10-3-1962. शनिवार

घरातील लहान बालकावर देवऋणानुबंधाचा संस्कार व्हावा असे मातेला वाटत असेल व सकाळी आधी देवाला नमस्कार कर व मगच चहा मिळेल असे जर ती बालकाला सांगत असेल तर पिता म्हणतो की आधी चहा पी. देवाला नमस्कार नंतर केलास तरी चालेल. यावरून तुमच्या लक्षात येईल की देवादिकाचा संस्कार सर्वप्रथम माता-पित्यावर होणे आवश्यक आहे.

जीव हा जन्मऋणानुबंध जोड़ून कर्मऋणानुबंध पुरा करीत असतो.  तो काया, वाचेत अंतर्भूत असतो म्हणून सर्व व्यवहार चालतात. गर्भ जन्मऋणानुबंधाला कारण होऊन सर्व कर्मऋणानुबंध गोळा करतो व असा ऋणानुबंध परिपक्व झाला की बालक जन्माला येते. बालक जन्माला आल्या बरोबर जर त्याच्या सत्कर्माला सुरूवात होईल तर घराण्याचा भाग्योदय होईल! पित्याला धंद्यात हजार रूपये मिळत असतील तर लाख रूपये मिळायला लागतील. मुलगा जरी धंदा करायला जात नसला तरी त्याच्या पुण्याईचा ठेवा पित्याला मिळतो. धंद्याचा व्याप वाढल्यामुळे जो काही थोडा बहूत पित्याकड़ून देव-धर्म होत असेल तोसुध्दा होणे बंद होतो. पण मुलाच्या पुण्याईचा भाग पिता खाऊन टाकत असतो हे लक्षात येत नाही.

आवक वाढली यास कारण कोण?  हे लक्षात येत नाही. पण तेच जर पैसे कमी मिळू लागले असते बंकेतील शिल्लक कमी कमी होत गेली असती तर मात्र ते लक्षात लगेच आले असते. पिता आपल्या मुलाकरीता घरदार मोटारगाडी, बँकेत पैसे ठेवील. मुलाच्या जन्माच्या वेळी पित्याचे वय 40 असेल तर पिता 58 व्या वर्षी म्हणजे मुलगा, 18 वर्षाचा असताना वारला तर काय परिस्थिती होते याचा आपण विचार करू. मुलाचे सत्कर्म जन्माबरोबर उदीत झाले. तो कारण 18 वर्षापर्यंत टिकला व 18 ते 30वर्षे कठीण. म्हणजेच पापाला कारण असेल तर वडिलानी ठेवलेला पैसा-अडका संपून जाऊन वयाच्या 30 व्या वर्षी अगदी हलाखीची परिस्थिती येते. मुलाकरिता पैसे ठेवले पण त्याचा पुण्याचा ठेवा खर्ची पडत असता त्याचा संचितावस्थेत काहीही टाकले जात नाही  म्हणून ठेवलेला पैसा थोडक्या कालातच खर्ची पडतो.

जीवनाला सुरूवात सत्कर्माने का दुष्कर्माने व्हावी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. वास्तविक मुलामुळे पैसा मिळत असताना पिता म्हणत असतो की मी मुलाला अगदी सुखात ठेवलेला आहे. ज्यावेळी मुलगा रोज रू 100 जास्त देत असतो त्यावेळी त्याला 2रू सुध्दा देत नसतो कारण मुलाला एखादे खेळणे व गरम कपडय़ाची अर्धी चड़्डी म्हणजे त्याला सुखात ठेवला असे वाटत असते. पण मुलाला अर्धी चड्डी त्याचवेळी बापाच्या अंगावर वुलनचा सूट असतो व तो मुलाच्या पुण्याईने मिळाला आहे हे त्याच्या लक्षात नसते. हे सर्व सहजगत्या होत असते.

देवादिकाचा ऋणानुबंध म्हणजे काय तर साधना किवा एक शक्ती असे आपण मानू. गाडी मुंबईहून पुण्याला पोहोचण्यास 6 गॅलन पेट्रोल लागेल पण तीच जर गाडी जुनी असेल तर 8 गॅलन पेट्रोल लागेल. तेलाचा साठा कमी पडल्यास गाडी मध्येच थांबेल व मग ढकलणे, ओढणे इ. गोष्टी आपल्याला जीवनात कराव्या लागतील.  कुटुंबात तीन भाऊ आहेत. एका भावाला त्याच्या ऋणानुबंधाप्रमाणे व्यवसाय नाही व सहाजिकच, त्याच्या प्रपंचाची काळजी दोन भावांना करावी लागते. अशा तऱहेने हा घरात बसलेला भाऊ आपल्याच भावाचा ऋणानुबंध घेत असतो. कुटुंबात एकमेक एकमेकाचा असाच ऋणानुबंध घेत असतात. ज्याचा ऋणानुबंध घेतला गेल्यामुळे त्याला स्वतःला कमी पडल्यास त्याला कमालीची अशांतता लाभेल. पण ज्याने त्याचा ऋणानुबंध घेतला तो मात्र सुखात असेल. ज्यावेळी कुटुंबांतील सर्व माणसे आपले ऋणानुबंध पूर्णपणे घेऊन जगत असतात त्याचवेळी त्या घरात शांतता असते. यामुळेच पती-पत्नींचे पटत नाही.

घरात शिरा केला. तो खाऊन सगळयाना समाधान मिळणार असते, पण कुटुंबातील सर्वजण एकदम ग्रहण करणार नाहीत. एक तरी म्हणेल की मी दोन तासानी शिरा खाईन.  अशावेळी आपण समजावे की त्याचे कर्म उदीत व्हायला अजून दोन तासाचा अवधी आहे. आम्ही प्रसाद देऊन हे असे वेडे-वाकडे झालेले ऋणानुबंध सरळ आणतो. तुझ्या बायकोची गाडी 30 मैल वेगाची व तुझी 20मैल वेगाने जात असेल, तर बायकोच्या गाडीची गती 5 मैलानी कमी व तुझी 5 मैलानी वाढवितो व अशा तऱहेने दोघांच्या गाडय़ा 25 मैल वेगाने चालू लागल्या की, संसारात सुख लाभायला लागते. संध्याकाळी 7 वाजता स्नान करून सर्व भक्त-मंडळी आरतीला जमतात.  पण ज्या भक्ताच्या ऋणानुबंधात त्यावेळी रात्रीचे 12 वाजले असतील त्यावेळी तो नेमका झोपतो. तुम्ही सकाळी 5ला उठता व बायको 7 ला उठते. तुम्हास वाटत असते की सर्वांनी आपल्यासारखेच लवकर उठावे व बायकोलासुध्दा उशीरा उठण्याची इच्छा नसते. पण ऋणानुबंधच असा असतो त्याला काय करणार.

पूर्वी संसाराला सुरवात करण्यापूर्वी शास्त्रयुक्त विधी, कुलधर्म करीत असत तो एवढय़ासाठीच व त्यामुळे त्यांचे संसार सुखाचे झाले. तुमच्या सुखाची अभिलाषा न धरता कुणाचे खर्ची पडत आहे याची प्रामाणिकपणे कबूली द्या. मुलाने खेळता-खेळता जरी नामस्मरण केले तरी पुरे आहे. मुलामुळे तुमच्या जीवनात दुख आले आहे असे जर मी सांगितले तर हे कार्टे मला त्रास देत आहे असा विचार मनात येणार नाही असा पिता विरळाच. म्हणूनच साधकाने मुलामुळे सुख वा दुख आले असले तरी ती गोष्ट उघड न करणे हिताचे असते.  तांदूळात खडे असतील तर बाजूला काढता, तद्वतच काही काल मुलाला तुमच्यापासून दूर ठेवा असे सांगितल्यास आपण ठेवाल का?  कुटुंबातील सर्व घटक सगळय़ा कुटुंबाला उर्जीतावस्था प्राप्त व्हावी म्हणून धडपडत असतात. पण काहीही होऊ शकत नाही. अशावेळी अमुक एकाला तीर्थयात्रेला पाठवा. कारण तो घरात असणे घातक आहे तर आपण पाठवाल का?  एवढे कशाला, घरातला प्रत्यक्ष कर्ता पुरूष म्हणजे मुलाबाळांचा बापच जर सगळय़ांच्या आड येत असेल तर त्याला संन्यास देऊन घराबाहेर का काढावयाचा?  अशावेळी तुम्ही काय कराल तर सांगितलेल्या माणसाला बाहेर पाठवणार नाही तर आमच्याच घरात भांडण लावतो म्हणून मला म्हणजेच माझ्या प्रसादाला घराबाहेर फेकून द्याल. पण आम्ही कुठल्याही परिस्थितीत कुणालाही घराबाहेर काढीत नाही. तर कर्मविमोचनाचा संकल्प देऊन हे वेडेवाकडे ऋणानुबंध सरळ करतो.

कर्मविमोचनाचा प्रसाद या माकडचेष्टा नाहीत!

प्राप्त जन्मातील अपेक्षा बाबा केव्हा पुऱया करतील याचाच ध्यास तुम्हाला लागलेला असतो. पण अपेक्षित सुख जमविण्याचे साधन मला करावे लागते. ज्यावेळी मी गवंडी- काम करून, विटा रचून घर बांधतो त्याचवेळी तुम्ही वास्तू-शांत करता,  एवढा फरक आहे. सर्व मंडळींची जन्मकर्म विसंगती सारखी व्हावी म्हणून कुटुंबप्रमुखाला संकल्प आहे. असाच जर कोणी तुमचा ऋणानुबंध खाऊन गेला असेल तर आम्ही त्या माणसाच्या बंकेतील पैसे तुम्हाला देऊन त्याची भरपाई करीत नसतो तर संकल्प सोड़ून त्या माणसाच्या भावी कारणात त्याला मिळणाऱया सुखाचा काही भाग तुमच्याकडे पाठवीत असतो. ‘

अ’, ‘ब’, ‘क’या तीन व्यक्ती, आजोबा, मुलगा व नातू म्हणून आहेत.  ‘अ’, ‘ब’दिवंगत झाले आहेत. त्यांनी दुष्कर्म केली आहेत पण देव हलकट आहे एवढे वाक्य उच्चारून तरी एका रूपयातून १. ५ आणे सत्कर्म केलेले आहे. देव हलकट आहे म्हणजे बंदा रुपया. आजोबांनी हलकट म्हटले तरी ‘देव’ नुसता शब्द उच्चारला म्हणून त्यांना रुपयातील तिसरा हिस्सा पुण्य मिळाले. आता त्या सत्कर्माने ते जन्माला येणार होते त्याना जरा थांबण्यास सांगून ते सत्कर्म इकडे पाठवून देण्यास सांगितले आहे.  माता एकाच भावनेने तिच्या बालकाना जन्म देते, दूध पाजते, मग प्रत्येक बालकाच्या नशिबात फरक का? जन्म प्राप्त होतो तो काही जीवाला दुख व्हावे म्हणून नाही. किंबहुना, विधात्याचा संकेत असा असतो की त्या जीवाने गतजन्मापेक्षा या जन्मात जास्त सुखी असावे, मग हा जीव दुखी का? प्रत्येकाला विद्या, संपति व संतति या तीन गोष्टींची अभिलाषा असते.  समप्रमाणात या गोष्टी फार थोडय़ाना मिळतात व बहुतेकाच्या वाटय़ाला कमी-जास्त प्रमाणात या गोष्टी येतात. ही उणीव असण्याचे कारण आपणच आहोत.पशु, पक्षी, झाडे याना ऋतुमानाप्रमाणे फल येणे हा त्यांचा धर्म आहे. आपल्याला पण फल प्राप्ती होत असते पण फल मिळण्याचे कारण निश्चित नाही.

स्त्री  ही परमेश्वराने निर्माण केलेल्या अभिजात आदिशक्तीचा परिमल आहे

. पती व पत्नी यांचे विचार, भावना एकच असेल व दोघांची संमती अनुकूल असेल तर होणारे बालक वरील तिन्ही गुणानी युक्त असते. पण मातेच्या इच्छेविरूध्द गर्भधारणा झाली असल्यास स्वाभाविकपणे 2/3 महिने तिला गर्भाविषयी घृणा वाटत असल्यास ते बालक विद्येत जरा मागे पडते. दोघाची संमती म्हणजे ऐच्छिक संतती असून चालणार नाही. कारण जन्म दिलात पण कर्म व जीव देऊन त्यावर संस्कार व्हायला पाहिजे. डोहाळे-जेवण झाले नाही तर गतजन्मीचा त्याग व पुढच्या जन्माची जोड जोडली जाणार नाही. सगळय़ानाच काही खाण्याच्या वासना होणार नाहीत. काही माताना समुद्राचे सौंदर्य पहाणे आवडेल तर काही जणींना घरातील सुंदरसे असणारे प्रभू रामचंद्राचे चित्र सारखे पहाणे आवडेल. ते बीज तुम्हाला दिसत नाही.  पण त्याला मात्र तुमच्या घरातील सर्व काही दिसत असते. तो जीव म्हणत असतो की मला रामासारखे व्हायचे आहे. पण हल्ली घरात देवादिकांच्या चित्रा ऐवजी अर्धनग्न स्त्राó जलाशयात पाय सोड़ून बसली आहे. अशाच धर्तीची चित्रे फार असतात. मग अशा चित्राचे प्रतिबिंब उमटले आहे असा तो बालक 10व्या वर्षी स्त्री  हात धरील नाहीतर काय करील?

आदिनाथ अपर्णेला गुरूमंत्र देत असता गर्भावस्थेत असणाऱया मच्छिंद्रनाथांना बम्हज्ञान झाले व त्यानंतर पुढे नवनाथ झाले. ही गोष्ट तुमच्या आमच्यात का घड़ू नये?  कारण आपले विचार-आचार शुध्द स्वरूपाचे नाहीत म्हणून आपणाला तशा प्रकारचे सुख लाभत नाही.

स्त्री ही रई म्हणजे चंद्रप्रकृतीची व पुरूष हा रश्मी म्हणजे सूर्यप्रकृतीचा मानलेला आहे. 

स्त्री  ऋतूकाल हा चंद्रपौर्णिमा अगर अमावास्येच्या कालात असतो. चंद्र व सूर्य हे परस्पर विरोधी असतात. कारण एकीकडे दिवस तर एकीकडे रात्र असते. पण हे एकमेकासमोर रात्री 12ते3 या कालात येतात व या कालात गर्भधारणा झाल्यास जन्मास येणाऱया बालकाचे ठिकाणी माता पित्याच्या चांगल्या गुणाचा संयोग पूर्णत्वाने होतो. पण गर्भधारणा या कालाच्या आधी अगर नंतर झाल्यास त्या-त्या प्रमाणात रई व रश्मीतत्व कमी पडेल. रश्मीतत्व कमी म्हणजे तेजतत्व कमी व अशा बालकाला भावी आयुष्यात संपत्ती कमी पडते व रई म्हणजे चंद्रतत्व कमी पडल्यास ते बालक संतती धारण करण्यास कार्यक्षम ठरत नाही.

बापाची इच्छा पण आईची नाही त्यामुळे आई अंतर्यामी दुखी. त्यामुळे जीवाचा कर्मऋणानुबंध आईकड़ून पुरा होत नाही. ज्यावेळी बालक सज्ञान होऊन स्वतःचा ऋणानुबंध जोड़ू मागतो त्यावेळी बापाचा मृत्यू व मगच त्याच्या कर्माची परिपक्वता होते. त्याच्या उलट स्थिती असल्यास आईचा मृत्यू झाल्याशिवाय बालकाचा भाग्योदय होत नाही. पण केवळ लैगिंक भावनेने दोघानाही नको असता गर्भधारणा झाली तर दोघांचेही दुर्लक्ष होते व दोघाचाही मृत्यू झाल्याशिवाय मुलाचा भाग्योदय होत नाही. जीव सांगत असतो की15 मिनीटे बाबांचे चिंतन करीत जा. पण कर्मेद्रियांना सवय नाही.

आंबा, पेरू, चिकू या प्रत्येक फळाचा गुणधर्म वेगळा व शरीराला आवश्यक असे गुण प्रत्येक फळात असतो. पण आपण सर्व फळे कापून त्यावर दूध-साखर घालून फ्रुट सॅलड तयार करून त्या सर्वांना एक वेगळीच चव आणत असतो. आपल्या कर्माचे आपण असेच सँलड करत असतो. काही सुखे दुख द्यायला येतात व काही दुखे सुख देण्यासाठी येतात व काही दुखे तुम्हाला उध्दरण्यासाठी येतात.

जीवनात दुख का असते, याचा तुम्ही विचार करत नाही, मग मी तरी तुमच्या सुखाचा विचार का करावा?