आत्मनिवेदन ग्रंथ भाग ६
जो कोणी जन्माला येतो त्याच्या जन्माचे काही ‘कारण’ हे निश्चित असले पाहिजे. कोणीही कारणाशिवाय इहलोकामध्ये जन्माला येत नाही व जात नाही. – असे ‘कारण’ सर्वांना विदित व्हावे म्हणून ‘निराकरण’, ज्यामध्ये कारण आहे, त्याचे निरसन व्हावे म्हणजे निराकरण – हे निराकरण जेव्हा आपल्या जीवनात आचार, विचार व उच्चार यामध्ये व्यतीत होईल तेव्हा जीवनामध्ये जे कारण आहे ते समूळ नष्ट होऊन जो आपला आचार व विचार देवाप्रीत्यर्थ केलेला असतो, तो आचार ‘प्रतिमा’ म्हणून आपल्यासमोर उभा राहतो. यासाठी जी प्रतिमा आपल्याला दिली आहे ती ‘कारण प्रतिमा’ आहे. त्याचे प्रतीक आपण गुरूहस्ते घेतले आहे. जन्माचे कारण व गुरूंचा कृपाशिर्वाद अशा दोन्ही अंगानी ही प्रतिमा सिध्द आहे. कारण प्रतिमेमध्ये अनंत विषय असून ‘कारण प्रतिमा’ हाच प्रामुख्याने एक महत्त्वाचा विषय आहे हे कोणाच्याही लक्षात येत नाही. प्रधान प्रतिमा ही कारण प्रतिमा होय. आपणास दोन हात व तिसरे मस्तक यापैकी एक जर काही नसेल तर जसे आपले जीवन व्यर्थ होते, त्याप्रमाणे कारण, साईशक व महाकारण प्रतिमा या घेतल्या नाहीत तर जीवन हे व्यर्थ आहे; याचे कारण या तीन प्रतिमांमध्ये विश्वाचा जो धर्म आहे तो सामावलेला आहे. उत्पत्ती, स्थिती व लय ही तत्त्वे एकरूप झाल्यानंतर विश्वाचे कार्य-कारण-भाव निर्माण होतात. त्याप्रमाणे या तीन प्रतिमा किंवा उत्पत्ती, स्थिती व लय ह्या त्रिपुटीचे कार्य व कार्यकारणभाव म्हणजेच ‘श्रीनारायणी’ प्रतिमा होय.
पूर्वीच्या काळी देव्हाऱ्यामध्ये जे देव आपण पूजनास मांडत होतो त्या प्रतिमांमध्ये वरीलपैकी एकच तत्त्व असावयाचे, त्यामुळे इतर दोन तत्त्वे ही गौण असल्यामुळे जरी आपण वर्षानुवर्षे देवतार्जन केले तरी त्याचे फल अपेक्षेप्रमाणे मिळत नव्हते व नाही. तेव्हा ह्या तीन प्रतिमा – साईशक, कारण व महाकारण म्हणजे उत्पत्ती, स्थिती व लय – ही त्रिपुटी झाल्यानंतर त्या प्रतिमांना देवत्त्व प्राप्त झाले आहे. त्या देवत्वाला आपल्या जीवनामध्ये इष्ट कार्य करावयाचे आहे म्हणून चौथी प्रतिमा म्हणजे श्रीनारायणी ही होय. तिला जे इष्ट कार्य करावयाचे आहे त्यासाठी प. पू. साईनाथ महाराजांनी पूर्वीच आशिर्वाद दिला आहे, तो म्हणजे,
।। जया मनी जसा भाव, तैसा तया अनुभव ।।
हा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकाने जो महामंत्र दिला आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण हा महामंत्र मी स्वतः औदुंबर क्षेत्री म्हणत होतो व अजूनही गेली ३७ वर्षे मी तो नित्यनियमाने म्हणत आहे. त्या महामंत्रात काय आहे व काय नाही ही शंका काढून काहीही समजणार नाही. प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय दु:ख किवा सुख हे दुरून अनुभविता येत नाही. साधकाला जी जी साधना श्रीगुरू देत असतात त्यामागे भक्तांचे कल्याण निश्चित लिहिलेले असते. जरी भक्त अज्ञानी असला तरी गुरू हे सज्ञानी आहेत. त्यामुळे त्यांचा अधिकार आपल्यावरच नव्हे तर विश्वावर असतो म्हणून हे विश्व चाललेले आहे. आज भौतिक विचारांमुळे आध्यात्मिक विचार करण्याची पातळी आपल्यापाशी नाही. जी गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहतो यावरच विश्वास ठेवणे असे आजचे जग आहे, त्यामुळे श्रध्दा व सबुरी ही कोणाहीपाशी नाही. जो विश्वास आहे तो फक्त पै-पैशावर असून त्यामागे मनुष्य धावत आहे. पण हे केवळ जीवनात मृगजळ असून त्या पाण्याने जीवनाची तहान भागणार नाही. हे विश्व कितीही जरी शास्त्राप्रमाणे पुढे गेले तरी एक वेळ मागे वळून पाहावे लागेल. ही पाहण्याची क्रिया जेव्हा आपण करू तेव्हा अध्यात्म म्हणजे काय हे कळेल. भौतिक शास्त्राचा आधार घेऊन ह्या विश्वात ‘प्रेरणा’ म्हणून काही शक्ती आहे याचा मागमूस लागणार नाही. भवितव्यामध्ये असे जग चालले तर या विश्वाचा ऱहास होईल. यासाठी तसे घडू नये म्हणून प. पू. श्रीसाईनाथ महाराजांनी चौथी प्रतिमा ‘श्रीनारायणी’ म्हणजे ‘प्रेरणा’ ही निर्माण करून सर्व भक्तांना दिली आहे. याचा अनुभव आज जरी आपल्याला मिळाला नाही तरीपण कालांतराने हा अनुभव हा सत्य आहे असे अनुभवास येईल.
आज आपण आपल्या स्वतःपुरताच विचार करीत आहोत, परंतु आपल्या घरी जी मुलेबाळे आहेत त्यांची तरतूद पै-पैशानी केली तरी ती तरतूद निरंतर अशी ठेव नाही. जर आपण सूज्ञपणे जगाचा म्हणण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा विचार केला तर जसे सुख आज आपण उपभोगीत आहोत तसा लाभ भवितव्यामध्ये आपल्या मुलाबाळांना मिळाला पाहिजे. ह्या सदिच्छेने ही प्रेरणा म्हणजे श्रीनारायणी ही सांभाळली पाहिजे तरच भवितव्यामध्ये सुख, शांती व समाधान हे न मागता घरच्या घरीच मिळू शकेल. तसेच आपल्या कुटुंबाचा उच्चार, विचार व आचार याचे अधिष्ठान ‘श्रीसाईशक प्रतिमा’ यामध्ये एकरूप होण्याने तोच परमेश्वर भवितव्यामध्ये आपल्याला तारणार आहे. यासाठी जी आपली देवाबद्दल, धर्माबद्दल अंधश्रध्दा आहे ती न ठेवता स्वतः देवाबद्दल आदरभाव निर्माण करा. तो भाव वाया जाणार नसून, त्या भावाचे मूल्य भावनेत होईल व हीच भावना विश्व-कल्याणास उपयोगी पडेल.
जो कोणी या जगात जन्माला येतो, त्याला देवापाशी काही मागावयाचे नसून, जन्माला येते वेळी ती संपत्ती तुम्हाला एकोणीस माध्यमांच्या रूपाने न मागता दिली आहे. ती संपत्ती आपल्याला समजत नाही म्हणून आपल्यावर आपत्ती ओढवते. वास्तविक जो जन्म आपल्याला प्राप्त झाला आहे त्यामध्ये परिपूर्णता असल्याशिवाय देव जन्माला पाठवीत नाही. असे असताना जी संपत्ती दिली आहे तिचे ज्ञान करून घेतले पाहिजे. हे ज्ञान शाळेत व विश्वविद्यालयात मिळणारे नाही. जे ज्ञान शाळेत व विश्वविद्यालयात मिळते त्या ज्ञानाने आपली उपजीविका होते म्हणजे ते ज्ञान २५ टक्के आहे असे गृहित धरले पाहिजे. पंचाहत्तर टक्के ज्ञान हे आपणास नसल्याने, आपला जन्म केवळ अज्ञानाने व्यर्थ खर्ची पडतो व शेवटी अंताच्या वेळी आपण काय मिळविले व काय घालविले याचा हिशेब लागत नाही. आज जरी जन्म घेतला तरी पुन्हा जन्माला यावयाचे आहे, हे आपण विसरतो, त्यामुळे जरी जन्म प्राप्त झाला असला तरी पुढच्या जन्माची तरतूद आपणच केली पाहिजे हे विचारात न घेता, खाणे-पिणे, कपडालत्ता, ऐषाराम यामध्ये जीवन खर्च होते. आज जो आपल्याला जन्म प्राप्त झाला आहे, त्यात जी सुखे आपण उपभोगतो, ते सुख तुमचे नसून, ती पुण्याई वाडवडिलांची आहे किंवा पूर्वीच्या अनेक जन्मांत त्म्ही सत्कृत्य केले असल्याने आज जो काही जन्म सुखावह आहे तो त्या सत्कृत्यांचे फल म्हणून आहे. असा कर्माचा खेळ अहर्निश चालू आहे म्हणून जन्माचे ज्ञान होणे अत्यावश्यक आहे, हे ईश्वराला ज्ञात आहे म्हणून अवतारी पुरूषांना तो जन्माला पाठवितो, त्यांचे आगमन भूतलावर होते, ते कार्यार्थ आयुष्य वेचीत असतात. त्यात त्यांना आपला मोठेपणा, आदर, नावलौकिक व्हावा अशी इच्छा कधीही नसते तर जगाचा कसा उध्दार होईल म्हणजे जग कधी ज्ञानी होईल ही तळमळ त्यांना असते. जे आपण दुख म्हणून भोगतो त्याचे कारण अज्ञानाचा शाप म्हणजेच ‘Curse of Ignorance’ आहे. वास्तविक जे समितीचे कार्य चालू आहे त्यामध्ये तीन यज्ञं गेली पस्तीस वर्षे चालू आहेत, त्यामध्ये एक ‘कर्मयज्ञ’ दुसरा ‘ज्ञानयज्ञ’ व तिसरा ‘धर्मयज्ञ’ होय. जेव्हा तुम्ही अडीअडचणी घेऊन येता व समितीच्या कार्यकेंद्रावर विडा, सुपारी, नारळ व दक्षिणा ठेवता त्यावेळीच तुमचे चांगले-वाईट कर्म हे गुरूंना ‘गुरूदक्षिणा’ म्हणून नकळत समर्पित करता. आता जे कर्म की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आहे की दु:ख आहे हे न समजल्यामुळे ते कर्म गुरूंना समर्पित केल्यावर ‘माझे काय होणार’ व ‘मला सुख लाभेल किंवा नाही’ हे प्रश्न गौण आहेत. वास्तविक त्या क्षणापासूनच ज्ञानयज्ञाला आरंभ होतो. त्या यज्ञाची पूर्णाहुति केल्याशिवाय आपल्याला सुख. शांती व समाधान मिळत नाही, पण हे कर्तव्य आपण विसरत आहोत म्हणून श्रीपंतांनी एका पदात म्हटले आहे की,
‘क्षणोक्षणी विसरतो तुजला । परि राखिसी निशीदिनी मजला’,
असे वचन दिल्यानंतर धर्मयज्ञ सुरू होतो पण ह्या यज्ञाचा मागमूससुध्दा आपल्या आचारात-विचारात दिसत नाही.
जी कर्मे तुम्ही सद्गुरूंना दिली आहेत, त्या कर्मात काय आहे हे विचारामध्ये घेणे गैर आहे. कारण हे कर्म तुम्ही निरपेक्ष बुध्दीने गुरूंना गुरूदक्षिणा म्हणून दिले आहे, तेव्हा ह्या कर्माचा विचार करून ‘माझ्या नशिबात काय आहे ? ’याचा विचार करणे म्हणजे आपण नि:स्वार्थी नसून स्वार्थी आहोत. जगामध्ये जो कोणी स्वार्थ म्हणून मागतो, त्यावेळी त्याचा एक स्वार्थ पूर्णत्वास जाईल व दुसरा स्वार्थ त्याची भरपाई करील म्हणजे जे आज दिले ते उद्या निघून गेले, असे जीवन सदैव चालू आहे, म्हणजे लक्ष्मी येते व जाते. असा हा खेळ जीवनामध्ये असू नये यासाठी गुरूंनी कर्मयज्ञामध्ये तुमचे कर्म तुमच्यापासून नकळत हिरावून घेतले आहे व त्याच्याऐवजी तुम्हाला तीन प्रतिमा देऊन कर्माची भरपाई केलेली आहे. फक्त आपले कर्तव्य एवढेच राहिले आहे की त्या प्रतिमांना श्रध्दा, भक्तीने पूजनात मांडून काही एक अपेक्षा न ठेवता जर त्यांचे पूजन केले तर अपेक्षित सुख तुम्हाला न मागता मिळेल. या प्रतिमांचे पूजन केल्यानंतर तुमच्या ज्ञान-अज्ञानाने असे काही मागितले गेले तर जे कर्म आपण गुरूंना दिले आहे त्या कर्माचे आवाहन आपण नकळत करता. त्या कर्माचे आगमन तुमच्या जीवनामध्ये पुनश्च झाले म्हणजे ते अधिक प्रखर होते, कारण ते नको असलेले कर्म गुरूंच्या झोळीमध्ये दक्षिणा म्हणून तुम्हीच दिलेले असते. ह्या कर्मावर आपला काही एक हक्क नाही म्हणून ते कर्म आवाहन केल्यानंतर आपले जीवन अधिक दु:खी होते. यासाठी वेळोवेळी जी निवेदने आपल्याला ज्ञानी करण्यासाठी लिहिली गेली आहेत ती वारंवार वाचून, त्यांचे मनन करून आपल्याला काय ज्ञान होते त्याची दक्षता घ्यावी तरच जी निवेदने लिहिली गेली आहेत, ती ईश्वराची वचने म्हणजे ‘Ten commandments’ आहेत.
आता चौथी प्रतिमा म्हणजे ‘नारायणी, हा धर्मयज्ञ आहे’. म्हणजे ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ या वचनाप्रमाणे आपले आचरण व त्याप्रमाणे विचार आपल्या जीवनामध्ये सदैव वास करीत राहीला पाहिजे. देवाने किवा गुरूंने तुमची पात्रापात्रता न पाहता जशा ह्या प्रतिमा तुम्हाला दिल्या आहेत तशीच आपणही इतरांशी वागणूक ठेवली पाहिजे. ह्या प्रतिमा पूजनात केवळ देव म्हणून ठेवण्यासाठी नाहीत. त्या प्रतिमा आपल्या आचरणामध्ये येऊन, आपले देहिक प्रतीक याची प्रतिमा बनली पाहिजे कारण जो अडथळा कर्मामध्ये होता ते कर्म लयास गेले आहे म्हटल्यानंतर कर्माची आगंतुक निर्मिती आपण जर करीत बसलो तर आपले जीवन हे ‘जीवन’ न राहता ते ‘वन’ होईल. यासाठी सूज्ञ भक्तांनी या तीन यज्ञांचा म्हणजे प्रतिमांचा बोध घ्यावा यात श्रीसाईशक प्रतिमा म्हणजे कर्मयज्ञ, कारण प्रतिमा म्हणजे ज्ञानयज्ञ, महाकारण प्रतिमा म्हणजे धर्मयज्ञ आणि नारायणी प्रतिमा म्हणजे मानवता, असा परम-अर्थ सामावलेला आहे.
वरील चार लक्षणे तुमच्याकडे आहेत म्हणून तुम्ही लक्ष दिल्यास लक्षाधीश व्हाल, असे अभिवचन देवाने दिले आहे ते असे –
।। “दत्तगुरू भजनी मन रंगले । गुरूभजनी मन पूर्ण रंगले ।
दत्तचि चालता दत्तची बोलता । जेवित खेळिता चित्त दत्तमय झाले।।
दत्त सर्वकाम जन वन धाम । दत्त आत्माराम रूपे जगचि भासले ।।
दत्त योग ज्ञान दत्त ध्यान मौन । सर्व दत्त चरणमय स्वयंसिध्द ठेले” ।।
आज आम्हा भक्तभाविकांच्या जीवनात सुख, शांती व समाधान निर्माण करणारी व मागील तसेच पुढील अनेक पिढय़ांत श्रीसद्गुरूकृपाशिर्वादाचे बीज रूजविणारी ‘श्रीसाई अध्यात्मिक समिती’ची स्थापना होऊन जरी ३६ वर्षे पूर्ण झालेली असली तरी ही कार्ययोजना विश्व-नियंत्याच्या मनात विश्वाच्या उत्पत्ती आधीच निर्गुण निराकार रूपात प्रसवली होती. त्या निर्गुण, निराकार कार्य योजनेला साकार करण्यासाठी अनेक अवतारी सत्पुरूषांनी भूतलावर जन्म घेऊन आपले जीवन कार्यार्थ वेचले. परंतु निश्चित असा सोपा, सुलभ मार्ग सामान्य जनाला दाखविण्याऐवजी धर्म-शास्त्र, पोथी-पुराण, व्रत-वैकल्ये, यज्ञ-याग इत्यादी अवडंबरे माजवून परमेश्वर प्राप्तीचा मार्ग अधिक बिकट करून ठेवला.
श्रीसाईनाथांनी श्रध्दा, सबुरी व मानवता याची शिकवण समाजाला दिली व तीच तत्त्वे अंगीकारलेली ‘श्रीसाई-आध्यात्मिक समिती’ उदयाला आली. मानवाच्या अज्ञानामुळे कुटुंबात व समाजात निर्माण झालेले असमाधान, अश्रध्दा दूर करण्यासाठी समितीचे कार्य कार्यान्वित झाले. देवदेवतांचे कृपाशिर्वाद, अवतारी पुरुषांची पुण्याई व वाडवडिलांचे सत्कर्म स्वतःच्या जीवनात धारण करण्यास ज्यावेळी सामान्य मानवाचे सामर्थ्य अपुरे पडले त्यावेळी हे पूर्वसंचित व मानवी जीवन यांची सुसंगती साधावी म्हणून श्रीसाईनाथांनी माझ्या माध्यमातून भक्त-जीवनात तीन विमोचने व पाच दीक्षा देऊन वंशाचे ‘गुरूअंशात’ स्थित्यंतर केले, तसेच मानवी जीवनाचे ज्ञान होऊन जीवनातील विसंगती दूर व्हावी म्हणून वेळोवेळी सेमिनार-रूपी ज्ञानयज्ञ घडविले. या ज्ञानयज्ञातून जीवाचे परमात्मा अवस्थेत स्थित्यंतर होण्यासाठी जी साधना आवश्यक आहे त्या साधनेची ओळखही करून दिली.
जीवाला जन्मकारणाचे ज्ञान झाल्यावर तो जीव, ‘जीव’ न राहता ‘नर’ अवस्थेचा अनुभव अनुभवितो. या अवस्थेत केवळ स्वतःचा आत्मिक विकास व्हावा म्हणून साधना केली, तर त्या साधनेचा लाभ स्वतःपुरताच मर्यादित राहतो व मृत्युनंतर हा लाभ ‘पुण्याई’ या स्वरूपात वलयरूपाने वातावरणात विलीन होतो. परंतु स्वतःच्या आत्मिक विकासाबरोबरच जनकल्याणार्थ जीवन वेचण्याची तळमळ जर साधकाने ठेवली तर ज्याप्रमाणे आकाशात सूर्यनारायणाच्या आगमनाने अवघी सृष्टी प्रकाशमान होते, तद्वत साधकांच्या साधनेतून निर्माण झालेल्या तेजोवलयामुळे त्याचे स्वतःचे व इतरांचे जीवन सुवर्णमय होते. ’श्रीसाई अध्यात्मिक समिती’च्या उभारणीतील हे एक महत्त्वाचे अंग होय. समितीने गेल्या ३६ वर्षांत जगातील दु:खी जिवांची दुखे निराकरण रूपात स्वतः भोगली व त्यांच्या दु:खात सहभागी होताना त्यांना केवळ अपरिमित सुखाचा चिरंतन ठेवा ‘ठेव’ म्हणून दिला आहे.
विश्वाची उत्पत्ती ज्या तीन तत्त्वातूंन झाली आहे ती तीन तत्त्वे उत्पत्ती, स्थिती व लय, ॐ कार साधनेत सामावून भक्तांना नित्य उपासनेचा सोपा श्रीगणेशा श्रीगुरूंनी प्राप्त करून दिला, तसेच या तीन तत्त्वांचे प्रतीक म्हणून श्रीसाईशक, श्रीकारण व श्रीमहाकारण ह्या तीन प्रतिमा नित्य पूजनार्थ दिल्या. त्या तीन प्रतिमांमध्ये नरजन्माचे ज्ञान, जिवाचे जन्मकारण व जीवनाची सार्थकता सामावलेली आहे. ज्या भक्तभाविकांच्या नित्य पूजनात या तीन प्रतिमांचा समावेश आहे, त्यांना चौथी प्रतिमा म्हणजेच ‘श्रीनारायणी’ प्रतिमेचाही लाभ झाला आहे.
निसर्गातील प्रत्येक घटक आपले आयुष्य हे इतरांच्या कल्याणार्थ वेचित असतो. पशू-पक्षी, वृक्ष-लता, डोंगर-नद्या, ऊन-पाऊस या सर्वांचा उपयोग कल्याणकारीच आहे, मात्र आज आपण मनुष्य जरी याच निसर्गात जन्म घेते झालो आहोत, तरी आपल्या बुध्दी माध्यमाच्या दुरूपयोगामुळे स्वतःचे व इतरांचे अकल्याण केवळ स्वार्थापायी करीत आहोत. श्रीसाई आध्यात्मिक समितीच्या शिकवणीत परमार्थ व स्वार्थ या दोहोंचा सुंदर संगम अनुभवास येतो. ‘स्वार्थ’ म्हणजे स्वतः प्राप्त केलेल्या जीवन माध्यमाचा निश्चित अर्थ व ‘परमार्थ’ म्हणजे इतरांचे जीवन सुखमय बनविण्यासाठी करावयाचा जीवनाचा सदुपयोग म्हणजेच ‘परम-अर्थ’ होय.
नरजन्माचे कर्तव्य ज्यावेळी जनहितार्थ कार्यान्वित होते त्यावेळी ‘नर’ ह्या अवस्थेचे ‘नारायणी’ या अवस्थेत स्थित्यंतर होते. आम्हा भक्तभाविकांच्या जीवनात ही नारायणी अवस्था उदीत व्हावी म्हणून आपणा सर्वांस ‘नारायणी प्रतिमा’ देण्यात आली. ही परमपवित्र नारायणी अवस्था सामान्य भक्ताला सहज प्राप्त व्हावी म्हणून माझ्या माध्यमातून श्रीगुरूंनी अहोरात्र कार्य केले आहे, हेच माझे सद्भाग्य होय. आपल्यापाशी नित्य पूजनात असलेल्या तीन प्रतिमा म्हणजे श्रीगुरूंची काया, श्रीगुरूंची वाणी व श्रीगुरूंचे मन आहे, या भावनेने या प्रतिमा जपावयास पाहिजेत. वास्तविक श्रीगुरूच या तीन प्रतिमांच्या स्वरूपांत प्रत्येक भक्ताच्या घरी वास करीत आहेत ही ओळख आपल्याला ज्या वेळी होईल त्यावेळी आपल्या जीवनात गुरूपौर्णिमा उदयाला येईल व नारायणी प्रतिमेचे महत्त्व व माहात्म्य आपल्याला समजेल. या नारायणीत अखिल विश्व सामावलेले आहे. ‘ना’– म्हणजे नाद, –विश्वाच्या उत्पत्तीचे प्रमुख सूत्र म्हणजेच उत्पत्ती अवस्था, ‘रा’म्हणजे राग–जीवनाचा स्थायी सुर म्हणजेच स्थिती अवस्था, ‘य’-म्हणजे लय अवस्था—नर जन्माची परिपूर्णता ! या तिन्ही प्रतिमांचे एकरूपत्व अस्तित्त्वात असणे म्हणजे ‘णी’ ही चौथी अवस्था होय. अशी ही नारायणी आज जगत्कल्याणार्थ इहजगतात श्रीसद्गुरूकृपेने अवतरली आहे व आपल्या कृपाशिर्वादात सर्व भक्तभाविकांना धन्य करीत आहे !
श्री साई अध्यात्मिक समितीच्या स्थापनेचे एक कर्तव्य या नारायणी प्रतिमेच्या रूपात आज घरोघरी नांदते आहे. या सुवर्णयोगाचे वर्णन शब्दाने वर्णन करणे अपुरे होईल. श्री साई अध्यात्मिक समितीने भक्तांना आजमितीपर्यंत काय दिले याचे सिंहावलोकन करावयाचे झाल्यास असे म्हणावे लागेल की ‘श्री’ म्हणजे सरस्वती व लक्ष्मी या दोहोंचा वरदहस्त प्रत्येक भक्ताला प्राप्त व्हावा म्हणून विमोचनांद्वारे कुटुंबातील वंश, कर्म व ऋण यातील संपत्ती, संतती व विद्यानाशांचे दोष विमोचित केले, ‘साई’ म्हणजे ‘सा’मान्य जनाला सोपी साधना शिकवून त्यातून, ‘ई’श प्राप्तीचा सुलभ मार्ग दाखविला. आत्म्याची उन्नती होण्यासाठी दीक्षांद्वारे अवधान, ध्यान व चिंतन या अवस्था साधक माध्यमात रूजविल्या व श्रीसाई स्वाध्याय मंडळ स्थापन करून प्रापंचिक व ‘आध्यात्मिक’ जीवनातील कर्तव्याचीओळख करून दिली. ‘समिती’चे कार्य हे समाजाभिमुख, मित्रत्वाचे, विश्वबंधुत्वाचे व तितीक्षेचे म्हणजे दया, क्षमा, शांती व सबुरीचे कार्य आहे.
मानवी जीवनामध्ये जे ५ ऋणानुबंध असतात, त्यापैकी चार ऋणानुबंध आपल्या जीवनात अस्तित्त्वात असून देवादिक हा ऋणानुबंध जीवनाबाहेर असतो. हे ऋणानुबंध जीवनाशी हितसंबंधित असून त्यांच्या अनुकूल-प्रतिकूलतेवर जीवनातील सुख-शांती-समाधान अवलंबून आहे. ज्यांची प्रखरता अधिक असेल ते ऋणानुबंध अनुकूल करून घेणे यासाठी मानवी प्रयत्न अपुरे पडतात व केवळ श्रीसदगुरूंची कृपा झाली तरच हे कार्य होऊ शकते, ते होण्यासाठीच आपण भक्तांना प्रतिमा दिलेल्या आहेत, त्यापैकी श्रीसाईशक – प्रतिमा ही मातृपितृ ऋणानुबंधासाठी, कारणप्रतिमा इतरेजन ऋणानुबंधासाठी, महाकारण- ही जन्मजन्मांतरासाठी व या तीन प्रतिमांचे एकरूपत्व असलेली चौथी श्रीनारायणी प्रतिमा ही जन्मकर्म ऋणानुबंधासाठी आहे व त्यामुळे आपले जीवन परिपूर्ण म्हणजे ३६०0 बनते. हे जे ३६०0 चे कृपाशिर्वादाचे वलय आपल्या जीवनात धारण करून दिले आहे त्याला कार्य करू देणे हे आज आपले कर्तव्य आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. ज्या जन्मकर्म ऋणानुबंधपरत्वे ‘पुनरपि जननं, पुनरपि मरणं’ ही अवस्था आपल्या जीवनात होती त्यामध्ये स्थित्यंतर होऊन नराचा नारायण होणे हा कृपाशिर्वाद श्रीसद्गुरूंनी ह्या प्रतिमा सिध्द करून आपणास दिला आहे.
आपल्या जीवनात प्रापंचिक व पारमार्थिक अशा दोन बाजू असून पारमार्थिक जीवन प्राप्त होण्याची तरतूद श्रीगुरूंनी करून दिली जेणे करून जरी अडचण उपस्थित झाली तरी ती निवारण करण्याचे कार्य आपणच करावयाचे आहे. तरच जी ऋणानुबंधांची समतोल अशी अवस्था आपल्या जीवनात धारण झाली आहे ती जतन होईल. यासाठी पुढीलप्रमाणे मार्गदर्शन केले गेले—
ऋणानुबंध प्रतिमा मंत्र निराकरण
मातृपितृ श्रीसाईशक ॐ श्री साईनाथाय नमः कौटुंबिक-सुख-शांती
इतरेजन कारण ॐ नमः शिवाय: वास्तुदोष, संतती, इ.
जन्मजन्मांतर महाकारण श्रीनवनाथ अनुष्ठान : पारमार्थिक उन्नती
१० नावे
जन्मकर्म श्रीनारायणी सर्व मंगल मांगल्ये विवाह जमण्यास अडथळा
प्रत्येक ऋणानुबंध, त्यासाठी दिलेली प्रतिमा व मंत्र याबद्दलचे मार्गदर्शन केले गेले. हे मंत्र म्हणजे ‘शस्त्र’ आहेत, हे जरी खरे तरी त्या मंत्रांचा शास्त्रपरत्वे उच्चार झाला तरच ते शस्त्र असून ह्या चार मंत्रांमध्ये सर्व आधीव्याधींचा समावेश झालेला आहे. या मंत्रांचा योग्य उच्चार कारणपरत्वे करून व प. पू. बाबांच्या आशिर्वादाची याचना करून केवळ ‘उदी’च्या साहाय्याने आपणच आपली कोणतीही अडचण दूर करू शकाल, याबद्दल मला खात्री आहे.
पुढे मी गोव्याला गेलो असता चंपाषष्ठीला श्रीखंडोबाच्या नवरात्राची सांगता करण्यात येऊन नित्य साधनेतही थोडा बदल करण्यात आला व त्यानंतर मकर संक्रांतीला प. पू. बाबांनी भक्तांना असा संदेश दिला की :-
“केवळ वर्षारंभ म्हणजे ‘नवीन वर्ष’, म्हणून आपण हा दिवस साजरा करतो, त्यापेक्षा विश्वात काहीतरी निश्चित नव्याने उदयास येत असते. संक्रांत म्हणजे संक्रमण. गेल्या वर्षांत जे काही वाईट घडले त्याची पुनरावृत्ती न व्हावी म्हणून हा सण साजरा करावयाचा असतो. ह्या सणाचे महत्त्व असे की समाजात हा सण जरी घरोघरी साजरा होत असतो तरी हा सण व्यक्तिशः स्वतःच्या जीवनाचे सिंहावलोकन करण्यासाठी आहे. या दिवशी रवि एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गमन करतो. म्हणजे पुढच्या राशीला भरभराट, सुख, शांती, समाधान हे लाभावे यासाठी मागील राशीत जे आपल्या हातून नकळत दुर्विचार, अविचार घडले असतील त्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा काळ ‘संक्रमण’ म्हणून साजरा करीत असतात. म्हणजेच थोडक्यात जुन्या संगती, दुर्व्यसन, ज्याच्यामध्ये काया-वाचा-मनाचा उत्कर्ष होण्यास अडथळा येत असतो तो येऊ नये म्हणून हे जे सर्व त्याज्य आहे त्याचे विसर्जन होऊन नव्याने आपल्या जीवनाला हितकारक असेल तेवढेच विचार व आचार आचरणात आणावेत याचा अर्थ ‘मकर संक्रांत’ !
या दिवशी, त्या दिवसाचे प्रतीक म्हणून तीळ व गूळ हा वाटावयाचा असतो. याचे कारण स्वतःच्या जीवनात दुर्गुणांना थारा तिळमात्र राहू नये म्हणून तीळ व जीवन संपूर्णतः गोड व्हावे म्हणून गूळ ! याचा अर्थ ‘तिळगूळ घ्या, गोड बोला’ असा आहे. या दिवशी आसमंतात जे जग आहे ते जग आपले मित्र व्हावयास पाहिजे, जेणेकरून मानवी जीवन सुखशांतीने व्यतीत होईल.
‘मन’ आहे तो ‘मानव’. त्याअर्थी सगळे जग आपले मित्र असून, कोणीही आपले हितशत्रू नाहीत. हितशत्रू हे आपले आपणच असून जीवनात योग्य काळ व अयोग्य काळ याचा विचार जन्माला येऊन आपण कधीच करीत नाही, त्याचा विचार व्हावा यासाठी या दिवशी देवाला गोड नैवेद्य म्हणजे गुळाची पोळी करतात. या पोळीमध्ये दोन पापुद्रे असतात व मध्ये गूळ असतो. या मिश्रणामध्ये सलोखा वाढावा, शत्रू व मित्र एक व्हावेत व हा पदार्थ खात असताना तोंड नुसते गोड न होता तोंडात जी वाणी आहे त्या वाणीने नकलीपणा सोडून गोड बोलावे, असा अर्थ आहे”.
आज हे समितीचे कार्य स्थापन होऊन ४० वर्षे झाली, त्यापैकी गेली ५ वर्षे ही सुवर्णाक्षरांनी लिहावीत. असे हे कार्य गेल्या ५ वर्षांत झाले आहे. ५ वर्षांपूर्वी प. पू. बाबांच्या आज्ञेने गोव्यात ‘साईधाम’ बांधण्यात आले व त्याचवेळी श्रीशक्तिपीठाची स्थापना साईधाममध्ये करण्यात आली. बहुसंख्य भक्तांना ‘साईधाममध्ये शक्तिपीठ स्थापना केली आहे’, एवढेच माहिती आहे, परंतु त्या मागील परंपरा किती वर्षांपासूनची आहे हे कोणालाही माहीत नाही. जो कोणी मनुष्य जगतात जन्माला येतो त्याला काया-वाचा-मन असल्याशिवाय जीवन जगता येत नाही. त्याप्रमाणेच देवाला प्रतीक-प्रतिमा व प्रतिभा असल्याशिवाय देवाचे अस्तित्व, अस्तित्वात आहे, हे दाखविता येत नाही.
आज आपणा भक्तांच्या घरी तिन्ही प्रतिमा व चौथी प्रतिभा म्हणजे, नारायणी ही पण आहे. परंतु जेव्हा आपल्याला या प्रतिमा मिळाल्या, तत्पूर्वी त्या प्रतिमा ४० वर्षांपूर्वी सिध्द करण्यात आल्या होत्या, तरी त्या आपण भक्तांना तेव्हा दिल्या गेल्या नाहीत. कारण आपल्या घरी आज ज्या प्रतिमा आहेत त्यांचे मूळ शक्तिपीठात आहे. तेव्हा प्रथमतः ‘साईधाम’ बांधावे लागले व त्यानंतर शक्तिपीठाची स्थापना करण्यात आली. जी शक्ती शक्तिपीठात स्थापन करण्यात आली, तिचे आवाहन श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी येथे दर पौर्णिमेला लघुरूद्र हवन करून करण्यात आले. ११ पौर्णिमांनंतर १२ व्या पौर्णिमेला महारूद्र स्वाहाकार करण्यात येऊन ती शक्ती साईधाम, गोवा येथे शक्तिपीठामध्ये स्थापन करण्यात आली. त्यानंतर आपण भक्तांना या ३ प्रतिमा म्हणजे साईशक, कारण व महाकारण, म्हणजे उत्पत्ती, स्थिती व लय देण्यात आल्या. जर साईधाममध्ये शक्तीपीठ स्थापन झाले नसते, तर तुम्हा भक्तांना ज्या प्रतिमा दिल्या गेल्या आहेत त्या देण्यात आल्या नसत्या. म्हणजेच पर्यायाने आपल्या घरी न मागता देवाचे आगमन झाले आहे असे म्हटल्यानंतर त्या प्रतिमेचे मूल्य किती आहे हे सूज्ञ भक्तांनी समजून घ्यावे व ज्या प्रतिमा आपण घेतल्या आहेत त्यांचे फल मिळण्यासाठी म्हणून आपणास साधना म्हणजे औपचार पण शिकविला आहे. त्यामध्ये ॐ काराची १२ अंगे व संथेने सद्गुरूनाम:स्मरण हे करण्यासही शिकविले आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून प्रापंचिक अडचणी कशा सोडवता येतील हा प्रश्न प्रामुख्याने आपण विचारत असता. त्यापेक्षा जी साधना शिकविली आहे, त्याप्रमाणे आपण जर साधना केलीत तर निश्चित १०० % सुख अधिक प्राप्त होतील.
चैत्र प्रतिपदा श्री साईशके ७ या दिवशी शक्तीपीठीतील शक्तीत ‘नारायणी’ म्हणजे ‘प्रतिभा’ हिचा संगम म्हणजे एकत्रीकरण करणे हा विधी केला गेला. हे अवधान लक्षात ठेवून आपण भक्तांनी जरी लाखो रूपये खर्च केले तरी ज्या प्रेमाने जगद्गुरू श्रीसाईनाथ महाराज यांनी आशिर्वादाची भेट पाठविली आहे तिचे मूल्य होणार नाही. त्याशिवाय या ५ वर्षांत समितीच्या कार्यार्थ काही कार्य व्हावे म्हणून श्रीसाई स्वाध्याय मंडळ स्थापन केले गेलेले आहे. ही स्थापना होऊन आज ४ वर्षे होत आहेत. या मुदतीत आपण समाजामध्ये ज्या संस्था, पैशा अभावी कार्य करू शकत नाहीत अशांना ३।। लक्ष रूपये देणगी म्हणून या स्वाध्याय मंडळाने दिली आहे ! तसेच आपल्याला आपल्या परंपरेचे ज्ञान व्हावे व गुरूमार्गात सज्ञान होऊन आपण जीवन जगावे म्हणून ‘गुरूप्रसाद’ हा ग्रंथ लिहिला गेला. हा ग्रंथ लिहिण्याचा उद्देश असा की अनादि कालापासून देवदेवतार्जन व धर्माचरण कशा प्रकारे होत होते ते या ग्रंथात नमूद केले गेलेले आहे. भवितव्यामध्ये ही निराकरण पध्दत आपल्याला अवलंबिता येणार नाही म्हणून सोप्यात सोपा असा कुलधर्म-कुलाचार आपल्याला सूचित करण्यात आला, ज्यायोगे समाजाला उपयोग होऊन आपल्या कुटुंबीयानां जो कृपाशिर्वाद मिळेल तो आशिर्वाद देवदेवतार्जनापेक्षा अधिक आहे ! प. पूबाबांनी या शुभदिनी आपणा सर्वांस असा आदेश दिला की –
।। सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे ।।
असे जीवन आपण व्यतीत करावे.
चैत्र प्रतिपदेचा शुभदिवस गोव्यात श्रीसाईधाम येथे साजरा करून मी बेळगावला प. पू, पंतमहाराज यांचेकडे आलो. सकाळी आरती करून सर्व भक्तांचे वतीने त्यांचे पायाशी एक प्रार्थना सादर समर्पण केली व त्यांचे कार्यार्थ आशीर्वाद मागितले.
प्रार्थना : ।। आश्विन शुध्द ५ ।। – बेळगाव ––
“आज आम्ही गुरूभक्त पुण्य विभूती यांचे चरणी विनम्र भावनेने अशी प्रार्थना करीत आहोत की आम्हा मानवांना प्राप्त जन्माचे ज्ञान व्हावे व प्राप्त जन्मात सुख, शांती, समाधान लाभावे तसेच आपण जो मानवी जीवनाचा उध्दार व्हावा म्हणून हे कार्य स्थापन केले आहे, त्या कार्यात प्रत्येकाचा अंशमात्र भाग आहे हे जाणून परोपकाराचे इष्ट कर्तव्य आमच्या हातून यथोचितपणे पार पडावे अशी शिकवण अनादि कालापासून आजपर्यंत आपण वेळोवेळी अवतार घेऊन आम्हा मानवांना आपण दिलीत परंतु इहजन्मांत जे कर्तव्य आम्हा मानवांना करणे भाग आहे त्याचा विसर पडल्यामुळे आजची जगाची परिस्थिती फार बिकट झाली आहे. त्यामध्ये आवश्यक तो बदल घडविणे हे आपल्या कृपाशिर्वादाशिवाय होणे शक्य नाही. तरीसुध्दा आपण विभूतींनी कृपावंत होऊन सोप्यात सोपा असा मार्ग आम्हा मानवांना सूचित केला आहे. अशा मार्गाचे पालन व कर्तव्य आमच्या हातून नि:संकोच घडत राहावे व आम्हाला तशी शक्ती आपण द्यावी व ह्या सुखशांतीचा लाभ आमच्या जीवनात होऊन ईश्वरप्रणित मानवी जीवन आदीचा लाभ घडत राहवा अशी आपल्या चरणी प्रार्थना !”
“आज दिवसापर्यंत मानवी कल्याणासाठी जी साधने प. पू. साईनाथ महाराजांनी शिकविली आहेत त्याबद्दल आम्ही जन्मोजन्मी त्यांचे ऋणी राहू. पुनःश्च तसा अपराध व प्रमाद आमच्या हातून घडू नये अशी सुबुध्दी प. पू. जगद्गुरू श्रीसाईनाथ महाराज, श्रीनवनाथ आदी विभूती व देवदेवता यांनी आम्हाला व आमच्या भावी पिढयांना द्यावी अशी अनन्य भावनेने प्रार्थना करीत आहोत”.
वरील प्रार्थना बेळगावला प. पू. पंतांचे चरणी ठेवून आलो. त्यानंतर मुंबई येथे साधक अवस्थेतील पुढील मार्गदर्शनाप्रीत्यर्थ संमेलन घेतले गेले.
“जगतामध्ये बहुसंख्य लोक ‘क़ुंडलिनी विज्ञान’ या विषयाबद्दल उत्सुक असतात. परंतु तेवढेच या विषयाबद्दलचे अज्ञान आहे. परमेश्वराने आम्हा मानवांना निर्माण करते वेळी कोणतीही माध्यमे उदीत करावी असे कार्य आपणासाठी ठेवलेले नाही. असे जर असते तर आपण जन्माला येऊन सज्ञानी झालो नसतो. तेव्हा “कुंडलिनी जागृत करावयाची आहे” असे जे लोक म्हणतात याबद्दल अज्ञान खूप आहे. त्यापैकी एक दिशा ज्ञात आहे. बाकीच्या सात दिशा अज्ञात असतात. त्या गुरूकृपेने ज्ञात होणे म्हणजे ‘कुंडलिनी जागृती’ होय. .
देहामध्ये असंख्य रक्तवाहिन्या आहेत. त्यापैकी ३ ड्याय़ा म्हणजे इडा, पिंगला, सुषुम्ना या होत. ह्या नाड्या जीवनामध्ये प्रमुख असून त्यांच्यामुळे पचन, श्वसन व रक्ताभिसरण, ह्या ३ क्रिया जीवनात अव्याहत चालू असतात. ते कार्य होण्यासाठी मनुष्याला आपण होऊन काही एक प्रयत्न करावा लागत नाही. त्यामध्ये जर आपल्या आचार विचारांमुळे बिघाड झाला तर आपण त्याला ‘आजारपण’ असे म्हणतो व त्यावर आपण औषध चालू करतो. पूर्वीच्या काळी असे आजार जर झाले तर औषधोपचार न करता प्रथमतः लंघन करीत म्हणजे जो आजार आहे तो आपोआप बरा होत असे. पण आज लंघन किंवा उपास केव्हा केला जातो ? जेव्हा आपली अन्न प्राशन करण्याची इच्छा नाहीशी होऊन पोट बिघडते तेव्हा ! त्या आधी आपण पोटाकडे लक्ष न देता ती ‘मोट’ आहे असे समजून अन्न सेवन न करता नुसते आत ढकलतो व त्यामुळे पचनक्रिया बिघडते व अन्नपचन होत नाही. त्यामुळे रक्ताभिसरण जरी झाले तरी रक्त शुध्द न होता त्या रक्तात अधिक बिघाड म्हणजे कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो व नंतर जी श्वसनक्रिया (म्हणजे श्वास घेणे व देहाबाहेर सोडणे) ही क्रिया जेवढी पाहिजे तेवढी होत नाही. त्यामुळे ही नको ते रोग उदाः-दमा, क्षय, रक्तक्षय, रक्तदाब, हृदयविकार इ. रोग उद्भवतात. यासाठी जरी औषधोपचार केला तरी आपले शरीर निकोप न राहतो केवळ औ÷षधाने आपण जगतो. यासाठी कुंडलिनीचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
मानवाचे शरीर पंचभौतिक तत्त्वांनी निर्माण झालेले आहे. जरी बाहय़ देह दिसला तरी अंतर्गत कार्य इतके विलक्षण आहे की तो विचार केल्यानंतर मति गुंग होते. देहाची प्रामुख्याने ३ द्वारे आहेत ज्यांच्यामुळे अंतर्गत कार्याला चालना मिळते. ती ३ द्वारे म्हणजे डोळे, कान व जिव्हा. ही ३ माध्यमे जर आपणास नसती तर आपण जगलो नसतो. या ३ माध्यमांचा संबंध इडा (कान), पिंगला (डोळे) व सुषुम्ना (जिव्हा ) या नाड्यांशी आहे. या नाड्या शरीरामध्ये पाठीला जो कणा आहे त्यामध्ये वेणीच्या रूपाने अस्तित्त्वात आहेत. त्यांचा संबंध शरीरातील मोठय़ा व लहान मेंदूशी आहे. त्यामुळे आपण चलन-वलन करीत असतो. अशांचा योग्य वापर केला गेला तर आपल्या कुंडलिनीचा सदुपयोग आपणास होईल. अन्यतः खाणे, पिणे, कपडालत्ता, ऐषाराम यातच जीवन व्यतीत होईल. तेव्हा साधकाने जी संपत्ती देवाने दिली आहे ती म्हणजे डोळे, कान व जिव्हा यांचा योग्य तो वापर केल्यानंतर हा अनुभव येईल.
माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असा आहे की, मी गेल्या ५० वर्षांत सिनेमा, नाटक, टिव्ही पाहिला नाही व पाहतही नाही. जे मी वाचतो तेसुध्दा संतवाङ्मयच असते. मी फक्त शास्त्रीय संगीत ऐकतो. वर्तमानपत्रसुध्दा मी वाचत नाही. त्यामुळे फालतू चर्चा करण्याचा प्रसंग माझ्यावर येत नाही. मी जेवण जेवतो ते जेवण तुम्ही कोणीसुध्दा जेवणार नाही एवढे सात्विक असते व आज अनेक वर्षे १-१/२ पोळी व १/२ वाटी भात एवढाच आहार मी घेतो. त्यामुळे माझी तीनही माध्यमे नि:संकोच कार्य करीत असतात. हे बंधन मी स्वतःला का घालतो ? तर या तीन मांध्यमातून जी शक्ती अनाठायी खर्च होत असते ती मी कार्यार्थ वापरत असतो. असे जर तुम्ही केलेत तर तुम्हाला स्वतःचे प्रश्न सोडविता येतील व दुसऱ्यालाही मदत करता येईल.
काल २४/८/८९ रोजी प. पू. श्रीसाईबाबा यांचे आगमन झाले व आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला आहे. तेव्हा भवितव्यात या ३ माध्यमांचा गैरवापर न करता देहामध्ये इडा-पिंगला-सुष्म्ना यांचे कार्य उदयास यावयास पाहिजे. म्हणजेच ‘कुंडलिनी जागृत झाली’ असे म्हणता येईल. अन्यतः कुंडलिनी असूनसुध्दा नसल्यासारखेच आपण आज जगतो आहोतच. अशासाठी डोळे, कान व जिव्हा यांचा अतिरेक न करता जीवनात राहिलेला वेळ नामःस्मरणात व चिंतन करण्यात जर व्यतीत करते झालात तर विश्वशांती होण्यास विलंब लागणार नाही.
‘विमोचन’ हा शब्द उच्चारल्या बरोबर अंगावर थरकाप उमटतो, अशी ही अत्यंत बिकट अशी साधना आहे, यासाठी गुरूमार्गात किवा अन्य ठिकाणी या साधनेच्या वाटेला कोणीही जात नाही. कारण हे साधन साधकाला जर सिध्द करता आले तर जगाचे कल्याण होईल. नाहीतर साधकाला प्राणास मुकावे लागेल इतकी ही प्रखर साधना आहे. हे साधन करीत असताना दोन्ही जगांचा प्रथमतः विचार करावा लागतो. पहिले जग म्हणजे इहलोक व दुसरे जग म्हणजे परलोक.
प्रथमतः इहलोकाचा विचार करू या. जे कोणी दु:खी आहेत त्यांच्या दुखाचे कारण त्यांचे कर्म अनुकूल असत नाही व त्यासाठी त्यांना जी सेवा आपण सांगतो त्याआधी त्यांच्या देवदेवतांचा आशिर्वाद आपल्याला घ्यावा लागतो. उदा.– एखाद्याने आपल्या घराण्याचा कुलधर्म, कुलाचार १२ वर्षे केलेला नसतो व त्यामुळे तो कार्य केंद्रावर येऊन आपण दु:खी आहोत असे सांगतो, त्यावेळी त्याचे दुख निवारण व्हावे म्हणून जो प्रसाद ११ आठवडे पूजनास दिला जातो ते पूजन तो करीत असताना त्याच्या देवदेवतांना हे निराकरण मान्य करावे लागते. म्हणजे त्याचे दुख हा ‘दैविक कोप’ असे म्हणता येईल.
दुसरी बाजू — एखादा मनुष्य दु:खी आहे इतका की त्याला सुख देण्यासाठी त्याच्यापाशी अनुकूल कर्म शिल्लक नसते. अशावेळी गुरूंना जरी दुख भोगावे लागते किवा हालअपेष्टा सोसाव्या लागल्या तरी गुरूभक्तांचे कल्याण व्हावयास पाहिजे.
तिसरी बाजू — जो मनुष्य दु:खी आहे तो पूर्वजन्मी जर अन्य धर्माचा असेल व ह्या जन्मी त्याचा धर्म भिन्न असेल तर ह्या जन्मी अनेक देवदेवतांचे पूजन करूनसुध्दा त्याचे फल त्याला मिळत नाही, यासाठी गुरूंना आपल्या साधनेतून त्याचे जीवन ‘दत्तक’ घेऊन त्याला सुखी करावे लागते. असे करण्यासाठी साधकाची पुण्याई खर्ची पडते. आज ह्या जगात असे कोण आहेत की जे दु:खी आहेत त्यांच्यासाठी आपली पुण्याई खर्च करेल ? एकवेळ पै-पैशाने मदत करता येईल पण स्वतःची पुण्याई कोणीही खर्च करणार नाही, यासाठीच कोणीही साधक या मार्गाच्या वाटेला गेलेला नाही. विमोचनाच्या या विधीला ‘कर्मविमोचन’ असे म्हणतात.
दुसरा भाग म्हणजे जे कोणी आत्मे मरणोत्तर जीवनानंतर इहलोकांत पिशाच्चांच्या रूपाने वावरत असतात त्यांना मुक्ती देणे किवा सद्गती देणे. त्यामुळे तो जीव पुढच्या जन्मासाठी पुढे जातो. अशावेळी जो कोणी आत्मा इहलोकातून मुक्त करावयाचा आहे, त्यासाठी परलोकांमध्ये त्यास जागा-पत्ता असावयास पाहिजे. तो आत्मा उत्पत्ती-स्थिती-लय या सृष्टीतील ३ अवस्थेत बध्द आहे. त्याची जर गुरूकृपेने मुक्तता झाली तर त्याच्या जन्माचे स्थित्यंतर म्हणजे विमोचन करता येते. नाहीतर अनेक जन्मापर्यंत तो आत्मा इहलोकात तिष्ठत राहतो व बाधक म्हणजे पिशाच्च होऊन लोकांना शारीरिक व मानसिक भोग भोगावयास लावतो. यासाठी प्रथम गुरूआज्ञेने नुसते साधन सिध्द करून म्हणजे बाधा काढून चालत नाही, तर वरच्या म्हणजे भू, भुवः, स्वः, महः, जनः या लोकांवर सत्ता असावयास पाहिजे म्हणजे तो आत्मा आपल्या कर्मानुसार पुढील अवस्था प्राप्त करता होईल.
काही आत्मे ज्यांच्या मरणोत्तर जीवनानंतर इच्छा-वासना शिल्लक राहिल्या आहेत किंवा ज्यांनी धर्मबाह्य आचरण केलेले आहे, त्यांच्यासाठी शास्त्रात नारायण-नागबळी, त्रिपिंडी इ. विधी सांगितलेले आहेत. परंतु हे विधी करण्याने तो आत्मा मुक्त होत नाही, कारण आज हे विधी करणारे व या विधींचे पावित्र्य शिल्लक राहिलेले नाही. केवळ बाजारी स्वरूपात हे विधी केले जातात. त्यामुळे ते आत्मे मुक्त व्हावयाच्या ऐवजी या विधीने अधिकच बध्द होतात व पुन्हा जगताला त्रास देत असतात. हे सर्व विधी करीत असताना ज्या जीवात्म्याला मुक्तता मिळते ह्या विधीला ‘वंशविमोचन’ असे म्हणतात.
तिसरी अवस्था अशी आहे की गुरूमार्गी होण्यापूर्वी भक्ताचे विमोचन करणे भाग आहे. कारण जो जन्म झाला आहे त्यामध्ये कर्म अधिकता असल्याने तो विकसित नाही. त्याला प्रथमतः विकसित करणे व विकसित झाल्यावर त्याला योग्य त्या दीक्षा देऊन त्याला ‘मानव’ करणे म्हणजेच प्रथमतः जन्माला येतेवेळी तो ‘जीव’ म्हणून येतो, त्यानंतर गुरूसंस्काराने त्याचा ‘आत्मा’ बनतो. यासाठी गुरूंना केवढे दिव्य करावे लागते याची तुम्हीच कल्पना करा. नुसते ‘गुरू करणे’ हे सोपे आहे. परंतु ‘जगाचे गुरू होणे’ ही ‘सूळावरची पोळी’ आहे हे भक्ताने विसरता कामा नये. आज जगतामध्ये जे गुरू म्हणून आहेत, ते गुरू लोकांना फसविण्याचा सोपासा मार्ग अनुसरताना दिसतात. यापेक्षा योग्य गुरू भेटेपर्यंत सबुरी राखणे हे उत्तम होय.
जन्माला येताना आपल्यापाशी जन्मकर्म व जन्मजन्मांतर हे दोन ऋणानुबंध असतात. जन्माला आल्यानंतर त्यात अधिक २ ऋणानुबंधांची जोड होते — ते म्हणजे मातृपितृ व इतरेजन. देवादिक ऋणानुबंधाचे वलय त्याच्यापासून दूर असते. ते नित्य उपासनेतून व गुरूआज्ञेने शिकविलेल्या साधनेतून जोडावयाचे असते. ही जोड करून घेण्यासाठीच आपल्याला ३ प्रतिमा देण्यात आल्या आहेत व इहजन्मी नव्याने प्राप्त केलेल्या ऋणानुबंधातील प्रतिकूलता आपल्या नित्य साधनेच्या आड येऊ नये म्हणून या ऋणानुबंधाचे कर्मात रूपांतर करून त्यांना कार्यार्थ गुरूकृपा प्राप्त करून दिली आहे. हा विधी जरी सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात हे दिव्य साधन फक्त श्रीगुरूच करू शकतात. या साधनसिध्दतेलाच ‘ऋणमोचन’ असे म्हणतात. जीवनामध्ये एखादे कर्म धर्मबाह्य आपल्या हातून घडते व त्याबद्दल पश्चाताप जेव्हा होतो तेव्हा आपण ‘प्रायश्चित्त’ घेतो. असे प्रायश्चित्त सदैव घेऊन चालत नाही. प्रायश्चित्त हे जीवनात एकदाच घेता येते. त्यासाठी सूज्ञ मानवाने कर्म करण्यापूर्वी विचारपूर्वक कृत्य करावे.
जन्माला येऊन याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करणे म्हणजे सुख, शांती, समाधानाचा अभाव असणे. यामध्ये अनेक प्रयत्न करूनही लाभ मिळत नाही, कारण विमोचन झालेले नसते. विमोचन झाल्यावर ऋणानुबंधात बदल गुरू करतात. त्यामुळे न मागता सुखाची प्राप्ती होते. तो बदल साधकाने लक्षात ठेवला पाहिजे. यामध्ये जर बिघाड झाला तर तो पूर्ववत् करता येत नाही, यासाठी ‘लोभ’ सोडला पाहिजे व त्याऐवजी ‘लाभ’ कसा होईल असा विचार सदैव ठेवला पाहिजे. तरच ‘गुरूकृपा’ म्हणजे काय हे समजेल. हा जो बदल गुरूंनी केला आहे तो न दिसल्यासारखा आहे. परंतु अनुभवांनी हे समजेल की आपल्या जीवनात जे विमोचन झाले आहे याचे उदाहरण म्हणजे आपले इष्टमित्र, नातेवाईक आपल्यापासून दूर जातात. जन्मप्राप्तीपूर्वीचा आत्म्याचा विषय जन्मानंतर आल्याचे उद्दीष्ट (Object) प्राप्त व्हायला पाहिजे. तरच जीवनाचे मर्म समजेल व मग इतरेजनांना त्याचा लाभ होईल. अशा प्राप्त झालेल्या जन्मास ‘मानवी जन्म’ असे म्हणतात.
कर्म ही क्रिया जरी देह करतो तरी, त्यापरत्वे कर्म घडेल असे नव्हे तर त्या क्रियेमध्ये जोपर्यंत काया-वाचा-मन याचा समावेश होत नाही तोपर्यंत कर्माची इच्छा किंवा वासना ही जरी देहाला झाली तरी ही इच्छा वासनेची निर्मिती कर्म म्हणून जमेस घरता येत नाही. जन्मप्राप्तीसाठी कर्माचा संचय करावयाचा असतो म्हणून पुढे याच कर्माला ‘कर्म’ करावयाचे असते. तेव्हा आपल्या हातून घडलेले कर्म हे खरोखर घडते आहे की नाही हा विचार करून जीवन व्यतीत व्हावयास पाहिजे. याचा अर्थ या जन्मात जी क्रिया करावयाची असते, त्या क्रियेमध्ये विषय असावयास पाहिजे व जो विषय आपणास प्राप्त करावयाचा असतो त्यापरत्वे क्रिया करीत असता ती क्रिया निरासक्त बुध्दीने जर झाली तर त्या क्रियेत अंतर्भूत झालेला विषय हा आपल्या नकळत कर्माची धारणा करून घेतो.
भक्तांना जीवनामध्ये जी अडीअडचण निर्माण होत असते त्याचा अर्थ पूर्वजन्मी पातक-प्रमाद घडले आहे असे नव्हे, तर जीवनात जी उणीव निर्माण झाली आहे त्यासाठी सत्कर्म असावयास पाहिजे, यासाठी अडचण निर्माण झाली आहे, याचा कोणीही विचार करीत नाही. जेव्हा केंद्रावर कार्यार्थ येता तेव्हा तुम्हाला ‘प्रसाद’ दिला जातो तो आपले काम व्हावे म्हणून नव्हे तर प्रसाद दिल्यानंतर जी सेवा सांगितलेली असते ती आज्ञा आहे, हे आपण विसरतो. पण ह्या आज्ञेप्रमाणे दिलेल्या मुदतीपर्यंत सेवा केली तर त्या सेवेचा लाभ ‘सत्कर्म’ म्हणून आपल्याला उपयोगी पडतो. पण ते न करता अनेक भक्त अडचण आली म्हणजे चिंताग्रस्त होऊन हताश होतात. त्यामुळे सेवेमध्ये जे अधिक कर्म जोडलेले असते ते कारण नसताना खर्ची पडते व इष्टसुख प्राप्तीसाठी विलंब लागतो. यापेक्षा उत्तम मार्ग म्हणजे आपल्याला जे दु:ख आहे ते कार्यकेंद्रावर जाऊन सांगणे व त्यासाठी जे निराकरण सांगितले आहे ते केले असता कर्माचा अपव्यय होत नाही व प्रामाणिकपणे जर ११ आठवडे सेवा आपण केलीत तर त्याचा लाभ जन्मभर होईल. म्हणूनच जे दु:ख गुरूंना निवेदन केले आहेत त्याबद्दल ‘चिंता करू नको काही, सद्गुरूसी शरण जाई’, असे वागले पाहिजे. तरच कर्माचा अपव्यय होणार नाही. ते कर्म प्रापंचिक व पारमार्थिक जीवनास उपयोगी आहे म्हणून जी आज्ञा आहे त्याप्रमाणे वागणे हे भक्तांचे कर्तव्य आहे !
वाणी म्हणजे कंठ. ही प्रत्येक प्राणीमात्राला मिळालेली ईश्वरी देणगी आहे. तरीही मनुष्य व इतर पशु पक्षी यांच्या आवाजातील एक महत्त्वाचा फरक म्हणजे आवाजाला उच्चारीत करून विचारांना साकार करण्यासाठी मनुष्य नैसर्गिक पाच माध्यमांचा वापर करतो. ही नैसर्गिक पाच माध्यमे म्हणजे ओठ, जीभ, टाळा, स्वरयंत्र व श्वास होय. यातील स्वरयंत्र व श्वास ही दोन माध्यमे श्रेष्ठ माध्यमे आहेत. श्वासोच्छवास म्हणजे प्राण. प्रत्येक श्वासोच्छवासाला एक प्रमाणबध्द लय असते. ही लय प्रमाणबध्द नसली तर शरीरातील नैसर्गिक क्रियेमध्ये अडथळे उत्पन्न होतात. हृदयविकार, रक्तदाब, दमा इत्यादी आजार उद्भवतात. म्हणून शरीराला निरोगी राखण्यासाठी नियमितपणे प्राणायाम करणे आवश्यक आहे.
मानवी देह हा पंचमहाभूत तत्त्वांपासून साकार झालेला असतो. या पंचतत्त्वांची तन्मात्रे मानवी देहात वास करीत असतात. त्यांचे समतोलत्व व समन्वय राखण्यासाठीही नियमित प्राणायामाची आवश्यकता असते. मानवी देहातील पंचकोश यातून जीवनातील प्रत्येक क्रिया कार्यान्वित होत असते. मनुष्याचा आचार-विचार व उच्चाराची परिपक्वता व शुध्दता या कोशांच्या परिपक्वतेवर अवलंबून आहे व कोशांची परिपूर्णता प्राणायामावर निर्भर आहे, म्हणून मानवी जीवनात प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. विशेषतः ध्यान, चिंतन, योग करणाऱ्या साधकाला प्राणायामचे वलय जीवनातील सार्थकता साधण्यास उपयोगी पडते. साधकाला देवाची भाषा समजली पाहिजे. कारण नित्य जीवनात इष्टमित्र, आप्त जे आपल्याशी बोलतात ती भाषा शाब्दिक आहे. त्यामध्ये ‘संकेत’ नाही, पण ईश्वराची भाषा अशी आहे की त्यामध्ये संकेत आहे. तो समजण्यासाठी आपली साधना १०० % व्हावयास पाहिजे. म्हणजे स्वर-ताल-लय अशा अंगानी जर साधना केली तर आपले शरीर ‘मध्यस्थ’ (Medium) बनते. त्यामुळे लहरींच्या रूपाने जो संकेत आहे तो आपल्याला समजतो. यासाठी प्रथमतः साधना सिध्द करणे आवश्यक आहे. तरच “देव आपल्याशी बोलेल” असे म्हणता येईल. कारण कारण देव हा दृष्य नाही व अदृष्यही नाही, पण गोविंद (नाद) आहे.
भारतीय संगीताची शास्त्रोक्त उभारणी प्राणायामावर आधारलेली आहे. संगीतातील आलाप, राग व एकूणच संगीत हे शास्त्र प्राणायामाने सिध्द झालेले आहे. ठराविक अंतराने (Pause) श्वास घेणे व घेतलेला श्वास संथ लयीत सोडणे, यालाच प्राणायाम असे म्हणतात. संगीतातील सातांपैकी पाच प्रमुख स्वर सा, रे, ग, म, प हे पाच कोशांना पूरक आहेत. म्हणूच पाच स्वरांना उच्चारीत करून पाच कोशांतून केलेला प्राणायाम ही सर्वश्रेष्ठ साधना होय. ‘सा’ हा स्वर अन्नमय कोशावर नाभीस्थानातून नियंत्रण ठेवतो. तर ‘रे’ स्वराचे हृदयस्थान, प्राणमय कोशात स्थित आहे. ‘ग’ स्वर मनोमय कोशाला कंठस्थानातून जागृत करतो. तर ‘म’ स्वराने विज्ञानमय कोश, ललाट स्थानातून कार्यान्वित होतो ‘प’ ह्या स्वराने आनंदमय कोश ब्रम्हस्थानात उल्हसित होतो व साधकाचा पूर्णतः विकास होतो. प्राणायामाचे वेळी घेतलेला श्वास प्रथम अन्नमय, प्राणमय व मग मनोमय कोशात धारण होतो व तेथील विशुध्दता दूर करताना कंठातून हळूहळू उच्चारीत होतो. त्यावेळी विज्ञानमय व आनंदमय या दोन कोशांना सुखाची अनुभूती येते. साधनेतील समाधान व आनंद हा विज्ञानमय व आनंदमय या कोशात सामावून राहतात व साधक माध्यमाच्या वाणीतून गुरूकृपेचे अमृतबोल व्यक्त होतात. ‘सा’, ‘रे’ व ‘म’ ‘प’ या चार स्वरांचा मध्य म्हणजे ‘ग’ याचे स्थान कंठ आहे व कंठातून निघालेला उच्चार मनातील भाव-भावना व्यक्त करीत असतो म्हणून ह्या मध्य स्वराला व कंठस्थानाला जीवनात अतिशय महत्त्व आहे. आपण नित्य व्यवहारातसुध्दा जे सहजोद्गार व्यक्त करतो ते या कंठस्थानातूनच. म्हणूनच उच्चाराची माध्यमे या स्थानाशी निगडीत असतात. ज्यावेळी कंठ स्थानातील ‘ग’ हा स्वर परिपूर्ण असतो त्यावेळी त्यास ‘गुंजारव’ म्हणतात.
कोणत्याही शब्दाला उच्चार, मध्य, लय या ३ अवस्था आहेत. ज्यावेळी उच्चारित शब्द या ३ ही अवस्थेतून व्यक्त होतो, त्यावेळी उच्चारलेल्या शब्दाला आकार येतो. अन्यतः उच्चारलेला शब्द फक्त आवाज म्हणून ओळखला जातो. पशुपक्षांचा स्वरोच्चार हा आवाज असतो, तर मनुष्याचा स्वरोच्चार हा शब्द व भाषा यांनी समृध्द असतो. कारण मानवी शब्दोच्चार हा ३ अवस्थेतील व पाच माध्यमांतील आविष्कार असतो. या आविष्कारातूनच मनुष्याचा स्वभावधर्म पारखला जातो. म्हणून कोणताही उच्चार करताना तो अवधानपूर्वक केला गेला पाहिजे तरच साधकाचा विकास होईल व त्या विकासाच्या प्रकाशात इतरांची जीवने ज्योर्तिमय बनतील.
जगतामध्ये बहुसंख्य लोक जे जन्माला येतात तो जन्म आत्म्याचा नसून जन्म झाल्यानंतर त्या जीवाचे स्थित्यंतर जर झाले तर त्या जीवाचे आत्म्यामध्ये रूपांतर होते असा नियम आहे. परंतु जेव्हा अडीअडचणी निमित्याने सद्गुरूंची भेट होत असते ती भेट अडचण निवारण करण्यासाठी म्हणून नव्हे, तर जो जीव जन्माला येतो त्याचे स्थित्यंतर व्हावे म्हणून तो जीव अडचण निर्माण करतो. यासाठी कार्यकेंद्रावर जो प्रसाद किवा आशीर्वाद आपण भक्तांना दिला जातो तो तुमची अडचण निवारण करण्यासाठी म्हणून दिला जात नाही, तर तुमच्या जीवनात स्थित्यंतर व्हावे म्हणून दिला जातो. ही स्थित्यंतरे जीव, जीवात्मा, आत्मा अशी व्हावयास पाहिजेत. त्यासाठी जी साधना, आरती व वर्षाकाठी जे संमेलन होते, त्याचे तुमच्यावर संस्कार होऊन तुमच्या ठिकाणी जो जीव आहे तो आपणहून स्थित्यंतर करवून घेत असतो. हेच स्थित्यंतर जर ह्या जन्मात झाले नाही तर अनेक जन्मांपर्यंत पुन्हा होत नाही. याचे कारण प्न्हा गुरूंची भेट होण्यास अनेक जन्मपर्यंत वाट बघावी लागते.
पण असे स्थित्यंतर होण्याने मरणोत्तर जीवनानंतर तो आत्मा परलोकात जातो व तिथे आत्मा म्हणून राहतो व जेव्हा जन्म घेण्याची इच्छा होते त्यावेळी तो परत जीव म्हणून इहलोकात येत नाही. तर जो जीव आत्मा झाला आहे. तो आत्मा म्हणूनच जन्माला येतो. अशा आत्म्याला निश्चित कार्यकारण असते. पण जो जीव म्हणून इहलोकात येतो व परलोकात जातो तो जरी जन्माला आला तरी त्याला जीवनामध्ये सुख, शांती, विद्या, संपत्ती प्राप्त करण्यासाठी अधिक कष्ट पडतात. असे होऊ नये म्हणून ह्या जन्मात जेव्हा गुरूभेट होत असते त्यावेळी आपल्याला काय प्राप्त झाले हा विचार न करता गुरूंनी काय प्राप्त करून दिले याचाच विचार करावा.
आज श्रीसद्गुरूंनी तुम्हा भक्तांना ‘प्रज्ञा’ वस्थेचा लाभ करून दिला आहे. ही अवस्था साधकाला प्राप्त करण्यासाठी अनेक जन्म घेऊनसुध्दा प्राप्त होत नाही. इतकी ही दुर्लभ आहे. त्याचे कारण साधकाने प्रथमतः आपली पंचमहाभूत-तत्त्वे, पंचतन्मात्रे, पाच कोश, बुध्दि, मन, चित्त व अहंकार यांचा विकास केल्यावर जेव्हा कुंडलिनी जागृत होते त्यावेळी ‘प्रज्ञे’ला आरंभ होतो. त्यावेळी ही अवस्था सांभाळण्यास अति कठीण आहे. कारण आपल्या सभोवार जे जग दिसते त्याचा लोभ आपल्याला होतो. त्यावेळी गुरूकृपेने काय लाभ झाला आहे हे विसरता कामा नये. हा लाभ अति प्रयत्नाने आपल्याला होतो. तेव्हा ह्या अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचे पथ्य असे की जगाचा लोभ सोडला तरच ही अवस्था म्हणजे जन्मोजन्मीचा लाभ तुम्हाला होऊन जगालाही तुम्ही देऊ शकाल. आज ही जी अवस्था श्रीसद्गुरूकृपेने तुम्हाला प्राप्त झाली आहे त्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये.
प्रज्ञावस्थेचे जतन करण्यासाठी साधकाने आचार, उच्चार याकडे लक्ष द्यावयास पाहिजे. कारण जर एखाद्याचे कल्याण आपण करू शकलो नाही तरी दुसऱ्याला शाप देऊ नये. कारण आता तुमची साधना सिद्ध झाली आहे म्हटल्यानंतर तुमच्या वाणीतून जगाचे कल्याण व्हावयास पाहिजे. त्याशिवाय तुमच्या उच्चारामध्ये फाजील गर्व किवा अहंकार असता कामा नये. जर तुम्ही लीन वागलात तर तुमची प्रगती अधिक होईल. बोलण्या चालण्यामध्ये देखावा असता कामा नये. जे खरे असेल त्याप्रमाणेच साधकाचा आचार, विचार व उच्चार असावयास पाहिजे, तरच त्याला ‘गुरूभक्त’ असे म्हणता येईल !
आज साधना संमेलन याची समाप्ती होत आहे. या संमेलनात आपण काय शिकलो याचा आढावा प्रत्येकाने घेतला पाहिजे. कारण संमेलनामध्ये जे जे विषय आपल्या अभ्यासात आले ते पुस्तकात जरी आपण वाचतो तरी ते सिध्दांत आहेत हे आपणास कळत नाही व नुसते वाचन करणे म्हणजे अभ्यास नव्हे. वाचन केल्यानंतर त्या सिध्दांताची अनुभूती आपणास आली, तर असे म्हणता येईल की जे लिखाण आहे त्यामध्ये सत्य काय आहे हे आपणास समजते. तेव्हा साधना संमेलनात जे विषय सांगितले गेले आहेत त्या गोष्टी नव्हेत किंवा इतिहास नव्हे. तेव्हा तुमच्याकडून १० दिवस जो अभ्यास गुरूंनी करून घेतला त्याचे विस्मरण होता कामा नये, कारण जो आपला जन्म होतो हा दुर्लभ आहे. तेव्हा त्याप्रमाणे वागून जीवनाचा अपव्यय करणे ह्य़ासारखे पाप नाही. पूर्वपुण्याईने आपणास गुरू भेटतात. अशी संधी आयुष्यात एकदाच येते. त्यासाठी त्यांच्या ज्ञानाचा लाभ आपण करून घेतला पाहिजे. तरच आपण गुरूमार्गी झालो असे म्हणता येईल. केवळ गुरूपूजन करून गुरूदक्षिणा देणे म्हणजे आपले कर्तव्य संपले असे जे लोकांना वाटते हा औपचार आहे. ह्यापेक्षा तुमच्या जीवनात बदल किंवा स्थित्यंतर झाले तर असे म्हणता येईल की आपण गुरूमार्गी आहोत. आपण जर त्याप्रमाणे आचार-विचार केला नाही तर कुणीही आपल्याला गुरूमार्गी आहोत असे म्हणणार नाही. जीवनात गुरू एकदाच भेटतात. त्यावेळी संपूर्ण जीवनाचे अवलोकन गुरू करतात. जीवनात जेव्हा अडीअडचणी येतात तेव्हा त्याचा विचार आपण स्वतः हा करायला पाहिजे.
प्रत्येक अडीअडचणीचे वेळी गुरूंना प्रश्न न विचारता आपल्यामध्ये काय कमी-अधिक आहे अशी विचारणा स्वतःला स्वतःच करावी. म्हणजे गुरू जी शिकवण आपणास देतील त्याचा लाभ भवितव्यात आपणास व आपल्या कुटुंबियास होईल. यासाठी दरवर्षी साधना संमेलन घेतले जाते. तरी अजून जेवढे भक्त प्रश्न विचारण्यासाठी येतात तेवढे संमेलनास उपस्थित रहात नाहीत. नाहीतर वर्षांतून तीन संमेलने घेतली गेली असती. यावरून असे दृष्टोत्पत्तीस येते की भक्तांना ज्ञानाची जरूरी नसून प्रश्न लवकर कसे सुटतील असाच प्रश्न आहे. जीवनात एक प्रश्न सुटला की दुसरा उभा राहतो असे म्हटल्यावर तुम्ही ज्ञानी कसे होणार ? प्रश्न गुरूंना राहतो. प्रथमतः तुम्ही ज्ञानी व्हा म्हणजे तुम्ही निरंतर सुखी व्हाल. असा आशीर्वाद प. पू. बाबांनी आज आपणास दिला आहे.
।। शुभं भवतु ।।