6-2-1962 मंगळवार
सर्व कामकाज झाल्यावर पूजन केलेला एक प्रसाद ताटात शिल्लक राहिला होता.हा प्रसाद शिल्लक का राहिला?विडा व प्रसाद लावून घेत असताना दुसऱयाचे माझ्याकड़ून कल्याण व्हावे ही जर भावना असती तर तुम्हाला ताबडतोब असा जबाब मिळाला असता की या भक्ताला ‘प्रसाद’ लावण्याची जरूरी नाही.पण तुम्ही नारळ व विडा गोळा करण्याकरिता बसता.आता प्रश्न असा आहे की तो जरी ‘प्रसाद’ असला तरी तो दुसऱयाच्या जीवनात ‘प्रसाद’ म्हणून जाऊ इच्छित नाही.कारण त्याच्यामागे असणारे तुमचे अज्ञान.सेवा अज्ञान रूपी असेल तर उपयोगी पडणार नाही. माझ्यामुळे आलेल्या भक्ताला सुख शांती मिळू दे या भावनेऐवजी दिल्या जाणाऱया निराकरण पत्रिकेप्रमाणे भक्ताला सुख शांती मिळू दे ही तुमची भावना आहे.ही भावना म्हणजे 3 सेल्स विकणारा दुकानदार.ज्याला अडचण तो 3 सेल्स टॉर्चमध्ये घालून अडचणीचे निवारण करील,पण विकणारा दुकानदार मात्र अंधारातच राहिल. गुरुकृपेने राहिलेला प्रसाद आम्ही पहिला प्रसाद म्हणून अगर वास्तुप्रसाद म्हणून अगर कर्मविमोचन करण्यासाठी देऊ शकतो.तुम्हाला तुमच्या शक्तीने एक प्रसाद वेळ प्रसंगी वाटेल त्या कामासाठी वापरता येईल का?
गुरूकृपा ही टाटा पॉवरहाऊस सारखी आहे.त्यातून मिळणारी वीज कुठल्याही कामाला वापरु शकता पण तुमची शक्ती अगर भावना म्हणजे टॉर्चमध्ये घालण्याचे तीन सेल्स आहेत.यापलिकडे तुमची मजल जाऊ शकत नाही.तुमच्यामागे कर्मपरंपरा किती जबरदस्त आहे याचा कधी अंदाज घेतलात का? बाबांना भेटायला येता, पान आणता पण सुपारी रहाते.कधी सुपारी आणता व पाने रहातात.गादीवरील पाने घेऊन तुम्ही वेळ भागवता.इच्छित कामासाठी दिलेला आशिर्वाद घेऊन घरी जाता.पण जाताना पाने नेली नाहीत म्हणजे काही कर्माचा भाग आपल्याबरोबर आला नाही,तो घरीच राहिला आहे व त्याचेसुध्दा तुमच्या आशिवार्दाने विमोचन होऊ द्या.अशी कधी प्रार्थना करता का? दोन पाने व एक सुपारी म्हणजे दोन हात व मस्तक. इथे विडा लावून घेऊन पैसे गोळा करण्याकरिता आम्ही बसलो नाहीत.ईश्वराकडे रिकाम्या हाताने जाऊ नये.दोन हात व नतमस्तक याने त्याला शरण जायचे असते.पण बाबांच्या कृपेमुळे वेळेला पान किवा सुपारी सहज मिळते.पण अजून काही घरी शिल्लक रहाते आहे याचा विचारच तुमच्या मनात येत नाही.अज्ञानात राहू नका.त्रिकाळ ज्ञानी व्हा.ज्याची मीमांसा स्वतःच्या जीवनात मांडता आली त्यालाच ब्रम्हज्ञान म्हणतात.
तुम्ही महिन्याचा पगार घेण्याच्या दिवशी खिशात 4 आणे नसतील तर बस अगर गाडीने ऑफिसमध्ये जाऊ शकणार नाही व रुपये 300 पगार मिळणार नाही. 4 आणे असल्याशिवाय तीनशे रुपये मिळत नाहीत,मग तुमच्या जवळ 4आणे असल्याशिवाय बाबांची कृपा व त्यांच्या कृपेमुळे मिळणारे हजार रुपये कसे मिळणार?तुम्हाला सच्चिदानंदाची प्राप्ती पाहिजे पण त्या आधी तुमच्याजवळ आनंद तरी पाहिजेच ना ! तुला सद्गुरुकृपा पाहिजे पण तुझी कृपा कोणावर असेल तरच सद्गुरूकृपा लाभेल.मुलाला नोकरी नसते म्हणून बाप मुलाला जाण्या-येण्यासाठी गाडी-भाडय़ाचे पैसे देतो.पण हे पैसे कुठपर्यंत देतो,त्या मुलाचा पहिला पगार हाती येईपर्यत.महिन्याच्या शेवटी 300रुपये पगार आला.या 300 रुपयावर माझा काहीही हक्क नाही.तर दिवसाकाठी आठ आणे या हिशेबाने महिन्याचे 15रुपये गाडी भाडय़ाला देणाऱया आईवडिलांचा, भावाचा त्या300रुपयावर हक्क आहे.पण ही भावना तुमच्याशी आहे का? आता दररोज आपणास 8आणे लागतात व पहिला पगार हाती आल्यानंतर यापुढे लागणाऱया बसच्या पैशाची तरतूद तुम्हीच केली पाहिजे.आता जर वडिलांकडे पैसे मागितले तर ते रागावल्याशिवाय राहाणार नाहीत.
सर्वप्रथम तुम्ही इथे आलात त्यावेळी तुमच्या संचितावस्थेत पाप आहे का पुण्य आहे हे कुठल्याही प्रकारे विचारात न घेता मी तुम्हाला 4आणे दिले.ते तुम्ही सर्व खर्च केलेत.आता यापुढे उसने मिळणार नाहीत.तत्त्ववादी होणे फार सोपे आहे कारण प्रत्यक्षात काहीच करावयाचे नसते,पण तत्त्वनिष्ठ होणे फार कठीण.कारण ती निष्ठा जीवनात आणावी लागते.आज सहा महिने झाले.दरराज कर्मविमोचनार्थ 11 माळा जप चालू आहे,पण अजून हाती ‘घेतलेले’ काम का होत नाही?11 माळा या सद्गुरुकृपेमुळे आहेत हे विसरु नका.पण एवढे करुनसुध्दा काम होत नाही म्हणजे कर्माची प्रखरता जास्त आहे व त्याकरीता जपाची संख्या वाढवली पाहिजे.हा अंदाज तुम्हाला का करता येत नाही.पानावर बसलो आहोत,भात-पोळी आली,पण अजून जाणीव होते की आणखी दोन चतकोर पोळीची आवश्यकता आहे.ही जाणीव झाल्याबरोबर आपण आणखी पोळी घेतो,घरात जास्त पोळय़ा केलेल्या असतात म्हणून मागत नाही.या पोळीचा अंदाज घेता येतो मग कर्माच्या प्रखरतेचा अंदाज का येत नाही.
तुम्ही एकदा सद्गुरु चरणाशी आल्याबरोबर तुमची कर्मे म्हणतात की आम्हाला याच्या जीवनात या पुढे जावयाचे नाही.तुमचे दुष्कर्म म्हणते की,मला सोडवा व सत्कर्म म्हणते की आम्हा ला पूर्णत्व द्या.सगुण करा,साकार करा व मला त्याच्या मुलाबाळाच्या जीवनात जाऊन त्याला सुख-समाधान-शांती लाभू दे.ती कर्मे तुम्हाला सोडायला तयार आहेत.पण तुम्ही त्याना सोडत नाही. पूर्व जन्मातील ऋणानुबंधाला मी बाजूला केले आहे.पूर्वजन्म ऋणानुबंध असा आहे की तुम्हाला खोटे बोलण्याची सवय आहे पण यापुढे प्राण गेला तरी खोटे बोलणार नाही,असा निश्चय तुम्ही केला आहे का?या जन्मात पुन : खोटे बोललास,दुष्कर्म केलेस की गतजन्मातील सर्व दुष्कर्मे भोगणे प्राप्त होते. पुनश्च तशी कर्मे घड़ू नयेत म्हणून आपण दक्षता घ्यायला पाहिजे.सध्या जो काही त्रास होतो आहे तो गतजन्मातील ऋणानुबंधाचा नसून प्राप्त जन्मात करत असणाऱया दुष्कर्माचा त्रास होतो आहे.पुन्हाः दुष्कर्मे करणार नाही असा निश्चय करणे म्हणजेच कर्म-विमोचन.
आज तेच करीत आहात.म्हणजे पहिला उकीरडा आहे त्यावर निर्माल्य टाकला तरी उकीरडा तो उकीरडाच संध्याकाळी 7 ते 9 येथे आरतीला येता त्यावेळी तुमच्या घरातील उंदिरापासून ते नोकर-चाकरापर्यंत सर्व माणसांचा ऋणानुबंध मी बाजूला काढीत असतो. अशावेळी अर्धातास झाल्याबरोबर घरची आठवण येते म्हणजे घरचा ऋणानुबंध किती जबरदस्त आहे याचा विचार करा.दोन तासात अर्धा तास येथे व दीड तास घरी तर चोवीस तासात आठरा तास घरी एवढय़ाचा ऋणानुबंध अजून तुम्हाला भोगावयाचा आहे,हे लक्षात ठेवा.घरात सात-आठ माणसे खाणारी व एकच कमाविणारा असेल तर सर्व मंडळीना काटकसरीने रहावे लागते.आवड-निवड चालत नाही.मिळेल ते खावे लागते.पण एका बरोबर आणखी तिघे जण नोकरीला असतील तर सर्वांना मनासारखे मिळेल.हे जसे प्रपंचात तसेच परमार्थात आहे.एखाद्या कुटुंबाचा उध्दार 10 वर्षे होत नाही हे ठरले आहे. त्यातील एकजण इकडे येऊन सेवा करु लागला तर तेच कुटुंब सात वर्षात उध्दरून जाईल व कुटुंबातील सर्वजण सेवेला लागतील तर दहा वर्षाऐवजी एका वर्षातच ते कुटुंब उध्दरून जाईल.
आजच्या तरुणाना फार मोठी सबब आहे.नोकरी नाही कारण सगळीकडे बेकारी तर माझ्या पोटालासुध्दा बेकार राहिले पाहिजे.नोकरीची वाट कशाला बघावी लागते ! नोकरीने तुमची वाट बघितली पाहिजे.घरातल्या देवाची पूजा एक करतो मग जेवायला सगळे का? परवा दादांची लहान मुलगी म्हणत होती की दादांना फार काम असते त्यांचा जप आपण केला पाहिजे.ही प्रेरणा कुठून आली.जे त्या लहान मुलीला जाणवले ते एवढय़ा मोठय़ांना कळू नये!याचे कारण जिथून ते वाहते आहे तेथे शुध्दत्व आहे.नदीचे मुख शुध्द असेल तर तेथून निघणारे सर्व प्रवाह हे शुध्द असावयालाच पाहिजेत.बँकेचा overdraft केव्हा घ्यायचा तर आपण हात-पाय हालविणार आहोत हा आत्मविश्वास असेल तर !आमच्या या बँकेतून (पूर्व संचितावस्था) overdraft मिळतो पण सगळे कुटुंब परिपूर्ण पारमार्थिक करीन हा दृढनिश्चय असेल तरच.पण तुम्ही आमच्या आशिर्वादाशी जुगार खेळणार, रेस खेळणार तुमचे आजोबा 84 वर्षे का जगले? कारण त्यांनी आपल्या नशिबातला overdraft पोटच्या पोराला दिला नाही.असा overdraft देण्याने पैसाच नाही तर पर्यायाने तुमचे आयुष्य देखील कमी होत असते.तुमचे आजोबा तुमच्या वडिलामागे हात धुवून लागत असत,पण आज तुमच्या बापाच्या कमाईतील तुम्ही पाच जण खात आहात याचा विचार करा.
रावसाहेबांनी25वर्षे नोकरी व 2 वर्षे पेन्शन घेतली पण तुमच्या या बेताल वागणुकीमुळे तुमचे वडील पेन्शनीत जातील व थकून जातील.एक कमावतो व पाच जण खातात याचा अर्थ काय?तुम्ही समोर बसता व अमुक एक काम होऊ दे असा आशिर्वाद मागता. अरे,आशिर्वाद हा आहेच. पण तो कामा करता न मागता अजून कर्म तीव्र आहे, प्रखर आहे ती तीव्रता कमी होऊ द्या अशी प्रार्थना करता का ? कर्म वज्रासारखे कठीण आहे.देवांचा राजा इंद्र, हा वज्र देवांचे रक्षण करण्यासाठी वापरीत असे.पण नाथांनी त्या वज्राचासुध्दा चुराडा केला.मग वज्रासारख्या कठीण झालेल्या कर्माचा चुराडा ते करतीलच.पण आशिर्वाद कामाकरिता मागता.कर्म म्हणते आशिर्वाद आहे म्हणून या कामातून बाजूला होईन,पण दुसऱया एखाद्या कामाच्या आड आल्याशिवाय सोडणार नाही.
देवांना कर्म भोग सुटला नाही.कर्माने रामाला 14 वर्षे वनात पाठवले. आपण तर मानव.आपणाला कर्म भोग कसा सुटेल?आजपर्यंत संदलच्या प्रसादाची अनुष्ठाने मांडलीत पण यापुढे अशी प्रार्थना करा की बाबा,माझ्या काया,वाचा,मनाने घडलेल्या पातक-प्रमादाच्या ऋणानुबंधाचे कर्म उभे राहिलेले आहे,त्या कर्माचे विमोचन होऊ द्या.पण त्या कर्माचे विमोचन केव्हा होईल तर पुनश्च तशी कर्मे तुझ्या हातून घडणार नाहीत तेव्हाच. मला माझ्या गुरुने असे सांगितले आहे की मानवाच्या जीवनातील कळवळा,दुख, प्रेम,आनंद हे निरंतर नसते.ते सर्व क्षणिक असते.तरी कार्यार्थ जाशील त्यावेळी समोर बसून कोणी कितीही रडला तरी त्या रडण्याकडे लक्ष देऊ नकोस.त्या मागील कारण शोध !हा पैशाचा लोभी आहे.पैसा दिला म्हणजे वाहवा करील तरी त्याच्या आनंदात सहभागी होऊ नकोस.कोणत्याही परिस्थितीत स्थिर रहा.स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्य जे-जे करतो ते जर तू केलेस तर तो स्वार्थापासून दूर होणार नाही.पुनश्च तशी कर्मे घडल्याशिवाय रहाणार नाहीत व मुलाबाळांना सुख मिळणार नाही.
1962 साल हे सिध्द होण्यासाठी नाही तर साध्य मिळवण्यासाठी आहे.साधना सिध्द होण्यासाठी तुमच्या अपेक्षा 61सालापर्यत पुऱया केल्या,या पुढे नाही.तुमचा दृष्टीकोन असा असला पाहिजे की,बाबा इच्छित कामना पुरी करत आहेत म्हणून तुमच्याकडे आलो नाही किवा ती कामना पुरी करत नाहीत म्हणून देखील तुमच्याकडे आलो नाही.या पुढे मला पाहिजे ते मी माझ्या ईश्वरा जवळून मिळवीन.वाण्याकडे गेलात व2शेर साखर मागितलीत तर साखर मिळते.वाणी वजन तुमच्या पदरात टाकत नाही.दुसऱया गिऱहाईकारणा साखर देताना वजन लागेल.तुम्ही समोर बसून अपेक्षा केलीत की ती मी तोलतो.अपेक्षा ही सिध्द आहे व वजन हे साध्य आहे.तुमची गाडी अडली होती.आम्ही ढकलीत ती पंपावर आणली.पदरचे पैसे मोड़ून2गॅलन पेटोल भरले.आता सुरू तुम्ही केली पाहिजे.पण तुम्ही म्हणता की जरा अजून गाडी ढकला.वास्तविक गाडी चालू करुन आम्हाला आमच्या घरी पोहोचविले पाहिजे, पण तसे न करता आता तुम्ही बसने जाणार की ट्रामने जाणार याची विचारणा करता.तुमचा जीवात्मा असाच अडला होता.पातकामुळे तो त्रस्त झाला होता.मला सोडवा म्हणून त्याने देवाकडे धाव घेतली.त्याने टाहो फोडला,पण तुम्हाला वाटले की,आपल्या इंद्रियांत काही बिघाड झाला आहे.जिथून मार्गाला लागलो तिथे काया,वाचा,मनाला सोडले पाहिजे.हा गुरू असा आहे की तुम्हाला सुख8दिवसानी मिळायचे असेल तर तो आजपासूनच तुमच्याकडे सुख पाठविल.पण त्याचप्रमाणेच दुखही 8 दिवस आधी पाठवील.याला म्हणतात गुरू!
जालंदरनाथानी गोपीचंद राजाचे पाच पुतळे भस्म केले, याचा अर्थ समजला का?गोपीचंदाच्या ज्ञानेंद्रियाच्या व कर्मेद्रियाच्या ठिकाणीपंचतत्वाची असणारी विशुध्दता जाळून टाकली व त्याचवेळी तो दीक्षा घ्यायला तयार झाला. आपत्तीच्या रुपाने तुमच्यामागे कर्माचे पुतळे उभे करुन तुमची विशुध्दता जाळून टाकत आहे.जेवण करुन झोपल्या वर दुसऱया दिवशी अन्न पचन झाल्यास तरतरी वाटते.वाजवीपेक्षा जास्त अन्न ग्रहण केले असल्यास करपट ढेकर येतात.साधनासुध्दा अशीच करायची असते.आजसुध्दा पारायण करायचे अशी भावना झाल्यास कारणची साधना बरोबर झाली असे म्हणावे लागेल.पण तुम्हाला जगापुढे लखलखीतपणे उभे करायचे आहे व जगाला दाखवून द्यावयाचे आहे की गुरूकृपा झाल्यावर लाख रुपये मिळत नाहीत तर मनुष्य कसा भिकारी होतो.या गोष्टीनेच आपल्या सभोवतालचा अंधकार नष्ट होईल.