अध्याय २ भक्तभाविकांची कार्यार्थ भूमिका.

सर्व सामान्य भक्तभाविकाना दुखाचे निवारण होण्यासाठी कांही निश्चित मार्गाचा शोध घ्यावाच लागतो.असा शोध घेत भक्तभाविक जेंव्हा समितीच्या कार्यकेंद्रावर येतात तेंव्हा त्याना समितीच्या निराकरण पध्दतीचा लाभ होऊन सुख, समाधान प्राप्त होते.पण त्या भक्तभाविकांना, समितीने अशी साधी, सोपी, अल्पखर्चिक निराकरणे कशी सिध्द केली आहेत, त्यांची परंपरा काय,त्यात कोणकोणत्या विभूतींचा आशिर्वाद व सहकार्य लाभलेला आहे, याची माहिती नसते व ती प्राप्त करून घ्यावे अशी ओढही त्यांना नसते म्हणून, वंदनीय दादांनी समितीबद्दल माहिती सर्वानाच प्राप्त व्हावी म्हणून या अध्यायात निवेदन केली.त्यात समितीने निराकरण पध्दती कशी सिध्द केली, त्यासाठी साधक-माध्यमाला किती प्रखर साधना करावी लागली व हरघडी अवधान सांभाळून कार्य कसे सिध्द करावे लागले याचे थोडक्यात निवेदन यात केले आहे. :–

श्री सद्गुरुंनी साधक-माध्यमाची ( वं दादांची ) वेळोवेळी परीक्षा घेतली,
साधकाकडून (वं.दादांकडून) प्रदीर्घ व प्रखर अशी साधना अचुकपणे होत आहे,हे पाहिले.
ज्या सिध्दसाधन-पध्दती साधकाला (वं.दादांना) पूर्णत्वाने प्राप्त झाल्या आहेत कीं नाही,याचीही परीक्षा घेतली.
नंतरच (वंदनीय दादांना) कार्यार्थ नियुक्त केले.
अशा प्रखर साधनेनंतर जी निराकरणे (वंदनीय दादांनी) सिध्द केली, त्या निराकरणाबद्दलचे सविस्तर निवेदन अध्यायात केले आहेच पण त्यातील तत्वज्ञानाची ओळख होण्यास, समितीची कांही वचने व माहिती नमूद केली आहे तीचे लक्षपूर्वक मनन करावे, म्हणजे

प.पू.साईनाथ महाराजांची नियोजन-पध्दती,

वंदनीय दादांचे कार्यार्थ समर्पण,

समितीची लोक-कल्याणार्थ तळमळ,—

— समजण्यास थोडेसे सहाय्य होऊ शकेल.

वंदनीय दादांचे माध्यम योग्य प्रकारे विकसित असले तरी लोक-कल्याणाच्या कार्यात अनेक प्रकारची प्रलोभने, निरनिरा•या स्वरुपात, म्हणजे अनिष्ठ व्यक्ति वा शक्तिरुपात-समोर येऊन अडथळा निर्माण करू शकतात म्हणून वंदनीय दादांचीही वेळोवेळी परीक्षा घेतली गेली.

वचने-

1.“कार्य केंद्रावर तुम्ही येतां,ते निराकरण पध्दतीचा लाभ होऊन सुख, शांती, समाधान प्राप्त व्हावे म्हणून पण गुरुमार्गाच्या दृष्टीने ही तुमची कृती,तुमच्या जीवनाला अपायकारक असते.”

2.“निराकरण ही कृपाशिर्वादाची ठेव व भेट असते.”

3.“आशिर्वादाची ठेव मानवी जन्माच्या मूल्यापलीकडे आहे.”

4.“आपण आजपर्यंत कधीही विनम्र भाक्तिभावनेने परमेश्वराला शरण गेलो नाही.”

5.“जीवन विकसित करण्याचा जो कार्य-कारण-भाव आहे तो अनादि कालाच्या शास्त्रपरंपरे प्रमाणे व साधन पध्दतीप्रमाणे मानवाच्या कल्याणार्थ अजूनही कार्य करतो आहे.याची साक्ष म्हणजे हे कार्य होय”

6.“प्राःयश्चित्त” एकदाच घेता येत, वारंवार नाही.”

धर्म म्हणजे काय?/ त्या धर्माप्रीत्यर्थ आपले कर्तव्य काय? / ऋणानुबंध व त्यांची फेड, / देहिक जीवन / इत्यादींचे सविस्तर विवेचन अध्यायात केले आहे ते शांत चित्ताने वाचवे, मनन करावे.

प्रत्येकाला जीवन जगत असताना जन्मकर्म व जन्मजन्मांतर यांच्या सहकार्यानेच जीवन जगावे लागते.पण ज्याना कार्य करावयाचे आहे अशा माध्यमाला बालपणापासूनच संस्कारविधी करून पुढील जीवनाच्या कर्तव्याच्या  जबाबदा-या संभाळण्याचे सामर्थ्य त्यात सामावावे लागते.तथापी गुरुंची विशाल कृपा असल्यासच असे हे कार्य सिध्द होणे शक्य होऊ शकते.कारण आपल्या ठिकाणी असलेल्या श्रध्देचा,भक्तिचा,सबूरीचा, परोपकाराचा, देवाबद्दलचा,कर्माबद्दलचा अभाव असूनसुध्दा श्री सद्गुरु पाठ फिरवीत नाहीत पण सानिध्यात बसविण्याचे भाग्य प्राप्त करून देतात, त्यातून ऐहिक सुखाच्या इच्छा वासनाबद्दल स्वाभाविकरीत्या आपण विन्मुख व्हावयास पाहिजे,तरच गुरुप्राप्ती झाली हे अनुभवास येईल.–याचाच अर्थ “गुरुसाक्षात्कार” होय

निसर्गाचा नियम म्हणजेच …परमेश्वराने केलेली योजना …“जीवन अर्पण करा”,

हा संदेश आहे.

याचे विवेचन करताना हे स्पष्ट केले आहे कीं मानवी देह हा तीन प्रमुख देहानी युक्त आहे.ते तीन देह म्हणजे स्थुल देह,सूक्ष्म देह व कारण देह.स्थुल देहाकडे जन्मकर्म, सूक्ष्म देहाकडे जन्मजन्मांतर व कारण देहाकडे देवादिक, असे ऋणानुबंध सामावलेले असतात.त्या तत्वांची जाणीव होऊन त्यानुसार कार्य होण्यासाठी, स्थुल देहाला बुध्दीचे माध्यम, सूक्ष्म देहाला मनाचे माध्यम, तर कारण देहाला चित्त हे माध्यम, अशी माध्यमे निसगाने प्रदान केलेली आहेत.अशी नैसर्गिक व स्वाभाविक कार्य रचना देहात नियंत्याने केली आहे, त्याचा लाभ न घेता मनुष्य अनैसर्गिक मार्गाचा अवलंब करीत असतो.त्यात भिन्नभिन्न देवदेवतां, उपास्य देवता, जपजाप्य, दीक्षा, अनुग्रह घेऊन अशुध्द अशा वलयांची निर्मिती, देह-परिसरात मनुष्य सतत करीत असतो.अशी वलये देह स्वीकारीत नाही म्हणून अडचणी येत असतात.अशा वलयांना देहापासून अलग अगर दूर करावे लागते म्हणजेच त्यांचे विमोचन करावेच लागते.

ज्योतिषशास्त्र हे मार्गदर्शनार्थ आहे.भविष्यात काय आहे,याचे ज्ञान त्यात नाही.कारण भवितव्यातील घटनाक्रम मनुष्याच्या आचरणानुसार घडत असतो.नियोजीत कार्य बदलण्याची (अनुकुल वा प्रतिकुल) क्षमता मानवाच्या आचरणात असते.आर्थिक प्राप्ती हे कुटुंबप्रमुखाचे कर्तव्य असते.दैनंदिन आचरणात ज्ञान-अज्ञानाने घडलेल्या  द्ष्कृत्यापासून दोषमुक्त होण्यासाठी पश्चाताप आदि विधी शास्त्रात सांगितले आहेत त्यात होम-हवन, दान, इत्यादी सूचित केले आहेत.पण त्यातून मनुष्य पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाही.कारण पापमुक्त करण्याचा अधिकार इतर कोणाचा नसून तो फक्त देवाचा आहे.म्हणून कोणीही ज्ञानी प्रायःश्चित्त सागू शकेल पण मुक्तता प्राप्त करून देऊ शकणार नाही.

वरील सर्व विषय बारकाईने व सूज्ञपणे अभ्यासावेत कारण,समितीने साध्य केलेल्या निराकरणांचा पाया वरील विषयांवर अवलंबून आहे हे लक्षात घ्यावे.