अध्याय ३ – निराकरण -कुलधर्म व कुलाचार
प्रथमतः आपणांस पाच आठवडयांचा प्रसाद आपल्या देवादिकांचे कुलधर्म व कुलाचार यासाठी पूजावा लागेल. या पूजनात आपल्या वाडवडिलांच्या हातून आज मितीला न झालेला व राहिलेला कुलधर्म व कुलाचार मान्य करून घ्यावा लागेल. काही घराण्याचे कुलधर्म व कुलाचार इतके विचित्र आहेत की, ते आजच्या परिस्थितीत होणेही शक्य नाही. असे कुलाचार म्हणजे साधे हळद-कुंकू वाहण्यापासून ते रेडा बळी देण्यापर्यंत असू शकतात. तरी याबद्दल दिलेल्या प्रसादाचे अनुष्ठान मांडून रूढ झालेल्या कुलधर्म, कुलाचारांपासून सोडवणूक करून घ्यावी. हे कुलधर्म, कुलाचार यथायोग्य वेळी न झाल्याने जीवनात अनेक तऱ्हेची दु:खे, शारीरिक व्याधी व प्रापंचिक अशांतता निर्माण झालेली असते व पुढेही राहते. आपल्या कुटुंबाच्या भावी पिढीच्या परिस्थितीचा विचार करून देवदेवतांचे कुलधर्म व कुलाचार करणे हितावह होणार आहे.
ग्रामदेवता कुलधर्म – कुलाचार :- दुस-या वेळी आपल्याला आपल्या मूळ गावच्या ग्रामस्थ ग्रामदेवतांबद्दल प्रसाद दिला जातो. प्रत्येकजण आज नोकरी व्यवसायासाठी शहरात आल्यामुळे आपल्या वडिलोपार्जित घराण्याच्या ग्रामदेव परंपरा (उरूस, जत्रा इ.) विसरला. त्यामुळे मूळ गावच्या देवतांचे कुलधर्म संबंध राहिले. त्या गावी तुमच्याच घराण्यांनी गावची वतने (देशपांडे, कुलकर्णी, कोतवाल, चिटणीस इ.) उपभोगली. याच वतनात ग्रामदेवतांचेही उत्पन्न होते. आज त्यापैकी काहीही आपण करू शकत नाही. म्हणून त्याबद्दल त्या देवतांचे कुलधर्म, कुलाचार अंशतः पूर्ण करणे आवश्यक आहे. हे कुलाचार, कुलधर्म न झाल्याने घरांत अशांतता, शारीरिक व्याधी, मानसिक अशांतता, फिट येणे, वेड लागणे, मृत संतती जन्माला येणे किंवा पूर्णत्वाने निर्वंश होणे, संसारांत एकमेकांचे न पटणे यासारख्या आपत्ती ओढवतात.
कुलदेवदेवता व कुलधर्म, कुलाचार निश्चितता :- वरील दोन्ही प्रसाद पूजनानंतर कुलदेवता व ग्रामदेवता यांचे वडिलोपार्जित व आजमितीपर्यंत राहिलेले कुलधर्म व कुलाचार यांची सोडवणूक झाली. आता आपल्या भावी पिढीच्या सुखासमाधानासाठी कुलदेवदेवता व कुलधर्म, कुलाचार यांची निश्चितता करणें आवश्यक आहे. कारण बऱ्याच भक्त-भाविकांची कुलदेवदेवता गोव्यास, कोल्हापुरास, तुळजापुरास किंवा हिमाचल प्रदेशासारख्या दूरच्या ठिकाणी आहे. अशा कुलदेवदेवतांच्या दर्शनास आजच्या परिस्थितीत वारंवार जाणे शक्य आहे का ? ते शक्य नसल्याने पुन्हा वार्षिक कुलधर्म, कुलाचार पहिल्याप्रमाणेच शिल्लक राहून पुन्हा दु:खास कारण होणार. म्हणून आपण ज्या ठिकाणी स्थायिक झाला असाल तेथीलच स्थानिक महालक्ष्मी, महासरस्वती किंवा अन्य देवता कुलदेवदेवता म्हणून मानणें योग्य होईल. त्याच वेळी कुलधर्म व कुलाचार मान्य करून घेणे आवश्यक आहे. बऱ्याच घराण्यांत देवदेवतांच्या नवरात्र महोत्सवांत होमहवन करून बळी दिला जात असे व अद्यापही देण्याची पध्दत आहे. काही घराण्यांत ब्राह्मण, सुवासिनी व कुमारिका यांना भोजन देऊन साडी, चोळी वगैरे देण्याची परंपरा असे. आजच्या परिस्थितीत यांपैकी काय काय शक्य आहे ? याचा विचार करून भावी काळासाठी कुलधर्म निश्चित करणे आवश्यक आहे. विचारांती हेच निश्चित करणे योग्य होईल की नवरात्रांत रोज पूजाअर्चा, साधा नैवेद्य, अखंड नंदादीप किंवा सकाळ-सायंकाळ साजूक तुपाचे निरांजन लावणे, आठव्या दिवशी (अष्टमीस) खणा-नारळाची ओटी, देवतांचे उत्थापन झाल्यावर मान्य केलेल्या कुलदेवतेस किंवा सुवासिनीस द्यावी. परिस्थितीमुळे तेही कोणास शक्य नसेल तर मानलेल्या कुलदेवतेच्या मंदिरात सव्वा पावशेर तूप व तेल नंदादीप लावण्यासाठी द्यावे. खणा-नारळाची ओटी भरावी, भोजन देणे शक्य नाही म्हणून एक माणसाचा शिधा द्यावा. या शुध्द, सात्विक कुलधर्म, कुलाचारावर बऱ्याच भक्त-भाविकांचा विश्वास फारच कमी बसतो कारण या सर्व उपासनेत कोठेही “बोकड किंवा कोंबडी बळी द्यावा” असे सांगितले नाही. तरी अशा विचारांच्या भक्त-भाविकांनी हे लक्षांत घ्यावें की, दैवी उपासनेत बळी देण्यानें देव लवकर प्रसन्न होतात ही रूढ भावना काढून टाकावी. वरील प्रकारे मान ठेवण्यानेच खरा कुलधर्म, कुलाचार होत असतो.
या अनुष्ठान पध्दतीचे मार्गदर्शन करतांना एकंदर तुमच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला आहे. नाहीतर शास्त्राधाराप्रमाणें नवचंडी किंवा शतचंडी हवन व दानधर्म करावयास पाहिजे. या प्रामाणिक भावनेशी आपण समरस होता का ? जेव्हा आपणांस वरील प्रसादाचे अनुष्ठान मांडण्यास सांगतिले जाते, तेव्हां ‘नऊ विडे आवाहनाचे मांडा’ अशी आज्ञा असते. त्यावरील दक्षिणा हीसुध्दा ऐच्छिक स्वरूपाची असून तुम्ही ही भावना निर्माण करू शकत नाही की, “परम पूज्य बाबांच्या कृपेने मी आता देवादिकांच्या रूढ झालेल्या कुलाचार, कुलधर्मापासून सुलभ व सात्विक मार्गाकडे जाणार आहे. तेव्हा आज क्षणापर्यंत राहिलेल्या कुलधर्म, कुलाचार ऋणाबद्दल प्रत्येक विड्यावर पाच आणे ठेवावेत. जर याच कुलधर्म, कुलाचाराबद्दल हवन किंवा दानधर्म करावा लागला असता तर शेकडो रूपये खर्च झाले असते. ते श्री. बाबांच्या कृपेने वांचले”. पण आपली कल्पना अशी आहे की, या विड्यावरील दक्षिणेच्या निमित्ताने समिती पैसे जमा करू पहाते. पण इतक्या स्वार्थ बुध्दीपेक्षा प्रथमच आम्ही आपणांकडे अमुक एक रक्कम मागितली असती. या कार्याचा पाया नि:स्वार्थबुध्दीने सेवा करावयाची व सेवा करण्यास शिकवावयाचे असा आहे. हे आपणांस कदाचित ठाऊक नसेल म्हणून आपण नवे पाच पैसे ठेवून कुलधर्म, कुलाचारास आवाहन करता. परंतु अशा संकुचित भावनेने आपल्या दु:खाची कारणे मिटतील का ? जे जन्मऋणानुबंधनाचे ऋण (देव, गुरू व पितृऋण) बाकी असेल तें देऊन मुक्त झाल्याशिवाय निरंतर सुखाचा पाया भावी पिढीसाठी निर्माण होणार नाही.
वास्तुपुरूष व वास्तुदोष :- आता राहत्या घराच्या वास्तुदोषांमुळे निर्माण झालेल्या दु:खाची कारणमीमांसा विचारांत घ्या. वास्तुदोषामुळे आपल्या जीवनात सदैव अशांतता रहात असते. कुटुंबात रोज कोणी ना कोणीतरी आजारी असते. नोकरी, धंदा, व्यापार यांत आर्थिक प्रगती होत नाही. मिळालेला पै-पैसा पुरत नाही. शिवाय या वास्तुदोषाचा परिणाम आपल्या मुलांच्या बुध्दीवर होत असतो, त्यामुळें त्यांचे अध्ययन प्रगतीपर होत नाही. काही दोष इतके प्रबळ असतात की, आपल्या मुलामुलींची लग्नकार्यसुध्दां होण्यास अडथळे निर्माण करतात. तसेच संतती होण्यासाठी बाधक असतात. तसेच कोणी वाईट इच्छेने करणी, भानामती, जादुटोणा केला तर त्यांचेहि निवारण होऊ शकत नाही. अशा वास्तुदोषामुळे केलेले देवादिकांचे कुलधर्म, कुलाचार किंवा अडीअडचणीप्रीत्यर्थ केली जाणारी सेवा ही सुध्दा होऊ शकत नाही. सेवा झालीच तर पूर्णपणे तिचे फल मिळू शकत नाही. आजच्या आधुनिक जगात या देवतेचा विचार शास्त्रीयदृष्टया व्हावा तसा होत नाही. परंतु याच देवतेच्या कृपाछायेखाली आपले देवधर्म व आपले कौटुंबिक सुख सामावलेले आहे हे कोणाही आधुनिक पध्दतीने नवीन घर बांधणाऱ्यास पटणार नाही. कारण घर बांधतेवेळी जवळ असणारा पैसा व आधुनिक सुखसोयी या खेरीज जागेच्या इतर दोषांकड़े लक्ष दिले जात नाही. म्हणून वास्तुशांत करूनसुध्दां वरील दोषांचा अनुभव तेथें रहावयास आल्यानंतर येतो.
आता या दोषांची कारणमीमांसा पुढीलप्रमाणे सांगतां येईल. राहत्या जागेची वास्तुशांत झाली नसल्यास ती जागा पूर्वीची स्मशानाची, निर्वंशाची, देवस्थानची, दानधर्म केलेली, व्याघमुखी, पूर्वी स्थानदैवत असलेली, सावकाराने व्याजापोटी घेतलेली, शिवाय आजूबाजूला विहीर असून तीत कोणी जीव दिलेला किंवा घर बांधतेवेळी कोणी पड़ून घातमृत्यु झाला असलेली, आजूबाजूस वड, पिंपळ किवा औदुंबर असून तो तोडला गेला असलेली, अशा प्रकाराने वर नमूद केलेले दोष कुटुंबामध्ये सदैव दु:खास कारण होतात.
आता शास्त्राधारांप्रमाणे वास्तुशांत किंवा गृहशांत करणे हा एकच मार्ग आहे. आपण जर भाड्याच्या घरात रहात असाल तर शेदीडशे रूपये खर्च करून वास्तुशांत कराल, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही व आर्थिकदृष्टया ते कोणास सांगणे हितावह होणार नाही. म्हणून येथून सेवकाकरवी वास्तुदेवतेच्या शुध्दीसाठी मंत्राक्षता टाकून वरील दोषाचें निवारण केले जाते व वास्तुदेवतेच्या नावे एक श्रीफळ घरात बांधण्यास दिले जाते. पण ते करून घेण्यास बऱ्याच भक्तमंडळींचा विरोध असतो का, तर हा विधि करीत असतां शेजारी-पाजारी पाहतात व चौकशी करतात. या त्यांच्या होणाऱ्या चौकशीसाठी तुम्ही आपला कार्यभाग घालविता. त्यामुळे पुन्हा दु:खास कारण तुमचे अज्ञान ! आजपावेतो याच अज्ञानामुळे आपण खऱ्या मार्गाचा अवलंब करू शकला नाही. समाजात जणू ही विचारसरणीच रूढ झाली आहे की, संकटे, दु:खे आली की, त्याच्या निवारणार्थ गुपचूप देवादिकांच्या मार्गाचा अवलंब करावयाचा. का, तर तो लोकांना कळतां कामा नये. बरोबर याचाच फायदा जगांतील भोंदू लोक घेऊन तुम्ही दु:खनिवारणार्थ त्यांचेकडे जाताच “अमुक द्या, आम्ही सर्व करतो” असें सांगतात. आपल्या मागे त्यांनी काही दैवी किंवा अन्य प्रकार केले तर ते आपण पाहू शकत नाही किंवा विचारूहि शकत नाही. कारण तुम्ही अशा ठिकाणी जाताना स्वतःच्या मनाला फसवून जग काय म्हणेल या विचाराने गेलांत. आता येथील पूर्वीचा वाईट अनुभव जमेस धरून तुम्ही येथूनहि तशीच अपेक्षा करीत असाल तर आम्ही स्पष्टपणे असे सांगू इच्छितो की, येथील कार्यकारण काही गुपचूप प्रकारांनी येण्यासाठी व करण्यासाठी नाही. आपण उजळ माथ्याने येण्यातच आपले कल्याण होणार आहे. कारण ज्या अनुष्ठानपध्दती दु:खनिवारणार्थ सांगितल्या जातात, त्यांचे अनुष्ठान कमीत कमी पांच आठवड्यांचे तरी असतेच. अशा वेळी कुटुंबातील सर्वांना दु:खनिवाणार्थ मांडलेल्या प्रसादाबद्दल ज्ञान होणे आवश्यक आहे. कारण दु:खनिवाणार्थ अनुष्ठानाप्रीत्यर्थ जी नित्य उपासना सुचविली जाते, ती कुटुंबांतील जास्तीत जास्त मंडळींनी करण्यानेच लवकर सुखप्राप्ति होईल. शिवाय या कार्याचा हेतू देवादिकांचे महत्व, नित्य धर्माचरणाचें महत्व, षोडषादि संस्कारांचे महत्व व कुलधर्म, कुलाचार यांचे जीवनातील महत्व ओळखणे हा आहे. धर्मबाह्य विचारसरणीस आमचे विचार पोषक नाहीत. दु:खनिवारणार्थ जे जे मार्गदर्शन होईल, ते ते कटाक्षाने पाळणे हाच आपला आयुष्यातील सुखाचा क्षण !
वंशदोष व पितृविमोचन :- आता भौतिक दोषांच्या मीमांसेबद्दल जी धर्मपरंपरा आहे ती पूर्णत्वाने समजून घेणे आवश्यक आहे. या दोषांमुळे आज कित्येक घराण्यांची वाताहात झाली आहे. या दोषांचे परिमार्जन पैसे खर्च करूनही होणारे नाही. त्यासाठी सदगुरू कृपाच जोडली पाहिजे. आजपर्यंत या मार्गातील सिध्दसाधकांनी या दोषांच्या परिमार्जनार्थ काही अभ्यास केला असेल असें वाटत नाही. कारण या दोषांच्या परिमाजनार्थ शास्त्राधारात ‘नारायण नागबली’ च सांगितलेला आहे व तो करुनही काही कुटुंबियांना दु:खे भोगावीच लागत आहेत. पुन्हा अशी कुटुंबे त्या दु:खपरिमार्जनार्थ समितीच्या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यासाठी येतात. हे दोष घराण्यात एकदा निर्माण झाले की त्या घराण्याचा पूर्णत्वाने नाश केल्याशिवाय रहात नाहीत. बाह्य जगतात या दोषांचे परिमार्जन होण्यासाठी बरेच पर्याय व उपचार सुचविले जातात व ते करण्याचा आपण प्रयत्नही करता; परंतु या ऋणांतून मुक्त करणे सर्वसामान्य साधकाचे किंवा ज्योतिषाचें काम नव्हें. कारण या दोषपरिमार्जनार्थ तुमच्या सात पिढ्यांतील पितरांना आवाहन करावयाचें असते. त्यांनी ज्ञान-अज्ञानाने ऐहिक सुखाच्या वासनेसाठी जी कर्मे केली ती येणेप्रमाणे –
– तुम्हा कुटुंबियांच्या घराण्यातील गेल्या सात पिढीपर्यंत जे तुमचे वाडवडील वारले, ते त्यांच्या जीवनांत केलेल्या धर्मबाह्य कर्मामुळे, इच्छा वासनेमुळे, देवादिकांची उत्पन्नें, सावकारी, गुप्त धने ठेवून दुसऱ्यास दु:ख देण्यास कारण झाले किंवा निर्वंशाची स्थावर, धन वगैरे घेण्याने मुक्तावस्थेप्रत पोहोचले नाहीत म्हणून मरणोत्तर जीवनानंतर त्यांना वासनारुपी योनि (पिशाच्चरुपाने मूळ पुरूष इ.) प्राप्त झालेली असते. या त्यांच्या वासनेमुळे तुमच्या जीवनात धननाश, विद्यानाश व संततिनाश होत असतो. शिवाय पूर्वी सांगितलेले इतरही पाच दोष निर्माण होतात. आतां असा विचार करा की, इतक्या प्रकारे आपले जीवन दूषित झाल्यावर आपणांस सुखसमाधान लाभेल का ? एक साधे डोके दुखू लागले तर जीव नको होतो आणि हे तर दु:खणे जन्मजन्मांचे आहे !
या सात पिढीतील कित्येकजण, आपल्या तीव्र वासनेमुळे मुक्त होऊ शकत नाहीत. कारण त्यांनी केलेल्या कर्माचे प्रायश्चित्त त्यांनी भोगल्याशिवाय ते मुक्त कसे होणार ? त्या शिवाय त्यांनी इतरेजनांना दु:खे दिली असतील तर त्यांचेहि वाडवडील तळतळाटाने त्यांच्या व तुमच्यामागे असतात. अशा वेळी त्रिस्थळी यात्रेला गेलो ‘(प्रयाग, काशी, गया) आणि श्राध्दादि विधि करून दानधर्म केला म्हणजे वाडवडिलांच्या ऋणांतून मुक्त झालो म्हणून चालणार नाही. कारण त्यावेळी त्यांनी ज्यांना ज्यांना छळले किंवा ते ज्यांच्या ज्यांच्या ऋणास कारण झाले त्यांना मुक्त केलेत का ? आणि अशा पिंडदानाच्या आवाहनाने तुम्ही त्यांना मुक्तही करू शकत नाही. कारण आता ते आत्मे मरणोत्तर जीवनानंतर तुमचे नसून त्यांनी जीवनात जे जे काही बरेवाईट केले त्या प्रायश्चित्त कर्माचे ते आहेत. तुमची त्यांना मुक्त करण्याची इच्छा ही परोपकारार्थ नाही, तर तुम्हाला त्रास होत आहे म्हणून तुम्ही त्यांना मुक्त करू पाहता. म्हणजे पर्यायाने त्यांनी ज्या ज्या वासनेने जे जे केले तेच सुख तुम्हाला आज पाहिजे आहे. तेव्हा नुसते वाडवडील मुक्त होऊन चालणार नाहीत, तर त्यांच्या जीवनांत आलेला प्रत्येक कार्यकारण, हितसंबंध मुक्त व्हावयास पाहिजे. आज स्वतःचे आयुष्य तुमच्या सुखासाठी धोक्यात घालून हें पितृविमोचन करण्यास सहसा कोणीहि साधक तयार होणार नाही. साधारण स्वरुपाची बाधा झाली तर ती जीव नको करते आणि हे आवाहन तर तुमच्या सात पिढीतले तुमचे वाडवडील व त्यांचे संबंधित आत्मे यांना करावयाचे असते. मग हे आत्मे साधकाला या जगात शिल्लक ठेवतील का ? ही जबाबदारी पत्करावयाची म्हणजे मृत्यूला आवाहन करण्यापैकीच आहे. मग आज प्रश्न असा विचाराल की, जर आमच्या दु:खपरंपरा इतक्या दोषांस कारण झाल्या आहेत तर आमचे काय होणार ? तर या दोषपरिमार्जनार्थ या समितीच्या सिध्द-सिध्दान्त पध्दतीत तसा गुरूकृपेचा अमोल प्रसाद मिळालेला आहे की ज्यामुळे आपण या त्यांच्या जन्म-ऋणानुबंधनांतून मुक्त व्हाल. ज्यांना खरोखरच आपले भावी जीवन व भावी पिढयांच्या भाग्याचा विचार करावयाचा आहे, त्यांना या दोष-परंपरेतून ऋणमुक्त होता येईल. हा प्रसाद घेतेवेळी घेणा-यांनी आपली भूमिका समजावून घ्यावी. कारण, सात पिढ्या आणि त्यांचे संबंध यापासून ऋणमुक्त व्हावे अशी इच्छा असेल तर आपण खरोखरच धर्माचरण करणार आहात का ? असाल तर स्वतःला पूर्णपणे विसरावे लागेल. ’मी श्रीमंत’, ‘मी ज्ञानी’, ‘मी इतरांपेक्षां श्रेष्ठ’, हे विचार सोड़ून देऊन परमपूज्य बाबांचे चरणी लीन व्हावे लागेल. गुरूआज्ञेने वेळोवेळी होणारे मार्गदर्शन विचारात घेऊन नित्याचरण करण्याची सवय लावावी लागेल. वरील दोष-परिमार्जनार्थ दिलेल्या प्रसादाचे पूजन-अर्चन व उपासना नित्याने करून वरील संबंधित मृतात्म्याच्या ऋणमुक्ततेपर्यंत व पुढेही धर्माचरण करणे आवश्यक आहे. यासाठी योग्य ते मार्गदर्शन निराकरण पत्रिकेमध्ये आहे.
कदाचित तुमची कल्पना अशी असेल की, पैसे देऊन हे सर्व परस्पर नाही का होणार ? तर ते कदापिही शक्य नाही. कारण, आता ज्या दोष-परिमार्जनार्थ तुम्ही प्रायश्चित्त घेणार आहात, ते दोष असेच पैशांच्या अभिलाषाने झालेले आहेत आणि पुन्हा त्याच पायावर तुम्ही प्रायश्चित्त घेणार असाल तर तें न घेणेच योग्य ठरेल ! आजपर्यंत तुम्हाला जे सुख, समाधान मिळाले नाही ते पाहिजे आहे ना ? तर मग काहीतरी स्वार्थत्याग हा तुम्हाला केलाच पाहिजे. परंतु बाहय जगताने तुम्हाला असे भासविले आहे की, दैव-प्रारब्धांतून ऋणमुक्त होण्यास चार पैसे खर्च केले की जे पाहिजे ते मिळते. मग धर्माचरण केले नाही तरी चालेल ! पण इतक्या संकुचित भावनेने देव, धर्म न मानता तुम्ही सुख निर्माण करू शकणार नाही. कालांतराने तरी तुम्हाला भावी पिढीच्या सुखासाठी धर्माचरण करणेच कर्तव्य ठरणार आहे ! ते धर्माचरण यथायोग्य तऱ्हेने होऊन आपले आचारविचार जीवनाला पोषक आहेत किंवा नाही हे दाखविणे, हाच या कार्याचा हेतू होय.
ऐहिक सुखासाठी आचवलेल्या आजच्या समाजास पैसा हेच सर्वस्व झाले आहे. जीवनातील ऐहिक सुखाची कल्पना निश्चित नसल्याने त्याच्या प्राप्तिसाठी जो पै-पैसा लागतो आहे तो ज्या मार्गाने मिळवता येईल त्या मार्गाने मिळवायचा प्रयत्न मनुष्य अव्याहत करतो आहे. आज या अविचाराबद्दल जर तात्विक मार्गदर्शन वरीलपमाणे केले तर ते कोणासही पटणार नाही. किंबहुना तीच पैसा मिळविण्याची प्रवृत्ती अन्य मार्गाने तुमच्या पूर्वजांमध्ये होती. त्यांनी केलेल्या दुष्कर्मांचा वाटा त्यांनीच दैवी उपासनेने दूर केला होता, राहिलेला तुमच्या वाटणीस आला. तुम्ही आज अनित्य मार्गाने खूप श्रीमंत होण्याची कल्पना मनाशी बाळगली आहे. परंतु तितकेच दु:ख तुमच्या भावी पिढीला भोगावे लागणार आहे हे विसरला आहात. आज तुमच्या जीवनात देवधर्मासाठी निश्चित स्थान नसल्याने ऐन उमेदीमध्ये मिळविलेला पै-पैसा म्हातारपणीसुध्दा दु:खाला कारण झाल्याशिवाय राहणार नाही. हे विचार केवळ तत्व म्हणून तुमच्याबरोबर मांडले नसून आजपर्यंत अनेक भक्तमंडळी अशा तऱ्हेचे दु:ख वार्धक्यात भोगत असून एकवेळच्या उदरनिर्वाहास महाग झाली आहेत. तेव्हा आजची पिढी जर या विचाराशी सहमत झाली तर समाजातील बराच अशांततेचा भाग कमी होईल.
वैयक्तिक कर्म-विपाक :-
वर सांगितलेले सर्व निराकरण तुमच्या जीवनाशी संबंधित असलेल्या ऋणमुक्ततेसाठी होते. आता तुम्हांस तुमच्या जन्मकारणपरंपरेमध्ये असलेले ऋण (पितृ, देव, गुरू) यांच्यापासून मुक्त व्हावयास पाहिजे. रोज नित्याचरणात व पूर्वी घडलेल्या पातकांबद्दल जर काया, वाचा, मनानें प्रायश्चित्त घेतले नाही तर पुनःश्च तशी कर्मे हातून घडतात. शिवाय स्वतःची जन्मकारणपरंपरा ही दु:खे निर्माण करण्यास कारण होते. तेव्हा यातून निश्चित जीवन निर्माण होऊन जीवनात निरंतर सुख, शांति लाभावी अशी इच्छा असेल तर जीवनाची दिशा निश्चित करावी लागेल. कारण, प्रथमतः तुम्ही येथे आलात ते दु:ख सांगून सुखी होण्यासाठी. ‘माझ्या जीवनात काय काय उणे आहे व ते मला कसे मिळेल’ हा एकच स्वार्थ म्हणजे आपले जीवनाबद्दलचे ज्ञान ! आणि त्या ज्ञानाने जे जे मिळेल तेवढी तुमची परमेश्वराबद्दलची निष्ठा ! हेच गणित चुकले. जितके जीवनातील उणे सांगितले तितकी तुमची असमाधानी वृत्ती आज दु:खास कारण आहे हे सिध्द झाले. ते असमाधान जाण्यासाठी काया, वाचा, मनाने तुम्ही काही प्रयत्न करणार असाल तर अभ्यासाने हे पटेल की, आजपर्यंत जीवनात खरोखर उणे किंवा उणीव कशाचीच नव्हती. खरी उणीव होती ती परमेश्वराची, पण इतका चांगला विचार येण्यासाठी जे योग्य ते संस्कार जीवनात व्हावयास पाहिजे होते त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून सुखाच्या उणीवा लक्षात घेऊन परमेश्वराकडे धावलात. आज जगात स्वतःला ईश्वरभक्त, ज्ञानी, अनुभवी, गुरूप्रसाद पूर्ण लाभलेला सिध्द, साधक समजणारासुध्दा या उणीवा उरी बांधून परमेश्वर शोधतो व त्या सुखाची पूर्णावस्था प्राप्त झाली नाही की ढासळतो. ‘म्हणजे मला मार्ग पटत नाही’, ‘या मार्गात कांही तथ्य नाही’, असे उद्गार काढतो, पण विचार असा करा की, या तुमच्या स्वार्थाने भरलेल्या जीवनात ज्या उणीवा आहेत त्या पूर्ण झाल्या म्हणजे परमेश्वर आहे का ? किंवा त्याचा आशीर्वाद मिळाला आहे का ? तुमची अशी कल्पना आहे की, ‘जे-जे मी मागितले ते-ते मला मिळाले म्हणजे माझ्यावर परमेश्वराची अखंड कृपा आहे’. याच चुकीच्या भावनेने तुम्ही तुमच्या जीवनातील ऐहिक सुखाच्या गरजा आज वाढवून बसला आहात. जोपर्यंत तुमच्या इच्छाशक्तीने हे सर्व सुख प्राप्त होत असते तोपर्यंत तुम्ही देवाला मानता आहात हा भास निर्माण होतो व जेव्हा वासनेने ही इच्छाशक्ती निर्बल होते तेव्हा पुन्हा दु:खे निर्माण करण्यास कारण तुम्हीच होता. आता प्रामाणिकपणे असा जबाब द्या की, या स्वार्थी सुखाच्या जीवनासाठी तुम्ही खरोखर परमेश्वर मानलात का ? खऱ्या परमेश्वराची कृपा अशी आहे की, तुमच्या जीवनात जे जे नाही असे जगाला वाटते, तरी सुध्दा ज्याची तुम्हाला आठवण सुध्दा होत नाही, व जे आहे व नाही याबद्दल आसक्ती नाही हे समाधान म्हणजे ईश्वरी कृपा. परंतु हे ऐहिक सुख मिळून तरी तुम्हाला समाधान आहे का ? ते होणार नाही. कारण वासनापूर्ततेसाठी ‘देव शक्तिमान आहे’ हे मानणे याचा अर्थ तोही ‘वासनारुपी आहे’ असा होतो. पण देव तसा नाही. याउलट ‘त्याच्याशिवाय जीवन व्यर्थ आहे’ ही भावना हे त्याचे रूप आहे. तेच आत्मसात केले पाहिजे आणि हे आत्मसात करण्यासाठी तुम्हाला हा प्रसाद ‘वैयक्तिक कर्म विपाक’ म्हणून घ्यावा लागेल.
या वर नमूद केलेल्या ऋणमोचनाच्या निराकरण पध्दतीच्या शास्त्रशुध्द आधाराने तुम्हाला दु:खमीमांसा कशाप्रकारे असू शकतात हे कळले. या दु:खमीमांसेला तुम्ही आज जरी कारण नसाल तरी त्याचे संबंध तुमच्या जीवनाशी असेच येत राहणार. यासाठी आणखी काही सिध्द-सिध्दांत पध्दतीचा अभ्यास कटाक्षाने करावा लागेल. मानवी जीवन हे पूर्णपणे परावलंबी आहे. त्यासाठी ज्याला तुम्ही दैव किंवा नशीब म्हणतां ते बनवावे लागते. देवावर, धर्मावर, नशीबावर किंवा ज्योतिषावर विसंबून ते बदलत नाही. सुरुवातीलाच ही भूमिका तुम्ही सांगता की, आम्हाला दु:ख या माणसामुळे झाले. तो जसा एखादा मनुष्य दु:खाला कारण होतो तसा एखादा सुख निर्माण होण्यासही कारण होतो. एक काळ या जगात असा होता की, आमच्याच वाडवडिलांनी पिढ्यानपिढ्या जे सुख-समाधान भोगले ते आम्हाला आज वर्षभर सुध्दा लाभू शकत नाही. याला कारण काय ? नुसत्या समाजउन्नतीच्याच कल्पनांनी आम्ही वेडे होऊन ‘सुख’, ‘सुख’ म्हणून ओरडतो आहात. पण ते लाभण्याचे भाग्य आमच्या हाती नसल्याने, एकमेकांत द्वेष, वैर निर्माण करण्यास आम्हीच कारण झालो. खरोखर आम्ही दु:खी आहोत का ? हा साधा प्रश्न विचारात घेण्यासही आमच्यापाशी समाधानी वृत्ति नाही. याला कारण आज आमचा देवधर्माबद्दलचा अविश्वास.
प्रत्येक मानवाच्या जीवनाला आरंभ तो जन्माला आल्या क्षणापासून तरी होत असला तरी, त्या जन्माचे कार्य हे त्याच्या ५ व्या दिवसापासून सुरु होते. म्हणून धर्मशास्त्रानें या दिवसापासून ते मरेपर्यंत “षोडषादि संस्कार” सांगितले आहेत. आज समाजाच्या विचारांची विकृत अवस्था, ह्या संस्कारास ‘मागासलेली विचारसरणी’ म्हणून संबोधते आहे. म्हणून वरील ऋणातून जरी मुक्त झालात तरी दु:खे संपत नाहीत. या संस्काराचे महत्व न पटल्याने जो दु:खी झाला त्याला काय काय यातना भोगाव्या लागल्या त्या आपण “निराकरण पत्रिकेवरून” अभ्यासात घ्या.
जीवनांतील दु:खमीमांसा व कारणे ही जशी दैवी मार्गाचा अवलंब करून दूर होतात, तसेच आणखी काही ऋणानुबंध आपल्या जन्मकारण परंपरेत असतात, की ज्यामुळे जीवनात सुख, शांति, समाधान निर्माण होते. हे ऋणानुबंध म्हणजे माझे दैव असू शकेल, यावर सध्या जरी कोणा भक्तभाविकांचा विश्वास बसला नाही तरी तो अभ्यास म्हणून नोद करून ठेवावा. कारण तशी घटना केव्हा ना केव्हा जन्मात घडल्याशिवाय तुम्ही हे जग सोडणार नाही. तत्संबंधीचें विवेचन निराकरण पत्रिकेत अनुभवांनी मांडले आहे.
आज समाजकल्याणासाठी व उन्नतीसाठी जशी अन्य शास्त्राची आवश्यकता आहे तशी याही शास्त्राची असावयास पाहिजे हे आपण कधीही म्हणणार नाही. यासाठी समितीने मानवी जीवनाच्या दु:खपरंपरेला काय काय शास्त्रीय कारणे असू शकतात हे अभ्यासण्याचें कार्य गेली १० वर्षे चालविले आहे. आपली कल्पना येवढीच आहे की, आरती व दु:खाचे निराकरण यापेक्षा या समितीपुढे काही कार्य नाही. तर समितीला समाजकल्याणार्थ हे शास्त्र किती आवश्यक आहे हे सिध्द करावयाचे आहे. आज पैसा हेच माध्यम आपल्या लोकांचे झाले असल्याने सुख हे पैशावर अवलंबून असते हा विचार निश्चित झाला आहे. त्यामुळे जीवनात येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्याचे धैर्य, आत्मविश्वास आपल्यापाशी नाही. यासाठी दैवी उपासनेशिवाय दुसरा कोणताहि मार्ग धैर्य, आत्मविश्वास, निष्ठा निर्माण करू शकणार नाही. गेल्या दहा वर्षांत जी हजारो भक्तभाविक मंडळी आपल्या दु:खनिवारणार्थ आली, त्यांच्या दु:खाची मीमांसा निराकरण पत्रिकेत लिहिली आहे ती या हेतूने की, आज प्रत्येक मनुष्य उठता बसता ‘यात काय अर्थ आहे’ असे बोलतो. पण तो बोलणारा एकटा असल्याने त्याच्या बोलण्यात तरी काय अर्थ आहे हे त्याला समजणार नाही. म्हणून आजपर्यंत येथे ज्यांना ज्यांना मार्गदर्शन केले, त्यातून समितीने अभ्यासाने ज्या मीमांसा काढल्या त्या निराकरण पत्रिकेत सविस्तर मांडल्या आहेत.