श्री.साई आध्यात्मिक समितीचे मूळ स्त्रोत प.पू.साईनाथ महाराज !
प.पू.साईनाथ महाराजानी आपले संपूर्ण जीवन एका निश्चित कार्यासाठी व्यतीत केले. ते कार्य म्हणजे ‘मानवी जीवन ईश्वरमय व्हावे’
असे विशाल ध्येय साध्य करणे व त्याचे सातत्य टिकविण्यासाठी कार्याची रचना मूळापासून अभ्यासणे आवश्यक असते. अशा उत्तुंग कार्याची उभारणी करण्यास प्रापंचिक जीवन यशस्वीरित्या जगून, पारमार्थिक जीवनातील मूळ उद्देश प्राप्त करता येतो, हे प्रामाण्य म्हणून दाखविणारे सक्षम माध्यम गरजेचे असते, हे प.पू.साईनाथ महाराजाना ज्ञात होते. तसे माध्यम नियंत्याने नियोजित केलेले आहे, याची जाणही प.पू.साईनाथ महाराजाना असल्याने, ते माध्यम उदयोन्मुख होताच, त्या माध्यमाकरवी (वंदनीय दादांकरवी) कार्याची सुरुवात केली.
प.पू.साईनाथ महाराजानी अंगिकारलेले जीवित कार्य, हे एका छोट्य़ाशा, सोप्या वाक्यात व्यक्त केलेले असले, तरी त्यात सामावलेली विशालता, व्याप्ति, क्लिष्टता, जीवघेणी-धोके यांची कल्पना सहजासहजी येणारी नाही. कारण त्यात दडलेली असतात ती गूढ तत्वें, कीं ज्यांची उकल करून घेण्यासाठी करावी लागते ती दीर्घ तपःश्चर्या व इंद्रियातीत ज्ञानांचा करावा लागतो, तो सखोल अभ्यास. अशा कार्याच्या प्राप्तीसाठी संकल्प करावा लागतो. तो संकल्प मानवानी इच्छा-वासनेतून केलेला असून चालत नाही. तशी ईश्वरी आज्ञा व्हावी लागते. हे सर्व लक्षात घेऊन खालील प्रश्नांमध्ये त्यांचा समावेश करून ते अभ्यासण्याचे आदेश प.पू.साईनाथ महाराज व विविध दिव्य, पुण्य विभूतींनी वंदनीय दादांना वेळोवेळी दिले :-
अ) मानवाचा जन्म कां, कसा व कशासाठी होतो?
आ) मानवाला जीवन जगण्यासाठी जी मूलभूत-तत्वांची जाण असणे गरजेचे असते, ती जाण होण्यासाठी नियंत्याने काहीं उपाय योजनांची आखणी देह धारणेत केलेली आहे काय?
इ) मानवाला, जीवन जगत असताना कोणत्या गोष्ठींची पूर्तता करावी लागते? किंवा जीवन जगण्याची कांही जीवन-तत्वे निसर्गात कोठे दडवून ठेवले आहेत काय?
पहिल्या प्रश्नाची उकल करण्यासाठी वं दादांनी, प.पू.साईनाथ महाराज व दिव्य-पुण्य विभूतींच्या मार्गदर्शन व सहकार्याने, घेतला तो विषय म्हणजे जन्म-उत्पत्ती-मीमांसा. दुस-या प्रश्नाची उकल करण्यासाठी घेतला तो विषय म्हणजे :- जीवन-उत्पत्ती-मीमांसा. तिसरा आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे मानवी जीवनात अडचणी, अडथळे, दुखे इत्यादी कां व कोणत्या कारणामुळे येत असतात?त्या दुखांचे निवारण कसे व कोणत्या प्रकारे केल्यास त्यांची पुनरावृत्ती होणार नाही? या व अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी ज्या प्रकारची गुंतागुंत जीवन जगत असताना नकळत गुंफत गेलेली असते, त्यांची उकल करण्यासाठी, प.पू.साईनाथ महाराज व दिव्य-पुण्य विभूतींच्या मार्गदर्शनान्वये घेतला तो विषय म्हणजे– दुख-कारण-मीमांसा. अशा प्रकारे आज्ञा होताच मानवी जीवनाच्या अभ्यासास सुरुवात केली. पहिल्या व दुस-या प्रश्नांचा खुलासा होण्यासाठी, तिसरा प्रश्न सखोल पध्दतीने अभ्यासल्यास तीनही प्रश्नांची उकल होऊ शकते. म्हणून मानवी जीवनात कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात, दुखे किती व कसे येतात इत्यादी समजून घेण्यासाठी विविध प्रकारच्या दुखी माणसाना भेटून त्यांच्या अडचणी ऐकून घेणे आवश्यक होते. याचाच अर्थ पहिल्यांदा सर्व-सामान्यांचे प्रश्न कामकाजाच्या माध्यमातून सोडविणे अगत्याचे असल्याने ते कार्य सुरु केले. त्यातूनच जीवनात कोणते प्रश्न, कोणकोणत्या प्रकाराचे व कसे निर्माण होतात, हे उमगले. दुखाला कारण असणा-या दोषांचा अभ्यास करतां, असे दृष्टोत्पत्तीस आले की, दुखाची कारणे इहलोक व परलोकाशी (मरणोत्तर जीवनाशी) संबंधीत असतात. म्हणून परलोकांचाही अभ्यास करावा लागला. एवढ्यावर सीमित नसून त्या परलोकावर प्रभुत्वही प्राप्त करावे लागले. जीवनाचे संतुलत्व बिघडविणास कारणीभूत असतात ते त्रिदोष. ते त्रिदोष म्हणजे –
1. कर्मदोष
2. वंशदोष व
3. ऋणदोष.
हे दोष निवारण केल्याशिवाय, म्हणजेच त्यांचे विमोचन केल्याशिवाय, जीवनाला योग्य वळण लागू शकत नाही. त्यासाठी तीन विमोचन-पध्दती सिध्द कराव्या लागल्या. त्या विमोचने-पध्दती म्हणजे
1) कर्मविमोचन
2) वंशविमोचन
3) ऋणमोचन
विमोचनांद्वारे जीवनात निश्चितता येते हे स्पष्ट झाले. अशी निश्चितता म्हणजे दैनंदिन जीवनात आहार निश्चित करावा लागणे व विचारही निश्चित करण्याची संवय लागणे. त्यामुळे दैनंदिन आचरणात स्थिरता येते, म्हणजेच देहशुध्दी होत असते. याचा अर्थ दैनंदिन जीवन जगत असताना काया-वाचा-मन हे एकत्र येऊन कार्य करू लागतात, प्रत्येक कार्यात एकाग्रता होण्याची सवय लागते. यानंतर दीक्षा घेतल्यास संतुलित जीवनाचे सातत्य टिकविण्याचा मार्ग सुलभ होतो. पुढे त्यातूनच पारमार्थीक जीवनाची ओळख होऊन, त्याची ओढ निर्माण होते. दीक्षा ही एकच असते. पण दीक्षा धारण करण्याची क्षमता काया,वाचा व मनाचे ठिकाणी नसल्याने ती दीक्षा विभागून द्यावी लागते. विभागलेल्या त्या पांच दीक्षा म्हणजे :-
1) उपासना दीक्षा
2) नामस्मरण दीक्षा
3) अनुग्रह दीक्षा
4) गुरू दीक्षा
5) कारण दीक्षा
दीक्षानुरुप दैनंदिन सेवा करीत गेल्यास, जीवनाला एक निश्चित दिशा प्राप्त होऊ लागते. त्यातूनच आत्मिक-तत्वाची जाण होऊन सुख-समाधानाची प्राप्ती होऊन जीवनाला आकार येऊन जीवन साकार होऊ लागते. वरील सर्व विषय साध्य करून,जीवन साध्या, सोप्या पध्दतीने जगण्यासाठी जी शिकवण वंदनीय दादांनी दिली त्यात :-
1) नित्य ॐ कार साधना
2) प्रतिमा पूजन व अनुष्ठान
3) आरती साधना
ॐ कार साधना व प्रतिमा ह्या वंदनीय दादानी सिध्द केल्या असून, त्यासाठी निसर्गातील तीन प्रमुख देव-देवता (उत्पत्ती-स्थिती-लय कर्ते) यांना एकत्र येण्याचे आवाहन करून, त्यांच्याच संमतीने, आशीर्वादाने व सहकार्याने त्यांची स्थापना शक्तिपीठात केली आहे. ॐ कार साधना ही, आद्य कार्य-केंद्रावर शिकविली जाते. प्रतिमा ह्या सूचित सेवेचे पूर्णत्व झाल्यावर अद्य कार्य-केंद्रावर विधीवत दिल्या जातात. याशिवाय सविस्तर माहितीसाठी श्री साई अध्यात्मिक समिती,पुणे येथे संपर्क साधावा. पत्ताः-
श्री विजय भागवत,
श्री साई अध्यात्मिक समिती,
“द्वारकामाई”, 70 अ / 2,एरंडवणा, 15 वी गल्ली, प्रभात रोड,
पुणे 41104.
अशा प्रकारे सन्मार्गी लागलेल्या आपल्या जीवनात काय साध्य होत असते तर :-
1. स्वतःचे जीवन परिपूर्णपणे जगत असल्याचे समाधान प्राप्त होत असते.
2. गत सात-पिढ्य़ातील,सद्गती प्राप्त न झालेल्या आत्म्यांना सद्गती प्राप्त होऊ शकते.
3. एवढेच नव्हे तर, आपणच आपल्या पुढील जन्मांची तरतूद करू शकतो.
असे अलौकिक ज्ञान, ज्ञान-भांडारातून प्रत्येकाने प्राप्त करून घेऊन प्राप्त-जीवन यथार्थ पध्दतीने जगून सार्थकी लावाले ही जगद्गुरु चरणी प्रार्थना.!
।। शुभं-भवतु ।।