अध्याय १० – गुरुतत्व व त्याचे जीवनातील महत्व

अध्याय १०. गुरुतत्व व त्याचे जीवनातील महत्व.
निवेदन
शीर्षकामध्ये म्हटल्याप्रमाणे या अध्यायात गुरु व गुरुतत्व याबद्दलचा खुलासा मूळ तत्वापासून केला आहे.त्यात गुरु व गुरुतत्व यातील फरक तसेत तत्व म्हणजे काय याचेही विवेचन केले आहे. सध्याचे मानवी जीवन असे विस्कळीत झाले आहे हे शास्त्रीय मीमांसेतून समजावून दिले आहेत. आजची परिस्थिती,त्या परिस्थितील भक्तभाविक व सर्व सामान्य मनुष्य, त्यांच्या अडीअडचणी. त्या अडचणींच्या निवारणार्थ शोधात असलेल्यांची मानसिकता,इत्यादिंचा विषयांचा सविस्तर खुलासा केला आहे.

सर्व सामान्य मनुष्य गुरुंचा शोध कळत न कळत घेतच असतो. पण त्यांच्या अडीअडचणी खरोखरीच सोडविण्या इतपत क्षमता असलेले गुरु आज आहेत काय ? तसे सामर्थ्यवान गुरु असते, तर समाजाची स्थिती इतकी खालावली नसती, मनुष्य इतका मनाने पिचलेला व अगतिक झालेला दिसला नसता.

नुकतेच कुठे साधक अवस्थेची ओळख झालेल्या गुरुंकडून नाडलेल्या भक्तभाविकांची कशी भलावणी केली जाते याचे सविस्तर विवेचन केले आहे. त्या भलावणीतूच आर्थिक प्राप्ती करून असे गुरु गडगंज होत असतात याबद्दलचे विवेचन एकतर्फी विचार न करता तटस्थपणे वाचावे. त्यात कोणाबद्दल अनादर केलेला नसून त्यातील शास्त्रीय मीमांसा लक्षात घेण्यासाठी आहे, हे लक्षात येईल. आजच्या वास्तवाचे ते प्रत्यक्ष निवेदन आहे. त्यातील सत्यता आपण देखील मान्य कराल. विवेचनात नमूद केलेली शास्त्रीय कारणे लक्षपूर्वक वाचावित. म्हणजे अंधश्रध्देचे निर्मूलनही होईल.

‘गुरु’ जरी मानवी देह धारण केलेल्या स्वरुपात आपणास दिसत असले तरी ते प्रत्यक्षात देह-धारी ईशतत्व असते. म्हणजे ती कार्यशील त्रिगुणात्मक शक्ति असते. अशा त्रिगुणात्माक शक्तितून, भक्तभाविकांच्या जीवनात स्थित्यंतर घडविण्याचे सामर्थ्य फक्त अशा परिपूर्ण गुरुतच असते. अशा गुरुंचा जन्म मानवी जीवनात स्थित्यंतर घडविण्यासाठीच असतो. कारण ते अवतारी पुरूष असतात.

गुरुंनी मानवी देह धारण केल्यावर, त्यांनाही प्रखर साधना करावी लागते जेणे करून मानवी जीवनात त्या त्या कालानुसार स्थित्यंतर घडवून, मानवातील ईश्वरी-अंश जागृत करण्याचे कार्य सुलभपणे करता येईल. अशा साधनेतील, जे शास्त्रीय विवेचन विस्तृतपणे केले आहे ते परत परत वाचावे. त्यातील मर्म कळेपर्यंत वाचावे. म्हणजे पुढील विषयांचे आकलन सुलभपणे होईल.

गुरु ज्यावेळी मार्गदर्शन करीत असतात, त्यात प्रामुख्याने पहिल्यांदा अडीअडचणींच्या निवारणार्थ सेवा सूचित करतात. पण सर्वच अडचणींचे निवारण एकाच वेळी होऊ शकत नाही. कारण अडचणींचे स्वरूप वेगवेगळे असते. यास्तव वेगवेगळी सेवा गुरु सूचित करीत असतात.

ह्या सर्व विवेचनात जे विविध विषय घेतले आहेत, ते म्हणजे विमोचन, निराकरण, निवारण, मार्गदर्शन, दीक्षा, दीक्षांचे प्रकार, दीक्षेचे मानवी देहातील कार्य, इत्यादी. त्यातील आधिभौतिक निराकरणे ही काल्पनिकता नसून वास्तवता आहे. त्यांचा उगम हा हजारो वर्षापूर्वी झालेला असून, त्या त्या कालानुसार निराकरण सूचित केले जात असते. त्या बद्दलचे विवेचन वाचनीय तर आहेच,पण शास्त्रीय दृष्टीकोनातून ते विवेचन स्मरणीय आहे.

गुरुंचे सामर्थ्य अमर्याद असते. पण गुरु, आलेल्या भक्तांच्या पात्रतेनुसार मार्गदर्शन करीत असतात. हे लक्षात घ्यावे. सिध्द पुरूषांकडे काय मागावे, ह्याचे भान आपणास असले पाहिजे.

विवेचनात तन्मात्रे, शब्दब्रम्ह, शक्तिपीठ, तिथीनुसार अनुष्ठान, गुरुदक्षिणा, तीन अवस्था (‘अवधान-ध्यान-चिंतन’), दीक्षेतील –विशेष महत्वाची दीक्षा (म्हणजे महाकारण दीक्षा), या प्रत्येक विषयाचे निवेदन पूर्णपणे शास्त्रीय आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात त्यांचा समावेश असतोच. पण त्याबद्दल अनुभव घ्यावयाचे असल्यास गुरुंच्या मार्गदर्शनच घ्यावे लागते. तसेच त्याबद्दलचा तक्ता देखील खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे लक्षात येईल की, परमेश्वर हजारो वर्षापासून मानवांची काळजी वाहतो आहे व वाहणार आहे. कारण परमेश्वराला मानवी स्वभावाची म्हणजे तो सतत सुखासिनतेतून जीवन जगणे पसंत करीत असतो, याची पूर्ण जाण आहे.

ज्ञान या अवस्थेबद्दल केलेला खुलासा परत परत वाचावा. श्रध्दा म्हणजे काय व ती पूर्णत्वास नेता येईल, हे समजून घेण्यासाठी आहे.

विमोचनापैकी, वंशविमोचनाचे महत्व व पूर्णत्व, या बाबतचा सविस्तर खुलासा केलेला आहे. विविध प्रकारचे दोष, त्यापैकी विद्यानाश हा एक महत्वाचा दोष असून, तो दोष पुढील पिढ्यांत, विमोचन होईपर्यंत, धारण होत असतो. त्याबाबतचा खुलासा व त्या अनुषंगाने केलेल्या, श्री साई स्वाध्याय मंडळाची स्थापनेतील हेतू सविस्तपणे सांगितला आहे. स्वाध्याय मंडळाकडून होत राहणारे कार्य, हे निरंतर असे कार्य आहे. त्यातील शास्त्रीय विवेचन लक्षात घ्यावे. ते परत परत वाचणे हे आपल्याच हिताचे आहे. त्या मंडळाच्या स्थापनेतून, आपल्याच कल्याणाची नव्हे तर, पुढील पिढ्यांची काळजी घेतलेली आहे, हे स्पष्ट होईल. मंडळाबद्दल व त्याच्या सभासदत्वासाठी परमपूज्य साईनाथ महारांजानी दिलेला कृपाशिर्वाद याची खास करून नोंद घ्यावी. परमपूज्य बाबांनी आपणा सर्वास सभासद करून घेतले आहे, पण ते सभासदत्व टिकविण्याचे कार्य हे आपल्यावर अवलंबून आहे, याची जाणीव ठेवावी. म्हणजे जीवनाची सार्थकता कशात आहे हे उमगेल.

तसेच कुलधर्म, कुलाचार, देवदेवतार्जन इत्यादिंचा खुलासा निवांपणे वाचावा. त्यातून घ्यावयाचा बोध समजल्यास व त्याप्रमाणे आचरण ठेवण्याच्या सूचना पाळल्यास जीवनात सुख-शांती-समाधान प्राप्त होऊन, पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शन करण्याची गरज उरणार नाही.

सर्वसामान्य मनुष्यास काया-वाचा-मन ह्याचा अर्थ समजला तरी त्यातूनच पुढे त्याचे रूपांतर तन-मन-धन यामध्ये कसे होते, ते नीट समजून घ्यावे. म्हणजे साधना व तिचा परिपाक म्हणजे काय व तो कसा करून घेता येईल, हे समजून घ्यावे. त्यात आचरण कसे महत्वाचे आहे ते उमगेल.

वंदनीय दादांनी गुरुपौर्णिमेबद्दल केलेला खुलासा सतत स्मरणात ठेवून, गुरुपौर्णिमेचे महत्व जाणून घ्यावे. वं. दादांनी एकच गुरु मानला व त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करून, परमपूज्य बाबांच्या जीवनाचे जे तत्व होते (मानवी जीवन ईश्वरमय व्हावे), ते साकार करण्यासाठी श्री साई आध्यात्मिक समितीची स्थापना करून, लोक-कल्याणाचे कार्य निरंतरपणे होत राहील, अशी तरतूद केली. गुरुंबद्दल व्यक्त केलेली श्रध्दा सतत स्मरणात ठेवून, योग्य तो बोध घेतल्यास जीवनाचे सार्थक होईल. सर्व सेवकांनी व भक्तभाविकांनी काय केले पाहिजे, हे देखील निक्षून सांगितले आहे. त्याची योग्य ती दखल घेऊन आपले आचरण ठेवणे म्हणजेच ‘गुरुदक्षिणा’ अपर्ण करणे होय !

आपण सूज्ञ भक्तांच्या अभ्यासात मागील सर्व विषय आल्यावर स्वाभाविकच गुरुभक्ति हा विषय काय आहे व ती कशी करावी, हे आपल्याला जाणून घेण्याची इच्छा होईल. पण ‘गुरुभक्त’ किंवा ‘गुरुसाधक’ याचा अर्थ आपण व्यावहारिक दृष्ट्या एवढाच लावतो की ज्या साधकाने नोकरी, धंदा, व्यवसाय आदि परावलंबी जीवन न स्वीकारता गुरुभक्तीचे किंवा परमेश्वर उपासनेचे जीवन स्वीकारले आहे, तो गुरुभक्त किंवा गुरुसाधक होय. अशा व्यक्तीस तुम्ही जे गुरु म्हणता त्यांच्या ह्या देहिक अवस्थेतील भाव व स्वभाव यांची तुम्हाला ओळख झाली. पण हे तत्त्व म्हणजे गुुरुतत्त्व नव्हे. ज्याप्रमाणे कावीळ झालेल्या माणसाला हे सर्व जग कावीळ झाल्यामुळे पिवळे दिसते त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या देहिक अवस्थेतील वासनाविकार, इच्छाअपेक्षा, जीवनातील भवितव्याबद्दलच्या अवाढव्य कल्पना, ऐहिक सुखाबद्दलची सुखद अशी स्वप्ने, हा तुम्ही देहाभोवती धारण केलेला चष्मा असल्याने, त्याच चष्म्यातून तुम्ही तुमच्या गुरुमाध्यमाची ओळख करुन घेता. हे तुमच्या देहिक अवस्थेतील तुमच्या हितार्थ नसलेले देहिक हितसंबध निवारण करण्याचे कार्य ज्या गुरुंना करावयाचे आहे, तोच चष्मा तुम्ही तुमच्या डोळ्यांवर परिधान करता. वास्तविक गुरुकृपार्शिवादाने हया तुमच्या चर्मचक्षूंना दिव्यदृष्टी प्राप्त करुन देण्यासाठी गुरुमाध्यमाचा जन्म अनादि कालापासून त्रिगुणात्मक अशा तत्त्वातून झालेला आहे. असे असताना या त्रिगुणात्मक तत्त्वाने ज्या दिव्य साक्षात्कारातून आपली ही चर्मचक्षूंची दृष्टी या जगाला कशी व्यापून राहिल यासंबंधीचे जे कार्य अंगिकारले आहे, याचा सखोल विचार जो आपण केला पाहिजे तो न करता देहात अनंत जन्मांपासून वास करीत असलेल्या दूषित कर्मपरत्वे जे वासनाविकारांचे हितसंबंध या देहाशी आहेत, ते हितसंबंध त्या दृष्टीत आणून गुरुमाध्यमाला ओळखण्यास तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमच्याप्रमाणे तुमचे गुरु आहेत असे तुम्हाला वाटते. हाच गुरुभक्तीतील प्रथमारंभीचा पाया तुमच्या अध:पतनाला कारणीभूत होतो.

गुरुमार्गात किंवा साधनामार्गात साधकाच्या अवस्था दोन प्रकारच्या असतात. प्रथमावस्थेत असलेले साधक म्हणजे ज्यांनी स्थूल व सूक्ष्म या देहांचे एकरुपत्व करुन प्रखर अशा साधनांनी ह्या दोन देहांतून खर्च होणारी देहिक शक्ति ही खर्च होऊ न देता किंवा त्याचा अपव्यय विचार-अविचाराने, विकार-वासनेने होऊ न देता, संग्रहित केलेली असते. ही स्थूल व सूक्ष्म देहातील देहिक शक्ति इष्ट देवतांच्या कृपाशिर्वादाने सिध्द करुन ध्यानधारणा, योगसाधना इत्यादींसाठी त्या शक्तीचा वापर करुन त्या शक्तीला स्वत:च्या ठिकाणी संघटित केलेली असते. अशी ही देहिक शक्ति इतरांच्या देहिक शक्तीपेक्षा अधिक सबळ असल्याने देहिक अवस्थेतील जे भक्तभाविक आहेत त्यांच्या कल्याणार्थ या देहिक शक्तीचा वापर होऊन, त्यांच्या अडीअडचणी निवारण्याचे कार्य या साधकाकडून जरी होत असले तरी केवळ ऐहिक विषय व ते सुलभतेने प्राप्त करुन देऊन ऐहिक विषयात जीवन व्यतीत करुन देण्याचे कार्य या देहिक शक्तीने होत असते. ही शक्ति त्या साधकाचे माध्यम म्हणून असते. त्या शक्तीस जरी आपण ‘ईश्वरीशक्ती’ असे संबोधलेत, तरी तुम्हा मानवांच्या जीवनात ज्या अडीअडचणी जन्मजन्मांतरपरत्वे आल्या आहेत, तेवढ्याच ही देहिक शक्ति निवारण करु शकते. परंतु एखाद्या व्यक्तीची अडचण देवादिक ऋणानुबंधाशी जर हितसंबंधित असेल तर त्या व्यक्तीच्या अडीअडचणी निवारणार्थ जरी हया देहिक अवस्थेतील साधकाने काही प्रयत्न केला तरी त्या अडीअडचणींचे निवारण होऊ शकत नाही. कारण ही साधकाची देहिक शक्ति यामध्ये देवदेवतांच्या कृपाशिर्वादाचा अंतर्भाव नसल्याने देवादिकांच्या हितसंबंधात असलेल्या अडचणी निवारणार्थ जरी त्यांनी निराकरणपध्दतीचा अवलंब केला तरी दु:खनिवारण होत नाही. याचे कारण केवळ ध्यानधारणा, योगसाधना इत्यादि करुन, स्थूल व सूक्ष्म देहांना एकत्र करुन त्यांच्या शक्तिचा अपव्यय होऊ न देता शक्ति जरी संघटीत केली तरी त्यामधील शक्तीस देवदेवता अनुकूल नसल्याने देवदेवतांच्या हितसंबंधात असलेल्या अडचणी निवारण होऊं शकत नाहीत. याशिवाय ज्या व्यक्तीना या गुरुंच्या किंवा साधकांच्या सान्निध्यात गेल्यावर गुरुदीक्षा, अनुग्रह घ्यावयाचा लोभ होतो त्यांनी जरी गुरुमार्गातील हे आवश्यक कार्य अंगिकारले तरी त्यांच्या माध्यमातून दिल्या जाण्याऱ्या अनुग्रह व गुरुदीक्षा या दीक्षा म्हणून जरी दिल्या गेल्या तरी कालकालांतराने भक्तभाविकांना त्या शिक्षा म्हणून भोगणे भाग पडते.

गुरुमार्गातील दीक्षा:

गुरुनामस्मरणदीक्षा, अनुग्रहदीक्षा, गुरुदीक्षा आदि ज्या दीक्षा क्रमश: आपल्या भक्तगणांना द्यावयाच्या आहेत, तत्पूर्वी त्या भक्ताला प्राप्त जन्मात प्रतिकूल अशा ऋणानुबंधपरत्वे जीवनात जे अनुकूल-प्रतिकूल असे जीवन व्यतीत करावे लागते, यासाठी प्रथमत: त्याचे कर्मविमोचन करावे लागते, हे कर्मविमोचन करण्यास त्या भक्ताला आपल्या देहिक अवस्थेतील शक्तीचा वापर करुन, जन्मकर्म व त्यातील अनुकूल-प्रतिकूल दोष अनुकूल करुन घ्यावयाचे असतात. हे कार्य त्यांच्या सामर्थ्याच्यापलीकडे असल्याने प्रथम त्याला ‘गुरुनामस्मरण दीक्षा’ द्यावयाची असते. या गुरुनामस्मरण दीक्षेत काही काळ व्यतीत केल्यानंतर त्या भक्ताला ‘वंशविमोचन’ विधि याची ओळख करुन देऊन तो ज्या घराण्यात किंवा कुटुंबात जन्माला आला आहे त्या कुटुंबातील सात पिढीतील दिवंगत व्यक्तींंचा हितसंबंध या गुरुभक्तांशी आहे की काय व त्याचा दुष्परिणाम त्याला गुरुदीक्षा दिल्यानंतर सोसावा लागेल की काय याचा विचार दीक्षा देणाऱ्या गुरुंनी करावयाचा असतो. असे वंशविमोचन न करता जर प्रथम गुरुदीक्षेचा लाभ त्याला करुन दिला व त्या गुरुदीक्षेप्रमाणे जे नामस्मरण किंवा सू्चित केलेली उपासना आपल्या जीवन उध्दारार्थ तो करील तर केल्या गेलेल्या उपासनेचा अधिक वाटा हे मृतात्मे की, ज्यांना मरणोत्तर जीवनानंतर सद्गती मिळाली नाही ते आपल्या नकळत घेऊन जातात. याचे कारण त्यांना प्राप्त झालेली जी दुर्गति असते त्यातून उत्तम लोकी जाण्यासाठी त्यांना काही ना काही प्रकारे केलेल्या पुण्याची आवश्यकता असते.

आपण करीत असलेले देवदेवतार्जन, धर्माचरण किंवा नित्य उपासना यातील अर्धा-अधिक वाटा जर या मृत योनीने आपल्या मुक्तावस्थेसाठी आपल्यापासून हिरावून नेला तर आपल्याला किती काळपर्यंत व किती जन्मापर्यंत उपासना करणे भाग पड़ेल हे कोणालाही सांगता येत नाही. यासाठी देण्यात येणाऱ्या दीक्षांतविधीपूर्वी या भक्तगणांचे प्रथमत: कर्मविमोचन व नंतर वंशविमोचन करणे हे महत्वाचे कार्य गुरुंना करावयास पाहिजे.

दुसरी दीक्षा, ही अनुग्रह दीक्षा होय. या दीक्षेचा अर्थ असा की, गुरुंनी भक्तांची सिध्दता व तिचे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी ज्या त्रिगुणात्माक शक्तीचा कार्यकारणभाव म्हणजे साधकाच्या ठिकाणी आपल्या शक्तीचे कारण देहात संक्रमण करुन, आपल्या मूळ अवस्थेपासून तेथे साकार रुप धारण करुन ती शक्ति साधकाच्या तिन्ही देहिक माध्यमांशी एकरुप होणे. अशा देहातील तिन्ही अवस्थांचे एकरुपत्व साधकाच्या ठिकाणी झाल्यानंतर ती जी शक्ति त्याच्या ठिकाणी वास करीत असते, ती सिध्द स्वरुपात असते. ही शक्ति प्राप्त करण्यासाठी प्रथमावस्थेत साधकाला देवदेवता यांच्या कृपाशिर्वादापासून ते दत्तपरंपरेपर्यंत किंवा नाथपरंपरेपर्यंत आपल्या साधकमार्गाचा अवलंब करुन साधना करावी लागते. ही साधनामार्गात झालेली जी प्रगती असते तिचा प्रधान विषय जो ‘गुरु’ म्हणून असतो, तो गुरुविषयी गुरुभक्तांच्या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी परिचित करुन द्यावा लागतो. या विधीस अनुग्रह दीक्षा विधी असे म्हणतात.

जन्मजन्मांतर या ऋणानुबंधपरत्वे आपण जेव्हा अनेक जन्म घेतलेले आहेत, त्या जन्मपरत्वे प्रत्येक जन्मात आपले एकच आधिदैवत किंवा गुरुदैवत होते असे नाही व जे होते त्यांची प्रत्येक जन्मात देहिक प्राप्ती झाल्यानंतर जाणीव राहिलेली नसते. अशा भिन्नाभिन्न उपास्यदेवता, आधिदेवता व गुरुतत्वे जन्मजन्मांतराच्या ठिकाणी अस्तित्वात असल्याने निश्चित अशा गुरुभक्तीचा मार्ग भक्तांना अवलंब करण्यास कठीण होते. यासाठी ज्या जन्मजन्मांतरात भिन्नाभिन्न उपास्यदेवता, आधिदेवता, गुरुदेवता पूर्वीच्या अनेक जन्मांत सामावलेल्या असतात, त्यांचे विमोचन करुन प्राप्त जन्मातील प्रधान विषय म्हणजे ज्या गुरुंना ते भक्तिभावनेने ईश्वररुप मानीत आहेत त्यांचा एकमेव परिचय या ‘गुरुदीक्षे’त करुन देण्यात आल्यावर ‘गुरु’ हा एकच विषय व तोही जीवन उध्दारार्थ असा संकल्प त्यांच्या जीवनात प्राप्त होतो. त्यामुळे प्राप्त जीवनात इहजन्माचा हितसंबंध असूनही इष्ट अशी पारमार्थिक उन्नती करण्यास त्यांना योग्य असा वाव व संधी मिळते.

पहिल्या गुरुनामस्मरण दीक्षेत वैचारिक कर्माचे विमोचन करावयाचे असते. अनुग्रह दीक्षा विधीपूर्वी वंशविमोचन विधी करुन या पंचभौतिक देहाचा हितसंबंध देहाबाहेरील प्रतिकूल ऋणानुबंधांशी असतो त्याचे विमोचन होण्याने, जे गुरुभक्त नामस्मरण दीक्षा घेतल्यानंतर उपासना अवस्थेत असतात, त्यांचे कर्मविमोचन व वंशविमोचन होण्याने त्यांना साधक अवस्था प्राप्त होते. या प्राप्त झालेल्या साधक अवस्थेपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनातील इच्छित अपेक्षा या अधिक प्रमाणात ऐहिक विषयांचा लाभ करुन घेण्यासाठी जरी विचारात घेतल्या, तरी या साधक अवस्थेपर्यंत तुमची पारमार्थिक उन्नती ही पंचवीस टक्के झालेली आहे असे समजावयास हरकत नाही. हे वाचनात आल्यावर आपल्याला काही विशेष प्राप्त झालेले आहे असे विचारात न घेता, या प्राप्त झालेल्या पंचवीस टक्के पारमार्थिक उन्नतितून आपल्याला अजून इष्टदेवतांच्या दर्शनाचा लाभ का होत नाही किंवा दिव्य ज्ञान, दिव्यदृष्टी, त्रिकाल जाणण्याची अवस्था का निर्माण होत नाही अशी इच्छा आपण प्रकट करु. पण ही पंचवीस टक्के झालेली तुमची प्रगती जी साधक अवस्थेपर्यंतची आहे, ती देवदेवतांच्या दर्शनाचा लाभ करुन घेण्यासाठी किंवा दैविक मार्गात इतर ज्या काही गोष्टी वर सांगितलेल्या आहेत त्यांची प्राप्ती करुन घेण्यासाठी नाही. साधक अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो काही कृपार्शिवादाचा लाभ झाला आहे तो वरील विचारांच्या भावना निर्माण करुन कुणीही भक्तांनी तो कृपार्शिवाद अनाठायी खर्च करु नये. कारण साधक अवस्थेनंतर सिध्द अवस्थेपर्यंतचा काळ अत्यंत कठीण व बिकट आहे. जगतात नानाविध देवदेवतांची उपासना करणारे व अनेक गुरुमार्गी भक्तभाविक हे साधक अवस्थेच्यापलीकडे क्वचितच जातात याचे कारण उपासना या विषयातील वर सांगितलेली जी लक्षणे आहेत ती शेवटच्या म्हणजे ‘साध्य’ अवस्थेत अनुभवण्याची आहेत. ती अनुभवण्याचा लोभ त्यांना साधक अवस्थेत होण्याने प्राप्त झालेल्या कृपार्शिवादाचा अपव्यय होतो. यासाठी ज्या कृपार्शिवादाने तुम्ही साधक अवस्थेपर्यंत पोहचला आहात त्या अवस्थेची पुढील कठीण अवस्था म्हणजे सिध्द अवस्था  प्राप्त करण्यासाठी साधकाला जरी ऐहिक जन्म व ऐहिक विषय व त्या विषयापरत्वे जीवन प्राप्त झाले आहे आणि त्या  प्राप्त जीवनात जरी तुम्हाला सुख, शांती, संपत्ती आदि  सुखांचा लाभ झाला आहे तरी केवळ ती सुखे अनुभविणे एवढाच जीवनाचा संकुचित अर्थ लावून त्या जीवनाचा यथेच्छ उपभोग घेणे म्हणजे सुखी जीवन असे व्हावयास नको. उलट या प्राप्त झालेल्या जीवनात सुख, शांती, संपत्ती, संतती हे विषय स्वाभाविक तुमच्या ऐहिक जीवनाचा काही एक भाग म्हणून जे अस्तित्वात आहेत ते तुम्हाला ‘भक्ती’ या विषयाकडून स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न सदैव करीत असतात. अशा प्रयत्नाने भक्तिमार्गाबद्दल आपले जे विचार पोषक झालेले असतात त्या विचारांना सद्सदविवेकबुद्धीने आपल्या इच्छाधीन ठेवणे हे सहजासहजी कोणाही साधकाला सहज प्राप्त करुन घेता येत नाही. म्हणून ही पंचवीस टक्के झालेली पारमार्थिक उन्नति किंवा पारमार्थिक विकास हे एक साधन तुम्हाला कृपार्शिवादाने जे दिले आहे ते एवढयाचसाठी की, ऐहिक विषय तुम्हाला तुमच्या ध्येयवादापासून परावृत्त करुन पुन्हा तेच उपभोग घेण्यास ते भाग पाड़तात व अशा ऐहिक विषयात राहून जी पारमार्थिक उन्नती आपणास करावयाची आहे यासाठी हा पंचवीस टक्के कृपार्शिवाद तुम्ही सुविचारात घेऊन जे तुमचे मन, बुद्धी या विषयातूर होते त्या माध्यमांना आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी हा कृपार्शिवाद उपयोगात आणला पाहिजे. हाच तुमच्या प्रगतीचा पाया आहे.

याचा अर्थ आपण ज्या कुटुंबात जन्माला आलो आहोत व ज्या कुटुंबाच्या कल्याणार्थ आपली इष्टकर्तव्ये आहेत त्याकड़े पाठ फिरवून आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ह्या कर्तव्याच्या ज्या प्रापंचिक जबाबदाऱ्या आहेत त्याकड़े दुर्लक्ष होता कामा नये. कारण शास्त्राप्रमाणे प्रापंचिक  विषय हासुद्धा पारमार्थिक आहे व पारमार्थिक विषय हासुद्धा ऐहिक आहे. याचा अर्थ काय तर ऐहिकामध्ये पारमार्थिक म्हणजे आपल्या जीवनातील गरजेपरत्वे जी जी काही सुखे प्राप्त झालेली आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त करुन समाधानी राहणे हा विचार पारमार्थिक अवस्थेचा पाया आहे. पारमार्थिक अवस्थेत चोवीस तास ईश्वराचे चिंतन करणे म्हणजे परमार्थ नव्हे. त्या चिंतनात आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून, ‘ती यथायोग्य करण्याचे कर्तव्य मलाच करावयाचे आहे’, हे  विचारात घेऊन जीवन व्यतीत करणे म्हणजे ऐहिक विषयातून पारमार्थिक विषय व पारमार्थिक  विषयातून ऐहिक  विषय असे दोन  विषय जेव्हा तुम्ही  विचारात घ्याल त्यावेळी जो जन्म इष्टकर्तव्यपूर्ततेसाठी प्राप्त केला आहे त्याचे सार्थक होईल व ह्या जन्मात जे इष्टकर्तव्य करावयाचे आहे ते प्राप्त करण्याचेही सार्थक आपण प्राप्त करते व्हाल. हा जो विचारांचा समतोलपणा तुम्हाला सहजासहजी प्राप्त करुन घेता येत नाही व ज्यांची प्राप्ती कृपार्शिवादाशिवाय होऊं शकत नाही असा कृपार्शिवाद तुम्हीं जीवनात पंचवीस टक्के उपासना अवस्थेपासून साधक अवस्थेपर्यंत  कमाविलेला आहात.

आता अनुग्रह दीक्षेपासून गुरुदीक्षेपर्यंतचा जो काही काळ भक्तभाविकांना गुरुमार्गदर्शनाप्रमाणे आचरणात आणावयाचा आहे, ही जबाबदारी गुरुभक्तांनी सोपी आहे असे समजू नये. कारण ज्या गुरुतत्वाशी तुम्ही एकरुप झाला आहात व ज्या तत्वाच्या ठिकाणी तुम्हाला परमेश्वराच्या सगुण साकार स्वरुपाचा अनुभव आलेला आहे, तो अनुभव येण्यास गुरुमाध्यमानेही यथोचित कर्तव्य केले आहे. अशावेळी मार्गदर्शनात तुम्हाला जी नित्य उपासना सूचित करण्यात येते त्या उपासनेशी तुम्ही भक्तभावनेने एकनिष्ठ रहावयास पाहिजे. ती उपासना किती लहान आहे हे विचारात न घेता,  तो ‘गुरुप्रसाद’ आहे म्हणजे ती लहान नसून महान आहे, अशा भावनेचा आविष्कार तुमच्या विचारांतून ओतप्रोत भरला गेला पाहिजे. कारण अशा अवस्थेतून आपला जो पुढ़ील विकास व्हावयाचा असतो,  ही जबाबदारी भक्तभाविकांपेक्षा गुरुंची अधिक असल्याने ते सोप्यात सोपी व लहान अशी उपासना एवढ़्याचसाठी सूचित करतात की तुमच्या नित्य उपासनेने तुमच्या देहात व देहाबाहेर त्या उपासनेतून आवश्यक इतकीच व तुमच्या पुढील अवस्थेला पोषक आहेत अशीच वलये निर्माण व्हावयास पाहिजेत. समजा, गुरुंनी तुम्हाला ‘राम’ एवढयाच नामाचा उच्चार कर असे म्हटले तर ‘हे नाव मी पूर्वी घेतच होतो. या नावाने माझा काय उद्धार होणार?’ असा विचार निर्माण होता कामा नये. गुरुवाणीतून निघालेला शब्द हा कुणा देवाला उद्देशून नसतो, तर गुरुचे ठायी वास करीत असलेल्या शक्तीचे संक्रमण शब्द स्वरुपाने त्यांना भक्तामध्ये करावयाचे असते. तो सूचित शब्द ध्वनित झाल्यावर त्या शब्दातून निर्माण झालेले स्पंद ध्वनित होऊन जेव्हा तुम्ही ते श्रवण करता त्यावेळी गुरुचे ठायी वास करीत असलेली शक्ति शब्दस्वरुपामध्ये म्हणजे शब्दब्रह्माने तुमच्याशी हितसंबधित होते. एवढा त्याचा अर्थ विचारात घेऊन गुरुवाणीतून निघालेला शब्द हेच ब्रह्म हा विश्वास ठेवावा. त्याऐवजी ‘राम’ शब्द उच्चारला आहे म्हणून आपण ‘श्रीराम जयराम जयजय राम’ इतका अधिक ‘राम’ शब्दाचा उच्चार करुन काही अधिक कृपार्शिवाद प्राप्त करु अशी जी तुमची पारमार्थिक मार्गाबद्दलची भावना आहे ती कोणत्याही जन्मी तुम्हाला साकार करता येणार नाही.

ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर साधक अवस्थेपासून  सिद्ध अवस्थेपर्यंत  जाण्याची महत्वाची जबाबदारी साधकाला किंवा गुरुभक्ताला आपल्या जीवनामध्ये प्राप्त करुन घ्यावयाची आहे. त्यापूर्वी गुरुमाध्यमाद्वारा होणाऱ्या लोककल्याणाची भूमिका माहिती असावयास पाहिजे. जे गुरुमाध्यम साध्य अवस्थेपर्यंत ‘सिद्ध’ आहे अशांचे पंचभौतिक शरीर म्हणजे देह आपल्याला आपल्यासारखाच वाटला तरी त्यांच्या ठिकाणी दोन शक्तींचा आविष्कार झालेला असतो. या दोन शक्तींना समतोल प्रमाणामध्ये कार्य करण्यास प्रेरणा देणारी तिसरी शक्ति असते ती म्हणजे त्यांच्यावर झालेली गुरुकृपा किंवा देवदेवतांची कृपा. प्रथम ज्या दोन शक्ति आपल्या कल्याणार्थ कार्य करीत असतात त्यापैकी देहिक शक्ति ही तुमच्या अडीअडचणी निवारणार्थ  गुरुमाध्यमातून कार्य करीत असते. ह्या शक्तीद्वारा तुमच्या कल्याणार्थ जे उद्गार गुरुवाणीतून उच्चारले जातात ते सत्य अनुभविण्यासाठी त्यांची आत्मिक शक्ति कार्य करते व वाणीतून उच्चारला गेलेला शब्द भक्तांच्या जीवनात कार्य करण्यासाठी जी तिसरी शक्ति कार्य करते ती गुरुकृपा किंवा देवादिकांची कृपा असते.

अशा ह्या तीन प्रकारच्या शक्ति साधक अवस्थेतील माध्यमास एकतर पूर्वपुण्याईने प्राप्त झालेल्या असतात किंवा ह्या जन्मामध्ये गुरुआज्ञेप्रमाणे सेवासाधन करुन त्या मिळविलेल्या असतात. असा हा गुरुकार्याच्या शक्तीचा विस्तार आजपर्यंत आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण अनेक ठिकाणच्या मार्गदर्शनास बळी पडता. भूतभविष्याबÉल ज्या काही गोष्टी अवास्तव सांगून आपल्याला आपल्या जीवनातील भविष्यकाळाबद्दल फोल अशा आशेला जे साधक लावतात, अशा साधकाचे कार्य हे फक्त देहिक शक्तीतून कार्य करीत असते. पण जे साधक तीनही शक्तीतून कार्य करीत असतात, ते मार्गदर्शन करीत असताना ‘तुम्ही देवाच्या कृपेने सुखी व्हाल’, इतकेच वाणीद्वारा उच्चारुन भक्ताला आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देतात. पण चुकूनही भविष्य काळाबद्दल आशेची दिशा दाखवून भक्तगण जोडण्याचा ते प्रयत्न करीत नाहीत.

पहिल्या देहिक अवस्थेतील साधकांच्याबाबतीत गुरुमार्गाला लांछनास्पद असणारी त्यांची कार्यपद्धती अशी अनुभवाला येते की, जरी काही साधनामार्गाने त्यांनी देहिक शक्ति इतरांपेक्षा अधिक प्राप्त केलेली असली तरी त्यांच्या देहाशी हितसंबंधित असलेले विकार व षड्रिपू हे काही त्यांना जिंकता आलेले नसतात. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनार्थ आलेल्या भक्तांमध्ये जे सुखवस्तु असतात, श्रीमंत असतात किंवा ज्यांना सट्टा जुगार आदींचे व्यसन असते, अशांच्या लोभाला हे साधक तात्काळ बळी पडतात. साधक अवस्थेतील पूर्णत्व हे तीन शक्तींचे एकरुपत्व आहे. ते ज्या साधकाच्या ठिकाणी साकार झालेले असते, तो समाजातील ह्या ऐहिक सुखांपासून सदैव विन्मुख असतो. त्याला समाजातील धनिक लोकांचा आधार किंवा आश्रय घेण्याचे कदापिही कारण पडत नाही.कारण तो गुरुआश्रित असतो.

पहिल्या अवस्थेतील साधकापेक्षा थोडीबहुत उच्च अवस्था म्हणजे ज्यांची आत्मिक शक्ति, ही देहिक शक्तीबरोबर कार्य करते आहे अशा साधकांना समाजातील ऐहिक सुखे अनुभविणाऱ्या व्यक्तींबाबत थोडासा आदर वाटून त्यात आपण सहभागी व्हावे असे वाटते. पण देहिक अवस्थेतील साधकांइतके ते या विषयाकडे आकर्षित होत नाहींत. कारण त्यांनी अंगिकारलेल्या कार्याची जाणीव त्यांचे आत्मिक तत्व वारंवार करुन देत असते. पण ह्या साधक अवस्थेतील जे कोणी साधक आहेत ते जरी पहिल्या अवस्थेपेक्षा उच्च आहेत तरी त्यांच्या कार्यपध्दती ह्या समाजाला अधिकच मोहित व आकर्षित करणाऱ्या असतात. कारण या अवस्थेत साधकांना क्षुद्र सिद्ध प्राप्त झालेल्या असतात. याचे कारण दोन शक्तींची अवस्था पूर्ण होऊन तिसऱ्या शक्तीचा आरंभ झालेला असतो. अशावेळी त्यांना ह्या ज्या क्षुद्र सिध्दी प्राप्त होतात त्या माध्यमातून ते नानाविध प्रकारचे चमत्कार समाजापुढे दाखवून हे चमत्कार म्हणजे देवाचे अस्तित्व आहे असा भास निर्माण करतात. त्या व्यतिरिक्त ह्या साधकांच्या जीवनात अनेक शास्त्रीय पुस्तके, धर्मग्रंथ, वेदवेदांत इत्यादि वाचनात आल्याने त्यांचे त्या विषयातील भाषाप्रभूत्व ते इतरांपेक्षा अधिक असते.त्यामुळे ऐकणारा मोहवश होऊन हे आपण ब्रह्मज्ञान ऐकत आहोत अशा गुंगीत तो त्या गुरुमाध्यमाचा लाभ घेत असतो.

तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे साधक तिसऱ्या अवस्थेचे पूर्णत्व प्राप्त करते झाले नसल्याने त्यांचा इहजगतात जन्माला येण्याचा जो काही कार्यकारणभाव आहे त्या कारणपरत्वे त्यांनी या जगतात अचूक व नेमके कोणते कार्य करावे याची मार्गदर्शनदिशा गुरुकृपार्शिवादाने त्यांना मिळत नसल्याने आजकाल असा अनुभव आपल्या वाचनात व ऐकण्यात येतो की अमुक एक हे परदेशी गेले आहेत व सध्या काही कालपर्यत पाश्चात्यांना आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती करुन देण्यासाठी ते अमुक एक कालपर्यत तेथे राहणार आहेत. वास्तविक यातील सत्य फक्त परमेश्वरालाच माहीत आहे.  ज्यांना आपल्या कार्यार्थ वर्तमानपत्राचा आधार लागतो त्या साधकाजवळ निराधार अशा भक्तांच्या आयुष्याला आधार देण्याचे सामर्थ्य आहे किंवा नाही हे सूज्ञ भक्तांनी समजून घ्यावे. वास्तविक आज परदेशात जाऊन वास्तव्य करण्याचा मोह हा विद्यावान विद्यार्थ्याला व्हावयास पाहिजे. कारण आपल्या भारतापेक्षा वैज्ञानिक युगाची प्रगती पाश्चिमात्य देशात अधिक झाली असल्याने त्या शास्त्रांचे अध्ययन करुन त्या शास्त्रात संशोधन करुन, ती शास्त्रे आपण भारतीयांच्या कल्याणार्थ कशी उपयोगात आणता येतील अशी या विद्यावान व्यक्तींची इच्छा असणे स्वाभाविक आहे. पण त्याउलट या साधक व्यक्तींची पाश्चिमात्य देशात जाण्याची स्पर्धा चालू असून, नित्याने वाचनात व ऐकण्यात हेच येते की ह्या साधक व्यक्ती परदेशात कार्यार्थ गेल्या आहेत. वास्तविक जे साधक भारतीय आहेत, त्यांना आपल्या समाजातील जे दु:खी लोक अज्ञानाने आपले जीवन व्यतीत करीत आहेत व ज्यांना जीवन कल्याणाचा मार्ग त्यांच्या ज्ञानाअभावी विचारात घेता येत नाही अशांना सज्ञान करावयाचे असते. असे असताना हे उठताबसता पाश्चिमात्य देशात वास्तव्य करतात. तेथे हे साधक काय कार्य करतात हे आपण पाच किंवा दहाहजार मैलांवरुन पाहू किंवा बघू शकत नाही. म्हणून केवळ परदेशागमनाचा जरी पोशाख त्यांनी अंगिकारला आहे तरी त्यांच्या अंतर्मनाचे ठिकाणी देवाचे वास्तव्य किती आहे हे आपणास सहज कळेल. जर तो साधक पूर्णत्वाने तिसऱ्या अवस्थेची म्हणजे गुरुकृपा किंवा देवादिकांची प्राप्ती करता होईल तर त्याला आपले जीवन ज्या कार्यार्थ व्यतीत करावयाचे आहे ते कार्य नि:संकोचपणे, निरपेक्षपणे, नि:स्वार्थपणे, समाजाला कसे देता येईल या जाणीवेने तो आपल्या कार्याशी एकरुप होऊन श्रीसद्गुरुआज्ञेने त्यांनी नेमून दिलेले कार्यक्षेत्र व त्यांची किमान मर्यादा यांचे चुकूनही उल्लंघन करणार नाही.

आज आपल्या देशाची भौतिक प्रगती नाही म्हणून नाईलाजास्तव आपल्या विद्यावंत विद्यार्थ्यांना जशी  पाश्चिमात्यांची मनधरणी करण्यासाठी जावे लागते, तसेच ज्या देशात तेथील देशबांधवांचा आध्यात्मिक विकास झालेला नाही किंवा ज्यांना इहजन्माचे कर्तव्य काय आहे हे कळलेले नाही अशांना आपल्या प्राप्त जन्माची जाणीव करुन घेण्याची जर भूक लागली असेल तर त्यांनी भारतामध्ये येऊन या ज्ञानाचे लाभ मुक्तहस्ते व मुक्तकंठाने अवश्य घ्यावा. पण आम्ही साधक गुरुआश्रित असून गुरुपदाचे दास असून त्यांचे सेवक असूनसुद्धा आज केवळ पाश्चिमात्यांना त्या शास्त्राची ‘तहान’ लागली आहे तीसुद्धा क्षणिक पण अजून ‘भूक’ नव्हे असे असतानाही अनादि कालापासून जतन केलेली शास्त्रे तेथील देशांत नेऊन ज्यांना आपल्या आचाराने, विचाराचे, संस्कृतीचे, नीतीमत्तेचे, देवादिकांचे भय-अभय नाही अशांना ती देण्याचे कार्य म्हणून जे अंगिकारले आहे अशा या भूमिकेस ‘कार्य’ म्हणता येईल काय ? उदाहरणार्थ आपल्या घरातील मुलेबाळे अन्न, वस्त्र, निवारा यांच्या अभावी दु:खी असताना इतरांसाठी अन्नछत्र व निवारा जो चालवितो, त्याला सूज्ञ पिता म्हणता येणार नाही. तीच अवस्था आज परदेशात जाणाऱ्या साधकांनी निर्माण करुन ठेवलेली आहे. परदेशगमनाचे व तेथील अगणित भक्तांच्या संख्यांचे शेपूट ही उपाधी मागे लावल्याने ह्या मार्गात आपण श्रेष्ठ आहोत व केवळ बाहेरुन अंगिकारलेल्या अशा ह्या मार्गापासून आपण कार्य करीत आहोत असे भासविणे, हे सत्य पटणारे नाही. याउलट कोणतीही परदेशी उपाधि तुम्ही आपल्या व्यक्तिगत जीवनात न अंगिकारुन, जर नि:स्वार्थ, निरपेक्ष बुद्धीने आपले जीवन देशबांधवांसाठी व्यतीत केलेत व त्याची जाणीव होऊन जर पाश्चिमात्य देशातील बंधुबांधवांना खऱ्या अर्थाने जीवन उद्धाराची भूक लागली, तर साधकहो, तुम्ही ही त्यांची भूक नि:स्वार्थ, निरपेक्ष बुद्धीने शमन करण्याचे कर्तव्य प्रथम करा. पण तत्पूर्वी जी विद्या अनादिकालापासून शास्त्रपरंपरेपासून देवादिकांपासून जतन केली गेलेली एकच अशी संपत्ती आहे की अनेक आक्रमणे वेगवेगळया देशपरत्वे होऊनसुद्धा ही आपली संपत्ती कोणालाही हिरावून घेता आलेली नाही, ती संपत्ती केवळ स्वत:चा व्यक्तीगत नावलौकिक व्हावा म्हणून जर तुम्ही या देशाबाहेर नेणार असाल तर ते कदापिही तुम्हाला यशदायक होणार नाही. कारण या भूमीची अनादिकालापासूनची परंपरा अशी आहे की जी शास्त्रे आपल्या हितार्थ व कल्याणार्थ ती ऋषीजनांनी व देवादिकांनीं निर्माण केली, त्या शास्त्रांचा पाया हा देवदेवतांधिष्ठित आहे. तुम्ही व्यक्तिगत माहात्म्य व प्रतिष्ठा वाढावी म्हणून जरी परदेशगमन केलेत व तेथे कार्य म्हणून काही संस्था स्थापन केल्यात आणि शास्त्राच्या नावाखाली जरी स्वत:ला उजेडात आणलेत तरी ज्या शास्त्राचे अधिष्ठान ‘देवदेवता’ आहेत ती शास्त्रे परदेशापर्यत पोहचली तरी देवदेवता परदेशगमन करणार नाहीत हे निश्चित लक्षात ठेवून पुढील काळात आपण अंगिकारलेले कार्य केवळ भारतात करावे की परदेशात करणे उचित आहे हे तुम्हीच ठरवावे. मात्र शास्त्रपरत्वे तुम्ही वेषांतर, देशांतर, धर्मांतर करता आहात. हे जरी तुमच्या व्यक्तिगत देहाधीन आहे तरी देवतांचे देशांतर करण्यासाठी तुम्ही अनेक जन्म जरी घेतलेत तरी ते कोणत्याही जन्मात तुम्हाला शक्य होणे अशक्य आहे.

आपण भक्तास साधकावस्थेमध्ये लोककल्याण कार्य करीत असणाऱ्या दोन भिन्न साधक माध्यमांच्या लोककल्याण कार्याची कार्यपद्धती ही निवेदन करण्यात आली. आता ज्या साधकाचे ठिकाणी देहिक व आत्मिक  शक्ति यांचा विकास झाला आहे व या दोन्ही शक्ति गुरुकृपाशिर्वादाने कार्य करतात अशा या तिसऱ्या अवस्थेतील साधकाचे कार्य इतरांप्रमाणे जरी या पंचभौतिक माध्यमातून होत असते तरी जो देह या पंचभौतिक तत्वातून निर्माण झालेला असतो त्या  पंचभौतिक देहाचे सर्व देहिक धर्म व अंतर्गत भावभावना त्यांच्या देहाधीन असत नाहीत व जरी असल्या तरी साधकाच्या इच्छाअपक्षेप्रमाणे त्या कार्यान्वित होत नाहीत. कारण या दोन शक्ति गुरुतत्वाशी किंवा गुरुशक्तीशी जेव्हा एकरुप होतात तेव्हा त्या साधकाचे ऐहिक अस्तित्व हे जरी आपल्या अनुभवास आले किंवा आपण त्याचा परिचय करुन घेतला तरी ज्या तिसऱ्या तत्वाचा आविष्कार त्यांच्या पंचभौतिक तत्वांत गुरुकृपाशिर्वाद म्हणून झाला आहे अशा साधकाच्या कार्याची योजना ही साधकाच्या इच्छाअपेक्षेवर अवलंबून नसून ती गुरुशक्ति अधीन असते व त्या शक्तीपरत्वे होणारी प्रेरणा ही जेव्हा तुम्हा भक्तभाविकांच्या जीवनाशी एकरुप होते त्या क्रियेलाच ‘कृपाशिर्वाद’ असे म्हणतात.

आता हाच कृपाशिर्वादाचा प्रकार प्रथमावस्थेतील साधक म्हणजे देहिक शक्तीतून कार्य करणाऱ्या व आत्मिक शक्तीतून कार्य करणाऱ्या व्यक्ती हाच कार्यकारणभाव व्यतीत करीत असतात. पण अशा शक्तीचा जो लाभ आपणास होत असतो त्याला कृपाशिर्वाद असे न म्हणता केवळ आशिर्वाद असे म्हणावे लागते. हे दोन शब्द एकमेकांजवळ अधिक हितसंबंधांत जरी बोलण्यात येतात तरी ह्या शब्दातून व्यक्त होणारी क्रिया किंवा कार्य हे समजण्याइतके सोपे व सुलभ नाही. जेव्हा आपण आशिर्वाद घेतो तेव्हा याचे कार्य आपल्या जीवनात मर्यादित कालपर्यंतच राहून पुनश्च आपल्या जीवनाला विस्कळीतपणा येतो. पण कृपाशिर्वादाचा लाभ ज्यांना होतो त्यांना ह्या जन्मात तो निरंतर स्वरुपामध्ये तर मिळतोच, पण पुढेही तो  कृपाशिर्वाद जन्मोजन्मी आपले इष्टकर्तव्य करीत असतो. आम्हा मानवांचा जन्म हा पाच ऋणानुबंधपरत्वे झाला आहे हे वर आपल्याला निवेदन केलेलेच आहे. त्यापैकी केवळ एक ऋणानुबंधपरत्वे म्हणजे ‘जन्मकर्म’ व त्यापरत्वे आलेल्या अडीअडचणी निवारणार्थ जो पहिल्या दोन साधकवस्थेतील साधकांचा आपण लाभ करुन घेता व तो त्यांना सुलभपणे जरी करुन देता येत असला तरी जे तुमचे जीवन पाच ऋणानुबंधांशी हितसंबंधीत आहे, त्या ऋणानुबंधापैकी एकच ऋणानुबंध जर तुम्ही अनुकूल करुन घेतलात व त्यापरत्वे जरी सुख, शांती, समाधानाची प्राप्ती झाली तरी राहिलेले चार ऋणानुबंध आपल्याला अनुकूल आहेत किंवा प्रतिकूल आहेत हे आपणास तर समजत नाहीच,  पण साधकांना या ऋणानुबंधांची ओळख होत नसल्याने प्राप्त झालेले सुख हे आपण काही काळापर्यंत अनुभविल्यानंतर इतर चार ऋणानुबंधांमुळे पुनश्च पहिल्याप्रमाणे  आपल्या जीवनात बिकट समस्या निर्माण होतात.

ज्या साधकाच्या ठिकाणी या तिन्ही शक्तींचे एकरुपत्व होऊन कृपाशिर्वादाचा साक्षात्कार झालेला आसतो, त्या व्यक्तींच्या मार्गदर्शनार्थ आपण गेल्यावर जो मार्गदर्शनाचा लाभ आपल्याला होतो, हा लाभ घेत असताना आपण भक्तांना केवळ क्षणिक सुखाचीच जाणीव असल्याने, आपल्याला प्राप्त झालेला कृपाशिर्वाद व त्याचे सामर्थ्य हे आपण जाणते होत नाही. कारण, ह्या साधकांच्या कार्यपद्धतीचा पाया ऐहिक किंवा क्षणिक सुखाचा लाभ करुन देण्याचा नसतो. ऐहिक जीवनातील अडीअडचणी निवारणार्थ मार्गदर्शन करणे हे त्यांचे प्रधान कार्य नसते. हे कार्य त्यांना एवढ्यासाठी करावयाचे असते की बहुजन समाजातील बहुजन लोकांना आपल्या प्राप्त झालेल्या जीवनाबद्दल, देवादिकांबद्दल, धर्माबद्दल, कर्तव्याबद्दल व प्राप्त जन्माचे सार्थक कशात आहे याची जाणीव व्हावी. पण हे जे त्यांचे कार्य, लोकसंग्रह करुन त्यांना मार्गी लावण्याचे आहे, या त्यांच्या प्रधान कार्याचा बोध आपण भक्त न घेता केवळ  अडीअडचणी निवारण्यासाठीच या साधकांनी ह्या जगतामध्ये हे कार्य अंगिकारले आहे असे समजून तुम्हाला सुलभपणाने व सोप्या मार्गाने जाण्याचा गुरुमार्ग जरी परमेश्वराने निर्माण करुन दिला आहे तरी आपल्या समोरील साधकमाध्यम हे कोणत्या कार्यार्थ या जगतामध्ये आपल्या हितार्थ आपले आयुष्य वेचित आहे याची जाणीव न होण्याने जरी या जन्माचे सार्थक करण्याइतके सामर्थ्य या गुरुमाध्यमाचे ठिकाणी आहे तरी आपल्या अज्ञानामुळे ह्या बहुमोल अशा कृपाशिर्वादाचा लाभ आपण घेऊ शकत नाही. या साधकांच्या कार्यपद्धतीत जो प्रधान विषय तुम्हा मानवांच्या कल्याणार्थ असतो, त्या विषयात तुम्हा भक्तांचे आचारविचार तुमच्या जीवनाला पोषक करुन देणे व ज्या देवदेवता तुमच्या घराण्याच्या किंवा कुटुंबियांच्या आहेत, त्यांच्या कृपाशिर्वादास आज तुम्ही आपल्या आचारविचाराने आशिर्वाद घेण्यास पात्र नसता, ती पात्रता आपल्या मार्गदर्शनाने तुम्हाला प्राप्त करुन देणे हा हेतू असतो. याशिवाय जो तुम्हा मानवांचा जन्म पाच ऋणानुबंधपरत्वे झाला आहे, या ऋणानुबंधातील अनुकूल-प्रतिकूल अशा क्रियेमुळे तुमच्या घराण्यात विद्यानाश, धननाश, संततीनाश होत आहे त्यांचेही ते ऋणमोचन करतात. ही मार्गदर्शने ऐहिक जगतासाठी असतात. पण प्राप्त जन्मात आपला हितसंबंध हा पारलौकिक तत्वाशीही आहे. त्याचेसुद्धा जे हितसंबंध मातृपितृ ऋणामुळे, इतरजनांच्या ऋणामुळे आज आपणास भोगावे लागतात, त्या परलोकावरही त्यांची एवढीच सत्ता असते. त्यामुळे जे हे दोष पिढ्यान्पिढ्यातील कीड म्हणून आज समाजात अनुभवास येत आहेत, त्यांचेही विमोचन ते आपल्या सामर्थ्याने सहज लीलया करीत असतात. ही दोन निराकरणे म्हणजे आधिदैविक व आध्यात्मिक असून ती सहजासहजी ऐकीवात आहेत व अनुभवातील आहेत. पण जी ‘आधिभौतिक’ निराकरणे आहेत की, ज्यांचा संबंध तुम्हां भक्तांच्या जीवनामध्ये स्थळ, काळ, वेळ (Space, Time, Limit ) यापरत्वे येत असतो, यालाच आपण अकस्मात संकट असे म्हणतो. या संकटाची पूर्वसूचना कधीही व कुणासही येत नाही. पण आपण ह्या जन्मात जेव्हा सर्वस्वाने सद्गुरुरुप होतो, तेव्हाच याचा लाभ आपण भक्तांस मिळतो. कारण ज्या अकस्मात संकटाने अकस्मात अशी हानी आपल्या जीवनात होणार आहे, यासाठी आपापल्या घरी बसून व सद्गुरु आपल्या निवास्थानी बसून हे कार्य त्यांना करता येत नाही. यासाठी,वेळोवेळी गुरुदर्शनास जाऊन त्याचा लाभ घेतला पाहिजे. आज आपली भूमिका अशी असते की, जेव्हा अडीअडचणी निर्माण होतात तेव्हाच आपण प्रश्नांची विचारणा करण्यासाठी गुरुस्थानी जावयाचे. पण मध्यंतरीच्या काळात तुमच्यावर काय संकटे येणार आहेत ही जाणीव संकटे कदापिही तुम्हाला देत नसल्यामुळे त्या संकंटाचा आघात किरकोळ स्वरुपापासून ते व्यक्तीचे अस्तित्व नष्ट होणे इथपर्यत तीव्र असतो. यासाठी सोपा उपाय जो पूर्वी गुरुमार्गात सूचित केला आहे त्यासच ‘सत्संग’ असे म्हटले आहे.

साधक अवस्थेतील या तिन्ही अवस्था वाचनात आल्यावर आपण एवढाच विचार करु शकाल की, गुरुमार्ग हा इथपर्यंत आहे. पण या गुरुमार्गातील तीन अवस्था व त्या अवस्थेपर्यंतचे जे गुरुकृपाशिर्वादाचे कार्य असते त्याचसंबंधी फक्त विवेचन झाले आहे. या तिन्ही अवस्था प्राप्त होऊन साधकांच्या ठिकाणी आविष्कार झालेली शक्ति साधकाच्या माध्यमातून लोककल्याणार्थ कार्य म्हणून सेवा स्वरुपात ¨केली जाते. ही सेवा नि:स्वार्थ, निरपेक्ष बुद्धीने दोन तपांपर्यंत झाल्यावर साधक हा गुरुकृपाशिर्वादाने ‘कारण’ व ‘महाकारण’ अशा महान दीक्षा प्राप्त करण्यास पात्र  होतो. याचा अर्थ असा असतो की, दोन तपांपर्यंत लोककल्याणार्थ अंगिकारलेली सेवा ज्या शक्तीच्या कृपाशिर्वादातून साधकाच्या देहिक माध्यमातून केली जाते, त्या शक्तीच्या मूळ स्वरुपाशी हा साधक एकरुप होऊन ‘कारण दीक्षा’ व  ‘महाकारण दीक्षा’ या अवस्थेप्रत जाण्यास पात्र होतो. उदाहरणार्थ या तिसऱ्या अवस्थेतील साधक हा देवदेवता उपासक असेल किंवा दत्त उपासक असेल अगर नाथपरंपरेचा उपासक असेल तरी कारण दीक्षेत तो साधक ज्या शक्तीमाध्यमामुळे कार्य करतो त्या मूळ शक्तीच्या स्वरुपाशी एकरुप होऊन तो पूर्णत्वाने मूळ शक्ति स्वरुप होतो. या अवस्थेला प्राप्त झाल्यावर साधकाला नाईलाजास्तव आपण अंगिकारलेल्या लोककल्याणाच्या कार्यातून  बाजूला व्हावे लागत असले तरी, हा प्राप्त झालेला बहुमान याबद्दलचा मोठेपणा त्यांना न वाटता, या साधक अवस्थेपूर्वीपर्यंतची प्राप्त झालेली साधना ते आपल्या प्रेमळ अशा भक्तांत   शक्तिस्वरुपाने संक्रमण करुन त्यांना आपल्या कार्यात सामावून घेऊन आपण अंगिकारलेले कार्य ‘नियुक्त सेवक’ म्हणून त्यांना सुपूर्द करतात. याचा अर्थ गुरुंनी मार्गदर्शन करण्याचे बंद ¨केले आहे असे मानून आपण नियुक्त सेवकाकडून मार्गदर्शन न घेण्यात चूक करतो. वास्तविक अशा प्रकारचे कार्य करणारी परंपरा अनादिकालापासून नाथसंप्रदायात असल्यामुळे उत्तरोत्तर होणारी जी प्रगती ती जर हा साधक ‘हा प्राप्त झालेला गुरुसामर्थ्याचा ठेवा माझ्यासाठीच आहे’ असे म्हणून या दोन तपानंतर ती शक्ति स्व:तचेच ठिकाणी ठेवता झाला तर परंपरेने पुढील काळात जे कार्य लोककल्याणार्थ म्हणून चालावे ही परंपरा न चालता त्या साधकाच्या अंतकाळानंतर त्याने या काळापर्यंत केलेली सेवा व त्या सेवाकार्यार्थ प्राप्त केलेली सिद्धसाधना ही त्याच्याबरोबर लयास जाते.

गुरुमार्गातील वरील दीक्षा विधींची परंपरा ही काही काल्पनिक स्वरुपाची नसून हिचा उगम श्रीनवनाथपरंपरेपासून चालत आलेला आहे. या दीक्षा ज्या क्रमश: देण्यात येतात व जे गुरुभक्त त्यांचा अंगिकार करतात, ही एकमेकांतील कृपाशिर्वादाची देवाणघेवाण, हिचा दोघांनीही आस्थापूर्वक विचार करुन ती कार्यान्वित करावयास हवी. पण जे गुरुमाध्यम साध्य अवस्थेच्या पूर्णावस्थेला पोहोचलेले असते, त्यांचे इहजगतातील लोककल्याणाचे कार्य व त्या कार्यार्थ अंगिकारलेला मानवी जीवनाचा विषय आणि विषयपरत्वे मानवी जीवनात निर्माण होणारी दु:खे जी कर्मपरत्वे, ऋणानुबंधपरत्वे व देवादिकपरत्वे असतात, अशा ह्या दु:खांचे प्रथमत: कर्मपरत्वे निराकरण, ऋणानुबंधपरत्वे निराकरण व देवादिकपरत्वे आचरण, अशा कार्यपद्धतीतून त्या मार्गदर्शनाचा लाभ जर भक्तभाविकांना गुरुमाध्यमांकडून मिळेल तरच त्यांच्या उद्धारार्थ किंवा कल्याणार्थ त्यांना दिल्या जाणाऱ्या दीक्षा म्हणजे उपासना दीक्षा, गुरुनामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा व गुरुदीक्षा ह्या ज्या क्रमश: घ्यावयाच्या आहेत त्या दीक्षांपरत्वे त्या भक्तभाविकांचा यथोचित देहिक, आत्मिक व कारणिक विकास होण्यास काहीही अडथळा निर्माण होत नाही. ह्या ज्या दीक्षा क्रमश: सांगितल्या आहेत त्या केवळ आपण या समाजात गुरुस्थानाला पात्र झालो आहोत किंवा आपण भक्तगणांमध्ये आदरणीय आहोत म्हणून देण्याचा हव्यास साधकाने न करता आपणास जो दीक्षा देण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे, तो ज्या भक्तभाविकांना द्यावयाचा आहे तो देण्यापूर्वी साधकाने आपली जबाबदारी अशी विचारात घ्यावयास हवी की, ‘माझ्या भक्तांच्या ऐहिक  कल्याणार्थ व जीवन उद्धारार्थ मी ज्या दीक्षा माझ्या भक्तगणांना देणार आहे त्या दीक्षांची अनुभूती मला पूर्णत: आलेली आहे किंवा नाही?’,असा प्रश्न अप्रत्यक्षपणे समाजातील साधकांच्या बाल्यावस्थेतील कार्य म्हणून करणाऱ्या व्यक्तींना का विचारण्यात येत आहे? याचे कारण असे की ज्या ज्या व्यक्तींनी समाजातील अनेक भक्तभाविकांना अशा दीक्षाविधीत समावेश करुन त्या दिल्या आहेत त्यांचे बरेवाईट अनुभव गेल्या पंचवीस वर्षांत या कार्यपद्धतीत मार्गदर्शन करताना आलेले आहेत.

अनेक व्यक्ती सुखसमाधानाने संसार करीत असताना व आपल्या जीवनातील कर्तव्यांची जाणीव अंगिकारुन सुखसमाधानाचे आयुष्य व्यतीत करीत असताना अशा प्रकारच्या गैरदीक्षा घेण्याने अनेक व्यक्तींनी आपल्या कुटुंबाकडे व आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवून परमार्थाचे राज्यपद आपल्याला या गुरुदीक्षेमुळे प्राप्त  होणार आहे या आशेने बहुमोल अशा आयुष्याचा अनाठायी अपव्यय केला आहे. असे अनेक प्रकार या दीक्षाविधी नंतर दीक्षा घेतलेल्या व्यक्तींमध्ये अनुभवास येतात. दीक्षाविधीपूर्वी ‘देव’ हा शब्दसुद्धा उच्चारलेला नसतो व ‘परमार्थ’ हा विषय खाण्यापिण्यासाठी आहे की आचरणासाठी आहे हेही विचारात घेतलेले नसते. पण या दीक्षाविधीनंतर चोवीस तास बोलता चालता ‘गुरुदेव दत्त’, ‘हरि ॐ’ अशा देवांच्या नावाने हाक मारणे चालू असते. जणू काही देव यांच्या हाकेला आपली कर्तव्ये सोडून ‘ओ’ देण्यास आपल्या दारात उभा आहे. याशिवाय कोणी स्नेही, इष्टमित्र, नातेवाईक भेटीस आल्यानंतर एकमेकांच्या कुटुंबातील कुशल विचारण्याऐवजी भक्तीमार्ग व परमार्थ या दोन विषयावर बोलण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे असे भासवून आलेल्या परिचीत व्यक्तीसमोर ह्या व्यक्तीचे वक्तव्य चालू होते. त्यावेळी या सगळया प्रकारात दीक्षा मोठी, साधक मोठा, देव मोठा की, बडबडणारा मोठा ? असा संभ्रम ऐकणाऱ्याच्या मनात होतो. अशासाठी अशा दीक्षाविधीपासून प्रत्येकाने दक्षता ही घ्यावी की, निदान ह्या जन्मात देव न भेटल्यामुळे आपले काही नुकसान होणार नाही. पण ज्या कर्तव्यासाठी तुम्ही जन्माला आलात ते कर्तव्य न करता ती व्यक्ती देवाचा आणि परमार्थाचा शोध लावण्यासाठी आयुष्य खर्च करील, तर पुढच्या पिढयांना अशा भक्तांनी या प्रकारे देवांचा शोध लावण्यासाठी जे आयुष्य खर्च केले त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो.

दीक्षाविधी संबंधीचा सविस्तर खुलासा आपल्याला योग्य प्रकाराने विचारात घेता यावा म्हणून अनुभवसिद्धपद्धतीने निवेदन करण्यात आले आहे. याशिवाय ज्या उपासनेचा उल्लेख वर करण्यात आला आहे, त्याची पुनश्च येथे ओळख करुन देण्याने त्याचे कारण अधिक स्पष्ट व्हावे म्हणून पुन्हा त्याच दीक्षाविधीसंबंधी मार्गदर्शन केले जात आहे.

प्रथमत: उपासना दीक्षा हिचा हितसंबंध तुमच्या घराण्याच्या परंपरेतील कुलदेवदेवता यांच्याशीं संबंधित आहे. जेव्हा आपण आपल्या घरात काही धार्मिक विधि करावयाचे ठरवितो त्या विधि आरंभी प्रथम आपण आपल्या इष्ट कुलदेवदेवता यांच्यासमोर नारळ, विडा, सुपारी व दक्षिणा हे ठेवूनच घरात होणाऱ्या विधिसाठी कृपाशिर्वाद मागतो. त्याप्रमाणे भवितव्यात ज्या दीक्षांचा क्रîमश: स्वीकार करणार आहोत त्या गुरुदीक्षांचा स्वीकार जरी गुरुमाध्यमाकडून घ्यावयास आहे तरी तत्पूर्वी आपल्याला आपल्या घराण्यातील कुलदेवतांचा कृपाशिर्वाद असणे अत्यावश्यक आहे. या उपास्य देवदेवतांच्या दीक्षाविधीचा संस्कार आपली ‘काया’ हिच्यावर होणे महत्वाचे असते.

त्यानंतरची दीक्षा म्हणजे गुरुनामस्मरण दीक्षा. हिचा हितसंबंध जरी गुरुतत्वाशी असला तरी ही दीक्षा गुरुतत्वाशी संबंधित नसून आपल्या वाणीशी संबंधित आहे. कारण वाणीचा धर्म हा शब्दस्वरुपाने उच्चार करुन आपला विचार व्यक्त करण्याचा भाव इतरांना समजावा असा जरी असला, तरी ह्या वाणी माध्यमाच्या होणाऱ्या विषयपरत्वे ज्या क्रिया आहेत, त्या क्रियांचा हितसंबंध परा, पश्यंति, मध्यमा, वैखरी आदिंनी होत असतो. या स्वाभाविक क्रिया व त्यांची अनुभूति ही क्रमश: पुढ़ील दीक्षांत विधीमध्ये अनुभवास येते. पण तत्पूर्वी या वाणीला त्या क्रियांची ओळख करुन देण्यासाठी ही नामस्मरण म्हणून दीक्षा देण्यात येते. तिचा हितसबंध गुरुंशी न लावता तो आपल्या वाणीशी आहे असा विचार निश्चित करुन गुरुदीक्षेच्यावेळी जे नामस्मरण अमुक इतक्या संख्येने करावे असे सांगितले जाते, पण ज्याकडे आपण जाणून दुर्लक्ष करतो ते न करता तो वाणीला स्वाभाविक क्रिया प्राप्त करुन देण्यासाठी म्हणजे वाणी सिद्ध करण्यासाठी ही दीक्षा आहे हा त्याचा अर्थ लक्षात घेऊन ही दीक्षा म्हणजे गुरुकृपाशिर्वादप्राप्ती असा विषय कोणीही समजू नये.

अनुग्रहदीक्षा ही वाचनात व ऐकण्यात आल्यावर आपण असा अर्थ लावतो की, जे आपले गुरुमाध्यम आहे ते माध्यम ज्या गुरुपरंपरेचे आहे त्या परंपरेतील दीक्षा व तिचा स्वीकार करते झालो आहोत. उदाहरणार्थ आपले गुरुमाध्यम नाथपरंपरेपैकी किंवा दत्तपरंपरेपैकी आहे म्हणून अनुग्रह दीक्षाविधि आपण स्वीकारला म्हणजे आपण दत्तपंथी किंवा नाथपंथी झालो असे नसून ही जी दीक्षा आहे तिचा संस्कार मनावर करण्यात येतो. कारण मनाचा कार्यकारणभाव व ह्या जन्मात देहपरत्वे त्याचे कार्य हे जन्मकर्म व जन्मजन्मांतराशी संबंधित आहे. त्यामुळे अनेकवेळा असे अनुभवास येते की, एखादी गोष्ट अधिक तीव्रतेने जेव्हा करावीशी वाटते, तेव्हा थोडया बहुत अंशाने ती न करावी असाही संकेत होतो. पहिल्या अवस्थेतील संकेत हा जन्मकर्मपरत्वे असतो व त्यात आपण यशस्वी होणार नाही, ही जाणीव जन्मजन्मांतराला असल्याने त्याकडून पहिल्या अवस्थेला प्रतिसाद न मिळता जाणीव स्वरुपात हा संकेत देहमाध्यमांकडे पाठविला जात असतो, अशा दोन्ही अंदाजांशी हितसंबंधित असणारे मन हे साधक अवस्थेमध्ये एका विषयाशीच एकाग्र होणे अत्यावश्यक असते म्हणून हा अनुग्रहदीक्षाविधी मनावर करण्यात येतो.

असा हा साधक अवस्थेतील महत्वाचा दीक्षाविधि व ज्यांचा संस्कार मनावर होणे अत्यावश्यक आहे, ती साधनपरंपरा वाचनात किंवा ऐकण्यात जरी येत असली तरी प्रत्यक्षात ती कार्यान्वित करणे हे साधन अत्यंत कठीण आहे. कारण मन म्हणून ज्या काही माध्यमाचा विचार देहाच्या हितसंबंधाशी जोडला जातो अशा मनाच्या स्वाभाविक  अवस्था तरी किती आहेत याची ओळख आजपर्यंत कोणी साधकाने करुन दिली असेल असे वाटत नाही. मन हे व्यक्त व अव्यक्त अशा क्रिîयेद्वारे कार्य करीत असते. मनाची व्यक्त अवस्था ही स्थूल देहाकडे असून जन्मकर्मपरत्वे हा देह जो सर्वदा विषयाधीन होण्याचा प्रयत्न करीत असतो, त्याला जरुरीप्रमाणेच विषयाधीन होण्याचा धर्म प्राप्त व्हावा यासाठी स्थूल मन हे त्या पंचभौतिक शरीराला विचार स्वरुपामध्ये विषयापासून परावृत्त करण्याची जाणीव करुन देत असते. त्यामुळे देहिक धर्म हा जरी विषयाधीन होण्याचा असला तरी जरुरीपेक्षा अधिक जर देह हा विषयाधीन होईल तर देहद्वारा करावयाची प्राप्त कर्तव्ये यशस्वी होणार नाहीत.

मनाची अव्यक्त अवस्था म्हणजे सूक्ष्म मन. याचा संबंध जन्मजन्मांतराशी असून त्याचे अव्यक्त कार्य कारणदेहाशी असते. आपण जो पूजनादि विधी करतो ही क्रिया देहधर्मपरत्वे होते. परंतु आपण करीत असलेली पूजा ही जी क्रिया आहे त्यास पुण्य म्हणता येणार नाही. ज्या भाव-भावनेपरत्वे ही क्रिया देहमाध्यमाद्वारे केली जाते, तत्पूर्वी त्या क्रियेबद्दलच्या भावभावना आपल्या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात. तुमच्या ठिकाणी असलेल्या सूक्ष्म मनाद्वारे किंवा ज्याला ‘अंतर्मन’ असे म्हणतात, त्या  माध्यमाद्वारे या भाव व भावना यांची निर्मिती होते. अशा भावनात्मक क्रियेतील पूज्यतेमुळे हा पूजनादि विधि केल्यावर तो भाव अव्यक्त स्वरुपामध्ये सूक्ष्म मनाचे ठिकाणी सामावला जाऊन तो पुढे कारण देहाशी सामावला जातो. अशा देहाद्वारे होणाऱ्या क्रियेस ‘पुण्यसंचय’ म्हणतात. अशाप्रकारे तुम्ही अंगिकारलेली अनुग्रहदीक्षा ही काही काळापर्यंत योग्य तऱ्हेने आचारविचारात घेऊन जेव्हा गुरुमार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही सेवा करते होता, त्यानंतर काही काळापूर्वी तुम्ही आपल्या जीवनातील जो काही काळ सेवासाधनेत व्यतीत करुन कारण देहाच्या ठिकाणी पुण्यसंचय केलेला असतो तो पुण्यसंचय हा जरी स्वत:च्या पुढील जन्माची तरतूद म्हणून करावयाचा असला तरी त्या पुण्याचा लाभ आपण इतरांच्या कल्याणासाठी विचारात घेतला तर प्राप्त केलेल्या पुण्याईपेक्षा अधिक पुण्याई सेवाव्रतातून प्राप्त होत असते. अशी साधनामार्गातून संचय केलेली पुण्याई ही आपण जरी ऐच्छिक विषय म्हणून प्राप्त करुन घेत असलात तरी त्याचा लाभ स्वत:ला किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींना या जन्मात जर तुम्हाला द्यावयाचा असेल तर त्यासाठी प्राप्त केलेले पुण्य योग्य साधकाकडून सिद्ध करावे लागते. यदाकदाचित् या जन्मात सेवापरत्वे संचय केलेली पुण्याई ही जर सिद्ध करुन आपणास कार्यान्वित करता आली नाही तर ती पुण्याई पुढील जन्मात तुमच्या वाट्याला येते. अशी वाट्याला आलेली पुण्याई ही सिद्ध होऊन, तिचा योग्य तो लाभ होण्यासाठी म्हणून जी प्रथम दीक्षा, उपासनादीक्षा म्हणून सांगितलेली आहे ती तुमच्या इष्ट देवदेवतांशी संबंधित असल्यामुळे जीवनातील प्रथमारंभी तुम्हाला जीवनामध्ये सुख, शांती, समाधान हे प्राप्त करुन देण्यात येते. प्रथम अवस्थेत याचा जर लाभ झाला नाही तर पुढील दीक्षा ज्या जीवनोद्धारार्थ आहेत त्यासाठी आवश्यक पुण्याचा संचय करण्यासही कौटुंबिक परिस्थिती समाधानकारक नसल्यामुळे तु्म्हाला योग्य वाव मिळत नाही. गुरुमार्गदर्शनाप्रमाणे तुम्ही आपली प्रगती करुन घेण्यासाठी गुरुमार्गात दैवदैविक उपासनादीक्षेपासून ते अनुग्रह दीक्षाविधिपर्यंतचा काळ परमेश्वराच्या सेवेत व चिंतनात व्यतीत करता त्या काळात जो पुण्यसंचय तुमच्या सेवामार्गातून तुम्हाला प्राप्त झालेला असतो ते पुण्य सिद्ध करुन कार्यान्वित करण्यासाठी जी दीक्षा देण्यात येते ती ‘गुरुदीक्षा’ होय.

गुरुमार्गातील दीक्षाविधींचा लाभ ज्या भक्तभाविकांना करुन देण्यात येतो किं वा जे लाभ घेतात, त्यांना त्यांच्या देहिक अवस्थेमध्ये काय स्थित्यंतरे झाली आहेत याची जाणीव होणे महत्वाचे आहे. आपल्या स्थूल मनाचा व बुद्धीचा देहाशी जो हितसंबंध आहे व जो हितसंबंध कर्मपरत्वे जीवनात व्यतीत होत असतो तो योग्य कारणपरत्वे व्यतीत व्हावा यासाठी स्थूल मन व बुद्धी या दोन माध्यमांमध्ये समतोलपणा निर्माण व्हावा यासाठी हे पहिले दोन दीक्षाविधि आहेत. अनुग्रह दीक्षाविधीत सूक्ष्म मन व सूक्ष्म बुद्धी (लहान मेंदू) यांचे योग्य असे कार्य जीवनात होणे आवश्यक आहे ते घडविले जाते. या माध्यमांचा साधक अवस्थेत फार महत्वाचा कार्यकारणभाव आहे हे न जाणल्यामुळे याकडे आपले दुर्लक्ष होते. त्यामुळे दीर्घकाळ जरी भिन्नाभिन्न देवदेवतांची, उपास्य देवतांची, गुरुंची सेवा मनोभावे केली तरी त्याची आत्मिक अनुभूति ही अनुभवास येत नाही. जो गुरुदीक्षा विधि भक्तांच्या कल्याणार्थ दिला जातो या दीक्षाविधीचे परिपूर्णत्व याचा अनुभव ‘समाधी अवस्था’ म्हणून अनुभवास येतो. अशा समाधी अवस्थेचा कार्यान्वित होण्याचा कार्यभाग म्हणजे, कारण देहाच्या ठिकाणी जो ईश्वर हा विषय धारण झालेला आहे त्याच्याशी जेव्हा सूक्ष्म मन व सूक्ष्म बुद्धी तदाकार होतात तेव्हा देहिक अस्तित्व विलयास जाऊन कारण अवस्थेत कारणदेहात जो ईश्वर हा विषय आहे तो साक्षात्कार स्वरुपात देहमाध्यमात साकार होतो. त्यावेळी देहिक स्थितीची जाणीव जाऊन ईश्वर या विषयात देह पूर्णत: एकरुप होतो. अशा अवस्थेलाच समाधी अवस्था असे म्हणतात. प्राप्त झालेली गुरुदीक्षा व त्या दीक्षेची आत्मप्रचीति ह्या योगे समाधी अवस्थेपर्यंत नेण्याचे साधन जरी त्या गुरुदीक्षा विधीत आहे तरी ह्या दीक्षाविधीचा स्वीकार केल्यानंतर मार्गदर्शनाप्रमाणे आपण आपले आचारविचार या दीक्षा विधीस पोषक असे ठेवून जर सूचित केलेले साधन योग्यवेळी व योग्य प्रकाराने केले तरच आपल्याला जो दीक्षाविधि ज्या संप्रदायपरंपरेने देण्यात आला त्या संप्रदायामध्ये आपण त्या संप्रदायाचे गुरुभक्त झालो असे सिद्ध होते. उदाहरणार्थ,  दत्तसंप्रदाय किंवा नाथसंप्रदाय. या दीक्षांचे परिपूर्णत्व प्राप्त झालेल्या साधकांची प्रगती ही समाधी अवस्थेपर्यंत होते असे वाचनात आल्यानंतर स्वाभाविक तुम्हा भक्तांना हे साधन इतके सोपे व सुलभ आहे तर जे साधक या अवस्थेपर्यंत व पुढेही पोहचले असतील त्यांची समाधी लागते किंवा नाही व लागली तर ती व्यक्ती काळापर्यंत लागू शकते असा प्रश्न आपल्या ठिकाणी निर्माण होणारच. समाधी अवस्थेत गेल्यानंतर स्वत:चे व जगातील अन्य विषयांचे विस्मरण आपल्याला होणे असा अर्थ नसून दीक्षाविधीनंतर कारणदेहाचे ठिकाणी जो पुण्यसंचय तुम्ही करते झालेले आहात, त्या पुण्यसंचयाला ‘सिद्धावस्था’ प्राप्त झाल्यावर त्या सिद्धावस्थेला कार्यार्थ प्रधान विषय म्हणून ‘गुरुआज्ञा’ व्हावी लागते. ऐहिक जीवनात आपल्या बोलण्या-चालण्यात अमुक एकाने अमुक करावे असे जे बोलतो त्यालाही आज्ञा असे म्हणतो. पण आज्ञा हा जो शब्द आहे हा ध्वनिरुपात तुम्हास ऐकावयास मिळत नसून सूक्ष्म बुद्धी व सूक्ष्म मन हे कारण देहाशी जेव्हा एकरुप होते व तेथील पुण्याई ह्या दीक्षाविधीनंतर जेव्हा सिद्ध होते त्यावेळी ईश्वराचे अस्तित्व हे जरी साकार स्वरुपात दिसत नसले तरी त्याच्या इच्छेचे स्पंद या माध्यमामध्ये साकार होतात व मग ते त्या साधकाला याचे ज्ञान विचार स्वरुपात देतात. यालाच प्रेरणा म्हणतात. या प्रेरणेप्रमाणे जो साधक गुरुअंकित होऊन गुरुआज्ञेप्रमाणे जीवनातील अन्य विषय गौण मानून ‘गुरु’ हा विषय प्रधान ठरवेल त्या साधकाच्या क्रियेला ‘आज्ञा’ असे म्हणतात. अशी आज्ञा व प्रेरणा यांचे प्रधान विषयाशी एकरुपत्व करुन जेव्हा साधक ‘माध्यम’ बनून कार्य करतो तेव्हा केले गेलेले कार्य याची चुकूनही जाणीव देहिक अवस्थेला जाणवत नाही. अशी जेव्हां स्थिती होते त्यावेळी तो साधक प्रधान विषयपरत्वे जी सेवा अंगिकारतो त्या सेवेचे समाधान कोणत्याही ऐहिक विषयामधून मिळत नाही अशा सात्विक व शुद्ध समाधानात तो मनुष्य स्थितप्रज्ञ असतो. ही अवस्था प्राप्त करणे म्हणजे समाधी अवस्था होय.

वर सांगितलेल्या चार दीक्षा विधीनंतर तो साधक सिद्धावस्थेप्रत जातो. हा सिद्धावस्थेपर्यंतचा काळ स्वत:च्या देहिक, आत्मिक व कारणिक या अवस्थांचा विकास होण्यासाठी व योग्य विषयापरत्वे कार्यान्वित होण्यासाठी त्याचा लाभ झाल्यावर, सिद्धावस्थेतील साधकाने स्वत:च्या जीवनाबद्दल अहंभाव न ठेवता ज्या परमेश्वराच्या कृपाशिर्वादाने ह्या पदापर्यंत पोहोचलो त्याची जाणीव ठेवून ऐहिक जगामध्ये आपल्या परिसरामध्ये येणाऱ्या नानाविध विषयांपासून अलिप्त राहून प्राप्त झालेल्या कृपाशिर्वादाचा लाभ  निरपेक्ष व नि:स्वार्थ बुद्धीने देऊन बहुसंख्य भक्तांच्या जीवनात देवाबद्दल, धर्माबद्दल, स्वत:च्या इष्ट कर्तव्याबद्दल, प्राप्त झालेल्या जन्माच्या उद्धाराबद्दल जे अज्ञान आहे त्याचे निरसन करुन घेतले पाहिजे. ही सेवा करीत असताना आपल्याला परमेश्वराने जो कृपाशिर्वाद दिला त्यावेळी आपल्यातील कमीअधिक दोषांकडे लक्ष न देता आपल्याला ‘आपला एक भक्त आहे व त्याचा उद्धार मला करावयाचा आहे’ ह्या जाणीवेने त्या परमेश्वराने आपल्याला कृतार्थ केले आहे, तेव्हा आपण अंगिकारलेली सेवा ही कृतार्थ भाव व भावनेतून जगताला परिचित होणे अत्यावश्यक आहे अशी भावना ठेवावी.

या चार दीक्षाविधी नंतर साधकाला जी सिद्धावस्था प्राप्त होते त्यामुळे मनुष्यमात्राच्या जन्माचे जे हितसंबंध ऋणानुबंधपरत्वे इहजगताशी असतात त्यातून तो मुक्त होऊन गुरुऋणाशी हितसंबंधित होतो. अशावेळी पुढील अवस्थांचा म्हणजे ‘कारण दीक्षा’ व ‘महाकारण दीक्षा’ यांचा लाभ करुन घेण्यासाठी त्याचे देहिक माध्यम विकसित होते. आज आम्हा मानवांचा प्राप्त जन्म हा कर्माधीन असल्याने परिपूर्ण जीवन हे कर्मपरत्वेच व्यतीत करावे लागते. पण कारणदीक्षेपासून महाकारण दीक्षेपर्यंत जो काळ साधकाच्या जीवनामध्ये पुढील जन्माचा कार्यकारण भाव प्राप्त करुन घेण्यासाठी आहे, अशावेळी कारण अवस्थेतील दीक्षा प्राप्त करुन ती सिध्द करण्यापर्यंत जर साधक या साधनेबद्दल कृतार्थ राहील तर पुढील जन्म कर्मपरत्वे न येता तो इच्छापरत्वे प्राप्त होईल. असा जन्म जेव्हा एखादी व्यक्ती प्राप्त करते तेव्हा त्याच्या बाल्यावस्थेपासूनच त्याच्या ठिकाणी सामावलेल्या ईश्वरी तत्वाचा अनुभव यावयास लागतो. पूर्वजन्मपरत्वे अशी अवस्था प्राप्त करुन असा साधक पुनश्च इच्छाजन्मी होता झाल्यावर पूर्वजन्मातील कारण दीक्षेप्रमाणे त्या त्या इष्ट प्रेरणा होऊन पुनश्च तो त्याच गुरुसेवेच्या व्रताचा अंगिकार करीत असतो. अशा अवस्थेत आत्मिक व कारणिक या अवस्था जरी पूर्णत्वाने विकसित असल्या तरी जगताला आपला जन्म घेण्याचा परिचय व्हावा म्हणून त्यांना पंचभौतिक देहमाध्यमाची गरज पडते. अशा अवस्थेत जरी त्यांनी पंचभौतिक देह हा कार्यार्थ माध्यम म्हणून अंगिकारला असला तरी गुरुप्रेरणेप्रमाणे त्या देहालाही ते आपल्या सेवेने सिद्धवस्थेत नेऊन पोहोचवितात. अशामुळे पुनश्च त्यांनी धारण केलेली देहिक अवस्था ही जन्मत:च त्यांना सिद्धावस्था म्हणून कार्यान्वित करता येते. अशा अवस्थेला ‘ईश्वरस्वरुप अवतार’असे म्हणतात.

ही त्याची देहिक स्थिती इहजगतात सर्वसामान्य माणसाप्रमाणेच क्रिîयाकर्म करीत आहे असे जाणवत असल्याने त्यांच्या ठिकाणी ज्या प्रखर अशा शक्तीचा वास आहे त्याची जाणीव त्यांच्या परिचित भक्तांना न होण्याने असे हे सिद्धपुरुष आपल्या कल्याणार्थ इहजगतात मानवी रुपात येऊनसुद्धा आपल्या मानवी द्दष्टीला त्यांच्या जन्मातील ही गूढता देहात अंतर्भूत असलेल्या शक्तीची भव्यता व सर्व जगातील दु:खी लोकांना आपल्या ठिकाणी सामावून घेऊन जे दु:खी आहेत त्यांचे दु:ख आपलेच आहे अशा भक्तियुक्त सहिष्णूतेने ते जगाच्या कल्याणार्थ जे आयुष्य वेचित असतात याचे ज्ञान होत नाही. असा हा त्यांचा नि:स्वार्थ, निरपेक्ष सद्हेतू हा ईश्वरी प्रेरणेनुसार जरी परमेश्वरस्वरुप असतो व त्यांचे बोलणे चालणे हे सामान्य माणसाप्रमाणेच आपल्या अनुभवाला येत असते, तरी त्यांचे भक्तांबद्दल आचारविचार हे ब्रह्मस्वरुप असतात. आपण कर्मबंधनाने देहात असल्याने आपल्या ठिकाणी विचारआचारांचे, इच्छावासनांचे रागलोभांचे द्वैत अहर्निश चालू असते. अशामुळे जरी नकळत काही एक कष्ट न करता पूर्वजन्मातील काही पुण्याईची उतराई म्हणून अशा ईश्वरीस्वरुप अवतारी पुरुषांचा लाभ झाला तरी आपण आपल्याच अज्ञानाने ईश्वराने आपल्या कल्याणासाठी अंगिकारलेली ही अपूर्व योजना असूनसुध्दा त्याचा यथोचित लाभ घेऊ शकत नाही. ही ‘कारणदीक्षा अवस्था’ जशी इच्छाजन्मी असते तशीच ती इच्छामरणी असते. अशा संत पुरुषांना आपले इष्टकार्य या जगताशी काय आहे व किती काळ आहे हे कळल्यानंतर ते त्या काळपर्यंत आपले जीवन व्यतीत करुन अल्पकाळातही या जगताचा निरोप घेतात. अनेक वेळा असे बोलण्यात येते की अशा अधिकारी व्यक्ती ह्या अल्पायुषी कशा होतात ? पण ते त्यांचे अल्पायुष्य व त्यांचे सामर्थ्य आपण जन्म घेत असलेल्या जन्मकर्म बंधनाच्यापलीकडचे असल्याने आपणास घ्यावे लागणारे दीर्घकाळ असे सात जन्म व त्यांचा एक जन्म इतका तात्विक फरक यात आहे. यामुळे इष्ट कार्याची फलश्रुति झाली की पुढील अवस्था प्राप्त करुन घेण्यासाठी व पुढील कार्याची योजना ईश्वरी प्रेरणेने अंगिकारण्यासाठी ते अल्प काळात निघून जातात. यातच त्याच्या जन्माची सार्थकता आहे. आपणास दीर्घकाळ जगण्यात व दीर्घायुषी होण्यात जो काही मोह वाटतो, याचे कारण आपल्यासमोर जन्माला येण्याचे कर्तव्यकारण काय आहे याचा उगम कोणत्याही जन्मात झाला नसल्यामुळे कर्मपरत्वे सुखे निर्माण करणे व ती भोगून पुढील जन्मासाठी नवीन अशा दु:खांची निर्मिती करणे एवढेच आपल्या जन्माचे कार्य आहे. त्यामुळे आपण जरी दीर्घायुष्य प्राप्त केले तरी जोपर्यंत प्राप्त झालेल्या जीवनाची सफलता होत नाही तोपर्यंत ह्या दीर्घकाल प्राप्त झालेल्या आयुष्याची यत्किंचितही शोभा नाही.

सिध्दावस्थेचे पूर्णत्व होईतोपर्यंत प्राप्त होणा ऱ्या दीक्षा ह्या मानवी स्वरुपात वास करीत असलेल्या परमेश्वराच्या आशिर्वादाचा लाभ आहे, पण कारणदीक्षेपासून ते महाकारणदीक्षेपर्यंत जो काळ साधकाच्या जीवनात व्यतीत होतो त्या काळात ह्या दोन महान दीक्षा, ह्या त्या साधकाचे जे गुरुतत्व असेल तेच गुरुतत्व त्या साधकाला ही दीक्षा देत असते.

आपण भक्तांच्या जीवनात वर निवेदन केलेल्या सिध्दपुरुषांच्या कार्याचा लाभ घेण्याचा सुयोग आलाही असेल किंवा पुढेमागे येईलही. पण जे सिध्दस्वरुप सत्पुरुष आहेत त्यांच्याकडे आपण गेल्यावर सूज्ञपणाने काय इच्छा व्यक्त करावयाची याचे सारासार ज्ञान नसल्याने व आपण आपले जीवन केवळ एक ऐहिक सुखाचा संसार म्हणून जो खेळ मांडला आहे, त्या विस्कळीत झालेल्या जीवनाच्या खेळाला सुव्यवस्थितपणा येऊन अधिक ऐहिक सुख कसे प्राप्त करुन घेता येईल ही इच्छा विचारात घेऊन आपण ह्या सिध्दपुरुषांच्या दर्शनार्थ किंवा कृपाशिर्वादार्थ जात असतो. हा आम्हा मानवांचा जन्म ज्या कर्मपरत्वे झाला आहे त्यात ऐहिक सुखे कमी-अधिक प्रमाणात प्राप्त होणे स्वाभाविक आहे. पण जो परमार्थ प्राप्त करण्यासाठी अनेक जन्मापर्यंत मनुष्य जन्म घेऊनही तो प्राप्त करता येत नाही. तो “मला कसा प्राप्त करुन घेता येईल व आपण आपल्या कृपाशिर्वादाने कृतार्थ करुन त्याचा लाभ मला करुन द्याल काय ?” अशी नम्र भावनेची इच्छा चुकूनही कुणा भक्ताच्या वाणीतून उद्गारली जात नाही. याला कारण सिध्दपुरुषांचे सामर्थ्य किती आहे हे जाणण्यास व ओळखण्यासाठी आज आपण असमर्थ आहोत. त्यांच्या सामर्थ्याची जर ओळख करुन द्यावयाची झाली तर तुमच्या जीवनातील ऐहिक अपेक्षापूर्ती करण्यापासून ते जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त करण्यापर्यंतचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते. अशा सामर्थ्याचा लाभ होऊनही आपण आपले आयुष्य सद्गुरुंना वाहण्यास तयार होत नाही. अनेकवार आपल्या वाचनात असे येते की कुणी अवतारी पुरुषाने आपल्या भक्तांचे अल्पायुष्य टाळले. अशी जी असामान्य लीला हे सहजलीलया करतात, हे त्यांचे सामर्थ्य नियतिच्या सामर्थ्यावरही मात करते. जेव्हा तुम्हा भक्तांच्या जीवनात अकस्मात मृत्युयोग, अपघात किंवा जन्मकर्मपरत्वे येणारी अन्य संकटे असतात त्यावेळी तुमची देहिक स्थिती अशी असते की तुमचे जन्मकर्म व जन्मजन्मानंतर ही एकमेकांपासून विभक्त होण्याच्या मार्गावर तरी असतील किंवा पूर्णत: विभक्त झाली असतील. अशा वेळी या दोन अवस्थांमध्ये जी पोकळी निर्माण झालेली असते ती पोकळी म्हणजे या दोन ऋणानुबंधांचे संबंध एकमेकांशी नसणे. अशा वेळी त्या व्यक्तीचे अपघाती निधन, अपमृत्यु इत्यादि संकटे त्याच्या कुटुंबियांना भोगावी लागतात. अशी ही पोकळी आपल्याला जरी जाणवत नसली तरी ती सिध्दपुरुषांना जाणवताच ते स्वत:च्या कृपाशिर्वादाच्या सामर्थ्याने ही पोकळी व्यापून दोन्ही ऋणानुबंधांना कृपाशिर्वादाशी एकरुप करतात. अशा रीतीने जेव्हा आपण संकटमुक्त होतो तो आपल्या जीवनातील क्षण हा पुनर्जन्माचाच होय हा सुविचार करुन पुढील आयुष्य ऐहिक विषयांच्या सेवेसाठी त्या ऐहिक विषयाच्या पायाशी ऐहिक सुखप्राप्ती होण्यासाठी त्याची मनधरणी करण्यासाठी वाहावयाचे की ज्या कृपाशिर्वादाने तुम्हाला पुनर्जन्म प्राप्त झाला आहे त्या गुरुचरणाशी हे आयुष्य वाहावयाचे हे ज्या सूज्ञ भक्तभाविकाला समजेल व त्याचे जे जीवन सद्गुरुकृपाशिर्वादाने पुनरुज्जीवित झाले आहे त्यापुढील आयुष्यात तो भक्तभाविक जर ऐहिक विषयांकडे विन्मुख होऊन गुरुपदाशी एकरुप होईल तर प्राप्त जन्माचे जे उद्दिष्ट कृतार्थ होण्याचे आहे त्यासाठी पुढे प्राप्त करावे लागणारे साधारण तीन जन्म व कर्मपरत्वे भोगाव्या लागणाऱ्या यातना यातून तो मनुष्य मुक्त होऊन गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त झालेल्या जीवनात तो ह्या कृतार्थाची प्राप्ती करता होतो.

या नंतरची महान दीक्षा ही महाकारणदीक्षा होय. वर निवेदन केलेली कारणदीक्षा व महाकारणदीक्षा या दीक्षा विधींचा लाभ साधकाला प्रत्यक्ष परमेश्वराकडून होत असल्याने पहिल्या अवस्थेत, म्हणजे कारणदीक्षेत तो परमेश्वरस्वरुप म्हणून जगत्कल्याणाचे कार्य अंगिकारतो. ह्या कार्याचे पूर्णत्व म्हणजेच दीक्षेची पूर्तता. अशानंतर जेव्हा या साधकाला महाकारण दीक्षा प्राप्त होते त्यावेळी तो इच्छाजन्मी व इच्छामरणी म्हणून या जगतात येत नसून त्याचा जगतात येण्याचा हेतू त्याच्या अधीन नसून तो परमेश्वराधीन असतो. अनेक वेळा या सिध्दपुरुषांच्या जन्माच्या उत्पत्तीची मीमांसा जोडण्याचा किंवा शोधण्याचा आपण प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे त्यांचे इष्टकर्तव्य पूर्ण झाल्यावर जेव्हा ते निजधामाला जातात त्यावेळी त्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही कर्माधीन मानव करण्यास सोडत नाही. पण या परमेश्वरी तत्वाला आदि नाही व अंत नाही. अशा तत्वाचा शोध घेण्यात वेळ खर्च करण्यापेक्षा त्यांचा जो लाभ इह जगताला झाला आहे त्याचे समाधान मानून त्यांच्या सदैव चिंतनात निरंतर असे राहता येईल याचा विचार करावा. त्यांची जी देहिक अवस्था वरीलप्रमाणे जरी मानवी स्वरुपामध्ये चर्मचक्षूंना अनुभवास येत असली तरी ह्या देहिक स्थितीच्यापलीकडे ब्रह्माण्डाला व्यापून राहिलेली जी शक्ति आहे ती कार्यार्थ त्यांच्या पाठीशी उभी असते. अशा सिध्दपुरुषांना ‘परमेश्वराचा अवतार’ असे म्हणतात. यांच्या देहिक स्थितीचे कार्य अगदी बाल्यावस्थेत म्हणजे साधारण वयाच्या आठव्या वर्षापासून सुरु होते. जेव्हा आपल्या मुलांना खाण्यापिण्याचेही ज्ञान नसते, त्यावेळी ती सिध्दसाधक अवस्थेतील बालके आनंदाने ब्रह्मलीला दाखवित असतात. असे अवतार कार्य परमेश्वराने आम्हा मानवांच्या कल्याणार्थ किती सिध्दसाधन, शास्त्रीय व अनुभवसिध्दपध्दतीने योजले आहे याचा जरी आपण विचार करु लागलो तरी या ठिकाणी आपली बुद्धी विचार करण्यास असमर्थ ठरते.

आज जगतात अनेक व्यक्तींना प्राप्त जीवनात पारमार्थिक सुखाचा ठेवा प्राप्त व्हावा अशी तळमळ व इच्छा असते. अशा व्यक्ती समाजातील साधक अवस्थेतील व्यक्तीकडे मार्गदर्शनार्थ गेल्यावर हे साधक ज्यांनी अधिकार नसताना समाजात ‘गुरु’ म्हणून मान्यता प्राप्त केली आहे, ते आलेल्या व्यक्तीस काही अवघड अशा साधनांचा अवलंब सेवा या स्वरुपात वर्षानुवर्षे करावयास सूचित करीत असतात. पण खऱ्या गुरुमार्गात जेव्हा एखादी व्यक्ती पारमार्थिक सुखाचा लाभ घ्यावा अशा इच्छेने येते, तेव्हा त्या व्यक्तीच्या जीवन परिसरात जी काही दोषास्पद वलये असतात त्याचे प्रथमत: विमोचन केले जाते. ही दोषास्पद वलये वर वर्णिलेल्या गुरुपरंपरेतील लोक जाणण्यास समर्थ नसल्याने जरी  काही जप, तप, साधन करावयास सांगितले तरी त्या व्यक्तीस काही लक्ष जप करुनही ‘साधक-सिध्द-साध्य’ ह्या अवस्थेपैकी पहिली म्हणजे साधक अवस्थाही प्राप्त होऊ शकत नाही. याचे कारण पूर्वजन्मपरत्वे किंवा ज्या घराण्यात आपण जन्म घेतो त्या घराण्यातील दोष आम्हा मानवांच्या वाट्याला जन्म प्राप्तीनंतर येत असतात व ही दोषास्पद वलये जरी अदृष्य रुपाने असली तरी कमी अधिक प्रमाणात प्रखर असतात. जरी आपण पारमार्थिक सुखाचा लाभ व्हावा म्हणून मार्गदर्शनाप्रमाणे साधनेला आरंभ केला, तरी साधक अवस्थेतील ही बाल्यावस्था असल्याने जे दोष अनेक जन्म व अनेक पिढ्यांपरत्वे धारण झालेले आहेत ते करीत असलेल्या साधनेची फलप्राप्ती करुन देत नाहीत. अशासाठी गुरुंच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यास जे जातात, त्यांना साधनसेवा सूचित करण्यापूर्वी मार्गदर्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या देहिक अवस्थेच्या आसमंतात प्रतिकूल अशी जी वलये असतात त्यांचे प्रथमत: विमोचन करण्याची जबाबदारी गुरुंची असते. त्याचबरोबर देहिक माध्यमातून करीत असलेली साधना साकार व्हावी अशी जी इच्छा मार्गदर्शन घेणाऱ्या व्यक्तीची असते त्यांच्या देहिक माध्यमाचा इष्ट विकास कोणत्या साधनपध्दतीने म्हणजे दीक्षांत विधीपरत्वे होईल, हेही साधन ह्या गुरुमार्गातील व्यक्तींना प्राप्त व्हावयास पाहिजे. यासाठी ज्या दीक्षामाध्यमातून भक्तगणांचा देहिक विकास करावयाचा असतो अशा दीक्षा प्रथमत: गुरुमार्गातील व्यक्तींनी संकल्पाने सिध्द करावयाच्या असतात. अशा संकल्पाने जेव्हा ह्या दीक्षा सिध्द होतात व भक्त गणांना दिल्या जातात, तेव्हा ह्या दीक्षाविधीतील संकल्प भक्तांच्या देहिक माध्यमात नकळत कार्यरत होऊन, त्यांच्या देहिक माध्यमाचा विकास ह्या दीक्षापरत्वे होत असतो. नुसती दीक्षा देणे ही जबाबदारी गुरु व शिष्य यामध्ये जेव्हा देवाण-घेवाण करते तेव्हा ‘अमुक गुरुकडून मी दीक्षा घेतली आहे’ एवढेच त्या गुरुंच्या नांवाचे भांडवल सांगण्यापलीकडे कोणतीही अवस्था प्राप्त होत नाही.

आज भारतात गतकालातील अनेक अवतारी पुरुषांची समाधी मंदिरे ‘तीर्थक्षेत्र’ म्हणून, अस्तित्वात आहेत. अनेक भक्तभाविक अशा तीर्थक्षेत्री वर्षानुवर्षे जात राहून त्या समाधी मंदिराची सेवा मनोभावनेने करीत असतात. पण ह्या अवतारी पुरुषांनी ईश्वरी आज्ञेने हे जे अवतारकार्य इहजगतात ‘ईश्वरी कार्य’ म्हणून केलेले असते अशांच्या ठिकाणी  ब्रह्माण्डशक्तीतील काही एक विशिष्ट गुण तन्मात्र रुपाने (म्हणजे शब्द, स्पर्श, रुप, रस, गंध) धारण झालेला असतो. अशा ह्या गुणांपैकी कोणता निश्चित गुण आपल्याला प्राप्त होण्यास आपले देहिक व आत्मिक तत्व पोषक आहे ह्या गोष्टीचा साधनमार्गाचा अवलंब करण्यापूर्वी अनुभव घेतला पाहिजे. केवळ देहाने वर्षानुवर्षे  या तीर्थक्षेत्राचा लाभ आपण घेत आहोत म्हणजे आपली पारमार्थिक उन्नती होईल असे नाही. याचे स्पष्ट व अनुभवास आलेले असे उदाहरण म्हणजे आज आपल्या सर्व कार्यकेंद्रावर श्रीसद्गुरु पंतमहाराज यांनी जी पदांची शब्दरचना केली आहे, ती पदे ऐकत असताना आपल्या शरीरात ऐकलेल्या प्रत्येक शब्दातील स्पंद हे देहिक अवस्थेत आपल्या न कळत उमटतात. याचा अनुभव प्रत्येकाने घेतला आहे. याचे कारण दत्तपरंपरेतील ह्या अवतारी पुरुषाजवळ ‘शब्दब्रह्माचा’ आविष्कार झालेला होता. त्यामुळे त्यांनी जी शब्दरचना श्रीदत्तगुरुंना समर्पण केली आहे, तो प्रत्येक शब्द हा साक्षात् परब्रह्म असून, आपल्या वाणीतून तो जेव्हा गायिला जातो, तेव्हा न कळत आसमंतात शब्दब्रह्माचे स्पंद उमटतात व त्या स्पंदवलयामध्ये आपली वृत्ती तल्लीन होते. अशा गोष्टीचा यथायोग्य विचार आपण भक्तांनी न करता केवळ अवतारी पुरुषांची समाधी मंदिरे अस्तित्वात आहेत म्हणून तेथे जाणे योग्य नाही.

प्रत्येक अवतारी परंपरेतील सत्पुरुषांचा धर्म हा जरी कृपाशिर्वाद देण्याचा असला तरी अवतार कार्यात त्यांचा जो काही प्रधान गुणधर्म ब्रह्मस्वरुप म्हणून त्यांच्या ठायी होता, तो आम्हा मानवांच्या कल्याणार्थ ते इहजगतात ठेवून गेले आहेत. ब्रह्माण्डाची उत्पत्ती ही जशी पंचतन्मात्रांनी झाली आहे, त्याचप्रमाणे मानवी देहाची धारणासुध्दा पंचतन्मात्रांनी युक्त असल्याने जेव्हां आपण अशा अवतारी परंपरेतील सत्पुरुषांच्या दर्शनाचा लाभ जोडतो तेव्हां त्यांच्या ठायी ब्रह्मरुपाने जो तन्मात्रगुण होता तो गुण आपल्या देहिक अवस्थेतील तन्मात्राच्या ठायी जर धारण झाला तर जे देहिक अवस्थेतील तन्मात्र आहे ते ब्रह्मरुप होते. देहिक अवस्थेतील एक तन्मात्र हे जेव्हा ब्रह्मरुप होते तेव्हा ते देहिक अवस्थेतील बाकीच्या चार तन्मात्रांनाही ब्रह्मरुप करीत असते व काही एक दीर्घ जपतप साधन न करता आपणास साधक-सिध्द-साध्य ह्या अवस्था सुलभपणे प्राप्त होतात. अशी ही अवस्था ज्या गुरुंना प्राप्त झाली आहे, अशांच्याच गुरुभेटीचा लाभ पूर्वपुण्याईने जर इहजन्मात झाला तर प्राप्त झालेले इहलोकीचे जीवन याचे सार्थक होत असते व ज्या जीवनाचे सार्थक इतक्या शास्त्रशुध्दपध्दतीने झाले असेल तोच साधक इहजगतात लोककल्याण करु शकतो. अन्यथा लोककल्याण होण्याऐवजी लोकसंग्रह करणे म्हणजेच लोककल्याण असा प्रचार समाजात रुढ होतो.

आपण भक्तांच्या ठायी असलेली तन्मात्रे ही देहिक-आत्मिक अवस्थेत होती. माझ्या माध्यमातही तीच तन्मात्रे आहेत. पण गेली चार तपे श्री सद्गुरुंच्या कृपाशिर्वादास पात्र झाल्याने ती पाचही तन्मात्रे ब्रह्मरुप झाली. असा लाभ आपण भक्तास माझ्याप्रमाणे व्हावा म्हणून शिरोडा-गोवा येथे आठ साधना संमेलने घेण्यात आली. पहित्या दोन संमेलनात मी आपणाकरवी सामुदायिक सााधना करवून घेत होतो व मुलाखतीचा लाभ करुन देत होतो. अशावेळी माझ्या वाणी माध्यमातून जे ब्रह्म आपण श्रवण करते झालात, त्या श्रवण केलेल्या शब्दमाध्यमातून आपल्या नकळत आपले शब्दतन्मात्र हे देहिक-आत्मिक अवस्थेत न राहता ब्रम्हस्वरुप झाले व पुढे जी संमेलने होत गेली त्या संमेलनांचा सोहळा हा ब्रह्मानंदात आपण भक्त अनुभवते तर झालातच, पण त्याचबरोबर राहिलेली चार तन्मात्रेही ब्रह्मस्वरुप झाली. प्राप्त झालेला देह हा पंचतत्वांनी  (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) धारण झाला असून तन्मात्रे ही अति सूक्ष्म अवस्था आहे. जेव्हा लोककल्याणार्थ, गुरुंना एखादे साधन सिध्द करावयाचे असते अशावेळी भक्तांच्या माध्यमांचा सदुपयोग करावा लागतो. अशा वेळी आवाहनित झालेली शक्ति ही सूक्ष्मात सूक्ष्म असल्याने भक्तगणांच्या देहिक माध्यमातील तन्मात्रे ही जागृतावस्थेत असावी लागतात, तरच ती शक्ती साधनेच्या सिध्दतेसाठी धारण होत असते. आपण भक्तांची अशी माध्यमे जेव्हा तयार झाली तेव्हाच लयशक्तीस आवाहन करुन आपण भक्तांच्या माध्यमात त्या शक्तीची धारणा करण्यात आली. आठव्या संमेलनास आपण भक्त लयशक्ति म्हणजे ब्रह्मशक्ति ही धारण करुन जेव्हां उपस्थित राहिलात तेव्हा शिरोडा येथे आपण सर्व भक्तांच्या माध्यमातील शक्ति ही एकरुप करुन त्या शक्तीचे ‘शक्तीपीठ’ आवाहन केले व आपल्या माध्यमातील धारण झालेली शक्ति ही या शक्तिपीठात अंतर्भूत केली. आता भविष्यात लोककल्याणाचे हे कार्य सोप्या व सुलभपध्दतीने होण्यासाठी सोप्यात सोपे असे शक्तिपीठाचे कार्य हे यापूर्वी निवेदन केल्याप्रमाणे केवळ प्रार्थना माध्यमातून म्हणजे आपल्या ठायी जे ‘शब्दतन्मात्र’ आहे त्या शब्दतन्मात्रातून होणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून आपण भक्तांना कार्यकेंद्रावर उपस्थित राहून पंचमी, एकादशी, पौर्णिमा व अमावस्या ह्या दिवशी ‘अनुष्ठान’ करण्याची आज्ञा झाली होती व त्याप्रमाणे आपण जरी करीत होतात तरी हे अनुष्ठान याच दिवशी करण्याचे महत्व काय आहे व ते देवाप्रीत्यर्थ आहे की, स्वत:प्रीत्यर्थ आहे हे काही आपण भक्तांच्या लक्षात आले असावे असे मला वाटत नाही. साधारपणे पंचमी, एकादशी, पौर्णिमा व अमावस्या म्हटले की आपले लक्ष तिथीवाराकडे जाते. वास्तविक ही साधना देवाप्रीत्यर्थ नसून आपण भक्तांना प्राप्त झालेल्या अवस्थेत आपण काया, वाचा, मनाने किती एकरुप झालेले आहात याचे अनुमान अनुभविण्यासाठी हे दिवस श्रीगुरुंनी ठरविले आहेत. “पंचमी” म्हणजे शुध्द किंवा वद्य पक्षातील पाचवा दिवस असा अर्थ नाही. पंचमी म्हणजे, आपले देहिक माध्यम ज्याची धारणा पंचतत्वांनी (पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश) झाली आहे, त्यांच्याशी ह्या दिवशीचे अनुष्ठान हितसंबंधीत आहे. अशा पाच तत्वांनी जरी आपण ह्या देहाची धारणा करुन घेतो तरी ही पाच तत्वे निसर्गाच्या प्रमाणात नसतात. त्यामुळे आपण आपले जीवन व्यतीत करीत असताना ते समतोलपणे व्यतीत होत नाही म्हणून प्रथमत: साधनामार्गारंभी ही पांच तत्वे जी विषम प्रमाणात असतात, अशांना कृपाशिर्वादाने निसर्गाप्रमाणे समतोलपणा प्राप्त करुन दिला जातो. त्यामुळे देहिक माध्यमातून जी काही क्रियाकर्मे घडतात याबद्दल आपण निराश न होता आनंदी असतो. अशी जी अवस्था श्रीगुरुंनी साधनारंभी प्राप्त करुन दिली आहे त्या प्राप्त अवस्थेत काही विषमता निर्माण झाली आहे काय याचा शोध पंचमीच्या दिवशी करण्यात येत असलेल्या अनुष्ठानातून अनुभवायचा आहे. साधनामार्गात प्रथमत: प्राधान्य हे पंचभौतिक देहिक माध्ममाला असते. जर यदाकदाचित ह्या पंचतत्वात विषमता असेल तर जरी कोणतेही साधन आपण करते झालात तरी त्या साधनेत आपण एकरुपत्व प्राप्त करते होत नाही. म्हणून पंचमीच्या अनुष्ठानात आपल्या ह्या पंचभौतिक देहातील तत्वात अगतिक विचार, विकारपरत्वे विषमता निर्माण झाली आहे काय याचा आढावा अनुष्ठानापूर्वीच्या व्यतीत झालेल्या दिवसातून काढावा.

एकादशीस जे अनुष्ठान आपण करता त्या दिवशी पंचभौतिक देहातील पंचकर्मेंद्रिये, पंचज्ञानेंद्रिये व बुद्धी यांचा जो इष्ट विकास गुरुकृपाशिर्वादाने झाला आहे त्या माध्यमात काही कमी-अधिकता झाली आहे काय हे अनुभवायचे आहे. त्याची अनुभवसिध्दपध्दती अशी की अनुष्ठानास उपस्थित राहिल्यावर किंवा तत्पूर्वीच्या काळात सुविचाराबद्दल विचारांची किती प्रगती झाली आहे व अविचारांची किती वाढ झाली आहे, हे अनुभवित असताना जर सुविचारांचे प्रमाण अधिक असेल तर विकसित अवस्थेत आपण वृध्दी करीत आहोत. म्हणजे गुरुकृपाशिर्वादात आपण अधिक काळ जीवन व्यतीत करीत आहोत असे अनुभवास येते.

पौर्णिमा किंवा अमावस्या ह्या दिवशी देहातील अतिसूक्ष्म तत्वे म्हणजे पंचतन्मात्रे, पंचप्राणकोश, बुद्धी, मन, चित्त, अहंकार व आत्मा आदिंचा समावेश ह्या साधनेत असतो. आज प्राप्त झालेल्या अवस्थेपरत्वे श्रीगुरुंनी कृपावंत होऊन देहिक-आत्मिक अवस्थांचे एकरुपत्व आनंदमय कोशाशी करुन दिले असल्याने त्या आनंदमय तत्वाच्या ठिकाणी श्रीगुरुंचा सदैव वास असतो. ह्या दिवशी अनुष्ठान करीत असता पंचमी किंवा एकादशीपेक्षा अधिक एकाग्रता व्हावयास पाहिजे. ती जर झाली नाही तर त्याला कारण वरील दोन दिवशी जी देहिक माध्यमे अनुष्ठानाव्यतिरीक्त इतरवेळी आपण गैरवापरात आणतो असा ह्या माध्यमांचा जर गैरवापर झाला असेल तर पौर्णिमा किंवा अमावस्या ह्या दिवशी आपण इतर दिवसांपेक्षा जे अधिक एकाग्र व्हावयास पाहिजे ते होत नाही. यासाठी पंचमीपासून पौर्णिमा किंवा अमावस्येपर्यंत आपल्या ज्ञान-अज्ञानाने प्राप्त जीवनाचा गैरवापर विचार, आचार, विकारपरत्वे काय केला आहे याचा आढावा घेऊन अनुमानपध्दतीने आपल्या नकळत होणाऱ्या ह्या चुका आपण आता सुधारल्या पाहिजेत. यापूर्वीच्या जीवनात आपण भक्तगणांच्या कुटुंबपरंपरेने किंवा जन्मकर्मपरत्वे जे दोष देहाबाहेर होते ते आपल्याला आपल्या सामर्थ्याने निवारण करता येणे शक्य नव्हते, म्हणून श्रीगुरुंनी कृपावंत होऊन ते दोष निवारण केले. पण जे दोष देहात आहेत म्हणजे ‘पडिले वळण इंद्रिया सकळा’ असे दोष निवारण करण्याचे कार्य हे गुरुंचे नसून ते आपण भक्तांचे आहे. अशा दोषांची जाणीव आपणास इतरांनी करुन दिली, तरी आपण त्याकडे दुलáक्ष करतो. म्हणून गुरुआज्ञेने पंचमी, एकादशी, पौर्णिïमा किंवा अमावस्या ह्या दिवशी आपल्याला प्राप्त झालेल्या अवस्थेप्रीत्यर्थ आपणास काय दक्षता घ्यावयची आहे ही जाणीव होण्यासाठी आपणास ह्या दिवशी अनुष्ठान करावयाची आज्ञा दिली होती.

श्रीगुरु व जो भक्त अडी-अडचणीमुळे गुरुंना भेटावयास येतो ही जी भेट ह्या जन्मात अडचणीपरत्वे घडविली जाते हा भेटीचा योग पूर्वीच्या अनेक जन्मपरत्वे आलेला असतो. जर आपण अडचणीत आलो नाही तर त्या अडचणी निवारणार्थ आपण गुरुमार्गी होणार नाही किंवा देवदेवतांची पूजा, आराधना करणार नाही. तर सूज्ञ भक्तांनी प्रथमत: गुरुभेट झाल्यावर अडी-अडचणींबद्दल विचार न करता जी गुरुभेट ह्या जन्मात झाली आहे, त्या भेटीचा लाभ प्राप्त जन्मात जास्तीत जास्त इहजन्मासाठी व पुढील अनेक जन्मासाठी कसा करुन घेता येईल याचा जर विचार करुन गुरुंनी सूचित केलेल्या सेवेचा आपण लाभ घेतला तर ज्या सुखाच्या याचनेने आपण गुरुभेटीस आलो ती सुखे आपल्यासमोर हात जोडून उभी आहेत याची प्रचिती आल्याशिवाय रहाणार नाही. हे सूचित करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आजच्या अवस्थेत आपण भक्तांची जीवनमाध्यमे म्हणजे देहिक व आत्मिक याचे एकरुपत्व करुन देऊन श्रीगुरुंनी ह्या जोडल्या गेलेल्या देहिक-आत्मिक अवस्थेच्या ठिकाणी आपले अस्तित्व अनंतकाळासाठी निर्माण करुन दिले असल्याने जीवन व्यतीत करीत असताना जरी अडी-अडचणींचा भास निर्माण झाला तरी त्याबद्दल दु:खी, कष्टी व असमाधानी न राहता त्या ‘अडचणींचे निवारण करण्याचे सामर्थ्य श्रीगुरुंनी द्यावे’ एवढ्याच प्रार्थनेची आता भविष्यात आपल्याला गरज आहे. याचे महत्वाचे कारण असे की हे समितीचे कार्यं जरी प्रारंभिक अवस्थेत एका व्यक्ती माध्यमातून साकार झाले आहे तरी जगताला त्याचा लाभ होण्यासाठी अनेक व्यक्तिमाध्यमे की जी कृपावंत झाली आहेत अशांची भवितव्यात गरज आहे.

आजच्या अवस्थेची प्राप्ती ही आपण भक्तांना सहज व सुलभ अशी झाली असून ह्या अवस्थेच्या प्राप्तीसाठी कोणतेही प्रखर असे साधन किंवा काही बंधनांचा अंगिकार करावा लागला नाही. म्हणजे प्राप्त झालेली अवस्था ही क्षुल्लक आहे असे समजू नये. ह्या अवस्थेच्या प्राप्तीसाठी जरी आपण भक्तांनी लाखो रुपये खर्च केले असते, तरी आजची अवस्था प्राप्त झाली नसती. आज मी गेली चार तपे गुरुमार्गाच्या सेवेत असून गुरु व गुरुमार्गी अशा अनेक  व्यक्तींची कार्ये व जीवने बारकाईने अभ्यासलेली आहेत. ह्या अभ्यासात माझ्या अनुभवास असे आले आहे की गुरुमाध्यमाला ज्या ज्या अवस्था प्राप्त झालेल्या असतात त्या त्या अवस्थांचा लाभ त्यांना आपल्या भक्तगणांना करुन देता येत नाही. फक्त प्राप्त झालेल्या अवस्थेपरत्वे ते कृपाशिर्वाद देण्याचे कार्य करु शकतात. त्यामुळे जरी त्यांचा भक्तगण संख्येने अधिक असला तरी व्यक्तिगत जीवनाव्यतिरीक्त इतरांना सुख-शांती-समाधान देण्याचे कार्य कृपावंत असूनही त्यांना करता येत नाही. यासाठी मी जे ‘कामकाज’ व ‘निराकरण’, आपण भक्तांच्या अडी-अडचणीसाठी करीत होतो, ते कार्य मी गेली काही वर्षे स्थगित करुन गुरुंनी कृपावंत होऊन मला ज्या अवस्थांचा लाभ करुन दिला त्या अवस्था आपण भक्तांच्या जीवनांत साकार करण्यासाठी वेळोवेळी गुरुमार्गदर्शनाप्रमाणे साधनामार्गाचा अवलंब करुन तीच साधना आपण भक्तांच्याही देहिक माध्यमाद्वारे करुन घेतली. अशा अवस्थांची (म्हणजे मला प्राप्त झालेल्या अवस्था) देवाण-घेवाण गुरु व भक्त यामध्ये होण्यासाठी गुरुंचे काया-वाचा-मन जे त्रिगुणात्मक झालेले असते अशी त्रिगुणात्मक अवस्था ही भक्तांना सूचित केलेल्या साधनेतून करुन घ्यावी लागते. अशी त्रिगुणात्मक अवस्था गुरुप्रमाणे शिष्याची व्हावी म्हणून जी गुरु व शिष्य यामध्ये देवाण-घेवाण होते त्यासाठी जे साधन उपयोगात आणावयाचे असते असे साधनही त्रिगुणात्मक असावे लागते. म्हणजे ह्या साधनेमुळे गुरुंना प्राप्त झालेली अवस्था शिष्याच्यां ठायी साधनेच्या स्पंदानी (Vibrations) धारण होते. असे साधन म्हणजे गेली पाच वर्षे आपणाकरवी करविली गेलेली ॐ कार साधना होय.

 अशा ह्या ॐ कार साधनेची दीक्षा मला माझ्या जन्मगावी श्रीभैरवनाथ यांनी प्रथमत: दिली. त्या दीक्षेप्रमाणे मी गेली तीन तपे जरी ही साधना नित्याने करीत होतो, तरी इतरांच्या कल्याणासाठी ह्या ॐ कार साधनेच्या सिध्दतेची आवश्यकता हिची जाणीव झाल्याने हे ॐ कार तत्व सिध्द करण्यासाठी एक वर्षपर्यंत श्री क्षेत्र नरसोबा-वाडी येथे दर पौर्णिमेस उपस्थित राहून अकरा पौर्णिमेस हवनादी विधी केले. ह्या अकरा पौर्णिमेच्या हवनादी विधींची सांगता म्हणून महारुद्र स्वाहाकार करण्यात आल्यावर हे जे ॐ कार तत्व सिध्द झाले त्या तत्वाची दीक्षा आपण भक्तांना  ‘कारण दीक्षा’ म्हणून दिली. ह्या कारण दीक्षेची सिध्दता होऊन ती कारणदीक्षा ही ‘महाकारण अवस्था’ म्हणून आपण भक्तांना त्याचा लाभ व्हावा यासाठी श्रीगणेश देवता की ज्या देवतेचे मूळ आत्मस्वरुप ॐ कारमय आहे म्हणजे अ-उ-म किंवा उत्पत्ती-स्थिती-लय असे आहे त्या देवतेस प्रसन्न करुन घेऊन आपण भक्तांस महाकारण दीक्षेचा लाभ करुन दिला. ह्या दीक्षेपर्यंत आपण भक्तांनी वेळोवेळी ज्या दीक्षा (उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरुदीक्षा, कारणदीक्षा महाकारण दीक्षा) घेतल्या होत्या, त्या दीक्षांचे एकरुपत्व त्रिगुणात्मक शक्तीत करुन ती ॐ कारमय अवस्था बत्तीस शिराळ्यास श्रीगोरक्षनाथ यांचे चरणी समर्पण करुन त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण भक्तांना नाथपंथाचा अनुग्रह प्राप्त करुन दिला. ज्या ज्या अवस्था गुरुंना प्राप्त झालेल्या असतात, त्या अवस्थेचे प्रतीक शिष्याच्या ठायी धारण होणे म्हणजेच ‘अनुग्रह’ होय. केवळ एखादा मंत्र देऊन त्याचे तंत्र उपलब्ध करुन देणे म्हणजे अनुग्रह नव्हे. आजच्या अवस्थेपर्यंतचा हा गुरुमार्गातील आपला प्रवास म्हणजे आपले जे आत्मिक तत्व त्या आत्मिक तत्वाचा वास गुरुचरणी लीन झाला असून ते साकार होऊन आता निराकार झाले आहे. अशा अवस्थेचे कार्य भवितव्यात जगत्कल्याणासाठी भक्तगणांकडून व्हावे म्हणून गुरुंना प्राप्त झालेल्या अवस्था भक्तांत साकार करण्यासाठी साधनपध्दतीने भक्तांच्या ठायी गुरुंच्या अवस्थेंचा जो आविष्कार व्हावयास पाहिजे, यासाठी भक्तमाध्यमाला एकाच साधनमाध्यमातून साधना करावयास सूचित करावे लागते. अशावेळी ही साधना अन्नमय कोशापासून म्हणजे नाभीस्थानातून सुरुवात करुन आनंदमय कोशापर्यंत म्हणजे, ब्रह्मरंध्रांपर्यंत नेऊन त्या सूचित केलेल्या साधनेचे पूर्णत्व भक्तांच्या ब्रह्मरंध्रांत करावे लागते. क्रमश: या अवस्थेपरत्वे जेव्हा तुम्हा भक्तगणांच्या देहिक माध्यमातून ही साधना ब्रह्मरंध्रांत लय अवस्था म्हणजे पूर्णत्व प्राप्त करती होते त्या अवस्थेस ‘सहस्त्रदलकमलाचा उदय’ झाला असे म्हणतात. पण दत्त, नाथ व सुफी पंथाप्रमाणे ह्या अवस्थेची प्राप्ती म्हणजे देहिक व आत्मिक अशा दोन शक्तीचे एकरुपत्व गुरुशक्तिच्या ठिकाणी होऊन ह्या त्रिगुणात्मक शक्तीला प्रतीक म्हणून ब्रह्मरंध्राच्या ठायी धारण करुन द्यावे लागते. अशा अवस्थेची प्राप्ती जी आज आपणास झाली आहे ती कृपाशिर्वादाचे शक्तीपीठ म्हणून आज आपल्या काया-वाचा-मनाच्या माध्यमातून इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणार आहे. अशावेळी ज्या काया-वाचा-मनाचे एकरुपत्व शक्तीपीठाच्या ठायी झाले आहे तो गुरुकृपाशिर्वाद होय. ह्या शक्तीचे स्पंद (लहरी) आपण भक्तांच्या वाचेतून यापुढे बाहेर पडणार आहेत. यासाठी जी प्रार्थना आपण यापुढे नित्याने म्हणणार आहात, ती प्रार्थना ही एक केवळ शाब्दिक म्हणून आपल्या वाणीद्वारा उच्चारली जाणार नसून जेव्हा आपण हा इतरांच्या कल्याणासाठी शास्त्र, शस्त्र व अस्त्र म्हणून आसमंतातील वातावरणात कार्यान्वित होऊन आज जे वातावरण गैर अशा विचारपरत्वे दूषित झाले आहे ते शुध्द होऊन प्रत्येकास परमेश्वराने बुध्दीची अमोल ठेव दिली असूनही व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे निर्माण होणारा हा बुध्दीमाध्यमातील अविचारांचा दोष आपण नित्याने म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनेतून निवारण होणार आहे. भवितव्यातील हे महान कार्य श्रीगुरुंनी किती सोपे व सुलभ करुन दिले आहे याचा भक्तांनी सूज्ञपणे विचार करावा.

आपण भक्तांवर ही प्रार्थना इतरांच्या कल्याणार्थ म्हणावयाची जबाबदारी टाकली आहे ती पार पाडीत असताना कोणत्याही कारणास्तव आपले काया-वाचा-मन हे अशांत, असमाधानी कोणत्याही विकाराच्या आहारी गेलेले, असता कामा नये. आजपर्यंत आपण भक्तांनी श्रध्दा, भक्तीने अनेक गुरुपौर्णिमा साजऱ्या करुन श्रीगुरुंना गुरुदक्षिणा दिली असेल पण ज्या गुरुंची सत्ता ह्या त्रिभूवनावर असते अशांना जी काही गुरुदक्षिणा आपण समर्पण करता ती गुरुदक्षिणा नसून ते एक आपल्या भक्तीभावनेचे प्रतीक आहे. खरी गुरुदक्षिणा आता आपणास द्यावयाची आहे. कारण प्राप्त जन्म व पुढे येणारे जन्म याचे सार्थक करुन घेण्याचे सामर्थ्य कोणाही मानवाला कोणत्याही जन्मात प्राप्त होणे शक्य नाही. ते केवळ आपण गुरुंना शरण गेल्यामुळे प्राप्त झाले आहे. यापुढील जीवनात गुरुआज्ञेचे पालन करणे एवढेच व्रत भवितव्यासाठी आपण भक्तांना करावयाचे आहे व त्याची पूर्तता आपण भक्तांनी जर केलीत तरच गुरुंनी आपल्या कल्याणार्थ जे केले आहे त्याचा प्रतिसाद म्हणून आपण  गुरुपूजन करुन गुरुदक्षिणा देणार आहात. हीच अपेक्षा भवितव्यासाठी ठेवून आठव्या संमेलनात मी आपण भक्तांना असे सूचित केले की, या पुढे आपण माझी व्यक्ती म्हणून पूजन न करता माझ्या माध्यमातून ज्या शक्तीने आपल्या जीवनांस आकार व साकार अशा अवस्था प्राप्त करु दिल्या आहेत त्या शक्तीची मनोभावनेने, श्रध्दा, भक्तिने, पूजा करा. म्हणजे याबद्दल जास्तीत जास्त पूज्यभाव निर्माण करा. हीच माझी आपण भक्तांनी दिलेली ‘गुरुदक्षिणा’ आहे !

आपण भक्तांच्या कुटुंबात जो माझा फोटो आपण भक्तांनी भक्तीभावनेने पूजनार्थ ठेवला आहे याबद्दल मला आजपर्यंत कधीच धन्यता वाटली नाही. त्याचप्रमाणे अनेक भक्तांनी आपल्या घरी बोलावून ‘गुरु’ म्हणून आदरातिथ्यही भरपूर केले आहे. पण याबद्दल आपण भक्तांना जरी समाधान झाले असले तरी याबद्दल मला कधीच समाधान वाटले नाही. याचे कारण आपण जेव्हा या कार्याकडे मार्गदर्शनार्थ आलात व जेव्हा आपल्या ऐहिक गरजांचे प्रश्न माझ्या माध्यमातून सोडविले गेले तेव्हाच आपण भक्तांनी माझ्या फोटोचा स्वीकार पूजनार्थ केलात. हे सर्व ऐहिक सुख जर मी आपणास प्राप्त करुन दिले नसते तर आपण माझा फोटो पूजनार्थ ठेवला असता काय ? असा प्रश्म मी स्वत:ला विचारीत असतो. आपण भक्तांच्या ज्या काही अपेक्षा माझ्याकडून पुऱ्या व्हाव्यात म्हणून आपण मला भेटावयास आलात तशा माझ्याही काही अपेक्षा आपण भक्तांकडून पुऱ्या व्हाव्यात अशी माझी इच्छा होती व आहे. वेळोवेळीच्या गाठीभेटीत व प्रत्येक संमेलनात आपण माझे गुणगान गाईले आहे. हे सर्व मी ऐकले असून मी जे काही आपण भक्तांच्या बाबतीत केले आहे त्या कारणास्तव मी आज जन्म घेता झालो नाही. माझ्या जन्माचे कारण जे गुरुकृपेने आपली सेवा करण्याचे कर्तव्य म्हणून आहे त्यात महत्वाचे कारण असे आहे की माझ्याचप्रमाणे आपला प्राप्त जन्म हा सत्कारणी लागावा. आपल्याला किती ऐहिक सुख प्राप्त झाले व कोणकोणत्या संकटाचे गुरुकृपाशिर्वादाने निरसन झाले याबद्दल मला धन्यता वाटली नाही. याचे कारण ज्या व्यक्तिमाध्यमाला जन्माला येऊन ईश्वराचे कार्य करावयाचे असते अशा व्यक्तिमाध्यमाचे सामर्थ्य दगडाला देव करण्याचे असते. तेव्हा जे ऐहिक सुख आपण गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त करते झालात व प्राप्त झालेल्या सुखाबद्दल माझी महती आपण गाईलीत यापेक्षा आपली पारमार्थिक प्रगती किती झाली आहे, याबद्दल जर काही निवेदन आपण केले असते तर मी जे कर्तव्य आपण भक्तांच्याबाबतीत केले त्याबद्दल मला समाधान झाले असते. याचा स्पष्ट खुलासा म्हणजे असा की गुरुमार्गदर्शनार्थ आपण येण्यापूर्वी आपले काया-वाचा-मन हे पूर्णत: षड्विकारांच्या आधीन होते. देहिक अवस्थेचा विकास न होण्याने हे आपले जीवन विकारमय अवस्थेत होते, कृपाशिर्वाद प्राप्तीनंतर कोणकोणत्या विकारांची प्रखरता कमी झाली आहे व जे आपण विकारमय होतो तेच जीवन गुरुकृपाशिर्वादाने किती विचारमय झाले याचा जर आढावा आपण घेतलात तर ही जी स्थित्यंतर अवस्था आपल्याला कृपाशिर्वादाने प्राप्त झाली ती स्थित्यंतरे कृपाशिर्वादाच्या अभावी आपल्या जीवनांत अंतापर्यंत आपल्याला करता आली नसती हा बोध आपल्याला होईल.

दुसरा महत्वाचा बोध माझ्या साधनसेवेच्या हितसंबंधात सांगावयाचा म्हणजे आजपर्यंत जगामध्ये मानवी कल्याणार्थ जे सिध्दसाधक अशा प्रकारचे कार्य गुरुआज्ञेने अंगिकारते झाले व त्यांनी लोककल्याणाची सेवा जरी केली तरी हे कार्य व्यक्तिगत स्वरुपाचे होऊन त्यांच्या पश्चात् त्यांच्या ह्रया कार्याचा अस्त झाला. पण माझी तळमळीची अशी इच्छा आहे कीं, आपण प्राप्त केलेली ही गुरुकृपाशिर्वादाची ही साधने आपल्या हयातीतच कार्यान्वित होऊन आपल्या पश्चात् या सिध्दसिध्दांतपध्दतीचा अस्त होऊ नये म्हणून ही सर्व साधने मी गेल्या वर्षात सिध्दस्वरुपामध्ये सिध्द करुन गुरुपौर्णिमेस योग्य अशा सेवकांच्या ठिकाणी ती परंपरेने कार्यान्वित व्हावीत म्हणून गुरुआज्ञेने एकरुप केली. आज माझ्या अनुपस्थितीत जे सेवक कार्यकेंद्रावर मार्गदर्शन करीत आहेत, त्यांच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी ही पूर्णत: संकुचित आहे. त्यामुळे मी माझ्या आत्मविश्वासाने व आत्मप्रचीतीने, हे सेवक जरी सिध्दावस्थेप्रत आहेत व आपली ऐहिक विषयापरत्वे असलेली दु:खे निवारण करु शकतात असा जरी आत्मविश्वास ठेवला, तरी गुरुमार्गाच्या परंपरेप्रमाणे तुम्हा भक्तांची श्रध्दा ही व्यक्तीपूजनाचा विषय असल्याने, आपली दु:खे केवळ वं. दादांच्याच आशिर्वादाने निवारण होतात, अशी श्रध्दा जी आहे, ती यापुढे विचारात न घेता, जो  नियुक्त सेवक कार्यकेंद्रावर कार्य करतो आहे त्यांची नियुक्ती ही त्यांच्या इच्छेप्रमाणे  झाली नसून ते गुरुआज्ञेचेच एक प्रतीक आहे, अशी श्रध्दा व विश्वास जर निर्माण कराल तर आपली विषयपरत्वे आलेली दु:खे निवारण करण्यासाठी माझी बहुमोल अशी शक्ति व्यर्थ खर्च न होता  ती शक्ति आपल्या प्राप्त जन्माचे सार्थक करण्यासाठी मला उपयोगात आणता येईल.

गुरुमार्गात जीवनाची सार्थकता होण्यासाठी नामस्मरण विधी, दीक्षांत विधी, अनुग्रह विधी हे अनेकवार व अनेक ठिकाणी देण्यात येतात. ते आपण घेता किंवा ऐकता. पण जीवनाचे सार्थक होणे हा विषय इतका सहजासहजी प्राप्त करण्याइतका सोपा व सुलभ नाही. ज्याला त्याबद्दलची तळमळ लागली आहे, त्याच्याही सामर्थ्यापलीकडील हा विषय असल्याने, जर भक्तांच्या कल्याणार्थ गुरुमाध्यम हे आपले तन, मन, धन व काया, वाचा, मन हे पूर्णत: श्रीगुरुंना समर्पित करील, तरच त्याचे योग्य फल तुम्हां भक्तांच्या कल्याणार्थ आहे, याची प्रचीती किंवा अनुभव हा उदयास येईल. अन्यथा आपण भक्त गुरुमार्गी झाला आहात, म्हणून उच्च विषयांतील शब्दांचा शब्दोच्चार करणे व आपण तो ऐकणे या पलीकडे आपण भक्तांचा उध्दार होऊ शकत नाही.

आजपर्यंत आपण भक्तांची केलेली सेवा हे या जन्माचे सार्थक ह्याच जन्मी मला अनुभविण्यास मिळाले. यापेक्षा अधिक मोठे सुख, समाधान व शांती मी मानीत नाही. आजपर्यंत आपल्या सेवेत माझ्या हातून ज्ञानाने-अज्ञानाने चांगलेही झाले असेल वाईटही झाले असेल पण जे चांगले म्हणून आपल्या वाट्याला आले त्याचा स्वीकार आपण करुन वाईट घडले असेल हे सर्व विसरुन जावे. बाल्यावस्थेपासून ते आज दिवसापर्यंत आपल्याप्रमाणे असणारे माझे पंचभौतिक देहिकमाध्यम हे काया, वाचा, मनाने परिपूर्ण गुरुमय झाले असल्याने स्वाभाविकच गुरुमायेचा हात मी आपणा सर्वांच्यावर आत्मिक विचाराने व आत्मिक सद्भावनेने जरी फिरवत आलो तरीसुध्दा तुम्हां भक्तांची देहिक अवस्था ऐहिक विषयापलीकडे नसल्याने हे माझे प्रेम कीं जे तुमच्या जन्मदात्या आईवडीलांच्यापलीकडे होते त्याला तुम्ही जाणते झाला नाहीत. आजपर्यंतच्या व्यतीत झालेल्या जीवनांत मी श्रीसद्गुरुंना जर कृपाशिर्वादाशिवाय कांहीही मागितले नाही, तर तुम्हा भक्तांच्याकडे काही अपेक्षा पूर्ततेसाठी मी यावे हे मला शोभणारे नाही व तशी अपेक्षा श्रीसद्गुरुकृपाशिवादाने मला करण्याची वेळही आलेली नाही.

ह्या वर्षात गुरुआज्ञेने मला करावी लागलेली साधना व तिचा सिध्दसाध्य हेतू मी आपण भक्तांच्या अभ्यासाने निवेदन केला आहे. याचा आस्थेने विचार करुन हे कार्य ‘दादांचे आहे’ असे न मानता ‘आपणा सर्वांचे’ आहे अशी भूमिका विचारात घेऊन आपल्या यथाज्ञानाने व यथासामर्थ्याने हे कार्य जर पुढे करण्याचे भाग्य आपण प्राप्त करुन घेतलेत तरच मला प्राप्त झालेल्या जन्माचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

साधना मार्गामध्ये अवधान, ध्यान व चिंतन ह्या तीन महत्वाच्या अवस्था आहेत. त्यांची ओळख पुढीलप्रमाणे आहे :-

अवधान अवस्था :- गुरुमार्गात ही  अवस्था प्राप्त होणे दुर्मिळ आहे. कारण जन्म घेतल्यावर कर्माची उपाधी मागे लागते व ह्या कर्मबंधानातून सुटका व्हावी म्हणून आपण गुरुमार्गी होतो. अशावेळी सुखाची प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा न ठेवता गुरुंची प्राप्ती केव्हा होईल असा घ्यास लागला पाहिजे. नुसते खाणेपिणे, कपडालत्ता, ऐषराम आदीनी जीवन व्यर्थ खर्च न होता जीवनास निश्चित आकार यावयास पाहिजे. तो आकार गुरु देत असतात. गुरुमार्गात ‘गुराखी’ व ‘गुरु’ हे दोन शब्द आहेत. एक फक्त गुरे राखतो व दुसरा मार्ग ! जन्माला येऊन तो जन्म वाया जाऊ नये तर इतरांना त्याचा उपयोग व्हावा या तळमळीने जे वाट दाखवितात त्यांना ‘गुरु’ असे म्हणतात. ह्या गुरुंनी स्वत:चे जीवन, तन-मन-धन भक्तांसाठी खर्च केले पाहिजे. ज्या अडचणी भक्तांच्या जीवनामध्ये उपस्थित होतात्l त्या न सांगता त्या अडचणींना कारण   असणा-या कर्माचे विमोचन करुन त्या भक्ताला अभयदान द्यावे लागते. नुसते दु:खाचे निवारण हे रस्त्यावर बसणारे ज्योतिषीसुध्दा सांगू शकतात. अशावेळी जरी भक्ताची पातळी अज्ञानाची असते तरी त्या भक्तास सखोल ज्ञानाचा लाभ करुन देणे हे महत्वाचे कर्तव्य गुरुंनी विसरता कामा नये. केवळ ऐहिक सुखासाठी जन्म नाही हे दाखवून दिले पाहिजे. मग हळू हळू भक्ताची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागते. तशी ती बदलली पाहिजे. कारण हे जीवन क्षणिक आहे. जे जे काही प्राप्त करावयाचे आहे त्याचा लाभ जन्मोजन्मी असावयास पाहिजे. नुसता लोभ असून चालणार नाही. इहजन्माचे ज्ञान व लोभ आपल्याला होतो तो न वाढविता आपण जसे जसे मार्गात जाऊ तसा तसा लोभ कमी करुन लाभ कसा होईल हा विचार केला पाहिजे. म्हणजे, ‘मी जगात आहे, पण माझे जग इहलोकांत नाही’ असे बोलणे व वागणे म्हणजे ‘अवधान अवस्था’ ! इहलोकांतील कर्तव्ये करीत असता त्यात आपला विषय न राहता फक्त ‘वास’ राहिला पाहिजे. म्हणजे ‘कर्माचा विषय भोगणे न राहता धर्माने कर्माला मुकणे’ ही अवस्था प्राप्त होते. म्हणजेच स्वाभाविक इहजन्मात पुढील जन्म म्हणजे परलोक ह्याला आरंभ होत असतो. अशावेळी आपण जी ॐ कार साधना करतो ह्या अवस्थेत फक्त ‘अ’ हे तत्व सिध्द होते. ‘अ’तत्व म्हणजे विश्वाची उत्पत्ती होय. अशावेळी आपला आत्मा हा जन्म घेतो व गुरुमार्गी झाल्यावर तो आत्मा ॐ काराची ‘अ’ ही अवस्था प्राप्त करता होतो, म्हणून ही साधना करीत असतां शंभर टक्के अवधान ठेवले पाहिजे.

ध्यान अवस्था :- पूर्वी अनेक जन्मांत अनेक कर्मे आपण केली आहेत म्हणून पुन्हा ह्या जन्मी जन्म घेतला आहे. पण त्या जन्माची स्मृती आपल्याला नाही, म्हणून पुन्हा पुन्हा तेच पातक किंवा प्रमाद आपल्या हातून घडत असतात व पुन्हा पुन्हा सुखाचा लोभ वाढत असतो, म्हणून पुन्हा जन्म ! हे रहाट गाडगे चालू असते. पण कोणत्या तरी जन्मात आपण काही पुण्य कर्म निश्चित केले आहे. त्या कर्माची फेड म्हणून ते कर्म आपल्याला गुरुमार्गी करते. पण त्यावेळी गुरुंची आठवण होत नाही. म्हणून एखादे संकट आपल्या जीवनांत निर्माण होते. त्यावेळी आपल्याला सुख कसे लागेल म्हणून आपण गुरुंना भेटतो. वास्तविक ते दु:ख नसते तर आपल्याला जागे करुन आपण जाग्यावर यावे म्हणून कर्माने आपल्यावर उपकार केलेले असतात. त्यावेळी पुनश्च तशी कर्मे आपल्या हातून घडू नयेत म्हणून श्रीगुरु वंशाचे व कर्माचे विमोचन करुन त्या ऐवजी दीक्षा देत असतात. वास्तविक वंशात व कर्मात जे काही दोष असतात ते दोष जाऊन जीवन निर्दोष व्हावे अशी गुरुंची इच्छा असते व पुढील जन्माची तरतूद ते करुन देत असतात. पण आपण आपल्या सभोवार जे जग दिसते तसे जीवन आपण उपभोगावे म्हणून विमोचनाला व दीक्षेला किंमत देत नाही. पण ज्यावेळी ही जाणीव होईल तेव्हा त्याचे मूल्य काय आहे हे कळेल. हा जन्म वारंवार येत नसतो. पुन्हा जन्माला येण्यासाठी काही शेकडो वर्षे लागतात. म्हणून ज्ञानी पुरुषांनी जीवन व्यर्थ खर्च करु नका असे वारंवार सांगितले आहे. ह्या जीवनाचा आपण उपभोग घेऊन इतरांना त्याचा उपयोग व्हावा याकडे लक्ष द्यावे. वास्तविक जन्माला येते वेळी हे जीवन ‘वना’सारखे होते. गुरु भेटल्यावर त्याचे नंदनवन झाले. हा धर्म गुरुंचा आहे. आपण कर्माधीन आहोत म्हणून गुरुंनी काय दिले आहे हा प्रश्न आपल्यापुढे उभा असतो. ज्यावेळी कर्माधीन अवस्था सुरु होते व जीवन इतरांसाठी आहे ह्याचा बोध होतो, म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येऊन कर्माधीन होण्यापेक्षा जन्म घ्यावयाचा आहे पण गुरुकृपेने धर्मासाठी हेच वचन आपण पाळले पाहिजे. एखादेवेळी आपले जेवण विसरले तरी चालेल कारण त्यापेक्षा जीवन अधिक मोलाचे आहे असा ध्यास लागला पाहिजे. आपण जी ॐ कार साधना करीत असतो त्या साधनेत जी अवस्था ‘उ’ अशी आहे तिची प्राप्ती ध्यान अवस्थेमध्ये होते. आता गुरुंपाशी आपण काही मागायचे नसून आपला जन्म जो व्यर्थ गेला असता तो गुरुकृपेने अर्थपूर्ण झाला आहे, तेव्हा ह्या जन्माची दक्षिणा गुरुंना द्यावयाची आहे. ही दक्षिणा म्हणजे आपण दक्ष राहणे हे आपल्या हिताचे आहे. जो वंश जन्माला येतो तो वंश न राहता आता गुरु अंश बनला आहे. म्हणून भवितव्यामध्ये संतती ही अवस्था प्राप्त न करता ‘संपत्ती’ म्हणून जन्म घ्यावयाचा आहे. याचा अर्थ न संपणारी संपत्ती असा कृपाशिर्वाद गुरु देतात.

चिंतन अवस्था:- ही अवस्था काय आहे हे ज्ञानी माणसालासुध्दा समजत नाही. इहलोकांत जन्माला येणे म्हणजे भाग्यवान होणे असा अर्थ आहे. त्रिभुवनात इहलोकांइतका श्रेष्ठ जन्म नाही. कारण जीवाला आपला विकास जन्म झाल्यावर करता येतो. अन्यथा दुसरे लोक हे नुसते जिवंत आहेत. त्याठिकाणी जीव जरी धारण होतो तरी उत्क्रांती इहलोकात होत असते. ह्याला शास्त्रीय कारण असे की, ह्या सृष्टीवर पाचही तत्वे आहेत. जीवाची धारणा होण्यासाठी देह पाहिजे व तो देह पांच तत्वांनी तयार होतो. देह + जीव = जीवन असा अर्थ आहे. हा जीव जेव्हा जन्माला येतो त्यावेळी देह हा नव्याने धारण होतो. पण जीव, जीवात्मा किंवा आत्मा हा पूर्वीचाच असतो. असे जीवन जीवाने भोगलेले असते पण त्याचा लाभ देहाला होत नाही. म्हणून जन्म प्राप्तीनंतर देहाला लोभ असतो व जीवाला किंवा आत्म्याला लाभ कसा होईल ह्याबद्दल चिंता असते. म्हणजे पर्यायाने हे द्वैत चालू असते. जर गुरु भेटले नाहीत तर ‘चिंता’ करुन ‘शेवट गोड करी दत्ता’ याच्या ऐवजी  ‘चिता’ हे क्रमप्राप्त आहे. तेव्हा गुरुमार्गात हे द्वैत जाऊन अद्वैताचे ज्ञान झाले पाहिजे. जीवन हे क्षणिक आहे. म्हणून कोणत्या सुखाचा ध्यास लागला आहे हा प्रश्न स्वत:ला विचारुन पहा. मग सुखाचा ध्यास लागण्यापेक्षा ‘सुखाचा घास’ हे सुख गुरु देतात. ‘शेवटी जीवन गोड व्हावे’, असा आशिर्वाद मागणे आपले कर्तव्य आहे. ते सोडून आपल्याला ‘जैसी करणी वैसी भरणी’ असे जीवन प्राप्त होते. जन्माला आल्यावर सभोवार आपले आप्त व सोयरे जवळीक साधतात व शेवटी आपल्याला त्यांना सोडावे लागते, कारण परलोकांमध्ये कोणीही आपले नाही. म्हणून श्रीपंतांच्या पदात ‘एकलासि येणे, एकलासि जाणे’, हा बोध केला आहे व ‘गुरुमार्ग हा भला’ असे सांगितले आहे. परलोकात आत्म्याला देह नाही. फक्त देहालाच आपली व इतरांची ओळख असते. अशावेळी परलोकात फक्त आत्मा व त्याचे कर्म अस्तित्वात असते. जर सत्कर्म केले असेल तर ते बरोबर परलोकांत येते. बाकीचे वासनारुपी कर्म इहलोकात असते. ते वासनारुपी कर्म इहलोकात आहे म्हणून जन्म. जेव्हा सत्कर्म घेऊन आपण जाऊ त्यावेळी आपल्याला पुनर्जन्म येईल. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा चिंतन अवस्था ! म्हणजे पूर्वीच्या अनेक जन्मात आपण जन्माची उतराई होत नाही ती व्हावी म्हणून चिंतन ! ‘चि’ म्हणजे चिरंजीव व ‘तन’ म्हणजे कारण देहाची प्राप्ती. असा आशिर्वाद गुरुंकडून घेऊन परलोकांवरती हा आत्म्याचा प्रवास सुरु होतो. चिंता व चिता असे जीवन न राहून चिंतन म्हणजे आत्म्याचे कार्य, दया-क्षमा-शांती ही त्रिपुटी ज्याच्या आचारात व विचारात अनुभवास येते तो आत्मा, परमात्मा होतो. एवढी तरतूद केल्यावर श्रीपंतांचा बोध आहे, “साधनसेवा काहीच नसता, दावियले निजधाम” असे जीवन होते. शेवटी हे चिंतन सदैव असावे. “दया करी श्रीगुरु दत्ता, दुर्गुण काढू मी न शके, क्षमा करी रे अनंता”. ह्या साधनेत अवधान, ध्यान व चिंतन यांची त्रिपुटी झाल्यावर तो साधक ‘सच्चिदानंद’ होतो व त्यानंतर जीवनात देणे व घेणे इत्यादी न राहता ‘लेणे काय आहे ?’ असा प्रश्न ईश्वर साधकाला विचारतो !

श्रीमहाकारण दीक्षा श्रीसद्गुरु कृपावंत होऊन भक्तभाविकांना प्रदान करतात. श्रीमहाकारण दीक्षा ही ‘प्रेरणा’ आहे. ती अवस्था असून कल्पना नाही हे लक्षात घेतले पाहिजे. जगत्कल्याणाच्या कार्यात तळमळ ही आत्म्याला असते व ईश्वराचे सहाय्य प्रेरणा म्हणून मिळत असते. लोककल्याणाचे कार्य करण्यास कल्पना निर्माण करुन चालत नाही. कारण कल्पना हा बुध्दीचा कार्यकारणभाव आहे. बुध्दी जरी प्रेरणा देता झाली तरी मूलत: बुध्दीची धारणा ही कर्मांगाने युक्त असून कर्मपरत्वे बुध्दीला चालना मिळते. म्हणून अशा चालनेला प्रेरणा म्हणता येत नाही. प्रेरणा ही चैतन्ययुक्त असून आत्म्याच्या ठायी तिचा अविष्कार होत असतो

मूळ प्रेरणेची निर्मिती होऊन ती साकार झाली तरी ती प्रेरणा आकारात येण्यासाठी काही शतकांचा काळ जावा लागतो. या काळात जगतावर अवतीर्ण झालेल्या अनेक सत्पुरुषांचा  सहभाग, ह्या प्रेरणेची सिध्दता करण्यासाठी कार्यान्वित होतो. अशा रीतीने जगत्कल्याणासाठी निर्माण झालेली ईश्वराची प्रेरणा हिची सिध्दता अनेक अवतारी पुरुषांच्या तळमळीतून व समर्पित जीवनातून होण्यास जरी काही शतकांचा काळ लागला तरी ती सिध्दावस्थेत गेलेली ईश्वरी प्रेरणा जगाच्या अंतापर्यंत जगत्कल्याणाचे कार्य करीत राहते.

आज सिध्दस्वरुपात आपणास प्राप्त झालेली महाकारण दीक्षा म्हणजेच ही ‘ईश्वरी प्रेरणा’ होय. तिची परंपरा श्री आदिनाथांपासून आहे. श्री आदिनाथांनी नवनारायणांना अनुग्रहित करुन नाथ केले व नवनाथांनी अनाथ जगताला सनाथ व सज्ञान करुन श्रीगहिनीनाथांनी पुढील कार्यासाठी श्री निवृत्तीनाथांना अनुग्रहित केले. ह्या काळापर्यंत पंचाहत्तर टक्के वैराग्य व पंचवीस टक्के भक्ती हे उपासनेचे सूत्र होते. श्रीज्ञानेश्वरांनी मूळ प्रेरणा म्हणजे ईश्वराची इच्छा काय आहे हे जगाला समजावे म्हणून ‘पसायदान’ याचा मंगल शब्दोच्चार केला आणि पन्नास टक्के ज्ञान व पन्नास टक्के भक्ती अशी उपासना पध्दती जगासमोर ठेवली. जे ज्ञान शब्दांनी व्यक्त होते त्यामागे शक्ति उभी असेल तरच ते ज्ञान प्रभावी ठरते व निश्चित असे कार्य करु शकते. म्हणून श्रीज्ञानेश्वरांनी ‘ज्ञान अधिक ईश्वर’ हा सिध्दांत जगताला दिला.

ह्याच परंपरेप्रमाणे आज श्रीसाईनाथ महाराजाांनी भवितव्यासाठी मूळ ईश्वरी प्रेरणेला मूर्त स्वरुप देऊन भूतलावर ईश्वरीशक्ति अधिष्ठित केली. जी शक्तिपीठ प्रार्थना गुरुबंधुभगिनीना दिली आहे, ती प्रार्थना म्हणजे पसायदान होय. जगताला सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे म्हणून मूळ ईश्वरी प्रेरणा ही शब्दरुपांत साकार करुन आपल्यासमोर आज श्रीसद्गुरुंनी ठेवली आहे. आपण भक्तांनी काही याचना न करता किंवा आपल्या ध्यानीमनी नसताना या कृपेची प्राप्ती श्रीगुरुंकडून होते, ती कृपेची ठेव म्हणजेच ‘ईश्वरी प्रेरणा’ होय. ह्या कृपेची प्राप्ती आज आपणास सुलभपणे व केवळ भक्तियुक्त भावनेने केलेल्या श्री सद्गुरुनामस्मरणांतून व्हावी म्हणून कारण, महाकारण व श्रीसाईशक अशा तीन प्रतिमा देण्यात आल्या आहेत. अशा रीतीने सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी विश्वामध्ये व्यक्त झालेली ईश्वरी प्रेरणा आज श्रीगुरुकृपेने साकार होऊन जगतात मानवता युगाचा आविष्कार होण्याची सिध्दता प्राप्त करती झालेली आहे.

आपण भक्तांस गुरुकृपाशिर्वादाने प्राप्त जीवनात जो दीक्षांचा लाभ झाला अशी ही साधक अवस्थेतील अत्यंत अवघड अशी अवस्था प्राप्त होण्यास आम्हा मानवांना प्रखर अशा साधनांच्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. तरीसुध्दा ही अवस्था निश्चितपणे आपण प्राप्त करु अशी शक्यता नाही. परंतु आज श्रीगुरुंनीच कृपावंत होऊन आम्हा भक्तांचे जीवन ह्या दीक्षापरत्वे साकार केले. ही अवस्था जरी आपण भक्तांना काही एक साधनसेवा न करता प्राप्त झाली आहे, तरी ही प्राप्त झालेली अवस्था सज्ञान होऊन अभ्यासणे आपण भक्तांचे कर्तव्य आहे. ह्या कर्तव्याची पूर्तता विचारांती करण्यानेच पुढील पिढ्यांच्या सुख-शांती-समाधानाची तरतूद आपण भक्तांनी गुरुकृपाशिर्वादाने केली असे म्हणता येईल.

आपण भक्तभाविकांस जो दीक्षांचा लाभ झाला ह्या दीक्षांपरत्वे आपल्या जीवनाची निश्चित रुपरेषा म्हणजे प्राप्त झालेल्या गुरुकृपाशिर्वादाचे जतन करणे व त्या मार्गपरत्वे आपले व भवितव्यातील आपल्या पिढ्यांचे नित्याचरण गुरुमार्गपरत्वे ठेवणे एवढेच कर्तव्य आपल्यासाठी शिल्लक राहिले आहे. आपण भक्तांस ह्या दीक्षेचा लाभ करुन देत असताना श्रीसद्गुरुंनी कृपाशिर्वाद देऊन पिढ्यान्पिढ्या आपणास आपल्या भवितव्यातील सुख-शांती-समाधानाची तरतूद करुन दिली. हेच प्राप्त करण्यासाठी आपण ज्ञान अज्ञानाने कुलधर्म, कुलाचार, व्रतवैकल्ये, उपासतपास, जपजाप्य, नवससायास, श्राध्दपक्षादि कर्म करीत होतात. तरी प्राप्त जीवनातील अपेक्षित सुख-शांतीचा लाभ ह्या रुढीपरंपरेतील अनुकरण पध्दतीच्या अनुकरणाने न झाल्याने आपण गुरुकृपाशिर्वादाच्या शोधार्थ आलात. कार्यपध्दतीच्या मार्गदर्शनाप्रमाणे तुम्हां कुटुंबियांच्या कल्याणार्थ वंशविमोचन, कर्मविमोचन, ऋणमोचन आदि विमोचने करुन तुमच्या प्राप्त जीवनाचे हितसंबंध घराण्यातील दिवंगत व्यक्तींच्या हितसंबंधात इच्छावासना म्हणून दोषपरत्वे कार्य करीत होते असा दोषांचे विमोचन केले. अशा दिवंगत व्यक्तींंना सद्गती प्राप्त होण्यासाठी जरी आपण भक्तांनी वर्षानुवर्षे श्राध्दपक्षादि विधी किंवा त्रिस्थळी (प्रयाग, काशी, गया) तीर्थयात्रा केल्यात तरी आपला इष्ट सद्हेतू आपल्याला प्राप्त झाला नाही. त्याचप्रमाणे आपल्या घराण्यातील वंशपरंपरेतील कुलदेवदेवता यांच्या प्रीत्यर्थ कुलधर्म, कुलाचार, होमहवन, दानधर्मही केला. पण ह्या देवादिकांच्या कृपाशिर्वादाच्या मार्गाचा अवलंब करुनही तुम्हां भक्तांना इष्ट देवतांच्या कृपाप्रसादाचा लाभ झाला नाही.

आज आपण भक्तांस प्राप्त झालेली ‘दीक्षा’ ही अवस्था केवळ प्राप्त झालेल्या जीवनांतील आपली ऐहिक प्रगती व्हावी यासाठी नसून प्राप्त जीवनातील प्रापंचिक कर्तव्याची पूर्तता करुन प्राप्त जीवनाची सार्थकता करण्याचेही कार्य ह्या दीक्षापरत्वे आपण भक्तांस करावयाचे आहे. अशा ह्या प्राप्त झालेल्या गुरुकृपाशिर्वादामुळे आपण भक्त आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तींना सद्गती प्राप्त करुन देते झालात, त्याचप्रामाणे प्राप्त जीवनांत आपल्या घराण्याच्या कुलदेवदेवता आहेत ह्यांच्याही कृपाशिर्वादास पात्र झालात. याशिवाय तुमचे प्राप्त जीवन ज्या जन्मकर्म ऋणानुबंधपरत्वे तुमच्या जीवनातील उपासनेआड येत होते अशाही कर्माचे विमोचन झाले. अशी ही प्राप्त जीवनातील जीवनाचे सार्थक करण्याची दुर्लभ अवस्था श्रीसद्गुरुंनी केवळ कृपावंत होऊन तुम्हां भक्तास ह्याच जन्मात प्राप्त करुन दिली आहे.

ह्या हितसंबंधात मुलाखतीद्वारा आपण भक्तांस असे सुचविण्यात आले की, प्राप्त जीवनाचे सार्थक करण्याचे कर्तव्य आपण भक्तांना या पुढील जीवनात करावयाचे आहे. पण अनेक भक्तांना ‘प्राप्त जीवनाचे सार्थक करावयाचे’ म्हणजे काय करावयाचे हे न समजल्याने त्यांनी कारणदीक्षा प्राप्त होताच आपल्या जीवनातील कर्तव्यपूर्ततेपेक्षा अधिक वेळ गुरुकृपाशिर्वादाची प्राप्ती करण्याकडे खर्च करावयाचा आहे असा अर्थ लावला. वास्तविक दीक्षा प्राप्त होणे याचाच अर्थ आपण गुरुकृपाशिर्वाद प्राप्त करते झालो आहोत असा होतो. यासाठी अधिक वेळ सेवेत खर्च करण्याचे कर्तव्य तुम्हा भक्तांवर श्रीगुरुंनी ठेवले नसून प्राप्त झालेला कृपाशिर्वाद फक्त ‘जतन’ करण्याचे कर्तव्य करावयाचे आहे. अशा कर्तव्याची पूर्तता करीत असताना ज्या समाजामध्ये आपण जन्मास आलो आहोत त्या समाजाप्रीत्यर्थ काही परोपकार करण्याचे कर्तव्य माझे आहे ही जाणीव ठेवून ‘मला प्राप्त झालेल्या जीवनातील ऐहिक सुख-शांती-समाधानात इतरांचाही काही अंशमात्र वाटा आहे का ?’ हा प्रश्न स्वत:स विचारला पाहिजे. असा प्रश्न विचारात घेतल्यावर आपल्यासमोर प्रामुख्याने जे विषय प्रश्नचिन्ह म्हणून उभे राहतात ते प्रश्न म्हणजे ‘मी देवधर्म करावा का ?’, ‘मी दानधर्म करावा कां ?’ याशिवाय ‘मी द्रव्यदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान, भूदान हे करावे का ?’

यापैकी पहिला जो कर्तव्याचा भाग म्हणजे देवधर्म व दानधर्म ह्या कर्तव्यापासून आपली मुक्तता गुरुकृपाशिर्वादने झालीच आहे. ही मुक्तता गुरुकृपाशिर्वादाने करण्याचे प्रयोजन अशासाठी होते की आजपर्यंत आपण भक्तांनी ह्या मार्गाचा अवलंब केवळ अंधश्रध्दा व अनुकरण म्हणून केला. वास्तविक प्राप्त झालेले जीवन हे इतरांच्याही सुख-शांती-समाधानाला कारणीभूत व्हावे अशी कर्तव्यपूर्तता करण्यासाठी आहे हा समाजकल्याणाचा व नकळत होणारा परोपकाराचा लाभ घेण्याचे कर्तव्य चुकूनही आपण विचारात घेते झाला नाही.

आता दुसरा मार्ग म्हणजे द्रव्यदान, वस्त्रदान, अन्नदान, विद्यादान इत्यादि. हाही मार्ग प्राप्त जीवनातील कर्तव्यपूर्तता व जीवनाची सार्थकता करण्याचा आहे. पण नित्याच्या जीवनात आपण यापैकी कोणत्या मार्गाचे कर्तव्य करतो ? अन्नदान म्हटले की, आपण आदल्या दिवशीचे उरलेले अन्न दारापुढे आलेल्या भिकाऱ्यास देऊन ‘मी अन्नदान करतो’ असे म्हणतो . वास्तविक जो भिकारी बारा वाजता आपल्या पोटाला लागलेली भूक शमविण्यासाठी भीक मागतो त्यालाही सुग्रास अन्न खाण्याची इच्छा असते. पण कर्मपरत्वे भीक मागणे हेच केवळ जीवन ज्याला प्राप्त झालेले आहे अशाकडे आपण कधीही आस्थेने पाहत नाही. रोज नित्याने आपण दिवसाकाठी दोनदा जेवतो. अशावेळी स्वत:पुढे आलेले सुग्रास अन्न पाहिल्यावर स्वत:स असा प्रश्न विचारावा की ‘ज्या गुरुकृपेने मी आज हे सुग्रास अन्न जेवत आहे त्यात इतरांचाही काही वाटा आहे काय ?’ व तो देण्याचे कर्तव्य मला काया-वाचा-मनाने करता येईल काय ?  त्याचप्रमाणे वस्त्रदान, द्रव्यदान, विद्यादान करताना हा प्रश्न स्वत:स विचारण्याचे कर्तव्य नित्याने करणे व त्या कर्तव्यपरत्वे आपले आचार-विचार सदैव तसे ठेवणे म्हणजेच ‘प्राप्त जीवनाची सार्थकता’ होय !

जीवनात काही एक साधनसेवा न करता दीक्षा प्राप्त झाली आहे म्हणून अधिक ऐहिक सुखाची प्राप्ती होईल ह्या इच्छा अपेक्षेने प्राप्त झालेल्या दीक्षेचा अनादर चुकूनही न करता जीवनात प्राप्त झालेले सुख, शांती, समाधानाने कसे अनुभवता येईल ह्या कर्तव्याची जाणीव ठेवून प्राप्त झालेले सुख, समाधानाने उपभोगणे हाच खरा ह्या जीवनाचा परमार्थ व सार्थकता होय.

असा जीवनाच्या सार्थकतेचा एवढा सोपा मार्ग सूचित केल्यावर प्राप्त झालेल्या जीवनात व भवितव्यात आपल्या मुलाबाळांच्या कल्याणार्थ काय करणे इष्ट आहे हे ठरविणे तुम्हा भक्तांस जरी शक्य नाही तरी सद्गुरुकृपाशिर्वादाने तुम्हा भक्तांच्या कल्याणार्थ श्रीसद्गुरु काही ना काही निश्चित असा मार्ग एवढ्यासाठी सुचवितात की, त्याचा लाभ तुम्हा भक्तांना प्राप्त जीवनात तर व्हावाच पण पुढे तुम्हां भक्तांच्या  पिढ्यान्पिढ्यांचे कल्याण त्या मार्गदर्शनात सामावलेले असते.

आजपर्यंत आपण भक्त जीवनात अपेक्षित सुख-शांती-समाधान प्राप्त करण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब करुन त्यासाठी पै-पैशाची झीजसुध्दा सोसून निश्चितपणे सुख-शांती-समाधानाचा लाभ घेऊ शकला नाहीत. पण आज आपण भक्त गुरुकृपाशिर्वादास पात्र झाल्याने ऐहिक सुखाप्राप्ती तर झालीच, पण त्याच बरोबर प्राप्त जीवनाचे सार्थक करण्यासाठी कृपाशिर्वादही प्राप्त करते झालात. अशा प्राप्त झालेल्या जीवनाचा लाभ घेत असता वैयक्तिक स्वार्थाची भूमिका ठेवून श्रीसद्गुरुंनी दिलेल्या कृपाशिर्वादाची फेड आपण करु शकणार नाही. वास्तविक गुरुकृपाशिर्वादाची फेड आम्हा मानवांना कोणत्याच जन्मी करता येणे शक्य नाही. हे जरी खरे तरी आज जगतात लोककल्याणाची कार्ये म्हणून काही प्रकारे सेवा चालू असते, पण अशा सेवाकार्याची महती किंवा त्या सेवाकार्यात आपण सहभागी व्हावे असा चुकूनही आपण विचार न करता समाजाच्या कल्याणार्थ चाललेले कार्य याची पूर्णत: ओळख करुन न घेता आपण अज्ञानाने त्याची निंदाच करीत असतो. पण जेव्हा आपण सद्गुरुकृपाशिर्वादाने सुख-शांती-समाधानाचा लाभ करुन घेण्याचे कर्तव्य प्राप्त करतो, त्यावेळी इतरांच्या सेवाकार्याच्या कर्तव्यास आपण काही प्रकारे हातभार लावणे आपले इष्टकर्तव्य आहे ही जाणीव विसरतो. गुरुकृपाशिर्वादाने आपण भक्त देवादिकांच्या धर्मकृत्यापासून किंवा अन्य प्रक्राराने सुखप्राप्ती करण्याच्या मार्गातून जेव्हा आपल्या पै-पैशाची बचत करता तेव्हा जाणत्याने आपली संचित ठेव वाढविण्यासाठी सद्गुरुंनी आपल्याला कृपाशिर्वाद दिला आहे अशी ओळख करुन न घेता अज्ञानाने आपला जो पै-पैसा अनाठायी खर्च होत होता तो योग्य प्रकारे खर्च व्हावा यासाठी आपण अंगिकारलेल्या अनुकरण व अंधश्रध्दापध्दती यापासून आपल्याला अभयदान दिले हे समजून घ्यावे. हा गुरुकृपेचा वाटा समाजातील अन्य कार्यार्थ सेवेस लावून त्याचा लाभ जर आपण घेते झालात तरच ‘दीक्षापरत्वे आपल्या जीवनाचे सार्थक’ म्हणजे काय याची ओळख पूर्णत: आपणास होईल.

आपण भक्तांच्या जीवनातील इष्टकर्तव्याची जाणीव व ओळख वरील विवेचनात करुन दिल्यावर आपणास असे वाटेल की वंदनीय दादांनी ह्या कार्यपध्दतीत नवीन काही सेवाकार्याची योजना योजली आहे काय ?

प. पू. साईनाथ महाराजांच्या आज्ञेनुसार श्री साई स्वाध्याय मंडळ ही संस्था स्थापन करण्यात आलेली असून हया संस्थेचे कार्य व ओळख आपण भक्तभाविकांस होणे आवश्यक आहे.

आपण भक्त प्रापंचिक जीवनातील अडीअडचणीसंबंधी विचारणा करण्यासाठी आल्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्याचे कार्य श्री साई आध्यात्मिक समिती गेली अनेक वर्षे करीत आहे. यामध्ये आपल्याला धर्माची व देवाची ओळख व्हावी म्हणूनच केवळ हे कार्य स्थापन केलेले नाही. इहजगतात जो कोणी जन्माला येतो, त्याला धर्म व देव आहेच. परंतु प्रत्येकाची विचारसरणी अशी झाली की खाणेपिणे, कपडलत्ता म्हणजेच जीवन व ह्या सुखांची प्राप्ती व्हावी म्हणूनच केवळ मनुष्य हा देवाचा व धर्माचा आज विचार करीत आहे. आपल्या प्राप्त जन्माचे कारण काय व त्यापरत्वे आपले इहजगतातील कर्तव्य काय याचा विचार कोणीही करीत नाही, त्यामुळे त्याची ओळख मनुष्याला होत नाही ज्या देवाने आपणास जन्माला घातले त्या देवाची ओळख आपणास व्हावयास पाहिजे. परंतु मनुष्य आपल्या कर्माची ओळख करुन घेण्याच्या प्रयत्नात असतो व ती ओळखही त्याला पूर्णत्वाने होत नाही. जरी जगतात ‘जन्माला आलो आहोत’ असे आपण म्हणत असलो तरी खऱ्या अर्थाने जन्मप्राप्ती अजून व्हावयाची आहे. कारण प्राप्त जन्माचे ज्ञान होईल तेव्हाच जन्मप्राप्ती झाली असे म्हणता येईल. ही अवस्था गुरुभेट झाल्याशिवाय प्राप्त होत नाही. जगात ज्याला ‘जन्म’ म्हणजे उत्पत्ती अवस्था प्राप्त होते त्याला ‘लय’ ही अवस्था आहेच. पण ‘स्थिती’ प्राप्त होणे म्हणजे जन्म प्राप्त होणे असे म्हणता येईल. यासाठी स्थित्यंतर होणे आवश्यक आहे. हे कार्य गुरुकृपेशिवाय होत नाही.

जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्मप्राप्तीमागे काहीएक निश्चित कारण आहे हे समजावे, म्हणून आजपर्यंत समितीने ह्या कार्याची ओळख श्री साईनाथ महाराजांच्या कृपाशिर्वादाने आपणास करुन दिली आहे. प्रत्येक मनुष्याच्या सुख-शांती-समाधानाबद्दलच्या अपेक्षा असतात. परंतु ह्या अपेक्षांची फलप्राप्ती कां होऊ नये याचे शास्त्रीय कारण कोणीही विचारात घेत नाही. ह्या सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून स्वत:च्या जीवनात व समाजात अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत होत आलो आहोत. त्यामुळे ह्या जगात काही सुखाचा मार्ग आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून ज्ञानी होण्याऐवजी मनुष्य अज्ञानी मार्गाचा अवलंब करुन अधिकाधिक अज्ञानी होत चालला आहे. अशा हया मानवी जीवनात निश्चित असा मार्ग आम्हा मानवांना मिळावा म्हणून परमपूज्य बाबांनी वेळोवेळी कृपाशिर्वाद म्हणून मार्गदर्शन केले आहे. हा आशिर्वाद म्हणजे आजपर्यंत हजारो वर्षापासून अवतारी पुरुषांनी मानवी कल्याणासाठी केलेल्या सिध्दसाधना होत. त्यांची प्राप्ती सर्वसामान्य मनुष्यास सुलभपणे व्हावी म्हणून एखाद्या मध्यस्थामाध्यमातून अशी कार्ययोजना ईश्वर करीत असतो. ती कार्य योजना त्या ‘मध्यस्थ’ व्यक्तीच्या विचारातून निर्माण झालेली नसते. परंतु अशा कार्यात मानवी जीवनामध्ये सुख-शांती-समाधानाचा लाभ व्हावा अशी योजना असूनसुध्दा मनुष्य अज्ञानामुळे ह्या मार्गाला दुरावतो.

अशा योजनेपैकी वंशविमोचन हे साधन अत्यंत महत्वाचे असून त्या साधनाचा लाभ आपण भक्तांनी घेतलेला आहे. मानवी जीवनांत संपत्तीनाश, संततीनाश व विद्यानाश हे प्रमुख दोष आहेत. त्यांच्या निवारणार्थ पूजापाठ, नवससायास इत्यादी मानवी प्रयत्न अपुरे पडत असून गुरुकृपाशिर्वादाचा लाभ झाला तरच ह्या दोषापासून आपली म्हणजेच पर्यायाने पुढील पिढ्यांची मुक्तता होत असते. यामध्ये विद्यानाश हा दोष निर्माण झाला तर एका पिढीत काही व्यक्तींचे विद्याविद्यार्जन होते, काहींचे होत नाही. पुढे कालकालांतराने हा दोष वाढीस लागून  कुîटुंबात ऐपत असूनसुध्दा विद्याविद्यार्जन करता येत नाही. आज व भवितव्यात प्रत्येक व्यक्तींने विद्याविद्यार्जन करणे अत्यंत आवश्यक आहे. पण अशा दोषांचे निवारण गुरुकृपाशिर्वादाचा लाभ झाला तरच होत असतो. यासाठी श्रीसद्गुरुकृपेने ‘श्री साई स्वाध्याय मंडळ’ ही संस्था स्थापन केली असून समितीच्या प्रत्येक कार्यकेंद्रावर एक वही ठेवण्यात आली आहे. आपण भक्तभाविकांनी व कुटुंबीयानी स्वत:च्या हस्ताक्षरांत ह्या वहीमध्ये आपले नाव व पत्ता याची नोंद करुन श्री साई स्वाध्याय मंडळाचे सभासद व्हावे.

आपण जे विद्याविद्यार्जन करतो त्या शिक्षणामुळे पुढे नोकरी, धंदा, आदि व्यवसाय करुन द्रव्यार्जन करीत असतो. परंतु सुखप्राप्ती झाली तरी शांतता आपल्या अनुभवास येत नाही. याचे कारण विद्या ही दान करावयाची असते. पण आपल्या ठिकाणी परोपकाराचा ठेवा नसल्याने त्याचा लाभ आपल्याला होत नाही. भवितव्यात आपल्या कुटुंबातील जे कोणी विद्याविद्यार्जन करुन ज्ञानवंत होतील त्यांना प्राप्त होणारी विद्या हिचा सदुपयोग जगाला सुखी करण्यासाठी व्हावा अशी परमपूज्य बाबांची इच्छा आहे. त्यासाठी श्री साई स्वाध्याय मंडळाची स्थापना करण्यात आली. ह्या संस्थेच्या सभासदत्वासाठी काही वर्गणी जमा केलेली नाही. आपण भक्त सभासद व्हावे म्हणून परमपूज्य बाबांचा आशिर्वाद ह्या स्वाध्याय मंडळासाठी प्राप्त झालेला असून ती ठेव आपण आपली नांवे सभासद म्हणून नोंदविण्या आधीच प्राप्त झालेली आहे.

आपण भक्तभाविक आजपर्यंत अडीअडचणींचे निवारण करुन घेण्यासाठी श्रीगुरुचरणांशी येत आहात व पुढेही याल. जीवनातील दु:खे दूर होऊन सुख शांती लाभावी अशी आपली इच्छा जरी असली तरी विद्येतून जे ज्ञान प्राप्त करावयाचे ते ज्ञान जर नसेल तर कितीही सुख प्राप्त झाले तरी ‘समाधान’ ही अवस्था आपणास अनुभवता येणार नाही. कारण समाधान ही अवस्था पै-पैशाने प्राप्त होणारी नसून विद्यार्जनातून ज्ञानी होण्यामुळे प्राप्त होते, याचा विचार सूज्ञ भक्तभाविकांनी भवितव्यासाठी केला पाहिजे.

सर्वसामान्यपणे मनुष्य असा विचार करतो की, उच्च शिक्षण घेणे म्हणजे ज्ञानवंत होणे. परंतु ‘ज्ञान’ ही वेगळी अवस्था असून ती देहिक माध्यमातील आचार, विचार व उच्चार यांमधून व्यक्त झाली पाहिजे. जगात काही लोक असे जन्माला येतात की, ज्यांना असामान्य बुद्धीमत्ता लाभलेली असते. अशा बुद्धीचा सदुपयोग जगाला ज्ञानी करण्यासाठी केला गेला पाहिजे. कारण पूर्वपुण्याईने त्यांना अशी अपूर्व संधि प्राप्त झालेली असते. की, विश्वाच्या कार्यामधील ‘ज्ञान’ ही अवस्था स्वत:च्या ठिकाणी धारण व्हावी. परंतु हे न समजल्यामुळे अशा व्यक्ती विश्वविद्यालयात शिक्षण घेऊन केवळ आपल्या चरितार्थाचाच विचार करतात. त्यामुळे जगाला ज्ञान देण्याचे कर्तव्य त्यांच्या हातून पार पाडले जात नाही. अशा व्यक्ती जरी सुख प्राप्त करता झाल्या तरी समाधान ही अवस्था अनुभवू शकत नाहीत.

गुरुमार्गात जे ज्ञानी आहेत त्यांनी हे ज्ञान शाळेत किंवा विश्लविद्यालयात प्राप्त केलेले नसून त्याची प्राप्ती ही स्वयंभू किंवा गुरुमार्गात काही एका विशिष्ट साधनेने होत असते. हेच ब्रह्मज्ञान असून त्या ज्ञानास ‘अपौरुष’ असे म्हणतात. ज्ञानाचा आरंभ ‘श्री’ ने होतो व शेवटही ‘श्री’ ने होतो. पहिली ‘श्री’ म्हणजे लक्ष्मी व दुसरी ‘श्री’ म्हणजे सरस्वती आहे. पहिल्या श्रीची प्राप्ती कुणालाही होत असते, परंतु दुसऱ्या श्रीची प्राप्ती होण्यासाठी पूर्वपुण्याई, पूर्वसंस्कार किंवा कृपाशिर्वादाची आवश्यकता असते. आज जगात असे किती लोक आहेत की, ज्यांना पूर्वपुण्याईने जन्म घेता येतो ? या विसाव्या शतकात शिक्षणाशिवाय जगणे आम्हा मानवांना कठीण आहे. ज्ञान हे पूर्वपुण्याईवर अवलंबून असल्यामुळे जगात बोटावर मोजता येण्याइतकेच लोक या ज्ञान अवस्थेचा लाभ घेऊ शकतात. पण बहुसंख्य लोक पूर्वपुण्याईअभावी व जीवनांतील दोषपरत्वे शिक्षण घेता येत नाही म्हणून दु:खी आहेत. याची जर कीव आली तरी अशा परिस्थितीत स्थित्यंतर करण्याचा मार्ग आज समाजापुढे नाही. याचा फायदा ज्योतिषी इत्यादि लोक घेत असतात. ‘अमुक व्रत, नवस किंवा जप करा, तुमचा मुलगा कालिदास होईल’ असे मार्गदर्शन करतात. पण कालिदास होण्याऐवजी हा मुलगा आपले जीवन इतरांचा दास होण्यात घालवितो. विद्याविद्यार्जन व ज्ञानप्राप्ती न होणे ह्या समस्येमध्ये जगातील पंचाहत्तर टक्के लोक आज आहेत. तेव्हा “अशा परिस्थितीतून काही मार्ग आहे की नाही ?”, अशी विचारणा मी हे कार्य स्थापन करण्यापूर्वी परमपूज्य साईनाथ महाराजांना केली होती. ‘पुढील काळात जेव्हा वेळ येईल त्यावेळी मार्ग सुचविन’ असे परमपूज्य बाबा म्हणाले होते. ती वेळ येण्यास पस्तीस वर्षे लागली. हेच गुरुमार्गदर्शनातील मर्म आहे.

आपल्या जन्मकारणाचे व जीवनाचे ज्ञान आपण भक्तांस व्हावे म्हणून ह्या कार्यपध्दतीमध्ये आजपर्यंत साधना संमेलने घेण्यात आली. ह्या संमेलनामधील प्रमुख विषय म्हणजे मानवी जन्म जो प्राप्त होतो त्याची ‘जीवनउत्पत्ती व कार्य’ असा होता. आम्ही मानव जरी जन्म प्राप्त करते होतो, तरी जीवन जगणे ही कला आहे व तिचा लाभ गुरुकृपेशिवाय होत नाही. यामध्ये गुरुभेट होणे किंवा गुरुंना मानणे इतकेच नसून गुरु जे मार्गदर्शन करतात त्यापरत्वे जे कर्तव्य आहे ते आपल्यालाच करावे लागते. ही शिकवण ह्या साधना संमेलनांतून भक्तभाविकांना देण्यात आली. या बरोबरच देहिक विकासासाठी आवश्यक अशी सेवा म्हणजे ॐ कार साधना व श्रीसद्गुरुनामस्मरण ही साधनाही शिकविण्यात आली.

ह्या संमेलनामधून भक्तभाविकांस ज्या अलौकिक ब्रह्मज्ञानाचा लाभ झाला, त्यामुळे आपण प्राप्त जीवनाबद्दल सज्ञानी होऊन आपल्या काया-वाचा-मनाच्या ठिकाणी केवळ गुरु हेच तत्व ह्या जगांत साक्षी आहे अशी नितांत आदराची ठेव प्राप्त झाली आहे. ही अमोल ठेव प्रत्येकाच्या जीवनात व आपल्या कुटुंबातील पिढ्यांपिढ्यांमध्ये सदैव वास करीत रहावी याची साक्ष म्हणून श्री साई स्वाध्याय मंडळ ही संस्था स्थापन केली आहे. आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासाठी भवितव्यात असा आशिर्वाद प्राप्त करावयाचा आहे की, प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर विद्याविद्यार्जन ही ठेव जन्मत:च प्राप्त होऊन ज्ञान ह्या अवस्थेचा लाभ व्हावा. ही ज्ञानज्योत आपल्या कुटुंबांत अखंडपणे वास करीत रहावी म्हणून श्री साई स्वाध्याय मंडळ ह्या संस्थेचा सभासद श्रीगुरुंनी आपणास करावे अशी परम पूज्य बाबांच्या चरणी मी प्रार्थना करीत आहे.

जगामध्ये संस्था स्थापन करण्यासाठी लोक पैसा जमा करतात. श्री साई स्वाध्याय मंडळ ह्या संस्थेचे हे वैशिष्ट्य आहे की, आपणापैकी प्रत्येकाने ह्या संस्थेचा सभासद व्हावयाचे आहे, पण ते पैशाने नव्हे तर ज्या श्रीगुरुंना आपण काया-वाचा-मनाने मानले आहे ती अमोल ठेव म्हणजे ‘श्रध्दा’ ही आपण वर्गणी म्हणून द्यावयाची आहे. श्री साईनाथ महाराजांचा कृपाशिर्वाद व आपण भक्तांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेली श्रध्दा यातून श्री साई स्वाध्याय मंडळ ही संस्था जे कार्य जगतात करील ते कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने ‘लोककल्याण’ कार्य असे म्हणता येईल. अशा अलौकिक तत्वावर स्थापन झालेली संस्था ही जगामध्ये अखंडपणे कार्य करीत राहिल व त्या कार्याचे ब्रीदवाक्य “जे का रंजले, त्यांसी म्हणे जो आपुले” असेच असेल. आपण सर्व भक्तभाविक, ज्यांना श्रीगुरुकृपेने आपल्या काया-वाचा-मनाचा विकास होऊन ज्ञान अवस्थेचा लाभ झाला आहे त्या काया-वाचा-मनाच्या ठिकणी हाच भाव वास करीत रहावा अशी परम पूज्य बाबांच्या चरणी प्रार्थना !

आपण सर्व भक्तांस परम पूज्य बाबांनी ह्या मंडळाचे सभासद केले आहे, याचा अर्थ आपल्या घराण्यातील विद्यानाश जो वंशपरंपरेने पुढे जाणार होता तो विमोचित  केला असून भवितव्यात आपण घेतलेल्या विद्येचा मोबदला ‘दान’ म्हणून करण्यानेच हा कृपाशिर्वाद आपण आपल्या कुटुंबासाठी मिळवू शकाल. ह्या कार्यामध्ये सर्व भक्तभाविकांनी कर्तव्यबुध्दीने सहभागी व्हावे अशी परमपूज्य बाबांचे चरणी प्रार्थना ! आपण भक्तांना आपल्या अडीअडचणी निवारणार्थ आल्यावर सुख, शांती, समाधान प्राप्त होण्यासाठी धर्माचरण, देवदेवतार्जन इत्यादि मार्गाची ओळख करुन द्यावी लागली. पण आज ह्या मार्गदर्शनाच्या पुढील प्रगतीचा मार्ग म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी प्राप्त जीवनात तन-मन-धनाने काही सेवा करण्याचे जे कर्तव्य अंगिकारावयाचे त्या कर्तव्याची पूर्तता आपण आपल्या यथाशक्ति यथाज्ञानाने करुन त्याबद्दल जेव्हा समाधान व्यक्त कराल तेव्हा अशी इतरांच्या कल्याणात स्वत:ला समाधान मानण्याची अवस्था प्राप्त करणे म्हणजेच  खऱ्या अर्थाने परमार्थातील ‘मुक्ति’होय.

आपण भक्तांना कारण दीक्षा प्राप्त झाल्यावर जे पुण्यकर्म करावयाचे आहे त्यामध्ये अधिक काळ साधनसेवेचा विचार न करता, जे कर्तव्य इतरांच्या कल्याणासाठी म्हणून आपण अंगिकारले त्याची सार्थकता प्राप्त झालेल्या दीक्षापरत्वे आपण भक्त करु शकाल. एवढेच नव्हे तर भवितव्यात आपण भक्तांच्या पुढील पिढ्यांनाही आपण केलेल्या कर्तव्याचा ठेवा हा सहजगत्या लाभणार असून भवितव्यात तुम्हा भक्तांच्या मुलाबाळांनी काही नव्याने देवदेवतार्जन, कुलधर्म, कुलाचार, उपासतापास, व्रतवैकल्ये, दानधर्म, तीर्थयात्रा आदि कृत्यांचा लाभ घेऊन पुण्यसंचय करण्याचे प्रयोजन उरणार नाही.

तुम्हा भक्तांच्या हितार्थ व कल्याणार्थ पोषक असे मार्गदर्शन करुन भवितव्यात तुमच्या मुलाबाळांनाही त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले आचार-विचार ठेवण्यास कोणत्याही प्रकारे अडचण वाटू नये अशाच पध्दतीने हे कार्य गेली कित्येक वर्षे चालले आहे. आज आपण भक्तांना जे वरील निवेदन अभ्यासण्यास दिले आहे ते आपण कुटुंबियांनी एकत्र बसून कुटुंबातील सज्ञान मुलामुलींनाही ह्या निवेदनातील हितकारक असा जो मार्गदर्शनातील विषय आहे तो नीट समजावून सांगून त्यांचेही नित्याचे आचारविचार प्राप्त झालेल्या दीक्षेला पोषक होतील असा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी निर्माण करावा. दीक्षेस आपण भक्तभाविक कृपापात्र झालात म्हणजे किरकोळ स्वरुपाच्या अडचणी येणार नाहीत असे नाही. पण जरी त्या आल्या तरी गुरुकृपाशिर्वादाने निवारण होतील इतकी तरतूद आपल्या जीवनात झालेली असल्याने आलेल्या अडीअडचणींचा आस्थेने विचार करुन कोणत्याही कारणपरत्वे जे काया-वाचा-मनाचे एकरुपत्व होऊन ज्या ॐ कार साधनेचा लाभ आपण करुन घेणार आहात त्या साधनेत जर आपण केवळ एखाद्या क्षुल्लक अडचणीप्रीत्यर्थ प्रतिकूल असे विचार निर्माण करुन अशांतता निर्माण करु, तर प्राप्त झालेल्या दीक्षेतून जी साध्य अवस्था आपण भक्तांना प्राप्त करावयाची आहे, ती प्राप्ती होण्यास ह्या प्रतिकूल विचारपरत्वे अडथळा निर्माण होईल. पूर्वी आपण ह्याच गुरुमार्गातील मार्गदर्शनाचा लाभ करुन घेत असताना सूचित केलेल्या साधन-सेवा आपणास करता येत नसत. याचे कारण प्राप्त जीवनातील काया-वाचा-मनाचा हितसंबंध जन्मकर्म, जन्मजन्मांतर व अन्य ऋणानुबंधांशी होता. अशा ह्या दोषांचे गुरुकृपाशिर्वादाने विमोचन झाल्यामुळे आपण भक्तांस सुलभ अशा साधनसेवापध्दतीने ‘साधक’ व ‘सिध्द’ ह्या दोन अवस्था जरी न कळत प्राप्त झाल्या असल्या तरी गुरुमार्गातील प्रधान अवस्था म्हणजे ‘साध्य’ ही अवस्था प्राप्त होण्यास जे सुलभ असे साधन सांगितले आहे, ते साधन ‘साध्य’ अवस्थेप्रत नेऊन प्राप्त करण्यास आपण भक्तांस कोणत्याही प्रकारच्या व्रतवैकल्याचा, उपासतापासाचा, दानधर्माचा किंवा काही संख्येंने जपजाप्य करण्याचा मार्ग सूचित केला नसून ही अवस्था जरी बिकट असली तरी नित्याने निश्चितपणे अर्धा तास सेवा करण्याने ही साध्य अवस्था आपणास प्राप्त होणार आहे.

‘साध्य’ अवस्थेच्या प्राप्तीसाठी जे काही साधन आपण भक्तांस सूचित करण्यात आले आहे, त्या नित्याच्या साधनेने जेव्हा आपण भक्त आपले देहिक माध्यम म्हणजे काया-वाचा-मन हे नित्याच्या साधनेशी एकरुप कराल त्यावेळी ह्याच काया-वाचा-मनाचे रुपांतर तन-मन-धन म्हणून तुमच्या ठिकाणी धारण होईल. ‘साध्य’ अवस्थेतील हा स्पष्ट खुलासा आपल्याला केल्याने आपल्यासमोर असा प्रश्न निर्माण होईल की, काया-वाचा-मन व तन-मन-धन  यात फरक काय ? तर गुरुमार्गात साध्य अवस्था प्राप्त होण्यास काया-वाचा-मनाचा परिपाक होणे हे अत्यावश्यक असल्याने तो जो परिपाक होतो ती काया-वाचा-मनाची परिपाक झालेली अवस्था म्हणजे तन-मन-धन होय.

साधनामार्गारंभी तुमच्या काया-वाचा-मनाची जी देहिक अवस्था होती, ह्या अवस्थेचे ऐहिक विषयाधीन होण्याचे कार्य अविरत होत असल्याने तुम्हाला नित्याच्या साधनेत कदापिही एकरुप होता आले नाही. पण जेव्हा ह्या काया-वाचा-मनाचा परिपाक होऊन तन-मन-धन ही अवस्था प्राप्त झाली तेव्हा तुमच्या जीवनातील ‘परमेश्वर’ हा इच्छित विषय साकार होण्याची क्रिया ह्याच देहिक माध्यमातून तुमच्या नकळत सुरु झाली. अशी ही  जीवनात प्राप्त होणारी अमोलिक दीक्षा जर आपणास प्राप्त जीवनात व भवितव्यात कुटुंब कल्याणार्थ रक्षण करावयाची असेल, तर यापुढील जीवनांत काही कारणपरत्वे आलेल्या अडीअडचणी निवारणार्थ कोणत्याही देवदैविक उपासना, उपासतपास, नवससायास, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा, श्राध्पक्ष, आदि मार्गाचा अवलंब करता कामा नये. याचे कारण दीक्षेच्या ‘साध्य’ अवस्थेची प्राप्ती होण्यासाठी जे काही मार्गदर्शन सूचित करण्यात आले आहे ही सेवा नि:संकोच, अविरत करण्यानेच ‘साध्य’ अवस्था सिध्द होणार आहे. ह्या अवस्थेत आपण भक्तांस गुरुकृपाशिर्वादाच्या सामर्थ्याचे चमत्कार, दृष्टांत, साक्षात्कार ह्या विषयासंबंधींची स्वप्ने ही पडणार नाहीत. कारण ह्या सर्व अवस्थेपूर्वीच्या असतात व आपण भक्तांस आज त्यापुढील सिध्द व साध्य ही अवस्था प्राप्त झाली आहे म्हटल्यावर आपण पूर्णत: कृपावंत झाले आहोत ही गोष्ट सत्य आहे. अशावेळी मार्गारंभीच्या अवस्था तुमच्या देहिक माध्यमात उदित होतील ही शक्यता नसल्याने आपण भक्तांनी एकमेकांशी या विषयाबद्दल चर्चा करुन जी अवस्था प्राप्त करावयाची आहे तत्संबंधी एकमेकांत संशय निर्माण करु नये. त्याचप्रमाणे दीक्षा ही अवस्था प्राप्त होणेे म्हणजे आपल्या ठिकाणी सद्गुरुकृपाशिर्वाद साकार होणे अशी अवस्था सहजगत्या आज आपल्याला प्राप्त झाली आहे. अशा अवस्थेपरत्वे हे तुमचे तन–मन-धन आता सद्गुरुरुप झाले आहे म्हटल्यावर कोणत्याही देवदेवतांचा, पुरुषाचा किंवा अन्य बाधेचा संचार आपल्या ठिकाणी निर्माण होईल, किंबहुना झाला आहे अशी भावना निर्माण करुन त्या अवस्थेपरत्वे इतरांच्या ठिकाणी त्याबद्दलचे भय किंवा आदर निर्माण करु नये.

दीक्षा व त्या दीक्षापरत्वे करावयाची सेवा व कर्तव्य याची पूर्णत: ओळख वरील निवेदनावरुन आपण भक्तांना झालीच असेल. कारण दीक्षेच्या प्रार्थनेबरोबर एक प्रार्थना आपण भक्तभविकांना म्हणावयास दिली होती. या प्रार्थनेबद्दल आपण भक्तांना योग्य ते मार्गदर्शन झाले असेल किंवा नसेल म्हणून याबद्दल याच निवेदनात स्पष्ट खुलासा असा की, पूर्वी आपण आपल्या घराण्याच्या इष्टदेवदेवता यांच्या कृपाशिर्वादप्राप्तीसाठी भिन्नाभिन्न प्रकारे उपासना, व्रतवैकल्पे, जपजाप्य, होमहवन इत्यादि मार्गाचा अवलंब हा सज्ञान होऊन करते झाला नाहीत. तो एक केवळ घराण्याच्या परंपरेतील वाडवाडिलांनी अनुकरण केलेला मार्ग पुढे आपण आपल्या नित्याचरणात आणलात. पण जेव्हा आपण भक्तांस गुरुकृपाशिर्वादपरत्वे उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरु दीक्षा, आदिंचा लाभ झाला, तेव्हाच प्राप्त जीवनात सुख, शाती, संपत्ती आदिंचा लाभ सुलभपणे आपण प्राप्त करते झालात. आपल्या भावी पिढ्यांचा विचार करता आपण गुरुकृपाशिर्वाद प्राप्तीपूर्वी ज्या देवदेवतार्जनाच्या मार्गाचा अवलंब करीत होतात तो मार्ग भविष्यात पुढील पिढ्या आचरणात आणू शकतील किंवा जरी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याला पोषक असा आचार, विचार व आहार या भावी पिढ्यांना करता येईल अशी शक्यता नाही. यासाठी आज प्राप्त झालेल्या कारण दीक्षेचा लाभ घेत असताना पुढील पिढ्यांची तरतूद करण्याची जबाबदारी आपण भक्तांची असल्याने जी प्रार्थना म्हणावयास दिली आहे त्या प्रार्थनेचा प्रधान हेतू असा की, भविष्यात तुमच्या घराण्यातील मुलाबाळांच्या ज्ञानअज्ञानाने जरी त्यांनी कुटुंबपरंपरेतील कुलधर्म, कुलाचार करण्याचे कर्तव्य केले नाही तरी त्यापरत्वे त्यांच्या जीवनात दु:ख तथा अशांतता निर्माण होण्याचे काहीएक कारण उरणार नाही. हीच भविष्यातील तुम्हा कुटुंबियांच्या कल्याणाची तरतूद होय. तुम्ही भक्तांनी आजपर्यंत जे ज्ञानअज्ञानाने देवदेवतार्जनाचे, कुलधर्म, कुलाचार म्हणून रुढीपरंपरेने अनुकरण केलेत, त्याची सांगता तुमच्याच हयातीत तुम्हां भक्तांकडून व्हावी व पुढील पिढ्यांना भवितव्यात केवळ एक गुरुभक्ती एवढाच प्राप्त जीवनाच्या सार्थकतेचा मार्ग सुलभपणाने प्राप्त व्हावा, ह्या गुरुकृपेच्या आज्ञेप्रमाणे ती प्रार्थना आपण भक्तांना कारण दीक्षेबरोबर म्हणावयास दिली होती.

अशी प्रार्थना आपल्या म्हणण्यात येते म्हणजे आपण आपल्या घराण्याच्या कुलदेवदेवतांच्या हितसंबंधांत नाही अशी गैरसमजूत कुणीही भक्तांने करुन घेऊ नये. कुलधर्म-कुलाचार परंपरेच्या रुढीपरंपरेतून आपण भक्तांना जरी गुरुकृपाशिर्वादाने त्या कृत्याची सांगता होऊन अभयदान मिळाले आहे तरी ज्यांच्या कृपाशिर्वादाने गुरुकृपाशिर्वादाच्या माध्यमाचा लाभ झाला, त्या घराण्याच्या इष्टदेवदेवता यांचा परिचय तुम्ही भक्तानी भावी पिढ्यांना करुन देण्याचे कर्तव्य याकडे दुर्लक्ष करु नये.

आपण भक्तांना परमार्थाबद्दलची व जीवनाची सार्थकता करण्याबद्दलची जाणीव ही गुरुमार्गात आल्यावर झाली. तत्पूर्वी आपल्या कुटुंबातील अन्य वडीलव्यक्ति ह्या आपल्या कुटुंबांच्या कल्याणार्थ व रक्षणार्थ आपल्या घराण्याच्या कुलदेवदेवतांची मनोभावनेने सेवा करीत होत्या. अशा व्यक्तींनी दीक्षापरत्वे जरी वार्षिक कुलधर्म, कुलाचार म्हणून नव्हे पण ज्या देवदेवतांच्या कृपाशिर्वादाने या गुरुकृपाशिर्वादाचा लाभ झाला त्या घराण्याच्या इष्ट देवदेवतांच्या कृपाशिर्वादाची उतराई आपल्या हातून व्हावी म्हणून जरी ओटी भरणे, हळदीकुंकू करणे किंवा अन्य प्रकारे देवतार्जन केले तर ते दीक्षेस बाधक आहे अशा समजूतीने त्या व्यक्तीच्या श्रध्दाभक्ती आड कोणीही सूज्ञ भक्ताने येऊ नये. पूर्वी कुटुंबात जे काही देवदेवतार्जन केवळ चालीरीती म्हणून होत असे, ते आता आपण भक्तांनी सज्ञान होऊन करण्यामुळे त्याचा लाभ यथोचित असा होईल. जी धर्मकृत्ये वर्षानुवर्षे करावी लागत होती ती केवळ वार्षिक म्हणूनच आपल्याला विचारात घ्यावी लागतील,

आम्ही मानव कर्माधीन आहोत. त्यामुळे स्वाभाविक ऐहिक विषयांची अधिकाधिक एकरुप होऊन ते विषय सेवन करणे म्हणजेच जीवनाची इतिकर्तव्यता असे जरी आपल्याला वाटत असले तरी परमेश्वराने आपल्या कल्याणार्थ योग्य अशा मार्गादर्शनातून व आपली देहिक अवस्था ज्या प्रमाणामध्ये विकसित होईल त्या अवस्थेपरत्वे परमेश्वरी स्वरुपाचा लाभ घेता यावा म्हणून सर्व सामान्य उपसकापासून ते अवतारस्वरुपापर्यंत आपल्या कल्याणाची योजना आपल्याला परिचित करुन दिलेली आहे. असे थोर उपकार करुन ज्या परमेश्वराने जगाच्या उत्पत्तीपासून अंतापर्यंत आम्हा मानवाच्या कल्याणार्थ जे सत्कार्य म्हणून चालविले आहे अशा या सत्कार्यात आपलाही काही अंशत: भाग आहे. जरी आपल्याला अशा कार्यात सहभागी होता आले नाही तरी सहानुभूतीचे कर्तव्य करण्यास काही अडथळा असू नये. आज आपल्या जीवनात ज्या ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या आपल्याला विनामूल्य कोठेही भागवून मिळू शकत नाहीत. आज प्रत्येक मनुष्य एकमेकांच्या सोयीपरत्वे एकमेकाला मदत करण्याचा जरी प्रयत्न करतो आहे तरी त्या मदतीत निस्वार्थ, निरपेक्ष असा भाव अनुभवास येत नाही. प्रत्येकाची मदत करण्याची जी भावना आहे, ती ‘उपकार’ या स्वरुपामध्येच विचारात घेतली जात असल्याने झालेल्या उपकाराची फेड होत नाही अशी खंत वाटत राहते. वास्तविक आपण मानवांतील स्वाभाविक असा जो मानवाता धर्म की, ‘सर्वांभूती आत्मा एक आहे’ ह्या विचाराने जगातील प्रत्येक मानवाने आपापली सुखदु:खे एकमेकांना विचारात घेऊन ती आस्थेने निवारण करावयास पाहिजेत. जी सुखदु:खे तुम्हां मानवांच्या सामर्थ्यापलीकडे आहेत त्यांच्या निवारणार्थ परमेश्वर अवताररुपाने या जगताचा भार वाहतच आहे. अशा परिस्थितीत हे जे सिध्द सत्पुरुष अवतार म्हणून कार्यार्थ येतात त्यांना महान असे जगताचे कार्य करावयाचे असते. पण ह्या जगतामध्ये आपण मानव एक घटक म्हणून आहोत, त्यामुळे आपण या महान अवतारपरंपरेचा लाभ घेत असताना केवळ जगातील दु:खी लोकांंना सुखी करण्यासाठी ही अवतारपरंपरा आहे असा संकुचित विचार करतो व आपल्याला प्राप्त झालेल्या जन्मात केवळ आपणच सुखी कसे होऊ एवढाच विचार करतो. आपल्या सुखाची तरतूद करण्यासाठी त्या परमेश्वराला उपासक अवस्थेपासून ते महाकारणिक अवस्थेपर्यंत म्हणजे अवतार कार्यापर्यंत अनेक जन्म हे तर घ्यावे लागतातच. पण त्याबरोबरच या ऐहिक जगतातील सुखांचा त्यागही करावा लागतो. जेव्हा आपण अशा सिध्द-सत्पुरुषांच्या दर्शनार्थ जाता व अपेक्षित सुखाची याचना करता, अशावेळी निदान असा तरी प्रश्न आपल्या मनाला विचारा की, ज्या सिध्दसाधकांनी अनेक जन्मांपर्यंत प्राप्त झालेला जन्म हा साधन मार्गाने प्राप्त करुन आपल्यासमोर ईश्वरी स्वरुपाचा साक्षात्कार घडविला आहे त्यांच्यापुढे केलेल्या सुखाच्या याचनेचे सुख ह्याचा ह्या जन्मात किती काळपर्यंत उपभोग मी घेऊ शकेन ? एवढी जरी विचारणा जाणीवपूर्वक आपण आपल्या मनाला केलीत तरी तुमच्या पुढे जे सिध्द-सत्पुरुष परमेश्वराच्या विराट अशा अवतारकार्याचे सूत्र हाती घेऊन बसले आहेत. त्यांच्या कृपाशिर्वादास आपण सहज प्राप्त करते व्हाल.

गुरुपौर्णिमा हा सण आपण दरवर्षी साजरा करतो. हा जन्म जो प्राप्त झाला आहे त्यानंतर पुन्हा जन्म प्राप्त होईल की नाही याची शाश्वती नाही व जरी जन्म प्राप्त झाला तरी पुन्हा गुरुप्राप्ती होईल किंवा नाही व झाली तर पुढील कुठल्या जन्मांत होईल हे समजणे कठीण असते. गुरुप्राप्ती झाल्यावर त्यांच्या कृपेंने जन्माचे सार्थक होते हे निर्विवाद आहे. परंतु आजच्या जन्मांत गुरुभेट होईपर्यंत जीवनातील जो काळ वाया गेला याबद्दल जरी आज आपल्याला पश्चाताप वाटतो तरी तशी वेळ पुन्हा पुढील जन्मांत येऊ नये याची दक्षता कुणीही घेत नाही. अनेक सणवार वर्षानुवर्षे जीवनात येतात, पण त्या दिवसाचे महत्व आपण विचारात घेत नाही. दरवर्षी आपण सण साजरे करतो, पण त्यांचे स्मरण रहात नाही. कारण हे सण दरवर्षी येतात. परंतु ज्या जीवनात हे सण साजरे करावयाचे तो जन्म पुन्हा केव्हा येईल हा विचार जर आपण केला तर मग खऱ्या अर्थाने दसरा व दीपावली आपण प्राप्त जन्मात साजरी केली काय, हा प्रश्न आपणास स्वत:ला विचारावा लागेल. ह्या सणाप्रमाणे गुरुपौर्णिमाही दरवर्षी येते. हा दिवस गुरुऋणाची फेड करण्यासाठी आहे. त्या दिवशी आपण गुरुपूजन करतो ते केवळ द्रव्यमाध्यमातून, पण त्याने गुरुऋणाची फेड होत नाही. ज्यांच्या कृपेने आपण सज्ञान झालो, नावारुपाला आलो किंबहुना ह्या जन्माची सार्थकता करता आली, त्या गुरुऋणाची फेड कदापिही करता येणार नाही. जर आपल्या प्राप्त जन्मातील थोडेबहुत आयुष्य इतरांच्या कल्याणार्थ खर्ची पडले तरच ही फेड अल्पांशाने होऊ शकते.

माझ्या आयुष्यातील गेली पन्नास वर्षे गुरुपौर्णिमा ह्याच दिवशी मी दसरा व दीपावली साजरी करीत आलो. त्यानिमित्त केवळ मुलाबाळांना कपडे, दागदागिने केले नाहीत तर खऱ्या अर्थाने सण साजरे केले व त्यावेळी स्वत:ला असा प्रश्न विचारला की “दसरा जरी साजरा  होत असला तरी जीवनांत सीमोल्लंधन झाले काय ? ” त्याचप्रमाणे “दिवाळी साजरी झाली तरी ज्या जगात आपण जगतो आहोत त्या जगाला ‘प्रकाश’ म्हणजे ज्ञान देता आले काय” ? ह्या रीतीने जीवन जगता यावे म्हणून श्रीसद्गुरुंनी जी कृपा केली तो दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा !  पण हा अनुभव अनुभवण्यासाठी पन्नास वर्षात गुरुंना दक्षिणा म्हणून काय दिले ? त्यासाठी तन, मन, धन हे द्यावयाचे असते. येथे धन म्हणजे पैसा नव्हे. पैशाने जे खरिदताच येत नाही असे सर्व गुरुंना अर्पण करावयाचे व ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे’ असे जे मन तेही गुरुंना समर्पण करावे लागते.

गेली पन्नास वर्षे मी एकाच गुरुचे नांव घेतले. नामस्मरण त्यांचेच केले. जीवनात सुखदु:खे आली ही पण त्यांची कृपा. त्यांच्या कृपेने हे जे कार्य आपल्यासमोर ठेवले ते कार्य करण्याची प्रेरणा त्यांनीच दिली. त्याप्रमाणे मी त्यांची आज्ञा हिचा कृपा म्हणून स्वीकार केला. जीवनारंभी अडीच वर्षे माधुकरी मागून सेवा केली. इतरांच्या दृष्टीनें ते दु:ख असेल पण आज जेवढी सुखे मला मिळाली यापेक्षा मी अधिक सुखी त्यावेळी होतो. माधुकरी मागताना ती त्यांच्यासाठी मागितली. कारण देवासाठी भीक मागणे हयात केवढा स्वाभिमान आहे !

पन्नास वर्षे हा दिवस मी नित्याने साजरा केला. गुरुपौर्णिमा हा सण मला इतर सर्व सणांपेक्षा मोठा वाटला. लोकांना दरवर्षी दसरा व दीपावली ही मोठी वाटते. कारण ह्या दिवशी गोड जेवण मिळते. शिवाय कपडे अलंकार इत्यादिही करतात. दसरा व दीपावली हेही सण मी साजरे केले, पण ते गुरुपौर्णिमेला आशिर्वाद घेऊन साजरे केले. माझ्या जगद्गुरुंनी आपले नांव त्रिभुवनात अजरामर केले. तो दिवस म्हणजे दसरा होय. मी दरवर्षी दसऱ्याला परमपूज्य बाबांना हे मागितले की “जगाला सुखी करण्यासाठी आशिर्वाद द्या. शतकानुशतके समाज हा अंधश्रध्देमध्ये जगतो आहे. त्यांच्या जीवनात दसऱ्याला सीमोल्लंघन करा. हेच मागणे तुमच्या पायाशी जन्मभर मागेन की जेणे करुन समाज जागा होऊन तुमच्या नामस्मरणात धुंद होईल”  त्याचप्रमाणे दीपावली केली व प्रार्थना करीत आलो की, ‘देवा ज्ञान दे. त्या ज्ञानामुळे आंधळ्या समाजाला दृष्टी लाभू देत. जगाला ज्ञानी म्हणजे प्रकाशमय कर’, एवढे मागणे मागता मागता आज पन्नास वर्षे झाली तरी अजून दसरा व दीपावली झाली नाही असे मी म्हणतो. मग गुरुपौर्णिमा किती दूर आहे याचा विचार करा.

यापुढे गुरुपौर्णिमेचा दिवस नुसता साजरा करावयाचा नसून पुढे येणारी दसरा-दीपावली ही मला गुरुकृपेने जगासाठी साजरी करावयाची आहे हे आता आपण लक्षात घेतले पाहिजे, तरच आपण गुरुपौर्णिमा साजरी केली असे म्हणता येईल. गुरुकृपेचे स्तवन गाणे व भाषणे करीत बसणे ह्यात शेकडो वर्षे गेली. पण गुरुंची कृपा ही गाणे व भाषणे यानी संपादन होत नाही. हे जीवन स्वत:साठी नाही. स्वत:साठी केवळ चार आणे असून बारा आणे जीवन दुसऱ्यासाठी आहे. असे हे बारा आणे जीवन जे आहे त्याचा विनियोग जगासाठी कसा करता येईल याचा बोध सज्ञान होऊन आपण भक्तांनी घ्यावा अशी परमपूज्य बाबांच्या चरणी मी प्रार्थना करीत आलो आहे. याचे कारण जी सृष्टी निर्माण झाली आहे, तिचा शोध आम्हा मानवांना अजूनपर्यंत लागलेला नाही. प्राणीमात्रांमधील उत्क्रांति व मानवी उत्पत्ती याबद्दल शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे, पण निश्चितपणे काहीही सांगता येत नाही. ‘कर्मवाद’ हा विषय हिंदूधर्मात आला. पुनर्जन्म नाही असे ख्रिश्चन मानतात. मुसलमान, जैन, बौध्द यांनी आपापल्यापरीने याबाबत वाद निर्माण केले आहेत. तरीसुध्दा निश्चित असे कोणीही काही सांगू शकत नाहीत किंवा सिध्द करु शकत नाहीत. पूर्वीच्या युगात देवधर्म हा विषय अस्तित्वात आला. पण ज्याची प्राप्ती करावयाची त्यासाठी निश्चित काय करावयाचे ? कोणत्या मार्गाने गेल्यावर ही प्राप्ती होईल ? की देवाच्या नानारुपांबद्दल अंधश्रध्दा मानून स्वस्थ बसावयाचे ? असे हे बिकट प्रश्न आजपर्यंत कोणालाही शास्त्रपरत्वे सिध्द करता आले नाहीत. म्हणून परमपूज्य साईनाथ महाराज यांच्या कृपेने ‘मानवता युग’ याची निर्मिती करण्याची जबाबदारी आज आम्हा सेवकांची आहे असे म्हणता येईल. यासाठी काय केले पाहिजे हे सोप्या कार्यपध्दतीने भवितव्यात जगाला पटले पाहिजे. यासाठी असा शास्त्रशुध्द मार्ग शोधला पाहिजे की, ज्याला कोणत्याही धर्माचा विरोध होता कामा नये. कोणता धर्म श्रेष्ठ याबाबत वादविवाद करुन चालणार नाही. असे साधन आज समाजापुढे ठेवले पाहिजे की ज्यामध्ये समाजाचे कल्याण होईल. मानवी जीवनातील जुनी मते व नवी विचारसरणी या दोघांनाही मान्य करावे लागेल, असे जे साधन त्याचा शोध घेणे आवश्यक आहे.

‘कर्मवाद’ याचा विचार केला तर कर्माचा आरंभ कोठे याचा शोध घेणे हा एक प्रश्न आहे. आजपर्यंत कर्मवाद व कर्माची फले हा विषय तत्वज्ञान म्हणून विचारात येऊन काही युगे खर्ची पडली तरीसुध्दा कर्माचा आरंभ केंव्हा व कोठे झाला हे ठरविता येत नाही. या तत्वज्ञानातून इतक्या पळवाटा काढल्या गेल्या आहेत की, मानवाला बुध्दी आहे किंवा नाही हा विचार मनात येतो. ह्या शोधाशोधीचा शेवट होणार की आपला शेवट होणार हाच प्रश्न आहे !

प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे आचरण ठेवावे हे खरे. तरी धर्म म्हणून कोणते आचरण ठेवावे ह्याचा मार्गदर्शन करीत असणाऱ्या धर्मसंस्था आपल्या स्वार्थापलीकडे विचार नाहीत. दुसरी बाजू समाजाची. आज धर्माचरण करावयाचे म्हटले तरी आपली मातृभाषा आपल्याला येत नाही व कदाचित समजत असली तरी तिचा अर्थ न कळल्यामुळे अधिकच गुंतागुंत झालेली आहे. मग असा विचार येतो की, ह्या समाजात धर्माबद्दलचे एवढे तत्वज्ञान कशासाठी निर्माण झाले ? एकमेकामध्ये वितुष्ट, वाद आदि निर्माण होण्यासाठी झाले काय ? यापेक्षा प्राचीनकाळी रानटी असे ज्यांना आपण संबोधतो ते मनाने तरी सुसंस्कृत होते. याचा अर्थ सुसंस्कृत म्हणण्यासाठीसुध्दा अजून मानवी जीवन हे अज्ञानी असून त्या अज्ञानाचाच शाप आपण भोगतो आहोत असे म्हणावे लागेल. आजची समाजाची परिस्थिती अशी आहे की, एक नास्तिक तर एक आस्तिक व तिसरा दोन्ही मानणारा. म्हटले तर नास्तिक म्हटले तर आस्तिक. अशा परिस्थितीत समाजाची घटना जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे वाद कोठपर्यंत चालणार आहेत ? ह्याचा शेवट तरी गोड होणार आहे का ? आज समाजातील एक भाग इहजन्माचा आस्थापूर्वक विचारही करीत नाही व समाजातील एक भाग इहजन्माचा विचार करतो आहे. तो मोक्षप्राप्तीच्या मागे लागला असून आपल्या जन्माचे कर्तव्य काय हा स्वत:ला प्रश्न विचारीत नाही.

वर उल्लेख केलेला विषय की, ज्यामुळे समाज इहजगतात सुखासमाधानाने रहावा म्हणूनच परमपूज्य साईनाथ महाराजांनी अवतार कार्य केले. ह्या अवतार कार्यात ‘ईश्वर सर्वत्र आहे’, ‘सर्वांवर प्रेम करणे हा मानवाचा धर्म आहे’ ही दोनच तत्वे आहेत. ह्या दोन तत्वांचा विचार करुन ती आचरणात आणली तर कोणत्याही धर्माचा किंवा तत्वज्ञानाचा अधिक विचार करण्याची गरज नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाला ह्या ‘महामंत्राने’ ही जागृती होईल की, ‘माझ्या जन्माला येण्याचे कर्तव्य माझ्या जीवनात परमपूज्य बाबांच्या कृपेने घडू देत’. आजपर्यंत साधकांनी व उपासकांनी ‘हा मंत्र श्रेष्ठ की तो मंत्र श्रेष्ठ’ या वादात ज्यांना सन्मार्गाची ओढ लागली होती अशांना योग्य त्या दिशेला जाण्याचा प्रकाश न दाखविता जे जीवन आधीच अंधारात होते त्यात आणखी एका मंत्राची भर घातली. प्रत्येक मंत्राचा उच्चार ॐ कारने होतो. हा ॐ कारच जर सिध्द झाला नाही तर मंत्राच्या उच्चाराचा उपयोग नाही. म्हणून परमपूज्य बाबांच्या कृपेने प्रथमत: ॐ  हा मंत्र सिध्द करुन दिला. कारण विश्वोत्पत्तीचे सूत्र ह्या ॐ कारामध्ये आहे. सृष्टी जेव्हां निर्माण झालेली नव्हती तेव्हां ॐ  कार म्हणजे ‘ध्वनि व प्रकाश’ हे अस्तित्वात होते व आजही आहेत.

आजही प्राप्त झालेला जन्म दुर्लभ आहे. त्यामध्ये अडीअडचणी निमित्ताने आपण गुरुमार्गी झालो. परंतु त्यामुळे इहजन्मात गुरुंची भेट होऊन त्यांच्या उपदेशाप्रमाणे जी साधनसेवा करण्याचा लाभ आज होत आहे, ती सेवा अडीअडचणींना विचारात घेऊन करणे हे योग्य नाही. अनेक भक्त दीक्षेचा स्वीकार करतात. अडीअडचणींचे निवारण होऊन सुखाचा लाभ व्हावा म्हणून साधना करतात. यामध्ये साधनेतील विषय हा ईश्वरप्राप्तीचा असला तरी साधना करीत असलेली व्यक्ती ही ऐहिक सुखप्राप्तीचा विषय विचारात घेत असल्याने ईश्वरप्राप्तीही होत नाही व अपेक्षित सुख हेही वाट्याला येत नाही. जर साधना हाच विषय विचारात घेतला तर न मागता सुख आपल्या वाट्याला येईल.

आपण जन्माला आल्यानंतर आपला संबंध स्वत:पुरताच नसून ह्या जगासाठी आहे. केवळ आपल्या जीवनातील बऱ्यावाईटाचा आपण जो विचार करतो हा इतका संकुचित विचार न करता, “मी जर स्वत:चे नुकसान केले, तर जो माझ्या जीवनात जगाशी संबंध आहे त्यांचे भवितव्यात मी नुकसान करीत आहे”, ही जबाबदारी यापुढे आपण विचारात घ्यावयाची आहे. पूर्वी आपण मार्गदर्शनार्थ येऊन आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होतात व तत्प्रीत्यर्थ इष्ट ती सेवा सूचित करण्यात आल्यामुळे आपण साधनसेवेचा अंगिकार केलात. पण यापुढे आपल्याला अपेक्षीत सुख प्राप्त झाले किंवा नाही तरीसुध्दा “मी करीत असलेली सेवा हिचा लाभ होत नाही पण जर इतरांना तिचा लाभ होत असेल तर ह्या कर्तव्याची जाणीव मला ठेवली पाहिजे”, असा विचार यापुढे करणे आवश्यक आहे. आपण भक्तांना जी ॐ कार साधना सूचित केली आहे तिच्यामध्ये केवळ ईश्वरप्राप्ती एवढाच विषय नाही. हे विश्व आपण निर्माण केले नसून ते ईश्वराने निर्माण केले आहे. त्याचा अंश म्हणून आपण जन्माला आलो आहोत. त्याचप्रमाणे अनेक जीव जन्माला आले आहेत. तेव्हा केवळ एखाद्या साधनेमुळे आपल्याला ईश्वर प्राप्ती व्हावी यापेक्षा ‘तसा ईश्वर इतरांना का प्राप्त होत नाही ?’ असे म्हणून साधना केली तर ती अधिक फलदायी होईल.

गतकाळाचा विचार केला तर आम्ही मानवांनी जीवनाचा उपयोग कशासाठी केला असा प्रश्न आहे. त्या काळात मुबलक खाणेपिणे, ऐश्वर्य व सुखात जीवन व्यतीत केले व वेळ जाण्यासाठी म्हणून धर्माचरण व देवादिकांंच्या मार्गाचा स्वीकार केला. त्याचप्रमाणे विज्ञानमार्ग व ज्ञानमार्ग यांचाही अंगिकार केला. पण विज्ञानमार्गाचा अधिक अवलंब करुन आज शेकडो वर्षात जी आम्हां मानवांची प्रगती  झाली आहे त्यामुळे जीवन हे जरी गतिमान झाले असले तरी आम्ही प्रगतीपथावर नसून एक ना एक दिवस ह्या विज्ञानाच्या गतीने आमच्या जीवनाचा नाहीतर जगाचा संहार होणार आहे. वास्तविक ज्ञानमार्गाने जगाचा सांभाळ करावयाचा असून जगात शांतता, सुख, समाधान सर्वांना लाभावे अशी धारणा मूळ विषयांत होती. परंतु आज प्रगतीची स्पर्धा एकमेकांमध्ये चालू असून विज्ञानामनध्ये सर्व जगाचा समावेश झाला आहे. ही स्पर्धा दिवसरात्र चालू असून कोणासही मानवी जीवनाबद्दल आस्था नाही. जन्माला येण्यापूर्वीच त्याचे मरण कशात आहे याचा शोध घेतला जात आहे. जन्माला येणे हे किती महत्वाचे आहे हा विषय कुणीही अभ्यासात घेत नाही. मानवी जीवनाची प्रगती याचा अर्थ जीवनांत आचार, विचार व उच्चार यांचे कार्य समप्रमाणात झाले पाहिजे व तसे ते झाले तरच आपण सुखाचे वाटेकरी होऊ. पण आज सर्वत्र नुसता विचार, अति विचार, हीच क्रिया होत गेली असल्याने मानवी मनाचे अस्तित्व शिल्लकच राहिलेले नाही. त्यामुळे मनाचा आविष्कार अशा ज्या क्रिया म्हणजे दया, क्षमा, शांती यांचे अस्तित्व कोणाही मानवाच्या ठायी अनुभवास येत नाही.

मानवी जीवनात काया, वाचा, मन ह्या अवस्थांचे कार्य सारख्या प्रमाणात होत असेल तर मानवी जीवन सुख-शांती-समाधानाचा लाभ घेते होईल. परंतु विज्ञानाच्या शास्त्राधारे फक्त मन ह्या अवस्थेचा विकास व त्याची गति इतकी झाली आहे की, त्यामुळे लहान मुलापासून वृध्दापर्यंत आज कुणातही स्थिरता नसून मनाची एकग्रता किंवा शांतता ही अनुभवास येत नाही. ही शांतता जगतात नांदावी असा दोन्ही – ‘ज्ञानी’ व ‘अज्ञानी’ – वर्गाचा प्रयत्न चालू असून आपापल्यापरीने प्रत्येकजण प्रयत्न करीत आहे. त्या प्रयत्नांचा विषय जरी एक असला की जगतात शांतता नांदावी तरी ज्यामुळे शांतता निर्माण होईल त्या विषयांची अंगे भिन्नाभिन्न तत्वज्ञान, आचारविचार व रुढीपरंपरा यांनी अंगिकारली गेली असून त्यांनी आम्हा मानवांना या विसाव्या शतकात ग्रासले असल्यामुळे नुसती शांतता निर्माण व्हावी असे शब्दांनी जरी व्यक्त केले तरी ती होण्यासारखी नाही. जोपर्यंत आपण एकमेकांना अन्य पातळीवर पाहून, भिन्नाभिन्न आचार, विचार व रुढीपरंपरेने वागतो आहोत, जगतो आहोत, तोपर्यंत शांतता पहावयास मिळणार नाही. यासाठी प्रथमत: परमपूज्य साईनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपण कुठल्याही धर्माचे, कुठल्याही देवाचे, कुठल्याही आचार-विचारांचे उपासक असलो तरी त्याबद्दलचा कर्मठपणा याचा समाजामध्ये प्रचार न करता जर प्रथमत: आपण या विश्वात एकमेकांना ‘विश्वबंधुत्व’ या नावाने ओळखले नाही व त्याप्रमाणे विश्वबंधु या नात्याने ओळखले नाही व त्याप्रमाणे विश्वबंधुत्वाचे प्रेम निर्माण केले नाही तर रहात असलेल्या या विश्वात सुखशांती लाभावी याऐवजी ह्या विश्वाचा शेवट अज्ञानाच्या प्रलयामध्ये होणार ही गोष्ट सत्य आहे.

जगाच्या उत्पत्तीपासून मानवी जीवनाच्या कल्याणार्थ अनेक अवतार ईश्वर घेता झाला आहे. त्यापैकी एकाला मानले तर त्यामुळे इतरांचा अनादर होतो अशातला भाग नाही. ह्या विसाव्या शतकात आपण असा विचार केला पाहिजे की, जो अनादि अनंत असा ईश्वर तो एकच असून जनकल्याणार्थ तो पुन्हा पुन्हा अवतार घेतो आहे, म्हणजेच अवतार कार्याचे सूत्र उत्पत्ती, स्थिती, व लय किंवा Power of Trinity याचे आधीन असून या व्यतिरीक्त कुणीही चौथी शक्ति अवतार म्हणून जन्माला आलेली नाही. अनादि अनंत कालात होऊन गेलेले अवतारी पुरुष यांच्याबद्दल जरी आदर असला तरी विसाव्या शतकातील ज्या ईश्वरी अवताराने जगाच्या सद्यपरिस्थितीचा विचार केला अशा दिव्य अवताराचा विचार आम्ही ईश्वरभक्त होणाऱ्या भक्तभाविकांनी केला पाहिजे.

प्रेमळ भक्तभाविकांनो, वरील सर्व निवेदनात मी आपल्या अज्ञानासंबंधी किंवा आपण आपले आयुष्य जे अज्ञानाने व्यतीत करीत आहात त्याबद्दल आस्थेने जे चार शब्द सद्गुरुकृपाशिर्वादाने आपल्यासमोर मांडले आहेत, त्यामागे माझ्यावर जन्मोजन्मी ज्यांची कृपा अखंड झाली आहे त्यांच्या कृपेमुळे मी तुम्हां सर्वांपेक्षा अधिक सज्ञानी व ज्ञानी झालो आहे असे सांगण्याचा माझा हेतू नाही. मी आजपर्यंत परमेश्वराजवळ अनन्य भक्तिभावनेने हेच मागत आलो आहे की, “परमेश्वरा, तू माझ्यावर अखंड कृपादृष्टी ठेवून हे जगत्कल्याणाचे कार्य करण्याची योग्य संधि मला दिली आहेस ते कार्य नि:स्वार्थ, निरपेक्ष बुध्दीने माझ्याकडून करवून घे. पण केलेल्या सेवेचा यत्किंचितही अहंकार माझ्या ठिकाणी निर्माण होऊ न देता लहानात लहान असे अज्ञानी बालरुप देऊन मी केलेल्या सेवेचा आनंद मला माझ्या प्राप्त जीवनांत अनुभवू दे”. आज गेली पंचवीस वर्षे प्राप्त झालेले माझे जीवन तुम्हा भक्तांच्या कल्याणार्थ जे व्यतीत केले गेले त्याची इतिसार्थकता ही परमेश्वरी कृपेने तर वेळोवेळी झालेलीच आहे, त्याशिवाय ज्या परमेश्वराने मला कृपाशिर्वाद देऊन सार्थ केले त्या कृपाशिर्वादाची साध्यसिध्दता करण्याचा लाभ तुमच्या जीवनातील अडीअडचणी निवारणार्थ तुम्ही माझ्या जीवनाशी सहभागी होऊन मला दिलात, त्यामुळेच मी आज ह्या जगात नावारुपाला आलो असलो तरी तुम्ही आपल्या जीवनातील बहुमोल असा जो सुखदु:खाचा वाटा मला, माझ्या कल्याणार्थ दिलात, याबद्दल उदार अंत:करणाने आपले आभार मानतो.

वर लिहिले गेलेले हे निवेदन तुम्हा भक्तांच्या कल्याणार्थ व पुढील जन्मांची तरतूद करण्यासाठी गुरुकृपाशिर्वादाचे प्रतिक म्हणून तुम्हाला सादर करीत आहे. ह्या गुरुकृपाशिर्वादाच्या प्रतिकात निराकरण, निवारण व आचरण यांचा उल्लेख हा केवळ शाब्दिक स्वरुपाचा नसून जो निराकरण, निवारण व आचरण यापध्दतीचा उपचार सूचित केला आहे, हे सर्वसिध्द साधन मी माझ्या सिध्दसाधनमार्गातील पुण्यविभूती यांना औपचार म्हणून अर्पण केले आहे. त्यामुळे स्वाभाविक ही सर्व निराकरणे सर्वसिध्द असून सुलभ, सोप्या अशा आचारविचाराने ह्या जन्मी व जन्मोजन्मी त्यांचा लाभ सहजासहजी करुन घेता येईल अशी भक्तिभावनात्मक इच्छा सर्व विभूतींचे चरणी आपादमस्तक ठेवून व्यक्त करतो.

जो हा ‘गुरुप्रसाद’ आज आपल्याला गुरुकृपाशिर्वाद म्हणून भेट देण्यात आलेला आहे, तो आपण आस्थापूर्वक वाचून आपल्या कुटुंबातील बालगोपाळांपासून वयोवृध्द व्यक्तींना निवेदन करावा. यामागील सद्हेतू असा आहे की, ज्यांचे बालवय आहे त्यांच्या प्राप्त जन्माचा विकास हा योग्य मार्गाने तर होईलच, पण ज्यांची वार्धक्य अवस्था आहे, त्यांनाही काही पारमार्थिक ज्ञान झाल्याचे समाधान ह्या जन्मात लाभेल. बालापासून वार्धक्य अवस्था प्राप्त झालेल्या आम्हा मानवांना तारक असा हा गुरुप्रसाद की, जो आज गुरुआज्ञेने लिहिण्याचे भाग्य मला प्राप्त झाले तो हा गुरुप्रसाद मी त्या थोर व श्रेष्ठ अशा सर्व सिध्दसत्पुरुषांच्या चरणी सर्व भक्तभाविकांच्या भक्तियुक्त श्रध्दाभावनेचे प्रतिक व आदर म्हणून अर्पण करतो.

आपण भक्तांच्या सान्निध्यात गेली पंचवीस वर्षे या सेवेत व्यतीत केल्यावर आपण भक्तांना भक्तिभावनेने शेवटचे एकच मागणे मागावयाचे आहे की, हे जे कार्य गुरुआज्ञेने मी आपण भक्तांच्या कल्याणार्थ उभे केले ते कार्य हा केवळ माझ्या इच्छेचा विषय नव्हता व त्यापासून मला या जन्मांत आनंद किंवा मोठेपणा मिळविण्यासाठी माझा हेतू नव्हता. जन्मोजन्मी माझ्या माध्यमाला उपासनादीक्षेपासून ते सिध्दावस्थेपर्यंत ज्यांनी वेळोवेळी हाकेला ओ देऊन सर्वसिध्द केले अशा त्या माझ्या गुरुंच्या कृपाशिर्वादाचे हे मंदिर आहे. ह्या मंदिराची योग्य ती पूज्यता राखणे व त्याचा योग्य तो लाभ जगातील इतर लोकांना  करुन देणे हे जसे तुमचे कर्तव्य आहे तसे ह्या कार्यार्थ माझ्यापासून ते नियुक्त सेवकांपर्यंत ज्यांचा ह्या कार्यात सहभागी होण्याचा वाटा परमेश्वराने  नियुक्त केला आहे, अशांची या कार्याबद्दलची योग्य अशी भूमिका व त्या भूमिकेपरत्वे योग्य असे आचरण व विचार जर चुकूनही अयोग्य मार्गाला जात असतील तर त्याची जाणीव करुन देण्याचे इष्ट कर्तव्य तुम्ही कदापिही करावयास विसरु नये, एवढेच आपणा सर्वांस मागावयाचे आहे. आपण भक्तांच्या कल्याणार्थ हे कार्य ज्या थोर अलौकिक पुण्य विभूतींंच्या कृपाशिर्वादाने चालले आहे व ज्यांच्या कृपाशिर्वादाचा लाभ आपण भक्तांनी घेऊन प्राप्त जीवनात सुख-शांती-समाधान अशा ऐहिक सुखाचा लाभ घेतला आहे, त्याचबरोबर आपण भक्तांना पारमार्थिक सुखाचाही लाभ न मागता प्राप्त झाला, त्या थोर पुण्य विभूतींचे आम्हा भक्तांवर अनंत उपकार आहेत. आज त्यांच्या चरणी अशी प्रार्थना करु की, “आज आम्ही गुरुभक्त, पुण्यविभूती यांचे चरणी विनम्र भावनेने अशी प्रार्थना करीत आहोत की, आम्हा मानवांना प्राप्त जन्माचे ज्ञान व्हावे व प्राप्त जन्मात सुख, शांती, समाधान व परोपकाराचे इष्टकर्तव्य आमच्या हातून घडत रहावे अशी शिकवण अनादिकालापासून आजपर्यंत वेळोवेळी अवतार घेऊन आम्हा मानवांना आपण दिलीत. परंतु इहजन्मात जे कर्तव्य आम्हा मानवांना करणे भाग आहे त्याचा विसर पडल्यामुळे आजची जगाची परिस्थिती फार बिकट झाली आहे. त्यामध्ये आवश्यक तो बदल घडविणेे, हे आपल्या कृपाशिर्वादाशिवाय होणे शक्य नाही. तरीसुध्दा आपण विभूतींनी कृपावंत होऊन सोप्यात सोपा असा मार्ग आम्हा मानवांना सूचित केला आहे. अशा मार्गाचे पालन व कर्तव्य आमच्या हातून नि:संकोच घडत रहावे व ह्या सुखशांतीचा लाभ आमच्या जीवनात होऊन ईश्वरप्रणीत मानवी जीवन आदिंचा लाभ घडत रहावा अशी आपल्या चरणी प्रार्थना.

आज दिवसापर्यंत मानवी कल्याणासाठी जी साधने परमपूज्य साईनाथ महारांजानी शिकविली आहेत, त्याबद्दल आम्ही जन्मोजन्मी त्यांचे ऋणी राहू. पुनश्च तसा अपराध व प्रमाद आमच्या हातून घडू नये अशी सद्बुद्धी परमपूज्य सद्गुरु साईनाथ महाराज, श्रीनवनाथ आदि विभूती व देवदेवता यांनी आम्हाला व आमच्या भावी पिढ्यांना द्यावी अशी अनन्य भावनेने प्रार्थना करीत आहोत”.

अध्याय ९. ॐ कार साधना.<<