22-2-1962 मंगळवार
गेल्या आठवडय़ात पारायण केलेत. समाधान लाभले का? तुम्हाला एखाद्या गोष्टीचे ज्ञान व त्यापासून होणारे समाधान हे तुमच्या ज्ञानेंद्रिय व कर्मेद्रियांना होते. चैतन्याला होत नाही. गुलाबाचे फूल जिवंत माणसाच्या नाकासमोर धरले तर त्याला वास येईल पण त्याच फुलाचा वास मेलेल्या माणसाच्या नाकाला येणार नाही. कारण, त्याचे चैतन्य लुप्त झालेले असते. तुमच्या डोक्यात कायदा, डोके आहे म्हणून रहात नाही तर चैतन्य आहे म्हणून रहातो. आपण आजपर्यंत काय केले तर आपल्या पंचकर्मेद्रिय व ज्ञानेंद्रिय यांना नित्य उपासनेची सवय लावली. आज तुम्ही ऐकता, बघू शकता कारण चैतन्याची शक्ती आहे. पण तुमचे चैतन्य अनेक ठिकाणी विभागले गेले असल्यामुळे तुम्हाला या भिंतीच्यापलीकडे दिसत नाही. चैतन्य त्या इंद्रियांपासून फार दूर आहे. ज्यावेळी पूर्णपणे चैतन्य दृष्टीच्या मागे उभे राहिल त्यावेळी या भिंतीचा भेद करून कुठचीही गोष्ट तुम्ही आर-पार पाहू शकता.
आता साधनेसाठी उपासना करत असताना कुणी दृष्टी पूर्णावस्थेला नेईल तर कुणी वाचा पूर्णावस्थेला नेईल. जोपर्यंत चैतन्य प्रबळ झाले नाही तोपर्यंत साध्यता नाही. या अवस्थेला आल्यानंतर तुमचे मन कार्यक्षम होऊ लागते. मनाला थोडे-थोडे संकेत कळू लागतात व अशावेळी साधकाला आपणास परमेश्वर प्राप्ती झाली असे वाटू लागते. तुमची इंद्रिये ही नश्वर आहेत. त्यांना घेऊन तुमच्यात जो ईश्वर आहे तो अनंत पटीने वाढवा. आज तुमच्या चैतन्याच्या ठिकाणी साठा असण्याऐवजी साठा असल्याचा भास आहे. आजपर्यंत साधना करून काय केलेत तर नश्वराला म्हणजे इंद्रियांना ईश्वर करण्याचा प्रयत्न केलात. आजपर्यंत उपासना इंद्रियांनी केलीत, यापुढे चैतन्याने करावयाची आहे. ज्यावेळी या ठिकाणी पहिल्या दिवशी आरतीला आलात, त्यावेळी तुमच्या काया, वाचा मनाच्या मागे चैतन्य संपूर्णतया उभे होते व त्यामुळे आरती म्हणत असता अश्रू ओघळायला लागले. त्या दिवशी चैतन्य व कर्म अगदी एकरूप झालेले होते. त्यानंतर आजपर्यंत आरती म्हणताना काया म्हणजे कर्म असते व चैतन्य नसते. यामुळे प्रत्येक गोष्टीत यांत्रिकपणा आलेला आहे.
मग प्रश्न असा येतो की चैतन्य गेले कुठे? त्याने आपली जागा सोडली का? चैतन्याने आपली जागा सोडली नाही तर आपल्या इंद्रियांनी त्यांची मर्यादा सोडली. तुमच्या गुरुबंधुची पहिल्यांदा ओळख झाली, त्यावेळी एक आदरयुक्त भाव तुमचे मनात निर्माण झाला. पण आज त्याच गुरुबंधुविषयी तुमचे मन कलुषित आहे. चैतन्याचा धर्म विषयाचे ज्ञान करुन देणे हा आहे. त्यानंतर ते बाजूला होते. पण ज्ञान चैतन्यामुळे झाले हे विसरुन जावून मला ज्ञान झाले आहे असे समजून चैतन्याला बाजूला फेकून देतो व कर्मेद्रियांच्याद्वारा प्राप्त ज्ञानानुसार बडबड करू लागता. गतजन्मात चैतन्यावर ईश्वराचा संस्कार झालेला होता पण त्याने जो देह धारण केला त्या कायेला ईश्वराचा संस्कार नाही म्हणून त्याने तुम्हाला आरतीला आणले. तुमच्या इंद्रियांना बाबांची ओळख करुन दिली. पण ही जाणीव इंद्रियामुळे झाली की, चैतन्यामुळे हे कळत नाही. अशा कर्मेद्रियांनी केलेल्या सेवेने साध्यता होऊ शकत नाही. आज तुमचे चैतन्य सुप्त आहे. तुम्हाला चिमटा घेतला तर स्पर्शेद्रियामुळे चिमटा घेतलेला समजतो. कर्माची जाणीव देहाला व देहाला जाणीव चैतन्यामुळे होते. पण चैतन्य जर सुप्त नसते तर चिमटा घेण्यामागचे कारण म्हणजे बाहेर गेल्यामुळे आपणाला चिमटा घेतला हे तुम्हाला कळले असते.
शाळेत मास्तर फळय़ावर गणित सोडवून दाखवत असतात. आपण डोळयांनी फळा बघत असतो व कानानी सांगत असलेले ऐकत असतो, पण चैतन्य कुठेतरी असल्यामुळे“तू उत्तर सांग”असे म्हटल्याबरोबर आपण भानावर येतो. अशावेळी प्रश्नाचे उत्तर देता येत नाही. मी सांगतो हे ज्ञान चैतन्य करून घेत असते, इंद्रिय करून घेत नाहीत. देहाने पुण्य जोडणे व चैतन्याने जोडणे यात फरक आहे. गतजन्मी देहाने पुण्य जोडलेले असल्यास, या जन्मी नश्वर अशा कायेला सुख मिळेल. पण चैतन्य कोरडेच राहील. पण चैतन्याने पुण्य जोडले असल्यास ते अनंत जन्म तुमच्या बरोबर येईल. आपण वूलनचा सूट घालून आपला देह सुशोभित करतो, त्याचप्रमाणे मूळ चैतन्याने हा देह धारण केला आहे. पण तो वूलनचा सूट म्हणजे काही तुम्ही नव्हे. एवढेच म्हणता येईल की अमुक एकाचा तो सूट आहे. तुमचे चैतन्य देवऋणानुबंध घेऊन येते. पण तो देवऋणानुबंध कसा आहे तर अपेक्षित आहे. देह हा नश्वर आहे त्याला निरंतर गोष्टीचा ध्यास लागत नाही. चैतन्य गप्पच बसलेले असते देह सारखा म्हणत असतो, अरे, एवढे करतोस पण घोडागाडी, पैसा मिळाला का? आईबापानी तुमची अपेक्षा केली व तुम्ही जन्माला आलात. आता ज्याचा जन्मच अपेक्षेने झाला आहे त्या देहाला तू निरपेक्ष हो, हे म्हणणे कितपत बरोबर आहे. तुमचा देह अपेक्षा करणारच. फक्त त्या प्रमाणाबाहेर वाढत नाहीत ना? इकडे लक्ष द्यायला पाहिजे.
देह सदैव तुलनात्मक दृष्टीने बघणार. त्याने एवढे केले तर त्याला अमुक एक मिळाले मग मलाही तसेच मिळाले पाहिजे. हीच सारखी तुलना चालू असते. पण चैतन्य व त्याचा धर्म ‘मन’ असे कधीही म्हणत नाही. उलट ते सारखे म्हणत असतात की जरा धीर धर. बाबा सगळे काही तुला देतील. आता यापुढची साधना चैतन्याकरीता आहे. म्हणूनच संकल्पात शेवटी म्हटले आहे की ऐहिक सुखाकरीता ही साधना करु नका. मनाची फार कुतर ओढ होते. कधी मन चैतन्याकडे तर कधी देहाकडे म्हणजेच कर्माकडे ओढले जाते. कर्माकड़ून मनाला उपवास घडला की, तुम्हाला साधना करुच देणार नाही. पारायण झाल्यानंतर समाधान झाले की नाही हा निर्णय चैतन्य देणार. आपल्याला पारायणाची संख्या वाढवायची नाही. साधकाचे काय हाल होतात हे मला माहित आहे. मी तुमचे कौतुक करणे हा माझा धर्म आहे पण ते करवून घेणे हा धर्म तुमचा नाही. गाय दूध देते हा तिचा धर्म पण त्याचा सत्वांश म्हणजे लोणी तयार झाले की मला द्या असे तिने म्हणू नये हा संकेत सिध्द करायचा होता म्हणून गाईला वाचा दिली नाही. त्या गायीला एकदा ज्ञान झाले की, संध्याकाळी 6 वाजता मालक येईल व दूध काढेल. एकदा हे ज्ञान झाल्यानंतर बरोबर 6 वाजता मालक विसरला तर ती हंबरडा फोडते व मालकाला आठवण करून देते. त्यावेळी तिला पान्हा फुटलेला असतो.
ईश्वराला सुध्दा असाच पान्हा फुटतो. बरोबर 7 वाजता माझ्या भक्ताला आशिर्वाद देण्यासाठी तो येतो. पण भक्तच जाग्यावर नसतो. ईश्वराला देखील प्रेमाचा पान्हा फुटतो, हे आम्हाला आजपर्यंत कळलेच नाही.
मला माझे सत्व द्यायचे आहे हा गाईचा धर्म. प्रत्यक्ष नागाला सुध्दा तिने दूधच दिले. वीष दिले नाही. आम्हाला देखील दुसऱयाला सुख, समाधान देणे हा धर्म आहे. पण आमच्या इंद्रियाना ही गोष्ट ज्ञात होत नाही. तुमच्या दारात कुत्रा असतो. घरात एखादा अपरिचित आला तर त्यावर तो भुंकू लागतो. कारण कुटुंबातल्या मंडळीपैकी तो नसल्यामुळे त्याच्या कर्मेद्रियांत ज्ञान झाले की तो परका आहे व त्यावर भुंकून घरातल्या माणसाना त्याची जाणीव करून देणे हा त्याचा धर्म त्याला समजतो. आलेला अपरिचित तुमच्याशी तासभर गप्पा मारतो व त्यानंतर तुम्ही व तो बाहेर जायला निघता. यावेळी मात्र तो कुत्रा भुंकत नाही. कारण त्याला एवढे कळते की आलेला मनुष्य आपल्यापैकीच एक आहे. एक तासाच्या अवधीत आपला कोण व परका कोण हे जाणण्याचे ज्ञान त्या प्राण्याला आहे. पण गेल्या 12 वर्षात हा भगवंत माझा आहे एवढे देखील तुम्हाला कळू नये का? तुम्हाला म्हणजे तुमच्या या देहाला अपरिचीत असा परमेश्वर परिचित (तुमच्या चैतन्याला तो परिचित आहे) कारण गतजन्मी त्यावर संस्कार झालेला आहे म्हणून तुमच्याकडे पाठविला. पण तुमचे सगळेच अपरिचित चालले आहे.
आता साधनेचा हेतू काय? साध्यता म्हणजे काय? काय मागणार मोटार का बंगला? तुम्ही समोर बसता व आशिर्वाद मागता की नोकरीत बढती मिळू दे. पण नोकरी ही काही निरंतर नाही. रिटायर झाल्यानंतर दिलेला आशिर्वाद नोकरीवर मागितला असल्यामुळे तुमच्या बरोबर येत नाही. पुन्हा पैशाची अडचण भासू लागते. पण आशिर्वाद असल्यामुळे त्या खुर्चीवर तुमच्या नंतर येणाऱया प्रत्येकाला बढती मिळत असते. आजपर्यंत आशिर्वाद काया, वाचेवर घेतलात, यापुढे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे चैतन्यावर घ्यावयाचा. तसेच आजपर्यंत आशिर्वाद अपेक्षेवर घेतलात. अपेक्षा आली की त्याचबरोबर काया, वाचा, कर्म, आई-बाप, भाऊ, वासना या सर्व गोष्टी आल्या.
आशिर्वाद या सर्वांना घेता पण मूळ ज्याला आशिर्वादाची जरूरी आहे, असा जो आपल्या जीवनाचा उगम म्हणजे चैतन्य ते घेऊन माझ्यासमोर कधी बसलात का? विद्या विषयात उत्तीर्ण होण्यासाठी आशिर्वाद घेतला व त्यानंतर पुढच्या आयुष्यात ज्या विद्यार्थ्य़ाना तो विषय शिकवत असता त्यांना देखील प्रथम आशिर्वाद घ्यावा लागेल व मगच ते विद्दार्थी त्या विषयात उत्तीर्ण होतील. कारण मुळात शिक्षकाने त्या विषयावर आशिर्वाद घेतला होता. वास्तविक अभ्यासावर आशिर्वाद घेण्यापेक्षा आपल्याला आशिर्वाद घ्यायचा व मग अभ्यास अभ्यासावयाचा. मी तुम्हाला वाईट देणार नाही. पण चांगले देताना प्रथम ज्ञानाची जाणीव करून मगच देईन. असा आहे हा गुरू!यापुढे प्रश्नांना अगर कामाला आशिर्वाद नको तर स्वतःला आशिर्वाद द्या की सगळी कामे आपोआप होतील.
आशिर्वाद चैतन्याला, देहाला नाही. कारण शेवटी ही इंद्रियें आपण विसर्जन करणार आहोत. तुकारामाने आशिर्वाद चैतन्यावर घेतला व त्याच बरोबर देहावरही घेतला व त्यामुळे पांडुरंगाला त्याला सदेह वैकुंठाला न्यावा लागला. असाच आशिर्वाद घेतल्यामुळे ज्ञानेश्वर जीवंतपणी समाधी घेऊ शकले. मूळ चैतन्याकडे आपण जाऊ लागलो की या देहाच्या ठिकाणी जडत्व जावून हा देह सूक्ष्म होऊ लागतो. आम्ही देह विसर्जन केल्यावर एका ज्योतीच्या रूपाने या वातावरणात विलीन झालो. आम्ही जिथून आलो तिथेच गेलो. तुम्ही मातीतून आलात व मातीतच जाणार. वातावरणात फार मोठा अग्नी आहे. त्यात देह जाळायला वेळ लागत नाही. तुम्हाला लाकडे का लागतात कारण, चरबी जाळायला वेळ लागतो. पारायण करताना कुठल्याही प्रकारची चढा-ओढ नको. पारायण चढून जा, पण ओढू नका! ओढ निरंतर भगवंताची पाहिजे, पण चढा-नको. देवा, थकलो रे आता, असे म्हणू नका, मी खोटी अभिवचने देणार नाही. तुला लाख रूपये देतो असे कधीच सांगणार नाही. पण तुझ्यामागे केवढी कर्मपरंपरा आहे हे सांगून तुला ज्ञानी करीन.
गेल्या वेळेच्या मुलाखतीत मी तुम्हाला भिकारी करणार आहे असे म्हटल्याबरोबर सगळेजण हादरून गेले. भिकाऱयाची वासना निर्माण झाली तरी परिस्थितीमुळे त्याला आपली वासना पुरी करता येत नाही. त्याचप्रमाणे तुमच्या इंद्रियाच्या ठिकाणी होणाऱया वासनांना भिकारी करणार व चैतन्याला श्रीमंत करणार. चष्मा घातल्यानंतर चांगले दिसायला लागले हे जसे दाखविता येते त्याचप्रमाणे समाधान दाखविता आले पाहिजे. पूर्वी एखाद्या गोष्टीविषयी असमाधान होते कारण ती गोष्ट मिळाली नाही की आपण बेचैन होतो. ते जाऊन त्या पदार्थाविषयी निरासक्ती आली की समाधान लाभते. तुमच्या इंद्रियांना आमच्या आशिर्वादाचे ज्ञान होणार नाही. डोळे उघडे असण्यापेक्षा अंतर्मुख प्रेम पाहिजे.
आशिर्वाद कर्मापुरताच मर्यादित रहातो. म्हणून गतजन्मात पुण्य करूनसुध्दा या जन्मात त्रास होतो. इंद्रियव्दारा आशिर्वाद दिला जाऊ नये म्हणूनच आम्ही दादांच्या शरीरात प्रवेश करून तुम्हाला आशिर्वाद देत असतो. तुमच्या चैतन्याकड़ून आम्हाला कार्य करून घ्यावयाचे आहे. माझ्या समोर भक्त बसल्यानंतर मला जातपात, धर्म, पशु-पक्षी हे न दिसता फक्त जीव दिसत असतो. डस्टर पुसण्याचे कार्य करतो. तो तुम्हाला निर्जीव वाटतो. पण डस्टर तयार करणारा सजीव असतो हे तुम्ही विसरता. टेलीफोन निर्जीव वाटतो. पण तुम्हीच निर्जीव असता कारण तुमच्यापासून लांब असणाऱया मित्राशी तुम्ही बोलू शकत नाही. पण टेलीफोन ते कार्य करतो. म्हणजे त्या अर्थाने तो सजीव आहे. साध्यता मिळवू लागलात की, तुमचे भाव स्फुरण व्हावयास लागतील. एखाद्याचे भले करावे. त्याला शनिवारचा उपवास अगर संदलच्या प्रसादाचे अनुष्ठान त्याच्या संकट निवारणार्थ सांगावे अशी भावना होईल. पण हे सर्व ज्ञान इंदियाना होईल म्हणून आपण त्याचा वापर करता कामा नये. आपल्याला चैतन्यद्वारा कार्य करायचे आहे. कर्मेंद्रियव्दारा होणारे ज्ञान म्हणजे घराबाहेरचा नळ की जो केव्हाही सुटेल व ज्याच्या खाली हातपायच धुतले जातील. पण चैतन्यव्दारा कार्य होणे म्हणजे घरातला नळ की जो सोडल्याशिवाय सुटणार नाही व त्याच्या पाण्याचा चहा केला जाईल एवढा फरक लक्षात ठेवा. तुमच्या साधनेचा आविष्कार गुरूमर्यादेच्या पलिकडे जाऊ देऊ नका. नकळत तुमची इंद्रिये काम करायला लागतील. त्यांना उपासना करायला लावायची आहे. पण कार्य करू द्यायचे नाही.
आपण दुसऱयाला संकट निवारणार्थ सांगायचे का नाही तर त्याचे चैतन्य त्याच्याजवळ नाही तर फक्त कर्मेद्रियच आहेत. मग उगीच आपल्या चैतन्याची शक्ति आज खर्च करून चालणार नाही. आज कुणीही उठतो व शंकराची उपासना करू लागतो. बम्हा, विष्णु, महेश म्हणजे तुमचे वडिल, आजोबा, पणजोबा आहेत. आज शेंबूड न निघणारा पणजोबाची उपासना करतो. अशी उपासना करण्याआधी या देहाला वडील व आजोबा या दोघाचे पूर्णत्व प्राप्त झाले आहे का? आपल्याला पारायणांची संख्या नको तर सांख्य पाहिजे आहे.
अपेक्षा कर्म-ज्ञान-देह-पूर्वजन्मऋणानुबंध व चैतन्य अशी जर तुमच्या मागची मालिका आहे तर इतराना काही देण्याऐवजी चैतन्यालाच आशिर्वाद दिलेला काय वाईट!तुमच्या घराच्या रक्षणार्थ एखादा नोकर अगर कुत्रा ठेवता. परका मनुष्य घरात आल्याबरोबर कुत्रा भुकुन तुम्हाला जागरूक करील. अशा तऱहेने आपला धर्म पाळील. पण दारातील नोकर चहाडी करील. आलेल्या माणसाला सांगेल आमचा मालक फार चिक्कूîआहे. तुम्हाला एक पै देखील मदत मिळणार नाही. त्याचवेळी मालकाला देखील तो सांगेल की, दारात आलेला माणूस फार लबाड आहे व त्याला काहीही मदत करू नका. नोकर हा सजातीय असल्यामुळे आपला धर्म पाळणार नाही. पण तेच कुत्रा हा विजातीय असल्यामुळे त्याच्या धर्माचे पालन करील.
“आपल्या जीवनचा संरक्षक कोण ठेवणार? सजातीय का विजातीय ठेवणार? अपेक्षारूपी सजातीय नोकर ठेवलात तर तो चहाडी-चुगली केल्याशिवाय रहाणार नाही. तो म्हणणार इतकी पूजा करतोस काय देतात बाबा तुला? पण विजातीय नोकर म्हणजे बाबा ठेवलेत तर काम चोख होईल.”
आपल्याला काया आहे तशीच बाबांना पण आहे. आपल्याला कर्मेद्रिये तशीच बाबांची पण कर्मेंद्रिये आहेत. आपण आपली इंद्रियें आपल्याच सुख समाधानासाठी वापरतो. पण बाबा त्यांच्या इंद्रियांनी दुसऱयांना सुख समाधान देतात. या अर्थाने बाबा हे आपल्याला विजातीय आहेत. कालपासून दादा फारच थकले आहेत. पण मी मुलाखत घेतली. तुम्हीसुध्दा तुमची इंद्रिये थकतात, त्यावेळी अशीच कार्यक्षम करायला शिका. साधना ही सुलभ, सुटसुटीत व ती करत असताना आपण त्याच्यात पाहिजे. नळाखाली तांब्या धरला असता तो भरायला 3 मिनीटे लागतील. पण ते तांब्यातील पाणी प्यायला मात्र एक दिवस लागेल. एकदा चहा, पाणी, साखर एकत्र केली की चहा तयार होतो. असा एकदा चहा तयार झाला की त्यातील पाणी पुन्हा वेगळे काढता येत नाही. मग तुम्ही एकदा सज्ञानी झाल्यानंतर पुन्हा अज्ञानी कसे होता?
नवनाथ वाचता. अडबंगीनाथानी काय केले? मनात आले ते करायचे नाही, हे तुम्हाला पण साधले पाहिजे. आजपर्यंत साधना मार्गातील साधकानी प्राकृत भाषेत जनतेला ज्ञान का करून दिले नाही हे मला समजत नाही. मला टीका करायचा अधिकार नाही. पण मला सांगावेसे वाटते की, एकदा शक्ति प्राप्त झाली की, साधक आलेल्या भक्ताला तो ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने जाण्यास सांगतो. पण हे करणे बरोबर नाही. माझे म्हणणे असे आहे की तुला एकदा मुंबई-पुण्यातील अंतर 120 मैल आहे हे कळले ना? कोणत्या रस्त्याने जावे हे सांगणारा कोणी नसल्यामुळे एकदा इकडे गेलास, एकदा तिकडे गेलास, एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे असा शोध करीत-करीत शेवटी तुला ईश्वर भेटला.
आता तुला स्पष्ट कळून चुकले की, अमुक एक मार्गाने पुण्याला अगदी सरळ व लवकरात लवकर जाता येते. मग तुझ्याकडे आलेल्या भक्ताला हे पुनश्चरण कर, हा पाठ कर हे सांगतोस कशाला? तू गंगेत उभे राहून 12 वर्षे पुनश्चरण केले असशील. पण आता ईश्वराजवळ अधिकारी झाला आहेस ना? मग ईश्वराला तितक्याच अधिकार-वाणीने सांगता आले पाहिजे की 12 वर्षे पाण्यात उभा राहिलो असेन. पण माझ्यानंतर येणाऱया प्रत्येक भक्ताला एका वर्षांत व तेसुध्दा पाटावर बसून तू दिसला पाहिजेस. हे जो करू शकेल तोच खरा साधक असे म्हणता येईल.