अध्याय १० – हा मार्ग, हाच सुखाचा ठेवा.
आज जगात या मानवाच्या सुख-समाधानासाठी अनेक बुध्दिवादी शास्त्रे निर्माण झाली आहेत. त्या सिध्दांतामागे ज्ञान आहे, बुध्दि आहे पण भावना नाही. ती अशी की ते सुख सर्वांना मिळतेच असे नाही. ह्याचा प्रचार म्हणजेच आजचे अशाश्वत सुख ! ते न मिळणे म्हणजे ‘मी दु:खी व ज्याला ते मिळते तो सुखी’ ! ‘मी गरीब’ व ‘तो श्रीमंत’ ! खरोखरीच जीवनाबद्दल सूज्ञपणाने विचार करण्यास कोणासही वेळ नाही व अशा अविचारांच्या पायी प्रत्येक जण आपले आयुष्य कंठतो आहे. आज सुख प्राप्तीसाठी समाजातील प्रत्येक जण हा काही ना काही मार्गाचा अवलंब करून सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नानेच आज समाजाची विपन्नावस्था झाली आहे. आज समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा धर्म म्हणजे कर्तव्य प्रामाणिकपणे करायला लावणारा कोणताही मार्ग अस्तित्वात नाही. आज साध्या भिक्षुकापासून ते राज्यकर्त्यापर्यंत आपल्या कर्तव्याचे पालन होत नाही आणि प्रत्येक जण आपल्या ऐहिक सुखाच्या पूर्ततेसाठी आपल्याकडे येणाऱ्या गरजू व्यक्तीना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेवून समाजात दु:ख वाढविण्यास कारण झाला आहे. उदा. :- एखादा धार्मिक विधी असेल तर भिक्षुक आपली प्राप्ती बुडेल या प्रामाणिक स्वार्थाने धार्मिकविधी प्रीत्यर्थ यादी देतात, वास्तविक यादीतील तितक्या जिन्नसांची जरूर असते किंवा नाही हे समजत नाही, परंतु या यादीच्या निमित्ताने प्राप्ती वाढविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा यजमानास प्रामाणिकपणे ‘इतकी दक्षिणा आपणास द्यावी लागेल’ हे सांगणे योग्य होईल. कोणत्याही धार्मिक विधीसाठी धार्मिक कर्माची भूमिका समजावून सांगण्याने देवधर्म करण्यात समाज प्रवृत्त होणार आहे.
आता दुसरी बाजू म्हणजे वकीलांसंबंधी. वास्तविक या मंडळींचे स्थान समाजात इतके उच्च आहे की, प्रत्यक्ष न्यायदेवतेच्या अधिकाराने एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून कायद्याच्या सल्ल्याने हे सोडवू शकतात. आज समाजाची ज्ञान-अज्ञानाने झालेली विचारांची अधोगती त्यांच्याच नाशास कारण झाली आहे. अशा वेळी एकमेकांत होणारी भांडण-तंटे, मारामाऱ्या, खून इ. या हातून घडलेल्या अज्ञानाच्या व अविचारांच्या कृत्याबद्दल ही मंडळी अशा ज्ञानी माणसांचा सल्ला घेण्यास येतात. आज समाजातील शेकडा पन्नास लोकांना सुविचारांनी सुखी होण्याचे मार्गदर्शन यांच्या हातून होण्यासारखे आहे. परंतु ज्या ज्ञानाचा फायदा आज परोपकारार्थ व्हावयास पाहिजे, तो न होता कैक लोकांच्या घरादाराची राखरांगोळी करण्यात ते ज्ञान कारण झाले आहे ! आज समाजामध्ये अडलेला एखादा, की ज्याचे एखादे काम अन्य कारणाने कोर्ट-दरबारात असते व वारंवार दोन्ही पक्षांकडील वकील आपली प्राप्ती वाढविण्यासाठी तारीख मागून घेतात अशा वेळी ज्याच्यासाठी तारीख घेतली त्याला तारखेला हजर राहण्यासाठी स्वतःच्या मुलाबाळांना एकवेळ किंवा ते सुध्दा नाही अशा अन्नपाण्यावर ठेवावे लागते आणि अशा परिस्थितीच्या कारणानेच त्रस्त झालेला एखादा गुन्हा करण्यास प्रवृत्त होतो. आज समाज व्यवस्थेसाठी कायद्याने गुन्हा करणारा ‘गुन्हेगार’ ठरतो, पण गुन्हा करायला लावणारा कायदा (वकील) गुन्हेगार ठरू शकत नाही. या बाबतीत या सर्वांचा अधिकार समाजकल्याणाच्या दृष्टीने फार मोठा आहे. कोणासही त्याच्या हिताच्या दृष्टीने कायद्याचा सल्ला देण्याने आशिर्वादच मिळणार आहेत. परंतु समाजामध्ये आपली भूमिका परोपकारार्थ आहे ही जाणीव देण्यासाठी मार्ग नाही व आहे त्यावर विश्वास नाही.
आज तीच स्थिती डॉक्टर, वैद्य किंवा त्या प्रकारच्या व्यवसायी लोकांची आहे. या विद्येचे स्थान परमेश्वरापेक्षाही मोठे आहे, जेव्हा एखादा मनुष्य आपल्या जन्म-ऋणानुबंधनाच्या कारणाने एखाद्या व्याधीला कारण होतो, त्यावेळी त्याला त्या यातना म्हणजे कृतकर्माचे प्रायःश्चित्त असते. अशा वेळी या व्यवसायातील लोकांचा तो पिडीत आश्रय घेण्यासाठी धावतो. अशा पिडीतांना पुनःश्चः निरालस आरोग्य प्राप्ती करून देणे हा परोपकार परमेश्वरी कृपेपेक्षाही मोठा आहे. परंतु ही पारमार्थीक विचारांची जाणीव भौतिक विचारांनी नष्ट झाल्याने डॉक्टर म्हणजे परोपकार हा पूज्य भाव जावून डॉक्टर म्हणजे गाडी व बंगला असा तिरस्काराचा भाव आज समाजात निर्माण झाला आहे. मनुष्य नाईलाजाने या ज्ञानी वर्गाकडे जातो, याचा अर्थ त्याच्या अज्ञानाचा फायदा घेण्यास कारण होऊ नये. एखादा रोगी जर सर्वसाधारण औषधांनी बरा होणार असेल तर आपली आर्थिक वाढविण्यासाठी व गाडी-बंगल्याचे स्वप्न साकार करण्यासाठी औषधांचा मारा करून त्याला कर्जबाजारी करण योग्य नाही. ही परोपकाराची भूमिका ज्या क्षणी आमच्या समाजातील या अधिकारी लोकांच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात उतरेल त्या क्षणी समाजोन्नती होण्यास वेळ लागणार नाही. परंतु हा परोपकाराचा ठेवा निर्माण होण्याचा पाया दाखविणारे शास्त्र हजारो वर्षापासून जरी अस्तित्वात आहे तरी ते मांडणे कमीपणाचे आहे, असे विचार प्रकट केले जातात.
अशा अनेक परोपकाराच्या बाजू समाजाच्या कल्याणासाठी व हितासाठी आवश्यक आहेत, असे दाखविता येईल. परंतु भौतिक जीवनाच्या ऐहिक सुखासाठी ही लागलेली तहान नित्यानित्य विवेक, परदु:ख, परोपकार करण्साठी सद्बुध्दी निर्माण होऊ देणार नाही. भौतिक जीवनाने सर्वांना सुख-समाधान प्राप्त व्हावे हे आवश्यकच आहे. परंतु त्याच्या प्राप्तीसाठी जे विचार अनावश्यक आहेत ते गेले तरच समाजातील मनुष्याच्या संसारापासून ते राष्ट्राच्या कल्याणापर्यंतचे प्रश्न सुटतील. आज भौतिक जीवनाचा ठेवा सर्वांना मिळावा असा समतावाद निर्माण करून तो मिळणार नाही. कारण उद्या सर्वांच्या सुखासाठी मोटारी स्वस्त झाल्या आणि प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा असा विचार जरी प्रकट झाला, तरी तो घेण्यासाठी नशिब स्वस्त व्हावयास पाहिजे. कारण तो ठेवा विधीलिखीत असल्याने मोटारीसारखी मोटार निघू शकते, पण नशिबासारखे नशिब होऊ शकत नाही. हे द्वैत भौतिक जीवनाची पराकोटी जरी झाली तरी ते कोणीही बदलू शकत नाही. आणि हे न समजल्याने आपल्याला गाडी मिळत नाही किंवा अशाच अन्य प्रकारची सुखे मिळत नाहीत म्हणून मनुष्य अन्य मार्गांनी पै-पैसा मिळवून सुखाचा ठेवा निर्माण करण्यास प्रयत्न करीत आहे. परंतु जे तुमच्यासाठी नाही ते निर्माण करण्यासाठी जसे तुम्ही अनेक मार्ग निर्माण करता, तसेच ते सर्वस्व जावून पुन्हा मुलाबाळांच्या किंवा भावी पिढीला दु:ख देण्यास कारण होता, हे वरील विवेचनावरून सूज्ञ माणसाला पटण्यासारखे आहे. आता प्रश्न असा निर्माण होईल की मग ही सुखे कशासाठी निर्माण झाली ? तर त्यालाही पारमार्थिक विवेचन असे आहे की, ही सर्व साधने होत. या साधनांचा उपयोग करून त्यातून राहिलेला वेळ ईश्वरचिंतन, समाजचिंतन, वैयत्किक उन्नति करण्यासाठी जर खर्च झाला तरच त्याला सुख म्हणता येईल. अशा अशाश्वत सुखाच्या कल्पनांनी स्वतःच्या जीवनाचा नाश करण्याची प्रवृत्ती एकमेकांच्या सुखांकडे पाहून समाजामध्ये निर्माण झाली आहे. ज्या क्षणी एकमेकांकडे पहाण्याची दृष्टी आदर्श म्हणून निर्माण होईल, तेव्हा खरे सुख आणि समाधान प्राप्त होईल. ही समाधानी वृत्ती निर्माण होण्यासाठी जीवनामध्ये असा आदर्श निश्चित करावा लागेल की, ज्याच्याशी बोलले, ज्याच्याकडे पाहिले, ज्याला आपले सर्वस्व अर्पण केले तरी सुध्दा आपल्या ठिकाणी वासनेचा गंधही निर्माण होणार नाही व नित्य जीवनातील आचार-विचारांसंबंधी सहनशीलता निर्माण होईल. असा आदर्श हा पारमार्थिक किंवा आध्यात्मिक मार्गाशिवाय मिळणार नाही.
हे तुमचे सुविचार तुमच्या ठिकाणी अशी भावना निर्माण करतील की, बाह्य जगताबद्दल मला माझ्या ठिकाणी एकही अविचार निर्माण करावयाचा नाही. हा तुमचा विचार तुमच्या ठिकाणी निर्माण होण्यास जीवनाचा निश्चित आदर्श म्हणून परमेश्वरच मानावा लागेल. भावनासुध्दा दोन प्रकारांनी निर्माण होतात. एक आपण मानव आहोत म्हणून व दुसरी आपण मानव असून ईश्वरभक्त आहोत म्हणून ! पहिली भावना तुमच्या ज्ञानाचे प्रतिक असल्याने त्यात अधिक-उणेपणा असणारच. दुसरी परमेश्वराच्या कृपेचे प्रतिबिंब असल्याने ‘त्याचे दु:ख म्हणजेच माझे दु:ख’ ही भावना सदैव जागृत राहाणार ! या भावनेची निरंतर जागृती कुटुंब कल्याणासाठी, समाज कल्याणासाठी, राष्ट्रकल्याणासाठी प्रत्यक्ष आचार-विचारांमध्ये आली की तोच खरा सुखाचा ठेवा. !