श्री.भास्करराव नारायणराव भागवत – वं.दादांचे वडील

श्री.भास्करराव नारायणराव भागवत हे सातारा येथील सचोटीने वागणारे व सत्शील गृहस्थ होते.त्यांचा देवावर विश्वास होता.ते श्री.दतगुरुंचे नःसिम भक्त होते.ते श्री.नृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनास औदुंबर व नरसोबाची वाडी  येथे दर पोर्णिमा – अमावस्येला जात असत.त्यांचा सत्संग नित्य व व्यापक होता.
त्यांचा मोटार प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय असल्याने विविध प्रकारच्या लोकांशी संबंध येत असे.त्याकाळी हा व्यवसाय सचोटीनें करणे व तोही सत्शील व्यक्तीने करणे म्हणजे हरघडीची कसरत व कसोटीच असायची.तथापी त्यानी उत्तम व्यावसायिक म्हणून नांव कमावले.
जेंव्हा पीरवाडीतील सत्पुरुषाने त्यांना पुन्हा विवाह करण्यास संगितले, त्यावेळी त्या सत्पुरुषावर श्रध्दा असल्याने, त्यांची आज्ञा मान्य केली व आज्ञेचे पालनही केले.सत्पुरुषाची वाणी सत्यस्वरुपात अवतरल्यावर, पहिल्या मुलाचे नांव ‘दत्तात्रय’ ठेवले.
वडिलांचा जसा सत्संग होता, तशीच देवावर गाढ श्रध्दा होती.ते स्वतः व त्यांच्या सौ.मनोरमाबाई, दोघेही वृत्तीने धार्मिक असल्याने घरात नित्यनियमाने देव-देवतार्जन, धार्मिक सण, उत्सव साजरे होत असत.कुलधर्म, कुलाचार, कुलोपासनेनुसार आचरण असल्याने घराततील वातावरण शांत व पवित्र होते.
प.पू.तेली महाराजानी केलेली सूचनावजा आज्ञा वडिलानी मान्य करून, वं.दादांना, महाराजांची सेवा करण्यास सांगितले.पुढे महाराजानी वं.दादांचे शिक्षण बाल वयातच जरी खंडित केले तरी वडिलानी त्याबद्दल खंत वा विकल्प मनात कधीच आणला नाहीच पण ‘तुमचे हित कशात आहे’ हे महाराजाना ज्ञात असल्याने त्यांच्या आज्ञेचे पालन सतत करण्यास सुचविले.यात वडिलांची महारांजांबद्दल श्रध्दा स्पष्ट होते.तसेच महाराजांचे वं.दादांवर असलेले प्रेम, विश्वास, कळकळ याची प्रचिती सतत येत होती.महाराजांच्या स्पष्टोक्तीतून नाराज न होता, वं.दादांच्या विचाराची दिशा योग्य प्रकारे प्रवहित होत आहे, यात वडिलाना मोठे समाधान मिळत होते.ज्या वयात मुलानी खेळावे, बागडावे, अभ्यास करावा, शिकून मोठे व्हावे असे स्वप्न पालक पाहात असतात, तेथे बालवयातच मुलाचे शालेय शिक्षण खंडित झाले, हे पाहून सामान्य पालक गलबलून गेला असता,पण श्री.भास्करराव यांचा पिंडच श्रध्देचा व अध्यात्मिक वृत्तीचा व आज्ञापालनाचा असल्याने तिच शिकवण वं.दादांच्यात बिंबविली.तशातच वं.दादांनी शाळेला ‘श्री’ म्हटल्यामुळे वं.दादांना वेळ भरपूर होता.वेळेचा सदुपयोग व्हावा, मनाला स्थिरता लाभावी व मन काबूत राहावे यासाठी ‘गुरुचरित्र’ वाचत जा असा सल्ला वडिलानी दिला.यात वडिलांची अध्यात्मिक मार्गातील गती व दूरदर्शीपणा  दिसतो.
औदुंबर येथील सेवा समाप्ती नंतर देवापुढे काय ठेवावे असा प्रश्न वं.दादांना पडला असताना, लहानपणी वडिलानी सांगितले होते,  ते आठवले :-

  •  ‘नुसते गोड खाऊन मनुष्य गोड होत नाही.हलवाई दिवसभर मिठाई विकतो.त्याचे हात कधी गोड झालेत कां?याचा विचार कर.व गोडाला विसरून जा.तरच आचार व विचार यात गोडी येईल.”औदुंबर सोडताना, येथून जाताना काय न्यायचे आहे व येथे काय सोडावयाचे आहे, पुढे जगला आपली गरज आहे.त्यासाठी आचारात व विचारात गोडी निर्माण व्हावयास पाहिजे.

पुढे श्री भैरवनाथांची सेवा सुरु असतां, श्री.भैरवनाथानी ॐकार प्रगट करुन दाखविल्यानंतर वं.दादा घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याना, वडिलानी स्वतः मंदिरात नेले.परत तोच नाद ऐकल्यावर त्या नादाचे विश्लेषण करून त्याची महती विषद केली.यात वडिलांचा अभ्यास किती गाढा होता, हे स्पष्ट होते, हे त्यानी काढलेल्या उद्गारावरून समजू शकेल –

  • “या ध्वनीला ‘सिंहनाद’ असे म्हणतात.जेंव्हा देव प्रसन्न होतो, तेंव्हाच असा नाद निर्माण होतो.हा ध्वनी नसून ॐ कार आहे.तू जन्माला का आलास हे गूढ होते.ते मला आज समजले.आपण शांत  चित्ताने घरी जाऊ.आता तुझी भीति होती कीं, भूत आहे, तेही बरोबर आहे.भूत याचा अर्थ, एखादी व्यक्ती मृत झाल्यावर त्यांची जी वासना इच्छा शिल्लक राहते, तेंव्हा तो आत्मा इच्छावासनेने ह्या जगात हिंड़त असतो.एखादी चांगली गोष्ट गतकाळात घडते व त्याची पुनरावृत्ती व्हावी म्हणून निसर्गसुध्दा भूतकाळाची जाणीव आम्हा मानवाना देतो.पण ज्ञानाच्या अभावी तो निसर्गाच्या कृपेला पात्र होत नाही.जर तू भूत म्हणत राहून श्री.भैरवनाथाकंडे आला नसतास, तर जो ध्वनी आता ऐकलास, त्याला मुकला असतास.आता तुझी भीति गेली आहे.भवितव्यात कशाकशाचा लाभ होतो आहे?याचा विचार कर.सर्व जग भूत, भविष्य व वर्तमान ह्या तिन्ही काळावर विश्वास ठेवून जगत आहे.परंतु ज्यामुळे लाभ निश्चित होणार आहे, त्या देवावर विश्वास ठेवत नाही.”

एका गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री.भैरवनाथांनी बोलावल्याने वं.दादा तेथे गेले.त्यावेळी श्री.भैरवनाथांनी वं.दादांना ॐकार दीक्षा दिली.पांच स्थानातील ॐ काराचे महत्व समजावून देताना म्हटले–

  • “जो ॐ कार तू आज म्हटला आहेस, तो पांच स्थानातून म्हणावयाचा असून, त्या स्थानातून ‘स्वर’ अशी संथा म्हणावयास पाहिजे.पुढे हा स्वर ह्या स्थानातून न उच्चारता, पांचही स्थाने सिध्द झाली, म्हणजे एक सूर म्हणावा लागतो.त्यावेळी जो ‘सूर’ वाणीतून उच्चारला जातो तो उच्चार नसून, त्याचे रुपांतर ‘निनाद’ मध्ये होते.म्हणजे हा नाद ‘सिंहनाद’ असा होतो.ही ओळख ब्रम्हांडाची आहे.”

वरीलप्रमाणे श्री.भैरवनाथानानी केलेला खुलासा हा वडिलानी केलेल्या खुलाशासी कसा मिळता आहे, हे समजून येईल.
स्वतः वडिलच पारमार्थिक तत्व चांगल्या प्रकारे जाणत असल्याने व त्यांची अध्यात्मिक अवस्था प्रसंशनीय असल्यानेच वं.दादांचे संपूर्ण जीवन नियंत्याच्या नियोजनाप्रमाणे सुरळीतपणे प्रवाहित होत गेले.वं.दादांच्या अध्यात्मिक जीवनातील उत्तुंग अवस्था सांगावयाची झाल्यास, वं.दादांची अध्यात्मिक मार्गातील प्रगती योग्य प्रकारे होत आहे, याचे समाधान, वडिलांना झाले.
त्याच वेळी आपण श्री.गुरु दत्तांना जी प्रार्थना केली होती ती आठवली ती म्हणजे ‘मला जो गुरु हवा आहे,तो भगवी वस्त्र धारण केलेला संन्यासी नसावा.तो राजयोगी असावा.त्याप्रमाणे वं.दादांच आपले गुरु आहेत, हे वडिलाना स्पष्टपणे जाणवले.एका गुरुपौर्णिमेपूर्वी वं.दादांना सातारा येथे येण्याचे कळविले.त्या प्रमाणे वं दादा सातारा येथे आले.गुरुपौर्णिमेच्या दिवशी वडिलांनी, वं.दादांना गुरु मानून, यथासांग  ‘पाद्य-पूजा’ केली व वं.दादांना गुरु केले.
असे होते ज्ञानी, सत्शील, निगर्वी, विनयशील वडील, ज्यानी आपल्या मुलाची अध्यात्मिक योग्यता जाणली, व स्वतःच्या मुलाला स्वतःचे गुरु केले.
असा होता पुत्र, ज्यानी घराण्याला उच्च स्थानी नेऊन व स्वतःच्या गुरुंना, “जगद्गुरुस्थानी“ नेऊन गौरविले
(CHIP OF THE OLD BLOCK).