7-3-1962 बुधवार

आपल्या मुलाबाळांचे शिक्षण चांगल्याप्रकारे व्हावे, त्यांच्या भावी जीवनात त्याना कशाचिही ददात पड़ू नये, अशी प्रत्येक माता-पित्याची इच्छा असते, त्यांचे पालन-पोषण केले म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही.  त्यांच्यावर देवऋणानुबंधाचा लहानपणापासून संस्कार केला पाहिजे तरच भावी जीवन चांगल्या प्रकारे जाईल. पण तुम्ही सुखी कुटुंबाचे चालक, मालक का पालक?  चालक असाल तर कुटुंब तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालेल,  मालक असाल तर कुटुंबाची आपणावर जबाबदारी आहे याची आपणास जाणीव असेल.  पण या स्वतः मालकाची जबाबदारी आणखी कोणावर तरी असते!

देवादिकांच्या ऋणानुबंधाने चालना दिली. मग या देहाचा मालक कोण तर जीव म्हणजे शक्ति व जी चा धर्म या देहाच्या ठिकाणी चालना निर्माण व्हावी.  तुमच्या अपेक्षा पुरी कोण करणार?  आज जीवनाचे माध्यम पैसा आहे, पण हे बाह्यांग आहे.  पैसा असल्यास वस्तू निर्माण करू शकाल पण उणीवा पुऱया करू शकणार नाही. लहान मुलाला एखादी मोटार गाडी,  खेळणे देऊ शकाल पण त्याला उत्तम Career ( जीवन ) देऊ शकाल का?  अंतर्यामी त्या शक्तीचा साठा आहे की नाही याचा विचार करायला पाहिजे. जन्मऋणानुबंध जोडून कर्म-ऋणानुबंध पुरा करावयाचा असतो. आपण अन्न खाल्ले तर त्याचे समाधान मुलाला देऊ शकत नाही. मग आपण केलेली उपासना मुलाला कशी देऊ शकाल?  तुमचे स्वतःचे विमोचन होऊन तुमचा देवऋणानुबंध शिल्लक राहिला तरच तो मुलाला देऊ शकाल.  कुणाचेही देणे-घेणे शिल्लक राहिलेले नाही, म्हणजेच देवऋणानुबंध शिल्लक, पण हे केव्हा घडेल तर पुनश्च तशी कर्मे घडणार नाहीत तेव्हा. पण ती तर रोज घडत आहेत. पण पुण्य तुमच्या शिलकीत काय रहाणार? व त्यातला वाटा तुम्ही तुमच्या मुलाबाळांना कसा देणार.

घरातील एकानेच उपासना करून चालणार नाही. सगळय़ानी हातभार लावला पाहिजे. तरच कुटुंबाचा उध्दार होईल. या ठिकाणी 5 दिवे आहेत. विजेची शक्ती सगळय़ाशी जोडलेली आहे व Main म्हणजे मुख्य बटन दाबला की सगळे दिवे एकदम लागतात.  तुमच्या उपासनेचा करंट तुमच्यापासून तो पाळण्यातल्या मुलापर्यंत पोहोचू शकतो का?  एकवेळ धरून चला की,  तसा करंट पोहोचतो. पण त्याच बरोबरचा धोका लक्षात येत नाही. Main बटनाचा फ्यूज उडाला की सगळे दिवे बंद!  उपासना करणारे घरातील आजोबा म्हणज (Main) गेले की,  कुटुंबात सगळीकडे अंधार!  यावरून तुमच्या लक्षात येईल की, प्रत्येक दिव्याचे बटन वेगळे पाहिजे. म्हणजेच उपासना प्रत्येकाने केली पाहिजे. आपणच ऋणमुक्त नाही तर इतरांना काय देणार?

तुम्ही वडिलाजवळ हट्ट धरता, वडील रागावतात, मग सहाजिकच वडील ऑफीसमध्ये गेल्यावर आईकड़ून तुमची मागणी पुरी करून घेता. एकदा आईच्या देखत वडील तुम्हाला रागावलेले असल्यामुळे आईला पुन्हा रागावता येत नाही व मुलाचा हट्ट पुरा करावा लागतो.  लहान मुलगा जसा आईवडिलाकडे जातो तसेच तुम्ही माझ्या कड़ून काम होत नाही असे बघून हाजीबाबांकडे धाव घेता हे मला माहीत आहे. घरात धान्य कमी पडले तर किती आणायला पाहिजे याचे मोजमाप ठरू शकते. पण उपासना किती कमी पडते आहे हे कळण्याचे मोजमाप का नाही?

तुम्ही पूजाअर्चा करता, एवढी काही मुलाना करायला नको पण एखादे स्तोत्र किवा त्यांच्या कलाकलाने जरी नामस्मरण केले तरी तुम्हाला होणारा त्रास 20 टक्याने ते कमी करू शकतात. त्यांची कर्मेद्रिये व ज्ञानेंद्रिये तयार होत असतात.  त्याना इच्छा, वासना, विकार यांचे अज्ञान असते.  त्यांना एकच गोष्ट माहित असते व ती म्हणजे देवाचे नाव घेणे हे होय. म्हणून लहान ध्रुवाला ‘देव’ भेटला. लहान मुलाला देव 12 महिन्यात भेटला तर मोठय़ा माणसाला कि वा साधूला 12 वर्षांनी भेटेल. आज तुमचे वजन काय तर 120 पौंड. पण हे वजन जन्माला आलात त्यावेळी एवढे नव्हते. पाळण्यात होता त्यावेळी वजन 8 पौंड होते. पण 120 पौंड वजन व्हायला 25 वर्षे लागली.  त्याचप्रमाणे समोर बसून सांगता की 300 पौंड वजनाचे दुख माझ्या पाठीशी आहे. पण त्याचे कारण सांगाल की नाही?  पण आम्हाला कारण समजत नाही. जन्माला आलात त्यावेळी 8 पौंड होते. त्याचप्रमाणे कर्मऋणानुबंध बरोबर होता तरी काया, वाचा पूर्ण होऊन देह धारण झाला, त्यावेळी काही 300 पौंड दुखाचे गाठोडे आणले नव्हते. या मधल्या काळात त्याची आपणच वाढ केली आहे.

तुम्ही छाया दाखविता पण मूळ रूप दाखवा ना!  सुख कसे सांगावयाचे हे शिकला नाहीत, त्यामुळे दुख कसे व्यक्त करायचे हे कळले नाही. ईश्वराने आदिमातेच्या ठिकाणीअसणाऱया आधिदैवताचा परिमल स्त्री ठिकाणी निर्माण केला. पण आज उपभोग्य वस्तू याशिवाय आपल्या मनात विचारच येत नाहीत. बरे, आजपर्यंत संसार केलात, मुलेबाळे झाली. आता तरी पवित्र भावनेने त्या बालकाच्या मातेकडे  तुम्ही बघता का? ज्यावेळी गर्भधारणा होते त्यावेळी ज्यांचा अन्नमय कोशच शिल्लक राहिला आहे अशाच जीवांना ईश्वर पाठवितो. इतर जीव देहा व्यतिरिक्त या वातावरणात असतात व स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. अन्नमय कोश घेऊन आलेल्या जीवाचे जीवन अन्नमय कोशानेच होत असते. कारण माता जे काही अन्नग्रहण करील त्यातूनच त्या जीवाची वाढ होत असते. जीवाला सर्व काही माहीत असते. त्याची एकच इच्छा असते की गतजन्मात जे माझ्या हातून घडले ते पुनश्च या जन्मात घडू नये. यासाठीच त्याची धडपड चालू असते.

अभिमन्यू गर्भावस्थेत असताना श्रीकृष्ण एकदा सुभद्रेला चक्रव्यूहाविषयी माहिती सांगत होता. माहिती सांगत असताना मातेला झोप लागली. पण गर्भ म्हणजे जीव ते ऐकतच होता. 18 वर्षानंतर द्रोणाचार्यानी व्यूह रचला पण याचा भेद कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर, श्रीकृष्णाने अभिमन्यूचे नाव सुचविले ते ऐकून त्याच्या प्रत्यक्ष बापाला म्हणजे अर्जुनाला आश्चर्य वाटले. त्यावर हे ज्ञान अभिमन्यूला गर्भवस्थेतच प्राप्त झाले आहे असे श्रीकृष्णाने सांगितले. संस्कार झालेला असल्यामुळे, संकट उभे राहिल्या बरोबर त्याच्यासमोर ज्ञान उभे राहिले व त्याने व्यूहाचा भेद केला. आज आपण जन्माला आल्यानंतर नारायण करण्याचा प्रयत्न करतो पण ते शक्य नाही. कारण एकदा देह धारण केला की जीव बध्द होतो व देहत्याग होईपर्यंत त्यात काहीही बदल होऊ शकत नाही. गर्भवती स्त्री आराम खुर्चीवर बसून जरी नवनाथ वाचले तरी जन्माला येणारे बालक कुलाचा उध्दार केल्याशिवाय रहाणार नाही. त्यावेळी सगळे सोड़ून देव म्हणजेच चैतन्य अशी अवस्था असते व 25 वर्षानंतर त्याच देहाच्या जीवाच्या ठिकाणी देव सोड़ून सगळे काही असते. ती अंशमात्र शक्ती सभोवतालच्या वातावरणाप्रमाणे वाढत असते.

मुलगा सज्ञान व्हावा व त्याने म्हातारपणी आपणाला सुख द्यावे ही आपली भावना!  पण या घटकेला सुख पाहिजे म्हणून बाबांना भेटता मग म्हातार पणी तुम्हाला सुख कोण देणार, मुलगा का बाबा? गादीवर तुम्ही येता. तुमचा मान राखला जातो. तुम्हाला सुख लाभते. पण तेच घरी गेलात की परिस्थिती वेगळी होते. याचे कारण माझ्यासमोर बसून मला ठीक करा असे म्हणता पण मुलाबद्दल बोलतच नाही. वास्तविक आपले मुलाबद्दलचे कर्तव्य पार पाडीत असता त्यामागे हेतू कशा करिता?

जीव गर्भावस्थेत असताना त्याचे ठिकाणीआचार-विचार येणार नाहीत तर तुमच्या अन्नमय कोशाची वासना सूक्ष्म रुपाने तेथे असते. ज्या प्रमाणात अन्नमय कोश अशुध्द त्या प्रमाणात गर्भ अशुध्द असतो. पण त्या सूक्ष्म रूपाने असणाऱया वासनेनेच तो गतजन्मांतील 60 वर्षाच्या कारणातील अन्नाच्या वासनाना ओढून घेतो. त्याचे ठिकाणी लाड़ू हवा असल्यास वाचेची शक्ती नसते व माध्यम म्हणून तो मातेचा उपयोग करतो. त्याला कर्मज्ञान इत्यादी नसतात. पण आईच्या शक्तीतून तो भावना दर्शवितो. त्यानंतर ठरलेल्या चार कोशांचा स्वीकार करीत असतो.

  1. अन्नमय कोश 1-3 महिने या कारणात अन्नवासना अगर उलटी होते.
  2. प्राणमय कोश धारणा 3-5 महिन्यात. यावेळी छातीवर दाब येतो, श्वासांत जडपणा येतो. मनोमय 5-7 महिन्यात. या कारणात ज्याला सात जन्माचे अभिवचन दिले, अशा पतीचाही विचार करीत नाही.  चराचरात स्त्री जीव कुठेही नसतो. तर फक्त त्या जीवातच, त्याच वेळी मनोमय कोश धारण होऊ शकतो.
  3. विज्ञान कोश 7-8 महिने. या कारणात एखादी गोष्ट दोनदा सांगावी लागते. विस्मृती होते. आठवावे लागते.
  4. ज्ञान होण्याची शक्तीच्या अर्ध्या भागावर त्याचे प्रतिबिंब असते. आनंद कोष 9 महिने.

सर्व अवयव पूर्ण झालेले असतात. यावेळी मातेचा व जीवाचा आनंद एकच असतो. 70 वर्षाच्या ऋणानुबंधाला अधिष्ठान प्राप्त करून देणाऱया त्या मातेला स्थान कसे पाहिजे! उपासना असेल तरच जोपासना होईल. त्यात बदल होण्यासाठी प्रथम आपल्यात बदल व्हायला पाहिजे.  जन्म व कर्मऋणानुबंध प्रत्यक्ष त्या चैतन्याच्या ठिकाणीपहाणे यालाच साक्षात्कार म्हणतात. दोहोचा लय होतो, वासना जातात व अधिष्ठान फक्त परमेश्वराचे रहाते. जन्म, कर्म व जीव हे सांगोपांग एकाच तत्त्वाने राहिले पाहिजेत. सायकलची दोन चाके म्हणजे जन्मकर्म,  ऋणानुबंध व पॅडल म्हणजे जीव.

तुम्ही जास्त हवा चाकात भरता. मागले चाक फुटले तर पुढल्यात आणखीच जास्त हवा भरता. पण शक्तीच्या सहाय्याने पॅडल मारल्याशिवाय इच्छित स्थळी पोहोचू शकणार नाही. अपेक्षा घेऊनच देवाकडे आलात व एवढे ज्ञान झाल्यावर देखील अपेक्षाच करता.  माझाविषयी तुम्ही जे काही बरेवाईट बोलता ते मला24तासात कळते. मग मी मुलाखती द्वारे जे सांगतो ते निदान 48/72 तासात कळले पाहिजे. फलश्रुति दिली होतीच पण चालकाने चालना दिली नाही. मालक कोण समजले नाही व पालक म्हणावा तर हाच दुसऱयाकडे 25वर्षे नोकरी करतो.

चालक, मालक और पालक यह तीन बातोसे जुदा है वही परमात्मा का भक्त है !  प्यास लगी फिर दुसरों से क्यौं मांगता,  सब चीजोसे जूदा वही अल्ला का भक्त!  तीनही जीवनावर ज्याने संयम मिळवला तोच ईश्वर भक्त!  मालक हा जीव. चालक म्हणजे कर्म व ज्ञानेद्रियें. हे काय व ते काय अशी सारखी ती इंद्रिये चालना देत असतात. पालक संबध काया. पालकाला  म्हणजे कायेला शर्ट घालता. पण त्या कायेच्या मालकाचे काय? त्या मालकारणा कधीच काही घालणार नाही का? त्याला काय माहीत नाही? त्याला सर्वस्वाचे ज्ञान आहे! 

बाबा एकच ब्रम्हवाक्य बोलले, “जया मनी जैसा भाव,  तया तैसा अनुभव” सर्व काही ठीक चालले असताना ज्या भावनेने पूजा केली त्याच भावनेने संकटकारणीसुध्दा पूजा करणारा भक्त पाहिजे. पण आम्ही म्हणतो “तुमचा जसा अनुभव, तसा माझा तुमच्याबद्दल भाव”. बाबा काय बोलले व तुम्ही काय बोलत आहात. प्रत्यक्ष गुरूतत्व बदलते. मग संकट जाणार का येणार!  असे उलटे वागता म्हणून दुख-दुख म्हणून समोर बोललात की आम्ही त्याचा अर्थ उलटा घेतो व म्हणतो, तू सुखी आहेस का, बहोत अच्छा. बाबांनी त्यांच्या शब्दात कधीही बदल केलेला नाही. घडयाळ थांबले तर चावी देऊन पुन्हा चालू करता येईल पण एक वेळ तुम्ही थांबलात की चावी नाही तर स्मशानात जावे लागते.

लोणी घेत असता, थोडे लोणी कमी पडल्यास दुकानदार थोडेसे ताजव्यात टाकतो.   ते टाकलेले व पहिले लोणी लगेच एकजीव होऊ शकते. तशीच तुमची जीवने आहेत. बाहेर कुठेही  गेलात तर एका क्षणात त्यांच्यासारखे व्हाल. पण सोनाराकडे गेलात व तो य़ाला सोने कमी म्हणून 1गुंज सोन्याचा तुकडा टाकला तर ते दोन्ही तुकडे भट्टीत घातल्या शिवाय एकजीव होत नाहीत. तसेच सद्गुरूचरणी आल्यानंतर मी नाही तुम्हाला विचारणार तर तुम्हाला गाळणार.  “हम तुम्हारे लिये नही गलेंगे,  तुमको हमारे लिये गलना पडेगा”.