अध्याय १ – कार्याचा उद्देश

प्रापंचिक जीवनात निरनिराळ्या प्रकारांनी झालेली दु:खे दूर व्हावीत म्हणून मनुष्य या मार्गाचा अवलंब करतो. दु:ख निवारणार्थ जाणाऱ्या माणसाच्या मनाची परिस्थिती इतकी विचित्र झालेली असते की, समोर बसलेला साधक जे काही अडचणी निर्माण होण्याचे कारण कथन करील, त्यावर त्यास विश्वास ठेवणेच भाग पडते. कारण मानवी जीवनास आशा ही मोठी वेडी असते. जेव्हा असा गांजलेला मनुष्य अशा सिध्दसाधकाकडे जातो, त्यावेळी त्या माणसाची भावना, भक्ति, श्रध्दा ही परमेश्वरावर जेव्हढी नसेल तेव्हढी त्या साधकावर असते. हेतू हा की, आपल्या कुटुंबास सुखाचे दिवस यावेत. अशा वेळी या सिध्दसाधकांची भूमिका इतकी स्वार्थी असते की, समोर दु:खाने पिडलेल्यास कोणती सहानुभूती आणि प्रेम दाखविल्याने तो सुखी होणार आहे याचा विचार न करता आपल्याला आलेल्या माणसाकडून जास्तीतजास्त काय प्राप्ती होईल, याचा विचार ते करीत असतात आणि अशा स्वार्थी भूमिकेतून सांगितलेली निराकरणे ही जरी बुध्दीला पटणारी नसतात, तरी मनुष्य आशेने ते करतो. या जगतातील अशा सिध्दसाधकांचे अनुभव प्रत्यक्ष या कार्याच्या प्रमुख मध्यस्थांच्या कुटुंबास अनेक प्रकाराने आले आणि अशा विश्वासघातकी वृत्तीस असे सिध्दसाधक ईश्वरी कृपेची ‘गुरुकृपा’ म्हणून लोकांना लुबाडतात. अशा विचारामागील सत्य शोधण्यासाठी प्रथमतः या कार्यास आरंभ झाला तो याच हेतूने की, ईश्वरी कृपा म्हटल्यावर जास्तीत जास्तपणे ती जगातील लोकांच्या सुखास कारण ठरली पाहिजे. प्राप्त झालेल्या जीवनातील दु:ख निवारणार्थ आलेल्या मनुष्याजवळील श्रध्दा, भक्ति व भावना ही असल्यानंतर आणखी अन्य देवाण-घेवाण करण्याची आवश्यता नाही. या सद्हेतूस परमपूज्य बाबांच्या कृपाप्रसादाचा आशिर्वाद लाभला व गेली दहा वर्षे याच भूमिकेतून आलेल्या भक्तभाविकाना मार्गदर्शन होत आहे.

अशा कार्याची किंवा सिध्दसाधकांची दु:ख निवारणार्थ आलेल्या मनुष्यास मानवी जीवनातील सुखदु:खाबद्दल मार्गदर्शन करीत असता जबाबदारी मोठी असते. परंतु ती स्वतःच न समजावून घेता आलेल्यास खूप समाधान वाटावे म्हणून सुखाबद्दल काहीतरी भ्रामक कल्पना निर्माण करून दिलेली असते. वास्तविक मनुष्याच्या जीवनामध्ये कर्मगतीसारखा गुरू नाही. मनुष्याने आयुष्यात कितीही बढाया मारून आकाशाला वेसण घालायचा प्रयत्न एकवेळ केला असेल, परंतु कर्मगती ही त्याला शरणगती पत्करण्यास लावते. कदाचित अशा माणसाने जीवनात देवधर्म, संस्कार, कर्म, प्रारब्ध हे खोटे मानले असेल तर त्याला ते मानण्याशिवाय गत्यंतर नसते. अशा वेळी त्याला जीवनाचा खरा अर्थ कळलेला असतो. तोपर्यंत त्याने सुखाची निर्माण केलेली स्वप्ने ही एक रुपाया मिळविण्याससुध्दा कशी निर्बल झालेली असतात हे कटू सत्य त्याला पटलेले असते. अशा वेळी योग्य ते मार्गदर्शन होऊन जर अशा मनुष्यास सुखी केले तर सबंध कुटुंबाची आचार-विचार पध्दत बदलते व ते एक धर्मपरायण सहिष्णुतेचे कुटुंब बनते. परंतु हीच जबाबदारी न ओळखून वेड्यावाकड्या प्रकाराचे मार्गदर्शन असे साधक लोक करतात व अशा कटू अनुभवांची प्रचिती घेतलेले जेव्हा समितीच्या कार्यपध्दतीचा अनुभव घेण्यास आले तेव्हा दोन्हीतील निराकरणाचा फरक हा त्यांच्या बुध्दीला जाणवला व जीवन हे जन्मप्रारब्धाने अशाच सुखदु:खांचे लेणे आहे हे पटून आजचे आपले जीवन व आपल्या मुलाबाळांचे जीवन सुखी व्हावे या सद्हेतूने त्यांनी समितीच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलाच. शिवाय हेही विचारांती निश्चित केले की, जीवनात सुखासाठी ज्या ज्या काही उणीवा आहेत असे वाटते त्यात परमेश्वराची उणीव ही प्रामुख्याने असते. अशी भक्त मंडळी आज आपल्या दैनंदिन जीवनात या कार्यपध्दतीची उपासना नित्य करीत आहेत. समितीच्या कार्यपध्दतीची स्पष्ट भूमिका या भक्तभाविकांना जीवनातील कर्तव्य व समाजकल्याण हाच पारमार्थिक ठेवा आहे असे सांगते. यामुळे काही भक्तभाविकांना या कार्यपध्दतीची ओळख ही लोककल्याणार्थ आहे, कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नाही हे पटले व असा विश्वास निर्माण झाला की, या कार्यपध्दतीत कोणतीही उणीव किंवा कमीपणा नाही. जो आहे तो आपल्यापाशीच आहे. आणि तो समजावून घेणे म्हणजेच जीवनात निरंतर सुख,समाधान निर्माण करणे हा होय !

या उलट अशी भक्तमंडळी समितीच्या मार्गदर्शनार्थ येतात की, जी वर सांगितलेल्या साधकांच्या तावडीत सापडली नाहीत, अशांना कितीही आत्मियतेने व सहानुभूतीने त्यांच्या दु:ख निवारणार्थ मार्गदर्शन केले तरी, ‘नशिबा’बद्दल काहीतरी सांगितले नाही म्हणून समितीच्या कार्यपध्दतीत बरेवाईटपणा आहे असा ग्रह निर्माण करून जाण्यास कारण होतात. पण बाहेर गेल्याने नशीब तेच न्यावे लागले, हे ते विसरतात. कर्मधर्मसंयोगाने आणखी बाहेरच्या वाईट अनुभवास ते बळी पडतात. याबद्दल दु:ख वाटते.

वरीलप्रमाणे येणारा भक्तभाविक हा जरी कोणत्याही हेतूने येत असला तरी समिती आपली भूमिका व उद्देश केव्हाही बदलणार नाही. आज तुमच्यासारख्या येणाऱ्या भक्तभविकांच्या जीवनात समितीला देवधर्माचे महत्व, संस्काराचे महत्व, नित्याचरणाचे महत्व, कर्तव्याचे महत्व व लोककल्याणार्थ काहीतरी जनसेवा केल्याशिवाय हे जग सोडता कामा नये असे सांगावयाचे आहे. ही सर्व सेवा नि:स्वार्थ बुध्दीने करण्यासाठी सेवक तयार करावयाचे आहेत व केले आहेत. परंतु कोणासही आपली नित्य कर्तव्याची जबाबदारी पार पाडून (उदा :- नोकरी धंदा, व्यवसाय इ.) सेवा करण्यास शिकविले आहे.

>>कार्यपध्दतीस शास्त्राधार.