अध्याय ६ – दैवी उपासना

यापुढील समितीची भूमिका अगदी स्पष्ट आहे. देव, धर्म यांचा अर्थ स्वतःच्या स्वार्थी भूमिकेने जे लावून बसले आहात, त्यांचा या विधानाशी खूप विरोध होईल. पण त्यांचा विरोध विचारात न घेता किंवा त्याला उत्तर न देता समितीला आपली भूमिका आपणांसमोर आपल्या सुखसमाधानासाठी मांडावयाची आहे, की ज्यात आपण सर्वजण आहोत. या ठिकाणी येणाऱ्या बऱ्याच भक्तमंडळींची पूर्वीची सेवा खूप प्रकाराने झालेली असते. त्यात वारांचे उपवास, तिथीचे उपवास, देवजयंति, पुण्यतिथीचे उपवास व इतर अन्य व्रते हे सर्व केले आहे, ‘म्हणजे आपण फार मोठे ईश्वरभक्त आहोत’ असे प्रत्येकाला वाटत असते. पण याबद्दल समिती असे सुचविते की, अशीच उपासना तुमच्या वाडवडिलांनी करून तुमच्यासाठी आजचे दु:खमय जीवन पाठविले आहे. तुम्हीही तसेच प्रकार करुन तुमच्या मुलाबाळांना ते दु:ख पाठवू नका. कारण प्राप्त झालेल्या जीवनातील दु:खाचे ऋणानुबंध जर ज्याचे त्याने भोगले नाहीत, तर पुढे तेच आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात व लागणार. तर मग आपणांला आपल्या वाडवडिलांसारखी व्रते, उपासना करून चालणार नाही. त्यांच्या जीवनात आलेली संकटे टाळण्यासाठी त्यांनी उपवास, निरनिराळी व्रते व आराधना केली. त्यामुळे केवळ संकटे दूर झाली, पण त्यांचे निर्मूलन झाले नाही. कारण या देवाच्या सेवेत त्यांनी आलेली दु:खे भोगण्याचे सामर्थ्य परमेश्वराजवळ मागितले नाही तर ती संकटे ‘दूर व्हावीत’ या अर्थाने सेवा केली. त्या वेळी ती संकटे तात्पुरती दूर झाली. जेव्हा तुम्ही व तुमची मुलेबाळे देवधर्म मानेनासे झालात तेव्हा ती संकटपरंपरा पुन्हा तुमच्या जीवनात आली. प्रत्येकजण येथे आल्यावर अभिमानाने असे म्हणतो की, ‘मी आजपर्यंत कोणाचेहि वाईट केलेले नाही मग मला अशी दु:खे का ?’ तर त्याला उत्तर असें की, ‘हा प्रसाद तुमच्याच वाडवडिलांचा !’ एवढ्याचसाठी जीवनात आलेली दु:खे दूर होण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब करू नका. फक्त सदगुरूपाशी असे सामर्थ्य मागा की, ‘माझ्या जन्मऋणानुबंधनात जी-जी दु:खकारणमीमांसा असेल ती मी भोगतो, आपण माझ्या पाठीशी असा’. हाच खरा परमार्थ आहे की, स्वतःचे दु:ख देवालासुध्दा देणार नाही, तर माझ्या इतरेजनांना तरी मी कसा देऊ ? आणि अशा भावनेच्या माणसाला दु:ख हे सुखाला कारण झाल्याशिवाय राहील काय ? आणि यापलीकडे परमेश्वर तरी निराळा आहे का ?

खरा उपवास याचा अर्थ ‘गुरुसन्निध बसणे’ हा होय. पण आज ते शक्य नाही. आजची उपवासाची पध्दत ही दैवी उपासना नसून खाद्यपदार्थाची उपासना आहे. कारण त्यादिवशी साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ किंवा काही फलाहार याशिवाय आपला उपवास होऊ शकत नाही. आता हा उपवास देवाप्रीत्यर्थ का खिचडीप्रीत्यर्थ ? तर खऱ्या अर्थाने खिचडीप्रीत्यर्थ ! तर अशा देवाच्या नावावर अधर्म करून उपवास, व्रतवैकल्ये करून ‘पुण्य जोडतो आहोत’ म्हणून देवाला आणि मनाला फसवू नका ! खऱ्या अर्थाने उपवास करावयाचा झाला तर आपण वर्षातून एकदासुध्दा तो करणार नाही ! कारण वर्षभर दुसऱ्याचा अपमान, उपमर्द, तिरस्कार, दुसऱ्याची अपरोक्ष निंदा, दुसऱ्याच्या मनाला किंवा शरीराला क्लेश देण्यास तुम्ही कारण होणार व वर्षातून एकदा शिवरात्रीचा उपवास करून पुण्य जोडणार ! या विचारांचे गणित कोणत्या जगात खरे ठरेल ? तर यासाठी उपवास असा करा की, ‘दैनंदिन जीवनात माझ्या हातून काया, वाचा, मनाने कोणाचाही अपमान, उपमर्द, तिरस्कार, दुसऱ्याची अपरोक्ष निंदा, दुसऱ्याच्या मनाला अथवा शरीराला क्लेश देण्याजोगे आचरण होणार नाही. अज्ञानाने झालेच तर प्रामाणिकपणे सदगुरू नामस्मरण करीन’. या उपवासात खरोखर तुम्ही मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न करून तो कदाचित न झाल्याबद्दल पुन्हा सदगुरू नामस्मरण केलेत, म्हणजे उपवासाच्या दिवसाचा अर्थ वर लिहील्याप्रमाणे म्हणजे ‘गुरूसन्निध बसणे’ हा पूर्ण झाला. म्हणजे आज खऱ्या भावनेने दु:खनिवारणार्थ साधना केलीत. समितीच्या अशा अनेक प्रकारच्या कार्यपध्दतींत अशा अज्ञानाबद्दल मुलाखतीच्याद्वारे मार्गदर्शन केले जाते. बऱ्याच भक्तभाविकांच्या देवाधर्माबद्दलच्या भावना व विचाराचे कौतुक करावे का खेद करावा हेच समजत नाही. कारण देवाबद्दलचे त्याचे विचार असे असतात की अमुक एक देव लवकर पावतो, व अमुक पावत नाही. यामुळे अशा भक्तांना एक वाईट सवयच जन्माची लागते. त्यामुळे संकटे आली की मागचा पुढचा विचार न करता देव, देव्हारे, दरवाजे पूजत हिंडावयाचे. पण ही भावना केव्हाही धार्मिक नाही. कारण कोणताही देव पूजला तरी तो पावण्यात म्हणजे संकटे दूर होण्यास कारण तुम्ही व्हावयास पाहिजे. देव आहे आरशासारखा. जसे तुम्ही असाल तसे तो तुम्हाला फल देणार. प्रथमदर्शनी तो आपले देवत्व दाखवतच नाही. तुमच्यामध्येही तो अंशमात्र आहे म्हणून तुम्ही संकटे आली की ज्या भावनेने देवाकडेच जाता त्या भावनेला तो निश्चित करतो. दैनंदिन उपासनेने ही भावना जर वाढली तर घरचे देवसुध्दा पावतील व पावतात. पण आपल्याला असा बुध्दिभ्रम झाला आहे की, घरचे देव निर्बल आहेत. देवऋषी मोठे आहेत. असे वाटावयाचे कारण घरच्या देव-देवतांबद्दलची अनास्था. आज प्रत्येक जण येथे आल्यावर असे सांगतात की, घरी देवधर्म रोज होतो. पण काही वेळ प्रसंगाने अशांच्या घरचे देव पाहण्याचे भाग्य लाभते. तेव्हा काय दिसते ? देवाचे टाक किंवा मूर्ति कशाची आहे म्हणजे, तांब्याची, पितळयाची, पंचधातूची का चांदीची हेच समजत नाही. कारण कैक वर्षे त्या देवांचे उव्दार्जन झालेले नसते. पूजनानंतर लावलेल्या गंधाच्या चित्रविचित्र आकृत्या भिंतीवर उठलेल्या असतात. देव्हाऱ्याच्या खाली झुरळे, जळमटे, निर्माल्य सांडून राहिलेले असते. देवाचे वस्त्र, देव पुसून ते पोतेरे आहे का देव-वस्त्र आहे हे समजत नाही. नंदादीपाची समईची तीच स्थिति. अर्धवट जळलेल्या वाती व शेकडो काड्या इतस्तः पसरलेल्या असतात. शिवाय एखादी पोथी किंवा स्तोत्रे, ती जीर्ण झालेली, काहीतील अध्याय गेलेले असतात म्हणून दुसऱ्याकड़ून आणलेले. अशा देवांच्या संसारांत देव पूजन घरातील लहानात लहान मुलगा करणार किंवा जेवण-खाण झाल्यावर सौ. करणार व आपणच करीत असाल तर 10 वाजता ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी जेवणास परवानगी मिळावी म्हणून एक तांब्याभर पाणी त्या देवाच्या डोक्यावर ओतले की वरीलप्रमाणे पूजन करून जेवणाची परवानगी घेता. यास देवधर्म कसा म्हणावा ? व अशा स्थितीत ठेवलेल्या देवांनी तुम्हाला तरी सुख का द्यावे ? बऱ्याच भक्तांना याची जाणीव दिली तर ते परिस्थितीची बाजू पुढे करतात. साफसफाई करण्यास खर्च काहीच नाही. पण आठवड्यातून आम्हाला एक दिवसच सुट्टीचा मिळणार. तेव्हा दुसऱ्याचे उंबरे पूजण्यात वेळ गेल्याने देवाच्या वाटणीला सुट्टीचा दिवस कोणताच नाही. खर्चाचा प्रश्न विचारात घेतला तर स्नो, साबण, पावडर किंवा अन्य सौंदर्य-प्रसाधनास जेवढा खर्च महिन्याला येतो त्यात देवधर्म वर्षभराचा होतो. ह्या विचारांशी सहमत होऊन आलेल्या भक्तभाविकांनी आपले देवदेव्हारे व उपासनेच्या पोथ्या व स्तोत्रे जर प्राणांपलीकडे जतन करण्याची सवय लावली तर प्राणांवर संकट कोसळणार नाही.