अध्याय १ प्रस्तावना

अध्याय १

प्रस्तावना

कृपया ह्या निवेदनाचे  वाचन करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.

श्री.साई अध्यात्मिक समितीच्या तीन ग्रंथातील एक ग्रंथ “साधन पत्रिका” ही संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येत आहे. त्यातील “प्रस्तावना” ही येथे प्रदर्शित केली असून त्यातील कोणते विषय अभ्यासावेत हे खाली नमूद केले आहेत, जेणे करून विविध मुद्द्यांचा अभ्यास करणे सोईस्कर होईल.

1) “समिती पूर्णत्वाने आपल्या सर्वांच्या सुखाचा विचार करते.”
2) “सद्गुरु उपासना नित्याने होणे आवश्यक आहे.”
3) “दुखाची नुसती कारणे समजण्यापेक्षा, त्यांची मीमांसा अभ्यासली गेली तर पुन्हा आपल्याला किंवा आपल्या मुलाबाळांना तसे दुख भोगावे लागणार नाही.”
4) “जन्मजन्मांच्या पातकांचे व प्रमादांचे प्रायःश्चित्त घेणे आवश्यक”
5) “दुखाचे परिमार्जन ईश्वरी उपासनेने करा”

____________________________________________________________________________________

1 भक्तमंड़ळीस :-

आपण आपल्या जीवनांतील दुखांचे निराकरण होऊन जीवन सुखी व्हावे म्हणून या ठिकाणी आला आहात. हा आपला हेतू आपण पूर्ण अर्थाने समजून घेतलांत का ? नाही. याउलट ही समिती पूर्णत्वाने आपल्या सर्वांच्या सुखाचा विचार करीत आहे, हे स्पष्ट दिसते. कारण आपला हेतू जीवनातील दुख दूर व्हावे यापलीकड़े जात नाहीं. दु:खे निर्माण का झाली, पुन्हा होणार याला उपाय काय, याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. हा अभ्यास नित्याने करण्याची सवय झाली तर दु:खे निर्माण होणार नाहीत. रोज आपण जेवतो, झोपतो, नोकरी धंदा करतो, सर्वतोपरी प्रत्येक व्यवहार नित्याचा ठरला आहे. या सर्वावर नियंत्रण असण्यासाठी “सद्गुरू उपासना” नित्याची होणे आवश्यक आहे. परंतु तेवढाच सुविचार प्रत्येक मनुष्य आजचा उद्यावर ढकलून दु:खे वाढविण्यास कारण होत आहे. या समितीच्या कार्यपध्दतीचा हेतू हाच आहे की, एकदा हे मानवी जीवनांचे सुख-दु:खाचे गणित ज्ञान-अज्ञानाने चुकले की ते दुरुस्त करण्यासाठी मनुष्य अनेक प्रयत्न करतो. अनेक प्रयत्नांत दैवी प्रयत्नही असतो. दैवी मार्ग हा प्रयत्नाचा मार्ग नाही. तर ती परिपूर्ण सिध्द-सिध्दान्त पध्दत असल्याने आपल्या आचरणाने आपले दु:ख दूर करता येते. दु:खाची नुसती कारणे समजण्यापेक्षा त्याची मीमांसा अभ्यासली गेली तर पुन्हा आपल्याला किंवा आपल्या मुलाबाळांना तसे दु:ख भोगावे लागणार नाही. उदा. एखादा मनुष्य म्हणतो, ‘मला अमुक माणसाने करणी केली किंवा करतो आहे’. ‘मी अमुक माणसामुळे बुडलो’. ही दु:खे निर्माण होणारी कारणे झाली. परंतु मीमांसा हे सांगेल की, आपापसांतील जन्मजन्मांची ऋणानुबंधने बाकी होती. त्या वेळी यथायोग्य तऱ्हेने त्यांचे निराकरण झाले नाही, त्यामुळे त्या माणसास तुम्हाला करणी करण्याची किंवा बुडविण्याची बुद्धी होते.

आता पहिल्या दु:ख-कारणाचे निराकरण जेव्हा सांगितले जाते त्या वेळी तुम्हास “प्रसाद” पूजनास दिला जातो. या प्रसाद पूजनानंतर तुम्हाला जी सुख, शांति लाभत जाते, तेवढयावरच तुमचा दैवी मार्गाने सुखी होण्याचा प्रयत्न थांबतो व आपण हळूहळू येथे येण्याचे बंद करता किंवा ‘इतर सेवा ही माझ्यासाठी नाही’ असे समजता. याचाच अर्थ पूर्णपणे अज्ञान निर्माण करून आपण स्वतःची दिशाभूल करता. आपणांस निरंतर सुख, समाधान लाभावे अशी इच्छा असल्यास नुसते दु:खाचे कारण समजून किंवा त्याबद्दल येथून दिलेला प्रसाद पूजन करून चालणार नाही. तर ते जन्मोजन्मी लाभावे, म्हणून “सदगुरू उपासना”च केली पाहिजे. सदगुरूकृपेने या कार्यात ज्या अनेक दु:ख कारणमीमांसा अभ्यासिल्या गेल्या आहेत, त्या विचारून नित्य जीवनात पुन्हा ज्ञान-अज्ञानाने आपल्या हातून तशी पातके व प्रमाद घड़ू नयेत म्हणून धर्माचरणाने वागणे आपणां सर्वांचे कर्तव्य आहे.

या अभ्यासाने हातून घड़लेल्या जन्म-जन्मांच्या पातकांचे व प्रमादांचे प्रायश्चित घेतल्याशिवाय सदगुरू प्रसाद तरी काय करील ?  तुमची अपेक्षा नुसते सुखच भोगण्याची आहे. मग दु:ख कोण भोगणार? तर तेही तुम्हालाच भोगले पाहिजे. ते भोगण्याचे ज्ञानही घेतले पाहिजे. कारण जन्मोजन्मीच्या सुख-दु:खास स्वतःचीच कर्मे कारण झालेली असतात. त्याशिवाय किड्या-कीटकापासून ते देवादिकापर्यंत जे ज्याचे ऋण राहिले असेल, तेही यथाशक्ति फेड़ले पाहिजे. नाहीतर पुनश्च तुमच्या मुलाबाळांना हाच भोग भोगावा लागेल. आज आपण या ठिकाणी आलात, उद्या दुसऱ्या ठिकाणी जाल. तरीसुध्दा सुखप्राप्तीसाठी नशीब तेच न्यावे लागेल. तेव्हा एकदा जीवनाचा हेतू पूर्णपणे समजून घ्या व त्याचा अभ्यास करा. या ठिकाणी जी जुनी मंड़ळी आहेत, त्यांच्या जीवनातील ऋणमोचनाचे विधि ज्या सिध्द-सिध्दांत पध्दतीने केले, ते तुमच्यासारख्या नवीन भक्तांसाठीही आहेत. आता जन्मोजन्मींच्या दु:खमीमांसा कोणत्या व त्या किती प्रकारांनी असू शकतात ते अभ्यासून या दु:खमीमांसेचे परिमार्जन ईश्वरी उपासनेने करा.