आत्मनिवेदन ग्रंथ भाग ३

पिंड म्हणजे मानव व ब्रह्मांड म्हणजे निसर्ग. याप्रमाणे ह्या विश्वाची धारणा झाली आहे. मानव म्हणजे काया, वाचा व मन म्हणजेच प्रतीक व ब्रह्मांड म्हणजे उत्पत्ती, स्थिती व लय, म्हणजे प्रतिमा. ह्या दोन्हींचा संबंध जेव्हा जगतात होतो, त्यावेळी जगात प्रतिभा उदयास येते. ह्यावेळी ह्या जगाचा धर्म चेतना व चैतन्य या माध्यमातून होऊन जगाची धारणा संपत्ती ही होते, अन्यथा नुसते जन्माला येऊन जन्म व्यर्थ खर्च होणे, ह्यासारखे पाप नाही, यासाठी गुरुमार्गात दीक्षांपरत्वे प्रतिभेचा उदय जीवनात व्हावयास पाहिजे. ते जर प्राप्त झाले नाही तर आपले जीवन चैतन्यमय नसून चेतनामय म्हणजे नुसताच जीव जगतो आहे, असे म्हणावे लागते. अशा प्रकारे जीवन व्यर्थ जाऊ नये म्हणून प. पू. बाबांनी पाच दीक्षेंचे कार्य, म्हणजे काय आहे हे सांगितले. त्याप्रमाणे सर्व भक्तांना क्रमशः पाच दीक्षा देऊन व त्यापरत्वे ‘नामस्मरण’ करून घेतल्यावर ह्या पाच दीक्षांपरत्वे विकसित झालेले कोश यांचा संबंध एकमेकाशी जोडला जाऊन अशा अवस्थेचा उपयोग इतरांना व्हावा अशी इच्छा प. पू. बाबांनी व्यक्त केली. त्याप्रमाणे तीन दीक्षांचा संबंध काया-वाचा व मनाशी झाला तेव्हा ॐ कार साधना सुरु केली. प्रथमतः ‘ॐ’ हा श्रीभैरवनाथांकडून शिकलो होतो. पण प. पू. बाबा म्हणाले, “नुसते शिकून चालणार नाही तर ह्या ॐ चा संबंध विश्वाशी आहे. विश्वाची निर्मिती ‘ॐ’ तून झालेली आहे. तेव्हा हा ‘ॐ’ सिध्द होणे आवश्यक आहे. तशी वेळ येईल त्यावेळी तू तयार राहा. आज नव्हे. जेव्हा मला वाटेल की जगाला त्याची गरज आहे, त्यावेळी मी आज्ञा देईन. ह्यावेळी जरी तुझ्या पायाशी हजारो भक्त जमा झाले व लक्षावधी संपत्ती तुझ्यापुढे आली तरी शब्दाला जाग, तरच जग जागे होईल. ही जीवनातील कसरत आहे. तुझा लोभ जगावर आहे का, गुरु काय सांगतात त्याचा लाभ घेणे हिताचे आहे, ते त्यावेळी ठरव”.

हा प्रसंग ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी बरा आहे, पण त्या दिवसापासून मी जागरूक झालो. ज्याप्रमाणे एखाद्याला व्यक्तिशः ‘तुझे मरण हे अमुक दिवसानी आहे’, अशी सूचना मिळावी व ते ऐकल्यानंतर त्याची जशी स्थिती होते तशी माझी झाली. काय दिव्य सांगणार आहेत हा विचार करताना पूर्वाश्रमीचे जीवन आठवले. त्यावेळी मी नोकरीत होतो. त्यावेळी अशीच आज्ञा झाली की, ‘नोकरी सोड’ ही आज्ञा ऐकल्यावर पुढे कसे जगावे ? यापेक्षा देवाज्ञा बरी असे, त्यावेळी वाटू लागले होते, पण आता मनाची दृढता निश्चित झाली की मनाला कशाचे दु:ख मानावयाचे नाही. आज्ञा होताच ती आज्ञा पूर्ण करावयाची अशी प्रतिज्ञा मी केली. भक्त येत-जात होते व अन्य ठिकाणी केंद्रे कार्यार्थ चालू केली होती. त्यावेळी पुणे, मुंबई व दिल्ली ह्या ठिकाणीच कार्य सुरु होते, पण पुढे गोवा स्वतंत्र झाल्यावर मी गोव्याला जावे असे वाटू लागले. त्यावेळी असा योग घडून आला की गोवा बघण्यासाठी म्हणून मी गेलो. कार्याची ओळख व्हावी असे मनात नव्हते. त्यावेळी श्रीपंतांचा उत्सव होता. त्या उत्सवासाठी म्हणून मी बाळेकुंद्रीला गेलो. त्यावेळी एक गोव्याचे रहिवासी, जे मुंबईला राहात होते ते ह्या उत्सवासाठी म्हणून बाळेकुंद्रीस आले असताना माझी त्यांची भेट झाली. त्यांच्या बोलण्यात हा विषय आला. मुंबईस त्यांचा छंद ‘भविष्य सांगण्या’चा होता. जेव्हा त्यांची माझी भेट झाली, तेव्हा ‘मी भविष्य सांगत नसून लोकांचे भविष्य घडवितो’ असे मी त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर त्यांना नवल वाटले. इतक्या वर्षांत ‘भविष्य सांगतो’ असे म्हणणारे लोक आपल्याला भेटले, पण ‘भविष्य घडविणारा’ कोणीही भेटला नाही असे ते म्हणाले. उत्सवाचे चार दिवस संपल्यावर पुढील कार्यक्रम काय आहे ? पुन्हा आपली भेट केव्हा ? इत्यादी विचारणा त्यांनी केली. त्यावेळी मुंबईचे एक पंतांचे भक्त तिथे होते. माझ्या मनात गोव्याला जावयाचे आहे असे सांगितले. तेव्हा ते ऐकून ते म्हणाले की ‘माझी गाडी घेऊन गोव्याला जा व बरोबर ह्यांना घेऊन जा, कारण ते गोव्याचे रहिवासी आहेत’. त्याप्रमाणे ठरले, पण त्यावेळी श्रीपंतांनी उत्सवासाठी बोलावले होते. तेव्हा त्यांची आज्ञा महत्त्वाची, ती झाल्यास पुढील कार्यक्रम ठरवू. एवढे बोलून मी ज्यांच्या घरी राहात होतो त्यांच्याकडे आलो. पंतांचे देऊळ लहान आहे, पण आजूबाजूला आमराई मोठी आहे. जसे रम्य ‘औदुंबर’ होते तशी ‘बाळेकुंद्री’ त्या क्षणी भासली. असे वाटले की, आपली मुलगी लहान असते व हळू हळू मोठी होते. तिचे जे लाड आईवडील पुरवतात त्याला ‘माहेर’ म्हणतात व दुसरे स्थान बाळेकुंद्री. ह्याचा अर्थ ‘सासर’ असतो असे वाटू लागले, पण माहेर व सासर म्हणजे काय याचा अर्थ शाब्दिक नाही हे समजणे आवश्यक आहे. शब्दांची कसरत कोणालाही करता येते, कारण आपण नेहमी म्हणतो की ‘गोड बोलावे’. पण जगतात हे आडनावसुध्दा नाममात्र आहे, मग गोड बोलणे हे बाजूला राहीले.

संताची भाषा वेगळी असते हे त्यावेळी अनुभविले. त्या रात्री जेवणखाण झाल्यावर मी देवळाच्या कट्टयावर बसून होतो. गोव्याला जाऊ का नको ? हे पंतांना विचारावयाचे होते. पण सकाळी पंतांचा फोटो उग्र वाटला, त्यामुळे विचारावे किंवा नाही याचे धारिष्ट्य होईना. त्यावेळी १२ वाजून गेले होते. अशा वेळी ‘मोगऱ्याचा वास’ आला. उत्सव जेव्हा होतो तो महिना अश्विन. तेव्हा मोगऱ्याची फुले मिळणे कठीण. पण अजून मला आठवत आहे की त्या रात्री आसमंतात मोगऱ्याचा सुगंध पसरला होता. तो वास घेत घेत माझी तंद्री लागली व शब्द असे जिव्हाळ्याचे ऐकले “मुला, जागा हो. नवीन प्राप्त करावयाचे आहे, त्यासाठी त्या प्रांताची माहिती पाहिजे. जी आज्ञा तू मागतो आहेस तो प्रांत गोवा आहे. हा प्रांत इतरांप्रमाणे नाही. उठता बसता ह्यांना ‘देव’ लागतो. त्यांची श्रध्दा देवाबद्दल आहे पण ती पाहून किळस येते, म्हणून तुला जो ‘मोगऱ्याचा वास’ आला त्याचा अर्थ ‘मोग’ म्हणजे ‘प्रेम’. पण देवाबद्दल नाही. ते ‘मोग’ केव्हा समजते ? जेव्हा देवाकडून काही मागावयाचे असते अशावेळी ते मोगात येतात. नाहीतर विसरून जातात. यासाठी पहिल्यांदा ‘मोग’ म्हणजे ‘प्रेम’ संपादन कर व मग कार्याला आरंभ कर”. त्याप्रमाणे गोव्यात प्रवेश केला. त्यावेळी गोवा फारच लहान होते. तेथे एका हॉटेलमध्ये उतरलो. त्यावेळी मुंबईस माझ्याकडे येणारे भक्त नोकरीच्या निमित्ताने आले होते. त्यांची माझी गाठ पडली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी घरी बोलावले व गोव्यात कार्य सुरू करा’ अशी इच्छा प्रकट केली. त्यावेळी मी सांगितले की “मी ताबडतोब कार्य सुरू करीन पण जर येथील देवतांनी आज्ञा दिली तर, कारण मी गोवा बघण्यास आलो. तेव्हा पुन्हा प. पू. बाबांची आज्ञा घेऊन मग येईन”. त्याप्रमाणे गोवा व देवस्थाने यांना भेट देऊन मी परत पुण्यास आलो व गोव्याला कार्य सुरू करावयाचे आहे हे विसरून गेलो.

त्या मध्यंतरी सहा महिने लोटले. चैत्र पाडवा झाला व त्याच दिवशी रात्री देवी मला बोलावते आहे असे स्वप्न पडले. स्वप्नात ‘एक सुवासिनी मला बोलावत आहे, भव्य मंदिर व एका बाजूला ब्राह्मण बसला आहे व तोंडाने ‘सप्तशती’ वाचत आहे’, हे दृष्य मी पाहिले. त्यावेळी पहाटे ३ वाजले होते. दुसऱ्या दिवशी प. पू, बाबांचे फोटोसमोर प्रार्थना केली की ‘आरंभापासून माझी उपासना ‘पुरूष’ ह्या माध्यमातून होत आहे. माझे वडील हे दत्ताची उपासना करीत होते व मी पण त्या पंथातून चालत आलो आहे. काल रात्री जे स्वप्न पाहिले त्यामध्ये ‘प्रकृती’ म्हणजे देवीचे दर्शन घडले व ती मला गोव्यास बोलावत आहे. ही कोण ?’ तेव्हा प. पू. बाबा म्हणाले, “मूर्खा ! तुझी ती आई. आईला विसरून कसे चालेल ?” त्याचबरोबर औदुंबरची आठवण झाली. रोज सायंकाळी नदीच्या पलीकडे जे देवीचे देऊळ होते त्या देवळात जाऊन मी जप करीत असे. तेव्हा स्वप्नात पाहिलेली देवी व ती देवी एकच आहे असे जाणवले. “त्यावेळी ज—ग म्हणजे काय ? याचा अर्थ तुला विचारला होता. ‘ज’ म्हणजे जननी व ‘ग’ म्हणजे गणपती, म्हणजेच ॐ. आता योग्य वेळी तुला बोलावले आहे तेव्हा तू आवश्य जा. पुढील साधना ह्यावर अवलंबून आहे”. त्याप्रमाणे मी गोव्यास गेलो. गोव्यात शेकडो देवळे आहेत, त्यापैकी प्रमुख देवता कोण ? , म्हणून मी विचारणा केली. त्यावेळी ‘श्रीशांतादुर्गा’ व ‘श्रीमंगेश’ ह्या प्रमुख देवता आहेत असे कळले. गोव्याला जाण्यापूर्वी ‘आपल्या इकडे ‘कौल’ लावण्याचा प्रकार आहे, त्याप्रमाणे ‘प्रसाद’ घेण्याची पध्दत आहे. गेल्यावर श्रीदेवीला जर आपले म्हणणे मान्य असेल तर प्रसाद होतो व जर मान्य नसेल तर होत नाही’, असे मला एका अनुभवी माणसाने सांगितले. आता आपल्याकडे जो कौल होतो तो प्रसाद गुरव सांगत असतो व त्याप्रमाणे देवाला प्रार्थना करतो. यामध्ये गुरवाचा भाग किती व देवाचा भाग किती ! अशी शंका माझ्या मनात आली. कारण देवाचा वारसा-हक्क ह्या पुजाऱ्याकडे किंवा गुरवाकडे हा चालत आलेला आहे. तेव्हा देवाचे सांगणे ही परंपरा चालत आली आहे व ती परंपरा मला नको होती, कारण तसे भक्त व देव मी बरेच पाहिले होते.

पूर्वी एकदा हा खेळ काही भक्तांसमवेत मी पुण्याला केला होता. जेव्हा नवरात्र बसते त्या दिवसात घरोघरी घागरी फुंकणाऱ्या बायका असतात. त्याशिवाय गावाची देवीची जत्रा असते. त्या दिवशी भक्ताच्या अंगात येते हे खरे आहे का खोटे आहे ह्याची परीक्षा मी घेतली होती, कारण अंगात येते ही एक प्रकारची भीती बहुसंख्य लोकांना असते, त्यामुळे ह्या भक्ताचे गोड कौतुक होत असते. देव राहीला बाजूला व ह्या भक्तांचे म्हणणे अंगात आलेली देवी  किंवा देव आहे असे समीकरण ठरले आहे, म्हणजे इष्ट प्रसाद झाला असे म्हणावयाचे का, हा प्रश्न आहे. याप्रमाणे दोन्ही देवळात गेलो. श्रीशांतादुर्गेच्या देवळात तिच्या पायाखाली एक तांब्याचा पत्रा आहे, त्यावर ‘श्रीयंत्र’ म्हणजे देवीची प्रतिमा मी पाहिली व दर्शनाचे वेळी मनोभावनेने तिला विनंती केली की मी जे कार्य तुझ्या कृपेने हाती घेतले आहे, ते योग्य असेल तर सांग. नाहीतर तुझे असंख्य भक्त तुझ्याकडे येऊन प्रसाद लावतात व प्रसाद झाला म्हणून समाधान मानून घरी जात असतात पण मला संमती पाहिजे आहे. कोणी लोक डोक्यावरचे फूल  पडले किंवा अन्य प्रकारे ही संमती समजतात. मला निश्चित खूण पाहिजे, कारण जे कार्य ते मी करणार  असे मी म्हणून चालणार नाही. त्या कार्यात तू सहभागी व्हावयास पाहिजेस, नाहीतर मी हे कार्य करणार नाही”. दर्शनाचे वेळी मी विडा, नारळ देवीपाशी ठेवला होता. त्यावेळी पुजाऱ्याने मला बोलावले की, ‘प्रसाद न्या’. तेव्हा मी म्हणालो की “माझे व देवीचे संभाषण काय झाले हे तुम्हाला माहित नाही. नुसती घाई करू नका. मला जो प्रसाद पाहिजे आहे तो देवीकडून, तुमच्याकडून नव्हे” व मी सभामंडपात बाजूला बसून राहिलो. अशाच प्रसाद म्हणून खारका मी औदुंबरला घेतल्या होत्या, पण त्यावेळी ज्ञान नव्हते. आज माझ्या समवेत जे आले होते त्यांची देवी शांतादुर्गा आहे हे मला ठाऊक होते. त्यांनाही मी का थांबलो आहे हे, कळेना. त्यांचे उपाध्येही बरोबर होते त्यांनीसुध्दा काय इच्छा आहे हे विचारले. ज्यावेळी देवळात गेलो, त्यावेळी देवीला अभिषेक चालू होता व नंतर महापूजा होणार होती. महापूजा झाल्यावर माझे अंगावर शहारे येऊ लागले. तशी अवस्था पूर्वी मला येत होती. त्यावेळी श्रीबहुचराईचा संचार मला होत होता. तशी अवस्था पुन्हा व्हावयास लागली म्हणून मी भिऊ लागलो व देवीचा निरोप घेऊन पणजीला आलो व ज्यांचेकडे जेवणास बोलावले होते त्यांच्याकडे गेलो. त्यांच्या पूजनात प. पू. बाबांचा फोटो व शांतादुर्गेचा फोटो होता. त्या दिवशी आरती झाली व मग जेवून हॉटेलवर गेलो व दुसऱ्या दिवशी निराश होऊन बाळेकुंद्रीस आलो. जे सांगणे देवीला केले होते ते श्रीपंतांना सांगितले. तेव्हा पंतांनी सांगितले की “तू जो प्रसाद मागितला आहेस तो प्रसाद आज देवी देणार नाही. कारण तो पारमार्थिक असून बहुसंख्य लोक तिच्याकडे येतात त्यावेळी ऐहिक मागतात, पण आपल्याला ऐहिक नको आहे, यासाठी थांब. देवीची कृपा आहेच. त्याशिवाय तू गोव्याला गेला नाहीस. ती शक्ती आहे. तिचा लाभ नंतर होईल, जेव्हा ह्या देवता गुरुशक्तिमध्ये विलीन होतील. सध्या ह्या ठिकाणी जे नामस्मरण करीत आहेत त्याचा अर्थ तरी ह्या लोकांना समजला आहे का ? कारण कोणतीही गोष्ट ज्ञानी होऊन केल्यास त्याचे फल आपल्याला मिळते, नाहीतर अज्ञानामुळे ‘भोपळा’ प्राप्त होणार. ह्या नामस्मरणाचा अर्थ मागाहून कळेल. तू गोव्याला कार्य सुरू कर. लहान असताना मुलाला म्हातारपण येणार नाही. जर लहानपणी मूल म्हातारे झाले तर ही नक्कल आहे असे समजावे”.

याप्रमाणे गोव्याला जाणे-येणे सुरू होते. पुण्यापासून ३०० मैलांवर गोवा आहे. एवढा प्रवास व प्रवासास साधन नाही अशी परिस्थिती होती. पहिल्यांदा मुंबईचे एक भक्त यांची गाडी घेऊन मी जात होतो. पण कुणाला चांगले बघवत नाही व देवदर्शना आड येणारे लोक या जगामध्ये  आहेत. त्यावेळी प. पू. हाजीमलंग बाबांचा उरूस ठरला होता व त्या उरसास शेकडो भक्त येणार होते पण आयत्या वेळी ह्या भक्ताच्या पुतण्याने मी नेत असलेली गाडी खोलून ठेवली व मला निरोप पाठविला की गाडी १५ दिवसात तयार होईल. मग काय करावे ? दोन दिवसांनी उरूस होता. त्यावेळी मी मुंबईला होतो व तेथील उरूस झाल्यावर गोव्याला जाणार होतो. मग विचार केला की आपल्याला गाडी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेला लोकांवर हे कार्य अवलंबून असून चालणार नाही. आपण प्लेनने गोव्याला जाऊ व मग गाडी घेण्याचा विचार करू. नाहीपेक्षा रेल्वेने जाऊ. त्याप्रमाणे गोव्यास गेलो व उरूस झाला. त्यावेळी प. पू. हाजीबाबा म्हणाले की, “बच्चा ! डरो मत। पुढील उरसास तुझ्या गाडीतून तू ये. हम कोई भिखारी नही है । ये मालूम होना चाहीये !”. त्याप्रमाणे गाडी घेतल्याशिवाय परत पुण्याला जावयाचे नाही असे मनाने ठरविले व गाडीच्या शोधात लागलो. ‘शब्द’ म्हणजे ब्रह्म आहे. एके वेळी ब्रह्म खोटे ठरेल, पण विभूतींचा शब्द खाली पडणार नाही याची साक्ष अनुभवास आली. त्यावेळी माझेपाशी शंभर रूपये नव्हते. अशावेळी गाडीची किंमत २५ हजार होती, पण जीवनाला आरंभ मी असा केला की, ‘सोने नसेल तर पितळ’ घालणारा मनुष्य मी नाही. हा माझा बाणा होता कारण तो ‘बाणा’ याला कारण देव आपल्या पाठीशी आहे !

या काळात गोवा ते दिल्ली आदि ठिकाणी कायार्थ जाऊन आलो. पुष्कळ अनुभव जमेस धरून गुरुलीला अगाध आहे हे कळून चुकले. पण गुरूंनी साधकाची परीक्षा घेतली तर ‘मी–मी’’ म्हणणारे साधक काही सबबी सांगून गुरूंच्यापासून बाजूला होतात. कारण गुरुमार्गामध्ये आल्यानंतर हा मार्ग गुरु होण्यासाठी नाही. ‘गुरू’ म्हटल्यावर आपल्यासमोर कोणी एक व्यक्ती आहे असे लोक म्हणतात, पण गुरू याचा अर्थ ‘ज्ञान’ असा आहे. हे ज्ञान सर्व चराचरामध्ये भरले आहे, त्यासाठी साधकाला दृष्टी लागते. त्याशिवाय सृष्टी काय आहे याचा बोध होत नाही. या ठिकाणी ‘दृष्टी’ म्हणजे ‘डोळे’ असा अर्थ नव्हे म्हणून प्रथमतः संतांनी असे म्हटले आहे की, ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यांनी  पाहीन  रूप तुझे’. आपण ‘घालीन लोटांगण’ म्हणतो. ही पहिली अवस्था असून त्याचा अर्थ साधकाला न समजता तो पुढे जातो. जो जन्म आपल्याला प्राप्त होतो त्या जन्माचे दान देऊन दास व्हावे लागते. त्यावेळी कर्मात सुख किंवा दु:ख आहे आदीचा लवलेश राहता कामा नये, म्हणजे जन्म घेतल्यावर त्या जन्माचे आपण मालक होतो. जोपर्यंत प्राप्त जन्माची मालकी, तोपर्यंत त्या जीवनाला दान देण्याचा अधिकार प्राप्त होत नाही व ते झाल्यावर मग ‘दास’ ही अवस्था प्राप्त होते. पहिल्या अवस्थेस केवळ एक जन्म नव्हे तर ‘जन्मोजन्मी’ प्राप्त होण्यास लागतात. जे फूल देवाला वाहायचे असते त्या फुलास पाय लागू नये, कोणी सुवास घेऊ नये आदी बंधने आहेत, त्या बंधनाला अनुसरून आपण आचरण केले तर वाहिलेले फूल याचे ‘निर्माल्य’ होते. म्हणून फूल म्हणजे जीवन, हे निर्माल्य व्हावे ह्यासाठी पहिल्या अवस्थेत गुरुमार्गात आचार, विचार, उच्चार, हा गुरुआज्ञेने केला पाहिजे. या मार्गात अट्टाहास चालणार नाही. ‘अट्टाहास’ हा एक प्रकारचा गर्व आहे. तो गर्व कर्मांगी असतो व त्या कर्माचा प्रसाद म्हणून मनुष्य जगाला मुकतो. यासाठी आपल्या मनात जरी असंख्य विचार आले तरी त्या विचारांना कार्यान्वित करता कामा नये. म्हणजे कर्माचे बरे वाईट परिणाम यापासून बचाव होतो, त्यासाठी दीक्षेचा लगाम पाहिजे, ‘लेझीम’ नको. ह्या अवस्थेत गुरु भक्तांचे रक्षण करीत असतात. अनेक लोकांना रक्षण याचा अर्थ अजूनही समजला नाही. रक्षण याचा अर्थ प्रत्येक क्षणी गुरुंची कृपा असणे. त्या कृपेने प्रत्येक क्षण जो ह्या जीवनात आहे व त्याच्या जोडीला कर्म आहे. यापासून ‘रक्ष रक्ष परमेश्वरा’ असे होत असते. अशा जीवनाला जो अभय देतो, तोच परमेश्वर पण आपण प्रत्येक क्षणी त्याला विसरतो, तरी तो आपले जीवन सांभाळतो. यासाठी आपले जीवन निर्दोष व्हावे म्हणून सर्व अवतारी पुरूष प्रयत्न करीत असतात. पण आपण उतराई होणे हेच कर्तव्य विसरून गेलो.

ह्यानंतर  दुसऱ्या अवस्थेत ‘वंदीन चरण’ आहे. पहिल्या अवस्थेत ‘दास’ झाल्यावर दृष्टीला काय दिसते ? ‘हे जग तुझे व माझे नाही. ह्या जगात जन्माला आलो कर्म भोगण्यासाठी, पण तुझी भेट झाली. तू व मी हे द्वैत संपले. ह्या जगात असताना वासनांचा खेळ चालू राहतो. पुढे खेळ संपतो. पण वासना शिल्लक राहते, त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म, यापेक्षा असे जीवन तुझ्या कृपेने प्राप्त होऊ दे की माझ्या जीवनात तुझा वास पाहिजे, म्हणजे लहान-मोठे जेव्हा मला वंदन करतील तर त्यांना मी न दिसता तू दिसला पाहिजेस. म्हणजे पर्यायाने तुझे चरण दिसले पाहिजेत आणि पुढील जन्मीही तुझे वंदन करण्यासाठी म्हणून आपल्या चरणापाशी सदैव तुझ्या सत्संगतीमध्ये ठेव, कारण मला जन्माला येते वेळी जी दृष्टी तू दिली आहेस, त्याचा वापर मी न केल्यामुळे मला तू दिसत नाहीस; एवढेच नव्हे तर माझा आत्मा तो तूच परमात्मा आहेस. एवढेसुध्दा ज्ञान मला नाही. ह्याचा तरी लाभ ह्या जन्मी होऊ दे, अशी माझी इच्छा आहे. निदान ‘तुझ्या चरणाला’ हे जीवन वाहीन. एवढीच प्रार्थना आहे’.

तिसर्या अवस्थेमध्ये ‘डोळ्याने पाहीन रूप तुझे” हा साधकाचा अहंकार आहे. ‘डोळे केवढे लहान व रूप किती पटींनी मोठे आहे’ ! तुझी माया विराट आहे, पण मी प्रेमाने म्हणत असतो की ‘डोळ्याने पाहीन’, पण रूप नव्हे, कारण तू अरूप आहेस. माझी दृष्टी संकुचित आहे. त्यातून ही दृष्टी फसवू शकते, कारण सोने व पितळ ह्यांचा रंग एकच पण गुणधर्म वेगळा. असा वेगळेपणा माझ्या वाटय़ाला देऊ नकोस. सत्य काय, असत्य काय ह्याचा अर्थ न समजल्यामुळे जीवनात अनर्थ झाला. वारंवार मी जन्माला येतो व तू जन्म देतोस, असे जन्म किती घेतले ह्याचा हिशेब नाही. तेव्हा असा एकच जन्म दे की ‘जन्मोजन्मी मी जन्म घेतला. त्याचे पारणे मला फेडू दे. एवढीच तळमळ लागून राहीली आहे. तू दाता आहेस. जे जे कोणी मागतात त्यांना तू देतोस, पण शेवटी हे सर्व तुझ्याशिवाय व्यर्थ आहे व यापेक्षा काही मागणेही व्यर्थ आहे. तुझ्या भजनात, तुझ्या आरतीत किंवा तुझ्या नामस्मरणात अमृतमय अवस्थेमध्ये मला राहू दे’.

ह्या तीन अवस्थेत आपले जीवन खर्च व्हावे अशी भूक लागली होती, त्यावेळी वरील प्रार्थना प. पू. पंतांना केल्यावर त्यांनी आशीर्वाद दिला की “तुझ्या वाणीने माझी पदे तू म्हणशील त्यावेळी आंधळा डोळस होईल, मुका बोलू लागेल व जो ‘भूक’ म्हणतो आहे तो भाक मागेल. ह्या तीन अवस्था म्हणजे काय हे, पुढे तुझा तूच बोलशील. सध्या मध्यरात्रीचा समय आहे. थोड्याच दिवसांनी उषःकाल तू पाहशील. तेव्हा तू जग पाहून ये. मग आपल्या भारत-भूमीत काय कमी आहे व काय जास्त नाही हे समजेल”.

थोड्याच दिवसात लंडनला बोलावणे आले. एक वर्ष विचार केला की आपला मार्ग व त्याची दिशा वेगळी आहे, कारण परधर्म व संस्कृती भिन्न. त्यांचा धर्म व संस्कृती समजून घ्यायची का आपला धर्म व संस्कृती इतरांना समजावयाची ? कारण जर का आपण समजतो तसे केले की, आपले तत्त्वज्ञान बदलेल व जग बदलेल हा संघर्ष चालू होता. शेवटी बाबा म्हणाले की, “तू जेव्हा नोकरी सोडलीस, तेव्हा तुझ्या भाऊबंदांनी काहूर माजविले होते की तू नोकरी सोडलीस किंवा धरलीस तरी ‘बुवाबाजी’ चालली आहे. तेव्हा तुझ्या माध्यमातून मी बोललो होतो की वेळ आल्यावर तुम्हाला दिसेल व कळेल की परदेशात जाऊन मी कार्य करीन. त्यावेळी फक्त नोकरी सोडली, पण कार्य म्हणजे काय हे नात्यातील लोकांना समजले नाही. तेव्हा तू विचार करीत बसू नको. लंडनला बोलावणे आले काय व न आले काय, तू लंडनला जाऊन ये. त्यासंबंधी बोलून काही उपयोग नाही”. हीं आज्ञा शिरसावंद्य मानून मी जाण्याची तयारी केली. जसे जसे दिवस जवळ येऊ लागले तसे ‘हे जग काय आहे’ हा विचार करू लागलो, कारण पहिली भाषा ! ते बोलतात ती, त्यांची मातृभाषा होती व माझे शिक्षण अवघे चार इयत्तांमध्ये झालेले ! काय इंग्लिश बोलणार व लिहिणार ? नाही म्हणण्यास ‘तर्खडकरांचे ग्रामर’ पाठ होते. त्यावर आपली मदार. भाषेचा उच्चार समजत नव्हता, त्यामुळे गेल्यावर ह्या इंग्लिश लोकांशी कसे बोलायचे, कसे वागायचे. कोणाची तरी शिकवणी ठेवली असती, पण आपला विषय जगापेक्षा वेगळा, कारण जोपर्यंत सुख असते त्यावेळी देव आठवत नाही व दया त्याहून आठवत नाही. आपला विषय ‘दैविक’. तो मार्ग म्हणजे काय ? कारण ह्या देशात, ह्या मार्गाचे धिंडवडे काढणारे साधक आहेत. फक्त पेहराव बदलला की ‘दैवी मार्ग’ सुरु होतो, असे पाश्चिमात्त्यांचे मत आहे, त्यामुळे हा मार्ग जरी खरा वाटला तरी त्यावर शंभर टक्के विश्वास ठेवणारे लोक किती ? त्या जगात जाऊन कार्य करावयाचे म्हटल्यावर दिव्य वाटू लागले. अशी माझी विचारधारणा झाली. शेवटी आज्ञेचे पालन करणे हेच आपले कर्तव्य समजून मी जाण्यास तयार झालो. जाण्याच्या दिवशी एअरपोर्ट (विमानतळ) वर शेकडो भक्त हजर होते. पण मी स्वतः गैरहजर होतो. त्या आधीच मी लंडनला पोहोचलो होतो. कारण माझ्या बरोबर मीच होतो. अनेक लोक परदेशात जातात, पण आपली स्वतःची किंमत विकली जाते. याचा अर्थ ‘परदेशगमन’ ! पण मला परदेशात ‘गमभन’ शिकवावयाचे होते. त्यासाठी ओळख पाहिजे. इकडे शेकडो लोकांना मी माहीत होतो, पण नव्याने आरंभ करावयाचा तो कसा ? काही चमत्कार करून का ? तत्त्वज्ञान म्हणून काही दैविक मार्गानी भूत भविष्य सांगावे, हेही जमत नव्हते व प. पू. बाबांना चमत्काराची बाजू मान्य नव्हती. ह्या अनेक विषयात माझे मन गर्क होते. एकूण प्रवास चौदा तासांचा होता, त्यावेळी विमानात बसून जेव्हा मुंबई सोडली म्हणजे जमिनीवरून न चालता आकाशामध्ये चालतो आहे असे वाटले, तेंव्हा ‘वाचलास तर नाव होईल व जमिनीवर आलास तर फजिती होईल, असे कानाशी कोणीतरी हासत आहे असे वाटू लागले. त्यावेळी हाजी बाबांचा शेर मला आठवला की, “याद है तो बाद है, भूल गये तो बरबाद है’ ! ह्या चौदा तासांत प. पू. विभूतींचे शब्द कानी आले की, ‘जीवन म्हणजे काय ? एवढाच विषय तू बोल व त्याची प्रचिती तू दाखवशील तर नावलौकिक होईल. नुसते ‘लंडनला जाऊन आलो’, असे म्हणून चालणार नाही’

एकंदर एक वर्ष मी लंडनला राहिलो. या काळात अनेक संस्थांना भेटी दिल्या. त्यांचे सार्वजनिक कार्य पाहिले — लांबून नव्हे तर प्रत्यक्ष ! ते कार्य कसे करतात व आपल्याकडे कार्य म्हणजे स्वतःचा स्वार्थ या व्यतिरिक्त अर्थ नाही असे मला वाटू लागले. एका आध्यात्मिक संस्थेपासून अनाथाश्रमापर्यंत सर्व कार्य हे लोक करतात. तेथील नागरिकांचा मुख्य धर्म असा की कोणालाही नावे ठेवणे हे गैर आहे व ते पाप असून आपल्याला जे कार्य करता येत नाही ते हे लोक-कल्याणार्थ कार्य म्हणून मदत करतात. त्यांना मदत करणे हा आपला जन्मसिध्द हक्क आहे. ‘केवढे कार्य म्हणून हे लोक इतरांना मदत करीत असतात. त्यामुळे आर्थिक मदतीची गरज भासत नाही’. त्यामुळे ह्या संस्था नि:संकोचपणे कार्य करू शकतात, याशिवाय प्रत्येक क्षेत्रात हे कार्य म्हणून करतात. उदा. :- नाताळ हा मुख्य सण सर्वांचा आहे. त्यावेळी हा वैयक्तिक सण म्हणून साजरा करीत नाहीत, तर इतरांना त्या सणाची मदत आर्थिक म्हणून होत असते. प्रत्येक ठिकाणी खरेदी चालू असते, अशावेळी जो आपण खर्च करीत असतो त्यावेळी खर्चाचा वाटा म्हणून काही रक्कम बाजूला काढून ठेवतात व शेवटी ती रक्कम संस्थेला देतात. आपल्याकडे मागितल्याशिवाय मदत मिळत नाही, कारण इतरांना मदत करणे ही संकोची भावना आपल्यामध्ये आहे, त्याशिवाय कोणाचेही उपकार ते ठेवणार नाहीत. माझ्या अनुभवात काही गोष्टी आल्या त्या नमूद करणे माझे इष्ट कर्तव्य आहे. म्हणून मी लिहीतो. जगात पुष्कळ ‘फुकटे’ आहेत, पण काय फुकट, विकत घ्यावयाचे याला मर्यादा आहे. ते केवळ इतरांचे पैसे पैशासाठी बुडवतील पण ‘देवाचे’ नाहीत. देवाला भजणारे पुष्कळ आहेत व देवाकडून घेणारेही पुष्कळ आहेत, पण देवाला देणारे मी या देशात पाहिले. यावरून देव ही कल्पना नसून देव आहेच हे या माणसांच्या प्रत्यक्ष कृतीवरून समजते. उदा. – एक मनुष्य मला भेटण्यासाठी स्कॉटलंडमधून लंडनमध्ये आला व आल्यावर आपल्या कौटुंबिक अडीअडचणीसंबंधी एक तासभर विचारणा करता झाला. माझे सांगणे ऐकून घेऊन गुरूदक्षिणा म्हणून १५ पौंड माझ्या टेबलावर न मागता ठेवले. वास्तविक मला ही अपेक्षा नव्हती. त्याने असा प्रश्न विचारला की “इकडे आल्यावर तुझे जीवन कशाप्रकारे चालले आहे ? लंडन हे शहर अधिक महाग असून ज्या जागी तुझे वास्तव्य आहे तो भाग धनिक लोकांचा आहे. एवढा रोजचा खर्च कोण करतो ?” इत्यादी चौकशी माझ्याबद्दल त्याने केली. त्यावेळी मी असे सांगितले की, “पैसे मिळविण्यासाठी या देशात मी आलेलो नाही, तर जेणे करून ज्ञान प्राप्त होईल व इतर देशांमध्ये स्नेहसंबंध वाढतील या हेतूने व मानवी जीवनाची मूलभूत तत्त्वे यांची शिकवण शिकण्यासाठी मी आलेलो आहे”. हे ऐकून त्याला धन्यता वाटली, एवढेच नव्हे तर डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला की “इतक्या लांब आपला देश, आपला धर्म यांचा योग्य प्रचार करण्याचे कार्य, तुझ्यासारखे  लोक करीत आहेत याचे नवल वाटते. तू जे काही निराकरण सांगितले आहेस त्याप्रमाणे मी आचरणात आणून माझे काम निवारण झाले की मी तुला भेटावयास येईन किंवा टेलिफोन करीन.”. वास्तविक लंडनपासून एडिंबरो खूप दूर आहे, पण हा मनुष्य निश्चिंत मनाने मला भेटावयास आला व आपली अडचण याला भेटल्यावर निवारण होईल एवढा आत्मविश्वास घेऊन तो गेला. दोन आठवड्यानंतर दुपारी माझ्या नावाने टेलिफोन आला. “मी अमुक ठिकाणाहून, अमुक व्यक्ती बोलतो आहे. माझे काम घरासंबंधी होते, त्यावेळी तू सांगितले होतेस की जे घर तुला घ्यावयाचे ते मला विचारल्याशिवाय घेऊ नकोस. तर आता त्याप्रमाणे तीन घरे मी व माझ्या बायकोने पाहिली आहेत. तेव्हा या तिन्हीपैकी तू सांगशील ते घर मी विकत घेणार आहे”. यावरून हे दिसले की परदेशात श्रध्दा असते, पण दृढ श्रध्दा ही या देशात मला अनुभविण्यास आली, कारण मी सांगेन ते घर ह्या व्यक्तिला विकत घ्यावयाचे आहे म्हटल्यावर विचार करणे हा माझा धर्म आहे. त्याप्रमाणे मी अमुक एक नंबर सांगितला व ते घर पुढील आठवड्यात त्याने घेतले व कागदोपत्री रजिस्ट्रेशन झाले. त्याप्रमाणे मला फोनवर ही आनंदाची बातमी त्याने सांगितली व मी पण आशीर्वाद दिला. वास्तविक टेलिफोनवर संभाषण माझे व त्याचे झाले व हा विषय इथे संपला होता. पण दुसरे दिवशी सकाळी माझ्या नावे एक रजिस्टर पत्र आले. त्या पत्रात १०१ पौंड म्हणजे आपल्याकडील रू. २०००/= चा चेक त्याने पत्रासोबत पाठविला होता व पत्राबरोबर अभिनंदन व दिलेल्या आशीर्वादाबद्दल मनःपूर्वक आभार त्याने मानलेले होते. वास्तविक जेव्हा प्रश्न विचारण्यासाठी तो आला होता तेव्हा जी रक्कम गुरुदक्षिणा म्हणून दिलेली होती तीच अधिक होती, त्यामुळे जे काम झाले त्याचा मोबदला पुन्हा मिळावा अशी अपेक्षा माझी नव्हती, परंतु इतक्या लांबून आवर्जून आपल्याला काय मदत केली आहे याचे मूल्य ओळखून त्याने ही रक्क म मला पाठविली होती.

लंडनला जाण्यापूर्वी भारतामध्ये कार्य २० वर्षे मी करीत आलो आहे, परंतु आपल्या अडचणी निवारण झाल्या आहेत म्हणून सांगण्यासाठी किंवा कबूल करण्यासाठीसुध्दा इकडे लोक येत नाहीत. काही सण, गुरूपौर्णिमा व उरूस आदी महत्त्वाचे दिवस इकडे साजरे आपण करीत असतो. पण ह्या दिवसांबद्दल आगाऊ निवेदन काढूनसुध्दा त्या दिवशी न येणारे अनेक लोक आढळतात कारण ह्या दिवशी न जाणो आपल्या हातून काही गुरुदक्षिणा याचा लाभ होईल ! हे पाप चुकूनही घडू नये म्हणून हे लोक दक्षता बाळगत असतात. असा अनुभव स्वदेशांत,  पण परदेशात असा आला ! यामागे लिहीण्याचा उद्देश असा आहे की केवळ पैसा मिळविणे हे कार्य नसून ह्या कार्यात ज्यांचा समावेश होतो त्या व्यक्तींनी कार्याबद्दल किती जागरूक राहावे हे अनुभवास आले. वास्तविक कार्य हे कुठल्याही एका व्यक्तीसाठी नसून ते जगासाठी आहे म्हणल्यानंतर आपण जसे अडचणीत आहोत तसे अ़डचण निवारण झाल्यावर त्याचा लाभ इतर दु:खितांना कसा मिळेल याचा विचार हे लोक करीत असतात.

वरील काही अनुभव माहिती होण्यासाठी लिहिले आहेत, त्याशिवाय तेथील एक अशी संस्था आहे ज्याचा अभ्यास ‘परलोक’ आहे असे ते म्हणतात. परलोक म्हणजे मेल्यानंतर त्या जिवाचे काय होते व त्या जिवाचे काही कार्य मेल्यानंतरर आहे किंवा नाही याचे संशोधन तेथे चालू आहे, यासाठी इहलोकांशी ते आत्मे हितसंबंधित आहेत किंवा नाहीत हे पाहण्यासाठी तेथील मध्यस्थ ह्या लोकांशी संबंध जोडतात. तो जोडला जातो किंवा नाही व आत्मे हे सात लोकांतून येतात किंवा नाही याचे संशोधन चालू आहे. पण असे आत्मे जरी इहलोकात येण्यासाठी सदैव उत्सुक असतात, तरी ह्यावेळी जो आत्मा आला आहे त्याचे परलोकातील निश्चित स्थळ आपल्याला समजले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा हे आत्मे काहीही सांगून ‘मी अमुक आहे’ असे भासवितात व त्यांची निश्चित दिशा समजत नाही, म्हणून आपण त्या आत्म्याला ‘विभूती’ असे म्हणतो. ‘विभूती’ हा शब्द उच्चार करताना सोपा आहे, पण ही अवस्था म्हणजे स्व-इच्छेने ते इहलोकात येण्यासाठी उत्सुक नसतात. एखादा मध्यस्थ ज्याला काही जगाचे कल्याण व्हावे अशी त्याची इच्छा असली तरी हे त्याने ठरवून चालत नाही. ज्यांना विभूती म्हणतात त्यांना हे सत्य पटले पाहिजे की ह्या मध्यस्थाकरवी लोक-कल्याणाचे कार्य हा विषय काया, वाचा, मनाने होत आहे. तसे असेल तर ह्या विभूती इहलोकात येतात. कारण विभूती हा आत्माच आहे, पण त्याचे स्थान स्वर्ग लोकात आहे. कारण त्यासाठी इहलोक व परलोकात इच्छा, वासना शिल्लक राहता कामा नये. ‘विभूती’ हा शब्द आपण सहज उच्चारत असतो, पण ह्यांचे स्थान पाचव्या लोकांपासून सातव्या लोकांपर्यंत आहे. मध्यस्थाचे माध्यम योग्य आहे किंवा नाही हे ते पडताळून पाहतात.

जगात पुष्कळांना संचार होतो. तो खरा किंवा खोटा हा वाद आहे. फक्त अंगात येणे म्हणजे संचार असे लोक म्हणतात. पण संचार येण्यासाठी मध्यस्थाचा ‘आचार’ देवाप्रमाणे व्हावयास पाहिजे. ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य आपण दाखवतो तेवढीसुध्दा इच्छा आपल्यापाशी शिल्लक राहता कामा नये, त्यामुळे ‘संचार’ म्हणून जे कोणी आपल्या भक्तांना उघडे नागडे करतात, तो संचार नसून ‘हिंसाचार’ आहे हे निश्चित समजावे. असा संचाराचा एक दाखला वर सांगितला, त्याशिवाय परकाया प्रवेश म्हणून एक साधना आहे. ही साधना काय आहे याचे बऱ्याच लोकांना ‘ज्ञान’ होत नाही. परकाया प्रवेश म्हणजे ‘कर्ण-पिशाच्च’ असे अनेक लोक संबोधतात. परकाया प्रवेश याचा अर्थ पहिल्या लोकांपासून सातव्या लोकांपर्यंत व त्याशिवाय जे आत्मे पृथ्वीच्या जवळ आहेत अशा आत्म्यांचा संपर्क साधणे. ह्यामध्ये पहिली अवस्था ‘जीव’ व मग जशी जशी आपली प्रगती होईल तसा ‘जीवात्मा’, ‘आत्मा’ व ‘परमात्मा’ ह्या अवस्थांचा लाभ होतो. म्हणजे परकाया प्रवेशात तीन अवस्था असतात; तेव्हा ह्याची जाणीव व्हावयास पाहिजे की या माध्यमात ‘जीवा’चा प्रवेश झाला आहे किंवा ‘परमात्मा’ याचा प्रवेश झाला आहे. बहुतेक लोक पहिल्या अवस्थेला बळी पडतात. पहिल्या अवस्थेतील जीव व आत्मा यांनाही त्रिकाल भाकीत सांगता येते, तेव्हा लोकांचा विश्वास ह्या अवस्थेवर बसतो व त्या अवस्थेलाच आपण ‘विभूती’ म्हणतो.

‘परकाया प्रवेश’ व ‘संचार’ ह्या अवस्था भिन्न आहेत. परकाया प्रवेशामध्ये जो आत्मा इहजगतात येतो तो निश्चित काही एका कार्यार्थ प्रवृत्त झालेला असतो. त्याच्या इच्छा, वासना तृप्त झालेल्या नाहीत म्हणून तो येत नाही. गतजन्मात काही कार्य शिल्लक राहीले असेल तर तो इहजगतात येतो. अशावेळी त्याला परलोकात कुठली अवस्था प्राप्त झाली आहे हे समजले पाहिजे. त्याच्या स्व-इच्छेने त्याला येता येत नसून त्याला मध्यस्थ म्हणजे ‘मिडीयम’ मिळावयास पाहिजे तर आपले इष्ट कार्य तो आत्मा करू शकतो. दिवंगत झाल्यावर परलोकात जे स्थान आपल्याला प्राप्त होते हे स्थान आपल्याला जीवन असतेवेळी असलेला आपला आचार-विचार व आहार यावर अवलंबून आहे. केवळ देवाच्या मागे लागलो म्हणजे तो आपल्याला मुक्त करतो हे खोटे आहे. देवाची मदत आपल्याला लागते. कारण परलोकात एकंदर सात लोक आहेत. त्यांची प्राप्ती देव करून देणार नाही तर त्यासाठी नित्य आचार, विचार व ज्या धर्मात आपण जन्माला आलो त्यापरत्वे आपला आहार यावर अवलंबून आहे, पण समजा आहार योग्य नसला तरी चालेल. कारण आहाराचा संबंध अन्नमय कोशाशी येतो, पण बाकीचे चार कोश यांचा संबंध मरणोत्तर जीवनाशी आहे, यासाठी जन्माला आल्यावर मरेतोपर्यंत ‘खा-खा’ करू नये. जे आपण खातो त्यामध्ये वासना तीव्र असते. ती हळू हळू वयोमानाप्रमाणे कमी करून एवढी कमी करावी की आपण जगण्यापुरते अन्न खावे व त्या खाण्यात वासना तिळमात्र असता कामा नये. त्या ऐवजी ‘वास’ असला पाहिजे म्हणजे खाद्यपदार्थाचा नव्हे ! वास याचा अर्थ आपण जे जे अनुभवले त्याचे समाधान होय. ते जर प्राप्त झाले तर पुढची अवस्था प्राप्त होते, नाहीतर आत्मा हा ‘श्राध्द’ करण्यासाठी मागे उभा असतो.

जेव्हा लंडनला जाण्याचे ठरवत होतो तेव्हा असा विचार आला होता की आपण तिकडे गेल्यानंतर काय करावयाचे ? तेथे करमणूक म्हणून १००% जीवनाचा अपव्यय होतो, पण अभ्यास करावयाचे म्हटले तर आयुष्य पुरणार नाही असे हे शहर आहे. जगतात पुष्कळ मोठी शहरे आहेत. मुंबई, कलकत्ता, टोकियो, न्युयॉर्क इत्यादी पण त्या शहरांना ‘आपले’ म्हणता येत नाही कारण युगायुगांप्रमाणे आपल्यामध्ये अदलबदल झाला. सांगण्यासारखी संस्कृती कोणापाशीही नाही हे डोळे उघडे ठेवले तर कळून येईल. आज हिंदुस्थानात पुष्कळ शहरे आहेत. पण तेथे राहणाऱ्या समाजाची संस्कृती काय आहे, हा प्रश्न पडतो. अर्धा भारतीय, अर्धा परदेशी असा आचार–विचार म्हटल्यानंतर काय संस्कृती म्हणून सांगावयाची ? असे आज आपण अनुकरण केले आहे व ह्या जीवनाला ‘आधुनिक जीवनाबद्दलचा स्वाभिमान’ असे म्हणतात. पुष्कळसे भारतीय भारताच्या बाहेर जातात व गेल्यावर आपण भारतीय आहोत असे म्हणण्यास त्यांना कमीपणा वाटतो.

एका प्रसंगाची ओळख मुद्दाम लिहीतो आहे. कारण आपल्या नित्य जीवनामध्ये जे आपण वागतो तसे वागू लागलो तर त्या जीवनाला ‘मागासलेले लोक’ असे आपलेच बांधव म्हणतात. इंग्लंडला गेल्यावर सहा महीन्यांनी मला भारतीय हाय-कमिशनरनी जेवावयास बोलाविले. माझ्या बरोबर आणखी काही भारतीय व्यक्ती होत्या. ज्या ठिकाणी मी राहात होतो ते घर एका भारतीय माणसाचे होते, त्यालाही जेवणाचे आमंत्रण होते. त्या गृहस्थाने मला असे विचारले की “आपण हाय-कमिशनरांकडे जेवायला जात आहोत, तेव्हा तुम्हाला पाश्चिमात्त्य पध्दतीने जेवण्यास जमेल काय ?”. मी म्हणालो “जेवायला गेल्यावर पाहू”. त्या दिवशी पाच भारतीय व आठ इंग्लिश अशा सर्वांना आमंत्रण होते. आम्ही सर्व गेलो. जेवण भारतीय पध्दतीचे होते. कारण मी शाकाहारी आहे म्हटल्यावर ज्यांनी जेवावयास बोलाविले होते, त्यांनी हॉटेलमध्ये शाकाहारी जेवणाची ऑर्डर दिली होती. वास्तविक हा विषय खाजगी आहे पण ‘आत्मनिवेदन’ लिहायचे  म्हटल्यावर सर्व वृत्तांत लिहिले भाग आहे, कारण प. पू. बाबांनी परदेशात पाठविले होते ते मजा करण्यासाठी नसून आपले लोक परदेशात गेल्यावर आपला देव, धर्म, न्याय-नीती ह्याला कशी मूठमाती देतात हे शिकण्यासाठी होते. असो.

पुढे जेवणासाठी टेबलावर बसल्यावर ज्यांनी जेवणास बोलाविले होते त्यांनी अपरोक्ष असा प्रश्न विचारला की “आपण काय घेणार ?”. सहा महिन्यांत या प्रश्नाला मी वाकब झालो  होतो ! तेव्हा मी म्हणालो “आपण सर्वजण आपल्याला पाहिजे ते घ्या. मला मात्र ऍपल ज्यूस द्या”. हे ऐकल्यावर जे भारतीय होते, त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला. एकतर जेवण शाकाहारी व दुसरे काहीजण असे की ‘फ्रूटज्युस’ म्हटल्यावर त्यांचा चेहरा, होता का नव्हता, असा झाला. कारण मद्य व मांसाहारी जेवण म्हटल्यावर भूक नसेल तो मनुष्य जेवावयाला बसतो, पण माझ्यासारख्या ‘सोवळ्या’ला पाहुणा म्हणून जेवायला बोलावणे हे पाप आहे. ज्या देशामध्ये आपण राहतो, तेथील रहिवासी कसे वागतात हे तरी आपण शिकावे. ते राहिले बाजूला, ज्यांनी जेवणासाठी बोलवले होते त्यांना निश्चित हे समजले की मी लंडनला येऊनसुध्दा भारतीय आहे. त्यांनी बाकीच्या मंडळींना विचारले की ‘तुम्हा काय घेणार’ ? ‘पंगत कां संगत’ असा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्यापैकी जे खरे इंग्लिश होते त्यांनी सांगितले की “जे ड्रिंक भागवत घेतील ते आम्ही घेऊ”. बाकीचे, ज्यांनी इंग्लिश माणसाचा पेहरावा केला होता त्यांनी सांगितले की “आम्ही व्हिस्की घेणार आहोत”. त्याप्रमाणे ऑर्डर देण्यात आली. फुकटचे मिळाल्यावर पिण्यात व खाण्यात काही बंधने असतात, ह्याचा त्यांना विसर पडला. कारण व्हिस्कीचा धर्म असा आहे, आपण कोण आहोत ह्याचा विसर पडणे. याचा अर्थ व्हिस्की व तीच जास्त झाली की रिस्की. जे जेवण मागविले होते ते ‘थ्री-कोर्स’ होते व वेटर ते आणून देत होते. पण आपल्याला जेवणासाठी कोणी बोलावले आहे, ह्या जेवण्यासाठी कोणाला निमंत्रित केले आहे व ज्यांना निमंत्रित केले आहे ती व्यक्ती भारतातून इतक्या दूर ज्या उद्देशाने आली आहे, तो विषय ग्रहण करावा ह्या सर्वाचा या लोकांना विसर पडला, त्यामुळे आपण इंग्लंडमध्ये नसून भारतातच आहोत याची साक्ष पटली. हे भारतीय ५००० मैलांवरील इंग्लंडमध्ये नसून  मुंबईत असल्याप्रमाणेच वागताना पाहून त्यांची कीव आली. अशा प्रकारची आपली कीर्ती आज परदेशात असून सामाजिक दृष्ट्या इतके खाली आपण गेलो आहोत.

वास्तविक आपण जन्माला येऊन ‘भारतीय’ आहोत हे आपल्याला भूषण आहे. आपला हा देश, यामध्ये काय कमी आहे ? निसर्गाची देणगी आपल्याला मिळाली असूनही त्याकडे डोळे झाकून आपण जीवन जगत असतो. इंग्रजांनी १०० वर्षे आपल्यावर राज्य केले, पण आपला आचार विचार त्यांनी घेतला नाही. आपण मात्र त्यांच्याप्रमाणे वागणे म्हणजे ‘संस्कृती’ या नावाखाली आज बाटलेले आहोत, त्यामुळे ‘धोबी का कुत्ता, ना घरका  ना घाटका’ अशी आपली अवस्था झालेली आहे.

आपले घर, याला ‘वास्तू’ म्हणतात. धर्मशाळेला वास्तू म्हणत नाहीत. घराच्या चार भिंती आपले जीवन घडवितात. आपले जीवन हा आपला धर्म आहे. त्या धर्माप्रमाणे वागणे ही शिकवण त्या वास्तूने मिळते, त्यासाठी वास्तूची शुध्दता जेवढी आपण टिकवू तेवढे आपले आचार व विचार पोषक राहून आपल्याला व आपल्या कुटुंबीयांना सुख, शांती, समाधान मिळत असते. हे जीवन आपल्याला रोजचे आहे, म्हणून त्याची किंमत वाटत नाही.

परदेशात वास्तूची प्रतिष्ठा नसते, त्यामुळे प्रत्येकजण कशा पध्दतीने वागतो हे तिकडे पाहून आल्याशिवाय समजणार नाही. बाप-मुलगा, नवरा-बायको, ही नाती रक्ताची असावयास पाहिजेत. ती नाती आज तेथे भाडोत्री झाली आहेत व त्याचा ‘प्रतिसाद’ आपल्याकडेही जवळ जवळ झाला आहे. याचे कारण ‘प्रेम’ ही भावना नाही. इतरांवर प्रेम करण्यासाठी व   दुसऱ्याने आपल्यावर करण्यासाठी दोघांनाही पोषक असा आचार व विचार व्हावयास पाहिजे, यासाठी आपल्या धर्मामध्ये आचार व विचार याला महत्त्व देवापेक्षा जास्त होते. आज मात्र प्रत्येकजण आपापल्या इच्छेप्रमाणे वागू लागला आहे. आज जी जागतिक अशांतता आहे तिचे मूळ कारण आपल्यामध्ये आहे.

वरील घटनेनंतर सबंध वर्षांत मी जेवावयास कोणाकडेही गेलो नाही. नाही म्हणायला एका जर्मन फॅमिलीकडे दर बुधवारी मी जात होतो. ती बाई मला प्रथम भेटावयास त्यांच्या भारतीय मित्राच्या सांगण्यावरून आली. त्या दिल्लीतील भक्ताने तिला लिहिले होते की “माझे गुरु तिकडे आले आहेत, तेव्हा तू त्यांचा फायदा करून घे”. त्यांनी पत्रात लिहिले होते की “माझा व माझ्या गुरुंचा परिचय आज दहा वर्षे आहे. हिंदुस्थानातून पुष्कळ लोक तिकडे येतात व अध्यात्म म्हणजे काय ह्या विषयावर बोलतात पण त्यातले खरे किती व पैसे मिळविण्यासाठी गेलेले किती, हा प्रश्न आहे, कारण ‘अध्यात्म’ हा आज पैसे मिळविण्याचा धंदा झालेला आहे. परंतु माझे गुरु तसे नसून अत्यंत सोप्या पध्दतीने हा विषय व हा मार्ग याचे विवेचन करून ते नित्य साधना सूचित करतात व ही साधना आपण नियमाने करावयाची असते, तेव्हा तू त्यांना भेट व नवऱ्याची ओळख करून दे. म्हणजे आज मला जी शांती प्राप्त झाली आहे तशी तुला प्राप्त होईल, ही व्यक्ती लंडनला आहे व पत्ता असा …… आहे”. अशा आशयाचे पत्र तिला भारतातून आले व मलाही त्यांनी तसे कळवले.

परंतु पत्र येऊन भेट होण्यास १५ दिवस गेले, कारण ते दोघे ज्या ठिकाणी राहात होते तो भाग लंडनमधील ‘सुस्वागतम्’ म्हणता येईल असा होता, त्यामुळे तिला संकोच निर्माण झाला की जो पाहुणा आपण आपल्याकडे बोलावणार आहोत त्याचा आचार-विचार कसा असेल ? अशा संभ्रमात एक आठवडा गेला. शेवटी तिने निर्णय घेतला की आपण जाऊन येऊ, कारण तोपर्यंत भारतातून दुसरे पत्र आले होते की ‘माझ्या गुरुंची भेट घेतलीस का’ ? त्यामुळे आता तिला भेटणे भाग होते. त्याप्रमाणे तिने फोन केला व मी तिला बोललो की, “तू मला भेटण्यास संध्याकाळी ६ वाजता ये”. त्याप्रमाणे ती आली व माझ्या खोलीच्या दारावर तिने टॅप केले. मी तिला होकार दिला व तिच्या स्वागतासाठी दरवाज्याजवळ गेलो. दार उघडल्यावर ती म्हणाली की “मला डी. बी. भागवत यांना  भेटावयाचे आहे. तेव्हा मी म्हणालो की, “तुला ज्या व्यक्तीला भेटावयाचे आहे ती तुझ्यासमोर उभी आहे”. हे ऐकून तिला एवढा आनंद झाला की तिला संकोच आवरला नाही. त्या क्षणी तिने मला मिठी मारली व मी व ती एकमेकांकडे बघत राहिलो. मग मी म्हणालो की ‘आपण बसूया’. तेव्हा ती म्हणाली, “डियर दादा, आपण सर्व काही घरी बोलू…. . जर तुला काही भेटी आज नसल्या तर आपण माझ्या गाडीतून घरी जाऊ”. लंडनमध्ये असंख्य गाड्या आहेत, पण माझ्या वाटय़ाला एकही आली नव्हती. तिची गाडी पहिल्यांदाच बसावयास मिळाली, माझा पेहराव तिला इतका आवडला की तिने दहा वेळा त्याचे वर्णन केले. आम्ही जात असतां तिने मला विचारले की, “लंडनमध्ये किती ठिकाणी हिंडलास व काय काय पाहिलेस ?” मी तिला सांगितले की, “मला लंडन पाहण्यापेक्षा खूप बोलायचे आहे व त्यासाठी मी लंडनला आलो आहे”. हे ऐकून तिला आश्चर्याचा धक्का बसला, कारण हजारो प्रवासी लंडन पाहण्यासाठी येतात व मग तिखटमीठ लावून लंडनचे वर्णन करतात, पण मीच तिला असा परदेशीय भेटलो की ज्याला लंडन पाहावयाचे नव्हते ! तेवढय़ात तिचे घर आले. जाताना गाडी चालत होती त्यापेक्षा माझे डोके याची गती अधिक होती. याला कारण भारतात शेकडो लोकांना मी भेटत होतो, पण आजची भेट वेगळी होती. देवालासुध्दा मी भ्यालो नाही, पण आज होणारी ही जर्मन दांपत्यांची भेट वेगळी होती.

गाडीतून उतरून लिफ्टने आम्ही ५ व्या मजल्यावर गेलो व घरात प्रवेश करण्यापूर्वी कोणाशी आपली भेट होणार आहे ही आतुरता मनात होती. लागलीच तिने अशी काही हाक मारली की किती जन्माच्या आपल्या भेटी झाल्या आहेत असे वाटू लागले. तिचा नवरा जवळ येऊन उभा राहीला व म्हणाला की, ‘माझे नाव मायकेल’ व तुझे नाव माझ्या बायकोने आत्ता ओरडून सांगितले आहे की, ‘माय डियर दादा ! ’ तिने हा उच्चार केला, त्यात सर्व काही आले. मनुष्याने जन्माला येऊन हेच मिळवावयाचे आहे की परदेशातसुध्दा आपली किंमत कळली पाहिजे. आपल्याकडे भक्तांचे वागण्याचे दोन प्रकार असतात, हे तेव्हा कळले. तोंडापुरते “दादा’, पण चिंतनात सुखाचा पाढा व त्या सुखाची प्राप्ती बाबा व दादा केव्हा करून देतील तेव्हा खरे. असा अनुभव मला नवीन नव्हता. पण एवढय़ा प्रेमाने हाक मारण्याचेसुध्दा धारिष्ट्य पाहिजे. परदेशामध्ये स्वतःच्या नवऱ्यासमोर दुसऱ्या व्यक्तीला ‘माय डियर’ असे संबोधणे एवढे सोपे नाही. यावरून आपले मन व त्याची प्रगती किती झाली आहे याचे अनुमान कळते.

शेवटी आम्ही तिघांनी एकमेकांना सांगितले की, आपली ही भेट देवाने घडविली आहे. तेव्हा ह्या भेटीत संकोच नको. दोघे मला म्हणाले की ‘तू मनमोकळेपणाने येथे राहीलास तर आम्ही आमचे भाग्य समजू’. त्या दिवशी रात्री २ वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. त्यानंतर जेवणाचा विषय निघाला. तिने जेवण तयार केले होते. ‘मी मांसाहारी नाही फक्त शाकाहारी जेवतो’ असे सांगितल्यावर ते दोघे हसू लागले, कारण शाकाहार म्हणजे भरपूर पालेभाजी व त्यात मटण किंवा मासे असा त्यांचा समज होता ! मागाहून त्यांना कळले की ‘शाकाहारी जेवण’ म्हणजे काय व मग ह्या दोघांनी माझी माफी मागितली व म्हणाले “पुढच्या वेळी आपण सर्वजण शाकाहारी जेऊ व तू येथे आहेस तोपर्यंत दर बुधवारी येथे ये व तुला जे काही सांगावयाचे आहे ते मनमोकळेपणाने बोल”. मागाहून मला हे समजले की ती दोघे पदवीधर आहेत. मायकेलचा विषय राजकारण  व बायकोचा विषय तत्त्वज्ञान हा होता. त्यामुळे वर्ष केव्हा संपले हे मला कळले नाही.

सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी व रविवारी मी बाहेर जाऊन येत असे, त्यामुळे लंडनमध्ये काय पाहण्यासारखे आहे हे् कळले. मुख्यत्वे बागा व म्युझियम्स् पाहण्यासारखी आहेत, तसेच जुन्या काळातील पेंटिंग्जही पाहण्यासारखी होती. मूळ स्वभाव माझा चित्रकला शिकण्याचा होता. घरच्या परिस्थितीमुळे मला शिकता आले नाही. पण मग शिकलो ह्या जगापासून. कारण जग ही रंगभूमी आहे. ह्या भूमीत नानाविध रंग आहेत,  पण भूमी मात्र एकच आहे. त्याचा पत्ता ह्या रंगीन लोकांना लागत नाही. म्हणून हे जग दु:खी आहे असे आपण मानतो.

मूळ रंग तीन असून त्यापासून सात रंग तयार होतात. हे रंग सहसा आपल्याला दिसत नाहीत. पण ह्या तीन रंगांतच विश्वाचे कार्य चालू आहे. सकाळी, प्रातःकाळी जो रंग  क्षितिजावर आपल्याला दिसतो तोच रंग १२ तासांनी पुन्हा दिसतो. ह्या रंगालाच उदय व अस्त असे म्हणतात. जो रंग ‘उदय’ म्हणजे ‘असतो’ ह्याचा अर्थ ‘स्थिती’ वा ‘अस्त’ म्हणजे ‘सायंकाळ’ त्याचा अर्थ ‘उत्पत्ती’ होय. जन्माला आल्यावर उत्पत्ती + स्थिती = लय म्हणजे ‘जीवन’. असा अर्थ ह्या दांपत्याला सांगितला. विश्वाची निर्मिती व कार्य व जन्माला आल्यावर आपले कार्य काय एवढा विषय ह्यांच्यासमोर मांडला. मायकेल व सिल्व्हा अभ्यासू होते. जेव्हा मी त्यांचे घरी गेलो तेव्हा एक कपाट नानाविध विषयांबद्दलच्या पुस्तकांनी भरलेले पाहिले, त्यात ‘पॉल ब्रॅण्टन’ची वेदाबद्दलची पुस्तके व चिन्मयानंद यांनी लिहिलेली पुस्तके मी पाहिली, तेव्हा त्यापेक्षा काही वेगळेपणा आपल्यात दिसला पाहिजे. तेच तेच बोलू लागलो तर तेच तत्त्व आहे असे लोक समजतील, यापेक्षा जगाला काही नवीन शिकवावे असे ठरवून घरी आलो.

दुसऱ्या दिवशी गुरुवार होता. सकाळी पूजा झाल्यावर प. पू. बाबांना म्हणालो की, ‘येथील जग  निराळे आहे. मला आपण परत बोलवा, इकडील आचार, विचार व भाषा ही आपल्याला अवगत होणारी नाहीत. लंडनचा देखावा मला समजला’. ‘झाकली मूठ’ म्हणून आपण परत जावे’ असे विचार करत प. पू. बाबांसमोर बसून अक्षरशः रडलो. ह्यामध्ये सकाळचे १० वाजून गेले होते. शेवटी नाश्ता करून मी बाहेर पडलो व असे मनाशी ठरविले की खूप दूर जाऊन बाबा काय म्हणतात याचा विचार करू. तेवढ्यात बाहेरच्या रस्त्यावर सिल्व्हा मला भेटली व म्हणाली की ‘मायकेल काही कामानिमित्त पॅरिसला गेला आहे व सांयकाळी येणार आहे’ मधल्या वेळात तू दादांना जाऊन भेट. त्यांची निश्चित गाठ पडेल’, असे त्याने सांगितले. ती आल्यामुळे मला माझा प्रोग्राम बदलावा लागला व मी व सिल्व्हा एका बागेत गेलो. ती बाग भव्य होती व सर्वत्र हिरवेगार होते. जातानाच जेवणापायी  वेळ जाऊ नये म्हणून तिने जेवण बरोबर घेतले होते. शेवटी तिनेच कालचा विषय काढला. मी म्हणलो, “सिल्व्हा, तुझ्या घरी तत्त्वज्ञानावरची असंख्य पुस्तके आहेत. तेव्हा तूच एखादा विषय काढ, मग मी बोलेन”. तेव्हा ती म्हणाली “आजपर्यंत शेकडो पुस्तके वाचून डोक्याचा खेळखंडोबा झाला, तेव्हा तू काहीतरी बोलून माझे समाधान होईल असे सांग. हॉटेलमध्ये गेल्यावर जे मेनूकार्ड असते ते आता आम्हाला नको आहे. आम्हा दोघांची पार्श्वभूमिका तयार आहे. देव व धर्म खोटे आहेत असे आम्ही मानत नाही, परंतु ‘देव’ म्हणजे काय व कोणाला म्हणावयाचे ? धर्म म्हणजे काय ? ह्या जगात धर्माच्या नावाखाली विडंबन चालले आहे व अजून देव म्हणजे काय व धर्म म्हणजे काय याचे उत्तर मिळत नाही. ज्या तत्त्वज्ञानाचे वाचन आम्ही दोघांनी केले आहे ते लेखक ह्यांनी या मार्गाला स्वतः वाहून घेतलेले आहे, परंतु आमच्यासारख्या सामान्य माणसांना त्या तत्त्वज्ञानाची प्रचिती आल्यावर आम्ही त्याला सत्य म्हणू. पुष्कळसे लोक भारतातून येतात व व्याख्याने देऊन ‘हा मार्ग गूढ आहे’ असे मत प्रतिपादन करतात, त्यामुळे त्यांच्याशी ह्या विषयाबद्दल बोलण्यास विष वाटते. रागावू नकोस. आमची श्रध्दा आहे व नाही अशा संभ्रमात आम्ही आहोत. कारण आमचे व आमच्यासारख्या इतरांचे जीवन तुला माहित नाही. दुसऱ्या महायुध्दात आमचे आई वडील बॉम्ब हल्ल्यात बळी पडले व शेवटी आमचे संगोपन ‘रेडक्रॉस’ मध्ये झाले, त्यामुळे मला व मायकेलला आई व वडील म्हणजे काय व त्यांचे प्रेम म्हणजे काय हे माहित नाही. फक्त रेडक्रॉस कँम्पमध्ये प्रार्थना रोज म्हणत असू. प्रार्थना झाल्यावर धर्मगुरु म्हणायचे, “लढाई लवकर संपेल व देव तुमचे रक्षण करेल”. ह्या विश्वासावर आम्ही आजपर्यंत जगत आहोत. लंडन हे गाव आमचे नाही. आम्हाला आपले जन्म गाव ठाऊक नाही व जरी ठाऊक असेल तरी त्या ठिकाणी आता कोण आहे ? केवळ जगण्यासाठी लंडन हे शहर आम्ही पसंत केले. तेव्हा आमचा देश हा देवाला माहित व आमचे दु:ख देवाला माहित म्हणून तू इकडे आलास व आम्हाला भेटलास, त्यामुळे आम्ही जन्मभर देवाचे ऋणी आहोत. एवढे मोठे जग — ह्या जगात दुसरे महायुध्द झाले, पण आमचे रक्षण देवाने केले. त्यामुळे दर रविवारी चर्चमध्ये जाणे हा आमचा धर्म आहे व कर्तव्य समजून आम्ही जगतो आहोत. ह्या जगात मला कोणीही नाही व मायकेललाही कोणी असेल असे वाटत नाही, म्हणून पहिल्या दिवशी तू जेव्हा भेटलास तेव्हा ‘माया’ म्हणजे काय हे कळले. मायेचे विवेचन पुस्तकात सांगितले आहे पण माया म्हणजे काय हे तू भेटल्यामुळे समजले”.

इतक्या आशेवर मनुष्य जगू शकतो हे मी ह्या दिवशी समजलो. सायंकाळी मी घरी परत आलो व सिल्व्हा आपल्या घरी गेली. पण त्या दिवसापासून हा विचार करू लागलो की, हे जग म्हणजे काय आहे व ह्या जगाची खोली नीट समजली पाहिजे. लोक एकमेकांना भेटतात, पण त्या भेटीत काही जीवनातील गणित सामावले आहे हे कोणालाही समजत नाही. त्यामुळे एकमेकांना भेटूनही त्याची किंमत शून्य असते.

पुढील आठवड्यात मी त्यांच्या घरी गेलो. जेवणामध्ये फक्त शाकाहारी पदार्थ केलेले होते. आपल्या इकडे काही गैर आचाराने वागणे याला भूषण म्हणतात. पण ह्या दोघांनी मांसाहारी असूनही केवळ माझ्या संगतीमध्ये आपले जीवन व्यतीत व्हावे म्हणून शाकाहारी जेवण पसंत केले. ह्यावरून हे सिध्द होते की निश्चय ठरला की व्यसने आपल्या अधीन होतात.

ह्याप्रमाणे दिवस चालले होते. त्यांना मी आपल्या समितीचे कार्य म्हणजे काय याची ओळख करून दिली, की प्रत्येक जन्माला येणारा मनुष्य याचा विकास होणे आवश्यक आहे व तो विकास होण्यासाठी केवळ पूजा पाठ करून चालत नाही. त्यासाठी १५ मिनिटांच्या नित्य साधनेची आवश्यकता आहे. ती साधना प्रामाणिकपणे केल्यावर आपण हळू हळू देवापाशी जाऊ – ‘देवाकडे’ नव्हे ! कारण देवाकडे शेवटी नाइलाजास्तव आपण जातो. हे म्हणण्यामध्ये खूप अंतर आहे. कारण एक अवस्था अनंत आहे व दुसरी अवस्था अंताची आहे. हे समजून घेऊन जो कोणी साधन करतो त्याला देवाची भेट इहजगतात होते. जशी आपल्याला देवाची मदत लागते, तशी मदत आपण इतरांना करणे म्हणजे काही कमीपणा नाही. उलट आपली मदत इतरांना उपकृत होते. एवढे ज्ञान व साधना मी भारतात सगळ्यांना शिकवीत आहे व परदेशी आल्यावरही तीच साधना सांगत आहे. चमत्कार वगैरे मला वर्ज्य आहे. चमत्कार करणे म्हणजे चमत्कारिक वागणे व बोलणे असे मी मानतो. त्याचा काही उपयोग नाही. जन्माला आल्यावर प्रत्येकाला ‘मरण’ आहे, पण जोपर्यंत आपल्याला जाणीव आहे तोपर्यंत ‘शरण’ जाणे हे आपले कर्तव्य आहे.

एवढा विषय नानाविध रूपाने व दाखले देऊन त्यांना समजाऊन त्या उभयतांना ‘सेवक’ म्हणून तयार केले व आज ती दोघेही सेवकाचे कर्तव्य पार पाडीत आहेत. याबद्दल अभिमान वाटतो. इंग्लंडला जाऊन पैसे मिळविले नाहीत, पण माणसे जोडली. त्यामुळे त्यांना माझी व मला त्यांची आठवण सदैव होते. ही कृपा प. पू बाबांची म्हणावी लागते.

जवळ जवळ एक वर्षानंतर मी भारतात येण्यासाठी तयारी केली व या काळात सर्व जग पाहिले म्हणालात तरी चालेल. कारण लंडन शहरात जगातील सर्व लोक, त्यांची भाषा व चालीरीती ह्या पाहिल्या. अनेक धर्ममंदिरे व संस्था याही पाहिल्या. एकूण सर्व काही पाहिले. दुरून डोंगर लहान दिसतो. पण चढण्यासाठी तो फार मोठा असतो. ‘कार्य’ हा शब्द अगदी लहान आहे. म्हणजे तो दोन अक्षरी शब्द आहे व देहाने जेव्हा क्रिया होते त्याचा अर्थ कार्य असे लोक म्हणतात. पण ‘कार्य’ हा शब्द सागरासारखा आहे. ते करीत असताना आपण संपून जाऊ. पण कार्याचा उगम केव्हा व कोणी केला याचा जर अंत लागत नाही, मग जो ‘अनंत’ आहे त्याचा अंत कधीही लागत नाही म्हटल्यावर ‘मी हे केले’ असे म्हणणे व्यर्थ आहे. जो करविता व घडविता तो तोच आहे; फक्त आपले कर्तव्य एवढेच की आज्ञा पालन करणे. आपण अधिक शहाणे आहोत म्हणून त्याचा अर्थ किंवा अनर्थ आपण लावतो. पण अधिक शहाणपण तर दिले कोणी, याचा अर्थ समजला पाहिजे. नुसता वाद करून शहाणपण येत नाही, यासाठी ह्या जगात आपण कोणीही नाही हे जेव्हा स्वतःला समजेल तेव्हा जग म्हणजे काय हे समजेल. पण नुसता फाजील गर्व आपल्याच नाशाला कारणीभूत होतो. जेव्हा इतरांना दु:ख द्यावयाचे असते, तेव्हा आपल्याला काही साधना करावी लागत नाही. पण नुसते गोड बोलावे यासाठी आपल्याला साधनेची बंधने पाळावी लागतात. तरच जग सुखी होईल. असे तत्त्व आपल्या आचारात यावयास पाहिजे. एवढे शिकून मी भारतात परत आलो. इकडे असताना ‘मन व विचार’ याचा अभ्यास साधना म्हणून मी केला होता. पण ‘आचार’ हा महत्त्वाचा कार्यभाग जीवनात आहे, हे बाहेर गेल्यावर समजते.

हिंदुस्थानात परत आल्यावर असे ठरविले की पुन्हा ‘कामकाज’ म्हणजे ऐहिक प्रश्न सोडविणे यापेक्षा वेगळे काही द्यावे. जगाला काहीही दिले तरी हे जग ‘पुरे’ हा दोन अक्षरी शब्द आपला जरी अंत झाला, तरी उच्चारणार नाही. तेव्हा ऐहिक बाजू २५ टक्के व पारमार्थिक ७५ टक्के असे दिले पाहिजे. त्याचीच गरज विश्वाला आहे व त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, असा विचार केला. नुसते जग पाहून आलो हे म्हणणे जगाला पटले, तरी मला ते पटेना. कारण महत्त्वाचे कार्य अजून बाकी आहे. ते कार्य हाती घ्यावे अशी तळमळ लागून राहीली. तशी प्रार्थना करून मार्गदर्शनाबद्दल प. पू. बाबांना विनंती  केली. तेव्हा प. पू. बाबा म्हणाले, “तुझे पाच पीर काय म्हणतात हे विचार. नुसती माझी आज्ञा हवी, असे म्हणून चालणार नाही. नुसते कार्य असे म्हणून तळमळत राहू नकोस. तर ‘तळमळ’ ह्या शब्दाचा बोध घे. आज जगाला तळमळ आहे सुखाची. हे डोहाळे आहेत भीक मागण्याचे. ते डोहाळे पुरविणे म्हणजे कार्य नव्हे. हे लक्षात घे. ‘कार्य कार्य’ म्हणून तू म्हणत आहेस. पण बाळ जर अजून अंगावर मुतत आहे तर त्याची मुंज आत्ताच नको. मी त्याबद्दल नंतर सांगेन. आजपर्यंत जे कार्य आपण करीत होतो, ते वाया गेलेले नाही, पण जोपर्यंत चाड शिल्लक आहेत तोपर्यंत त्याचे मोजमाप करू नकोस. पुढील टप्पा महत्त्वाचा आहे त्यासाठी १०० टक्के भक्त पाहिजेत. नुसती भक्ती असे म्हणून सक्ती करणारे नको आहेत. तरच पुढील मार्ग सूचित करीन. नुसती अडीअडचणी विचारणारा समाज आता नको आहे. कारण माझ्या वेळेला जग निराळे होते व आजचे जग वेगळे आहे, ‘गुरुचरित्रा’चे पारायण कर. तुझी संकटे दूर होतील हे ऐकून ज्या भक्ताचा पारा चढतो ते लोक देवाची सेवा करतील ? त्यापेक्षा देव नसला तरी त्यांना चालेल. दोन वेळेला जेवावयाला मिळते आहे मग अधिक त्रास कशाला घ्यायचा ? ‘आजची वेळ भागते आहे, पुढचा विचार पुढे करू’ असे जग जन्माला येणार आहे. त्या जगाला सोपा मार्ग दाखविणे हाच आजचा परमार्थ आहे. माझी आज्ञा होईतोपर्यंत आहे तेच कार्य चालू राहू देत. ह्या काळात लोकसंग्रह करणे आपले कर्तव्य आहे. जे लोक येतील त्यांचा  कमीपणा दाखवून नावे ठेवून, ते बाजूला जातील असे वर्तन घडू नये. कारण लोकांना संग्रहित ठेवणे हा आपला ठेवा आहे ! ”

त्याप्रमाणे कामकाज नित्य नियमाने होत होते. त्यामध्ये भक्ताच्या दु:खाचे कारण सांगून त्याला निराकरण व जीवनाचा धर्म म्हणजे काय, आदी मुलाखती चालू होत्या. पुष्कळ वेळा असे वाटे की सर्व भक्तांना एकत्र आणून ‘सेमिनार’ घ्यावे व निरनिराळे विषय यांची ओळख न सांगता एकाच विषयाला प्राधान्य द्यावे, जेणे करून भक्तांना एकाच पातळीवर सर्व विषय समजतील. पण नुसती इच्छा असून चालणार नव्हती. सर्व इच्छा प. पू. बाबांच्या अधीन होत्या. त्याप्रमाणे मी वाट बघत होतो. या काळात १२ वर्षे गेली. ही वर्षे फुकट गेली नाहीत. तर मुख्य साधना ही सिध्द व्हावयास पाहिजे असा संदेश प. पू. बाबांचा मिळाला. पूर्वाश्रमी जी सेवा मी करीत होतो ती सेवा माझ्यापुरती होती. पण आता जगाला साधना शिकवायची होती. ती म्हणजे ‘ॐ साधना’. पूर्वी लिहील्याप्रमाणे ‘ॐ’ हा भैरवनाथांनी शिकविला व ‘ॐ साधना’ ही जगाला शिकवायची आहे, यामध्ये फरक काय ? हा प्रश्न उभा राहीला, त्यासाठी ‘कामकाज’ म्हणजे ऐहिक प्रश्न हे बंद करावयास पाहिजेत. तर पुढील मार्गाचा प्रवास सुरु होईल, असे स्पष्ट प. पू. बाबांनी सांगितले ह्या कालात दोन तपे सेवा झाली होती व भारतभर समितीचे कार्य परिचित झाले होते.

>>