मुलाखती

श्री. साई अध्यात्मिक समिती पुणे, आज विजया-दशमी दिनांक ३.१०.२०१४ पासून वंदनीय दादांच्या माध्यमातून विविध विभूतींनी घेतलेल्या मुलाखती प्रदर्शित करीत आहे.

 तत्पूर्वी मुलाखत म्हणजे काय, हे कळणे आवश्यक आहे. मुलाखतीचा अर्थ कळल्यावरच भक्त-भाविकांमध्ये मुलाखती नित्यनियमाने वाचण्याची ओढ निर्माण होईल. त्यानंतर मुलाखतीतील आशयाचे चिंतन, मनन करून जीवन जगावे असे वाटू लागेल. त्यामुळे त्याना ‘जन्माचे कारण’ अंतःप्रेरणेने उमगत गेल्याने जीवनाचा यथार्थ व यथाशक्ती सदुपयोग करून जीवन जगता येईल.

असे केल्यानेच प.पू.जगद्गुरू श्रीसाईनाथ महाराजांचे जे जीवन तत्त्व “मानवी जीवन ईश्वरमय व्हावे” याची सुरवात प्रत्येक भक्तभाविकाचे जीवनात होईल.

 सबब. मुलाखत या शब्दाचा अर्थ वंदनीय दादांच्या शब्दात खाली देत आहोत.

 “श्री क्षेञ औदुंबर येथे असताना एका गुरुपौर्णिमे दिवशी पहाटेपासून पूजा-अर्चा-पारायण चालू होते..या दिवशी इच्छा अशी झाली कीं, काही उपदेश ग्रहण करावा व तशी प्रार्थना मी श्रीदत्तगुरुंना केली असतां, “आज रात्री बारा वाजता परमपूज्य हाजी मलंगबाबा हे ‘मुलाखत’ घेणार आहेत. तेव्हा तुझी इच्छा ते पूर्ण करतील”  असे शब्द ऐकू आले. ‘मुलाखत’ हा शब्द तेव्हा प्रथम ऐकला”.

 “ प्रथमतः ‘मुलाखत’ या शब्दाचा अर्थ असा कीं साधकाला साधना करीत असता जी अनुभूती येते तोच स्वानुभव आपल्या भक्तगणांना निवेदन करणे. त्यामध्ये  अतिशयोक्ती असून चालणार नाही. जे जे काही सांगावयाचे असते त्याचा अनुभव हा पूर्णपणे म्हणजे १००% न सांगता ७५% समजेल अशा रीतीने सांगून त्याचे कार्य जीवनात होईल असे घडावयास पाहिजे. नुसत्या  शंकाकुशंका वाढीस लागतील असे संभाषण करू नये. याचा अर्थ ‘मुलाखत’!

 प्रत्यक्षात  ती ऐकत असताना परमेश्वर आपल्यासमोर उभा आहे असे वाटावयास पाहिजे. ही  अनुभूती सांगत असताना मोठे मोठे शब्द उच्चारले गेले म्हणजे साधकाला ज्ञान होते असे नाही तर सांगत असतांना शब्द सर्वसामान्य माणसाला समजतील असे बोलावे. पण त्यात जिव्हाळा, प्रेम, आपलेपणा असावयास पाहिजे. ‘नाहीतर एकादशीच्या घरी भिकारी गेला आणि दोघांना उपास घडला’! असे निरूपण करून चालणार नाही! ”

वरील प्रमाणे ‘मुलाखत’ ह्या विषयाची ओळख व ज्ञान प.पू.हाजी बाबांनी औदुंबर येथे १९५३ च्या सुमारास करून दिले.त्यानंतर वंदनीय दादा पुण्यास आल्यावर साधारण १९५४ पासून परत मुलाखती घेणे सुरू झाले..श्रीसाई अध्यात्मिक समितीची स्थापना, विजया-दशमी,दिनांक २५-१०-१९५५ रोजी झाली. समितीच्या कार्याचा एक भाग म्हणून मुलाखतींना विशेष  महत्व आहे. ब-याचवेळा मुलाखती  प्रसंगपरत्वे घेतल्या जात होत्या. त्यानंतर साधारणपणे १९५७ पासून मुलाखती नियमित घेतल्या गेल्या जात असल्याने त्या लिखीतस्वरुपात ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या. मुलाखतीतील विषय जीवन जगण्यासाठी उपयुक्त असल्याने त्यापूर्वी मुलाखतीद्वारा अंधश्रध्दा व अज्ञान दूर करणे हा हेतू होता. असे अद्वितीय ज्ञान सर्वसामान्यापर्यंत निरंतर प्रवाहित रहावे म्हणून समिती उपलब्ध मुलाखती सर्व सामान्य भक्तांसाठी समितीच्या  संकेतस्थळावर प्रदर्शित करीत आहे.

साल व दिनांकाप्रमअणे मुलाखतींचा क्रम