अध्याय २ – दु:ख-कारणमीमांसा
शास्त्राधाराप्रमाणे – (१) आधिदैवीक (२) आधिभौतिक व (३) आध्यात्मिक अशी दु:ख-मीमांसा सांगितली जाते . तरीसुद्धा आजची आमची नवमतवादी विचारसरणी आणखी दु:खास कारण झाली आहे. जीवनात वेळोवेळी होणारे संस्कार आम्ही मानले नाहीत. धार्मिक संस्कारांकडे तर पूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. (याबद्दल पूर्ण विवेचन निराकरण पत्रिकेत केले आहे ).
आधिदैविक : – या मीमांसेत जे कुलाचार, कुलोपासना व कुलधर्म कुलपरंपरेमध्ये आहेत, त्यांचे पालन आजमितीपर्यंत झाले नाही. शिवाय आपल्या वडिलोपार्जित मूळ गावच्या ग्रामस्थ ग्रामदेवता यांचाही कुलाचार, कुलधर्म झाला नाही. या व्यतिरिक्त आपल्या गतजन्मांतील राहिलेली दैवी उपासना व चालू जन्मातील दु:ख-निवारणार्थ भिन्न देवतांची केलेली उपासना, व्रतवैकल्ये, अनुष्ठाने वगैरे पासून निर्माण झालेली जीवनातील अशांतता, दु:खे यांचा समावेश होतो. अशा दोषांचे परिमार्जन झाल्याशिवाय दैवी कृपा लाभणे असाध्य आहे.
आधिभौतिक :- या मीमांसेचा भाग प्रामुख्याने आज बऱ्याच दु:खास कारण झाला आहे आणि या मीमांसेतील दोष इतके कठीण आहेत की, तुम्ही स्वतः देव झालात तरी ते तुम्हाला ते सोडणार नाहीत. या मीमांसेतील प्रमुख दोष स्वतः:च्या तिसऱ्या पिढीत निर्माण झालेले असतात किंवा कालांतराने पुढेही निर्माण होतात. यापैकी (१) धननाश (२) विद्यानाश (३) संततिनाश या शिवाय आणखी पाच प्रकार असे (१) मुलांचा आईवडिलांच्या पश्चात भाग्योदय (२) माता किंवा पिता हयात असेपर्यंतच भाग्योदय (३) मुलगी जन्मल्यापासून सासरी जाईपर्यंत मातृ-पितृ घराण्यास उतरती कळा (५) स्वतः ची पूर्वजन्मशापित जन्मदशा किंवा अनिष्ट ग्रहदशा. आता वरील सर्व दु:खाचे कारण जन्म-जन्मांच्या पताकांचे आहे . त्यात घराण्यातील वाडवडील मरणोत्तर जीवनानंतर मुक्त झाले नसतील, दुसऱ्याच्या धनाचा अपव्यय केला असेल, निर्वंशाची स्थावर किंवा जंगम इस्टेट मिळाली असेल, तर वरील दु:खे निर्माण होण्यास कारण होते.
आध्यात्मिक :- ही दु:ख मीमांसा निर्माण होण्यास आपणच बहुतांशी कारण होतो. जीवनाबद्दल काहीतरी सुखाच्या भ्रामक कल्पना करून जीवनाचा अपव्यय करणे, वरील दोन्ही शास्त्रे म्हणजे केवळ मूर्खपणा आहे, त्यांचा आचार-विचार करणे, देवधर्म मानणे म्हणजे कमीपणाचे आहे , मी एकच ज्ञानी, माझा अभ्यास म्हणजेच सर्वस्व हे समजून वरील दोन्ही मीमांसेमधील शेषमात्र ऋण कमी करण्याचा प्रयत्न न करणे यानेच ही दु:खे निर्माण होतात.
आता वरील सर्व दोष हे मानवी जीवनाचा नाश करण्यास कारण झाले आहेत. तरीसुद्धा त्यांचे परिमार्जन करण्यास तुम्ही तयार नाही. मग पुन:श्च हीच दु:खे जास्त प्रमाणात तुमच्या भावी पिढीत गेली व आणखी दु:खास कारण झाली तर दोष तुमचा का देवाचा, का धर्माचा ? तर या सर्व दु:ख-मीमांसेचे परिमार्जन म्हणजे गुरुकृपा ! ती आपणां सर्वांस लाभावी म्हणून ही समिती अखंड आपल्या सेवेस हजर आहे. वरील एकूण दोषांचे परिमार्जन करुन घेणे हा हेतू पूर्ण अर्थाने समजून घेणे व त्याप्रमाणे नित्याचरण करणे म्हणजेच निरंतर सुखाचे वाटेकरी होणे. नुसते ऐहिक सुख मिळावे अशी अपेक्षा करु नका. वरील दोषांच्या परिमार्जनार्थ या ठिकाणी सामुदायिक विधी केले जातात कारण प्रत्येकाला सुख-समाधान लाभावे यासाठी जे धार्मिक विधी आहेत त्यांचा खर्च वैयक्तिकरित्या कोणाला परवडत नाही. यासाठी हे धार्मिक विधी सामुदायिकरीत्या केले जातात व त्यामुळे त्याचा फायदा सर्वांना मिळतॊ.
वर सूचित केलेले दोष जर तुमच्या दु:खास कारण असतील तर नुसत्या पाच आठवड्याच्या ‘प्रसाद’ पूजनाने निरंतर सुखी व्हाल का? सुखी होण्याचा प्रयत्न केलात, तर तो क्षणिक ठरेल. यापुढे जीवनात निरंतर सुखासमाधानाचा लाभ हवा असेल तर तुम्हाला स्वतःच सेवेचा लाभ जोडून दोषमुक्त व्हावयास पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्राय:श्चित्तपूर्वक सेवा करण्यास शिकले पाहिजे. तेवढ्यासाठी रोज सायंकाळी जी सेवा या ठिकाणी होते त्यात स्वतः: भाग घ्यावयास पाहिजे. वेळ नसेल त्या वेळी कुटुंबातील कोणीही सेवा करावी. सकाळी ८ ते १२ व दुपारी ४ ते रात्री ९।। पर्यंतच सेवा करण्यास यावे. वर सूचित केलेल्या दोषांचे परिमार्जनार्थ वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे.
पूर्वी एका सूचनापत्राद्वारे या कार्याची भूमिका जाहीर झालीच आहे. पुन्हा आज त्यापैकी एक बाजू समजावून दिली आहे. वरील दोषांचे परिमार्जनार्थ दैवी निराकरण, उपासना व उपचार सांगणे हे या समितीचे कर्तव्य आहे. आपण किती पटींनी श्रीमंत व सुखी व्हाल, हे गणित समिती सोडवत नाही. जसे, प्रामाणिकपणे महिनाभर नोकरी केली तरच पूर्ण पगार मिळतो, नाहीतर केल्या कामाइतकाच मिळतो, तद्वतच दु:ख निवारणार्थ केलेल्या उपासनेइतकेच दु:ख दूर होईल. येथे केलेल्या अडचणींच्या मार्गदर्शनानंतरची सेवा आपणासच करावयास पाहिजे. कदाचित आपणांस असे वाटणे स्वाभाविक आहे की, सेवा न करता काही रोख रक्कम दिली तर नाही का चालणार ? तर त्यासाठी हे कार्य नाही. आतापर्यंत कार्याची एकच बाजू आपण अभ्यासलीत म्हणजे स्वतः:चा किती फायदा होणार आहे हे पाहिलेत, तर समिती हेच सांगू इच्छिते की, वरील अभ्यासानंतर आपल्या भावी पिढीला ‘दु:ख कसे असते ?’ असे विचारावे लागेल. आज आपण सुख कष्ट व कोठे आहे हे विचारीत आहात.
समितीच्या वरील कार्यपध्दतीत दुसरा विचार व त्याचा अभ्यासही तितकाच पोषक आहे. पहिल्या बाजूस प्रापंचिक दु:ख-मीमांसेचा विचार व निराकरण सांगत असता जे प्राय:श्चित्त किंवा सेवा करावी लागेल ती समाजातील जास्तीत जास्त लोक सहजगत्या कशी करू शकतील हाच विचार समजून घेऊन आलेल्या लोकांना सेवा व निराकरण सांगणे हा दुसरा भाग होय. उदा:- दैवी कोप किंवा सेवा बाकी असेल तर यज्ञ-याग, दान-धर्म करावा असे शास्त्र सांगते. हे आज समाजातील किती लोकांना शक्य आहे ? याचा विचार आर्थिकदृष्ट्या होणे आवश्यक आहे, हे समिती समजून घेऊन आलेल्या भक्त-भाविकास त्याच्या अडचणीला अनुसरून पाच आठवड्यांचे अनुष्ठान सांगते. याचा अर्थ कोणीही असा समजू नये की समितीच्या कार्यपध्दतीस यज्ञ-याग, दान-धर्म यांचे शास्त्र माहीत नाही. आज समाजाच्या बहुसंख्य गरिबीचा भावार्थ लक्षात घेऊन समितीस मार्गदर्शन करावयाचे आहे. हाच माणुसकीचा धर्म समिती निर्माण करू इच्छित आहे, हा सेवेचा पर्याय झाला. आता प्राय:श्चित्त पर्यायाचा विचार करु. ज्यावेळी तुमच्या वाडवडिलांनी कोणाचे धन, सावकारी, निपुत्रकाची स्थावर किंवा अन्य व्यवहार करुन पाप निर्माण केले असेल, त्यामुळे जर आपल्याला दु:ख झाले असेल तर शास्त्राधार सुवर्णदान, गोदान, गृहदान, यज्ञ, याग, तीर्थयात्रा वगैरे पर्याय सुचवितो. सद्गुरु आज्ञा ‘श्रीहनुमंताचे मंदिरात अकरा किंवा पाच आठवडे नंदादीपात गोडे तेल घालावे’ असे सुचविते . अभ्यासूंनी हा भेद जरूर लक्षात घ्यावा. म्हणजे आपणांस हे कळले की, समिती तुमच्या सुखद:खाचा विचार आर्थिकदृष्ट्या कोणत्या प्रकारे करीत आहे ! अशा अनेक पर्यायांचे निराकरण समिती तुमच्या अडचणी लक्षात घेऊनच सुचवीत असते. त्यामागील भावना हीच असते कि की, आपण अज्ञानाने केव्हाही भावना व श्रद्धा निर्माण करु नका. ज्ञानाने, भावना व श्रद्धा निर्माण झाली तरच ‘अखंड सद्गुरु कृपा’ काय आहे हे कळेल.
आज जगात ऐहिक सुखाच्या आहारी गेलेल्या समाजास खऱ्या अर्थाने धर्म समजावून सांगणे कठीण झाले आहे. देव, धर्म किंवा धर्मकृत्य करण्याची इच्छा असूनसुद्धा ते यथायोग्य तऱ्हेने होऊ शकत नाहीत. या मार्गातील प्रत्येक जण स्वतःचा आर्थिक लाभ बुडेल या स्वार्थाने तुमच्या जीवनाबद्दल वाटेल ते भविष्यवाद कथन करतो आहे व आपणांस ‘ते मिळणार आहे’ या भावनेने आपण नाचत आहात, व तो सांगेल ती कर्मे करुन त्याच्या मार्गाचा अवलंब या हेतूने करीत आहात की, या जगात मला खूप पैसा व सुख मिळणार आहे. पण सूज्ञ विचार असा करा की, जर घराच्या बागेत आंब्याचे झाड लावले असेल तर आंबाच मिळेल, पेरु मिळणार नाही व जर भूक लागली असेल तर दुसरा पोटभर जेवून तुम्ही स्वतः ढेकर देऊ शकणार नाही. तद्वतच तुमच्या जन्म-जन्मांच्या कर्माचा ठेवाच आपण घेऊ शकाल व अधिक नित्य केलेल्या उपासनेची गुरुकृपा याचे यथार्थ ज्ञान सामान्य माणसास होऊन त्याचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न ही समिती करते. आपण सर्वजण जास्तीत जास्त कसे सुखी व्हाल याबद्दल जी निराकरण पध्दत या ठिकाणी सांगितली जाते, ती पूर्णपणे अभ्यासलेली आहे. प्रथमच सांगितल्याप्रमाणे मनुष्यास ज्ञान-अज्ञानाने बऱ्याचशा कर्मपरंपरेचा वाटा दु:खास कारण झाला आहे तर त्याचे नुसते कारण शोधून तुम्ही सुखी होऊ शकणार नाही तर त्यांचे निराकरण झाले पाहिजे. परंतु तुम्हास बाह्य जगतासारखे काहीतरी भ्रामक उत्तर पाहिजे असते व ते येथे मिळत नाही. त्यामुळे आपणांस या मार्गाबद्दल अविश्वास वाटतो. आपणां सर्वांची अशी समजूत आहे की प्रसाद मिळाला व पूजन सुरु की पैशाचा पाऊस पडेल. तर विचार असा करा की, आलेल्या दु:खाचे परिमार्जन व्हावे म्हणून प्रसाद घेतला आहे, पैशाचा पाऊस पडण्यासाठी नाही. आता आपणांस ‘पूर्ण सुखी व्हावे’ अशी खरोखर तळमळ लागली असेल तर खालीलप्रमाणे प्रसाद घ्यावे लागतील. ते परिपूर्ण सिद्धसिद्धांत पद्धतीने आत्मसात केलेले आहेत. हे प्रसाद घेतले असताही आपणांसच सेवा करावी लागेल. तरच, खऱ्या अर्थाने तुम्ही सुखी व्हाल.