अध्याय ९ – समाजकल्याणार्थ समितीची भूमिका

या समितीच्या कार्यपध्दतीचा हेतू हा शास्त्रीय असून तो मानवी जीवनाच्या दृष्टीने पूर्ण अभ्यासलेला आहे. केवळ लोक जमवून त्यांचा बुध्दिभेद करून भावनेच्या अंधश्रध्देला बळी पडून केलेला नाही. या कार्याची उभारणी येथे असलेल्या लोकांच्या अनुभवावर केलेली नाही. त्यामुळे येणा-या भक्तांची संख्या वाढली तरी कार्याची पध्दती बदलणार नाही व ती बदलण्याचा प्रयत्न भक्तमंडळीनी आपल्या सोईसाठी करू नये. वर नमूद केल्याप्रमाणे येथील कार्यपध्दतीचा अनुभव आपणा सर्वांस घ्यावयाचा आहे. कारण त्या पध्दती व्यावहारिक किंवा प्रापंचिक जीवनातील नसून सिध्द स्वरूपाच्या आहेत, म्हणजे “गुरुप्रसाद” आहे.

आज समाजामध्ये प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही काही ना काही कारणाने बिघडलेली आहे. ती परिस्थिती दूर व्हावी व सर्वांना सुखसमाधान लाभावे म्हणून प्रत्येकजण दु:खनिवारणार्थ काही ना काही प्रयत्न करीत आहे. सुख निर्माण होण्याची कुचंबणा जर कोठे होत असेल, तर ती स्वतःची असलेली अनिश्चितता, आत्मविश्वाचा अभाव व दैवी मार्गाबद्दल पूर्णत्वाने नसलेली श्रध्दा. याशिवाय एक मोठा घातक विचार म्हणजे मी माझे नित्य आचार-विचार कोणासाठीही बदलणार नाही व धर्माचरण करावे लागले तर ते न करता काही चार पैसे परस्पर देऊन कोणी करणारा भेटला तर बरे, म्हणून ज्योतिषी, देवऋषी, मांत्रिक किंवा एखादा आधिदैविक साधक यांचा आश्रय तुम्ही शोधणार आणि स्वतःजवळचा पै-पैसा घालवून आहे त्यापेक्षा परिस्थिती कठीण करणार ! त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ‘ते मला मिळणार आहे’ या भविष्योत्तर जीवनाची स्वप्ने स्वतः काही एक न करता बाळगता !

समितीची समाजकल्याणार्थ भूमिका अगदी स्पष्ट आहे, हे पूर्वी विहिलेल्या निराकरण पध्दतीवरून समजेल. ही निराकरणे कोणाही व्यक्तीचे विचार नाहीत. आज गेल्या दहा वर्षांमध्ये दु:खनिवारणार्थ जे मार्गदर्शन केले व मनुष्याला जी काही निरनिराळ्या प्रकारची दु:खे म्हणून असतात, ती जास्तीत जास्त या निराकरण पध्दतीच्या पलीकडे असू शकत नाहीत हा विश्वास तुम्हाला पटावा म्हणून या साधनपत्रिकेमध्ये मानवी जीवनात दु:ख निर्माण होण्यास जास्तीत जास्त प्रमुख कारणे कोणती असू शकतील, ती सहा प्रकारांनी आपणासमोर अभ्यासासाठी मांडली आहेत. या दु:ख कारणपरंपरा शेकडा 80 लोकांच्या दु:खास कारण असतात. बाकीच्यांची म्हणजे शेकडा 20 लोकांची दु:खे ही अज्ञानाने निर्माण झालेली असतात हे स्पष्ट समजावे म्हणून आपणासमोर ही साधनपत्रिका व निराकरणे तुम्ही प्रश्न विचारण्यापूर्वीच ठेवली आहेत. या निराकरणपध्दती जगातील गरीबात गरीब व श्रीमंतात श्रीमंत जो असेल त्यालाही दु:खनिवारणार्थ आत्मसात करता येतील. शिवाय या निराकरणपध्दतीचा हेतू देवधर्माबद्दलचे अज्ञान, तिरस्कार, निंदा, नालस्ती हे मनुष्याच्या ठिकाणचे अविचार जावेत असा आहे. कारण बाह्य जगात देवधर्माबद्दलचा अर्थ खूपच वेगळा आहे. त्या ठिकाणी देव मानायचा याचा अर्थ आपल्या जीवनात नित्य कर्तव्य न करता कोणा व्यक्तीवर, दगडावर, मूर्तीवर, जपा-तपावर, ज्योतिषशास्त्राच्या खोट्या विधानावर विश्वास ठेवून झोपी जा, असा केला जातो. आजपर्यंत गादीवर आलेल्या शेकडो भक्तांनी हा भ्रम निर्माण करून ठेवला आहे की, आपण आरतीला आलो, प्रसाद पूजनास घेतला की आपले कर्तव्य संपले. तर अशा विश्वासासाठी हे समितीचे कार्य नाही. आपल्या आपत्ती दूर होण्यास आपणच कारण झाले पाहिजे व दूर करण्यास शिकले पाहिजे. देव मानायचा तो आळसाने, अविचाराने, खोटेपणाने, दुस-याला बुडवून, नित्याचरण न करून, नित्यानित्य विवेक न सांभाळून केवळ जग ऐहिक सुख भोगत आहे, ते आपल्यालाही मिळावे या वासनेने नाही, व तशी वासना असेल तर सुख मिळणार नाही, उलट असलेली परिस्थिती बिघडण्यास कारण व्हाल. तुम्ही देवाकडे येता तेव्हा एकाच दृष्टीकोनातून येता की, ‘मला अमूक एक मिळाले पाहिजे’, पण त्याबद्दल ‘मला काय काय सोडले पाहिजे’ असे जर विचारलेत तर, देव कशाला पाहिजे हे समजेल. तेव्हा वरील सर्व आचार बदललात म्हणजे खरा देव मानलात. पण या समितीच्या समाजकल्याणार्थ भूमिकेशी जे भक्त-भाविक सहमत होण्यास तयार नसतात ते समितीबद्दलचे वाईट अनुभव पुढे करून बाह्य जगतामध्ये अन्य भक्त-भाविकांची दिशाभूल करीत असतात.

या कार्याची कार्यपध्दती ही पूर्णत्वाने समाजोन्नतीसाठी चाललेली असल्याने ज्या निराकरण पध्दतीने आपल्याला मार्गदर्शन होते, त्यात कोणताही आडपडदा न ठेवता आपणा सर्वांच्या अध्ययनार्थ त्या ठेवण्याचा हेतू असा की, बाह्य जगतात भौतिक किंवा सुधारक लोकांचा असा गैरसमज आहे की, दैवादिकांचा मार्ग म्हणजे केवळ भावनेच्या आहारी गेलेल्यांचा बुध्दीभेद करण्याचा मार्ग ! तशी समजूत दूर व्हावी व जे सिध्द आहे ते शास्त्र आहे व त्याची प्रचिती तुम्ही अनुभवावी. केवळ नित्याचरण सोडण्यानेच बहुतांशी तुम्ही दु:खी झाला आहात हे या वरील अभ्यासाने आपणास पटेल. कारण परमेश्वराच्या मार्गाइतका अचूक मार्ग मार्गदर्शन करण्यासाठी नाही. लोककल्याणार्थ खरा मार्ग असेल तर ताबडतोब धर्माचरण करण्यास सांगेल. ज्ञान-अज्ञानाने चुका झाल्या असतील तर कोणत्याही प्रकारे भीड न ठेवता त्या दाखवून नित्याचरणाची सत्यता पटवील, हे या कार्याचे लोककल्याणाचे ध्येय आहे.

आपण भक्तमंडळी या ठिकाणी आलात, पुढेही कोणाला येण्याबद्दल मार्गदर्शन करणार असाल तर क्षणिक सुखाच्या शोधार्थ येऊ नका व दुस-याला पण तसे मार्गदर्शन करू नका. कारण केवळ आपले जीवन आपण सुखी करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्ही मार्गदर्शन करू शकणार नाही. कारण या सिध्दसिध्दांत पध्दती प्रयत्न नसून ते शास्त्र आहे. तेव्हा आपण आपले आचार-विचार निश्चित करणार असाल तर मार्गदर्शन हितावह होईल. आपण आपले जीवन सुखी करू पहातो, पण ते जन्मऋणानुबंधनाने किती परालंबी आहे हे जर पाहिले तर अन्य मार्गाने सुखी होण्याचा प्रयत्न केलात तर तो निष्फळ ठरेल ! पण हा मार्ग कदापिही परावलंबी नाही हे हजारो वर्षांपासून सिध्द झाले आहे म्हणजे तुम्हाला उपासना, सेवा व धर्माचरण करावयाला लावणारा आहे व हे करण्याने आपण सुखी होणार आहोत. बऱ्याच भक्त-भाविकांची या कार्याबद्दलची कल्पना भ्रामक आहे. तत्संबंधी स्पष्टपणे लिहीणे कर्तव्यच ठरेल. आपणापैकी कोणासही वाममार्गाने (सट्टा, जुगार, रेस इ.) सुख व पैसा मिळवून देणे हे कार्य या समितीचे नाही. शिवाय आध्यात्मिक या शब्दाचा अर्थ मोक्ष मिळेल का ? वगैरे प्रश्नांची मीमांसा सांगणे किंवा सिध्दता करून देणे हा अर्थ समितीचा नाही, काया, वाचा, मनाने इतरांना सुख समाधान देण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतील, ते नि:स्वार्थपणे करणे या मानवता धर्माच्या शिकवणीत समिती ‘आध्यात्मिक’ समजते.

पारलौकिक, पारमार्थिक आत्मोन्नती या शब्दांचा वापर करून आपला अभ्यास खूप झाला आहे, हा भास निर्माण करणारी बरीच भक्तमंडळी येथे येतात. पण समिती वैयक्तिक, पारलौकिक, पारमार्थिक किंवा आत्मोन्नती याचा अर्थ असा करते की, जसे प्रकाश म्हणजे सूर्य नव्हे पण सूर्य म्हणजे प्रकाश, तद्वतच या शब्दांचा वापर म्हणजे उन्नती नव्हे, तर प्रत्यक्षात आचरण हीच उन्नती होय. उन्नती ह्याचा अर्थ एका अवस्थेची पूर्णावस्था होवून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाणे. मग आतापर्यंत पारलौकिक, पारमार्थिक,आत्मोन्नती, वैयक्तिक उन्नती झालेली माणसे दु:खी का ? वास्तविक अशी उन्नती झालेल्यांना सुख-दु:खाची कल्पना जाणवू नये, असे तेच सांगतात. मग अशा समाजाची अनावस्था का ? आज समाजसुधारणेच्या कल्पना भौतिक दृष्ट्या किती सुंदर व मोहाला बळी पाडणाऱ्या आहेत ! प्रत्येकजण असा विचार प्रकट करतो की, माझा विचार म्हणजेच समाजसुधारणा ! अशी दहा माणसे समाज सुधारण्यास निघाल्यावर कोणाच्या विचारांची दिशा निश्चित धरावयाची, असा प्रश्न जर समाजसुधारकांना विचारला की, ’आज समाज कल्याणाच्या विचारांनी आपले जीवन आपल्याला अपूरे झाले आहे असे आपण म्हणता, तर हे विचार कोणाच्या कल्याणार्थ आहेत ? देशाच्या, धर्माच्या, देवादिकांच्या, समाजाच्या का स्वतःच्या ?’ तर त्याला उत्तर एकच की, स्वतःच्या स्वार्थासाठी ! आणि हीच समाजिक उन्नती आहे असे कोणी मानणार असेल तर मानोत. स्वतःच्या स्वार्थापलिकडे समाजाचे काय होणार आहे, तर पुढचे भविष्य आपणच ! या स्वार्थी सामाजिक विचारांना दैवी विचारांनी नि:स्वार्थ बनविणे हाच परमार्थ व हेच आध्यात्म आज जगाला पाहिजे आहे. समाधी किंवा साक्षात्कार हे अवडंबर नको आहे. याची प्रचिती येण्यासाठी समितीच्या सेवकांना आलेल्या लोकांना दु:खनिवारणार्थ मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त करून आज समाज कसा दु:खी आहे, धर्माबद्दल, देवाबद्दल व स्वतःबद्दल कसे अज्ञान आहे हे दाखवून सेवाधर्म म्हणजे स्वतःचा स्वार्थ नव्हे हे शिकविले जाते. समाजाची उन्नती झाली असे केव्हा म्हणता येईल ? तर ज्या दिवशी समाजातील दैविक मार्गातील व्यावहारीक द्वैत संपेल त्या दिवशी. या अभ्यासाची ओळख आलेल्या भक्त-भाविकांना करून देणे हीच समितीची लोककल्याणार्थ भूमिका आहे.

येथे येणाऱ्या ब-याच भक्त-भाविकांची कल्पना अशी आहे की, नुसती आरती,पूजा व प्रश्न निराकरण एवढेच हे कार्य मर्यादित आहे. पण तसे नसून वरील काही विवेचनावरून समाजकल्याणार्थ या कार्यापुढील उद्देश आपणास समजतील. याही पुढे एक महत्वपूर्ण कार्याचा भाग समितीच्या सिध्दसिध्दांत पध्दतीमध्ये आत्मसात केला गेला आहे. परंतु तो प्रश्न किंवा ती साधना ही काही आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय होण्यासारखी नाही. आर्थिक प्रश्न हा कांही विशेष प्राधान्याचा भाग या कार्य-पध्दतीमध्ये नाही. जो प्रश्न आहे तो येणाऱ्या आपल्यासारख्या भक्तमंडळीच्या आचार-विचारांचा. प्रथमतः आपल्या निदर्शनास आणले आहे की, आपल्या दु:खनिवारणार्थ समिती पूर्णत्वाने सुख निर्माण व्हावे,अशी इच्छा करीत आहे. आज समितीची प्रत्येक कार्यकेंद्रे ही काही मठ, धर्मशाळा, देऊळ इत्यादी अशी नाहीत. ती आपल्या सारख्याच कुटुंबवत्सल गृहस्थांच्या घरी त्यांच्या सहानुभूतीने व प्रेमाने तुमच्या कल्याणार्थ स्थापन झाली आहेत. याचा आपण कधीही विचार केला नसेल. रोज सकाळी साडेपाचपासून ते रात्रौ दहा पर्यत या कार्यकेंद्रावर आपल्या सारख्या येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या दु:खाचा विचार सहानुभूतीपूर्वक या कुटुंबातील मंडळी करीत असतात. यात त्यांचा काही फायदा आहे का ? तुम्हालाच पटण्यासारखे आहे. कारण तुम्ही आपले कर्तव्य कोणत्या प्रकारे करता, हे तुम्हालाच माहित आहे. तुमच्या घरी चार दिवस जर एखादा पै-पाहुणा आला तर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी आपण नापसंती व्यक्त करता आणि या ठिकाणी तर अव्याहत हे कार्य चालू आहे. तुमच्याप्रमाणे सामान्य जीवन जगणाऱ्या या कुटुंबियांना इतकी सहनशीलता कोठून येते व आली आहे हा जर विचार आपल्या मनाशी कराल तर वेगळा परमेश्वर शोधण्याचे कारण पडणार नाही.

आज जगतामध्ये लोककल्याणाची तळमळ असणारी मंडळी काही थोडी नाहीत. परंतु तुमच्यासारख्या भक्त-भाविकांच्या आचरणाने अशी कार्ये मातीमोल होतात. आमच्या समाजात इतकासुध्दा चांगला विचार निर्माण होऊ शकत नाही की, आपल्याला कोणाचे चांगले करता येत नाही तर निदान आपण वाईट करण्यास तरी तयार होऊ नये. समाजातील काही व्यक्तिंना अशा घातकी आचार-विचारांचा अभिमान वाटतो आणि असे भक्त-भाविक अशा कार्याच्या ठिकाणी श्रद्धेने धर्माचरण व ईश्वर भक्ती करण्यास लागलेल्या इष्ट मित्र, नातेवाईक लोकांना आपला आचार-विचारांचा खोटेपणा बाजूस ठेवून अशा समाजकल्याणाच्या कार्यात खोटेपणा आहे हे दर्शविण्याचे कार्य करीत असतात. कार्य खरे किंवा खोटे हे खरे-खोटेपणा दाखविण्याने सिध्द होत नसते. असे जरी असले तरी आज आमचा समाज हा आचार-विचारांनी लुळा झाल्यासारखा आहे. अशी मंडळी एखाद्या कार्याचा उदो-उदो करण्यास कारण होतात व तीच मंडळी कार्याच्या नाशासही कारण होतात. आज या समितीचा हा मार्ग ईश्वरी कृपेच्या आशिर्वादाचा ठेवा आहे म्हणून गेल्या दहा वर्षांमध्ये समाजातील अशा मंडळीच्या सुख-दु:खाचा विचार नि:स्वार्थपणे करूनसुध्दा त्या मंडळीनी कार्याच्या आड येण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु जसा सूर्यप्रकाश कोणी दडवू शकत नाही, त्याप्रमाणे हे कार्यही समाजाआड ते करू शकले नाहीत. पण अशा लोककल्याणाच्या कार्यार्थ ज्यांना स्वतःचे बलिदान करावे लागते, याचा तरी विचार निदान ज्यांना दुस-यास सुख, समाधान देण्याचे विचारसुध्दा नाहीत अशांनी अवश्य करावा.

आता वर जो आर्थिक प्रश्न म्हणून सांगितला तो असा आहे की, आज आपल्याच देशात ग्रामसुधारणेसाठी आपले राज्यकर्ते बराच प्रयत्न करीत आहेत. तरीसुध्दा काही बाबतीत ते सुखसमाधान देण्यास असमर्थ आहेत, हे अगदी निश्चित अनुभवाने येथे मांडले जात आहे. हजारो वर्षांपूर्वी ज्यावेळी समाजव्यवस्थेसाठी जी खेडी बसविली, त्याच वेळी त्यांच्या संरक्षणार्थ देवतांचीही स्थापना केली. त्यांनाच आज ‘ग्रामदेव’ किंवा ‘ग्रामदेवता’ म्हणतात. वर्षातून एकदा त्या देवतांची जत्रा किंवा उरूस करण्याची प्रथा प्रामुख्याने असे. यामागील हेतू सुध्दा समाजकल्याणाचे द्योतकच होता. तो असा की, जर गावातील एकमेकांत काही वैरभाव, भांडणतंटा निर्माण झाला असेल, तर या जत्रेच्या दिवशी अशा एकमेकांत वैर असणाऱ्या लोकांना त्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम गाव-पंचायत करीत असे व ज्ञान-अज्ञानाने घडलेल्या प्रमादाचे निराकरण होऊन पुन्हा एकमेकांत प्रेमाचा सलोखा निर्माण होत असे. आज क्षुल्लक अशा कारणासाठी कोर्ट-दरबार करून शेकडो कुटुंबे कर्जबाजारी होऊन अजून वैरभाव विसरू शकली नाहीत. यावरून त्या कालामध्ये ग्रामस्थ ग्रामदेवतांचे महत्व समाज कोणत्या प्रकारे मानीत होता हे अभ्यासण्यासारखे आहे. आज प्रत्येकास शहरी जीवनातील विषय सुखाची आसक्ती निर्माण झाली आहे व शहरी जीवनाच्या पगड्यामुळे जत्रा, उरूस करणे अशिक्षितपणाचे आहे असे वाटू लागले आहे. आज जत्रा उरूसामध्ये जो करमणूकीचा भाग आपण पहातो, तो अलिकडे काही शतकांमध्ये आलेला आहे. तेव्हा जत्रा उरूस म्हणजे तमाशाचा ‘फड’ ही कल्पना त्याच खेड्यातील व शहरातील लोकांनी केलेली आहे पण देवदेतांचे पूजन, अर्चन व महाप्रसाद या शिवाय वरील अन्य सोहळा पूर्वी असे. आज अशा देवतांकडे दुर्लक्ष झाल्याने जरी भौतिक सुख म्हणून कोणी विमान दिले तरी अंतर्यामीचे सुख, समाधान हे भौतिक जीवनातून मिळत नसते, हे अभ्यासण्यासारखे आहे.

या समितीला अशा कार्यपध्दतीचा अभ्यास करण्यास जो काही लाभ झाला तो आपणासमोर ठेवीत आहोत. ज्या काही खेड्यांमध्ये समितीच्या कार्यप्रमुखांना जाण्याचा योग आला, तेव्हा तेथील परिस्थिती अशा प्रकारे दृष्टोत्पत्तीस आली की, शेतीवाडी भरपूर आहे, पीक-पाणी नाही, भावाभावांची भांडणे इतकी विकोपाला गेली आहेत की, एकमेकांचा खून करण्यापर्यंत एकमेकांना धाक दाखविला जात आहे. नैसर्गिक हवा, प्राणी, शरीर प्रकृतीला हितावह असूनसुध्दा निरनिराळे रोग भरपूर आहेत. वाड-वडिलांच्या वेळेला दोन दोन पाण्याच्या मोटी चालल्या तेथे एक मोट चालणे अशक्य झाले आहे. सुगीनंतर पै-पैसा येत आहे, परंतु हाताला लागत नाही. मुली उपवर झाल्या आहेत पण लग्ने होत नाहीत. याला कारणे काय ? वडिलोपार्जित जे काही होते ते काही कोणी नेले नाही. निसर्गाने आपल्यात यांना दु:ख देण्यासाठी काहीही बदल केला नाही. मग बदल कशात झाला ? बदल झाला तो तेथील लोकांच्या विचारात व भावनेत ! वरील दु:ख निवारण परंपरेची मीमांसा हा ग्रामस्थ ग्रामदेवता यांच्याशी संबंधीत आहे, हे त्यांना पटवून त्यासाठी समितीच्या कार्यपध्दतीतील निराकरण सांगितले. यात प्रामुख्याने ‘बळी’ न देण्याबद्दल सांगितले. ‘बळी’ देण्याची पध्दत ही सुध्दा दैवी स्वरूपाची आहे,असे वाटत नाही. कारण ज्या ज्या लोकांना त्यांच्या त्यांच्या देवतांना ‘बळी देऊ नका, आतापर्यंत दिलात, तो अज्ञानाने दिला आहात’ असे सांगितले, त्यांना ते न देण्यापासून जास्त सुखच झाले आहे. (या ‘बळी’ देण्याच्या पध्दतीचे विवेचन सविस्तरपणे ’निराकरण-पत्रिके’त केले आहे.) या निराकरणानंतर, त्या खेड्यातील परिस्थितीत खूपच बदल झाला हे तेथील रहिवाशांनी कबूल केले आहे. एक वेळ शहरातील मनुष्य ईश्वरकृपेने मिळालेले फल हे ‘नशिबाने मिळत आहे’ असे सांगतो. परंतु खेड्यातील मनुष्य प्रामाणिकपणे ‘ईश्वरी कृपेचे फल’ म्हणून स्वीकार करतो ! हा अभ्यास सूज्ञ भक्तांच्या दृष्टीने विशेष विचार करण्यासारखा आहे.

आज आपल्या देशात अशी अनेक खेडी आहेत की, ज्यात भौतिक सुधारणेने सुखी करण्याच्या प्रयत्न केले जात आहेत. हे जरी असले तरी हे कार्य भौतिक सुधारकांचे नाही हे अनुभवाने सिध्द होऊ शकते. आज गेल्या काही वर्षात ज्या भौतिक सुधारणा उदा. धरण बांधणे, ताली घालणे, नाले खोदणे इ.अशा झाल्या, तेव्हा ज्यांच्या हातात अधिकार व सुधारणेसंबंधीचे ज्ञान (उदा. इंजिनियर इ.) होते, त्यांनी अशा सुधारणा करीत असता या ग्रामस्थ ग्रामदेवता यांचा विचार न करता त्यांना आपल्या स्थानापासून हलवून बाजूस फेकून दिले. पण जेव्हा अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबात आजारपण, वेड लागणे इ. त्रास सुरू झाला तेव्हा अनुभवास हे आले की, या लोकांनी अशा देवतांना त्यांच्या स्थानापासून हालविले आहे. काहींनी ते मान्य करून ज्या ठिकाणी ही कामे केली गेली होती, तेथे त्याच देवतांच्या प्रित्यर्थ स्थापना केली व काहींनी ते अशक्य असल्याने घरीच समितीच्या अनुष्ठान पध्दतीने आपल्या दु:खाचे निराकरण करून घेतले. आज अशा कार्याची जबाबदारी घेण्यास समिती पूर्णपणे सिध्द आहे. परंतु प्रचाराची भूमिका समितीस मान्य नसल्याने जो भक्त-भाविक एकमेकांच्या ओळखीने येईल, त्याचे इच्छित कार्य समिती केव्हाही आनंदाने करील. या सर्व कार्यपध्दतीस अनुकूल लोकमताची आवश्यकता असते. परंतु स्वतःच्या ऐहिक स्वार्थाची प्राप्ती झाली किंवा ती न होण्यास स्वतःच कारण असणारी भक्तभाविक अन्य प्रचाराची भूमिका अप्रमाणिकपणे करतात. त्यामुळे स्वतःच्या नुकसानीस कारण होऊन दुसऱ्याचे हित होणार असेल तर तेही त्याला मिळू देत नाहीत. अशा समाजातील आचार-विचारांचे जेव्हा निर्मूलन होईल व स्वतःच्या जीवनातील आचार-विचार हे काहीतरी परोपकार करण्यास कारण होतील, तेव्हाच समाजोन्नती, वैयक्तिक उन्नती किंवा पारमार्थिक उन्नती होईल हे म्हणणे सत्य होईल.