8-2-1962 गुरूवार

आजची तुमची दिनचर्या-उठणे,पूजापाठ,भस्म,जप,खाणेपिणे या सर्व गोष्टी बघून नवीन येणारा भक्त म्हणेल की अगदी देवासारखी ही माणसे आहेत.आपला आचार-विचार व आहार यावर बराच संयम आला.एकंदरीत आपली साधना अगदी ठिक चालली आहे या भावनेत तुम्ही वावरत आहात.पण तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेत आहात.बाहेरच्या जगातील महाराज या तुमच्या सेवेला पाहून भुलले असते.पण आम्ही नाही भुलणार.या आसनाखाली ज्वालामूखी आहे, तुम्ही ‘बाबा’ म्हणून नमस्कार केलात तर जग भूलेल कारण त्याना फक्त नमस्कार दिसतो.आम्हाला नमस्कार करणाऱयाचा अंतरंगाचा ठाव घेऊन कोणत्या भावनेने हा नमस्कार करत आहे हे स्पष्टपणे दिसत असता तुमच्या नमस्काराला आम्ही भुलणार कसे?
तू असा का बसलास? असा का वागलास? जुना मुकटा नेसून हे काय चालवले आहेस? असे प्रश्न प्रत्यही विचारून तुम्हाला शिस्तीत बसविणारा कोणी भेटला नाही.

आचार-विचार व आहार यात संयम आला व साधनेत प्रगती आहे.पण अजून साधना केलीच नाहीत.आतापर्यंत या मार्गातील यम-नियम शिकलात.साधन शिकलात साधना नव्हे. प्रत्येक ठिकाणी बाबांची कृपा,बाबांची कृपा म्हणून नाचण्याचे सोडून द्या. साधन,साधना व सिध्दता म्हणजे प्रत्यक्ष बाबा फार लांब आहेत.तुम्ही मुलाबाळासह दिल्लीला निघालात.मूल्य दिलेत व दिल्लीचे तिकीट काढलेत.पण ते तिकीट म्हणजे काही दिल्ली नव्हे.लहान मुलगा प्रत्येक स्टेशन आले की विचारत असतो,हीच का दिल्ली? आपण त्याला सांगतो की बाळ दिल्ली अजून लांब आहे.असे सांगून आपण त्याची समजून घालतो.तुम्ही देखील नेमके हेच करत आहात.यम-नियम म्हणजे साधन,साधना नव्हे.तिकीट दिले व सांगितले की दिल्लीला म्हणजे बाबांकडे जा.पण आज त्या तिकीटा लाच दिल्ली समजून चालला आहात.फार भ्रमात आहात.

साधनेची पराकोटी म्हणजे पार्थिव लिंग.पार्थिव म्हणजे कुणी न बनविलेले.आद्य शंकराचार्याचे पार्थिव लिंग आहे.समाधी घेतल्यानंतर चैतन्य,हाड,माती वगैरे एकत्र गोळा करून वर येते.लिंगाचा आकार धारण करते.‘माते,आज तुला अभिषेक करतो’ असे म्हटल्या बरोबर परमहंसाच्या हातातून दुधाची धार लागत असे.असा अभिषेक घेत असे ती कालिमाता.पुरूष व दुधाची धार या किती परस्पर विरोधी गोष्टी आहेत.पण चैतन्याचा पूर्ण अविष्कार झाला,की स्त्री व पुरूष हा भेद नाहिसा होतो.देहाची कर्मेंद्रिये व ज्ञानेद्रिंये कामे करूच शकत नाहीत.त्या कर्मेंद्रिंयाची देहाला गरजच भासत नाही.बाबांकडे बधून कधी तरी एका आगळय़ा आनंदात मग्न झालात का?‘माते’ म्हटल्या बरोबर दुधाची धार वाहते.ही आर्तता लक्षात धेता “हे भगवंता,तू कोठे आहेस?”असे नुसते म्हटल्या बरोबर टप-टप अश्रूंचे ओघळ वाहले आहेत का, असा दिवस कधी अनुभवलात का? आज अज्ञानाने इतके निगर घट्ट झाला आहात की काठीने मारले तर दोन अश्रूसुध्दा डोळय़ात तरळत नाहीत. ही या क्षणाची तुमची अवस्था व साधना योग्य प्राकारे चालली आहे ही आहे,ही भावना.केवढे हे अज्ञान.

गेली चार-पाच वर्षे तीर्थ,गोळ्या  भक्तभाविकास देत आहात.पण तीर्थ म्हणजे काय, स्पर्श संवेदन, ज्ञानसंवेदना याचा अर्थ समजला का? मी सांगितलेला अर्थ मलाच ऐकवू नका.तुम्हाला अर्थ काय समजला,तुमच्या जीवनात त्याचा अर्थ काय लागला?विचार-संवेदना म्हणजे वाईट विचार,संवेदनांच्या रूपाने सोडून देणे.हे समजले.पण तुम्ही वाईट आहात,तुमच्यापाशी वाईट विचार आहेत हे मूळात मान्य आहे का?यामुळे तुमच्याकडून वाईट कर्म घडून इतरांना दुख होते याचा विचार केलात का?

जून 1961 साली या साधना चालू केल्या त्यावेळी कोणते वाईट विचार होते व आज कोणते आहेत.इतके वर्षे गोळय़ा केल्यात,गुण तुमच्यामुळे आला का बाबांमुळे?या प्रश्नांची उत्तरे तुमच्या जवळ आहेत का?तुमच्याजवळ तळमळच नाही.नाही तर बाबा,तुम्ही मला नियुक्त केलेत पण स्पर्शसंवेदना याचा अर्थ सांगा,असे तुम्ही मला विचारले असते.ज्या साधनेमुळे चैतन्याचा,पूर्वजन्माच्या ऋणानुबंधावर संस्कार झाला,ज्यामुळे चैतन्य जागृत झाले तिकडे दुर्लक्ष करू नका. संस्कार,चैतन्य व साधना यांची केव्हाही तटातूट करू नका.

आज साधनेची बाल्यावस्था आहे पैसा खूप मिळाला पण मोहात पडला नाहीत,ही बाबांचा कृपा.पैसा मिळला,मोटार आली,मुलानो, मोटारीतून हिंडून या,मजा करा,पण मी आरतीला चाललो ही भावना पाहिजे.तुमच्या दारात कुत्रे असते.सकाळ-संध्याकाळ दोन भाकरीचे तुकडे टाकले तर तुमच्या चाकरीला हजर असते.घरात कोणी परका शिरत असल्यास त्याच्यावर लगेच भुंकतो.जसा घरात परका मनुष्य शिरतो तसेच तुमच्या या देहात काय,काय शिरले आहे याचा कधी विचार केलात का? स्वतःवर कधी भुंकलात का? तुम्ही एकमेकावर भूंकता.मनुष्य जन्म फार वाईट. क्रिया, कर्म हा देहाचा धर्म आहे.जेवण हा धर्म व समाधान देणे हा आत्म्याचा धर्म. तद्वत चैतन्याचा धर्म म्हणजे साधना देऊन ढेकर आली का? शेतकरी म्हणतो की पाऊस पडू दे.ऊन नको,विधाता म्हणतो शेतकरी वेडा आहे. पाऊस चार महिने येतो पण पेरलेल्या धान्याचा अंकूर येण्या साठी ऊन्हाची आवश्यकता लागतेच.जे पेराल त्याच्या द्विगुणीत होते.पण पावसाने कधी बिल पाठविले नाही.पण पावसाने तयार झालेले धान्य गोण्यात भरले की बिल चालू होते.औषध घेतल्याने गुण रोग्याला येतो व रोग्याचा राग औषध स्वतःकडे घेते.
पृथ्वीवरील पाणी वर जाऊन पावसाच्या रूपाने खाली येते.त्याचप्रमाणे तुमच्या इच्छा-अपेक्षांचे ढग करून बाबा पावसाच्या रूपाने खाली पाठवतात.पण सुख-शांतीचे ढग निर्माण व्हायला कृपा ही हवीच.आज कसलीच जबाबदारी नाही तेव्हा काय करायचा ईश्वर,असा प्रश्न येणे स्वाभाविक आहे.मी म्हणतो संकट निवारण करण्यासाठी नव्हे पण निदान जे आजपर्यंत मिळविले ते उपभोगण्यासाठी कृपा ही हवीच.

मानवाच्या हितासाठी प्थ्वीच्या पोटात खनीज पदार्थ,नवग्रह ठेवले,पण आता सगळीकडे खोदून काही शिल्लक ठेवले नाही.पूर्वी नुसत्या पाण्यावर माणसाची तब्येत ठणठणीत असे.कारण त्या पाण्यात शरीरास आवश्यक असे क्षार होते.तर आता Iron कमी म्हणून इंजेक्सन घ्यावे लागत आहे. हा हिंदुस्थान पोकळ होऊ नये,इथल्या लोकाना आवश्यक ते खनीज द्रव्य व क्षार मिळून त्यांची शरीरसंपदा चांगली रहावी म्हणून अमेरिकेने खनीज द्रव्य काढण्याचे नाकारणे.हे घडले बाबांच्या कृपेने.पण आमचा धंदा बुडला असे काही भक्तांना वाटते.निसर्ग आपला धर्म करीत आहे.उत्पत्ती,स्थिती व लय हा क्रम चालू आहे.पण मानव नेमका उलटा चालला आहे. प्रथम वाम-मार्गाने या देहाचा नाश केला व नंतर ईश्वर शोधायला निघाला.पण वार्धक्य अवस्थेत चैतन्य पुढे जात असते व मनुष्य मागे येत असतो.प्रथम ऍटम बॉम्बने माणसे मारली व आता मानवाच्या सुखाकरता त्याचा वापर करू लागला आहे म्हणून मानवाला शांती नाही.त्याच्या हातून अखंड साधना होत नाही.