अध्याय १३ उपसंहार

आज समाजाची या मार्गाकडे पाहण्याची दृष्टी इतकी शंकेखोर झाली आहे, याला कारण आजपर्यंत या मार्गातील लोकांनी केलेली वैयक्तिक उपासना, खरोखर ‘उपासना ही देवाप्रीत्यर्थ आहे का ?’ असे विचारल्यास त्याचे उत्तर मिळू शकणार नाही. देवाची उपासना स्वतःप्रीत्यर्थच असते हे इतके रूढ झाले आहे की, देवासमोर बसून शिव्या जरी दिल्या तरी ती उपासनाच ! असे म्हणणारा वर्ग समाजात होता व आहे. वास्तविक अशा प्रकारची उपासना ही उपासना नसून ती उपासमार आहे ! त्यामुळे देव असून-नसून सारखाच. यासाठी देवाची उपासना याचा अर्थ नित्य आचारांची निश्चितता व आपल्या इंद्रियवासनेची उपासना, याचा अर्थ मनोनिग्रह करण्यानेच उपासना होणार आहे व आजच्या क्षणाला समाजातील आस्तिक किंवा नास्तिक या दोघांनाही समाजकल्याणार्थ ती आवश्यक आहे.

आपण भक्तमंडळी अनेक प्रश्न विचारण्यासाठी येता. त्यांचे निराकरण सांगून समिती संस्काराचे जीवन निर्माण करू मागते आहे. ते आपल्या जीवनात निरंतर निर्माण व्हावे या सदिच्छेने येथील ‘निराकरण’ पध्दतीचा अभ्यास करा. पुष्कळ आलेल्या भक्तांना प्रचीति अशी आली आहे की, अडचणी निवारणार्थ सांगितलेले निराकरण म्हणजे विचारलेल्या प्रश्नांपेक्षाही मोठे संकट आहे असे त्यांना वाटते. ही भक्तमंडळी अज्ञानाने जातात याचे दु:ख वाटते. वास्तविक अडचणीप्रीत्यर्थ विचारलेल्या प्रश्नांची मीमांसा ही दोन प्रकारांनी जाणवते.

१. जन्मजन्मातरांतील राहिलेला ऋण भाग

2. या जन्मात त्यात काय अर्थ आहे, असे म्हणून दुर्लक्ष केलेला भाग.

पण आजपावेतो असा एकही भक्त किंवा भाविक येथे आला नाही की, ज्याला तळमळ आहे की हे जीवन पूर्णत्वाने गुरुकृपेचे बनवावे, जीवनातील इच्छा पूर्णत्वास येण्या व फलदायी होण्यास कालावधी लागतोच आणि त्या कालपावेतो आपली भावना म्हणजे विचार निश्चित होण्यासाठी व पुढेही तसेच रहाण्यासाठी दैवी संस्कार होणे आवश्यक आहे.

जगातील कोणताही धर्म, कोणतेही शास्त्र भावनेशिवाय निर्माण झालेले नाही. निरंतर भावनेची स्थिरता हीच श्रध्दा होय. श्रध्दा ही ईश्वर प्रणितच असते, हा बुध्दिवाद चुकीचा आहे. जीवनातील प्रत्येक क्षणाला श्रध्देची आवश्यकता आहे. येथे येणारी बरीच भक्तमंडळी श्रध्देचा पाठपुरावा केल्याचा भास निर्माण करतात. परंतु ही श्रध्दा संस्काराशिवाय वाढणारी नाही. त्यामुळे कितीही श्रध्दावान असल्याचा भास निर्माण केला तरी ते समजल्याशिवाय रहाणार नाही. कारण श्रध्दा वाढली म्हणजे भावना जोपासू लागते आणि मग हळूहळू ऐहिक जीवनाबद्दल आसक्तीचे विचार कमी होऊन सद्गुरुशिवाय किंवा धर्माचरणाशिवाय जीवन व्यर्थ आहे ही भावना जागृत होते. या नि:स्वार्थ भावनेपोटी जे कार्य किंवा कारण निर्माण करण्याची बुध्दि होईल तोच ‘ परोपकार’ किंवा ‘मानवता धर्म’ होय. पण इतका सूज्ञ विचार होईपर्यंत आम्ही येथे राहू तेव्हा ! एक प्रसाद पूजला, तोही वेडावाकडा की आम्ही देवाचे गणित सोडविण्याचा प्रयत्न सुरू करतो. म्हणजे येथे आलेल्या नव्या जुन्या लोकांना त्यांना आलेले अनुभव विचारतो. तोही विचारावा. पण ज्याला स्वतःच्या जीवनाचे गणित सुटले असेल त्याला ! प्रत्येकाला अनुभव येणार तो आपल्या विचाराप्रमाणे. कारण पूर्ण भावनेने परमेश्वराजवळ गेल्याशिवाय त्याचा अनुभव येत नाही. आपण ऐहिक सुख निर्माण करण्याची इच्छा करतो आहोत हे ज्ञान हाच त्या परमेश्वराचा अनुभव. बाह्य जगात अशाच न जोपासलेल्या किंवा संस्कार न झालेल्या भावनेला घेऊन फिरलात. पण त्या ठिकाणी संस्काराचा पाया निर्माण करणे म्हणजे दैवी निराकरण. हा ध्येयवाद तेथे नव्हता. त्यामुळे येथे आल्यावर आपण जे विचार प्रकट करता की, ‘मला अमुक इतके मिळू दे, मी इतके बाबांना देईन’ याचे कौतुक वाटते. अहो, अमुक आणि तमुकासाठी बाबांनी आपले जीवन निर्माण केले नव्हते मग तुम्हाला अशा प्रकारचा अनुभव पाहिजे असल्यास आपण आपला वेळ व्यर्थ फुकट घालवू नका. त्यासाठी हे समितीचे कार्य नाही.

खरोखर, ऐहिक सुखाने जगण्याचा प्रयत्न करून आपण आज अनेक दु:खे निर्माण केली आहेत. वास्तविक तुम्ही जेव्हा जन्माला आलात, तेव्हा दु:खी म्हणून आलात का ? त्यावेळी तुमचे नाव ठेवल्यावर तुमच्या माता-पितरांनी साखर पेढे वाटले. ते अशा आशेने की, आता घराण्याचा उध्दार झाला. भावी काळात आता आपल्याला कशाचीही उणीव रहाणार नाही. विचार करा. प्रत्येकाच्या जीवनात हे दृष्य येत असते. त्यावेळी त्या माता-पितरांना तुम्ही म्हणजे सर्वस्व वाटता. इतकी श्रध्दा तुमच्या ठिकाणी ठेवून त्यांनी तुम्हाला लहानाचे मोठे केले. ज्ञानी केले, म्हणजे संस्कारच केले. गुरुने विद्या शिकविली व तुम्ही ज्ञानी झालात. तोही संस्कारच होता. अशा जीवनाने ज्ञानी झाल्यावर आपण या संस्कारास विसरलात व म्हणू लागलात “आई वडिलांनी काय केले ?” पण त्यांनी जो आपल्या कर्तव्याचा भाग पुरा केला, तो तुम्ही तुमच्या मुला-बाळासाठी करु शकता का ? कदाचित होईल किंवा होणार नाही म्हणून तुम्ही येथे येता. येथे ज्याच्यासाठी आलात ते मिळाल्याशिवाय राहणार नाही पण त्याचे मूल्य फार मोठे आहे हे आपल्याला न कळल्यामुळे आपल्याला जो अनुभव येतो किंवा दुसऱ्यांना अनुभव विचारता, तो अनुभव समितीचा नसतो. उदा. एखादा पदार्थ पाण्यावर तरंगला म्हणजे पाणी हलके आहे म्हणून चालणार नाही. तद्वतच आपल्या विचारांचे होत असते. आज समितीला तुम्हाला लाख रुपये देऊन स्वतःकडे काही हजार ठेवावयाचा स्वार्थ नाही. मानवी जीवनाचा पाया श्रध्दा व सबुरी या तत्वांवर निर्माण करायचा आहे. याचसाठी तुम्ही मार्गदर्शनाचा अनुभव घ्या. लोकांच्या विचाराचा नको. प्रत्येक निराकारण हे संस्कार घडविण्यासाठी मांडण्यास सांगितले जाते. ते यथायोग्यपणे मांडण्यानेच दु:ख दूर होणार आहे.

आज आमच्या समाजाचे जितके अधःपतन झाले आहे तितके जगात कोणत्याही धर्मात किंवा देशात झाले असेल असे वाटत नाही. आज आपल्या भारतात अनेक धर्म आणि धर्मसंस्था आपआपल्या परीने आपल्या धर्माचा प्रचार करीत आहेत. पण त्यामध्ये लोककल्याण किंवा जनसेवा करण्याचे कार्य एकटा ख्रिस्ती धर्म जितक्या सुख-समाधानाने करतो आहे, त्याचा अभ्यास म्हणून त्यांच्या मानवता धर्माच्या जीवनाचा आदर्श आज समाजात कोणाप़ुढे आहे का ? इंग्लंडमध्ये मजुरी करणारा मनुष्य दर महिन्याला मिळणाऱ्या आपल्या मासिक प्राप्तीतून धर्म प्रचारार्थ काही अंशतः रक्कम त्यांच्या धर्मसंस्थांना देतो आहे. तो पैसा हिंदुस्तानात येऊन त्या पैशावर जगताच्या सुखासमाधानाचे कार्य अव्याहत चालले आहे. पण ज्यांनी हा आपला कर्तव्याचा भाग म्हणून आपल्या धर्म-संस्थांना पै-पैसा दिला त्यांनी अजून हिंदुस्तानसुध्दा पाहिलेला नाही. तेव्हढी त्यांची धर्मावर श्रध्दा आहे ! आणि आम्ही मात्र त्यांच्या आंग्लभाषेचे पांघरूण घेऊन ‘नास्तिक आहोत’ असे भासवितो. परंतु त्यांचा ‘परोपकारार्थ जीवन जगणे’ हा आदर्श बाजूला ठेवतो आहोत. एवढय़ावरच आम्ही थांबत नाही तर ज्या आई-वडिलांचे ऋण घेऊन आम्ही पदवीधर झालो ते ज्ञान “ ज्ञानेश्वरी खरी का खोटी” हे शोधण्यासाठी खर्च करीत आहोत. परंतु ज्ञानेश्वरांनी ज्या वयात जगाच्या कल्याणार्थ जीवन पूर्ण केले त्या वयात आम्हाला आमचे आई-वडिल एकवेळा जेऊन कसे शिकवत आहेत हे सुध्दा समजू शकले नाही. हीच आमची आजची साधुसंतांबद्दलची श्रध्दा की ज्यांनी आजमितीपर्यंत आपल्या नि:स्वार्थ जीवनाचा परिमल टिकविला आहे  !

आज पाश्चिमात्य देश शिक्षणाने पुढे जात आहेत त्यांच्यात खूप ज्ञानी विज्ञान मंडळी आहेत, परंतु या क्षणापर्यंत कोणीही आपल्या ज्ञानाने बायबल खरे की खोटे आहे हे शोधण्यास गेला नाही ? ज्या धर्मसंस्था लोकल्याणार्थ कार्य करीत आहेत त्यांची निंदा-नालस्ती करण्यासही कारण झाला नाही. धर्माची बंधने राजासुध्दा पालन करीत आहे. त्या परदेशी धर्मसंस्था आमच्याच देशात येऊन आमच्या बंधुबांधवांच्या दु:खाला आपले दु:ख समजून त्यांची सेवा करीत आहेत. त्यात कोणाचे काही बरे वाईट लक्षात न घेता, शांतपणे धर्माज्ञा पालन करीत आहेत. धर्म म्हटले की द्वैत हे नाहीच ! या भावनेने सुखाचा विचार कोणत्याही प्रकारे न करता आमच्या देशबांधवाच्या हितासाठी स्वतःचे आयुष्य वेचीत आहेत. आज त्यापैकी कोणी कोठेही असले ‘धर्म’, ‘धर्मगुरु’, ‘धर्मसंस्था’ हा शब्द उच्चारला की, मानाने त्याचा स्वीकार करतील. तर आमची मंडळी त्यावर चर्चा, वाद, व शेवटी एखाद्या वर्तमानपत्राचा आश्रय घेतील. पण असा विचार करणार नाहीत की, आपल्यासारखीच ही मंडळी आहेत. त्यांना जगातील लोक सुखी व्हावेत असे वाटत आहे, त्याला कारण काय ? व आपल्या ठिकाणी तितकासुद्धा चांगला विचार येऊ शकत नाही,  याला तरी कारण काय ? तर प्रथमतः स्वतःबद्दलचे पूर्ण अज्ञान व दुसरे देव व धर्म यांचे न मानलेले संस्कार किंवा योग्य वेळी न झालेले संस्कार.

आज,धर्माची अवनती व समाजाची अनावस्था पाहिली तर काय दिसेल ? (या ठिकाणी धर्म शब्द आचार-विचार या अर्थी घेतला आहे). ज्या समाजकल्याणाची आंदोलने समाजात होत आहेत, त्याच्या मुळाशी काय आहे ? आज बहुतांशी समाजकल्याण वैयक्तिक विचारांनी, आचारांनी चाललेले आहे. विचारांनी ‘समाजास सुखी करणे’ हे बोलण्यास जितका वेळ लागणार नाही त्याच्या शेकडो पटीने तो आचाराने सुखी होणे कठीण आहे. दैवी मार्ग किंवा पारमार्थीक मार्ग हा सुध्दा समाजकल्याणाचा ठेवा आहे. त्याचे मार्गदर्शन आज शेकडो वर्षे साधुसंतांनी केले आहे, म्हणून काही चांगली माणसे आज समाजात लोककल्याणार्थ आपले आयुष्य वेचीत आहेत. समाजकल्याणाचे पुढारीपण कोणीही केले तरी भावी काळासाठी ते हितावहच होईल, या हेतूने समितीने आपली कार्यपध्दती सुरु केली आहे. समाजसुधारणेसाठी नुसत्या सुधारणा असून चालणार नाही.तर सुविचारांची धारणा व्हावयास पाहिजे व ती होण्यास दैवी किंवा पारमार्थिक मार्गाचे आचरण होणे आवश्यक आहे.

आजच्या समाजातील आस्तिक-नास्तिकांची भूमिका परिस्थितीच्यामुळे बनलेली आहे. दैवी मार्गाचा अवलंब करणारे शास्त्र म्हणून किंवा त्याविना जीवन व्यर्थ म्हणून याचा अवलंब करून जीवनास योग्य वळण, सवय लावण्यास तयार नाही. परिस्थितीने गांजला आहे म्हणून त्याला परमेश्वराची आठवण झाली आहे. मुळातच जी भावना गांजली आहे, ती ईश्वररूप कशी होऊ शकेल ? अशी भावना जीवनात कोठेच स्थिरता करून देत नाही, मग अशा दु:खी माणसास साधे जीवन सुखी करण्यासाठी बरेच ज्योतिषी व दैवी मार्ग लागतात. व अशा अनुभवांनी हताश झाल्यावर देवधर्माला नावे ठेवण्यास, ज्याला पै-पैसा आहे, त्यांच्याकडे विषारी हेतूने पाहण्यास असे लोक तयार होतात आणि आज समाजात अशांची संख्या खूप वाढली आहे. ती फाजील ऐहिक सुखांच्या कल्पनांनी जे सुख मिळाले आहे ते न अनुभवता, जे नाही किंवा नव्हते ते शोधण्यासाठी विचार व विकार वाढतात व ज्यामुळे जीवनाचा नाश होतो ते सुख, मला कोणत्या उपासना मार्गाने सोडता येईल याचा शोध ध्यावयाचा, हीच विचारांची तात्त्विक बाजू आज समितीला प्रत्येक मानवाच्या जीवनात निश्चित करावयाची आहे. म्हणजेच दु:खाचे कारण न शोधता त्या दु:खाची मीमांसा अभ्यासावयाची. या मीमांसेच्या अभ्यासासाठी साधनेचे अनेक मार्ग सांगितले आहेत. तरी आपण मार्गात असल्याशिवाय जीवा-शिवाच्या सिध्द-सिध्दांत पध्दतीचा उपयोग होणार नाही. तरी खरे समाधान शांती जनसेवा करण्यानेच होणार आहे. या कार्यपध्दतीची गुरुपरंपरा हेच शिकवत आली आहे. प.पू.साईनाथ महाराजांचे जीवन याच कार्यार्थ होते. तिची कृपा ह्या समितीच्या कार्यपध्दतीस लाभली, ते मार्गदर्शन झाले व ते ‘साधन-पत्रिका’ म्हणून अभ्यासून पुढे ठेविले.

आज प.पू.बाबांचे असंख्य उपासक समाजात किड्या-मुंगीसारखे वावरत आहेत. ह्या अवतारी सत्पुरूषाच्या जीवनाचा उपयोग स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी होत आहे. ही खेदाची गोष्ट आहे. एवढ्यावरच हे लोक थांबत नाहीत, तर बाबांच्या बरहुकूम वेष करून गावोगांव हिंडतात. खरोखर, आपण त्या योग्यतेला पोहोचलो आहोत किंवा नाही याचा विचार ते करीत नसल्याने, त्याचा वाईट अनुभव घेतलेला समाज स्वतःला नास्तिक म्हणतो व या अनुभवाची बाजू समितीसारख्या लोक-कल्याणाच्या कार्यास आड येते. प.पू.बाबांच्या अवतार कार्याची थोरवी कोणीही शब्दांनी वर्णन केली तरी शब्दांनी सिध्द होणारी नाही. कारण, ज्यांनी जगाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांनी सेवा, श्रध्दा व सबुरी या व्यतिरिक्त गुरु-अमृत निर्माण केलेच नाही. ज्यांनी धर्म, जात हा भेद न पाहता मानवता धर्माला ब्रह्म मानले, त्यांची कृपा शब्दाच्या पलिकडे आहे. ती साधकाने, बाधकाने, आस्तिकाने, नास्तिकाने, भक्ताने, याचकाने प्रत्यक्ष सेवा करूनच अनुभवली पाहिजे. ती परिपूर्ण नि:स्वार्थ भूमिकेने अनुभवलीत तर स्वतःचे कल्याण करून, समाज कल्याणातून राष्ट्रकल्याण करण्याचे कर्तव्य पार पाडू शकाल. नाहीतर जन्माला आलात व गेलात याशिवाय जीवनात काही निर्माण केले नाहीत. म्हणजे तुम्ही जन्माला कशाला आलात याचा शोध घेतला नाहीत. तो शोध घेणे म्हणजेच दु:ख-कारण-मीमांसा अभ्यासणे.

ही साधनपत्रिका समितीने लोककल्याणार्थ कार्य म्हणून आपल्यापुढे ठेवली आहे. त्यात देवा-धर्माबद्दल, साधकाबद्दल अपरोक्ष निंदा केलेली नाही. प्रत्यक्ष परिस्थितीतील सत्य समाजापुढे ठेवून देवाला अंतराळात न शोधता, स्वतःत शोधला तर सामाजिक परिस्थिती आचार-विचारांनी कर्तव्याची होऊन स्वतः सुखी होणे म्हणजे इतरांस दु:ख देणे या विचारास स्थान राहणार नाही. त्या जागी हा विचार यावा लागेल की, ‘दुसऱ्यांना सुख, समाधान देण्यासाठी काया, वाचा व मनाने मला आज काय कर्तव्य केले पाहिजे’, ते यथायोग्य करण्याची सवय लावून घेणे हीच समितीची पारमार्थिक उन्नतीची व्याख्या होय. ही निश्चित एका कुटुंबात झाली की त्या समाधानाने विश्वबंधुत्व, विश्वशांतीपर्यंतचे कार्य एकमेकांच्या सहकार्याने करण्यास सद्गुरुकृपेची जोड जोडली पाहिजे. त्यासाठी देवाधर्माचे, जाती-पाती, ज्ञानी-अज्ञानी, आस्तिक-नास्तिकाचे वाद शोधण्याचे किंवा ते नष्ट करण्याचे कार्य करण्याची आवश्यकता नाही. जे ’मानवता धर्माला’ पोषक ते टिकविणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. ते करण्याचे कार्य जसे समिती करीत आहे, तसे प्रत्येकाने कोणासाठी म्ह्णून न करता जीवनातील कर्तव्य म्हणून करावे, अशी श्री.सद्गुरु चरणी प्रार्थना.

आषाढ शुध्द १५ शके १८८२
(गुरुपौर्णिमा)