29-7-61. माझी भूमिका
तुम्हाला माझी भूमिका लिहावयास सांगितली होती,ती लिहून आणली का?एका भकताने उत्तर दिले की लिहून तयार आहे व ती आपणाजवळ द्यावयाची आहे.त्यावर बाबा म्हणाले कि गुरुआज्ञनेने जी तारीख नेमली त्या दिवशी एका नियुक्त सेवकाजवळ का दिली नाही?याचा अर्थ असा की तुम्ही अजूनसुध्दा एकमेकांना वेगळे समजता.जसे बँकेत भरलेले पैसे हे कॅशिअरने जरी घतलेले असले तरी ते त्याच्या खिशात न जाता बॅंकेत जातात.त्याप्रमाणे नियुक्त सेवकाकडे दिलेले कागद इकडे जमा झालेले असतात.
एका सेवकाची वही बघितली,विचारले हे काय?उत्तर मिळाले की आपली मुलाखात Rough लिहीली आहे.त्यावर बाबा म्हणाले तुमच्या जीवनात सदैव Rough–Fair चालेले आहे.आमची एवढी मुलाखात तुम्ही म्हणता रफ (Rough) मध्ये लिहीली “तो फिर आपके मुकद्द्रपर भी रफ लिखेगा तो चलेगा क्या? “तब बोलता है बाबा जल्दी फायनल (Final) करो.
आजपर्यंत आपली देवाबद्दलची कल्पना काय?व त्याच्या जवळ मागावयाचे काय? असे विचारले तर आपण सुख-शांती-समाधान याची अपेक्षा देवाजवळ करतो व ते आपण काया-वाचा-मन यांच्या योगे अनुभवू शकतो.आज देवाबद्दल जे काही कथा-पुराणे अगर काही सिध्द-साधकांचे अनुभव जर पाहिले तर आपणास असे दिसून येईल की देव हा ऐहिक सुख देणारा आहे. आपण वाचतो की,अमुक एक राजाने अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडला व त्याला अमुक एक मिळाले.अमुक एक व्रत केल्याने एकाची मनिषा पूर्ण झाली. किंबहुना,अगदी पराकोटीला पोहचलेल्या ऋषिमुनींना एका जवळ कामधेनू आहे व ती दुस-या जवळ नाही या मोहापासून अलिप्त राहता आले नाही.पण आजपर्यंत याच्या पलिकडे जाऊन ईश्वर म्हणजे काय याचा प्रयत्न कोणी केला नाही.थोडक्यात म्हणजे ईश्वराबद्दलची आपण अशी कल्पना करुन घेतली की ईश्वर म्हणजे ऐहिक-नश्वर सुख देणारा व याच भावनेने तुम्ही सर्व भक्तमंडळी इतकी वर्षे येऊन प.पू.बाबांकडे असेच मागत असता.पण देवाने ज्यावेळी तुम्हाला जन्माला घातले त्यावेळी अगदी शेवटच्या क्षणापर्यंतची म्हणजे तुमच्या मुखात गंगोदक,तुळशीपत्र घालण्यापर्यंत सर्व व्यवस्था आधीच केलेली आहे.तुमच्या जीवनात नित्य आवश्यक लागणाऱया गरजांचा त्याने व्यवस्थित बंदोबस्त केला आहे.याशिवाय आपले जे काही ऋणानुबंध आहेत त्याबद्दलसुध्दा योग्य ती व्यवस्था केली आहे. उदा–5।6महिन्यापूर्वी एक (क्ष) भक्ताकडे आम्ही चहा पाण्याला गेलो नाही. याचा अर्थ असा नाही की,त्याचा आमचा ऋणानुबंध नाही.पण आमची भाकरी बाबांकडून मिळत असल्याने त्यांच्याकडे जाण्याची वेळ आलेली नाही.या दृष्टीने आमच्या नावे त्यांच्याकडे ज्या भाकऱया शिल्लक राहिल्या त्या Surplus म्हणून धरल्या पाहिजेत.हय़ाचप्रमाणे ऋणानुबंधनाने दोघा गुरुबंधुत 25रु.देण्या-घेण्याचा व्यवहार व्हावयाचा असतो.पण जो घेणार आहे त्याला ते 25रु दुसरीकडून मिळाल्यावर तो याच्याकडे कशाला मागेल? तुम्ही जन्माला आलात त्यावेळी तुम्ही आधाशी आहात हे लक्षात घेऊनच वास्तविक एक पोळी मिळावयाचे लिहीले असता 4पोळयांची व्यवस्था केलेली आहे.यावरुन आपल्याला कळून येईल की आवश्यक अशा गोष्टींची मागणी करण्याची जरुरीच नाही.एखाद्याला मोटारीतून फिरण्याचे सुख मिळणार आहे पण जोपर्यंत त्याची काया मोटारीत आहे तोपर्यंत तो सुखी.एकदा मोटार बिघडली की त्याला दुख होते.सुख मिळण्याचे त्याचे ते साधन होते. आपल्या काया-वाचा-मन यांना सुख-शांती-समाधान ही साधनेने मिळणार आहेत.सतार हे वाद्य आहे.त्याची तार छेडली तर त्यातून नाद हा निघणारच. तो सतारीचा धर्म आहे.पण जो सतार वाजविणारा आहे तो नाद काढण्याचे शिक्षण घेत नाही तर राग व अलाप कसे घ्यावयाचे याचे तो शिक्षण घेतो.ते एकदा आले की सतारीतून पाहिजे ते सुर तो सहज काढू शकतो.त्याचप्रमाणे आपण जन्माला आलो,त्यावेळी ईश्वराने आपल्या बरोबरच सुख-शांती-समाधान पाठविले पण ते अनुभवण्याचे ज्ञान आपण आत्मसात केले नसल्याने आपणास कृपाशिर्वाद कसा मिळतो हेच कळत नाही.आपण हय़ा जगात कोठलीही गोष्ठ ही भोगण्यासाठी आलो नसून अनुभवण्यासाठी आलो आहोत.तुम्ही म्हणाल की मला सुख भोगावयाचे आहे की सुखाबरोबर दु:खही भोगण्याची तयारी पाहिजे.पण सुख अनुभवणे याचा अर्थ वेगळा आहे.मी मोटार ठेवणार नाही.ती असेल दुस-या कोणाची.पण मी त्यात बसून सुख अनुभवीन.त्याचप्रमाणे एखादा खाद्यपदार्थ तयार करतो, तो मनुष्य वेगळाच असतो पण त्याची रुची अनुभवते आपली जीभ.एवढे सृष्टीसैंदर्य़ विधात्याने निर्माण केले पण त्याचा आस्वाद घेतात आपले डोळे.देवाला व्यवहारी बनवू नका.बाबांना सगळय़ा गोष्टी माहीत आहेत.मग त्याच त्याच गोष्टी विचारुन त्यांचा आशिर्वाद मागणे म्हणजे भाताच्या लोंब्या काढून शेतातील इतर लोंब्यांना दाखविणे व त्यांना सांगणे की हा तुमचाच बंध-बांधव.हाच प्रकार तुमच्या जीवनात नेहमी घडतो.मी म्हणतो तुमच्या वर अगदी दुखाचे डोंगर कोसळले तरी लागणारे मनोधैर्य हे आपल्या प्रार्थनेने “हे भगवंता नारायणा” मिळालेच पाहिजे.पण ते मिळण्यापूर्वीच “भगवंता नारायणा…”या शब्दाचा उच्चार केल्याबरोबर साऱया विश्वातील शक्ति त्यामागे आहे ही दृढ श्रध्दा जोपासण्याचे काम तुमचे आहे.
[मुलाखतीचे महत्व विषद करताना जीवनातील तत्त्वे समजावून दिली जात असतात. केवळ श्रवण करून मुलाखतीचे महत्व लक्षात येत नसल्याने व आचरणात सकारात्मक बदल होत नसल्याने त्या मुलाखती लिहून ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या जेणे करून त्यांचे वाचन नियमितपणे करणे सुलभ होईल हा उद्देश त्यामागे आहे. एवढे समजावून देखील भक्तभाविक किती दुर्लक्ष करतात हे दाखविले आहे. त्यामुळे भक्तांचे नुकसान होत असल्याचे लक्षात येईल.]