28-4-1962 शनिवार
आपल्याला पुन्हा देहधारण कर्मामुळे करावा लागतो इकडे आल्यावर वंशविमोचन का केले? प्रथम आलात त्यावेळी येण्याचे कारण एकच होते की तुमची अपेक्षा पुरी होत नव्हती. सद्गुरूंना जाणवले की अपेक्षा पुऱया न होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे वंश शुध्द नाही. आपल्या वाडवडीलांच्या इच्छा-वासनाज्ञान-अज्ञानाने घडलेली कर्मे, आपल्या अपेक्षापूर्तीच्या आड येत आहेत. याचे ज्ञान तुम्हाला नव्हते. येथे आल्यानंतर ते ज्ञान तुम्हाला झाले. जे गेलेले आहेत व जे आपल्या वंशात पुढे जन्मास येणार आहेत ते शुध्द असावेत हे गुरूकृपेवर अवलंबून आहे व या करीताच आचरण शुध्द पाहिजे. आपले आचरण शुध्द असले की त्यांच्या हातून घडलेल्या पातक-प्रमादांचा आपल्या जीवनात प्रवेश होऊ शकत नाही.
मानवी जीवनाची अवस्था म्हणजे,
- विद्या
- संपत्ती
- संतती
- आरोग्य
- सुख, शांती, समाधान
याप्रमाणे कार्यारंभ होतो.
आपल्या आप्त-स्वकीयांच्या मरणोत्तर जीवनानंतर इच्छा-वासना शिल्लक रहातात. त्या आपणास कर्मप्रारब्ध म्हणून भोगाव्या लागतात. त्यामुळे दुख प्राप्त होते. अशा कर्मांचे विमोचन म्हणजे तशाच प्रकारची कर्मे आपल्या हातून घडू नयेत व तशी कर्मे आपल्या जीवनात येऊन आपल्या हातून आणखी काही कर्मे घडू नयेत म्हणून विमोचन करावयाचे. आत्म्याला त्याच्या इच्छा-वासनापासून मुक्त करावयाचा आहे. आत्मा म्हणजे चैतन्य, म्हणजेच शक्ती. याचे कार्य-कारण काय? त्याचा धर्म काय? आत्मा हा कोणाच्याही पाशांत अडकणार नाही. माझे कार्य संपले, असे म्हणून तो देहाचा त्याग करतो व मनुष्य मृत होतो. देह सोडताना त्याला किती मुले बाळे आहेत याचा तो विचार करीत नाही. तो माया, उपाधी यात अडकत नाही. त्याची मूळ अवस्था बंधनात न रहाणे अशी आहे मग असा विमुकत आत्मा बंधनात का अडकतो?
जन्मजन्मांतरात घडलेली कर्मे त्याला जन्म घ्यायला कारणीभूत होतात. आज तुमचा जन्म 8वा आहे. 7 जन्माचा ऋणानुबंध पूर्ण करण्यासाठी आज त्याला 8 वा जन्म घ्यावा लागला तरी प्राप्त जन्मात शुध्द आचरण ठेवल्यास पुढील जन्मात बोजा कमी होईल. तुम्ही स्वतंत्र आहात तर मग 8 तास नोकरी का करता, तर संसार आहे. मुलाबाळांना अन्न वस्त्र मिळाले पाहिजे व या करीता तुम्ही 8 तास बध्द असता. तसेच तुमचा आत्मा 50-60 वर्ष एकेकाच्या जीवनात बध्द झालेला असतो. आत्म्याचे परलोकात कार्य काय असते? आपल्या हातून एखादे पातक घडले तर आपल्याला पश्चाताप होतो. पण पुनश्च तसे कर्म आपल्या हातून घडतेच कारण आपल्या देहाच्या ठिकाणी ज्ञानेंद्रिये व कर्मेद्रिये आहेत. वासना विकार निंर्माण करून पुनःश्य तशी कर्मे करणे हा त्यांचा धर्म आहे. म्हणूनच पश्चाताप झाला तरी पुन्हा तसेच कर्म आपल्या हातून घडते. आत्म्याने या पंचमहाभूतात्मक देहाचा त्याग केला की त्याच्या बरोबर देह जात नाही तर सूक्ष्म रूपाने घडलेली कर्मे जातात.
काया-वाचा-मनाने सुख अनुभवणे हा प्राप्त जन्मात आपला धर्म आहे. आपला आत्मा हा आदि चैतन्याकडून आलेला आहे. तो मुळ चैतन्याकडे जात असतो. त्याला अपेक्षा करण्याचे कारणच नसते. त्याच्या ठिकाणी शक्ती आहे. त्या शक्तीच्या योगे पातक करावे किवा नाही याची सद्विवेक बुध्दी प्राप्त होते. त्याच्या कर्माची पूर्तता करावयाची आहे कर्मे वाढवावयाची नाहीत. पण आपण अज्ञानाने कर्मे वाढवतो. जन्मऋणानुबंधामुळे कर्मऋणानुबंध प्राप्त होतो. आज आपल्याला जेवढा पश्चाताप होतो त्याच्या कितीतरी पट आत्माला देहत्याग केल्यावर पश्चाताप होतो. आत्मा वर गेल्यावर देहाकरवी घडलेली सर्व कर्मे आठवतो. आपल्या शक्तीने सर्व कर्मे एकत्र आणतो व काही कर्मांचा त्याग व कर्मफळांचा त्याग करतो. आपल्याच वंशात पुढे जन्मास येणाऱयाना त्या कर्माचा त्रास होईल अगर आपल्यालाच पुनःजन्म प्राप्त झाला तर त्याग न केलेली कर्मे पुनः आपल्याला भोगावी लागतील व त्यामुळे आपल्या हातून आणखी कर्मे घडतील व उपाधी वाढेल. आत्मा सर्व कर्माचा त्याग करतो. जी कर्मे आपल्या वंशात जन्मास येणाऱयाना झेपणार नाहीत अशा कर्माचा त्याग करतो. कर्मफलाचा त्याग म्हणजे काही काळापूर्वी त्याने घोडागाडीची इच्छा केली असेल पण आता मुंबईत जन्म घ्यायचा म्हणजे मुंबईत घोडागाडी मिळणे कठिण कारण मोटारीचा जमाना चालू. तरी घाडागाडीचा त्याग करतो.
आत्मा हा नेहमी पुढे जाणारा आहे. आपण दिल्लीला निघालो की, वाटेत लागणारी स्टेशने त्यांचा आपण त्याग करतो किवा दिल्लीलाच राहिलो तर त्या सर्व स्टेशनांचा आपल्या दृष्टीने त्यागच होतो. याला कर्मफलत्याग असे म्हणतात. अशा प्रकारे कर्माचा त्याग झाला पण त्यांचे विमोचन झाले नाही. जोपर्यंत अशा कर्मांचे विमोचन होत नाही तोपर्यंत वंश शुध्द होऊ शकत नाही.
या विश्वांत हिरण्यगर्भ शक्ती आहे. त्या शक्तीला एकटेपणाची जाणिव झाली म्हणून ही सृष्टी निर्माण झाली. त्या शक्तीने आपल्या चैतन्याचा भास निर्माण करून ती बाजूला झाली. आत्म्याला स्वयंमुक्ती नाही. प्रथम आपणाला बाबांच्या चरणी विलीन व्हावयाचे आहे. कारण त्या शक्तीचा अंश बाबांच्यात आहे व त्याच्या एक लक्षांश ही शक्ती आपणांत आहे. म्हणून प्रथम बाबांच्या चरणी विलीन व्हावयाचेव नंतर त्या शक्तीतून निर्माण व्हायचे.
असा आत्मा वर गेल्यावर त्याला मूळ चैतन्याची, परब्रम्हाची जाणीव होते. आपण आपल्या बरोबर हे काय विनाकारण आणलेले आहे? अशा विचाराने आणलेल्या कर्मांचे गाठोडे सोडू लागतो. त्या नंतर कर्माचा त्याग करतो की, ज्यामुळे कोणाच्या जीवनांत दुख निर्माण होणार नाहीत. तो अशीच कर्मे बरोबर आणतो की देवादिकांचा ऋणानुबंध संपला जावून परमेश्वर दर्शन घडेल. अशा त्याग केलेल्या कर्मांना, आवाहन करून त्यांचे विमोचन केले. सिगरेट न पिणे हा कर्माचा त्याग पण जोपर्यंत बाजारांत मिळते तोपर्यंत सिगरेटचे विमोचन होत नाही. ईश्वरीकृपेने प्रतिकार शक्ती वाढते व केलेल्या कर्मांचा जीवनात प्रवेश होत नाही. वाडवडिलानी केलेली कर्मे पातक-प्रमादयुक्त असतात. ती आपल्या जीवनात आल्यास आपण एखाद्याला टप्पल मारत असू तर लाथ मारू. फळाची वासना पुरी झाली नाही व त्याकरीता पुन्हा जन्म घ्यावा लागणार असल्यास आत्मा अशा कर्मफलांचा त्याग करतो.
एखाद्दाला रु. 5 दिले व घेताना 7 रु. घेतले. हे दोन रुपये जास्त घेतले याचा त्याग करतो. अडचण आली म्हणून तुमच्या जवळचे शंभर रुपये दिले. पण घेताना रु. 125 घेता. अडचण आली तर त्याचा दोष नाही पण अडवून 125 रु. घेतले. त्यामुळे त्याचा रु. 125 चा ऋणानुबंध कमी झाला व तुमचा वाढला. वाडवडिलांनी इतरेजनांचा व देवादिकाचा ऋणानुबंध ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही संसार करता व देवाकडे येता पण तुम्ही जर देव मानीत नसणारे असल्यास आठ तासाच्या कमाईतील अशा रु. 125 मुळे त्याचा जन्म व कर्मऋणानुबंध तुमच्याकडे येतो. पर्यायाने त्याचा ऋणात जाल तर त्याचे संचित तुम्हाला मिळावे कसे? त्यांचा देवादिकाचा ऋणानुबंध तुमच्याशी जोडून दिला आहे. कारण तुमचे विमोचन झाले आहे. तुमच्या आत्म्याने स्वतः अशाच कर्मांचा व कर्मफलांचा त्याग केलेला आहे. आता तो उत्तम तऱहेचे जीवन जगण्यासाठी आला आहे.
आजपर्यंत न मिळालेली सुखे अनुभवण्यासाठी तो आलेला आहे. ती सुखे आजपर्यंत का मिळाली नाहीत, ती कारणे व ती मिळण्याची कारणे देखील त्याने बरोबर आणली आहेत. मरणाच्या क्षणापर्यंत जे जे काही पाहिजे ते ते सगळे त्याने आणले आहे. आत्म्याचा आविष्कार म्हणजे परब्रम्ह पण त्याला ओळख कशी होणार? 55 वर्षाच्या आयुष्यात 50 वर्षे तुम्ही संसार केलात व उरलेली 5 वर्षे देवतार्चन केलेत. पुढे पुढे हा काळ वाढत जाईल व इहजगतात माया म्हणजे उपाधी रहाणार नाही. फक्त राहील ते म्हणजे दुसऱयांना सुख समाधान देणे होय. आम्ही देखील 20 जन्म घेतले आहेत. त्या जन्मांतील तपःश्चर्या सत्कारणी लावीत आहोत. कृपेचा हा भाग जोडलाच पाहिजे. एखादेवेळी तुम्ही घरी असलात तरी देखील तुमचा आत्मा इकडे येऊन दर्शन घेऊन जातो. एक वेळ तुमची हजेरी लागत नाही. पण ‘त्याची’ हजेरी दररोज लागते. पण हे केव्हा होऊ शकेल तर दररेज येण्याची सवय असेल तरच.
प्रपंच म्हणून कर्तव्य करताना कर्तव्य म्हणून ईश्वराकडे गेले पाहिजे. नित्याचरणात देवादिकाचा ऋणानुबंध जोडला पाहिजे. कर्म व कर्मफलत्याग केले त्यांचे विमोचन होण्यासाठी 1100 जप आहे व अपेक्षा पुऱया न होण्याचे जे कारण आत्म्याने बरोबर आणले आहे, त्याचे विमोचन दुसऱया 1100 जपाने होणार आहे. मार्गाला आणले पहिल्या संकल्पाने पण एकदा आल्यानंतरसुध्दा जाण्याची इच्छा होते. त्याकरता दुसरा संकल्प दिला आहे. तुमचा जन्मऋणानुबंध पातक प्रमादांनीयुक्त आहे. विकृतीमात्र इह जन्मांत झाली आहे. मन मात्र जन्मजन्मांतरांतले तेच आहे. त्या मनाला तुम्ही गतजन्मांत किती पापपुण्य केले आहे हे माहित आहे. म्हणून ते तुम्हाला प्रेरणा देत असते. तुमची कर्मे तुम्हाला अज्ञात आहेत. पण तशा प्रकारच्या कर्माची पुनरावृत्ती केंव्हा होणार ते मनाला नेमके माहीत असते. म्हणून ते तुम्हाला प्रेरणा देऊन सांगत असते की, पारायण कर. पण अशा झालेल्या प्रेरणा आपण मानित नाही.
पारायण करण्याची प्रेरणा ज्ञानेंद्रियाकडे गेल्यावर तो म्हणता की आज काम आहे. तरी उद्या कर प्रत्यक्ष उद्याचा दिवस आल्यावर ज्ञानेंद्रियाकडून कर्मेंद्रियाकडे आज्ञा गेल्यावर कमेंद्रिये म्हणतात की आज बायको घरी वाट पहात आहे. तरी पारायण परवा कर. मनाने प्रेरणा दिली की, 30 माळा नामःस्मरण कर. माळ घेऊन बसता पण 10 मिनीटांतच उठता. 30 माळा जप करण्यास 1 तास लागतो. पण 10 मिनीटातच उठलात म्हणजे तासाला 10 मिनीटे पुण्य व 50 मिनीटे पाप आहे. आज कर्मऋणानुबंधाप्रमाणे 9 वाजता सुटणार आहात. पण आज 9।। ला सोडणार आहे. याला तुमची तयारी आहे ना?