अध्याय ४ – आचार, विचार, निश्चितता
प्राप्त झालेल्या जीवनामध्ये निरंतर सुखाची अपेक्षा करणाऱ्या माणसाने आपले आचार, विचार, निश्चित करणें आवश्यक आहे. ते पूर्णत्वाने निश्चित करण्याचा प्रयत्न दैनंदिन जीवनात तुम्ही करू लागलात की पूर्णत्वाने तुम्ही सुखी व्हाल. आता प्रश्न असा निर्माण कराल की, ‘आमचे आचार, विचार निश्चित नाहीत का ?’ काही बाबतीत ते तसे आहेत व काही बाबतीत तसे निश्चित नाहीत. जे निश्चित आहेत त्यांचे सुख तुम्ही अनुभवीत आहात. पण जे निश्चित नाहीत तेच दु:ख म्हणून तुम्ही विचारण्यास येता आहात.
आचार हा पूर्णपणे कुटुंबाच्या सुखाचा ठेवा आहे. तो निरंतर स्वरूपाचा लाभण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील प्रत्येक कर्म हे ‘कर्तव्य’ म्हणून करण्याची सवय कुटुंबातील नोकरां-चाकरांनासुध्दा लागली पाहिजे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यतचे सर्व दैनंदिन कार्यकम यथायोग्यपणे प्रत्येकाने पार पाड़लेच पाहिजेत व त्याचा अभ्यास व्हावा म्हणून कुटुंबांतील प्रत्येकाने झोपण्यापूर्वी ‘परमार्थ प्रश्नावली’ चा आढावा आपल्या मनाशी घ्यावा. ही परमार्थ पश्नावली रोज वाचून त्यापमाणे आपण वागू शकलो किंवा नाही हे पाहण्याची सवय प्रत्येकाने लावून घेणे आवश्यक आहे. (ही ‘परमार्थ प्रश्नावली’ पुढे दिली आहे.)
आयुष्यात लाभणारा प्रत्येक क्षण हा पुनश्च स्वतःला मिळणारा नाही. तेव्हा स्वतःचा व दुसऱ्याचा वेळ कदापीही फालतुकपणे खर्च करण्यास कारण होऊ नये. स्वतःचा वेळ तशा प्रकारे जात असल्यास किंवा दुसरा घेत असल्यास प्रामाणिकपणे अपव्ययाच्या दृष्टीने त्याची देवाणघेवाण होऊ देऊ नये व त्याबद्दल स्पष्टवक्तेपणा असावा. हा आचार, विचार पारमार्थिक उन्नतीच्या मार्गातील माणसाने प्रथमतः केला पाहिजे. कारण असे की, आपण किती वर्षे या जगात राहणार आहोत हे आज आपल्याला ठाऊक नाही. तेव्हा आयुष्यातील दैनंदिन कर्तव्याचा भाग पुरा झाल्यावर राहिलेला वेळ स्वतःच्या उन्नतीसाठीच खर्च केला पाहिजे. त्याचा हिशेब लागल्याशिवाय नुसते तासतास देवाबद्दल, धर्माबद्दल, शास्त्राबद्दल, मार्गाबद्दल चर्चा व प्रवचन देऊन किंवा लिखाण लिहून चालणार नाही, हे मार्गदर्शन समिती आपल्याला आपण येथील निश्चित भक्त झाल्यावर करते.
वरील दोन सिध्दांत आज तुम्ही आत्मसात केलेत की जीवनात सुख, शांति निर्माण करण्यास तुम्हीच कारण होता. हे आपले निश्चित झालेले आचार, विचार सदगुरूच्या ठिकाणी इतके एकरूप व्हावयास पाहिजेत की दैनंदिन जीवनात आपल्या हातून कोणाचा अपमान, उपमर्द, तिरस्कार किंवा अपरोक्ष निंदा-नालस्ती होता कामा नये. तसेच कोणाच्या शरीराला अथवा मनाला क्लेश किवा दु:ख देण्यासही कारण होता कामा नये. ही निश्चितता ज्या भावनेने तुम्ही निर्माण करू शकाल, त्या भावनेचा ओलावा म्हणजेच ‘परमेश्वर’ आणि ज्याच्यासाठी ही भावना व्यक्त केली गेली तोच ‘माणूस धर्म’.
आज जगाच्या निरनिराळया तात्विक वादांत धर्माबद्दल अनेक प्रकारांनी अनेक विचार प्रकट केले जात आहेत. याचा अर्थ असा आहे की, एक खूप पंचपक्वान्ने जेवतो आहे व जे उपाशी आहेत त्यांना ‘तुम्ही ढेकर का देत नाही?’ असे विचारतो आहे. हीच स्थिती आज समाजात सिध्दसाधक, सुधारक व शास्त्रज्ञ यांची आहे. परंतु अशा संकुचित आचार-विचारांचा ‘धर्म’ कधीच होऊ शकत नाही. आपण आपले आचार-विचार सदगुरूंच्या ठिकाणी निश्चित केल्यावर आपल्या ठिकाणी एक स्फूर्त भावना निर्माण होऊ लागते की, जगातील इतरांना सुख, समाधान देण्यासाठी कायेने, वाचेने, मनाने, नि:स्वार्थपणे मला काय काय प्रयत्न करता येतील ? ते नि:स्वार्थपणे करणे हा विचार म्हणजेच आजचा खरा ‘मानव-धर्म’ होय. तर ही भावना ‘पूर्वी माझ्या ठिकाणी होती का?’ नव्हती. कारण “मी ईश्वरसेवक नव्हतो. देव मानत नव्हतो. मानला तरी आचार-विचार निश्चित नव्हते. त्यामुळे माझ्या ठिकाणी अहंभाव होता. दुसऱ्यास ज्या ज्या प्रकारांनी दु:ख देता आले, अप्रामाणिकपणा करता आला, स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या सुखदु:खाचा विचार करता आला नाही. हे अविचार जाण्यास काय कारण झाले ? तर माझे जीवनाबद्दलचे आचार-विचार सदगुरूरूप झाले. मी देहाने आहे तसाच आहे परंतु वाचेने आणि मनाने मी पूर्णपणे बदललो. त्यामुळे माझ्या ठिकाणी असणारा दुजाभाव किंवा व्दैत नाहीसे झाले. हाच धर्म आज समितीला आपणां सेवकांकड़ून जगाला शिकवावयाचा आहे. म्हणजे तुम्हाला काया, वाचा, मनाने इतरांना सुख-समाधान देण्यासाठी आपले आचार-विचार सदगुरूच्या ठिकाणी निश्चित करावयास पाहिजेत व हे निश्चित झाले की, इतरेजनही त्याचा विचारपूर्वक स्वीकार करतील व हीच खरोखर पारमार्थिक उन्नति होय. गुरूपीठाची पारमार्थिक उन्नतीबद्दलची व्याख्या हीच आहे की, ‘जो पर्यंत नि :स्वार्थपणाने आपल्याला आपला आचार-विचार करता येत नाही, तोपर्यंत पारमार्थिक उन्नतीबद्दल चर्चा, वादविवाद किंवा प्रवचन करणें व्यर्थ आहे !’