11.3.1962 रविवार

              दुख
   जन्म    ————–कर्म  <————–  जीव
               सुख

जन्मऋणानुबंध कुणामुळे? तर कर्मऋणानुबंधामुळे व कर्मऋणानुबंध जीवामुळे.

जीवाने आजपर्यंत अनेक देहांना धारण केलेले आहे. कारण त्याला सुटावयाचे आहे. जीव अनेक जन्मापासून फिरत आहे.  जन्मऋणानुबंध येत आहे व काया-वाचा-मनाने कर्मऋणानुबंध तयार करतो आहे. कर्मऋणानुबंधाचा भाग हा अनंत जन्माचा आहे. कदाचित तो सात जन्माचा देखील असेल. पण जन्मऋणानुबंध मात्र एकच जन्माचा असतो. या जन्मात 60 वर्षाचे आयुष्य भोगायचे आहे. पण ऋणानुबंधात मात्र सुख-दुख 60 वर्षाचे नसून अनेक जन्मांचे असेल. हा कर्मऋणानुबंध आपणाला प्राप्त जन्मात जन्मऋणानुबंध म्हणून भोगावयाचे आहे. जीवाने 60 वर्ष हे काया, वाचा व मन मागून घेतले. या जन्माचे कर्तव्य कर्मऋणानुबंधाचे भोगत्व कमी करणे असे आहे. पण ते शक्य होत नाही. कारण पुनश्च तशी कर्मे आपल्या हातून घडतच आहेत. वासनानी कर्मऋणानुबंध वाढत असतो व त्यामुळे 14 जन्मांचा ऋणानुबंध पुरा करण्यासाठी 25 जन्म घ्यावे लागतील.

ज्ञानेंद्रिये व चैतन्य संकट निवारण करण्यासाठी निर्बल ठरलेली असतात. कारण चैतन्यावर 14 जन्मांचे वलय असते. वलय मोठे असल्यामुळे अंतर्भूत असलेली चैतन्याची शक्ती पाहिजे त्या प्रमाणात कार्य करू शकत नाही. चैतन्याची शक्ती ही शेवटपर्यंत कायमच असते. प्रश्न असतो त्यावर असणाऱया कर्माच्या वलयांचा. वलये लहान असती तर चैतन्याने आपल्या ठिकाणी शक्ती निर्माण करून वलयांतील वासना कमी केल्या असत्या. पण वलये मोठी असल्यास शक्ती अपुरी पडते व म्हणून तुम्ही मनोनिग्रह करू शकत नाही. मी बोलतो आहे ते तुम्ही ऐकू शकता. पण बाहेरच्या रस्त्यावरील माणसाला माझे बोलणे ऐकायला येणार नाही. त्याला एवढेच कळेल की, कोणी तरी एकजण हॉलमध्ये हातवारे करीत आहे. हे जसे हातवारे करण्याचे जाणवते पण प्रत्यक्ष ऐकायला येत नाही तसेच कर्माचे वलय मोठे असल्यास चैतन्याने फक्त संकेत तुमच्यापर्यंत येत असतात की अमुक एक गोष्ट करू नकोस पण केल्याशिवाय मात्र रहात नाही. वलय लहान असते तर वासनाचा नाश होऊन विचार इच्छा निर्माण झाल्या असत्या पण मोठे असते म्हणून फक्त संकेतच!

कर्मेंद्रिये पातके आणून दुष्कर्म करतात व ज्ञानेद्रिंये व मन सत्कर्म जोडून पुण्य जोड़ू मागतात. कर्मऋणानुबंध हा कुबेर आहे. त्याच्याजवळ सगळे काही आहे व म्हणून तो काही अपेक्षा करत नाही. जीव तर अपेक्षा कधीच करणार नाही कारण त्याला पूर्णपणे माहीत आहे की “अहं बम्हास्मि”. “सर्वांभूती आत्मा एकच आहे”. माझ्या व तुमच्यात एकच जीव आहे. तुमचा जन्मऋणानुबंध मात्र दरिद्री आहे.  सारखा मला भेटत असतो व ते द्या हे द्या, असे सांगत असतो. मी दरिद्री जन्मऋणानुबंधाने कर्मविमोचनाचे अनुष्ठान मांडले असतानासुध्दा  प्रश्न विचारत असतो.

“जन्म, कर्म व जीव हे तीन जलाशय आहेत. चैतन्याच्या जलाशयातील पाणी कर्माच्या जलाशयांत येत असते व कर्मऋणानुबंधाच्या जलाशयातून दोन तोटय़ानी (एक सुखाची व दुसरी दुखाची) पाणी जन्मऋणानुबंधांत येत असते.  सुख दुखाच्या त्या दोन तोटयांतून सारख्याच प्रमाणांत पाणी येत असते.  पण आपली नैसर्गिक प्रवृत्ती दुष्कर्माकडे असल्यामुळे दु;खाच्या तोटीतून पाणी जास्त प्रमाणात येऊ लागते.  दु;ख एवढयासाठी आहे की सुखाची चव कळावी. बाबांनी काय केले आहे तर दुष्कर्माच्या तोटीतून पाणी जास्त प्रमाणात येत आहे व त्यामुळे सत्कर्माच्या तोटीतून मिळणारे पाणी दूषित करीत आहे म्हणून सत्कर्माच्या तोटीतून येणाऱया पाण्याचा प्रवाह जरा कमी केला आहे. “

पातक-प्रमादाच्या तोटीतून येणारा प्रवाह तुम्ही कमी केला नाही व मीही कमी केला नाही. आता काही मिळतच नाही तर आहे त्यात सुख मानायची तुमची तयारी झाली आहे. पुनश्च तशी कर्मे घडली नाहीत तर आपोआपच कर्मऋणानुबंधात 14 जन्म असतील तर ते 10 होतील व चैतन्याची शक्ती तीव्रतेने भासू लागेल. सेवा करून जन्म व कर्मऋणानुबंधांत भर पडत नाही. तर जी चैतन्याची शक्ती कमी पडते ती वाढली जाते. संकल्पाने कर्माचे विमोचन होत असते. पण आपली सेवा ज्या प्रकारे व्हावयास पाहिजे तशी होत नाही. होत आहे का? अनुष्ठानापुढे प्रार्थना एवढीच करता की अडचणीचे निवारण होऊ दे.

तुमचे म्हणणे एकच की, बाबा मला त्याच्यासारखे सुख द्या.  ‘अ’ या व्यक्तीच्या कर्मऋणानुबंधांत 5 जन्म शिल्लक असतील तर तो ज्यात हात घालील त्यात त्याला यश प्राप्ती होईल. कारण त्याच्या हातामागे प्रत्यक्ष चैतन्य उभे असते. ‘ब’ या व्यक्तीला ‘अ’ सारखेच सुख पाहिजे. पण ‘ब’ या व्यक्तिच्या कर्मऋणानुबंधांत 15 जन्म शिल्लक असल्यामुळे ‘अ’सारखे सुख मिळू शकणार नाही. तुम्हाला फक्त सुख दिसते. जन्म दिसत नाही. ‘अ’ ला 1960 साली सुख मिळाले व तुला 1962 साली मिळेल. पण तोपर्यंत सबुरी व निष्ठेने सेवा जोडली पाहिजे. एकाला एक प्रकारचे सुख मिळावे व दुसऱयाला दुसऱया प्रकारचे मिळावे अशी बाबांची इच्छा नाही व तुमचीही असणार नाही. बाबा तर असे म्हणत असतात की माझा भक्त हा निरंतर सुखी असावा. कारण ते तुम्हाला पोटच्या पोरासारखे मानतात. तुमचा सद्गुरू एक, तुमचा प्रसाद एक व तुमचा संकल्पही एक. मग प्रत्येक भक्ताची अपेक्षा भिन्न का?  देवांना देखील तुमचा हेवा वाटतो. कारण देवांना त्यांचे विमोचन संताकड़ून करवून घ्यावे लागते. आज आम्ही तेच द्यायला बसलो आहोत, पण तुम्ही कोणत्या प्रकारे घेत आहात याचा विचार करा!.

पहिल्या जन्मात चैतन्याने तुम्हाला सगळे काही दिले. तुमच्या इच्छा–वासना पुऱया केल्या. पण आज अनेक जन्मानंतर तुमच्यापर्यंत चैतन्याची शक्ती येऊ शकत नाही. प्राप्त जन्मात दुष्कर्म व वासना वाढविल्या तर कर्मऋणानुबंध वाढत असतो. कारण या जन्मातला जन्मऋणानुबंध हा पुढच्या जन्माच्यावेळी कर्मऋणानुबंध होत असतो. आपण पहातो की एखादा मनुष्य सारखा अस्वस्थ असतो. तो धड प्रपंचात नसतो व धड परमार्थातही नसतो. अशा माणसाला भक्कम उपासना सांगून चालणार नाही. तर त्याचा एक एक जन्म कर्मऋणानुबंध कमी करावा लागतो. मगच तो स्थिर होऊन बाबांची सेवा करायला लागतो व म्हणू लागतो की,  बाबाच माझा उध्दार करतील व कितीही वेळ लागला तरी सेवेत खंड पड़ू देत नाही.  वासना व विचार यांना मागचे काही नको असते. त्यांना सारखे पुढचे पाहिजे असते. माझ्याकडे आलात व टेबलावर ठेवलेली सुपारीची वाटी बघितली. ती लगेच पाहिजे असल्यास त्या वाटीची किंमत द्यावी लागेल. पण काही वेळ थांबलात तर तुमच्याच कर्मऋणानुबंधाप्रमाणे तसलीच वाटी तुम्हाला भेट म्हणूनसुध्दा मिळेल. पण आपण थांबायला तयार नसतो.

कर्मद्रियांचे ज्ञान ज्ञानेद्रियांना व ज्ञानेद्रियांचे ज्ञान चैतन्याला असते. यालाच, उपासना म्हणतात. कर्मविमोचनाचा प्रकार ऋणानुबंध कमी होण्यासाठी आहे, कामे होण्यासाठी नाही, म्हणजे जन्मऋणानुबंधाच्या अपेक्षा पुऱया करण्यासाठी नाही. वैयक्तिक संकल्प हा पुनश्च तशी कर्मे प्राप्त जन्मात घड़ू नयेत म्हणून आहे व कौटुंबिक संकल्प हा कुटुंबाच्या संचितावस्थेत असलेल्या कर्माला आवाहन म्हणून आहे. त्यामुळे सगळ्यानच्या कर्माला आवाहन होत असते. सेवा करून चैतन्याकडे, चैतन्या कड़ून कर्मऋणानुबंधाकडे व कर्मऋणानुबंधाकडून जन्मऋणानुबंधाकडे यायला पाहिजे. पण आपण सेवा करून आपल्या अपेक्षा करता, म्हणजे आपल्या कामाकरता वापरतो. आज तुमचे जे आचार-विचार आहेत त्यापेक्षा पुढील जन्मी जास्तच वाईट असतील. एवढे कशाला तुमच्या कर्माची गती तितकीच जर जोराची असेल, तर पुढच्या वर्षीसुध्दा याचे प्रत्यंतर आपणास येईल. तुमचे दुख संयुक्तिक आहे. ते नुसतेच सुख मागायला आले नाही तर तुम्हाला मुक्त करायला आले आहे. पण तुम्हाला मुक्तच व्हायचे नसेल तर कोणी काहीही करू शकत नाही. असे काही लोक असतात की त्यांच्या जीवनात व वैयक्तिक स्वार्थाशिवाय दुसऱया गोष्टीवर स्थान असू शकत नाही. अशा हय़ा माणसांना यम केव्हा येणार ते जर आधी कळेल तर पैशाची पुंजी मांडीखाली घालून त्यावर हे बसतील.  मेल्यानंतर मुक्त न झाल्याने जो त्या पैशाला हात लावील त्याला धरल्याशिवाय रहाणार नाही. पण यम हा फार हुशार आहे. केव्हा येतो,  याचा पत्ताच लागत नाही. आयत्या वेळी बंकेतल्या पैशांची आठवणसुध्दा रहात नाही. अशा या अविमुक्त आत्म्यांच्या भोवती वासनांचे वलय असते व आपल्याभोवती कर्मऋणानुबंधाचे असते.

आम्हालाही तुमच्या सारखेच जन्म होते. आम्ही 20 जन्म पुरे केले त्याचवेळी 20 जन्म सत्कर्माचे ठेवले.  आमचा देह कर्तव्या पुरताच वापरला व म्हणून आज इथे येऊन तुमची कामे करू शकतो. परमेश्वर मनुष्याला तारतो मग मनुष्य मनुष्याला का तारू शकत नाही? एका जीवाची शक्ती असते त्याला आणखी चार जीवांची जोड मिळाली की त्या पांच जीवांनी प्रगट केलेली इच्छा पूर्ण होते. यावरून आपण “पांचा मुखी परमेश्वर”असे म्हणतो. वास्तविक ते परमेश्वर नसतातच. कारण वेगळे काढले तर लगेच एकमेकाना शिव्या देऊ लागतात. एका कार्यासाठी ते एकत्र येतात. मार्गदर्शनाप्रमाणे आपला कर्मऋणानुबंध पुरा करा. अर्धे सैन्य नुसता गणवेश घालून उभे रहाणार व अर्धे सैन्य गोळय़ा खाणार. अशी सैन्यभरती आमच्याकडे नाही. आमची भरती म्हणजे समुद्राची भरती. एकदा आली की, सगळीकड़ून सारखी येणार. एवढे जन्माचे गणित मांड़ून दाखविणार.

पुन;पुन;तेच-तेच प्रश्न विचारताना घृणा वाटायला पाहिजे. प्रश्न अवश्य विचारा. पण सांगा की,  सेवा यथायोग्य तऱहेने चालू आहे. पण अजूनही कर्माची  तीव्रता कमी झाली नाही. तरी आपल्या आशिर्वादाची भर पडल्यास कर्माची तीव्रता कमी होईल. स्पष्ट सांगतो की 1962साली तुमच्या अपेक्षा पुऱया करणार नाही.   पटत नसेल तर चालायला लागा. पहिल्या प्रथम येथे आलात त्यावेळी काही तुम्ही माझ्या हातावर साखर ठेवली नव्हतीत. पण इथून निघताना मी मात्र तुमच्या हातावर साखर आवश्य देईन. यापुढे निश्चित उपासना म्हणजे रोज गादीवर येणे. आरतीला न हालता सर्व कार्यक्रम निश्चलपणे पार पाडणे. इकडे एक वेळ न येऊन जर आठ आणे वाचवाल तर कोर्टात 8 रूपये कमी पडतील. कारण ते आठ आणे कर्मऋणानुबंधाने आधीच दिलेले होते व त्या आठ आण्यात एक वेळ आरतीला येऊन तुमचा जीव एका जन्मातून मुक्त होणार होता!

जीव म्हणजे उत्पत्ती, कर्म म्हणजे स्थिती व जन्मऋणानुबंध म्हणजे लय. काही वर्षानंतर या देहाचा त्याग होणार म्हणून जन्मऋणानुबंधाला लय म्हटले आहे.

तुमच्या वाडवडिलांचा जीव पातक-प्रमादामुळे कर्मऋणानुबंधांत असतो. त्यांचा जर योग्यवेळी बंदोबस्त झाला नाही, तर ते जन्मऋणानुबंधांत येतात. मग तुम्हाला जन्मभर त्यांचाच कर्मऋणानुबंध भोगावा लागतो. हजार खेटे घालावे लागतील पण निष्पत्ती होणार नाही. जन्मभर खेटे घालणे एवढेच तुमच्या हातून घडेल. तुमच्या पाठीमागे त्यांची नुसतीच कर्मे नसतात तर त्यांचा अविमुक्त आत्मा असतो.  5 वा प्रसाद घेऊन त्यांना आज तुमच्या जीवाजवळ आणून ठेवलेले आहे. त्यांचा व तुमचा जीव एकच आहे. त्यांच्या कर्माचा बंदोबस्त संकल्प सोडून केलेला आहे. सत्कर्म व दुष्कर्म असो. जोपर्यंत त्याच्यामागे चैतन्य नाही तोपर्यंत त्याचे फळ प्राप्त होत नाही. अगर त्रास होत नाही. संकल्प सोड़ून त्यांच्या दुष्कर्मामागील चैतन्य काढून टाकलेले आहे व त्यांच्या सत्कर्माशी तुमच्या चैतन्याची जोड करून दिली आहे. त्यांना A-Class कैदी म्हणून ठेवलेले आहेत व त्यांना सांगितले आहे की सध्यातरी तुमची सत्कर्म इकडे पाठवत चला. तुमच्या त्या सत्कर्माचा ठेवा घेऊन तुम्ही पुन्हा जन्म घ्यावा किवा नाही याचा विचार सध्यातरी करण्याची जरूरी नाही. दुष्कर्माची नैसर्गिक प्रवृत्ती पातक करण्याकडे असते. परंतु अशी पातके स्वतः काही एक न करता संचित अवस्थेमधील सत्कर्मांना तशा प्रकारची कर्मे करण्यास प्रवृत्त  करतात व अशी अज्ञानाने घडणारी कर्मे (दुष्कर्मे) यांना प्रमाद म्हणतात.  पातक अज्ञानाने घडते. तर प्रमाद जाणून बुजून होतो. पातकात एकाची कर्माची पुनरावृत्ती होते. पण प्रमादांत दोन कर्मांची (एक पातक व दुसरे सत्कर्म) यांची पुनरावृत्ती होते.

तुम्ही पापक्षालनार्थ काशी क्षेत्री जाऊन डोक्याला शेण लावता पण प्रमादांचा विचारच करत नाही. तुमच्या घरी आवश्यक ती शांतता लाभणार नाही म्हणून या ठिकाणी येऊन पारायणे करायला सांगितली आहेत. घरी पारायण करताना लहर लागल्यास मध्येच चहा घेऊ शकाल. पण या ठिकाणी काहीही मिळू शकणार नाही. घरी एकीकडे  पारायण चालू असावे व इतक्यात टेलिफोनची घंटा वाजावी मग खाणाखुणा करून टेलिफोन संदेश लिहून ठेवायला सांगायचा. पण तुम्ही एवढे का धडपडता. टेलिफोनचा मजकूर लिहून ठेवण्यापेक्षा समोर लिहिलेले आहे तेच वाचा. या वरील गोष्टी झाल्या नाहीत तरी निदान टाळी वाजवून दार लावायला सांगितल्याशिवाय रहाणार नाही. आज तुमची स्थिती लहानशा बटू सारखी आहे. त्याला मुंज झाल्यामुळे आचमन ही एक नवीनच गोष्ट शिकायला मिळालेली असते.   त्यामुळे तो जाता-येता आचमन करीत असतो. बंबाच्या तोटीखाली हात धरूनसुध्दा तो आचमन करतो. नेमकी हीच स्थिती आज तुमची आहे. या साधनेत आमची शतकानुशतके गेली आहेत. पुढे-पुढे आपले चैतन्य आपणालाच दाखविता येते.

मारूतीने छाती फाड़ून प्रभू रामचंद्र दाखविला होता. आजपर्यंत लोकांच्या हितार्थ आपण सेवा करावी ही तळमळच कुणाकडे नव्हती. जे काही थोडे बहुत हिमालयावर जाऊन बसले होते त्यांना थोडीशी दृष्टी आल्याबरोबर लंगोटी आवळून खाली उतरले.  त्यामुळे पूर्णपणे साधना करू शकले नाहीत. तुमचीसुध्दा हीच परिस्थिती झाली असती पण आम्ही सदैव तुमच्या पाठिशी आहोत म्हणूनच तुम्ही मार्गापासून ढळला नाहीत. आज तुमच्या कर्मेद्रियांची सत्ता ज्ञानेंद्रियें व चैतन्य याजवर चालत आहे. वास्तविक चैतन्याची सत्ता ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये याजवर चालायला पाहिजे.

अडबंगीनाथानी जे मनात आले ते केले नाही व अशा तऱहेने कर्मेद्रियांची सत्ता मुळांत उखड़ून टाकली.  तुम्हाला प्रत्येक प्रसाद 9 आठवडे म्हणजे जास्त वाटत असेल व तुमची ताकद असेल तर 5 आठवडय़ात अनुष्ठानाची सांगता करण्यास सांगेन.  पण दररोज जप 5500 करण्याची तयारी पाहिजे. हल्ली सांगितलेला 1100 जप होताना मारामार होते आहे,  हे मला माहित आहे. मी सगळय़ांना प्रसाद देतो व तुम्ही पण मला प्रसाद देता. पण तुमचा प्रसाद म्हणजे तुमच्या कर्मांना मी फटके मारीत वर नेत असतो. या हॉलमध्ये पूर्वी सामानाची फार गर्दी होती. आता सामान जावून त्याऐवजी भक्तभाविकानी हॉल भरलेला असतो. मी येतो म्हणून कामे होत असतात.  ही जरी गोष्ट खरी असली तरीपण आपण दोघेजण रामलक्षमणासारखे निश्चितपणे येथे उपस्थित असता म्हणून कार्य होऊ शकते. सकाळ-संध्याकाळ इथे झांज वाजते म्हणून शेजारचा बोंबलत असतो. इथे काय चालले आहे याची त्याला कल्पना काय येणार!खरे म्हणजे तो बोंबलत नाही तर त्याच्या मागचे कर्म बोंबलत असते. वास्तविक तुमच्या जीवनातील हा केवढा ऋणानुबंध आहे की उंबरठा ओलांड़ून येताना प्रत्येक भक्त या ठिकाणी येऊन आपले कर्म विमोचन करून घेत असतो. या शिवाय जीवनात, भाग्य ते काय असू शकते?