वं.दादांचे प्रापंचिक जीवन

सातारा हे, स्वातंत्र्यपूर्व काळातील, एक छोटसे संस्थान. तेथे श्री.भास्करराव नारायणराव भागवत राहत होते. श्री.भास्करराव हे दत्तभक्त होते. त्यांचा प्रवासी मोटार वाहतुकीचा व्यवसाय होता. तो चांगल्याप्रकारे चालत होता. घरात वैभव नांदत होते. श्री.भास्करराव हे विधूर होते. त्यांचा सत्संग सतत असल्याने ते एका सत्पुरुषाकडे गेले असताना त्या सत्पुरुषाने त्यांना सांगितले कीं, “तू लग्न कर.तुला पहिला मुलगा होईल.त्याचे नांव “दत्तात्रय” ठेव. तो जगाचे कल्याण करणारा होईल”.
त्याप्रमाणे त्यांनी विवाह केला. त्यांना पहिला मुलगा झाला. त्याचे नांव गुरु आज्ञेप्रमाणे “दत्तात्रय” ठेवले.तेच वंदनीय दादा! वं. दादांचा जन्म दिनांक 6.2.1921 (पौष अमावस्या शके 1842) रोजी झाला. त्यांची आई सोज्वळ व धार्मिक वृत्तीची होती. माता-पिता दोघेही धार्मिक वृत्तीचे असल्याने वं.दादांवर योग्य ते सुसंस्कार बालपणापासूनच झाले. शाळेत ते एक हुषार विद्यार्थी होते.
वं.दादांच्या वडिलानी, वं.दादांना एका मोहरमच्या उरुसात फकीर केले. त्यावेळी ते तीन वर्षाचे होते पुढे ही प्रथा बरेच वर्षे चालली.
एकदा त्यांच्या वडिलांना एक सत्पुरुष (प.पू. तेली महाराज) रस्त्यात भेटले. त्यांनी वडिलांना सांगितले “मला जेवू घालीत जा. पण ते तुझ्या मोठ्या मुलाकडून पाहिजे, नाहीतर नको.” त्याप्रमाणे वं.दादा दररोज, शाळेत जाण्यापूर्वी जेवणाचा डबा प.पू. तेलीमहाराजांना नेऊन देत.
वं.दादांच्या वडिलांना एकदा, स्वप्नात श्री.भैरवनाथांचा दृष्टांत झाला. श्री.भैरवनाथांनी त्यांना सांगितले कीं, “मी अंधारात आहे. मला प्रकाशात येण्याची इच्छा आहे.” त्याचा अर्थ लक्षात घेऊन वडिलांनी, वं.दादांना श्री.भैरवनाथाच्या मंदिरात नेले. तेथे पणती लावून सांगितले कीं, रोज सायंकाळी या मंदिरात येऊन दिवा लावत जा. त्याप्रमाणे ही सेवा देखील वं. दादांनी सुरु केली.
अशा प्रकारे प.पू. तेली महाराजांची व श्री.भैरवनाथांची सेवा करीत असताना वं.दादांना शाळेत जाण्यास उशीर होत असे. तसेच दोन्ही सेवा करण्यात वेळ जात असल्याने, वं. दादांना, अभ्यास करावयाला वेळ मिळत नसे. तथापि अभ्यास करण्याचा प्रयत्न चालू होता. तरीही, अभ्यास होऊ न शकल्याने व्हायचा तोच परिणाम झाला आणि वं. दादा परीक्षेत नापास झाले. अपयशामुळे वं. दादांना खूप वाईट वाटले. या सर्व घटनांमुळे वं.दादानी शाळेला “श्री” म्हटल्याने त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही.
शालेय शिक्षण नाही. घरात तेच वडील होते. परिस्थिती बिकट होत होती. पुढे काय करावे हे समजत नसल्याने वं.दादांनी घरातील सर्व परिस्थितीचा विचार केला आणि सातारा सोडून ते पुण्यास नोकरी शोधण्यासाठी आले. त्यावेळी दुसरे महायुध्द चालू होते. मिलिटरीत भरती होण्याचा निर्णय घेऊन ते मिलिटरीत भरती झाले. त्यांना मोटार दुरुस्तीचे थोडेसे ज्ञान असल्याने मोटार दुरुस्तीच्या विभागात त्यांची नेमणूक झाली. रँक देखील मिळाली.
वं.दादांचे मामा मेजर गुणे मिलिटरीत होते. त्यांचा “ज्ञानेश्वरी” चा अभ्यास गाढा होता. तेही सत्शील व धार्मिक हाते. त्यांची अध्यात्मिक मार्गात गती होती. त्यांचे सानिध्य व मार्गदर्शनही मिळाले.
मिलिटरीतील नोकरी असल्याने बाहेर देशात जावे लागल्याने वं.दादांना बगदाद व करबला येथील पवित्र स्थाने पहावयास मिळाली. या कालावधीत देशाबाहेर नोकरीत असताना देखील अंगिकारलेली सेवा चालूच होती. मिलिटरी सोडल्यावर वं.दादांनी पुण्यात दुसरी नोकरी शोधली.
दरम्यानच्या काळात, त्यांचा विवाह झाला. त्यांना सुविद्य पत्नी लाभली. एक मुलगा व दोन मुली झाल्या. त्या सर्वांचे शिक्षण केले. तसेच यथायोग्य वेळी त्यांचे विवाहही पार पाडले, व तसेच त्यांच्या भावंडांचीही लग्ने पार पाडली. इतकेच नव्हे तर इतरांची लग्नेही लावून दिली. शिक्षणासाठी अनेकांना तर मदत केलीच पण त्यांच्या मूळ गावी, म्हणजे धावडशी येथील, श्री. ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या शिक्षण संस्थेस घवघवीत आर्थिक मदत देऊन धावडशीतील मुलांच्या शालेय शिक्षणाचा मार्ग सुकर केला.
वं.दादांना प्रापंचिक जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी न डगमगता सर्व प्रकारची प्रापंचिक व व्यावहारिक कर्तव्ये उत्तमरीतीने पार पाडली. सर्व प्रापंचिक कर्तव्ये यथोचितरित्या पार पाडणे, हे प्राथमिक गरजेचे आहे याचे सदैव भान ठेवले. हे सर्व करीत असताना, जीवनातील अनेक चढउतार अनुभवले. घटना घडत होत्या. त्या मागील कार्यकारणभावाची प्रचिती येत गेल्याने, त्यांचा ईश्वराबद्दलचा विश्वास, श्रध्दा, भक्ती दृढ होत गेली. वेळोवेळे प्राप्त झालेली सेवा / साधनाही चालूच होती. अशा प्रकारे, प्रापंचिक जीवन परिपूर्णतेने जगत असताना, पारमार्थिक जीवनाची ओळख होत गेल्याने ते वाटचाल देखील चालू होती
वंदनीय दादांनी, स्वतःचे जीवन जगत असताना प्रपंचात राहून, प्रपंचातील सर्व कर्तव्ये यथायोग्य पध्दतीने पार पाडली. प्रपंच व परमार्थ, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करीत राहून इष्ट उद्दिष्ट साधता येते, हे प्रत्यक्ष प्रमाण म्हणून, दाखवून दिले आहे. हा एक मोठा आदर्शच मानवाला घालून दिला आहे.