आत्मनिवेदन ग्रंथ भाग २
‘ॐ कार’ साधना ही दिलेल्या अंगांनी करण्यानेच ह्या साधनेची प्राप्ती होईल. एकाच अंगाने उच्चार म्हटला गेला तर त्याचा लाभ हा शास्त्रीय दृष्टीने होत नाही.
पहिली अवस्था :- उच्चार-मध्य-लय ह्या अंगानी म्हणते वेळी प्रथमतः संथेने म्हणावयास पाहिजे.
संथेची वेळ खालील प्रमाणे —
‘ॐ’ ह्याचा उच्चार, मध्य, लय मिळून म्हणताना २ १/२ सेकंदात म्हणावा. जेव्हा साधकाची प्रगती दिसून येईल तेव्हा ५ सेकंदामध्ये व तिसरी पायरी यामध्ये ही संथा १० सेकंदात म्हणावी.
दुसरी अवस्था :-
१) उच्चार मध्य लय
२) स्वर ताल लय
ह्या अवस्थेपासून प्रमाण (Scale) व स्वर यांनी संथा म्हणावी लागते. कारण ह्या संथेमध्ये ॐ चा ध्वनी आपल्या वाणीतून म्हटला असता, वातावरणात ध्वनि–लहरी-ध्वनि निर्माण होतो. हा ध्वनि आपल्या वाणीतून उच्चारला जाऊन जेव्हा तो ऐकावयास येतो त्यावेळी प्रतिध्वनी ही क्रिया निर्माण होते. म्हणजे ध्वनि-लहरी-प्रकाश ही अवस्था. इथे ‘प्रकाश’ ह्याचा अर्थ ‘उजेड’ असा नसून साधकाला ‘प्रकाश’ ही अवस्था म्हणजे करीत असलेल्या साधनेची जाणीव होणे. ही क्रिया करीत असतां उच्चार हा ५ स्थानातून म्हणणे आवश्यक आहे. ती स्थाने म्हणजे : नाभी, हृदय, कंठ, ललाट व ब्रह्म ही होत. ह्या स्थानातून साधना करते वेळी उच्चार म्हणावा. अशा रीतीने साधना केली असता ५ कोशांचा लाभ आपोआप होत असतो. ही ५ स्थाने व ५ कोश यांवर आपले जीवन आधारलेले आहे. ह्या साधनेतील अवस्था प्राप्त होण्यास वेळ लागतो. पण जेव्हा ह्याची प्राप्ती होते म्हणजे ५ स्थाने व ५ कोश ह्यांचा विकास होतो तेव्हा साधकाला ५० टक्के प्राप्ती साधना केली असता होत असते.
तिसरी अवस्था :-
साधकाला ही अवस्था अत्यंत महत्त्वाची असून त्यामध्ये आपण जन्माला येते वेळी, आपण जो स्थूल देह आणतो त्याशिवाय आणखी दोन देह आहेत. पण आपल्याला ते दिसत नाहीत म्हणून आपल्याला एकाच देहाची जाणीव होते. जेव्हा आपले इष्टकाम हे प्रयत्न करूनही होत नाही तेव्हा आपण म्हणतो की कर्माचे संकट आहे. पण देताना देवाने तीन देह दिले असताना जर एकाच देहाने आपले प्रयत्न केले तर या ठिकाणी दोन देहांची कमतरता भासते व आपण संकट आले असे म्हणतो. एक देह हा जरी व्यक्त आहे तरी त्यामागे दोन देह अव्यक्त असतात. त्यांचा लाभ होण्यासाठी साधनेचा ‘मोक्ष किंवा सोक्ष’ म्हणजे या अवस्थेतील साधना होय. पहिल्या अवस्थेत जो ॐ केला त्यामध्ये काया-वाचा ह्या माध्यमांना लाभ झाला. आता तिसऱ्या अवस्थेत उच्चार-आचार-विचार यांचा लाभ तीन देहांना करावयाचा आहे, यासाठी संथा ही काळजीपूर्वक विचारात घेऊन उच्चाराचा शब्द शुध्द स्वरुपात म्हटला गेला पाहिजे. या दोन्ही अवस्था जेव्हा एकरुप होतील तेव्हा मन एकाग्र होईल. या अवस्थेत जेव्हा तिन्ही देहांना साधनेचा लाभ होतो तेव्हा नकळत ‘अहंकार’ म्हणजे ‘अहं आकार’ ही अवस्था प्राप्त होते. म्हणून पहिल्या अवस्थेत ‘स्थित्यंतर’, त्यानंतर ‘स्थिती’ व त्या नंतर ‘अवस्था’ ही जी अवस्था आहे याचा अर्थ कोणालाही सांगता येत नाही. म्हणजेच ‘साधना’ ही क्रिया आपल्या आचरणाने घडत असते. साधनेचा जो धर्म आहे तो आपल्या देहाच्या ठायी अनुभवास यावयास पाहिजे. मूळ ‘साधनेत’ धर्म म्हणजे देव नसून देव हे माध्यम मदत करीत असते. ज्यावेळी ‘साधनेत’ तीन अवस्थांची प्राप्ती होते तेव्हा त्याला ‘साधक’ असे म्हणतात.
पहिली अवस्था ‘स्थित्यंतर’ म्हणजे आपल्या मूळ आचार, विचार उच्चार यांचे एकरुपत्व होणे. त्यानंतर ‘स्थिती’ ही अवस्था प्राप्त होणे, म्हणजे आपले स्वतःचे सुख व दु:ख यापेक्षा इतरांबद्दल प्रेम निर्माण करणे व त्यानंतर साधनेतील अवस्था म्हणजे जगावर ‘परोपकार’ करणे यासाठी श्रीगुरुंनी जी ‘ॐ साधना’ शीकविली आहे याचा स्पष्ट अर्थ अहं, त्वम्, इदम्, असा होय. म्हणजे कृपेची प्राप्ती होणे.
आचार
उच्चार ५ से ५ से विचार.
चौथी अवस्था :- पहिल्या तीन अवस्थेत काया-वाचा-मन यांचे एकरुपत्व होते. त्यानंतर पंच स्थाने व पाच कोश ह्यांची प्राप्ती होते. जन्माला येणारा जीव याचे कार्य केवळ खाणे, पिणे असे नसून जन्माला आल्यावर प्राप्त जन्माचा विकास होणे आवश्यक आहे. ॐ साधनेच्या पहिल्या तीन अवस्थेत जीव, जीवात्मा यांची प्राप्ती होत असते. म्हणजेच जो आत्मा म्हणून आपल्यामध्ये आहे त्याच्या अस्तित्त्वाची प्राप्ती आता होत असते. जे पंचप्राण आहेत त्यातील केवळ अन्नमय कोशामध्ये आत्मा न राहता ॐ साधनेतून जीव, जीवात्मा व आत्मा ही क्रिया साधनेतून घडत असते व पाच कोश यामध्ये ‘चेतना’ अवस्था न राहता ‘चैतन्य’ अवस्थेची निर्मिती होते. म्हणजे इहजन्मात जे कार्य आत्म्याला करावयाचे असते ती त्याची इच्छा आता पूर्ण होत असते. यासाठी साधनेमध्ये उच्चार हा स्वरांत म्हटला गेला पाहिजे. ‘स्वर’ म्हणत असता ताल सांभाळला पाहिजे. हा ताल जर सांभाळता आला नाही तर पुढील अवस्था म्हणजे ‘सूर’ हा वाणीतून उच्चारला जाणार नाही, यासाठी ‘संथा’ ही महत्त्वाची आहे.
ह्या अवस्थेत ॐ कार उच्चार करीत असता हा उच्चार वाणीने करावयाचा असतो. अन्यवेळी आपण बोलतो, चालतो किंवा एखादे गाणे गुणगुणतो तेव्हा ही क्रिया ज्या देहाने उच्चारली जात असते त्याला ‘वाणी’ असे म्हणता येणार नाही. ॐ कार उच्चार वाणीने करीत असता जी माध्यमे कारणीभूत होतात ती येणेप्रमाणे – दोन ओठ, जीभ, (जिभेचे टोक), टाळा, श्वासोश्वास व स्वरयंत्र यांनी युक्त असा उच्चार करावयाचा असतो. सवयीने हळू हळू तो उच्चार आपल्या वाणीतून होणार आहे. ती वाणी म्हणजे आपण बोलतो तो शब्द किंवा स्वरयंत्र याचा उपयोग केला असता जो ध्वनी ऐकू येतो तो ध्वनी नाही. वरील माध्यमांचा वापर प्रथमावस्थेत ॐ काराचा ध्वनी करण्यासाठी केला जातो. हळू हळू श्वास हा जेव्हा कंठातील स्वरयंत्रातून बाहेर निघतो, त्या क्रियेतून जो ध्वनी निघेल, त्यास ‘ॐ कार’ म्हणतात. त्यासाठी वरील माध्यमे यांचा वापर कमीतकमी व्हावयास पाहिजे. ही साधना करण्यापूर्वी आपले बोलणे इतरांना समजण्यासाठी ह्या स्वर यंत्राचा वापर जरी आपण करीत असलो तरी त्या बोलण्यात ‘स्वर’ आहे असे म्हणता येत नाही. आपण व इतर आसमंतातील लोक जे वेगवेगळ्या स्वरांनी बोलत असतात, हे बोलणे देहिक क्रियेतून होत असते. ॐ काराचा उच्चार हा आत्म्याने करावयाचा असून ती साधना आत्म्यासाठी आहे. जेव्हा साधनेस सामुदायिकरीत्या आपण बसू त्यावेळी एका निश्चित स्वरावर आपल्या वाणीमध्ये अवधान असले पाहिजे. अशा रीतीने सामुदायिकरीत्या ॐ कार केला असता सर्वांना एकच स्वर ऐकावयास यावयास पाहिजे. आपला स्वर हा इतरांप्रमाणे जर मिळवता येत नाही तर त्याचा अर्थ ॐ कार साधना आपण देहाने करीत आहोत हे सिध्द होते. ॐ काराचा उच्चार करीत असता स्वराचे अवधान जर आपण ठेवले तर ‘सूर’ ही अवस्था सहज प्राप्त होत असते. ह्या चौथ्या अवस्थेत जे अंग ‘स्वर-ताल-सूर’ म्हणून आहे, त्यामध्ये स्वर हा वाणीतून ध्वनित होणे ही साधकाची देहिक अवस्था आहे. पुढे हीच अवस्था ‘सूर’ ह्या अवस्थेशी एकरुप व्हावयाची आहे, यासाठी ‘स्वर’ व ‘सूर’ हे इष्ट वेळात उच्चार करणे म्हणजे ‘ताल’ यांनी युक्त असा केला असता सूराचे रुपांतर ‘आत्मा’ या अवस्थेमध्ये होत असते. ह्याचा अर्थ ‘स्व-सूर’ ! म्हणजे सृष्टीचे सौंदर्य याचे गान सदैव सृष्टीमध्ये कार्यान्वित होत असते. अन्यथा आपण गाणे म्हणतो हा विकार देहाचा असून आत्म्याचा ध्वनि हा विचार म्हणजे इष्ट विकास याचा लाभ होतो. ह्या अवस्थेत आपले प्राप्त जीवन ‘वीणा’ व्हावयास पाहिजे. म्हणजे ‘सरस्वती’ किंवा ज्ञान होणे. ह्यासाठी ही चौथी अवस्था अत्यंत महत्त्वाची आहे, हे सूज्ञ भक्तांनी लक्षात ठेवले पाहिजे. केवळ ऐहिक जीवनाचा लाभ व्हावा बहीणयासाठी ॐ कार साधना तीन अवस्थांनी सूचित केलेली आहे व पुढील दोन अवस्था ह्या पारमार्थिक जीवनासाठी आहेत.
पांचवी अवस्था :- ह्याची ओळख आता साधकाला होणे आवश्यक असून साधनेचे मर्म म्हणजे ‘सांगता’ होणे, ह्याचा परिचय ह्या पाचव्या अवस्थेत ॐ करताना अनुभवास यावयास पाहिजे. पहिल्या अवस्थेत ‘ओळख’ हा शब्द लिहिला आहे, ’ओळख’ हा शब्द पूर्वजन्माशी सूचित आहे. कारण जे जे काही आपल्या हातून ज्ञान-अज्ञानाने घडत असते ते पूर्वसंचितावर अवलंबून असते. म्हणजे घडणारी घटना हीचा संबंध ‘ओळख’ म्हणून असल्याशिवाय त्याची पुनरावृत्ती इहजन्मात होत नाही. ह्याप्रमाणे पूर्वीच्या अनेक जन्मांपैकी आपण काही एका जन्मात काहीएक साधना केलेली असली पाहिजे. त्याशिवाय आज आपण ह्या गुरुमार्गात येत नाही. ह्याचा अर्थ इंग्लिशमध्ये असा की No Admission without permission ! म्हणजे काय, तर ह्या जन्मात आपली इच्छा देवाधर्माचे आचरण करावे किंवा करू नये अशी असते. पूर्वजन्माप्रमाणे हा जन्म होतो व त्या जन्मात सभोवार जे जग दिसते त्याप्रमाणे आपण वागावे असे वाटते. परंतु तसे वागून जेव्हा शांतता प्राप्त होत नाही, तेव्हा आपोआप आपल्या नकळत आपले मन आपण काय केले असता शांतता मिळेल याचा शोध घेऊ लागते. याचा अर्थ वरीलप्रमाणे आहे. पाचव्या अवस्थेत साधना करण्यापूर्वी चौथ्या अवस्थेत तीन देह म्हणजे तीन जन्म एकत्र येतात. ह्या तिघांपैकी प्रत्येकाने काहीतरी सत्कृत्य केलेले असते ते सत्कार्य ज्यावेळी आपण अडीअडचणीमध्ये येतो तेव्हा उपयोगी पडून साधकाला ज्या सुखशांती समाधानाची उणीव भासते ती उणीव भरून काढण्यासाठी निश्चित मार्गाची दिशा दाखवत असते. अनेक लोकांना असे वाटते की सत्कर्म खूप करावे म्हणजे आपली मुक्तता होईल किंवा मुक्ती प्राप्त होईल. पण मुक्ती देवाने द्यावी म्हणून नवस सायास किंवा देवाप्रीत्यर्थ साधना करून मुक्तता प्राप्त होत नाही. ही प्राप्ती देवाला प्राप्त करून मिळणारी नाही. ह्याची प्राप्ती साधकाला आपली आपणच करावी लागते. त्यासाठी ह्या पाचव्या अवस्थेवर जीवनाचा निर्णय अवलंबून आहे. म्हणजे इंग्रजीत म्हटल्याप्रमाणे ‘Hell or Heaven’ म्हणजेच करीत असलेल्या साधनेची ‘सांगता’ ह्या अवस्थेत आहे.
वरील सांगितलेली ही अवस्था हीचे महत्त्व देव प्रसन्न होणे किंवा मुक्ती प्राप्त होणे यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. ह्या अवस्थेत गुरुभक्ती करीत असता ‘काय आहे व काय नाही’ याचा शोध आपला आपणच घेतला पाहिजे. हे एकच साधन असे की ज्यामुळे तीन अवस्थांची प्राप्ती होते. ती म्हणजे इहलोक, परलोक व स्वर्गलोक. म्हणजेच पाच लोक यांची प्राप्ती ह्याच जन्मांत करता येत असून “प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे”, अशी अवस्था ह्यामध्ये आहे. मागील चौथ्या अवस्थेत ‘स्वर-ताल लय’ अशी संथा होती व आता पाचव्या अवस्थेत ‘सूर-ताल-नाद’ ही संथा म्हणावयाची सवय करावी. एवढेच नव्हे तर ह्यामध्ये देहिक व आत्मिक या दोन्ही तत्त्वांनी संथा म्हणावयाची असल्याने गुरुमार्गातील ही साधना किती सूचक आहे हे कळले पाहिजे. एकवेळ लाख रुपये कमवाल किंवा गमवाल. परंतु ही जी साधना सूचित केलेली आहे, त्यावेळी १०० % अवधान साधनेकडे असावयास पाहिजे व ही साधना सद्गुरुंनी सूचित केली आहे म्हटल्यावर ती प्राप्त होईतोपर्यंत सेवेची पराकाष्ठा करावयास पाहिजे. ही साधना पुढील आयुष्यात किंवा अडचण निवारण झाल्यावर आपण करू असे म्हणून चालणार नाही. याचे कारण या साधनेचा लाभ होण्यासाठी आपले काया-वाचा-मन उत्सुक नसते. ‘गुरुंची आज्ञा’ म्हणून आपण साधनेला प्रवृत्त होत असतो. पण ही प्रवृत्ती गतजन्मातील केलेल्या पुण्याईने उदीत झालेली असते व त्याचा लाभ ह्या जन्मात होण्यासाठी पुनःश्च तसे कर्म आपल्या हातून घडावे अशी सद्गुरुंची इच्छा असते. जर आपण अडीअडचणींच्या सबबी सांगून सेवा करण्यामध्ये दिरंगाई किंवा चालढकल करीत राहिलो तर पुनःश्च तशी संधी किंवा योग प्राप्त होणार नाही. कारण गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये हा खेळ ‘नाटक’ म्हणून चाललेला असतो. आपल्या समोर जे काही घडते ते सर्व ‘नाटक’ या स्वरुपामध्ये असते. पण ह्या घडणाऱ्या घटनेकडे ‘टक’ लावून पाहीले असता सत्य वस्तुस्थितीचा अनुभव मागाहून येत असतो.
चौथ्या अवस्थेमध्ये ‘स्वर’ म्हणून आपण म्हणतो त्याचा अर्थ शाब्दिक नसून ह्या जगाचे जे कार्य अव्याहत चालू आहे, त्या कार्यामध्ये सृष्टीचा समावेश आहे. जो स्वर त्याची उपपत्ती ब्रह्मांडीशी असून ते ब्रह्मांड पृथ्वीप्रमाणे स्वतःभोवती प्रदक्षिणा करीत असते, त्यावेळी त्या फिरण्याने जी गती निर्माण होते त्या गतीला ‘नाद’ असे म्हणतात. पुढे हा नाद सृष्टीकडे येतो. याचे कारण गुरुत्वाकर्षण हा धर्म पृथ्वीचा असून पृथ्वीकडे हा नाद येऊ लागल्यावर त्या नादातून पुढे सात स्वर निर्माण होतात. त्याच स्वरांना ‘सप्तलोक’ असे म्हटले असून पहिल्या स्वरात पहिल्या लोकाची प्राप्ती आम्हा मानवांना होत असते. इहजगतात जन्माला आल्यावर बालक जो पहिला आवाज उच्चारते तो पर्यायाने पहिला स्वर आहे. त्या स्वराला ‘रडणे’ असे गोड कौतुकाने जन्मदाते आईवडील म्हणत असतात. ह्याच रडण्याने आसमंतातील आप्तइष्ट जागे होतात किंवा आई जागी होऊन त्या बालकाची विचारपूस करू लागते. याप्रमाणे प्राथमिक अवस्थेमध्ये जो उच्चार म्हणजे रडणे तेसुध्दा ‘गाणे’ असून वारंवार गुरुंना भक्तांचे ‘रडगाणे’ ऐकावे लागते. पुढे मोठे झाल्यावर हेच बालक दुसरा स्वर म्हणजे ‘कुरकुरणे’ आदीचा उच्चार करते व त्यानंतर ते बालक सज्ञान होऊनही अज्ञानी होते. म्हणून ‘आणणे’ हा स्वर म्हणू लागते. असे तीन स्वर प्रथमांगी काया-वाचा-मनाने उच्चारल्यावर हा करीत असलेला उच्चार ‘ॐ ’ आहे का ‘बोंब’ आहे हे तुम्हीच ठरवावे. पहिले तीन स्वर हे जर बिघडले आहेत तर गुरु जी शिकवण देतात त्यावेळी उच्चार म्हणजे उत्पत्ती, स्थिती म्हणजे कुरकुरणे आणि लय म्हणजे रडगाणे अशी अवस्था प्राप्त होऊन आपण गुरुंच्या शोधात येतो. त्यावेळी प्रथमतः जी संथा जीवनारंभी बेसूर झाली आहे ती ठीक करणे हे काम किती महान आहे हे फक्त परमेश्वराला ठाऊक आहे. सद्गुरु सेवेत ठाऊक काय आहे हे गुरूंना माहित असते. परंतु भक्ताच्या ठिकाणी ‘ठाव’ केव्हा सापडेल याचा नेम नाही. आज गुरुमार्गात आहे म्हटल्यावर सूरात साधना किंवा आरती म्हणेल, पण गुरुंच्या मनाप्रमाणे ‘वाकणे’ हे त्याला पथ्य असल्यामुळे जेव्हा त्याच्या मनाप्रमाणे घडत नाही तेव्हा हा भक्त ‘असुर’ होऊन बाहेर ‘सूर’ शोधण्यासाठी पुनःश्च जीवनास आरंभ करतो. पहिली अवस्था म्हणजे पहिला सूर याची निर्मिती ही रडण्यामध्ये आहे व आपण जन्म घेतेवेळी रडण्यासाठी आलेलो नाही ही जाणीव ठेवून जेव्हा आपण कृपेच्या शोधार्थ येतो तेव्हा हे रडगाणे नसून हा ‘राग’ आहे असे जगाला पटले पाहिजे. ह्या रागातून जेव्हा स्वराने व सूराने विश्वाचे गान भक्त गाईल तेव्हा ही सृष्टी धन्य होईल.
ॐ कार साधना ही श्रीभैरवनाथांनी सांगितली. तिचे महत्त्व सुरुवातीला वाटले नाही. मी औदुंबरला आलो असता नित्य नियमाने प्रथमतः ॐ कार करीत होतो. पण पुढे ही नित्याची साधना होईल असे वाटले नाही. त्यावेळी ॐ काराचे महात्म्य वेगळे वाटायचे. मग एके दिवशी लख्ख प्रकाश असा पडला की जसा प्रकाश अमावस्येला अनुभविला होता, तसे इंद्रधनुष्य हे चांदण्यात पाहीले. इंद्रधनुष्यात जे सात रंग असतात ते सूर्य प्रकाशात दिसतात. पण त्या दिवशी पौर्णिमा होती. माघ महिना होता. त्या दिवशी श्री हाजीमलंगबाबांचा उरूस होता. त्या दिवशी सायंकाळी प्रार्थना केली असता आकाशात ‘अभोगी’ चे सूर ऐकू येऊ लागले व हळू हळू आकाशात त्या सूरांचे रंग उमटले व शेवटी हे इंद्रधनुष्य आहे पण आकाशात पाहतो ते नसून हे स्वरांचे आहे ही जाणीव झाली. ‘इंद्र’ हा देवांचा राजा. ‘स्वर’ हा गाण्यांचा राजा, ‘सूर’ हा धनुष्याचा बाण. तो सूर आकाशाकडे चालला आहे असे पाहिले व त्यावेळी श्री हाजी मलंगबाबांचे शब्द ऐकू येऊ लागले की “पाँच पीर को याद करो”. याचा अर्थ ‘पाच स्थानातून उमटणारे पाच स्वर व पाच स्वरांचा एकच राजा म्हणजे इंद्र – आत्मा ! आपल्याला जे जे दिसते ते १८० अंश जग आहे, पण प्रत्यक्षात ते आहे ३६० अंश. यावेळी जाणीव झाली की विश्व हे ३६० अंश आहे. परंतु प्रत्यक्ष १८० अंश दिसते. म्हणजे दर्शन होते ते दर्शन पिंडाचे आहे. १८० अंश ब्रह्मांडाचे आहे, यासाठी १८० अंश जे जे दिसते ते धनुष्य होय ! हा शब्द ‘ध + मनुष्य’ असा आहे व ‘ध’ च्या पुढे गुरु भेटल्यशिवाय जाऊ नकोस” असा इशारा त्यांनी दिला याचा अर्थ ‘सा-प’ हा जरी साध्य झाला तरी गुरुची भेट होईल तेव्हाच ‘प-सा’ ची प्राप्ती होईल. तोपर्यंत संयम ठेव. नाहीतर ‘यम’ वाट बघतो आहे. त्याला चकविणे वाटते तितके सोपे नाही. आजचा दिवस उरूसाचा आहे. अल्लाकी दुवा है ! सलाम आलेकुम ! ”
त्या रात्री झोप आली नाही. पहाटे तीन वाजेपर्यंत काहीतरी ध्वनि माझ्या कानाशी ऐकू येत आहे असे वाटले म्हणून तीन वाजता उठल्यावर स्नानास गेलो. तेव्हा स्नान झाल्यावर प्रातःस्मरण करीत असता तोच ध्वनि अधिक स्पष्ट झाला. त्याकडे लक्ष देऊन ऐकू लागलो. ‘ध्वनि-लहरी-ध्वनि’ असा शब्द समजला. याचा अर्थ काय आहे ! म्हणून विचार करू लागलो. कारण श्रीभैरवनाथांनी ॐ कार हा पांच स्थानातून शिकविला होता व आज तर त्याचे रूपांतर ‘ध्वनि-लहरी-ध्वनि’ असे म्हणताना ऐकले. त्या म्हणण्याचा अर्थ ‘संथा’ असा आहे. भवितव्यात हीच संथा रोज ब्राह्म मुहूर्तावर म्हणावयाची आहे. ही संथा म्हणताना देहातील पाच स्थानांचा समावेश होतो आहे की नाही हे अनुभवले. ही पाच स्थाने आपल्या देहामध्ये आहेत हे पहिल्यांदा समजले व ह्या पाच स्थानांचा संबंध करीत असलेल्या साधनेतून जोडावयाचा असतो हे ज्ञात झाले. म्हणजे प्रथमतः नाभी स्थान व शेवटी ब्रह्म स्थान. देहात चौऱ्यांशी योनी असून त्यांचे कार्य काया-वाचा-मन द्वारा होत असते. त्यावेळी पहिली योनी ही नाभी स्थान याच्यातून निर्माण होते व अशा रीतीने ब्रह्मस्थानापर्यंत ह्या राहिलेल्या योनींचा समावेश होऊन त्यांचा संबंध ह्या पाच स्थानांशी म्हणजे पाच कोशांशी आहे. त्या योनींचे कार्य योनी आहेत म्हणून होणार नाही, तर आपण करीत असलेली साधना त्या साधनेत ह्या योनी अंतर्भूत व्हावयास पाहिजेत. पूर्वी अनेक वेळा ‘चौऱ्यांशी लक्ष योनी’ म्हणजे मनुष्य जन्म हा चौऱ्यांशी लक्ष योनींमधून जन्म घेतल्यावर येतो असे ऐकले होते. पण त्या दिवशी असे स्पष्ट कळले की ‘लक्ष’ याचा अर्थ संख्यावाचक नसून ‘लक्ष दे’ असा आहे. तेव्हा गुरुमार्गामध्ये प्रथमतःच बोध झाला असे म्हणता येईल. जसे शाळेत गेल्यावर प्रथमतः ‘श्रीगणेश’ लिहिता, बोलता येतो, त्याप्रमाणे साधकाला आपली साधना ही क्रिया यातून ‘क्रियापद’ म्हणजे ‘बोध होणे’ आवश्यक असते. नुसते वर्षानुवर्षे साधनेच्या नावाखाली देहाने क्रिया करणे म्हणजे साधना नसून, त्या साधनेचे ‘फल’ काय ? हे साधकाला कळले पाहिजे. त्याप्रमाणे त्या दिवशी प्रथमतःच मनुष्य जन्म प्राप्त होतो म्हणजे काय क्रिया घडते व काय घडवावयाची आहे, हे स्पष्ट समजले म्हणजे मनुष्याला येणारा जन्म हा नऊ महिन्यात होत असतो — ही क्रिया नऊ महीन्यात होते, पण त्या क्रियेचे ‘पद’ प्राप्त होणे हे त्याच्या आचार-विचार व उच्चारावर अवलंबून आहे. ह्या क्रियेलाच ‘पुण्य’ असे म्हणतात. हा बोध झाल्यावर डोळ्यांसमोर लहानपणी जे चित्र शेषशायी भगवान श्रीविष्णुचे पाहीले होते, त्यात त्यांच्या नाभीस्थानातून वेल येऊन त्या वेलात शेवटी कमळामध्ये ब्रह्मदेव आहेत असे चित्र होते. त्या चित्राची ही कल्पना त्याकाळी असे. पण प्रत्यक्ष आज त्याचा अनुभव अनुभवायचा आहे अशी भूक जाणवली. नाभीस्थानातून आपला जो उदय झाला आहे, जन्म नव्हे, त्यात उदय हे जन्माचे बीज असून, त्या बीजाला खत-पाणी घालणे म्हणजे संगोपन करणे हे आम्हा मानवांचे जन्मतःच इष्टकर्तव्य असून त्यासाठी गुरुंचा उपदेश म्हणजे बोधामृत मिळाले असता जन्माचे सार्थक होत असते. त्या बोधामृताने आपले हे जीवन ‘ईश्वरमय’ होते.
अशा अवस्थेत दिवस जात होते. यावेळी असे विचार येऊ लागले की आपण कोण ! व आपले नाते ह्या जगाशी काय ! म्हणून आपण ह्या ठिकाणी आलो ? कशाला हा खटाटोप आपण अंगावर घेतला ? जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात संग्राम हा आहेच. जय किंवा पराजय यापैकी एक अवस्था कुणाच्यातरी वाट्याला येणारच. भवितव्यात आपण करीत असलेली ‘साधना’ हीला दोन फले आहेत. एक स्वतःचा उध्दार किंवा जगाचा म्हणून प्रश्न चिन्ह समोर उभे राहीले. अशी अवस्था कधीच झाली नाही किंवा एक वर्षांत हा प्रश्न जाणवला नाही. नुकताच श्री हाजींबाबांचा उरूस झाला त्यावेळी “पाच पीरांची उपासना कर, ते तुझा व जगाचा सांभाळ करतील”, असे अभिवचन श्रीबाबांनी दिले होते. अशा वेळी एखाद्या नदीमध्ये जशी नावेची अवस्था होते त्याप्रमाणे माझी झाली. त्यावेळी मन एकाग्र होईना, नित्य सेवा चालू होती. पण जर मन एकाग्र होत नाही तर सेवेत व्यत्यय येणे हा प्रमाद न कळत हातून घडत आहे म्हटल्यावर मनाला खंत वाटू लागली. गेल्या आठवडाभराचे अवलोकन केले म्हणजे आचार-विचार यांचे अवलोकन केले. कारण जी ‘साधना’ आपण करतो त्याची प्रमुख अंगे आचार-विचार ही आहेत. आपले नामीतत्त्व अदृष्य रूपात वास करीत असते. अशावेळी त्याचा शोध घेतला पाहिजे. नाहीतर आपली साधना सिध्द होणार नाही व साधना सिध्द झाली किंवा नाही हे जगाला काय माहीत ! फक्त जगाला ज्ञात होते की मी औदुंबरला सेवेसाठी राहिलो आहे. अशावेळी खोटे बोलणे व वागणे हे मनाला पटेना. शेवटी चौथ्या दिवशी सायंकाळी देवळाच्या परिसराच्या बाहेर जाऊन बसलो व विचारमालिका सुरु झाली. पण काही मूळ अवस्थेचा निर्णय लागेना. त्यावेळी झोप लागली असे नाही पण गुंगीत आहोत अशा अवस्थेत एक दृष्य पाहीले की, कोणी एक यात्रिक ह्या तीर्थक्षेत्री आला आहे व आपल्या दिवंगत वडिलांची इच्छा म्हणून रू. ५१/= देवाच्या नावाने खर्च करावेत म्हणून हा यात्रिक औदुंबर क्षेत्री आला. त्यावेळी मी दररोज सायंकाळी नदीच्या दुसऱ्या तीरावर एक देवीचे देऊळ आहे तेथे दर्शनासाठी जात होतो. त्यावेळी या यात्रिकाने देवळाच्या आसपास विचारपूस केली की कोणी ‘सेवेकरी’ सेवा करीत आहे का ! तेव्हा पुजाऱ्यांनी माझे राहण्याचे ठिकाण त्याला दाखविले व ते नदीच्या पलीकडे देवीच्या दर्शनासाठी गेले आहेत म्हणून सांगितले. तेव्हा या यात्रिकाने वडिलांप्रीत्यर्थ आणलेले रू. ५१ /- माझ्या आसनाखाली ठेवले व नमस्कार करून तो निघून गेला. हे दृष्य पाहताक्षणी मी धावत देवळाकडे आलो व माझ्या राहण्याच्या ठिकाणी जे आसन होते ते उचलले. त्या बरोबर जसा विंचू चावावा तसे दृष्य मला दिसले व गुरुंचे शब्द आले “हे पैसे नसून साधनेत अडथळा निर्माण करणारे विष आहे. त्यापासून दूर राहा कारण हे जे विष याचा ‘विषय’ साधनेत सिध्द करावयाचा आहे. त्याची प्रचिती तुला दाखविली. आता जे विष त्याचा विषय सिध्द कर. पुढे जगाला ‘अमृत’ पाहिजे आहे, त्यासाठी जे विष प्रत्येकाच्या पिढ्यान् पिढ्यामध्ये आहे त्या विषाचे विमोचन कर. म्हणजे भवितव्यात या पिढ्यान्पिढ्या सुखी होतील”.
‘विमोचन’ हा विषय दोन प्रकारांनी करावयाचा असतो. पहिल्या प्रकारात जीवनातील कर्मपरत्वे निर्माण होणारे दोष असतात. जीवनात ज्ञान अज्ञानाने घडलेल्या कर्मामुळे हे दोष निर्माण होतात व ह्य़ा दोषांचे विमोचन पश्चातापाने करता येते. जेव्हा दोषांची प्रखरता अधिक असते तेव्हा ते कर्म शिल्लक राहाते व पुढील जन्मात किंवा ज्या घराण्यात आपला जन्म झाला आहे त्या घराण्याला ते कर्म दोष म्हणून भोगावे लागते. जेव्हा ही व्यक्ती दिवंगत होते तेव्हा त्या कर्माला कुणी वाली नसल्याने ते कर्म वासनेच्या रूपाने शिल्लक राहून त्या घराण्याच्या सर्व व्यक्तींच्या भोवती हिंडत असते. अशावेळी तो आत्मा या कर्माशी संबंधित राहते व तो ते कर्म व त्यातील दोष कमी करू शकतो. पण त्यासाठी जन्म घेण्याची इच्छा किंवा वासना आत्म्याला होणे ही अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही कारण पुनश्च जन्म घेतेवेळी आत्मा सज्ञान होऊन असा विचार करता होतो की कर्माचा जो भोग आहे तो काही कालपर्यंत भोगावा लागेल. परंतु राहीलेला काळ म्हणजे आयुष्य यातून पुनश्च परलोकवासी झाल्याशिवाय सुटका नाही. असे जे कर्म त्याच्या प्रखरतेवर दोषांची प्रखरता अवलंबून असते व हे कर्म व त्याचे अस्तित्त्व हे कुटुंबात अनुभवाला येते. असे जे दोषयुक्त कर्म ज्यामध्ये त्या संबंधित आत्म्याचा समावेश होत नाही, त्या कर्माचे विमोचन त्या कुटुंबामध्ये होत असलेला दानधर्म, व्रतवैकल्य आदींनी होऊ शकते. अशा रीतीने कुटुंबात किंवा वैयक्तिक जीवनात धारण झालेला दोष त्या जीवनात अधिक चांगले कर्म करण्याने ह्या दोषांचे विमोचन व त्या दोष परिमार्जनार्थ वरील प्रमाणे सेवा केली असता त्याचा लाभ स्वतःला व कुटुंबाला होत असतो. विमोचन साधनातील हा पहिला प्रकार असून ह्या अवस्थेमधले जीवन जगतामध्ये ५०% लोकांना अनुभवास येते.
विमोचनातील दुसरा जो प्रकार आहे, त्यामध्ये दोष किंवा कर्म हे इहलोकामध्ये वलयरूपाने राहून त्याचा त्रास कुटुंबात किंवा घराण्यात होत असतो. ह्या कर्माचा प्रादुर्भाव हा जसा क्षयरोगी असतो, त्याप्रमाणे असतो. म्हणजे हा दोष त्या कुटुंबातील व्यक्तींची प्राणहानी करत नाही तर ज्या सुख, शांती, समाधानाची गरज आम्हा मानवांना असते त्या सुखात असूनही सुख हे अनुभवता येत नाही. याचे कारण या प्रकारात म्हटले तर सुख आहे म्हटले तर नाही. अशी परिस्थिती असून कर्म + आत्मा हे वलयरूपाने त्या कुटुंबाच्या सभोवार हिंडत असतात व अशावेळी कुटुंबात जन्माला आलेली माणसे कर्तृत्ववान होतात, परंतु इहजन्मात आपले कर्तव्य काय हे विसरून कुठूनही प्राप्त झालेल्या धनाचा क्षय होण्यासाठी ह्या व्यक्तीचे जीवन हे व्यसनाधीन होत असते. ही पराधीनता निर्माण झाल्यावर प्राप्त होणारी लक्ष्मी हिचा विनियोग सत्कारणी होत नाही. पुढे हे दोष इतके तीव्र होतात की प्रथमतः वंशातील संपत्ती व संतती आदींचा लाभ होण्याऐवजी आपत्तीचा लाभ होत असतो व पुढे कालकालांतराने ‘विद्या’ हिचाही मागमूस कुटुंबात राहात नाही.
ही संकटे आपणच निर्माण केलेली असतात. जन्माला येतेवेळी १००% कर्म देवाने दिलेले असते. त्यापैकी फक्त २५% कर्माचा उपभोग जन्मामध्ये घ्यावयाचा असून बाकीचे कर्म म्हणजे कर्तव्य इतरांसाठी आहे असा जीवनाचा अर्थ आहे. हे कर्तव्य करण्यात आपण चालढकल करू लागलो तर त्याचा परिणाम वरील दोषांमध्ये होत असतो. कर्तव्यपरत्वे जीवन जर मनुष्य जगू लागला तर जीवनामध्ये ‘संकट’ म्हणजे काय हा प्रश्न देवाला विचारावा लागेल. या उलट आज अशी परिस्थिती आहे की मी जन्माला येतेवेळी जे काही आहे ते माझेच असून तुझे जे काही आहे ते ही माझेच आहे, असे म्हटल्यावर जगावे कसे ? जीवनात परोपकार हा धर्म असून तो धर्म आज नैवेद्यालासुध्दा शिल्लक राहीलेला नाही. यावेळी परमेश्वर असे म्हणत असतो की, “अरे प्राण्या ! तुला जन्म दिला त्या जन्मांत संकष्टीचे व्रत करावयाचे ते सोडून संकटाचे व्रत घेतले आहेस, त्याला मी तरी काय करणार ? जेव्हा तुझी कुठल्या जन्मांत गुरुंची गाठ-भेट होईल तेव्हाच हा दोष निवारण होऊ शकेल”. ज्या कर्मात वासनेने आत्मा अडकला आहे किंवा गुंतला आहे, त्याची मुक्तता ही सद्गुरुशिवाय कोणालाही करता येत नाही. या आत्म्याला इहजगतातून परलोकात इष्ट स्थळी पाठवावयाचे असते. अशावेळी ज्यांना आपण ‘सद्गुरु’ असे म्हणतो त्यांचा अधिकार इहलोक, परलोक व स्वर्गलोक यावर कार्य करता होईल तेव्हाच आत्म्याची मुक्तता होईल. अन्यतः कोणीही सांगणे व त्या प्रमाणे घडणे हे जगतात क्वचितच पहाण्यास किंवा अनुभविण्यास मिळते. बाकीचे ‘गुरु’ हे नामधारी असून त्यांच्या हातून हे कार्य लोक-कल्याण म्हणून. करता येणे नाही. लोक-कल्याण म्हणजे आपल्यासमोर जे जग दिसते आहे त्याचा उध्दार ! पण यांचे बाबतीत ‘उध्दार’ म्हणजे इतरांचा पदोपदी ‘उध्दार करणे’ असे होत असते.
लोक-कल्याणाची भूमिका ही आपण स्वीकारायची नसून ते कार्य आपली पात्रता पाहून आपल्यावर सोपवलेले ईश्वराचे कार्य असा आदेश असतो. ह्या ठिकाणी आज्ञा व आदेश ह्य़ात जमीन-अस्माना एवढा फरक आहे. ‘आज्ञा’ ही आचरणात आणावयाची असून ‘आदेश’ हा विचारात आणावयाचा असतो. तेव्हा जे जग आपण पाहतो ते जग आपल्या इच्छेप्रमाणे होण्यासाठी जोपर्यंत ईश्वराचा आदेश मिळत नाही, तोपर्यंत आपण कार्य करतो आहोत असे म्हणून चालणारे नसून त्याचे फल हे सर्वस्वाने ईश्वराच्या अधीन आहे, अशी कार्यकारण भावना जेव्हा साधक-भक्त ह्यांच्यात धारण होईल तेव्हाच दुसरा भाग जो विमोचनाचा आहे त्याचा लाभ जगतातील दु:खी लोकांना मिळेल. अन्यतः धार्मिक विधी, तीर्थक्षेत्रे व तीर्थक्षेत्री राहणारे उपाध्ये यांचा ‘उपाधी’ हा त्रास भक्तांच्या मागे लागतो. ह्य़ापेक्षा अधिक धर्म आहे असे म्हणता येणार नाही
वरील दोष निवारणार्थ उपाय असा आहे की प्रथमतः ज्या आपल्या घराण्याच्या इष्ट देवदेवता आहेत त्यांची कृपा आपल्यावर व्हावयास पाहिजे. ह्या कृपेला अनुसंधान म्हणून जो धार्मिक विधी शास्त्राने सांगितला आहे, तो विधी यथासांग करावयास पाहिजे. ज्या इष्ट देवदेवता आपल्या घराण्याला असून त्यांचे कुलधर्म, कुलाचार म्हणून सांगितले आहेत त्या देवदेवता उत्पत्ती, स्थिती व लय अशा अवस्थेत जगतात वास करीत असतात, तेव्हा प्रथमतः ‘उत्पत्ती’ ह्या अवस्थेमध्ये ज्या देवदेवता असतील त्यांचा विचार करून त्या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी काय काय धार्मिक विधी आहेत त्याचे शास्त्र, साधकाला अवगत होणे आवश्यक आहे. अशा रीतीने पुढे गेलो असता, स्थिती अवस्था व नंतर शेवटची म्हणजे लय या अवस्थेचे जे प्रधान दैवत असेल त्याची कृपा व्हावयास पाहिजे. म्हणजे जो दोष कुटुंबात आहे त्याचे निवारण ह्या तीन देवतांची कृपा होण्याने होत असते. पुढे आत्म्याला सद्गती प्राप्त करून घ्यावयाची असते. त्यासाठी सदगुरुंची कृपा असावयास पाहिजे. इतके शास्त्र यामध्ये असल्याने, कर्मामध्ये जे दोष आहेत त्यांचे अनुमान नुसते संकट आहे असे म्हणून चालणार नाही.
हा विमोचन विधी सिध्द होण्यासाठी जो संकल्प करावयाचा असतो त्या संकल्पात दोषांचे कारण स्पष्ट उच्चारले गेले पाहिजे. केवळ आपण करीत असलेली साधना यामध्ये देवदेवता व गुरुदेव यांची कृपा आपल्याला प्राप्त झाली आहे असे म्हणून चालत नाही. कारण पुढे या कृपेने येणाऱ्या भक्तांचे विमोचन करावयाचे आहे म्हटल्यावर हे साधन प्रथमतः ‘शास्त्र’ म्हणून उपयोगात आणावयाचे व पुढे त्याचे ‘शस्त्र’ हेही उपयोगी पडले पाहिजे. अन्यतः नुसता संकल्प करून जर उच्चारला गेला तर इतरांचे विमोचन करण्याआधी करीत असलेल्या साधकाचे ‘मोचन’ होत असते. हा विधी बहुतांशी साधकांना अवगत नसतो. यामध्ये जी साधना आहे ती साधना करीत असतां, प्रधान तत्त्व ‘गुरु’ असावयास पाहिजे व गौण उपासना इष्ट देवदेवतांची करावी लागते. पुष्कळांना या मार्गात साधना व उपासना याचा अर्थ न समजल्यामुळे व दोन्ही क्रिया देहिक माध्यमातून करता येत असल्यामुळे ‘हा विधी करून पहा’ किंवा ‘तो विधी करून पहा’ असे मार्गदर्शन ते करीत असतात. म्हणून हा विधी सूचित करण्याआधी परमपूज्य हाजीमलंगबाबा यांनी सकाळी गुरुंची साधना व ॐ कार अशी सेवा व सायंकाळी इष्ट देवदेवता यांची उपासना करण्यास सूचित केले. त्याप्रमाणे रोज सायंकाळी मी औदुंबर क्षेत्री जी कृष्णा नदी आहे तिच्यापलीकडे जे देवीचे देऊळ आहे तेथे जात होतो. त्या देवीचे नाव ‘भुवनेश्वरी’. आमच्या घराण्याची कुलदेवता व कुलदैवत हे कोल्हापूरची महालक्ष्मी व ज्योतिबा असे आहे पण त्यावेळी रोज उठून कोल्हापूरला कसे जाणार ? तेव्हा पर्याय असा सूचित केला की, “जे देऊळ नदीच्या पैलतीरावर आहे, ती देवी हीच कुलस्वमिनी संबोधून तिची उपासना सुरु कर”. त्यासाठी ‘श्रीदेवीमहात्म्या’चा अध्याय व नामस्मरण व
।। सर्व मंगल मांगल्ये । शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्रंबके गौरी । नारायणी नमोस्तुते ।।
हा मंत्र अकराशे वेळा म्हणून मी परत येत असे. त्या सेवेत एकादशीचे महात्म्य अधिक आहे म्हणून एकादशीचे स्तोत्र मी एकादशीच्या दिवशी म्हणत असे. ह्या दोन देवता म्हणजे उत्पत्ती व स्थिती. यांची प्राप्ती करावयाची व पुढे ‘लय’ या तत्त्वाची देवता ‘श्रीशंकर किंवा मार्कंडेय’, यांचे स्तोत्र व कवच आदी सेवा प्रामुख्याने करावी लागली. ह्या सेवेत ह्या तिन्ही देवतांचा नामनिर्देश करून या तीन देवता जेव्हा प्रसन्न झाल्या तेव्हा चौथी शक्ती म्हणजे, विमोचनाचा संकल्प सिध्द झाला. यासाठी उपासना करण्याआधी संकल्पाचा प्रथमतः उच्चार करावा लागतो व उच्चार ज्या वाणीने म्हणावयाचा ती वाणी प्रथमतः सिध्द होण्यासाठी ॐ कार साधना, नंतर गुरुकृपा व नंतर इष्टदेवता असा क्रम या नित्य साधनेमध्ये सांगितला होता. त्यासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो संपूर्ण वेळ सत्कारणी लागत असे त्यामुळे आपण किती वर्षे सेवा करतो आहोत व आजही चालू आहे याचे अनुमान सांगता येत नाही. फक्त डोळ्यासमोर एवढेच अवधान होते ते म्हणजे होणारा बोध यात ‘सत्कर्म योगे वय घालवावे । सर्वांमुखी मंगल बोलवावे । ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही’ एवढेच चिंतन आयुष्यात करण्याच कर्तव्य या जगात जन्माला येऊन करावयाचे आहे हा बोध होता. यापेक्षा चिंता करून काही एक पर्याय नव्हता. कारण करीत असलेली साधना, उपासना, बोध, बोधामृत, अवधान हे व्रत आपण घेतले आहे. यापलीकडे जग आहे किंवा नाही याचा शोध घेतला नाही “ह्याचा शोध घेऊ नकोस. आज जगाला शोधण्यापेक्षा साधना पूर्ण झाल्यावर जग तुला शोधत येईल”, असे अभिवचन सद्गुरुंनी दिले होते. त्याची अनुभूती पुढे कार्यारंभ करते वेळी आली. ती म्हणजे जो विधी जगासाठी सिध्द केला होता त्याची सिध्दता ही येणाऱ्या भक्तभाविकांना देऊन त्यांना सुखी करणे याचा अर्थ हे कार्य म्हणजे शेतात धान्य पेरणे व धान्य आल्यावर ते वेचण्यासाठी आहे विकण्यासाठी नव्हे असे अनुमान येणाऱ्या भक्तभाविकांना दिले पाहिजे. हा दुसरा संकल्प होता. पहिल्या संकल्पात साधनेत ज्याचा उच्चार केला त्याची सिध्दता असून ज्यांनी ह्या संकल्पाचा स्वीकार काया-वाचा-मनाने केला आहे, त्यांच्या दोषांचे निर्मूलन व्हावे असा संकल्प द्यावा लागतो. पहिल्या संकल्पात आपण होतो व दुसऱ्या संकल्पात भक्तभाविकांचा समावेश होत असतो. ह्याचा अर्थ ‘कृपाशिर्वाद’ ! असा असावयास पाहिजे.
हे कार्य विचार करण्यापलीकडे आहे. ज्या दिवशी या संकल्पाची भूमिका मला समजली तेव्हा हे ज्ञान झाले की, जगतात जन्माला येण्यात सुख नसून सुखासाठी जन्म येतो हेच मुळी अज्ञान आहे. कारण जन्म प्राप्त झाल्यानंतर सुखाच्या पोटी आपल्या ठिकाणी हव्यास एवढा असतो की, शेवटपर्यंत हा हव्यास प्रत्येक मनुष्याला पुरून उरतो. ह्या उरण्यामुळे जरी जन्माला येणारा मनुष्य सुखी झाला असता तरी बरे झाले असते. पण हा अज्ञानाचा शाप असून त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे मनुष्य जन्म-मरणाच्या बंधनामध्ये अडकलेला असतो. ह्या जीवनात बंधन-रहित असा जन्म केव्हा प्राप्त होईल हे सांगता येत नाही. कारण जो कोणी जन्माला येतो त्याचा विषय ऐहिक जगाचा विलास भोगणे हाच असून ह्या व्यतिरिक्त जीवनात काही अन्य विषय असतील असे काही वाटतनाही. मला प्रत्यक्ष मरणोत्तर जीवनानंतर आत्म्याला काय अवस्था व यातना भोगाव्या लागतात व त्याला प्राप्त होणारी गती काय आहे याचे ज्ञान झाले. पण हे न समजता केवळ ‘एक्कावन रूपये’ एवढ्या दक्षिणेवर आपल्या वाडवडिलांना सद्गती प्राप्त होण्याची तरतूद पुरेशी आहे असे त्यांचे वंशज मानतात. यापेक्षा त्या वंशाने ‘श्राध्द’ हा विधी केवळ वासनेपासून आत्मा मुक्त व्हावा म्हणून करावयाचा नसून ‘श्राध्द’ ह्याचा अर्थ दिवंगत व्यक्तीबद्दल ‘श्रध्दा’, ही जर आपण ठेऊ शकलो तर ह्या दिवंगत व्यक्तीला उत्तम प्रकारे सद्गती सहज मिळेल. जी व्यक्ती दिवंगत झाली आहे, तिने आपल्या संसारामध्ये आपल्या वाट्याला जे जे काही असेल ते ठेवून जाणे हे कर्तव्य ह्या जीवाचे आहे, पण आत्म्याला वासनेच्या पोटी जन्म घ्यावा लागतो व जन्म प्राप्त होऊनही वासना संपत नाहीत. मग पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्याचसाठी जन्माला येणे हा क्रम जगतामध्ये वर्षानुवर्षे चालत आला तर ह्या जगात शांतता कशी लाभावी ? हा ‘भस्मासुर’ वासनेच्या पोटी जन्म घेतो आहे म्हटल्यावर, त्याची मुक्तता ही कधी होणे शक्य नाही. असा विचार त्या दिवशीपासून नव्याने निर्माण झाला. त्याचे कारण हे आपण पाहतो आहोत ते जग सुखी नसून ते सुख हा दु:खाचा पाया आहे. त्यावर सर्व जग उभे असून हा भस्मासुर केव्हा जगाचा अंत करील हे सांगता येत नाही. त्यावेळी अशी भीषण कल्पना मनात रुजली की जे जग आज आपण पाहतो आहोत, त्याहीपेक्षा अधिक प्रखरता कालांतराने निर्माण होईल तेव्हा कोणत्या मार्गाने म्हणजे साधनेने हे वासनेमधील बध्द झालेले जीव आहेत त्यांची सुटका सुलभ अशा मार्गाने होईल ही विवंचना मागे लागली. स्वीकारलेल्या मार्गापासून वंचित होणे हे साधकाला किंवा गुरुभक्ताला भूषणावह नाही म्हणून त्या दिवशी निश्चय करून गुरूंच्या चरणावर लोक जो पंचामृताचा अभिषेक करतात पण त्या दिवशीचा अभिषेक मी अश्रूंनी केला की “या जगाचे कल्याण करण्याचे सामर्थ्य माझ्यात नसून जर आपली कृपा झाली तरच हा डोंगर बाजूला सारणे शक्य आहे”. त्या दिवसापासून मार्गदर्शनाप्रमाणे सेवा ही ‘दृष्टांत’ म्हणून स्वीकार केली. आपल्या सभोवारचे जे जग इहलोकी वास करीत आहे, त्या जगाला पुनश्च सुखी पाहणे हे आपले आद्य कर्तव्य असून तोपर्यंत ती दृष्टी अंतर्मुख करणे व बाहेरची दृष्टी हिचा अंत करणे अशी सेवा स्वीकारून ज्या योगे नितध्यास लागला आहे, त्यासाठी
“कोटी ब्रह्महत्या हरिती, करिता दंडवत ।
लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात ।”
अशी कृपा सद्गुरूंची आहे. परंतु नित्याच्या सेवेमध्ये ही आरती जेव्हा सर्व भक्त मोठ्याने आरडून म्हणत असतात त्यावेळी त्याचा अर्थ काय ‘गोड’ आहे हे समजणे शक्य नाही. पण किती ‘गूढ’ आहे हे मला समजले. त्यामुळे हे जग एवढे महान असून या जगाला आपण पुरे पडू की नाही हा संभ्रम वाटू लागला. पण कृपाशिर्वादाची ठेव आपल्याकडे आहे म्हटल्यानंतर जग हे जरी महान असले तरी आपण लहान होणे हे जगताच्या हिताचे आहे. ज्याप्रमाणे साखर ही घरात डब्यामध्ये असते तेव्हा त्या साखरेचा स्वाद, गोडी मुंगी अनुभवते. हत्ती हा महान असून दरवाज्याच्या बाहेर डुलण्यासाठी त्याचा देखावा दिसतो. परंतु मेवा हा मुंगीला मिळत असतो. त्याप्रमाणे सेवा करीत असता उपासना व साधना हे दोन्ही मार्ग कसे आहेत तर ‘साखर’ ही उपासना व मुंगीला जी तिची ‘गोडी’ मिळते ती ‘साधना’ ! ही अवस्था, भक्ताने सदैव लक्षात ठेवावी.
कर्तव्याची पूर्णता झाल्याखेरीज ‘साधना’ मार्गाचा अवलंब करता येत नाही. जन्माला येतेवेळी आत्मा योनी मार्गातून येतो. परंतु मरणाचे वेळी त्याचे गमन ‘योगी’ म्हणून व्हावे. जन्माला आल्यावर जीवाला ह्या जगात जागा असावयास पाहिजे. त्या जागेची तरतूद उपासना मार्गाने होते व ह्या उपासनेत अन्न, वस्त्र, निवारा यांची तरतूद करावी लागते. जीवन पूर्ण झाल्यावर ‘विश्रांती मिळाली किंवा पूर्णविराम झाला’ असे आपण म्हणतो. याचा अर्थ आपण ‘जीव’ म्हणून जन्माला येतो व शेवटी जाताना ‘शिव’ म्हणून जातो. ह्या ‘शिवा’चे गमन होते त्यावेळी जीवाचे रूपांतर ‘बीजा’त होते. यासाठी मनुष्याला पुढील जन्माची तरतूद करताना, ‘योगी’ अवस्था म्हणजे ‘बीजा’ची प्राप्ती करावी लागते.
साधनेचा मार्ग व उपासनेचा मार्ग याची ओळख श्रीगुरुंनी सांगितली. त्यामध्ये ह्या दोन साधना प्रत्येक मनुष्याला जन्माला आल्यावर प्राप्त होणे आवश्यक आहे. कारण प्राप्त जीवनात कर्माची फेड करणे किंवा कर्तव्याची पूर्तता करणे यांची जी आवश्यकता आहे, त्यासाठी जीवनात इहलोक व परलोक यांचा समावेश केला असता सर्वांगाने प्राप्ती होते. पुन्हा जन्माला येणे ही अवस्था असून पुढील जन्म येण्यासाठी इहजन्मात जे काही आपण करतो ते आपल्याला पोषक असावयास पाहिजे, जेणे करून पुढील जन्म हा कर्मासाठी नसून तो जन्म आपल्याला प्राप्त होण्यासाठी सत्कर्म उपयोगी पडते. स्वर्गलोक ही अवस्था वेगळी नसून जसे आपण आंब्याचे झाड लावल्यावर ते झाड आपल्याला फल देते ते म्हणजेच स्वर्गलोक आहे. ह्या जीवनात जन्मप्राप्ती झाल्यावर साधना व उपासना ह्यात कृपाशिर्वाद व कृपा याचा अंतर्भाव होत असतो. अशी अवस्था साधकाला प्राप्त व्हावयास पाहिजे किंवा प्राप्त करणे आवश्यक आहे. तरच त्या व्यक्तीला ‘साधक’ असे म्हणता येईल. यासाठी नुसते वंशविमोचन हा विधी करण्याचे साधन प्राप्त करून चालणार नाही. जीवनात प्रत्येक क्षणी विमोचन आहे, यासाठी कठीणात कठीण व सोप्यात सोपे असे साधन आपल्यापाशी पाहिजे आहे तरच कार्य करता येते. कृपाशिर्वाद प्राप्त होण्यासाठी विलंब लागतो, म्हणून बरेच साधक मंत्राचा आधार घेतात. पण मंत्रात जो उच्चार आहे तो सिध्द करावयाचा असून ह्या अंगाने एक साध्य होते व बाकीचे शिल्लक राहाते. अशावेळी सुखाची प्राप्ती करून येणारा भक्त सुखी होत नाही. त्यासाठी समाधान ही अवस्था प्राप्त होणे आवश्यक आहे.
औदुंबरला ज्या परलोक मार्गाची ओळख झाली तो मार्ग किती खोल आहे हे मागाहून पटले. त्यावेळी साधारण दर १५ दिवसांनी माझ्या मामांकडे जात होतो. ह्या मार्गाची नुसती ओळख होऊन चालणार नसून ह्या मार्गाची सिध्दता की ज्यामुळे त्याचा लाभ असंख्य लोकांना होऊ शकेल असे साधन आपल्याला प्राप्त करावयाचे आहे असे मनाशी निश्चित ठरविले. त्याप्रमाणे मामांच्या घरी गेल्यावर हा विषय त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी घेतला. त्यावेळी मामांनी माझ्या विषयाबद्दल कुतुहल दाखवून म्हटले की, “असा विषय जर तुम्ही सिध्द केलात तर भवितव्यामध्ये असंख्य लोकांना त्याचा लाभ होऊन इहलोकांत व परलोकांत ज्या आत्म्यांचे वास्तव्य असते अशांना मुक्ती व सद्गती प्राप्त होऊ शकेल. कारण कुटुंबातील व्यक्तींना आत्म्याची मरणोत्तर जीवनानंतर काय इच्छा-वासना आहे हे न समजल्यामुळे त्या आत्म्याची पीडा कुटुंबाला होत असते. अशावेळी नुसती पीडा आहे तिचे क्षालन होऊन चालणार नाही. नुसता कर्माचा होणारा त्रास निवारण करणे हे ठीक नसून जो आत्मा आपल्या कृतकर्मामुळे पीडित झाला आहे ती पीडा बाजूला गेली पाहिजे व आत्म्यालाही सद्गती प्राप्त व्हावयास पाहिजे. यासाठी मरणोत्तर जीवन हे ‘जीवन’ असून त्या जीवनात काय काय अंतर्भूत झाले आहे ह्याचा विचार नुसता करून चालणार नाही. जो आत्मा पिशाच्च योनीमध्ये वावरत आहे अशाशी संपर्क साधल्याशिवाय त्यांची इच्छा काय हे अनुमानाने सांगून चालणार नाही”. हे मामांचे म्हणणे बरोबर होते. जे दृष्य मी औदुंबरला पाहीले त्याप्रमाणे दिवंगत आत्म्याचा त्रास होऊ नये म्हणून दानधर्म करणारे अनेक लोक असतील. ज्यांना होणारा त्रास हा कशामुळे आहे हे निश्चित समजत नाही त्या व्यक्तींना आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तींना मुक्त करण्याचे कर्तव्य करावयाचे आहे हे जर समजले तर नि:संकोच हा विधी तीर्थक्षेत्री करतील. पण होणारा त्रास समजत असूनही आज काही एक करता येत नाही. ज्या परलोकवासी झालेल्या व्यक्तींच्या पीडा आपणास होतात त्यासाठी शास्त्रात त्रिस्थळी यात्रा, दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान आदि-विधी याशिवाय नागबली, नारायण नागबली आदि-विधी सांगितलेले असून ह्या विधी माध्यमातून अंशमात्र सुटका होते. जो आत्मा वासनावलयामध्ये बध्द झालेला आहे, त्याची मुक्तता ह्या विधीने होते. परंतु ते वासनावलय म्हणजे कर्म हे शिल्लक राहून त्याचे अस्तित्त्व कुटुंबाशी संबंधित राहाते व पीडा ही शिल्लक राहते. आत्म्याची मुक्तता ह्या विधींनी होऊ शकेल पण आत्म्याचे जे कर्म अपायकारक म्हणून शिल्लक राहीलेले असते, जे कर्म कुटुंबातील इतर व्यक्तींना भोगावे लागते त्या कर्माचाही क्षय व्हावयास पाहिजे. असा थोर विचार करून आपण आपले साधन सिध्द करा” असे माझ्या मामांनी सांगितले.
इतका विषय त्यांच्याकडून कळल्यानंतर त्या विषयाची सिध्दता करण्याची जबाबदारी काय आहे ह्याचा विचार मी दिवसरात्र करू लागलो. कारण परलोकात काय आहे हे इहलोकात समजणार नसून, आपण परलोकवासी झाल्याशिवाय ते कळणार नाही. म्हणजेच ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ असे मी म्हणू लागलो. ही साधना ‘लहान तोंडी, मोठा घास’ घेण्यापैकी प्रकार असून तसे साधन पूर्वीच्या काळी कोणी केले होते काय याचा विचार मी करू लागलो. विचार करता करता असे अनुभवास आले की एखाद् दुसऱ्याने आपल्या दिवंगत व्यक्तींचा त्रास वाचविण्यासाठी वरील विधी केले असतील. पण आता हाच विधी सामुदायिक करावयाचा असून जगतामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपला वंश आहे. त्या वंशात चांगले व वाईट असे कर्म घडलेच असेल. तेव्हा ह्या साधनाचा लाभ सर्वांना व्हावयास पाहिजे म्हटल्यावर साधन सिध्द करतेवेळी एका व्यक्तीचा समावेश ह्यामध्ये होऊन चालणार नाही, अशी दुसरी समस्या समोर उभी राहीली. त्यामुळे करीत असलेल्या साधनेमध्ये गोडी होती तेवढी न राहता, दिवसेंदिवस मी हताश होऊ लागलो. एके दिवशी पहाटे तीन वाजता जाग आली. त्यावेळी साधारण पाच ते दहा आत्मे मला हाक मारीत आहेत असा भास झाला. पण ही हाक दूरवर ऐकू येत होती. त्या दिशेने मी त्यांचे जवळ गेलो. त्यांची ओळख व परिचय नव्हता. परंतु मरणोत्तर जीवनानंतर त्यांची जी इच्छा होती त्यामध्ये हाच मी करीत असलेल्या साधनेचा विषय त्यांनी सांगितला व म्हटले की त्यासाठी आमची जी काही मदत आपल्याला लागेल ती आम्ही करू. कारण आज शेकडो वर्षे होऊन गेली, कोट्यावधी आत्मे मुक्ततेसाठी व सद्गतीसाठी तिष्ठत आहेत. ह्याचा परिणाम इहजगतावर होत असून त्याची जाणीव आम्हाला होत आहे, पण देह नसल्यामुळे व जन्म मिळत नाही म्हणून काही प्रयत्न करता येत नाही, यासाठी आपण जी साधना करणार आहात त्यामध्ये आम्ही साहाय्य करू. इहजगतामध्ये जो जन्माला येणारा जीव आहे त्या जीवाची उत्पत्ती कोशामधून होत असते. ह्या कोशांमध्ये प्रमुख कोश ‘अन्नमय’ हा असून ह्या कोशामुळे जन्माला येणारा जीव हा वासनेमध्ये गुंतलेला असतो व या वासनांपरत्वे पुन्हा पुन्हा जन्म घेणे भाग पडते. जन्म हा जरी वासनेमुळे होतो तरी तो जन्म याचे रूपांतर दिवंगत होण्यापूर्वी ‘वास’ ह्या अवस्थेत व्हावयास पाहिजे व ही अवस्था अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत धारण व्हावयास पाहिजे. तरच तो आत्मा सद्गतीपर्यंत जाऊ शकतो. अन्यथा केवळ खाणेपिणे, कपडालत्ता असे जे जीवन ह्याचाच जर उपभोग आपण घेतला असेल तर निश्चित मरणोत्तर जीवनानंतर ही उच्च अवस्था प्राप्त न होता पिशाच्च म्हणून आपण मागे राहू.
जन्माला येणारा प्रत्येक जीव याची धारण कर्माने होत असते. अशावेळी कर्माचे रूपांतर अन्नामध्ये होत असते. ह्या सेवन केलेल्या अन्नातून वीर्य तयार होते व ह्या वीर्यापासून मनुष्याच्या जन्माला आरंभ होत असतो. त्यावेळी योनीची धारणा होऊन पुढे कालकालांतराने पूर्ण शरीर तयार होते. त्यामध्ये प्रथम अन्नमय कोश ज्याची निर्मिती अन्नापासून होते व पुढे आनंदमय कोशापर्यंत तो जीव कोश निर्माण करता होतो. हे कार्य गर्भावस्थेमध्ये होत असते. पुढे जन्माला आल्यानंतर वय वर्षे १८ पर्यंत सज्ञान होण्याची क्रिया अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत करावयाची असते. कारण पुढे वय वर्षे १८ मध्ये जीव सज्ञान होतो. यामध्ये ज्ञानी होण्याची क्रिया अन्नमय कोशापासून सुरु झाली तर त्याचा अर्थ ज्ञान झाले म्हणजे ‘ज्ञानी’ नसून, तो योनीचा भोक्ता होतो. अशावेळी काया-वाचा-मनाला ज्ञान हे योनीचे होत असते व कायेला ऐहिक सुखे भोगणे हेच कार्य यापलीकडे ज्ञान होत नाही. पुढे ही योनी इतकी प्रखर होत असते की केवळ देहिक वासनेचा भोग भोगणे यातच जीवनाचे स्वारस्य आहे असे बाल-वृद्ध लोक समजू लागतात. पण बाल्यावस्थेत ज्ञानी होण्यासाठी जर आनंदमय कोशापासून विचार केला व वय वर्षे १८ ते २१ पर्यंत जर आपण अन्नमय कोशापर्यंत आलो तर जन्म प्राप्तीमध्ये केवळ भोगी न राहता आपण ‘योगी’ अशी अवस्था सुलभपणाने प्राप्त करू शकतो. पण आज समाजात जीवनाचे गणित उलटे असून जीवनारंभ हा अन्नमय कोशामुळे होण्याने त्या कोशामुळे जन्म प्राप्त होणारा जीव ह्याचा विकास न होता विकार एवढा प्रबळ होत असतो की, जीवन म्हणजे काय हे न समजून, ‘इतरांचा जीव घेणे’ म्हणजेच जीवन असे प्रचलित समाजात अनुभवास येत असते. याचे कारण जे कर्म स्वतःला जन्म प्राप्त होण्यासाठी लागत असते, त्या व्यतिरिक्त अन्य आत्मे किंवा त्यांचे कर्म हेही अन्नमय कोशामुळे जन्माला येत असते. त्यावेळी हे कर्म व त्या बरोबरचा आत्मा यांचीही धारणा शरीरात होते. श्वास जो आपण घेतो त्या श्वासाबरोबर ह्या कर्माची किंवा आत्म्याची धारणा फुफ्फुसात होते. पुढे ते कर्म व आत्मा यांचे रक्तात रूपांतर होऊन ते दोष किंवा इच्छा वासना रक्तात सामावल्या जातात. पुढे ह्याच रक्ताने जीवनाची निर्मिती, वीर्यापासून होत असते. त्यावेळी त्या वीर्यात जे दोष किंवा आत्मे असतात, त्यातील विषय जो स्वतःच्या हितासाठी नाही त्याचा न मागता अज्ञानाने आपण लाभ करून घेत असतो व हे दोष ज्यांची निर्मिती वीर्याने झाली ते वीर्य पुढे देह धारणा करते होते. देहात ज्या चौऱ्यांशी योनी (म्हणजे द्वारे) असतात त्यांचा सहजधर्म जीवनात सुख, शांती निर्माण करण्याचा असतो. परंतु जेव्हा धारण झालेल्या दोषांतून देहाची निर्मिती झाली की ह्या ८४ योनी मनुष्याला सुख असले तर त्याचा लाभ करून देत नाहीत. कारण प्राप्त सुखाचा लाभ होण्याऐवजी त्या योनीमध्ये जे दोष सामावलेले आहेत ते पुढे जीवनात प्रतिसाद देत असतात. तेव्हा ह्या योनीमाध्यमात असणारा दोष जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत देवाने जरी ऐरावताएवढे सुख दिले तरी तो जीव सुखाला ‘साद’ देणार नाही.
वरील जीवन-उत्पत्ती मीमांसा आम्हा मानवांच्या कल्याणार्थ सांगितलेली आहे, पण आम्हास धर्माचरण करणे आपल्या हिताचे नाही असे वाटते. त्यामुळे जे आत्मे किंवा जे कर्म याचे विमोचन स्वतः करणे इष्ट आहे ते न करता त्यासाठी गुरुंचा कृपाशिर्वाद अशा सुख प्राप्तीसाठी आपण खर्च करतो. त्यामुळे जरी कृपा झाली तरी त्या कृपेचा वापर आपण दोष निवारणार्थ करतो. म्हणून दिलेला कृपाशिर्वाद हा इतरांच्या कल्याणासाठी उपयोगी पडत नाही, यासाठी नुसती साधना ही देहिक माध्यमातून केली असता त्याचे फल मिळणारे नसून जोपर्यंत करीत असलेली साधना ही काया-वाचा-मनाने होत नाही व ज्या पाच कोशात आत्म्याचे कार्य चालू आहे त्यांना कोश असे न संबोधता ‘पंचप्राण’ असे संबोधले तरच आपले हित आहे. हे पाच कोश बाह्य जीवनात दिसत नाहीत. पण त्यांचे कार्य अनुभवास येते. तेव्हा त्यांचा विचार करणे अगत्याचे आहे.
इहजन्मात प्रथमतः अन्नमय कोशाची निर्मिती होते. त्यावेळी अन्न म्हणजे आपण सेवन करतो ते नसून मनुष्य जन्माला येते वेळी व आल्यावर जे जे काही लागते याचा समावेश ‘अन्नात’ होतो. अन्न, पाणी व हवा हे यातील प्रमुख घटक असून या सर्व घटकांचे ज्ञान मनुष्याला विज्ञानातून होते. ह्या विज्ञानातून इतके शोध लावले गेले आहेत की जमिनीवर गाड्या धावतात, पाण्यावर बोटी तरंगतात व हवेतून विमान वाहतुक चालू असते. पर्यायाने जमिनीवर ज्याचा जन्म होतो; लयही जमिनीवर होतो पण तो जीवन हवेमध्ये जगत असतो. ज्या पाण्याने तहान भागते ते पाणी इतरांना देणे हा उपकार न करता इतरांना पाणी पाजण्यासाठी तो तत्पर असतो म्हणून त्याला ‘प्राणी’ असे संबोधतात.
या प्राण्याची प्रगती एवढी झाली की, अन्नमय कोशापासून ते विज्ञानमयापर्यंत. आनंदमय कोश हा जीवनाचे सार आहे. पण ‘जगणे’ याचे मर्म शास्त्रज्ञंानाना समजत नाही, असे जरी म्हणता आले नाही तरी आज ते त्यांना नको आहे. पिंडाची निर्मिती ह्या चार कोशातून झालेली असून, ब्रह्म हे आनंदमय ह्या एका कोशात आहे, यासाठी बाल्यावस्थेत जीवनाची सुरुवात करीत असतां अन्नमयातून शरीराची वाढ व ज्ञानाची वृध्दी आनंदमयातून करावयाची आहे. आनंदमय व विज्ञानमय या कोशांत ज्ञानवृध्दी करावी व अन्नमय, प्राणमय यांनी जगावे कसे, याचे ज्ञान मनोमय कोशात होत असते म्हणून ज्ञानाची वृध्दी व आपली वाढ याचे मिलन मनोमयकोशात व्हावे. म्हणजे ज्या प्रमाणे गंगा ही स्वर्गातून आली असे म्हणतात, ती गंगा आनंदमय कोशातून व यमुना अन्नमय कोशातून येऊन ‘संगम’ म्हणजे तृप्ती ही अवस्था मनोमय कोशात व्हावयास पाहिजे. जी साधना आपण करतो त्याचा उद्देश देव भेटावा असा नसून देवाने जो हा जन्म सोन्यासारखा दिला आहे त्याचे मूल्य देवापेक्षा अधिक आहे. ह्या दुर्लभ जीवनाची माती व्हावयास नको यासाठी पाच कोशांची प्रगती करून घेणे महत्त्वाचे आहे. अशी प्रगती झाल्यावर शरीरात जागा शिल्लक राहता कामा नये. ह्या पाच कोशांनी विकसित होऊन जी जागा व्यापली आहे त्या जागेत “एक तत्त्व नाम” अशा नामीतत्त्वाने वास केला की मग पाप व पुण्य याचा हिशेब कोण करू शकणार ? “पुण्याची गणना कोण करी ?” असे जे संतांनी सांगितले आहे याचा अर्थ “अन्नातून म्हणजे पिंडातून जन्म घे व इथून जातेवेळी ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ असे म्हणून जा. पण जाते वेळी इतरांना जागे कर व जागा दे”. याचाच अर्थ म्हणजे जीवनात मोक्षप्राप्ती होय.
’परलोक’याबद्दलचे तत्त्वज्ञान अभ्यासासाठी फार खोल आहे व त्या ज्ञानातून प्रात्यक्षिक अनुभवास यायला पाहिजे. साधनेमध्ये एक प्रश्न सुटत असतो व दुसरा प्रश्न समस्या म्हणून पुढे उभा राहात असतो. अशावेळी आपण जरी जगाला ज्ञान म्हणून हे शास्त्र सांगितले तरी जोपर्यंत त्याची अनुभूती अनुभविता येत नाही तोपर्यंत ते तत्त्वज्ञान बोलण्यासाठी बरे आहे, पण चालण्यासाठी फार अवघड आहे, यासाठी जे कोणी परलोकवासी झालेले आहेत त्या आत्म्यांशी संपर्क साधावा किंवा जोडावा. असे जर साधन उपलब्ध करून घेतले तर परलोकवासी जे आत्मे आहेत, त्यांची इच्छा काय आहे व मरणोत्तर जीवनानंतर जीवन म्हणजे काय ? हे सांगता येईल. ते कल्पनेने सांगणे इतरांच्या हिताचे नसून जगाला हे सत्य आहे हे पटले पाहिजे. आज जगात अंधश्रध्दा ठेवणारे लोक फारच थोडे आहेत. पण सज्ञान होऊन ह्या मार्गावर विश्वास ठेवणारे बहुसंख्य लोक आपणास भेटतात. अशा लोकांना हे जीवन किती मौल्यवान आहे हे समजले पाहिजे. कारण ह्या जीवनाची भूमिका इहलोकात प्राप्त झालेल्या जीवनात व्यतीत करावयाची असते. पण जे जीवन प्राप्त जन्मामध्ये आपल्या वाट्याला येते ते केवळ भोगून आपण संपवत असतो. पण ह्या जीवनापैकी काही जीवन पुढच्या पारलौकिक जीवनासाठी जर शिल्लक राहीलेले असेल तर मरणोत्तर जीवनात उत्तम असे जीवन प्राप्त होत असते. ह्यासाठी कोणी मध्यस्थ आपण निर्माण करू शकलो तर ह्या मध्यस्थामधून जे आत्मे परलोकाबद्दल ज्ञान सांगतील त्याचा उपयोग इहजगतातील लोकांना ज्ञानी होण्यासाठी उपयोगी पडेल असा मी विचार केला. वर्षानुवर्षे श्राध्दपक्ष इ, विधी आपण करतो ह्याचा अर्थ अनुकरण विधी असा असून त्याचा लाभ कोणालाही होत नाही. पण ह्या कार्यासाठी मध्यस्थ तयार होणे आवश्यक असले तरी आपल्या इच्छेने कार्य करणारा मध्यस्थ तयार होईल का ? कारण ‘मध्यस्थ’ अवस्था हा धोका असून कोणीही त्या वाटेला आपणहून जाणार नाही. याचे कारण असे की आत्म्याला जे आवाहन आपण करतो त्यामध्ये त्याचे आगमन त्याला स्वतःला करता येत नाही. तर ती जबाबदारी मध्यस्थाने स्वीकारावयाची असते. कारण जो आवाहन केलेला आत्मा आहे त्याला पुनश्च परत पाठविणे म्हणजे ‘पुनरागमनायच’ करता येणे आपल्या हिताचे आहे. आत्म्याशी केलेले हितगूज सांगण्यास व लिहिण्यास सोपे आहे, पण असे आत्मे वातावरणातून इहलोकाकडे येऊ लागतात त्या त्यांच्या येण्याने इहलोकाकडे येण्याची दिशा जर समजली, तर त्या दिशेने शेकडो आत्मे येऊ शकतात. मरणोत्तर जीवनानंतर जेव्हा शरीराचा त्याग करून आत्मा परलोकाकडे जात असतो, तेव्हा एक गती त्याला परलोकाकडे नेत असून ज्या शरीराचा त्याने त्याग केला आहे ते शरीर इहलोकामध्ये विलीन होत असते. याचा अर्थ पृथ्वीकडे Force of Gravity असून परलोकाकडे Ethric Force आहे. तेव्हा जो आत्मा आवाहन होऊन त्याने आपल्या प्रश्नांचे शंकानिवारण केले आहे त्या आत्म्यास पुनश्च योग्य ठिकाणी जाणे आवश्यक असते. पण ही साधना अत्यंत अवघड अशी आहे. याचे कारण आपण करीत असलेली साधना हिचे सामर्थ्य जर इहलोकात अनुभविता येत नाही तर ते सामर्थ्य परलोकांत कसे उपयोगात येईल ? ह्याचा आपण सूज्ञपणे विचार करावयास पाहिजे. जे जग आपल्याला दिसते आहे ते २५ % असून ७५ % जग परलोकात आहे. तेव्हा इहलोकात काही चमत्कार करणे सोपे आहे. परतु परलोकात चमत्कार करणे हे हास्यास्पद असे असून आत्म्याला आवाहन करून इहलोकाकडे बोलावले असता पुनश्च तो आत्मा परलोकाकडे जाईल ह्याची शाश्वती नाही कारण त्याला जी गती प्राप्त झाली आहे, त्यापेक्षा उच्च अवस्था प्राप्त व्हावी अशी स्वाभाविक इच्छा परलोकातील आत्म्याची असते. म्हणून अशा आवाहन केलेल्या आत्म्याला मरणोत्तर जीवनामध्ये जी गती प्राप्त झाली आहे त्यापेक्षा श्रेष्ठ अवस्थेत जावे ही जी इच्छा असते ,अशावेळी आपण जे साधन अंगिकारले आहे त्यातील संकल्पामध्ये ह्याचा समावेश झाला असला पाहिजे. ह्या संकल्पाचा हेतू आपल्या हितार्थ नसून ह्या परलौकिक आत्म्यांसाठी असतो. अशावेळी साधनेत दोन भाग इहलोक व परलोक असे असून त्यासाठी आशिर्वाद असावयास पाहिजे. नाहीतर ज्या आत्म्याला पुढची अवस्था प्राप्त होत नाही, तो न बोलावता इहलोकाकडे येऊन इतरांना त्रास देत असतो. अशा आत्म्यांचे जीवन काय व कसे आहे याचा सांगोपांग अभ्यास करण्यासाठी प. पू. बाबांनी आज्ञा देऊन इहलोक व परलोक ह्यासाठी एकच उपाय म्हणजे ‘निराकरण’ सुचविले व त्याप्रमाणे आज कित्येक वर्षे आपण जे कार्य करीत आलो आहोत त्याचा लाभ बहुसंख्य लोकांनी घेतलेला आहे. ही साधना अतिशय महत्त्वाची आहे, पण ते महत्त्व समजणे सर्वांना शक्य नाही व कार्यात हा विषय जर सूचित केला तर कार्यार्थ तसे सेवक निर्माण होणे हे दुर्लभ आहे. म्हणून येणारा भक्त जो कोणी दु:खी आहे त्याचा विश्वास ह्या मार्गावर बसावा म्हणून आजपर्यंत हे कार्य निराकरण मार्गाने मी केले. पण भवितव्यात इतरांना कार्याचा लाभ व्हावा यासाठी जे सेवक कार्य करतील ह्या कार्याची योजना पूर्वीच करून ठेवली आहे. ह्यासाठी सेवकांना माझ्यासारखी प्रखर साधना, उपासना, दीक्षा इत्यादी प्राप्त करून घ्याव्या लागणार नाहीत. जो कोणी दु:खी मनुष्य जेव्हा ह्या कार्याचा लाभ घेण्यासाठी येईल तेव्हा प. पू. बाबांच्या आशिर्वादाने त्याचे दु:ख दूर व्हावे यासाठी फक्त ‘नामस्मरण’ व ‘निवारण’ सांगण्यात येईल.
परलोकाचा अभ्यास करण्यासाठी ज्या माध्यमाची गरज पाहिजे होती त्यासाठी माझी बहीण हीने ही मध्यस्थाची जबाबदारी स्वीकारावी व तिच्या माध्यमद्वारा मी कार्य करावे असे ठरले. त्याप्रमाणे आज्ञेनुसार मी तिला औदुंबरक्षेत्री बोलाविले व तिला या साधनेची ओळख करून दिली. त्यावेळी तिला काहीही कल्पना नव्हती. इहलोक व परलोक म्हणजे काय हेसुध्दा माहित नव्हते. मलाही ‘परकाया प्रवेश’ म्हणजे काय अवस्था होते हे माहित नव्हते. माझी बहीण औदुंबरला आली, तेव्हा दुपारची महापूजा होऊन आरतीस सुरुवात झाली. त्यावेळी ती शांत उभी होती. आरती होऊन मंत्रपुष्पांजलीच्या वेळी ती ओरडू लागली. काही लोक ‘भूत आले आहे’ असे म्हणत पळू लागले. शेवटी हळू हळू देवापुढे गर्दी कमी झाली व तीही शांत उभी होती. नंतर माझ्याकडे टक लावून पाहात म्हणू लागली, “भूताच्या वाटेला जाऊ नकोस. कधीकाळी ते कानफाटे यांनी आम्हाला ओळखले होते. त्यावेळी त्यांचे सामर्थ्य एवढे होते की कुठलाही आत्मा जर भूतयोनीमध्ये असेल त्याला ते मुक्त करीत असत. पण त्यानंतर तसा कुणीही साधक जन्माला आला नाही. तेव्हा आम्हाला मुक्ति केव्हा मिळेल हे सांगता येत नाही अशी परिस्थिती होती पण आज तो सुदिन आला आहे. आज आम्हा लोकांना पुन्हा मुक्त करणारा जन्माला आला आहे”. जो संचार बहिणीमध्ये झाला होता त्या आत्म्यास त्याचे नाव काय, गाव कुठले ही माहिती मी विचारली. तेव्हा तो म्हणू लागला की “तुम्ही बंगल्यावर चला. मी सगळे सांगतो. भाऊंना (म्हणजे माझ्या मामांना) मी ओळखतो”. मग हा संचार निघून गेला. त्यावेळी माझ्या बहिणीला मी काय घडले ते विचारले. त्यावेळी तिने जे पाहीले त्याचे वर्णन केले. मी जसे तिष्ठत असणारे आत्मे पाहीले होते, तसेच परलोकाचे वर्णन तिने केले. ‘त्यावेळी तुला भय वाटले का ? ’ असे मी विचारले. ती म्हणाली, ‘मी आरती ऐकत होते. हळू हळू आरतीचे शब्द ऐकू येण्याचे बंद झाले व मी डोळे बंद करून वर वर चालले आहे असा भास झाला. शेवटी जसे आपले जग आहे तसेच जग दिसू लागले’. ‘ त्या जगात काय आहे ? ’ असा प्रश्न मी तिला विचारला.
ह्या जगतात जो आपल्याला प्रकाश दिसतो त्यामुळे वस्तु पदार्थाचे ज्ञान होते. ह्या प्रकाशामुळे आपली सृष्टी निर्माण झालेली आहे. परलोकात सात रंग असून ते रंग इंद्रधनुष्याप्रमाणे आपल्याला भासतात. ह्याचा अर्थ असा जे सप्तलोक म्हणून आपण म्हणतो त्याची ओळख ह्या सप्तरंगामुळे कळते. प्रत्येक लोकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रंग आहे. त्यामुळे आत्म्याला आपले स्थान कोणत्या रंगात आहे हे समजते. परलोकातील आत्मे इहलोकांत येऊन त्यांच्याशी विचार विनिमय झाल्यानंतर ते आपापल्या ठिकाणी परत न जाता प्राप्त झालेला जो रंग म्हणजे आत्म्याचे स्थान, त्यापलीकडे अधिक उच्च स्थान प्राप्त करून घेत असतात. म्हणजेच त्यांचा संबध इहलोकाशी आल्यानंतर त्यांची अवस्था आपल्या कृपाशिर्वादाने बदलते.
इहलोकांत जे जीव जन्माला येतात त्यांना वासनेमुळे स्वतःची उक्रांती न करता येऊन तोच जीव पुन्हा पुन्हा जन्म घेतो व ही जन्माला येण्याची सवय लागल्यावर वरच्या लोकात काय आहे याचा विचार न करता जन्माला येणेच महत्त्वाचे आहे असे हे आत्मे समजू लागतात. अशा जीवांना म्हणून Earth Bound Spirits असे म्हणतात. पण इहजगतात जीवन ध्येयवादी जगल्यावर त्या कर्मानुसार त्या लोकांची प्राप्ती जीवास होते. ह्या सप्तवलयात जे काही रंग असतात ते सामान्य माणसाला कळत नसल्याने स्वर्गात पोकळी आहे असे त्याला वाटते. पाऊस पडल्यानंतर उन्हामध्ये जे इंद्रधनुष्य दिसते त्यातील सप्तरंगाप्रमाणे हे सप्तलोकांचे रंग असून शास्त्राने त्याचे नामाभिधान ॐ भू, ॐ भुवः, ॐ स्वः, ॐ महा:, ॐ जनः, ॐ तपः, ॐ सत्यम् असे केले आहे.
पहिल्या तीन अवस्थेतील जे आत्मे असतात त्या आत्म्यांना ह्या तीन लोकांत आपली उत्क्रांती प्रथमतः करून घ्यावी लागते व ही उत्क्रांती इहलोकांत धारण करावी लागते. जरी जीव हा कर्मपरत्वे जन्माला आला, तरी जन्माला येऊन कर्म भोगणे असाच केवळ जन्माचा अर्थ नसून कर्मपरत्वे जगत असता जर ‘धर्माचरण’ केले तर जरी तो जीव कर्मांगानी जन्माला आला असला तरी धर्माचरणाने त्याची उत्क्रांती होऊन त्याच्या अवस्थेत स्थित्यंतर होत असते. म्हणजे जीव, जीवात्मा व आत्मा ही उत्क्रांत अवस्था इहलोकातच प्राप्त करावयाची असते व तशी उत्क्रांती इहजन्मातच झाली म्हणजे जन्माला आलेला जीव, आत्मा ह्या अवस्थेला पोचला, तर मरणोत्तर जीवनानंतर परलोकांमध्ये ॐ भू, ॐ भुवः, ॐ स्वः ह्यांचा लाभ होत असतो. पहिल्या अवस्थेमध्ये म्हणजे भू लोकात ह्या आत्म्याला प्रवेश मिळाला की वर्षश्राध्द झाल्यानंतर ह्या आत्म्याचा प्रवेश दुसऱ्या लोकांत होतो व दुसरा व तिसरा लोक यामध्ये त्याचे अस्तित्त्व बारा वर्षापर्यंत असते. पुढे चौथ्या अवस्थेत स्थित्यंतर अवस्था असते. पृथ्वी व परलोक यामध्ये जी पोकळी आहे तिला Earth Bound Sphere असे म्हणतात व तिसऱ्या व चौथ्या अवस्थेमधील पोकळीला Horizon of Spirit असे म्हणतात.
असा हा परलोकातील प्रवास सुखकर होण्यासाठी आपले इहजगतातील जन्माला येण्याचे कारण याचे ज्ञान होणे आवश्यक असते. मग ज्या कर्तव्यार्थ जन्म घेतला आहे त्या कर्तव्याची पूर्तता करून आत्मा परलोकी जात असतो. ही स्थिती सामान्य माणसाची नसून योग्य संस्काराने अशा जीवनात ‘पिंड’, म्हणजे त्या जीवाची धारणा होते व हे संस्कार मरणोत्तर जीवनानंतर पुढच्या अवस्थेची प्रगती प्राप्त करून देतात. चौथा व पाचवा लोक म्हणजे ॐ महः, ॐ जनः यांना स्वर्ग किंवा देवलोकांची अवस्था असे म्हणतात. याचा अर्थ जे देव आपल्या पूजनात आपण मानतो त्यांचे अस्तित्त्व देवात नसून आत्म्याचे चालणे, बोलणे देवाप्रमाणे इहजगतात होत असते व त्यांची इच्छा ही वासनारूपी नसून इहजगतातील जीवन कर्तव्यार्थ व्यतीत करतेवेळी जो विषय अपुरा राहीला आहे त्याची पूर्तता करण्यासाठी हे आत्मे जन्माला येत असतात व त्यामुळे सृष्टीवर देवाणघेवाण सुरु होते. पण गेल्या शंभर वर्षांत या आत्म्यांचे जगतात अस्तित्त्व असूनही व त्यांना जन्म घेण्याची इच्छा असूनही योग्य असे आचारविचार व उच्चार हे आमच्यामध्ये आज नसल्याने हे आत्म्ये जन्म घेऊ शकत नाहीत. त्यामुळे Earth bound Spirits मध्ये स्थित्यंतर झाले नाही व त्यामुळे आत्म्याच्या वासना शिल्लक राहून त्यांना मुक्ति मिळत नसून या वासना ‘बाधा’ या रूपाने आपल्या सभोवार हिंडत असतात. ही बाधा आपली वासना पुरी करण्याची पराकाष्ठा करीत असते व ह्या वासनेतून मुक्त व्हावे अशी धारणा या जीवांची असते. ह्याचे ज्ञान इहजगतातील लोकांना नाही. दैनंदिन जीवनात ह्या वासना वाढत आहेत त्याचा शोध घ्यावयास पाहिजे. कारण आज प्रत्येक जण जन्माला आल्यानंतर ‘खा खा’ करू लागला आहे. इतके खाऊनही जीवाला समाधान नाही. याचा अर्थ आपण खात नसून जे जीव वासनेमुळे आपल्या वाट्याला आले आहेत त्यांची खाण्याची वासना आज इतकी तीव्र आहे की हे जग जरी खाल्ले तरी तृप्तीचा ढेकर येणार नाही, यासाठी सोपा उपाय म्हणजे देवधर्म जरूरी पुरता करावा. त्याचा अतिरेक होऊन ‘नको तो धर्म’ असे वाटता कामा नये.
पुढे भिलवडीत असतां कै. आप्पा शेणोलीकर यांची मृतात्मा म्हणून संचार अवस्थेत गाठ पडली. त्यावेळी त्यांचे म्हणणे असे की “मरणोत्तर जीवनानंतर आत्म्याला जी अवस्था प्राप्त होते तेथून सद्गती प्राप्त होणे हे सोपे नाही. जेव्हा मनुष्य इहजगतात मरतो, तेव्हा त्याचे श्राध्द कुटुंबीय करीत असतात. परंतु ते श्राध्द एकाचे नसून त्यावेळी तीन आत्म्यांना बोलाविले जाते, म्हणजे पितृत्रयी ही श्राध्दाला उपस्थित पाहिजे व असे श्राध्द केले असता जी पितृत्रयीच्या आधीची मागील चौथी पिढी आहे ती मुक्त होते. हा क्रम वेदशास्त्राने विधीमध्ये लिहिला आहे व त्याप्रमाणे बहुतांशी लोक ह्या विधीचा अवलंब करतात. पण ह्या विधीमुळे किती आत्मे मुक्त झाले आहेत ? हा प्रश्न आहे. यासाठी काही मार्ग गुरुंना विचारा. कारण जो श्राध्दविधी धर्मशास्त्राप्रमाणे तीर्थयात्रा, दानधर्म, आपुनी केला जातो हे केवळ अंधश्रध्देच्या पोटी केले जाते, .परंतु आवश्यक ते कार्य ह्या विधींमधून आज होत नाही”.
त्याप्रमाणे प. पू. बाबांची आज्ञा अशी झाली की “जे कोणी दु:खी मार्गदर्शनार्थ आपल्याकडे येतील त्यांचा उपयोग करून घे. त्यायोगे जे त्या घराण्यातील आत्मे मुक्त झाले नाहीत, त्यांचा संबंध पुढील पिढ्यांच्या जीवनाशी ऋणानुबंधपरत्वे काय आहे हे आपल्याला कळले पाहिजे. यासाठी ‘वंशविमोचन’ हा विधी संकल्पाने सिध्द करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे हा संकल्प तयार होऊन सर्व भक्तांना द्यावयाची वेळ मी तुला सांगेन. पण तत्पूर्वी याचा लाभ तुझ्या मातृ व पितृ घराण्यातील जे कोणी दिवंगत झाले आहेत त्यांना होतो की नाही हे पडताळून अनुभव घे म्हणजे मग तो संकल्प इतरांना देता येईल”. त्याप्रमाणे माझ्या घराण्यात व आईच्या घराण्यात काय घडले आहे ह्याचा विचार केला. नुसते हे आत्मे मुक्त झाले असे म्हणून विश्वास ठेवणे योग्य नाही. कारण दोन्ही घराण्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. कर्मामध्ये तरतूद होती, पण घराण्यात दोष होते. त्यामुळे घराण्याचा उत्कर्ष झाला नाही, पण नंतर वंशविमोचनामुळे ह्या घराण्यात जेव्हा सुखशांती ह्यांचा लाभ होऊ लागला तेव्हा आपली साधना सिध्द झाली आहे हे सिध्द झाले.
पुढे गुरु आज्ञेप्रमाणे सेवा चालू होती. पण ही सेवा इतरांना लाभदायक झाली असली तरीपण ह्या सेवेमुळे त्यांची प्रगती ऐहिक होते व तशीच पारमार्थिक प्रगतीसुध्दा व्हावयास पाहिजे. हा अनुभवही यावयास पाहिजे होता. पण येणारे भक्तभाविक यांची विचारणा जीवनातील प्रश्नाला उद्देशून चालू होती. मूळ विषय हा सुखाचा होता. त्याप्रमाणे बहुतांशी लोक सुखाची प्राप्ती केंव्हा होईल हे विचारीत असत. त्यावेळीसुध्दा येणारे जे भक्तभाविक होते, त्यांना पारमार्थिक लाभ होण्यासाठी किंवा ओळख होण्यासाठी मार्गदर्शन केले गेले. पण मार्गदर्शन घेणाऱ्या भक्तभाविकांचे लक्ष आपले जीवन कसे समृध्द होईल याकडे असल्याने मार्गदर्शन होऊनही त्याचा लाभ त्यांना अनुभवाला आला नाही. त्यावेळी येणारे लोक व त्यांचे प्रश्न यांची विचारणा काय होती व आपण भवितव्यात काय करणार आहोत ह्याचा मूळ विषयांशी मेळ जमेना. यासाठी हताश होऊन असे वाटू लागले की इतरांना ज्ञानी करण्यापेक्षा ह्या मार्गाच्या वाटेला जाऊ नये. शेवटी एके दिवशी प. पू. बाबांनी असे सांगितले की, “जगामध्ये देव नसून दगड आहेत असे जर तू मानलेस तर पूजा करण्यासाठी भक्तभाविक शिल्लक राहायला पाहिजेत. यासाठी आपले प्रयत्न हे ईश्वर प्राप्त करण्यासाठी नसून लोकांनी ईश्वरासारखे वागावे यासाठी प्रयत्न आहेत. हा विचार करून पुढे चाल. पुढे कालकालांतराने हेच भक्त जेव्हा परमार्थाचा विचार करतील तेव्हा त्याची किंमत आजच्यापेक्षा शतपटीने अधिक असेल. अशावेळी त्यांना परमार्थाची भूक लागली आहे हे तुझ्या अनुभवाला येईल व त्यावेळीच त्यांना हा मार्ग सूचित करणे योग्य आहे. अन्यतः ज्यांना भूक लागलेली नाही अशांना हा मार्ग शिकवूनही व्यर्थ जाणार आहे. कारण हा मार्ग हा ७५% गुरुकृपेचा ठेवा असतो व ऐहिक २५% मिळून साधकाला १००% सेवा करावयाची असते. पण येणारे भक्त फक्त सुखासाठीच येतात म्हणून २५% कृपेला पात्र होतात व ७५% कृपा ही शिल्लक राहते. कारण ही कृपा ही केवळ अनुकरण म्हणून प्राप्त होणारी नसून त्यासाठी नित्य साधना ही जीवनात जोडली पाहिजे. ह्या साधनेत जी शिकवण दिली जात असते. त्याप्रमाणे आपले आचरण जर झाले तर ही कृपा ७५% प्राप्त होते. अन्यथा गुरू भेटूनही न भेटल्यासारखे जीवन व्यतीत होत असते.
जीवनात अनेक विषय येतात व जातात. येणारे विषय किती व जाणारे विषय किती, याचा जन्माला येऊन विसर पडतो. त्यामुळे कोणत्या विषयात काया, वाचा, मन यांची त्रिपुटी झाली आहे ह्याची ओळख व्हावयास पाहिजे. अन्य विषय जे येणारे व जाणारे आहेत त्या विषयांचे संस्कार झाले तर ते पुढील जन्मात उपयोगी पडतील. अन्यतः ‘नळी फुंकली सोनारे’, अशी आपली अवस्था होत असते. यासाठी मोजकेच विषय अभ्यासासाठी घेऊन प्रथमतः काया, वाचा व मन हे एक होत आहे किंवा नाही हे पडताळून पाहीले पाहिजे. कारण जेव्हा जीवनात ‘ईश्वर’ हा विषय प्राप्त करावयाचा असतो त्यावेळी जीवनात मूळ काया, वाचा व मन ह्यांची त्रिपुटी जर झाली तर ‘ईश्वर’ हा काय विषय आहे हे समजेल. ईश्वर म्हणजे काय ! काया, वाचा, मनाची त्रिपुटी होऊन जेव्हा मनुष्य जगू लागतो, तेव्हा त्याच्या जगण्यात, वागण्यात किंवा बोलण्यात जी क्रिया आपण पाहतो त्या क्रियेस ‘ईश्वर’ असे म्हणतात ! यासाठी प्रथमतः जे भक्त तुझ्याकडे येतील त्यांना ऐहिकाची गोडी लागली पाहिजे. कारण ‘ऐहिक’ जर विषय म्हटला तरी तो विषय ईश्वरापेक्षा मोठा आहे, यासाठी जे जे कोणी आपले दु:ख घेऊन येतील त्या दु:खाचा विचार ‘ईश्वरा’चा म्हणून कर. तेव्हाच ह्या विषयातून प्रेम द्रवेल व मग तो भक्त आपोआप ऐहिक न मागता पारमार्थिक ह्या विषयाकडे त्याची दृष्टी वळेल. यासाठी येणाऱ्या भक्तांना साधन हे सोप्यात सोपे असावयास पाहिजे; मग हळू हळू भक्तात जो बदल होत असतो त्याचा अर्थ ‘परम-अर्थ’ ! एवढा जरी जन्माला येऊन समजला तरी त्या भक्ताचे सार्थक होईल.
जेव्हा मी औदुंबरला आलो त्या दिवशी श्रावण प्रतिपदा होती व पंचमीच्या दिवशी श्री शेषाचे दर्शन पहाटे झाले. नेहमी घरची सवय होती, त्यामुळे सकाळी उठण्यास उशीर झाला. स्नान, पूजा केली व प्रार्थना म्हणत असताना मनाची द्विधा बाजू लागली. एक घर आठवू लागले व त्यानंतर जी ‘साधना’ तिचा पत्ता नव्हता. साधना म्हणजे काय केल्यावर काय प्राप्त होते हे अज्ञात होते, त्यामुळे स्वाभाविक मनाचा कल घराकडे होता. आई, वडिल, भाऊ-बहीणी घरी होते. त्यांची आठवण होऊन ह्या जगात आपल्याला सर्व काही आहे व काही नाही असे मन सांगू लागले. दु:ख म्हणावे तर दु:ख नाही व सुख म्हणावे तर ते कशात ते सांगता येत नव्हते.
पहिल्या दिवशी अशी जाणीव किंवा आज्ञा झाली असे आपण म्हणूया की “साधकाला जग उठल्यावर उठणे हे योग्य नाही. जग अंधःकारात आहे. त्याला जर जागे करायचे आहे तर झोपून कसे चालणार ? यासाठी प्रथमतः वेळेवर उठण्यास शिक !”. त्याप्रमाणे पहाटे ३ वाजता उठू लागलो, कारण स्नान, संध्या, नामस्मरण आदि ब्रह्मकर्म हे ब्रह्ममुहूर्तावर व्हावयास पाहिजे. अशा क्रमाने चालत असता दिवस, महीने, वर्ष संपले. ह्याप्रमाणे साधना चालू होती. आता ह्या जीवनाला आकार आल्यामुळे जीवन व्यर्थ खर्च होणे याची किंमत किती आहे हे कळू लागले. ह्या कार्यक्रमास दिनचर्या असे म्हणतात. रोज नव्याने जगणे, बोलणे व वागणे ह्यास दिनचर्या म्हणता येणार नाही, त्यामुळे जीवनाचा विषय किती व काय साध्य करावयाचे आहे याचा आराखडा मनाशी तयार केला, कारण ‘साधना’ केव्हा होईल व त्याचा लाभ जगताला कसा होईल ह्याचे गणित समजेना. शेवटी एक दिवस पहाटे उठल्यावर महाराजांचे दर्शन घेतले व आसनावर येऊन बसलो आणि डोळे बंद करून पाहू लागलो. पहाटेचा प्रकाश व क्षितिज दिसू लागले. आसमंतात जग नसून सर्वत्र प्रकाश व सात रंगांच्या छटा वेगवेगळ्या दिसत असून दिसत असलेला रंग केशरी व पुढे क्षितिजापर्यंत तांबूस असा होता. हे पाहत असताना कानाशी शब्द आले, “अरे मुला, हा रंग ब्रह्मडाचा आहे. पुढे कालकालांतराने हा रंगीबेरंगी होऊन त्या रंगांतून पिंड निर्माण झालेले आहेत. हा जो रंग तुला दिसत आहे त्याच्यात जेव्हा बदल होईल तेव्हा हे गणित सुटेल; अन्यथा हे गणित नसून अगणित आहे. तेव्हा शोध घेऊन वेळ खर्च करू नकोस. तुला ह्या ठिकाणी जे बोलावले आहे ते सेवेसाठी. सकाळी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी जो आपण एक दिवस म्हणतो त्याला अज्ञानी लोक ‘दिवस’ असे म्हणतात पण साधक लोक त्याला ‘वर्ष’ असे म्हणतात”.
हळू हळू साधना पूर्ण होण्याचे दिवस आले असा भास होऊ लागला. महाराजांचे देऊळ आहे त्या ठिकाणी मोठा वृक्ष औदुंबराचा आहे. एके दिवशी त्याच्या मुळाशी गणपती आहे हे मी प्रत्यक्ष देवळात पाहीले व आजही तो आहे .पण त्यास शुभशकुन असे लोक म्हणतात, त्याप्रमाणे मला तीन औदुंबराची फुले दृष्टीस पडली. ती पाहून धन्य झालो असे वाटू लागले. कारण आपण जी सेवा करीत आहोत. त्या सेवेला प्रतिसाद महाराजांनी दिला असे मी मानू लागलो. त्या आठवड्यात माझ्या मामांचा निरोप आला की, ‘मला येऊन भेटून जा’. त्यांची श्रध्दा ‘गीते’वर होती. ते स्वतः म्हणत असत व घरातील सर्वांना शिकवीत असत. त्यांच्या निरोपाप्रमाणे मी त्यांच्या घरी गेलो व दुपारी जेवण झाल्यावर मी व ते त्यांच्या मळ्यात गेलो व जेथे ते नेहमी बसत असत त्या विहीरीजवळ आम्ही दोघे बसलो, त्यावेळी त्यांनी असा उच्चार केला “।। यदा यदाही धर्मस्य ग्लानीर्भवति ‘भारत’ ।।”.
त्यांची अशी वाणी मी प्रथमतःच ऐकली. कारण ते जवळ जवळ ५० वर्षे गीता म्हणत होते. पण ह्य़ावेळी त्यांचे उच्चार ऐकून माझी मति गुंग झाली. अर्धा तासपर्यंत ते व मी स्तब्ध बसलो. शेवटी ते उठून मला म्हणाले “दादा, आपली इच्छा असते वेगळी व ईश्वराची असते वेगळी. आत्ता मी जे काही म्हणालो त्याची मला आठवणही नव्हती. तुम्हाला सांगावयाचे वेगळे होते पण झाले दुसरेच. मला जे स्वप्न गेल्या आठवड्यात पडले ते तुम्हाला सांगावयाचे होते. ते असे की पहाटे माझ्या स्वप्नात श्रीकृष्ण आले व म्हणाले “ईश्वराचे कार्य आहे. त्या कार्यास कोणीतरी मध्यस्थ लागतो. हा मध्यस्थ म्हणजे ईश्वर नसून तो ईश्वराचा संदेश घेऊन येतो. ह्यावर पूर्ण श्रध्दा ठेवली तरच ह्या जगाचा उध्दार होईल. जर ‘संदेह’ मनात निर्माण झाला तर जग बुडाले” व मी जागा झालो. गेले चार दिवस हा संदेश माझ्या कानाशी सारखा गुणगुणतो आहे म्हणून तुम्हाला बोलावणे पाठविले”. मग मी त्यांना गेला आठवडाभर माझी अवस्था काय झाली होती हे सांगितले म्हणजे दोघांनाही ईश्वराचा आदेश झाला, ही गोष्ट सत्य आहे.
त्याप्रमाणे मी औदुंबरास आलो व एक आठवडाभर ह्या जगाचा विचार करीत होतो. ‘जग किती मोठे आहे व ह्या जगाला आपण काय देणार ?’ असा प्रश्न उभा राहीला. जग हे विसाव्या शतकात असून पुढे पुढे चालले आहे. त्यामुळे ह्या जगाचा देवावर, धर्मावर विश्वास कमी होत चालला आहे. त्याला परत कसे जागे करू शकू, हा प्रश्न उभा राहीला. निर्णय लागेना. विचारांची मालिका संपेना. शेवटी ह्या विचारांचा बळी घेतल्याशिवाय हे विचार थांबणार नाहीत असे ठरवून समोर कृष्णा नदीचा डोह होता त्यामध्ये तीन बुड्या मारल्या व काठावर येऊन उभा राहिलो. त्यावेळी पूर्वेकडे सूर्य उगवतो आहे असे दृष्टीस दिसले. त्यावेळी मन म्हणू लागले की, “पश्चिमेला आता काळोख सुरु झाला आहे त्याप्रमाणे भवितव्यात घडणार आहे हे सत्य आहे. घाई करू नकोस. आपले कर्तव्य आपण करावे. त्याचे फल देव देणार आहे”. त्या दिवसापासून विचार करणे हे सोडून दिले. कारण “नुसता विचार करून क्रिया ही शून्य होण्यापेक्षा विचारांची शून्य अवस्था प्राप्त करून घे. मग क्रिया ही किती गतिमान आहे हे समजेल. ह्या गतीवर जग चालले आहे. जग हे गतिमान आहे, पण ह्या जगाला ‘मध्य’ म्हणजे काय व ‘लय’ म्हणजे काय हे शेवटी कळेल. हे जग गतिमान आहे त्याला हळू हळू कमी करावे लागते व शेवटी लय व्हावा लागतो म्हणजे गतिचे पूर्णत्व होते. ह्या गणिताने तुला जावयाचे आहे. ती शिकवण प. पू. बाबां देतील त्याप्रमाणे वाग”.
माघ महिन्यात पंचमी आल्यावर, “तू स्वगृही जा ! तत्पूर्वी जी अमावस्या त्या दिवशी तुला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत” अशी आज्ञा झाली. ती आज्ञा ऐकून विचार करू लागलो की स्वगृही म्हणजे काय ? कारण औदुंबरला येण्यापूर्वी माझा संसार मी मोडला होता. बायको एकीकडे मुलगा दुसरीकडे व मी तिसरीकडे असे असताना फकीराला तरी झोपण्यासाठी मशीद असते पण मला हेही स्थान नव्हते. अशावेळी ‘स्वगृही’ हा शब्द कोणाला उद्देशून आहे ? जन्माला आलो तेव्हा आपला संसार जोडला. पण ज्यावेळी साधना पूर्ण झाली, त्यावेळी जगाचा संसार करावयाचा आहे याचा बोध झाला. निरोप घेण्यापूर्वी,
।। जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले,
तोची साधु ओळखावा, देव तेथेची जाणावा ।।
अशी वेदवाणी झाली व बोध झाला की ह्याचा अर्थ व्यावहारिक नाही. त्या वाक्यात सर्व जगाचे तत्त्वज्ञान आहे. ‘जे कां रंजले, गांजले’ म्हणजे इहलोक. ‘भाव तेथेचि जाणावा’ म्हणजे परलोक. ‘तोचि साधू ओळखावा’ म्हणजे स्वर्गलोक. ह्याचा संबंध तिन्ही लोकांत आहे, यासाठी इहलोकी ज्या व्यक्ती जिवंत आहेत त्यांना ‘भूत’ समज. कारण भूताची इच्छा, शमन व शांती कधीच होत नाही, कारण त्याला आकार नाही. जसे जग बदलते तसे हे आपला आकार बदलतात. पुढे कार्यामध्ये ही भूते पळवून लावतील. जरी ह्या भूतांना सोन्याचा डोंगर दिला तरी गुरूने काय दिले, ह्या प्रश्नाची विचारणा हे लोक करतील. पण परलोकात जे कार्य आहे ते कार्य १०० % होणार, कारण तेथील हे आत्मे पुढे जन्माला येतात. ह्या आत्म्यांना काया-वाचा नाही. जसा आपण आकार देऊ तसा ते घेत असतात. वाणी नसल्याने गायत्री मंत्र किंवा ‘श्रीराम जयराम जयजय राम’, इतका मोठा उच्चार त्यांना करता येत नाही, ह्यासाठी एक अक्षर म्हणजे ॐ म्हणता येईल. तो त्यांना शिकतल्यावर ते म्हणतील. यासाठी जे इहलोकी आहेत ते काया, वाचा व मन असे त्रिगुणी मानव आहेत. त्यांनी मरेपर्यंत ॐ कार साधना केली पाहिजे. शेवटी पुनश्च जन्म घेतेवेळी ॐ हाच शब्द पूर्ण येतो. त्यामुळे जन्म घेतेवेळी अहं आकार अशी अवस्था जन्मतःच प्राप्त होत असते. मनाची धारणा ही इहजगात संस्कारावर अवलंबून आहे, म्हणजे काया व वाचा यांचा लाभ संस्कारांनीच होत असतो. म्हणजे मनाएवढे महान कार्य तुला भवितव्यात करावयाचे असून ह्या कार्याची योजना ईश्वराने आखली आहे. जरी जग आपल्या पुढे गेले तरी जगाला ईश्वरापुढे नमावे लागेल. अजून पुढे जग आहे. येथे आल्यावर नदीच्या पलीकडे जे मंदिर आहे, ते तू पाहीलेस. ती ‘ज’ म्हणजे जगत्जननी आहे व ‘ग’ म्हणजे गणपती–ह्याच्या वाटेस जाऊ नकोस. पुढे तोहून बोलावील. तोपर्यंत ॐ असे म्हणत राहा. हाच प्रसाद तुला तुझ्या ‘वाढदिवसाला’ दिला आहे. हा दिवस अक्षय असून आपण जगात साजरा करू”.
पुढे पंचमीस सकाळी स्नानादी विधी करून महाराजांसमोर बसून राहिलो. ह्या २।। वर्षांत काय घडले याचा विचार करू लागलो. ज्या ‘नंदनवनात’ आपण तुळशी वेचल्या त्या तुळशीचे नाव जग शेवटी घेते. एवढा जगात व आपल्यात फरक आहे. नित्य पूजनात ‘तुळशीपत्र’ असल्याशिवाय पूजा हा विधी होत नाही. जग ‘तुळशीपत्रा’वर सुध्दा वासना, इच्छा सोडत नाही. ईश्वराने आम्हा मानवांना जन्म दिला व ज्ञानी केले. पण ‘न’ची बाराखडी विसरलो, म्हणून हा पुन्हा जन्म. नाहीतर एकाच जन्मात सोक्ष व मोक्ष आहे. पण मोक्ष हे आपल्याला विष आहे व सोक्ष हा विषय आवडीचा आहे. त्याच्या मागे लागून शेवटी मात्र फसतो. त्या दिवशी वसंत पंचमीचा सण हा दिवस भाग्याचा होता. त्या दिवसात सर्वत्र फुले व मग फले असा बहार निसर्गाला येतो. संगीतातसुध्दा ‘बसंत’ हा राग आहे. तो अत्यंत मधुर आहे व तो राग आळवून जेव्हा गायक बहार गातात तेव्हा सृष्टीची पावले असे सूचित करीत असतात की, पुढील काळ हा सुखाचा आहे. त्या दिवशी माधुकरी न मागता उपाध्ये यांचे घरी महाप्रसादाचे जेवण जेवलो. ते जेवण व नेहमी माधुकरी मागून जे जेवण जेवत होतो, त्यातला फरक काय हा समजला. कारण माधुकरीत जेवण हा महाप्रसाद होता, त्यात वास होता व शेवटी जेवलो त्यात वासना होती. वेळ फारच थोडा होता. त्यावेळी जसे गाईचे वासरू गायीपासून विभक्त करतात, तशी माझी स्थिती झाली. जन्म देणारी आई व सांभाळून नेणारी आई ह्यात फरक न समजता लोक म्हणतात की ‘माझी माऊली’ पण जर पावली असेल तर हा शब्द तोंडावाटे बाहेर पडतो अन्यथा नाही. जन्म देणारी आई ही, आपले जन्माचे ओझे ९ महिने सांभाळते, पण जी आई आयुष्यभर सांभाळते, हे आपल्याला समजत नाही. कारण तो तिचा धर्म असतो. थंडी, पाऊस, ऊन हे निसर्गात बदल होत असतात. त्याप्रमाणे जगात शेकडो लोक आजारी पडतात व हैराण होतात. पण गेल्या अडीच वर्षांत माझ्या माऊलीने माझा सांभाळ असा केला की, कोणतीही जगतातील आई असा सांभाळ करू शकणार नाही. ह्या काळात सर्दी, ताप, पडसे ह्यापैकी एकालाही माझ्या बाजूला येऊ दिले नाही. का ? तर माझी ‘साधना’ चालू होती. अशा माउलीचे उपकार कसे फेडू, हे मनात येऊन रडू लागलो व शेवटी निरोप घ्यावयाची वेळ आली. देवापुढे काय ठेवावे ? लोक निमित्ताने दर्शनासाठी येतात व शेवटी देवापुढे पै-पैसा ठेवतात. पण माझेकडे पैसे नव्हते, मग काय ठेवावे ? शेवटी आठवले. एक दिवस वडील मला म्हणाले होते की, “लहानपणी मला जेवताना अतिप्रिय साखर होती”, ज्यावेळी त्यांनी सांगितले की, “नुसते गोड खाऊन मनुष्य गोड होत नाही. नाहीतर हलवाई दिवसभर मिठाई विकतो. त्याचे हात कधी गोड झाले आहेत का ? याचा विचार कर व गोडाला विसरून जा. तेव्हाच आचार व विचारात गोडी येईल”. ते शब्द आठवले. येथून जाताना काय न्यावयाचे आहे व येथे काय सोडावयाचे आहे ? पुढे जगाला आपली गरज आहे. त्यासाठी आचारात व विचारात अशी गोडी निर्माण व्हावयास पाहिजे की आपल्याला जो कोणी भेटेल त्याला क्षणभर तरी आपल्या दु:खाचा विसर पडला पाहिजे असे बोधामृत पिऊन झाल्यावर घरी व आप्त इष्ट यांनी जेवावयाला बोलावले तरी ‘मिष्टान्न’ हे सोडू नकोस त्याचा आदर कर. कारण हे ब्रह्म आहे. ते गुरुंना अपर्ण कर. ज्या मिष्टान्नाने एक आत्मा वासनेने तृप्त होतो त्यापेक्षा अनंत आत्मे तृप्त होतील असा प्रसाद घेऊन जा. तोसुध्दा ब्रह्म आहे. त्याचा अनादर करू नकोस. पण घेताना फक्त प्रसादाइतकाच घे. तरच ते ब्रह्म होईल. आकंठ खाऊन ब्रह्मची किंमत कमी करू नकोस”. शेवटी नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी माझ्या मामांचेकडे गेलो. ह्या साधनेत त्यांनी बहुमोल मदत केला होती. तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो व घरातील सर्व मोठ्यांना नमस्कार करून मी पुण्यास येण्यासाठी निघालो.
ज्यावेळी मी पुण्याहून औदुंबरला आलो त्यावेळी मी ज्यांचे घरी राहात होतो, तेथे सर्व फोटो पूजनात होते व “मी येईपर्यंत तुम्ही त्यांची पूजा करा” असे सांगितले होते. त्याप्रमाणे आल्यावर हेच फोटो आपण ठेवून गेलो होतो का नवीन आहेत असा संभ्रम निर्माण झाला. पुढे एक दोन दिवसात ह्या फोटोंची प्रचिती त्या कुटुंबीयांना आली हे कळले. कारण त्यावेळी कार्याची स्थापना झाली नव्हती, फक्त सकाळी व संध्याकाळी आरती मी एकटा म्हणत असे व आलेल्या भक्तांना उदी देत असे. त्याप्रमाणे सकाळी व संध्याकाळी लोक जमू लागले. त्यावेळी जे कोणी काही दु:ख घेऊन येत, त्यांना फक्त प. पू. बाबांचे श्रीफल पूजनार्थ देत असे. यापेक्षा काही प्रश्नांची विचारणा केली नाही. फक्त ‘प्रसादाचे पूजन ११ आठवडे करा व नामस्मरण, ॐ श्री साईनाथाय नमः, १ माळ म्हणा. प. पू. बाबा तुमचे दु:ख निवारण करतील’ असे सांगत असे. हा विश्वास संपादन केल्यावर प. पू. बाबांनी “समितीची स्थापना कर. ह्यासाठी जी मदत लागेल ती मदत ५ पीर करतील. लहानपणी तुला ज्यांनी फकीर केला आहे, तेच हे सर्व कार्य करतील” असे सांगितले.
जगतात जे कोणी जन्माला येतात, त्यांना प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा ह्याची गरज लागते, असे आपण विचारात घेऊन त्याचा प्रयत्न करीत असतो. अशावेळी आपल्या जीवनात त्यांची तरतूद काय काय झाली आहे, असा सुविचार कधीच करता आला नाही. आपल्या सभोवार जे जग दिसते तशा प्रकारची सुखे, ऐषआराम आपल्याला प्राप्त का होत नाहीत, अशा विचारात आपण जागे होतो. कारण इतरांप्रमाणे आपण सुखी नाही, सुखासाठी प्रयत्न करूनसुध्दा आपल्या वाट्याला सुख नाही असे आपल्याला वाटू लागते. मग हे जीवन काय आहे हे पाहू लागतो. पहिला प्रयत्न भूत, भविष्य, वर्तमान ह्या तिन्ही काळात सुखाची बाजू आहे किंवा नाही हे पडताळून पाहतो. ज्या अर्थी ह्या तिन्ही काळात जाऊनसुध्दा सुख, शांती मिळत नाही म्हटल्यावर व दैवाने पाठ फिरवली म्हटल्यावर मनुष्य मग देवाच्या शोधात लागतो. त्यावेळी देव म्हणतो “अरे माणसा, तुला माझी आज आठवण झाली. पण तुझ्या पूर्वजांना मीच अन्न, वस्त्र, निवारा दिला होता व पुढेही मीच देणार आहे, पण तुला माझी आठवण आता होते आहे. मूल जरी आईला विसरते तरी आई मुलाला विसरत नाही”. त्याप्रमाणे देव आहेच ,पण पाठीशी की, पोटाशी ? हा प्रश्न आहे. जगात पुष्कळ लोक अडचण आल्यावर देवाचे खूप करतात. काम अडले की म्हणजे अडचण निर्माण झाली की देवाचा धावा करतात व ती निवारण झाली की देवाची निरवानिरव करतात. जीवन हा कर्माचा खेळ आहे. ह्या खेळात जय-पराजय असे फासे पडतात, हे विसरून चालणार नाही. जीवनात एखादे कर्म अडचण म्हणून येत नसते, तर ती अडचण आपल्याला जागे करण्यासाठी येत असते पण आपण जर जागेवर असू तर. देव आपल्याला हाक मारतो आहे हे समजेल, ह्यासाठी जीवन म्हणजे काय व जन्म म्हणजे काय हे समजले पाहिजे. नुसते जन्माला येणे हे सोपे नाही. जन्म घेतेवेळी ९ महीने लागतात. पण जन्माला आल्यावर ह्या जन्माचे डोहाळे पुरविता पुरविता जीवन वाया जाते. ह्यासाठी सूज्ञांनी निदान आपण जन्माला का आलो व आपले कर्तव्य काय ? हा विचार केला तरी पुष्कळ आहे.
ह्याप्रमाणे जे जे लोक मला भेटण्यासाठी येत होते, त्यांची रडकथा हीच होती. प्रत्येकाला हाच प्रश्न मी विचारला. त्यावेळी ह्या लोकांनी निवेदन असे केले की ‘देवळात होणारे कीर्तन, पुराण, प्रवचन आदी ऐकले आहे. पण तुम्ही जो प्रश्न आमच्यापुढे मांडला आहे तो कोणी विचारला नाही. देवळात होणाऱ्या कीर्तनात देवाचा विषय असतो किंवा पुराणातही ह्य़ा व्यतिरिक्त अन्य प्रश्न कोणीच विचारला नाही’ असे उत्तर बहुसंख्य लोकांनी दिले. यावरून हे अभ्यासावयास मिळाले की समाजात देवधर्माबद्दल श्रध्दा आहे, पण ही श्रध्दा कोरडी आहे. त्याच्या मुळाशी ओलावा नाही. म्हणजे केवळ जीवनात वेळ जात नाही म्हणून बरेच लोक देवतार्जनास जातात व त्यांचे अनुकरण बाकीचे सर्व करतात. हाच देव व धर्म असे म्हणतात. त्यासाठी निराकरणार्थ जे लोक येत होते, त्यावेळी त्यांना चार शब्द सांगण्यास म्हणजे ‘मुलाखती’ ह्या विषयाला आरंभ केला.
जीवनारंभी मानवी जीवनात जे काही दु:ख म्हणून असते ह्याच्या मुळाशी अज्ञान असते. ह्या अज्ञानामुळे कोणावरही श्रध्दा ठेवली जात नाही. निदान स्वतःवर तरी श्रध्दा आहे का ? आपण जे काही करत आहोत त्यातून आपल्याला काय लाभ होणार आहे याचा विचार कोणी करीत नाही. जे जे लोक मला भेटण्यासाठी येत होते त्यावेळी येणारे ९० टक्के लोक मला सुख पाहिजे व कसे प्राप्त होईल, ह्याची विचारणा करीत असत, त्यावेळी माझी परीक्षा होण्याची वेळ आली, कारण गेली २।। वर्षे मी ‘साधना’ केली. ह्या साधनेने सुख, शांतीची प्राप्ती होत नाही, म्हटल्यावर येणाऱ्या लोकांना काय द्यावे व काय देऊ नये असा प्रश्न उभा राहीला, कारण जगाला हे ज्ञान होते की, मानवी जन्म हा कर्मपरत्वे होतो व कर्माची बरी वाईट फळे मानवाला भोगावी लागतात. यापेक्षा अधिक ज्ञानाची गरज नाही व अशा लोकांना हा मार्ग सुखाचा आहे का फाशीचा मार्ग आहे हे कळले पाहिजे, यासाठी काही मार्ग आहे का ? नुसते औदुंबरला राहणे सोपे होते त्याहीपेक्षा अधिक बिकट मार्ग जग पाहिल्यावर वाटू लागले. त्यामुळे झोप येईना. ज्या आनंदात मी होतो त्याहीपेक्षा विवंचना मागे लागली. औदुंबरला जी ‘साधना’ आपण केली हे मी म्हणत होतो, पण त्या साधनेची प्रचिती येणाऱ्या भक्तांना यावयास पाहिजे तर आपण बोलतो आहे हे सत्य होईल. गुरु आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास इतरांना देणे सोपे आहे, पण त्याची अनुभूती यावयास पाहिजे. अशा अवस्थेमध्ये मी होतो. रोज झोपण्याआधी प्रार्थना म्हणत होतो, पण त्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळेना. काय चुकले आहे हे कळेना. ‘सर्वस्व दिले आता देण्यासाठी काय बाकी आहे’ हाही विचार करू लागलो. शेवटी मती गुंग झाल्यावर विचाराची दिशा उलटी चालू लागली. यापेक्षा मरण बरे. नाही तो उपद्व्याप केला आहे, असे वाटू लागले. शेवटी एके दिवशी सकाळी पूजा, आरती करून गावाबाहेर विठ्ठलवाडी आहे, तेथे जाऊन बसलो. त्यावेळी तेथील नदीचा परिसर लोकांना जास्त माहिती नव्हता. त्या ठिकाणी बसून शांतपणे विचार करू लागलो. गेल्या २।। वर्षांत कशाचाही मोह झाला नाही, पण उत्तर मिळेना. शेवटी गावात परत येतेवेळी आजूबाजूला आमराई होत्या. त्या झाडावर माघ महिन्यात मोहराने झाड फुलले आहे हे पाहून उभा राहिलो व विचार करू लागलो. कारण ‘काही दिवसांनी ह्याच मोहराची फले तयार होतील व मग फळ पिकल्यावर जग खाईल. नुसता मोहर पाहून ‘हा आंबा आहे’ असे जग म्हणणार नसून, ‘आंबा’ ह्याऐवजी तुला ‘आबा’ म्हणतील. आमराईचा मालक आंबे पिकले की ते देवाला अर्पण करतो मग राहीलेले आंबे विकण्यास बाजारात जातो. तू एवढा शहाणा होऊन तिन्ही लोकांचे ज्ञान होऊनही कोरडा राहीलास ! गेली २।। वर्षे सेवा केली म्हणतोस, तर सेवा कोणी केली, हा प्रश्न आहे. सेवा करण्यासाठी पुढचा जन्म आहे. सेवा केली ही दत्तगुरुंनी व ती तुझ्या माध्यमातून. यासाठी इहजन्मी मेवा तू खा पण सेवा ‘मी केली’ असे म्हणालास तर फल येणार नाही. येणारे जग ‘मेवा आहे का’, ही विचारणा करतात. त्याची गोडी लागल्यानंतर त्यांना सेवेचा मार्ग दाखव. ह्यासाठी गुरुमार्गात जे जे आपण मिळवितो ती साधना गुरुदक्षिणा म्हणून गुरुंना द्यावी लागते. तरच त्याचे फल आहे’.
केवळ झाडाला आलेल्या मोहर याने मला जागे केले, त्यामुळे प्रचिती आली की आपल्या हातून कार्य व्हावे हा ‘मोह’ आवरला पाहिजे. अजून ‘साधने’ला फल यावयाचे आहे, ते आल्यावर मग ‘गुरुदक्षिणा’. तोपर्यंत गुरुमार्गात ‘दक्ष’ राहणे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे विचारांची दिशा बंद करून सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून आचार होतो किंवा नाही यावर बारकाईने लक्ष ठेवून वागू लागलो. त्याच रात्री प. पू. बाबांनी दर्शन दिले. रात्री १ ते २ च्या दरम्यान जाग आली. मी ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी मी एकटाच झोपत असे. समोरच्या कोनामध्ये देवाचे स्थान होते. मी उठून हातपाय धुतले व एकांतात बाबांच्यासमोर बसलो, त्यावेळी प. पू. बाबांचा फोटो हा नेहमीप्रमाणे वाटेना. त्यात काहीतरी बदल झाला आहे असे वाटू लागले, पण खूण काही पटेना. शेवटी मी आदराने प. पू. बाबांना विचारणा केली की, “बाबा, आज जो फोटो पाहतो आहे व रोजचा पूजन करतो यामध्ये फरक आहे का ?” तेव्हा ते म्हणाले “वेड्या, फोटो तोच आहे. ज्याप्रमाणे कावीळ होते व रोग्याला जग पिवळे दिसते त्याप्रमाणे साधक अवस्थेत भास होतो. हा ‘भास’ म्हणजे काय हे समजले पाहिजे नाहीतर मृगजळाप्रमाणे आपली अवस्था होईल. गेल्या २।। वर्षांत माझा फोटो आहे तोच आहे, त्यात बदल केव्हा होईल ? जेव्हा जगात बदल होईल तेव्हा ! हा बदल तू घडविलास तर होईल, नाहीतर मी ‘बाबा’ व तू ‘काबा’, असे दोन वेडे पीर जन्माला येऊन फुकट गेले असे म्हणावे लागेल. कारण ज्यावेळी मी होतो त्यावेळी हेच जग मला वेडा म्हणत होते व आता तुला अतिशहाणा असे म्हणतील. यासाठी नेहमी ‘मौन’ पाळावे. भांग पिऊन बडबड करू नये. ‘भांग’ हा जगत् जननीच्या डोक्यात शोभतो, त्यामुळे डोक्यात मधोमध बरोबर केसाचे दोन भाग केले जातात. एक उजवीकडे व दुसरीकडे डावी बाजू याचा शोध नंतर लागेल. तोपर्यंत ‘मौन’ पाळ. ’मौन’ याचा अर्थ ‘बोलणे बंद’ असा नसून खरे बोलणे व चालणे म्हणजे मौन. आता ह्या गप्पा खूप झाल्या. माझ्यावेळी सुध्दा असेच रिकामटेकडे खूप भक्त होते. भक्ती राहीली बाजूला. ब्रह्म म्हणजे काय ? स्वर्ग म्हणजे काय ? ह्या शंका-कुशंकांनी मला बेजार केले. जरी ब्रह्म म्हणजे काय हे मी सांगितले असते तरी ‘कुठाय’ ? म्हणून दुसरा प्रश्न विचारला असता म्हणून जे जे लोक ज्ञानी आहेत ते म्हणतात, असे लोक मला भेटण्यासाठी येत, त्यावेळी मीच त्यांना उद्देशून म्हणत असे की, “हे बघा ब्रह्म आले. घ्या दर्शन ! , ह्याचा लाभ पुष्कळ होईल”. अशी कानउघाडणी केल्यावर कार्य म्हणजे काय हे समजले व त्याची स्थापना म्हणजे काय करावयाचे हा प्रश्न पुढे उभा राहीला. पुढे प. पू. बाबा मला म्हणाले की, “तुझ्या बा ने तुझे ‘दत्ता’ नाव ठेवले. त्यापेक्षा ‘गधा’ हे शोभले असते. नाव मोठे व अक्कल शून्य. जे कार्य म्हणतोस होऊन २।। हजार वर्षे नाथांनी केली. पुढे काळाचा महिमा आपल्या वाट्याला येतो अशावेळी तेच कार्य पुन्हा उदित करावयाचे असते, म्हणून माझ्या वेळेला येणाऱ्या लोकाना हे कार्य म्हणजे काय हे समजावे यासाठी मी धुनी पेटवून त्यातील राख लोकांना ‘उदी’ म्हणून देऊ लागलो म्हणजे ही उदी ग्रहण केल्यावर तरी जग जागे होईल म्हणजेच ‘उदित होणे’ हीच क्रिया तुला करावयाची आहे. जे कार्य नवनाथांनी २।। हजार वर्षांपूर्वी केले तेच कार्य पुन्हा करावयाचे आहे. मनुष्याला जन्म एकदाच मिळतो. त्याची पुनरावृत्ती वारंवार होणे म्हणजे जन्म नव्हे. तेव्हा या विजया दशमीला कार्य सुरु कर पण स्थापना नव्हे कारण नवरात्राची सांगता आपण करतो तो ‘विजय’ दशदिशांना होऊ दे” अशी आज्ञा केली . त्याप्रमाणे ‘श्री साई अध्यात्मिक समिती’, ह्या नावाने ह्या शुभमंगल दिवसापासून ‘कार्य’ सुरु केले.
समितीचे कार्य हे विजया दशमीला सुरु झाले. त्या कार्याचे ब्रीद काय ? प. पू. बाबांनी बोध असा केला की ‘सर्वांभूती आत्मा एकच आहे’. ह्या तत्त्वाप्रमाणे आपण सर्वांनी वागले पाहिजे यासाठी समितीच्या मार्गदर्शनार्थ जे कोणी येतील त्यासाठी सर्व भक्तांना हरिचे मुक्तद्वार असावयास पाहिजे. जगात जे जे धर्म व धर्माचरण लोक करीत आहेत त्यांत ‘हा अधिक, हा कमी’ असा भाव असता कामा नये. यासाठी पूर्वीच्या काळाप्रमाणे अनुकरण असून उपयोगी नाही. माझे ‘स्थान‘ सर्वांना दर्शनासाठी खुले पाहिजे. देव्हारा व इतर प्रकारांनी आपण देवाची मांडणी करतो, ती मला नको आहे. जो जो कोणी ह्या जगातील मनुष्य मला भेटण्यासाठी येईल तो जरी मोकळ्या मनाने आला नाही तरी ‘देव’ हा संकुचित असता कामा नये. जगातील लोक दु:खी आहेत. त्या दु:खात वाटेकरी व्हा. वारकरी नव्हे, कारण ‘वारकरी’ हे लोक महिन्यातून दोनदा एकादशी व दुसऱ्या दिवशी द्वादशी यावेळी जो कुलाचार चालू असतो, त्यावेळी कुलाला न शोभेल असे वागतात. पूर्वी कुलाला शोभेल असे वागणे व दानधर्म करणे अशी परंपरा आपली होती. ती बाजूला राहून हे लोक फक्त देवाचे नाव घेऊन चरत असतात. तेव्हा येणाऱ्या भक्ताचे दु:ख कसे कमी होईल याचा विचार प्रथमतः केला पाहिजे. नुसती गीता सांगितली तर हे लोक पुढे अंगाईगीत गातील. यापेक्षा सोप्यात सोपा असा मार्ग लोकांना सूचित कर व ह्याप्रमाणे कार्याची योजना कर. शास्त्राने सांगितले आहे की कुलोपासना, कुलधर्म, कुलाचार, मातृदेवोभव, पितृदेवोभव, आचार्यदेवोभव, अतिथीदेवोभव ही कर्तव्ये नकळत आपल्या हातून घडली पाहिजेत. आपल्याला गोड खाण्याची वासना झाली म्हणजे कुलधर्म नव्हे. देवाची भूक लागल्यावर कुलधर्म करावा. तो देवाला ‘भाक’ सांगून जागे करतो व पर्यायाने आपण जागे होतो”.
वरीलप्रमाणे मार्गदर्शन झाल्यावर हताश झालेले मन हे गुरुकृपेने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार झाले. पुढे येणाऱ्या लोकांना श्रीगणेशापासून जीवनाचा आरंभ कसा करतात, ह्याची शिकवण ‘मुलाखती’द्वारे समजावून देऊ लागलो. त्यामुळे देवळातून मिळालेला नारळ व आपण देत असलेले ‘श्रीफल’ यात काय फरक आहे हे लोक समजू लागले. देवळात किंवा नारळाच्या दुकानात मिळणारा ‘नारळ’ व आपण देणारे ‘श्रीफल’ म्हणजे काय ? कारण नारळ हा देवासमोर ठेवल्यावर पुजारी तो परत देतो. त्यावेळी तो नारळच असतो. कोणीही भक्त व पुजारी ह्यांची देवाण घेवाण अशीच चालू असते. अशामुळे शेकडो नारळांचा बळी जातो. पण आपल्याला सुख, शांती लाभू शकत नाही. जेव्हा आपण नारळ ठेवतो, त्यावेळी जो नारळ देवाला अर्पण करावयाचा असतो त्यावेळी आपल्या ठायी भक्ती व श्रध्दा यांचा संगम व्हावयास पाहिजे. पण तो नारळ म्हणजे देवाचे काही देणे आहे अशी भावना बहुतांशी लोकांची असते. वास्तविक पुजाऱ्याकडून येत किंवा देत असलेला नारळ हा ‘प्रसाद’ म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे व त्यानंतर जो प्रसाद आपल्याला मिळतो, त्या प्रसादाची ‘साद’ म्हणून आशिर्वाद हा देवाकडून मिळतो. ही क्रिया त्रिपुटी आहे. देव, पुजारी व भक्त यांची इच्छा देवाकडे आल्यावर एक व्हावयास पाहिजे. अन्यथा देवाच्या नावे खडे मोजणारे लोक पुष्कळ आहेत.
अडीअडचणीमुळे आलेल्या भक्ताने आपले दु:ख सांगितल्यावर त्याला जे श्रीफल (नारळ) देण्यात येते, तत्पूर्वी हे श्रीफल अभिमंत्रित करावे लागते. नुसते पाण्यात ते ओले केले की आपले कर्तव्य संपले असे नसून वास्तविक त्या दिवसापासून आपल्या कर्तव्यास आरंभ झाला, कारण जो कोणी दु:खी आहे त्या भक्तास जेव्हा आपले दु:ख निवारण करता येत नाही, तेव्हा तो आपल्याकडे येऊन दु:ख सांगू लागतो. तेव्हा ११ आठवडे याचे पूजन भक्ताने करावयाचे असाच त्याचा अर्थ नसून अपरोक्ष तो प्रसाद आपण स्वीकारला आहे ही भावना जेव्हा निर्माण होईल तेव्हा भक्तास जे जे सुख तो मागतो आहे त्याच्या इच्छेपेक्षा अधिक मिळते म्हणून जो नारळ द्यावयाचा असतो, त्यास ‘श्रीफल’ असे म्हणतात. ह्या फलात दोन ‘श्रीं’ चा अंतर्भाव श्रीगुरुंनी केलेला असतो. एक म्हणजे ‘लक्ष्मी’ ही प्राप्त व्हावी अशी अपेक्षा ईश्वराकडे तो मागत असतो. दुसरी ‘श्री’ म्हणजे ‘सरस्वती’ म्हणजे ज्ञान. हे ज्ञान साधकास व्हावयास पाहिजे. याशिवाय ह्या ११ आठवड्यांत अपरोक्ष कार्य चालू असते. त्यामध्ये पहिली ‘श्री’ म्हणजे प्रपंच व दुसरी ‘श्री’ म्हणजे परमार्थ अशी ठेव जेव्हा आपण न मागता मिळते त्याचा अर्थ ‘श्रीफल’.
ह्या कार्यात मूळ विषय हा कर्माचा असतो. ज्यावेळी कर्म अनुकूल असते तेव्हा सर्व सुखांची प्राप्ती होत असते, पण जेव्हा प्रतिकूल कर्म असते तेव्हा जीवनात दु:ख, अशांती असते. त्यावेळी जे कर्म प्रतिकूल आहे म्हणजे कोणते कर्म माझ्या हातून घडले आहे हे आपणास कळत नाही तोपर्यंत गत जन्मांत आपण पाप केले असेल असा तर्क आपल्या बुद्धीत निर्माण होतो. अशावेळी कर्माचा शोध घेणे अत्यंत अवघड आहे. एकवेळ धर्माचे मूळ किंवा खूळ हे आपल्याला समजेल, पण कर्म म्हणजे काय ? त्याची क्रिया म्हणजे दु:ख आपल्या वाट्याला येते. ते तरी का ? हे समजू शकलो तर जे कर्म प्रतिकूल आहे, ते अनुकूल होईल म्हणजे सुख असे म्हणता येईल. ह्या कर्माची मीमांसा पूर्वी औदुंबरला सांगितली होती. ह्याचा अनुभव प्रत्यक्ष भक्ताच्या जीवनात येतो किंवा नाही व त्यावर तरणोपाय काय आहे हे समजले पाहिजे. ‘मीमांसा’ याची महती आपण जन्माला येण्यापूर्वीच लिहिली आहे. त्यानुसार प्रथमतः ‘वंशविमोचन’ याचा विचार करावयास पाहिजे. ह्या साधनेत घराण्यातील तीन महत्त्वाचे दोष संपत्ती, विद्या व संतती यांचा नाश होण्यास जे कर्म कारणीभूत होते त्या कर्मातील दोष जावयास पाहिजे. त्याप्रमाणे जी जी भक्त मंडळी मार्गदर्शनार्थ येत होती त्यापैकी त्यांच्या वंशात एक तरी दोष धारण होतोच हे कळले. अशा प्रकारे दोष हे सर्वांचे ठिकाणी आहेत, याचे कारण गेल्या १०० वर्षांत आपले आचार-विचार ह्यांच्या पत्ता नाही. अमूक जात, अमूक धर्म, हा सांगण्यासाठी राहीला आहे. नित्य आचरणात देव व धर्म आला असता तर ह्या दोषांची मुक्तता झाली असती. म्हणजे मनुष्य जगण्यासाठी जो गुण आवश्यक आहे तो म्हणजे सत्वगुण. आज ह्या गुणाचे अस्तित्त्व शून्य आहे. आपल्या बोलण्यात व वागण्यात धर्म असावयास पाहिजे. निसर्गात अन्य पक्षी, प्राणी आपापल्या धर्माप्रमाणे वागतात. परमेश्वराने आपल्याला बुद्धी दिली म्हणून ह्या जीवनाचा खेळखंडोबा करणे हे उचित नव्हे. आपण बाहेर जाते वेळी चांगले कपडे घालतो की ज्यामुळे समाजाने आपल्याला मोठे म्हणावे ही दक्षता आपण घेत असतो. पण घराण्यात जी संतती होणारी आहे ती निरलस व सर्वगुणसंपन्न असावी अशा विचारार्थ काय केले पाहिजे त्याचे ज्ञान नाही. जन्माला आल्यावर त्या जिवाची प्रगती व्हावी याची विचारणा आपण देवाला करतो, पण जो जीव जन्माला येणार आहे त्याचे माता-पिता, ही खाण आहे. जन्माला येणाऱ्या मातीत दोष (आचार, विचार) असेल तर त्याचप्रमाणे संतती जन्माला येईल. जन्माला आल्यावर जी सुधारणा व्हावयास पाहिजे असे शास्त्रज्ञ म्हणतात, ती कशी होणार ? समाजात एखादाच डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ हा जो कोणी आपण पाहतो, त्याच्या जन्माच्या आधी त्याचे माता-पिता कसे वागले की, ज्यामुळे मुलगा डॉक्टर झाला किंवा शास्त्रज्ञ झाला हे पाहीले पाहिजे. आज जे जग आहे त्यात बदल झाला नाही, तर तो बदल आम्हा मानवांमध्ये झाला आहे, यासाठी समाजामध्ये जे जे काही आपल्याला दिसते व ज्यामध्ये सुधारणा व्हावी असे आपण म्हणतो त्या समाजाची रचना कशी झाली ? यासाठी जो पाया आहे, तो इतरांचा न पाहता आपल्या पायाखाली काय आहे हे पाहा. तीच माती पुढे आकार घेते व आपली संतती आपण निर्माण करतो. जन्माला येते वेळी संततीत जर कमीअधिक असेल तर ‘संपत्ती’चा लाभ काय ? जे जगण्याचे साधन आहे त्या ‘संपत्ती’चा लाभ जरी झाला तरी त्या संपत्तीपासून समाधान मिळत नाही. समाजात अडचणी असतील पण किती काळपर्यंत ? अडचणी आपणास जागे करण्यासाठी असतात. पण ‘संपत्ती’चा मोह इतका वाढला आहे की, अडाणी मनुष्यापासून शिकलेल्या मनुष्याला तृप्ती आहे का ? ह्या मोहापायी जीव कसा जातो व कसा जगतो ही स्पर्धा चालू आहे. जर स्वतःला शांती नाही तर विश्वात व्हावी कशी ? ‘शांती’बद्दल भाषणे देणारे पुष्कळ आहेत. पण भाषणे देणारा आपले कर्तव्य काय आहे, हे विसरून भाषणात व संभाषणात सर्व विषय, जी इतरांची निंदा असते, ह्या व्यतिरिक्त बोलत नाही. नुसते दया, क्षमा व शांती हे शब्द बोलण्या-सांगण्यास राहीले आहेत, याचे कारण जन्माचे गणित चुकले आहे. ही चूक आज आपल्याला भोगावी लागत आहे व पुढे ह्याच परिस्थितीकडे आपण दुर्लक्ष केले तर आपल्याला जगणे अशक्य आहे. आज आपण संपत्ती प्राप्त कराल, पण पुढे ही संपत्ती आपल्या नाशाला कारणीभूत होणार आहे. ह्याचा दोष मुळाशी आहे. जो आपला पाया देवावर, धर्मावर उभारला आहे त्याची जागृती व्हावी व सर्वांना सुख लाभावे यासाठी ह्या समितीचे कार्य प. पू. बाबांनी सुरू केले. प. पू. बाबा काही शास्त्रज्ञ नव्हते. पण ह्या साध्या फकीराने सर्व जगाला तारावे असा विश्वास सर्वांना दिला व देत आहेत. जगाची रीत अशीच आहे की आपल्याला जगाने मोठे म्हणावे यासाठी जगाची निंदा करावी. ह्या जगात साधूसंत येतात व जातात. येताना जगाला तारण्यासाठी येतात व जाताना त्याचा ‘वास’ अखंड भूतलावर असतो म्हणून आजपर्यंत आपण तरलो आहोत.
वरील दोष आम्हां ७५ % मानवामध्ये आहेत. बाकीचे जे २५ % सुखी आहेत त्यांनी ज्यांना दु:ख आहे, त्यांच्याकडे सहानुभुतीने पाहावे. नुसती दारे बंद करून ‘सभोवारच्या जगाने डोळ्यावर देवाची, धर्माची पट्टी बांधली आहे’, हे म्हणणे हास्यास्पद आहे. धर्मशास्त्राने जे जे दोष आहेत त्यांचे निवारण व्हावे अशी तरतूद केली आहे. पण त्यासाठी निराकरण करणारे लोक पाहिजेत, ह्यासाठी जगाकडे धाव घेऊन हे दु:ख दूर होणारे नाही. जर आपण मनोभावनेने देवाचे काही स्मरण केले, तर आपले मरण चुकेल व आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा साधक भेटेल. जर आपण दुसऱ्यावर विसंबून राहिलो तर सर्वत्र बाधक वाट पाहात आहेत, ते आपल्या दु:खाचा व अज्ञानाचा बळी घेतील, ह्यासाठी ह्या मार्गात येण्यापूर्वी सज्ञान व्हा व मार्गस्थ व्हा, नाहीतर मार्ग न समजल्यामुळे आपले दु:ख व आपले कुटुंब म्हणजे पर्यायाने आपला वंश ह्याचे विमोचन होण्याऐवजी आपला अस्त होईल.
याप्रमाणे जे जे कोणी मार्गदर्शनासाठी येत होते त्यांना ‘निराकरण’ म्हणजे काय ह्याची सविस्तर माहिती सांगून ‘वेळ येताच’, म्हणजे प. पू. बाबांची आज्ञा जेव्हा होईल तेव्हा, मी पुढील निराकरण सांगीन असे सांगत असे. तत्पूर्वी वंशविमोचनाचा विधी कसा करावा ह्या संबंधी विचारविनिमय येथील वेदशास्त्रसंपन्न गोगटे गुरुजी त्यावेळी आपल्याकडे येत होते त्यांच्याशी केला. त्यांचे मूळ गाव ‘वाई’ असे असून त्यांचे वास्तव्य पुण्यास होते. त्यावेळी माझा विषय काय आहे व काय विधी करणे आवश्यक आहे किंवा काय प्रायश्चित्त घेणे भाग आहे हे त्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले “त्यासाठी मला एक महिना विचार करण्यास द्या. त्या मुदतीमध्ये आणखी जे जे कोणी विद्वान पुण्यात आहेत त्यांना मी जाऊन भेटेन व मग आपण भेटू.”. त्याप्रमाणे वंशविमोचनाचा आराखडा तयार झाला की ज्यामध्ये प्रधान आवाहन देवांना करून मग पूजा, अर्चा व हवन आदी विधी होता. जो दोष घराण्यास आहे त्यासाठी संकल्पयुक्त प्रायश्चित्त हवन करावयाचे असून त्यासाठी – सहा पितृ व मातृ घराण्यांचा उच्चार व्हावयाला पाहिजे व त्याच्या आहुती तीळ व तूप यांनी देऊन हवन करावयाचे व सांगता शेवटी पूर्णाहुती देऊन, असा विधी पूर्ण होतो. त्यावेळी जे जे कोणी भक्तभाविक उपस्थित राहतील, त्यांच्या प्रायश्चित्त-संकल्पांचा उच्चार त्यांनी केला पाहिजे. हा विधी झाल्याबरोबर सुखाचा पाऊस पडेल असे नाही. ह्या विधीमुळे गतकाळात जे जे आत्मे परलोकवासी झाले आहेत, त्यांना दोषमुक्त करून पुढे ह्या आत्म्यांना सद्गती मिळते, पण मधे आपले आचार-विचार यावर त्यांची मुक्तता अवलंबून आहे. नुसता वंशविमोचनाचा संकल्प घेतला म्हणजे ते मुक्त होतील असे जर कोणास वाटत असेल तर भगीरथाने जी तपश्चर्या केली तो वेडा होता असे म्हणावे लागेल. त्याप्रमाणे पहिले वंशविमोचनाचे हवन कल्याणला हाजीमलंग ह्या डोंगरावर झाले. अशा तऱ्हेने ५ हवनेही तेथे झाली. त्याचे कारण अभ्यासण्यासारखे आहे. ते असे की दोष+कर्म यांचे ‘विमोचन’ होऊन ह्या विधींचा दोष कोणालाही लागू नये, कारण हा विधी पहिल्यांदाच आपण करीत होतो व त्यावेळी ज्या दोषांचा उच्चार केला जातो तो राहत्या वास्तूमध्ये होऊ नये. त्यासाठी काही असे विधी आहेत की जे विधी वास्तूच्या बाहेर करावे लागतात. याप्रमाणे ५ हवने केल्यावर मग मुंबई, पुणे व गोवा ह्या तीन केंद्रांवर हे वंशविमोचन ह्याच पध्दतीने केले गेले. पहिले हवन पुणे मग मुंबई व मग गोवा ह्या क्रमाने करण्यात आले, कारण हा विधी ३६० मैलांतच व्हावयास पाहिजे होता. आपली पृथ्वी ही ३६० अंशाने जन्माला आली. त्या पृथ्वीच्या आसमंतात जी पोकळी आहे त्या पोकळीत प्रथमतः आत्म्याचा प्रवेश होतो व मग हे आत्मे आपापल्या कर्माप्रमाणे गतीला जात असतात व परलोकातील ५ लोकांत ह्या आत्म्यांना स्थान प्राप्त होत असते. यासाठी हा विधी मकर-संक्रांत झाल्यावर करावयाचा असून त्या विधीसाठी ग्रह हे अनुकूल पाहिजेत. हा विधी प्रथमतः जेव्हा करण्यात आला तेव्हा पृथ्वीची कुंडली हीचा विचार केला गेला आहे, कारण गुरु हा सिंह राशीत असताना त्या राशीला शनि यावयास पाहिजे. ह्या विधीचा आरंभ ३६० वर्षानी झाला. जगात बाहेर खूप तीर्थक्षेत्रे आहेत व त्या ठिकाणी पुष्कळ उपाध्ये व ज्ञानी आहेत, परंतु कोणता विधी ह्या जगाला हितकारक होईल ते बघावे लागते. नाहीतर दर महिन्यात हा विधी होऊ शकतो, पण त्याचा हेतू वेगळा. बरेचसे लोक ह्याला बळी पडतात. कारण आपल्याला संतती नसणे, हा दोष जन्माला येऊन कमीपणाचा वाटतो म्हणून ह्या तीर्थक्षेत्री लोक येतात व जे उपाध्ये सांगतील ते विधी हे लोक करीत असतात. त्यामुळे त्यांचे मनोगत जे अपत्य व्हावे असे असते, त्याऐवजी ‘आपत्ती’ घेऊन घरी येतात. काही प्राप्त व्हावे अशी इच्छा होणे स्वाभाविक आहे, पण ती इच्छा ईश्वराधीन असते. तेव्हा ईश्वराला प्रसन्न न करून घेता वासनेला बळी पडून तीर्थक्षेत्री जाऊन ‘आपत्ती’ आणत असतात. अशी चूक झाल्यावर गुरुमार्गी जरी तो भक्त झाला, तरी ह्या दोषापासून मुक्त होत नाही, यासाठी हा वंशविमोचन विधी केंद्रावर जे कोणी भक्त आहेत व पुढे येतील त्यांचेसाठी दरवर्षी करून ह्याची सांगता २१ वर्षांनी केली. त्यासाठी गुरुआज्ञेने संपूर्ण वर्ष दर पौर्णिमेस मी श्रीनरसोबाची वाडी ह्या ठिकाणी जाऊन प्रथमतः दर पौर्णिमेस ‘रूद्र’ (म्हणजे शंकर) याचे होमहवनयुक्त असा विधी केला. ११ पौर्णिमेस हा विधी जेव्हा सिध्द झाला, तेव्हा ‘महारूद्र स्वाहाकारा’स आवाहन केले गेले, त्यासाठी समस्त भक्तांना आमंत्रण देण्यात आले. कारण ह्या विधीची सांगता पैसे आहेत म्हणून करता येत नाही. ‘स्वाहाकारात’ आवाहन करावयाचे असते. त्यावेळी स्वाहाकारात ज्या शक्तीचे आगमन होत असते तत्पूर्वी भक्ताचे काया-वाचा-मन दीक्षा देऊन तयार करून घ्यावे लागते, कारण ती शक्ती भूतलावर आल्यावर प्रत्येकाच्या ठायी अंश रूपाने राहीली पाहिजे. हा विधी जगतात पुष्कळ लोक करतात. कारण जगात शांती निर्माण व्हावी, म्हणून हा विधी केला जातो, पण हा विधी करण्यात काय पथ्य आहे, हे न समजल्यामुळे ‘शांती’ प्राप्त न होता, आहे त्यापेक्षा ‘अशांती’ जगात पसरलेली आहे.
ह्या विधीच्या संदर्भात वंशात, कर्मविमोचन व ऋणमोचन हा विधी आहे. आपल्या घराण्यात वंश जन्माला येतो, ज्यावेळी हा वंशवृक्ष जन्माला येतो त्यावेळी हे लक्षात घेतले पाहिजे की पूर्वीच जर वंशाला कीड लागली तर तीच परंपरा पुढे कर्म म्हणून आपल्याला भोगावी लागते. ती कीड गेल्याशिवाय संपत्ती, संतती आदी सुखं प्राप्त होण्यापेक्षा न होणे हे बरे ! एखादी संतती घराण्यात जन्माला येते. अशावेळी पूर्वीच हा दोष मुक्त झाला नाही तर जन्माला येऊन न्यून्यता पाहण्यास मिळते. अशा दोषामुळे विद्या नाही, संपत्ती नाही अशी परिस्थिती येते. मग अशा लोकांनी जगावे कसे ? आज दोष जावेत म्हणून वैद्यकीय शास्त्र व डॉक्टर उपाय करीत आहेत व शोध पण लागला आहे. पण किती – तर १० टक्के ! अशाने हे जग सुखी होईल कां ?
येणाऱ्या भक्तांना वंशविमोचनाचा लाभ दिल्यावर, त्याच बरोबर ‘दीक्षा’ याचाही लाभ जोडावयाचा असतो, ह्यामुळे बऱ्याचशा भक्तांना हे कार्य कसे चालू आहे ह्याचा अचंबा वाटला. ‘विमोचनाचा संबंध दीक्षेशी कसा काय’ ? ही विचारण केल्यावर त्यांना मुलाखतीद्वारा हे समजावून सांगितले की, जगात जे जे कोणी जन्म घेते त्याच्या काया, वाचा, मनात पोकळी नाही. दोष हे देहामध्ये कर्मरूपाने असतात व कर्माचा अडथळा आला की देहाची गती मंद होते किंवा अधिक प्रमाणात चालत असते. अशामुळे जरी सुख असले तरी मनाची शांती लाभत नाही. शांती, सुख ह्यांची माध्यमे काया-वाचा-मन. ह्यांची गती वेगवेगळी आहे. मनाची गती अधिक असते त्यावेळी कायेची गती अतिशय मंद असते, त्यावेळी शरीर गतिमान होणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी पहिले विमोचन व मग दीक्षा, यामुळे हळू हळू प्रगती व मग गती ही अवस्था प्राप्त होते. याप्रमाणे तीन विमोचने व तीन दीक्षा यांचा देहिक-अवस्थेशी संबंध असतो. पुढील दोन दीक्षा ह्या आत्म्याला असतात. जो आत्मा शरीरात धारण झाला आहे, त्याला योग्य मार्गाने वळण लावावयास पाहिजे. देहिक+आत्मिक = मानव (ह्याचा धर्म वेगळा असतो). बहुतांशी साधक हे फक्त स्थूल देहाचा विचार करतात. उदा. ‘अमुक जप केला, अमुक पारायणे केली, अमुक तीर्थयात्रा मी केल्या, म्हणजे पर्यायाने ‘देहाने किंवा आत्म्याने जन्माला येतेवेळी पाप केले आहे’ हीच भावना जमेस धरून हे लोक साधना करीत असतात, यासाठी गुरुंचे कर्तव्य दोन्ही अंगांनी युक्त पाहिजे — एक देहिक व दुसरे आत्मिक. ह्या दोन अवस्थांमुळेच जीवन प्राप्त होते. एकाची प्रगती केली की दुसऱ्या अवस्थेची अधोगती ही न कळत भोगावी लागते. यासाठी गुरु हे माध्यम ‘आई’सारखे आहे. आई ज्याप्रमाणे जन्माला येणारी बालके यांचा सांभाळ करते, त्याप्रमाणे ‘गुरु’ असावयास पाहिजेत.
ह्या ३० वर्षांत अनेक भक्त आले व गेले, त्यापैकी कोणाला काय मिळाले, म्हणजे ऐहिक प्राप्ती किती झाली याची चौकशी केली नाही. आपले कर्तव्य हे पुढे जाण्याचे आहे. मागून बघण्यासाठी किंवा बोलण्यासाठी नव्हे. त्यांना गुरुकृपेने काही प्राप्त झाल्याशिवाय राहिलेले नाही. ‘कृपा झाली’ असे म्हणणारे किती याचा विचार मी केला नाही. आपण आपल्या इष्ट कर्तव्यास सदैव जागरूक राहणे याचा अर्थ कृपेला पात्र होणे असा आहे. ह्या ३० वर्षांत माझा प्रवास सगळ्या हिंदुस्थानभर झाला, त्यावेळी अनेक पवित्र अशी स्थाने मी पाहीली व त्या ठिकाणी जे जे काही प्राप्त होण्यासारखे होते की, ज्याचा लाभ ह्या कार्यास होईल त्या त्या पवित्र स्थानी मी जाऊन आलो. या भेटीत काय प्राप्त केले असेल तर आपली ‘साधना’ की ज्यामुळे ‘पुरूषार्थ’ प्राप्त होतो. ह्या त्रिभुवनात ३३ कोटी देव आहेत. त्यापैकी किती देवांत देवत्व आहे हा प्रश्न आहे. बाकीचे सर्व नुसते नामधारी म्हणजे आपल्याचसारखा. देव व आपण यांचा उपयोग कसा करतो ? तर स्वतःलाही नाही व इतरांना म्हणावे तर लाज वाटते. अशी स्थिती आज मितीला आहे. म्हणून २।। हजार वर्षांनंतर नाथांनी ‘साईनाथां’चे नाव अजरामर केले.
निसर्गात मानव व देव यांची ओळख सर्वांना आहे. पण नेमके कुणाला देव म्हणावे व कोणाला मानव म्हणावे हा वाद आहे, तो मिटणे शक्य नाही. जरी जग बुडाले तरी हा वाद मिटणे शक्य नाही, कारण ज्ञानी म्हणतात की देव आहे व नाही. अज्ञानी लोक म्हणतात की देव आहे. यापैकी दोन्ही बाजूत सत्य आहे. ज्ञानी हा कल्पनेने ‘देव नाही’ असे म्हणतो, म्हणजे देव ही ‘कल्पना’ आहे, ती वस्तुनिष्ठ अवस्था नव्हे व नाही. याशिवाय अज्ञानी केवळ अंधश्रध्देने देव आहे असे म्हणतो म्हणून हे जग देवाने व्यापले आहे असे म्हणतात. ह्या वादातून खरे व खोटे ठरविण्यासाठी ह्यापैकी दोघांनाही मेहनत करावयास नको आहे. देव आहे म्हणल्यावर सिध्द करण्यास जन्म पुरणार नाही हे ज्ञानी लोकांना कळते. त्यामुळे ‘देव नाही’ म्हणले की आपले भागले असे त्यांना वाटते, त्यामुळे ज्ञानी लोकांना नावे ठेवणे येवढेच कार्य सुशिक्षीतांचे राहीले आहे. परंतु एकच प्रश्न आहे की, ज्ञानी व अज्ञानी कोणाला म्हणावयाचे ? हा प्रश्न जगभर आहे. कितीही जरी मानव मोठा, श्रेष्ठ व ज्ञानी झाला तरी मनाला शांती नाही असे म्हणणारे सर्वजण आहेत. वादातून आपण काय प्राप्त करू ? – तर काही नाही. शेवटी ‘मन’ व ‘मनाला शांती’ पाहिजे. विज्ञान नको आहे ज्यामुळे तर्क-वितर्क निर्माण होतात. मानवाचा शत्रू मानव आहे, यापेक्षा मन म्हणजे मानव व देव म्हणजे शांती एवढे प्राप्त करून घ्यावयाचे आहे. तेवढी साधनसेवा आपल्या सर्वांकडून घडावी व सर्वांना सुख, शांती प्राप्त व्हावी अशी ईश्वराची इच्छा आहे, असे मार्गदर्शन आजपर्यंत सर्वांना केले. त्यात महत्त्वाचा विषय:- मला जो ॐ कार, ही साधना श्रीभैरवनाथांनी शिकविली होती, तिचा लाभ सर्व जगाला व्हावा म्हणून प्रथमतः ‘ॐ ’ हा सिध्द व्हावयास पाहिजे, यासाठी प्रथमतः कामकाज बंद करावे म्हणजे जी आपली ऐहिक प्राप्ती आहे ती बंद करावी अशी आज्ञा झाली. त्याप्रमाणे सर्व केंद्रांवर होणारे कामकाज जे मी करत होतो, ‘ते कामकाज इतर सेवकांनी करावे व मग तुला ॐ सिध्द करता येईल’ अशी आज्ञा झाली.
वर सांगितल्याप्रमाणे सर्व पवित्र स्थानी जाऊन भेटलो, त्याचे कारण साधकाला जी अनुभूती येत असते त्यावेळी त्याच्या शरीरावर काय परिणाम होतो हे कळले पाहिजे. प्रत्येक स्थानी ज्या शक्तीचे वास्तव्य असते ती शक्ती एकाच प्रकारची नसून त्या शक्तीमध्ये त्रिगुणात्मक तत्त्व असते. अशावेळी समाधीच्या ठिकाणी जे शक्तीचे वास्तव्य असते, ते वास्तव्य देवळात नसते. कारण देवळातून जी शक्ती आपल्याला अनुभवास येते ती दगडी किंवा पंचधातूंची मूर्ती असते. ज्यावेळी त्या मूर्तीची स्थापना केली जाते, त्यावेळी जे मंत्र उच्चारले जातात त्यामुळे त्या मूर्तीला ‘देवत्व’ प्राप्त होते. अशी जी शक्ती आपण धारण करतो, अशावेळी साधकाला ज्या शक्तीची प्राप्ती होत असते ती मंत्रांनी होते, त्यामुळे जे मंत्र आहेत त्यांची ‘जागृती’ पुन्हा पुन्हा करावी लागते. या शक्तीचा वापर जे कोणाला दु:ख आहे ते निवारण होण्यासाठी केला जातो. काही वेळा यास बराच वेळ लागतो; याचे कारण असे की ज्या मंत्रांचा उच्चार आपण करतो ते मंत्र त्रिगुणात्मक असून त्या मंत्रांची सिध्दता होण्यासाठी पहिल्यांदा मंत्रांचा उच्चार हा संख्यावाचक असावयास पाहिजे. दुसरा काल — म्हणजे अमुक एक दिवसांनी जी संख्या म्हणावयाची असते तो काल व नंतर जो मंत्रोच्चार आपण करतो त्याचे हवन. या क्रियेस ‘पुरश्चरण’ असे म्हणतात. नुसता मंत्रोच्चार करून तो सिध्द होत नाही. जी शेकडो देवळे आपल्याला दिसतात परंतु त्यामध्ये देवत्व नसते. नुसती मूर्ती देवाची आहे हे समाधान मानून आपण देवाची वाट बघत असतो. हा एक अभ्यास. दुसरा अभ्यास ज्या ठिकाणी ‘समाधी’ आहे असे स्थान. ह्या ठिकाणी ज्या व्यक्तीची शक्ती अनुभवास येते, ती शक्ती प्रथमतः काया, वाचा, मन यांची त्रिपुटी करून त्यातून ही शक्ती निर्माण होते. त्यामध्ये जी उपासना व साधना त्या साधकाने केलेली असते, त्या साधनेतून ही शक्ती निर्माण होऊन आसमंतात त्या शक्तीचे वास्तव्य आपल्याला अनुभवास येते व शक्ती प्राप्त करते वेळी साधनेत थोडे बहुत बंधन असते व ह्या शक्तीचा वापर कोणा साधकाला, जो दु:खी आहे त्याला सुखी होण्यासाठी करता येतो, पण जगात जे जे सत्पुरूष जन्माला आले त्यांचा जन्म स्वतःसाठी नसतो हे सुज्ञांना समजत नाही. कृपा होण्यासाठी एखादा नवस करतील, बकरे मारतील किंवा नवचंडीचे हवन करतील, पण सत्पुरूषाला नमस्कार करणार नाहीत, कारण तो सामान्य आपल्यासारखा मनुष्य आहे. ह्याला जर गतजन्माची खूण म्हणून चार हात असते तर जगाने त्यांना जगू दिले नसते. या संतांना जे आपण पाहातो तो जन्म आपल्यासारखा नसतो. त्या जन्माला ‘अवतार’ असे म्हणतात, कारण जगात जो काही बदल होतो, त्याप्रमाणे ईश्वर त्यांच्या रूपाने अवतार म्हणून जन्म घेतो व त्या वेळची जी परिस्थिती असेल ती बदलून जगाला सुख मिळावे अशी योजना कार्य म्हणून करत असतो, पण ते लोक असामान्य आहेत हे आपल्याला कळत नाही. शेकडो वर्षे देव आहेत असे आपण म्हणतो व त्यांची पूजा-अर्चा मनोभावनेने करून आपण उपासना किंवा साधना केल्यावर आपल्याला आशिर्वाद मिळतो — साधना केल्यावर ! पण त्या संतांच्याकडून, काही एक न करता, जी कृपा व आशिर्वाद मिळतो त्याची किंमत जगाला नाही. देवळात देवाकडून फक्त कृपा मिळते व तिचा लाभ एकाच पिढीला मिळतो, पण संतांची कृपा असते, याशिवाय आशिर्वाद म्हणजे पिंडास म्हणजे जो जो वंश आपल्या घराण्यात जन्माला येईल त्याला हा आशिर्वाद केवळ नामस्मरण केल्याने लाभतो. एवढी तरतूद ह्या जगाची करून त्यांच्या समाध्या शेकडो वर्षे जागृत आहेत, याची अनुभूतीची प्रचिती आजपर्यंत आल्यावर असे म्हणावे लागते की, “तरीच जन्मा यावे दास जगाचे व्हावे”.
ह्या संतांच्या दर्शनार्थ गेल्यावर संतांचे जग काय आहे ते समजते. जसे ‘गाणे’ हा आपण विषय घेतो त्यावेळी गाण्यात काय काय आहे, हे ज्ञात करून घेत असतो. नुसते गाणे म्हणून गप्प बसणे हास्यास्पद आहे. पहिले, दिवसाकाठी किती प्रहर आहेत, हे समजेल. त्या त्या प्रहरात कोणकोणता राग आहे व तो राग आळवत असताना निसर्गात काय रंग आहेत हे समजते. त्याप्रमाणे संतांची उपसना करू लागल्यावर काय महिमा आहे हे कळेल. प्रत्यक्ष ‘ब्रह्म’ ही अवस्था अनेक योजने दूर आहे, पण ‘संत-समागम’ झाल्यावर आपणच ब्रह्म आहोत असा अनुभव येतो, त्याचे कारण त्यांचा तो धर्म की, ‘आपणासारिखे करिती तात्काळ’ स्वतःला देव, देवत्व म्हणजे काय ! ही तपश्चर्या ते करतात. पण देवत्व आपल्याला अनुभविण्यास देतात. ज्याप्रमाणे गाय खाते ‘गवत’, पण देते ‘दूध’ ! अशा अवस्थेचा अनुभव जेव्हा मिळतो ह्या अनुभवास ‘अनुपम सुख’ असे म्हणतात.
या सुखाची प्राप्ती ही साधकाला अनुभविण्यास मिळते. बाकीचे नुसते मिटक्या मारीत बसतात व थोरवी एवढी गात असतात की जणू काही परमेश्वरप्राप्ती झाली, असे इतरांना वाटावे. अशा वाटण्यास हरकत नाही, पण ज्यांना ह्या मार्गाची ‘श्री’ सुध्दा माहिती नसते अशा वेळी महती सांगून एक तर येणारे भक्त यांची दिशाभूल करतात किंवा अश्रध्दा निर्माण करण्यास कारणीभू होतात. हे भूत जेव्हा अंगावर बसते, अशावेळी भक्ताची नित्य साधना बाजूस राहून महतीचा पोवाडा गाऊन शेवटी हेच लोक पोबारा करतात. अशासाठी भक्तांची काय पातळी आहे त्याप्रमाणे वागावे, यासाठी जेव्हा अजमेरला मी गेलो त्यावेळी दर्शनार्थ गेलो असताना ख्वाजा गरिबन् नवाज ह्यांनी आज्ञा दिली की ‘परत गेल्यावर पंत बाळेकुंद्रिकर यांना जाऊन भेट. त्यांचा वाटा ह्य़ा कार्यात मोठा आहे. तो भेटल्यावर सांगतील’ त्याच आठवड्यात मी मुंबईस आलो व अकस्मात पंतांची भेट होण्याचा योग आला. नेहमी ‘असे योग माझ्यामुळे आले’, असे प्रत्येकाला वाटते, पण कुठला चांगला योग येत नसतो. तसा ‘योग’ दार बंद करून येणार नाही, यासाठी साधकाने सदैव जागरूक असावयास पाहिजे, कारण ‘योग येणार आहे’ म्हणून पत्र येत नाही, पण हे निश्चित की, योग येतो हा कुणामुळे हे सांगता येत नाही. ह्या ३० वर्षांत पुष्कळ लोक आले, पण ज्यांना घेऊन आले ते अजून आहेत व ज्यांनी केंद्रावर आणले ते बाहेर आहेत. त्याप्रमाणे ‘योग’ हा कोणा व्यक्तीमुळे घडत नसतो. तो पूर्वीच लिहिलेला असतो. आपण फक्त त्या योगाचे माध्यम आहोत. याप्रमाणे पंतांची भेट झाली. त्यावेळी ते म्हणाले, “मुला किती वाट पाहात राहिलो आहे, जगाला ज्याची गरज आहे त्यासाठी मी थांबलो आहे, यासाठी मुक्काम येथे कर व जी पोथी तू आणली आहेस तिचे पारायण माझ्यासमोर बसून कर. मला ऐकू देत. पुढे या पारायणाचे कार्य काय आहे हे समजेल”. याप्रमाणे आज्ञा होताच दुसऱ्या दिवशी श्रीनवनाथ पोथीचे पारायणास सुरूवात केली. ह्यापूर्वी मी ती पोथी वाचली होती. पण ह्यावेळी हे वाचन नसून काहीतरी अद्वितीय आपल्या जीवनात घडत आहे हे जाणवले. पारायण करण्यास सात दिवस लागतात. कोणी म्हणतात की हा ‘सप्ताह’ असतो. यात फार मोठा फरक आहे, कारण पारायण करण्यासाठी गुरुंची आज्ञा लागते शिवाय कोणताही ‘हेतू’ मनामध्ये ठेवून चालत नाही. या उलट ‘सप्ताह’ ही सेवाच आहे, परंतु त्यामध्ये अनेक हेतू मनामध्ये असतात. अशावेळी आपण व परमेश्वर यामध्ये ‘सेतू’ने आपले जीवन जोडावे लागते, मगच आपला हेतू साध्य होतो. दिवसानुदिवस म्हणता म्हणता सात दिवसांचे पारायण पूर्ण झाले.
त्या दिवशी गुरुंच्या घरी पारायणाची सांगता केली, त्यावेळी नवनाथांची पोथी व ‘दत्तप्रेमलहरी’ ह्या दोन पुस्तकांचे मनोभावे पूजन केले. त्या दिवशी श्रीपंतांनी अशी आज्ञा केली की “ह्या पुस्तकात २५०० पदे लिहिलेली आहेत. तुला जी योग्य वाटतील ती घेऊन त्या पदांना चाली लाव”. वास्तविक ‘संगीत’ हा विषय माझा नव्हता व नाही. फक्त आज्ञेचे पालन करणे हेच आपले कर्तव्य म्हटल्यावर ते पुस्तक उघडून पहिले पद व चाल म्हणू लागलो. “आरती अवधूता” हे पहिले पद म्हटल्यावर अष्टभाव जागे झाले की काय, असे वाटू लागले. त्या दिवशी मी दहा पदांना चाली लावल्यावर तीच पदे पंतांच्या समोर बसून म्हणू लागलो, तेव्हा ‘पंत काय आहेत’ ! नुसता अवतार म्हणून चालत नाही. प्रत्येकाची सत्ता ह्या त्रिभुवनात वेगळी आहे हे जाणवले व हे कळले की यांच्या ठायी शब्द व नादब्रह्म आहे. तेव्हा जी पदे दत्तप्रेमलहरीत आहेत ती म्हणताना व ऐकताना ‘मन’ आहे याची जाणीव होते. याप्रमाणे प. पू. बाबांनी आज्ञा केली त्याप्रमाणे मी बाळेकुंद्रीला जावून आलो. एवढ्याचसाठी औदुंबरला २।। वर्षे माधुकरी मागितली. त्याचा अर्थ नंतर समजला. ‘मधु+करी’ जमा केली. नुसते तोंडाने किंवा हाताने जग गोड होणार नाही. आपल्या शब्दात व वागण्यात मधुरता पाहिजे, यासाठी पाच गृही माधुकरी मागत होतो. त्यावेळी अर्थ समजला नाही. पाच स्थानांचा संबंध पाच कोशांशी आहे व ते नुसते विकसित होऊन चालणार नाहीत तर कोशांचे एकरूपत्व करून आरती म्हटली तर ‘नादा’ची प्राप्ती होते. या ‘नादाची’ ‘उत्पत्ती’ व ‘उपपत्ती’ साधकाला कळली पाहिजे. नुसता ‘नाद’ म्हटल्यावर वाद निर्माण होतो. एक भांडे दुसऱ्याला भेटले की ‘नाद’ होतो. तो वादाचे मूळ आहे हे समजावे. नादाची उत्पत्ती ही ब्रह्मपासून झालेली आहे. त्याची उपपत्ती म्हणजे शब्द. जो आपण बोलतो तो शब्द ‘वाणी’ म्हणून येतो म्हणजे पिंडात येतो. पिंडातून ‘वाणी’ ही निर्माण होते. ती वाणी ही अवस्था जर आपल्याला समजली तर वाणी हेसुध्दा ब्रह्म आहे. आपण जगतो म्हणजे काय ? जे जे आपल्या सभोवार आहे त्याला जिवंत करणे असा अर्थ होतो. जसे, एक दिवा लागला की असंख्य दिवे आसमंतात आपल्याला दिसतात तसे आपले जीवन निर्माण व्हावयास पाहिजे. हे दिवे आपल्या जीवनात प्रज्वलित केले पाहिजेत, त्यासाठी रॉकेल किंवा तेल ह्याचा वापर उपयोगी नाही तर त्यासाठी निस्सीम भक्ती आपल्या ठायी पाहिजे.
ह्याप्रमाणे कार्य सुरु होते. काही भक्त असे दु:ख घेऊन येत होते — ‘मला कुणीतरी ‘करणी’ केली. त्यामुळे माझा धंदा-व्यापारात नुकसान होत आहे’. कोणी म्हणत ‘माझा आजार बरा होत नाही, कारण कोणीतरी ‘करणी’ केली म्हणजे जीवनात दु:ख झाले की कोणीतरी करणी केली म्हणजे ‘जादूटोणा’ इत्यादिने संबोधतात, पण कोणालाही करणी म्हणजे काय प्रकार आहे याचे ज्ञान नाही. आलेले दु:ख किंवा त्याचा संबंध करणीशी हे लोक जोडतात, किंबहुना लोक ‘मांत्रिका’कडे जातात, ज्याच्याकडे जातात त्याला तरी मंत्र येतो का ? हे विचार करतात. देवाने बुद्धी कशासाठी दिली आहे ? जसे गाईला शिंगे असतात ही शोभेसाठी नाहीत, तर ती गाय स्वतःचे संरक्षण करीत असते, पण आपण बुध्दी असून नसल्याप्रमाणे वागत आहोत. ह्या वागण्यात स्वतःचे नुकसान करून घेत आहोत. बाहेरील लोक ह्याचा फायदा घेत असतात. जो कोणी दु:खात आला त्याचा गैरफायदा घेऊन हे लोक न पटणारी विधाने करीत असतात व त्यावर आपला विश्वास बसतो, पण देवावर नाही. ह्या ‘करणी’चा काय प्रकार आहे याचा अभ्यास सुरू केला. शेवटी ‘करणी’चा प्रकार आहे हे सत्य आहे, पण जो कोणी करणी करणार आहे त्याच्यापाशी जेवणास पैसे नाहीत अशावेळी कुणाचे वाईट व्हावे अशी जरी इच्छा झाली तरी त्यासाठी हे मांत्रिक लोक भरमसाठ पैसे उकळतात. हा उपद्व्याप म्हणजे ‘घरचे झाले थोडे व व्याह्याने पाठविले घोडे !’ अशा परिस्थितीत तो मनुष्य हा मांत्रिकाकडे खेटे घालत असतो. जणू काही ‘सुखाची खाण’ ह्याला सापडली आहे व ते सुख आपल्याला मिळणार आहे ! हा केवळ खुळ्यांचा बाजार असतो. अशाने मनुष्य त्रस्त होतो. यापेक्षा देवाला शिव्या देण्याऐवजी हातात जोडा घेऊन मांत्रिकाला म्हणावे की, ‘इतरांनी’ ‘करणी’ केली नसून तुझी करणी अगाध आहे. कारण मला ज्ञान नसल्याने तुझा फायदा झाला. ह्य़ासाठी मी जोडा आणला आहे त्याचा स्वीकार कर’
‘करणी’ हा जो प्रकार आहे त्यातील ७५ टक्के ‘बाधा’ असून त्या बाधेने जो त्रास होत असतो, याचे शास्त्रीय कारण म्हणजे ज्या आत्म्याची इच्छा किंवा वासना शिल्लक राहिली आहे असे आत्मे आपली इच्छा किवा वासना पूर्तता करीत असतात व हे कारण न समजल्यामुळे ह्या त्रासाला आपण ‘करणी’ असे म्हणतो. याचे निवारण केवळ मांत्रिकाला भेटून होत नसते, कारण जी बाधा झाली त्या आत्म्याला काय इच्छा आहे हे समजून घेतले पाहिजे. हे समजण्यासाठी दैविक उपासना केली पाहिजे की, ज्यामुळे हे आत्मे पुढील गतीला जातील. ह्या बाधा अंगात येत नसून त्याचा त्रास होत असतो. ह्यामुळे डॉक्टरी उपचार करूनही रोग काय आहे हेही कळत नाही. असे अनेक लोक पीडित आहेत, ह्यासाठी प. पू. बाबांना विचारावे असे वाटू लागले. याचे कारण एका भक्ताला असाच त्रास होता म्हणून मी सांगितले. शेवटी तो म्हणाला की, ‘हा त्रास होत आहे असे पुष्कळांनी सांगितले आहे. परंतु ह्या त्रासातून कोणीही मुक्त केले नाही. या उलट लोक पैसे लुटतात. यासाठी विश्वास कोणावर ठेवावा ?’ असे म्हटल्यावर ह्या भक्तास सांगितले की, ‘दोन दिवसांनी ये. तुझा त्रास निश्चित बरा होईल’. त्याप्रमाणे प. पू. बाबांना विनंती केली की ‘हे आत्मे मला दिसतात म्हणून मी सांगतो, पण सामान्य माणसाला ही दृष्टी नाही. तेव्हा ह्या सांगण्यावर विश्वास कसा बसावा ? ह्यासाठी काही मार्ग दाखवा की जेणे करून ह्या जगाचा विश्वास बसेल’. यावर बाबा हसले व म्हणाले की “हे जग विचित्र आहे. बाप दाखव नाहीतर श्राध्द घाल अशा विचारसरणीचे हे जग आहे. ह्या जगाला भिऊन जाऊ नको. ह्या विश्वासावर काही जग चालणार नाही. ह्या लोकांची चाल वेगळी आहे व जगाची गती वेगळी आहे. तेव्हा ह्या लोकांनी विश्वास दाखविला किंवा नाही दाखविला तरी ह्या जगाचा मार्ग वेगळा व आपला वेगळा. त्यांना कुठून तरी सुख पाहिजे असते. पण ज्याला आपण सुख म्हणतो ते दु:ख आहे, पण ते मागण्यासाठी शहाणे लोकसुध्दा येतात. मग अशांना शहाणे कसे म्हणावे ? पण निदान तुला तरी समाधान व्हावे अशासाठी मी आशिर्वाद देतो की जेणे करून हे जग ‘उणीव’ काढून बसणार नाही. तेव्हा पौर्णिमेला सकाळी स्नान झाल्यावर एक वाटीभर उदी माझ्यापुढे ठेव व पूजा कर. संपूर्ण दिवस ती वाटी माझ्यापुढे ठेव व दुसऱ्या दिवशी त्या उदीचा वापर करणी काढण्यासाठी कर”. त्याप्रमाणे मी केले. आज्ञेप्रमाणे ताम्हन घेऊन त्यामध्ये पाणी घातले व वाटीतील चिमूटभर उदी पाण्यात टाकली. टाकल्यावर ती उदी पाण्यात मिसळली व प. पू. बाबा म्हणाले, “जो कोणी भक्त ‘करणी’ म्हणून येईल त्याला ते ताम्हन दाखव. त्या उदीत ती बाधा किंवा माकडचेष्टा म्हणजे मंत्रामुळे जो त्रास होतो तो त्याला दिसेल. ती बाधा किंवा करणी ही ताम्हनात दिसत आहे, ती हळू हळू कमी होईल व मग माझे दर्शन घडेल. हे घडल्यावर बाधा गेली असे निश्चित समजावे”. त्याप्रमाणे त्या भक्तास मी बोलाविले व प. पू. बाबांच्या आज्ञेप्रमाणे ताम्हनात बघण्यासाठी त्याच्यापुढे ताम्हन ठेवले व सांगितले की, ‘ताम्हनात तुझी बाधा मोकळी होईल’. त्याप्रमाणे तो सुखी झाला व तेंव्हापासून आजतागायत हे कार्य सुरू आहे. याप्रमाणे वेळोवेळी जो कोणी अडचणीत येत होता, त्याचे दु:ख निवारण होत होते. त्याप्रमाणे हळू हळू कार्याचा प्रचार होऊ लागला. त्यावेळी अनेक लोक ‘अमुक ठिकाणी व अमुक गावी या’ अशी विनवणी करू लागले. त्याचा मोह अवरला पाहिजे, ह्यासाठी प. पू. बाबांची आज्ञा झाल्याशिवाय कोठेही गेलो नाही व त्याप्रमाणे पहिली बारा वर्षे मुंबई, पुणे व दिल्ली आदी ठिकाणी कार्यार्थ गेलो पण कोणाचाही नमस्कार घेतला नाही व जी गुरुदक्षिणा ती प. पू. बाबांच्यापुढे ठेवावी असे सांगण्यात आले. अनेकांनी “मला दीक्षा व नामस्मरण घ्यावयाचे आहे”, अशी इच्छा प्रदर्शित केली. शेवटी मी सर्वांना सांगितले की, प. पू. बाबांनी आज्ञा दिल्याशिवाय हा विधी करता येत नाही. कारण गुरुमार्गात येण्यापूर्वी प्रत्येकाचे कुलस्वामी व कुलस्वामिनी असतात. जरी त्या देवता प्रसन्न झाल्या नाहीत असे ते म्हणतात तरी आपण ‘गुरु’ म्हणून ह्या देवतांनी मान्यता दिली पाहिजे, त्यासाठी जेव्हा ‘गुरुदीक्षा’ हा विधी होईल तेव्हा ह्या देवतांना आवाहन करून हवन हा विधी झाल्यावर मुख्य दीक्षा हा विधी होईल. तोपर्यंत प. पू. बाबांचे नामस्मरण करीत राहा असे सर्वांना सांगितले.
यासाठी पहिले ‘नवरात्र’ हा विधी विधीपूर्वक केला. ह्या दहा दिवसात ब्राह्मण–सुवासिनी जेवावयास बोलाविले व सकाळी-संध्याकाळी नंदादीप अखंड ठेवला. ह्या नवरात्रात जो विधी असतो तो केल्यावर श्री महाकाली, श्रीमहासरस्वती व श्रीमहालक्ष्मी ह्या देवतांनी संतुष्ट होऊन आशिर्वाद दिला, कारण जो कोणी दीक्षा घेईल त्याला ह्या देवतांचा आशिर्वाद पाहिजे असे सांगितल्यावरच ‘दीक्षा विधी’ देण्याचे ठरविले. प्रश्न असा की दीक्षा म्हणजे काय ? केवळ मानवी जन्म घेतला आहे म्हणून दीक्षा घेऊन चालत नाही, तर मानवी जन्म हा विकसित होणे महत्त्वाचे आहे, ह्यासाठी दीक्षा देतेवेळी आपली दृष्टी भक्ताकडे पाहून दीक्षा देणे अशी असणे योग्य नाही. आपण सांगितल्यावर जे तत्त्वज्ञान आहे याचा बोध होणे आवश्यक आहे. नुसते तत्त्वज्ञान ऐकून मोहीत होणे हे चूक आहे, यासाठी त्या भक्तास ‘जागे’ करावयास पाहिजे. याचा अर्थ दीक्षा धारण करण्यास त्याच्या जीवनात जागा आहे किंवा नाही हे पाहीले पाहिजे. ती जागा काया, वाचा व मन ह्यामध्ये आहे किंवा नाही ह्यासाठी ५ दीक्षा व ३ विमोचने आहेत. ह्या ८ अंगांनी सिध्द व्हावयास पाहिजेत.
याप्रमाणे जे जे कोणी भक्तभाविक येत होते, त्यांचे वंशविमोचन करण्यात येऊन मग पहिली दीक्षा ‘उपासना’ ही देण्यात आली. उपासना दीक्षेचा अर्थ काय हे समजले पाहिजे. जेव्हा आपण जन्म घेतो तेव्हा ‘इहलोक’ असे म्हणतात. नुसते जन्माला येणे हे सोपे आहे, परंतु जन्म झाला म्हणून समाधान मानून चालणार नाही. ज्याप्रमाणे इहजन्मात अन्न, वस्त्र व निवारा याची सोय पाहावी लागते, त्याप्रमाणे जो जीव जन्माला येतो त्याचे जीवन घडावे लागते. यासाठी पहिली ‘उपासना दीक्षा’ म्हणून आहे. याचा अर्थ ‘उप+आसन’ हे सिध्द व्हावयास पाहिजे. ह्यानंतर दीक्षा क्रमशः आहेत व त्यानुसार आपली प्रगती म्हणजे ऐश्वर्य नव्हे तर ज्या ठिकाणी ईश्वर आहे असा आचार विचार हा दृढ झाला पाहिजे, मग हे समजेल की ऐश्वर्य श्रेष्ठ का ईश्वर श्रेष्ठ. नुसते वाद-विवाद मांडून चालणार नाही. पहिली १२ वर्षे दीक्षा ही सिध्द करणे यासाठी असून पुढे १२ वर्षांनंतर त्याची ‘सांगता’ करावी लागते. याचा अर्थ आपण सांगतो असा नाही. दीक्षेचे ‘बीजतत्त्व’ असते. त्याचे कार्य होण्यासाठी जी गुरुआज्ञा होईल तोच ‘स्वाहाकार’ करावा लागतो. त्याप्रमाणे ५ दीक्षांचा स्वीकार भक्तभाविकांनी केला ह्याची खात्री झाल्यावर ‘स्वाहाकार’ म्हणजे दीक्षा माध्यमातून त्या शक्तीचे आवाहन करावे लागते. अशावेळी आवाहन केलेली शक्ती प्रगट होण्यापूर्वी भक्तांची माध्यमे तयार करावी लागतात. ज्याप्रमाणे पावसाचे आगमन होण्याआधी शेताची मशागत करावी लागते व पाऊस पडल्यावर बीज पेरावे लागते. असे केले तरच पाऊस आल्यावर ते ‘बीज’ उदित होईल. नाहीतर पाऊस येऊन संपत्तीच्या ऐवजी विपत्तीचे धनी आपण होऊ. अशी क्रमशः गुरुमार्गात दीक्षा असते. केवळ भक्त जमा करून त्यांची बेरीज किती झाली याचा हिशेब करणे चूक आहे हे साधकाला कळले पाहिजे. जीवनात प्रत्येक क्षण हा मोलाचा आहे. येणाऱ्या भक्तास हे शास्त्र समजत नाही. कारण जगतात अनेक छंद आहेत. त्यापैकी ईश्वर-सेवा हाही एक छंद आहे, पण हा छंद जर गवसला तर जीवनात स्वानंद होईल. नाहीतर नसत्या फंदात पडाल व हे भूत डोक्यावर बसेल. यासाठी देवाला हाक मारावयाच्या आधी भाक मागा. दुसऱ्याचा हेवा करू नका, कारण देव दिसत नाही. तो कोणाच्याही रूपाने येतो व जातो व शेवटी आपले काय चुकले ? हा प्रश्न उभा राहतो. भक्ति मार्गात काटे पुष्कळ आहेत. ते मोजता मोजता ‘कोट’ होतात यासाठी शहाण्याने ‘अवधान’ प्रथमतः ठेवले पाहिजे.
वर लिहील्याप्रमाणे ५ दीक्षा आहेत. वास्तविक दीक्षा ही एकच, पण साधकाला धारण करता येणार नाही म्हणून त्याचे ५ भाग केले. ज्याप्रमाणे शरीराच्या भागांची ५ कोशांतून विभागणी केली आहे, त्याप्रमाणे ५ दीक्षा क्रमशः दिल्या जातात, यासाठी गुरुंनी दक्ष राहावे लागते व दीक्षा घेणारे भक्त असतात त्यांचेकडे लक्ष असावे लागते, कारण भक्तांची संख्या वाढली की दक्षिणेचा लोभ वाढतो. त्याकडे लक्ष न देता आपल्या माध्यमातून ती दीक्षा प्रवाहीत होत आहे किंवा नाही हे पाहावे. याशिवाय ती घेणारा भक्त याचे काया, वाचा, मन ही त्रिपुटी असते. अशावेळी दीक्षेचा संबंध प्रथमतः कायेशी यावयास पाहिजे व यासाठी जो संकल्प दिला जातो तो सिध्द असावयास पाहिजे. ‘संकल्प’ म्हणजे ‘उच्चार’. त्यामागे शक्तीची धारणा असावययास पाहिजे. नुसता ‘उच्चार’ करून चालणार नाही व नुसती शक्ती असून चालणार नाही व नुसती शक्ती असून चालणार नाही तर युक्ती असावयास पाहिजे. ही शक्ती धारण झाली म्हणजे दीक्षा प्राप्त होते. यासाठी ‘उच्चार’ स्पष्ट असावयास पाहिजे. ‘संकल्प’ हा रामायण म्हणून जरी उच्चार झाला तरी ‘रामायणात’ राम आहे किंवा नाही हे् अनुभवास यावयास पाहिजे, नाहीतर ‘जयराम’ व्हावयाचे !