23-02-1962 संदल-प्रसाद

आजपर्यंत अनेक वेळा संदलच्या प्रसादाचे अनुष्ठान लावले असेल पण तो ‘प्रसाद’ म्हणजे काय आहे हे कळले का?  हे जर कळेल तर त्या प्रसादाजवळ काय मागायचे हे कळेल. त्या सत्पुरूषाच्या दरबारचा प्रसाद म्हणजे काय हे तुम्हाला कळलेच नाही. या प्रसादाची चटणी देखील होईल व चांगल्या प्रकारे संभावना केल्यास आपल्या कर्मऋणानुबंधा पासून सुटका होईल. मनुष्य हा काया,वाचा,मनाने बध्द आहे. तो सत्पुरूष जगाचे कल्याण करतो. पण आपण आपलेच अकल्याण करीत असतो.  आपल्या जीवनाचे अमरत्व प्राप्त करून देणारा हा प्रसाद आपली जबाबदारी निर्विवादपणे पार पाडील. पण भक्त त्यांची जबाबदारी पार पाडतो का? हा एक प्रश्नच आहे.

1961 सालापर्यंत या प्रसादाचे पूजन करून मला काय देणार हे तुम्ही त्या प्रसादाला विचारता. पण त्याच प्रमाणे बरोबर आपल्याला त्या प्रसादाला काय द्यायला लागेल याचा कधी विचार केलात काय? कदाचित एका आठवडय़ाच्या अनुष्ठानात नमस्कार करण्याचे देखील विसरला असाल. अनुष्ठान मांडून तीन आठवडे झाले. पण अजून काम झाले नाही म्हणजे त्या प्रसादाने काहीच केले नाही असे का म्हणता?

प्रत्यक्ष काम झालेले दिसले नाही पण अप्रत्यक्ष रुपाने तो प्रसाद काय करतो याचा विचार केलात का? तुम्ही अपेक्षा का करता तर दुख आहे म्हणून. दुख का तर जन्मजन्मांतरातील ऋण आहे म्हणून. पण मी ऋणानुबंधामुळे दुखी आहे,याचा विचारच करायला तुम्ही तयार नाही.  तुमची अपेक्षा पूर्ण झाली पण दुख म्हणजे ऋणमुक्तता झाली का? आजपर्यंच ऋणमुक्ततेसाठी त्या प्रसादाची संभावनाच केली नाही.  तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे व ती म्हणजे जास्तीत जास्त लवकर सुख मिळावे. पण त्याचबरोबर जास्तीत जास्त दुखही येते हे विसरता. गाडी ताशी 30 मैल वेगाने चालली असता आपण पुण्याला पोहोचू व गाडीही चांगल्या स्थितीत राहील हे तुम्हाला कळून चुकले. पण तुम्ही गाडी 90 मैलाच्या गतीने चालविता. परिणामी पुण्याला लवकर पोहोचता पण गाडी दुरूस्तीसाठी पाठवावी लागते. तुम्हाला पुण्याच्या पुढचा प्रवास करायचा आहे की नाही?

आज जी अपेक्षा आहे त्यानंतर दुसरीही पुढे येणारी अपेक्षा पुरी व्हावी असे तुम्हाला वाटते ना? मग एवढय़ा जोरात गाडी चालवता कशाला?  काखान्यात गाडी टाकली की लगेच ती दुरूस्त व्हायला पाहिजे. जरा वेळ लागला की दुरूस्त करणाऱयाचे डोके ठिकाणावर नाही असे तुम्हाला वाटते. तुमच्या जीवनाच्या गाडया अशाच दुरूस्तीसाठी इकडे येतात. पण मी गाडीऐवजी मालकालाच दुरूस्त करतो. या जगात दुर्दैवी कोणी नाही. आपणच दुर्दैव आणलेले असते. एका निश्चित अपेक्षेने प्रसाद पूजनाला लावता. तुम्हाला वाटते 3 आठवडे झाले पण काम झाले नाही. पण या 3 आठवडय़ात अप्रत्यक्षपणें तो प्रसाद तुम्हाला ऋण मुक्त करीत असतो. 800 वर्षांची तपःश्चर्या ऋणमुक्त होण्यासाठी वापरण्याऐवजी दोन चेकचे पैसे मिळावे यासाठी वापरता.

वास्तविक ज्याने चेक दिले तो देखील तुमच्या सारखाच व्यापारी असतो. व्यापारातल्या अडचणी तुम्हाला माहीत असतात. चेक दिला पण काही नड आल्यामुळे पैसे भरू शकला नाही. आजचे पैसे पुढल्या आठवडय़ात मिळतील. पण एवढा धीर कुठे. त्या पैशासाठी प्रसादाचे पूजन करता. परिणामी त्या चेकचे पैसे, 500 रू प्रथम ज्याने तुम्हाला चेक दिला त्याच्याकडे पाठवावे लागतात व मग तो तुम्हाला पैसे देतो. पण हे सर्व करण्यात आशिर्वाद त्याला मिळाला हे लक्षात येत नाही. या मालावर 10 टक्के सुटू देत अशी काहीजण प्रार्थना करता. तुमचा 100रू खरेदीचा माल 110 रूला विकला जावा एवढी अपेक्षा. पण अनुष्ठान लावल्यामुळे जो माल तुमच्याकड़ून विकत घेतो त्याला प्रथम 110 रू आशिर्वादाने दिले जातात व मग त्या व्यवहारात तुम्हाला 10रू सुटतात. अशामुळे शेवटपर्यंत अपेक्षाच करावी लागेल. नोकरीत बढती द्या असा आशिर्वाद मागता. त्या खुर्चीवर जो कोणी बसेल त्याला बढती मिळते. पण नोकरी निरंतर नसल्यामुळे आशिर्वाद घेऊनसुध्दा रिटायर झाल्यानंतर पुनः पैशाची अडचण भासतेच. अभ्यासावर आशिर्वाद न घेता आशिर्वाद घेऊन अभ्यास अभ्यासायचा.

भगवंता बद्दलचे ज्ञान इंद्रियानी न अभ्यासता उपासना चैतन्याप्रत गेली पाहिजे. देहाच्या ठिकाणी होणारा भास हेच सुख समाधान आहे असे समजून त्याच्यामागे हा प्रसाद घेऊन धावता! शक्यतो कर्ज काढू नका असे सांगितले असता देखील 500 रू ची सोय होईल. पण त्याबरोबर येणाऱया ऋणानुबंधाची सोय होऊ शकणार नाही. धर्मशाळेत रहाणारा तेला-तुपाचा भाव विचारीत नाही. पण जो प्रपंचात आहे व आज 5 रू. शेर तूप आहे, आपल्याला झेपणार नाही म्हणून निग्रहाने खरेदी करणार नाही. अशा त्या प्रापंचिक माणसाला की ज्याला तुपाचा भाव कळला आहे,त्यालाच परमेश्वराचा भाव कळेल. तुम्ही ज्यावेळी 10 रूपयांची अपेक्षा करता त्यावेळी ते 10रू. तुमच्याजवळ असायला पाहिजेत. मग आज का नाहीत तर ऋणामुळे. जीवनाला पीळ देण्याची कला अवगत केली नाहीत. तुम्ही पीळ दुसऱयाला देता व स्वतःला पीळ बसत आहे असे भासवीत असता.

ऋणानुबंधाने एकावेळी 300रू जास्त दिले होते. पण विचार पूर्वक खर्च न केल्यामुळे त्याच ऋणानुबंधाने आज 300रू कमी दिले आहेत. पाण्याचा लोंढा येतो व भिंतीला आपटून परत फिरतो. तसेच एकावेळी पैसे मिळाले पण आज कमी पडले. मुलाच्या फीची सोय करण्यासाठी बाप 100 रू कर्ज काढतो. हे 100 रू मुलाच्या ऋणानुबंधात लिहीले नसताना देखील ते घातले जातात. शेवटी मुलाचा ऋणानुबंध इतका चांगला होतो की. B A ला First Class आलाच पाहिजे. पण ते दोषास्पद असे 100 रू त्याच्या जीवनात आल्यामुळे III Classमध्ये पास होतो. मी म्हणतो“साधना कर. तुला ऋणमुक्त करतो”. पण तुम्ही म्हणता मला दुख मुक्त करा.  तुम्ही तुमच्याबरोबर दुख भरपूर आणलेले असेल पण माझ्यासारखा ऋणमुक्त करणारा भेटला आहे हे केवढे सुख आहे.

प्रसादाला प्रार्थना एकच करा वज्रासारखे कर्म कठीण होऊन उभे राहिलेले आहे त्याला बाजूला कर! आंब्याचे फळ हे त्या झाडाला दूर नाही तर बागवानाला दूर आहे. तसेच तुमचे इच्छित फळ तुमच्या जीवनापासून दूर नाही तर तुमच्या जीवनात अपेक्षारूपी जो बागवान आहे त्याच्यापासून ते दूर आहे.  हा तुमच्या जीवनातला बागवान बाहेरच्या जगात पेरू आले आहेत हे पाहून आपल्या झाडाला अजून आंबा कसा आला नाही याचा विचार करतो. आंबा हा कधीही आंबट नसतो. तो तुम्ही नको त्यावेळी पाडता म्हणून आंबट लागतो. वास्तविक त्या आंब्याला काठीने पाडण्याची काहीही जरूरी नाही.  योग्यवेळी झाड फलाचा त्याग करीलच. पण आपणाजवळ सबूरी नाही. सगळीकडे पेरू बघितले व आंबा खाण्याची लहर आली.  विचार केला नाही की हा मोसम पेरुचा आहे. काही दिवसानी आंब्याचा येईल. पण एवढा धीर नाही. मग डब्यातला आंबा आणून खायचा. पण हे सगळे अनैसर्गिक आहे हे लक्षात घेत नाही. वासना पुरी होते. पण आंबा ठेवलेला डबा, तो आंबा, त्याची किंमत व विकणारी कंपनी एवढय़ा गोष्टीचा ऋणानुबंध तुम्ही जोड़ून ठेवता. पैसे खर्च होऊन गेले व फळाच्या मोसमात खरा आंबा खाण्यासाठी काही शिल्लक रहात नाही.

डब्यातला आंबा 2।। रू डझन व आज 2 रू डझन हा भाव आहे. पण पैसे नाहीत. अशाच अनेक गोष्टी नकोत त्यावेळी आणल्यात व आज अपेक्षा करीत बसला आहात. तुमच्या घरचा रखवालदार कुत्रा म्हणजे विजातीय केल्यास तो काम बरोबर करेल. पण तोच नोकर म्हणजे सजातीय ठेवलात तर चुगली केल्याशिवाय रहाणार नाही.

तुमच्या जीवनाचा अपेक्षा हा नोकर न ठेवता बाबांना करा!

अपेक्षेला संरक्षक केलेत तर 1000 रू. कर्ज काढाल. त्यावेळी 500रू कर्ज भागेल. पण सद्गुरूला संरक्षक केलेत तर 500रू कर्ज भागून 500रू. घरात रहातील. तुमच्या जीवनात अपेक्षेची गर्दी फार. रेल्वेला गर्दी फार म्हणून आपण महिन्याचा पास काढतो. तसाच हा प्रसाद म्हणजे पास दिलेला आहे. पण तो महिन्याचा अगर वर्षाचा नसून जन्माचा दिलेला आहे. फेब्रुवारीत अनुष्ठान लावलेत.  पण या महिन्यात कुठलाही त्रास होणार नसेल पण मार्च महिन्यात ऋणानुबंधाप्रमाणे काही त्रास होणार असेल तर फेब्रुवारीत पुजन केलेला प्रसाद पुढील ऋणानुबंधाचे विमोचन करतो. शब्द अडला तर Dictionary बघता. कर्माची डिक्शनरी तयार झाली नाही. कर्माची Directory (डिरेकटरी) मात्र आहे.

1961 साली पूजन कराल तर 62 साली येणाऱया दुखाची तीव्रता कमी करेल. असाध्य तंत्र आहे ते. हे सर्व कार्य अप्रत्यक्षपणे चाललेले असते. तुमची विचार करण्याची पध्दतच वेगळी आहे. गाडीने पुण्याला गेलात तर गाडी भाडे 5 रू अशी नोंद करता. पण गाडीने 120 मैल आणलेले असते व मनुष्य भेटून इच्छित कार्य झालेले असते हे लक्षातच घेत नाही. थकला-भागलेला मनुष्य एक कप चहा पिऊन सुखावतो. मग 800वर्षाची तपश्चर्या पाठीशी असणारा हा प्रसाद काहीच का तुम्हाला देणार नाही. क्षणानी नाही,दिवसानी नाही तर जन्मजन्मांत येणाऱया कर्माचे देखील विमोचन करील. अज्ञान व्यक्त करता येते म्हणून का ते व्यक्त करायचे असते! तुमच्या डोळय़ानी जेवढे शक्य आहे तेवढे दूरवरचे तुम्ही पाहू शकता. मग प्रसादही त्याला जेथपर्यंत पहाता येईल तेथपर्यंत पाहिल्या शिवाय रहाणार नाही. या जन्मात दुख नसेल तर पुढच्या जन्मात येणाऱया दुखाचे विमोचन केल्याशिवाय रहाणार नाही.  उद्या पटले  नाही म्हणून इथून जरी निघून गेलात तरी प्रसाद आपले कार्य करण्याचे थांबणार नाही. इथे असशील तर म्हणशील की बाबांच्या कृपेने सुख मिळाले. बाहेर गेलास तर माझ्या नशीबाने मिळाले असे म्हणशील. तू कुठेही जा. पण बाबा अगर नशीब म्हणजे दुसऱया कोणीतरी आजचे सुख दिले आहे. तू काही मिळवले नाहीस,हा सिध्दांत खरा ठरतो.

61 साली पडलेला पाऊस साठवून ठेऊन 62 साली पिण्यासाठी पाणी दिले जाते. पण पावसाचे समाधान कोणाला तर ज्याची जमीन आहे त्याला. आम्ही धान्य बाजारात आल्यावर खरेदी करायला जाणारे लोक आहोत. आमचे जीवन सद्गुरूरूप झालेले नाही. त्यांनी 800 वर्षे परंपरा टिकवली. आम्ही 8 दिवससुध्दा धीर धरू शकत नाही. अंथरूणातून पारोसे उठूनच प्रसादाला विचारत असतो की काम करशील ना? औषध फार कड़ू पण ताप लगेच उतरतो. मला तुम्हाला भेटण्याची दुर्बुध्दि दिली पण तुम्हाला मात्र तो निश्चितच सद्बुध्दि देईल. तुम्हाला वाटत असेल की हा प्रसाद दररोज पूजनात ठेवावा. पण तसे करू नका.

दररोज शाळेत दिसणारे मास्तर व फळा याचे महत्व आपण जाणत नाही. तशी परिस्थिती या प्रसादाची कराल म्हणून पौर्णिमेलाच याची पूजा करा. दोन प्रसाद सांभाळणे जड वाटते मग तुमचे दोन डोळे जड होत नाहीत का? चार आण्याचा माठ उन्हाळा संपला की घासून पुसून माळय़ावर ठेवता. साध्या माठाचा लोभ सुटला नाही मग या प्रसादाचा लोभ तुम्हाला नाही यावर माझा विश्वास बसत नाही. प्रसाद सांभाळण्यासाठी घाबरता काय?  जबाबदारी माझ्यावर आहे. 800 वर्षाचा विचार झाल्याशिवाय तो प्रसाद झाला नाही व कार्यपध्दतीत आला नाही. या विश्वात जी पंचमहाभूतात्मक शक्ति आहे ती जर आपणाला कुठलाही नवस न करता मिळते मग देवसुध्दा तसाच नैसर्गिकपणे का मिळू नये. त्यासाठी नवस सायासांची जरुरी काय?