अध्याय ८ प्रार्थना साधना व त्यातील वेदवेदांत

आम्हा मानवांच्या जीवनकल्याणार्थ वेदकालापासून आजपर्यंत जे काही धार्मिक विधी,आचरण, उपासतापास, व्रतवैकल्ये आदि मार्ग सूचित करण्यात आले आहेत, ह्या मार्गात प्राप्त झालेल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी ह्या जन्मात कोणत्या कर्तव्याचा अंगिकार केला पाहिजे, हे सूचित केले नसून, प्राप्त झालेल्या जीवनात ऐहिक जीवन व्यतीत करण्यासाठी, ज्या ज्या काही आम्हां मानवांच्या गरजा व उणीवा आहेत, त्यांची प्राप्ती कोणत्या मार्गाने करुन घेता येईल, असा आशय विचारात घेऊन, जे जे काही धार्मिक विधी आम्हां मानवांच्या जीवनामध्ये आज रुढ झाले आहेत, व त्या रुढीप्रमाणे अजूनही अनेक व्यक्ती ह्या जगात अंधश्रध्देने त्यांचा अवलंब करुन प्राप्त झालेल्या जीवनात जे सुख प्राप्त झालेले आहे ते सुख अनुभविण्यास ह्या मानवी जीवनाच्या माध्यमात म्हणजे काया-वाचा-मनात कशा कशाची कमतरता आहे हे विचारात न घेता, अधिक काही सुख प्राप्त व्हावे या आशेने आज देवदैवीक मार्गाचा व धर्माचरणाचा वापर करीत आहेत. आज आपल्या नित्याच्या जीवनात अनेक व्यक्ती अनेक तीर्थक्षेत्री जाऊन देवदर्शन, पोथीपाठ, स्तोत्रे आदिंचे पठण करीत आहेत. पण सूज्ञपणे कोणासही अशी जाणीव आजपर्यंत झाली नाही की, मी जे काही करतो आहे, ह्या माझ्या नित्याच्या कर्मात निरासक्तता किती आहे ? आज नित्याने पठणार्थ येणारी पोथीपुराणे ही जरी आपण वाचत असलो, तरी माझ्या मते ती आपण करीत असलेली कर्मकर्तव्ये ‘प्रार्थना’ म्हणून देवापर्यंत पोहोचलेली नाहीत असे अनुभवांती म्हणावे लागेल. उदाहरणार्थ, जर आपण व्यंकटेश स्तोत्र किवा अन्य एखादे स्तोत्र वाचत असाल, तर स्तोत्राच्या शेवटी जी ‘अवतरणिका’ म्हणून लिहीलेली असते, त्यात अमुक दिवस अमुक वेळेपर्यंत ह्या स्त्रोतांचे जर पठण केले तर अमुक फल प्राप्ती होईल, असे जेव्हा वाचनात किंवा पठणात येते, तेव्हा देव व आपण. यामध्ये काय देवाण-घेवाण चाललेली आहे, याचा स्पष्ट खुलासा होणार आहे. आपणास काही प्राप्त करावयाचे आहे ते आपण अनेक जन्मापर्यंत जरी देवाकडे मागत राहिलो, तरी ती सुख-संपत्ती परमेश्वर तुम्हाला कदापिही देणार नाही. जेव्हा तुम्हाला जगतातील इतर दु:खी माणसाला आपल्यासारखेच सुख प्राप्त व्हावे, अशी  तळमळ होऊन, तुम्ही इतरांसाठी परमेश्वराला प्रार्थना माध्यमातून आळवाल, तेव्हाच तुमच्या प्राप्त जीवनात ज्या उणीवा आहेत ह्या भरुन निघतील. ही इतरांच्या कल्याणाची सखोल अशी मानवी कर्तव्याची भूमिका, आजपर्यंत ज्या काही धर्माचा, शास्त्राचा किंवा देवदेवतार्जनाचा आपण विचार केलात, त्यात इतरांसाठी माझ्या प्राप्त जीवनांत मला काही कर्तव्य करावयाचे आहे, ही जाणीव किंवा बोध आपणास कोठेही सापडणार नाही. कोणताही धार्मिक विधी आपणांकरवी जेव्हा केला जातो, तत्पूर्वी काही संकल्पाचा (प्रार्थनेचा) उच्चार करुन विधीस आरंभ करता, त्यातच आपला वैयक्तिक स्वार्थ किती व काय आहे हे देव जाणत असल्याने आपण केलेला विधी हा क्रियाकर्म न होता, ती एक शास्त्रपरत्वे देवाला उद्देशून, पण स्वतःच्या स्वार्थासाठी केलेली प्रार्थना आहे.

अशा मार्गाचा शतकानुशतके आम्ही मानवांनी अज्ञानाने अवलंब करुन प्राप्त झालेल्या जीवनास ईश्वरकृपेने साकार करण्याचा कर्तव्यास आपण मुकलो आहोत, ह्या जाणीवेची ओळख ह्या समितीच्या कार्यारंभी श्री सद्गुरुकृपेने झाल्यावर, गुरु आज्ञेने जेव्हा ह्या समितीच्या कार्यास आरंभ केला, तत्पूर्वी आपण आपल्या अडिअडचणी निवारणार्थ निराकरण विचारण्यास येणार, अशावेळी आपल्या जीवनाला योग्य मार्गाने योग्य ते वळण दिले जावे म्हणून प्रथमतः गुरुआज्ञेने ‘हे, भगवंता नारायणा,..’ ही प्रार्थना लिहिण्यात आली आजपर्यंत भक्त ही प्रार्थना नित्याच्या आरती नंतर प्रत्येक केंद्रावर सकाळ संध्याकाळ ऐकता. कदाचित् ही प्रार्थना आपण घरीसुध्दा म्हणत असाल. पण ह्या प्रार्थनेत जीवनोध्दारार्थ काय वेदवेदांत गुरुकृपेने सामावले आहेत, ह्याची चुकूनही आपणास जाणीव झाली नसेल.

वर लिहिल्याप्रमाणे जेव्हा इतरांसाठी आपण आपल्या काया-वाचा-मनाने सदिच्छा प्रगट करतो, तेव्हा ही नित्याची क्रिया काही लक्ष जप संख्येपेक्षा अधिक पुण्यकर्म जोडण्यास मदत करते. याचे कारण व्यक्तीगत जीवनातील उणीवा, गरजा यांची पूर्तता होण्यासाठी जेव्हा आपण पूजा-अर्चा, देवधर्म किंवा काही धार्मिक विधी करतो, तेव्हा आपले मन, हे करीत असलेल्या विधीच्या ठायी एकाग्र झालेले नसते. तर ते मन, ज्या उणीवा आहेत, त्या प्राप्त होण्याचा मार्ग शोधित असते. पण जर आपण एखादी प्रार्थना, म्हणजे आज जी म्हणत आहोत, ती नित्याने म्हटली तर भवितव्यात कुटुंबासाठी व इतरांसाठी गुरुकृपेने सिध्दसिध्दांत पध्दतीचा नकळत उच्चर करुन, कुटुंबातील व इतर व्यक्तींच्या जीवनातील उणीवा दूर होण्यास, गुरुकृपाशिर्वादाने ह्या कार्यपध्दतीत ज्या काही सिध्दसिध्दांत पध्दती आहेत, त्यांचा लाभ आपण कृपाशिर्वाद म्हणून घेतला असल्याने, प्रार्थना माध्यमातून ह्या सिध्दसिध्दांत पध्दती इतरांच्या कल्याणार्थ, आपल्या नकळत कार्यान्वित होणार आहेत. पण ही जाणीव आजपर्यंत आपल्याला झालेली नाही.

आज आपण भक्तांना गुरुकृपाशिर्वादाने जी बहुमोल अशी अवस्था इहजन्मांत प्राप्त झाली आहे, अशा अवस्थेची प्राप्ती होण्यास जरी आपण भक्तांनी अनेक जन्म खर्च केले असते, तरी ही अवस्था प्राप्त होणे कठीण आहे, असे अनेक वेळा झालेल्या मुलाखततीत सूचित करण्यात आले आहे. पण आपण भक्तांनी काही एक जप, तप, साधन न करता, श्रीसद्गुरुंनी कृपावंत होऊन, ही जी अवस्था प्राप्त करुन दिली आहे, त्या अवस्थेचा आपण आस्थेने विचार केला नाहीत या बद्दल दु:ख वाटते. ह्यापेक्षा जर इतरांच्या जीवनातील ऐहिक सुखापेक्षा अधिक सुख कृपाशिर्वादाने आपल्याला  प्राप्त झाले असते, तर त्या सुखाबद्दल अधिक आस्था, प्रेम निर्माण झाले असते. आज गरजेपेक्षा अधिक काही प्राप्त करुन देण्यास श्रीसद्गुरु असमर्थ नाहीत, पण जे काही आपल्याला प्राप्त होईल, ती सर्व सुखसंपत्ती इह जगताचा निरोप घेतेवेळी, इहजगतात सोडून जावी लागेल. आज प्राप्त झालेले पै-पैशाचे सुख ह्याचा पुढील जन्माची तरतूद करण्यासाठी किंवा उत्तम असा जन्म प्राप्त होण्यासाठी, भवितव्यात काहीही उपयोग नाही. या जाणीवेने गरजे इतकेच सुख, आज आम्हां मानवांना देऊन, प्राप्त जन्मांची वारंवार पुनरावृत्ति होऊन नये म्हणून, जरी आज आपण कर्मपरत्वे जन्म घेते झालो आहोत, तरी त्या जन्माचे सार्थक म्हणून श्रीसद्गुरुंनी आजचा जन्म ‘कृपापरत्वे’ करुन दिला आहे. ही बहुमोल अशी ठेव, व्यक्तिशः आपल्याचसाठी व आपल्या कुटुंबियांच्या भवितव्यासाठी असल्याने, आपण भक्तांचे भवितव्यासाठी आद्य कर्तव्य असे की, प्राप्त झालेली अवस्था जतन करण्याचे कर्तव्यच आता आपल्यासाठी शिल्लक आहे. आपणास प्राप्त झालेल्या अवस्थेचा इतरांना लाभ देण्याचा परोपकार जरी करता आला नाही, तरी ह्या प्राप्त अवस्थेचा दुरुपयोग विचार-अविचाराने, आपल्या ज्ञान-अज्ञानाने होऊ नये, ही दक्षता आपण भक्तांनी विचारात ध्यावयास पाहिजे.

आज आपणास जी अवस्था प्राप्त झाली आहे, त्या अवस्थेचा लाभ होण्यासाठी, कोणकोणत्या ऋणानुबंधातून आपणास सुलभ व सोप्या मार्गाने ऋणमुक्त केले आहे, याची जाणीव आपणास प्रथमतः व्हावयास पाहिजे. आम्ही मानव जन्माला आल्यावर, प्राप्त जीवन हे पाच ऋणानुबंधात (मातृपितृ, इतरेजन, देवादिक, जन्मकर्म, जन्मजन्मांतर) हितसंबंधित असते. जोपर्यंत ह्या पाच ऋणानुबंधातील कर्तव्याची पूर्तता आपल्या हातून होत नाही, तोपर्यंत प्राप्त झालेल्या जीवनांचे सार्थक होत नाही. यदाकदाचित् एखाद्याला ह्या ऋणानुबंधांची जाणीव होऊन, त्यातून मुक्त होण्याचे कर्तव्य देवदेवकादि मार्गाने त्याने करावयाचे ठरविले, तर त्यासाठी प्राप्त जीवन तर अपुरे आहेच, पण याशिवाय ज्या विधी मार्गपरत्वे आचार, विचार, आहाराची व पै-पैशाची आवश्यकता असते, तेवढा खर्च करुनही आपण ऋणमुक्त होणे अश्यकच आहे. काही एका विधीपरत्वे देवधर्म, दानधर्म, परोपकार, तीर्थयात्रा आदि धर्मकृत्ये आपल्या हातून घडली, तर यापैकी एक किंवा दोन ऋणानुबंधातून आपण इहजन्मात मुक्त होऊ शकाल. पण पुनश्च जन्म प्राप्तीच्या वेळी कृपाशिर्वादाच्या अभावी प्राप्त झालेला जन्म, हा पुनश्च पाच ऋणानुबंधाशी हितसंबंधीत हा असणारच. ही जी व्यथा आधिव्याधि म्हणून आम्हा मानवांच्या प्रत्येक जन्मांत आम्हाला भोगावी लागते, त्यामुळे प्रत्येक जन्मात ‘जन्मांचे कारण’ म्हणून जो काही विषय घेऊन आत्मा नरजन्म घेतो, त्या नराचा नारायण होण्यास,अनेक जन्म प्राप्त होऊनही, जे जन्माला येण्याचे कारण स्वतःसाठी व इतरांसाठी असते,त्याचे सार्थक होत नाही.

आपल्या नित्याच्या जीवनात अनेक धर्मग्रंथ वाचनात येतात, पोथीपुराणे यांचेही श्रवण मनन होते. ही सर्व शास्त्रे आम्हास “प्राप्त झालेल्या जन्माचे सार्थक करुन घ्यावे”, असे सांगतात व आपण नित्याने हे जरी ऐकतो, तरी आजपर्यंत कोणीही निश्चित् असा मार्ग, आम्हा मानवांना जीवनाच्या सार्थकतेसाठी सूचित केला नाही. त्यामुळे एकमेकांनी एकमेकाला, ‘जन्माला आला आहेस, जन्माचे सार्थक करुन घे’, एवढे सांगण्या व्यतिरीक्त काहीही केलेले नाही. ज्यांच्या करवी हा बोध आपण श्रवण करतो, त्यांचे तरी जीवन सार्थकी लागले आहे का असा प्रश्न कोणीही विचारात घेत नाही. हीच अंधश्रध्देने अनुकरण करण्याची व्यथा समाजात रुढ झाली असल्याने त्याच मार्गाचा अवलंब शतकानुशतके होत असून, आजपर्यंत कुणीही साधकाने सुलभ व सोप्या अशा मार्गाने, आम्हा मानवांची जीवने साकार करण्याचे शास्त्रशुध्द शास्त्र उपयोगात आणलेले नाही. आज मला असे म्हणावे लागेल की, आपण भक्त काही एक अडिअडचणी निमित्ताने व त्या निवारण व्हाव्यात, असा हेतू विचारात घेऊन, ह्या समितीच्या कार्य पध्दतीचा लाभ घेण्यासाठी आलात. पण समितीच्या कार्याचा लाभ अडिअडचणी निवारणार्थ घेत असताना, आपल्या प्राप्त जीवनाचे सार्थक होईल, अशा सिध्दसिध्दांत पध्दतीचाही समावेश जो ह्या कार्यात आहे, त्याचाही लाभ आज आपण घेते झाला आहात. एके काळी आपण भक्त सुखप्राप्तीच्या शोधात आलात व आज आपल्या नकळत आपण इतरांनाही सुख देण्यास समर्थ झालात. ही अवस्था ह्या जन्मात, ज्या सद्गुरु कृपाशिर्वादाने आपणास प्राप्त झोली आहे, त्या गुरुमाऊलीच्या कृपाशिर्वादाची धन्यता वर्णन करण्यास शब्दही आज त्रिभूवनात अपूरे आहेत !

हा विस्तृत असा कार्यपध्दतीचा वृतांत, अनेक भक्तांच्या अनुभवास आला असून, ज्या सिध्दसिध्दांत पध्दतीने आपण भक्तांना आजच्या अवस्थेपर्यंत येण्याचे भाग्य प्राप्त झाले, त्याच सिध्दसिध्दांत पध्दती .भवितव्यात जगाच्या कल्याणासाठी व सुख-शांती-समाधानासाठी उपयोगात आणावयाच्या  आहेत. पण नव्याने येणाऱ्या परिचित अपिरिचत अशा भक्तांना दीर्घकाळपर्यंत त्यांच्या इच्छा अपेक्षेप्रमाणे प्राप्त जीवनात जे काही ऐहिक व पारमार्थिक सुख प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे, त्यांना प्राप्त जीवनाबद्दल आपले कर्तव्य काय याची जाणीव नाही. आज ज्यांना आपण सुशिक्षीत  किंवा वैज्ञानिक म्हणून म्हणतो, अशांनी जीवन जगण्याचे जरी ज्ञान प्राप्त करुन घेतले असले, तरी ‘जीवनाबद्दल ज्ञान’ त्यांना नसल्याने, त्यांच्या अज्ञानाने त्यांना प्राप्त झालेल्यापैकी पंचाहत्तर टक्के जीवनाचा, ऐहिक सुखसंपत्ती प्राप्त करण्यातच अपव्यय  होत आहे. प्राप्त झालेले जीवन किती बहुमोल आहे याची जाणीव न होण्याने, अधिक सुखप्राप्ती म्हणजे जीवनाचे सार्थक, अशा हेतूने अशा व्यक्तींची बहुमोल जीवने अनाठायी खर्च होत आहेत. अशांना जर प्राप्त जीवनाची ओळख झाली, तर भवितव्यात विश्वशांतीचे कृपाछत्र धारण करण्यास ह्या व्यक्तींचा हातभार हा अधिक मोलाचा आहे. यासाठी आपणास प्राप्त झालेले जीवन सार्थकी लागावे म्हणून आजपर्यंत ज्या काही सुलभ व सोप्या सिध्दसिध्दांत पध्दतीचा (विमोचन, दीक्षा, साधन सेवा) अवलंब केला गेला, त्याहीपेक्षा गुरुकृपाशिर्वादाने, सुलभ अशां पध्दतीने, जगतातील दु:खीकष्टी  लोकांना सुखाची दिशा प्राप्त करुन देऊन, प्राप्त जन्मांचे ज्ञान व कर्तव्य करण्यास त्यांना परमेश्वराने बुध्दी द्यावी, अशी साधना आता आपण गुरुबंधु-भगिनींना करावयाची आहे. ही जाणीव श्रीसद्गुरुंना तीस वर्षापूर्वीच कार्यारंभी होती, म्हणून त्यानी ‘हे भगवंता नारायणा …. ‘ ही प्रार्थना की ज्या प्रार्थनेत आजपर्यंत ज्या काही सिध्दसिध्दांत पध्दतीने आपण भक्तांना आजची अवस्था प्राप्त झाली आहे, त्या अवस्थेचा लाभ न कळत जगतातील इतर दु:खीकष्टी, अज्ञानी लोकांना  व्हावा म्हणून सर्व सिध्दसिध्दांत पध्दतीचा समावेश ह्या प्रार्थनेत केला आहे.

आपण भक्तांची जीवने ही गुरुमार्गी होण्यापूर्वी, जीवन म्हणून जरी आपण व्यतीत करीत होता, तरी ‘जीवन’ ह्या शब्दाचा सखोल अर्थ आपल्याला समजला नव्हता. जीवन ह्या शब्दाचा अर्थ असा की,व्यतीत होणार काळ. आम्हा मानवांना जे जीवन प्राप्त होते, तत्पूर्वी त्या जीवनाचे स्थळ, काळ, वेळ हे विधीलिखीत असल्याने, आपण जरी जीवन व्यतीत करीत असलो, तरी व्यतीत होणारे जीवन हे निसर्गाच्या गतीच्या अधीन असल्याने, जन्माला आलेल्या वेळेपासून ते अंतापर्यतचा काळ त्या निसर्गगतीप्रमाणे व्यतीत होत असतो. जेव्हा आम्हा मानवाना जीवन ही अवस्था प्राप्त होते, अशा अवस्थेत देह व जीव (आत्मा), म्हणजे देहिक व आत्मिक अशी अवस्था असते. प्रत्येक जन्मांत आत्म्याला कर्मपरत्वे नव्याने देह जरी धारण करावा लागतो तरी आत्मा किंवा आत्मिक अवस्था ही बदलत नाही. प्रत्येकाच्या जीवनात देहिक अवस्था ही पंचवीस टक्के असून, आत्मिक अवस्था पंचाहत्तर टक्के असते. जोपर्यंत देहिक अवस्था ही आत्मिक अवस्थेशी एकरुप होत नाही, तोपर्यंत प्राप्त झालेले जीवन कोणतेही सुखसमाधान याबद्दल त्या व्यक्तीचे मन शांत नसते. देहिक अवस्थेची जाणीव देहाने होत असल्याने, देहाच्या ठायी जी माध्यमे जाणीव किंवा ज्ञान करुन देण्याची आहेत, ती माध्यमे आपल्या आसमंतातील इतर व्यक्तींच्या जीवनाचे अनुकरण करण्याकडेच स्वाभाविक प्रवृत्त होतात. त्यामुळे आपल्याला जरी परमेश्वकृपेने काही सुख समाधान प्राप्त झाले असले, तरी इतरांच्या जीवनाकडे पाहून, आपल्या जीवनात बरीच काही ऐहिक सुखाची उणीव आहे असा भास निर्माण होतो. पण अशा जीवनांत परमेश्वराच्या कृपेची उणीव आहे, ही जाणीव होत नसल्याने, देहिक व आत्मिक ह्या अवस्थांचे एकरुप न होता ह्या दोन अवस्था भिन्नाभिन्न विषयपरत्वे  आचार-विचार निर्माण करत्या होतात व जरी आपल्या अपेक्षेपलीकडे काहीही प्राप्त झाले, तरी आत्मिक म्हणजे मनाची शांतता आपल्याला अनुभविण्यास येत नाही. ह्या दोन्ही अवस्थांचे ऐक्यत्व किंवा एकरुपत्व हे केवळ सांगण्याने किंवा बोलण्याने होणारे नसून ते ऐक्यत्व साधण्यास निश्चित असे साधन व गुरुकृपाशिर्वाद ह्यांची अत्यंत आवश्यकता आहे. अशी अवस्था गुरुकृपाशिर्वादाने आपण भक्तांना ॐकार साधनेच्या माध्यमातून करुन दिल्यावर, जेव्हा आपल्या देहिक व आत्मिक अवस्थांचे एकरुपत्व झाले व ह्या दोन्ही अवस्था ज्या पंचप्राण कोशापरत्वे (अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय ) कार्यान्वित होतात.अशा कोशांची शुध्दता करुन, अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत सूचित केलेल्या साधनेपरत्वे हे कोश आज एकमेकांना जोडून दिले असल्याने, आजच्या अवस्थेत ज्या ॐकार साधनेचा आपण लाभ घेते झाला आहात, ती अवस्था म्हणजे ‘हिरण्यगर्भ अवस्था’ किंवा पिंडी ते ब्रम्हांडी ही अवस्था होय व ह्या अवस्थेमुळे आज आपले काया, वाचा, मन म्हणजे देहिक व आत्मिक हे जे गुरुरुप झाले आहे, ती ‘सेवक अवस्था’ होय !

आठव्या संमेलनात आपण भक्तांना सेवक अवस्थेचा लाभ करुन दिला आहे असे जेव्हा सांगण्यात आले, तेव्हा आपण भक्त जागे होऊन समाजात काहीतरी कार्य करावे, असे आपणास वाटू लागले. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, आज समितीची कार्यकेंद्रे,गोवा, बेळगाव, कराड, पुणे, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, विजापूर, दिल्ली अशी असून, तेथील कार्यार्थ सेवक नियुक्त आहेत. मग संमेलनास उपस्थित झालेल्या चारशे सेवकांना कार्यार्थ कार्यकेंद्रे नसल्यामुळे, आपणास प्राप्त झालेल्या अवस्थेतून कार्य करावे, असे जे सूचित करण्यात येत आहे, याचा अर्थ आपण सेवकांना न समजल्याने, आपणास कार्य करण्यास केव्हा संधी किंवा आज्ञा मिळते आहे, याची अनेक सेवक बंधू आज वाट पहात आहेत. पण ईश्वरी कायार्थ आणखी कार्यकेंद्रे निर्माण करणे म्हणजे कार्य नसून, तो एक भवितव्यात कार्याचा प्रचार न होता पसारा होईल, ह्या जाणीवेने श्रीगुरुंनी प्रत्येक सेवकाचे कुटुंब व ते रहात असलेली जागा हे आपले ‘कार्यकेंद्र’ केले आहे. याचे स्पष्टीकरण म्हणजे आता भवितव्यात इतरांच्या कल्याणासाठी ‘ हे भगवंता नारायणा …’ एवढीच प्रार्थना की, ज्या प्रार्थनेत आम्हा मानवांच्या कल्याणाच्या सिध्द-सिध्दांत पध्दती आहेत, त्या प्रार्थनेचा उच्चार आपण सेवकांना नित्याने आपल्या कुटुंबियांसमवेत बसून करावाचा आहे. कोणतेही एखादे दिव्य साधन करुन किंवा इतरांना ते करावयास लावून, ह्या समितीच्या कार्याचा प्रचार करावयाचा नाही.

प्रार्थना :- हे साधन.सर्वात श्रेष्ठ असून, जगतात सर्व धर्मात प्रार्थनेला जेवढे महत्व आहे, तेवढे प्रार्थनापरत्वे विधीस नाही, हे आपण सेवकांनी लक्षात ठेवावे .पूर्वीच्या अवस्थेत आपल्या देहिक अवस्थेच्या आसमंतात अनेक दूषित वलये होती, शिवाय देहिक व आत्मिक ह्या अवस्थांचे एकरुपत्व आनंदमय कोशाशी झालेले नव्हते. त्यामुळे जरी आपणास पूर्वी साधनसेवा किंवा कृपाशिर्वाद हे प्राप्त होते, तरी त्याची जाणीव आपल्या काया,वाचा,मनाला होत नसे. आज आपली देहिक व आत्मिक अवस्था निकोप होऊन ती सद्गुरुरुप झाली आहे म्हटल्यावर, आपले काया, वाचा, मन हे आता पूर्वीच्या जन्मपरत्वे कोणत्याही ऋणानुबंधात नसून, ते श्रीसद्गुरुकृपाशिर्वादाचे प्रतिक म्हणून उदयास आले आहे, हे आपण भक्तांनी लक्षात घ्यावे..

आज जगतात प्रत्येक धर्मात धर्मागुरु आहेत. ते सांगत असलेल्या प्रार्थना आपण ऐकतो व भक्तिभावनेने त्यावर श्रध्दा ठेवून, त्यांच्या मुखातून निघालेले शब्द म्हणजे परमेश्वराचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्याचे एक माध्यम आहे, अशी श्रध्दा ठेवून काही विधी करीत असतो. उदाहरणार्थ, अकरा वैदिकांनी जर अकरा वेळा रुद्र आवर्तन म्हटले, तर देवाला रुद्राभिषेक होतो, अशी आपली श्रध्दा असून, त्या श्रद्धेपरत्वे आज सर्वत्र असे विधी होत असतात. पण आपण चुकूनही असा विचार करीत नाही की, आपल्यासाठी जी व्यक्ती प्रार्थनामाध्यमातून देवाला आळवित आहे, तिचा देहिक व आत्मिक विकास किती झाला आहे ? अशा ह्या व्यक्ती देहिक व आत्मिक अवस्थेने विकसित झालेल्या नसतात. त्यांची आपणासाठी प्रार्थना करण्याची आस्था हे एक उदरनिर्वाहाचे साधन असल्याने, आज वर्षानुवर्षे जरी आपण ह्या प्रार्थना करुन विधी करीत आहोत, तरी इष्ट फलप्राप्ती होत नाही.

गुरुकृपाशिर्वादाने जेव्हा देहिक व आत्मिक अवस्थांचा विकास होऊन, प्राप्त जीवन गुरुमय होते, तेव्हा ह्या त्रिभुवनांत वास करीत असलेला परमेश्वर, हा आपल्या हाकेला साकार करण्यासाठी सदैव तत्पर असतो. अशा सिध्दसाधनपध्दतीचा विचार करुन, श्रीगुरुंनी आपण भक्तांना नित्याने म्हणण्यास जी प्रार्थना दिली आहे, ती प्रार्थना आपण भक्तांच्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीच्या वाणी माध्यमातून जेव्हा उच्चारली जाईल, तेव्हा त्या उच्चारांचे स्पंद किंवा ध्वनी हे आसमंतातील वातावरण शुध्द करण्याचे कार्य करतील. आज जगतात हे काही दु:ख,अशांतता पसरली आहे, तिच्या मुळाशी प्रत्येकाचे जीवनाबद्दलचे अज्ञान आहे. ह्या अज्ञानाने प्रत्येक व्यक्ती केवळ ऐहिक विषयपरत्वे जगण्यात जीवनाचा विचार करीत आहे. असे विचार जे त्यांच्या ठायी निर्माण होतात, ते विचार त्यांच्या माध्यमातून ह्या वातावरणात पसरुन नैसर्गिक वातावरणातील शुध्दतेची जी गरज आम्हा मानवांना सुख,शातीसाठी लागते, ते वातावरणात आज दुषित झाले असून, आपण कोणत्याही देवदेवतांच्या मार्गाचा जरी अवलंब केलात, तरी सुख,शांती, समाधान प्राप्त होणे शक्य नाही.

सर्वात श्रेष्ठ साधना किंवा इष्ट जीवनाचा विकास करण्याचे माध्यम, की ज्या माध्यमातून काया, वाचा, मनाने एकरुपत्व व्हावयास पाहिजे, ते साधन म्हणजे प्रार्थना होय. प्रार्थना हे साधन जरी विचारांती लहान असले तरी त्याचे कार्य महान आहे हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. आज आपण भक्तांची देहिक व आत्मिक शक्ति गुरुकृपेने एक झाली असून, जी प्रार्थना आपणास करावयाची आहे, त्या प्रार्थनेत गुरुकृपाशिर्वादाने जी काही साध्यसिध्दता आम्हा मानवांच्या कल्याणासाठी आहे, तिचा समावेश आपणास नित्याने म्हणावयास सूचित केलेल्या प्रार्थनेत असल्याने, ह्या प्रार्थनामाध्यमातून बहुजन समाजाचे कल्याण अधिक लवकर होणार आहे.

पूर्वापार रुढीपरंपरेप्रमाणे आजपर्यंत समाजात जे काही धार्मिक विधी इष्टकायार्थ किंवा इष्ट फलप्राप्तीसाठी केले जातात, त्यात वेदांत मंत्रांचा आधार घेतला जातो, ते मंत्रसुध्दा  प्रार्थनाच होत. पण तुमच्या प्रार्थनेने इष्टफलप्राप्ती होईल किंवा नाही यावर आपला विश्वास नसल्याने, त्या मंत्रांच्या जोडीला काही विधी हे करण्याचे वेदकालापासून सूचित करण्यात आले. म्हणजे जरी आपण एखादा वेदमंत्र हा श्रवण करीत असलो, तरी त्या मंत्रोच्चाराप्रमाणे कायेने काही क्रिया केल्याशिवाय त्या मंत्रावर आपली श्रध्दा दृढ होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेदवेदांत मंत्राला विधीचा आधार देऊन, विधी करण्याचा धार्मिक विधी हा प्रचलित समाजात रुढ झाला. आज घरोघरी व देशभर कौटुंबिक शांततेपासून ते विश्वशांतीपर्यंत अशा विधींचा प्रसार होत आहे. पण वेदमंत्र अपौरुषेय आहेत व ज्या व्यक्तिमाध्यमांच्या पठणातून त्यांचा उच्चार केला जात आहे, ते मंत्र त्या व्यक्तींनी सिध्द केले आहेत किंवा नाहीत याचा विचार न होण्याने, केवळ पठण केले आहे. म्हणजे त्या उच्चारलेल्या मंत्रातून काही साध्य होईल असे नाही. अशी ही आजची समाजातील रुढ झालेली परंपरा, या मागे प्रत्येकाचा सद्हेतू असा आहे की, आपल्या न कळत परमेश्वरकृपेने जे काही प्राप्त झाले आहे, त्यात सुखसमाधान न मानता, जगतात इतरांना आपल्यापेक्षा जे काही अधिक सुख प्राप्त झाले आहे, अशा सुखाची प्राप्ती आपल्याला व्हावी, म्हणून वेदकालापासून सूचित केलेली सूक्ते (प्रार्थना) यांचा धार्मिक विधी म्हणून केला जात आहे.

असे विधी शतकानुशतके होत असूनसुध्दा, आज आम्हां मानवांना जीवनात जे सुख, शांती, समाधान नाही, त्याच्या मुळाशी कारण म्हणजे, प्राप्त झालेले जीवन ज्या देहिक माध्यमाद्वारा व्यतीत करावयाचे, त्या देहिक माध्यमाचा यथोचित विकास हा न होण्यामुळे, आपण करीत असलेले देवदेवतार्जन व धार्मिक विधी यांचे फल आपण प्राप्त करु शकत नाही. यासाठी जेव्हा आपण गुरुमार्गाकडे जातो, तेव्हा आपण आपले दु:ख गुरुमाध्यमाला कथन करुन, त्यांच्या कृपाशिर्वादाने ते निवारण व्हावे अशी अपेक्षा ठेवतो. पण गुरुमार्गात ज्याला दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते, अशांना भेटावयास आलेल्या व्यक्तीच्या जीवनातील उणीवापेक्षा, ज्या देहिक माध्यमातून हे जीवन व्यतीत करावयाचे आहे, त्या देहिक माध्यमात काय काय उणीवा  आहेत त्या दिसतात.अ शावेळी गुरु जो कृपाशिर्वाद देतात व जो आपण घेतो, त्या ठिकाणी गुरु व भक्त यांच्या विचारांची दिशा परस्परात विरोधात्मक असते. गुरुंनी दिलेला आशिर्वाद हा देहिक माध्यमातील उणीवा (अविकसितता) भरुन निघाव्यात व देहिक विकास व्हावा या विचाराने श्रीगुरुनी कृपावंत होऊन दिलेला असतो, पण कृपाशिर्वादार्थ आलेल्या भक्ताचे विचार हे ऐहिक सुखाकडे धाव घेणारे असल्याने, ह्या भक्ताच्या कल्याणार्थ श्रीगुरुंनी आपल्या सामर्थ्याचा कृपाशिर्वाद म्हणून काय वापर केला आहे, याची जाणीव भक्तास होत नसल्याने, अनेक वर्षे गुरुमार्गात राहूनही गुरुंच्या कार्याची किंवा सामर्थ्याची ओळख आम्हा भक्तांना होत नाही.

काही व्यक्ती गुरुमार्गी न होता, आपल्या घराण्यातील इष्टदेवता यांच्या प्रीत्यर्थ काही धार्मिक  विधी करुन, ह्या उणीवा भरुन काढण्याचा प्रयत्न करीत असतात. अशावेळी ज्या देहिक माध्यमाद्वारे कृपाशिर्वाद धारण करावयाचा आहे, ते किती अविकसित आहे याची जाणीव होत नाही. ज्या व्यक्तिमाध्यमाकडून हे विधी देवतांच्या प्रीत्यर्थ केले जातात, त्यांनाही देहिक माध्यमातील अविकसितता म्हणजे उणीव याची जाणीव होत नाही.प ण गुरुमाध्यम हे ईश्वरी आज्ञेने मानवी रुप धारण करुन, ईश्वराचे कार्य करण्यासाठी इहलोकी जन्म घेते, असा हा जन्म मानवी रुपांत असल्याने व भेटावयास आलेली व्यक्ती ही मानवच असल्याने, श्रीगुरुंना त्या व्यक्तीत सुख, शांती, समाधान प्राप्त करण्यासाठी कशाची कमतरता आहे,हे प्रथमतः जाणवते. ते जेव्हा कृपावंत होऊन काही सेवा किंवा कृपाप्रसाद देत असतात, तो प्रसाद आलेल्या भक्ताच्या जीवनातील उणीवांची भरपाई करुन दिलेला नसतो, तर सुखप्राप्तीसाठी देहिक माध्यमात ज्या काही उणीवा आहेत त्या उणीवांची भरपाई दिलेल्या कृपाशिर्वादाने व सूचित केलेल्या सेवेने होत असते. पण अशा कृपाशिर्वादार्थ आलेल्या व्यक्तीचा प्रधान विषय ऐहिक सुख प्राप्त करण्याचा असल्याने, श्रीगुरुंनी दिलेल्या कृपाशिर्वादाची प्राप्ती करुन घेण्याचे कर्तव्य त्या व्यक्तीकडून न होता, उलट जो कृपाशिर्वाद दिला आहे,त्याची अवहेलनाच होत असते.

गुरुकृपेने आज आपण ‘सेवक’ अवस्थेचे माध्यम बनलो आहोत. म्हणजे आपल्यालाही नियुक्त सेवकाप्रमाणे कार्य करण्याचा हक्क आहे, असा दुजाभाव जर आपल्या ठिकाणी निर्माण केलात, तर वरील ज्या अवस्थेचे स्पष्टीकरण आपल्याला करुन दिले आहे, या अवस्थेचा लाभ आपल्याला या अवस्था प्राप्त होऊनही होणार नाही. कार्यार्थ आपला समावेश ह्या कार्यात झाला आहे,  म्हणजे केंद्रप्रमुखाप्रमाणेच आपल्या हातून कामकाज व्हावे किंवा कोणालाही निराकरण सुचविण्यास आपण पात्र झालो आहोत असे नाही, आज आपणास प्राप्त झालेली अवस्था ही गुरुकृपाशिर्वादाची भेट असून, तो ह्या मार्गातील बहुमोल असा अलंकार आहे. ह्या अलंकाराचे जतन करावयाची जबाबदारी म्हणजे प्रथमतः स्वतःबद्दलचा अहंभाव कमी करुन, त्या ठिकाणी ममता, माया व इतरांबद्दल प्रेम व आस्था ही निर्माण व्हावयास पाहिजे. नियुक्त सेवक हा उच्च आहे व ही अवस्था प्राप्त झालेला सेवक कमी प्रतीचा आहे असा दुजाभाव आपण कदापिही निर्माण करता कामा नये.

आज जी अवस्था गुरुकृपेने प्राप्त झाली आहे, ती अवस्था बाल्य असून, ती सुदृढ व विश्वव्यापी करण्याचे कर्तव्य याकडे अधिक लक्ष देऊन आपल्या नावाला मोठेपणा कसा प्राप्त होईल, हे विष जसे मी आजपर्यंत गेली अनेक वर्षे बाजूला ठेवले, त्याच कर्तव्याचे अनुकरण तुम्हा भक्तांकडून व्हावयास पाहिजे. गुरुआज्ञेने ज्या सेवकांची कार्यार्थ नियुक्ती झालेली असते, अशांच्या रक्षणार्थ श्रीगुरु हे पाठीशी असतात. जी अवस्था नियुक्त सेवकाला प्राप्त झाली आहे, तीच अवस्था आपल्याला प्राप्त झाली आहे असे म्हणून जर आपण गुरुआज्ञेचा आस्थेने विचार न करता, ‘कामकाज’ म्हणजे अडिअडचणींनी त्रस्त झालेल्या माणसाच्या जीवनातील कर्मात हात घातलात, तर जी अवस्था गुरुकृपा म्हणून प्राप्त झाली आहे, ती अवस्था बाल्य असून जोपर्यंत सुदृढ होत नाही, तोपर्यंत कर्मपरत्वे अडिअडचणीत असलेल्या व्यक्तीच्या कर्मात हात घालण्याने, तुम्हास प्राप्त झालेल्या अवस्थेस मुकावे लागेल. ही जाणीव व दक्षता प्रत्येकाने विचारात घेतली पाहिजे. गेल्या कित्येक वर्षात आपण भक्त जेव्हा प्रथमतः अडिअडचणी निवारणार्थ आलात, तेव्हा मलाही आपण भक्तांच्या जीवनातील प्रतिकूल कर्मे अनुकूल करुन देऊन, विमोचनादि विधी करावे लागले. अशी आपल्या कर्मातील प्रतिकूलता ही अनुकूल करुन देऊन व धारण झालेल्या दोषांचे विमोचन करण्यासाठी ज्या काही शारीरिक पीडा व यातना भोगाव्या लागल्या, त्याचे वर्णन मी करु इच्छित नाही. ईश्वराच्या कार्यार्थ माझा जन्म झाला असून,माझे काया, वाचा, मन हे जरी सर्वस्वाने गुरुरुप झाले होते, तरीसुध्दा प्राप्त झालेली गुरुकृपाशिर्वादाची ठेव ही भक्तांच्या जीवनातील प्रतिकूल कर्माच्या किंवा दोषांच्या निवारणार्थ किती खर्ची पडेल याचा अंदाज लागत नाही. आपण भक्तांचे जन्म हे काही ईश्वरी अवतार कार्यार्थ झालेले नाहीत. असा जन्म भवितव्यात येईल. पण आज प्राप्त झालेल्या जन्माचे सार्थक करुन, प्राप्त झालेली कृपा ही पुढील जन्मासाठी ठेव म्हणून शिल्लक ठेवावयाची आहे.

अशा वेळी समाजात नावारुपाला यावे अशा लोभामुळे किंवा आसक्तीमुळे जर आपण प्राप्त झालेल्या अवस्थेतून इतरांच्या जीवनात ढवळाढवळ केली, तर हे लोककल्याण न होता, गुरुंनी अतिपरिश्रमाने ज्या कृपेचा लाभ आपण किंवा आपल्या कुटुंबियांस करुन दिला आहे, त्या बहुमोल अशा आशिर्वादास आपण मुकाल. ही जाणीव आज आपण सेवकास एवढ्यासाठी करुन दिली आहे की, मी जेव्हा पूर्वी कामकाज व निराकरण करीत होतो, अशावेळी अनेक व्यक्ती मला अशा भेटल्या की, ज्या व्यक्तींना त्यांच्या कुलदेवदेवतांचे संचार होते, कृपा होती, वाणीतून निघालेला प्रत्येक शब्द कार्यान्वित होत होता. अशा नावलौकिकामुळे अनेक व्यक्ती व कुटुंबिय मंडळी जी त्यांच्या घराण्यातील दोषामुळे किंवा बाधेमुळे त्रस्त झाली होती, ती निराकरणार्थ येती झाली. पण ह्या साधक अवस्थेतील व्यक्तींना आपल्या समोरील दु:खी व्यक्तींच्या जीवनातील दोष किती प्रखर आहेत ही जाणीव न झाल्याने, त्या साधक अवस्थेतील व्यक्तींच्या जीवनातील प्राप्त झालेली कृपा, त्यांच्या न कळत हे दोष धारणकर्ते होऊन, पुढे ह्या व्यक्तींच्या वाणीतून उच्चारलेला शब्द, हा इतरांचे कल्याण करण्यास असमर्थ तर झालाच, पण त्याच बरोबर त्यांच्या कौटुंबिक जीवनातील सुख, शांती, समाधान यासही त्या कुटुंबियाना मुकावे लागले. ही अनुभवसिध्दता आज आपण भक्तांना मुद्दाम निवेदन करण्याचे कारण असे की, जी अवस्था आज आपण भक्तांस प्राप्त झाली आहे, ती जर आपण आपल्या ज्ञानअज्ञानाने गमावून बसलात, तर ह्या अवस्थेची पुनःश्च प्राप्ती पुढील कोणत्या जन्मात केव्हा होईल व त्यासाठी योग्य असे गुरु माध्यम मिळेल किंवा नाही, हे कोणीही सांगू शकणार नाही. यासाठी आपण भक्तांचे ह्या कायार्थ आद्य कर्तव्य असे की, जी काही गुरु आज्ञा असेल तेव्हढेच कार्य किंवा कर्तव्य आपण भक्तांनी करावे. इतरांच्या कल्याणार्थ आपल्या जीवनाचा सदुपयोग व्हावा अशी जी आपली इच्छा आहे, त्यासाठी आपण व आपल्या कुटुंबियांनी नित्याने सकाळी किंवा संध्याकाळी ‘हे भगवंता, नारायणा…’ ही जी प्रार्थना की, ज्या प्रार्थनेत गेल्या तीस वर्षात गुरुकृपेने मला प्राप्त झालेल्या सर्व सिध्दसिध्दांत पध्दतीचा समावेश आहे, ही नित्यनियमाने म्हणावी. ह्या प्रार्थनेतून निर्माण होणारे स्पंद (Vibrations) ह्या वातावरणात उमटले जाऊन, लोककल्याणार्थ ह्या शब्दलहरी  विश्वभर प्रवाहित होतील. या उलट नियुक्त सेवकाप्रमाणे जर निराकरण करणे म्हणजेच कार्य, असे आपण समजत असाल, तर निराकरणाच्या वेळी आपल्यासमोर ज्या काही व्यक्ती उपस्थित आहेत, तेव्हढ्याच व्यक्तीना आपल्या प्राप्त झालेल्या कृपेचा लाभ होणार आहे. पण त्याऐवजी जेंव्हा आपण वर सांगितल्याप्रमाणे प्रार्थना म्हणाल, तेव्हा ती प्रार्थना एका व्यक्तीसाठी नसून, विश्वातील सर्व मानवांच्या कल्याणार्थ आपल्या वाणी माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला कृपाशिर्वाद आपण प्रवाहित कराल.

यदाकदाचित् कुणाला ह्या प्रार्थनेतील उद्देश अनुभवायचा असेल, तर आपल्या जीवनातील आपले इष्ट-मित्र, नातेवाईक, जे कुटुंबवत्सल आहेत त्यांना प्राप्त जीवनात अडिअडचणी, दु:ख, तथा अशांतता ही भोगावी लागत आहे, अशांना कांही एक निराकरण सूचित न करता, त्या कुटुंबियांच्या नावाचा उच्चार करुन, त्यांना परमेश्वराने सुख, शांती, समाधान द्यावे म्हणून, ‘हे भगवंता नारायणा …’ ही प्रार्थना एक आठवडा किंवा पांच आठवडे म्हणावी व त्याचा लाभ अशा परिचित व्यक्तींना काय झाला याचे अनुमान हे अनुभव म्हणून अनुभवावे, म्हणजे मग आपण भक्तांना, कार्यारंभी जगद्गुरु श्रीसाईनाथ महाराज यांनी सुचविलेली प्रार्थना किती विश्वव्यापक आहे याची प्रचीति येईल. ह्या प्रार्थनेत कोणत्याही देवदेवतांचा, धर्माचा, ज्ञाती बांधवांचा उल्लेख नसल्याने, विश्वातील विश्वबंधुत्व भावाचा हा ठेवा, ज्यांना गुरुकृपाशिर्वादाचा लाभ झाला आहे, अशांच्या सिध्द वाणीतून जर घरोघरी उच्चारला गेला, तर त्याचे पडसाद त्रिभुवनात उमटून, जगातील अखिल मानवाला त्याचा लाभ होणार, हे निश्चित आहे. ही प्रार्थना म्हणण्यासाठी पूजनअर्चनादि, व्रतवैकल्यादि नवससायासादि विधींची गरज नसून जगतातील दु:खी मानवी जीवनाबद्दल आदर व पूज्यता ही मनाच्या ठायी निर्माण करुन, ही जी प्रार्थना गुरुकृपाशिर्वाद म्हणून आहे, अशा प्रार्थनेत जर आपण आपल्या मनाचा समावेश केलात, तर मनाच्या सामर्थ्याने ह्या त्रिभुवनातील दु:ख कसे निवारण होते, हे अनुभवास आल्याशिवाय रहाणार नाही.

आज आपण जे कांही देवदेवतार्जन व धर्मपरत्वे काही धार्मिक विधी करीत असतां, यात एक व्यक्तिगत स्वार्थ यापेक्षा अधिक काही इतरांच्या कल्याणाचे कर्तव्य आपण करीत आहात असा अनुभव येत नाही. यापेक्षा प्रार्थनेमध्ये आपला, कुटुंबियांचा  व जगतातील इतर दु:खी लोकांचाही समावेश आपण करण्याने, जेव्हा प्रार्थनेद्वारे आपण प्राप्त कृपाशिर्वाद इतरांसाठी खर्च करतो, तेव्हा त्याबद्दल सद्गुरुंना धन्यता वाटून, ते आपल्यावर कृपाशिर्वादाचा अधिकच वर्षाव करतात. ही आपल्या न कळत आपणास प्राप्त होणारी कृपाशिर्वादाची ठेव आहे. या उलट आपण अनेक काळपर्यंत जपतप साधनादि मार्गाचा अवलंब करुनही कृपावंत होत नाही, तेव्हा त्या मार्गाचा अवलंब करु नये, अशी आपणास विनम्र विनंती आहे. आपण भक्तांच्या कल्याणार्थ व भवितव्यासाठी यापुढे काही नवीन साधने किंवा सिध्दसाधना आपल्याला आता सूचित करण्याची गरज उरली नाही. मानवी जन्माचे सार्थक होण्यासाठी जी आवश्यक साधने अस्तित्वात आणावयास पाहिजे होती, ती सर्व साधने श्रीसदगुरुंनी सिध्द करुन आपल्या हाती दिली आहेत. त्यांचा योग्य विचारांनी व योग्य कारणास्तव आपण उपयोग करावा, एवढेच कर्तव्य भवितव्यात आपल्यासाठी शिल्लक राहिले आहे. ही कर्तव्यपूर्तता आपण भक्तांनी मनोभावनेने करण्यानेच, ‘श्रीसद्गुरु साईनाथ महाराज की जय’, असे जे म्हणता, हे म्हणण्याचा खरा अर्थ म्हणजे, ह्या अलौकिक अवतारी पुरुषाचे जे कार्य, त्या कार्याचा लाभ ज्या भक्तांना झाला, त्यांच्या वाणीतून ह्या अवतार कार्याचा जयजयकार जगाच्या अंतापर्यंत होत रहावा, अशी श्री जगद्गुरु साईनाथ महाराज यांचे चरणी प्रार्थना.

>>अध्याय ९. ॐ कार साधना.

अध्याय ७. कार्याची निराकरण पध्दती.