आत्मनिवेदन ग्रंथ भाग १

।। ॐ ।।

आत्मनिवेदन

आज ह्या वर्षी ६ फेब्रुवारीला मला ६४ वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशी सर्व भक्तभाविकांनी शुभेच्छा प्रकट करून माझा गौरव केला. पण माझे जीवन म्हणजे काय ? व कसे होते ? यांचा बोध झाला तर भवितव्यात हे जीवन प्रत्येकाला उपयोगी पडेल. नुसती स्तुती करून चालणार नाही. मनुष्य जन्माला आल्यावर, जीवन जगण्यासाठी ‘पैसा’ ह्या माध्यमाची गरजच आहे. ह्यासाठी ‘शिक्षण’ हे आवश्यक आहे, पण फक्त शिक्षण मिळविणे हेच काही जीवनाचे कर्तव्य नाही तर ज्ञान प्राप्त करण्याने प्राप्त जीवनाचा विकास करून घेणे हे कर्तव्यही महत्त्वाचे आहे. शिक्षणाने जीवनाचा प्रश्न सुटतो. पण फक्त खाणे व पिणे ह्याशिवाय जीवन हे का प्राप्त झाले आहे ह्याचा बोध कुणालाही होत नाही. दुसरी बाजू ‘ज्ञान’ ! ज्ञानाने ‘आपण जन्माला का आलो’ ? हा प्रश्न कसा सोडविता येईल ? अशा विचाराप्रत मनुष्य जाईल व मग त्याला ‘जन्माला येणे’ ह्यामागे काय कारण आहे ? ह्याची जाणीव होईल. ‘कारण’ समजले की मनुष्य आपले तन-मन कार्याच्या मागे लावतो. त्याच क्षणी जीवनाचे मूल्य किती आहे हे समजून प्रत्येक क्षणी ‘जीवनाचा खर्च कारणासाठी होणे’ असे जीवन व्यतीत होऊ लागते. जन्माला आल्यावर केवळ पोट भरणे, पैसा मिळविणे, नावलौकिक होणे ह्यापेक्षा ‘नावारूपाला येणे’ हे जीवन आहे याचा बोध होणे आवश्यक आहे व हा बोध होण्यासाठी गुरुभेटीचे सौभाग्य जीवनात प्राप्त होणे महत्त्वाचे आहे. गुरुभेट झाल्यावर जीवनातील समस्या सहज सुटू लागतात व ज्ञानाच्या लाभाने जीवनाचा मार्ग उजळून निघतो म्हणून मी वयाच्या १२ व्या वर्षी शिक्षण घेण्यापेक्षा ज्ञानाचा लाभ कसा होईल याची वाट पाहात राहिलो. जीवनारंभी मी श्री. तेली महाराजांना माझे ‘गुरु’ असे मानले होते, तरीही त्यांना ‘गुरु’ असे म्हणता येणार नाही. कारण त्यांची माझी भेट झाल्यावर ते जे बोलत असत ते ‘ज्ञान’ होते. पण माझी पात्रता न होण्याने मला त्या शब्दांचा बोध आज ५० वर्षांनी झाला, तेव्हा ते ‘गुरु’ होते असे मी म्हणू लागलो. ‘गुरु’ ह्याचा अर्थ, जीवनात ‘स्थित्यंतर’ होणे. केवळ शब्दांनी गुरु करता येत नाही.

त्यावेळी माझे वय इतरांप्रमाणेच होते. त्यामुळे जरी गुरु भेटले तरी ‘गुरु’ ह्या शब्दाचा अर्थ समजत नसल्याने केवळ पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याव्यतिरिक्त कर्तव्य मानत नव्हतो. कारण वडिलांना ही जाणीव होती की, ज्या गुरुची मी सेवा करतो आहे, ती व्यर्थ जाणार नाही. पुढे ह्या गुरुंचे गमन झाल्यावर मला असे वाटू लागले की आपण जीवनात एकटे राहिलो आहोत. जीवनाला जो एक आधार वाटत होता तो गेला आहे. पुन्हा काही तो आधार मिळणारा नाही. अशाच स्थितीमध्ये थोडे दिवस गेल्यावर वडिलांना श्रीभैरवनाथांचा दृष्टांत झाला की, ‘मी अंधारात आहे, मला प्रकाशात येण्याची इच्छा आहे’. ही आज्ञा वडिलांनी मला सांगितली. एव्हढेच नव्हे तर मला घेऊन चैत्र पौर्णिमेस श्रीभैरवाच्या मंदिराकडे डोंगरावर गेले. त्या दिवशी वडिलांनी पणती लावून, भैरवाच्या मंदिरात प्रकाश केला व पुढे मला बोलावून सांगितले की ’रोज नियमाने तू ह्या देवळात येत जा व पणतीत तेल घालून, प्रकाश करत जा’. या नियमाप्रमाणे मी नित्याने ह्या मंदिरात जाऊन, दिवा लावीत असे पण त्यावेळी ‘प्रकाश करीत जा’ ह्या आज्ञेचा बोध झाला नाही. हे स्थान किती पवित्र व स्वयंभू आहे, ह्याची प्रचिती एका पौर्णिमेला आली.

मी सकाळीच रामभाऊंबरोबर पूजा साहित्य घेऊन दर्शनार्थ गेलो असता  डोंगरावर शिटीचा आवाज ऐकू येऊ लागला. हळूहळू डोंगर चढताना समोर जे दृष्टीस पडले ते पाहून, भयभीत होऊन, मी व रामभाऊंनी लोटांगण घातले. त्या क्षणी शिटीचा आवाज बंद झाला व समोर श्रीशेष श्रीभैरवाचे जवळ बसले आहेत, असे दृष्य पाहिले. हा चमत्कार आहे का सत्य आहे ह्या संभ्रमात मी कैक दिवस होतो. कारण त्या दिवसापासून एक वेगळाच अनुभव घेत होतो. हा काय प्रकार आहे हे विचारणार कोणाला ? शेवटी वडिलांना सर्व हकिगत निवेदन केली. त्यावेळी ते म्हणाले ‘श्रीशेषाचे दर्शन झाले तो चमत्कार नसून, प्रत्यक्ष श्रीशेषांनीच दर्शन दिले आहे’. त्यामुळे देव आहे ही बाजू दृढ होऊन मी शंभर टक्के आस्तिक होऊन या पुढील आयुष्यात नुसता चमत्कार किंवा दृष्टांत झाला, म्हणून ईश्वरावर विश्वास ठेवून गप्प बसलो नाही. ह्या सर्व घटना काय घडतात व त्यामागे काय कारण आहे याचा शोध लावून जगाला सांगणे आपले इष्टकर्तव्य आहे व याची शास्त्रीय मीमांसा, यांचा शोध त्यांच्याच कृपेने घ्यावयाचा, असा संकल्प विचारात घेतला. पण ही बाजू देवाची झाली. वडील ज्यांना मानत होते ती व्यक्ति सामान्य दिसत होती पण असामान्य आहे, हे कसे पटावे ?

एके दिवशी वडिलांची व त्यांची भेट रस्त्यात झाली असतांना, ‘मला जेवू घालत जा’ असे हाक मारून त्यांनी वडिलांना सांगितले. ताबडतोब घरी येऊन वडिलांनी माझ्या आईला जेवण करण्यास सांगितले. जेवणात फक्त भाकरी व मेथीची भाजी होती, ती घेऊन वडील गेले तोपर्यंत ते घरी पोचले होते. वडील जेवणाचा डबा घेऊन गेले असताना ‘मला जेवण पाहिजे आहे पण तुझ्याकडून नको. तुझ्या मुलाला पाठवून दे. तरच जेवण पाठव नाही तर नको’. वडील घरी आले. मला म्हणाले, ‘तुला तेली महाराज माहीत आहेत का ? ’मी ‘होय’ म्हणालो, “आहेत तर !”. ‘त्यांनी हा डबा घेऊन तुला बोलाविले आहे, नाहीतर मला जेवण नको आहे, असे ते म्हणाले. तेव्हा तू घेऊन जा’. त्याप्रमाणे मी महाराजांना डबा घेऊन गेलो. डबा पाहताच म्हणाले, ’त्या फळीवर ठेव व दुसरा डबा इकडे आण’, त्याप्रमाणे मी केले. पण मी नेलेला डबा त्यांनी त्या दिवशी खाल्ला नाही. असा क्रम चालू होता. पुढे वार्षिक परीक्षा जवळ येऊ लागली व डबा नेण्यात माझा अर्धा-एक दिवस जाऊ लागला. शेवटी मन घट्ट करून महाराजांना विचारले, ’बाबा, माझी परीक्षा आता जवळ येऊ लागली आहे व अभ्यासास वेळ पुरत नाही तर काय करू” ?

ज्या वर्गात मी शिकत होतो, त्या पूर्वीच्या परीक्षेत मला ८७ % मार्क मिळाले होते. ‘पुढे काय होणार’ ? म्हणून बाबांना विचारले असताना त्यांनी माझे केस धरले व म्हणाले, “जगाला शिकून आग लावू नको, आग लागली आहे ती विझव”. मला काही अर्थ समजला नाही. पुढील परीक्षा झाली व शेवटी परीक्षेचा रिझल्ट लागून, मला ३३ % गुण मिळाले. मी अतिशय निराश झालो. शेवटी वडिलांनी सांगितले की, ‘पुन्हा अभ्यास कर’. त्याप्रमाणे मी अभ्यास करू लागलो तर महाराज म्हणाले, ‘शिक, शिक, कसा आग लावतोस ते बघतो मी’. पुन्हा परीक्षा झाली व शेवटी मी नापास झालो. आणखी मनाने खचलो. पुढे काय करावे ? घरातला वडील मनुष्य ! भवितव्यात शिक्षण नाही, कसा उभा तरी राहणार ? ह्या विचारांनी काहूर माजला. शेवटी वडिलांना विचारले ‘आता पुढे काय करू ? ’ वडिलांनी सांगितले, “महाराजांची आज्ञा होईल तसे कर”. जगतातील लोक आपली मुले पास व्हावीत म्हणून महाराजांचा आशीर्वाद घेत, हे मी पाहिले असताना, मला नापास करताना हे वाक्य बोलताना मी ऐकलेले होते की ‘शिक, शिक, कसा आग लावतोस ते. बघतो मी‘. शेवटी मी महाराजांकडे गेलो, आता पुढील आयुष्यात ‘काय करू ?’ या विचाराने मी त्यांच्याकडे जाऊन सर्व परिस्थिती निवेदन केली. फक्त माझ्याकडे पाहून असे उद्गार त्यांनी काढले, ‘देवासारखा देव असून रडतोस काय ! जन्माला येणारा मनुष्य, कर्माला रडतो. तूच तर देव आहेस. मी गेल्यावर ही प्रचिती अनुभवाला येईल, पण मी नसणार. शहाणा हो व भैरवनाथांनी सांगितल्याप्रमाणे “प्रकाश कर !”  या वाक्याचा अर्थ ब्रह्म म्हणून विचार कर. जास्त खोलात जाऊ नकोस. नाहीतर बुडून मरशील. ’ त्यावेळी शब्दाला अर्थ असतो हे कळले, एक व्यावहारिक व दुसरा अर्थ तात्त्विक.

आता माझा मीच विचार केला की, ‘जगाचे भवितव्य ज्यांना कळते त्यांना माझे भविष्य सांगता येत नव्हते पण घडवावयाचे होते ! , ते त्यांना घडवू दे म्हणून ‘आज्ञा’ समजून गप्प बसलो. पुढे नियमितपणे श्रीभैरवाला जाऊ लागलो. आता शाळेला ‘इतिश्री’ म्हटले होते, त्यामुळे वेळ भरपूर होता. त्यामुळे मन स्थिर राहून काबूत राहिले पाहिजे, यासाठी ‘सकाळी रोज ‘गुरुचरित्र’ वाचत जा’ असे वडिलांनी सांगितले. ही आज्ञा शिरसावंद्य मानून, योग्य दिवस विचारून, वडिलांच्या हस्ते श्रीगुरुचरित्राची पोथी घेऊन, वाचनास आरंभ केला.

पुढे एके दिवशी श्रीभैरवनाथांच्या मंदिरांत गेलो होतो, त्यावेळी एक गुराखी येऊन माझी विचारपूस करू लागला व त्याने असे सांगितले की “येथून एका फर्लांगावर एक पाण्याचा झरा आहे व जिवंत पाणी आहे. नुसती पणती काय लावतोस ? स्नान कर. मग देव काय म्हणतोय ते पहा”. मी ह्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. पुढे तो गुराखी मला भेटला नाही, तेव्हा मीच झरा कोठे आहे याचा शोध घेतला. तर खरोखर देवळापासून एका फर्लांगावर हा पाण्याचा झरा वाहत असताना दिसला. पहिल्या दिवशी ओंजळीने ह्या झऱ्याचे पाणी प्राशन केले. ह्यामुळे तरतरी येऊन बरे वाटले. मग मंदिराकडे पणती लावण्यासाठी गेलो. नेहमीपेक्षा  पणतीचा प्रकाश वेगळा पडला असून चांदण्याचा प्रकाश असतो, असा भास झाला. त्या प्रकाशात श्रीभैरवांची मूर्ती जिवंत आहे असा भास झाला. याच रात्री असे वाटू लागले की, श्रीभैरवनाथांनी जो वडिलांना दृष्टांत दिला होता ‘मला प्रकाशात ठेव’ याची साक्ष पटली. अशा तऱ्हेने माझी भैरवनाथांची सेवा सुरू असताना एक दिवस सायंकाळी नेहमीप्रमाणे पूजा करून डोळे मिटून बसलो असताना ध्वनी ऐकू येऊ लागला. त्याबरोबर मी उठून, कपडे घेऊन पळत सुटलो व घरी आल्यावर वडिलांना म्हणालो, ‘यापुढे भैरवाकडे मला पाठवू नका. आज सायंकाळी ध्यान करीत असताना, मी भुताचा आवाज ऐकला’. वडिलांनी शांतपणे ऐकून घेतले व हसू लागले. पण मग मला म्हणाले, “अरे, ते स्थान पवित्र व स्वयंभू आहे. या ठिकाणी भूत येणे शक्य नाही. तुला कशातरी भास झाला आहे. मी येतो तुझ्या बरोबर”. आम्ही दोघे डोंगरावर गेलो. कुणी मनुष्य नव्हते. नेहमीप्रमाणे स्नान केले व पूजा करून ध्यानास बसू लागताच पुन्हा तो ध्वनी ऐकू येऊ लागला. मी पुन्हा घाबरलो. वडील बरोबर होतेच. ते म्हणाले “बाबा रे नीट ध्वनी ऐक. हा ध्वनी भुताचा नाही”. मी शांतपणे बसून ऐकू लागलो. “ह्या ध्वनीला ‘सिंहनाद’ म्हणतात. जेव्हा देव प्रसन्न होतो, तेव्हाच असा नाद निर्माण होतो. हा  ध्वनी नसून ॐ कार  आहे. तू जन्माला का आलास, हे गूढ होते. ते  मला आज समजले. आपण शांत चित्ताने घरी जाऊ. आता तुझी भीती होती की, ‘भूत आहे’, तेही बरोबर आहे. ‘भूत’ याचा अर्थ, एखादी व्यक्ती मृत झाल्यावर त्या व्यक्तीची जी इच्छावासना शिल्लक राहते, तो आत्मा इच्छावासनेमुळे  ह्या जगात हिंडत असतो. एखादी चांगली गोष्ट गतकाळात घडली व तिची पुनरावृत्ती व्हावी म्हणून निसर्गसुध्दा भूतकाळाची जाणीव आम्हा मानवांना देतो. पण ज्ञानाच्या अभावी आपण निसर्गाच्या कृपेला पात्र होत नाही. जर तू ‘भूत’ म्हणत राहून श्रीभैरवनाथांकडे आला नसतास, तर जो ध्वनी आता ऐकलास, त्याला मुकला असतास. आता तुझी भीती गेली आहे. भवितव्यात कशा कशाचा लाभ होतो आहे याचा विचार कर. सर्व जग भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांवर विश्वास ठेवून आहे. ज्यामुळे लाभ निश्चित होणार आहे, अशा देवावर मात्र विश्वास ठेवत नाही”.

त्याकाळी मी शाळेत शिकत असताना ‘गाणे’ हा विषय होता, त्यामुळे श्रीभैरवनाथांचा ध्वनी म्हणजे काय हे समजू शकलो. साधारणपणे संगीतामध्ये एक सप्तक म्हणजे कोमल ‘सा’ पासून उच्च ‘सा’ पर्यंत असते. ह्या क्रमाने एक वर्षांत हा ॐ कार संथेने मला श्रीभैरवांनी शिकविला. पुढे ही नित्य साधना करू लागलो. या उपासनेत कोणतीही देवता किंवा देव यांचा संबंध न येता व आजपर्यंत जेवढे अवतारी पुरुष म्हणून जे जन्माला आले, यांना ‘गुरु’ म्हणून मानणे, याची गरज पडली नाही. त्यामुळे जी साधना ॐ म्हणून दिली होती तिचे पूर्णत्व प्राप्त झाले.

पुढे चरितार्थासाठी काही मिळवावे, अशी इच्छा झाल्यामुळे पुण्यास आलो. आल्यावर काही नोकरीचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही, पण ह्या काळात नोकरी निमित्ताने ज्या व्यक्तींशी संबंध आला त्याच व्यक्ती पुढे कालांतरानी भेटून, स्वतःच्या व धंद्याच्या भवितव्यात काय आहे अशी विचारणा करत्या झाल्या, ह्या नोकरीच्या प्रयत्नात अनुभवाने असा निश्चित झालो की, आपण प्रयत्न केला व ज्या अर्थी ते यश आपल्याला प्राप्त होत नाही, याचा अर्थ ‘परमेश्वराची इच्छा नाही’, म्हणून गप्प बसणे भाग आहे.

ह्या काळात जागतिक लढाई सुरू झाली. महागाई हळू हळू वाढू लागली व माझे जे काम म्हणजे ड्राॅईंगचे ते महाग झाले व कालांतराने ह्या वस्तू बाजारात मिळेनाशा झाल्या. आता पुढे काय करावे ? एके दिवशी उठलो व संपूर्ण दिवस विचार करण्यासाठी विठ्ठवाडीला जाऊन बसलो. तरी निश्चित विचार ठरविणे कठीण होऊन बसले. शेवटी निर्णय असा घेतला की, आपण मिलिटरीमध्ये जावे. येथे बसण्यापेक्षा नोकरीचा लाभ होऊन, बाहेरचे जग पाहावयास मिळेल. पण पुढे काय होणार आहे हा विचार पुन्हा मागे ओढू लागला. आपल्याला श्रीभैरवांनी ॐ कार साधना शिकविली आहे, याचा लाभ कसा होईल ? पुढे जर ही साधना करता आली नाही तर ह्याचा लाभ जगताला कसा होईल या विचाराने व्याकुळ झालो. एका बाजूला परमार्थ व दुसरी बाजू प्रपंच अशी अवस्था झाली. त्यावेळी मी मामांच्याकडे राहात होतो. त्यांना विचारले, तर ते तरी काय सांगणार ! ’जशी देवाची इच्छा असेल, तसे घडेल’, असे ते म्हणाले. शेवटी मी मिलिटरीत भरती झालो ! प्रथमतः काय सांगावे ? हजारो लोक भरती होऊन आले, त्यात मी पण होतो. त्यावेळी भरती झाल्यावर एक वरिष्ठ अधिकारी प्रत्येकाला विचारत होता की, ‘तुला काय काम येते ?’ माझा नंबर आला तेव्हा त्यांनी तीच विचारणी मला केली. मी म्हणालो, “मला मोटारचे काम येते”. त्याप्रमाणे त्यांनी माझी रवानगी टेस्टसाठी केली. संध्याकाळपर्यंत मी वर्कशॉपमध्ये वेगवेगळे काम केले. ते काम पाहून दुसऱ्या दिवशी मग असे सांगण्यात आले की, ”सहा महिने तुला वर्कशॉपमध्ये शिकण्यासाठी पाठविले आहे. सहा महिन्यानंतर तुझी ग्रेड व रँक मिळेल”. त्याप्रमाणे सहा महिन्यानंतर मला सुपरवायझरची पोस्ट मिळाली व नोकरीमध्ये वॉरंट-ऑफिसर  अशी बढतीही मिळाली. ज्या कामासाठी माझी परीक्षा घेतली ते काम घरी असताना, मी शिकलो होतो. आमच्या वडिलांचा वर्कशॉप होता व गाड्या होत्या, मी केव्हा केव्हा वर्कशॉपमध्ये काम पाहण्यासाठी जात असे. मिलिटरीत भरती झालो तेव्हा माझी स्थिती ‘एकीकडे आड दुसरीकडे विहीर’ अशी झाली होती. आता कसे जगायचे ? हा प्रश्न पडला होता पण ईश्वर पाठीशी असतो ह्याची प्रचिती आली, म्हणूनच ज्यावेळी वरिष्ठांने, ”तुला काय काम येते” ? असे विचारले तेव्हा माझ्या तोंडून हे सांगितले गेले की, “मला मोटरचे काम येते”. मिलिटरीत भरती झाल्यावर आठ दिवसात एवढा मान मिळाला व पुढचे कार्य घडले ही परमेश्वराची कृपाच !

अशा तऱ्हेने पाच वर्षे मी मिलिटरीत राहिलो. कामा व्यतिरिक्त जो वेळ मिळाला त्यावेळी मी साधना करीत असे. वय लहान म्हणता येणार नाही पण ह्या नोकरीमुळे जगाचा संबंध सुटला. पाच वर्षे बाहेर होतो. त्यामुळे विचार करून आपली दिशा पुढे ठरविता आली. पुढे हिंदुस्थानात जरी मी हिंडलो असतो तरी ते खर्चाचे होते. पण मिलिटरीत जाण्याने बगदाद, करबला, जेरुसलेम येथील पवित्र स्थाने मला पाहावयास मिळाली. पुढे हिंदुस्थानात आल्यावर मी डिस्चार्ज घेतला व पुन्हा घरी आलो. त्यावेळी वडील खूप थकले होते. त्यांनी सांगितले, ”आता कोठेही जाऊ नको. जी तुला साधना दिली आहे ती सुरु कर”. तेव्हा मी म्हणालो की “गेल्या पाच वर्षांत मी झोपण्यापूर्वी नित्य साधना करतो आहे. त्यात एखादे वेळीच खंड पडला असेल, नाहीतर मी सेवा अखंड करीत आहे”. ते ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला.

पुढे नोकरीसाठी पुण्याला येण्यापूर्वी, श्रीभैरवनाथांच्या दर्शनास गेलो व जोपर्यंत घरी सातारला होतो त्यावेळी नित्य दर्शनासाठी जात असे. एके दिवशी “प. पू. साईबाबांचे नाव ऐकले आहेस का ?” असा ध्वनी आला. ‘नाव ऐकले आहे’ असे उत्तर माझ्या तोंडून निघाले. त्याबरोबर श्रीभैरवनाथांनी सांगितले, “भवितव्यात त्यांची सेवा कर व आज्ञापालन कर, त्यात तुझे व इतरांचे कल्याण होईल”. पुढे पुण्याला आलो व सरकारी नोकरी करू लागलो. तसेच भैरवनाथांच्याकडे जाऊन आल्यावर जी आज्ञा, ‘प. पू. बाबांची सेवा कर’अशी होती. त्याप्रमाणे मी जो प. पू. बाबांचा लहान फोटो देवघरात आहे, त्याची सेवा सुरु केली. त्यामुळे हळूहळू भूत-भविष्य समजू लागले होते व हे सांगण्यामागे कोण आहे हे समजू लागलो. कोणत्याही पुस्तकी शास्त्रांचा आधार घेतला नाही. पुढे काही दिवसांनी प. पू. साईबाबांची सेवा चालू असताना तळमळ ही होती की, प. पू. बाबांचे दर्शन घडावे ! . एके दिवशी पूजनासाठी बसलो असताना, मन एकाग्र झाले व डोळे मिटले, परंतु काही समजू शकलो नाही. अशाच अवस्थेत काही दिवस गेले. ‘हा आपल्याला भास होत आहे का खरे आहे’ हे समजेना. पण ज्या वस्तुस्थितीचा अनुभव मी घेतला तो खोटा नव्हता. मग असे कां व्हावे हेही समजेना. पुढे एका गुरुवारी सायंकाळी मी पूजनासाठी बसलो. बराच वेळ गेला तरी उठू नये असे वाटू लागले. साधारण रात्रीचे ११ वाजले असतील. अशा अवस्थेत मी बसून राहिलो – धड जाग नाही व झोप नाही, निदान अजूनही ती अवस्था मला सांगता येत नाही, पण अनुभव हा विलक्षण होता हे मात्र खरे ! अशा अवस्थेत मी बसून असताना, माझ्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला आहे असा भास झाला. तो हात कसा होता ? तर अतिशय मऊ व हाताच्या स्पर्शाने जी जाणीव झाली ती म्हणजे ‘माया’. ‘माया’ ह्या शब्दाचा संबंध आपण केवळ आईशी लावतो. पण आईहूनही प्रेमळ असते ती गुरुमाऊली ! माया + आई = गुरुचे प्रेम. याचा अर्थ त्या क्षणी समजला ! त्या क्षणी हे कळले की, प. पू. बाबांचे दर्शन घडले आहे. पण त्या क्षणी काय मागावे, काय बोलावे याचाही विसर पडला व तो पडतो ! मी एवढे मागितले की, “माझ्या हातून ह्या जगाची पूर्ण सेवा घडू दे. आपण सद्गुरुंच्या ठिकाणी आहात. हे जग भवितव्यात कसे सुखी होईल ही तळमळ लागली आहे. श्रीभैरवनाथांनी सुखाची गुरुकिल्ली आपल्या नावामध्ये आहे असे सांगितले. पण अजून मला आपले स्मरण, नामस्मरण करता येत नाही. श्रीभैरवनांथांनी जाणीव दिली आहे की, ‘भवितव्यात हे जग तुमच्याशिवाय जगू शकणार नाही’ म्हणून आपण जी आज्ञा द्याल, त्याप्रमाणे वागीन”.

इच्छा शिकण्याची खूप होते, पण ‘शिकून जगाला आग लावू नको. लागलेली आग शांत कर’, असे तेलीबाबा म्हणत होते. त्याचा अर्थ म्हणजे वेदांत आहे !  तेव्हा ‘माझ्या काया, वाचा, मनाला ज्ञान द्या’ एवढीच प्रार्थना म्हणून मी आडवा झालो. सकाळी ५।। वाजता जाग आली. तर हे जग जिवंत असून नसल्यासारखे वाटू लागले म्हणजे जग अस्तित्वात आहे, पण कशाची तरी उणीव आहे, हे वाटू लागले. ही उणीव भरून काढणे शक्य आहे का ? व अशीच उणीव जगाच्या अंतापर्यंत वाढीस जाणार का ? अशा तळमळीने बाबांची सेवा जास्त मन लावून करू लागलो. पुढे पुढे प्रश्नावर प्रश्न उपस्थित होऊ लागले व त्यांची उत्तरे आपोआप मिळू लागली. त्यावेळी जरी उत्तरे मिळाली तरी ज्या प्रश्नांसंबंधी विचारणा होती, त्याचे प्रत्यंतर अनुभवाला येण्यास वेळ लागला. एवढेच नव्हे तर काही तपे लागली. त्यावेळी मुख्य प्रश्न असे होते — विद्यानाश, धननाश, संततीनाश या दोषांचे निवारण गुरुकृपेने करता येईल किंवा नाही ? हा प्रश्न नेहमी विचारत असता बाबा म्हणाले, ”लहान तोंडी मोठा घास एकदम घेऊ नको. घास तसाच राहील व तोंड मात्र फाटेल !” हे उत्तर मिळाले तेव्हा आपली चूक कोठे आहे हे कळले. कारण ज्या प्रश्नांची विचारणा केली होती, ती प्राप्ती जरी झाली असती तरी माझी पात्रता त्यावेळी नव्हती. यासाठी योग्य वेळी जेव्हा आज्ञा होईल तेव्हाच कृपेने ह्या प्रश्नांचे उत्तर मिळेल, अशा विचारात सेवा चालू होती. लोकांची कामकाजे होत होती. कामानिमित्त येणारे भक्तभाविक ह्यांची संख्या वाढू लागली. त्यावेळेस कामानिमित्त  प्रामुख्याने येणारे सिनेमा धंद्यातील लोक होते. ह्या लोकांचे आगमन होत असता त्यांच्या येण्याने जाण्याने गुरूवर निष्ठा आहे किंवा या लोभामुळे मी वाहत जात आहे अशा परीक्षेचा काळ होता. पैसा व व्यसने, कनक व कांता हात जोडून हजर होत्या. काय करावे हे ठरविता येईना. कारण घरची परिस्थिती बिकट ! आठवड्याला रेशन आणण्यास पैसे नाहीत !  ती परिस्थिती क्षणात बदलता आली असती, मी जर ह्या लोकांची मनधरणी केली असती तर ! शेवटी निर्णय असा घेतला की, पैसा काही उपयोगी पडणार नाही. शेवटी ‘गुरु’ हेच साधन ! ती जोड ही पूर्वपुण्याईने प्राप्त होते. केवळ पैशासाठी ती तोडता कामा नये. हा निर्णय घेऊन शेवट काय ? उपाशी राहू, पण ‘गुरुंना’ अंतर द्यावयाचे नाही, असा निश्चय केला व शेवटी मी ह्या लोकांना भेटावयाचे बंद केले.

त्यावेळी मी नोकरीत होतो. नोकरी करून लोकांना भेटणे चालू होते. याप्रमाणे दोन वर्षांचा काळ लोटला. त्यावेळी ज्या लोकांची ओळख झाली त्यामुळे बराचसा प्रचार झाला होता व चांगले अनुभव येऊन लोक सांगत होते. अशावेळी एक घटना घडली. ती म्हणजे शनिवारी व रविवारी मी मुंबईस जाऊ लागलो. ज्यांच्या घरी जात असे, त्यांच्या बंगल्यावर ‘बाबू’ नावाचा एक गुजराथी नोकर घरकामाला ठेवला होता. लहानपणी त्याच्यासाठी त्याच्या आईवडिलांनी नवस केला होता, पण काय हे त्याला माहीत नव्हते. वयात आल्यावर नोकरीसाठी तो मुंबईला आला व मी ज्यांचेकडे राहत होतो, त्यांचेकडेच नोकरीला राहिला. एके दिवशी सांगितल्याप्रमाणे तो माझी खोली साफ करण्यासाठी माझ्या खोलीत आला. माझ्या खोलीत प. पू. बाबांचा फोटो पूजनार्थ ठेवलेला होता. त्या खोलीत शिरताच त्याच्या अंगात काहीतरी संचार आला, पण काय आले हे न समजताच तो धाडकन् पडून ओरडा करू लागला. त्यावेळी मी ज्यांचेकडे राहत होतो त्यांच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो. तोच एक नोकर पळत पळत येऊन सांगू लागला, “बाबूच्या अंगात भूत आले आहे व तो ओरडा करीत आहे. तेव्हा तुम्हाला बोलावले आहे”. मी त्या ठिकाणी गेलो. तो काहीतरी गुजराथीत बोलत होता, हे भूत नाही एवढे समजले. पण तो काय बोलतो आहे हे समजण्यासाठी एका गुजराथी माणसाला बोलावले. अंगात आलेल्या शक्तीने सर्व खुलासा सांगितला की, “मी भूत नसून, मी देवी आहे. ह्या व्यक्तीच्या लहानपणीच त्याच्या आईवडिलांनी मला हा मुलगा वाहिला आहे. आता तो आपल्या गावात राहून जे लोक अडीअडचणीत  आहेत, त्यांना मार्गदर्शन करावयाचे सोडून, ह्या मुंबईला आला आहे. ज्या गोष्टी पालन करावयास पाहिजेत, त्या तो करत नाही. म्हणून पूर्वीही त्याला ह्या प्रकाराबद्दल ताकीद दिली होती. लहानपणी गावातील सगळे लोक ह्याला ‘देवीभक्त’ म्हणून ओळखत होते व लोकांनाही त्याच्या सांगण्याचा गुण अनुभवास येत होता. पण मोठा झाल्यावर ज्याचे पालन करणे आवश्यक होते ते न केल्यामुळे मी त्याची वाचा बंद केली आहे. पूर्वी हा बोलत असे. आता बोलता येत नाही. फक्त सांगितल्यावर सर्व कामे हा करतो. आज तो ही खोली साफ करण्याच्या निमित्ताने आत  आला, तेव्हा प. पू. बाबांचा फोटो पाहून मी पुन्हा अंगात आले आहे. ह्या व्यक्तीला सांगा की, आपल्या गावी जा. अजूनही लोक वाट पाहत आहेत. त्यांची सेवा करण्यातच ह्याचे कल्याण आहे”. एवढे सांगून देवीचा संचार बंद झाला.

देवीच्या आगमनाने त्याची वाचा पुन्हा बोलू लागली. मग मी त्याला बोलावले व देवीने केलेला खुलासा त्याला निवेदन केला. त्यानेही गुजराथीमध्ये सर्व स्पष्टीकरण केले व यापुढे ह्या महिना अखेरीस गावी जाईन, असे आश्वासन दिले. पुढे तो गावी गेला. दोन महिने तेथे राहिल्यावर एके दिवशी देवीने येऊन त्याला सांगितले, ”साईबाबांच्या भक्ताला ताबडतोब भेट. मला सुटका पाहिजे आहे. तू माझे पालनपोषण करू शकणार नाहीस. येणाऱ्या नवरात्रापूर्वी मी तुला सोडवणूक देणार आहे”. त्याप्रमाणे तो पुन्हा मुंबईला आला व पूर्वी ज्यांच्याकडे तो नोकरी करीत असे, त्यांचेकडे जाऊन त्याने देवीने सांगितले होते ते सांगितले. त्यांचेकडून मला निरोप आला की, बाबू मुंबईस आला आहे व त्याचेकडील देवीने मला बोलावले आहे. त्याप्रमाणे मी मुंबईस गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या घरी बाबू राहात होता तिथे पूजा, आरती झाल्यावर देवीचा संचार होणार आहे असे कळले. त्याप्रमाणे पूजा आरती नंतर देवीचा संचार झाला. मी नमस्कार करून, ‘काय सांगणे आहे ?’ म्हणून देवीस विचारणा केली. तेव्हा त्या देवीने स्पष्ट खुलासा केला की, “ज्या कुटुंबात मी आज आहे, त्याला १०० वर्षे झाली. मला गावाचा संभाळ करावयाचा आहे. ह्या कुटुंबाचा संभाळ गावातील जे देवीभक्त आहेत ते करतील. हे लोक मला मानून सेवा करावयाची ती सोडून, पैसे मिळविण्यासाठी शहरात जातात. जी श्रेष्ठ गोष्ट वंशपरंपरेने मिळाली आहे, त्यापेक्षा त्यांना पैसे अधिक श्रेष्ठ वाटतात, त्यामुळे ह्या लोकांनी आपला ‘मान’ होता तो सोडून दिला आहे. यापुढे तुला माझी कार्यार्थ मदत हवी असेल. तर माझा आशीर्वाद तू घे”. मी हे आनंदाने कबूल केले.

यावेळी, मला संचार म्हणजे काय व कसा होतो त्याची शास्त्रीय मीमांसा काय आहे हे माहीत नव्हते. पुढे श्रावण महिना आला व त्यात तो अधिक ! ज्येष्ठ महिन्यात ती घटना घडली होती व देवीने मला ‘कार्यार्थ’ आशीर्वाद दिला होता. श्रावण महिना सुरु झाला व माझे अंग लटलट हालू लागले. हळूहळू माझी स्मरणशक्ती कमी   होऊ लागली आठवण नाहीशी झाली – ही पहिली अवस्था होती ! . समोरच्या व्यक्ती दिसेनाशा होऊ लागल्या. आजूबाजूचे लोक म्हणू लागले की, ‘संचार होतो आहे’, मला मात्र ही अवस्था म्हणजे काय याचा खुलासा पाहिजे होता. त्यावेळी ही काय अवस्था असू शकते हे कळले नाही. आज जरी त्याचे स्पष्टीकरण मी  सांगू शकतो आहे किंवा दुसऱ्याने शंका विचारली असता, त्याला शास्त्रीय उत्तर देऊ शकतो तरी त्यावेळी त्या क्षणी मला जी भूक लागली होती, त्याचे उत्तर मिळाले ते असे के, “सबूर” ! ह्यामुळे जी जी अवस्था मी अनुभविली त्याचे उत्तर आता मिळत आहे, पण ह्याचा अर्थ असा नव्हे की जे जे काही प. पू. बाबांना मी विचारीत असे त्याचे उत्तर देण्यास बाबा असमर्थ होते, तर साधक अवस्थेत साधकाला कुतूहल वाटणे स्वाभाविक आहे, पण एकदा आपले नामीतत्त्व निश्चित झाले म्हटल्यावर विचारलेल्या प्रश्नांचे समर्थन होईपर्यंत, साधकाने शांत राहणे हिताचे आहे.

पुढे अधिक श्रावण महिना आला. प्रति मंगळवार व शुक्रवार सकाळी व संध्याकाळी हा संचार होऊ लागला. येणारे भक्तभाविक त्याचा लाभ घेऊ लागले व अशावेळी शेवटच्या शुक्रवारी घर मालकांना हे आवडले नाही. त्यांनी प्रथमपासून मला पाहिले असल्यामुळे, ही अवस्था एकदम कशी प्राप्त होते याबद्दल चर्चा होऊ लागली. “हे केवळ ढोंग असून, लोकांना नादी लावण्याचा हा प्रयोग आहे”, अशी चर्चा उघडपणे ते व त्यांची बायको-सुना करू लागले. शेवटच्या शुक्रवारी संचार झाला असताना देवीने ह्या बाईंना बोलावणे पाठवले. त्याप्रमाणे त्या आल्या पण नमस्कार करण्यास तयार होईनात. इतर भक्तांनी सांगितले की, “दैवी संचार आहे. तुमचा विश्वास नसला तरी नमस्कार  करण्याने आपले काही नुकसान होणार नाही”. त्यावर त्या बाई म्हणाल्या की, “मी देवीचा संचार पाहिला आहे व हे केवळ ढोंग आहे. लोकांना जमविण्यासाठी हा संचार, हे निमित्त आहे”. हे उद्गार ऐकून देवी शांतपणे त्यांना म्हणाली की, “संकटाला आमंत्रण करू नकोस. मला फक्त कुंकू लाव व क्षमा माग”. पण त्या बाई, ह्या संचाराला मानण्यास तयार होईनात. शेवटी देवी असे म्हणाली, “तुला माझे सामर्थ्य पहायचे आहे का ? तुझ्या घराचा खांब मी तीन दिवसात हालवीन”. हे म्हणून संचाराचे गमन झाले व तिसऱ्या दिवशी त्या बाईंचा मुलगा मरण पावला. ज्या रात्री ही घटना घडली तेव्हा मी राहत्या घरून एका भक्ताच्या घरी राहावयास गेलो. तीन दिवस मला चैन पडेना. ही घटना हा योगायोग होता काय ? काय घडले व कसे घडले ? भवितव्यात जर अशा घटना घडू लागल्या तर कसे करावे ? जग आज नास्तिकवादात आहे. खरे व खोटे हा वाद आहे. त्यातून मार्ग किती कठीण आहे ! अजून कार्याला आरंभ झाला नाही आणि हा संचार ! त्याची प्रखरता केवढी आहे ! सामान्य भक्ताला ही प्रखरता कशी पेलवेल ? अशा सर्व विचारांनी व्याकूळ होऊन पुढे एक महिना सकाळची आरती झाल्यावर मी विठ्ठलवाडीला जाऊन बसू लागलो. भवितव्यात जगाला काय सांगावे अशा विचारात मी असताना एके दिवशी मला दृष्टांत झाला की, जो संचार मला होत होता त्या देवीचे नाव बहुचराई असे असून तिचे देऊळ येथून जवळच आहे. मी त्या देवळात दर्शनासाठी गेलो व पुढे नित्य दर्शनासाठी जाऊ लागलो. पुढे देवीची आज्ञा झाली की, “माझी प्रतिष्ठापना तुझ्या नित्य साधनेत तू कर”. त्याप्रमाणे देवीचा टाक तयार करून त्याची स्थापना नित्य पूजनासाठी केली. त्यावेळी मुख्य प्रश्न संचाराच्या प्रखरतेबद्दल होता. ही प्रखर शक्ती सौम्य होऊन प्रतिष्ठापना केलेल्या टाकामध्ये ती कृपाशिर्वाद म्हणून धारण झाली व कार्यार्थ कार्यान्वित होऊ लागली. अशा तऱ्हेने संचार होण्यासंबंधी निवारण झाले व कामकाज होऊ लागले.

पूर्वी जी तळमळ होती की जगताचे कल्याण व्हावे यासंबधी प. पू. बाबांना विचारणा केली होती, तो प्रश्न व त्याचे निराकरण बाकी होते. एके दिवशी प. पू. बाबा म्हणाले की, “जो प्रश्न मला विचारला होतास त्या प्रश्नासंबंधी माझा आशीर्वाद आहे, पण तुला साधना करावयास पाहिजे. त्याबद्दल नीट विचार कर ! एकदा गुरुमार्गात पाऊल उचलले म्हणजे शिळेवरील रेघ आहे. त्याप्रमाणे वागावयास पाहिजे. नाहीतर आज होकार देशील व मागाहून मार्ग झेपत नाही म्हणून चालणार नाही. तेव्हा अगोदर विचार कर !”. मी विचार करून शेवटी म्हणालो की “माझे हित कशात आहे हे आपल्याला जास्त माहीत आहे. तेव्हा आपण आज्ञा कराल त्याप्रमाणे मी वागेन”. त्याप्रमाणे एके दिवशी प. पू. बाबांनी सांगितले की, “तू नोकरी एकाची कर. नोकरी एकाची, भाकरी दुसऱ्याची, अशी अवस्था असून चालणार नाही”. याचा अर्थ असा होता की, यापुढे मी नोकरी करणे हिताचे नाही, म्हणून मी नोकरीचा राजीनामा दिला व प. पू. बाबांच्या आज्ञेने घरी आलो. पुढे काय होणार ? त्यावेळी माझे लग्न झालेले होते व चि. विजय एक वर्षाचा होता. तीन माणसांचे संगोपन कसे करावयाचे हा प्रश्न पुढे होता. शेवटी आज्ञा अशी झाली की “तू क्षेत्र औदुंबरला जा. तेथे राहून दत्ताची सेवा कर. जे प्रश्न तू विचारले होतेस त्याचे निवारण नुसते प्रश्न विचारून होणार नाही. प्रथम दोन साधना सिध्द व्हावयास पाहिजेत. – एक ‘निराकरण’ व दुसरी ‘निवारण’. ह्या दोन्हीसाठी जी सेवा करावयाची आहे, त्यासाठी तुझा संकल्प तयार पाहिजे व जे प्रश्न तू पूर्वी विचारले होतेस, त्यांचा समावेश ह्या संकल्पात करून त्यांचा उच्चार केला गेला पाहिजे. हे जर सिध्द करावयाचे असेल तर पुढील आज्ञा होई तोपर्यंत गुरुचरित्राची पारायणे कर. रोज पाच घरी माधुकरी माग व वास्तव्यासाठी श्री क्षेत्र औदुंबरला रहा”. ही आज्ञा ऐकणे अगदी सोपी आहे, पण ही साधना त्यांची कृपा असल्याशिवाय सिध्द होणार नाही ! यापेक्षा मरण बरे असे वाटू लागले. शेवटी निर्णय घेतला की, ”जगायचे कोणासाठी” ? ‘देवासाठी’ ! मग मरण आले तर, ते देवासाठीच येऊ देत. त्यात पुरुषार्थ आहे. साधना पूर्णत्वाला नेणे हे माझे कर्तव्य आहे”. म्हणून श्रीक्षेत्र औदुंबरला प्रयाण केले.

यापूर्वी अनेक वेळा औदुंबरला वडिलांचे बरोबर गेलो होतो. त्या ठिकाणी वास्तव्य करणारे सेवक मी पाहिलेले होते. तेव्हा मी पण सेवेकरी होऊन औदुंबरला आलो होतो तरी ‘सेवेकरी’ या शब्दाचा अर्थ मला आज समजत आहे. “माझी तू सेवा कर” ही आज्ञा म्हणजे काय आहे, ही आज्ञा म्हणजे काय दिव्य आहे ?  येण्यापूर्वी अनेक लोक सेवेकरी म्हणून भेटतात, पण ‘आज्ञा’ याचा अर्थ समजत नाहीत. एकदा आज्ञा झाली व आपण सेवेला आरंभ केला की, कंटाळून चालत नाही. पुनःश्च ‘आता सेवा बंद कर’, अशी आज्ञा होईतोपर्यंत थांबावे लागते. ही सेवा कठीण आहे. मध्यंतरी सेवा सोडावी लागली तर त्या सेवेचे इष्ट फल मिळणे अत्यंत कठीण जाते. यासाठी साधनेची सिध्दता व स्वतःला व इतरांना लाभ व्हावा यासाठी केली पाहिजे. केलेली सेवा पूर्ण न होण्यामुळे बहुतांशी साधक या सेवेच्या फलाला दुरावतात. यासाठी गुरुभेटीपर्यंत वाट पाहणे,  हाच सर्वात उत्तम व सुखकर मार्ग होय. पण गुरुमार्गाचा अवलंब करणे कठीण आहे व तो प्राप्त करणेही कठीण आहे, पण हे कार्य माझ्या माध्यमातून सुरू व्हावे, अशी परमेश्वराची इच्छा होती. म्हणून ज्या ज्या वेळी त्याची गरज लागली, तेव्हा तो परमेश्वर संकट समयी धावून आला. नाहीतर हे कार्य मी करणे सहज सोपे नाही. आता तुम्हाला नियुक्त केले असता तुम्ही इतरांचे कल्याण करू शकता. ही जर त्यांची इच्छा नसती तर तुम्ही इतरांचे काय पण स्वतःचे कल्याणही करू शकला नसतात. त्यावेळी श्रीक्षेत्री ज्या सेवेचा अंगीकार मी केला होता, त्यात प्रामुख्याने तीन विषय होते व त्या विषयाबद्दलची सिध्दता करावयाची होती, नुसते ‘देव प्रसन्न करून घेणे’ हे कर्तव्य करणे इष्ट नव्हते.

अनेक साधक ह्या मोहाला बळी पडतात. पण विषय न समजल्यामुळे, त्यांच्या जीवनातील बहुमोल आयुष्य व्यर्थ खर्ची पडते. त्यासाठी ‘साधक’ ह्या अवस्थेचा स्वीकार करण्यापूर्वी, जो विषय आपल्याला नामी तत्त्वाच्या आज्ञेने सिध्द करावयाचा असतो, तो विषय किंवा सिध्दांत निश्चित ठरवावा लागतो. हा विषय ठरविला की तो केव्हा सिध्द होईल हे सांगता येत नाही. कदाचित १ वर्षांत सिध्द होईल किंवा सिध्द होण्यास १२ वर्षेही लागतील. म्हणून सेवा करण्यामागे दोन संकेत असतात : एक. आपला साधनेचा विषय आपण ठरविणे किंवा देवाने ठरविणे. ह्यासाठी बहुतेक साधकांना देवाने काय दिले ह्याचे स्पष्टीकरण सांगता येत नाही. एवढेच म्हणता येईल की, देवाने दिले, पण काय ? हा प्रश्न गूढ आहे. त्यामुळे बहुतेकांना ह्याचे स्पष्टीकरण शास्त्रापरत्वे सांगता येत नसल्याने, विचारणाऱ्यांचे समाधान करता येत नाही व म्हणूनच लोकांना हा मार्ग बुवाबाजी वाटतो. वास्तविक ह्या मार्गासारखा दुसरा श्रेष्ठ मार्ग नाही ! पण स्वतःला काय प्राप्त झाले हे साधकाला समजले नसल्याने, त्याचा दोष ह्या मार्गाला लागतो. याशिवाय संकल्प निश्चित नसता साधना करण्यामध्ये साधकाला प्राप्त झालेल्या बहुमोल जीवनाचा अपव्यय होत असतो.

हे जीवन अत्यंत बहुमोल व दुर्लभ आहे. प्रत्येक क्षणाचा जो अपव्यय होईल तो क्षण पुन्हा मिळणारा नाही व मृत्यु हा कोणासाठीही थांबणारा नाही. म्हणून प्राप्त जन्मातील प्रत्येक क्षणाचा विनियोग सत्कारणी होणे आवश्यक आहे. जे देहिक माध्यम आपल्याला प्राप्त झाले आहे, ती ईश्वराची देणगी आहे. आपल्या बुध्दीमाध्यमाची प्रथम मालकी ईश्वराची आहे. तेव्हा त्या बुध्दीतून कोणता विषय प्राप्त करावयाचा हे त्यानेच ठरविणे योग्य असते. हा विषय जर आपण ठरविला तर बुध्दीमध्ये ‘देवा’ ऐवजी ‘हेवा’ अवस्थेची निर्मिती होते व आज जगतात सर्वत्र जी काही अशांतता आहे तिचे कारण हेच आहे. प्राप्त करावयाच्या संकल्पाचा विषय जर गुरुतत्त्वाने निश्चित केला तर त्यात १०० टक्के यश असते. कारण त्या संकल्पसिध्दतेसाठी आवश्यक असणारे पथ्य व स्थळ-काळ-वेळ याचे बंधन, याबाबतचे मार्गदर्शन आपल्या गुरुतत्त्वाकडून होत असते. कार्यारंभापासून ज्या ज्या साधनांची सिध्दता झाली, ते संकल्प प. पू. बाबांनी सूचित केलेले हाते. आरंभी मी फक्त एकच संकल्प केला, की “प्राप्त झालेले जीवन हे श्रीसद्गुरुचरणी वाहिलेले आहे त्याचा विनियोग जगत् कल्याणासाठी त्यांच्याकडून व्हावा”. या संकल्पापरत्वे पुढील जीवन मी त्यांच्या आज्ञेने व्यतीत केले व प्रत्येक दिवस उजाडल्यानंतर ‘हा आपला आयुष्यातील शेवटचा दिवस आहे’. ह्या जाणीवेने जगलो. म्हणूनच ३५ वर्षांमध्ये ३५० वर्षांइतके कार्य झाले ! .

एक महत्त्वाची आठवण सांगणे राहून गेले ! प. पू. तेली महाराज यांची सेवा चालू असताना, एक दिवस घरच्या परिस्थितीला वैतागून त्यांचेकडे गेलो, “वैतागून” असे म्हणता येणार नाही, कारण वैतागून काही परिस्थितीत बदल होणार नाही. बदल फक्त होईल, पण गुरुकृपा व्हावयास पाहिजे व दुसरे कर्म अनुकूल पाहिजे. कर्म अनुकूल असते, तर मी गुरुमार्गाच्या वाटेला गेलो नसतो. त्याअर्थी कर्माने वाटेला लावले, म्हणून गुरुंची आठवण झाली. निदान ह्या जन्मात ‘गुरुची’ आठवण होणे काही कमी नाही. तेव्हा कर्माला वैतागून शिव्या देण्यापेक्षा, त्या कर्माचे  आभारी होणे हितावह आहे असे मानू लागून जोपर्यंत कर्मात बदल होत नाही तोपर्यंत गुरुसेवा चालू ठेवावी, असा दृढ निश्चय केला !  पुष्कळ लोक ‘गुरुभक्ति’ हा शब्द उच्चारण्यास खूप सोपा आहे असे मानतात. पण गुरुभक्तीची वेळ येईल, तेव्हा ‘चणे खावे लोखंडाचे’, अशी अवस्था वाट्याला येईल व मग गुरुभेट व मग भक्ती !

तेव्हा ज्यावेळी गुरुसेवा चालू होती एक दिवस, श्रीतेलीबाबांना विचारले की, “बाबा, प्रश्न विचारू का” ? लागलीच म्हणाले, ”तुझे डोंबल, अक्कल आहे का प्रश्न विचारण्याची ? सगळं जग नक्कल करत आहे. त्याचा पाढा तू वाचू नको. आधी अक्कल मागून घे व मग विचार करायला शिक व मग प्रश्न विचार ! प्रश्न असतो देवाला. जन्माला येणाऱ्याला अन्न, वस्त्र, निवारा कसा मिळेल ही चिंता असते देवाला. फक्त मनुष्य जन्माला येतेवेळी बरोबर चिंता  घेऊन येतो आणि बरोबर नेतो चिता”. मग म्हणाले, ”विचार”. मी म्हणालो, “भवितव्यात माझे काय होईल ? कारण मला शिक्षण नाही. शिवाय काही कला पण येत नाही. ” बाबा म्हणाले, जगात तू फक्त उभा आहेस व सर्वजण आडवे झाले आहे. शिक्षण नाही व कला नाही याची चिंता देवाला. तू विचार करू नको. पुढील काळात जगाला तुला ‘चारा’ द्यावयाचा आहे व त्यासाठी  ‘कला कला’ने  घे. शेवटी एक दिवस पौर्णिमा होईल. हीच गुरुपौर्णिमा तुझ्या जीवनात येणार आहे”. याचा अर्थ जगाला उजेड म्हणजे ज्ञान प्राप्त होईल या ब्रह्म वाक्याचा अर्थ आज समजू लागलो !

माझ्या लहानपणी आमच्या घरी वडिलांचा बसचा धंदा होता. त्यावरील बहुतेक ड्रायव्हर मुसलमान होते. लहानपणी मला वडिलांनी ‘फकीर’ केले होते. ही ‘फकीरी’ म्हणजे एक प्रकारची दीक्षाच होय. वयाचा तीन वर्षाचा मी होतो, तेव्हा मला फकीर केले होते व पुढे ही फकीरी मी बारा वर्षे केली. दरवर्षी मोहरम महिन्यात दहा दिवस ताबूत बसविण्यात येतात. त्याचा अर्थ त्यावेळी समजला नाही. मोहरम महिन्यात दहा दिवस ताबूत बसतात व विसर्जनाचे दिवशी ‘कत्तल की रात’ नावाचा एक विधी केला जातो. हा विधी मुसलमान धर्माप्रमाणे आहे. त्या दिवशी ही ‘कत्तल की रात’ ची पूजा करण्यासाठी वडील मला घेऊन जात असत. हा विधी हिंदू-मुसलमान दोघेही साजरा करत असत. त्या काळात हिंदू-मुसलमानात वैमनस्य नव्हते. त्याप्रमाणे गणपती उत्सव हा हिंदूंचा आहे हा भेदभाव नव्हता. त्यामुळे दोन्ही सण आनंदाने साजरे होत होते. भावना अशी होती की, ‘परमेश्वर एकच आहे, कोणीही प्रार्थना केली तरी त्याचा उद्देश जगाला सुख लाभावे’, असा होता. हे सण आनंद व उत्साहाने साजरे केले जात असताना निदान आपल्या हातून सत्कर्म घडावे अशी भावना समाजात होती. म्हणजेच ‘सत्कर्मयोगे वय घालवावे’, या भावनेची जाणीव सर्वांच्या ठायी होती. ह्या दिवशी बरेच फकीर जमत असत. एका हातात भिक्षा मागण्यासाठी कटोरा व दुसऱ्या हातात मोर्चेल ! हा र्मोचेल अंगावरून फिरवीत व तोंडाने म्हणत असत, “दिया उसका भला नही दिया उसका भी भला । खुदा जिसने दिया मुझे तांबेका पैसा, तू उसको दे सोनेका पैसा । बारा इमाम तुम्हारा भला करेगा। खाली पाँच इमाम को याद करो । अल्लाह । अल्लाह ।”

त्यावेळी फकीर म्हणत असत की, ’पांच पीर इस दुनियाको संभालनेवाले है ! ’ पण त्यावेळी ज्या नावांचा उच्चार करीत असत ती नावे भूगोलातसुध्दा शिकलो नव्हतो. (म्हणजे अजमेर, गुलबर्गा, कल्याण वगैरे). पुढे ह्या पीरांचा संबंध आपल्या कार्यासाठी काय आहे ही जाणीव नव्हती. पुढे प. पू. बाबांच्या आज्ञेप्रमाणे श्री दत्तक्षेत्र औदुंबरी गेलो. आज्ञा होती तिचे पालन जास्तीतजास्त काटेकोरपणे करावयाचे हेच व्रत स्वीकारले. एके दिवशी पहाटे 3 वाजता स्वप्न पडले. स्वप्नात पाच समाध्या अर्थात पाच पीर दिसू लागले. हा काय चमत्कार आहे असे मनाला विचारले,  उलगडा होईना. आज्ञा मिळाली “औदुंबरला जा. गुरुचरित्र वाच व पाच घरी माधुकरी माग”. पण स्वप्नात तर पाच पीर दिसू लागले. ह्याच संभ्रमात मी सेवा करीत होतो. एक तर प. पू. बाबांची आज्ञा अशी की ‘दत्तमहाराजांची सेवा कर’. ती सोडून दर्शनात तर दिसू लागले पाच पीर ! पुढे काही दिवसांनी पुन्हा स्वप्न पडले. त्या रात्री प्रथमतः डोंगर दिसू लागला. हळू हळू त्या डोंगरावर एक भव्य दर्गा दिसू लागला. पूर्वी आपण पाहिलेला नाही …. फक्त आवाज आला…. , “पूर्व जन्मी मुसलमान होतास, त्या काळात फकीर होतास. इतनी याद बहोत है और जादा खोजमे मत जाना !”. हे ऐकून जाग आली. झोपण्यासाठी कांबळे होते, त्यावर बसून प्रार्थना केली. कानावर हळू हळू आवाज आला, “इन्सान जाग उठा ! अपना काम हो गया ! इन्शा अल्लाह !”

पुढे सेवेचा लाभ कसा करून घेता येईल ही शंका निर्माण झाली, पण विचारावी कोणाला ? पूर्वी घरी असताना काही शंका आली तर वडिलांना विचारीत असे, पण औदुंबरला गेल्यावर आज्ञा झाली की, सीमा ओलांडणे उचित नाही, मग विचारणा करणार कोणाला ? एके दिवशी महापूजा झाली. आरती व मंत्रपुष्पांजली सर्वजण म्हणत होते, मी पण डोळे बंद करून ‘श्रीगुरुदेव दत्त’ असे स्मरण करीत होतो. त्यावेळी एक म्हातारा काठी टेकत टेकत आला व माझ्या बाजूला उभा राहिला व “ह्या पाच खारका घे. हा प्रसाद दत्ताचा आहे. याशिवाय चार जिन्नस ज्यांचा आरंभ ‘ख’ ने होतो, त्यांची प्राप्ती अजून करावयाची आहे. ती झाली की, कार्याला आरंभ कर” असे म्हणाला. हा म्हातारा काय म्हणतो आहे असा विचार मी करू लागलो तेवढ्यात तो दिसेनासा झाला ! फक्त पाच खारका हातामध्ये राहिल्या. तो प्रसाद आहे असे समजून, मी माझ्या ओवरीत (राहण्याची जागा) ठेवून, ‘माधुकरी’ साठी निघालो. त्या दिवशी कोणी एका भक्ताने केलेला नवस फेडण्यासाठी एक मण प्रसाद वाटण्यासाठी पुजाऱ्याकडे दिला. त्याचे नाव होते ‘पंचखाद्य’. हा प्रसाद ओंजळभर मिळाला. त्यावेळी जो म्हातारा भेटला होता, त्याने सांगितले होते की “चार जिन्नस मिळाले की, ह्या कार्याला आरंभ कर”. हे चार जिन्नस कोठून येणार व भवितव्यात कोण देणार आहे असा विचार करता करता ओवरीत आलो.

रात्र झाल्यावर झोपण्यापूर्वी रोज नियमाप्रमाणे अकराशे वेळा गुरुनामस्मरण करीत बसलो असताना रात्रीचे ८ वाजले होते. त्यावेळी देऊळ बंद होते. दर्शनासाठी एक भक्त त्याची तीन मुले घेऊन आला. दर्शन झाले. अंगारा लावला. मुले म्हणू लागली, ”आम्हाला अंगारा नको. प्रसाद म्हणून खारका पाहिजेत. पण आता रात्री आणणार कोठून” ? हा संवाद मी ऐकला व शेवटी विचार केला की सकाळी ज्या खारका त्या म्हाताऱ्याने आपल्याला दिल्या आहेत त्या देऊया. मी पुढे जाऊन त्या मुलांना बोलावले व त्यातील तीन खारका मुलांना व एक वडिलांना दिली. शेवटी माझ्यापाशी एक शिल्लक राहिली. ती मुले निघून गेली असे वाटले, पण खारका खाल्ल्या कोणी ? हा प्रश्न नंतर मनात आला. ! ती अवस्थाच अशी असते की, संभ्रम होतो. पुढ्यात असूनही दिसत नाही. ह्याचा अर्थ, सेवेचा लाभ स्वतः घ्यावयाचा नसून, ती सेवा देवाला परत करावयाची असते. त्यासाठी काही जिन्नस हे माध्यम म्हणून लागतात त्याप्रमाणे पाच खारका त्यांनी दिल्या. चार घेऊन गेले व एक शिल्लक राहिली ! झोपण्यापूर्वी, मी ती खारीक मनोभावे खाल्ली. अशी खारीक पुन्हा खाल्ली नाही. पण कानाशी शब्द आले. ”अरे ही खारीक कुठली आहे ? अरबस्थान !”. ती खारीक खाल्ल्यापासून दुसऱ्या दिवशी औदुंबर हे नंदनवनासारखे दिसू लागले. मन म्हणू लागले, ”स्वर्गात काय आहे ? जे जगात आहे ते येथेच ‘पाया’ जवळ आहे” असे म्हणून शांत झोपी गेलो.

“ ‘साधक’ अवस्थेत दिनचर्या काय व कशी असते हे साधक झाल्याशिवाय समजणार नाही. जगात ‘बाधक’ नको तेवढे गावोगावी आहेत. कारण बाधक होणे ही सुध्दा एक अवस्था आहे. ते जर जन्माला आले नसते तर ‘साधक’ ह्या अवस्थेला किंमत शून्य ! मूळ हेतू साधकाला कळला पाहिजे. आपल्या सभोवार असणारे जग कशाप्रकारे जीवन व्यतीत करीत आहे, ह्या जगात कशाची कमतरता आहे, काय अधिक आहे ह्या दोन विषयांचा विचार केला पाहिजे. एक वर्ग असा आहे की, डोळे आहेत पण असून नसल्यासारखे व दुसरा वर्ग डोळे आहेत – ते फाडफाडून इतके पाहतात की आता फाटतील ही भीती वाटते. ज्या मार्गाचा अवलंब करावयाचा त्याचा अभ्यास प्रथमतः केला पाहिजे. नुसते वाडवडील करत आले म्हणून तेच तेच करणारे बहुसंख्य लोक आहेत, त्यामध्ये ‘चर्चा’ हा बहुतांचा विषय असतो. पण अनुभव ‘शून्य’ असे म्हणता येईल. आज शून्यालासुध्दा जेवढी किंमत आहे तेवढी ह्या जगाला नाही  हा अनुभव माझा स्वतःचा आहे. तसेच ’देव’ हा एक स्वतंत्र विषय आहे, हेही लोक विसरतात. ज्याप्रमाणे ‘मानव व त्याची जीवन मीमांसा’ हा एक विषय आहे, त्याप्रमाणेच ‘देव व त्याचे कार्य’ हा दुसरा महत्वाचा विषय आहे, पण आपले जीवन हे ज्याला समजत नाही त्याला देव व त्याचे कार्य सांगणे अत्यंत कठीण आहे. आज सर्वसाधारण लोक देवाचा विचार असा करतात – आपल्याला आलेल्या अडीअडचणी निवारणार्थ देव हे माध्यम व  त्याला प्रसन्न करून घेणे म्हणजे आपण करत असलेली नित्य साधना ! पण साधनेचा मूळ अर्थ कोणीतरी सांगितला आहे का ? एखादा डोंबारी रस्त्यावर खेळ करतो, अंग उलटेसुलटे करतो याला ‘सर्कस’ म्हणतात. पण ज्याप्रमाणे ‘व्यायाम–योग’ ही शास्त्रे आहेत व त्यांचा अभ्यास गुरुशिवाय करता येत नाही, त्याप्रमाणे ‘साधना’ हा विषय गहन आहे व तिचे ज्ञान होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. साधना हा विषय देवाला उद्देशून नाही किंवा हा विषय त्याला प्रसन्न करून घेण्यासाठीही नाही ! ‘सा ध ना’ हा तीन अक्षरी शब्द आहे. या शब्दाचा अर्थ प्रथम माहीत होणे आवश्यक आहे. ‘साधक व साधना’ हे दोन शब्द एकमेकांबरोबर आहेत. पहिल्या शब्दात ‘क’ आहे व दुसऱ्यात ‘ना’ हे अक्षर आहे, ह्या दोन शब्दांची उपपत्ती सोपी नाही. जर गुरुभेट झाली नाही तर दोन शब्द जन्माला पुरून उरतील. ”

वरील संभाषण किंवा मार्गदर्शन हे प. पू. हाजीमलंग बाबांनी केले. परंतु त्यांची बोलण्याची भाषा उर्दू होती. त्याकाळात मला फक्त मराठी भाषा येत होती व आज्ञा अशी होती की, औदुंबरची सीमा सोडावयाची नाही. इतर जे माझ्यासारखेच सेवेकरी  होते,  त्यांनाही फक्त मराठीच येत होते. जी भाषा प. पू. हाजीमलंग बाबा बोलत होते, त्यातील निश्चित अर्थ जर समजला तर काही उपयोग होईल, म्हणून शेवटी मी निराश होऊन प्रार्थना केली की “निदान मला या भाषेचे ज्ञान द्या”. शेवटी मार्गदर्शन असे झाले की ”जेव्हा तुझ्या पारायणाची सात दिवसांनी समाप्ती होईल तेव्हा एक दिवस पारायण करू नको. पुन्हा पारायणास सुरुवात करावयाची त्याआधी, फक्त एक दिवस तुझ्या मामांना तू जाऊन भेट. मी जे बोलतो ती भाषा त्यांना अवगत आहे म्हणजे मला जे मार्गदर्शन तुला करावयाचे आहे ते भाषेच्या अभावीही तुला समजेल व पुढे भाषा बोलता पण येईल ! माझे आगमन तुझ्या ठिकाणी मी करणार आहे. परंतु त्यासाठी एक वर्ष थांबावे लागेल. ही जी साधना आहे त्याला ‘परकाया प्रवेश’ असे म्हणतात. बहुतेक लोक ह्या अवस्थेला ‘संचार’ असे म्हणतात. ह्या एक वर्षाच्या काळात तुझ्या देहिक माध्यमात स्थित्यंतरे होतील, पण भिण्याचे कारण नाही. प्रथमतः माझे आगमन म्हणजे काय ! हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जोपर्यंत शास्त्र समजणार नाही तोपर्यंत जसे जग चालले आहे त्याप्रमाणे तूही म्हणशील. माझे आगमन होणार म्हणजे जशी भुते संचार करतात, त्याप्रमाणे ही अवस्था नाही. माझे वास्तव्य ७व्या लोकात आहे. किंबहुना बाकीच्या विभूती पण तेथे आहेत. तेथून आपल्या भक्तांचा योगक्षेम ह्या विभूती करत असतात. ज्याप्रमाणे सूर्य हा अनेक योजने दूर आहे, पण त्याचा प्रकाश जसा जगाला दिसतो, पण सूर्य कदापिही खाली येणार नाही. त्याप्रमाणे आम्ही थोर विभूती पुनश्च भुतलावर येत नाही. आम्ही त्या काळात जी ‘साधना’ करीत होतो, त्या साधनेतून जी शक्ति प्राप्त केली आहे, तिचा वापर ‘परकाया प्रवेश’ करण्यासाठी करत असतो. पण त्यासाठी जो माध्यम लागतो तो मिळाला पाहिजे. अशा माध्यमांची ह्या जगात कमतरता आहे. आम्हाला पोषक असे माध्यम जन्माला देव पाठवितो पण हा ‘प्रसाद’ देवाचा असून जोपर्यंत त्या साधकाकडून ‘साद’ मिळत नाही, तोपर्यंत हा माध्यम जन्माला येऊनसुध्दा आम्हाला ‘मेलेला’ आहे ! हे ऐकून रागावू नकोस ”

“मानव जन्माला येतो, पण जन्म घेणे सोपे नाही. जन्माला येण्याचे कारण दोन प्रकाराने कार्यान्वित होते. एक जन्म कर्मामुळे येतो व दुसरा जन्म आत्म्याला ह्या कर्मबंधनातून मोकळे व्हावयाचे असते म्हणून आत्मा जन्म घेतो. ह्या दोन्ही अवस्थेत जर जन्माचे कारण समजले तर मनुष्याची ह्या जन्मातून सुटका होते, नाहीपेक्षा जन्माला न येणे हितावह आहे. कारण जन्माला आल्यावर कर्म व आत्मा यांचे कार्य हे दोघांच्या हिताचे असावे लागते. पण जगात आत्म्याला जन्म घेण्याची प्रवृत्ती होणे, असे आत्मे फारच थोडे असतात. असा आत्मा जरी जन्माला आला तरी त्याची भावना उपभोगण्यासाठी नसून प्राप्त झालेल्या जन्मातून आपली सुटका करून कशी घेता येईल याचा विचार जन्म प्राप्त होऊनही चालू असतो. या उलट जे आत्मे कर्माने जन्माला येतात, ते त्या कर्मातून आपली सुटका न करून घेता सभोवार जे जग दिसते त्याचा भोग जास्तीत जास्त मला कसा प्राप्त होईल या विवंचनेत असतात व अशा आत्म्याला सुटका करून घेणे अतिशय अवघड आहे. समजा एखाद्याला पूर्वकर्मानुसार गुरुमार्गाचा लाभ झाला तरी बहुतेक लोक याला दु:ख असे म्हणतात. कारण पूर्वकर्मानुसार जन्म घेण्यात जरी आपली चूक झाली असेल तर त्याची जाणीव आत्म्याला होते, पण कर्माला नाही. ही जाणीव व्हावी व प्राप्त झालेल्या जन्मातून सुटका व्हावी म्हणून एखादे कर्म, संकट निर्माण करून त्या मानवाला मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत असते. वास्तविक जे कर्माने निर्माण केलेले संकट आहे ते देहाला ‘संकट’ वाटत असले तरी ते आत्म्याची ‘संकष्टी’ असते ! आपल्या सभोवार जे जग आहे ते कर्मानेच निर्माण झालेले असल्यामुळे ते मार्गी होणाऱ्याच्या कर्माला दाद देत नाही म्हणजे मार्गी होऊ देत नाही. अशी स्थिती जगाची आहे. जरी मार्ग दिसला किंवा गुरुभेट झाली तरी हे  लोक गुरुंचे गुरु असतात व मार्ग शोधण्यापेक्षा गुरुला मार्गी लावतात !

जीवनाबद्दलच्या तत्त्वज्ञानाचा मला जेव्हा “श्रीगणेशा” म्हणून लाभ झाला, त्यावेळी मी स्वतःला धन्य समजू लागलो. याचा अर्थ तेव्हा समजला जेव्हा प. पू. बाबांनी एके दिवशी झोपेतून जागे केले ! त्यावेळी पहाटेचे चार वाजले होते. गुरुआज्ञेप्रमाणे सहा महिने नित्य श्रीगुरुचरित्र पारायण, माधुकरी इत्यादी सेवा चालू होती. तो पंधरवडा अमावस्येचा होता. सर्वत्र काळोख होता पण कोणीतरी हाक मारली. शब्द आले, “मुला, ऊठ ! ” म्हटल्यावर उठलो. त्यावेळी वास्तविक अंधार होता. पण जेव्हा हाक मारली व जेव्हा उठलो त्यावेळी चांदण्याचा प्रकाश दिसू लागला ! मी नदीवर जाऊन तोंड धुतले. विचार करू लागलो … चार दिवसांनी अमावस्या आहे व आज पहाटे चंद्र दिसत नाही पण प्रकाश सर्वत्र पडला आहे. हा काय चमत्कार आहे ? ‘हाक मारली’ हे स्पष्ट आठवत आहे. निश्चित ही हांक प. पू. बाबांची आहे, पण चांदणे नसून प्रकाश स्पष्ट दिसत आहे ! शेवटी प. पू. बाबांनी सांगितले की, “बाबा, ह्याला आत्मा + प्रकाश म्हणजेच ‘ज्योतिष्मती’ असे म्हणतात . पहिली आज्ञा अशी की, ’औदुंबरला जा, श्रीगुरुचरित्र वाच, माधुकरी माग’, याचा अर्थ काय ? तर विचार, आहार, विहार यांचे एकरूपत्व होऊन, जीवन प्रकाशमान व्हावे. लहानपणी श्रीभैरवनाथांनी मला ‘प्रकाशात आण’ असे सांगितले. त्यावेळी पणती लावली, पण पणती किंवा निरांजन याचा अर्थ, वात लावण्याचे भांडे नव्हे. ‘निरंजन’ याचा अर्थ, ज्याला तीन लोकांचे स्वामित्व समजते ! त्या अवस्थेचा लाभ घेण्यासाठी औदुंबरला आणले. कारण जगाचा उपद्रव होऊ नये म्हणून ! जे सेवेकरी येथे बसून ‘गुरुचरित्र’ वाचतात ते जरी पहिल्यांदा मी वाचत होतो तरी “यापुढे तुला हे वाचावयाचे नसून, तुला जिवंत गुरुचरित्र वाचावयाचे आहे म्हणजे मनुष्य इहजगतात का जन्माला येतो, त्याची सुटका जन्ममरणातून कशी करता येईल, हे ज्ञान जगात नाही. ते तुला येथे बसून गुरु सांगतील ते ऐकावयाचे आहे. याचा अर्थ, —’श्रीगुरुचरित्र’ ! या जगाची जी अवस्था उत्पत्ती, स्थिती, लय ह्या तत्त्वाप्रमाणे आहे ही तुला समजली पाहिजे. यासाठी आज तुला प्रकाश दाखविला. यापुढे जग पाहण्यासाठी दुसऱ्या प्रकाशाची गरज नाही” असे प. पू. बाबांनी सांगितले.

साधकाला जेव्हा काही इष्ट कार्य करावयाचे असते त्यावेळी त्याला ‘साधना’ हा विषय ठरवावा लागतो. कारण कार्यार्थ जेव्हा साधक अवस्थेत तो नावारूपाला येतो ,तेव्हा जगाची उपस्थिती ‘भाऊ गर्दी’ म्हणून जमा होते त्यापैकी शिल्लक किती ? याचा अर्थ जमा किती झाले व शिल्लक किती राहीले ? त्यावरुन असे कळते की नुसती गर्दी होऊन चालत नाही. जे शिल्लक राहिले याचा अर्थ ह्या विषयाबद्दल त्यांना सहानुभुती आहे व आपल्याला काही ह्या मार्गाने प्राप्त करावयाचे आहे ह्या विचारांनी ते शिल्लक राहिले. बाकी साधना हा विषय एवढा विराट आहे की आपले आयुष्य जरी संपले तरी विषय संपत नाही ! काहींना हा विषय ‘विषा’प्रमाणे वाटतो. त्यामुळे ह्या विषयात अर्थ नाही म्हणून ते पलायन करतात ! तेही बरोबर आहे. कारण प्रत्येकाची ‘पात्रता’ असावयास पाहिजे. जन्माला आलेले सगळेच आहेत असे प्रत्येकाला वाटते. हे जग पाहिले की, ‘पात्रता’ किती व ‘पात्रे’ किती याचा पत्ताही  लागत नाही ! आले काय ! गेले काय ! जन्माला मनुष्य येतो पण जाण्यापूर्वी ‘स्मरणात’ किती राहतात ? फारच थोडे ! जवळ जवळ नाहीत. एखाद्या व्यक्तीने पैसे, घरदार. मागे ठेवले असते तर मुले, नातेवाईक स्मरण ठेवतात पण  त्या व्यक्तीचे नव्हे तर मागे ठेवलेली जी ठेव असेल  तिचे ! हा विषय येथे सांगितला, कारण पुढे विषयामध्ये जीवनाबद्दलची ‘मीमांसा’ महत्त्वाची आहे व साधना हा विषय म्हणजे जीवनाबद्दलचे तत्त्वज्ञान म्हणून ‘साधना’ हा विषय ईश्वराला उद्देशून २५ टक्के आहे व ७५ टक्के हा विषय जे जग आपल्या सभोवार आहे त्याचा अभ्यास करणे इष्ट आहे.

मनुष्याला जेव्हा जन्म प्राप्त होतो त्यावेळी ‘चेतना’ ही मूळ शरीरात धारण होते म्हणूनच मनुष्याला चालता, बोलता येते. त्याचा अर्थ तेव्हा मनुष्याच्या शरीरात चेतना असते. पण केवळ वासनापूर्तीसाठी ही चेतना जन्माला येते त्यावेळी ती चेतना ‘जीव’ म्हणून जन्माला येते. म्हणजेच वासनेमुळे मूळ अवस्था प्राप्त होऊनसुध्दा कमी प्रतीचा जन्म मिळतो. जर ‘वास’ असेल म्हणजे आपल्या हातून जन्मप्राप्तीनंतर सत्कर्म जर घडणार असेल तर ही चेतना जन्म घेतेवेळी ‘जीवात्मा’ म्हणून जन्माला येते व पुढे जन्मप्राप्तीनंतर साधनेचा लाभ घेता आला तर जीवात्मा ‘आत्मा’ म्हणून उदयास येतो. या अवस्थेत चेतना असते व पुढे २५ टक्के साधना केल्यामुळे ”चैतन्य” ही अवस्था प्राप्त होते, म्हणजे हा मनुष्य ‘मानव’ ही संज्ञा प्राप्त करता होतो. याचा अर्थ ज्याला काया, वाचा, मन ह्या अवस्थांचा लाभ होतो व ज्याला मन आहे तो ‘मानव’ ! जर ही २५ टक्के साधना प्राप्त होऊन मनुष्यामध्ये स्थित्यंतर झाले नाही तर, त्या मानवाला प्रत्येकापुढे ‘मान डोलवावी’ लागते किंवा अज्ञानामुळे ह्या मनुष्याची मान उंचावली आहे असे वाटते, म्हणून म्हण आहे की, ‘विद्या विनयेन शोभते’ म्हणजेच ज्ञानामुळे जगातील सगळे मान देतात. [Quantity (पात्रे) is everywhere but Quality (पात्रता) is rare ! ]

वरील विषय हा सांगण्याचे प्रयोजन असे की पुढे ‘विमोचन’ हे साधन सिध्द करावयाचे आहे. तत्पूर्वी ह्या साधनेचे महत्त्व काय आहे हे समजले पाहिजे, कारण भविष्यकाळात जे भक्त ह्या कार्याचा लाभ घेण्यासाठी येतील त्यांना ही साधना व तिचे जीवनमहत्त्व काय आहे हे समजले पाहिजे. नुसते संकटात लोक आहेत व गुरुकृपेने त्यांचे निरसन व्हावे हा हेतू कार्य करीत असता नव्हता. येणाऱ्या लोकांना दु:खाचे ज्ञान असते तर त्याचा उपाय शोधून दु:ख निवारण व्हावे असा प्रयत्न केला असता. पण जीवनात आज होणारे दु:ख आज आहे का ? हे कोणालाही समजत नाही; कारण दु:ख एक कर्माने होते व दुसरे अज्ञानी होण्याने ! तेच बहुसंख्य भक्तांना भोगावे लागते. अशा दोन्ही प्रकारात दु:ख आहे. दु:ख हे कोणत्या  प्रकारचे हे साधकाला समजत नाही. त्यामुळे भक्त येताना दु:ख घेऊन जरी आला व साधकाला भक्ताच्या दु:खाचे कारण समजले नाही तर निराकरण करता येत नाही. कारण मूळ जो ‘विषय’ आहे दु:खाचा ह्याची समज गुरुमार्गी होणाऱ्या साधकाला होत नाही. त्यामुळे दोघांची दिशा चुकीची होण्याने ह्या दोघांची युती होणार केव्हा व कधी ? यासाठी देव व भक्त यांना भेटण्यासाठी युक्ती असावी लागते. गुरुमार्गात ‘गुरु’ हे माध्यम आहे. त्याचा वापर कसा करावयाचा ह्याचे ज्ञान पाहिजे. ’गुरु’ हा एक विषय व ‘मार्ग’ हा दुसरा विषय आहे’ ‘गुरु’ हा विषय हा पहिल्यापासून शेवटपर्यंत तोच असतो. पण साधकाला हा विषय किंवा मार्ग ह्याचे अनुकरण करून चालणार नाही तर हा विषय अनुसरून त्याचे सदैव स्मरण ठेवले पाहिजे. यासाठी सदैव तत्पर असावे लागते, की आपण करीत असलेली साधना व तिचा हितसंबंध इतरांशी जोडण्यासाठी ’साधक’ अवस्थेला काय पथ्य आहे हे समजले पाहिजे. यासाठी प पू. बाबांनी असे सांगितले की “कार्य जर करावयाचे असेल तर प्रथमतः निराकरण सिध्द व्हावयास पाहिजे मग निवारण ! यासाठी संकल्पाची गरज आहे, कारण जे साधन सिध्द करावयाचे आहे ते सर्व जगाला उपयोगी व लाभदायक व्हावयास पाहिजे”. (उदाहरणार्थ :- दोरा. ह्याचा उपयोग मनुष्याच्या आधी-व्याधी निवारणार्थ होतो. तसा तोच दोरा जनावरांना गळ्यात बांधला तर लाभ व्हावयास पाहिजे. )

जे जग चराचरमय आपल्याला दिसते किंवा ज्याचा भास आपल्याला होतो, त्या जगाची निर्मिती पांच तत्त्वांनी झालेली आहे. जगाचे कार्य पाच तत्त्वावर अवलंबून आहे. त्या तत्त्वांचे कार्य एकमेकांना पोषक व्हावयास पाहिजे तरच निसर्गाचे किंवा जीवनाचे कार्य सुख, शांती, समाधानात होईल. अन्यतः एक तत्त्व अधिक असेल व दुसरे कमी असेल तर ह्या तत्त्वाच्या कार्यात बिघाड होईल. हे जन्माला येण्याचे कारण अणुरेणुंपासून ब्रह्मांडापर्यंत अव्याहत चालू आहे. कारण पाच तत्त्वे एकमेकाला पोषक आहेत. जेव्हा ह्या तत्त्वांमध्ये विषमता निर्माण होते, त्यावेळी ह्या सृष्टीवर किंवा मानवी जीवनात आपत्ती ओढवते. वास्तविक आपत्तीचा धर्म जगात पीडा किंवा अशांतता निर्माण व्हावी ह्या हेतूने कदापिही नाही. आम्ही ‘मानव’ जन्माला येतो ती कृपा ईश्वराची आहे, पण जन्माला आल्यावर तो ‘मानव’ असूनसुध्दा ‘दानव’ म्हणून जेव्हा जगू लागतो तेव्हाच आपत्ती, संकट इत्यादी वाट्याला येतात. याला दोष स्वतःचे अज्ञान आहे हे तो कबूल करावयास तयार नाही. ह्यासाठी श्रीगुरुंनी जी साधना औदुंबर येथे करण्यासाठी सांगितली होती, त्यांत ‘विमोचन’ हे साधन सिध्द झाले. ‘विमोचन’ ह्याचा अर्थ असा — जन्मतः मूळ तत्त्वात जी धारणा होते त्यामध्ये कमी अधिक वाढ जेव्हा निर्माण होते त्यावेळी मानवाच्या फाजील ज्ञानाने त्यात बिघाड होतो, त्यावेळी आम्हा मानवांना मूळ धारणेची पुनश्चः प्राप्ती करून  देणे याचा अर्थ ‘विमोचन’ होय.

पृथ्वी, आप तेज, वायू व आकाश ह्या पाच तत्त्वांनी परिपूर्ण असा निसर्ग मानवाच्या कल्याणासाठी अव्याहत झटत असतो. मात्र त्याचे हे कार्य इतक्या शांतपणे चालू असते की त्याची जाणीव आम्हा मानवांना सहजपणे होत नाही. जोपर्यंत ब्रह्मांडातील ही तत्त्वे समतोलपणे कार्य करत असतात तोपर्यंत ब्रह्मांडात किंवा निसर्गात सुख-शांती-समाधान नांदत असते परंतु ज्यावेळी ह्यातील कोणत्याही एका तत्त्वाचे समतोलत्व बिघडते, त्यावेळी निसर्ग आपली अशांतता वादळ, पूर, भूकंप ह्या नैसर्गिक आपत्तींद्वारे प्रकट करतो. तसेच निसर्गातील पंचतत्त्वात ज्यावेळी पुनश्च समतोलत्व निर्माण होते त्यावेळी इंद्रधनुष्याद्वारे तोच निसर्ग आपला आनंद व्यक्त करतो. मनुष्य हा निसर्गाचाच एक घटक आहे. अर्थात जी पाच तत्त्वें ब्रह्मांडाची निर्मिती करण्यास कारणीभूत होतात, त्याच पंचतत्त्वांनी पिंडाची निर्मिती झालेली असते. ज्यावेळी मनुष्याच्या जीवनातील ह्या पंचतत्त्वांचे समतोलत्व बिघडते त्यावेळी मनुष्याला जीवनात दु:ख, अशांतता, पीडा, असमाधान ह्या अवस्थेचा अनुभव येतो. देहातील ह्या पंचतत्त्वात झालेला बिघाड कोणत्या तत्त्वाच्या कमी-अधिकपणामुळे आहे हे पाहून त्याप्रमाणे इतर तत्त्वांचे समतोलत्व प्राप्त करून देणे ह्याचा अर्थ ‘विमोचन’ होय. ही साधना श्रीक्षेत्र औदुंबर येथे सिध्द झाली. ही साधना सिध्द करीत असता पाच घरी ‘माधुकरी’ मागण्याची सेवाही केली. ‘माधुकरी’ याचा अर्थ ‘मागणे’. नित्य साधना, सेवा व त्यासाठी पाळावयाची पथ्ये ह्यामुळे देहातील पृथ्वी व आप तत्त्वात संतुलन निर्माण झाले तेव्हा ही सेवा चालू असताना निसर्गातील तीन तत्त्वांची म्हणजे तेज, वायू व आकाश यांची मागणी श्रीसद्गुरुंकडे केली व अशा तऱ्हेने पिंडातील अशांतता, दु:ख दूर करण्यासाठी साधना सिध्द केली. ह्या साधनेचा विनियोग मनुष्यातील पंचतत्त्वांचा असमतोल काढून टाकण्यासाठी ३५ वर्ष केला व त्यापरत्वे मनुष्याच्या जीवनात सुख, शांती, समाधानाची निर्मिती झालेली अनुभवास आल्यानंतर ह्याच साधनाचा विनियोग निर्सगातील पंचतत्त्वांचा असमतोल काढून टाकण्यासाठी श्रीगुरुआज्ञेने केला. त्यासाठी केलेले साधन म्हणजे पृथ्वीवर केलेली श्रीशक्तीपीठाची स्थापना होय. ’पिंडी ते ब्रह्मांडी तेच पिंडी’ ह्या सिध्दांताप्रमाणे मनुष्याच्या बुध्दीचा विकास होत असताना अज्ञानाचा व्यापही अधिकाधिक वाढत आहे. त्यामुळे निसर्गाशी समतोलत्व न साधता मनुष्य निसर्गाच्या विरूध्द जाऊन नैसर्गिक तत्त्वात प्रदूषणे निर्माण करण्यास कारणीभूत होत आहे. अशा प्रदूषणांद्वारे निर्माण होत असलेली अशांतता दूर करण्यासाठी व विश्वात तसेच मानवी जीवनात सुख, शांती, समाधानाचे इंद्रधनुष्य उमटविण्यासाठी, श्रीसद्गुरुकृपेने श्रीशक्तिपीठाची स्थापना केली. श्रीशक्तिपीठाची स्थापना जरी आज झाली असली तरी तिची कार्ययोजना श्रीक्षेत्र औदुंबरच्या सेवेपासून उदीत झालेली होती.

विश्वाची धारणा तीन लोकांत झालेली आहे. एक इहलोक, दुसरा परलोक व तिसरा स्वर्गलोक. मानव जन्माला येतो त्यावेळी त्याचे अस्तित्व कर्म + आत्मा असे असते. पण जन्माला येतेवेळी तीन अधिक ऋणानुबंध जोडल्याशिवाय त्याला जन्माला येता येत नाही. म्हणजे जन्म घेण्यासाठी पाच तत्त्वांचा म्हणजे पाच ऋणानुबंधांचा संबंध प्राप्त जन्माशी येतो. त्याचा अर्थ म्हणजे परलोकात जे कर्म म्हणून अव्यक्त असते, ते जन्मप्राप्तीनंतर व्यक्त होते. ही कर्माची व्यक्त अवस्था म्हणजे ‘जीवन’. जीवन ह्यात मूळ शब्द आहे ‘जीव‘ म्हणजे जो जगणार आहे. यापेक्षा सुलभ अर्थ असा की जीवाची देवाणघेवाण ह्या जगाशी संबंधित आहे. त्याचा अर्थ जीवन होय. ते घेऊन मनुष्य जन्माला येतो व शेवटच्या क्षणापर्यंत जगणे हे जरी भाग असते तरी हा जन्म भोगण्यास आपला ‘भाग’ किती ! हा प्रश्न आहे. जोपर्यंत भोग भोगून संपत नाहीत तोपर्यंत आत्म्याची ‘सुटका’ होत नाही, यासाठी आम्हा मानवांना दोन भूमींचा विचार करावा लागतो. एक इहलोक व दुसरा परलोक. ह्या दोन लोकांमध्ये मनुष्य अडकला म्हणजे जीवनाचा ‘प्रवाह’ सुरू होतो. वास्तविक जीवनाचा ‘जन्म घेणे’ हा ‘प्रवास’ आहे  म्हणजे जे जे कर्तव्य काही शिल्लक राहिले आहे, त्याची फेड करण्यासाठी आत्मा जन्म घेतो. पण जन्म प्राप्त झाल्यावर अज्ञानाने कर्तव्यातून फेड करावयाची ती राहून, कर्माची उपाधी लावून घेतो. त्यामुळे जो प्रवास असतो त्याचे रूपांतर प्रवाहात होते. त्यामुळे तो गतीमध्यें सापडतो. वास्तविक ‘गत’ काळात काय घडले त्याची पुनरावृत्ती पुन्हा जन्मप्राप्तीनंतर होऊ नये म्हणून जन्म घेऊन कर्माची फेड करावयाची आहे हे ज्याला कळते तेव्हा श्रीगुरुंना ह्या प्रवाहातून सुटका करता येते. याचा अर्थ ‘गती’ असा आहे व अशी गती प्राप्त न होण्याने अनेक जन्मपर्यंत इहलोक व परलोक याची यात्रा सुरू होते. त्यामुळे कर्माची वाढ इतकी होते की, एखाद्याला जन्म प्राप्त झाला की फक्त कर्माचीच देवाणघेवाण सुरू होते, चुकत नाही ! ह्या जन्मांत काही ज्ञान प्राप्त होण्यासाठी ‘ज्ञानाची वाण’ शिल्लक राहते. अशा अवस्थेत आत्म्याची स्थिती अधिकच केविलवाणी होते. कारण देहिक अवस्था  इतकी जडवादी होते की ह्या मनुष्याला दया, क्षमा, शांती हे शब्द उच्चारूनसुध्दा ऐकावयास येत नाहीत ! अशी अवस्था प्राप्त होऊन तो जेव्हा परलोकवासी होतो त्यावेळीही ही जडवादी अवस्था जिवंत असते. तो मरतो परंतु वासनेतून त्याची सुटका होत नाही. त्या वासना शिल्लक राहिल्यामुळे पुन्हा जन्म घेणे भाग पडते. अशा भवचक्रात जो आत्मा सापडला आहे त्याची सुटका कधी शक्य आहे ? व जर अशी सुटका व्हावी अशी इच्छा झाली तर नुसत्या देवदेवतार्चन, पोथीपाठ, पूजाअर्चा इत्यादी सेवा करून होत नाही. दिवसाकाठी एक तास आपण देवासन्निध बसतो. बाकी राहिलेल्या वेळात आपला सहवास कर्माच्या वासनारूपी राक्षसाच्या सहवासात देवापेक्षा अधिक ! त्या वासनेतून जेव्हा आपली सुटका होईल, तेव्हा ईश्वराचा ‘वास’ व त्याचा लाभ कसा घेता येईल हे समजेल. याचे प्रात्यक्षिक श्रीगुरूंनी केवळ तत्त्वज्ञान सांगून केले नाही, तर औदुंबर क्षेत्री शेकडो आत्मे, जीव-जीवात्मे, आज शेकडो वर्षे तिष्ठत राहिलेले मला  प्रत्यक्ष दाखविले व शेवटी “ह्यापुढे तुला जे कार्य करावयाचे आहे ते इहजगासाठी २५ टक्के व ७५ टक्के जे जीव परलोकांत पुढील अवस्था प्राप्त न होण्यामुळे तिष्ठत आहेत त्यांची सुटका कशी करता येईल यासाठी करावयाचे आहे. असा जो मार्ग त्याचा अर्थ ‘वंशविमोचन’ होय”, असे सांगितले. “जन्माला आज जे लोक आहेत, त्यांचा कोणी ना कोणीतरी ह्या अवस्थेत ‘वंशज’ म्हणून शिल्लक राहिला आहे. त्याला ‘सद्गती’ प्राप्त होण्याने तुम्हाला जो त्रास भोगावा लागतो आहे त्याऐवजी सुख-शांती-समाधान आदींची प्राप्ती होणे म्हणजे ‘वंशविमोचन’ होय. यासाठी पुढे तुला जे जग दिसते आहे त्यांना जे दु:ख भोगावे लागत आहे त्या दु:खाचे मूळ परलोकांत आहे. तेव्हा ७५ टक्के जगात जे दु:ख आहे त्याचे निवारण परलोकाचा अभ्यास करून जी साधना सिध्द करावयाची आहे त्या साधनेचा संबंध परलोकाशी असावयास पाहिजे”, असे मार्गदर्शन केले.

एके दिवशी मी पहाटे नेहमीपेक्षा लवकर उठून प्रातर्विधी उरकून स्नानासाठी नदीवर गेलो. ते दृष्य अजून माझ्या डोळ्यांसमोर आठवण म्हणून आठवणींत शिल्लक आहे. नदीला घाट आहे. नित्य स्नानाला नेहमीच्या वेळेला गेलो असताना त्याठिकाणी लाखो आत्मे माझ्या येण्याची वाट पाहात आहेत असे दिसले. मी गेल्यावर सर्वांनी गर्जना केली, ”श्रीगुरुदेवदत्त, आम्हाला या नरकयातनेतून सोडवा ! कर्माचे प्रायश्चित्त शेकडो वर्षे भोगत आहोत. एक ना एक दिवस ही सुवर्णसंधी येईल ही श्रध्दा होती. शेवटी दत्तप्रभूंना दया आली. तुमचे आगमन झाले. जन्म कृतार्थ झाला ! देवा, पुन्हा जन्म नको. देह असता तर जगाला देहाचे हाल पाहून दया येईल पण देह नाही. यातना सगळ्या आत्म्याला ! अशी यातना भोगता भोगता शेकडो वर्षे वाट पाहिली. आपले स्नान झाले. समोर गंगा वाहती आहे, पण त्यात स्नान करावे एवढीसुध्दा पुण्याई नाही. आपले स्नान झाले की महाराजांचे तीर्थ आमच्यावर सिंचन करा. यापेक्षा मुक्ती कोणती ? जे कार्य भगीरथाने केले तेच कार्य तुम्हाला करावयाचे आहे त्यात आम्हाला सहभागी करा. तथास्तु ! श्रीगुरुदेवदत्त !”

ही दिनचर्या नित्यनियमाने माझ्या हातून घडावी असा संकेत श्रीगुरुंचा होता. याचा असा अर्थ होता की माझे शरीर हे मध्यस्थ होण्यासाठी अनुकूल व्हावयास पाहिजे, तरच ‘परकाया प्रवेश’ ही साधना साध्य होईल. मागे लिहिल्याप्रमाणे मला प. पू. हाजीमलंगबाबांनी पुढील आज्ञा दिली होती की, माझ्या मामांना भेटल्यावर, ‘मी जे बोलतो ते उर्दू आहे, ते शिकून घे’. पण एके दिवशी प्रार्थना केली की ‘जरी मी उर्दू शिकलो तरी शिकावयास वेळ लागेल व ही भाषा शिकण्यासाठी वेळ  कोठे ? त्यापेक्षा आपण जर मराठी बोलू लागलात तर ते काही अशक्य नाही व हळूहळू मी उर्दू बोलू लागेन’. ही प्रार्थना मान्य करून एके दिवशी त्यांचे आगमन मामांच्या घरी झाले. त्यादिवशी त्यांनी उर्दू बोलून “आमची इच्छा काय आहे” हे मामांना सर्व सांगितले. “परलोकाचें ज्ञान व्हावे व आम्ही ज्या विभूती ह्या कार्यात सहभागी होणार आहोत ते कार्य भवितव्यात असे आहे … सर्व जग आज जे अस्तित्वात आहे ते अंधश्रध्देचे अनुकरण करीत आहे. त्या आचरणांत आम्हाला आमूलाग्र बदल करावयाचा आहे. म्हणजे, हा बदल करणे हे जगाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. ही कार्ययोजना आम्ही विभूतींनी ठरवली नसून, ती ‘आज्ञा’ आहे ! ह्या सृष्टीचा जो नियंता आहे त्याची इच्छा अशी आहे की ह्या जगाची अपक्रांती होऊ नये. मनुष्य कितीही अज्ञानी म्हणून जन्माला जरी आला तरी ‘ईश तत्त्व‘ सज्ञानी आहे. त्या तत्त्वाने कृपा केली तर हा भेद राहणार नाही व नराचा नारायण होईल. आजच्या जगाचा उत्कर्ष इतका  झाला तरी मानव हा मागासलेला आहे. तर, ह्या तत्त्वाची प्राप्ती ज्याला करावयाची आहे त्याने देवधर्म, जातीपाती, अमुक एका धर्माचा ह्या विचाराप्रमाणे अनुकरण करून ह्या जगाची उक्रांती होणार नाही. फक्त मानव व त्याचे जीवन म्हणजे ‘मानवी जीवन’ अशी व्याख्या निर्माण झाल्याशिवाय ह्या जगाला सुख, शांती मिळणार नाही. मनुष्याला जन्म देतेवेळी देवाने आपल्यासारखाच जन्म ’आकृती’ म्हणून दिला. फक्त मनुष्य ‘कृती’ ही देवाची न करता दानवाची करतो म्हणून जग दु:खात आहे. त्यामुळे शतकानुशतके मनुष्य, जन्म प्राप्त होऊनसुध्दा गुलाम झालेला आहे. जन्म हा कर्माने होतो ही ‘गीता’ जोपर्यंत वाचू लागतो आहे तोपर्यंत आपली सुटका नाही. ह्यापुढे तत्त्वज्ञानात बदल असा होणे आवश्यक आहे; ‘मला जन्म प्राप्त झाला आहे तो धर्मासाठी ! कर्मासाठी नव्हे.  धर्माची सेवा माझ्या हातून घडू दे. कर्माची गीता वाचत न बसता माझ्या वाणीतून जगाच्या कल्याणाचे ‘गीत’ केव्हा उच्चारले जाईल ही तळमळ निर्माण व्हावी व अशी कृपा परमेश्वराने करावी अशी सद्बुध्दी मला दे’, अशी विचारसरणी तुम्हा मानवांची व्हावी अशी इच्छा आम्हा सर्व विभूतींची आहे. ह्यासाठी आवश्यक असे साह्य आम्हा सर्वांचे आहे. जगाचे कल्याण व्हावे ह्या व्रताचे पालन तुम्ही करत आहात म्हणून यापुढे कोठलीही शक्ति कार्याच्या आड येणार नाही, हे लक्षात ठेवा. ही आज्ञा ईश्वराची आहे. त्यात ज्ञाती-भेद-धर्म ह्याचे विष पेरू नका. जर त्याप्रमाणे आपण वागलो नाही तर हाच ‘शाप’ आपल्याला भोगावा लागेल. ”

आता यापुढे दुसरा विषय अतिमहत्त्वाचा आहे. तो विषय ‘कर्मविमोचन’ असा आहे. कर्माचे भोगावे लागणारे परिणाम असे आहेत की गेल्या काही शतकांत ज्या ‘मनुष्या’ची निर्मिती झाली, यात प्रामुख्याने जे जे दोष आढळले यांचा विचार सूज्ञांनी केला नाही. त्यामुळे सुखाची प्रगती झाली पण ‘शांतता’ निर्माण झाली नाही व त्यामुळे मनुष्याच्या एका मार्गाची प्रगती झाली, पण तो सुखी झाला का ? सुखाच्या मार्गाच्या साधनांचा शोध मनुष्याने लावला, पण सुखाचा शोध लागला तरी मनुष्य सुखी झाला का ? हा प्रश्न शिल्लक आहे. तोच प्रश्न आज ह्या जगासमोर उभा आहे. केवळ ऐहिक जीवनात सुखाची प्राप्ती अधिकाधिक वाढत चालली आहे, त्याचे कारण त्याचे मूळ विश्वात अन्यत्र शोधून सापडणार नाही. त्याचे मूळ मनुष्यामध्येच आहे. बाजारात गेलो तर शांती समाधान एक किलो मागून मिळणार नाही. ही अवस्था बाजारात विकत मिळत नाही. याचा शोध जर घेतला तर ह्या अवस्थेची कमतरता काया-वाचा-मन  ह्या मूळ देहामध्ये आहे हे कळते. आज लक्षाधीश माणसापेक्षा गरीब हा गरीब नसून ‘अमीर’ आहे, कारण त्याचे जीवन हे परिपूर्ण आहे व जो लक्षाधीश आहे तो लक्षाधीश असून त्याचे जीवन हे अपूर्ण आहे. आजच्या जगाला ‘काय पाहिजे आहे’ ? असे विचारले तर हे लोक सुखाचे पाढे वाचतील. ‘अधिक प्राप्ती’ कशी होईल’ म्हणून ह्या कार्याचा ते शोध घेत येतात ! बहुसंख्य लोकांत काय कमतरता आहे ह्याचा विचार कोणी करीत नाही तसेच मूळ जन्माची धारणा होत असताना काय कमतरता आहे ही अवस्था कोणाला कळत नाही. विज्ञानी लोकांनी सगळे शोध लावून प्रत्येकाला ‘मीटर’ बसविले आहेत. पण स्वतःच्या जन्माचा हिशोब लावण्यासाठी विसरले आहेत.

जो कोणी जन्माला येतो त्याला आपल्या जन्माचे इष्ट कार्य करण्यासाठी काया-वाचा-मन हे आवश्यक आहेत. त्याचबरोबर स्थूल-सूक्ष्म व कारण देह यांची जोडसुध्दा आवश्यक आहे. ह्या सहा माध्यमांत जी क्रिया नकळत होते त्या क्रियेचा परिपाक झाला तर विचार ! व परिपाक न होणे ही क्रिया जर देहाने केली तर त्या अवस्थेस विकार असे म्हणता येईल. ही सहा माध्यमे जन्म घेतेवेळी आपल्याला न मागता ईश्वर देतो. फक्त आपले कर्तव्य आहे की ज्या माध्यमांना देवाने दिले आहे त्यांची किंमत अमोल आहे व ती भेट पुन्हा मिळणार नाही. सर्व जीवनात क्षणिक भेटी असतात व गाठी पडतात. वास्तविक ज्याने जन्म दिला त्याची फेड करण्याचे कर्तव्य म्हणजे ह्या बहुमोल जीवनाला जो साकार करतो त्याच्या कृपेने ह्या जीवनाला आकार येऊ दे, अशा तळमळीने सदैव ध्यास घेतला पाहिजे. याउलट तळमळ लागली आहे ऐहिक सुखाची की जे सुख येथेच ठेवून जायचे आहे त्याचा ध्यास लागला आहे. शेवट गोड व्हावा अशी इच्छा सदैव ठेवावी.

देहाची सहा अंगे आहेत. त्यापैकी चार अंगे ह्या जन्माचे सार्थक होण्यासाठी वापरली गेली पाहिजेत. २ अंगे गतजन्मी होती व आजही आहेत. पुढच्या जन्मीही हीच २ अंगे जन्म घेण्यास लागणार आहेत. ४ अंगे म्हणजे स्थूल, सूक्ष्म व काया, वाचा. ह्या ४ अंगांनी चार पुरूषार्थांची प्राप्ती झाली पाहिजे व २ अंगे मन व कारण देह यांची ह्या जन्मात मुक्तता करावयास पाहिजे. हा एकंदरीत शरीराचा धर्म निसर्गाने नेमून दिला आहे. आजच्या काही शतकांमध्ये मनुष्याची अवस्था हीन पातळीवर वास करीत आहे. त्याला फक्त आचार, विचार, उच्चार ह्यांचे बंधन नाही. त्यामुळे ‘खाणे, पिणे, कपडा-लत्ता, ऐषराम’ म्हणजेच जीवन असे तो मानू लागला आहे. आज सभोवार बेफिकीरीने वागणारा मनुष्य हा गतकालात असणारा ‘मानव’ आहे का ? हा प्रश्न सूज्ञांसमोर आहे. हे दृष्य पाहिल्यावर जीवनाची कीव येते. ज्या साधुपुरुषांनी आपल्या जीवनाचे बलिदान केले त्यांनी जन्माला आलेल्यांना सन्मार्ग दाखविला व ह्या मार्गाने गेले असता जन्माची सार्थकता आहे असे टाहो फोडून जगाला सांगितले. त्या काळात आपण सूज्ञ होतो असे म्हणणारे आज पश्चातापाने उद्गार काढतात की ‘त्या काळात आम्ही अहंकाराने या सत्परुषांची निंदा-नालस्ती केली पण या साधुसंतांनी आपला मार्ग सोडला नाही. आज ह्या मार्गदर्शनाची किंमत एवढी आहे की दहा जन्म घेऊनही हा वारसा फेडू शकणार नाही. आजची समाजाची स्थिती पाहून असे वाटते की हा रोग महाभयंकर असून ज्याप्रमाणे क्षयरोग होतो त्यापेक्षाही हा रोग वंशपरंपरा, देवधर्म, नीति-न्याय, राष्ट्र आदी समाजाची मौल्यवान तत्त्वे जी आहेत त्या तत्त्वांचा बळी घेऊन शांत होईल  पण केव्हा ? जग ह्या प्रश्नात बुडाले आहे. दुसऱ्याला तरणोपाय जो सांगतो आहे त्याच्या पायाशी काय आहे ? –आमचा नाश !’. ही भीषण परिस्थिती पाहून ‘कर्मविमोचन’ हे साधन श्रीगुरुंनी सिध्द करण्यास सांगितले.

कोणीही मनुष्य जन्माला आल्यावर त्याला काया-वाचा-मन ही त्रिपुटी असावयास पाहिजे. आत्म्याला हा जन्म घेण्यापूर्वी काया प्राप्त करावी लागले. ह्या धारणेचा आरंभ गर्भधारणेत होत असतो. गर्भधारणेत कायेला अस्थी, मांस, रक्त, मज्जा व तंतूंनी आरंभ होतो. ह्या जन्मात जी अस्थी प्राप्त होते तिचा संबंध पुन्हा जन्म घेतेवेळी पूर्वजन्मातील जीवनाशी असतो. अस्थीचा संबंध पूर्वजीवनाचा आकार येण्यासाठी ‘पाया’ म्हणून असतो. ‘पाया’ म्हणजेच अस्थी. ह्या तीन प्रकारच्या असतात — देवाच्या, मानवाच्या व दानवाच्या. अस्थींची गरज मानवाला असते. कारण त्या पायावर जीवनाचे मंदिर उभे करावयाचे असते. गर्भधारणेत जीवाची जोपासना फार महत्त्वाची आहे. जो आत्मा जन्माला येतो, त्याला पुढील जीवन जगण्यासाठी ५० ते ७५ वर्षांचा काळ व्यतित करावा लागतो. त्याची तरतूद ९ महिने ९ दिवसांत करावयाची असते. त्याची जबाबदारी आहार, विचार, उच्चार यावर अवलंबून आहे. पूर्वीच्या काळी जन्माची धारणा ही संस्कारांनी होत असे व आज तेच संस्कार आपल्याला नको आहेत. त्यामुळे जन्म घेण्याची प्रवृत्ती जरी मनुष्याच्या ठिकाणी निर्माण झाली तरी संस्कांराच्या अभावी जे बीज मानवाच्या ठिकाणी धारण होणे आवश्यक आहे त्या बीजाची धारणा होत नाही. आज कर्मामुळे जन्म प्राप्त होतो व कर्माची धारणा देहात होत असली तरी संस्कारातून धर्माचे बीज याची प्राप्ती, जन्म घेतेवेळी व्हावयास पाहिजे ती न होण्याने ’वंशपरंपरा’ ही आपल्या अज्ञानाने नष्ट झाली आहे.

समाजात किंवा कुटुंबांत जन्माला लोक येतात व जातात. पण गेल्या काही शतकांत वंशपरंपरेचा मूळजन्माशी जन्म घेण्यात जो वाटा आपल्या संततीमध्ये मिळतो तो मिळत नसून प्रत्येक पिढीत जन्माला येतेवेळी आचार, विचार व उच्चार हे भिन्न आढळतात. म्हणून एकसूत्रीपणा मानवी जीवनात सापडत नाही. त्याशिवाय जन्मप्राप्तीच्या वेळी वाचा आणि मन यांचा संबंध उच्चार व विचाराशी होत असतो. ही संपत्ती आपण पुढच्या पिढीला प्राप्त करून द्यावयास पाहिजे. गतकालातील पिढ्यांमधील हितसंबंध आज मनुष्याच्या हाडामांसाशी आहे हे आधुनिक विज्ञानही  नाकबूल करीत नाही. याचाच अर्थ ह्या वैज्ञानिक लोकांना ‘आनुवंशिकता’ (Heredity) ही मान्य आहे. परंतु ‘चांगल्या गुणांनी जन्माला येणे’ हे निर्माण करण्यासाठी ‘सेवा’ करावी लागते. पण पोषक नाहीत असे गुण निर्माण झाल्याने आपण जगाचा ‘हेवा’ करतोच आहोत, कारण जन्माची धारणा अस्थींवर अवलंबून असते. यासाठी श्रीगुरुंनी असा आशीर्वाद दिला की, “भवितव्यात जन्माला येणारा मनुष्य हा ‘अंश’ म्हणून जन्माला येणे जरूर असून ‘वंश’ म्हणून जन्माला येणे हिताचे नाही”, यासाठी ज्या साधनेचा लाभ आम्हा सर्वांना झाला त्या उपकाराची फेड कधीही करता येणे शक्य नाही. मूळ मानवाची निर्मिती अशी होण्याने समाजात भीषण अवस्था भोगावी लागू नये, म्हणून या ‘वंशविमोचन’ साधनेमुळे जन्माला येण्याची मूळ अवस्था ही कृपाशिर्वादाने बदलली आहे. पूर्वी जन्माला येतेवेळी मूळ धारणा ही काया, वाचा व शेवटी मन अशी होती. ह्या अवस्थेमध्ये काया व वाचा ही प्रधान असून व मन गौण असणे अशी अवस्था असल्याने जरी जन्माला आलो तरी आपली इष्ट कर्तव्ये कोणालाही करावयाची नसून जास्तीत जास्त जीवनाचा उपभोग प्राप्त होण्यासाठी “दुसऱ्याचा भोग” चालू आहे, यासाठी मूळ धारणेत असा बदल केला आहे की, मनाची धारणा ही प्रधान करून, काया आणि वाचा ही गौण केली. पूर्वीच्या काळी ‘सत्कर्म संचित करणे’ असे जे आपण म्हणत होतो त्याऐवजी सत्कर्मांचे ‘सेवन’ केल्याने ते शिल्लक न राहता त्याचा सदुपयोग पुढच्या पिढीला जन्माला येण्यासाठी झाला पाहिजे. एकदा ह्या जन्मात गुरूंची भेट झाली आहे म्हटल्यावर ती भेट जन्मोजन्मी ‘साह्य’ देणार आहे, एवढा आत्मविश्वास स्वतःच्या ठिकाणी निर्माण करावयास पाहिजे. केवळ संकुचित विचाराने देवधर्म, दानधर्म ही कर्तव्ये परोपकाराची आहेत ती केवळ मुक्ती प्राप्त होण्यासाठी करावयाची नसून दु:खी लोकांना संकटातून व अज्ञानातून मुक्त करावयाचे आहे असा विचार आता  दृढ केला पाहिजे.

प्रथमतः आपण भक्तांनी अडीअडचणी निवारणार्थ ह्या कार्याचा लाभ विचारात घेतला, त्यावेळी सुखाचा लाभ कसा होईल हा विषय जमेस धरून आपण वारंवार कार्यकेंद्रावर उपस्थित राहून, प्रश्न विचारत होता. पण त्यावेळी आपल्या जीवनातील प्राप्त सुखाचा विचार न करता आपल्यामध्ये जन्म प्राप्त होऊनही कोणत्या सुखाची उणीव आहे याचा शोध घेण्यासाठीच आपण आलात. वास्तविक आपण आपल्या प्रश्नाला अडी-अडचण असे समजत होतात. पण गुरुमार्गामध्ये जेव्हा मनुष्य येतो. त्यावेळेला अडचण घेऊन येत नाही तर ‘चणचण’ कशाची आहे हे गुरुंना समजत असून आपला प्रश्न ‘निरर्थक’ आहे असे आपल्याला वाटते. पण आपल्या येण्याने जीवनाचा अर्थ काय आहे हे श्रीगुरुंना सांगावयाचे असते. याचा अर्थ सुख न मागता सुख कसे प्राप्त होईल आदिचा मार्ग म्हणजे सुख प्राप्त करण्याचा मार्ग हा आपणास मिळावा  व भवितव्यात तुमच्या मुलाबाळांनाही याचा लाभ व्हावा अशा दिव्य दृष्टीने आपल्या येण्याने आपल्याकडे पाहून श्रीगुरुंनी कृपाशिर्वाद दिला.

कार्यकेंद्रावर अडीअडचणींच्या निमित्त्याने आपण सर्वजण जेव्हा उपस्थित राहिलात, त्यावेळी आपली अवस्था काय होती हे गुरुंनी पाहिले. अडीअडचण ही क्षणिक असो अगर गंभीर असो, यासाठी संरक्षण देऊन वेळोवेळी या आपत्तींचे निवारण गुरुंनी केले आहे. ह्या अडीअडचणींच्या निवारणार्थ आपल्याला जी काही निश्चित सेवा सुचविण्यात आली, त्यावेळी आपल्या जीवनात जी कमतरता होती ती उणीव ह्या सेवेने भरून निघाली. आपले जीवन, याचा उपभोग आपण घेत असूनसुध्दा ह्या जीवनात काय उणीव आहे याकडे आपण कधीही ढुंकून पाहिले नाही. याउलट आपल्यापेक्षा इतरांना काही एक ऐहिक सुखाची प्राप्ती अधिक झाली असून त्या प्रकारचे सुख आपल्याला का मिळत नाही ? या विचारात कार्यकेंद्रावर आपण आलात. अशावेळी ऐहिक सुखाची प्राप्ती कशी व केव्हा होईल याचा जो विचार आपण करीत होतात त्या ऐवजी “माझ्यामध्ये काय कमी आहे” ? ही विचारणा जर केली असतीत तर  विचार करण्यापेक्षा आपल्याला अधिक लाभ झाला असता. गुरुमार्गात वेळोवेळी जे भक्तभाविक गुरुमाध्यमाचा लाभ घेण्यासाठी येतात तेव्हा आपले कर्तव्य गुरुमार्गात काय आहे ? व गुरूंचे येणाऱ्या भक्तांच्याबद्दल काय कर्तव्य आहे ? हे समजले पाहिजे. नाहीतर वेळोवेळी गुरुवाणीतून जे जे कांही भक्तांच्याबद्दल निवेदन किंवा भाकीत बोलले जाते त्याची प्रचिति न येण्यामुळे बहुसंख्य लोक ह्या मार्गाला निष्कारण गालबोट लावतात. भक्त हा सज्ञानी पण नाही व अज्ञानी पण नाही अशा अवस्थेत असतो. अशावेळी गुरुंनी आपले इष्टकर्तव्य कोणाकडे पाहून लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी याचा विचार न करता स्पष्टपणे जे काही जीवनात कमी अधिक असेल ते सांगावयास पाहिजे. नाहीतर बहुमोल अशा जीवनाचा अपव्यय होऊन, ”ना घरका, ना घाटका” अशी स्थिती भक्तांची होत असते. जी काही प्राप्ती भक्तांना होणार असेल ती देवाधीन आहे. त्याचे सामर्थ्य आपल्यापाशी नाही म्हणून ‘अमुक एक प्राप्त होणार आहे’ हे आमिष दाखवून भक्तांना भुरळ पाडणे गैर आहे. उलट प्राप्तीचा मार्ग भक्ताला दाखविण्याचे कर्तव्य साधकाने प्रथमतः केले पाहिजे. यासाठी इतरांप्रमाणे व इतर ठिकाणी अन्य जे साधक आहेत त्यांचा विचार करून आपण ह्या गुरुमार्गाकडे वळते झालो आहोत. पण हा मार्ग इतरांच्यापेक्षा सर्वस्वी भिन्न असून आपल्या अडीअडचणी ह्या भूत, भविष्य, वर्तमान ह्या तिन्ही काळावर अवलंबून नाहीत म्हणून प्रथमतःच भविष्य सांगितले जात नाही, असा स्पष्ट खुलासा केला, कारण जीवनात अडीअडचणी किंवा सुखदु:खे येतात तशीच जातात. पण अडचण येणे व जाणे ह्यांच्यामधला काळ हा पीडादायक आहे असे आपण समजून चाललो आहोत व त्यामुळे ह्या काळात आपल्याला काय फायदा होतो याकडे आपण लक्ष देत नाही. वास्तविक संकटे किंवा दु:खे ही निवारण होणे हे श्रीगुरुंना सहज करता येण्यासारखे आहे. आपण अडीअडचणींनी त्रस्त होतो तेव्हाच गुरुंचा शोध घेतो. पण हा शोध शोधून सापडणार नसून शोधाऐवजी गुरुमार्गातून आपण काय बोध घ्यायचा असा जर विचार केला तर आपल्या जीवनात ‘बोधामृताचा’ वर्षाव होईल.

आपण भक्तांना जो गुरुमार्ग म्हणून सांगितलेला आहे, ते ‘तत्त्वज्ञान’ आहे. त्या तत्त्वज्ञानातून साधक अवस्थेमध्ये पुढे या तत्त्वज्ञानाचे रूपांतर ‘सिध्दसिध्दांत पध्दती’मध्ये व्हावयास पाहिजे. यासाठी तत्त्वज्ञान हा विषय केवळ शाब्दिक असून चालत नाही. उदा :- ‘वंशविमोचन’ किंवा ‘कर्मविमोचन’ हे दोन भिन्नाभिन्न विषय व त्यांचे कार्य हे जरी तत्त्वज्ञानात निरूपण म्हणून सांगितले तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ मानवी जीवनात घेता येत नाही, यासाठी तत्त्वज्ञान याचा शोध घेऊन त्याचा बोध भक्तभाविकांना द्यावयाचा असतो. यामध्ये ज्याचा शोध आपण घेतला त्याबाबत “ही साधना मी केली” असे म्हणून चालणार नाही. आज सृष्टीत अनेक शोध लावले गेले आहेत. परंतु हे शोध आज लागले नसून काही हजारो वर्षापूर्वी तशा प्रकारचे शोध सिध्द केलेले सापडतात.

एखादे साधन आज सिध्द करण्यासाठी साधक अवस्थेत त्या साधकाची देहिक व आत्मिक अवस्था ह्या दोन्ही  अवस्था नामीतत्त्वाशी एकरूप झालेल्या असाव्या लागतात. याचा अर्थ देहिक माध्यम हे ‘मध्यस्थ’ व्हावयास पाहिजे असे प. पू. हाजीमलंग बाबांनी मला पूर्वी सांगितले होते. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ह्या अवस्थेची प्राप्ती मला जेव्हा झाली तेव्हा प. पू. बाबांनी मला असा इशारा दिला की ”या अवस्थेमुळे तुला भूत, भविष्य, वर्तमान हे समजू लागेल. परंतु हा लोभ क्षणिक असून भवितव्यात अतिमहत्त्वाच्या कार्यासाठी तुझे देहिक माध्यम हे तयार व्हावयास पाहिजे. यासाठी या तीन काळांचे कथन करण्याचे पाप तू करू नकोस. कारण पुढे साधक अवस्थेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचे ज्ञान होण्याची अवस्था प्राप्त करावयाची आहे, ज्यामुळे जगाच्या कार्ययंत्रणेमध्ये अदलाबदल करावयाची आहे. असे अदलबदल जर सृष्टीत झाले तरच मनुष्याला सुख शांती समाधान लाभेल. तेव्हा आज नुसते भविष्य सांगून एखादे भविष्य खरे करण्यापेक्षा भविष्य न सांगितलेले बरे !”.

गुरुमार्गात काय प्राप्त करावयाचे याचे ज्ञान होणे आवश्यक आहे. आपण दीक्षा हा शब्द सर्वत्र ऐकतो. पण दीक्षेची जबाबदारी ही गुरुंवर असते व भक्ताचे कर्तव्य हे फक्त गुरुआज्ञेचे पालन करणे हे असते. गुरुमार्गामध्ये ज्या दीक्षा – उपासना दीक्षा, नामस्मरण दीक्षा, अनुग्रह दीक्षा, गुरुदीक्षा, कारण दीक्षा व महाकारण दीक्षा अशा आहेत, त्यांचे कार्य व त्या दीक्षेंचा संबंध कोठे आहे हे समजले पाहिजे. ह्या दीक्षाविधींचा आरंभ अडीच हजार वर्षापूर्वी झालेला असून वेळोवेळी जशी आवश्यकता भासली त्याप्रमाणे त्या त्या दीक्षेची सिध्दता केली गेली आहे. श्रीगोरखनाथांचे देहिक माध्यम भस्मामधून निर्माण झाले, म्हणजे त्यांच्या ठिकाणी काया, वाचा व मन अशा तिन्ही तत्त्वांची उणीव होती तर मीननाथांकडे काया व वाचा यांची उणीव होती. मीननाथांचा जन्म वासनेपोटी झाला असल्यामुळे “याला धुवून काढ” अशी आज्ञा होताच गोरखनाथांनी मीननाथांचे कातडे वाळत घातले. जगातील पुढील कठीण काळामध्ये लोक अनाथ होऊ नयेत म्हणून ईश्वराने नवनारायणांना जन्म देऊन लोकांना सनाथ केले; व ह्या कार्यामध्ये अनेक प्रकारची साधनसिध्दता केली. ही सिध्दता पूर्वीच करून ठेवली आहे व जशी वेळ येईल त्याप्रमाणे साधकाचे माध्यम कार्य करीत असते.

आज अडचण निर्माण झाली की मग आपण ईश्वर आहे किंवा नाही याचा शोध घेतो. पण देव म्हणतो, “तुला माझी आठवण आज झाली आहे. तू जन्माला येण्यापूर्वी मी होतो, आज आहे व पुढेही तुला लागणार आहे”. कार्यारंभी प. पू. हाजीबाबांची आज्ञा अशी होती की, ’जगापुढे कार्य कर’. त्यावेळी विचारणा अशी केली की ‘कार्य म्हणजे काय ? साधक अवस्थेत काय प्राप्त होणे आवश्यक आहे ? म्हणजे त्याला कार्य म्हणता येईल ? कर्माचा पाच ऋणानुबंधांशी संबंध कसा आहे ?’ कर्माचे जीवनातील कार्य व त्याची फलप्राप्ती याचे ज्ञान साधकास होणे आवश्यक आहे. एखादे वेळी कर्माची अनिष्ट फलप्राप्ती होत असते. त्यावेळी हे् समजले पाहिजे की कर्म अस्तित्वात असूनही त्या कर्माला कार्य करून देणे किंवा नाही व त्या कर्माला इष्टफल येईतोपर्यंत भक्ताला सेवा करण्यास सूचित करणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ साधक अवस्थेत कार्य आहे. ते असे की कर्मानुसार जे घडणार आहे ते घडू न देणे किंवा कर्माची प्रवृत्ती जी असेल त्याप्रमाणे कार्य होऊ न देणे यासाठी भक्ताला कर्मवलयातून बाहेर काढून गुरुवलयात धारण करावे लागते. जी सेवा आवश्यक आहे, ती  त्याला सूचित करावे लागते व ही सेवा जी सूचित केली जाईल ती त्या भक्तांला झेपेल किंवा नाही, याचा विचार करणे आपले पहिले कर्तव्य आहे. कार्यकेंद्र हे ‘सेवाधाम’ असते. येणाऱ्या भक्ताला सेवेची गोडी लागली पाहिजे. सेवा सूचित केल्यावर भक्ताला ‘घाम’ सुटता कामा नये, अशी जबाबदारी साधकाची आहे.

‘कर्मविमोचन’ हे साधन अतिमहत्त्वाचे असून ते साधन असे आहे की मनुष्याने जन्म प्राप्त केला की त्याचा संबंध दोन जगांशी येत असतो. १) इहलोक २) परलोक. जन्म घेण्यापूर्वी आत्मा व कर्म हे परलोकात असते व अशावेळी दोन अवस्थांचा विचार करून जन्म प्राप्त होतो. पहिल्या अवस्थेमध्ये जन्म घेण्याची प्रवृत्ती आत्म्याला व्हावी लागते व दुसऱ्या अवस्थेमध्ये गतकर्माच्या वासनेमुळे जन्म घेण्याची इच्छा होते. पहिली अवस्था ही आत्म्याला प्रवृत्ती होण्याने होते. त्यामध्ये त्याचा हेतू असा असतो की पूर्वजन्मांत आपल्या हातून घडलेल्या चांगल्या वाईट कर्मानुसार ह्या बंधनातून आपली सुटका व्हावी. ती सुटका जन्म घेतल्याशिवाय कोणालाही प्राप्त करून घेता येत नाही. दुसरी अवस्था गतजन्मात घडलेल्या इच्छावासनेमुळे मरणोत्तर जीवनात काही इच्छावासना यांचा भोग अपूर्ण राहिला असेल तर आत्म्याची जन्म घेण्याची सहज प्रवृत्ती नसूनही कर्म हे त्याला वासनेमुळे जन्म घेण्यास भाग पाडते. जेव्हा आत्म्यास परलोकातून इहलोकात यावे लागते, तेव्हा तीन ऋणानुबंधाचा हितसंबंध त्याला जोडावा लागतो. हे तीन ऋणानुबंध त्याला जोडल्याशिवाय जन्माचे कार्य ‘कर्म’ म्हणून करता येत नाही. यातील पहिला संबंध मातापित्याशी जोडावा लागतो. कारण जन्म प्राप्तीसाठी मातृपितृ हे माध्यम आवश्यक असते. ही देहाची धारणा म्हणजे काया-वाचा-मन किंवा पिंड याची धारणा होत असता जे संस्कार होतील त्यावर कर्माचे कार्य अवलंबून असते. त्यावेळी होत असलेल्या संस्कारांचा किंवा इच्छावासनांचा ठसा त्या पिंडावर असतो. अशा जन्माची धारणा ही मातृपितृ ऋणानुबंधांतून जोडली गेल्यानंतर इहजगतात जन्म देणाऱ्या या मातापित्यांचे जे आप्त स्वकीय यांचा संबंध आपोआप किंवा नकळत व इच्छा नसूनसुध्दा जोडला जातो. त्याला शास्त्रात ‘इतरेजन’ असे म्हणतात. हा इतरेजनाचा संबंध जन्म प्राप्तीवेळी जीवाच्या धारणेला काही हितसंबंध जोडत नसून ‘जीव घेण्यासाठी’ यांची उपस्थिती ‘अनावश्यक’ म्हणजे न मागता आपल्या कर्मामध्ये समावेश म्हणून होते.

पूर्वकर्म हे काया, वाचा, मनाने घडलेले असते. त्या कर्माला जबाबदार एक आत्मा किंवा कर्म हे असते व इहजन्मामध्ये या दोघांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु जे दोन ऋणानुबंध – मातृपितृ व इतरेजन हे जन्म प्राप्तीचे वेळी जोडले जातात, त्यांचा ‘कर्म’ म्हणून आपल्या कर्मवलयात समावेश होत नाही. त्यामुळे जन्म हा कर्मानुसार व्यतीत होत असता ह्या ऋणानुबंधांचा अडथळा ते कर्म ह्या अवस्थेत नसल्याने होत असतो व ह्या ऋणानुबंधाची जीवनात मदत होण्याऐवजी अडथळा निर्माण होतो. कर्मामध्ये तरतूद असूनसुध्दा व आत्म्याला आपली सुटका करून घेण्याइतके कर्म असूनसुध्दा ह्या अगतिक ऋणानुबंधामुळे मोहाला बळी पडावे लागते. ह्या दोन ऋणानुबंधाचा हितसंबंध कर्म म्हणून आल्याशिवाय त्याचा लाभ घेता येत नाही. हा लाभ होण्यासाठी ’देवादिक’ यांचा ऋणानुबंध जीवनात जोडला गेला आहे. ह्या ऋणानुबंधात आपल्या घराण्याच्या ज्या कुलदेवदेवता आहेत त्यांची उपासना ही पूर्वापार पध्दतीने केली असता, त्या सेवेचा लाभ हे दोन ऋणानुबंध जे निमित्त म्हणून आहेत त्याचे रुपांतर कर्मात व्हावे अशी तरतूद कुलाचार व कुलधर्म यांच्यात केलेली आहे. ह्या कुलाचारात कुलस्वामी व कुलस्वामिनी असे दोन देव आहेत. कुलदेवी हिचे कार्य आपल्या जीवनात आईचा ऋणानुबंध जोडण्यासाठी कारणीभूत होतो व कुलस्वामीचा ऋणानुबंध पित्यासाठी कारणीभूत होतो. अशी ही योजना शास्त्राने मनुष्य जन्माला येण्यापूर्वी केलेली आहे.

जन्माला येणारा जो कोणी मनुष्य आहे, त्याला आपले जीवन कर्माने व्यतीत करावे लागते. म्हणून त्याला ‘नरजन्म’ असे म्हणतात. पण जर योग्य संस्काराने हा पिंड जोपासला गेला तर ‘नराचा नारायण’ होणे काही अशक्य नाही. याची साक्ष म्हणून आपल्याला जन्म देतेवेळी देवाने इतके उपकार केले आहेत की आपले शरीर जर निरखून पाहिले तर याचा बोध इतरांनी देण्याची गरज नाही. डोक्यापासून पायापर्यंत असलेली माध्यमे की ज्यांचा उपयोग आपण अहर्निश करून घेत असतो त्यांचा वापर करीत असता, देवाने, दोन दोन माध्यमे न मागता देऊन, “आठवणीत ठेवा, उपयोग न करता परत पाठवू नका” असा संकेतही परमेश्वराने दिला आहे. आपल्या शरीराचे दोन भाग असून उजवी बाजू ही ब्रह्मांड आहे व डावी बाजू ही पिंडाची आहे. या दोन पिंडांचे पोषण होण्यासाठी अन्ननलिका व श्वासनलिका एकत्र दिल्या आहेत. याचाच अर्थ “पिंडी ते ब्रह्मांडी व ब्रह्मांडी तेच पिंडी”.

ही शरीराची जोपासना अन्न आणि पाणी हे अन्न-नलिकेतून आणि आत्म्याचे पोषण हवा व आकाशतत्त्व हे श्वासनलिकेतून ह्या धर्माप्रमाणे होत असते. ही चार तत्त्वे जोडल्यानंतर शरीराच्या मध्यभागी ‘तेज’ हे प्रगट व्हावे म्हणजे “नराचा नारायण” होण्याची क्रिया पूर्ण होते. पण आपण जन्माला येऊन जीवाची जोपासना करावयाची सोडून फक्त पिंडाला ‘पोसला’ आहे. अशी रचना विधात्याने आम्हा मानवांची केली असताना ती ती स्थाने (माध्यमे) ह्यांचा यथायोग्य तऱ्हेने सदुपयोग न करण्यामुळे हा जन्म पुन्हा येईल किंवा न येईल हे सांगता येत नाही. तेव्हा जे जे काही संस्कार होणे आवश्यक आहे, ते ते त्यावेळी करून घेणे हा आम्हा मानवांचा धर्म आहे. परंतु अशा धर्माचे पालन करण्यास आपण आधुनिक पध्दतीचा पेहराव घालण्यामुळे विसरलो म्हणून श्रीगुरु हे आपल्याला विसरले नाहीत, तर जन्म घेण्याची इच्छा किंवा वासना ही कारणीभूत झाली असेल पण पुढे मरण हे प्राप्त करावयाचे आहे. परंतु साधे मरण नसून ‘अमरत्व’ प्राप्त व्हावे. ही प्राप्ती गुरूआज्ञेशिवाय होत नाही. तेव्हा गुरुमार्गी होणे याचा अर्थ गुरुंच्या बंधनामध्ये “जेविता खेळिता चित्त दत्तमय झाले ! ” असे व्हावयास पाहिजे. आम्हा मानवांना फाजील ज्ञान झाल्यामुळे भोग भोगण्यासाठी जन्माला आलो आहोत असे वाटते. पण आपण सुखात नांदावे म्हणून आपण काहीएक साधना न करता श्रीपंतांच्या आरतीप्रमाणे “साधन सेवा काही न करता, दावियले निजधाम”, याचा अर्थ ‘कर्मविमोचन’ !

शेवटी पाचवा ऋणानुबंध ‘इतरेजनांचा’ हा फेडावयाचा असून ह्य़ा ऋणानुबंधातून सुटका किंवा सोडवणूक प्राप्त करून घेणे हे अधिक महत्त्वाचे आहे. कारण हा ऋणानुबंध शंभरात एखाद् दुसऱ्याला उपयोगी पडत असतो. वास्तविक हा ऋणानुबंध ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ ह्याप्रमाणे ह्याचा लाभ होत असतो. यदाकदाचित देव भेटीला आला व जर कर्मात भेट लिहिलेली असेल किंवा घडणार असेल तर हा ऋणानुबंध  देवाला भेटू न देता देवाला वाटेला लावेल. उदाहरणार्थ – आपल्याला अशी इच्छा झाली की सत्यनारायणाची पूजा आपल्या घरी आपल्या हातून घडावी. ती पूजा ‘लोक काय म्हणतील’ हे विचारात घेऊन जाहीरपणे किंवा स्वेच्छेने करीत नाही ! ह्या इतरेजनांना  घालवून न देता त्यांची प्रेमाने बोळवण करण्यासाठी साधा उपाय शास्त्राने सूचित केला आहे तो म्हणजे‘वास्तुशांत’ ! आपण राहत असलेल्या घराचे, वास्तूचे संरक्षण आपणास पाहिजे. आज आपले घर व्हावे व लोकांनी स्तुती करावी की ‘ह्याने घरदार केले’ अशी आपली इच्छा असते. घरासाठी आपण लाख दीडलाख खर्च करतो. पण एक वास्तुशांत करण्यासाठी जास्तीत जास्त खर्च ५०० रुपये येईल. ती न करता किंवा अशा वास्तूत आपण ‘शांत’ न  करता जेव्हा  राहण्यास येतो तेव्हा ‘शांती’ झाली नसल्याने, तिची बहीण ‘अशांती’ ही आपल्या वाटेला सदैव येत असते. मानवी जीवनातील ५०% दु:ख ‘निवारण’  ह्या वास्तुशांतीने व्हावयाचे असते. पण ही वास्तूची स्थापना शास्त्रोक्त होत नाही. याचप्रमाणे आपले शरीर, ह्या ठिकाणीसुध्दा वास्तु  आहे, पण ती वास्तु आपल्या आचार, विचार व उच्चार या शब्दांच्या ठायी आहे व ती सदैव शांत राहण्यासाठी नित्य साधना किंवा सेवा ही कोणी सांगितली म्हणून ती करू नये, तर ही अवस्था उत्स्फूर्त व्हावयास पाहिजे.

प्रत्येक मनुष्याला जन्माला येते वेळी ह्या पाच ऋणानुबंधाचे हितसंबंध जीवनात कमी-अधिक प्रमाणात असल्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जगण्यासाठी जी विसंगती दिसते याचे मूळ कारण कोणास न समजल्यामुळे सर्वांना एका पातळीवरती आणण्याचा प्रयत्न आज भौतिकवाद करत असूनही या भौतिकवादात मनुष्याचे जीवन एका पातळीवर येणे शक्य नाही. जीवनधारणा ज्या मूळ तत्त्वात झालेली आहे त्याची उत्पत्ती व त्याचे कारण समजणे व त्याप्रमाणे त्या जीवनाचा लाभ घेणे हे कर्तव्य फक्त पारमार्थिक जीवनात मिळू शकते. याचे कारण वरील तीन ऋणानुबंध यांची गरज जीवनात आहे व नाही. ते ऋणानुबंध जीवन जगण्यासाठी लागतात हे बरोबर आहे व शास्त्राप्रमाणे त्यांचा उहापोह वारंवार केला गेला आहे. म्हणजे ह्या ऋणानुबंधांचा जर हितसंबंध आपल्या कर्माशी अवलंबून असेल तर त्याचा विचार जीवनात करणे अत्यावश्यक आहे. त्याऐवजी जन्मप्राप्तीनंतर आपल्या जीवनाची उपपत्ती समजली तर ह्या ऋणानुबंधांची फेड ही ‘भोग’ म्हणून किंवा ‘अडथळा’ म्हणून आपल्याला भोगावी लागत नाही. उलट जन्माची फेड कर्तव्य म्हणून करावयाची असते. हा सुलभमार्ग शास्त्राने दाखविला असून डोळे झाकून जर आपण जीवन जगलो, तर आज जीवन जगण्यासाठी व त्या जीवनाचे समाधान मानण्यासाठी प्रथमतः जीवन विकसित नाही. त्यामुळे ह्या विस्कळीत जीवनाचा लाभ घेत असता त्या जीवनात सुख, शांती, समाधान आदींची प्राप्ती नुसती अपेक्षा करून होणारी नाही, यासाठी जे प्राप्त जीवन आहे त्याचा बारकाईने आपला आपणच बोध घ्यावयाचा असून ‘माझ्या जीवनात काय कमी अधिक आहे’ ? याचा विचार प्रथमतः करावा. आपल्या सभोवार मनुष्य सर्व सुखे उपभोगतो आहे हे पाहून तशी सुखे आपल्याला प्राप्त होण्याची जरी इच्छा झाली तरी त्यांची प्राप्ती ‘अनुकरण’ करून मनुष्याला कदापिही प्राप्त न होता उलट तो मनुष्य ‘कर्जबाजारी’ होत असतो.

आज प्रत्येकजण देवाधर्माचा विचार करून त्याप्रमाणे धर्माचरण करीत आहे. गतकालात खाण्यापिण्याची सुबत्ता होती. वेळही भरपूर वाट्याला येत होता. त्या काळात लोकांनी ईश्वरभक्ती व धर्माचरण काही तपांनी केले. परंतु त्याबद्दलचे यथायोग्य मार्गदर्शन न होण्यामुळे ५०-५० वर्षे साधनसेवा केली गेली, तरीसुध्दा त्या सेवेचा लाभ कुटुंबाला किंवा इतरेजनांना होऊ शकला नाही. उपासना मार्गामध्ये अचूक मार्गदर्शन होणे अत्यंत आवश्यक असते. ’गुरुमार्ग’ हा अंधश्रध्देचा मार्ग नसून सखोल अशा शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करण्याचा मार्ग आहे. जर त्याचा अभ्यास केला गेला असता तर आजची परिस्थिती पाहावयास मिळाली नसती. मनुष्य जन्म घेण्यापूर्वी फक्त कर्म अस्तित्वात असते, पण जन्मप्राप्तीनंतर कर्माव्यतिरिक्त अन्य तीन ऋणानुबंध हे आपल्या वाट्याला येत असतात. त्यांचा संबंध जीवनात आल्यावर त्या ऋणानुबंधांतील चांगले वाईट असे दोष, त्या व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. हे दोष वेळीच विचार करून त्यांचे विमोचन करणे आवश्यक असते. विमोचन ह्याचा अर्थ ‘निर्मूलन’ करावयाचे असा नसून ते ईशकृपेने आपल्याला ‘अनुकूल’ करून घ्यावयास पाहिजेत. अशा ह्या ऋणानुबंधांतील दोष ज्यांचे विमोचन न केल्यामुळे त्यांची प्रखरता इतकी वाढते की ह्या दोषामुळे घराण्यात पुढे विद्यानाश, संततीनाश, संपत्तीनाश आदींचा समावेश होऊन बघता बघता सर्वसामान्य माणसाची जीवन जगण्याची जी परिस्थिती असते ती न राहून जन्माला येऊन ‘ऋण भोगणे’ यासाठीच जन्म घेतला आहे काय, असे वाटू लागते. अशी ही साधना म्हणजे वंशविमोचन व कर्मविमोचन ही दुर्लभ असून त्यांची प्राप्ती साधकाला करण्यासाठी सर्वसंग परित्याग करावा लागतो.

गुरुमार्गामध्ये पुष्कळ लोक असे बोलताना दिसतात की, ”मी बारा वर्षे तपश्चर्या केली”. पण प्रथमतः ‘तपश्चर्या’ ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. बहुतांशी लोक आपल्या मनाने वर्षानुवर्षे जी सेवा करतात, त्या सेवेस ‘तपश्चर्या’ म्हणून संबोधत असतात. वास्तविक अशी सेवा ही तपश्चर्या नसून, ’तप’ आहे. याचा अर्थ देवाचा किंवा गुरुंचा भक्त होण्याने तो घरादाराला ‘तापत’ असतो. तपश्चर्या ह्या शब्दाचा अर्थ न कळल्यामुळे आपल्या समाजात अज्ञानाने आपण सेवेचा लाभ व्हावा अशी इच्छा प्रकट करतो. वास्तविक ‘तपश्चर्या’ म्हटल्यावर त्याचा अर्थ कळला तर ऐकणाऱ्याला  घाम सुटेल व ह्या मार्गाला तो चुकूनही जाणार नाही. ‘तपश्चर्या’ ह्याचा अर्थ “गुरुंनी आज्ञा दिल्याप्रमाणे आचरण करणे” असा आहे. माझ्या जीवनात मला तप करावयाचे नसून माझ्या माध्यमातून तपश्चर्या घडवायची होती. म्हणून श्रीक्षेत्र औदुंबर येथे प. पू. साईबाबांनी जाण्यास सांगितले. जी आज्ञा झाली तिचा लाभ भवितव्यात तुम्हा भक्तांना व्हावा म्हणून ‘ वंशविमोचन’ व ‘कर्मविमोचन’ ही साधने तेथे सिध्द केली.

जीवनारंभी अनेक लोक मार्गदर्शनार्थ मला भेटावयास येत असत. पण ती भेट व्यक्तिशः अशी होती. ह्या भेटीचा लोभ वाढेल म्हणून प. पू. हाजीबाबांनी अशी आज्ञा केली की “जे जगताला सांगावयाचे आहे त्यामध्ये व्यक्तीचा हितसंबंध असता कामा नये. त्या सेवेचे रुपांतर कार्यामध्ये व्हावयास पाहिजे व ही कार्यपध्दत प. पू. महंमद जलानी बाबा यांच्या कृपेने तू प्राप्त करून घे. ह्यासाठी तुला सेवा करणे भाग आहे. त्यांची भेट व दर्शन तू पूर्वी घेतलेले आहेस. त्यांची समाधी ही हिंदुस्थानात नसून बगदाद येथे आहे. त्यांच्या दर्शनासाठी तू गेला होतास. पण त्यावेळी तुला ध्यानीमनीसुध्दा वाटले नाही की या थोर विभूतींच्या कृपाशिर्वादाचा संबंध पुढे जीवनात येणार आहे”. त्याप्रमाणे त्या आठवड्यात माझे पारायण संपल्यावर गुरुआज्ञेप्रमाणे मामांच्या घरी गेलो असता ह्या थोर विभूतींचे आगमन (संचार अवस्थेमध्ये) मामांच्या घरी झाले. प. पू. महंमद जलानीबाबा यांनी त्यावेळी असे सांगितले की, “माझे आगमन याचा अर्थ ह्या कार्यार्थ परमेश्वराने माझी नेमणूक केली आहे. औदुंबर येथील वास्तव्याची मुदत गुरुआज्ञेने पूर्ण होईल व जेव्हा आपण आपल्या स्वगृही जाल, तिथून योग्य ते मार्गदर्शन ज्याची भवितव्यात जगाला जरूर आहे असे कार्य स्थापन करण्याची सूचना मी देईन. ह्या कार्यात महत्त्वाचा विषय ‘वंशविमोचन’ व ‘कर्मविमोचन’ हा आहे. त्याचा अभ्यास पूर्ण करून घ्यावयास पाहिजे. त्यामध्ये कोणाही व्यक्तीस शंकाकुशंका उरणार नाही; इतका हा विषय व्यापक आहे त्याचा विचार करा”. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी देव हा आहेच. पण त्याचा विचार न करता ‘पोटाशी जे कर्म आहे’, त्याचा विचार प्रत्येकजण करीत असतो. त्यामुळे आपण अभागी व अनाथ आहोत असा विचार करून परमेश्वराला शिव्या देण्याव्यतिरिक्त अन्य कार्य या जगतात कोणीही करीत नाही.

प. पू. महंमद जलानीबाबांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने ‘वंशविमोचन’  याचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा औदुंबर येथे सुरुवात केली. पूर्वी वर निवेदन केल्याप्रमाणे जे असंख्य आत्मे पिशाच्च योनीमध्ये वावरत होते त्यांना देहधारणा करता येते. पण ही पिशाच्चयोनी पंचमहाभूत तत्त्वांनी देहाची धारणा न करता आम्हा मानवांमध्ये काही अंशमात्र Ectoplasm म्हणून जे असते त्याचा वापर ही योनी करून घेऊन आपला मृतदेह हा पुन्हा साकार करण्याचा प्रयत्न करते. त्याशिवाय असे आत्मे असतात की ज्यांना आपला देह साकार करता येत नाही. हे आत्मे पिशाच्चयोनीमध्ये आपल्या सभोवार वावरत असतात. त्यांचे अस्तित्व वलयरूपाने असते. ते वलय पाहाण्याची दृष्टी आपल्याला प्राप्त न झाल्यामुळे दिसत नाही. वास्तविक ज्या व्यक्तीला बाधा झाली आहे तिची छटा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत असते व त्यामुळे हा चेहरा असतो त्याहीपेक्षा उग्र व विद्रूप असा दिसतो. तेव्हा वंशविमोचन ही साधना सिध्द करतेवेळी अशी व्हावयास पाहिजे की जे आत्मे दृष्य आहेत व जे अदृष्य  आहेत अशांनाही मुक्तता प्राप्त करून देणे हे प्रथमतः प्राप्त झाले पाहिजे. जे आत्मे आपले दिवंगत शरीर याचा भास लोकांना करून देऊन आपली मुक्तता व्हावी ह्या हेतूने इतरांच्या ठिकाणी जे Ectoplasm आहे त्याचा वापर करून आपले अस्तित्व व्यक्त करतात, त्याहीपेक्षा जे आत्मे वलयरूपाने आहेत यांची पीडा, त्रास ही समजण्यापलीकडे आहे. कारण त्यांच्या काय इच्छा वासना आहेत ह्य़ा जर देहात संचार होऊन सांगितल्या गेल्या तर त्यांच्या निवारणार्थ मार्गदर्शन करता येते. पण जे वलयरूपाने आहेत त्यांना शरीर माध्यमात प्रवेश करता येत नाही. तेव्हा वलय रूपाने ते ज्यांना पीडा करावयाची असते त्यांच्या सभोवार anticlockwise फिरत असतात. ह्या पीडेमुळे त्या मनुष्याच्या आधीव्याधी निवारण करणे हेही समजत नाही व आचार विचार याचाही दुष्परिणाम ह्या व्यक्तीवर होत असल्याने ती व्यक्ती पिशाच्चवत् बोलू चालू लागते, याचा अभ्यास संपूर्ण करणे हे भवितव्यात लोकांच्या हिताचे असून त्या साधनेची प्राप्ती म्हणजे परमेश्वराची प्राप्ती ह्याहीपेक्षा अधिक आहे असे म्हणता येईल.

मरणोत्तर जीवनानंतर जे जीवन आत्म्याला आहे ह्या जीवनाबद्दलचा अभ्यास आत्तापर्यंत कोणीही केलेला नाही. ही योनी ‘पिशाच्च योनी’ म्हणून संबोधण्यात येते. ह्याचा अर्थ असा की जो कोणी मनुष्य मेल्यानंतर त्याच्या इच्छावासना शिल्लक राहिल्या आहेत म्हणजे पिशाच्च ! तेव्हा ही योनी तर्कावर आधारली नसून तिचाही अभ्यास शास्त्र म्हणून केला पाहिजे. मनुष्य जन्माला येतो आणि मेल्यानंतर बारा दिवसांत सुतक पाळून व त्या व्यक्तीचे श्राध्दविधी करून ‘पिंडाला कावळा शिवला आहे’ असे म्हणून आपण आपली सुटका करून घेत असतो. समजा एखादा मनुष्य ५०-६० वर्षे आयुष्य व्यतीत करतो. त्यामध्ये खाणे-पिणे, कपडालत्ता, ऐषाराम ह्यामध्ये सबंध जीवनाचा समावेश करून वासनामय जीवन जगतो. त्या व्यक्तीला मरण प्राप्त झाल्यावर त्याचे विधी बारा दिवस करून केवळ कावळा पिंडाला शिवला आहे, ह्या भ्रामक कल्पनेने ह्या मनुष्याचे इहलोकी जीवन संपले असे आपण म्हणतो. परंतु प्रत्येक आत्म्याचे जीवन २५% इहलोकी असून ७५% परलोकात असते. इहलोकीचे जीवन व्यतीत करून झाल्यावर हा आत्मा मुक्त झाला असे म्हणणे चुकीचे होईल. कारण त्याला परलोकीचे जीवन आहे व हे परलोकीचे जीवन इहलोकी प्राप्त केलेले संस्कार, ज्ञान, धर्माचरण व त्यापरत्वे कर्म यावर अवलंबून असते. इहलोकात प्राप्त झालेले जे जीवन आहे त्यापैकी परोपकारार्थ किती खर्च केले यावर परलोकामधले जीवन अवलंबून असते. यामध्ये अर्थ असा की २५% हे जीवन प्राप्त झालेल्या जीवनाचा ‘उपभोग’ घ्यावयासाठी असून त्या जीवनामध्ये ज्ञान, संस्कार, धर्म, कर्म म्हणून जे जे प्राप्त केलेले असते त्या जीवनाचा लाभ ७५% घ्यावयाचा आहे व त्याचा ‘सदुपयोग’ इतरांसाठी करावयाचा आहे. पुनश्च जन्मप्राप्तीच्या वेळेला जे कर्म २५% गत आयुष्यात खर्च केलेले असते व ७५% इतरेजनांसाठी सेवा म्हणून केलेले असते असे 100% घेऊन पुनश्च जन्मप्राप्ती करावयाची असते.

असे जीवन इहलोकी हे जग जे आपल्याला दिसते त्याच्याशी २५% हितसंबंधित असून, ७५% जीवन हे पुढल्या जन्मीची ‘ठेव’ म्हणून वापरावयाचे आहे. याचा अर्थ न समजल्यामुळे आत्म्याला सद्गती किंवा मुक्ती प्राप्त झाली आहे असे समजून कैलासवासी इ. नावाने संबोधून त्या व्यक्तीचा आदर करीत असतात. पण ह्या योनी पाच लोकांमध्ये संचार अवस्थेमध्ये हिंडत असतात. प्रथमतः मरणोत्तर जीवनानंतर हा पाच लोकीचा प्रवास सुरू होत नसून परलोक व इहलोक ह्यामध्ये जी पोकळी (Vacuum) असते, त्यामध्ये आपल्या इच्छेवासनेमुळे हा आत्मा हिंडत असतो. त्यास Earth bound spirits असे म्हणतात. यातून सुटका करून घेतल्याशिवाय हा जो पाच लोकीचा प्रवास आहे त्याला आरंभ होत नाही. ह्यासाठी ह्या पाच लोकांत जी यात्रा मरणोत्तर जीवनानंतर प्रत्येक मनुष्याला प्रवास म्हणून करणे क्रमप्राप्त आहे, त्याची तरतूद इहलोकीच्या जीवनात करावयाची असते. प्राप्त जीवनात पुढील जीवनाची तरतूद व चालू जीवनामध्ये सुख-शांती-समाधान याचाही लाभ व्हावा यासाठी मोठे काही धार्मिक कृत्य किंवा प्रखर अशी साधना किंवा देवदेवतार्चन करावे लागत नाही. आपले दैनंदिन जीवन व्यतीत करत असताना निदान झोपण्यापूर्वी जर जीवनाचे ‘सिंहावलोकन’ तरी ते पुरे आहे. वास्तविक इच्छा होणे व वासना होणे हे दोन्ही धर्म देहाला आहेत. पण कोणती वासना व कोणती इच्छा ? हे काही शिकलेल्या माणसालासुध्दा समजत नाही. हे दोन शब्द यांचा अर्थ समजून त्याप्रमाणे वागल्यानंतर  इहजगतात व परलोकात काय घडले हे इतरांना किंवा गुरूमार्गामध्ये गुरुंना विचारण्याचा प्रश्न शिल्लक राहात नाही. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन इहलोकात व परलोकात हितसंबंधित असते. इहलोकात जन्म झाल्यानंतर जे कर्म भोगण्यासाठी आपल्या वाट्याला येत असते ते कर्म परलोकात असून त्या कर्माला आवाहन करावयाचे असते. ते कर्म आपण अडचणीत आहोत किंवा आपल्याला त्या कर्माची आवश्यकता आहे म्हणून आवाहनित होत नाही. कारण आपले काया, वाचा, मन हे एकरूप झाल्याशिवाय कर्म हे प्रवाहित होत नाही.

अशी जन्मप्राप्तीनंतर कर्माची ‘देवाण-घेवाण’चालू असते. त्या कर्माचे इष्टफल प्राप्त व्हावे अशी अपेक्षा धरली, तरी केवळ कर्म आहे म्हणून त्याची प्राप्ती करता येत नाही. जोपर्यंत कर्म सुलभपणे कार्यान्वित होत असते तोपर्यंत कोणीही मनुष्य ह्या जीवनात काय आहे याचा विचार करीत नाही. असे कर्म आपल्या जीवनात असून त्या कर्माला कार्य आहे परंतु ते कार्यान्वित होत नाही, याचा अर्थ अडीअडचण म्हणून विचारात घेतली जाते. पण ही अडचण जीवनामध्ये कर्मामुळे नसून कर्माचे कार्य होण्यासाठी जे माध्यम म्हणजे देह, ते विकसित नसते. त्यामुळे कर्माला  आपले फलही देहिक अवस्था अविकसित असल्याने देता येत नाही.

देहाची धारणा काया-वाचा-मनाने होत असते. पण जन्माचे कार्य होण्यासाठी ह्या तीन अवस्थेत पाच कोशांचा समावेश होत असतो — अन्नमय, प्राणमय, मनोमन, विज्ञानमय व आनंदमय. ह्या पाच कोशांपैकी जीवनात पहिले तीन कोश अन्नमय, प्राणमय व मनोमय यांनी कर्माची इष्ट क्रिया करावयाची असून केलेल्या कर्माचे जे फल प्राप्त होत असते, त्या फलात सुख, शांती, समाधान प्राप्त करावयाचे असून ती प्राप्ती विज्ञानमय व आनंदमय कोशांनी मिळवावयाची असते. ह्या दोन विज्ञानमय व आनंदमय कोशांचे कार्य जेव्हा ह्या जन्मात होऊ लागते, तेव्हाच त्या कार्याला ‘जीवन’ असे म्हणतात अन्यथा जीवन एकांगी आहे. देहाची धारणा होत असता काया-वाचा-मनाची निर्मिती ही पंचतत्त्वातून (पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश) होत असते. असा देह प्राप्त होऊन तो क्रिया करण्यास कार्यरूप होणे याला ‘चेतना’ म्हणजे देहिक शक्ति असे म्हणतात व जो आत्मा देहामध्ये आहे त्या आत्म्याची जी शक्ति देहातून कार्यान्वित होत असते, त्यास ‘आत्मिक शक्ति’ किंवा ‘चैतन्य’ असे म्हणतात. ह्या दोन शक्तींचे कार्य एकाच वेळी देहातून होत असते. हे कार्य होत असले तरी जो जन्म कर्मामुळे, वासनेमुळे किंवा आत्म्यामुळे प्राप्त होत असतो, त्यातील कार्य म्हणजे ज्या पूर्वकर्मामुळे हा जन्म प्राप्त झाला त्या कर्माची सुटका व्हावयास पाहिजे. जेव्हा देहिक शक्ति हे कार्य करीत असते तेव्हा ही क्रिया देहातून कार्यान्वित होत असली तरी त्यामध्ये देह जरी कर्म  करतो आहे, तरी त्या क्रियेला कार्य म्हणता येत नाही. ही जी क्रिया देहद्वारा होत असते व आपण जरी ‘कर्म करतो आहे’ असे म्हणतो, तरी त्या कर्मात फक्त कायेचा समावेश होत असतो. उदा :- आपल्याला तहान लागली आहे म्हणून चांदीच्या भांड्यात पाणी प्यावयाचे सोडून जर आपण चांदीच्या भांड्याचाच उपभोग घ्यायचे म्हटले तर तहान भागणार नाही. त्याप्रमाणे देह जरी जीवनभर क्रिया करीत असला तरी त्याची पूर्तता किंवा सुटका ही कर्मापासून होण्यासाठी त्या कर्मात आत्मा पूर्णतः असावयास पाहिजे. ह्याचा स्पष्ट अर्थ असा की ही क्रिया देह करतो आहे म्हणजे कर्म घडेल असे नव्हे, तर त्या कर्मात जोपर्यंत काया-वाचा-मन ह्याचा समावेश होत नाही तोपर्यंत कर्माची इच्छा किंवा वासना ही जरी देहाला झाली तरी ही इच्छावासनेची निर्मिती कर्म म्हणून जमेस धरता येत नाही.

जन्मप्राप्तीसाठी कर्माचा संचय करावयाचा असतो व पुढे ह्याच कर्माला कार्य करावयाचे असते. तेव्हा आपल्या हातून घडलेले कर्म हे घडते आहे किंवा नाही हा विचार करून जीवन व्यतीत करावयास पाहिजे. ह्याचा अर्थ ह्या जन्मात जी क्रिया करावयाची असते त्या क्रियेमध्ये विषय असावयास पाहिजे. जो विषय आपणास प्राप्त करावयाचा असतो तशी क्रिया करीत असता ती क्रिया निरासक्त बुध्दीने जर झाली तर त्या क्रियेत अंतर्भूत झालेला विषय हा आपल्या नकळत कर्माची धारणा करून घेतो. उदा :-आपण नित्याच्या जीवनात कडधान्ये पाण्यात भिजत घालतो. त्यावेळी जे धान्य भिजत ठेवतो, त्या धान्याचे बीज यास ‘मोड’ यावयास पाहिजेत. मोड न आलेल्या धान्यास ‘चाड’ असे म्हणतात. त्याप्रमाणे आपण वर्षानुवर्षे जीवन व्यतीत करतो, परंतु कर्माचा गत आयुष्यातला विषय व आजच्या जीवनात नव्याने येणारा विषय याचे साम्य न होण्याने जीवनात सुख, शांती, समाधान आदींचा लाभ आपल्याला मिळत नाही. नवीन विषयाची धारणा याचे कार्य अनुभवास येण्यासाठी वेळ लागतो. पण तिथपर्यंत त्याची वाट बघावी हे आपणास पटत नाही. म्हणून प. पू. साईबाबांनी सर्व भक्तांस हे निवेदन केले आहे की, “श्रध्दा ही एका देवावर किंवा एका तत्त्वावर ठेवा व त्याचे फल प्राप्त होण्यासाठी घाई करू नका. जे कर्म आहे त्याचा निर्णय काय आहे हे ज्ञात नाही व कर्मातील विषय हा परिचित नसल्या कारणाने तुमच्या मागण्याने कदाचित त्या कर्मात पीडा किंवा अडचणी होऊ शकतील. तेव्हा सेवा केली म्हणजे लगेच आपण कर्माचे फल मागणे हिताचे नसून त्या कर्माचे फल जेव्हा सद्गुरुंना आपल्याला द्यावयाचे असते, तेव्हा त्या कर्माचे विमोचन करून ते फल देत असतात. याचा अर्थ ‘सबुरी’ हा होय”.

जन्माला येते वेळी जीवन हे १९ माध्यमांतून व्यतीत करावयाचे असते. यापैकी पूर्वजन्मातील कर्म त्यातून सुटका होण्यासाठी ९ माध्यमे यांचा समावेश होतो व पुढील जन्माची तरतूद यासाठी राहिलेल्या ९ माध्यमांची जरूर आहे, पण ह्या ९ माध्यमांचा विकास होणे आवश्यक आहे. पहिल्या ९ माध्यमांत कर्माचा उपभोग घेतल्यामुळे जीवन विकारमय बनते. तेव्हा पुढील ९ माध्यमांचा विकास करावयाची जबाबदारी आपल्यावर आहे म्हटल्यावर राहिलेल्या ९ माध्यमांचा विकास होण्यासाठी विकार हे कमी केले पाहिजेत. या उलट सद्गुरुकृपेने परिस्थितीत बदल झाल्यावर विकार अधिक बळावतात, म्हणजेच संपूर्ण शरीर हे विकारमय होते. देहिक विकास हाण्यासाठी देहातील कोश महत्त्वाचे आहेत. पहिल्या दोन कोशात अन्न-प्राण यांचा समावेश होतो. ह्या कोशांचा गुणधर्म वासना निर्माण करणे व राहिलेले दोन कोश म्हणजे विज्ञान व आनंद यांचा धर्म इच्छा निर्माण करणे असा आहे.

वरील विवेचनावरून असे स्पष्ट होते की, प्राप्त जन्म हा भोग भोगण्यासाठी नसून जन्म घेतल्यावर जीवनाचे सार्थक व्हावे ह्या हेतूने परमेश्वराने दिलेला आहे. परंतु आपण त्याचा वापर यथार्थ करत नाही. ह्या अवस्थेला आपले अज्ञान कारणीभूत आहे.

जीवनाची संर्पूण धारणा व तिचे कार्य हे पाच कोशांवर अवलंबून आहे. जेव्हा हे कोश विकसित झालेले नसतात अशावेळी हेच कोश नरजन्माची प्राप्ती ‘कर्मपरत्वे’ करण्यास कारणीभूत होतात. या उलट हेच कोश जर विकसित झाले तर प्राप्त झालेल्या जन्माला ‘नारायण’ ही अवस्था प्राप्त करून देतात. तेव्हा या कोशांचे कार्य जीवनात किती महत्त्वाचे आहे हे साधकाने लक्षात घेतले पाहीजे.

आता सुरूवातीला  अन्नमय कोश याचा आपण विचार करू या. ह्या कोशाचे कार्य केवळ देहाचे पालन-पोषण करणे असे नसून मनुष्याला जगण्यासाठी म्हणून जे जे विषय लागत असतात त्या सर्वांचा समावेश ह्या अन्नमय कोशात होत असतो. ही जाणीव हा कोश ‘भूक’ ह्या क्रियेद्वारे मनुष्याला देऊन त्याला जागे करीत असतो. पण व्यवहारात आपण ‘भूक’ याचा वापर म्हणजे ज्या अन्नाची कमतरता शरीरात निर्माण झाली ते अन्न व पाणी याची भूक अशी अवस्था शरीरात निर्माण करतो. परंतु बाकी अन्य विषयांची गरजही शरीराला आहे तिला ‘भाक’ असे म्हणतात. पण ही आपल्याला ऐकू न येण्यामुळे फक्त भूक लागली आहे एवढीच जाणीव होत असते. ‘भाक’ हा गुणधर्म बुध्दीचा आहे. ती जाणीव आनंदमय कोशातून होत असते. पण त्यामध्ये बुध्दीचा अंतर्भाव होत असतो. याचा अर्थ ‘भाक’ निर्माण होण्याने आपण सज्ञानी होऊ शकतो व ह्याचा लाभ जीवनात घेणे अत्यावश्यक आहे. ह्या जन्मात कर्माने आपल्याला अन्न जसे दिले आहे त्यात इतरांचाही वाटा आहे व तो योग्य तऱ्हेने दिला गेला पाहिजे.

दुसरा कोश प्राणमय :- हा कोश आपल्या ठिकाणी धारण झालेला आहे. परंतु त्याचे कार्य एकांगी नसून त्या कोशाचे कार्य मूळ कोश म्हणजे आत्मा ह्या ठिकाणी असून तो आत्मा ‘चैतन्यमय’ असतो व बाकी कोशांना कार्यार्थ ‘चेतना’ निर्माण करून देत असतो. हे कार्य आपल्या न कळत दिवसरात्र होत असते. त्याचे कार्य म्हणजे प्राप्त झालेल्या जन्माचेच कार्य करावयाचे असे नाही. हा कोश प्राप्त होणे याचा अर्थ जेव्हा मनुष्याची उक्रांती होते तेव्हा संपूर्ण शरीरात ८४ लक्ष योनी धारण होत असतात व त्या योनीद्वारा मानवी जन्माचे कार्य करावयाचे असते. तेव्हा ह्या ८४ लक्ष योनी (organs) विकसित करणे हा आम्हा मानवांचा धर्म आहे. ह्या कोशांच्या माध्यमातून संपूर्ण शरीरभर कार्य चालू असते. ह्या माध्यमाचा वापर आपणासाठी नसून इतरांसाठी  आहे व त्याचा विनियोग दया, क्षमा, शांती यासाठी करावयाचा असतो. ह्या जगात आपणास मानवी जन्म प्राप्त झाला आहे म्हटल्यावर ‘मानव’ या सारखे वागून आपल्या सभोवार इतर जीवन जगतात, त्यांचा ‘मान’ ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. ह्यासाठी हा प्राण म्हणजे आत्मा आपल्या हातून काहीतरी सत्कृत्य जन्मप्राप्तीनंतर घडावे म्हणून जन्माला  येण्यासाठी उत्सुक असतो व शेवटी अंताच्या वेळी हा प्राण मूळ तत्त्वात येतो. पण जर काही कारणामुळे वासना शिल्लक राहिली असली तर ती वासना पूर्ण होईतोपर्यंत गती प्राप्त होत नाही.

तिसरा कोश मनोमय :- या कोशातून जे कार्य आज होते ते म्हणजे अट्टाहास. ‘जगाने आपल्या मनाप्रमाणे करावे’ असा वापर आपण ह्या कोशाचा करीत असतो. वास्तविक हा कोश ह्या जन्मात प्राप्त होणे हे दुर्लभ असून हा कोश विकसित झाल्यावर सदैव त्याच्या ध्यानी-मनी असे विचार वास करावयास पाहिजेत की, ‘जे कां रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले’. अशाप्रमाणे जो मनुष्य बोलण्यात-चालण्यात वागत असतो त्याची प्राप्ती ही भूषणावह असून ह्या कोशाचा विकास झाल्यावर आपल्या नकळत ज्या क्रिया काया, वाचा, मनाने घडतात त्यालाच “सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे”, असे म्हणतात. हा लाभ क्षणिक विषयाने जो आनंद प्राप्त होतो त्या प्राप्तीपेक्षा कितीतरी पटीने मोठा असून हा होणारा आनंद संपूर्ण काया-वाचा-मनाच्या ठिकाणी प्राप्त होतो. ह्या अवस्थेलाच ‘सच्चिदानंद’ असे म्हटले आहे

चौथा कोश विज्ञानमय कोश :- जगात ‘ज्ञान’ ही एक अवस्था असून त्याची प्राप्ती बोध म्हणून घ्यावयाची असते. ह्या विज्ञानमय कोशाचा संबंध मोठा मेंदू व लहान मेंदूशी असतो. दोन्ही मेंदूंचे कार्य शरीरात ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांच्याशी आहे. शरीराला स्पर्श होण्यापासून एखादा आवाज आपण जो ऐकतो त्याचे ज्ञान ह्या माध्यमातून होते. आता आपली देहिक माध्यमे म्हणजे पंचकर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिये ही  यथोचित कार्य करीत असतात, म्हणून ह्या कोशाचे अस्तित्व समजत नाही, पण एखादा अंधळा किंवा बहिरा-मुका ह्या व्यक्तींना होणारी जाणीव विज्ञानमय कोशामुळे होत असते. एका इंद्रियाची त्यांना कमतरता आहे, पण देहातील दुसरी अवस्था ही कार्य करीत असतात व ‘शोध’ म्हणून त्यांचे कार्य जीवनात चालू असते. हे कार्य आपल्या नकळत होते. नाहीतर आपण पेढ्याच्या ऐवजी विष खाल्ले असते. विषारी पदार्थ किंवा रानटी फळे ज्यांचे ज्ञान आपल्याला नाही, ते आपण भक्षण करीत नाही. हे तारतम्य कशाने कळते ? ‘शोध’ ही अवस्था अतिसूक्ष्म आहे व ती अवस्था देहात आहे म्हणून आपल्याला जगता येते. रोजच्या जीवनचर्येत सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंतचा काळ ह्या कोशावर अवलंबून आहे. जीवनामध्ये आपण जडवादी तत्त्वाचा उपभोग घेत असतो. त्यामुळे ईश्वरापर्यंत पोचणे किंवा देव आहे किंवा नाही ह्या वादात आयुष्य फुकट घालवितो. जसे डोळे बंद केले तर जग अंधारात आहे असे वाटते, त्याप्रमाणे हा कोश विकसित नसल्यामुळे जगाचा केवळ भास होतो. जेव्हा विज्ञानमय व आनंदमय ह्या कोशांचा लाभ आपण घेऊ शकू, त्यावेळी जग हे नश्वर आहे असे न म्हणता जे जग आपल्याला दिसते आहे तोच ईश्वर आहे असे आपण म्हणू लागू.

पूर्वी आपल्या पूजनादि विधींमध्ये देवाच्या मूर्ती, टाक, फोटो आदी पूजनार्थ होते. पण पूजन करणे म्हणजे काय करणे ह्याचा अर्थ न समजल्याने अनर्थ ओढवला. ह्याला कारण देव नसून आपण आहोत. देवाने जन्म देते वेळी लाख मोलाची माध्यमे न मागता दिली. त्यांची किंमत ‘लाख रूपयांपेक्षा’ जास्त आहे, पण लाख रूपये आहेत कोठे असे आपण मानू लागलो. प्राप्त जीवनाची किंमत लाखो रूपये आहे. पण जे समजू शकलो नाही, त्यामुळे जीवन प्राप्त होऊनसुध्दा वाट्याला शेवटी ‘राख’ येत असते. आपल्यासमोर जे जग आपल्याला दिसते ते जग दृष्य आहे व अदृष्यही आहे. ही दुसरी बाजू आपल्याला अवगत होत नाही व दृष्य बाजूच आपल्याला दिसते. त्यामुळे समोरचा मनुष्य आपल्या फसवत आहे हे मागाहून कळते. त्यावेळीच आपल्याला ईश्वर कसा सांभाळत आहे हेही कळते. घरात दोन मुले असूनही त्यांचा सांभाळ नीटनेटका करणे आपल्याला जमत नाही ! पूर्वी माझी श्रध्दा देव हा आपल्या सारखाच सगुण स्वरूपामध्ये दिसेल अशी होती. पण काही अनुभवामुळे देवाचे निर्गुण अस्तित्व समजले. जसा वारा वाहतो व आपल्याला जाणीव होते, त्याप्रमाणे वातावरणात आपल्या साधनेतून ज्या लहरी निर्माण होतात व त्यामुळे जो नाद होतो त्याचा अर्थ ‘ईश्वर’ !  त्याची प्राप्ती, केवळ पूजन अर्चन करून होत नाही किंवा तो भेटत नाही. ही प्राप्ती मनोमय व विज्ञानमय कोशांच्या विकासावर अवलंबून आहे.

पाचवा कोश आनंदमय कोश :- याचा अर्थ अगदी सोपा आहे, त्यासाठी वेदांत किंवा तत्त्वज्ञान सांगून चालणार नाही. रोजच्या व्यवहारामध्ये रोजचे जीवन “शेवट गोड करी, मनुजा”, असा बोध आहे. शेवटच्या क्षणाला आत्मा ज्या अवस्थेमध्ये परलोकात गमन करतो त्यावेळी जर ती व्यक्ती ‘वा. के. खा.’ (वासरू केरसुणी खातंय) मध्ये गुंतली असली, तर जन्मभर देवापुढे बसून तरी काय करणार ? रोजचे जीवन आपण जगतो पण ह्या कोशाचा वापर न करण्यामुळे आपण दु:खी होत असतो. रोज सकाळी, दुपारी आपण जेवणास बसतो, त्यावेळी आपल्या समोर जे ताट वाढलेले असते. त्यावेळी एक क्षण स्वतःला विचारा की, “आत्ता ह्यावेळी इतके चांगले जेवण जगात किती लोकांना मिळत आहे ?” ह्याचे उत्तर तुम्हीच सांगू शकाल की, ‘मीच भाग्यवान’. केवळ अज्ञानाने कर्माला शिव्या देणे योग्य नाही. कर्माला शिव्या जरूर द्या. पण ज्या कर्माचा उच्चार करतो आहोत, त्याला खरोखरीच शिवलात का ? का दुसऱ्याचे सुख पाहून स्वतःच्या कर्माला नावे ठेवता ? कर्म काय आहे याचा अर्थ अनेक जन्म घेऊनही समजणार नाही. फक्त तुमचे कर्म समजण्या अगोदर तुमचे वर्म काय आहे हे देवाला व गुरुंना समजते. त्याआधी कर्मामुळे जन्म प्राप्त झाला, तो जन्म कशासाठी आहे व कोणासाठी आहे हे स्वतःला विचारा. आपल्याला कोणीच देत नाही. कारण हा कोश सदैव चांगली इच्छा करणारा आहे, म्हणजे सदैव “तथास्तु तथास्तु” असे म्हणत असतो. कारण जेवतेवेळी तो म्हणत असतो “उदर भरण नोहे, जाणीजे यज्ञकर्म”, अशाप्रमाणे तुम्ही वागावे व स्वतःला आनंद प्राप्त करून इतरानांही आनंद द्यावयासाठी ‘आनंदमय कोश’ धारण झाला आहे.

गुरुमार्गात आतापर्यंत हे विषय कोणी अभ्यासासाठी घेतले असतील किंवा नाही ही एक समस्या आहे. कारण हा विषय एवढा सखोल आहे की, विषय धरावा तर आवरत नाही व सोडून दिला तर साधनेत काही अर्थ उरत नाही ! तर ह्या विषयाची गाठभेट व्हावी कशी ? एखाद्या शास्त्राचा जेव्हा कोणी अभ्यास करतो त्यासाठी प्रयोगशाळा निवडावी लागते व आपला प्रयोग सिध्द झाला की त्याचे अनुमान काढावे लागते की पुढे काय निर्णय घ्यावा ? आयुष्यातला बहुमोल वेळ खर्च होऊ लागला व जगतात लोकांना अडचणी निर्माण होऊन लोक दु:खी होतात हे सभोवार मी पाहिले होते एवढेच नसून जगताला जे मार्गदर्शन करतात त्या साधक वर्गासाठी तासंतास आणि दिवस मी खर्च केले. ह्या साधकाकडे अडीअडचण घेऊन कोणी आले त्याला, “तुला करणी केली” किंवा “देवाचा शाप आहे” “म्हणून सुख लागत नाही” हे उत्तर त्यांचेकडून मिळत असे. येणाऱ्या लोकांत बहुसंख्य लोक करणीने पीडित आहेत असे सांगितले जात होते. परंतु ‘करणी’ म्हणजे काय व ती करणी कशी निवारण करावयाची ह्याचे उत्तर नाही, अशी परिस्थिती होती. आलेल्यांना सुख मिळावे, ह्याऐवजी हे साधक म्हणा बाधक म्हणा ह्यांचा गल्ला दर आठवड्यात भरतो आहे, पण कमी नाही  असे पाहावयास मिळाले. जे लोक नडलेले आहेत त्यांच्याकडून हे लोक इतक्या पैशाची मागणी करतात की तो मनुष्य भयभीत होऊन घरातील दाग-दागिने मोडून ह्या लोकांच्या नादी लागतो हे मी स्वतः पाहिले. जेव्हा ह्या मार्गाचा आरंभ गुरुआज्ञेने केला तेव्हा हा अभ्यास परिपूर्ण होता की येणारे दु:ख यांचे निवारण करता येते, नुसते ‘करणी केली’ असे सांगून दु:ख दूर होत नाही. लोक जे दु:खात असतात, त्यांचे दु:खाचे कारण काय व त्यासाठी ‘निराकरण’ काय हे समजले पाहीजे व ते शास्त्रशुध्द असावयास पाहिजे. त्याचे नुसते ज्ञान होऊन चालत नाही तर प्रत्यक्ष अनुभूती यावयास पाहिजे म्हणून जी मी ‘प्रयोगशाळा’ लिहिली त्याचा अर्थ असा की, एखादा सिध्दांत सिध्द करणाऱ्याला त्याची अनुभूती आपण स्वतः घ्यावी लागते व मग सिध्द, सिध्दांत, साधना हिचा उपयोग दुसऱ्यासाठी करावयाचा असतो. ह्या साधनपध्दतीमध्ये दुसऱ्यांच्या आयुष्याशी खेळ खेळावा  लागतो. त्यामुळे सिध्दांत यशस्वी झाला तर बरे नाहीतर सिध्द करण्याचे साधनच आपल्या नाशाला कारणीभूत होत असते. आज तुम्ही सर्वजण ‘सेवक’ ह्या अवस्थेप्रत पोचले नसताना, तुमच्या माध्यमाचा लाभ इतरांना होत आहे त्याचा अर्थ असा की तुम्ही, जे दु:खी आहेत त्यांना जे निराकरण सूचित करता त्यामध्ये ‘निराकरण’ हे सिध्द असून त्याचे कार्य गुरुशक्तीने होत असते. ह्या निराकरणांची प्राप्ती नुसते नामस्मरण करून किंवा गुरुचरित्र वाचून अथवा अन्य सेवा करून होत नाही व ह्या दु:खासाठी केवळ ‘निराकरण’ सुचवून चालत नाही, तर ‘निवारण’ करता यावे लागते. ‘निवारण’ ही अवस्था अशी आहे की आपण जी साधना करीत असतो त्याचा ‘वाटा’ इतरांना सुख लागावे म्हणून द्यावा लागतो. काही वेळा जो कोणी दु:खी म्हणून आलेला आहे, त्याचे दु:ख ‘निवारण’ होण्यासाठी तुम्ही करीत असलेली साधना ही जर बारा वर्षांची असेल तर ते दु:ख ही साधना घेऊन जाते. म्हणून प्रथमतः जी ‘सेवा’ आपल्याला करावयाची आहे ती सेवा आपल्या नामीतत्त्वाला मान्य असावी लागते. यासाठी जी सेवा आपल्याला करावयाची असते, तत्पूर्वी त्या विषयाला अनुरूप असा संकल्प  करावा लागतो व तो संकल्प सिध्द करावा लागतो. म्हणजे दु:ख निवारणार्थ सिध्द संकल्पाचा वापर करून आपली साधनेची बचत करावी लागते. ह्या साधनेच्या आरंभी प. पू. बाबांची आज्ञा अशी होती की प्रथम ज्ञान करून घे व नंतर साधना. त्याप्रमाणे वंशविमोचन, कर्मविमोचन यामध्ये जीवनाची प्राप्ती कशी होते, जीवन कसे अविकसित असते व पुढे साधनामार्गातून कसे विकसित करावयाचे असते याचे अमृत बोधरूपाने प्राप्त झाले.

इहजगतामध्ये जीवन प्राप्त झाल्यावर बऱ्याच लोकांना असे वाटते की पारमार्थिक जीवनाचा लाभ व्हावा आणि जीवनाचे सार्थक व्हावे. अशी आकांक्षा मनाशी धरून बहुतांशी लोक गुरुमार्गाचा अवलंब करावा ह्या इच्छेने गुरुंचा शोध चालू असतो. पण शेवटी हा मार्ग काय आहे हे न समजल्यामुळे गुरुंचा शोध घेता घेता किंवा योग्य गुरु न सापडल्यामुळे हे बहुतांशी लोक ‘शोष’ पडून ह्या मार्गाचा नाद सोडून देतात. याचे कारण ऐहिक जीवन हे प्रापंचिक जीवन असून त्या जीवनातील इष्ट कर्तव्ये पार पाडल्याशिवाय पारमार्थिक जीवनाचा आरंभ होऊ शकत नाही. या जीवनामध्ये जशी जशी जन्माला येण्याची कर्तव्ये आपण पार पाडत जातो तसे तसे न कळत पारमार्थिक जीवनाच्या आपण जवळ जात असतो. या पारमार्थिक जीवनात ज्या देवदेवतांचा समावेश शास्त्राने केला आहे, त्या इष्ट देवदेवतांच्या कृपेस पात्र व्हावे लागते. ही पात्रता आपल्या ठिकाणी आल्यावर ह्याच देवदेवता आपणाला गुरु शोधून देत असतात. परंतु गुरुमार्ग हा ऐहिक सुखाचा मार्ग नसून पारमार्थिक मार्गाची शिकवण देण्यासाठी आहे हे न समजल्यामुळे आपण गुरुमार्गी होतो. पण शेवटच्या क्षणापर्यंत ‘आणा’ हा शब्द संपत नाही. त्यामुळे पारमार्थिक जीवनाचा लाभ झाल्यावर हा ‘आणा’ शब्द कमी करून ‘जैसे ठेवियले अनंते, तैसेची राहावे’, या वचनाप्रमाणे समाधान मानून राहावे लागते. जेव्हा अशी परिस्थिती येते की, मागूनसुध्दा मिळत नाही मग प्रत्येकाला हेच म्हणावे लागते की, ‘ठेविले अनंते, तैसेची राहावे’. पण तसे म्हणण्यापेक्षा समाधानानेच जर हे म्हटले तर जीवनाचे सार्थक झाले असे म्हणता येईल.

जीवनारंभी मलासुध्दा आपल्यासारखीच गुरुमार्गाची शिकवण मिळावी अशी आंतरिक इच्छा तीव्रतेने जाणीव देत होती. दरवर्षी नित्यनियमाने येणारी गुरुपौर्णिमा हिचे पूजन हा एक विधी आहे. पण हे अनेक ज्ञानी विद्वान लोक विसरतात. हा विधी करावयाचा असून, हा सोहळा नाही हे न कळल्याने बहुतेक साधक सबंध वर्षाची वाट पाहात बसतात, की माझे शिष्य ह्या दिवशी येऊन औपचारिकरीत्या ‘गुरुदक्षिणा’ ही अर्पण करतील व आपण त्या दक्षिणेचा स्वीकार करू. गुरुपौर्णिमेचा विधी हा शास्त्रीय पध्दतीने केला गेला पाहिजे. नाहीतर केव्हाही ‘गुरु करता येतो’ असे नाही. हा विधी होमहवनयुक्त करावा लागतो. ज्या देवदेवतांच्या आशीर्वादाची फलप्राप्ती करावयाची असते, त्या देवतांना आवाहन व स्थापना करून, त्यांना उद्देशून हवन करावे लागते. या दिवशी जो  गुरुमंत्र भक्तांना द्यावयाचा असतो, तो मंत्र गुरुंनी सिध्द केलेला असावा लागतो. यासाठी गुरुंनी १२ वर्षेपर्यंत दररोज ह्या मंत्राचे पुरश्चरण निदान ११०० वेळा केलेले असावे लागते. गुरुपौर्णिमेस वर्षभर केलेल्या मंत्रसंख्येचे  १/१० हवन करून मग ह्या मंत्राची दीक्षा भक्तांना देऊन मकर संक्रांतीपर्यंत भक्तांनी खाण्यातील एक फळ सोडावे लागते. मकर संक्रांतीच्या दिवशी जो पुण्यकाल असतो, त्यावेळी पुन्हा भक्तांनी घेतलेल्या मंत्राचे हवन तीळ व तूप ह्या आहुतींनी करावे लागते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्य कर्केला असतो व मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रमण होऊन सूर्य मकर राशीला जातो. म्हणजे गुरुपौर्णिमेला जो विधी केला, त्याची सांगता संक्रातीला होते. गुरुपौर्णिमेचे हवन भक्तांचे काया-वाचा-मन म्हणजे ‘जीव’ ह्या अवस्थेला उद्देशून असते व संक्रांतीचे हवन ‘शिव’ (आत्मा) अवस्थेला उद्देशून असते. अशा तऱ्हेने हा विधी शास्त्रोक्त पध्दतीने केला तरच जीव हा गुरुकृपेने शिवरूप होतो. अन्यथा ‘गुरुपौर्णिमा’ हा विधी न होता, समारंभ होतो.

मला आरंभी असे वाटायचे की, आपणही गुरुमार्गाचा अवलंब करावा. पण एका वर्षी गुरुपौर्णिमेचे दिवशी पहाटे मला स्वप्नात आज्ञा झाली की, “तुझे गुरु ह्या जगतात जन्माला आले नाहीत. तेव्हा गुरुंचा शोध घेऊ नकोस. आज गुरुपौर्णिमा आहे. तेव्हा सायंकाळी तू श्रीभैरवनाथ यांचेकडे ये. तेथे ‘गुरु’ ह्याचा सविस्तर अर्थ तुला समजेल”. त्या दिवशी पाऊस पडत होता. तरीसुध्दा मी नेहमीप्रमाणे डोंगरावर श्रीभैरवनाथांच्या देवळात जाऊन स्नान वगैरे झाल्यावर श्रीभैरवनाथांची पूजाअर्चा केली व मनोभावनेने प्रार्थना करून काही ध्वनि ऐकू येतो आहे का याची एकाग्रचित्ताने मूर्तीसमोर डोळे बंद करून वाट पाहात बसलो. त्यावेळी पूर्वीप्रमाणे ॐ कार म्हणण्याचा ‘नाद’ मला ऐकू येऊ लागला. त्याप्रमाणे मी ही म्हणू लागलो. हळू हळू पाच स्थानातून हा ॐ कार श्रीभैरवनाथांनी माझ्याकडून म्हणवून घेतला. त्यानंतर शब्द ऐकू आले, “जो ॐ कार तू आज म्हटला आहेस तो पाच स्थानातून म्हणावयाचा असून त्या स्थानातून ‘स्वर’ अशी संथा म्हणावयास पाहिजे. पुढे हा स्वर, ह्या स्थानातून न उच्चारता पाचही स्थाने सिध्द झाली म्हणजे एक सूर म्हणावा लागतो. त्यावेळी जो ‘सूर’ वाणीतून उच्चारला जातो, तो उच्चार नसून स्वरांचे रूपांतर ‘निनाद’ मध्ये होते म्हणजे हा नाद ‘सिंहनाद’ असा होतो. ही ओळख ब्रह्मांडाची आहे. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपल्याला वाचा ही गर्भावस्थेत दिलेली असते. पण उच्चार करता येत नाही. तेव्हा डॉक्टर किंवा सुईण त्या बाळाला उलटा करून त्याच्या ढुंगणावर थापट मारत असतात. त्यामुळे ते बालक प्रथमतः वाणीने जो उच्चार करते त्याचा अर्थ ‘ॐ कार’ असाच आहे, पण त्या ॐ कारात तीन तत्त्वांपैकी उत्पत्ती तत्त्व ह्याला आरंभ होतो. आज जो ‘सिंहनाद’ तू ऐकला आहेस याचा अर्थ ॐ काराची साधना पूर्ण झाली असे म्हणावे लागते. भवितव्यात जगाला तारणारा एकच मार्ग, एकच मंत्र व एकत्र तंत्र आहे. ह्या मंत्रांची त्रिपुटी असून पुढे चौथी अवस्था तुला भवितव्यात प्राप्त करावयाची आहे. तेव्हा प्रयत्नांची केवढी पराकाष्ठा करावयास पाहिजे, हे मनाशी ओळखून पुढे चल. ’प्रकाश’ म्हणजे ज्ञान. ते देणारे तुझ्या पाठीशी आहेत. आजपासून हा कार्यारंभ कर. तो सिध्द होण्यासाठी सबंध आयुष्य जरी पुरले नाही तरी हरकत नाही. जेवढे आपल्या वाट्याला येईल, तेवढे ज्ञान जगाला देऊन ज्ञानी कर. पण माघार घेऊ नकोस. पुढचे मार्गदर्शन ज्यांच्या नावाने तुला वडिलांनी ‘फकीर’ केला आहे तेच तुला सांगतील. तेथपर्यंत तुला गुरु नाहीत असे म्हणू नकोस. गुरुच तुझा शोध घेत येतील. असा सुमंगल क्षण आयुष्यात येईल. आज पाच स्थानातून केलेला ॐ कार ही भवितव्यात होणारी ‘आकाशवाणी’ असेल व त्या दिवसाची तू व तुझे सहकारी वाट पाहाल. पण एक लक्षात ठेव. ॐ कार ही साधना भक्तांची संख्या वाढवण्यासाठी तिची सक्ती न करता, ज्यांना ईश्वराबद्दल गोडी लागली आहे त्यांनाच हा महामंत्र भक्ती स्वरूपात दे. पण कोणालाही ‘भक्त’ न संबोधता ‘सेवक’ म्हण, म्हणजे पुढील कार्य हे जगाच्या अंतापर्यंत चालू राहील. तथास्तु !”.

पुढे माझे वास्तव्य श्रीक्षेत्र औदुंबर येथे असताना मार्गदर्शनाप्रमाणे सेवा चालू असता त्यादिवशी गुरुपौर्णिमा होती. पहाटेपासून पूजा-अर्चा-पारायण चालू होते. या दिवशी इच्छा अशी झाली की, काही उपदेश ग्रहण करावा व तशी प्रार्थना मी श्रीदत्तगुरुंना केली असता, “आज रात्री बारा वाजता परमपूज्य हाजीमलंगबाबा हे ‘मुलाखत’ घेणार आहेत. तेव्हा तुझी इच्छा ते पूर्ण करतील” असे शब्द ऐकू आले. ‘मुलाखत’ हा शब्द तेव्हा प्रथम ऐकला. अनेक लोक निरूपण, पुराण, कीर्तन आदी नावे उच्चारतात व श्रोत्यांना काही उपदेशपर बोध सांगत असतात. पण ‘मुलाखत’ हा शब्द मला परिचित नसल्यामुळे त्या शब्दाचा अर्थ समजला नाही. शेवटी प. पू. हाजीमलंगबाबांचे शब्द ऐकू येऊ लागले. या मुलाखतीमध्ये विषय असा होता की, “गुरुमार्ग म्हणजे काय व त्याची प्राप्ती कोणाला करता येते ?”. हा विषय त्या दिवशी सांगण्यासाठी त्यांनी घेतला. प्रथमतः ‘मुलाखत’ या शब्दाचा अर्थ असा की, साधकाला साधना करीत असता जी अनुभूती येते तोच स्वानुभव आपल्या भक्तगणांना निवेदन करणे. त्यामध्ये अतिशयोक्ती असून चालणार नाही. जे जे काही सांगावयाचे असते त्याचा अनुभव हा पूर्णपणे म्हणजे १००% न सांगता ७५% समजेल, अशा रीतीने सांगून त्याचे कार्य जीवनात होईल असे घडावयास पाहिजे. नुसत्या शंकाकुशंका वाढीस लागतील असे संभाषण करू नये. याचा अर्थ मुलाखत ! म्हणजे प्रत्यक्षात ती ऐकत असताना परमेश्वर आपल्यासमोर उभा आहे असे वाटावयास पाहिजे. ही अनुभूती सांगत असताना मोठे मोठे शब्द उच्चारले गेले म्हणजे साधकाला ज्ञान होते असे नाही. तर सांगत असताना शब्द सर्वसामान्य माणसाला समजतील असे बोलावे. पण त्यात जिव्हाळा, प्रेम, आपलेपणा असावयास पाहिजे. ‘नाहीतर एकादशीच्या घरी भिकारी गेला आणि दोघांना उपास घडला !’ असे निरूपण करून चालणार नाही !

आता मुख्य विषयाला आपण सुरुवात करु या. वर सांगितल्याप्रमाणे गुरुमार्ग हा पारमार्थिक मार्ग आहे. याची भूक किती लोकांना या जगतामध्यें लागली आहे ? त्यांचा शोध गुरुप्राप्ती होण्यासाठी आहे किंवा नाही ? याची खात्री व्हावयास पाहिजे. कारण केवळ ऐहिक जीवनाचा लाभ घेत असता काही सुखांची कमतरता झाली की मग मनुष्य देवाच्या व गुरुंच्या मागे लागतो. पण अनेक गुरु आपले कर्तव्य विसरून गुरु बनतात. ह्यासाठी “आपणा सारिखे करिती तात्काळ” ह्या वचनाप्रमाणे ऐहिक प्राप्तीच्या अभिलाषेने जरी भक्त गुरुंना भेटावयास आले तरी हे गुरुंना समजावयास पाहिजे की ही भेट केवळ ऐहिक सुख प्राप्त होण्यासाठी झालेली नाही. भेटणारी व्यक्ती  हिला ज्ञान नाही, परंतु गुरुंना हे समजले पाहिजे की ही भेट साधी नाही तर ही भेट ‘गांठभेट’आहे. ‘गाठ’ ही अवस्था परलोकाची असून, ‘भेट’ ही अवस्था इहलोकाची आहे. म्हणून भेटीला येणाऱ्या व्यक्तीला आमिष दाखवून ‘वाटेला न लावता’ त्या व्यक्तीला वाट दाखवावी व पुढे हळूहळू त्याला गुरुमार्गाची गोडी लागेपर्यंत आपण सबूरी ठेवावी, यासाठी गाठ पडली आहे असे जाणावे.

पारमार्थिक मार्ग व गुरुमार्ग हे दोन भिन्न असून प्रथम अवस्थेमध्ये पारमार्थिक अवस्था प्राप्त करून घ्यावयाची असते. जे प्राप्त जीवन आहे त्या जीवनाला ‘परम-अर्थ’ आहे ! जन्म केवळ खाण्यापिण्यात खर्च न करता हा जन्म सत्कारणी लागावा अशी इच्छा निर्माण होणे म्हणजे ‘परमार्थ’. ह्या जीवनाचे सत्कार्य आपणाला समजत नाही. म्हणून ज्याचा उपयोग इतरांसाठी करावयाचा आहे ते ‘जन्म-कारण’ गुरुमार्गात समजते. यासाठी गुरुमार्गामध्ये गुरु सांगतील ती आज्ञा समजून त्याप्रमाणेच आचार, विचार, उच्चार याप्रमाणे वागावे लागते. याचा अर्थ “Do and Die and not question why !

अशा परिस्थितीत अनेक लोक गाठी-भेटीसाठी येऊ लागतात. तसे मला पण भेटण्यास येत होते. परंतु साधना करीत असते वेळी जरी साधना सिध्द झाली तरी इतरांना दीक्षा, कृपा, अनुग्रह करणे किंवा येता जाता नमस्कार करून घेणे याहीपेक्षा एक लोभ आवरला पाहिजे तो म्हणजे कोणी भक्तांनी पैसे किंवा गुरुदक्षिणा ही ऐच्छिक म्हणून जरी दिली तरी त्याचा बारा वर्षे स्वीकार करता कामा नये. हे ‘बारा वर्षे’ बंधन कां आहे ? तर दरवर्षी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे तीन ऋतू आपण सृष्टीमध्ये पाहात असतो. ह्या तिन्ही काळात तीन तत्त्वे — उत्पत्ती, स्थिती, लय ही कार्य करीत असतात. अशा तीन स्थितीतून दरवर्षी जर आपली साधना सिध्द झाली तर ती ‘सदृढ’ होण्यासाठी बारा वर्षे लागतात. ज्याप्रमाणे मनुष्य जन्मानंतर वय वर्षे बारा ही अवस्था ‘सज्ञान’ होण्याची असते, त्याप्रमाणे साधकाला आपल्या साधनेचा लाभ इतरांना देण्यासाठी ती ‘सदृढ’ होणे आवश्यक आहे. वय वर्षे बारापर्यंत मनुष्याच्या शरीराच्या घटकांची निर्मिती पूर्ण होते. तसेच बारा वर्षांच्या साधनेत साधना सिध्द होत असते. तरच त्या साधनेचा लाभ इतरांना देता येतो.

यापुढे जे कोणी दीक्षा घेण्यासाठी येतील त्यावेळी त्या व्यक्तिचे ‘विमोचन’ करणे आवश्यक आहे. जन्माला आल्यानंतर मनुष्य पाच ऋणानुबंध घेऊन येतो. पण जातेवेळी फक्त आत्मा + कर्म हे घेऊन जात असतो, तीच अवस्था जन्माला येण्यापूर्वीही असते. मध्यंतरीच्या काळात तीन ऋणानुबंधांचे जर विमोचन केले नसेल तर आपण करीत असलेली कृपा ही आत्म्याला न मिळता ती कृपा ह्या ऋणानुबंधांना अधिक प्रखर होण्यास कारणीभूत होते. यासाठी गुरुमाध्यमाला हे समजणे आवश्यक आहे की दीक्षा घेणाऱ्या भक्ताचे विमोचन होणे अत्यावश्यक आहे. तोपर्यंत जरी दीक्षा घेतली असली तरी ज्या दीक्षेचा उच्चार तो करत असतो तिचा कृपा म्हणून तो स्वीकार करता होत नाही. जी प्रार्थना दीक्षांत विधीच्या वेळी दिली जाते, त्यावेळी दीक्षा घेणारा जो कोणी असतो त्याचे ऋणानुबंध कमी केल्याशिवाय ह्या दीक्षेचा लाभ होत नाही. म्हणून हा विधी दीक्षा म्हणून होत असला तरी तुमच्याबाबतीत ती ‘शिक्षा’ होऊ शकेल. कारण ह्या ऋणानुबंधांचे ऋण एवढे असते की एकवेळ आपला जन्म फुकट गेला तरी हे ऋणानुबंध कोणालाही फेडता येत नाहीत. तेव्हा आपण दीक्षा घेतली आहे म्हणजे कृपेला पात्र झालो आहोत, असे नसून ती शिक्षा विमोचनासाठी आहे. ज्यावेळी तुमचे विमोचन होते व ज्यावेळी फक्त आत्मा आणि कर्म शिल्लक राहते, त्यावेळी दीक्षा म्हणजे आशीर्वाद याची प्राप्ती झाली असे म्हणता येईल.

देहिक माध्यम हे तीन माध्यमांतून दैनंदिन जीवनात कार्य करीत  असते. ती तीन माध्यमे म्हणजे काया-वाचा आणि मन. दीक्षा ज्यावेळी द्यावयाची असते, तेव्हा ऋणानुबंधाची वलये ही कायेच्या भोवती फिरत असतात. अशी दीक्षा घेणारी व्यक्ती आपल्यासमोर उपस्थित असली तर त्या व्यक्तीला दीक्षा देऊन नामस्मरण करण्यास सांगावे लागते व ह्या  वलयातून विमोचन करून गुरुवलयामध्ये  धारण करावे लागते. ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दीक्षा असून त्या दीक्षांचा संबंध हा पूर्णपणे गुरुतत्त्वाशी जोडला जात नाही.

प्रथमतः दीक्षेचा संबंध दीक्षा घेणाऱ्या व्यक्तीच्या घराण्यातील कुलदेवदेवता यांच्याशी असावयास पाहीजे. त्यानंतर त्याची उपास्य देवता हीचा समावेश दीक्षेमध्ये संकल्प म्हणून व्हावयास पाहीजे. या क्रियेमध्ये त्या व्यक्तिला कृपाशिर्वाद प्राप्त करून घेण्याची सवय प्रथमतः करावी लागते. ह्यासाठी लहानपणीच घरातील वडिलधारी माणसे यांना नमस्कार करावयास सांगून आपल्या वडीलमंडळीनी आशीर्वाद दिला की पुढे ह्याच आशीर्वादाच्या माध्यमातून देवदेवता व गुरु हे आशीर्वाद देत असतात. वर्षानुवर्षे हा भक्तभाविक येत असला तरी आशीर्वादाचा लाभ घेईतोपर्यंत त्या व्यक्तिवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते, आज जगतात ‘गुरु’ म्हणणारे लोक व त्यांचा ‘प्रचार’ म्हणण्यापेक्षा ‘पसारा’ अधिक असतो. त्यापेक्षा गुरुमार्गात कोणी शहाण्याने पडू नये. ज्या भक्तभाविकाला गुरुदीक्षेचा लाभ झाला आहे, त्याच्या पूर्ण जीवनाचे कार्य होईतोपर्यंत त्या व्यक्तीवर लक्ष ठेवून त्याच्या देहाचा विकास कसा होत आहे, हे बघावे लागते. अन्यतः नुसती दीक्षा किंवा अनुग्रह घेऊन गळ्यात बांधलेल्या खोंडाप्रमाणे त्याचे जीवन व्यतीत होत असते. अन्य गुरुमार्गात ज्या व्यक्तीने दीक्षेचा स्वीकार केला आहे अशा व्यक्तीवर काही बंधने सांगितली जातात. प्रामुख्याने या दीक्षेचे बंधन आहारावर सांगितले जाऊन अमुक एक उपवास व सांगितलेले व्रत म्हणजे नामःस्मरणाची अमुक एक संख्या सांगितली गेली की आपले कार्य संपले असे समजून येणाऱ्या व्यक्तीला पारमार्थिक जीवनाचा लाभ झाला आहे असे बहुतांशी साधक समजतात. ह्यामुळे दीक्षांपरत्वे जो त्याचा विकास होणे अत्यावश्यक आहे, तो सोडून गुरुमार्ग हा केवळ बंधनात राहण्याचा मार्ग आहे असे समजून बहुसंख्य लोक त्याचेच अनुकरण करीत असतात. वास्तविक ज्या व्यक्तीला गुरुमार्ग व दीक्षेचा लाभ घ्यावयाचा असतो त्यावेळी त्या व्यक्तीला जीवनात काही ‘सोडावे’ लागते व ‘मोडावे’ लागते असे नाही, तर स्वाभाविक स्थितीत हे जीवन ज्याप्रकारे तो जगत असतो त्याचप्रमाणे त्याला बंधन न घालता जगू देणे व दीक्षा दिल्यानंतर त्यांच्या जीवनाव आचार, विचार, आहारपरत्वे काय अदलाबदल झाला हे पाहावे लागते. येणाऱ्या भक्तभाविकाला बंधनात घातले तर ती व्यक्ती दिलेली दीक्षा प्राप्त करून घेण्यास पात्र का अपात्र आहे हे समजणार नाही. जेव्हा ह्या गोष्टी अनुभवास येतील की रोजचा आचार विचार यामध्ये बदल झाला आहे ह्याचा अर्थ येणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात दीक्षेचे कार्य सुरु झाले हे समजावे. असे जर घडले नाही तर पुढची दीक्षा न देता पहिल्याच दीक्षेची सेवा पुढे चालू ठेवा असे सांगावे लागते.

दीक्षा देण्यामध्यें अमुक एक प्राप्त होईल असे निश्चितपणे कुणालाही सांगता येत नसते. दीक्षा दिल्यनावर जीवनाला आरंभ होतो तो स्थित्यंतर होण्यामुळे ! ही स्थित्यंतरे प्रथमतः काया, वाचा, मन ह्यामध्ये व्हावी लागतात. पण दीक्षा घेतल्यानंतर आपण काही तरी वेगळ्या जगाचे अनुभव घेत आहोत असे काही भक्तभाविक भासवतात. उदा :- स्वप्नामध्ये ‘बाबा’ आले, इथपासून ईश्वराचा साक्षात्कार झाला आहे असे हे भक्तभाविक इतरांना काहीप्रकारे भासवून त्यांच्या श्रध्दा, भक्तीत हे ‘विष’ पेरतात. त्यामुळे असे वाटू लागते की दीक्षा घेतेवेळी आपण बरोबरच आलो, पण ह्याची फार पुढे प्रगती झाली आहे व असे समजून स्वतःच्या जीवनात काही कमी अधिकपणा आहे असे वाटू लागते. तर ही दक्षता साधकाने घ्यावयास पाहीजे की गुरुमार्गात जेव्हा दहा व्यक्तींचा समावेश होऊन एकाच प्रकारची साधना सांगितली आहे म्हटल्यावर त्याचा अनुभव दहापैकी नऊ लोकांना आला म्हणजे दीक्षेचे कार्य आपल्या जीवनात कार्यान्वित होत आहे असे निश्चित समजावे. त्यामध्ये एकाला अनुभव आला नाही तर त्याचाही विचार करावा.

गुरुमार्गात मार्गदर्शन करणारे माध्यम एकच असते व साधनाही सर्वांना एकच असते म्हटल्यावर जर एखाद्या व्यक्तीला वेगळा अनुभव येऊन ती व्यक्ति ‘मला अमुक एक होते किंवा अमुक एक दिसते अथवा अमुक एक विभुती माझ्याशी बोलते’, असे सांगत असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीएक दीक्षापरत्वे प्राप्त झालेले नसून ही अवस्था Self-hypnotism आहे असे म्हणावे लागते. साधकाने ह्या माणसापासून एवढेच जाणावे की ‘सावधान’ ! हा ‘खतरा’ इतरांसाठी तर आहेच, पण गुरु भेटूनही स्वतःचा ह्या मनोवृत्तीमुळे सर्वनाश होतो. याचा बोध एवढाच घ्यावयाचा असतो की ‘गुरुंचे गुरु कधीही होऊ नये’. म्हणजे इंग्रजीमध्ये म्हण आहे की Do not be a Master of your Master !

गुरुमार्गात जीवनाला आरंभ करण्यापूर्वी ह्या ज्या मार्गाचा अवलंब आपणास करावयाचा असतो, त्या मार्गाचे पूर्ण ज्ञान होणे आवश्यक आहे. तर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे इहलोक आणि परलोक ह्या अवस्थांशी मनुष्यजन्म हितसंबंधित असतो. ही क्रिया ज्या माध्यमातून घडत असते ते माध्यम म्हणजे देह. ह्याचा अर्थ काया, वाचा, मन. पण याहीपेक्षा अधिक खोलात अभ्यास करणे आवश्यक आहे. ह्या देहाला ‘पिंड’ असे म्हणतात. त्याची निर्मिती ब्रह्मांडासारखीच असते. अशा अवस्थेत जो ‘जीव’ म्हणून प्रथमावस्थेत जन्म घेता होतो त्यास अनेक साधक ‘आत्मा’ असे म्हणतात. परंतु जीवाची ‘उक्रांती’ व ‘अपक्रांती’ अशी पिंड आणि  ब्रह्मांड ह्यामध्ये क्रिया चालू असते. त्यामुळे जन्माला येतेवेळी येणारा मनुष्य जरी काया-वाचा-मन हे माध्यम घेऊन येतो, तरी त्याच्या ठिकाणी ‘आत्मा’ हे तत्त्व धारण न होता ‘जीव’ म्हणून तो जन्माला येत असतो. ज्याप्रमाणे काया-वाचा-मनाचा दीक्षापरत्वे विकास होणे हे महत्त्वाचे आहे, त्याहीपेक्षा अधिक दुसरी अवस्था म्हणजे जी पिंडाच्या ठिकाणी धारण झालेली आहे ती महत्त्वाची आहे. हा जो जीव ‘चेतना’ म्हणून कार्य करीत असतो हे कार्य काया-वाचा-मनाने न घडता फक्त कायेने क्रिया घडत असते. ही जी क्रिया देह करतो त्यालाच आपण ‘कर्म’ असे संबोधतो. पण कर्माची धारणा ही जोपर्यंत काय-वाचा-मन यांचे एकरूपत्व होत नाही तोपर्यंत होत नसून एखादी व्यक्ती ‘कर्म घडले’ असे म्हणत असली तरी ते ‘कर्म’ नसून फक्त ‘क्रिया’ असते. देहाची धारणा पाच तत्त्वांनी होते व देहाने कर्म करते वेळी काया-वाचा-मन यांनी युक्त असले तरच कर्माची धारणा होते. नुसते ‘कर्म केले’ असे म्हणून चालणार नाही. तिन्ही अवस्थांनी युक्त क्रिया हीचे पूर्णत्व होण्यासाठी मन असावयास पाहीजे. जन्माला जो मनुष्य येतो त्याच्या हातून कर्म होत आहे ह्याची साक्ष ‘मन’ देते. जर मनच अस्तित्त्वात नसले तर कर्म होऊनही ‘क्रिया’ होत राहाणार. मनाची निर्मिती होण्यासाठी सोप्यात सोपी साधना केली तर सेवेची सवय होऊन हळूहळू कर्म तयार होते.

त्याचप्रमाणे जो जीव जन्माला आला आहे, त्याच्या अस्तित्त्वामुळे चेतना देहामध्ये निर्माण होऊन क्रिया घडते. पण ह्या पिंडाचा यथायोग्य विकास करणे म्हणजे प्राप्त झालेला जन्म असे म्हणता येईल. जन्माला येते वेळी जो जीव म्हणून जन्म घेतो व परत परलोकवासी होतेवेळी त्या जीवाला ‘शिव’ही संज्ञा प्राप्त करून घ्यावी लागते. ह्यासाठी इहजन्माचे ज्ञान होणे आवश्यक असते. परंतु ह्याचा अर्थ जन्माला येतेवेळी न समजल्यामुळे जी जन्माची ‘यात्रा’ होती ती ‘जत्रा’ होत असते. अशावेळी जर गुरुभेट होऊन गुरुंच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले जीवन गुरुचरणी वाहीले असेल तर ही जत्रा न होता त्या जन्माचा प्रवास सुरु होतो. यामध्ये ‘प्र+वास’ म्हणजे वारंवार जन्माला येऊन फक्त ‘कर्माचा भोग’ याचा उपभोग घेणे एवढेच कार्य आपल्या वाट्याला न येता, आपला वाटा नकळत गुरुंच्या कृपाशिर्वादाने शिल्लक राहतो व पुढील जन्मप्राप्तीच्या वेळेला तो वाटा इहजगतामध्ये जन्माला आल्यावर गुरुंच्या कृपाशिर्वादाने ह्या वाट्याचा विनियोग ‘प्रसाद’ म्हणून जगाला ‘प्र+साद’ म्हणजे गुरुकृपा म्हणून होतो. याचा लाभ दीक्षा देत असता दीक्षा घेणाऱ्या भक्तगणाला नकळत होऊन येतेवेळी जो भक्त ‘जीव’ म्हणून जन्माला येत असतो त्याचे स्थित्यंतर दीक्षेमुळे ‘जीवात्मा’ ह्या अवस्थेमध्ये होते. ह्यासाठी श्रीपंतानी म्हटले आहे की, “साधन सेवा काहीच नसता, दावियले निजधाम”, याची प्राप्ती केवळ संतांच्या समागमामध्ये होत असते. याचप्रमाणे वेगवेगळ्या साधना व दीक्षापरत्वे ह्या भक्तांचा विकास आत्मा अवस्था प्राप्त होईतोपर्यंत होत असतो. हा विकास होण्यासाठी प्रथमतः जी उपासना म्हणून करण्याची आज्ञा श्रीगुरुंनी केलेली असते तिचा अवमान कदापिही करू नये. पुढे जी दीक्षा प्रथमारंभी प्राप्त केलेली असते, त्या दीक्षेत भक्तांची अवस्था जशी असेल तसे साधकाचे साधन म्हणजे उपास्य दैवत हे सगुण असावे लागते. ज्याप्रमाणे जीवनारंभी ‘श्रीगणेशा’ शिकल्यावर विश्वविद्यालयात पदवीधर होण्यापर्यंत परीक्षा असतात. त्यानुसार परीक्षेला बसून आपल्याला पदवी प्राप्त होत नाही, तसेच अनेक भक्त पुस्तकांत निर्गुण, निराकार व नित्य ॐ कार इ. शब्द वाचत असतात व तशी क्रिया किंवा अवस्था आपल्याला का प्राप्त झाली नाही ह्या संभ्रमात राहतात ! . पण एखादी पदवी आपल्याला मिळावी, अशी पात्रता नसणे हीसुध्दा ‘पदवीच’ आहे. हे सूज्ञांनी विसरता कामा नये.

वरील विषयात जीवाची धारणा ही काया, वाचा, मनामध्ये घडत असते. परंतु पुढे हाच जीव आत्मा ह्या स्वरूपामध्ये कार्य करता होतो. अशा वेळेला साधनेने काया, वाचा, मन याचा विकास होतो. म्हणजे जी १९ माध्यमे व ८४ लक्ष योनी ह्या काया-वाचा-मनामध्ये असतात, त्यांचा पूर्ण विकास होऊन त्या साधकाचे माध्यम कार्य करण्यासाठी गुरुआज्ञेने सिध्द होत असते. अशी सिध्दता प्राप्त झाल्यावर ज्या तीन अवस्था साधनेत सांगितल्या आहेत – साधक, सिध्द, साध्य ह्या अवस्थांचा लाभ त्याला होत असतो. ह्या अवस्थांचे कार्य असे की — साधक अवस्था ही इहलोकासाठी असून दुसरी सिध्द अवस्था ही परलोकासाठी व तिसरी साध्य अवस्था स्वर्गलोकासाठी आहे. हे कार्य क्रमशः प्राप्त करावयाचे असून ज्याप्रमाणे बाल, तरूण व वार्धक्य ह्या अवस्था असतात, तशी आपली सेवा आज बाल्य स्वरूपात असून जणू काही ती वृध्द म्हणजे परिपक्व झाली आहे असे भासवून ह्या साधनेची माकडचेष्टा साधकाने चुकूनही करू नये. कारण ह्या अवस्थांची प्राप्ती ही आपल्या मनाने करता येत नाही. ह्यातील दोन अवस्था नैसर्गिक असून पहिल्या अवस्थेमध्ये (‘साधक’) आपल्या मनाप्रमाणे गोष्ट घडते. पण पहिली अवस्था प्राप्त झाल्यानंतर पुढील दोन अवस्थांची प्रगती होण्यासाठी त्या अवस्थेप्रमाणे आपले मन तयार करावे लागते.

जो कोणी जीव जन्माला येतो त्याला चरितार्थ म्हणजे जीवन हे आहेच. चरितार्थ म्हणजे जगणे असा अर्थ नसून ज्याला जगवायचे आहे त्या जीवनामध्ये चरित्र असावयास पाहीजे. अन्यथा खाणे-पिणे, ऐष-आराम असे जीवन व्यतीत करून त्या जीवनाला ‘चरित्र’ असे म्हणता येत नाही. जे कोणी सत्पुरूष ह्या जगात जन्माला आले, त्या सत्पुरूषांनी आपले जीवन जगताना दुसऱ्याला जीवन दिले. अशा जीवनाचा अर्थ म्हणणे चरित्र होय. असे चरित्र प्रत्येक अवतारी पुरूषास आहे. त्यापैकी मी अभ्यासासाठी ज्याचे चरित्र वाचावयास घेतले ते चरित्र म्हणजे ‘गुरुचरित्र’ ! प्रत्येक सत्पुरुषाचे असे चरित्र असते. सत्पुरुषांच्या पश्चात् भक्तांना जे त्या गुरुतत्त्वाचे अनुभव आले ते अनुभव म्हणजेच गुरुचरित्र ! याप्रमाणे अनेक गुरुचरित्रे आहेत. प्रत्येकाने अनुभव हा एवढ्याचसाठी घ्यावयाचा असतो की भक्ती करत असताना ज्या क्रिया (म्हणजे चमत्कार नव्हे) यांची अनुभुती येते त्या अवस्थेची प्राप्ती होय. त्या अनुभुतीमुळे तो भक्त ‘साक्षात्कारी’ व्हावा असा उद्देश नसून ‘अनुभूती’ ही अवस्था आहे, पण ती अवस्था अनुभवण्यासाठी बऱ्याच भक्तांचा वेळ खर्च होत असतो. वास्तविक चरित्रातील विषय वाचन केलेला असतो. त्या चरित्रात काय सांगितले आहे हे प्रथमतः बारकाईने पाहून मग जो ‘चमत्कार’ म्हणून लिहिलेला असतो, त्या चमत्कारात ‘विज्ञान’ काय आहे हे शोधले पाहीजे. नुसते पाठांतर केले तर पुढे गुरु व भक्त यामध्ये ‘अंतर’ पडते. ह्यासाठी वाचन केल्यावर जे वाचन केले त्याचे मनन करावे. ‘मनन’ ह्या साधनेत ‘मन’ असावयास पाहीजे. नुसते ‘मनन’ करून भक्ताला ‘मनाचा’ शोध लागणार नाही. ‘थेंबे थेंबे, तळे साचे’, अशी अवस्था साधना करणाऱ्या भक्ताची असते. म्हणून वर्षानुवर्षे जरी कोणाचेही चरित्र वाचले तरी ‘मनन’ करावयास पाहीजे. ज्याप्रमाणे आपल्याला ‘भूक’ सदैव लागते, त्याप्रमाणे ‘मन’ ही अवस्था प्रथमतः प्राप्त व्हावी लागते. मग ‘मन’ तयार होते. ‘मन’ ही अवस्था, पोकळी आहे. ती पोकळी भरून काढावी ह्याची जाणीव होणे हे कर्तव्य भक्तांचे आहे. मग ही पोकळी ‘ऐहिक सुखाने’ भरून काढावयाची का, ‘पारमार्थिक विषयाने’ भरून काढावयाची हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

ह्या प्रमाणे नित्य दिनचर्या अशी होती की, सकाळी ‘वाचन’ व दुपारी ‘मनन’ ! जे वाचनात आले, त्यातील विषय गुरुंचा किती व येणारे भक्त यांचा किती हे अनुमान काढून मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कालचा विषय ज्याचे मनन केले आहे  तो ‘विषय’ याचा समावेश साधनेमध्ये करावयाचा. कारण तो विषय भवितव्यात जगाला लागणार आहे. केवळ कथा, कीर्तनामध्ये सांगण्यासाठी हा विषय नसतो. जे ५२ अध्याय गुरुचरित्रामध्ये लिहिले आहेत त्यांचा सारांश म्हणजे जगाचे कल्याण करण्यासाठी ५२ प्रकार असून ५२ आठवडे म्हणजे १ वर्ष होते; म्हणजे ज्यासाठी भक्त आपल्याकडे येतो ती अडचण वर्षाच्या आत निवारण व्हावयास पाहीजे. त्यासाठी गुरुचरित्र हे ५२ अध्यायांचे आहे  व ते पुन्हा पुन्हा वाचन करावयाचे असते. झाडाला प्रत्येक वर्षी नवी पालवी येते व जीर्ण पाने गळून जातात. त्याप्रमाणे ‘ज्ञान’ हे ‘जून’ होऊन चालत नाही. जर आशीर्वादाचा लाभ इतरांना झाला नाही तर ‘ज्ञानाचे गळू’ हा आजार होतो व भक्त आपल्याच भक्तीमुळे बेजार होतो. ह्या भक्तीमध्ये ‘काही अर्थ नाही’ असे म्हणतो. भक्तीचा कदापिही कंटाळा येत नसतो. भक्ती ही क्रिया निसर्गाचा धर्म आहे. ऊन, पाऊस, थंडी कोणासाठी म्हणून नसते. ज्याला जे पाहीजे असेल ते त्याने घ्यावे. ह्या मार्गदर्शनाप्रमाणे सेवा चालू होती. प्रथमतः ‘मार्गदर्शन’ हा एक शब्द असावा असे इतरांप्रमाणे मला वाटत असे. एके दिवशी जेव्हा वर्ष झाले त्या दिवशी गुरुंचे शब्द सायंकाळी नदीच्या काठी बसलो असताना ऐकू आले. ते ‘शब्द’ नसून आज्ञा होती ! “समोर जी नदी वाहत आहे त्याला प्रवाह म्हणतात. तो प्रवाह वाहत जाणारा आहे. जर त्याचा बोध झाला की जो ‘प्रवाह’ आहे त्याचा ‘प्रवास’ होईल. पुढे ‘प्र’ ह्या शब्दाला ‘प्रेम’ दिलेस तर ‘वास’ सदैव होईल. अन्यतः ह्या प्रवाहातून समुद्राकडे जाशील. जर समुद्राकडे गेलास तर पाणी खारट आहे. त्याचा उपयोग सृष्टीला नाही. सृष्टीला तहान लागली आहे. तेव्हा नीट विचार करून ज्या नदीच्या काठावर बसला आहेस तो विसरू नकोस. जो आज नदीचा ‘काठ’ पाहतो आहेस त्याची ‘काठी’ तयार कर. पुढे जगात चालण्यासाठी तीच काठी उपयोगी पडेल. हे जग जसे दिसते तसे नसते म्हणून आम्ही फसलो ! त्याप्रमाणे तू फसू व हासू नकोस. आज एक वर्ष झाले. काय मिळवलेस व काय घालविलेस याचा आढावा उद्या सांग”.

दुसऱ्या दिवशी सकाळी प्रश्न असा उभा राहीला, की काय सांगावे ? व काय न सांगावे ? कारण प्रपंच व परमार्थ म्हणजे कर्म श्रेष्ठ का कर्तव्य श्रेष्ठ, असा संभ्रम डोळ्यासमोर उभा राहीला. शेवटी मार्गदर्शन गुरुंनी केले. मार्ग हा एक भाग व दर्शन असा दुसरा भाग. ज्यावेळी मनुष्य कर्माने जन्माला येतो त्यावेळी कर्माचे कारण हे परलोकांत असते व कर्माचे फल मिळत नाही. ज्यावेळी जन्माचा विकास होतो, त्यावेळी कर्म अधीन होते. ह्या अवस्थेला गुरुमार्गामध्ये ‘मार्ग’ हा एक भाग व दर्शन हा दुसरा भाग असे म्हणतात. तसेच ‘दर्शन होणे’ म्हणजे दिसणे असा अर्थ नसून ‘ज्ञान होणे’ असा आहे. तेव्हा गुरुमार्गामध्ये मार्गदर्शन याचा अर्थ जे काही अज्ञात आहे ते ज्ञात असणे, त्याचे अस्तित्त्व साधकाला समजले पाहीजे. जो कोणी याचक आपले सुखदु:ख सांगत असतो त्यावेळेला दु:ख किंवा सुख हे किती  व्यक्त आहे व किती अव्यक्त आहे, हे समजून घेऊन त्याला मार्गदर्शनाप्रमाणे जी सेवा सांगितली जाईल त्याचबरोबर आशीर्वाद हा लाभलेला असावयास पाहीजे. कारण याचक आपले दु:ख निवारण व्हावे म्हणून जर जन्मभर सेवा करत बसला, तर त्या सेवेचे फल त्याला मिळत नसून तो दु:खीच राहतो. दु:ख किवा सुख ह्या दोन्ही अवस्था प्राप्त व्हाव्या  अशी जरी त्याची इच्छा असली तरी जन्माला येतेवेळी दु:ख निर्माण व्हावे हा काही कर्माचा धर्म नाही. जेव्हा जीवनात आपला विकास होण्याची वेळ येत असते, त्यावेळी जे आपण दु:ख म्हणून म्हणत असतो ते वास्तविक सुख आहे. कारण ते कर्मपरत्वे आलेले संकट हे आपल्याला जागे करत असते व त्यापरत्वे आपली दृष्टी म्हणजे ज्ञान ही अवस्था प्राप्त होऊन ‘जीवन म्हणजे काय ?’, हे तो याचक शोधू लागतो. अन्यतः जर सुखाची प्राप्ती होत राहीली, तर मरणाच्या क्षणापर्यंत ह्या प्राप्त झालेल्या दुर्मिळ जीवनाकडे तो दुर्लक्ष करतो. पण कर्मपरत्वे आलेल्या संकटामुळे जेव्हा जीवन म्हणजे काय ? ह्या विचाराप्रत तो जातो त्याक्षणी आपले वास्तव्य इहलोकांत असूनही त्याचा लय होतो व परलोक जीवनाला आरंभ होत असतो. असे जीवन या जीवनात अनुभवायचे आहे. पहिली बाजू कर्मपरत्वे असून ते कर्म आपल्या जीवनात ‘जागे होणे’ ही अवस्था प्राप्त करून देत असते व त्यामुळे जी जीवनातील दुसरी बाजू की हे जीवन केवळ आपल्यासाठी नसून इतरांसाठीही आहे हे कर्तव्य जीवनात निश्चित होते, याचा अर्थ प्रपंच व परमार्थ हे वेगवेगळे नसून ज्याप्रमाणे देवाचे अस्तित्त्व मूर्ती किंवा प्रतिमेत दिसते पण आशीर्वाद हा न दिसता अनुभवास येतो, त्याप्रमाणे प्रपंच हा समोर दिसतो पण त्यामध्ये परमार्थ हा अनुभवास येत असतो. ह्या अनुभवास कृपापात्र होणे असे म्हटले आहे. अशी अवस्था गुरुकृपेने मिळवावयाची याचा अर्थ ‘मिळविणे’ असा नसून, ‘आपले जीवन+गुरुकृपा’ याचा अर्थ ‘मिळवणे’ असा आहे व ‘घालविणे’ याचा अर्थ व्यर्थ खर्च करणे असा नसून गेल्या एक वर्षांत जो काळ व्यतित झाला त्याचा लाभ पुढे मिळविणे असा अर्थ आहे. साधकाला गुरुमार्गात हे शब्द पूर्णतः समजणे व ज्ञात होणे आवश्यक आहे. काय घालविणे व काय मिळविणे याचा अर्थ जर कळला नाही, तर ऐकलेले शब्द हे शब्दच राहून त्या शब्दात काय संदर्भ आहे याचा बोध घेता येत नाही, यासाठी साधना काळात साधकाला पूर्णपणे जागरूक राहावे लागते. या अवस्थेला ‘जागृती’ असे म्हणतात. तेव्हा पहिल्या वर्षांत ज्याचा लाभ झाला तो असा की बारा वर्षे सेवेत घालविली असता प्राप्त होणारे फल बारा महीने म्हणजे एका वर्षांत अनुभवास आले. असा सेवेचा लाभ अनुभूती म्हणून जगाला सांगण्यासाठी आपल्याजवळ शिल्लक राहणे याचा अर्थ ‘कृपा होणे’ असा आहे. ह्या  अवस्थेत काया, वाचा, मन याचा समावेश होऊन चौथी अवस्था म्हणजे ‘गुरुभक्त’ ही प्राप्त होत असते. ‘गुरुभक्त’ याचा अर्थ गुरुंच्या इच्छेप्रमाणे किंवा आज्ञेप्रमाणे वागणे. म्हणजे आचार, विचार आणि उच्चार यांची त्रिपुटी एक होऊन त्या गुरुआज्ञेप्रमाणे सदैव वागणे. यामध्ये गुरुमार्गात ‘वागणे’ याचा खरा  अर्थ ‘वाकणे’ असा आहे. पण गुरुमार्गात ह्या मार्गाचे अनुकरण बरेच लोक करतात व त्यावेळी ज्या शेपट्या वास्तविक नसतात, त्या काही एक शिक्षण घेतल्याने आपण लावत असतो. त्यामुळे हळू हळू ज्ञान होण्याऐवजी अज्ञान म्हणजे अहंकार, फाजील ज्ञानापेक्षा दृष्टोत्पत्तीस येते. त्यामुळे जी पुढची अवस्था आपणास प्राप्त करावयाची आहे तत्पूर्वी पहिली अवस्था प्राप्त करते वेळी जे काही पथ्य असते ‘त्यात काही तथ्य नाही’ अशी विचारसरणी ठेवल्यामुळे पहिल्या अवस्थेचा ‘श्रीगणेशा’ लिहीता येत नाही. मग दुसरी अवस्था कशी व केव्हा प्राप्त होईल हे सांगता येत नाही.

‘जागृती’ अवस्था याचा अर्थ पुस्तके वाचून लोक सांगत असले तरी तो अर्थ पुष्कळ प्रकारांनी आहे. एक अर्थ म्हणजे ह्या शब्दाचा हेतू काय ! या शिवाय सांगण्यासारखे, बोलण्यासारखे व वागण्यासारखे असे किती अर्थ काढू शकतो हे अनुभवले पाहीजे. केवळ त्या पुस्तकांची बाजारात किंमत असेल ती देऊन ‘विकतचे श्राध्द’ विकत घेण्यापेक्षा ही ‘अवस्था’ न समजणे उत्तम. कारण निवेदनात जो काही अनुभव लिहिला आहे त्याचा अर्थ स्पष्ट होणे, म्हणजे पुढील अवस्थेत जे जे काही अनुभविणे व इतरांना सांगणे ही क्रिया दोन अंगी आहे. नुसती ‘जागृती’ अवस्था प्राप्त होणे हे कधीच शक्य नाही व ती साधकाला स्वतःला अनुभविता येत नाही. एक मूळ ‘अवस्था’ प्रत्येकाला असतेच. गुरुमार्गी झाल्यावर जी मूळ ‘अवस्था’ आहे त्यामध्ये स्थित्यंतर होणे ही ‘जागृती अवस्था’ असून याचा अर्थ पदोपदी अनुभवास यावयास पाहीजे. कारण मूळ अवस्थेत घडणे ही क्रिया स्वाभाविक आहे. यापेक्षा वेगळे काही घडविणे व त्याचा लाभ इतरांना होणे याचा अर्थ म्हणजे ‘जागृती’ अवस्थेत स्वतः जागे होणे, हीच अवस्था नसून जी साधना आपण करीत असतो तिचा लाभ काया-वाचा-मनाला होत असतो — याचा अर्थ ‘जागे होणे’. म्हणजेच ‘जागृती’. ही पहिली अवस्था काया, वाचा, मनाच्या त्रिपुटीमध्ये होते. नंतर ती साधनेत व्हावयास पाहीजे म्हणजे जागृती. ही अवस्था साधकाला व त्यानंतर तो करीत असलेल्या ‘साधनेला’ प्राप्त व्हावयास पाहीजे. ह्या दोन अवस्था प्राप्त होणे आवश्यक आहे. नाहीतर भक्तभाविक गुरुंना भेटण्यासाठी आला, म्हणजे त्याचा त्रास नको म्हणून काहीतरी सांगून त्याला वाटेला लावणे बरे नाही, यासाठी ‘साधनेचा मार्ग’ ही पहिली अवस्था व दुसरी अवस्था ‘दर्शन’ ही होय. जगाला पुष्कळ भूक लागली आहे, पण पुष्कळांना फक्त पोटाची लागते म्हणजे ‘भिकेचे डोहाळे’ असे म्हणतात. साधकाला जी ‘भाक’ लागते तिची भूक शमत नाही व तोपर्यंत साधकाला शांती लाभत नाही. असे पुष्कळ साधक वाया गेले आहेत. त्यांच्या निष्ठेचे कौतुक वाटते. वास्तविक ‘गुरुमार्गात’ असणे हा धोका आहे, हे विसरून चालणार नाही. ध्यान, धारणा करीत असताना ‘कर्म’ अधिक होते किंवा कर्माचे निवारण होते. पण ‘धर्म’ हा खोटे बोलत नाही व चालत नाही. धर्माला दांभिकपणा किंवा खोटेपणा चालत नाही. कारण धर्माची ‘चाल’ ही वेगळी आहे. जर का धर्माला चाहूल लागली, तर इतरांना जागे करण्यापेक्षा आपण स्वतः ‘जागे होणे’ ह्यात मोठेपणा आहे. ही जागरूक अवस्था प्राप्त करते वेळी साधनेत काया, वाचा, मन यांचा समावेश व्हावयास पाहीजे. ‘काया’ हे साधनेचे प्रमुख माध्यम आहे. त्यात पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायु व आकाश व  त्यानंतर ‘वाचा’ ह्या माध्यमांमध्ये पंचप्राणकोश म्हणजे अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय व  त्यानंतर ‘मन’ या माध्यमामध्ये पंचतन्मात्रे म्हणजे गंध, रूप, रस, स्पर्श व शब्द, यांचा समावेश व्हावयास पाहीजे. म्हणजेच वरील १५  माध्यमांचे कार्य जीवनात व्हावयास पाहीजे. पुढे बुध्दि, मन, चित्त व अहंकार म्हणजे चार, अशी एकूण १९ माध्यमे म्हणजे ‘जीवन’ अशी अवस्था प्राप्त व्हावयास पाहीजे. अन्यतः जीवाची धारणा फक्त ७ माध्यमांत होते. बाकीची १२ माध्यमे असून नसल्यासारखी आहेत. यासाठी ‘साधना’ करते वेळी ईश्वराची आराधना करून चालणार नाही. ज्याची उणीव असेल त्याची प्रथमतः प्राप्ती करावयास पाहीजे. ही प्राप्ती  झाली की ‘देव’ हा विषय वेगळा नाही हे कळून येईल. ज्यावेळी १९ माध्यमे कार्यान्वित होतील, त्यावेळी आत्मा म्हणजे ‘शिव’ ही अवस्था प्राप्त होत असते.

वरील अवस्था प्राप्त होण्यासाठी नुसते चरित्र वाचन किंवा मनन करून चालणार नाही. म्हणून जीवनारंभी श्रीभैरवनाथांनी ॐ कार करण्यास सांगितला व असा आशीर्वाद दिला की भवितव्यात ही ‘ॐ साधना’ ह्यामुळे ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ म्हणजे काय याचे ज्ञान तुला व साधकांना होईल. त्यासाठी ‘ॐकार’ हीच साधना असून त्या साधनेत पाच अवस्था आहेत. त्यापैकी तीन अवस्था पिंडाचे ज्ञान होण्यासाठी व दोन अवस्था ब्रह्मांडाचे ज्ञान होण्यासाठी असून त्याप्रमाणे जी साधना मी शिकवितो आहे ती लक्षपूर्वक ऐक. जर का त्यापैकी एका अवस्थेत शास्त्रीय पध्दतीने चूक झाली तर भवितव्यामध्ये साधना सिध्द होणार नाही, यासाठी साधना करते वेळी लक्ष ठेवणे याचा अर्थ ‘सिध्द होणे’ असा आहे. तेव्हा पाच अवस्था ह्या ॐ काराची पाच रूपे असून ती रुपे भवितव्यात सहस्त्रावधी रुपे होतील. म्हणजे साधनारंभी जरी ५ लोकांना ॐ काराची संथा शिकवलीस तर पुढे हजारो भक्त तयार होतील !, असा माझा ‘आशीर्वाद’ नसून ‘कृपा-शिर्वाद’ आहे. याचा अर्थ ‘आशीर्वाद’ हा जरी प्राप्त झाला तरी तो दुसऱ्यांना देता येत नाही. त्यासाठी ‘कृपा-आशीर्वाद’ असावयास पाहीजे.

>>