अध्याय १२ सेवक व भक्त-भाविक नियमावली

तुमच्या नित्य जीवनात अशांतता निर्माण झाली व बिकट आर्थिक परिस्थितीला किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीला कंटाळून जाऊन जीवनात सुख, समाधान निर्माण करण्यास परमपूज्य बाबांच्या शोधात तुम्ही आलात. वास्तविक अशा वेळी तुम्ही बाबांचा शोध घेण्यासाठी येत नाही, तर ‘मी कोणत्या प्रकाराने सुखी होईन’ हे पाहण्याचा प्रयत्न करण्यासाठी येता. जोपर्यंत बाबांच्या कृपाप्रसादाने जीवनात सुख, शांती लाभलेली नसते, तोपर्यंत तुम्ही येथील प्रत्येक आचार-विचारांच्या नियमबध्दतेशी सहमत असता. परंतु एकदा तो कृपाशिर्वाद लाभला व आराम वाटू लागला, की ‘येथील कार्यपध्दतीत काही चुका आहेत, काही सुधारणा व्हायला पाहिजे’ असे तुम्हाला वाटू लागते. पण एवढ्यावरच तुम्ही न थांबता आपले आचार-विचार इतर भक्तभाविकांत फैलाविण्याचा प्रयत्न सुरु करता. अशा वेळी जर एखाद्या कार्यपध्दतीसमोर येणाऱ्या जाणाऱ्या भक्त-भाविकांसाठी कार्याच्या हिताच्या दृष्टीने नियमावली नसेल, तर कार्यपध्दत ही प्रत्येकाच्या इच्छावासनेचे बाहुले बनते. यासाठी ही नियमावली तुमच्या समोर अध्ययनार्थ ठेवली आहे. तिचा अभ्यास प्रत्येकाने जर प्रामाणिकपणे केला, तर समितीच्या कार्यपध्दतीचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होण्यास कारण तुम्ही व्हाल.

ज्या कोणा भक्तभाविकांस या ठिकाणी येऊन काही वर्षे झाली आहेत व ज्यांना जीवनात सुख, समाधान मिळाल्यामुळे आपल्याही हातून काही तरी सेवा व्हावी, अशी इच्छा असेल त्यांनी हा आपला हेतू वैयक्तिक जीवनापुरता मर्यादित न ठेवता जे संकटानी रंजले गांजले आहेत अशांना दु:ख निवारणार्थ परमपूज्य बाबांच्या कृपाछायेखाली सेवा करण्यास स्वयंस्फुर्तीने पुढे येणे हेच कालांतराने समाजाच्या सुखशांतीचे कर्तव्य ठरणार आहे. कारण तुम्ही ज्यांना सद्गुरुस्थानी मानले आहे, त्या सत्पुरुषानेसुध्दा आपले सारे जीवन लोक-कल्याणासाठीच व्यतीत केले. तेव्हा हा या जनसेवेच्या परंपरेचा वाटा नि:स्वार्थपणे व कर्तव्य बुध्दीने उचलण्यास तयार होण्याची जबाबदारी तुमची आहे. या सेवेचा वाटा तुम्ही प्रामाणिकपणे उचललात की, खऱ्या अर्थाची ईश्वरसेवा तुम्ही करू लागलात हे सिध्द होईल. यासाठी तुम्हास ‘सेवक’ बनणे आवश्यक आहे. जर तुम्हास महाराज, स्वामी, सद्गुरु, परमहंस इत्यादी बनावयाचे असेल तर त्यासाठी ही कार्यपध्दती नाही. आता तुम्ही् सेवक या अवस्थेची पायरी चढण्यास आरंभ करणार आहात. अशा वेळी स्वतःचा तोल संभाळणे आवश्यक आहे. कारण अशावेळी गादीवर येणाऱ्या भक्तभाविकांचे परिचय वाढून तुमच्या ठिकाणी स्वार्थबुध्दि, अहंभाव इ. मनोविकार बळावू लागतात व आलेल्या दु:खी लोकांना ‘माझ्यामुळे सुख समाधान प्राप्त होत आहे’ या फाजील विश्वासाने तुम्ही उपस्थित भक्तभाविकांशी वागू लागता. त्यामुळे समोर चढण्यास सोपी आणि सुलभ अशी सद्गुरुकृपेची वाट दिसत असली, तरी अहंकाराच्या मदांधतेमुळे तुम्ही ती चढू शकणार नाही. ती चढण्यासाठी तुम्ही जो यशस्वी पाया निर्माण करणार आहात तो ढोंगी व स्वार्थी असा असता कामा नये व इतरांनाही तो तसा आहे हे वाटता कामा नये.

लोककल्याणार्थ ज्या कार्याची स्थापना ईश्वरी आज्ञेने केली गेली आहे, तिला तुमच्या आचार-विचारांमुळे यत्किंचितही कलंक लागून त्याची बदनामी होईल असा कोणताच अनुचित प्रकार घडता कामा नये, म्हणून अत्यंत सावधानतेने, आत्मविश्वासाने, जिव्हाळ्याने, प्रेमाने ‘सेवक’ या अवस्थेची पायरी आत्मसात करावयाची आहे. त्यासाठी ज्याला खरोखर प्रामाणिकपणे आपली जबाबदारी ओळखून ती जगताच्या हिताच्या दृष्टीने पार पाडावयाची आहे त्यानेच आपले जीवन या कार्यपध्दतीत व्यतीत करणे योग्य होईल. नुसते येथील उपस्थितीत ‘जुना भक्त आहे, म्हणून कार्यपध्दतीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार मला आहे’ ही बेजबाबदारपणाची भूमिका कदापिही निर्माण करू नका. जर तुम्हांस तुमचे आचार विचार समितीच्या कार्यपध्दतीस पोषक अशा स्वरुपामध्ये बदलता येत नसतील, तर तटस्थपणे ते सुधारण्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावयास पाहिजे. या सर्व शिस्तपध्दतीचे आचरण कशा प्रकारचे असावे यासाठी खालील नियमावली समितीने भक्तभाविक व सेवक यांच्यासाठी आत्मसात केली आहे. ज्याला या नियमबध्दतेची जबाबदारी पेलणार नसेल, त्याने प्रामाणिकपणे आपली भूमिका व्यक्त करावी. परंतु दुसऱ्याचे अहित होईल असा विचार किंवा आचार प्रकट करू नये.

नियमावली
१. ही कार्यपध्दत सद्गुरु आज्ञेच्या प्रेरणेने चालली आहे. ती कोणाच्याही इच्छा वासनेसाठी किंवा सोईसाठी बदलली जाणार नाही. ती सद्गुरु आज्ञा असल्याने तिचे पालन करणे तुमचे कर्तव्य आहे. कार्याच्या दृष्टीने त्याची यथायोग्यपणे अंमलबजावणी होत असता ती करणारा सेवक हा नवा, जुना असा भेदभाव कोणीही प्रकट करू नये आणि अशा गुरु-आज्ञेशी तुम्हाला एकनिष्ठ रहावयाचे आहे, ही दृढनिष्ठा असली पाहिजे.

२ . प्रत्यक्ष कार्य आणि तुम्ही सेवक यात महदंतर आहे. याची जाणीव पूर्णपणे सेवकास असावयास पाहिजे. कोणतेही काम करताना येणाऱ्या व्यक्तीचे दु:ख संयमाने व सहनशीलतेने ती व्यक्ती जे जे काही सांगेल ते ऐकून घ्या, मात्र तुम्ही त्याच्याशी बोलताना उगाच पाल्हाळ न लावता किंवा इतरेजनांचे अनुभव पुढे न करता त्यांना सुख-समाधान देण्यासाठी त्यांच्या प्रश्नाला अनुसरून, त्यांना सहज समजेल अशा सोप्या व सरळ भाषेत उत्तर द्या. समितीच्या मार्गदर्शनार्थ आलेला कोणीही भक्त-भाविक यास तुच्छ लेखून उध्दटपणे वागू नका. तुमचे बोलणे हे गोड, स्नेहभावनेने मन जिंकणारे असे असू द्या. त्यांच्या दु:खात जास्तीत जास्त समरस होण्याच्या कर्तव्यास कदापिही विसरू नका.

३. तुम्ही जेव्हा समितीच्या कार्यपध्दतीचे कार्य हाती घेवून आलेल्यास दु:ख निवारणार्थ मार्गदर्शन करता, ते तुम्ही करत नसून तुमच्याकडून करविले जात आहे, हे विसरू नका. तेव्हा असे काम हाती घेतल्यावर अत्यंत शुध्द आणि पवित्र मनाने करा. हा गरीब, हा श्रीमंत, हा हिंदू, तो क्षुद्र असा भेदभाव निर्माण न करता किंवा हा जवळचा, हा ओळखीचा अशी भावना निर्माण करून कोणतेही काम केले जाऊ नये.

४. तुम्ही या ठिकाणी दु:ख निवारणार्थ मार्गदर्शन व्हावे म्हणून येता. आल्यावर सहज परस्परांविषयी बंधुभाव निर्माण करता, पण ही भावना सात्विकतेचे प्रतीक असतेच असे नाही. कारण ज्या अडीअडचणीच्या निवारणार्थ तुम्ही येथे आलात त्यासाठी गुरुप्रसादाने दु:ख निवारण करून न घेता गादीला, कार्याला, सेवकाला मध्यस्थ करून अगर मानून पैशासंबंधी देवाण-घेवाण, उधार-उसनवारी अगर अन्य व्यवसायासंबंधी व्यवहार करण्याचा प्रयत्न करता. केलेल्या व्यवहाराची जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचे कर्तव्य तुम्ही न करण्याने कार्यास अपवाद निर्माण होतो. अशासाठी कोणाही भक्तभाविकाने किंवा सेवकाने आपल्या परस्परांतील बंधुभाव व लोभ यांचा फायदा घेऊन पै-पैशाचा व्यवहार करू नये. तसे केल्यास पुनःश्च त्यांनी समितीच्या मार्गदर्शनार्थ येऊ नये.

५. समितीच्या कार्यपध्दतीत जी सामुदायिक उपासना म्हणजे आरती आहे तिला बसतेवेळी आपणापासून बाजूच्या कोणासही उपद्रव होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपण एकटेच परमपूज्य ‘बाबांचे गुणगान गाण्यात व आरतीत खूप तन्मय झालो आहोत’ असे भावनावश होऊन हातवारे करणे, सारखा नमस्कार करणे, वेडेवाकडे डोलणे किंवा ‘बाबांच्या पायाशी मिठी मारण्यासाठी आपल्याला बोलावले आहे’ असा आभास निर्माण करू नये. त्याचप्रमाणे आरती चालू असता ‘आपल्यात काही दैवी संचार आहे’, असाही भाव निर्माण करून तन्मयतेच्या भावनेचे विडंबन कोणीही करू नये. तशा प्रकारचे दैवी संचार कोणाही भक्तभाविकात किंवा सेवकात असल्यास त्याची या कार्यापध्दतीस आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे आरती संपल्यावर ‘मला समाधी लागत आहे’ असे वाटून कोणीही बसू नये, तसे बसल्यास शेजारच्या सेवकाने त्यास सावध करून उगाच जागा न अडविण्याबद्दल सूचना करावी.

६. जे कोणी सेवक आलेल्या भक्तभाविकांना मार्गदर्शन करतात किंवा निराकरण सूचवितात त्यांनी ‘त्यापासून त्रास झाला आहे’ किंवा ‘त्याची बाधा आपल्यावर आली आहे’ असे समजून स्वैर हावभाव प्रकट करून कार्यपध्दतीच्या कामकाजात निष्कारण अडथळा निर्माण करू नये. तशा प्रकारच्या बाधा किंवा त्रास परमपूज्य बाबांच्या कृपेने होत नाही व झाल्यास त्या सेवकाने किंवा भक्त-भाविकाने त्याचे प्रदर्शन इतरांसमोर न करता तो त्रास कमी होण्यासाठी सद्गुरू नामस्मरण करीत बाजूला बसावे.

७. समिती जे मार्गदर्शन करते, त्यावेळी जो प्रसाद, विभूती किंवा आशिर्वाद दिला जातो त्याचा उपयोग दुसऱ्याला द्वेष भावनेने पाहण्यासाठी किंवा सूडबुध्दीने दुसऱ्याचे वाईट होण्यासाठी दुष्ट इच्छेने कोणीही करू नये. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या तरी परमेश्वराचा भक्त आहे ही गोष्ट कदापीही विसरु नये. तेव्हा तुम्ही घेतलेला प्रसाद, विभूती, आशिर्वाद याचा उपयोग स्वतःचे कल्याण होण्यासाठी करावा.

८. या कार्यार्थ ज्या भक्तभाविकांनी आपली भूमिका सेवक म्हणून ठरविली आहे त्यांनी आपापसात कोणताही भेदभाव निर्माण करू नये. ‘अमूक सेवकाने जे सांगितले ते चूक’ व ‘मी सांगतो तेच खरे’ किंवा ‘मी खूप जुना म्हणजे अनुभवी’ व ‘तो नवा’, असा अहंभाव म्हणजे कार्य नव्हे. कारण अशा परिस्थितीत नवीन येणारा भक्त-भाविक गोंधळून जाऊन खऱ्या मार्गाचा अवलंब करू शकणार नाही. यासाठी सेवकांनी समितीच्या कार्यपध्दतीचे अध्ययन करून कार्याच्या दृष्टीने एकसूत्रीपणा निर्माण करावा.

९. तुमची येथील उपस्थिती ही आचार विचाराने कमालीची शिस्तबध्द व आत्मियतेच्या भावनेने असावयास पाहिजे. बाह्य जगतातील तुमचे आचार विचार हे तुमच्या दृष्टीने यथायोग्य असले तरी ते येथील पवित्र व मंगल अशा वातावरणास योग्य असतीलच असे नाही. तेव्हा तुम्ही आचार-विचारांनी येथील कार्यपध्दतीस सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. या ठिकाणी येण्यापूर्वी तुमच्या विचारास जर घातक सवयी लागलेल्या असतील तर संस्कारानी त्या तुम्ही बदलून घेण्यानेच तुमचे हित होणार आहे. यासाठी येथे आल्यावर शांतता, नम्रता, विनय, स्नेहभाव, मधुरवाणी, आपलेपणा व कार्याची तत्परता या अंगानी तुम्ही युक्त व्हावयास पाहिजे. तरच तुम्ही उपासक किंवा ‘सेवक’ आहात. नाहीतर, तुमच्या आचार विचारांचा पगडा इतरांच्या मनावर अयोग्य तो परिणाम केल्याशिवाय राहणार नाही व अशाने कार्यास स्थैर्य व प्रगती लाभणार नाही. तेव्हा उपस्थित सेवकांनी आपल्या वैयक्तिक आचार-विचारांची ओळख बारकाईने सद्गुरुसान्निध्यात बसून करून घ्यावी. ते शक्य नसल्यास नुसती उपस्थिती संख्या वाढविण्यास कारण होऊ नये.

१०. तुम्हाला जीवनात स्वतःच्या उन्नतीसाठी फारच थोडा वेळ मिळतो. तो बहुमोल वेळ येथे आल्यावर आरती, पाठ, पारायणे, जपजाप्य व चिंतन यात खर्च करणे हे केव्हाही कार्याच्या प्रचारापेक्षा जास्त हितावह होणार आहे. कारण तुम्हाला मिळणारा वेळ तुम्ही स्नेही, सहाध्यायी, गुरूबंधु यांच्याशी निष्कारण गप्पा मारण्यात व कार्यपध्दतीसंबंधीचे अनुभव किंवा प्रचिती सांगण्यात खर्च करता. तीच सवय बाह्य जगतातही एकमेकांना भेटल्यावर चालू ठेवता. अशाने तुम्ही कार्याचे एकनिष्ठ सेवक आहात हे सिध्द होत नाही. तुमच्या एकनिष्ठतेचे लक्षण हे असावयास पाहिजे की, ‘मला स्वतःची उन्नती करून घेऊन इतरांच्या सुखासमाधानासाठी काहीतरी ध्येयवाद निश्चित करावयाचा आहे !’ यासाठी मिळणारा प्रत्येक क्षण मोलाचा आहे. ही जाणीव ठेवून जी जबाबदारी तुम्ही स्वीकाराल, ती पार पाडण्यासाठी पराकाष्टा म्हणजेच तुमची एकनिष्ठता ! याचा विचार प्रत्येक भक्तभाविकाने व सेवकाने करावा.

११. या कार्यपध्तीचा पाया परिपूर्ण तऱ्हेने नि:स्वार्थ सेवा करण्याचा आहे. तेव्हा, कोणीही सेवकाने कोणत्याही कारणाप्रीत्यर्थ कोणाही भक्तभाविकाजवळ पै-पैसा मागू नये व त्याप्रमाणे सेवेचे धोरण ठरवू नये. येणाऱ्या भक्तभाविकाने कार्याची भूमिका पूर्णपणे समजावून घेऊन ज्ञानाने आपल्या सद्सद्विवेक बुध्दिला स्मरून जी गुरुदक्षिणा म्हणून ठेवावयाची असेल, ती परपपूज्य बाबांच्या चरणी ठेवावी.

१२. ज्या कोणा सेवकास वैयक्तिक उपासना अगर साधनामार्गाचा अवलंब करावयाचा असेल किंवा तीर्थक्षेत्राच्या किंवा यात्रेच्या स्थळी जाऊन सेवा करावयाची असेल, त्यास समितीतर्फे आज्ञा दिली जाणार नाही. कारण समितीतर्फे करण्यात येणारे मार्गदर्शन यात ‘वैयक्तिक कर्तव्याची जबाबदारी प्रथमतः स्वीकारावी व सहजगत्या नित्य सेवेची सवय लावून घ्यावी’ अशी शिकवण दिली जाते. वर्षातून एकदा अशी सेवा करण्याने ईश्वरीकृपा कदापीही लाभणार नाही. तेव्हा नित्य उपासना व साधना करून तुम्ही आपली प्रगती निश्चित करू शकाल. यासाठी कार्यपध्दतीत नमूद केलेल्या उपासनेत भाग घ्यावा.

१३. ‘सद्गुरुप्रसाद’ म्हणून देताना सेवकांनी ‘उदी’ हाच प्रसाद द्यावा. याशिवाय कोणी नारळ, पेढे किंवा खडीसाखर आणल्यास ती नैवेद्य दाखवून द्यावी. याशिवाय निरनिराळ्या देवदेवतांच्या तसबिरी, प्रतिमा, स्तोत्रांची पुस्तके, पोथ्या, अंगठ्या किंवा गळ्यातील ताईत (लॉकेट) देऊ नये. कारण क्षणोक्षणी आपल्याला व्यवसायाच्या निमित्ताने इकडे तिकडे जावयाचे असते. अशावेळी योग्य ते पावित्र्य ठेवता येत नाही.

१४. तुमच्या येथील उपस्थितीत तुम्ही स्वतःस गुरुबंधु यापेक्षा जास्त स्वतःची ओळख येथे आल्यावर ठेवता कामा नये. कारण या कार्याची भूमिका सहकार्याने काम करण्याची वृत्ती निर्माण करावयाची अशी आहे. यासाठी एकमेकाने एकमेकांस सांगितलेली कामे किंवा केलेली विनंती ही ‘गुरु आज्ञा आहे’ इतक्या पूज्यतेने मानली पाहिजे. तिची अवज्ञा अगर अव्हेर करून ‘तू मला कोण सांगणार ?‘ ‘तुला काय अधिकार ?’ हे अपशब्द अशा कार्याच्या भूमिकेत कदापीही बसत नाहीत. यासाठी प्रत्येकाने आपापसात सहकार्य व सक्रिय सहानुभूती निर्माण करणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. दैनंदिन उपासनेत ही एक प्रकारची उपासनाच आहे. कारण पारमार्थिक उन्नतीची जी अनेक लक्षणे आहेत, त्यात सहनशीलता हे एक प्रमुख लक्षण आहे.

१५. या कार्याच्या स्थापनेचा हेतू वादविवाद, खंडनमंडन, तुलना, चर्चा असा नसून तात्विक मीमांसेतून जीवनाचे प्रत्यक्ष दाखले देत देत आवश्यक त्या आचार विचारांचे बीज सामान्य मनुष्याच्या जीवनात रुजवून त्याचे आचार विचार मानवता धर्माची सेवा करण्यासाठी तयार करावयाचे असा आहे. याशिवाय धर्माचरण, ईश्वरभक्ती या संस्काराच्या जीवनाने जीवनात सुख, शांती, समाधान निर्माण करण्यासाठी या समितीची कार्यपध्दत स्वयंविचार, स्वयंतत्त्व व स्वयंनिराकरण यावर अधिष्ठित तत्वांनी चाललेली आहेत. तेव्हा कोणाही भक्तभाविकाने अथवा सेवकाने कोणत्याही प्रकारचे वादविवाद चर्चा किंवा तत्वज्ञान विषयक विचार एकमेकांसमोर मांडून एकमेकातील अभ्यासू वृत्तीचा कमी जास्तपणा दाखवू नये. तुमची अभ्यासू वृत्ती ही ज्या ज्या ज्ञानाने परिपूर्ण झालेली असेल, त्याचे मूल्यमापन तुमच्या आचार-विचारावरून होत असते. या कार्याचे तात्विक ध्येय सेवा करावयाची असे आहे. तेव्हा मानवतेची सेवा हाच खरा धर्म व तीच नित्य उपासना आहे, असे समिती मानते.

१६. येणाऱ्या भक्तभाविकाने कोणाही सेवकास ‘महाराज’, ‘गुरु’, ‘स्वामी’ वगैरे नावाने संबोधू नये, तसेच तिलक लावून, हार फुले घालून, पंचारती ओवाळून पूजा करू नये. कोणाही सेवकास तशी पूजा घेण्याचा अधिकार पोहोचत नाही. फार तर सेवकांना विनम्रपणे नमस्कार, तो ही हात जोडून करावा. ज्यांना हार फूले समर्पण करावयाची असतील ती त्यांनी सद्गुरु चरणी अर्पण करावी. या कार्यध्दतीत व्यक्तिपूजनास महत्व नसून कार्याची पूज्यता मानण्यास महत्व आहे. हे कार्य म्हणजे येणारा प्रत्येक भक्तभाविक व सेवक होय. तेव्हा कार्याकडे दुर्लक्ष करून वैयक्तिक पूजनाचे महत्व वाढवू नये.

१७. एखाद्या भक्तभाविकास किंवा सेवकास एखाद्याच्या चुका किंवा दोष निदर्शनास आणावयाचे असतील तर ते एकमेकांत न फैलावता किंवा सूडबुध्दिने चारचौघांसमोर व्यक्त करून वाद निर्माण करण्यास कारण होऊ नये. जर खरोखरीच अशा चुका किंवा दोष या कार्य पध्दतीस पोषक नसतील, तर त्याबद्दल योग्य तो विचार जरूर केला जाईल. पण व्यक्तिगत काही विचार कारण नसताना मांडावयाचे असतील किंवा सुव्यवस्थितपणे चाललेल्या कार्यपध्दतीत दोष दाखवायचा असेल तर त्या व्यक्तिने आपली उपस्थिती येथे न ठेवणे हे उत्तम ! याशिवाय अश्या तऱ्हेच्या चुका किंवा दोष निर्दशनास आणुन देण्यासाठी समितीने आपल्या कार्य पध्दतीत “सूचना-पत्रिका” म्हणुन ठेवलेली आहे. ती तुम्ही तुम्हाला न मिळालेल्या सहकार्याबद्दलच्या चुका किंवा दोष लिहुन ठेवण्याचे कर्तव्य कदापिही विसरु नका. कारण या ठिकाणी जसे आपण दु:ख निवारणार्थ येता तद्वतच् आपल्यातील दोष जावा व ती चुक सुधारण्याचा पवित्र हेतू निर्माण करावा हे कोणीही दुर्लक्षू नये. प्रत्येक केंद्रावर अशी ‘सूचना-पत्रिका’ ठेवलेली आहे, ती उपस्थित सेवकाकडून जरुर लागल्यास मागुन घ्यावी.

१८. प्रत्येक कार्यकेंद्र हे एखादे मंदिर, मठ, धर्मशाळा अगर अन्नछत्र अशा सारखे सार्वजनिक स्थान नाही. हे स्थान एका कुटुंबवत्सल मनुष्याच्या कुटुंबात त्याच्या परवानगीने व त्याच्या सदिच्छेनुसार अधिष्ठित केलेले आहे. तेव्हा त्या कुटुंबाच्या नित्य व्यवहारात कोणत्याही तऱ्हेचा त्रास अगर अडचण न होईल अशा तऱ्हेने सेवकाने आपल्या सेवेची भूमिका ठेवावी. सेवेच्या वेळेव्यतिरीक्त या ठिकाणी येऊन बैठकीच्या अड्ड्याचे स्वरूप किंवा विश्रांती स्थान बनवू नये. त्याचप्रमाणे कोणीही सेवकाने कोणत्याही कार्यकेंद्रावर गेल्यावर कामाव्यतिरिक्त पाहुणचार घेत राहू नये.

१९. ज्या सेवकांना या कार्यात सद्गुरु आज्ञेने कार्याची सेवा करण्याची आज्ञा दिलेली आहे व पुढेही अन्य कोणास दिली जाईल त्याने ‘सेवा कर’ या आज्ञेचा अर्थ ‘आपले विहित कर्म किंवा कर्तव्य बाजूला सारून किंवा नोकरी अगर व्यवसाय सोडून आपले जीवन संपूर्णपणे या कार्यासाठी वाहून घ्यावे व सद्गुरुचरणी जमणाऱ्या पै-पैशावर उदरनिर्वाह करावा’, असा घेवू नये. कारण या कार्यपध्दतीत मार्गदर्शनार्थ आलेल्या भक्तभाविकाकडून पै-पैसा घेतला जात नाही किंवा भक्तभाविक प्रामाणिकपणे तसा देतही नाही. याशिवाय सेवेचे मूल्य मासिक पगारासारखे असू शकत नाही. म्हणून प्रत्येक सेवकाने आपल्या कर्तव्याची जबाबदारी सांभाळून आयुष्यातील राहणारा वेळ अन्य तऱ्हेने खर्च न करता तो सत्कारणी लागावा हेच या कार्यपध्दतीचे वैशिष्ट्य होय.

२०. पूर्वीपासून ज्या देवदेवतांच्या तसबिरी आहेत, त्यामध्ये कोणत्याही कारणास्तव स्वेच्छेने आपल्या पसंतीनुसार अप्राप्य म्हणून देवादिकांच्या तसबिरींची संख्या अधिक वाढवू नये. त्याचप्रमाणे ज्या सेवकांना ज्या कार्यकेंद्रावर ज्या प्रकारची सेवा करण्याची आज्ञा झालेली असेल त्या केंद्राशिवाय अन्य केंद्रावर काम करण्यास आज्ञेशिवाय मनाई आहे. कारण सेवकास निरनिराळ्या कार्यकेंद्रावर काम करण्याचा मान अगर संधी प्राप्त झाली आहे असे वाटून त्याच्या ठिकाणी अहंभाव वाढेल व ‘आपण इतरांपेक्षा कोणी विशेष श्रेष्ठ आहोत’ असे वाटून तो सेवक आपल्या सहकाऱ्यांना तुच्छतेने पाहू लागेल. ही गोष्ट संघटीत कार्यपध्दतीस घातकच होय.

२१. आलेल्या भक्तभाविकांच्या दु:खनिवारणार्थ ज्या सिध्दसिध्दांत पध्दती ‘निराकरण’ म्हणून सांगितल्या जातात, त्या दु:ख मीमांसेच्या दृष्टीने पूर्ण अभ्यासिलेल्या आहे. तेव्हा या व्यतिरिक्त कोणत्याही ऐच्छिक स्वरुपाचे निराकरण कोणीही सेवकाने आलेल्या भक्तभाविकास सांगू नये व भक्तभाविकानेही समितीच्या कार्यपध्दतीशिवाय सांगितलेली निराकरणे मान्य करू नये.

२२. समितीच्या कार्यपध्दतीची ओळख म्हणून जे सूचनापत्र जाहीर झाले आहे, त्याचा अभ्यास प्रत्येक सेवक व भक्तभाविक याने करून आपली भूमिका त्या कार्यपध्दतीत बसविण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही नियमांचे ज्ञान-अज्ञानाने उल्लंघन होऊ नये, याची खबरदारी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे. तसेच होणाऱ्या चुका निदर्शनास आणून देण्याची वेळ आणू नये.

२३. पुणे केंद्र येथील गादीची प्रतिष्ठा ही आद्य होय. तेव्हा या गादीवर ज्या आवश्यक व योग्य अशा सुधारणा कराव्या लागतील त्या प्रत्येक कार्यकेंद्रावर झाल्याच पाहिजेत असा तेथील सेवकांनी अट्टाहास घरणे चुकीचे आहे. हेकेखोरपणाने या आद्य गुरुपीठाची हुबेहुब प्रतिकृती करण्यासाठी कोणीही सेवकाने वर्गणीच्या रुपाने, देणगीच्या रूपाने किंवा मार्गदर्शनाचा मोबदला म्हणून पै-पैसा जमा करून स्पर्धा करण्याचा विचार मनात आणू नये. आद्य गादीच्या परवानगीशिवाय कोणत्याही सुधारणा किंवा कार्यपध्दतीत बदल कोणीही सेवकाने आपल्या इच्छेने करू नये.

२४. या कार्यपध्दतीचे परिपूर्ण मार्गदर्शन हे प्रमुख मध्यस्थाकरवी ज्या दिव्य, पुण्य विभूती करीत आहेत, त्यातील उपदेश म्हणून जो काही भाग आहे, तो सामान्य माणसाच्या जीवनाला कशाप्रकारे पोषक आहे, याचा विचार सेवकांनी करावा. त्यास शास्त्राधार शोधीत बसण्याने कदापीही तुम्ही आपली उन्नती करून घेऊ शकणार नाही. ते मार्गदर्शन ज्या ओजस्वी व रसाळ अशा मधुरवाणीने तुम्हाला ऐकायला मिळते, तो अमृतवर्षाव चाखण्यानेच जीवनात अवीट गोडी निर्माण होणार आहे. त्या स्फुल्लिंग वाणीशी तुम्ही समरस होऊन तन्मय झालात की, तुमच्यातूनही त्याच ओजस्वी व मधुरतेने पाझरेल. याचा अर्थ ‘माझ्यात विभूतींचा संचार होणार आहे’ असा चुकूनही कोणी मनात आणू नये. कारण जेव्हा एखाद्या लोककल्याणाचे कार्य ईश्वरी आज्ञेने निर्माण होते, तेव्हा ती आज्ञा ही एका प्रमुख मध्यस्थाचे साध्य असते. व इतरांचे ते साधन असते. याशिवाय या कार्यात लोककल्याणार्थ जे मध्यस्थ तयार केले गेले आहेत व पुढे केले जातील, त्यांनी आपल्यामध्ये निर्माण केलेल्या मध्यस्थाच्या गुणधर्माचे महत्व हे दुसऱ्याशी तुलनात्मक दृष्टीने पडताळून पाहू नये. या दृष्टीने प्रत्येकाचे कार्यकारण हे महत्वाचे आहे. तेव्हा आपल्या ठिकाणी निर्माण केलेला गुण तो परिपूर्ण तऱ्हेने वाढविणे व जोपासणे हे कर्तव्य सेवकांनी कदापिही विसरता कामा नये. प्रकृतीधर्माप्रमाणे प्रत्येकात काही ना काही गुणांचा अभाव हा रहाणारच. तेव्हा त्या बाबतीत ‘आपण खूपच दुर्दैवी आहोत’ असे वारंवार वाटणे चुकीचे आहे.

२५. समितीच्या कार्यपध्दतीत लोककल्याणाच्या कामाप्रीत्यर्थ जे सेवक नियुक्त करण्यात आले आहेत, त्यांना काही अपरिहार्य कारणामुळे येथील कार्यकेंद्रावर अनुपस्थित रहाणे भागच असेल तर परस्पर आपल्या अधिकारात त्यांनी ती जबाबदारी दुसऱ्यावर न सोपविता तशी सूचना 24 तास अगोदर तेथील ‘सूचनापत्रिके’त करुन आपल्या सहाध्यायी सेवकबंधूस ते काम करण्याबद्दल विनंती करावी. व त्यानुसार आवश्यक ती व्यवस्था केली असल्याबद्दलची स्वाक्षरी संबधित दोघांही सेवकांनी त्यात करावी. यासंबधीची नोंद मासिक अहवालाद्वारे पुणे या आद्य केंद्रावर कळवावी.

२६. नियुक्त सेवकांनी त्यांच्यावर कार्याची जी जबाबदारी सुपूर्द करण्यात आलेली आहे, ती कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनात निश्चितता निर्माण व्हावी, उपासनेची सवय लागावी व त्याचबरोबर पावित्र्य आणि सिध्दतेच्या दृष्टीने पोषक असलेला आत्मविश्वास निर्माण व्हावा, म्हणून नित्य किमान एक तास तरी उपासनेत व्यतीत करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे भक्तभाविकांनी देखील आपल्यावर येणाऱ्या आपत्तीचे किंवा दु:खाचे निवारण होण्यास सहाय्य लाभावे म्हणून रोज एकतास श्रीसद्गुरु उपासना करणे जरूरीचे आहे.

२७. कोणाही सेवकास कोणी भक्तभाविकाने आपल्या अडीअडचणी समजाविण्यासाठी किंवा त्याची राहती जागा पहाण्यासाठी बोलाविल्यास त्याच्या इच्छेला मान देऊन तुम्ही जाऊ शकता. मात्र तेथील सर्व परिस्थिती समजावून घेतल्यानंतर तेथेच त्यांच्या घरी दु:ख निवारणार्थ निराकरण सांगत बसणे किंवा निराकरण करणे हे योग्य नाही. त्यांना नि:संकोचपणे समितीच्या कार्यपध्दतीबद्दल योग्य ती माहिती देऊन कार्यकेंद्रावर येण्याप्रीत्यर्थ नम्रतापूर्वक सूचना द्यावी. या कार्यपध्तीतीत ‘मी एक सेवक म्हणून व्यक्तिशः अशा प्रकारचे काम पहातो’ हे न दर्शविता या कार्यपध्दतीमागे ‘श्री साई अध्यत्मिक समिती’ ची संघटित व शिस्तबध्द विशाल योजना आहे व ही समिती म्हणजे ‘आपण सर्व आहोत’ हे तत्व प्रत्ययास आणून देणे प्रत्येक सेवकाचे आद्य कर्तव्य होय.