अध्याय २ – भक्तभाविकांची कार्यार्थ भूमिका

या कार्यपध्दतीचा लाभ घेण्यासाठी जेव्हा आपण भक्त कार्यकेंद्रावर उपस्थित होता, तेव्हा कार्यासंबंधीची माहिती आपल्याला कोणीतरी तेथील भक्त की, ज्याने तेथील निराकरण पध्दतीचा लाभ घेतला आहे, त्याच्याकडून कळते. यापेक्षा अधिक कार्यासंबंधीची ओळख आपणास होत नाही. प्रत्येक मानवाची जीवनाद्दलची अपेक्षा अशी असते की, प्राप्त जन्मात सुख-शांती-समाधान, विद्या-संपत्ती-संतती-दीर्घायुष्य आदिचा लाभ व्हावा. अशा या स्वाभाविक अशा जीवनातील गरजा व त्यांची योग्य तऱ्हेने प्राप्ती न होण्याची कारणे शोधून काढणे व त्यांचे निराकरण करणे हा या कार्याचा सद्हेतू आहे. हा सद्हेतू सद्गुरुकृपाशिर्वादाने व नाथपरंपरेच्या सिध्दसिध्दांत पध्दतीने मनुष्याला ऐहिक व पारमार्थिक अशा दोन्ही सुखांचा लाभ करुन देण्यास जरी समर्थ आहे तरी त्याचा लाभ तुम्हा भक्तांना होण्यास जेव्हा विलंब लागतो, तेव्हा विलंब लागल्यामुळे ऐच्छिक सुख प्राप्त होण्यास विलंब का लागला ? याचा सूज्ञ विचार न करता, अन्यत्र कोणीतरी साधक आपल्याला अपेक्षित सुखाची प्राप्ती लवकर करुन देईल म्हणून आपली मार्गदर्शनाची दिशा अज्ञानाने बदलता. अशावेळी आपण आपली महत्वाची जबाबदारी न ओळखता दुसरीकडे मार्गदर्शनार्थ जाता. अशा जाण्याने वावगे असे काहीच तुमच्या दृष्टिने घडत नाही. पण गुरुमार्गाच्या दृष्टिने ही तुमची कृती तुमच्या जीवनाला अपायकारक असते. कारण अडिअडचणि निवारणार्थ केले गेलेले निराकरण ही गुरुकृपाशिर्वादाची ठेव व भेट असते, ती आपण स्वीकारताच कार्यान्वित होण्यास सुरुवात करते. तो कृपाशिर्वाद कार्यार्थ आपण स्वीकारल्यावर आपल्या जीवनातील प्रतिकूल अशा परिस्थितीची जी तीव्रता तुमच्या जीवनासभोवर वलय रुपाने तुम्हाला दु:ख तथा अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत होत असते, अशा वलयातील या दोषांची तीव्रता कमी करुन ती वलये अनुकूल करुन देण्याचे कार्य हा गुरुकृपाशिर्वाद करीत असतो. दु:खनिवारणार्थ निराकरणानंतर कृपाशिर्वादाचे प्रतिक म्हणून, जे श्रीफल आपण भक्तभाविक स्वीकारता ते आपल्याला गुरुकृपाशिर्वादाने देण्यात आल्यावर ते श्रीफल गुरुकृपाशिर्वादाचे वलयच असते. पण आज आपण कृपाशिर्वादाचे वलय देहमाध्यामातून धारण करण्यास असमर्थ आहात म्हणून श्रीफल हे माध्यम कृपाशिर्वादार्थ उपयोगात आणावे लागते. आता अशा कृपाशिर्वादाच्या कार्याला सुरवात झाल्यावर जो लागणारा वेळ आहे तो तुमच्या जीवनातील कमी-अधिक प्रमाणामध्ये असणाऱ्या दोषांच्या अनुकूल-प्रतिकूलतेवर अवलंबून आहे. पण हा बोध आपण लक्षात न घेता, गुरुकृपाशिर्वादातच काही कमतरता आहे अशा विचाराप्रत जाऊन अधिक दु:ख वाढविण्यास कारणीभूत होता.

आज आपण भक्तांना इच्छित सुख-शांति प्राप्त करण्यासाठी ज्या कार्याची स्थापना गुरु आज्ञेने करण्यात आली, त्या कार्यार्थ लागणाऱ्या सर्व सिध्दसाधन पध्दती ह्या साधक अवस्थेतील माध्यमाला पूर्णत्वाने प्राप्त झाल्या आहेत की नाहीत याची परीक्षा वेळोवेळी श्रीसद्गुरुनी घेतल्यावरच साधक माध्यमास या कार्यार्थ नियुक्त केले आहे. हे आपण जाणत नसल्याने आपणही वेगळ्या प्रकाराने किंवा विचाराने साधकाला प्राप्त झालेल्या गुरुकृपाशिर्वाद, की जी आशिर्वादाची ठेव मानवी जन्माच्या मूल्यापलीकडे आहे, त्या कृपाशिर्वादाची परीक्षा केवळ ऐहिक विषयाधीन होऊन घेण्याचा प्रयत्न जो करता, तो न करता सुलभ व सोप्या मार्गाचा अवलंब करावा. तो म्हणजे अडिअडचणी निवारणार्थ दिला गेलेला प्रसाद याची प्राप्ती होण्यासाठी आपण आजपर्यंत कधीही विनम्र भक्तिभावनेने परमेश्वराला शरण गेलो नाही याची जाणीव ठेवून दिला गेलेला कृपाशिर्वाद हा भक्तिभावनेने मार्गदर्शना प्रमाणे पूजनादि विधी करुन त्याच्याशी एकरुप व्हावे. याउलट आपली भूमिका व आपले विचारांचे माध्मम आपण अडिअडचणीशी गुंतवून ठेवता, त्यामुळे कृपाशिर्वाद मनाने धारण केल्याशिवाय आपल्या अडिअडचणी निवारण होणार नाहीत, हे न समजल्याने कृपाशिर्वादाचा स्वीकार नाईलाजास्तव करता व अडिअडचणी निवारण का होत नाहीत याचा विचार न करता आपल्या अपेक्षित इच्छा-अपेक्षा ह्या कार्यात पुऱ्या होणार नाहीत म्हणून दुसरीकडे याच प्रश्नाची विचारणा करण्यासाठी धाव घेता. पर्यायी हे कार्य जरी तुमच्या अनेक जन्मांची, सुख-शांती-समाधानाची तरतूद करण्यास समर्थ असले तरी केवळ तुमच्या अज्ञानी विचारामुळे व वागण्यामुळे या कार्याला कमीपणा आणण्याचे कर्तव्य तुम्ही करता. वास्तविक ज्या तुमच्या ऐहिक गरजा आहेत, त्या तुम्हाला प्राप्त करुन देणे हे कार्य गुरुसामर्थ्यापलिकडचे नाही. तरीसुध्दा जोपर्यंत जीवनात ‘गुरुकृपाशिर्वाद’ हा प्रधान विषय म्हणून आपण स्वीकारीत नाही तोपर्यंत जगातील अनेक साधकांच्या साधक मार्गाचा किंवा निराकरणाचा जरी लाभ घेतलात तरी क्षणिक सुखापलीकडे तुमच्या जीवनाला निरंतर अशी निर्भय सावली प्राप्त होणार नाही. आपण भक्तभाविक कार्याच्या मार्गदर्शनार्थ आल्यानंतर आपल्या जीवनमाध्यमाचे गुरुकृपाशिर्वादाने निरिक्षण करण्यात येते त्यावेळी प्राप्त झालेल्या जीवनमाध्यमात पूर्णत्व न दिसता ते असंख्य अशा आचारविचाराच्या निरर्थक अशा कारणाने मोडकळीस आले आहे असे अनुभवास येते. याचे कारण आज प्राप्त झालेल्या जन्माचे यथोचित ज्ञान करुन घेऊन यथायोग्यवेळी त्या जीवनावर संस्कारादि गोष्टीची जी आवश्यकता होती त्याकडे आपण सर्वजण दुर्लक्ष करीत आलात. असे हे महत्वाचे विधी जीवनारंभी बाल्यावस्थेपासूनच होण्याने देहिक व आत्मिक या दोन्ही माध्यमांच्या विकासाला सारखेपणाने विकसित होण्यास वाव मिळतो. परंतु देवचिंतन, धर्माचरण आदि गोष्टी या वार्धक्यावस्थेत प्राप्त करावयाच्या असतात, अशा अज्ञानी कल्पना मुळाशी धरुन जीवनाचा विकास बाल्यावस्थेपासून होण्याने पुढील आयुष्य विकसित होऊन इष्टकर्तव्ये पार पाडण्याचे सामर्थ्य ज्या विधीतून किंवा संस्कारातून मिळत असते अशा संस्कारांना स्वतःच्या व कुटुंबांच्या जीवनापासून अलिप्त ठेवून तुम्ही आज आपली दुखे निवारण करु इच्छिता. जीवनारंभापासूनचा हा महत्वाचा, जीवन विकसित करण्याचा जो कार्यकारणभाव आहे तो अनादिकालाच्या शास्त्रपरंपरेप्रमाणे व साधनपध्दतीप्रमाणे मानवाच्या कल्याणार्थ अजूनही कार्य करतो आहे. याची साक्ष म्हणजे हे कार्य होय. !

आज जीवनातील अपेक्षित सुख, शांति, समाधानाच्या अस्ताव्यस्त कल्पना आपल्या जीवनामध्ये आहेत. त्या घेऊन आपण सद्गुरुचरणी धाव घेतो. पण आपल्या मोडकळीस आलेल्या जीवनाकडे पाहिल्यावर सद्गुरुंना परम दुख होते, याची कल्पना आपण भक्तांना कदापिही येणार नाही. आज तुम्हां भक्तांचे जीवन मोडकळीस येण्याचे कारण म्हणजे आज ज्या स्वधर्मामध्ये तुम्ही जन्म घेतलात तो धर्म म्हणजे काय ? ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माप्रीत्यर्थ आपले कर्तव्य काय ? हे जाणून घेतले नाहीत व ज्या कुळामध्ये जन्म घेतला त्या कुळाच्या कुलदेवता, देवदेवता यांच्याप्रीत्यर्थ कुलधर्म, कुलाचार, कुलोपासना ह्या विधीतून आपल्या जीवनाला पोषक असा कृपाशिर्वाद मिळविण्याचे कर्तव्य तुम्ही आजपर्यंत श्रध्दा भक्तिने कधीही अंगिकारले नाही. ज्या जन्मादात्या मातापित्यांनी तुम्हाला इहजन्मामध्ये जन्म प्राप्त करुन घेण्यास योग्य ती संधी दिली त्या मातापित्यांच्या ऋणानुबंधाची फेड जीवनात कर्तव्य म्हणून करणे हे आपले कर्तव्य आहे हेही विसरलात. प्राप्त जन्मात तुम्हाला प्राप्त झालेले सुख व तेही गरजेपेक्षा अधिक असतानासुध्दा अधिक प्राप्तीचा हव्यास ठेवून सुखाच्या सावलीकडे धावत गेलात. पण प्राप्त झालेल्या जीवनात इतरांनांही कांही सुख समाधान देऊन आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म, परोपकार आदि करण्याचे कर्तव्य हे या जन्माचे उद्दिष्ट आहे याची जाणीव कधीहि करुन घेतली नाहीत. त्याशिवाय अत्यंत जी महत्वाची जबाबदारी आपल्याला स्वीकारावयाची होती, ती म्हणजे आज प्राप्त झालेला जन्म हा जो आपण जीवन व्यतीत करण्यासाठी खर्च करीत आहात ती जन्मप्राप्ती, जन्मजजन्मांतर ऋणानुबंध व जन्मकर्म ऋणानुबंधपरत्वे प्राप्त झाली आहे, अशा या दोन ऋणानुबंधास ‘देहिक जीवन’ असे म्हटले आहे. पण ह्या देहिक माध्यमाला ज्या दोन अवस्थांच्या म्हणजे जन्मजन्मांतर व जन्मकर्म यांच्या सहकार्याने कार्य करावयाचे आहे,  त्या माध्यमाला बाल्यावस्थेतच संस्कारविधी करुन पुढील जीवनाच्या कर्तव्याच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचे सामर्थ्य आपण भक्तभाविक देऊ शकत नाही. याउलट आज जीवन करीत व्यतीत असताना आपल्या जीवनासभोवार असणारे अनावश्यक असे जे विषय आहेत त्या विषयांची प्राप्ती किती अधिक लवकर होईल ? यासाठी जन्मकर्माला म्हणजे देहातील अवस्थेला या तुमच्या सभोवार असणाऱ्या ऐहिक विषयाधीन केले आहे. अशी ही देहाची अधिक विषयाधीन होण्याची क्रिया झाल्यामुळे जन्मजन्मांतर व जन्मकर्म ह्या दोन्ही अवस्था परस्परांशी एकरुप होऊन सहकार्य करण्याऐवजी प्रधान माध्यम म्हणून केवळ देहच जीवन व्यतीत करीत आहे. त्यामुळे जीवन व्यतीत करण्याचा जो मूलभूत पाया शास्त्रीयदृष्ट्या जीवनोत्पत्ती मीमांसेमध्ये सांगितला आहे, त्याउलट तुम्ही जीवन व्यतीत करु लागल्यानंतर इच्छा किंवा अपेक्षा पूर्णत्वाला जाव्यात कशा ? आता ज्या अपेक्षेने तुम्ही आलात त्या अपेक्षा इतरांना प्राप्त झालेल्या सुखाचा विषय म्हणून विचारांनी मार्गदर्शनार्थ घेऊन आलात. पण ज्या अपेक्षा विचार स्वरुपात तुम्ही देहमाध्यमातून व्यक्त करता ते माध्यम या अपेक्षा पूर्णत्वाला नेण्यास तुमच्या अज्ञानामुळे किती असमर्थ झाले आहे हे विचारात घेत नाही. याचे कारण देहमाध्यमाची व्यक्त क्रिया ‘कर्म’ म्हणून तुमच्या अनुभवाला येते. पण देहमाध्यमाचे अव्यक्त कार्य म्हणजे तुमची ‘इष्ट फलप्राप्ती’ हे अव्यक्त असल्याने ते जाणून घेणे हे गुरुमार्गात निष्ठेने गेल्याशिवाय अनुभवास येत नाही.

तुमची देहिक स्थिती व त्यापरत्वे तुमचे जीवन इतके मोडकळीस येऊन ते अविकसित अवस्थेमध्ये असल्याने, ज्या तुमच्या इच्छाअपेक्षा पूर्णत्वाला जात नाहीत, असे जीवन श्रीसद्गुरुचरणी आल्यावर ह्या तुमच्या अज्ञानाबद्दल श्रीसद्गुरुनी कोणाही भक्तास अनादर, तिरस्कार केला नाही. याउलट तुमच्या अज्ञानाचे गोड कौतुक करुन तुमच्या भविततव्याची तरतूद करण्यासाठी साधक अवस्थेतील माध्यमाला ह्या कायार्थ सिध्द केले. ही गुरुंची विशाल गुरुकृपा ह्या जन्मात आपल्याला काहीएक प्रयत्न न करता जी लाभली आहे, ती आत्मियतेने जतन करुन त्या कृपेच्या चिंतनात आपले आयुष्य व्यतीत करणे हे या जन्माचे सार्थक होय. जीवनातील अनेक ऐहिक विषयप्राप्तीसाठी जन्मभर आपण काबाडकष्ट, मानापमान, हांजीहांजी, लाचलुचपत, खोटेनाटे, खरेखोटे इत्यादि प्रकारची वर्तने करुन ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. तरीसुध्दा तो ऐहिक विषय आपल्याकडे पाठ फिरवून उभा राहतो. या उलट तुमच्या ठिकाणी असणारा श्रध्देचा, भक्तीचा, सबुरीचा, परोपकाराचा, दुसऱ्यासंबंधी हितचिंतनाचा, धर्माबद्दलचा अभाव असूनसुध्दा श्रीसद्गुरु तुमच्याकडे कधीही पाठ न फिरवता तुमच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहून तुम्हाला आपल्या सानिध्यांत बसविण्याचे महत्भाग्य प्राप्त करुन देतात. असे हे निरंतर सुख वाट्याला आल्यावर ऐहिक सुखाच्या इच्छा वासना याबद्दल स्वाभाविकरित्या आपण विन्मुख व्हावयास पाहिजे. तरच या जन्मी गुरुप्राप्ती झाली म्हणजे ‘निश्चित’ काय झाले ते पदोपदी अनुभवास येईल.ही अवस्था भक्ताने प्राप्त करुन घेणे यालाच ‘गुरुसाक्षात्कार’ असे म्हणतात.

आपण भक्तांचे जीवन मोडकळीस येण्यास किंवा अपेक्षित सुख शांती प्राप्त करण्यास देहिक माध्यम का असमर्थ झाले आहे यासंबंधी सर्व खुलासा वर केला आहे. आता असे मोडकळीस आलेले किंवा सुखशांती प्रात्त करण्यास असमर्थ झालेले देहिक जीवन वास्तविक निसर्गनियमाप्रमाणे तुमचे तुम्हीच पूर्ववत करुन व शक्तिमान करुन इच्छित सुख-शांति-समाधानाची पाउलवाट सुलभपणे प्राप्त करुन घ्यावी अशी योजना या जन्मात त्या परमेश्वराने केलेली आहे. पण याचा अनुभव किंवा लाभ हा आपणास केव्हा प्राप्त होईल ? तर श्रध्देने व निष्ठेने तुम्ही आपले जीवन जर परमेश्वरास समर्पण केले असेल तरच होईल. याचा अर्थ जेव्हा या जगतामध्ये परमेश्वकृपेने तुम्ही जन्म घेता तेव्हा पूर्वीच्या जन्मात केले गेलेले धार्मिक आचरण, पुण्यसंचय, परोपकार, इतरांच्या हितासाठी सदविचार आदिचा समावेश जो पुण्याई म्हणून करण्यात येतो ते सर्व पुण्य तुम्ही जन्माला आल्यावर तुमच्या स्थूल देहाकडे म्हणजे पंचभौतिक देहाकडे एकरुप झालेले नसते. त्या पुण्याईतील काही भाग की ज्याची असे जीवन असमर्थ व दुबळे झाल्यावर पुन्हा एकवार ते उभारण्यास तुम्हाला गरज पडणार आहे, असे जो परमेश्वर जाणतो, त्याने ती पुण्याई सुरक्षित अशा ठिकाणी ठेवून पुढे तुम्हाला त्याची गरज जाणवते त्यावेळीच ती सद्उपयोगार्थ पाठविण्याचा स्वाभाविक, नैसर्गिक असा धर्म या जगात निर्माण केलेला आहे. हा स्थूल देह की ज्या माध्यमाकरवी या जगात आपण जन्माला आल्यावर आपल्या इष्ट कर्तव्याची पूर्तता करण्याचे महान कर्तव्य आपल्याला करावयाचे आहे, त्या स्थूल देहाची नैसर्गिक रचना निसर्गाने म्हणजे परमेश्वराने काय केली आहे याचा तरी आपण बोध घेतलात काय ? आज आरशासमोर उभे राहिलात तर आपल्याला ज्या स्थुल देहाचे प्रतिबिंब दिसते, त्या देहात अधिक दोन देहांचाही समावेश आहे हे आपण जाणत नाही. त्यामुळे जीवन कर्तव्यार्थ कोणकोणती आवश्यक कर्मे व कोणकोणते आवश्यक सुविचार करणे आपल्या हिताचे आहे हे आपणास समजत नाही. आंबा हे फळ आपल्या हातात घेतल्यावर त्याच्या तीन अवस्था दिसतात. त्या म्हणजे फळाचे वरील आवरण, आतील गर व त्या फळाची निर्मिती ज्या तत्वापासून झाली आहे ते त्याचे बीज. या फळाच्या निर्मिती बरोबरच आपली मानवी जीवनाची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे, ती अशी की, जो आपण पाहतो तो व त्याच्या आत ‘स्थूल देह’, ‘सूक्ष्म देह’ व ‘कारण देह’, अशा ह्या तिन्ही अवस्था एकच असणारे जे माध्यम ते म्हणजे देहिक जीवन व ह्या जीवनाला निरंतर अशा सुख-शांतीचा लाभ व्हावा अशी जी तुमची इच्छा आहे त्यासाठी या तिन्ही देहांचा परिपाक म्हणजे विकास हा योग्य मार्गाने योग्य आचार विचारात व्हावयास पाहिजे. जर आपणास आंबा हे फळ खाण्याची इच्छा झाली तर आपली आंबा खाण्याची पूर्णत्वास केव्हा जाईल ? तर प्रथम अवस्थेमध्ये आंबा हे फळ कैरी या अवस्थेमध्ये असते, त्यानंतर दुसऱ्या अवस्थेला आपण पाड लागला असे म्हणतो व तिसऱ्या अवस्थेला आंबा पिकला आहे असे म्हणतो. या तीनही अवस्थांचे पूर्णत्व हा त्या फळाचा पूर्णतः विकास. म्हणजे तुम्हाला फल सेवनाची जी इच्छा झाली आहे त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी केवळ आंबा खाण्याची इच्छा झाली म्हणून कैरी सेवनार्थ घेतली तर ती आंबट म्हणूनच अनुभवास येते. कारण आंबटपणा अनुभवास देणे हा जरी मूळ आंबा या फळाचा गुणधर्म नाही, तरी ज्या फळाचा परिपाक झाला नाही अशा फळाला तुम्ही इच्छा म्हणुन म्हणून सेवन केलेत व जर त्या आंब्याचा जो गुणधर्म नाही तो अनुभवास आला तर आंबा आंबट लागला हा दोष तुमचा की आंब्याचा ? त्याप्रमाणे आजचा हा जन्म पूर्वीच्या अनादि जन्माचे परमपवित्र असे फळ देवाने या जन्मात आपल्या ओटीत घातले आहे. परंतु त्या फळाची संभाव्य कार्यदिशा ही ज्ञानाअभावी आपल्याला न समजल्याने ते परमपवित्र फळ आपण आपल्या ओटीतून काढून ओटीवर ठेवतो आहोत. म्हणजे चव्हाट्यावर ठेवून, ‘मी दु:खी आहे’ असे आपल्याच बरोबरीच्या व आपल्यासारखे अज्ञानी असे जे जग आपल्यासभोवार आहे त्याला सांगत आहोत. ते तरी आपल्या दु:खात सहभागी होऊ शकतात काय ? नाही.कारण त्यांनाही आपल्या जीवनाचे जे परमपवित्र फळ असेच चव्हाट्यावर ठेवले आहे, यापेक्षा जे तुमच्या वाट्याला आलेले हे परमपवित्र फळ आहे त्याचे ज्ञान गुरुजनांच्याकडे जाऊन, भक्तिभावाने विनम्र होऊन, तत्संबंधीचे ज्ञान ग्रहण करुन, हे फळ जेव्हा ओळखाल त्यावेळी त्या परमेश्वराच्या अगाध लीलेबद्दल तुम्हाला धन्यता वाटून आज ज्या वाणीने तुम्ही अनेक ऐहिक सुखे मागता आहात त्याच वाणीने तुम्ही त्या अनंतव्यापी, सर्वज्ञ परमेश्वराला असे सांगाल की ’माझे मागणे आता एकच आहे, की तुझ्याचरणी मला निरंतर ठाव दे’.

आता हे परमपवित्र फळ म्हणजे तुमचे आजचे प्राप्त जीवन, जे महत्प्रयासाने प्राप्त झाले आहे त्याची ओळख मी माझ्या यथाज्ञानाने, यथाशक्तिने करुन देतो. हा प्राप्त देह व त्यात सामावलेले दोन देह, असे तीन देह म्हणजे स्थूल, सूक्ष्म व कारण. या देहिक माध्यमांना पूर्वीच्या अनेक जन्मात अपूर्ण राहिलेले असे कार्य, पुनःश्च प्राप्तजन्मात करावयाचे आहे. यासाठी जन्मप्राप्तीनंतर जे पाच ऋणानुबंध मनुष्याला जीवनात सुख-शांती-समाधान आदिला करणीभूत होतात, त्या ऋणानुबंधांचे कार्य यथोचितपणे त्या त्या माध्यमाकडे देऊन, या देहाची उभारणी परमेश्वराने योग्य अशा कार्याद्वारे केलली आहे ती म्हणजे स्थूल देहाकडे ‘जन्मकर्म’ ऋणानुबंध, सूक्ष्म देहाकडे ‘जन्मजन्मांतर’ ऋणानुबंध व कारण देहाकडे ‘देवादिक’ ऋणानुबंध, असा समावेश करुन या तत्वाची जाणीव होण्यासाठी स्थूल देहाल ‘बुध्दि’ हे माध्यम, सूक्ष्म देहाला ‘मन’ हे माध्यम व कारण देहाला ‘चित्त’ हे माध्यम, अशी देहाची रचना करुन, राहिलेले दोन ऋणानुबंध म्हणजे ‘मातृपितृ’ व ‘इतरेजन’ हे स्थूल देहाच्या बाहेर वलय रुपाने अस्तित्वात आहेत. आता आपल्याला सुख-शांती व समाधानाने जीवन जगण्यासाठी ज्या अत्यावश्यक माध्यमांची गरज आहे ती न मागता परमेश्वराने आस्थापूर्वक व विचारपूर्वक आपल्याला भेट म्हणून दिलेली आहेत तर त्या परमेश्वराचे भक्त होण्याचा कमीपणा तुम्हा भक्तांना का वाटावा ? हे मी गेल्या अनेक वर्षात समजू शकलो नाही.

असमर्थ झालेले किंवा मोडकळीस आलेले जीवन, याची पुनःश्च उभारणी तुम्हाला सहजगत्या व स्वाभाविक करता यावी म्हणून परमेश्वराने तुम्हाला पूर्वीच्या जन्मापैकी काही पुण्याईचा भाग मागे ठेवला आहे, असे जे वर सांगितले आहे याचा अर्थ तो पुण्याईचा भाग, कारण देह, म्हणजे देवादिकाचे माध्यम या ठिकाणी सामावलेला आहे. जेव्हा तुम्ही नव्याने जन्म घेतल्यावर पुन्हा निश्चित अशा परमेश्वराच्या भक्तीला स्वीकारुन ती कर्तव्य बुध्दिने पार पाडण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा ती भक्ति देवादिकाच्या, म्हणजे कारण देहापर्यंत पोहोचून तुमच्या वाट्याला आलेली व परमेश्वराने पुढील आयुष्याची तरतूद करण्यासाठी म्हणून जी ठेव ठेवली आहे, ती ह्या जन्मात विस्कळीत झालेल्या किंवा असमर्थ जीवनाला पुनःश्च चैतन्य प्राप्त करुन देण्यास उपयोगात आणता येते.

अशी ही नैसर्गिक व स्वाभाविक कार्यरचना करुन दिल्यावरसुध्दा आपण तिचा  लाभ न घेता अनैसर्गिक, निर्जीव अशा मार्गाचा अवलंब करुन ह्या पुण्याईला, असमर्थ झालेल्या जीवनाला समर्थ करण्यास वाव देत नाही. कारण ही कार्य रचना नैसर्गिक स्वरुपात प्राप्त होण्यास तुमचे आचार विचार, देवाबद्दलची श्रध्दा, निष्ठा व आपण करीत असलेली भक्ति ही निरपेक्ष व नि:स्वार्थ असावयास पाहिजे. तरच ती पुण्याई कार्यान्वित होऊन, तिन्ही देह एकरुप होऊन, जे एक तुमच्या ठिकाणी सामर्थ्य निर्माण होईल ते ह्या जगाला सामावून घेण्याइतके सामर्थ्यवान असेल. इतके सामर्थ्य निर्माण होण्याची तरतूद ह्या जीवनात परमेश्वराने केली असताना, एखाद्या प्रतिकुल कर्मपरत्वे भोगावी लागत असलेली परिस्थिती ही तुमच्या सामर्थ्याबाहेर असू शकेल काय ? पण इतका जीवनाबद्दलचा सखोल विचार करावयास म्हटले तर त्यास स्वाभाविक, वेळ हा लागणारच. ह्या कार्यरचनेच्या कार्यपध्दतीनुसार आपण कार्यकेंद्रावर आल्यावर जो कृपाशिर्वाद दिला जातो, हे सहाय्य किंवा ही मदत एव्हढ्यासाठीच आहे की, वरील तिनही अवस्था एकरुप करुन प्राप्त जीवन सामर्थ्यवान करणे हे सामान्य माणसाला करता येणार नाही, म्हणून परमेश्वराने गुरुरुपी अवतार घेऊन तुमची तरतूद केली आहे. आपण भक्तांची भावना अशी असते की, आम्ही विचारलेल्या ऐहिक प्रश्नांसंबंधी व दु:ख आणि अशांतता निर्माण झाली आहे त्याच्या निवारणार्थ हा प्रसाद आहे, पण ही आमची वरील भूमिका आजपर्यंत आपणास परिचित नाही. एकदा आपण सामर्थ्यवान झालात की जी सुखे आज आपल्याला मागावी लागत आहेत ती ऐहिक सुखे आपल्या पायावर लोटांगण घालतील. अशी ही गुरुकृपाशिर्वादाची महती सांगताना वेदवेदांत किंवा अन्य धर्मशास्त्रेही थकली आहेत.

जीवनाप्रीत्यर्थ परमेश्वराने केलेली कार्यरचना व त्यासंबधीचे ज्ञान न करुन घेता आपण अनैसर्गिक व निर्जीव अशा मार्गाकडे धाव घेऊन जीवनाबद्दलचे भूतभविष्य विचारता. जे साधक आज समाजात लोक-कल्याण कार्य म्हणून भास निर्माण करीत आहेत, त्यांच्याकडे जाऊन, भिन्नाभिन्न देवदेवता, उपास्य देवता, जपजाप्य, दीक्षा, अनुग्रह घेऊन, आपल्या जीवनाला जे पोषक नाही ते अनुभविण्यासाठी कांही काळ खर्च करता व त्यामुळे तुमच्या देहपरिसरात अशुध्द अशा वलयांची निर्मिती करता. ही वलये तुमचा देह स्वीकारीत नाही. कारण ही वलये अनैसर्गिक अवस्थेतून निर्माण झालेली असतात. जी वलये नैसर्गिक स्वरुपात व सजीव आहेत तीच फक्त तुमचा देह धारण करु शकतो. अशी ही, कारण नसताना आपण जी अवघड समस्या, की जी कृपाशिर्वादाला पोषक नाही, ती निर्माण करुन जेव्हा मार्गदर्शनार्थ येता तेव्हा आपणास दिलेल्या कृपाशिर्वाद ह्या अवस्थेला, जी वलये तुमच्या देहपरिसरामध्ये पोषक नाहीत त्याचे ‘विमोचन’ प्रथमतः करावे लागते. त्यामुळे तुमच्या इच्छा अपेक्षांची जी तीव्रता सुखशांतीसाठी असते त्याला विलंब लागतो. हे सूज्ञपणे जाणून भक्तभाविकांनी मार्गदर्शनार्थ आल्यावर दिलेल्या प्रसादाची अवहेलना न करता किंवा दिलेल्या मुदतीपर्यंत काम झाले नाही म्हणून कामासंबंधी विचारणा न करता दिले गेलेले कृपाशिर्वादरुपी श्रीफल हे नित्य पूजनात ठेवून त्याचे पूजन भक्तिभावनेने केल्यास ह्या कार्याचे सद्हेतू मानवी कल्याणार्थ किती सखोल, तात्विक,अनुभवसिध्द व सिध्दसिध्दांत पध्दतीवर आधारलेला आहे हे अनुभवास येईल. याउलट तुम्ही सुख-शांती, दु:ख तथा अशांतता याचा अन्वयार्थ न समजल्याने देहाच्या विकसित अवस्थेला वाव न देणारे आचार विचार जीवन म्हणून ठरविता. ते म्हणजे मानवी जीवनाच्या मार्गदर्शनार्थ परमेश्वराने निर्माण केलेली जी जी शास्त्रे आपण ऐकतो किंवा त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो त्या मुळ शास्त्रांची भूमिका मानवी जीवनाला कल्याणार्थ काय आहे हे् न समजल्यामुळे, त्या सर्व शास्त्रांचा दुरुपयोग मनुष्याने ज्योतिष शास्त्रापासून अणुशास्त्रापर्यंत केला आहे.उदाहरणार्थ ‘ज्योतिषशास्त्र’ हे मार्गदर्शनार्थ आहे. पण त्या शास्त्राचा उपयोग भविष्यात काय आहे हे विचारण्यासाठी होतो. वास्तविक प्रत्येक मनुष्याने भविष्य घडवायचे असते. ते घडत नसते. भविष्यकाळात येणाऱ्या अडिअडचणी किंवा संकटे यांची जाणीव करुन देण्यासाठी, त्या अडिअडचणी व संकटे यापासून आपला बचाव कसा करता येईल याची पूर्वसूचना मिळण्यासाठी व त्या अडिअडचणींना किंवा संकटाना तोंड देण्यासाठी, आपण आपली पूर्वतयारी कशी ठेवावी, हे समजावे असा भविष्यशास्त्राचा मुख्य उद्देश आहे. पण आज हे ज्योतिषशास्त्र जाणत आहेत ते गरजू माणसाला चुकीच्या दिशेने जाण्याचे मार्गदर्शन करतात. त्यामुळे जीवनपरत्वे प्राप्त झालेली सुख-संपत्ती नाश होऊन, त्याची पुनःश्च प्राप्ती करण्यासाठी याच शास्त्राचा उपयोग रेस, सट्टा, शेअर बाजार, आकडे, जुगार इत्यादिसाठी करुन, कष्टार्जित मिळविलेल्या लक्ष्मीचा गैरवापर करुन, त्या लक्ष्मीच्या कृपाशिर्वादाला आपण अपात्र ठरता. वास्तविक कष्टार्जित जीवन व प्रामाणिकपणे ती लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी अहर्निश जो मनुष्य कर्तव्यनिष्ठ असेल, त्या माणसाबरोबर संसार करण्यास लक्ष्मी सदैव तयार असते. पण जे आपल्या भाग्यातून आपल्याला लाभलेले आहे, त्यापेक्षा अधिक भाग्यवान होण्याचा मार्ग मनुष्य अंगिकारतो. परंतु हे मनुष्याच्या हाती नसून तुम्हाला भाग्यवान करण्याची उदार भूमिका लक्ष्मीचीच असते. अशा लक्ष्मीचा गैरवापर होण्याने आपण कर्जबाजारी होऊन शारीरिक व मानसिक दु:खे अज्ञानाने निर्माण करतो. शारीरिक दु:खाची भरपाई करण्यासाठी जुगार, सट्टा, आदि मार्गाचा वापर झाल्यावर, मनःशांती प्राप्त करण्याचा जो मार्ग म्हणजे रोज दिवसाकाठी सकाळी व संध्याकाळी निदान पंधरा मिनिटे तरी ईश्वर चिंतनात व्यतीत करावयाची, त्या ऐवजी आपण सायंकाळ होण्याची आतुरतेने वाट पहात असतो. कारण वरील सर्व प्रकारामुळे स्वतःच्या कुटुंबात स्वतःला स्वास्थ्य व शांतता पै-पैशाच्या अभावी नसते. पण अशा वेळी कुटुंबासमवेत सुखदु:खाचा विचार न करता सायंकाळी इष्ट मित्राबरोबर क्लबमध्ये जाऊन पत्ते व तेही करमणूक नव्हे तर पैसे लावून खेळले जातात. त्याप्रमाणे जी मनःशांती ढळली आहे ती मिळविण्यासाठी जो ईश्वर चिंतन करण्याचा सुलभ मार्ग आहे, त्या ऐवजी अशा व्यक्ती मद्यपान, धूम्रपान व इतर गुंगी आणणारे पदार्थ सेवन करुन मनःशांती प्राप्त करण्याचा आधुनिक व अद्भूत असा मार्ग निर्माण करुन, एक नवीनच समस्या गुरुमार्गाकडे मार्गदर्शनार्थ धाव घेणाऱ्या व्यक्तींच्या कुटुबियांना निर्माण करुन देऊन, जी संसाराची संपूर्ण जबाबदारी पतीने  सांभाळावयाची आहे ती आपल्या स्वैर विचारांना व आचारांना आवर न घालता आल्यामुळे, आपल्या पत्नीवर सोपवून मोकळ्या होतात. पर्यायी अशा अपयशाला व दु:ख अशांततेला आपणच कारणीभूत आहोत याची जाणीव न ठेवून आपली धर्मपत्नी की जिच्याशी आपण धर्मशास्त्राने विवाह केला, तिच्या पायगुणामुळे आपण भिकेला लागलो, असा सुखसंवाद सकाळी उजाडल्यापासून सांयकाळपर्यंत अशा व्यक्तिंच्या संसारात चालू होतो व अशा दु:ख अशांतीचे कारण आस्थेने, सुविचाराने लक्षात न घेता पुन्हा आपली पावले सायंकाळी त्याच अपयशाच्या दारात आपणास नेत असतात. अशावेळी अशा पडत्या काळात मनुष्याने आपल्याला पोषक असा स्नेह-मित्र परिचित करावा की, ज्यामुळे आपले हे दुर्वर्तन सुधारुन पुनःश्च आपण मानवी जन्माच्या मूलभूत अशा शुध्द, सात्विक व मौलिक अशा जीवनाकडे वळू.

अशा या ज्ञानअज्ञानाने घडलेल्या दोषांचे दुष्परिणाम आम्हा मानवांना जाणवले, की ह्या दुष्कृत्यापासून आपण दोषमुक्त व्हावे या सद्भावनेने, आपल्याला धर्मपरत्वे प्राय:श्चित्तादि विधी करुन घेण्यासाठी आपण गुरुजनाकडे धाव घेऊन प्रायःश्चित्तादि विधी करुन घेतो. त्या प्रायःश्चित्त विधीमध्ये होम-हवन, अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान इत्यादिंचा समावेश असतो. पण असा विधी करीत असताना, ज्या आम्हा मानवांच्या हातून दुष्कृत्ये न कळत घडलेली आहेत, तसेच त्याबद्दलचे प्रायःश्चित्तसुध्दा न कळत घेतले पाहिजे. हे प्रायःश्चित्त सांगणारे गुरुजन जो काही विधी किंवा पवित्र अशा मंत्राचा उच्चार आपणांस करावयास सांगतात, त्यावेळी आपले मन त्या पवित्र मंत्राशी व इष्टविधीशी एकाग्र व्हावयास पाहिजे. केवळ केल्या गेलेल्या दुष्कृत्याबद्दल मनःस्ताप होतो आहे, म्हणून देहिक विधी करुन याचे फल मिळणार नाही. जगातील प्रत्येक धर्मात केल्या गेलेल्या दुष्कृत्यासाठी किंवा पापविमोचनासाठी जे प्रायःश्चित्त देण्यात येते किंवा घेण्यात येते हा विधी शास्त्रशुध्द भूमिकेतून समजावून घेतला पाहिजे. कारण शास्त्राप्रमाणे प्रायःश्चित सांगणे इतकाच अधिकार धर्मपरत्वे गुरुजनांना आहे. पापमुक्त करण्याचा अधिकार त्यांचा नाही. तो देवाचा आहे. प्रायःश्चित्त घेण्याची इष्ट व अनिष्ट कर्तव्ये ज्या व्यक्तिच्या हातून ही कर्मे घडली आहेत, त्याने हा विधी आस्थापूर्वक पुढील भावी जीवनात आचार विचारामध्ये आणण्याचे कर्तव्य केले पाहिजे.

‘प्रायःश्चित्त’ जीवनात एकदाच घेता येते. पण ज्या स्वधर्मामध्ये आपण जन्माला आलो त्या धर्मात ही जी प्रायःश्चित्ते सांगितली आहेत, त्याचा अर्थ आपण सोयीने असा लावतो की, सदैव द्ष्कृत्ये व दुष्कर्मे करीत रहावे व वारंवार प्रायःश्चित घेत रहावे. अशाने जरी तुम्ही अनेक प्रायःश्चित्ते घेतलीत तरी केल्या गेलेल्या कोणत्याही दुष्कृत्यापासून तुम्ही दोषमुक्त होणार नाही. ही दुष्कर्मे एक तर पुढील जन्मात तुमच्या वाट्याला येतील किंवा कर्मपरत्वे त्यांचे दु:ख तुमच्या भावी पिढ्यांना भोगावे लागेल. तेव्हा धर्मशास्त्राने तरतूद करुन दिलेल्या प्रायश्चितादि विधीकडे धाव घेण्यापेक्षा, प्रथमतः ज्ञान-अज्ञानाने आपण ज्या दुष्कृत्ये करण्याच्या दुष्ट प्रवृत्तीला बळी पडलो, म्हणजे जी दुष्टप्रवृत्ती काया-वाचा-मनात ओतप्रोत भरुन राहिल्याने या दुष्ट कृत्यापासून आपण सद्सद्विवेकबुध्दिने दूर होऊ शकलो नाही, त्यासंबंधी परमेश्वराजवळ अनन्य भक्तिभावनेने व निष्ठेने बसून, ज्ञान-अज्ञानाने घडलेल्या पातकाबद्दल दुख व्यक्त करुन, काया-वाचा-मन हे शुध्द करुन घ्या. कारण जेव्हा गुरुजन आपल्याला प्रायश्चितादि विधी सांगतील तो कृपाशिर्वाद घेण्यास आपली काया, आपले मन व आपली आपली वाचा ही जशी जन्माला आली तेव्हा शुध्द होती. इतकी शुध्दता तिच्या ठिकाणी निर्माण करुन जर प्रायःश्चित घेतलेत तर ज्या स्वधर्मात तुम्ही जन्म घेतलात व ज्या धर्माने तुमच्या उध्दारार्थ शास्त्र निर्माण केले, ते शास्त्र किती शक्तिमान आहे हे अनुभवास येईल. याचा लाभ तुम्हाला याच जन्मी अनुभवास येईल असे नसून, पुढील अनेक जन्म व तुमच्या भावी पिढ्या यांच्या उध्दाराचा मार्ग तुम्ही सहज व सोपा असा कराल.

मार्गदर्शनार्थ येणाऱ्या अनेक भक्तभाविकांचा प्रश्न असा असतो की, कष्टार्जित पैसा पुरत नसल्याने सदैव प्रापंचिक ओढाताण होते व त्यामुळे कारण नसताना कौटुंबिक जीवनात अशांतता निर्माण होते. वास्तविक या प्रश्नाचे निराकरण विचारण्यपूर्वी अशी परिस्थिती निर्माण होण्यास कारण कोण व काय कारण आहे ? याचा कोणीही सूज्ञ भक्त विचार करीत नाहीत. जगतात जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा जेव्हा परमेश्वरकृपेने इहलोकी येतो, त्याआधीच परमेश्वराने त्याचा अन्न, वस्त्र, निवारा, देवधर्म, दानधर्म, परोपकार यांची सोय दोन पिढ्यांपर्यंत केलेली असताना, तुम्हा भक्तांना एकाच पिढीत, म्हणण्यापेक्षा अर्ध्या प्रापंचिक कर्तव्याची पूर्तता करताना ही कमतरता का भासावी ? आज तुमच्या सभोवार असणारे जग प्रत्येक क्षणोक्षणी आपले स्वरुप बदलत आहे. परंतु त्या बदलाच्या स्वरुपाला अनुरुप अशी तुमच्या जीवनाची भूमिका तुम्ही न ठरविल्यने वारंवार असे ऐकण्यात येते की, ‘या वाढत्या महागाईचा बकासूर कधी नष्ट होणार ?’. पण आजची ही जी परिस्थिती आपण आपल्या कौटुंबिक जीवनापासून राष्ट्रापर्यंत पहात आहोत, या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत असे प्रामाणिकपणे कबूल करण्यास कोणीही तयार नाही. आजची सामाजिक परिस्थिती व पूर्वीची सामाजिक परिस्थिती यांचे सिंहावलोकन केले तर असे अनुभवास येते की, पूर्वीच्या काळी संघटित किंवा एकत्र कुटुंब पध्दतीने लोक रहात असूनसुध्दा सुखासमाधानाने आपली इष्टकर्तव्ये करुन पुढील भावी पिढ्यांसाठी घरदार, जमीनजुमला, दागदागिने, आदिची तरतूद करु शकत होते. या ठिकाणी सूज्ञ भक्त अशी विचारणा करतील की, ’त्या काळात सर्वत्र सुबत्ता होती व आज वाढती महागाई आहे. यामुळे आम्हाला सद्यपरिस्थितीस तोंड देता येत नाही’. पण याला उत्तर असे की, वाढत्या महागाई बरोबर आपली प्राप्तीही पूर्वीच्या काळातील प्राप्तीच्या मानाने वाढलेली आहे. म्हणजे वाढत्या महागाईचे निमित्त करुन आपण जीवनपोषणार्थ जी भूमिका विचारांती ठरवू शकलो नाही, त्याचा दोष आपण वाढत्या महागाईला देतो. आता दुसरा प्रश्न असा की, ‘जर परमेश्वराने आम्हाला दोन पिढ्यांची तरतूद करुन जन्माला पाठविले आहे, तर जी आमची प्राप्ती आमच्या पिढीलाही पुरी पडत नाही याला जबाबदार कोण ?’. पूर्वीच्या कौटुंबिक पध्दतीप्रमाणे आज एकत्र राहण्याची पध्दत अस्तित्वात नाही. प्रत्येक कुटुंबातील व्यक्ति सज्ञान व प्रौढ झाल्यावर,वेगळेपणाने राहण्यात आनंद मानीत आहे. असे असताना तुमच्या जीवनात कुटुंबातील इतर व्यक्तिंच्या जबाबदाऱ्या त्या मानाने कमीच आहेत. त्यामुळे आवश्यक त्या समस्यांची पूर्तता न होण्यास जे कारण आहे, ते म्हणजे जीवन सुख-समाधानाने व्यतीत करणे, त्या भूमिकेचा मूलभूत पाया आज आपल्याजवळ नाही. ज्या परमेश्वराने तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा, देवधर्म, दानधर्म व परोपकार यांची तरतूद केलेली आहे, त्यापैकी देवधर्म, दानधर्म व परोपकार या जीवनातील आद्य कर्तव्यार्थ वर्षाकाठी तुमच्या प्राप्तीतून अल्प अशी रक्कमसुध्दा अतिकष्टाने खर्ची पडत नाही. जीवनात अन्न ही मनुष्याची प्रधान गरज आहे हे सर्वाना परिचित आहे. ती गरज प्रत्येक मनुष्य गरजेपरत्वे भागवितो. पण तुमच्या जीवनातील आवश्यक अशी प्राप्ती ही वस्त्र व निवारा यांत गरजेपेक्षा अधिक प्रमाणामध्ये वाढलेली आहे. वस्त्रांचा वापर हा वर्षाकाठी किती असावा ?असा प्रश्न तुम्हाला विचारला, तर आज ह्या जगातील बदलत्या फॅशनमुळे ज्या नानाविध प्रकारच्या वस्त्रांना खरेदी करुन घेण्याचा तुमचा मोह अनावश्यक म्हणून वाढलेला आहे, त्या वस्त्रांना साठविण्यासाठी घरातील कपाटेसुध्दा अपुरी पडू लागली आहेत. असा अनावश्यक खर्च वर्षाकाठी वस्त्र खरेदी करण्यासाठी होऊन, ती जतन करण्यासाठी लागणारी कपाटे यांचीच संख्या राहत्या जागेत वाढू लागली तर निवाऱ्यासाठी आपण आपल्या ऐपतीप्रमाणे जी जागा घेता, ती कुटुंबातील व्यक्तिंच्या उठण्या-बसण्यासाठी उपयोगात न येऊन जी कपाटे आजच्या आधुनिक फॅशनचे प्रदर्शन झाली आहेत, त्यांनी व्यापली आहे. गरजेपेक्षा अधिक सामान-सुमान व कपाटे, तेही केवळ वर्षाकाठी कधी येणाऱ्या पै-पाहुण्यांना आपण खूप ऐषारामात जीवन व्यतीत करीत आहोत याचे प्रदर्शन करण्यासाठी घरामध्ये दाखल झाली आहेत, अशा अडचणीमुळे पुन्हा इच्छा अशी निर्माण होते की, राहत्या जागेपेक्षा एखादी मोठी जागा घ्यावी. समजा, परमेश्वरकृपेने त्याचा जरी लाभ झाला तरी पुन्हा त्याही जागेत अनावश्यक वस्तूंची वाढ ही होतच राहणार. कारण आपल्या सभोवारचे जग हे बदलत्या दिशेने फॅशन म्हणून नव्या कलाकृती निर्माण करीत आहे, त्या पाहून आपला मोह इतका अनावर होतो की, ज्या जुन्यापुराण्या वस्तू जतन करुन वापरणे आपले इष्टकर्तव्य आहे, ते विचारात न घेता, आपण नित्य नव्या उदयाला येणाऱ्या बाजाराचे ग्राहक बनून, जो पै-पैसा कष्टार्जित आहे, त्याचा वापर गरजेपेक्षा अधिक केला गेल्याने, पुढच्या पिढ्यांच्या संगोपनांची, विद्याविद्यार्जनाची आबाळ, तुमच्या ह्या वासनारुपी इच्छा, ज्या नव्या जगाकडे धावत आहेत, त्यामुळे होते. यात परमेश्वराचा दोष काहीही नसून, त्याने जी तुमची तरतूद केली आहे ती तुमच्या गरजेपरत्वे केलेली आहे. यासाठी तुम्ही जीवनार्थ आपली भूमिका जर निश्चित कराल, की ज्यामध्ये कोणाचेही अनुकरण, कोणाच्याही जीवनाशी स्पर्धा नाही व आपल्या ऐपतीप्रमाणे जे आपणास प्राप्त झाले आहे त्यात सुख-समाधान मानून जर जीवन व्यतीत कराल तरच परमेश्वराने दोन पिढ्यांची तरतूद केली आहे किंवा नाही हे अनुभवास येईल.

>> अध्याय ३ घराण्यातील कुलधर्म.

अध्याय १ – कार्य व कार्याची भूमिका.<<