24-2-1962 शनिवार

आज,या ठिकाणी तीन प्रकारचे भक्त बसलेले आहेत. पहिला वर्ग अविवाहित दुसरा विवाहित व तिसरा वार्धक्य प्राप्त झालेले. नवनाथ कथासार वाचताना तुम्हाला एक गोष्ट आढळली व ती म्हणजे प्रत्येक नाथाला कोकशास्त्र शिकवले होते. हे वाचून तुम्हाला धक्का बसतो. त्या अभ्यासाने जन्म उत्पत्तीची शास्त्रीय मीमांसा शिकवली.

आपण इकडे का आलो तर दुख जाऊन सुख मिळावे म्हणून. पण दुखे का आलीत हेच जर कळले नाही तर भावी पिढीला तीच दुखें भोगावी लागतील. आज आमच्याकडे अशी विचार-सरणी रुढ झाली आहे की देव हा फक्त म्हातारपणी पूजायचा. या विचार-सरणीमुळे आपण आपल्या बालकाच्या आयुष्याचे नुकसान करतो. दुखाचा अभ्यास करा. अमुक एक गोष्ट म्हणजे सुख असे तुम्हाला वाटते. पण त्याचवेळी समाजातील एकाला ते सुख का मिळत नाही? दुख म्हणजे जन्मजन्मांतरातील आपण पुरा न केलेला ऋणभाग आहे. मनुष्याचा जन्म झाला की त्याच्याबरोबर जन्मऋणानुबंध म्हणजे काया,वाचा मन.  कर्म म्हणजे गतजन्मांतील ऋणानुबंध व देवऋण म्हणजे जीव, एवढय़ा गोष्टी येतात. आपण थोडावेळ निसार्गाकडे पाहू. मानव व निसर्ग यात कोणत्याही प्रकारे भेद नाही. आंब्याचे झाड म्हणजे फळ-फूल, जीव हे आलेच. जीव म्हणजे झाडाचे मूळ. जीवन पूर्णावस्थेला गेल्याचे प्रतीक म्हणजे प्रथम फूल. त्यानंतर फळ व त्यानंतर पुनश्च जीव त्या फळांत अंतर्भूत होतो. म्हणजे आंब्याची वाढ होऊन त्यातील कोय तयार होते. काया,वाचा,मनाची आजची कर्मे म्हणजे पुढच्या जन्माची तयारी. पण काहीजण म्हणतात पुढचा जन्म कोणी बघितला. पण निदान 60 साली चांगले केलेत तर त्याचे फळ 61 साली तुम्ही अनुभविता. झाडाला उत्तम फळे यावीत,म्हणून माळी पहिल्यापासून उत्तम खतपाणी घालतो. आम्ही आमच्या मुलांना खतपाणी घालत नाही तर त्यांच्या भावी आयुष्यात चांगली फळे यावीत कशी? आज आपली परिस्थिती अशी झाली आहे की गावातल्या सगळय़ा झाडाना मोहोर आला पण आपल्या झाडाला मोहोर आला नाही म्हणून आपण वरपासून झाडावर पाणी ओततो. ते पाणी झाडाची पानें शोषून घेत नाहीत व त्यामुळे खाली पडते. पानावर पाणी टाकून फळ मिळत नाही. पण इथे मात्र अनुष्ठान लावल्याबरोबर पैसे मागता. तुम्ही अनुष्ठान 1–9 लावलेत की ते देवऋणात जात असते. 12 दिवसाचे मूल व तुमच्यात काहीही फरक नाही. आंब्याच्या झाडाचा जीव जशी शक्ति जमिनीतून घेतो त्याचप्रमाणे आपले चैतन्य उपासनेमधून शक्ति शोषून घेते. अर्ध-कच्या फळाचा उपयोग नाही.

संदलचा प्रसाद वर्षभर पूजला. पण फळ मिळत नाही. पण झाडाला फळे येत नाहीत त्यावेळी फळे आणण्याचा प्रयोग केला हे लक्षात नाही. इतरांना सुख मिळाले व तसेच मला देखील मिळावे या भावनेने इकडे येता. पण त्याला फळ मिळण्याच्या मागे त्याचे कुटुंब, आचार, विचार, त्याच्या पूर्वजांची पुण्याई, या सर्व गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत. आपण चष्मा लावला आहे व सगळे जग हिरवे, पिवळे दिसत आहे. आपल्या डोळय़ात अगर जगात फरक नाही तर चष्म्याच्या काचेत फरक आहे. फळाच्या प्राप्तीसाठी तुमचे अनुष्ठान फार उशीरा लावलेले आहे. आज पाणी घालत आहात तर फळ पुढल्या वर्षी मिळेल. झाड ज्या जीवनात उभे असते त्या जीवनातून आवश्यक ती द्रव्ये घेत असते. आपले शरीर देखील अशीच पंचतत्वे घेत असते. आपल्याला तेज तत्व कमी पडत असेल तर पेट्रोल घालून चालणार नाही तर त्याऐवजी ईश्वराचे अंतर्भूत तत्त्वच घालायला पाहिजे. पाच आठवडे अनुष्ठानाला झाले पण फल नाही हे म्हणणे म्हणजे फूल नको पण फळ पाहिजे. दुख नको पण सुख पाहिजे असे होय. पण मूळ-तत्वात बदल कसा होईल. मनुष्य बोईंगमधून लंडनला जाईल. पण पोहोचल्यानंतर पायीच चालतो. मधल्या अंतराला म्हणजे आचार विचारां ना गती मिळेल. पण मूळ-तत्वात बदल होणार नाही.

Boeing बोईंग विमान हळू-हळू तुकडे एकमेकाला सांधून तयार केले जाते. लहान तुकडे वापरताना लक्षात येत नाहीत. पण एकमेकाला जोडल्यानंतर एवढे मोठे विमान तयार होते की विमानापर्यंत पोचायला पायीच जावे लागते. आपल्या कर्माचेसुध्दा Boeing असेच हळू-हळू तयार होत असते. पूर्णपणे तयार झाल्यावरच आपल्या लक्षात येते. तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही.‘अ’नावाची व्यक्ति आहे. त्याच्या 40 वर्षाच्या जीवनात संस्कार झालेले नसतात. मग इकडे येऊन विचारणार, मी विडा लावला आहे एवढेच तुम्हाला माहित असते. पण तुझा ऋणानुबंध कुठपर्यंत पोहोचतो आहे हे माहीत नाही. तुमच्या जीवनाच्या गाडीचा Conductor कंडक्टर म्हणजे दुर्बुध्दि व अविचार हा आहे. त्या कंडक्टरला मरायचे नाही तर मरणार तुमचा जीव! तो बाजूला होतो व पुन्हा जन्माला तू येईपर्यंत वाट बघत असतो. असा हा कंडक्टर मागील बाजूला काय करतो आहे, खरी खोटी तिकीटे किती देतो आहे त्यावर लक्ष ठेवा. एकतर त्याला पुढे घ्या किवा त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी पुढच्या बाजूस सद्गुरु माऊलीच्या कृपेचा आरसा लावा. हा कंडक्टर मागल्या बाजूला काही जोडत नाही तर मोडतो आहे. त्याच्यावर लक्ष ठेवले म्हणजे हा जीव थांबेल. त्यावेळी त्याला चहा प्यायला उसंत देणार नाही. आंब्याच्या फळात जीव आहे व त्याने अशाच असंख्य जीवाना जन्म द्यायचा आहे व आपल्या जीवाने देखील अशाच असंख्य जीवाना जोडायचे आहे. बाबांनी अशाच अनंत जीवाना जोडलेले आहे. पण फल, अपेक्षेला का जीवनाला? जीवनाला फल पाहिजे असल्यास जीवन कसे उभे आहे,याचा विचार करा. ज्या झाडाला फळे आली त्याची काळजी बागवान करीत नाही तर फळ न आलेल्या झाडाची करतो. सुख म्हणजे काय तर फळाची पूर्णावस्था व अपूर्णावस्था म्हणजे दुखः. पण सुख म्हणून जे म्हणतो ते सुख नसून पूर्णावस्था आहे. या न्यायाने ते जर सुख नाही तर ते दुखही नाही. काही काळानंतर आई-बापा ना आपली मुले मारावी लागतील. कारण ती कच्ची फळें असतील. तुम्ही जीव जन्माला घालता पण त्याच्यामागे घटना,कार्य,परंपरा व मीमांसा असते. याचा कधी विचार केलात का?

जन्माला आल्यानंतर काय घडायला पाहिजे व काय घडत नाही याचा आपण विचार करु लागतो. फल आपली पूर्णावस्था प्राप्त करु शकतो मग मनुष्याला ते का साधत नाही? कारण फलाची पूर्णावस्था व्हायला दुसऱया गोष्टीची जरुरी लागत नाही. पण स्त्री-पुरुष एकत्र आल्याशिवाय आपला जन्म होत नाही. माता व पिता या दोघांची इच्छा असून एकत्र आल्यास जन्माला येणाऱया जीवाला जन्म, कर्म व देवऋणानुबंध सारख्या प्रमाणात मिळत असतो. 9 महिने गर्भ वाढत असतो. 3 महिन्यांनी गर्भाचे द्रवरुपातून घनरुप व्हायला लागले की त्या जीवाचा कर्मऋणानुबंध चालू होतो. हळूहळू हात पाय येऊ लागतात.  व वयाच्या वाढीबरोबर ते वाढतच असतात. पण जीव मात्र शेवटपर्यंत असतो तेवढाच असतो. मूल 12 दिवसांचे असते पण त्याचा ऋणानुबंध परिपक्व असतो. मुलाच्या ऋणा नुबंधनाप्रमाणे 2 वर्षांनी बापाचा मृत्यू असतो पण अशावेळी बाप सांगत असतो की पाचवी-सहावीची पूजा नको. बारसेसुध्दा नको! वास्तविक ऋणानुबंधनाप्रमाणे काहीवर बऱयावाईट गोष्टी घडणार असतील तर त्याचे परिमार्जन व्हावे म्हणून सोळा-संस्कार सांगितलेले आहेत पण त्याचे पालन करत नाही. नऊ महिन्याच्या काळात आईला डोहाळे लागतात. गतजन्मातील राहिलेल्या इच्छा, वासना या जन्माला येऊ नयेत म्हणून त्या-त्या पदार्थाची इच्छा डोहाळय़ाच्या रुपाने मातेच्या ठिकाणी उत्पन्न होत असते. पण आपण कधी प्रेमाने मातेला जिन्नस घालतो का? आपण लाड़ू खाऊ घालत नाही मग त्या जीवाच्या बाराव्यापर्यंत लाड़ू खाणे चालूच असते. जीव म्हणतो एक दिवस पदार्थ खाऊ दे. गतजन्मातील त्या पदार्थाची वासना सोड़ून देईन! त्या जीवाला वाटत असते की,गत-जन्मातील वासनामुळे आपल्या भावी मात्यापित्यांना त्रास होऊ नये. किती सात्विक तत्वाने तो जन्माला येऊ मागतो. पण आपण त्याची इच्छा पुरीच करत नाही. त्यामुळे मुलगा भेळेची गाडी बघितली की ओरड़ू लागतो. तुम्ही मुलगा फार हटवाही म्हणून रागावता. पण हटवाही कोणासारखा-बापासारखा की आईसारखा. या नऊ महिन्यात आचार-विचार शुध्द व धार्मिक ग्रंथ वाचून त्या जीवावर चांगले संस्कार करायचे असतात. 9 महिन्यात तो अमरत्व निर्माण करीत असतो. एका संस्काराचा त्याग व एका संस्काराची जोड! किती पावित्र्य टिकवीले पाहिजे. हे जन्मऋणानुबंधाचे कोडे प्रजापितला उलगडेना म्हणून तो नाथांना शरण गेला. गत जन्मातील 50 वर्षाचा त्याग व पुढील जन्मातील 60 वर्षाची जोड म्हणजे एकंदर 110 वर्षाचा ऋणानुबंध नऊ महिन्याच्या काळात जीव पुरा करीत असतो. यावरून त्याची किती गती असेल याची कल्पना करा.

बरे,जन्माला आल्यानंतर नाव तरी चांगले ठेवले का?नाव काय तर‘राज’व कौतुक काय तर महिन्याचा आहे पण वाटिभर दूध पितो.  दिवस गेल्यानंतर आई-बाप संध्याकाळी बागेत फिरायला जातात.  घरातल्या वडिलधाऱया माणसानी सांगितले तर म्हणतात आम्हाला कोण खाणार आहे. मी म्हणतो तुला मनुष्य खाणार नाही पण बागेतील अविमुक्त जीव खाल्याशिवाय सोडणार नाही. असा हा मरिन-लाईन्सच्या बागेतील मुलगा वाटीभर दूध पिईल नाही तर काय करील. बापाची इच्छा होती पण आईची एकत्र यावी ही इच्छा नव्हती. पण अशावेळी गर्भधारणा झाली तर ती अनैच्छिक संतती समजली जाते. अशा वेळी मला नको होती गर्भधारणा पण झालेली आहे. अशी सतत 9 महिने भावना आईच्या ठिकाणी असणार. त्याच प्रमाणे आईची इच्छा पण पित्याची इच्छा नाही अशा वेळी होणारी देखील संतती अनैच्छिक असते. पण अशा जीवाचा भाग्योदय पिता अगर माता गेल्याशिवाय होत नाही!अशा संततीच्या मागच्या कर्माचा त्याग होत नाही. तुम्ही म्हणता एवढे चांगले दिवस आले पण वडील बघायला राहिले नाहीत. पण वडिलाना घालविल्याशिवाय त्याचा भाग्योदय होणार नाही. माता व पिता ही पोरखेळच म्हणून एकत्र येणारी असतील अगर केवळ सवय म्हणून येणारी असतील तर अशा जीवाचा भाग्योदय दोन्ही माता-पिता मेल्याशिवाय होत नाही. आईची इच्छा असल्यामुळे मागच्या जन्माचा ऋणानुबंधाचा त्याग होतो व पित्याच्या इच्छेमुळे पुढच्या जन्माचा ऋणानुबंध जोडला जातो. पण आईबापाची दोघांचीही इच्छा नाही अशा संततीने कुठे कुठे हिंडायचे? त्याला कितीही गंडे-दोरे केलेत तरी काहीही होणार नाही. त्याला उपाय एकच व तो म्हणजे वंशविमोचन व कर्मविपाक हा होय.

पुरुषत्व प्राप्त झाल्यावर तुमचे कर्म चालू होते पण मागील ऋणानुबंध किती प्रकारचा असतो हे माहित नसते. पाचवी-सहावी का करायची तर सटवाईला सांगितले जाते की बघ,बाळाच्या कर्मात जर काही वेडे वाकडे लिहिलेले असेल तर ते‘नीट कर’. पण आज धर्म नाही मग कर्म कुठे जाणार? आज गर्भधारणा झाल्यावर‘संतती’नको असल्यास डॉक्टरकडून ऑपरेशन करून घेता. एकदा जीव जन्माला आल्यानंतर तुम्हाला मारण्याचा अधिकार नाही. त्या जीवाची आयुर्मयादा 60वर्षे असल्यास तितकी वर्ष अदृश्य रूपाने तो तुमच्या मागे असतो. त्यामुळे येणारे दु;ख एवढय़ा वेगाने येते की,एखादे मोठे दुखणे तुमच्या ऋणानुबंधाप्रमाणे 5 वर्षांनी येणार असेल तर ते त्या जीवामुळे 1 वर्षांतच येऊन तुमची राखरांगोळी होते. तुम्ही माझ्यासामेर बसता व सांगता की 500रू. मिळवितो पण चार माणसाना पुरत नाहीत. पण भोजनाच्यावेळी पानावर 4 माणसे तुम्हाला दिसतात. पण त्याचवेळी अदृश्य रूपाने 6 जीव जेवत असतात. हे तुमच्या  ध्यानात येत नाही. कारण एक जीव मारलात तो एकटाच नव्हता,तर त्याच्या ऋणानुबंधांत 25व्या वर्षांत लग्न व त्यानंतर चार मुले होती. हा सर्व ऋणानुबंध तुम्हालाच भोगावा लागतो. तुम्हाला देव नको असल्यास त्याची पूजा करणार नाही. बापाला व आईला त्यांचा त्रास होत असल्यास काशी यात्रेला पाठवून द्याल. भावाचे वेगळे बिऱहाड थाटून देशील, सर्व काही कराल पण हा ऋणानुबंध कुठे पाठवाल? तुम्हाला बरकत का नाही याचा अभ्यास करा. अशा या होणाऱया त्रासापासून संरक्षण म्हणून ज्ञानसंवेदनाचा वर्ग आहे. पण कितीजण आपली मुले पाठवतात.

मी म्हणतो म्हणून नाही पण निदान तुमच्यासाठी तरी बाबांच्या समोर आपल्या मनाला ग्वाही द्या या सर्व दोषापासून मुक्तता होण्यासाठी 21 प्रसाद आहेत. दुखःच्या कारणापासून जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत सुखाची पूर्णपणे प्राप्ती होणार नाही. साधकाला समोर बसलेल्या भक्ताने पूर्वजन्माचा त्याग व प्राप्त जन्माची जोड केली आहे का नाही हे बघावे लागते. एवढया सर्व गोष्टी तुमच्या पाठीमागे आहेत, नाही तर आम्ही ‘मंजूर’ असे आम्ही म्हटल्याबरोबर तुमचे काम 8 दिवसात व्हायला पाहिजे. मातेच्या नाभीभोवती गर्भ फिरतो. कारण एकाचा त्याग व दुसऱयाची जोड करायची असते. पुढचे जोडतो ते पुन्हा तो मागे टाकत असतो. कारण येणाऱया जन्मात 60 वर्षाच्या काळात त्याला ते कर्म पुढे आणायचे असते.  आपण मनाशी ठरविले की उद्यापासून बाबांच्या आरतीला जायचे. पण सुरवात ठरल्याप्रमाणे न होता 3 दिवसानंतर झाली तर 3 आगाऊ जोडले व मागच्याचा त्याग केला नाही हे समजावे. संकल्पाची अनुरूप विभक्ती अशी जोडली आहे. जीव आहे पण जीवनत्व पूर्ण नाही. फूल आहे पण फळ नाही. योग्यवेळी खतपाणी न घालण्याचा हा परिणाम आहे.

स्तोत्रांच्या रूपाने लहान मुलांना संवेदना देत असतो पण योग्यवेळी संस्कार न झाल्याने मुलगा मोठा झाल्यावर त्याचे व बापाचे पटत नाही. मग एक दिवस Inter-Caste marriage (अंतर जातीय विवाह) करतो. आपण म्हणतो एवढे सुशील घराणे पण मुलगा अगदी गाढव निघाला. मुलगा गाढव नाही तर त्याचा बाप गाढव आहे. प्रत्येक आईला वाटते की माझा मुलगा कलेक्टर व्हावा. पण सगळेच कलेक्टर झाल्यावर व्हायचे कसे. मुलाच्या आईची आई ‘श्री’ उलटी काढत असे व मुलाची आई सुलटी ‘श्री’ काढत होती. वडिलांच्या बाजूनेही कोणी विशेष शिकलेले नाहीत. अशा परिस्थितित कलेक्टर होण्यासाठी आशिर्वाद मागता,याचा विचार करा.

मातृपितृ घराण्यातील लोक Inter (इंटर) पर्यंत शिकले ले  असतील तर मुलाच्या ऋणानुबंधात नसलेली दोन वर्षे मी घालून त्याला B. A.  करीन.  पण मुळात‘श्री’चा पत्ता नाही व ज्ञ’पर्यंत शिकला पाहिजे. अशा मागण्याने काय होणार आहे?आपल्या शास्त्रात मातृ-पितृ व आचार्य देवोभव असे तीन देव सांगितलेले आहेत. आचार्य म्हणजे जो सज्ञान करतो तो असा आहे. या तीन देवांचे 33 कोटी देव आपण केले. नर्मदेत गेला ‘शाळीग्राम’ सापडला. दुसऱया ठिकाणी ‘गणपती’ सापडला पण या सर्व देवांना गोळा करणारा हा 5 फुटी देव कोणी पूजायचा!

मुलाला त्रास होऊ नये म्हणून बाप सोमवार करतो. बापाने शक्ति जोडली पण बाप मेल्यावर मुलाने सोमवार चालू ठेवले तर ठीक,नाहीतर मुलाच्या बदल्या व्हायला लागतात. मुलाने स्वतः उपासना केली असती तर आलेला खड्डा त्याने ओलांडला असता. मनुष्य रिटायर होतो व बुध्दीला भ्रम होऊन सगळा पैसा व्यापार करण्याकरीता देऊन टाकतो. कारण काहीही जोडलेले नाही. ज्याच्या ऋणानुबंधात ‘संतती’नाही अशी भक्तमंडळी बाबांसारख्या सत्पुरूषाच्या आशिर्वाद घेतात. संतती होते पण तो जीव ‘जन्म-कर्म ऋणानुबंध’ न आणता फक्त ‘देवऋणानुबंधच’ आणतो. अशा संततीला देव म्हटल्याशिवाय पाणीसुध्दा मिळणार नाही. अशा लोकाच्या घरात केवढे अधिष्ठान पाहिजे. त्या जीवापासून होणाऱया सातही पिढय़ा देव-ऋणानुबंधनातल्याच असतात. पण नेमके याच वेळी आजोबा नातवाला सांगत असतात की तू फक्त वाटीभर दूध पीत जा. सध्या देव नको.  म्हातारपणी आहेच तो! पण यामुळे फार वाईट दशा प्राप्त होते.

पै-पैसा ठेवलात तर सार्थकी लागणार नाही. पैशाबरोबर सुविचार ठेवाल,संचितात पुण्याई ठेवाल तर तुमच्याच मुलाबाळांना दुख हा शब्द वापरावा लागणार नाही.