मंगळवार दि.१०-१-१९५७. प.पू.महंमद जिलानी.

मनुष्याला जन्म मिळण्यापूर्वी जीवन ईश्वरमय व्हावे असा संकेत असताना संसाराबद्दल आसक्ती व परमार्थाबद्दल घृणा असते असे का?

संसार व परमार्थ या दोघांचेही बीजारोपण बरोबर झालेले आहे. हे बरोबर उत्पन्न झालेले आहेत.याची प्रचिती मनुष्याला ईश्वराने दोन हात दिलेले आहेत यावरून येईल.आपणास सांगितले की एक हात बांधून ठेवा व दुसऱया एकाच हाताने काम करा.तर आपली फारच अडचण होईल किंवा ५० वा १०० रू. वाराचा कपडा घेऊन आपणास शर्ट शिवला परंतु त्याच्या एकच हाताची लांबी खूपच ठेवली व दुसरा हात बगलेपर्यंत बिनबाहीचा शिवला तर आपले समाजात हसे होईल.तद्वतच संसार आणि परमार्थाचे आहे.आपण संसारात पदार्पण केल्यावर संसार ठाकठीक करण्याची जबाबदारी पर्यायानेच आपल्यावर येते.आपण त्या करीता जे नित्य कर्म करता वा इथे येता ते आपले कर्तव्य म्हणून येता.कोणावर उपकार म्हणून नव्हे.

आपणास असे सांगण्यात येते की संसार नश्वर आहे.हे ऐकल्यावर लगेच प्रतिप्रश्न उभा रहातो तो हा की संसार जर नश्वर आहे तर ईश्वर काय? कारण ईश्वर असल्याशिवाय नश्वर असू शकत नाही.एखाद्या पडछायेचे उदाहरण घ्या.आपण म्हणतो पडछाया फसवी किंवा खोटी आहे.पण त्याच बरोबर हे पण नाकारून चालणार नाही की छाया ही पदार्थाची व वस्तूची असते.ज्याप्रमाणे वस्तू वा पदार्थ नाही म्हणजे छाया नाही व छाया आहे म्हणजेच वस्तू आहे.तद्वत संसार ही परमार्थाची छाया आहे.आता पदार्थाची छाया असते हे आपण पाहिले पण पडछाया कशामुळे आहे?वस्तू अंधारात ठेवा व पहा त्याची पडछाया पडते का? तेव्हा पडछाया पडण्याकरीता प्रकाशाची जरूरी असते.आणि इथे प्रकाश कोणता तर आधिदेवताचा.!

तेव्हा आधिदैवत हा प्रकाश,परमार्थ म्हणजे वस्तू ही तिची पडछाया !पुन्हा ३ अवस्था आल्या. प्रकाश=उत्पत्ती, वस्तू=स्थिती व पडछाया=लय.याचे विवेचन करताना जिलानी साहेब म्हणाले पडछाया वस्तूची असल्याने वस्तूप्रमाणे पडली पाहिजे. आपण असे म्हणणार का पडछायेमध्ये वस्तूची एखादी बाजू उमटली नाही.जशी वस्तू तशी पडछाया असे असतानाही पाच फूट उंच माणसाची सावली संध्याकाळी ७ फूट तर दुपारी लहानशी असते. कारण प्रकाशापासून आपण दूर किंवा जवळ असतो.मनुष्याची उंची वाढ़त नाही.तेव्हा वस्तू बरहुकूम पडण्याकरता विशिष्ठ अंतराची आवश्यकता असते.ही पडछाया वाढली म्हणजे आपणाला सुख होते.कमी झाली की तुम्ही कष्टी होता.

 

नाथपंथी महात्म्यानी परवा आपणास जो साधनेचा रस्ता दाखविला आहे त्याची जोपासना करणे हे आपले काम आहे.ती साधना म्हणजे एक ज्योत (चिराग) आहे.ती सतत जळत रहाण्याकरता आपणास २ गोष्टी कराव्या लागतील.प्रथम बाहेरच्या वाऱयाने ती विझू नये म्हणून आपणास षड्विकाराचे दरवाजे बंद करून घ्यावे लागतील.यामुळे बाहेरील जगाचाही संबंध तुटेल व दुसरे म्हणजे ती ज्योत विझू नये म्हणून त्यात भक्तीचे तेल घालावे लागेल.म्हणजे ती संथ परतु सतत तेवत राहील.मी हे जे सांगितले त्यावर विचार करा.प्रथम विचार नंतर आचार व मिळालेल्या ह्या ज्ञानासंबंधी पुन्हा विचार करा.म्हणजे त्या प्रकाशापर्यंत जाण्यास आपणास वेळ लागणार नाही.

 

मी आचार शब्द वापरतो तो इतर उर्दू शब्दाप्रमाणे त्याचा अर्थ नाही.आचार =आचरण. आचार म्हटल्याबरोबर आपल्या तोंडाला पाणी सुटले असेल.या समोरच्या सर्व माईîंची आंब्याच्या मोसमात लोणचे घालण्याची केवढी घाई! निदान वर्षभर पुरले पाहिजे म्हणून आपण जास्तीत जास्त मोठी बरणी घेता व ते लोणचे सालभर पुरते.माझ्यापाशी अशी वेगवेगळी (नमकीन) लोणची आहेत की विचारून सोय नाही.लोणचे घालता त्याचे उत्सुकतेने मजकडून घेतलेल्या लोणच्याच्या त्या बरण्या भरून ठेवा की त्या सालभर आपणास पुरतील.तिखटमीठात मुरल्यावरसुध्दा आंबा आपला आंबटपणा सोडीत नाही.पण मजकडील लोणच्याची गोडी कायम रहाते.

संचार सुटण्यापूर्वी मध्येच एका भगिनीने संचार कोणाचा याची जिज्ञासा व्यक्त केली. तेव्हा जिलानी साहेबानी अति समर्पक असा समारोप केलाः-

“ज्याच्याबद्दल आपणास आसक्ती आहे तो मी ‘हाजीबाबा’ नव्हे.ज्याचे विषयी आपणास निरासक्ती आहे तो ‘ख्वाजासाहेब’ पण मी नव्हे.तर या दोहोमधील पडछाया – महंमद जिलानी  आहे.”

[ह्या मुलाखतीत ‘जन्म’ व ‘जीवन’ या विषयांची ओळख थोडक्यात करून दिली आहे. प्रकाश, वस्तू व पडछाया यातून ते विषय समजावून दिले आहेत.प.पू.विभूतींची भाषा साधी, सोपी आहे म्हणून क्लिष्ट विषयाची ओळख चटकन् होऊ शकते.पहिल्याच वचनात काही संभ्रम निर्माण झाला असल्यास मुलाखत पुन्हःपुन्हा वाचल्यास तो आपोआप  निवारण होईल. पण या  विषयांचे  चिंतन-मनन  करणे  आवश्यक  आहे]