अध्याय ८ दैवीमार्गातील व्यावहारीक द्वैत
ज्या ज्ञात्यांनी या मार्गाचा अवलंब आतांपर्यंत केला, त्यांच्याकड़ून यथायोग्य तऱ्हेचे मार्गदर्शन सामान्य माणसाला होऊ शकत नाही. कारण आपले व्यक्तिमत्व कमी होईल या स्वार्थी हेतूने शास्त्रांच्या सिध्दान्तपध्दतीचे अवडंबर मांडून समाजातील ठराविक वर्गासाठीच ते बसले आहेत. राहिलेला वेळ वेद, वेदान्त, पुराणे किंवा अन्य साधन ग्रंथ अभ्यासून त्यावर नवीन लिखाण करण्याचे प्रयोग चालले आहेत. आज समाजाला खरोखर शास्त्रीय विवेचन व सिध्दसिध्दान्त पध्दत नको आहे. कारण शास्त्राच्या नवीन पुस्तकांची संख्या निरनिराळ्या लोकांच्या नावावर खूपच वाढली आहे. आज अशा पुस्तकांची आवश्यकता आहे का ? याच विषयावरील जी जुनी पुस्तके आहेत, त्यापेक्षा काही नवीन उपासना किंवा देव या नवीन ग्रंथकर्त्यांना सांपडले आहेत का ? फक्त पुस्तकांचे शीर्षक व लेखकाचे नांव हे बदलले म्हणजे झाले का ?आतील विषय एकच आहे. फक्त शब्द बदलून तुम्ही आज समाजाची दिशाभूल करीत आहात. अशामुळे समाजाची या शास्त्राकड़े शास्त्र म्हणून पाहण्याची दृष्टी अभ्यासू राहिली नाही. मानवी जीवनास वास्तविक या शास्त्रानेच आरंभ व्हावयास पाहिजे. तरच आमची एकमेकांकडे पाहण्याची संकुचित दृष्टी बदलेल.
अशा अभ्यासू लेखकांनी जी शास्त्रीय विवेचनाची पुस्तके आज समाजांत संख्येने वाढविली आहेत, त्यांचा अभ्यास प्रत्यक्षात केलेली साधक मंड़ळी किती आहेत ? कारण या मार्गाकड़े जाण्याची प्रवृत्ती एखाद्यामध्ये निर्माण झाली तर निश्चितपणे कोणता अभ्यास करावा, हे त्या नवीन मनुष्यास समजत नाही. आता समाजातील दुसरा ज्ञाता वर्ग. यांची समाजास मार्गदर्शन करण्याची दृष्टी ही समाजाच्या विचारांस पोषक आहे का ? आज जवळ जवळ शंभर वर्षे संतमहात्म्य व त्यांचे कार्य प्रत्येकजण वर्णन करण्यासाठ पुढे येत आहे. आपापल्या बुध्दीप्रमाणे व अभ्यासाप्रमाणे ते जे सांगत आहेत, ते समाज अंधश्रध्देने पुन्हा पुन्हा ऐकत आहे. आता खरोखर या सिध्द, साधक अभ्यासू लोकांनी या संतांच्या शिकवणीची पूज्यता ठेवावी. कारण पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यापासून ते परदेशगमन करून आलेला प्रत्येकजण ही शिकवण जाणतो आहे. आता यापुढील महत्वाचे कार्य संत शिकवणीचा पाया म्हणून असे व्हावयास पाहिजे की, जसे आजपर्यंत तुमचे ज्ञान ज्ञानेश्वरीइतक्या पूज्य भावनेने त्या समाजाने ऐकले, तसे तो समाज ज्या ज्ञान-अज्ञानाने दु:खास कारण झाला आहे, त्या समाजातील रूढ झालेल्या आचार-विचारांचे उच्चाटन करण्यास तुम्ही त्यांचे म्हणणे तितक्याच सहानुभूतीने ऐकले पाहिजे. ते जर झाले नाही तर या संतमहात्म्यांच्या शिकवणीबद्दलचे आपले विचार हे “विचार” म्हणूनच समाज लक्षात घेईल.
कारण आजच्या जगांतील मनुष्य इतका शंकेखोर व हेकेखोर आहे की, जर तो एखाद्या सिध्द-साधकाकडे गेला व त्याला त्या साधकाने ‘यज्ञ कर’ असे सुचविले व त्याच वेळी दुसऱ्यास ‘पूजा कर’ असे सुचविले, तर त्याच क्षणी त्या दोघांत सिध्द पध्दतीबद्दल विषम भावना निर्माण होते. अशा वेळी साधकांनी हा विचार करावयास पाहिजे की, ‘आपल्या प्रथम भेटीतच आपण त्या दोघांच्या आचार-विचारांत द्वैत निर्माण केले आहे. मग पुढील कार्यभाग हे दोघे निश्चित विचाराने कसे करतील ?’ वास्तविक देव जगाकड़े एकाच भावनेने पाहत आहे आणि तोच त्याचा भक्त त्याच्या कृपेने अनेक भावना निर्माण करून समाजाकड़े पाहत आहे. हे भावनेतील द्वैत सत्पुरूष, सिध्द-साधक होऊनसुध्दा जर जात नाही, तर समाजाचा उध्दार होईल, किंवा तो होणार आहे या आशीर्वादावर आज समाजाने विश्वास कसा ठेवावा ?
या जगात आज अनेक धर्म, अनेक पंथ अस्तित्वात आहेत. त्यांचे तात्विक विवेचन मनुष्य आपल्या ज्ञानाप्रमाणे अभ्यासून ज्ञानी होण्याचा प्रयत्न करीत आहे. आज अनादि कालापासून मनुष्य, धर्मातील द्वैत-अद्वैत वादाबद्दल लिहून जगाला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु खरे द्वैत आज मानवी जीवनात इतके भरले आहे की, प्रत्यक्ष परमेश्वराला ‘नमस्कार कर’ म्हटले तर ‘कुठे करू, कोणाला करूं ?’ असे प्रश्न निर्माण होतात. परमेश्वराबद्दल इतका भेदभाव आज आहे. या विचारांचा पगडाच आज आमच्या दु:खाला कारण झाला आहे व होत आहे. याचा विचार केव्हा व कोण करणार ? आज जी मंडळी समाजात ‘देवरूप झालेली’ म्हणून ओळखली जात आहेत, ती तरी खऱ्या अर्थाने अद्वैतरूप आहेत का ? वास्तविक समाजातील लोकांच्या भावनेचा व विचारांचा सदुपयोग करून घेणे व त्यांना त्यांचा धर्म, कर्तव्य समजावून देणे हे स्वतःचे कर्तव्य न मानता त्यांनी देवाधर्माचे अवडंबर माजविले व खऱ्या देवधर्मास बाजूला ठेवले आणि यातूनच द्वैतवादाचा जगभर प्रचार केला. अद्वैतवाद हा तात्विक दृष्टया परिपूर्ण आहे. पण आज समाजाला व्यावहारिक तत्ववादाची अत्यंत आवश्यकता आहे. तो कोण देणार ? तो देणार नसाल तर कालांतराने देव व धर्म हे केवळ ‘शब्द’ म्हणूनच प्रचारात राहतील.
अनादि कालापासून तो आजच्या क्षणापर्यंत देव हा देव्हाऱ्यातच पूजण्याचा ठेवा आहे, हा जणू सिध्दान्तच आमच्या साधकांच्या बरोबरच जन्माला आला आहे. आपण ज्या निसर्गाच्या सतत सहवासात आहोंत, त्याच्या निर्मितीस परमेश्वरच कारण आहे. निसर्गाला जो परोपकाराचा धर्म अव्याहत करावा लागत आहे, त्यामध्ये आज क्षणी किंवा पुढे केव्हाही द्वैत निर्माण करावे, म्हणून होणारे नाही. परमेश्वराने या निसर्गाचा ठेवा जगाच्या परोपकारार्थ निर्माण केला आहे. त्याचा धर्म हा कोणाप्रीत्यर्थही नाही व स्वतःप्रीत्यर्थही नाही. सूर्योदय झाला, अमुक धर्ममंदिरावर त्याचा प्रकाश पड़ला व अमुकावर अंधार पड़ला, असेही होत नाही. आज आपण उठता बसता पाण्याचा वापर करीत आहोत. त्याचाही कोणाशी द्वैतभाव नाही. पण ज्या परमेश्वराने याच सृष्टीत मानवाला निर्माण केले आहे त्या मानवाने प्रथम त्या परमेश्वराच्या ठिकाणीच द्वैत निर्माण केले आहे. कारण देवाच्या ठिकाणच्या सद्भावनेचा उपयोग व्यावहारिक जीवनात असावा या तत्त्वाशीच आजच्या सिध्द-साधकांचे द्वैत आहे. ज्या परमेश्वराने या सृष्टीला परोपकाराचा धर्म अव्याहत करण्याचा धर्म लावून दिला, तोच परमेश्वर आज आम्ही देव्हाऱ्यात सकाळच्या एक वेळेच्या पूजेचा ठेवा म्हणून ठेवला आहे. त्यामुळे परमेश्वराशिवाय जीवन व्यर्थ आहे, ही भावनाच निर्माण होत नाही. आजपर्यंत प्रत्येकजण असेच म्हणत आला आहे की, ‘पैशाशिवाय जीवन व्यर्थ’, ‘अन्न पाण्याशिवाय जीवन व्यर्थ’, ‘बायकामुलांशिवाय जीवन व्यर्थ’, ‘ऐहिक सुखाशिवाय जीवन व्यर्थ’. पण ‘परमेश्वराशिवाय जीवन व्यर्थ’ असे उद्गार कोठूनही ऐकू येत नाहीत. याला कारण वर सांगितल्यापमाणे ज्याने जगताला परोपकाराचा धर्म लावून दिला, त्या परमेश्वराच्या ठिकाणी या सिध्द-साधक, अनुभवी लोकांनी खूप द्वैत निर्माण केले आहे.
परोपकारार्थ निर्माण झालेले कोणतेही कार्यकारण आपला उपयोग जर परोपकारार्थ होत असेल तर त्याबद्दल द्वैतभाव निर्माण करणार नाही. उदा.लोखंड हा निसर्गाच्या पोटातील एक खनिज पदार्थ म्हणून आपण ओळखतो. त्याला ज्याने निर्माण केले ते जगाच्या परोपकारार्थ व हितासाठीच आहे. तो खनिज पदार्थ जगात एके काळी असाच अशुध्द स्वरूपामध्ये पडलेला होता. पण जेव्हा सूज्ञ बुध्दि जागृत झाली, तेव्हा त्याचा आज उपयोग म्हणजे परोपकार हा काय, हे सांगण्याचे कारणच उरले नाही. गरिबाच्या घरात पैरण अडकवायला ठाकलेल्या खिळयापासून राष्ट्रसंपत्तीच्या लोहमार्गापर्यंत त्याचा वापर होत आहे. पण त्या लोखंडाच्या ठिकाणी द्वैत निर्माण होत नाही. त्याच लोखंडाचे तुकड़े एकत्र करून शास्त्राधाराने विमान तयार झाले. त्यामागे विचार होते. लोखंड हे जीवनाला अत्यावशयक आहे हे समजल्यावर विचारांनी त्यांची उपयुक्तता मनुष्याने शोधून त्या लोखंडात चैतन्य निर्माण केले आणि आज ते वायुगतीने आकाशात उडत आहे. ही विचाराच्या भावनेची पूर्णावस्था आहे. पण ज्या परमेश्वराच्या ठिकाणी या उपकाराची कारणपरंपरा आहे, त्याला आम्ही पूर्ण अज्ञानाने पुजारी केला आहे व त्याच्याशिवाय जगू लागलो आहोत. तर यांची उपयुक्तता जीवनात पूर्णपणे आल्याशिवाय नित्य कर्मातील कर्तव्य-कारण समजणार नाही. पण तो ठेवा देण्यासाठी व दाखविण्यासाठी कोणी तयार नाही. कारण प्रथमतःच असे सांगितले जाते की, ‘देवप्राप्तीचा ठेवा पूर्वजन्मांची पुण्याई आहे. ह्या जन्मात त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केला तर १२ वर्षे तो पावत नाही’ अशा अनेक भ्रामक कल्पना निर्माण करून शास्त्राधार पुढे केले जातात. अशा विचारांनी भिऊन प्रत्येकजण हेच म्हणत आला आहे. ते नाही बुवा आपल्याला जमणार. मनुष्य पाषाणाला किंवा पंचधातूला भावनेने परमेश्वर मानून जेव्हा त्याची प्राणप्रतिष्ठा करतो तेव्हा त्या दगडाचा किंवा पंचधातूचा पूर्वजन्माचा ठेवा कोणी शोधत नाही. तो देव प्रतिष्ठीत झाल्यावर त्याच्याकडे पाहण्याऱ्याला इच्छित फल देतो. मग त्याच भावनेने दगड किंवा पंचधातूंना न प्रतिष्ठित करता, तीच भावना मानवाच्या ठिकाणी निर्माण केली तर वेगळा परमेश्वर शोधावा लागणार नाही. पण असा परमेश्वरकृपेचा ठेवा आज कोणालाही नको आहे. कारण त्याच्याशिवाय जीवन व्यर्थ हा विचार व भावना पूर्णत्वाने जीवनात आले तर स्वैर विचारांना आळा घालावा लागेल व लाचलुचपत किंवा अन्य मार्गाने सुख निर्माण करण्याचे प्रयत्न असतील, तर त्यांना सोडावे लागेल म्हणून परमेश्वर हा सकाळपुरताच असावा हे बरे.
काही वर्षांपूर्वी आज जी इकडे तिकडे साधक मंड़ळी आहेत त्यांना एकत्र येण्याबद्दल काही प्रयत्न केला होता. हेतू हा की, शास्त्राने मनुष्याच्या जीवनात कांही आदर्श निर्माण व्हावा व पारमार्थिक प्रश्न विचारांनी सुटुन मार्गदर्शन व्हावे. पण पारमार्थिक विचारांचे व परमेश्वराबद्दलच्या भावनेचे एवढे द्वैत ऐकावे लागले की तेवढे आज जगात कोणत्याही शास्त्रांत नाही. प्रथमतः काहींनी असे विचार प्रकट केले की ‘आमची ही उपासना व साधना वैयक्तिक आहे. आम्हाला आज्ञा असल्यास आम्ही आलेल्या भक्तभाविकांना भेटतो’. आता या विचारामागे स्वार्थ किती आहे तो अभ्यासण्यासारखा आहे. कारण जगात मनुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारांनी ईश्वरसेवा ही करतोच आहे. भावनेने वाहिलेल्या फुलाचा उपकारसुध्दा परमेश्वर ठेवीत नाही हे सत्य आहे. तेव्हा जो भक्तभाविक आपल्या दु:खाने पिडला आहे अशांना अशा साधकांचा पत्ता या भक्त-भाविकांना कोणा ना कोणाच्या रूपाने तरी समजतो व अशा साधकांच्या दर्शनार्थ गेलेल्या भक्तांना वरीलपमाणें उत्तर मिळते. ज्या परमेश्वराला जगताचे तंत्र सांभाळावयाचे आहे तो अशी कदापीही आज्ञा देणार नाही की ‘तू अमुकाला भेट आणि अमुकाला भेटू नकोस’. परंतु या साधक मंडळींना जगांतील गोरगरीब मंडळीकड़ून आर्थिक लाभ होणारा नसतो म्हणून वरीलप्रमाणे जेव्हा उदगार निघतात, त्याच वेळी आत त्यांच्याजवळ काही धनिक मंड़ळी आश्रयासाठी बसलेली असतात. अशा साधकांना गरिबांच्या भावनेमधला परमेश्वर व श्रीमंतांच्या भावनेतील स्वार्थ परमेश्वरासमोर बसून समजत नसेल, तर ‘त्याच्या आज्ञेशिवाय आम्हाला भेटता येत नाही’ हे कितपत सत्य आहे ?असे द्वैत गरीब-श्रीमंत, साधक आणि परमेश्वर, ‘आज्ञा आहे’ आणि ‘आज्ञा नाही’ इ. ज्यांच्या आचार-विचारांमध्ये अहोरात्र बसत आहे, यांना साधक म्हणून संबोधावे का बाधक, हे विचारांनी भक्त-भाविकांनी ठरवावे.
आता दुसऱ्या विचारांची बाजू अशी की, आमच्याकड़े येणारी भक्त-मंड़ळी स्वामी उपासक आहेत, बाबांना मानीत नाहीत. देवी उपासक आहेत, दत्तपरंपरेला मानीत नाहीत इ. आज खरोखर याच विचारांनी आमच्या देवाधर्माबद्दलच्या भावना एकमेकांत द्वेष, मत्सर, निंदा, नालस्ती निर्माण होण्यास कारण झाल्या आहेत. परंतु भावनेने कोठेही आचार निश्चित केलेत तरी ते परमेश्वरालाच पोहोचणार आहेत असे निश्चितपणे सांगणारा साधक विरळा ! अशामुळे अज्ञानाने उपासना करणाऱ्या लोकांनाही बऱ्याच दु:खाचा वाटा सहन करावा लागतो. जन्मकारण परंपरेमध्ये दैवी ऋणानुबंधनांतील वाटा असा आहे की, तुम्ही अमुक एक काळ देवीभक्त होता, त्यानंतरचा जीवनातील दैवी ऋणानुबंध जर दत्तपरंपरेची उपासना करून ऋणमुक्त होण्यास कारण असेल तर तुम्ही हें देवादेवांतील द्वैत न शोधता दोन्ही एकच आहेत असा विचार करावयास पाहिजे. उदा. शालेय शिक्षणानंतर विश्वविद्यालयीन उच्च शिक्षणाकडे जाताना ज्ञानामध्ये द्वैत असत नाही, मग परमेश्वरामध्ये का करावे ?
आता तिस-या विचाराची बाजू, हिच्या अभ्यासाकडे या समितीच्या कार्यपध्दतीकडे आलेल्या भक्त-भाविकांनी दुर्लक्ष करू नये. कारण या कार्यपध्दतीतील सर्व सिध्दसिध्दान्त पध्दति या वैयक्तिक उपासना करायला लावणाऱ्या आहेत. अशा साधकांचा या सिध्दान्तपध्दतींना विरोध आहे. विरोध असण्याचे कारणही बरोबर आहे. कारण समितीच्या सिध्दसिध्दान्त पध्दतीत जो प्रसाद पूजनास दु:खनिवारणार्थ म्हणून दिला जातो, तो जगातील गरीब, श्रीमंत, ज्ञानी, अज्ञानी, अमुक एक धर्मासाठी, अमुक एक जातीसाठी असा दिला जात नाही. हे सत्य पाहिल्यानंतर सूज्ञ बुध्दीला हे पटायला पाहिजे की, धर्माधर्मामधील वाद, जातीय वाद, पंथांचे वाद, देवादिकांचे वाद, हे केवळ अज्ञानाच्या भावनेचे खेळ चाललेले आहेत. हे सत्य समितीला इतके पटले आहे की, यापुढे समितीच्या कार्यपध्दतीमध्ये जर कोणी असा तात्विक वाद निर्माण केला की उपासना किंवा दत्तपरंपरा श्रेष्ठ असते तर ते अज्ञान आहे व म्हणून असाही वाद कोणी मांड़ू नये. हे वाद जगतामध्ये सिध्द-साधक, भक्त-भाविक, आस्तिक-नास्तिक मांडतील म्हणून या समितीच्या कार्यपध्दतीचा पाया ज्या पुण्य विभूतींच्या मार्गदर्शनाने आज लोककल्याणास कारण झाला आहे, त्यांनी या सिध्द-सिध्दान्त पध्दति एकाच तत्वावर सिध्द केल्या आहेत की ज्यांत मनुष्य व त्याच्या जीवनाला कारण झालेली दु:खपरंपरा ही दैवी कृपेने दूर झालीच पाहिजे. आजपर्यंत या कार्यपध्दतीचे फल हिंदू, मुसलमान, पारशी, ख्रिश्चन, जैन, शीख यांना याच सिध्द पध्दतीने मिळाले, व मिळत आहे. तर वर नमूद केलेले वाद निर्माण करण्यास कारण आमचीच सिध्दसाधक मंडळी झाली आहेत असे म्हटले तर ते वावगें होणार नाही. समितीच्या मार्गदर्शन पध्दतीत आर्थिक प्रश्नाला महत्व नसल्याने आलेल्या भक्तांस ‘कर्तव्याचा धर्म’ म्हणजे ‘स्वतःची दु:खे स्वतः दूर करण्यास तयार व्हा’ असे सूचित केले जाते.
याउलट तिसऱ्या विचारांची साधक मंडळी स्वतःची आर्थिक प्राप्ती लक्षात घेऊन मार्गदर्शन असे करतात की, ही तुमच्या दु:खाची कारणपरंपरा अशी आहे. (पण ती प्रत्यक्षात न समजण्यासारखीच असते. म्हणजे नातेवाईकांनी करणी केली आहे, मूळपुरूषाची बाधा आहे इ.) व त्या तिच्या निवारणार्थ मी ‘देवाचे अनुष्ठान मांड़तो’ ‘होमहवन करतो’, ‘गृहशांती करतो’, ‘जपाचे अनुष्ठान मांडतो’ इ. आणि ‘त्याप्रीत्यर्थ इतका खर्च येईल तो तुम्ही द्या’. केवळ या देवादिकांच्या व धार्मिक विधींच्या नावांवर स्वतःचे चार पैसे बुड़तील म्हणून हेही सांगितले जाते की, ‘हे तुमचे दोष बाहेर कोणीही काढू शकणार नाही. वेळप्रसंगी या दोषनिवारणार्थ मला माझ्या देवतेच्या गावी किंवा ठाण्यावर जावे लागले तर मी जाईन. पण तुम्हाला सुखी केल्याशिवाय राहणार नाही’. या अज्ञानी विचारास साधक म्हणावे का ? कारण कोणालाही कोणी सुख देणे म्हणजे प्रेमाची भेट देणे, आहेर देणे, उसने देणे किंवा कर्ज देणे या इतके ते सोपे आहे का ? जर सोपे असते तर आजच्या जगताच्या परिस्थितीला ते हितावहच ठरले असते. सुख हे देवही देत नाही, साधकही देत नाही, नातेवाईकही देत नाहीत, इष्टमित्रही देत नाहीत, बंधुबांधवही देत नाहीत, तर देते ती तुमची परमेश्वराबद्दलची निस्सीम भावना ! आणि याच भावनेची जोपासना व्हावी, ‘त्याशिवाय जीवन व्यर्थ आहे’ असा निश्चय व्हावा, असा आत्मविश्वास निर्माण व्हावा, अशी निष्ठा निर्माण व्हावी म्हणून समितीच्या कार्यपध्दतीबद्दलच्या बाजू त्या साधकांसमोर मांडल्या गेल्या. परंतु या निरनिराळया सिध्दसाधकांना एकत्र बोलावूनही या मार्गाचा मानवी जीवनासाठी परोपकरार्थ ठेवा काय आहे हे बहुजन समाजाला समजावण्याचे कार्यकारण निश्चित होऊ शकले नाही.
आज पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये, विशेषतः इंग्लंडमध्ये, अशा सिध्दसाधकांची एक संस्था आहे, की जिच्यात हा परलोकविद्येचा व गूढ विद्येचा अभ्यास केला जातो. मानवी जीवनानंतर मरणोत्तर जीवनही श्रेष्ठ प्रकारचे आहे या अभ्यासाची प्रगती खूपच झाली आहे. पण हा शास्त्रीय अभ्यास होण्याचे कारण तिकडे आमच्या येथीलप्रमाणे साधकांमध्ये द्वैत नाही. शिवाय या संस्थेस समाजामध्ये खूप मोठा दर्जा प्राप्त झालेला आहे. याला कारण या संस्थेमधील अभ्यासाने परिपूर्ण झालेले मध्यस्थ लोककल्याणार्थ आपली सेवा देऊन खोटया मार्गाचा अवलंब करणाऱ्या साधकांची भूमिका ही समाजाला स्पष्ट करून सांगत आहेत आणि त्यामुळे समाजात पूर्णत्व प्राप्त झालेले जे कोणी मध्यस्थ किंवा साधक, की ज्यांच्यात मानवी जीवनाच्या हितसंबंधांचे गुणधर्म नाहीत, अशांना, समाजाची फसवणूक केली किंवा दिशाभूल केली, याबद्दल न्यायालयासमोर उभे केले जात आहे. आज आमच्या भारतात असे शेंकडॊ बाजारी सिध्द, साधक, मध्यस्थ, मांत्रिक नावाच्या पाटया लावून किंवा प्रचारक ठेवून समाजाची दिशाभूल करीत आहेत व त्यांच्या वेड्यावाकड्या अनुभवाने आज समाज खऱ्या मार्गाला मुकला आहे. आज त्यांच्यापाशी असणारी दैवी साधना ही लोककल्याणाच्या दृष्टीने विचारांत घेऊन हे लोक जे मार्गदर्शन करीत आहेत त्यास ते पात्र आहेत हे ठरविण्यासाठी अशांची चाचणी जे पूर्णत्वाने ज्ञानी, अभ्यासू व दैवी सिध्दान्त आत्मसात केलेले आहेत, अशांनी करावी. ज्या अभावाच्या गोष्टी असतील त्याची प्रत्यक्ष जाणीव त्यांना देऊन त्याची नोंद समाजकल्याणाच्या दृष्टीने व्हावयास पाहिजे. अशा प्रकारचा अभ्यास केलेली संस्था इंग्लंड़मध्ये कार्य करीत आहे. तिचे सभासद आज लाखो आहेत. या शास्त्रीय पध्दतीच्या अभ्यासाप्रमाणे या समितीचे कार्य आपणां सर्वांसमोर मांडले जात आहे.
वर नमूद केलेल्या परमेश्वराच्या साधनेचा परोपकार जगाला पटावा व देव हा वैयक्तिक उपासनेचा ठेवा आहे असे नाही, हे सिध्द व्हावे म्हणून गेल्या पाच वर्षांमध्ये जी भक्तभाविक मंडळी प्रथमतः आपल्या प्रापंचिक अड़चणी निवारणार्थ आली, त्यांना या कार्यपध्दतीतील समितीची लोककल्याणार्थ भूमिका स्पष्ट समजली म्हणून त्यांनी आपणांला येथील कार्यपध्दतीत काही सेवा करण्याचा लाभ मिळावा अशी इच्छा व्यक्त केली. परमेश्वर हा परोपकारार्थच आहे, अमुक एक भक्त त्याचा लाडक़ा, अमुक एक जात त्याची लाडक़ी, अमुक एक धर्म त्याचा लाडक़ा, अमुक एक साधना किंवा उपासना त्याला आवड़ते (उदा. नवविधाभक्तींपैकी किंवा योग, याग, वतवैकल्ये, ध्यान, धारणा, समाधी इ.) असे म्हणणे हे अज्ञान आहे. त्यांच्या इच्छेची सिध्दता म्हणून की काय, या समितीच्या कार्यार्थ, आज जी वरील सेवक मंडळी तयार झाली आहेत व होत आहेत, व जी पुणे, मुंबई, सातारा एकूण पाच केंद्रांवर कार्य करीत आहेत, त्यांनाही त्यांची परोपकारार्थ भूमिका, या कार्याच्या प्रमुख मध्यस्थांनी आत्मसात करून दिली. यावरून सूज्ञ वाचकांना हे पटेल की आजपर्यंत या मार्गांत जे आचार-विचारांचे द्वैत निर्माण केले, याला कारण कोण आहे ?
वर मांडलेले विचार हे या मार्गातील द्वैत विचार म्हणून आपल्यासमोर मांडलेले आहेत. आता थोडा आचारपध्दतीबद्दल कसा द्वैतभाव निर्माण झाला आहे तो लक्षात घेणेहि आवश्यक आहे. आज समाजात जे सिध्द, साधक, सत्पुरुष म्हणून ओळखले जात आहेत, त्यांच्यावर असणारी या समाजाची श्रध्दा, भक्ति, प्रेम हे जर लक्षात घेतले तर समाजाच्या भावनेचा ठेवा घेण्यास हे कसे अपात्र आहेत हे पटेल, उदा. अशा सत्पुरुष, सिध्द-साधकांच्या दर्शनास भक्त-भाविक गेले की आजूबाजूचे पोटभरू, त्यांचे अनुयायी ‘महाराजांना विटाळ होईल’ म्हणून भावनेने दर्शनास आलेल्या भक्तांवर तोंडसुख घेतात. आता विचार असा करा की, आम्ही अशांना भावनेने परमेश्वररूप समजून दर्शनास गेलों, तर आमच्या भावनेला यांच्या आचरणाने नाही का विटाळ होत ?शिवाय यांच्या आचार-विचारांचा विटाळ परमेश्वराला झाल्याशिवाय का ते परमेश्वररूप झाले ? पण परमेश्वरानें यांचा विटाळ कधीही व्यक्त केला नाही. ज्या परमेश्वरी अवताराला समाजाचा विटाळ खपत नाही व त्याची भावना समजत नाही, त्याला समाजात आपला नावलौकिक व्हावा, लोकांनी आपल्याला परमेश्वर म्हणावे अशी अपेक्षा का ? समाज देवदर्शनास येतो याचा अर्थ तो शुध्दच असतो. तो शुध्द नसेल तर तो देवदर्शनाला आला हे चूक ठरेल तर आज समाजास खरा विटाळ या सिध्दसाधकांच्या आचाराचा झाला आहे ! कोणी कर्मठ विचाराचे ज्ञाते असा विचार प्रकट करतील की, आचारविचारांच्या शुध्दतेला सोवळे ओवळे म्हणतात. जर सोवळे वस्त्र नेसून आजपर्यंत परमेश्वरप्राप्ती झाली असती तर कापड़ाच्या गिरण्यांनी सगळी सोवळीच तयार केली असती व जास्त किंमतीच्या सोवळयांनी लवकर परमेश्वरप्राप्ती झाली असती ! पण असे सोवळयाचे वस्त्र वर्षानुवर्षे खुंटीला टांगून ‘मी सोवळयात आहे’ असे म्हणणे व रोज जो धूतवस्त्र नेसत आहे ते ओवळे आहे असे म्हणणे यामधील आचारांचे द्वैत हे परमेश्वरप्राप्तीच्या मार्गाचे लक्षण आहे काय ? याचा विचार सूज्ञ भक्त-भाविकाने करावा.
याहीपेक्षा बुध्दिभेद करणारा विचार लक्षात घेण्याजोगा आहे तो असा की, आपल्या नित्याचरणात आपले निश्चित कर्तव्य प्रतिपालन करीत असाल व पापपुण्याची कल्पना ज्ञान-अज्ञानाने मनाला शिवली नसेल, अशा वेळी ‘अमुक मार्गाने पुण्य होते’ व ‘अमुक मार्गाने पाप होते’ हे कसे ठरवायचे ? कारण ‘पुण्य कर’ यापेक्षा ‘सुखी होशील’ असा जर कोणी आशीर्वाद दिला तर त्याचा अर्थ ‘आणखी स्वार्थ निर्माण कर’ असाच होईल व ‘पाप करू नको, केलेस, तर प्रायश्चित घे’ याचा अर्थ ‘पाप करीत रहा’ आणि ‘प्रायश्चित घेत जा’ ही परवानगी दिल्यासारखेच होईल. आजपर्यंत जगात साधु-संत, महात्मे एवढे झाले त्यांपैकी कोणी पाप-पुण्य दाखविण्यासाठी कशातही भरून ठेवले आहे आणि तुम्हाला त्याचे ज्ञान होण्यासाठी ते तुम्हाला दाखविले आहे असे कधीच झाले नाही. मग हे पाप आहे व हे पुण्य आहे हे तरी ठरविण्याचा अधिकार कोणी कोणाला द्यावा ? यापेक्षा उत्तम मार्गदर्शन हेच होय की, ‘तू सेवा कर. इतरांना सुख, समाधान देण्यासाठी काया, वाचा, मनाने प्रयत्न करीत जा. दुसऱ्याच्या शरीराला वा मनाला क्लेश देण्याजोगा आचार-विचार करू नको. या नित्याचरणाने तुझ्या ठिकाणी जे निरंतर सात्विक समाधान निर्माण होईल व जे जीवनात निरंतर असेच लाभत रहावे असे वाटेल, तेच पुण्य होय’. ऐहिक सुखाच्या क्षुल्लक स्वार्थासाठी जो अविचार निर्माण होईल व त्यापासून झालेले असमाधान ही जाणीव देईल की, ‘माझ्या हातून काया, वाचा, मनाने काही अनित्य कर्म घड़ले आहे व मी दुसऱ्याच्या शरीराला व मनाला क्लेश देण्यास कारण झालो आहे, हा विचार म्हणणेच पाप होय’. अशा अनेक व्यावहारिक बाजू कीं ज्यांत एक क्षणही द्वैत मानल्याशिवाय घालवणार नाही, मग पोकळ धर्मवाद काय कामाचा ? व अशा गूढ अज्ञानास परमार्थ किंवा अध्यात्म कसे म्हणावे ?
साधकाच्या ठिकाणी रूढ झालेले वरील आचार-विचार दूर व्हावे म्हणून रोज सकाळ-सायंकाळ जी नित्य उपासना सर्व केंद्रावर चालते, त्या वेळी उपस्थित सेवकांना पूजन-अर्चन करण्यास लावले जाते. यामागील हेतू आपणां भक्तमंड़ळींना समजण्यासारखा आहे. तो असा की, या समितीच्या गुरूपरंपरेतील आधिदैवते यांची पूजाअर्चा ही भावनेने केली जाते, विटाळ-चांडाळ, सोवळे ओवळे, पापपुण्य हे दाखवून नव्हे. याशिवाय आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडणे योग्य होईल. तो असा की, आजपर्यंत समाजात व्यक्तिपूजनाचा जो प्रकार आहे, तो भावनेचे द्योतक असावा असे वाटत नाही. कारण परमेश्वराच्या अंशमात्र कृपेला कारण झालेला हा मनुष्य व्यक्तिपूजनाचे स्तोम किती माजवून बसला आहे, हे ज्यांना त्यांना आलेल्या अनुभवाने त्यांनी लक्षात घ्यावे.
या व्यक्तिपूजनाच्या रूढीमधून परमेश्वरांचे अस्तित्व पूर्णत्वाने मानणे हीच खरी आज अज्ञानाची बाजू आहे ! यासाठी या समितीच्या कार्यपध्दतीत दु:खनिवारणार्थ मार्गदर्शन करण्यासाठी जे सेवक नियुक्त केले जातात, त्यांना कार्यपध्दतीचा विश्वास व जगाच्या दु:खाचे आत्मदर्शन व्हावे म्हणून आठवड्यातून निरनिराळे दिवस सेवेसाठी दिले जातात. त्यामुळे सहजगत्या वरील दोन उद्देशांची सफलता होत असते. शिवाय ज्या परमेश्वराची अंशमात्र कृपा आपल्यावर आहे, त्याच्यासमोर बसून व्यक्तिपूजा घेणे योग्य नाही, हे समजते. तेव्हा येणाऱ्या भक्त-भाविकाने कोणाही सेवकाची पूजा करू नये अशी समितीची आज्ञा आहे. वेळोवेळी सेवकांनी सूचित केलेल्या आज्ञा तुम्ही भक्त मंडळींनी आचरणात आणून इतरांनाही तसे वागण्याची सवय लावून दिल्यानेच खरी व्यक्तिपूजा होणार आहे.
आतां थोडासा आहारामधील द्वैतभाव विचारांत घेऊ. बऱ्याच भक्त-भाविकांच्या घरी जेव्हा कुलधर्म, कुलाचार, व्रतवैकल्ये, सणवार असतात, अशा वेळी कुटुंवत्सल घरात हे दृश्य पाहावयास मिळते. ते असे की, त्या दिवशी घरात गोड खाद्यपदार्थ देवाच्या निमित्ताने केलेले असतात. शिवाय देवदेवतांचे नैवेद्य, ब्राम्हण-सुवासिनी भोजन, हे नैवेद्य झाल्याशिवाय घरात कोणालाही आधी जेवता येणार नाही.अशा रूढींचा पगडा मनावर इतका बसलेला असतो की, जेवणाला झालेल्या उशिरामुळे घरातील लहान मुलेबाळे जेवणासाठी कुरकूर करीत असतात. या करुण प्रसंगी भावना लक्षात न घेऊन ‘नैवेद्य झाल्याशिवाय जेवायाला मिळणार नाही’ असे त्यांना सांगितले जाते. पण खरोखर, नैवेद्य हा कोणासाठी आहे ? आणि नैवेद्य याचा अर्थ तरी काय ? नैवेद्याबाबत अन्य अर्थाची उपपत्ति लावण्यास काहीच अर्थ नाही. त्याचा खरा भावार्थ असा आहे की, नैवेद्य म्हणून परमेश्वरासमोर का ठेवायचा ? तर ‘मी जे काही खात आहे ते तुझ्या कृîपाशीर्वादानेच’ ! एवढया भावनेसाठी मुलाबाळांच्या भावनेची अनास्था निर्माण करण्याने देवाला नैवेद्य पोहोचेल का ? तर तुमच्या घरामध्ये जी मुलेबाळे आहेत, ती चालती बोलती परमेश्वराचीच प्रतीके आहेत. त्यांना संतुष्ट करण्यानेच तुमचा नैवेद्य परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे !
खऱ्या अर्थाने आज समाजाची अनावस्था लक्षात घेऊन ही समिती आपली कार्यपध्दति तुम्हांसमोर मांडीत आहे. आज समितीला समाजातील आचार-विचारांचे द्वैत बाजूला करून प्राप्त झालेल्या जीवनात निरंतर सुख, समाधान निर्माण करून त्याचा फायदा इतरेजनांना कसा देता येईल हे पाहावयाचे आहे. म्हणून आपण दु:खनिवारणार्थ येथे आल्यावर जे मार्गदर्शन आपल्याला सुचविले जाते तेच निराकरण जगातील कोणीही आला तरी केले जाईल. येथील कार्यपध्दतीच्या अभ्यासाने तुम्ही हे शिका की, ‘माझ्यापेक्षाही दु:खी लोक आज जगात आहेत. म्हणजे मी खूप सुखी आहे’. या भावनेची जागृति झाली की, आपोआप देवाबद्दल निस्वार्थीपणा निर्माण होतो. नुसते स्वार्थ-नि:स्वार्थ हे शब्द घोकून होत नाही आणि अशा तऱ्हेने प्रत्येकाच्या जीवनाकड़े पाहण्याचा अभ्यास करायचा म्हणजे ज्याला तुम्ही ‘सुखी’ म्हणता, असे लोक किती दु:खी आहेत, व ज्याला ‘दु:खी’ म्हणता, असे लोक किती ‘सुखी’ आहेत याचा शोध करावयाचा आणि हाच समितीचा मानवधर्म !