अध्याय ५ – नित्य आहार निश्चितता

आता वरील दोन महत्वाच्या विचारांचा अभ्यास केल्यावर आपल्याला आपला नित्य आहार निश्चित करणे आवश्यक आहे. कोणी अशी शंका काढील की, ‘आहार काय निश्चित करायचा ?’ पण तेच नेमके चुकले आहे. रोज खाण्यातील वासनेमुळेच या देहाच्या ठिकाणी अन्य वासना निर्माण होणार व होतात याबद्दल आपण कधीही शास्त्रीय दृष्टया विचार केला नाही व आहार निश्चित करण्याचे कारणही पडले नाही. जीवनात नित्य आवश्यक असणाऱया वस्तू बाजारात मिळत असतात हे जरी खरे असले, तरी ‘आहार-पध्दत’ परिपूर्ण तऱ्हेने मानवी जीवनातील वासनामय जीवन वासनारहित व्हावे या उदात्त हेतूने किंवा प्रेरणेने केलेली आहे. मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये आहार-मीमांसेबद्दल बरीच अनावस्था व निष्काळजीपणा दिसून येतो. अशामुळे शारीरिक, बौध्दिक व मानसिक संवर्धन होऊ शकत नाही. मनुष्यप्राणीमात्र जन्मतःच वासनेच्या आहारी गेला असल्यामुळे आहाराच्या वासना नैसर्गिक तीव्र स्वरूपाच्या असणे स्वाभाविक आहे. ज्या मानवी जीवनाची आपल्याला उन्नती करून घ्यावयाची आहे ते जीवन वासनारहित होणे शास्त्रदृष्टया आवश्यक आहे. तरच सदगुरुकृपेचा अमोल ठेवा आपल्या जीवनामध्ये निरंतर राहू शकेल. नाहीतर वासनेपोटी ह्या देहाची कर्ममय इंद्रिये देहाचे अधःपतन केल्याशिवाय राहणार नाहीत ! तात्विक विवेचन वैदिक अर्थात अनेक शास्त्राधारांनी सांगितले आहे.

एकदा आहार निश्चित केलात की आपली दैनंदिन कर्मे यथायोग्य तऱ्हेने पार पड़ू लागतील व तेच आज अत्यावश्यक आहे. मोठमोठी सिध्दसिध्दान्त पध्दतीची पुस्तके वाचण्यापूर्वी आपण आपला आचार, विचार व आहार हा पाया निश्चित करावयास शिकले पाहिजे. आहार निश्चित करण्यामागे बऱ्याच चांगल्या गोष्टीचा अभ्यास होऊ शकतो, कारण घरातील एकूण मंडळीची कुटुंबाबद्दलची आस्था कशी आहे, रोजच्या जीवनात क्षणाक्षणाला होणाऱ्या खाण्याच्या वासना या कशा प्रकारच्या व कशा स्वरूपाच्या असू शकतात व त्या सतत तशा चालू ठेवल्या तर शरीरपकृतीस काय अपाय होतो हेही अभ्यासिणे आवश्यक आहे. अशाच वासना वाढल्या की आहार-निश्चितता होऊ शकत नाही व ती झाली नाही म्हणजे आचार-विचार हे शुध्द स्वरूपाचे राहू शकत नाहीत.

ही एक साधना आहे, पण तिचाच अभ्यास न करता मनुष्य पुढे काहीतरी मोठे प्राप्त होणार आहे ते अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. या निश्चिततेत कोणाला कोणताही ‘आहार सोडा’ असे सूचित केले जात नाही. ‘निश्चितता करा’ ती अशी की, महिन्यातून एकदा कुटुंबातील सर्व मंडळींनी एकत्र बसावे. घरात येणारा एकंदर पै-पैसा किती व आपल्याला खर्च किती करावयास आहे असा विचार सामुदायिकपणे करावा. कुटुंबाच्या हिताच्या दृष्टीने तेवढा सूज्ञ विचार आपण कधीही केला नाही व पुढेही करणार नाही. मग बाबांची कृपा तुमच्यावर आहे हे तुम्हाला कसे कळावे ? आज या क्षणी आपला आचार, विचार व आहार निश्चित नसल्याने ही दु:खाची परिस्थिती जीवनाला झोके देत आहे. यासाठी कुटुंबाने एकत्र बसून एक आराखडा, तोही आपल्या परिस्थितीला अनुरुप असा तयार करावा. सोमवारपासून रविवारपर्यंत सकाळ-सायंकाळ कोणता आहार घ्यावा व परिस्थितीला कोणता झेपेल तो निश्चित करावा. जो एकदा निश्चित केला तो अंमलात आणला गेलाच पाहिजे. पै-पाहुणा जरी आला तरी त्यात बदल होता कामा नये व आलेल्या पै-पाहुण्यांचे कर्ज काढून ‘आदरातिथ्य करू शकलो नाही’ याबद्दल खेद वाटता कामा नये. तरच जीवनातील खरे समाधान कळेल  !

या तीन अवस्थांच्या अपेक्षेनेच मनुष्य देवाच्या मागे जातो. त्या तीन अवस्था म्हणजे सुख, शांति, समाधान होय ! हे जरी देवाच्या कृपेने लाभले तरी जीवनात ते निरतर टिकविण्यासाठी आपल्याला आपले आचार, विचार व आहार निश्चित करणे भाग आहे. या निश्चित झालेल्या तुमच्या भूमिकेमुळे तुमचे दैनंदिन जीवन सात्विक विचारांचे होऊन नि:स्वार्थता निर्माण होते व आज क्षणापर्यंत स्वार्थाने भरलेले जीवन हळूहळू बदलू लागते. ते पूर्णपणे बदलल्यावर तुम्हालाही असे वाटेल की, ‘या समितीप्रमाणेच मला इतरांना सुख, समाधान, शांति देण्यासाठी या जगांत काय करण्यासारखे आहे ‘? ही स्फूर्त भावना प्रत्येकाच्या जीवनात निश्चित करण्याचे कार्य तुम्ही करु लागलात की, “मानवता धर्माचा” पाया निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. या पारमार्थिक भावनेने विश्वशांति होण्यास वेळ लागणार नाही !