4.2.1962 वंशविमोचन

आमच्या कार्यपध्दतीत,5वा प्रसाद वंशविमोचनासाठी देतात.आपल्याच वाडवडिलांच्या इच्छा,वासना आपल्या जीवनात दुख,अशांतता निर्माण करतात.या दुखाचे कारण आपण बाहेरच्या जगात शोधतो, ग्रहात शोधतो.अज्ञानामुळे आपण असेही म्हणतो की,अमुक एकाने माझ्यावर करणी केली आहे.पण ज्याचे त्याला व्यवहार पुरे करता-करता कठीण झाले आहे.अशा परिस्थितीत तुमच्यावर तो करणी करतो यावर माझा विश्वास बसत नाही. तुम्हाला ठेच लागली म्हणून इकडे आलात व प्रार्थना करता की माझ्या आंगठय़ाला झालेली जखम बरी करा. तुमची जखम बरी होणे यावर तुम्ही संतुष्ट आहात.पण त्याच दगडाची तुमच्या मागून येणार्‍यास ठेच लागेल, हा विचार करतच नाही.या करीता आम्ही मार्गातील दगड बाजूला करून मार्ग मोकळा करुन टाकतो.

तुम्ही देवाकडे निघालात तरी देवासारखे नाही.पण निदान देव सांगतो तसे वागण्यास शिका.हे विमोचन संन्यस्त रहाणारा,प्रपंच व परमार्थात जाणार्‍य प्रत्येकाला करून घ्यावेच लागेल.नाहीतर त्याची प्रगति होणार नाही.आज बाहेरच्या जगात या मार्गात असणारे अनेक सेवक आहेत.तुमच्या जीवनात घडलेल्या सर्व गोष्टी अगदी अचूकपणे सांगतील पण त्यांना हे ज्ञान कर्ण-पिशाच्चामुळे होत असते.तुम्ही साधना मार्गाने स्वतःची उन्नती करून घेत असता,तुमचेच वाडवडील पिशाच्च योनीतून तुमच्या आड येत असतात.पण ही गोष्ट सगळय़ांना कळत नाही व ते एका भ्रमात असतात की आपणाला शक्ती प्राप्त झालेली आहे.पण या प्रकारे जन्मभर सेवा केलीत तरीं त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.तुमच्या पाठीमागचा हा साठा दूषित झाला आहे,तो शुध्द वंशविमोचनाने होतो.

तुम्हाला दुखाची जाणीव झाली की ग्रह शोधायला लागता.ज्योतिषी सांगत असतो की गुरू भाग्यात आला की सर्व त्रास मिटेल. पण असे किती गुरू आले नी गेले,पण तुम्ही आहात तिथेच आहात.पण एक गोष्ट लक्षात येत नाही की तु पहिलाच गुरू लाथाडलास! त्यावेळी तुझे मन सांगत होते की,हे दु:ख वेगळय़ा प्रकारचे आहे.तरी ग्रहातील गुरू बघण्यापेक्षा योग्य मार्गाने जा.पण ही गोष्ट लक्षातच घेत नाही.या ठिकाणीतुम्हाला ज्ञानी केले जाईल.या प्रसादाबद्दल झालेले ज्ञान व तुमची भावना म्हणजेच वंशविमोचन होय.

तुमच्या समोर असलेली उदीची डबी बाजूला केली तरी त्या मागील कार्य-कारण-भाव कळला पाहिजे.तुम्हाला फक्त एकच क्रिया दिसली व ती म्हणजे उदीची डबी बाजूला ठेवली.पण या क्रियेच्या आधीच्या दोन क्रिया तुमच्या लक्षात येत नाहीत.प्रथम मेंदूच्या ठिकाणीजाणवलेली भावना व त्यानंतर उदीची डबी उचलण्या मागच्या उद्देश.डबी का हालविली? सगळय़ाना मिळण्यासाठी का कुणालाच मिळू नये असा हेतू आहे.त्याच प्रमाणे तुम्ही पैसे मिळावे अशी प्रार्थना करता पण पैसे कशाकरिता. हजार रुपये मिळवून मुलाबाळाना सुख समाधान देणार,व्यापारात घालणार का आणखी इतर मार्गासाठी वापरणार हे कळले पाहिजे.

तुमचा मालक तुम्हाला महिना 300 रु. पगार देतो.एवढे पैसे मिळतात पण पुरत नाहीत.घरात सुख नाही असे तुम्हाला वाटते.याचे कारण असे आहे की, मालकाने कोणावर अन्याय करून, कोणाची मान पिरगळून,कुणावर जप्ती आणून जर पैसे मिळवले असतील व त्यातील 300 रू तुमच्या वाटेला पगार म्हणून आले असतील तर त्या पैशाने तुमचे जीवन कदापि सुखी होणार नाही.त्या माणसाचे तळतळाट तुम्हाला बाधल्याशिवाय रहाणार नाहीत.हा दोष जावा म्हणून घरात आलेला पै-पैसा बाबांच्या चरणाशी ठेवायचा.प्रार्थना करायची की हे भगवंता,ही मिळालेली लक्ष्मी तुझ्या चरणी ठेवीत आहे.लक्ष्मी तुमच्याजवळ कधीच राहू शकत नाही. कारण ती चंचल आहे म्हणून ती ज्याची त्याला म्हणजेच बाबांना अर्पण करायची व त्यानंतर बाबांकड़ून मिळालेली ठेव व आपण Trustee या स्वरूपात त्या पैशाचा विनियोग करायचा.

लक्ष्मी म्हणजे ठेव आहे व तुम्ही Trustee आहात ही भावना निर्माण झाली की एक पैसा खर्च करताना तुम्हाला विचार करावा लागेल की तो योग्य ठिकाणीखर्च होतो आहे ना! कारण तो पैसा माझा नाही तर बाबांचा आहे अशा जबाबदारीच्या जाणीवेने पैसे खर्च केल्यास तुम्हाला सुख हे लाभलेच पाहिजे.आज तुम्हा ला बाबांच्या आशिर्वादाने 10,000रू. मिळाले.पण वंश विमोचन न झाल्याने ज्याला उसने म्हणून दिलेत त्याला ते परत करण्याची बुध्दीच झाली नाही तर?याकरीता वंशविमोच करून घेणे आवश्यक आहे.

लहानपणापासून मुलाना देव काय करायचा आहे असा प्रश्न तुमच्या मनात येतो.जन्माला आलेले मूल तुम्हाला 12 दिवसाचे दिसते पण त्याचा ऋणानुबंध परिपक्व झालेला असतो. 12 दिवसाचे मूल बापाला नोकरीतून Dismiss करील,अगर बढतीसुध्दा देईल.मुदतीचा ताप मूल वा बाप बघत नाही.मूल लहान आहे पण मुदतीचा ताप मुलालाही येतो व बाळालाही येतो.हे येणारे आघात आई बापालाच सहन करावे लागतात.मुलाला लहानपणापासून स्तोत्र म्हणणे याची सवय लागली तर नैसर्गिकपणें तो स्वतःचे ऋणमोचन करून घेईल.पण तुम्हाला मूल देहाने, वाचेने लहान वाटते व त्याला आणण्याची टाळाटाळ करता. पण देहाने लहान असले तरी ऋणानुबंधाने ते परिपक्व असते.ही गोष्ट लक्षात येत नाही.

आज तुम्ही अत्यंतिक वासनेच्या आहारी जाता कारण तुमच्यावर योग्यवेळी संस्कार झाले नाहीत.या जगात जन्माला आलात त्यावेळीं घोटभर दूध पिऊन सुरवात केलीत तरी तेवढेच घोटभर दूध पिऊन हे जग सोडायचे आहे.मुलांना सज्ञान करून त्यांची परंपरागत उन्नती झाली पाहिजे.एखादी जुन्या मॉडेलची गाडी व त्याच्या बरोबर अगदी नवीन 40 हजारांची गाडी असली तरी दोन्ही गाडय़ा रू.2-12-0 च्या पेट्रोल शिवाय अडतातच.चालू झाल्यावर पाहिजे तर तुम्ही दुसऱया गाडीला आजोबांच्या वेळची गाडी आहे असे हिणवू शकता!पण हे बोलणे पेट्रोल भरून गाडी चालू झाल्यावर.त्याच्या आधी नाही.बाहय़ांगाला ही नवी व ही जुनी हा भेद जाणवतो पण आपणाला अंतरंगाकडे जायचे आहे.

स्त्री-पुरूष एकत्र आल्यानंतर मूल जन्माला येते,याचा अर्थ असा आहे की दोघांचा ऋणानुबंध ज्यावेळी पुरा होतो त्यावेळी तिसऱयाचा ऋणानुबंध चालू होतो. देह आहे, वासना आहे, कर्म घडले व त्याची फल प्राप्ती म्हणजे 9 महिन्यानी मूल जन्माला येते.आज केलेल्या कर्माचे फल मिळण्यासाठी नऊ महिने थांबावे लागते, मग आमच्याकडे आल्यावर कारण नमस्कार केला आज चमत्कार करून काहीतरी द्या हे म्हणता कसे व आम्ही द्यावे कसे? गणिताची परीक्षा पास होऊन रँगलर 25 वेळा व्हाल पण जन्मजन्मांच्या ऋणानुबंधाचे गणित करणे फार कठिण!

तुम्हाला वाटते की मुलांना जेवायला खायला घातले शाळेत पाठविले की आपले कार्य संपले,पण एवढय़ावर जबाबदारी संपत नाही.या सर्व गोष्टी तुम्ही करत नसून ते आपला ऋणानुबंध हक्काने पुरा करून घेत असतात.तो मुलगा तुमच्याचसारखा अर्धपोटी राहून त्याच्या मुलाला म्हणजे तुमच्या नातवाला B.Aकरील त्यावेळी तुमची जबाबदारी संपली.मुलांना ज्ञानसंवेदनेच्या वर्गाला पाठवत चला असे मी आवर्जून सांगतो.का तर तुमचे आचार-विचार,देव-दैविक मार्गातले नाहीत.देव ऋणानुबंध त्याच्यावर प्रतिबिंबीत व्हावा म्हणून इकड़े बोलावित असतो.पण आणण्याची टाळाटाळ करता.इकडच्या वर्गाला 5रू. फी द्यावी लागत असती तर एक वेळ गोष्ट निराळी होती.पण मुलाचे गणित कच्चे म्हणून 15 रू. शिकवणी ठेवता.त्याचा ऋणानुबंध कच्चा म्हणून त्याचे गणित कच्चे, हे लक्षात ठेवा. धर्माचरण करणे हा आज व्यभिचार ठरला आहे!

बाप होणे ही गोष्ट साधी नाही. अरे,फाटकी चड्डी म्हणून रडतोस काय?चल,ही घे नवीन चड्डी.एवढे झाल्यावर तुमचे कर्तव्य संपले नाही.गाडी बोरीबंदरहून सुटते,पण दिल्लीला पोहोचेपर्यंत रूळ अगदी  व्यवस्थित टाकलेले असतात.त्याचप्रमाणे तह-हयात जोपर्यंत वंश आहे तोपर्यंत सर्वजण ज्ञानी होतील,हे तुम्ही बघितले पाहिजे.“तुम बिन नही मुझे मा-बाप भाई” असे तुम्ही आरतीत म्हणता ना? ते तुमचे म्हणणे.

बाबा काय म्हणतात की या माझ्या लेकराला मी ज्ञानी करून सोडीन ! तुमचे मा-बाप म्हणतात की असे म्हणतात! मग तुम्ही बाप झाल्यावर तुमची जबाबदारी केवढी आहे.आज हे सर्व आपल्याच एका भक्ताच्या जीवनात घडणारया गोष्टीवरून सांगितले, पण त्याला वाटते की, मला बोलले.पण माझ्यामुळे इतराना केवढे ज्ञान झाले हा केवढा ऋणानुबंध आहे! माझ्या हातून चांगले झाले नाही, पण माझ्यामुळे सर्वांना ज्ञान झाले यात समाधान का वाटत नाही? आज निमित्त-मात्र होऊन देखील इतराना सुख,समाधान देण्यास मनुष्य तयार नाही.मग तुमचा पै-पैसा हार-तुरा नको.कारण ते तुमच्या जन्मऋणानुबंधनाचे आहे.पण तुमच्या जवळचे अज्ञान घेऊन या.ते माझे भांडवल आहे.

मी जन्माला का आलो हे न समजल्यामुळे जे अज्ञान आहे ते काढून टाकून तुम्हाला सज्ञानी करावयाचे आहे.तुम्ही अज्ञानी म्हणून मी बोलतो असे वाटते.पण ज्ञानी असता तर प्रसाद मिळाला असे म्हणाला असता.चार लोकात आपले नाव व्हावे,आपण मोठे व्हावे असे तुम्हाला वाटते मग चार लोकात बोलणी ऐकायची तयारी नको का? तुमची मुले ज्ञानसंवेदना च्या वर्गाला का येत नाहीत या बाबत पत्राने विचारणा केली पण उत्तरसुध्दा पाठविले नाही.ऑफीसचा Memo आला असता तर तीन उत्तरे पाठविली असतीत असे का? तर आँफीस रोटी देते पण बाबा जन्माची रोटी देतात!

माझे हात बळकट करा.मुले लहान आहेत व म्हणून एवढय़ा लांब येऊ शकत नाहीत.एवढय़ा दोन ओळी जरी लिहिल्या असतात तर मी बस ठेवली असती अगर तुझ्या फीचे पैसे मी देतो आहे तरी त्या मुलाना आणण्याची सेवा कर असे एकाद्या विद्यार्थ्याला सांगितले असते. केवढय़ा पूज्यतेने व आधिकार वाणीने पत्र लिहिले होते पण ते पत्र फेकून दिलेत. मग एक दिवस कृपाही अशीच बाजूला फेकील, मग मात्र कपाळाला हात लावू नका.ते बालक व तुम्ही त्याचे पालक. पण तुम्हाला कोणी तरी पालन करतो आहे ना! मग स्वतःला पालक म्हणण्या ऐवजी प्रौढ बालक म्हणा! प्रौढ बालकासाठी वर्ग म्हणजे मुलाखत व लहान बालकासाठी ज्ञान-संवेदना.

कचरा भरण्यासाठी 40 हजाराची बस म्युनिसीपालिटी खरेदी करते पण त्यात टाकला जाणारा कचरा मात्र 40 हजाराचा नसतो.त्याचप्रमाणे तुम्हाला लाभलेले जीवन अमोलीक आहे.या मिळालेल्या गाडीची किंमत करता येणार नाही.पण गाडीत तुमचा काया, वाचा, मनाचा कचरा टाकता का?परमेश्वराने जीव लक्ष रुपयाचा पाठविला पण कोण टाकतो आहे कचरा? शेवटी तो स्मशानात जाणार!