आत्मनिवेदन ग्रंथ भाग ५

जीवनामध्ये संकटे आल्यावर आपण उपाय योजना करतो परंतु पुढे निर्माण होणा-या परिस्थितीपूर्वीच त्यासाठी कृपाशिर्वादरूपी उपाय योजना करणे यालाच ‘तरणोपाय’, असे म्हणतात. अशी तरतूद ईश्वरी संदेशातून होत असते मानवी बुध्दीतून नाही. जो जीव पिंडात जन्माला येतो त्याला ब्रम्हांडात जाण्यासाठी म्हणजे इहलोक. परलोक व स्वर्गलोक यासाठी एकमार्ग असावा व जगतात जन्माला आलेले जीव मानवतेच्या भावनेतून एकत्र येण्यासाठी एक प्रार्थना असावी अशी प. पू. साईनाथ महाराजांची इच्छा होती. त्यासाठी लागणारी ॐकार शक्ति श्रीनृसिंह सरस्वतीं यांच्या रूपाने भुतलावर अवतीर्ण झालेली होती. ती शक्ति प्राप्त केल्यनावर त्या शक्तीमध्ये त्रिगुणात्मक रूपाने अस्तित्त्वात असलेल्या देवदेवता ह्या एकरूप झाल्या व मगच शक्तीपीठाची स्थापना करण्यात आली. परंतु ही शक्तीपीठाची स्थापना करताना जी दिव्य प्रचिती मी अनुभविली तिचा विचार आज आला तरी हातपाय कापू लागतात.

शिरोडय़ाला सेमिनार घेत असताना, “ह्या जगताचे भविष्य काय” ? असा प्रश्न मी प. पू, बाबांना विचारला. त्यावेळी प. पू. बाबांनी सांगितले की “योग्य वेळेला मी ते दिव्य तुझ्या माध्यमातून करून घेईन. फक्त तुझी तयारी असूदे कारण ही शक्तीची स्थापना साधी नाही. जे जग म्हणजे पिंड आहे त्याचे रूपांतर ब्रम्हांडात करणे सोपे नाही. ही साधना आहे, त्यामध्ये मूळ विषय असा आहे की पिंड + ब्रम्हांड मिळून शक्तीपीठ तयार होते. यासाठी जो साधक हे कार्य करेल त्याला आचार, विचार, उच्चार ह्या ज्या देहाच्या क्रिया आहेत, त्या क्रियेला मुकावे लागेल. ही जर तयारी असेल तर आपण दोघे मिळून शक्तीपीठाची स्थापना करू. जो ‘पिंड’ हा तू आहेस व ‘ब्रम्हांड’ मी आहे म्हणजे तू चेतना व मी चैतन्य मिळून ‘हिरण्यगर्भ’, म्हणजे शक्तीपीठ तयार होईल. अशी विश्वाची रचना करावयाची आहे. आजच्या दिनी जे भक्त आहेत त्यांना कल्पना येणार नाही. त्यांच्या पुढील पिढय़ांना याचे सुख मागाहून कळेल. असे दिव्य आजपर्यंत कोणी केले नाही. रस्त्याने चालत असता जर पायात काटा बोचला तर हे भक्त ‘आई ! ’ म्हणतात. मग जे आव्हान तू म्हणतोस त्याची कल्पनाही करवत नाही. गारेचा पाऊस आपण पाहतो, अशी गार आकाशातून खाली येत असता तिचा प्रहार सहन होत नाही. मग ‘बीज’ म्हणजे ब्रम्हांडाचे ‘बीज’ खाली आल्यावर तुझी अवस्था  शून्यवत् होणे हे स्वाभाविक आहे”. पण आता सर्व काही पूर्ण झाले. चैत्र पाडव्याला (1986) तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या व  त्यानंतरच शून्यवत् अवस्थेतून पुनश्च मूळ अवस्था प्राप्त झाली. याला तीन वर्षे लागली. असा सुख-सोहळा पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी उत्तम आहे. परंतु हे दिव्य देवानेसुध्दा केले नाही. कारण ह्य़ा जगाचे काय होईल व काय होणार आहे ही काळजी देवालासुध्दा नाही. ती प. पू, बाबांना आहे. ह्य़ा जगात अनेक लोक देवाचे भक्त असतील. पण माझ्या बाबांचे भक्त  ह्या जन्मात होणे यासारखे भाग्य नाही. म्हणूनच पदात म्हटले आहे की, “मेरे साई बाबा की महीमा निराली”. काय पुण्य आपण केले की ह्या जन्मात त्यांची भेट झाली ! आता मागण्यासारखे काहीही नाही. अज्ञानामुळे सर्व विश्व जगत आहे पण इतराना जगू देणे हा मानवाचा धर्म आहे. तोच नेमका आपण विसरलो आहोत. तरण्या पोरापोरींनी एकमेकावर मोहीत होणे म्हणजे ‘प्रेम’ नव्हे. ‘प्रेम’ही अवस्था आहे. जेव्हा पूर्ण देहामध्ये उच्चार, आचार, विचार यातून चौथी अवस्था निर्माण होईल ती चौथी अवस्था म्हणजे ‘प्रेम’. जोपर्यंत एकमेकाला केवळ देहीक आकर्षण आहे तोपर्यंत ती अवस्था प्रेम नसून ‘प्रेत’ आहे. प्रेताशी जीवन जगणे व व्यतीत करणे या जीवनात सुख, शांती कशी मिळेल ? जन्माला येऊन हे मिळवायचे नाही. प्रेम कसे प्राप्त होईल याचा नितध्यास लागला पाहीजे.

मी साधना ही म्हातारपणी केली नाही. सर्वांपेक्षा मी अधिक देखणा होतो. सर्वगुणसंपन्न असताना ह्य़ा जगाच्या नादी लागलो नाही. आपली ‘नांदी’ सद्गुरूकृपेने कशी होईल म्हणून वाट पाहिली व जगाला वाट दाखविली म्हणजे मार्ग दाखविला व त्यासाठी प. पू. बाबांची ‘आज्ञा’ होईपर्यंत थांबलो. ह्य़ाचा अर्थ ‘सबुरी’. प. पू. बाबांच्या प्रेरणेने शक्तीपीठाचे कार्य 100% झाल्यावरच त्यांचा ‘संदेश’ जगताला ‘शिलालेख’ म्हणून दिला. प. पू. बाबांच्या कृपेने आज ह्य़ा जन्माचा परीस झाल्यावर सोन्याचा लोभ ठेवण्यापेक्षा प. पू. बाबांचा ‘सोन्या’ होणे हे शत जन्मांपेक्षा श्रेष्ठ !

साडेतीन हजार वर्षांपूर्वी श्रीनवनारायणांनी कृष्णा व पंचगंगा नदीच्या परिसरातील ‘बत्तीस-शिराळे’ या गावी एक यज्ञ केला होता. त्यानंतर हजार वर्षांनी मच्छिंद्रनाथ व श्रीगोरक्षनाथ ज्यावेळी संचार करीत असता त्या मंगल ठिकाणी आले. त्यावेळी श्रीमच्छिंद्रनाथांनी श्रीगोरक्षनाथांना याच पुण्य स्थळी तपश्चर्या करण्याची आज्ञा दिली व स्वतः दक्षिण भारताच्या संरक्षणार्थ श्रीरामेश्वर क्षेत्री प्रयाण करते झाले. श्रीगोरक्षनाथांनी गुरू मच्छिंद्रनाथांना तपश्चर्येचे स्वरूप विचारले. त्यावेळी श्रीगुरूंनी त्यांना अवधान, ध्यान व चिंतन या तीन अवस्थांची दीक्षा दिली. प्रत्येक अवस्था सिध्द करण्यासाठी श्रीगोरक्षनाथांना बारा वर्षे लागली. अशा तऱहेने छत्तीस वर्षांच्या कालावधीनंतर पुनःश्च श्रीमच्छिंद्रनाथ व श्रीगोरक्षनाथ यांची या पावन स्थळी भेट घडली. त्यावेळी श्रीमच्छिंद्रनाथांनी श्रीगोरक्षनाथांना जगाच्या अंतापर्यंत ह्य़ाच स्थळी राहून तृषार्थ आत्म्यांची सेवा करण्याची आज्ञा दिली, तसेच बत्तीस-शिरा•य़ापासून ते दक्षिण भारताचा रामेश्वरापर्यंतचा संपूर्ण परिसर त्यांच्या संरक्षण कवचाखाली जतन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. बत्तीस-शिराळे ही मूळ बत्तीस गावे. त्या ठिकाणी आजही, ‘अनंताचे व्रत’ श्रीशेषपंचमीला केले जाते. ‘अनंत’ म्हणजे, ज्यास अंत नाही.

आजही रोज शेकडो आत्मे, ज्यांना त्यांचे वंशज प्रयाग-काशी-गया या त्रिस्थळी अंत्यविधी नंतर, अनाथ अवस्थेत सोडतात त्या आत्म्यांना श्रीगुरू गोरक्षनाथांच्या कृपाशिर्वादाने सनाथ अवस्था म्हणजे ‘मुक्ति’ प्राप्त होते. हे आत्मे कर्म-परंपरेतून मुक्त होण्यासाठी श्रीशेषपंचमीला नागाच्या रूपात हजारोंच्या संख्येने श्रीबत्तीस-शिराळे येथे उपस्थित होतात. या आत्म्यांना सद्गती प्राप्त व्हावी व त्यांचे भवितव्यातील जीवन सार्थकी लागावे म्हणून श्रीगोरक्षनाथ यांना अवधान, ध्यान व चिंतन या अवस्थांची दीक्षा देतात. आता ‘अवधान’ याचा अर्थ असा की सद्गती प्राप्त झाल्यानंतर पुनःश्च कर्मवलयाच्या मोहात गुंतून न पडता गुरूवलयाच्या तेजात जीवन कृतार्थ व्हावे म्हणून गुरूअंश बनून जन्माला यावे. परंतु ही दीक्षा प्राप्त झाल्यानंतर आपल्या जन्म-उत्पत्तीचा निर्णय त्या आत्म्याने घ्यावयाचा असतो. पुढे जन्मप्राप्ती नंतर त्या आत्म्यास ‘ध्यान’ अवस्थेची प्राप्ती होईल. त्यावेळी त्याने हे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की गुरूकृपेने जो नरदेह प्राप्त झाला आहे त्या नरदेहाला ‘नारायण’ ही अवस्था प्राप्त व्हावी व जीवन कृतार्थ व्हावे म्हणून सदैव ‘चिंतन’ या अवस्थेचे अवधान त्याने ठेवणे आवश्यक आहे. म्हणजेच जन्मातील मूळ कारण उदित होऊन जीवन हे केवळ स्वतःपुरतेच खर्च न होता इतरांप्रीत्यर्थ जीवनाचे कर्तव्य पार पाडण्यात ते व्यतीत होईल. अवधान, ध्यान व  चिंतन ह्या तीन दिव्य अवस्थांची आपल्या काया-वाचा-मनाच्या  ठिकाणी जपणूक व्हावी म्हणून व गुरूंनी नेमून दिलेली नित्याची ॐकार साधना जास्तीत जास्त कार्यान्वित व्हावी म्हणून साधनेची 12 अंगे व या 3 अवस्था यांचा विचार आस्थेने करणे आवश्यक आहे. अशी अवस्था भवितव्यात पुनःश्च प्राप्त होईल असे नाही म्हणून जी साधना आपल्याला शिकविली आहे त्याची दक्षता पाळली पाहीजे व साधनेतून क्रमाक्रमाने प्राप्त होणा-या अवस्थांचा सखोल अभ्यास साधकाने केला पाहिजे.

अवधान अवस्थाः-गुरूमार्गात ही अवस्था प्राप्त होणे हे दुर्मीळ आहे कारण जन्म घेतल्यावर कर्माची उपाधी मागे लागते. या कर्मातून आपली व आत्म्याची सुटका व्हावयास पाहीजे म्हणून आपण गुरूमार्गी होतो. अशावेळी सुखाची प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा न ठेवता गुरूंची प्राप्ती केव्हा होईल असा ध्यास लागला पाहीजे. नुसते खाणे-पिणे, कपडालत्ता, ऐष-आराम आदींनी जीवन व्यर्थ खर्च न होता जीवनास निश्चित आकार यावयास पाहीजे. तो आकार फक्त गुरू देत असतात. गुरूमार्गामध्ये ‘गुराखी’ व ‘गुरू’ हे दोन शब्द आहेत. एक फक्त गुरे राखतो व दुसरा मार्ग ! जन्माला येऊन तो जन्म वाया जाऊ नये व तर इतराना उपयोग व्हावा या तळमळीने वाट जे दाखवितात त्यांना ‘गुरू’ असे म्हणतात. ह्या गुरूंनी स्वतःचे जीवन तन-मन-धन भक्तांसाठी खर्च केले पाहीजे. ज्या ज्या अडचणी भक्तांच्या जीवनामध्ये घडतात त्या न सांगता जी अडचण ज्या कर्माने निर्माण झाली आहे अशा ‘कर्माचे विमोचन’ करून त्या भक्ताला अभयदान द्यावे लागते. नुसते दुखाचे निवारण हे रस्त्यावर बसणारे ज्योतिषी सांगू शकतात. अशा वेळी जरी भक्ताची पातळी अज्ञानाची असते तरी त्या भक्तास सखोल ज्ञानाचा लाभ देताना ऐहिक सुखासाठी जन्म नाही हे दाखवून दिले पाहीजे व मग हळू हळू भक्तांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलू लागते. हे जीवन क्षणिक आहे. जे जे काही प्राप्त करावयाचे आहे त्याचा लाभ जन्मोजन्मी असावयास पाहीजे. नुसता लोभ असून चालणार नाही. ही अवस्था इहजन्माची आहे. या इहजन्माचे ज्ञान व लोभ आपल्याला होतो तो न वाढवता आपण जसे जसे मार्गात जाऊ तसा तसा लोभ कमी करून गुरूमार्गात लाभ कसा होईल हा विचार केला पाहीजे. “मी जगात आहे पण माझे जग इहलोकात नाही” ! असे बोलणे व वागणे म्हणजे ‘अवधान अवस्था’ ! इहलोकातील कर्तव्य करीत असता त्यात आपला विषय न राहता फक्त ‘वास’ राहीला पाहीजे, म्हणजे ‘कर्माचा विषय भोगणे न राहता धर्माने कर्माला मुकणे’, ही अवस्था प्राप्त होते म्हणजेच स्वाभाविक इहजन्मांत पुढील जन्म म्हणजे परलोक ह्याला आरंभ होत असतो. अशावेळी आपण ॐकार साधना जरी करत असलो तरी ह्या अवस्थेत फक्त ‘अ’ हे सिध्द होते. कारण ‘अ’ म्हणजे विश्वाची उत्पत्ती होय. अशावेळी आपला आत्मा हा जन्म घेतो व गुरूमार्गी झाल्यावर तो आत्मा ॐकाराची ‘अ’ ही अवस्था प्राप्त करता होतो. म्हणून ही साधना करीत असता 100% अवधान ठेवले पाहीजे.

ध्यान अवस्थाः-पूर्वी अनेक जन्मात अनेक कर्मे आपण केली आहेत म्हणून पुन्हा ह्या जन्मी जन्म घेतला आहे पण त्या जन्माची स्मृती आपल्याला नाही म्हणून पुन्हा पुन्हा तेच पातक किवा प्रमाद आपल्या हातून घडत असतात. पुन्हा पुन्हा सुखाचा लोभ वाढत असतो म्हणून पुन्हा जन्म. हे रहाट गाडगे चालू आहे पण कोणत्यातरी जन्मात आपण काही पुण्यकर्म हे निश्चित केले आहे. त्या कर्माची फेड म्हणून ते कर्म आपल्याला गुरूमार्गी करते पण त्यावेळी गुरूंची आठवण होत नाही म्हणून एखादे संकट आपल्या जीवनात निर्माण होते. त्यावेळी आपल्याला सुख कसे लागेल म्हणून आपण गुरूंना भेटतो. वास्तविक ते दुख नसते, तर आपल्याला जागे करून आपण जागेवर यावे म्हणून कर्माने आपल्यावर उपकार केलेले असतात. त्यावेळी पुनःश्च कर्मे आपल्या हातून घडू नयेत म्हणून श्रीगुरू वंशाचे व कर्माचे विमोचन करून त्याऐवजी दीक्षा देत असतात. वास्तविक वंशात व कर्मात जे जे काही दोष असतात ते दोष जाऊन जीवन हे निर्दोष व्हावे अशी गुरूंची इच्छा असते व पुढील जन्माची तरतूद ते करून देत असतात. पण आपण आपल्या सभोवार जे जग दिसते तसे जीवन आपण उपभोगावे म्हणून ह्या विमोचनाला व दीक्षेला किंमत देत नाही पण ज्यावेळी ही जाणीव होईल तेव्हा त्याचे मूल्य काय आहे हे कळेल. हा जन्म वारंवार येत नसतो. पुन्हा जन्माला येण्यासाठी काही शेकडो वर्षे लागतात. म्हणून ज्ञानी पुरूषांनी ‘जीवन व्यर्थ खर्च करू नका’ असे वारंवार सांगितले आहे. तर त्या जीवनाचा आपण उपभोग घेऊन इतरांना त्याचा उपयोग व्हावा ह्य़ाकडे लक्ष द्यावे. वास्तविक जन्माला येते वेळी हे जीवन ‘वना’ सारखे होते. गुरू भेटल्यावर त्याचे ‘नंदनवन’ झाले. हा धर्म गुरूंचा आहे व आपण कर्माधीन आहोत म्हणून  गुरुंची काय दिले आहे हा प्रश्न आपल्या पुढे उभा असतो. ज्यावेळी ‘कर्माधीन’ अवस्था संपते त्यावेळी ‘धर्माधीन’ अवस्था सुरू होते व जीवन इतरांसाठी आहे याचा बोघ होतो. म्हणून पुन्हा-पुन्हा जन्माला येऊन कर्माधीन होण्यापेक्षा जन्म घ्यावयाचा आहे, पण गुरूकृपेने ‘धर्मासाठी’, हेच वचन आपण पाळले पाहीजे. एखादेवेळी आपले ‘जेवण’ विसरले पाहीजे कारण त्यापेक्षा जीवन अधिक मोलाचे आहे असा ध्यास लागला पाहीजे. आपण जी ॐकार साधना करीत असतो त्या साधनेत जो शब्द ‘उ’ असा आहे त्याची प्राप्ती ‘ध्यान अवस्थे’मध्ये होते. आता गुरूपाशी आपण काही मागावयाचे नसून आपला जन्म जो व्यर्थ गेला असता तो गुरूकृपेने अर्थपूर्ण झाला आहे. तेव्हा ह्या जन्माची ‘दक्षिणा’ गुरूंना द्यावयाची आहे. ही दक्षिणा म्हणजे आपण ‘दक्ष’ राहणे, हे आपल्या हिताचे आहे व जो वंश जन्माला येतो तो वंश न राहता ‘गुरूअंश’ म्हणून बनला आहे म्हणून भवितव्यात ‘संतती’ ही अवस्था प्राप्त न करता ‘संपत्ती’ म्हणून जन्म घ्यावयाचा आहे म्हणजेच ‘न संपणारी संपत्ती’ असा कृपाशिर्वाद गुरू देतात.

चिंतन अवस्थाः-ही अवस्था काय आहे हे ज्ञानी माणसालासुध्दा समजत नाही. ‘इहलोकात’जन्माला येणे म्हणजे भाग्यवान होणे असा अर्थ आहे. त्रिभुवनात इहलोकाइतका श्रेष्ठ जन्म नाही कारण जिवाला आपला विकास जन्म झाल्यावर करता येतो. अन्यतः दुसरे लोक हे नुसते जिवंत आहेत. पण त्या ठिकाणी जीव जरी धारण होतो तरी उक्रांती इहलोकात होत असते. याला शास्त्रीय कारण असे की ह्य़ा सृष्टीवर पाचही तत्त्वे आहेत. जिवाची धारणा होण्यासाठी देह पाहीजे व तो देह पाच तत्त्वांनी होतो. म्हणजेच देह + जीव, म्हणजे जीवन असा अर्थ आहे. हा जीव जेव्हा जन्माला येतो त्यावेळी देह हा नव्याने धारण होतो. पण जीव किंवा जीवात्मा किंवा आत्मा हा पूर्वीचा असतो. असे जीवन जिवाने भोगलेले असते, पण त्याचा लाभ देहाला होत नाही म्हणून जन्मप्राप्तीनंतर देहाला लोभ असतो व जिवाला किंवा आत्म्याला लाभ कसा होईल याबद्दल चिंता असते म्हणजे पर्यायाने हे व्दैत  चालू असते. जर गुरू भेटले नाहीत तर चिंता करून ‘शेवट गोड करी दत्ता’ याच्याऐवजी चिता ही क्रमप्राप्त आहे. तेव्हा गुरूमार्गात हे द्वैत जाऊन अद्वैताचे ज्ञान झाले पाहीजे. ‘कोणते जीवन क्षणिक आहे म्हणून त्या सुखाचा ध्यास लागला आहे’. हा प्रश्न स्वतःला विचारून पहा. मग सुखाचा ध्यास लागण्यापेक्षा ‘सुखाचा घास’ हे सुख गुरू देतात. म्हणजे ‘शेवटी जीवन गोड होईल’ असा आशिर्वाद मागणे आपले कर्तव्य आहे. ते सोडून आपल्याला ‘जैसी करणी तैसी भरणी’ असे जीवन प्राप्त होते कारण जन्माला आल्यावर सभोवार आपले आप्त व सोयरे जवळीक साधतात व शेवटी आपल्याला त्यांना सोडावे लागते. कारण  परलोकामध्ये कोणीही आपले नाही म्हणून श्रीपंतांच्या पदात ‘एकलाची येणे एकलाची जाणे’ हा बोध केला आहे. ‘गुरूमार्ग हा भला’, असे सांगितले आहे. परलोकात आत्म्यांना देह नाही. फक्त देहाला आपली व इतरांची ओळख असते; अशावेळी परलोकात फक्त आत्मा व त्याचे कर्म अस्तित्त्वात असते. जर सत्कर्म केले असेल तर ते बरोबर परलोकात येते व बाकीचे ‘वासनारूपी कर्म’ इहलोकात असते. ते वासनारूपी कर्म इहलोकात आहे म्हणून जन्म. जेव्हा सत्कर्म घेऊन आपण जाऊ त्यावेळी पुनर्जन्म आपल्याला येतो. हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा ‘चिंतन अवस्था’ ! म्हणजे पूर्वीच्या अनेक जन्मांत आपण जन्माची उतराई होत नाही, ती व्हावी म्हणून चिंतन ! ‘चि’ म्हणजे चिरंजीव व ‘तन’ म्हणजे कारणदेहाची प्राप्ती व्हावी असा आशिर्वाद गुरूंच्याकडून घेऊन ‘परलोकवासी’ हा प्रवास आत्म्याचा सुरू होतो. चिंता व चिता असे जीवन न राहून, ‘चिंतन’ म्हणजे आत्म्याचे कार्य–दया, क्षमा व शांती ही त्रिपुटी ज्याच्या आचारात व विचारात अनुभवास येते तो आत्मा, परमात्मा होतो. एवढी तरतूद केल्यावर श्रीपंतांचा बोध आहे—‘साधन सेवा काहीच नसता, दावियले निजधाम’- असे जीवन होते. शेवटी हे चिंतन सदैव असावे-

‘दया करी श्रीगुरूदत्ता, दुर्गुण काढू मी न शके क्षमा करी रे अनंता’. ह्या साधनेत अवधान, ध्यान व चिंतन यांची त्रिपुटी झाल्यावर तो साधक ‘सच्चिदानंद’ होतो व  त्यानंतर जीवनात देणे व घेणे इत्यादी न राहता ‘लेणे काय आहे’ ? असा प्रश्न, ईश्वर आपल्याला विचारील !

वरील विषयाचे ज्ञान आपण भक्तांना व्हावे तसेच आपल्या जन्मकारणाचे व जीवनातील कर्तव्याचे ज्ञानही व्हावे म्हणून वेळोवेळी शिरोडा-गोवा येथे साधना संमेलने घेतली गेली. आम्ही मानव जरी जन्म प्राप्त करते होतो तरी जीवन जगणे ही कला आहे व तिचा लाभ गुरूकृपेशिवाय प्राप्त होत नाही. प्रत्येक मनुष्याच्या सुख, शांती, समाधानाबद्दलच्या अपेक्षा असतात, परंतु ह्य़ा अपेक्षांची फलप्राप्ती का होऊ नये याचे शास्त्रीय कारण कोणीही विचारात न घेता ह्य़ा सुखांची प्राप्ती होत नाही म्हणून स्वतःच्या जीवनात व समाजात अशांतता निर्माण करण्यास आपण कारणीभुत होत आलो आहोत, त्यामुळे ह्य़ा जगात काही सुखाचा मार्ग आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून ज्ञानी होण्याऐवजी मनुष्य अज्ञानी मार्गाचा अवलंब करून अधिकाधिक अज्ञानी होत चालला आहे. अशा ह्य़ा मानवी जीवनात निश्चित असा मार्ग आम्हा मानवांना मिळावा म्हणून प. पू. बाबांनी वेळोवेळी मार्गदर्शन कृपाशिर्वाद म्हणून दिले आहे. हा कृपाशिर्वाद म्हणजे आजपर्यंत हजारो वर्षांपासून अवतारी पुरूषांनी मानवी कल्याणासाठी केलेल्या सिध्दसाधना होय. त्यांची प्राप्ती सर्वसामान्य मनुष्यास सुलभपणे व्हावी म्हणून एखाद्या ‘मध्यस्थ’ माध्यमातून अशी कार्ययोजना ईश्वर करीत असतो. ती कार्ययोजना त्या मध्यस्थ व्यक्तीच्या विचारातून निर्माण झालेली नसते, परंतु अशा कार्यात मानवी जीवनामध्ये सुख, शांती, समाधानाचा लाभ व्हावा अशी योजना असूनसुध्दा अज्ञानामुळे मनुष्य ह्या मार्गाला दुरावतो.

अशा योजनांपैकी वंशविमोचन हे साधन अत्यंत महत्त्वाचे असून त्या साधनाचा लाभ आपण भक्तांनी घेतलेला आहे. मानवी जीवनात ‘विद्यानाश’ व ‘संपत्तीनाश’ हे प्रामुख्याने निर्माण होणारे दोष असून एका पिढीत काही व्यक्तींस विद्याविद्यार्जन व ऐश्वर्य यांची सुलभपणे प्राप्ती होते तर काहींना त्या प्राप्तीस मुकावे लागते. पुढे कालकालांतराने हे दोष वाढीस लागून कुटुंबात ऐपत असूनसुध्दा विद्याविद्यार्जन घेता येत नाही. तर काही वेळा विद्याविद्यार्जन प्राप्त होऊनसुध्दा कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्याची ऐपत उरत नाही. अशा दोषांचे निवारण पूजा-पाठ, नवस-सायास, इत्यादींनी होत नाही. केवळ गुरुकृपाशिर्वादाचा लाभ झाला तरच  ह्य़ा दोषांपासून कुटुंबाची मुक्तता होत असते व आपण प्राप्त जीवनाबद्दल सज्ञानी  होऊन आपल्या काया-वाचा-मनाच्या ठिकाणी केवळ गुरू हेच तत्त्व ह्य़ा जगात साक्षी आहे अशी, नितांत आदराची ठेव प्राप्त होते. ही अमोल ठेव प्रत्येकाच्या जीवनात व आपल्या कुटुंबातील पिढय़ान्पिढय़ांमध्ये  सदैव वास करीत राहावी याची साक्ष म्हणून श्रीसाई स्वाध्याय मंडळ ही संस्था अक्षय तृतीया श्रीसाई शके 3 (1985 साली) या शुभदिनी स्थापन केली.

जगतात संस्था स्थापन करण्यासाठी लोक पैसा जमा करतात. श्रीसाईस्वाध्याय मंडळ या संस्थेचे हे वैशिष्टय़ आहे की आपणापैकी प्रत्येकाने ह्या संस्थेचा सभासद व्हावयाचे आहे पण ते पैशाने नव्हे तर ज्या श्रीगुरूंना आपण काया-वाचा-मनाने मानले आहे ती अमोल ठेव म्हणजे ‘श्रध्दा’, ही आपण वर्गणी म्हणून द्यावयाची आहे. श्रीसाईनाथ महाराजांचा कृपाशिर्वाद व आपण भक्तांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेली श्रध्दा यातून ‘श्री साई स्वाध्याय मंडळ’ ही संस्था जे कार्य जगतात करेल ते कार्य म्हणजे खऱया अर्थाने ‘लोक-कल्याण कार्य’ असे म्हणता येईल. अशा अलौकिक तत्त्वावर स्थापन झालेली संस्था ही जगतामध्ये अखंडपणे कार्य करीत राहील व त्या कार्याचे ब्रीदवाक्य ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्ह्णे जो आपुले’ असेच असेल. आपण सर्व भक्तभाविक ज्यांनी श्रीगुरूकृपेने आपल्या जीवनात स्थित्यंतर करवून घेऊन व आपल्या काया-वाचा-मनाचा विकास होऊन ‘ज्ञान’ अवस्थेचा लाभ झाला आहे त्या काया-वाचा-मनाच्या ठिकाणी हाच भाव—

।।  आस  एकची  माझी निववावी  गुरूसेवा  ।।

जन्मोजन्मी  घडावी  तव चराणांची सेवा ।।

वास करीत रहावा अशी प. पू. बाबांचे चरणी प्रार्थना !

प्रत्येक भक्ताच्या कौटुंबिक व सामाजिक कर्तव्यांची पूर्तता करवून घेण्यासाठी श्री साई स्वाध्याय मंडळाची स्थापना झाली तसेच भक्ताचा देहीक व आत्मिक विकास व्हावा म्हणून पुढे नित्य साधनेमध्ये ‘श्रीभीमरूपी’ या स्तोत्राचा समावेश श्रीगुरूआज्ञेने करण्यात आला परंतु या स्तोत्राचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.

हे स्तोत्र, प. पू. रामदास स्वामींनी लिहिलेले आहे. ते महाराष्ट्रातील एक थोर संत होऊन गेले व त्यांचे निवासस्थान साताराजवळील ‘सज्जनगड’ ह्या डोंगरावर आहे. त्यांचे उपास्य दैवत श्रीरामप्रभू होते. श्रीरामदासांनी अध्यात्मावर महत्त्वाचे लिखाण केलेल असून त्यात ‘श्रीदासबोध’, ‘मनाचे श्लोक’, इत्यादींचा समावेश आहे. त्यामध्ये ‘भीमरूपी’ हे स्तोत्र श्रीरामाच्या आज्ञेने त्यांनी लिहिले आहे. त्या काळाची व आजही त्याची गरज आहे, हे समजून माझ्या वडिलांनी मला वय वर्षे आठ ह्य़ावेळी हे स्तोत्र नित्य नियमाने म्हणण्यास सांगितले होते व त्याप्रमाणे मी हे स्तोत्र नियमाने म्हणत आलो व आजही म्हणतो आहे. शक्तीपीठ स्थापनेची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर प. पू. साईबाबांची आज्ञा अशी झाली की “हे नुसते स्तोत्र नसून त्यात जीवनाचे शास्त्र, शस्त्र व अस्त्र आहे, ते तू सर्वांना ‘दीक्षा’ म्हणून सांग. मग त्यातील गूढ अर्थ काय आहे हे समजेल”

आजपर्यंत, आपण ‘ॐकार साधना’ करीत आलो, पण वाणीची सिध्दता झाल्याशिवाय त्याचे फल स्वतःला व इतराना मिळत नाही. ह्य़ा स्तोत्रात मूळ जे बीज आहे ते ‘वायु’ आहे. म्हणून त्या स्तोत्राचा समावेश नित्य साधनेत करण्याची आज्ञा चैत्र प्रतिपदेला झाली. ह्या स्तोत्रातील गूढ अर्थ काय आहे तो आपणा भक्तास समजला म्हणजे जीवनाचे सार्थक होईल. नुसते ढोलके वाजवून देव भेटत नाही, त्यासाठी ध्यास लागला पाहीजे.

श्रीनवनाथांचे दैवत मारूती हे आहे, त्याशिवाय माझ्या घरी पूजनात जी मारूतीची मूर्ती आहे ती पाच पिढय़ांची असून ती मूर्ती माझ्या पणजीशी बोलत असे व आता माझ्या माध्यमातून ज्या स्तोत्रावर माझा दृढ विश्वास, श्रध्दा व भक्ति आहे त्या स्तोत्राचा गूढ अर्थ त्यांनीच माझ्य़ाकडून लिहून घेतला. ह्या भावनेने मी त्यांचा सदैव ऋणी आहे. जे काही जगाला कमी होते ते मी दिले आहे. यापेक्षा देव किवा ब्रम्ह वेगळे नाही हे आपण लक्षात ठेवावे. गेली 40 वर्षे जे कार्य माझ्या हातून घडले गेले त्यासाठी प. पू. साईबाबांचा आशिर्वाद पाठीशी होता. पण ज्या वाणीद्वारा ॐकार व भीमरूपी स्तोत्र मी म्हणत आलो त्यामुळेच त्या वाणी माध्यमातून हे कार्य सुलभपणे जगताला परिचित झाले. तेव्हा जीवनात काही मंत्रांचे पठण केले नाही तरी चालेल, पण नित्यनियमाने श्रीभीमरूपी  स्तोत्र म्हटल्यास त्याचा लाभ आपला देहीक व आत्मिक विकास होण्यास निश्चितच होईल असा माझा दृढ विश्वास आहे.

जगतामध्ये जे धर्म आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये ‘उपनयन’ अथवा ‘अनुग्रह दीक्षा’ सांगितली आहे व केवळ आपण ‘हिंदू धर्मा’मध्ये आहोत म्हणून त्या धर्माप्रमाणे मौंजीबंध, उपनयन किंवा अनुग्रह दीक्षा ही सांगितलेली नाही. जे बालक सज्ञान होते त्यावेळी त्याचे आचार व विचार यावर संस्कार होणे अत्यावश्यक आहे व त्यामुळे त्याचे पुढील आयुष्य उत्तम तऱहेने साकार होत असते. प्रत्येक मानवाला जन्माला येतेवेळी 5 कोश सांगितलेले आहेत पण त्या 5 कोशांचा विकास करणे  हे कर्तव्य आपण विसरतो त्यामुळे देह जरी प्राप्त झाला तरी त्याचा इष्टविकास न होण्यामुळे जन्मकर्म व जन्मजन्मांतर यातील जे कर्म आहे ते अनुकूल होत नसून ते पीडादायक होते. ही पीडा आपण अज्ञानाने संकट किंवा दुख आहे असे समजतो. ह्या 5 कोशांचा विकास होण्यासाठी श्रीसद्गुरूंनी 5 दीक्षा गुरूमार्गामध्ये सांगितल्या आहेत. त्या येणेप्रमाणे =उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरू दीक्षा व कारण दीक्षा. ह्या दीक्षा क्रमशः आपल्याला घ्यावयाच्या असतात. त्यामध्ये ‘अनुग्रह दीक्षा’ही महत्त्वाची आहे कारण त्यामध्ये पहिल्या दोन दीक्षा म्हणजे उपासना व नामस्मरण, ह्या अंतर्भुत होतात म्हणून  ही सर्वश्रेष्ठ दीक्षा आहे. पुढील ज्या दोन दीक्षा आहेत त्या आपल्या नित्य साधनेमध्ये आपल्याला सिध्द करावयाच्या आहेत. यासाठी श्रीगुरूंनी शिकविलेली नित्य साधना अत्यंत आस्थापूर्वक केली पाहीजे कारण ही सेवा काया-वाचा-मनाने केल्यानंतर तिचा लाभ म्हणजे पुढील दोन दीक्षा व कारण, महाकारण ही अवस्था आपल्याला प्राप्त होते.

समितीचे कार्य व त्याची स्थापना यामध्ये वैयक्तिक जीवनाचा समावेश होऊ न देता ज्या सेवकांना सेवा करावयाची आहे त्यांना आपली वैयक्तिक भूमिका विसरून समितीचे कार्य लोकांना समजावे यासाठी ‘निराकरण’ आणि ‘निवारण’ ही साधना सिध्द केली. ह्य़ा निराकरणात जगातील दुखात् दुखी असलेल्यालाही सहभागी करावे अशी योजना कार्यारंभीच केली. आज समितीची कार्यकेंद्रे गोव्यापासून कलकत्त्यापर्यंत म्हणजे जवळजवळ हिंदुस्थानभर व परदेशातही कार्य करीत आहेत पण ही सिध्दता झाली त्यावेळी ‘कार्य’ म्हणून योजना अस्तित्त्वात होती व त्या योजनेमागे सर्व थोर विभूतींचे आशिर्वाद होते पण कार्यार्थ केंद्रे नव्हती. तसेच आपण जन्म घेतल्यावर जीवनाचे सार्थक व्हावे व जीवन केवळ व्यर्थ खर्च होऊ नये म्हणून नित्य उपासनेत ॐकार साधना व श्रीसद्गुरू नामस्मरण स्वतः प्रत्यक्ष अनुभूती घेऊन सिध्द केले व गेल्या 50 वर्षांत ह्या साधनांची सिध्दता प्रत्येक भक्तासही अनुभवास आली आहे. 50वर्षांपूर्वी जी आजची परिस्थिती, हिचे अवलोकन करून निराकरण, निवारण व वैयक्तिक साधना सिध्द केलेली आहे.

मानवी जीवनात जे दुख म्हणून जाणवते त्याचे मूळ कारण कर्मात आहे. हे कारण समजून त्याचे निवारण कसे करता येईल याचा अभ्यास अनेक दुखी लोकांच्या जीवनातून करण्यास दोन तपे मी खर्च केली व शेवटी ‘निवारण’ याचा शोध श्रीगुरुकृपेने लावला. कार्यारंभीपासूनच गुरूकृपेने मानवी जीवनातील दुखपरंपरा नाहीशी करण्यासाठी एकच ‘रामबाण उपाय’ असावा ही माझी तळमळ होती. या इच्छेला श्रीगुरूंनी प्रतिसाद दिला की, ‘ह्या जन्मात जो कोणी कर्माने किवा धर्माने दुखी झाला आहे त्याचा शोध घेऊ नकोस. तो शोध कोणालाही लागणार नाही. शेवटी आपली पुण्याई खर्ची पडेल यापेक्षा त्या पुण्याईने जगाला कसे सुखी करता येईल असा सुविचार ठेवून जो कोणी समितीच्या मार्गदर्शनार्थ आला आहे त्याला त्याच्या दुखाचे कारण काय हे सांगण्याचे पाप करू नकोस. त्यापेक्षा त्याला पुनश्च तशी कर्मे न करण्याची सुबुध्दी व्हावी अशी प्रार्थना शिकव’, यासाठी आवश्यक अशी प्रार्थना, ’हे भगवंता नारायणा…. ’ ही प. पू. बाबांनी पूर्वीच दिलेली होती. या प्रार्थनेत सर्व काही म्हणजे कुलाचार, कुलधर्म, कुलोपासना, वास्तुदेवता, उपास्यदेवता याशिवाय गेल्या सात पिढय़ांतील वाडवडिलांची सद्गती यांचा समावेश केलेला आहे, इतकी तरतूद व सिध्दता असल्यानंतर आलेल्या भक्ताला निवारण ऐवजी निराकरण सांगणे म्हणजे ज्या घडलेल्या पूर्व कर्मामुळे तो आज दुखी आहे त्या कर्माचा पुनश्च उच्चार करणे होय. त्यामुळे प. पू. बाबांच्या आशिर्वादाने हे घडून गेलेले कर्म पुन्हा जागे करणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून श्रीगुरूकृपेने ‘निवारण साधन’ हे सिध्द केले. येणाऱया भक्ताला आशिर्वादाची गरज आहे, त्यासाठी आपली जी रोजची साधना आहे त्यातील वाटा इतराना देऊन त्यांना सुखी करण्याचे कर्तव्य भवितव्यात सेवकांनी करावे यासाठी प. पू. साईबाबांनी ‘गुरू-बीजाची’ धारणा प्रत्येकाला करून दिली आहे.

वीस शतकांपूर्वी जी परिस्थिती जगात निर्माण झाली होती तशी वेळ आताही आली आहे की आज ह्य़ा जगाला तारणारा कोणीही नाही. पूर्वीच्या काळी परमेश्वर अवतार घेत होता पण आता अवतार घेऊन त्यावर विश्वास ठेवून ‘हा परमेश्वर आहे’ असे मानणारे लोक फारच थोडे आहेत. ह्य़ा जगाचे कार्य अव्याहत चालू राहावे यासाठी आवश्यक अशी वेळही आता आली आहे. 50वर्षांपूर्वी म्हणजेच कार्यारंभी प. पू. जगद्गुरू साईनाथ महाराजांनी जी ‘दैनंदिन प्रार्थना’ सुचविली होती त्या प्रार्थनेत जे ‘बीज’आहे ते म्हणजे भवितव्यात अवतीर्ण होणारे मानवता-युग होय. जगात जन्माला येणाऱया प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुरूमंत्र जर धारण झाला तर पुढील काळात सुख, शांती, समाधानाची भरभराट प्रत्येक व्यक्तीमध्ये व्हावी अशी ईश्वराची इच्छा आहे.

भगवान येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी एक तारा त्या काळात लोकांना दिसला व त्या दिशेला लोक शोधण्यासाठी गेले असता तो तारा ‘यशदायक’ आहे असे जाणवले म्हणून त्यावेळी जन्माला आलेल्या बालकाचे नाव ‘येशू’ असे ठेवले व पुढे त्या बालकानेच लोकांना धर्म शिकविला. विश्व-कल्याणाची जन्मतःच तळमळ असली तर निसर्गसुध्दा साधकाला 100%îसहकार्य देतो, कारण निसर्गाचा धर्मच मुळी जनकल्याण हा आहे. याची प्रचिती 20 जून 1985 रोजी सर्वांना आली. तत्पूर्वी सर्व भक्तांस ‘महाकारण दिशा’ देण्याचा विधी प. पू. बाबांनी केला होता. त्यावेळी जी दिशा म्हणून दाखविली होती त्या दिशेने तो यशदायक तारा पुनश्च पृथ्वीकडे आला. अन्यथा असंख्य गॅलेक्सीप्रमाणे तो आपल्यापासून अनेक योजने दूर राहीला असता. हा तारा नवग्रहांपेक्षा अनेक पटींनी मोठा असून त्याच्यामुळे नवग्रहांचा परिणाम मानवी जीवनावर न होता त्या ताऱयाचा प्रभाव जीवनामध्ये प्रत्येकास अनुभवास येईल व असा अनुभव प्रत्येक भक्तास मिळावा म्हणून सर्व कार्यकेंद्रांवर ‘बीज दीक्षा’ दिली गेली. बींज दीक्षा म्हणजे ‘उपनयन विधी’. मुलांची मुंज जी आपण करतो त्यापेक्षा ह्या दीक्षेचा लाभ होणे हे हजार पटींनी श्रेष्ठ आहे, कारण हा शुभयोग सुमारे 2 ।। ते 3 हजार वर्षांनी आला. दिलेल्या आकृतीप्रमाणे हा तारा नभोमंडळात असेल. तो अनेक योजने दूर असल्यामुळे त्याचे अस्तित्त्व लहरींच्या स्वरूपात समजणार आहे. प. पू. बाबांच्या आज्ञेचे पालन केल्याने सर्वांचेच हीत साधणार आहे. ह्या ताऱयाचे अस्तित्त्व 15 वर्षे राहणार असून जी शक्ति ह्य़ा ताऱयापासून पृथ्वीकडे येईल त्या शक्तीचा लाभ ‘सुर’ ह्या माध्यमातून ॐकार साधना केली असता प्राप्त होईल. भवितव्यामध्ये ह्य़ा शक्तीमाध्यमातूनच जगतात मानवता युगाची निर्मिती होणार आहे”. प. पू. बाबांच्या संकेतानुसार या दिवशी सर्व भक्तभाविकांना ‘बीज दीक्षे’चा लाभ करून देण्यात आला.

आकृती.

जन्माला आल्यानंतर जिवाच्या ज्या चार अवस्था आहेत — जीव, जीवात्मा, आत्मा व परमात्मा…त्यांचा यथोचित विकास व्हावा व त्याद्वारे देहातील पंचकोशातील दोष नाहीसे होऊन नराचा नारायण होऊन अखिल विश्वात सुख, शांती, समाधानाचे बीज रूजावे म्हणून भुतलावर शक्तीपीठ स्थापन केले गेले, तसेच निसर्गातील पंचमहाभुत-तत्त्वांचा समतोल रहावा व सप्त लोकातील आत्म्यांना आत्मोध्दाराची दिशा दिसावी म्हणून जगन्नियंत्याने या दिव्य ताऱयाच्या रूपात निसर्गातही एक शक्तीपीठ स्थापन केले. निसर्गात चेतन, अचेतन व आत्मिक अशा तीन शक्ती आहेत. ह्या शक्तींचे कार्य जीवनात भिन्नाभिन्न आहे म्हणून ॐकाराची दीक्षा देऊन आपणास नित्य साधना शिकविली. या साधनेत पिंड  व ब्रम्हांड ह्या शक्तींचा समावेश आहे परंतु ह्य़ा दोन शक्ति आत्म्याशी एकरूप झाल्याशिवाय आत्म्याचे इहजगतातील कार्य काय आहे हे आपल्याला समजत नाही व जो कोणी जन्माला येतो त्याला जीवनाचे सार्थक करता येत नाही. विज्ञानाच्या अतिरेकामुळे निसर्गात उत्पन्न होणाऱया उत्पातांचा दुष्परिणाम जगतातील जीवमात्रांच्या जीवनात होऊ नये म्हणून परमेश्वराला निसर्गातील शक्तीपीठाची योजना कार्यान्वित करावी लागली. आज तेच ‘हिरण्यगर्भांतील’ शक्तीपीठ अखिल विश्वाचा सांभाळ व पालनपोषण करीत आहे याहून आम्हा मानवांचे अन्य महद् भाग्य कोणते ?

शक्तीपीठ स्थापनेनंतर 1985 च्या नोव्हेंबर महिन्यात कऱहाड येथे एक सेवक-संमेलन घेतले गेले व त्यात जे साधन सिध्द झाले तो विषय तत्पूर्वी 12 वर्षे आधी मी साधनेमध्ये घेतला होता. हा अत्यंत महत्त्वाचा विषय असून परलोकातील आत्म्यांना सद्गती कशी मिळेल व त्यासाठी काही साधना सिध्द होते की नाही हा प्रश्न प. पू. बाबांना मी विचारला होता, त्यावेळी त्यांनी सांगितले होते की “भविष्यात हेच साधन आपल्याला सिध्द करावयाचे असून त्यामध्ये धर्म किवा पंथ यांचा संबंध येता कामा नये. आज शेकडो वर्षांपासून हे शास्त्र धर्माचरणात सांगितले आहे परंतु त्याचा लाभ घेण्यासाठी व देण्यासाठी परलोक व इहलोक कार्यक्षम नाहीत. जी ॐकार साधना भक्तभाविक करीत आहेत त्यांच्या देहीक माध्यमाचा उपयोग ह्या सिध्दतेसाठी होईल. त्यासाठी प्रथमतः काया-वाचा-मन हे एक होणे आवश्यक आहे. त्यानंतर पेशी (Cells) हार्मोन्स व योनी (Organs) हे एक होतील व त्यांच्यातून द्रव पदार्थ एक्टोप्लाझम (Ectoplasm) हे द्रवेल. ह्या द्रवाच्या माध्यमातून ह्य़ा आत्म्यांची मुक्तता होईल. यापुढील ॐकार साधना ही अवधान ठेवून काळजीपूर्वक केली पाहीजे. नुसती देहीक क्रिया करून उपयोग होणार नाही. आता गुरूमार्गात श्रीगुरूंकडे काही मागावयाचे शिल्लक नसून आपण स्वयंस्फूर्तीने इतराना काही द्यावयाचे आहे व तो म्हणजे ‘कृपाशिर्वाद’. असा विचार सर्व भक्तांनी आता दृढ करावयाचा आहे. त्याचा लाभ इहलोक व परलोक यांना होईल’. असा शुभसंदेश प. पू. साईनाथ महाराजांनी देवून नित्यसाधनेत म्हणावयाच्या ॐकार व नामःस्मरणाचे कार्य काय आहे ते स्पष्ट केले. ते असे —

ॐकार.

ॐकारामध्ये काया-वाचा-मन हे एकरूप होणे आवश्यक आहे. तसेच ॐकाराच्या प्रत्येक उच्चारापूर्वी पॉज् घेऊन मग सुरूवात करावी. ‘पॉज्’ हा 3।। सेकंदांचा असून त्यामध्ये प्राणायाम होतो. त्यामुळे शरीर हे निरोगी राहून शांत राहाते. काया व वाचा यांच्या गतीबरोबर मनाची अवस्था यावयास पाहीजे. अशी त्रिपुटी झाली तरच एक्टोप्लाझम हे द्रव आपल्या माध्यमातून बाहेर येऊ लागते. विचार-अविचार यामुळे मनाची गती वाढली तर हे कार्य होत नाही, यासाठी प. पू. बाबांनी आशिर्वादाने आपल्या सर्वांच्या देहीक माध्यमात काया, वाचा, मन हे एक होणे या साधनाचा लाभ आपल्याला करून दिला आहे. ही अवस्था साधकाला दुर्मिळ अशी आहे हे साधकानी लक्षात घेतले पाहीजे, तसेच साधकाच्या शरीरातील पंचकोश हेही एक व्हावयास पाहीजेत. त्यासाठी ह्या पाच स्थानांतून पूर्वी ॐकार करवून घेतला. ही पाच स्थाने एक होऊन ह्या एकरूप अवस्थेतून उच्चार करावयाचा आहे, यासाठी ॐकाराची अंगे लक्षात घेऊन कंठस्थानातून ही साधना केली गेली पाहीजे व स्वर, ताल, लय यांचा उपयोग केला गेला पाहीजे.

ॐकार साधनेचा तपशीलः–

उच्चार :  अ + उ + म  =     (बरोबर)

उ + अ =  ओहों  X (चूक)

   पहिले अक्षर ‘अ’ याने उच्चार केला असता, ‘ओम्’ होतो. ‘म’ उच्चार करू नये. ‘लय’ इथे आल्यानंतर ‘म’ चा आपोआप उच्चार होतो. ‘उ’ ने  सुरूवात केल्यास ‘ओहोम्’ असा चुकीचा उच्चार होतो.

संथा ;-    काया    वाचा    मन  …  देहीक स्थिती

अंगे ;    उच्चार  मध्य    लय  …   (Perfection)

स्वर     ताल   लय  …    (Rhythm)

प्रमाण :   उच्चार   मध्य   लय         10 सेकंद

                           आकृती

ॐकार म्हणतेवेळी आवाज कायम ठेवावा. आवाज कमी-अधिक करणे चुकीचे आहे. याचा अर्थ Voice पाहीजे Volume नको.

थांबणे; (Pause)=ॐकार उच्चार 10 सेकंद केल्यावर 1 सेकंद थांबावे. हात पुन्हा जागेवर10सेकंदांत न्यावा. म्हणजे नैसर्गिक श्वास घेण्यास जो वेळ लागतो, त्या वेळात हात जागेवर न्यावा. पुढील ॐ सुरू  करण्यापूर्वी 1 सेकंद थांबावे. म्हणजे एकूण पॉज 3।। सेकंद व हाताची क्रिया 90 अंश असावी.

आकृती   1, 2, 3, 4

ॐकार साधनेस बसतेवेळी सहजासनामध्ये सरळ बसावे. मान सरळ ठेवावी. शरीर मोकळे असावे. अधिक ताठ बसू नये. श्वास उच्छ्वास ही क्रिया नैसर्गिक झाली तरच प्राणायाम होईल म्हणून या साधनेत श्वास नाकाने 1।। सेकंदात घेऊन  10 सेकंदात तोंडाने ध्वनित करून सोडला असता नैसर्गिक प्राणायाम होतो व शरीराचे गुणधर्म सुधारण्यास मदत होते म्हणजेच कफ, पित्त, वात हे समतोल होऊन त्यामुळे श्वसन क्रिया, पचन क्रिया व रक्ताभिसरण ह्या क्रिया व्यवस्थित होतात.

न्यास :-ही क्रिया बाह्यांगाने आपण करीत असलो तरी त्याचा संबंध शरीराच्या अंतर्गत रचनेशी असतो. शरीरातील अंतर्गत माध्यमे म्हणजे श्वसनक्रिया, पचनक्रिया व रक्ताभिसरण ह्या क्रिया विसंगत असतील तेव्हा शरीरातील कार्यात बिघाड होत असतो व त्यामुळे रक्तदाब, हृदयविकार, आम्लपित्त, बध्दकोष्ठ इ. रोग शरीरात होत असतात. ही शरीरातील अंतर्गत माध्यमे एकमेकाला पूरक असून त्यांचे कार्य एकमेकांवर अवलंबून आहे. ह्या माध्यमांना पूर्ववत् क्रिया करण्यास वाव देणे किंवा त्यासाठी व्यायाम देणे म्हणजे ‘न्यास’ होय. म्हणून न्यास करतेवेळी वरील प्रमाणे ॐकार साधनेची अंगे ही काळजीपूर्वक विचारात घेऊन त्यांचे अवधान सांभाळले पाहीजे, अशा रीतीने न्यास केले असता शरीर निरोगी राहून एक्टोप्लाझमचा पुरवठा अधिक होत असतो. न्यास ही देहीक क्रिया असून त्यामुळे शरीरातील अंतर्गत रचनेस आकार प्राप्त होतो. यासाठी न्यास 5 प्रकारांनी करावयाचे असतात. न्यास ही क्रिया दोन हातांनी करीत असता ॐकार उच्चाराने जे स्पंदन (Vibratios) शरीरात धारण होते ते स्पंद लहरींच्या रूपाने दोन्ही हातांची बोटे व तळवे यामधून  उत्सर्जित होतात. त्यावेळी न्यासाची क्रिया देहाला जाणवली पाहीजे. यासाठी हात अंगावरून फिरवीत असता त्याचा स्पर्श मोरपिसासारखा असावयास पाहीजे तरच ॐकार ध्वनी म्हटल्यावर त्या उच्चाराने शरीर कंपायमान होते. हाताची बोटे सरळ ठेवावयाची असून शरीराशी समांतर ठेवावीत.

प्रमाण (Scale) :- 15 सेकंद

उच्चार                    मध्य                         लय

श्रीसद्गुरूनामस्मरणः-

हे साधन पाच कोशांशी संबंधित आहे व कंठातून जो उच्चार होतो तो ‘आवाज’ असा नसून ‘ध्वनि’ असा आला पाहीजे. ह्या पाच कोशांचा विकास झाला याचे अनुमान म्हणजे कंठातून होणारा उच्चार ध्वनि असा ऐकू येतो. हा ध्वनि पिंडाचा असून त्यातून ध्वनि-लहरी-ध्वनि हे अंग अनुभवास येते. अशावेळी स्वर-ताल-लय याचे अवधान अति महत्त्वाचे असून स्वर व लय हे सारख्या प्रमाणात उच्चारले गेले पाहीजेत व हार्मोनियममधील जो स्वर आपल्याला ऐकू येतो त्या स्वराच्या गतीशी आपला उच्चार व लय एकरूप व्हावयास पाहीजेत व हा ध्वनी उच्चार–मध्य–लय ह्या अंगानी म्हणजेच ध्वनि-लहरी-ध्वनि असा स्पष्ट उच्चारला गेला पाहीजे. ही अवस्था पिंडाची असून त्याच क्रियेतून भवितव्यात ब्रम्हांडाची प्राप्ती व्हावयास पाहीजे. यासाठी जो उच्चार ध्वनि असा आहे तो वरील अंगानी अवधान ठेवून ‘ध्वनित’ केला तर हेच साधन ब्रम्हांडाचे झाले ! ह्य़ायोगे पाचही कोशांचे एकरूपत्व जेव्हा होते तेव्हा हे कोश ‘पंचप्राण’ होतात. ह्या अवस्थेस ‘पाचामुखी परमेश्वर’ असे म्हणतात. श्रीसद्गुरू नामस्मरण म्हणजे ।।ॐ श्री साईनाथाय नमः।। ही 9 अक्षरे संथेने म्हटली तरच त्याचा लाभ अधिक प्रभावी होतो. ही संथा काळजीपूर्वक म्हणून उच्चार स्पष्ट केला गेला पाहीजे. यातून देहीक व आत्मिक प्रगती आपल्या नित्य साधनेत करावयाची असते.

संथाः-

( आकृती )   उदात्त , अनुदात्त, स्वरित

स्वर,    ताल,     लय

व्यक्ताव्यक्त ॐकारः–

हीं क्रिया दोन्ही हातांनी करावयाची असते. शरीरातील अशुध्द रक्त हृदयाकडून फुफ्फुसाकडे शुध्द होण्यासाठी येते. जो श्वासोच्छ्वास आपण करतो त्यामध्ये श्वास म्हणजे ऑक्सिजन शरीरात घेणे व उच्छ्वासामध्ये कार्बनडायऑक्साईड सोडणे ही क्रिया होत असते. अशावेळी श्वास घेणे व थांबणे ही क्रिया 3।। सेकंदामध्ये करावयाची असून श्वास नाकाने घ्यावयाचा आहे व श्वास सोडण्याची क्रिया तोंडातून 10 सेकंदामध्ये  ॐकाराचा उच्चार ध्वनित करून केली असता हा व्यायाम अतिशय शास्त्रोक्त असा होतो व रक्ताभिसरण आणि श्वसनक्रिया यामधील अनियमितपणा दूर होतो. त्यामुळे जे एक्टोप्लाझम शरीरात निर्माण होत असते त्याची निर्मिती संपूर्ण शरीरामध्ये होऊ लागते. ह्य़ाच अवस्थेला ‘अहंकार’ म्हणजे; अहं+आकार’ असे म्हणतात.

धारणा ॐ कारः–

ह्य़ा अवस्थेत उजवा हात हृदयस्थानावर मूठ घट्ट न करता हळुवारपणे चार बोटे एकत्र व अंगठा वर अशी मुद्रा करून ठेवावा. ॐकाराचा उच्चार अवधान ठेवून करीत असता ज्या लहरी निर्माण होतात त्या संथपणे संपूर्ण शरीरात सामावणे ही क्रिया व्हावयास पाहीजे. अशा रीतिने ॐकार साधनेतील लहरी यांचा समावेश संपूर्ण शरीरात होतो किंवा ही अवस्था जेव्हा लहरींच्या रूपाने शरीरात निर्माण होते तेव्हा ‘समाधान’ ही अवस्था व्यक्त होते. ह्याच क्रियेला‘साधकाला नामी तत्त्वाची कृपा होणे’ असे म्हणतात.

संथा :-  उच्चार   मध्य    लय

स्वर     ताल    लय

आकृती

ह्या साधनेमध्ये ॐ कार व नामस्मरण कंठस्थानातून म्हणावयास पाहीजे, यासाठी सर्वांच्या सोयीचा स्वर म्हणजे हार्मोनियममध्ये वाजवला जाणारा ‘काळी एक’ आहे. ह्या स्वरात परिपूर्ण साधना म्हणावयाची असून त्याचे अनुसंधान लक्षात घेतले पाहीजे. नुसते साधनेस उपस्थित राहून व ‘मी साधना केली’ असे म्हणून काहीही साध्य होणार नाही, यासाठी पहिले अनुसंधान ‘स्वर’ या अंगाचे ठेवले पाहीजे.

श्री साई अध्यात्मिक समितीच्या मार्गदर्शनार्थ आजपर्यंत ज्या पुण्य विभुतींच्या आशिर्वादाचा लाभ ह्या कार्यपध्दतीस झाला आहे त्यात हाजी हजरत ख्याजा मोईनुद्दीन चिस्ती (अजमेर) यांच्या अज्ञेनुसार मला श्रीक्षेत्र बाळेकुंद्री येथे जाण्याचा योग आला व त्यानंतर श्रीपंत महाराजांच्या पदामधील अवीट गोडी व त्यातील ‘शब्दब्रम्ह’ अनुभवास आले. या घटनेस पंचवीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यापुढील सिध्दता म्हणजे श्रीनाथपंथातील सिध्दसाधने यांचा लाभ पुढील काळात सुलभपणे सर्वांना व्हावा यासाठी ही सिध्दसाधने 1985 च्या मकर-संक्रांतीचे दिवशी श्रीगोरक्षनाथांच्या आशिर्वादाने श्री पंत महाराजांच्या पदामध्ये सामावण्यात आली. तेव्हापासून ‘आरती’ हा नित्यसाधनेचा एक प्रमुख भाग झाला आहे. आता प्रत्येक कार्यकेंद्रावर होणाऱया नित्य आरतीतूनच आपला देहीक विकास होत आहे. आरती ही साधना स्वर, ताल, लय व उदात्त, अनुदात्त व स्वरित यानी युक्त असली पाहीजे. ‘आरती’ ह्या शब्दामध्ये ‘आर्त’ हा मूळ धातू असून ईश्वराबद्दलची आर्तता म्हणजे आरती होय. अशी आर्तता आपल्या देहीक माध्यमातून व्यक्त झाली पाहीजे व नित्य ॐकार साधनेतून देहातील 19 माध्यमे उदित झाली तरच ही आत्म्याची आर्तता व्यक्त होईल म्हणून ॐकार म्हणत असतानाही स्वर-ताल-लय;उच्चार, मध्य, लय; उच्चार, आचार, विचार व सुर, नाद, निनाद ही बारा अंगे विचारात ठेवून पूर्ण अवधानाने नित्य साधना केली गेली पाहीजे.

कोणताही विषय व्यक्त करण्यास शब्द लागतो पण शब्दामध्ये काय ‘शब्द’ आहे हे वाचणाऱयास समजता कामा नये. उलट त्याची स्थिती बदलली गेली पाहीजे. ज्ञान हे प्राप्त होणे अत्यावश्यक आहे पण ते ज्ञान इहजगताला तारणारे पाहीजे. शब्दांची कसरत करून पुष्कळ ग्रंथ लिहिले जातात व त्या ग्रंथांना ‘सुबोध’ म्हटले जाते. पण तो वाचणाऱयाला ग्रंथी आल्या म्हणजेच ग्रंथातील ज्ञान. जर कोणाचे अज्ञान होणार असेल तर लिहिले योग्य नाही. माझ्या आसपास शेकडो विषय डोलत होते. पण तरीही मी ‘आज्ञे’ची वाट पाहिली व मग लिहीण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये इहजगताला तारण्यासाठी काही मार्ग आहे का, ही विचारणा विचारात धेऊन समितीची कार्यपध्दत काय आहे व भक्तांचे कर्तव्य काय आहे हा प्रश्न जगासमोर मांडला. जग ही भूमिती आहे, तो सोंगटय़ाचा पट नाही. हे साधकाने लक्षात घेतले पाहीजे. कोणताही विषय शब्दांनी मांडल्याशिवाय व्यक्त होत नाही पण त्या शब्दातून आपला वास न येता श्रीगुरूंचा यावयास पाहीजे. आजपर्यंत 30 वर्षांत जे जे आवश्यक होते तेवढेच लिहिले. ते वाचता वाचता आपण संपून जाऊ, पण शब्द हे ब्रम्ह राहीले पाहीजेत. मनाला एकदा गती मिळाली की पुढे सद्गती मिळावयास पाहीजे. नुसती गती मिळून इतराना बोध झाला नाही तर त्या परत्वे दुर्गती होता कामा नये, यासाठी थोडके बोलावे व लिहावे. त्यासाठी विचार हे वर्षानुवर्षे बुध्दी, मन यात राहून उपयोगी नाहीत. बुध्दीतील विचार, मन व  त्यानंतर अंतःकरणात रूजावे लागतात. यासाठी चिंतन करावे लागते, नुसती चिंता उपयोगी नाही, मग मनुष्याचा शेवट चितेमध्ये होतो. या तत्त्वांचा विचार सदैव करणे म्हणजे ईश्वरभक्त ! नश्वरभक्त पुष्कळ आले व गेले. याची गणती नाही. आजचा विचार ही पुढची ‘नांदी’ आहे. त्याच्या आधी ह्या जगाचा मोह टाकून देऊन ‘नांदी’ हे तत्त्व सिध्द होण्यासाठी नाद पाहिजे पण जगाला जागे करण्यासाठी ! ऐहिक सुखाचा नाद एकदा लागला की मरेपर्यंत हा नाद सुटत नाही व शेवटी त्या नादाचे रूपांतर वासनेमध्ये होते. जन्माला येऊन ‘वासना’ ही पाहिजेच पण शेवटी ‘वास’ राहीला पाहीजे. म्हणून ‘शेवट गोड करी’ हे मागणे साधक मागत असतो.

गुरूमार्गात अनेक लोकांच्या गाठीभेटी होतात, पण कोणालाही निश्चित हे सांगता येत नाही की हा जो कोणी गुरूभक्त भेटण्यास आला त्याचा हितसंबंध गुरूंशी काय आहे ? तर येणारे जे भक्त आहेत त्यामध्ये चार प्रकारचे वर्ग आहेत. जो कोणी जन्माला येतो त्याला काया, वाचा व मन यांचे बंधन असल्याशिवाय जन्माला येता येत नाही. अशावेळी गुरूंच्या भेटीला आरंभ होतो कारण कर्माची गाठ ही प्रत्येकापाशी आहे. त्या कर्माच्या गाठीमुळे गुरूंची गाठ पडते. पहिल्या अवस्थेत जेव्हा आपण कायिक असतो अशावेळी अनुकूल व प्रतिकूल असा कर्माचा खेळ चालू असतो. अशावेळी हा खेळाचा खंडोबा झाला की तो जागा होतो व त्यावेळी कर्म म्हणजे काय, ह्या कर्माशी आपला संबंध काय आहे व ह्या कर्मातून आपली सुटका झाल्याशिवाय आपल्याला सुख लाभणार नाही असे सिध्द झाल्यावर  पहिला मार्ग ‘भुत-भविष्य’– ह्या मार्गाकडे आपण जातो. आपल्याला ही कला अवगत नसल्याने आपण ज्योतिषाकडे जातो व आपले भविष्य विचारतो. वास्तविक जो त्रास झाला आहे तो ग्रहांमुळे नव्हे तर कर्माने झाला आहे. जे जे कर्म आपल्याला अनुकूल नसेल त्याला अनुकूल करून घेणे असा जीवनाचा अर्थ आहे. पण प्रत्येकजण आज अनर्थाने वागू लागला आहे. त्यामुळे जे जे आपल्याला प्राप्त होते ते सुख पूर्वजन्मावर आहे हे आपण विसरतो.

आजचा हा जन्म म्हणजे काया, वाचा, मन हे जीवन भोगण्याचे माध्यम आहे, तेव्हा आपल्याला दुख झाले आहे म्हणून त्याचे निवारण कसे होईल ह्या विचारांनी अनेक मार्गांचा अवलंब केल्यावर ‘गुरूं’चा शोध आपण घेऊ लागतो. आज ह्या जगात प्रत्येकाला सुख पाहिजे पण ज्या सुखाची अपेक्षा आपण करतो ते सुख कष्ट न करता आपल्याला कसे प्राप्त होईल असा विचार प्रत्येकाच्या ठिकाणी वास करीत आहे. अशावेळी गुरूभेटीस आल्यावर जी आपण सुखाची याचना करतो त्याची किंमत किती आहे असा प्रश्न आपण स्वतःशी कधीच करीत नाही. दैनंदिनी जेव्हा आपण बाजारात जातो त्यावेळी प्रत्येक वस्तूला किंमत आहे व ती किंमत दिल्याशिवाय आपल्याला ती वस्तू मिळत नाही हा विचार आपण सुज्ञपणे करतो. गुरूमार्गात आल्यावर जे सुख आपल्याला मिळते ते सुख आपल्याला आशिर्वादाने मिळते. हे जे सुख आपल्याला गुरू देतात व प्राप्त होते ते सुख पैशांनी मोजता येत नाही तर जे सुख आपल्याला मिळाले आहे त्याच्या मोबदल्यात आपल्याला सेवा करावयाची असते. ही व्यावहारिक देवाणघेवाण गुरूमार्गात आहे. अशा सुखाचे आपण वाटेकरी होतो पण सुखाच्या मोबदल्यात आपण सेवा केली नसल्याने ती सेवा आपल्या माध्यमातून झाल्याशिवाय आत्मा आपल्याबरोबर येत नाही व आपण सेवा करू त्या सेवेत आत्मा म्हणजे चैतन्य असल्याशिवाय पुढील जन्मांची तरतूद होत नाही ! जगात जो मनुष्य एकमेकांचे पैसे घेतो ते पैसे त्याला परत करावे लागतात. हा व्यवहार आहे पण जीवनातील हा व्यवहार म्हणजे प्राप्त झालेल्या सुखाप्रीत्यर्थ सेवा करणे हे आपण विसरलो आहोत म्हणून आपल्याला कितीही धनप्राप्ती झाली तरी सुख, शांती, समाधान आज नाही. आज आपल्याला देवधर्म नको आहे, फक्त दिवसरात्र चैन करावी असा जीवनाचा धर्म बनला आहे. ह्या आपल्या विचार-आचारामुळे निसर्गसुध्दा कोपला आहे. कितीही ऐहिक प्राप्ती मिळाली तरी त्या प्राप्तीमध्ये यश व ‘यशाचा अंश म्हणजे ईश्वर’ हा नसल्या कारणाने जे जीवन  आपण जगतो आहोत त्या जीवनात अपेक्षा, उपेक्षा ही सदैव नांदते आहे. अशा जीवनाला ‘जीवन’ म्हणता येणार नाही, तेव्हा सुज्ञ भक्तांनो, जागे व्हा !

वर्षांनुवर्षे मनुष्य 24 तास आपले जीवन व्यर्थ खर्च करीत आहे. ह्या 50 वर्षांत कोणी मानवाने काही पुण्य केले असेल असे वाटत नाही. दैनंदिन जीवनात सकाळपासून झोपण्यापर्यंत जुगार, क्लब, रेस आदींचा शौक आपल्याला लागला आहे पण शेवटी ‘शोक’ करावा लागतो व एवढे मौल्यवान जीवन प्राप्त होऊनही ह्या जीवनात ‘शेवट गोड करी’ असे म्हणता येत नाही. कोणीही जन्माला यावे व कोणीही मरून जावे, असे जीवन आज प्राप्त झाले आहे. आजचे जीवन संपूर्ण ईश्वरवादी असे नको आहे. ‘जसे प्रत्येकजण आपल्या पोटासाठी मिळवितो  आहे, त्याप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने जर ।। सद्गुरूनामस्मरण ।।  केले तर आजची समस्या मिटेल. हे जग आपण पाहात आहोत, ह्या जगाचा निर्विवाद आपण बळी घेणार आहोत’ पूर्वी हीच जगाची अवस्था प. पू. बाबांच्या वेळी झाली होती. तेव्हा प. पू. बाबांनी उपदेश करून करून हे जग शंभर वर्षे जगविले पण ‘आता त्यापेक्षाही दिवस अतिशय वाईट आले आहेत व पुढे येणार आहेत’, अशी पूर्वसूचना प. पू. बाबांनी केली तेव्हा या जगाचा कसा सांभाळ करता येईल या तळमळीने मी अस्वस्थ झालो. ही तळमळ सर्व भक्तांनी आपल्या आपल्या जन्मात ठेवावी व आपले जीवन पारमार्थिक व्हावे अशी मी प. पू. बाबांच्या चरणी प्रार्थना केली.

पुढे मुंबईला साधना-संमेलन आयोजित केले होते. त्यावेळी श्रीशेषपंचमीचा दिवस होता. संचार अवस्थेची अनुभूती मला श्रीशेषांनीच दिली होती व पूर्वी लहानपणी मी सातारला डोंगरावर श्रीभैरवनाथांच्या सेवेस जात असता तिथे श्रीशेषांचे दर्शनही झाले होते. या गोष्टीस 60 वर्षे झाली असता, प. पू. साईनाथांच्या आज्ञेने या श्रीशेषपंचमीस सर्व कार्यकेंद्रावरील भक्तांच्या नित्य साधनेत बदल करण्यात येऊन नित्य साधना अनुष्ठान पध्दतीने म्हणावयाची आज्ञा झाली. साधनेत बदल केला तो यासाठी की पाच कोश व त्यातील पंचप्राण एक केले असता त्या अवस्थेला ‘ज्योतिष्मती’ असे म्हणतात. पारमार्थिक मार्गात ही अवस्था परमोच्च आहे. मला या अवस्थेचा लाभ श्रीऔदुंबर क्षेत्री झाला होता, तरी या अनुभूतीचे संक्रमण भक्तमाध्यमांत होऊन जगाचा सांभाळ करावयाचे कार्य आता कार्यान्वित होऊ लागले.

आज आम्हा मानवांची हजारें वर्षांपासून अधोगती चालली आहे व शेवटी जो मानव होता तो आता दानव झाला आहे. दैनंदिन जीवनात खाणेपिणे, कपडालत्ता आदी सुखांची अपेक्षा धरून आपण सुखी कसे होऊ, हे दुख समाजात आहे. याचे मूळ कारण जीवनाचे ज्ञान आपल्याला नाही. हजारो वर्षांपासून साधुसंतांनी जी शिकवण आम्हाला दिलेली आहे तिचा विसर आज आपल्याला पडला आहे म्हटल्यावर आपण सुखी कदापिही होणार नाही. सुखप्राप्तीसाठी अनेक प्रयत्न अपयशी झाल्यावर आपण जागे होतो तेव्हा देव काय म्हणतो आहे किंवा साधुसंत काय म्हणत आहेत याचा विचार करू लागतो. अशावेळी देवधर्म व त्यांचे आचार, विचार हे लांबदूर आहेत असे वाटू लागते. जेव्हा आपल्याला काही करावयाचे होते ती वेळ निधून गेली व आता आपण मानवी जीवन जगत नसून दानवी जीवन जगत आहोत. जे प्रेम सर्वाभुती होते ते प्रेम आता पैशावर राहीले आहे. अशावेळी ह्या बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला मार्ग कोण दाखविणार असा प्रश्न आहे. ‘जरी आपण मानवाचे दानव झालो आहोत तरी परमेश्वर बदललेला नाही तेव्हा देवाला शरण गेल्यावर, तोच मार्ग दाखवील’, असे अनेक वर्षांपासून संतांनी सांगितले आहे व म्हणूनच श्रीसाईबाबांनी अवतार घेतला. जो मार्ग अवघड होता तो सोपा केला. इतकेच नव्हे तर नाथांची परंपरा आपल्या साधनेत समाविष्ट केली. ही परंपरा म्हणजेच आज आपण जे करीत आहोत ते अनुष्ठान ! ह्या अनुष्ठानामध्ये श्री आदिनाथ ते श्रीसाईनाथ हे सिध्द आहेत, म्हटल्यावर जे आपण अनुष्ठान करू किवा म्हणू हे अनुष्ठान स्वर, ताल, लय आदिंनी  युक्त असे म्हटले असता आपल्याला जीवनात प्रापंचिक व पारमार्थिक अशा जीवनाचा लाभ होतो. आज आपण साधक आहोत, पुढे सिध्द होणार व साध्य आपल्याला ह्य़ाच जन्मी मिळणार यासाठी प. पू. साईनाथ महाराजांनी या श्रीशेषपंचमीच्या दिवशी सर्वांना शुभाशिर्वाद दिला.

जगताचा सांभाळ करावयाचा म्हणजे प्रथमतः आपला विकास झाला पाहीजे व त्यासाठी जी साधना वेळोवेळी आपल्याला आज्ञेनुसार शिकविली आहे तिची उजळणी करावयास पाहीजे कारण साधना ही देवाप्रीत्यर्थ नसून आपली प्रगती किती झाली आहे याचा अंदाज साधकाला आला पाहीजे. प्राप्त जन्म हा अविकसित होता त्याचा विकास होणे म्हणजे जो ‘जीव’जन्माला येतो त्याचे स्थित्यंतर ‘आत्मा’ असे व्हावयास पाहीजे व त्यापरत्वे इतराना शिकवण द्यावयास पाहीजे. आपण जेव्हा गुरूआज्ञेनुसार साधना करू तेव्हा ‘कारण अवस्था’ म्हणजे दीक्षा सिध्द होईल. आपल्याला कारणदीक्षा दिली म्हणजे प्रत्यक्षात त्या दीक्षेची ओळख करून दिली. त्यानंतर साधना सात प्रकारांनी म्हणजे सात माध्यमांतून करावयाची आज्ञा झाली तेव्हा ही साधना सिध्द झाली. सात प्रकारे साधना केली तेव्हा एक आवर्तन झाले व अशी तीन आवर्तने म्हटली गेल्यावर ‘महाकारण दीक्षा’ व अशी 21 आवर्तने झाल्यावर ।।ॐ श्रीसाईनाथाय नमः।। हे नामस्मरण सिध्द झाले. याच साधनेच्या क्रमातून आपण गेलो असता इहलोक, परलोक व स्वर्गलोक याची प्राप्ती आम्हा मानवांना होईल. यासाठी नित्य साधना ही देवांसाठी नसून आपल्याचसाठी आहे हे लक्षात घेऊन साधनेकडे अधिक लक्ष द्यावे अशी आपणा सर्वांस विनंती  कारण ह्या साधनेचे संधान पुन्हा कोणत्याही जन्मात प्राप्त होणार नाही ! नित्य साधना ही केवळ आपल्यासाठीच असली तरी केलेल्या साधनेचे फल इतराना प्राप्त झाले पाहिजे हा इप्सित हेतू मनाशी बाळगून साधना करावी. ‘गुरूआज्ञा आहे’ असे आज्ञेचे ओझे आपल्यावर आहे असे समजून साधना कदापिही करू नये. तशी जर साधना केली तर त्या साधनेचे परिणाम म्हणजे अधिक दुखी आपण व पर्यायाने जगही दुखी होईल,

कार्यकेंद्रावर येणाऱया प्रत्येक भक्ताची अडीअडचण समजावून घेऊन त्याच्या दुखाचे निवारण होण्यासाठी निराकरण सूचित करावयाचे कार्य गुरूआज्ञेने मी जरी करीत होतो तरी एक विचार मनात सारखा येत असे की ही अडीअडचण क्षणिक सुखाची  प्राप्ती करून देण्यासाठी आहे. भक्तांच्या जीवनात व त्याच्या कुटुंबातील पुढील अनेक पिढय़ांमध्ये चिरंतन सुख, शांती, समाधान नांदावे म्हणून काही शाश्वत असे निराकरण असावयास हवे. कार्यारंभी ईशचिंतनाची गोडी समाजाला लागावी म्हणून आरती व कामकाज ही साधन-माध्यमे गुरूआज्ञेने मी अंगीकारली. त्यानंतर श्रीक्षेत्र नरसोबा वाडी येथे दर पौर्णिमेला…असे 11 पौर्णिमांना रूद्रहवन व  त्यानंतर महारूद्र स्वाहाकार केला गेला, त्या आधी पाच वर्षे मी कामकाज बंद करून माझी वैयक्तिक साधना सुरू केली. या साधनेचा विषय अखिल विश्वाला चिरंतन सौख्य लाभावे, हा होता. त्यानंतरच आपणा सर्वांना सुख, शांती, समाधान लाभावे म्हणून आपल्याला तीन प्रतिमा दिल्या गेल्या.

आज भूगर्भात जे शक्तीपीठ स्थापन केले आहे त्यातील शक्तीला आवाहन श्रीक्षेत्र नरसोबा वाडी येथे जेव्हा ‘श्रीमहारूद्र स्वाहाकार’ केला गेला, त्यावेळी केले गेले होते. पुढे ही शक्ति गुरूरूप झाली व त्या शक्तीमध्ये देवादिकांची शक्ति विलीन झाली तेव्हा शक्तीपीठाची स्थापना केली गेली. ह्या आद्य शक्तीपीठामध्ये प्रतिक-प्रतिमा-प्रतिभा अशा शक्ति अधिष्ठित करण्यासाठी 5 वर्षांनी गोवा कार्यकेंद्रावर नवरात्र पूजन केले गेले. हे पूजन प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चालू होते. ह्या तीन शक्ति जेव्हा एक झाल्या तेव्हा ‘प्रकाश’ म्हणजे ‘हिरण्यगर्भ’ ही अवस्था ‘उदयाला’ आली. आता तुमच्यापाशी ज्या तीन प्रतिमा आहेत त्या जेव्हा नित्य साधनेने एकरूप होतील तेव्हा तुम्हाला ‘प्रकाश’ ही अवस्था प्राप्त होईल, त्यासाठी ह्या विजया दशमीला प. पू. श्रीसाईनाथ महाराजांनी सर्व भक्तभाविकांस असा आशिर्वाद दिला की “जगाला जेव्हा प्रकाशाचे अस्तित्त्व समजेल तेव्हा अंधार म्हणजे अज्ञान लयाला जाईल”.

अनादी कालापासून आपण देवाला मानत आलो आहोत व आपल्यापाशी देवाच्या प्रतिमा पूजनांमध्ये आहेत. आपल्या पूर्वजानी ह्या मूर्तींची स्थापना केली म्हणून आपण ह्या प्रतीकांना ‘देव’ असे संबोधते. वास्तविक ह्या प्रतिमांमधील देवत्त्व लयाला गेले आहे. कारण आपल्याला मंत्र, तंत्र व यंत्र ह्याचा उच्चार करता येत नाही. जर आपल्याला उच्चार म्हणता येत नाही तर देवाचे देवत्त्व आपल्याला अनुभविण्यास दीर्घ काळ लागेल व ही त्रिपुटी जर आपल्याला अवगत झाली तरच देवाचा ‘प्रसाद’ मिळेल. आपल्या घरोघरी जे देव आहेत ते अशा प्रकारचे आहेत. ‘देव’ म्हटल्यावर आपल्यापाशी भाव पाहीजे. नुसते पूजा-पाठ इत्यादी जे आपण करतो ते कर्म आपल्याकरवी ‘उपचार’ म्हणून होते. त्या कर्माने काही इष्टफल द्यावे असे नाही. वास्तविक

देवाची प्रतिमा व त्याची स्थापना आपल्या जीवनात बोलती-चालती व्हावी अशी जर का आपली इच्छा असेल तर त्यासाठी तपश्चर्या करावी लागते. केवळ दुकानावून पैसे देऊन आपण देवाच्या मूर्ती आणतो, म्हणून ती मूर्ती देवाची नाही. ती केवळ एका धातूची असेल, या व्यतिरिक्त त्यात अन्य अर्थ नाही असा अनुभव मी स्वतः घेतला आहे. म्हणून प. पू. बाबांना अशी प्रार्थना कार्यारंभी मी केली होती की येणारे जे भक्त आहेत त्यांच्या घरी एकतरी प्रतिमा असू दे की ज्यामुळे त्यांचे जीवन सुखी होईल ! पण कार्यारंभी ‘प्रतिमा’ म्हणजे काय हे समजले नाही.

आज कार्य करता करता 37 वर्षे झाली व त्या 37 वर्षांत जे काही गुरूआज्ञेचे पालन मी केले त्यामुळे या तीन प्रतिमा आपल्याला देऊ शकलो. ह्या तीन प्रतिमांमध्ये महाकारण ही प्रतिमा अशी आहे की ज्यामध्ये आपले गुरू व गुरूतत्त्व आहे. सोने हा धातू अतिसूक्ष्म आहे व गुरूंची कृपा सूक्ष्मातून येत असते म्हणून ‘महाकारण प्रतिमा’ प्रत्येकाकडे असावयास हवी. ‘महाकारण’, ही पारमार्थिक प्रतिमा आहे व बाकी दोन प्रतिमा ह्य़ा प्रापंचिक आहेत.

पूर्वीच्या काळी आपल्या देव्हाऱयात जे देव असावयाचे त्यामध्ये एकतरी प्रतिमा किवा टाक सोन्याचा असावयाचा. त्या काळात लोक जे आचरण करीत होते ते केवळ भावनेने. आज आपण विज्ञानी आहोत. विज्ञानामुळे सोन्याची अतिसूक्ष्म तार काढता येते तेव्हा आपण जी उपासना किवा साधना करू तिचे माध्यम म्हणून महाकारण प्रतिमा आहे. आज घरोघरी असणारे जे देव आहेत ते लयाला गेले आहेत म्हणून आपल्याला देवाचे आचरण करूनसुध्दा सुख-शांती मिळत नाही व म्हणून श्रीजगद्गुरूंनी आपल्या सामर्थ्याने ह्य़ा प्रतिमा सिध्द केल्या. ‘त्यांचा अनादर होऊ नये असे आचरण सर्व भक्तांनी ठेवले पाहीजे. कारण जरी आपल्याला त्यांचा लाभ आज नसेल तरी पुढील पिढीला त्याचा लाभ निश्चित होणार आहे’, असा संदेश प. प. बाबांनी दिला.

एकीकडे येणाऱया भक्ताच्या आत्मिक विकासासाठी गुरूआज्ञेने मी तीन प्रतिमा दिल्या व त्यावेळी ‘कामकाज’ करणे ही सेवा मला बंद करावी लागली, परंतु प्रश्नार्थ येणारा भक्त हा गरजू असतो. तो जी अडचण घेऊन येतो ती अडचण हेच त्याचे सर्वस्वी जीवन आहे असे त्याला वाटत असते, अशावेळी ‘मी कामकाज करत नाही’ म्हणून त्याला निराश होऊन परत पाठविणे हेही मला योग्य वाटेना. त्यावेळी प. पू. गुरू आज्ञेने मी सेवक माध्यमे तयार करू लागलो व आजही समितीच्या सर्व कार्यकेंद्रावर पूर्वीइतकेच सहजपणे भक्तभाविक कामकाज साधनेचा लाभ घेत आहेत

जगातील गुरू व भक्तांचे कर्तव्य काय आहे हे आपल्याला समजत नाही व त्यामुळे अनेक भक्त गुरूमार्गी होऊनसुध्दा ह्या मार्गाला वंचित होतात कारण जो आपला जन्म आहे त्यामध्ये, गुरूंचे स्थान देवापेक्षाही अधिक आहे. आपण अनेक जन्म घेऊन ह्य़ा जगात सुखदुखाचे वाटेकरी होतो, त्यातून आपली सुटका कशी करावी हे भक्तांना न समजल्यामुळे पुन्हा जन्म व पुन्हा मरण हा फेरा सदैव चालू असतो. अशावेळी पश्चात्ताप होऊन एखाद्या जन्मात सत्कृत्य घडल्यामुळे ह्य़ा जन्मी  पुन्हा गुरूंची भेट होत असते. ती भेट सुख भोगण्यासाठी नसून जो जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे त्यापेक्षा अधिक चांगला जन्म पुन्हा मिळावा किंवा जन्मालाच येऊ नये अशी तरतूद करण्यासाठी गुरूंची भेट ह्या जन्मात होत असते. तेव्हा गुरूंची भेट होते त्याला वरीलप्रमाणे कारण असते. सामान्यपणे आपण ह्या जगात वावरत असतो, त्यामुळे इतराना जे सुख मिळाले आहे असे आपल्याला दिसते तसे सुख आपल्याला मिळावे अशी अपेक्षा प्रत्येकाची असते. यासाठीच गुरूंच्या शोधासाठी आपण जातो. जगतात आपण जन्माला आल्यानंतर आपले कर्तव्य हे आपण विसरतो. तरी जन्माचे कारण गुरू आपल्याला निवेदन करतात. त्याकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे आपले आचरण घडले पाहीजे. ते जे सांगतात ते लक्षपूर्वक विचारात घेऊन त्यावर लक्षपूर्वक विचार केला पाहीजे. कारण वारंवार गुरूंची भेट होत नाही. जेव्हा आपण अनेक जन्म घेतो त्या कुठल्या तरी जन्मामध्ये गुरूभेटीची तरतूद केलेली असते व त्या जन्मात आपल्याला काही एका अडचणीमुळे म्हणजे एका निमित्ताने गुरूंची भेट होत असते. अशी भेट अत्यंत अमौलिक आहे. हे आपण विसरल्यामुळे ‘अधिक सुख प्राप्त करण्याचा मार्ग  म्हणजे गुरूमार्ग’ असा समज अनेक लोकांचा होत असतो.

आपण सर्वजण अडीअडचणी घेऊन गुरूसन्निध येतो, त्यावेळी गुरूंनी जो आशिर्वाद दिलेला असतो तो जतन करून जो आशिर्वाद दिला आहे तो द्विगुणित करणे हे भक्तांचे कर्तव्य आहे. कारण तो आशिर्वाद केवळ आपल्यापुरता नसून आपल्या घराण्यातील अनेक पिढय़ांना पुरेल असा असतो. पण आपण तो आशिर्वाद द्विगुणीत करण्याऐवजी शंकाकुशंका निर्माण करून जो आशिर्वाद प्राप्त झाला आहे त्याबद्दल श्रध्दा-सबुरी न ठेवता ‘असे का’ ? , ‘असे कशाला’ ? इत्यादी प्रश्न जीवनामध्ये निर्माण करतो. त्यामुळे गुरूबद्दलची श्रध्दा 100% जोपासली न जाता त्याऐवजी अश्रध्दा निर्माण करू लागतो. त्यामुळे आपली अडचण जरी निवारण झाली तरी दुसरी अडचण आपल्या जीवनात निर्माण होत असते. एकदा गुरूंनी आपल्या जीवनामध्ये कसे जगावे, कसे बोलावे व कसे आचरावे हे शिकविल्यानंतर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून दिलेल्या आशिर्वादास आपण मुकतो व वेळोवेळी गुरू भेटोत वा न भेटोत पण त्यांनी आपल्याला आशिर्वाद दिलेला आहे हे आपण निश्चितपणे विसरतो व ‘मला गुरूभेट झाली नाही’ असे भक्त म्हणतात त्यामुळे भक्ताची श्रध्दा आशिर्वादावर आहे की गुरूभेटीवर आहे असा प्रश्न निर्माण होत असतो,

या जगतात गुरूंचे कार्य जगाचे कल्याण होण्यासाठी असते. त्यामध्ये द्वैतभाव किवा वैरभाव असू शकत नाही. ‘कार्य’म्हणून जन्माला येते त्यासाठी गुरूंना अनेक जन्म जन्माला येऊन प्रत्येक जन्मामध्ये दीर्घ तपश्चर्या करावी लागते. केल्या गेलेल्या तपश्चर्येमुळे ह्या जगाला सुलभ असा मार्ग ते शिकवितात. ह्या शिकविण्याच्यामागे किंवा आशिर्वादामागे अनेक जन्मांची पुण्याई असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. गुरूंचे जीवन व आपले जीवन सारखेच आहे असे वाटले तरी आपला जन्म व गुरूंचा जन्म यामध्ये जमीन-अस्मानाएवढे अंतर आहे.

गुरूकार्यामध्ये जो आशिर्वाद मिळतो तो भक्तांना एकदाच मिळतो. त्याची साक्ष म्हणून भक्ताला पुन्हा पुन्हा दर्शन देऊन जो आशिर्वाद आहे तो ते स्वेच्छेने साकार करीत असतात. तेव्हा अशावेळी ‘गुरू मला भेटावेत’ हा अट्टाहास उपयोगी नाही, यासाठी गुरूभक्तांनी शंकाकुशंका निर्माण न करता गुरूमार्गी होणे हे आपल्या सर्वांनाच हितावह आहे. गुरू व भक्त यांची देवाण घेवाण सतत चालू असते तेव्हा गुरूभेटीमध्ये आपल्याला काय मिळाले व काय मिळाले नाही हे भक्तांनी स्वतः मुमुक्षू होऊन पाहावे म्हणजे ह्या जगतात जे नाही ते सुख गुरूंनी दिले आहे असे मागाहून समजेल. गुरू व भक्त म्हणजे जीव व शिव यांचा जीवनामध्ये संगम चाललेला असतो. या संगमामध्ये आपण इतराना न्हाऊ घालणे आपले आद्य कर्तव्य आहे पण त्या संगमामध्ये आपल्या आचार-विचारांनी गलिच्छता निर्माण करू नये तरच जन्माला येऊन जन्म म्हणजे काय हे आपल्याला समजेल व इतराना त्याचा लाभ आपण देऊ शकू, अन्यथा ‘जन्माला आला व निघून गेला’, असा अर्थ जीवनास प्राप्त होईल.

वरील विचार मला सुचले कारण मी गुरूआज्ञेने काही एका कारणपरत्वे कार्यकेंद्रावरील ‘कामकाज’ करणे बंद करून सेवक माध्यमांना नियुक्त केले, त्यावेळी काही भक्तांच्या मनात अशी शंका येऊ लागली की ‘दादा आम्हाला आता कधीच भेटणार नाहीत काय’ ? परंतु मी गुरूआज्ञेचे निष्ठेने पालन करीत होतो व ‘तुला जगाचा सांभाळ करावयाचा आहे’ अशी गुरूआज्ञा झाल्यावर त्यासाठी काहीतरी निश्चित असे साधन अवलंबणे आवश्यक होते. जगताचा सांभाळ करावयास जेव्हा ‘हिरण्यगर्भ शक्ती’ला शक्तीपीठात स्थापन होण्यास आवाहन केले तेव्हा ही शक्ति सामान्य जनात प्रवाहीत होऊन भक्तांच्या कुटुंबीयांचे अनेक पिढय़ांपर्यंत कल्याण व्हावे म्हणून या शक्तीपीठाच्या क्रमाक्रमाने प्रतीकात्मक प्रतिमा सिध्द करून त्या सर्व भक्तांना दिल्या. प्रत्येक प्रतिमा सिध्द होण्यापूर्वी भक्तांना जी दीक्षा द्यावयाची होती त्यासाठी प्रथमतः मला वैयक्तिक साधना करणे आवश्यक होते. याचा अर्थ मी भक्तांना भेटू इच्छित नव्हतो असा नव्हे. आज घरोघरी या प्रतिमा नांदत आहेत. त्यावेळी तुम्हा भक्तांना जी बंधने नाहीत त्याहून अधिक शास्त्रशुध्द बंधने मला पाळणे आवश्यक होती म्हणूनच मी कामकाज बंद करून सेवक माध्यमे तयार केली.

आता सेवकांचे कर्तव्य काय, याचा विचार करणे आज अत्यावश्यक आहे. कार्यार्थ जे कोणी भक्त मार्गदर्शनासाठी येत असतात त्यांना योग्य मार्गाने कार्याची ओळख करून दिली पाहिजे. अशावेळी ‘येणारा हा नवीन, आपण जुने’ असा भेद विचारात घेणे गैर आहे. येणारा हा आपल्याला भेटण्यासाठी येत नाही. तो देवाला भेटण्यास येतो व तत्पूर्वी त्याच्या हातून काही ना काही सेवा घडलेली असते. फक्त त्याला योग्य दिशेने नेणे हे आपले कर्तव्य आहे, पण आपण नेहमी अशी वागणूक इतराना देतो की जसे काही आपल्याला सर्वस्व मिळालेले आहे. वास्तविक येणा-या नवीन भक्ताची श्रध्दा जी असते तेवढीही श्रध्दा आपली नसते. देवावर श्रध्दा आहे, त्याचे प्रतीक आपल्या आचरणातून व उच्चारातून कळले पाहीजे. ज्या अर्थी ‘तुझे माझे’ आपण बोलतो त्या अर्थी आपला विकास शून्य आहे व मग आपली प्रगति कशी होणार हा प्रश्न प्रामुख्याने आपल्या समोर आहे याचा विचार केला पाहीजे. इतकी वर्षे आपण हय़ा गुरूमार्गात आहोत म्हटल्यावर आपला जर योग्य तो विकास झाला नाही तर गुरूमार्गाला गालबोट लागेल.

आज अनेक वर्षे मी हे कार्य जतन केले आहे याची साक्ष म्हणजे सर्व भक्तभाविक श्रध्देने येतात. आपले दुख निश्चित निवारण होणार आहे एवढा  आत्मविश्वास त्यांचा ह्या कार्याबद्दल आहे, जेवढा देवाबद्दल नाही. अशा वेळी त्यांची श्रध्दा वाढीस लागेल असे आचरण सर्व सेवकांनी ठेवले पाहीजे. नुसते कामकाज करणे, आरती करणे व साधना करणे म्हणजे ‘सेवक’ नव्हे. संतांनी सेवकाची व्याख्या अशी केली आहे की आपले आचार, विचार, उच्चार हे लोण्यापेक्षा मऊ असावयास पाहीजेत. ‘जे कां रंजले, गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ हे व्रत आपले आहे. ते नुसते तोंडाने म्हणून चालणार नाही. तुम्हाला काही एक साधना सिध्द करावयाची नसून जी साधना सिध्द आहे तिचा लाभ इतरांना व्हावा व तो होण्यासाठी आपले वर्तन यामध्ये ओलावा व आपुलकी पाहिजे. हीच साधना आज सेवकांसाठी आहे अन्यथा बाहेरचे जग व तुम्ही ज्यांना गुरूंचा लाभ झाला आहे यामध्ये फरक काय ? हे सदैव आपल्या चिंतनात ठेवले पाहीजे. बाहेरचे जग अज्ञानी आहे म्हणून त्याच्या हातून पाप घडत आहे, पण गुरूंनी आपल्याला सज्ञान केल्यावर आपले आचरण अयोग्य प्रकारचे घडेल तर त्याला कोणत्याही मार्गात विमोचन नाही कारण तुम्ही जे कर्म करीत आहात त्याचे ज्ञान गुरूंनी दिले आहे व जर आपण तेच कृत्य पुन्हा केले तर आपले कर्म आपल्याला भोगणे भाग आहे, यासाठी ‘सेवक अवस्था’ अत्यंत नाजूक असून ती ‘सुळावरची पोळी’  आहे हे समजून तुम्ही सर्वांना सुखी करणे हे कर्तव्य ओळखावे अशी देवाची इच्छा आहे. याचा अर्थ थोडक्यात असा की आपण आपल्याला गुरूमार्गात विरले पाहीजे. अंशमात्रही शिल्लक राहता कामा नये. ही जबाबदारी माझी एकटय़ाची नसून ती आपणा सर्वांची आहे, हे कदापिही विसरून चालणार नाही !

आज जगात प्रत्येक मानवाला इहजन्मामध्ये सुख, शांती, समाधानाची उणीव आहे. भौतिक शोध लागून जी प्रगति झाली आहे ही प्रगति शास्त्राची झाली आहे पण मानवी जीवनाची प्रगति होण्याऐवजी  ते गतिमान होऊन जीवन हे सुखाच्या अभावी दुखमय झाले आहे. त्यामुळे प्रत्येकजण प्रयत्नशील आहे की केव्हा आपल्याला सुख, शांती मिळेल, केवळ हा विचार करून चालणार नाही किवा शास्त्रज्ञांना विचारून चालणार नाही. कारण आम्हां मानवांचे गणित जन्मापासून चुकले आहे. गेल्या शंभर वर्षांत आपली अपक्रांती चालू आहे व आज अशी वेळ आली आहे की आम्हा मानवांचे काय होणार ? शास्त्रज्ञ चंद्रावर गेले पण स्वतःचा शोध अजून लागला नाही. जेव्हा आपला शोध आपणच घेऊ तेव्हा सुख आहे की नाही हे समजेल कारण ह्या सुखाच्या मागे कोण आहे ? तर आपले ‘संस्कार’ ! आजच्या जगात संस्कार हा विधीपूर्वक न करता संस्कार हा केवळ एक फॅशनेबल विधी झाला आहे, त्यामुळे आम्हा मानवांचा जन्म बाराव्या दिवशी उदीत न होता त्याचे ‘बारावे’करावे लागते. अशामुळे जरी आपण सुखाची अपेक्षा केली तरी सुख मिळणार नाही. मग आपली बुध्दि जागी होते की सर्वांना सुख प्राप्त झाले पण मला नाही व मग आपण शोधाशोध करू लागतो. जन्माला येतेवेळी जे संस्कार आहेत त्या संस्कारांना मानणे हा समाजात कमीपणा आहे म्हणून आपण त्यांची टाळाटाळ करीत असतो व शेवटी आपले जीवन टाळ कुटीत असते, अशा वेळी कोणाला जाऊन भेटावे व कोण निश्चित मार्ग सांगेल ह्या संभ्रमात आपण असतो. अशा संभ्रमित अवस्थेतील मानवाला योग्य ते मार्गदर्शन करावे या सद्हेतूने व प. पू. बाबांच्या आज्ञेने 12 वर्षांपूर्वी ‘गुरूप्रसाद’ हा बहुमोल ग्रंथ लिहीण्याचे भाग्य मला प्राप्त झाले. आजच्या जगाची गरज व पुढच्या पिढय़ांना निश्चित मार्ग समजण्यासाठी योग्य मार्गदर्शन या ग्रंथातून केले गेले आहे. गतकाळात आपले पूर्वज काय करीत होते व आपल्याला काय करणे इष्ट आहे हे समजून घेऊन पुढील काळात आपण काय  कर्तव्य केले असता आपला व आपल्या वंशाचा उध्दार होईल ह्याचा विचार आस्थापूर्वक करणे आपले कर्तव्य होय ! ‘गुरूप्रसाद’ ही श्रीगुरूंची भेट म्हणजे प्रत्येक कुटुंबाने जतन करावयाची आधुनिक ‘गीता’ आहे. प. पू. बाबांच्या आज्ञेने व श्रीगुरूंच्या लेखणीने माझ्या हातून ह्या बहुमोल ग्रंथाचे लेखन जगत्कल्याणार्थ व पुढील पिढय़ांना सज्ञान करण्यासाठी झाले याहून अधिक पुण्य ते काय ! .

दरवर्षी चैत्रापासून फाल्गुनापर्यंत घराण्यात कुलधर्म व कुलाचार काय करावेत असा प्रश्न आज आपणा सर्वांपुढे आहे. वास्तविक गुरूमार्गात आल्यावर जे मार्गदर्शन गुरू करीत असतात, त्याप्रमाणे आपण ‘वाकून’ त्याचे आचरण करणे म्हणजे कुलधर्म व कुलाचार आहे. परंतु त्याप्रमाणे आपण वागत नाही व काहीतरी  निराळेपणाने वागणे म्हणजे ‘गुरूमार्गी’ असा अर्थ आपण लावून तसे इतराना भासवितो, पण हा अर्थ आपल्या अनर्थाचा पाया आहे हे आपण विसरू नये कारण आता आपल्याला ज्या तीन प्रतिमा सिध्द करून दिल्या आहेत त्यांची सिध्दता आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. भक्तांचे कल्याण व्हावे अशी इच्छा गुरूंची असते म्हणून श्रीगुरू आपल्या कल्याणासाठी सोप्यात सोपी सेवा आपल्याला सांगत असतात. पण त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला सुख का मिळत नाही म्हणून आपण प्रश्न विचारतो. पण याचे उत्तर प्रश्नावर अवलंबून नाही तर गुरूमार्गाची अवहेलना आपण करीत असतो म्हणून आपल्याला सुख मिळत नाही असे त्याचे उत्तर आहे.

जो कोणी जन्माला येतो त्याच्या घराण्यात ज्या देवदेवता आहेत त्यांचा कुलधर्म व कुलाचार प्रत्येकाने केला पाहीजे. प्रत्येक पिढीत हा कुलधर्म व कुलाचार जर आपण केला तर दुख आपल्या वाटय़ाला येणार नाही म्हणून आपल्या पूर्वजांनी आपली सोय अशी करून ठेवली होती की ज्या देवदेवता आहेत त्यांच्या प्रीत्यर्थ प्रत्येक पिढीत निदान लघुरूद्र व नवचंडिका हवन केले गेले पाहीजे तरच ह्या देवता सिध्द होतील, तसेच  दानधर्म व परोपकार्य झाले पाहीजे. तरच सुख, शांती, समाधान अक्षय राहील.

आज आपल्याला देव नको आहे. दुख झाल्यावर आपण ‘देवा’ म्हणून हाक मारतो, पण ‘ओ’ ऐकू येत नाही कारण देव मानणे हा धर्म आपण विसरलो आहोत. म्हणूनच जगतामध्ये आज अशांती आहे. हा सर्व विचार करून पुढील पिढय़ांचे भवितव्य प. पू. साईनाथ महाराजांनी जाणले, मला आज्ञा देऊन मी करीत असलेले कामकाज बंद केले व ‘जगाला सुख देण्यापेक्षा सुखाचा मार्ग सांग’ असे सांगितले. त्याप्रमाणे आपण भक्तांचे वंशविमोचन करून व दीक्षा देऊन आपल्या घराण्यातील पिढय़ान्पिढय़ा असलेल्या दोषांतील कीड धुवून काढली म्हणून आज आपण येथे उपस्थित आहोत, नाहीतर इतरांप्रमाणे आचार, विचार ठेवून आपण देशोधडीला लागलो असतो. मी जे कामकाज बंद केले ते मला विश्रांती पाहीजे होती म्हणून नसून आपण भक्तांस सुख, शांती, समाधान याचा लाभ होण्यासाठी जो आशिर्वाद द्यावयाचा त्याची सिध्दता करण्यासाठी कामकाज बंद करून 12 वर्षे मी मार्गदर्शनाप्रमाणे साधना अव्याहत करीत होतो. ती साधना अमूक ठिकाणीच सिध्द होईल असे नसून ह्या सिध्दतेसाठी स्थळ, काळ, वेळ याचा विचार सूक्ष्मात सूक्ष्म  दृष्टीने ठेवून कार्य सिध्द करावे लागते. अशी सिध्दता केल्यानंतर आपल्याला दिलेल्या तीन प्रतिमांचे एकरूपत्व करून देण्यात आले आहे. हे एकरूपत्व म्हणजे प्रत्यक्ष देवाचे आगमन किंवा दर्शन हे आपल्याला न मागता मिळाले आहे. असे दर्शन घडण्यासाठी जरी आपण जन्मोजन्मी सेवा केली असती तरी हे भाग्य कोणालाही लाभले नसते. तेव्हा जो ‘कुलधर्म, कुलाचार’ दर वर्षी करावयाचा असतो तो कोणत्या प्रकारे करावा असा प्रश्न शिल्लक उरत नसून गुरूआज्ञेप्रमाणे आपण आचार-विचार ठेवाल तेव्हाच हा कुलधर्म, कुलाचार होईल.

प्रत्येक घराण्यात प्रत्येक पिढीत निदान एक लघुरूद्र व एक नवचंडिका हवन प्रत्येकाने करावयास हवे. हे विधी करण्यासाठी आपल्यापाशी पैसे नाहीत असे आपण म्हणत असलो तरी चैनीसाठी आपल्याजवळ पैसे आहेत असे पाहावयास मिळते. ब्राह्मण, सवाष्ण जी जेवावयास पाहीजे, त्याऐवजी इष्टमित्र बोलावून त्यांच्या समवेत आपला आहार-विहार बिघडला आहे याची दक्षता आपण ठेवत नाही, तसेच आपल्या वंशांनी ज्या घराण्यात आपल्याला जन्म दिला त्याचे ऋण फेडण्यासाठी तीर्थक्षेत्री जाऊन दानधर्म करण्यासाठी आपल्यापाशी पैसे नाहीत ही सबब आपण सांगता पण दर महीन्याला नाटक-सिनेमा यासाठी आपला किती खर्च होतो याचा आपण सुज्ञपणे विचार करत नाही. ज्या प्रतिमा आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांचा कुलधर्म, कुलाचार म्हणून कोणताही उपचार शिल्लक राहीला नसून प्रतिदिनी ॐकार साधना किंवा सद्गुरूनामस्मरण किंवा श्रीनवनाथ अनुष्ठान यापैकी एकतरी आपण केलेत तर त्या प्रतिमांची सिध्दता आपल्या अनुभवाला येईल. नुसत्या प्रतिमांचा स्वीकार करून त्याचा लाभ आपल्याला मिळेल असे नाही. जेव्हा आपण ‘लोभ’ सोडाल तेव्हा आपल्याला ‘लाभ’ म्हणजे देवाची कृपा प्रत्ययास येईल.

गुरूमार्गात जे कोणी गुरूमार्गी होतात त्यांचा योगक्षेम गुरू पाहतात. शास्त्राने जी शास्त्रमीमांसा म्हणजे प्रत्येक घराण्यात कुलधर्म, कुलाचार म्हणून लघुरूद्र व नवचंडिका हवन करावे, असे सांगितले असले तरी श्रीगुरूकृपेने श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे महारूद्र स्वाहाकार जो केला गेला व त्याची सांगता म्हणून जो प्रसाद म्हणजे तीन प्रतिमा आपल्याला प्राप्त झाल्या. यापेक्षा कुलधर्म-कुलाचार म्हणून वेगळा विधी आपल्याला सांगण्यासाठी शिल्लक राहीलेला नाही, याशिवाय आपणां भक्तांचे कर्तव्य काय, हा प्रश्नही श्रीगुरूंनी सोडविला आहे.

आपण भक्तांनी सहानुभूतीने श्रीसाई स्वाध्याय मंडळाची स्थापना केली आहे. तेव्हा दरवर्षी आपण जो कुलाचार-कुलधर्म आपल्या ऐपतीप्रमाणे करता तो न करता ती रक्कम श्रीसाई स्वाध्याय मंडळात जमा केल्यास त्याचा लाभ जगतातील जे दुखी आहेत त्यांना साहाय्य करण्यासाठी करता येईल. त्यामुळे ह्या पैशाचा विनियोग समाजामध्ये इष्ट ते कार्य होण्यासाठी होऊन त्या कार्यामुळे जो आपण व आपल्या कुटुंबियाना आशिर्वाद मिळेल यापेक्षा अधिक पुण्य ते काय ? असा सुविचार आपण सुज्ञ भक्तांनी करावा व जे समितीचे कार्य प. पू. जगद्गुरू साईनाथ महाराज यांनी स्थापन केले आहे त्या कार्याला  हातभार लावण्याचे कर्तव्य आपल्या या आचरणाने आपल्या हातून पार पडावे अशी प. पू. बाबांचे चरणी प्रार्थना.

प्रत्येक कुटुंबाने करावयाचा कुलधर्म-कुलाचार याचे विमोचन मी जरी केले असले तरी तुम्हा सर्वांना ज्या प्रतिमा पूजनार्थ दिल्या आहेत–साईशक, कारण, महाकारण व नारायणी. त्या प्रतिमांसंबंधी सखोल विवेचन करावयाचे मी मुद्दामच राखले होते तरी आता श्रीसद्गुरूंच्या ह्या अमोल भेटीचे सज्ञान होऊन तुम्ही स्वागत करावे म्हणून आता तत्संबंधी मी लिहित आहे.

कार्यारंभी जे जे भक्त मला भेटण्यासाठी येत असत त्यांना जन्माचे कारण समजत नव्हते किंबहुना आजही ते सर्वांना माहित नाही. यामुळे जीवनातील दुखाची कारण मीमांसा अज्ञात राहिली. केवळ आपण दुखी आहोत एवढय़ा सबबीवर ते कार्यार्थ इकडे आले त्यावेळी जे मार्गादर्शन झाले त्यात दोन भागः–

1) दुखाचे कारण काय, म्हणजे निराकरण व

2) ते दुख कसे दूर होईल यासाठी निवारण.

ह्या दोन मार्गातून सेवा असा तिसरा मार्ग. त्या मार्गाने जाण्यासाठी ज्ञान व भक्ति पाहीजे. नुसता देव आहे म्हणून त्याला भजणे गैर होय, यासाठी जसे दुखाचे कारण म्हणून निवारण सांगितले त्याप्रमाणे जी आपण सेवा म्हणून म्हणतो तिचा अर्थ काय आहे हा भक्तांना समजला पाहीजे, ह्यासाठी संमेलने घेतली गेली. ‘सेवा’ हा शब्द दोन अक्षरी आहे. परंतु अजून त्याचा अर्थ लागला नाही व लागू नये  अशी सेवा व तिचा अभ्यास गुरूआज्ञेने मी  सतत करत होतो, त्यात प्रामुख्याने ‘ॐकार साधना’ व ‘गुरूनामस्मरण’ हे सिध्द झाले व भवितव्यात कोणालाही कष्ट पडणार नाहीत असा सोपा मार्ग सिध्द करून त्याची ‘सांगता’1987 साली दिपावली म्हणजे वर्ष-पाडवा किवा बलिप्रतिपदेला गोवा येथे झाली. या गुरूकार्याचा वृक्ष मोठा आहे पण त्याचे फल म्हणजे ‘सांगता’ हा आंब्याप्रमाणे मधुर आहे. फळ अधिक मधुर आहे म्हणून कार्य संकुचित नाही. या कार्याची सांगता म्हणजेच प्रतीक, हे चार प्रतिमांच्या रूपात तुम्हा भक्तांच्या घरोघरी आज नांदत आहे. यातच सर्व मानवी जीवनाचे सार्थक आहे. या तीन प्रतिमांच्या रूपात ज्ञान (साईशक), भक्ति (कारण), व सेवा (महाकारण), प्रत्येक भक्ताच्या हृदयी वास करीत राहावी म्हणजे त्याची जी जीवन-सार्थकता होईल हीच ‘नारायणी’ म्हणजे चौथी प्रतिमा होय व त्यावेळी भक्त माध्यमातून

।। हेच ज्ञान देगा देवा, तुझा विसर न व्हावा ।।  असे अमृतबोल घरोघरी ऐकू येतील.

आपल्या पूजनार्थ ज्या देवाच्या प्रतिमा आज आहेत व ज्यांचे पूजन आपण सर्व भक्त करीत आहात त्याबद्दलचे मार्गदर्शन तपशीलवार केले, तेव्हा श्रीजगद्गुरू साईनाथ महाराज यांची आज्ञा अशी झाली की, जो कोणी माझा भक्त असेल त्याने तीन प्रतिमा पूजनार्थ घ्याव्यात. कारण ह्या  तीन प्रतिमांमध्ये जे सिध्द केलेले तत्त्व आहे हे नवनाथ परंपरेपासून आहे. ह्याचा लाभ कसा होईल ? तर–

‘जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव’ असा त्याचा लाभ होणार आहे’.

ह्या प्रतिमा आपल्यावर सक्ती करून त्या घ्याव्यात असे सांगण्यात आलेले नाही व भवितव्यात सांगणारही नाही. जी गोष्ट ईश्वराच्या कृपेने मला प्राप्त झाली ती प्राप्ती सर्वांना लाभावी अशी इच्छा माझी आहे म्हणून ज्यावेळी दीपावलीला प्रतिमा देण्याचे कार्य जेव्हा सिध्द झाले तेव्हा प्रतिमा आपल्याला देण्यात आल्या. जीवनामध्ये अडीअडचणी कधीही संपणाऱया  नाहीत. आपले आयुष्य संपले तरी अडचणी शिल्लक राहतात. त्या राहू नयेत म्हणून देवाधर्माला आपण शरण जातो पण त्यापेक्षा नित्याची प्रार्थना व ह्या प्रतिमांचे पूजन महत्त्वाचे आहे. सोने हे पिवळे आहे म्हणून आपण मौल्यवान मानतो. पण त्यापेक्षा ज्या कुटुंबात ह्या प्रतिमा आहेत ते कुटुंब जगापेक्षा अधिक सुशोभित होईल, असा माझा विश्वास आहे म्हणून

।।    ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ,

त्या  त्या  ठिकाणी निजरूप तुझे !

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ,

तेथे  तुझे सद्गुरू  पाय  दोन्ही ।।

                           ……   असा प्रतिसाद आपल्याला मिळेल.

आता आपण भक्तांना ज्या तीन प्रतिमा देण्यात आलेल्या आहेत त्या प्रतिमा म्हणजे काय, त्याचप्रमाणे परंपरा काय आहे, त्या सोन्या-चांदीच्या का केल्या, आपल्या प्रत्येकाकडे पूजनात देवदेवतांच्या मूर्ती व टाक असूनसुध्दा ह्या प्रतिमा का दिल्या गेल्या, याचा आस्थापूर्वक विचार करणे आवश्यक आहे.

कार्यारंभी मी जेव्हा भारताचा प्रवास केला, अनेक तीर्थक्षेत्रे व देवळे पाहिली, त्याचप्रमाणे अनेक भक्तांच्या घरातील देवदेवतांच्या मूर्ती व प्रतिमा पाहिल्या, त्यावेळी असे अनुभवास आले की ह्या देवदेवतांच्या प्रतीकांमध्ये देवत्व शिल्लक राहीलेले नाही. आज देवतार्जन म्हणून जो काही पूजाविधी होतो तो केवळ रूढीपरंपरेप्रमाणे केलेले अनुकरण व औपचार म्हणूनच होत असल्याने त्या देवतार्जनातून जे सुख. शांती, समाधान प्राप्त झाले पाहीजे ते होत नाही, त्यामुळे प्रत्येकजण आज काही ना काही दुखाने पीडित व गांजलेला आहे.

अशी परिस्थिती अनुभवास आल्यानंतर मी प. पू. बाबांकडे अशी विचारण केली की, “ह्या दुखी लोकांना काही एक निश्चित मार्ग व सेवा सांगितली पाहिजे जेणेकरून ते सुखी होतील तसा प्रसाद आपण द्यावा”. प. पू. बाबा म्हणाले की, “तुझी त्यांच्याबद्दलची तळमळ मला समजते. पण त्यासाठी योग्य वेळ आली की तुला काय करावयाचे ते सांगेन. तोपर्यंत तुला सांगितलेल्या मार्गाने त्यांच्या अडीअडचणीबद्दल मार्गदर्शन कर”. त्याप्रमाणे, मी आज 36 वर्षे कार्य करीत आलो.

प. पू बाबांच्या आज्ञेप्रमाणे आपण भक्तांना प्रथमतः ज्या तीन प्रतिमा दिल्या गेल्या त्यापैकी पहिली प्रतिमा ‘श्रीसाईशक’, दुसरी प्रतिमा ‘कारण’ व तिसरी प्रतिमा ‘महाकारण होय’

श्रीसाईशक प्रतिमाः– ही प्रतिमा घेण्यापूर्वी आपल्याला पाच दीक्षा म्हणजे क्रमशः उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरूदीक्षा  व कारण दीक्षा. ह्या देऊन आपल्याकरवी श्रीसद्गुरू नामस्मरण करून घेतले गेले व त्याप्रमाणे आपण करीत आहात. हे नामस्मरण मी जीवनारंभीपासून आजपर्यंत केले असल्याने ते नामस्मरण आज सिध्द आहे. त्या नामस्मरणाची सिध्दता आपल्याला व आपल्या भावी पिढय़ांना हितकारक व्हावी म्हणून त्या नामस्मरणाचे प्रतीक म्हणून श्रीसाईशक प्रतिमा आहे. ह्या व्यतिरिक्त या प्रतिमेचा लाभ असा आहे की आपल्या कुटुंबामध्ये गेल्या सात पिढय़ांत ज्या कोणी व्यक्तिनी, ‘गुरू’ केला नसेल किवा नामस्मरण उच्चार केला गेला नसेल तर गतकालामध्ये ह्या ज्या व्यक्तिंनी सद्गुरूतत्त्वाचा लाभ घेतला नाही, अशानाही ह्या प्रतिमेमुळे पुण्याचा लाभ मिळणार आहे, याशिवाय भवितव्यात भावी पिढय़ांचीही तरतूद ह्या प्रतिमेमध्ये केलेली आहे. भावी कालामध्ये योग्य तो गुरू व त्यांचे मार्गदर्शन मिळणार नाही म्हणून तीही तरतूद ह्या प्रतिमेमध्ये केलेली असून भावी पिढय़ांना फक्त श्रीसद्गुरूनामस्मरण म्हणजे

।। ॐ श्रीसाईनाथाय नमः।।

म्हटल्यावर इष्ट ते सुख, शांती, समाधान सहजगत्या प्राप्त होणार आहे. इतका सुलभ मार्ग आपल्या सर्वांसाठी श्रीसद्गुरूकृपेने सिध्द आहे.

कारण प्रतिमाः–ह्या प्रतिमेचा संबंध घराण्यातील दिवंगत व्यक्तिंशी आहे. जे कोणी गेल्या सात पिढय़ांमध्ये धर्माचरण करू शकले नाहीत किंवा ज्ञान-अज्ञानाने ज्यांच्या हातून पातक-प्रमाद घडले आहेत व त्यामुळे ह्या दिवंगत व्यक्तिंच्या इच्छा-वासना शिल्लक राहून आपल्याला जो त्रास होत आहे की ज्यामध्ये विद्यानाश, संपत्तीनाश व संततीनाश असे प्रामुख्याने तीन दोष कुटुंबात शिल्लक राहीलेले असतात, अशा दोषांचे परिमार्जन केल्याशिवाय भावी पिढय़ांना विद्या, संपत्ती, संतती याचा लाभ होणार नाही, यासाठी प. पू, बाबांच्या आशिर्वादाने जे काही विधी केले गेले त्यामध्ये प्रामुख्याने वंशविमोचन, कर्मविमोचन व ऋणमोचन हे करण्यासाठी श्रीक्षेत्र नरसोबा वाडी येथे 11 पौर्णिमेला होमहवनादी विधी करण्यात आले व मागाहून त्या विधींची सांगता म्हणून महारूद्र स्वाहाकार करण्यात आला. हा विधी सामान्य माणसाला करता येत नाही. त्या विधीसाठी साधारण 2।। लाख रूपये खर्च केले आहेत. तेव्हा पुन्हा तो विधी होणे शक्य नाही. ह्या विधीसाठी जी शक्ति म्हणजे रूद्रशक्ती हिला आवाहन केले होते. तिची मनोभावनेने सेवा करून त्या शक्तीची धारण भावी पिढय़ांसाठी आशिर्वाद म्हणून राहावी म्हणून‘साईधाम’मध्ये शक्तीपीठाची स्थापना प. पू. बाबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे केली आहे, म्हणजेच भावी पिढय़ांची तरतूद तुम्ही न मागता प. पू. साईनाथ महाराज यांनी केलेली आहे की ज्यामुळे जो कोणी जीवनात दुखी आहे तो इथे आल्यानंतर निश्चित सुखी होणार असा माझा आत्मविश्वास आहे.

महाकारण प्रतिमा :–ह्या प्रतिमेमध्ये दोन शब्द आहेत. ‘महान’ व ‘कारण’. ‘महान’ म्हणजे आपण ‘मोठे’ असे म्हणतो, पण ‘महान असले तरी लहान आहे’, याचा अर्थ कळला पाहीजे. ज्याप्रमाणे वडाचे झाड मोठे, महान व भव्य असते पण त्याचे बीज अतिसूक्ष्म व लहान असते. ते जर मनोभावनेने पेरले तर त्या बीजाचा कल्पवृक्ष निर्माण होतो, जेणे करून तमाम वाटसरूंना त्याच्या छायेमध्ये सुखाचे क्षण अनुभविता येतात.

त्याप्रमाणे आपण जे नामस्मरण नित्य करतो ते जरी लहान असले तरी  ते महान आहे. तेव्हा आपली दृष्टी लयास जाऊन त्या नामस्मरणामध्ये काय आहे हे विचारण्यापेक्षा स्वतःला प्रश्न विचारा की यात काय नाही ? मग त्याचे उत्तर तुम्ही स्वतःच देऊ शकाल. असे हे बीज पेरण्यासाठी महाकारण प्रतिमा आहे की ज्यायोगे वंशपरंपरेने भावी पिढय़ा सुखात नांदतील असा आशिर्वाद प. पू. बाबांनी दिला आहे. ज्याप्रमाणे घर बांधावयाचे झाल्यास जागा लागते किवा काही गोष्ट करावयाची झाल्यास स्थळ, काळ व वेळ पाहावी लागते त्याप्रमाणे आपण जे नामःस्मरण करीत आहोत ते सुरक्षित राहून त्याचा लाभ भावी पिढय़ांना व्हावा म्हणून ही प्रतिमा आहे. आज नित्याने जी सेवा आपण कराल तिचा अंतर्भाव ह्या प्रतिमेमध्ये होऊन कालांतराने ही प्रतिमा तुमच्या भावी पिढय़ांशी बोलू लागेल.

अशा तीन प्रतिमा आपणा सर्वांना मिळाव्यात म्हणून गेली 30 वर्षे माझे प्रयत्न चालू होते. ह्या प्रयत्नांना यशस्वीरीत्या यश येऊन आज तो प्रतिमारूपी प्रसाद भक्तभाविकांना घरोघरी पोहोचला आहे. ‘यापेक्षा आनंद काय आहे ? ’ असा प्रश्न मी स्वतःला विचारतो.

प्रतिमांचा विषय हा अति गहन असून त्यांचे कार्य त्यापेक्षाही गहन आहे कारण अनेक शतकांत हा विषय कोणीही अभ्यासण्यासाठी घेतला नाही. आजपर्यंत जे कोणी ह्या मार्गात आले त्यांनी येणाऱया भक्तांचे भविष्य सांगणे एवढेच कार्य केले आहे. त्यामुळे कोणीही भक्त अडचणीत आला की ह्या मार्गाकडे त्या दिशेने पाहात असतो. त्यामुळे ‘आपण जन्माला का आलो व आपले कर्तव्य काय ? ’ हा प्रश्न कोणीही विचारात घेत नाही. एखाद्या साधकाला ‘दिव्य-दृष्टी’ प्राप्त झाली आहे, म्हणजे काय, तर आलेल्या भक्ताच्या भविष्याचे कथन करणे किंवा अद्भुत सांगणे म्हणजे दिव्य दृष्टी का ? हा प्रश्न फार मोठा आहे व त्यामुळे समाज सज्ञान होण्यापेक्षा जास्त अज्ञानी होत चालला आहे, त्यामुळे वर्तमानपत्रात अमुक एकाचे नाव आले की ती व्यक्ती असामान्य झाली आहे असे म्हणावे लागते. विज्ञान युगामध्ये आपण सज्ञान होण्याऐवजी अज्ञानी अधिक झालो आहोत त्याचे कारण मूळ विषय हा ‘पुराण’ आहे असे म्हणणारा वर्ग समाजात वावरत आहे पण त्यांना ज्ञान आहे का ? हा प्रश्न आहे. जगतात अनंत विषय आहेत. त्याचा शोध लागणे हे अशक्य आहे.

एखाद्याने एक विषय अभ्यासण्यासाठी घेतला व तो त्या विषयात पारंगत झाला तर त्या विषयात इतर विषय शोधणे हे गैर आहे, त्यामुळे सध्या ‘अंधश्रध्दा’ हा विषय सर्वतोपरी विचारात आहे. ह्या विषयाचे मूळ कोठे आहे त्याचा शोध लागत नाही, या उलट जे लोक ‘अंधश्रध्दे’चा पाठपुरावा करतात त्यांचीच श्रध्दा आंधळी आहे असे म्हणावे लागते, त्यामुळे खरे आणि खोटे असा वाद चालू आहे. एका रूपयाच्या दोन्ही बाजू आहेत. न पेक्षा रूपया खोटा आहे असे म्हणावे लागेल व ह्या जगात तसे म्हणणे हा गुन्हा आहे. तेव्हा ज्याच्या वाटणीला जी बाजू येईल ती खरी आहे म्हणून गप्प बसले पाहीजे. एखाद्याची श्रध्दा आहे, ती खोटी आहे असे म्हणता येत नाही. अश्रध्दा व श्रध्दा हे विषय प्रत्येकाने अनुभविल्याशिवाय त्याचे उत्तर चूक की बरोबर हे म्हणता येत नाही. तेव्हा ह्या जगात जे लोक सज्ञानी आहेत ते अज्ञानी आहेत व जे लोक अज्ञानी आहेत त्याना सज्ञानी असे म्हणावे लागेल कारण बव्हंशी लोक पुस्तकी-ज्ञानी आहेत, त्यांना पुस्तकाचे ज्ञान म्हणजे चैनीने जगणे असा अर्थ समजला आहे. परमेश्वराने हे जीवन आपल्याला का दिले आहे हा मुख्य प्रश्न बाजूला ठेवून आपण जगतो आहोत.

आपण भक्तांना ज्या प्रतिमा दिल्या आहेत त्यांचे कार्य आपल्या स्वतःवर अवलंबून आहे. ज्या भक्तांनी तिन्ही प्रतिमा घेतल्या आहेत त्या प्रतिमांमध्ये ईश्वर किंवा परमेश्वर हा सगुण आहे की निर्गुण आहे हे ठरविणे चुकीचे आहे. जो कोणी परमेश्वर आहे त्याचा अनुभव घेतल्याशिवाय तो नश्वर आहे का ईश्वर आहे, हे समजणार नाही. तेव्हा ‘तीन प्रतिमा मिळाल्या आहेत’ म्हणजे सर्वस्वाने आपण सुखी होणार आहोत असे भवितव्यामध्ये भविष्य वदविणे योग्य होणार नसून प. पू. सद्गुरू साईनाथ महाराज यांनी जो कृपाशिर्वाद दिला आहे त्या आशिर्वादात

‘जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव’

ह्याप्रमाणे घडणार आहे व ही जबाबदारी साधकांची नसून भक्तांची आहे हे भक्ताने विसरता कामा नये. जेव्हा भक्त अनन्यभावे प्रतिमांचे पूजन व त्याबरोबर आपला आचार-विचार करेल त्याप्रमाणे त्याचे फल आपणास मिळेल. ह्या व्यतिरिक्त ह्या प्रतिमांचे महात्म्य एवढे आहे की, जे देव आपण पूजनासाठी मांडतो त्या देवामध्ये तीन तत्त्वांपैकी एकही तत्त्व सध्या शिल्लक राहिले नाही, मग देव आपल्या इच्छा कधी व केव्हा पूर्ण  करेल हे तुम्हाला व तुमच्या देवालाच माहित ! याकरिता प. पू. बाबांनी तीन तत्त्वांची सांगोपांग ओळख करून दिली आहे, एवढेच नव्हे तर जे तत्त्व निर्गुण-निराकार होते ते तत्त्व सगुण साकार आपल्याला कृपाशिर्वाद म्हणून दिलेले आहे. ह्या प्रतिमांमध्ये उत्पत्ती, स्थिती व लय म्हणजे त्रिगुण तत्त्व आपल्याला मिळाले आहे. त्या प्रतिमांचे कार्य आपल्याला समजावे म्हणून ‘नारायणी’ अशी चौथी प्रतिमा अधिक महिन्यामध्ये (पुरूषोत्तम मास) सिध्द केली. कारण अधिक महीन्याचे महात्म्य अधिक आहे, हे आपल्याला समजत नाही. ‘अधिक मास’ हा दर तीन वर्षांनंतर येतो. असे बारा अधिक महीने म्हणजे 36 वर्षे झाल्यानंतर ही ‘नारायणी अवस्था’ उदयास आली व शक्तिपीठ हे 36 वर्षांनंतर सिध्द झाले. अशा दोन प्रतिमा आपल्यास मिळाल्या आहेत. त्याचा उदय आपल्या भावी पिढय़ांत होणार आहे, यासाठी श्रध्दा व सबुरी आपण भक्तांनी ठेवली पाहीजे. अनेक भक्तांना असे वाटते की आपल्यापाशी तीन प्रतिमा पूजनात ठेवल्या आहेत म्हणजे आपला योगक्षेम त्या प्रतिमा वाहतील, परंतु असे नाही तो एक कृपाशिर्वाद आहे. त्या कृपाशिर्वादाने आपल्याला जे कर्म दुख म्हणून भासते त्या दुखाचे परिमार्जन व्हावे म्हणून आपल्याला त्या प्रतिमा आहेत.

जो कोणी जन्माला येतो तो निर्दोष जन्माला येत नाही, तेव्हा आपले दोष आपणच निवारण करण्यास शिकले पाहीजे. कारण पुढच्या काळात ‘गुरू’ हे तुम्हाला भेटणार नाहीत. गुरू अवस्था समाजामध्ये निर्माण करण्यासाठी ह्या व्यक्तीला आपले जीवन देवास वहावे लागते परंतु आजकाल जे कोणी गुरू म्हणून समाजात वावरत आहेत ते ‘खाबुनंदन’ आहेत व पुढच्या काळात ते ह्याहीपेक्षा अधिक प्रबळ होतील, तर हा धोका भवितव्यामध्ये तुमच्या कुटुंबीयांनी सांभाळला पाहिजे.

आपणा सर्वांना ज्या चार प्रतिमा दिल्या आहेत त्या म्हणजे–1)साईशक 2) कारण 3) महाकारण 4) नारायणी. जोपर्यंत आपला वंश ह्या जगतात जन्माला येतो आहे  तोपर्यंत ह्या प्रतिमा तुम्हा भक्तांना प्रसाद देतील. ह्या प्रसादामध्ये ऐहिक व पारमार्थिक अशा दोन्ही सुखांचा ठेवा श्रीसद्गुरूंनी ठेव म्हणून ठेवला आहे. तेव्हा परमेश्वरापाशी मागण्यासारखे काही शिल्लक राहिले नाही, जसे आपल्याला डोळे हे देवाकडे मागितल्यानंतर मिळत नाहीत. ह्याकरिता डोळे असून डोळसपणे वागलो नाही तर दुखाला कारण आपणच आहोत हे विसरता कामा नये. तेव्हा आपण सर्व भक्तांना चार प्रतिमा मिळाल्या आहेत त्यांचे कार्य जीवनात होण्यासाठी जो महामंत्र पुढे लिहिला आहे तो आपण पूजनादी विधी केल्यानंतर 21 वेळा प्रतिदिनी घरातील प्रत्येक व्यक्तीने म्हणावयाचा आहे. जे सद्गुरू नामस्मरण आपण करीत आहोत ते आपला विकास व्हावा म्हणून आहे व जो महामंत्र दिला आहे तो जीवन व्यर्थ जाऊ नये, तर जीवनाचा इतरांना उपयोग व्हावा म्हणून दिला आहे.

         ।। सर्व मंगल  मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके  ।।

          शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते  ।।

कार्यारंभी जेव्हा मी सेवेसाठी 2।। वर्षे श्रीऔदुंबर क्षेत्री राहिलो होतो तेव्हा नित्यनेमाने तेथेच नदीपलीकडे असलेल्या श्रीभुवनेश्वरीच्या देवळात सूर्यास्तापूर्वी जात असे व तेथे श्रीदेवी महात्म्याचे पठण करून ह्या महामंत्राचे अनुष्ठान करीत असे. अशी सेवा रोज अव्याहत चालू होती व आजही करीत आहे. भक्ताला महामंत्र पठण करण्यास सांगण्यापूर्वी त्या मंत्राची  सिध्दता करणे आवश्यक असते. वास्तविक तुम्हाला या प्रतिमा दिल्या  त्या आधीही मी स्वतः या महामंत्राचे पठण करीत होतोच परंतु तुम्हाला त्यावेळी हा महामंत्र म्हणण्यास सांगण्याची अनुज्ञा मला नव्हती, कारण उच्चारलेल्या शब्दातून जी शक्तींची वलये तयार होतात ती वलये धारण करून घेण्यास माध्यमाची आवश्यकता असते नाहीतर ज्या वाणीद्वारा ही शक्ति उच्चारित होते त्या वाणीवरच शक्तीचा आघात होण्याचा संभव असतो, म्हणून प्रथमतः श्रीनारायणी प्रतिमा तयार केल्या व त्या सिध्द झाल्यानंतरच श्रीगुरूकृपेने पावन झालेल्या ह्या महामंत्राचा समावेश नित्य साधनेत केला गेला.

सध्या जे जग आहे ते ‘यंत्रयुगा’चे आहे व एखादे यंत्र तयार करणे म्हणजे किती अवघड असते हे आपल्याला माहित आहे. आपल्याला दिलेल्या प्रतिमा हेही यंत्र आहे. पण त्यामागे ‘मंत्र’ आहे, पण यंत्राचे साहित्य आहे म्हणून जसे यंत्र होत नाही तसा मंत्र आहे म्हणून प्रतिमा तयार करता येत नाहीत. बाजारात शेकडो यंत्रे तयार मिळतात पण त्यामागे शक्तीचे कार्य नसल्याने अशा यंत्रांचा उपयोग जीवनात होत नाही, तेव्हा प्रथमतः मंत्र सिध्द करावा लागतो व मग यंत्र किवा प्रतिमा मिळाल्या आहेत त्यामागे गुरूशक्ति आहे हे विसरता कामा नये.

तुम्हाला जी चौथी प्रतिमा दिली गेली तिचे नाव ‘श्रीनारायणी प्रतिमा’ असे आहे. जो कोणी जन्माला येतो त्याचे जीवन नराप्रमाणे असते पण केवळ खाणे-पिणे असे जीवन व्यर्थ न घालविता त्या जीवनात ‘नारायण’ निर्माण झाला पाहीजे. अशी अवस्था फक्त श्रीगुरू करू शकतात पण हा योग सर्वांना लाभत नाही म्हणून आपल्या कुटुंबात ह्या प्रतिमांची जरूरी आहे.

पूर्वी आपल्या देवात ज्या मूर्ती होत्या ते देवाचे प्रतीक होते असे देवत्त्व सगुण व आकाररूप असून त्या प्रतिमांना वेगवेग•य़ा मंत्रांनी सिध्द करावे लागत होते, पण आपल्याला ज्या प्रतिमा मिळालेल्या आहेत त्या निर्गुण आहेत. त्यामुळे कोणताही मंत्र म्हटला तरी चालेल अशा ह्या प्रतिमा आहेत. त्यांना अमुक एक धर्म किवा कर्म पाहिजे असे नाही. जो कोणी ह्या जगात जन्माला येतो व ज्याला उच्चार करता येतो अशा कोणालाही मंत्रोच्चाराने पाहिजे ते फल मिळेल. असा सोपा मार्ग प. पू. जगद्गुरू साईनाथ महाराजांनी दाखविला आहे.

वास्तविक पहाता ह्या प्रतिमा ‘वं. दादांनी दिल्या  आहेत’ म्हणून त्याचा स्वीकार आपण भक्तांनी केला या व्यतिरिक्त त्यांचा अर्थ आपल्याला समजला नाही. आपल्याला चार प्रतिमा दिल्या आहेत. त्या कशासाठी ? आपल्याजवळ पैसे आहेत व त्या घेण्याची ऐपत आहे म्हणून आपण घेतल्या आहेत का ? तर महत्त्वाचा विषय आपण समजून घ्या. तरच भवितव्यात त्यांचा लाभ आपल्या कुटुंबीयांना होईल. तुम्हा भक्तांच्या घराण्यातील जे देव आहेत व ज्यांची आपण पूजाअर्चा करता असे देव हे पितळेचे किंवा तांब्याचे आहेत, त्याचे तत्त्व म्हणजे काय हे समजून घेतले पाहीजे. केवळ देवामध्ये पूजनासाठी मांडले आहेत म्हणून त्यांना ‘देव’ म्हणून संबोधणे हे अज्ञान आहे व त्यामागे अंधश्रध्दा आहे, यासाठी सर्व भक्तांना विनंती अशी की ज्या प्रतिमा आपल्याला दिल्या आहेत व त्यामागे जो विषय आहे तो जर समजला नाही तर हा विषय हा ‘विष’ आहे.

अनादि कालापासून ‘देवाचे प्रतीक’, म्हणजे ‘प्रतिमा’ असे आपण समजत आलो. परंतु ह्याचप्रमाणे आपल्याला या प्रतिमा दिल्या आहेत असे नाही तर पहिल्यांदा ‘देवाचे प्रतीक’ म्हणजे काय हे समजले पाहिजे. विश्वाची धारण तीन तत्त्वामध्ये झाली आहे. ती तत्त्वे म्हणजे उत्पत्ती, स्थिती व लय — त्यामध्ये जरी स्थिती ही अस्तित्त्वात असली तरी त्यामध्ये स्थित्यंतर करणे आवश्यक आहे. उदाः-आपल्या घराण्यात एखादे बालक जन्माला येते. त्या बालकावर जर संस्कार झाला नाही तर त्या बालकाला बोलता व चालता येत नाही, तसेच त्याच्याशी आपण जो विषय बोलतो तो जर त्याला समजला नाही तर ते बालक जन्माला येऊन किंवा जन्म घेऊनसुध्दा निरूपयोगी होते. हा संस्कार जो आपण करतो ती अवस्था बालकाचे ‘स्थित्यंतर’ असे होय. नुसते बालक आहे म्हणून आपल्या घरी जर त्याला सांभाळले तर ते बालक हाडामांसाचा गोळा म्हणून आपले जीवन व्यर्थ खर्च करेल. ही जशी स्थित्यंतर होण्याची अवस्था या बालकाची आहे त्याप्रमाणे आपल्या जीवनात तीन गुण आहेत, त्या गुणांचा विकास झाला पाहीजे म्हणजे असे की ‘उत्पत्ती-अवस्था’ ही जी स्थिति आहे त्यामध्ये संस्कार झाल्यानंतर स्थित्यंतर होते…म्हणजे ‘स्थिती अवस्था’, ही आपण प्राप्त करून घेतो. त्या अवस्थेप्रत पुन्हा संस्कार केल्यानंतर तिसरी अवस्था म्हणजे ‘लय अवस्था’ प्राप्त होते. याप्रमाणे प्रत्येक अवस्थेमध्ये स्थित्यंतर करणे अत्यावश्यक आहे. हे जे संस्कार आपण आपल्या देहावर म्हणजे ‘जीवना’वर करून घेतो, त्यामुळे जी जी स्थित्यंतरे आपल्याला पहावयास व अनुभविण्यास येतात त्या संस्कारामुळे आपण या जगात राहून सुखाची पाऊलवाट अनुभवितो. हा संस्कार होताना पूज्य भावना असल्याशिवाय स्थितीचे स्थित्यंतर अनुभवास येणार नाही. उदाः–आपल्या जीवनामध्ये जे बालक असते त्या बालकाबद्दल मोह व माया आहे म्हणून आपण त्या बालकाला सज्ञान करू शकतो. असे बालक भवितव्यामध्ये आपल्या कुटुंबाचा आधार बनते. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या प्रतिमा दिल्या आहेत त्या देवाचे प्रतीक म्हणून नव्हे तर आपल्या ठायी देवाबद्दल श्रीगुरूंनी  जो भाव निर्माण केला आहे त्या भावनेला जो प्रतिसाद मिळतो ह्या प्रतिसादास ‘प्रतिमा’ असे म्हटले आहे.

आपल्याकडील तीन प्रतिमांमध्ये सृष्टीचे गुणधर्म आहेत म्हणून जशी सृष्टी आपल्याला दिसते तसे आपले आचार, विचार व उच्चार हे इतराना अनुभवास यावयास पाहिजेत. जगामध्ये जो कोणी जन्माला येतो त्या व्यक्तीचे भिन्नाभिन्न गुण म्हणजे आचार, विचार व उच्चार हे समपातळीवर नसल्याने कुटुंबात म्हणजे जगात अशांतता सदैव आहे. अनेक वर्षांपासून आपण धर्म व पुण्यसंचय जरी केला आहे. तरी त्या आचारामध्ये‘देव’नसून दुस-याबद्दल ‘द्वेष’ हा दिसून येतो. त्यामध्ये जरी आपण स्वतःला‘देवाचे भक्त’ असे म्हणतो तरी मनामध्ये ‘हेवा’ हा असतोच. या सर्व परिस्थितीस आपणच कारणीभूत आहोत. कारण गुरूमार्ग हा केवळ जीवनातील जी अडीअडचण निवारण करण्यासाठी नाही, तर गुरूमार्गामध्ये जीवनाची शिकवण शिकायला मिळावी म्हणून तो आहे हे आपण विसरतो. गुरूअंकित झाल्यानंतर जो जीवनाचा आराखडा आपले गुरू  सांगतात त्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत व्हायला पाहीजे. वास्तविक जीवनात ज्या अडीअडचणी निर्माण होतात ती अडचण नसून जन्माला आपण का आलो आहोत हे आपल्याला समजावे व त्याप्रमाणे आपला आचार, विचार व्यतीत व्हावा अशी इच्छा ईश्वराची असते. पण त्याउलट आपला विचार अन्य दिशेने जात असल्यामुळे आपण सर्वजण दुखी म्हणजे अज्ञानी आहोत असे म्हणावे लागेल. या सर्व विचारांचा सांगोपांग विचार करून ‘हे जग कसे सुखी करता येईल’, असा प्रश्न माझ्यासमोर कार्यारंभी होता व आजही आहे, त्यासाठी निश्चित एक गुरू केल्याशिवाय ही सुखाची दिशा प्राप्त होत नाही.

जे आज आपले जीवन आहे त्यात काय अधिक आहे व काय कमी आहे असा विचार चुकूनही कोणी करीत नाही. जन्माला येऊन दोन टोके एकत्र करून ‘आपण का सुखी नाही’ असा प्रश्न आपण इतरांना विचारत असतो. अनादि कालापासून धर्म, रूढी, परंपरा आणि योग्य ते संस्कार यांचा विचार व आचरण आपण सदैव करीत असतो. हीं स्थिती आजची नव्हे तर त्यामध्ये स्थित्यंतर केल्याशिवाय आपल्याला जगता येणार नाही असा सुविचार कोणी मनुष्य कदापिही करत नाही. पिढय़ान् पिढय़ा तेच तेच करणे म्हणजे धर्माचरण. हे एक टोक व दुसरे टोक म्हणजे देवाला, धर्माला न मानणारा एक वर्ग आज समाजात प्रचलित आहे की ज्या व्यक्तींना ‘सोयर-सुतक’ याचा अर्थही न समजता फक्त सुख पाहीजे असा वर्ग आपल्या सभोवार वावरत आहे. भवितव्यामध्ये ही पिढी समाजाची शत्रू होणार आहे, हे आपण विसरलो आहोत, यासाठी प. पू. जगद्गुरू श्रीसाईनाथ महाराज यांचे आज्ञेप्रमाणे ह्या जगाचा जीवन जगण्याचा मूळधर्म बदलला पाहिजे. असा विचार मी केला. तसेच या जगाला जगण्याचा मार्ग दाखविला पाहीजे अशी शिकवण श्रीसद्गुरूंनी दिली आहे असे म्हटल्यावर, काहीतरी जगात कार्य निर्माण केल्याशिवाय हे जग एकाच मार्गाने जाणार नाही म्हणून

                       ।। श्रीसाई अध्यात्मिक समिती ।।

हीची स्थापना 30 वर्षांपूर्वी करण्यात आली व त्या मानवी जीवनाचा कार्यारंभ सुरू केला.

>>