8.3.62 गुरूवार (रमजान ईद)

आज ईद आहे. ‘काही’ भक्तांच्या मनात शंका निर्माण होते की, मुसलमानांचा सण गादीवर साजरा कसा करतात? आज विभूती येऊन आशिर्वाद देणार.पण दादा तर बाम्हण. हे सारे गौडबंगाल वाटते.एकदा मानवतावाद जीवनात आणावयाचा म्हटल्यानंतर अमुक जात,अमुक धर्म,असा भेद करून चालणार नाही.आपण असा जर भेद करू लागलो तर जगात अखंड असे काहीच दिसणार नाही.धर्म जन्माला का आला?

धर्म प्रवर्तकाने आपल्या जीवनाचा त्याग केला.आपल्या चपलेचा खिळा पायाला टोचू लागला तर कधी एकदा नाक्यावरच्या चांभाराकड़ून बसवून घेईन,असे तुम्हाला होते.पण त्या प्रवर्तकाने मानवाचे दुख दूर करण्यासाठी आपल्या हातावर खिळे ठोकून घेतले.तुम्ही विडा लावून स्वतः प्रीत्यर्थ काय वाटेल ते मागता पण त्याने परमेश्वराजवळ काय मागितले! जे काही मागितले,ते तुमच्या-आमच्याच हितासाठी मागितले. आपली कार्यपध्दत जातीयवाद मानीत नाही.

उस्तव साजरा करण्यामागचा उद्देश काय? रमजानात उपवास करतात.कारण वर्षभर देहाने जी काही पातके घडली त्यांचे परिमार्जन व्हावे म्हणून हे उपवास किवा  व्रत घेतले.त्या आधी जर कुणाशी वैमन्यस्य आले असेल तर ते विसरून जावून आपण ‘ईद’ किवा ‘पाडवा’ या दिवशी ईद-मुबारक किवा शुभेच्छा प्रकट करतो – का? आपण घरांतील रोज कचरा काढतो त्यामुळे घर स्वच्छ होते.जीवनातील कधी कचरा काढलात का? घरातील कचरा काढला नाहीतर उकिरडा कुठला,हेच कळणार नाही.काहीजण म्हणतात की माझे चारित्र्य धुतल्या तांदळा सारखे आहे.पण हे सगळे धुतल्या नंतरचे झाले.आधीचे सांगा ना? जसे कपडे नवीन तसे विचार नवीन नकोत का? दोन जीवनाची जोड करून आपण कर्तव्याने कृतार्थ झालो का? जे दुर्लभ आहे असे जीवन अगर अवस्था यालाच ‘सण’ म्हणतात. “साधुसंत येति घरा, तोचि दिवाळी दसरा”.पण साधुसंत कोण हा प्रश्नच आहे.

जे काही निश्चित चांगले आहे,तोच सण होय.तुम्ही सण म्हणून लाड़ू जिलब्या खाता पण श्रीखंड खाऊन शरीर केशरी होत नाही.लाड़ू खाऊन गाल वर येत नाहीत.एवढे खाऊन देहाच्या ठिकाणीफरक झाला नाही कारण सत्वांश घेऊन बाकीचे उद्या फेकून देणार आहे.तुम्हाला या कार्य पध्दतीत प्रिय कोण?वास्तविक कार्यच प्रिय पाहिजे.आपणाला मूळ तत्वाशी एकरूप व्हायचे आहे.तुम्ही म्हणता आमचा धर्म श्रेष्ठ.पण तुम्ही ज्यावेळी श्रेष्ठ व्हाल,त्यावेळीच तुमचा धर्म श्रेष्ठ आहे,असा म्हणण्याचा अधिकार तुम्हाला  प्राप्त होईल. हा धर्म श्रेष्ठ व हा धर्म कनिष्ठ असे केव्हा म्हणू शकाल ? प्रथम दोन फुलांचा वास घ्या,अभ्यास करा व नंतर चांगले वाईट ठरवा.याप्रमाणे सर्व धर्मांचा अभ्यास करून मगच श्रेष्ठ, कनिष्ठ,उच्च,नीच,ठरवा.

धर्म अत्याचार करत नाही.मनुष्याने म्हणजे त्याच्या आचाराने अत्याचार केला,धर्माने नव्हे.इथे येणाऱया प्रत्येकाचे दुख स्वाभाविक व मानवी असते व त्यामुळे सगळय़ांना प्रसाद एकच दिला जातो.धान्य ही अमोल ठेव आहे.मुग्यांपासून ते देवापर्यंत सगळेजण भक्षण करतात पण हय़ा लोंब्या हिंदूकरिता व हय़ा इतर धर्मीयांसाठी असा भेद त्या धान्याने केला नाही.ते सगळयानाच सारखे आहे.पण तुम्ही मात्र पिशव्यात भरून त्याचे मूल्य ठरविलेत.तुम्ही मातेची लेकरें आहात का विकारांची! त्याने कधिही उच्चार केला नाही की मी इस्लाम! हा शिक्का त्याच्यानंतर मारला गेला.“वो तो खुदाकी जबान थी”.नंतर मुसलमान आले.ते विचारा-अविचारापासून अलिप्त राहिले म्हणजेच ‘संत’ अगर ‘ईश्वर’ होते.ते अलिप्त का होते तर तुम्हा आम्हाला सुख लाभावे म्हणून.तुम्हाला प्रत्यक्षात व्यथा फार थोडी असते.परंतु सर्कशीतल्या जनावरासारखी तुम्ही नाचत असता.

बंडच्या तालावर जनावरे नाचतात.पण प्रेक्षक नाचत नाहीत.कारण त्यानी बिन बंडच्या आधीच उडय़ा घेतलेल्या असतात.भेदभावामुळे आपण समाजातील सत्य बघू शकत नाही.सणाच्या दिवशी सिंहावलोकन करा.तू जोडायला निघालास,पण सोडलेस काय?या ठिकाणी सूचना पत्रके लागतात. त्यात तुम्हास उद्देशून, “भक्तभाविकास” असा शब्द प्रयोग वापरला जातो.वास्तविक विभूती तुम्हाला भक्तभाविक म्हणून संबोधतात हे पाहून तुम्ही स्वतःच्या थोबाडीत मारून घेतले पाहिजे व मला येऊन सांगितले पाहिजे की, मला मूर्ख म्हणा.पण भक्तभाविक म्हणू नका.मी माझ्या गुरूला हेच सांगितले असते.कारण मी तो नाही.मला शब्दांचे ज्ञान झाले पण एका क्षणापुरतेच!तुम्ही भक्त कुणाचे व भाविक कुणाचे.शत्रूला मित्र म्हणून कवटाळण्याची तयारी आपली असावी.“खुदाके भक्त बन जाव,और भाविक तमाम दुनियाके.बाबांची पूजा करावयाची व मानवाची सेवा करावयाची आहे.ही भावना आपल्या जीवनात मुबारक म्हणजे अमर करावयाची आहे.ही भावना माना, संभाळा व अखंड टिकवा व त्याच वेळी

 “ईद मुबारक म्हणा”!!