अध्याय ७ – व्रतवैकल्ये

आजपर्यंत समाजात रूढ झालेल्या या व्रतवैकल्यांच्या कल्पना जोपर्यंत बदलण्याचे कार्य किंवा जबाबदारी अधिकारी व्यक्ती म्हणून कोणी हाती घेणार नाही, तोपर्यंत आजच्या आर्थिक परिस्थितीने हतबल झालेला भक्तभाविक आपल्या पूर्वापार कुलधर्म व कुलाचार किंवा कुलोपासना यांच्या परंपरा इच्छा असूनसुध्दा भावी जीवनात करू शकणार नाही. आज ज्ञान-अज्ञानाने दुर्लक्ष झालेले कुलाचार, कुलधर्म जास्तीत जास्त दु:खास कारण झाले आहेत. याला कारण देवदेवर्ताजनाबद्दलच्या उपासनेचा रुढ झालेला पगडा ! आज सर्वसामान्य माणसाच्या जीवनात गणपती-उत्सव, नवरात्र व अन्य धार्मिक उत्सव हे कुलाचार परंपरेने आहेत. नवरात्र अश्विनात असते. अशा वेळी ते करावयाची इच्छा असून आर्थिक परिस्थिति अनुकूल नसली तर मनुष्य तेच नवरात्र पुढच्या वर्षावर ढकलतो. पुढल्या वर्षी तीच परिस्थिति राहिली तर पुन्हा पुढे ढकलतो. कालांतराने असे म्हणतो की, ‘परिस्थितीच जर बदलत नाही तर काय करायचे करून ?’ वास्तविक अशा वेळी निश्चित मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. यथायोग्य वेळी देवधर्म झाले तर इतके दु:ख सहन करावे लागत नाही. याबाबत समिती असे मार्गदर्शन करते की, ‘ज्या देवाची उपासना किंवा नवरात्र करावयाचे होते, त्या देवाला तुमची परिस्थिती पूर्णपणे माहीत होती’. शिवाय त्या देवालाही तुमच्या आधी ठाऊक असावयास पाहिजे की, ‘मला माझ्या भक्तांकड़ून उपासना घ्यावयाची आहे’. मग त्या देवाने जर अडचणीतून मार्ग काढावयाचा तो काढला नाही, तर तुम्ही कर्ज काढून कर्जाचा बोजा देवावर ठेवू नका. कारण तुमचा आश्विन महिना अजून आला नाही. प्रश्न असा आहे की, हे तरी कोणी ठरविले की ‘हा चैत्र’, ‘हा आश्विन’, ‘हा रविवार’, ‘हा सोमवार ?’ पृथ्वीप्रदक्षिणा केली तर हे लिहिलेले कोठेच सापड़त नाही. हे गणित कालमापनाचे आहे, देवमापनाचे नाही. जेव्हा तुम्हाला सवड होईल त्या क्षणी मनोभावनेने तुम्ही तुमचा देवधर्म करा. आणि आजच्या जगाच्या परिस्थितीला हेच योग्य ठरणार आहे.

आज समाजाच्या सुख, शांति व योग्य मार्गदर्शनासाठी शास्त्रशुध्द अनुभवी व अधिकारी साधकाची आवश्यकता आहे. मनुष्य परिस्थितीने वैतागल्यावर जे दैवी म्हणून दिसेल त्याला सुखासाठी कवटाळण्यास धावतो आहे. पण अशा वेळी आजच्या समाजातील साधकाच्या मार्गदर्शनाचे आश्चर्य वाटते. ते असे की, निर्गुण निराकार परमेश्वराचे अस्तित्व त्यांना समजते. परंतु पुढे बसलेल्या हतबुध्द झालेल्या भक्ताची परिस्थिती समजत नाही. अशा वेळी दु:खपीडीतांना ‘नवचंडी, शतचंडी हवन करा’, ‘याग करा’ किंवा अन्य दानधर्म व व्रतवैकल्ये सुचवितात. पण ज्याला ‘दुपारी काय करू’ असा प्रश्न पड़ला आहे, अशाच्या दु:खनिवारणार्थ दैवी मार्गात निराकरणे नाहीत का ? व अशांना सुख, समाधान मिळावे अशी देवांची इच्छा नाही का ? पण जगाच्या कल्याणासाठी इतका सूज्ञ विचार करण्यास साधकाला वेळ नाही. ‘मी व माझी विद्या’ हेच सर्वस्व मानून अशी मंडळी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन विश्वशांति करण्यासाठी धार्मिक विधी करतात. जोपर्यंत समाजातील जास्तीत जास्त दु:खी, पीडित यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला सुलभ निराकरण आत्मसात होणार नाही, तोपर्यंत अशा धार्मिक विधींनी केलेले विश्वशांतिचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत ! यासाठी येथे आलेल्या भक्तभाविकास तो मनाने विचारी, परस्परांविषयी जिव्हाळयाचे प्रेम असणारा व्हावा म्हणून येथील कार्यपध्दतीतील साधना शिकविली जाते. आजपर्यंतचा साधनेबद्दलचा झालेला विचार असा आहे की, नित्य जीवनात जी आपण साधना, उपासना व व्रतवैकल्ये करतो ती सर्व परमेश्वराप्रीत्यर्थ असतात. पण खऱ्या अर्थाने साधना, उपासना ही परमेश्वराप्रीत्यर्थ नाही. कारण त्या परमेश्वरासमोर बसून परमेश्वराजवळचे काही शोधावयाचे नाही तर स्वतःपाशी जे जगाच्या दृष्टीने हितावह नाही ते सोडावयाचे. ‘जगातील दु:खी जीवांमध्ये अंशमात्र परमेश्वर आहे व त्यांची सेवा करण्यासाठीच मला त्या परमेश्वराचा कृपाप्रसाद लाभला आहे.’ हे त्याच्यासमोर बसून जोडावयाचे, हाच खरा ‘विश्वशांतीचा यज्ञ’ होणार आहे.

वरील विचारांची प्रत्यक्ष साधनापध्दती नित्याचरणामध्ये यावी व आपल्या हातून त्या परमेश्वराची ‘सेवा’ कोणत्याही अज्ञात कारणाने होऊ नये, या उदात्त हेतूने आतापर्यंत या समितीच्या कार्यपध्दतीच्या मार्गदर्शनार्थ आलेल्या भक्तभाविकांना त्यांच्या उपवास, व्रतवैकल्ये, नवस-सायास यासारख्या उपासनेपासून परावृत्त करून त्यांना आजच्या सामाजिक जीवनाचा पारमार्थिक तत्ववाद शिकविला. तो असा की, तुम्ही आपल्या जन्मऋणानुबंधनातील ऋणामुळे आज दु:खाला कारण झाला आहात. तर त्याबद्दल जो देवधर्म करून ऋणमुक्त होण्याच्या मार्गाचा अवलंब करीत आहात पण खऱ्या अर्थाने तुम्हाला ‘मानवधर्म’ करण्यानेच सुख, शांति निर्माण होणार आहे. त्या तुमच्या नित्याचरणातील कर्तव्यामधून समाजकल्याण होण्याचाही बहुमोल ठेवा तुम्ही सहजगत्या प्राप्त करून घेणार आहात. आजपर्यंत केलेल्या उपवास, व्रतवैकल्ये, नवरात्रासारखे वार्षिक महोत्सव यांपासून सात्विक समाधान काही लाभले का ? आज सदगुरू आज्ञेने तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित कुलधर्म, कुलाचार व कुलोपासना या रूढ धार्मिक विधींपासून ऋणमुक्त केले आहे, ते याचसाठी की, खरा देवधर्म तुम्हाला समजावा. भावी जीवनात समितीच्या शिकवणीप्रमाणे तुम्हाला ‘देव’ याचा अर्थ समाज व धर्म याचा अर्थ स्वतःचे कर्तव्य असा लावावा लागेल ! या विचाराशी तुम्ही सहमत झालात तर आजच्या परिस्थितीत व कालांतराने समाजावर येणाऱ्या आपत्तीत आजच्या आचार-विचारांनी शह बसेल. आजपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात काय काय देवधर्म केलात, असे जर विचारले तर तुम्हाला उत्तर देणे कठीण होईल. आजपर्यंत जगामध्ये मनुष्याने आपल्या जीवनातील आचार-विचारांचा प्रामाणिकपणा देवाधर्माबाबत किंवा ऐहिक सुखाबाबत कधीही व्यक्त केला नाही, हे जरी खरे असले तरी मनुष्य-स्वभावानुसार त्याच्या जीवनात त्याने केलेल्या देवधर्माचा हिशेब मोठ्या अक्षरांमध्ये लिहीलेला सापड़ून तत्संबंधीचा उच्चार अनेक वेळा आप्त इष्ट, गुरूबंधु त्यांच्यासमोर झाला असेल. पण त्या देवधर्माच्या शतपटींनी जो व्यसनापायी पैसा खर्च झाला आहे, त्याची चुकूनसुध्दा नोंद सापड़णार नाही. ही बुध्दिशी प्रतारणा करणारी विचारसरणी याला ‘धर्म’ म्हणता येईल काय ? यासाठी समितीने भक्त-भाविकांना असे मार्गदर्शन केले आहे की, आजपर्यंत तुमचे वडिलोपार्जित जे कुलधर्म, कुलाचार व कुलोपासना होत्या, तत्प्रीत्यर्थ तुम्हाला येणारा वार्षिक खर्च यांचा हिशेब तयार करा. पूर्वीच्या परंपरेतील खर्चाची बाजू व आजच्या परिस्थितील खर्चाची बाजू ही लक्षात घेऊन समितीने जो गोरगरीबांच्या कल्याणाचा विचार निश्चित केला आहे, त्यांच्या साहाय्यतेसाठी, वरील दोन्हीमधून निश्चित केलेली रक्कम ‘अल्पबचत योजने’त लिहा. त्याचा विनियोग गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी व वैद्यकीय साहाय्यतेसाठी केला जाईल.

आज समाजात असाच आध्यात्मिक व पारमार्थिक विचार पाहिजे आहे, म्हणजे जो नास्तिक-आस्तिक वाद चालला आहे, तो वाद नसून प्रत्येकाचे आपल्या जीवनातील कर्तव्य आहे, हे सिध्द होईल. कारण जो नवमतवादी समाज भौतिक वाद मानतो, त्यालाही शिक्षणाप्रीत्यर्थ आपण काही हातभार लावावा, व जो अध्यात्मवादी आहे, त्यालाही देवधर्माप्रीत्यर्थ जो खर्च करावयाचा त्याचाही भावार्थ समजेल. आणि आस्तिकानेहि आपले कर्तव्य करावे व नास्तिकानेही करावे ही विचारसरणी ज्या दिवशी समाजाच्या दृष्टीने पोषक होईल, त्या दिवशी या समाजाच्या हातून ज्ञान-अज्ञानाने विघातक कृत्य घड़णार नाही !

वेदकालापासून जी उपासना, व्रतवैकल्ये समाजाने आपल्या आत्मोन्नतीसाठी करावी असे सांगितले जात आहे, त्यातील महत्वपूर्ण भाव काही स्वार्थी लोकांनी बाजूला केला असावा असे वाटते. कारण काही शतकांपूर्वी राजे-रजवाड्यांपासून ते सामान्य माणसापर्यंत देवधर्म केला गेला, तो अभ्यासला म्हणजे असे निदर्शनास येते की, देवधर्माने समाजास जी व्रतवैकल्ये, उपवास, उपासना करण्यास प्रवृत्त केले होते, त्यामागे हेतू हाच होता की, धार्मिक भावनेने समाजकल्याणार्थ परोपकार व्हावा. याचे सत्य इतिहासाकड़े दृष्टि टाकली तर पटण्यासारखे आहे, की त्या काळात नुसते देवधर्माचे अवडंबर न माजविता विद्यापीठापासून ते पाण्याची विहीर खोदण्यापर्यंत परोपकार केला गेला. आजच्या समाजाची देवाधर्माबद्दलची विचारसरणी ऐकली तर स्वार्थी अज्ञान प्रकट होते. ते असे की, स्वतःला स्वतःच्या जीवनापलीकडे काही समाजकल्याणार्थ आपला जन्म आहे हे समजत नाही. मग परोपकार करावा हे तर स्वार्थी विचारांना कधीही न पटण्यासारखे आहे. आणि ज्यांना या कर्तव्याची जबाबदारी पार पाडायची नाही, त्यांच्याच तोंडून देवधर्म हे थोतांड आहे असे बाहेर पड़ते ! निदान ज्यांना देवधर्मामधील परोपकार हा थोतांड आहे हे सिध्द करावयाचे आहे, त्यांनी आपल्या आर्थिक प्राप्तीमधून एखादया गरीब विद्यार्थ्याचे शालेय व विश्वविद्यालयीन शिक्षण पुरे केले आहे हे सत्य दाखवावे.