वं.दादांचे पारमार्थिक जीवन
वं.दादांचे पारमार्थिक जीवन, बालपणापासूनच, नकळत घडत गेले. विविध प्रकारच्या अनेक घटना घडत होत्या. त्यामागील कारणे ज्ञात होत नव्हती. त्यात एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे, वं.दादा जीवनातील प्रसंगाना, घटनांना सामोरे जात असताना त्यांना बालपणात झालेले सुसंस्कार, विश्वास, श्रध्दा व भक्ती यांचाच उपयोग झाला ब-याच घटनांचा अगर उपदेशांचा अर्थ त्यावेळी कळत नसायचा. तथापि आज्ञा पालन करणे, या संस्कारातूनच, त्या घटनांचे अर्थ, यथावकाश कळू लागले अगर उपदेशातील ज्ञान प्राप्त होत गेले, परमार्थ कळू लागला. पुढे साधक अवस्थेत, अत्यंत गरजेचे असलेले, निश्चलता व निर्धार हे गुण, निसर्गदत्त असल्यामुळे, वं.दादांची परमार्थात प्रगती होत गेली. एवढेच नव्हे तर अध्यात्मिक जीवनात करावयाची प्रखर व दीर्घ साधना पूर्णपणे सफल होऊन, अंगिकारलेले सर्व संकल्प सिध्द होऊ शकले, साध्य झाले.
पारमार्थिक किंवा अध्यात्मिक मार्गात स्वतःसाठी वा वैयक्तिक, असे कांही न मागता, वं.दादांनी जे कांही मागितले आणि प्राप्त केले, ते फक्त लोक-कल्याणासाठीच केले आहे. म्हणजेच परमार्थाची पायरी पार करून, अध्यात्मिक जीवनातील अंतिम उद्दीष्ट, गाठले.याचाच अर्थ “लोक-कल्याणार्थ” संपूर्ण जीवन व्यतीत केले. एवढेच नाही तर, त्याही पुढे जावून जे काही प्राप्त केले, ते सर्व गुरु चरणी अर्पण करून, श्री सद्गुरुंना ‘जगद्गुरु’स्थानी नेले.जे काही केले ते “मी” केले असा कधीही उच्चार देखील केला नाही. त्यापुढे जाऊन अध्यात्मिक ठेवा जो प्राप्त केला त्यातील लवलेशही स्वतःसाठी न ठेवता तो सर्व मानवतेसाठी सद्गुरु चरणी अर्पण केला.
वं. दादांचे स्वतःच्या जीवनाबद्दलचे उद्गार –
“माझे जीवन म्हणजे काय? व ते कसे होते ? याचा बोध झाला तर भवितव्यात हे जीवन प्रत्येकाला उपयोगी पडेल ”
हे केवळ सार्थ नव्हे तर सकल मानवांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहेत.