20-3-1962

आज तुम्हाला 11 वा प्रसाद देत आहे. हा वैयक्तिक कर्मविमोचनाचा नसून सद्गुरूकृपेचा आहे. वाडवडिलांची पुण्याई या प्रसादाने तुम्हाला मिळणार आहे. या प्रसादाला यज्ञोपवीत नाही. प्रथम इकडे आलात त्यावेळी मी हळद-कुंकवाचे स्वस्तिकावर पूजनास प्रसाद देत असे. तशाच प्रकाचे पूजन या प्रसादाचे आहे. तो प्रसाद मीच दिला व हा देखील मीच देत आहे.  आज बाबांचा खऱया अर्थाने प्रसाद देत आहे.  त्यावेळी ज्या कामा निमित्त येत होता त्या कामाची फलश्रृति होण्यासाठी तुमची शक्ति प्रसाद देऊन वाढवली जात असे. पण आज बाबांचा ‘प्रसाद’ देत आहे. त्यावेळी आमचा प्रसाद दिला नाही कारण तुम्ही संभाळू शकला नसता. आज 5 वर्षांनी, “बाबाच माझे भले करतील” हा ठाम निश्चय झाला. त्याचवेळी आम्हाला पण वाटले की, हा आमचा प्रसाद संभाळू शकेल. प्रसादाचे मर्म कळायला अजून खूप वेळ आहे.

आत्मा हा अविमुक्त आहे. तो बंधनात अडकणारा नाही. आत्म्याने काया, वाचा, मनाचा देह धारण केल्यानंतर त्या देहाकरवी जी कर्मे घडतात ती कर्मे जन्म-ऋणानुबंध म्हणून भोगावी लागतात. आत्म्याचे कार्य अविनाशी आहे. तो सर्वज्ञ व सर्वव्यापी आहे. तो देहात प्रवेश करतो ते या देहाला चराचर सृष्टीचे ज्ञान व्हावे म्हणून. तो देह धारण करतो म्हणजे जडत्व धारण करतो व स्वतःच्या शक्तीने चैतन्य निर्माण करुन ज्ञान संपादन करु लागतो व आपणास चराचराचे ज्ञान होऊ लागते. जसा आत्मा अविनाशी आहे तसाच देह देखील अविनाशीच आहे. जड देह मृत हातो पण त्याचे अणु-परमाणु नवीन देहाला धारण करण्यास कारणीभूत होतात. देह नाशवंत असेल तर अविनाशी आत्मा त्यात प्रवेश करुच शकला नसता. तेल व पाणी एकत्र येऊ शकत नाही,मग देह व आत्मा हे एकत्र कसे येतात?  आजपर्यंत एकाकडून दुसऱयाला विद्यादान होत असताना काही भाग चुकीचा सांगितला गेला व त्यामुळेच आत्मा हा अविनाशी व देह हा नाशवंत असा तुमचा समज झालेला आहे.

जन्म प्राप्त झाल्यानंतर आत्म्याच्या शक्तिने आपल्याला जे काही चराचराचे ज्ञान होते व या जगात जे-जे काही आपल्या सन्निध येत आहे ते-ते सगळे (उदा.  रेडिओ, मोटार इ.) हे सगळे नाशवंत आहेत.  ज्ञान-अज्ञानाने जे काही समजले, दिसले तेच सुख आहे,असे समजू नकोस कारण ते सगळे नाशवंत आहे असा खरा अर्थ आहे. आज देह नाशवंत आहे असा विपर्यास झालेला आहे.  देह-पतन म्हणजे एका अवस्थेतून दुसऱया अवस्थेत तो जातो. आंब्याचा वरचा भाग म्हणजे साल. ही नाशवंत आहे पण आतील भाग म्हणजे कोय ही अविनाशी आहे. कारण या कोयीतून पुन्हा दुसऱया आंब्याची उत्पत्ती होणार आहे.  आत्मा व देह हे जर विरोधी असेल तर एकमेकाना पुनःश्च ओळख झाली नसती. आत्मा देह-धारण करतो म्हणजे सूक्ष्म जडात एकरूप होतो. ‘सूक्ष्म’ जडात’ विलीन होतो म्हणून आपणाला ज्ञान होऊ शकते. देहाचे व आत्म्याचे नैसर्गिक कार्य एकच आहे तोपर्यंतच कर्मविमोचन होऊ शकेल.  देहाच्या ठिकाणी इंद्रिये आहेत व त्यांचा ठिकाणी असणाऱया वासना-विकाराने कर्मे घडतात की ज्यात आत्मा व मन नसते.  अशी देहाकरवी घडलेली कर्मे म्हणजेच ‘जन्मऋणानुबंध’ होय.

आत्मा हा सूक्ष्म तत्त्वाने असतो व मनाला आज्ञा करीत असतो की तू अमुक एक गोष्ट करु नकोस पण वासना प्रबळ असल्यामुळे कर्म घडते.  त्या कर्मापासून आत्मा अलिप्त असतो व असे घडलेले कर्म संचित होऊन जन्मऋणानुबंध म्हणून भोगावे लागते. आजपर्यंत येथे येऊन जी काही उपासना केलीत त्यामुळे चैतन्याची जाणीव कायेच्या ठिकाणी पूर्णपणे होऊ लागत आहे. त्यामुळेच तुम्ही मनोनिग्रह करु शकता. मन हे चैतन्याचा अधिकारी आहे. पुनश्च तशी कर्मे घडून आपला ऋणानुबंध वाढू नये, तीव्र होऊ नये म्हणून आत्मा मनाकरवी मनोनिग्रह करु लागतो म्हणजेच कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रियांना मन हे निग्रह करण्यास प्रवृत्त करते. जे कर्म चैतन्यव्दारा घडले नाही व ज्यात फक्त वासना आहे ते कर्म कर्मप्रारब्ध म्हणून भोगावे लागते व आत्म्याने देह धारण केला की त्याच्याभोवती अशा कर्मांचे वलय असते. अशा कर्मांचे आत्म्याला जन्म घेतल्यानंतर विमोचन करावे लागते.

आपण जी नित्य उपासना करतो, त्यात जर चैतन्य, मनाचे कार्य अपूर्ण असेल तर ती उपासना फलदायी होऊ शकत नाही.  चैतन्यव्दारा केलेली उपासनाच निरंतर असू शकते. कारण चैतन्य हे अविनाशी आहे.  इंद्रियद्वारा केलेली सेवा आपल्या जीवनात केवळ भास म्हणून राहील. आजपर्यंत अशीच सेवा केलीत व या सेवेने आपला जन्मऋणानुबंध कमी करण्याचा प्रयत्न केलात पण आत्यंतिक वासनेनें युक्त असा जन्मऋणानुबंध इंद्रियाव्दारा केलेल्या सेवेने कमी होऊ शकत नाही. आत्मा देहाचा त्याग करुन काही काल असाच वर असतो व बंधनाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर तो कर्माचा व कर्मफलाचा त्याग करु लागतो.  जो आत्मा आनंदमयकोशापर्यंत गेलेला असतो तो अशा कर्माचा त्याग करतो की जेणे करुन त्याला पुनः जर जन्म घ्यावा लागला तर पुनश्च तशी कर्मे त्याच्या हातून घडू नयेत किवा त्याच्याच वंशात जन्मास येणाऱया मुला-बाळांना ती भोगणे भाग पडू नयेत. पण जे आत्मे अन्न, प्राण यापर्यंतच गेलेले आहेत ते अशा कर्मांचा त्याग करतात की जेणे करुन त्याच कर्मांची पुनरावृत्ती होऊन त्यांच्या इच्छा वासना पुऱया होतील.

पहिल्या प्रकारात कर्मत्यागाने दुसऱयांना त्रास होत नाही तर दुसऱया प्रकारातील कर्मत्यागाने दुसऱयांना त्रास होतो. अशी ती त्याग केलेली कर्मे वरच्या वातावरणात वलयांच्या रुपाने असतात.  जलाशयात एक खडा टाकला तर अनेक वलये निर्माण होतात व शेवटी ती एकमेकात मिसळतात, त्याच प्रमाणे आपल्या वंशजांनी त्याग केलेल्या कर्माचे वलय हळू-हळू आपल्या जन्मऋणानुबंधाचे जे वलय आहे, त्यात विलीन होऊ लागतो व तुमचा जन्मऋणानुबंध तीव्र होतो.  ती वलये आपल्यात का मिसळतात, तर आमच्या वाडवडिलांचे जे अज्ञान तेच आमचे अज्ञान आहे.  त्यांच्या वलयांना एक ठराविक दिशा नाही पण तुमचा देह जडत्वाचा असल्यामुळे तुमच्या कर्माच्या वलयांना एक ठराविक गती आहे.  आत्मा वर आहे तोपर्यंत तुमची देखील कर्मे वातावरणातच असतात.  पण एकदा आत्म्याने देह धारण के ला की लगेच ते कर्मे तुमच्या देहाशी निगडित होऊन देहाभोवती वलये निर्माण करुन ठेवतात.  असा ज्याचा जन्मऋणानुबंध तीव्र झालेला आहे त्याला आम्ही त्याच्या कामाच्या फलश्रृति करिता कितीही आशिर्वाद दिला म्हणून काय होणार आहे?

जोपर्यंत कर्माचे विमोचन होत नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही. आज आपल्या सभोवार हीच परिस्थिती दिसते आहे. एखादी चांगली गोष्ट नजरेस पडली की, तिचा नाश कसा होईल हाच विचार प्रामुख्याने येतो. आज जगात विश्व-बंधुत्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत आहे. वास्तविक बंधुत्व विश्वात निर्माण करावयाचे नाही तर ते आपल्या अंतर्यामी भरावयाचे आहे.  मांडीखाली बंदुक घेऊन या गप्पा कशाला मारता?  आत्मा तर म्हणतच असतो की “अहं ब्रह्मास्मि”.

सहिष्णुतावाद हा आत्म्याचा धर्मच आहे म्हणून तर तुम्ही परगोत्रातील मुलगी घरी आणून तिच्याशी संसार करु शकता.  विधात्याने ज्यावेळी सृष्टीची निर्मिती केली त्यावेळी सहिष्णुता हा शब्द निसर्गाला देऊन टाकलेला आहे.  गुलाबाचे व घाणेरीचे रोप शेजारी-शेजारी वाढू शकते.  भूमाता दोघांना सारख्याच धर्माने जगविते.  फक्त सहिष्णुता माणसानेच सोडली आहे. पाऊस पडतो तो सगळ्यां झाडांना मिळतो मग ते उपयोगी असे वा नसो.  समानतेने वागणे हा निसर्गाचा धर्मच आहे पण आम्ही मात्र जे आपल्याला उपयोगाचे आहे त्यावर मर्जी ठेवतो व जे उपयोगाचे नाही त्याकडे बघत नाही. सहिष्णुता हा आत्म्याचा धर्म असल्यामुळेच तो म्हणतो की, गतजन्मात दुष्कृत्ये केली असली तरी ती सत्कर्मे व्हावीत म्हणून तो मूळ-चैतन्याकडे जाऊ लागतो आणि सद्गुरुसेवा करु लागतो. तुमच्या आत्म्याने कर्म व कर्मफलाचा त्याग केला. असाच त्याग करण्याची प्रवृत्ती देहाच्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय कर्माचे विमोचन होऊच शकत नाही. आत्म्याने एकपट कर्माचा त्याग व त्याचवेळी देह दसपट कर्म करीत असतो व यामुळे नऊपट कर्माचे विमोचन करावे लागते.

आज या देहाकरवीं उपासना करण्याचा मात्र त्याग होत आहे. देहाकरवी त्याग होणे म्हणजे उपासनेची निश्चितता होणे व मनाच्या ठिकाणी ईश्वरी-तत्त्व निर्माण होणे. हे व्हायला पाहीजे. हवा असलेला पदार्थ जोपर्यंत देह ग्रहण करीत नाही तोपर्यंत मनाला चैन पडत नाही. मग त्याप्रमाणे नामःस्मरण करावयाचे राहून गेले तर मन बेचैन होते का?  इंद्रिंयांमुळे आपल्याला सगळय़ा गोष्टींचे ज्ञान झाले ना। मग हे असे का होते?  वासनेच्या आहारी जाऊन केलेल्या कर्मात आत्म्याला अनैच्छिकपणे यावे लागते पण उपासनेत तो ऐच्छिकपणे येतो याप्रमाणे चैतन्याचे दोन्ही प्रकारे कार्य चालू असते. बाबा हे ईश्वर आहेत हे त्याने ज्ञान करुन दिले.  आत्मा हे तत्त्व परिमाणू, तर बाबा हे सागर आहेत.  देहाला बाबांची ओढ निर्माण करुन देणे हा त्याचा धर्म आहे मूळतत्त्वाकडे जो ऐच्छिकपणे जात असतो व मला जे पाहिजे आहे ते “माझा भगवंत” मला देणार आहे असा त्याचा दृढविश्वास आहे पण हे सर्व लक्षात न घेता आपण एखादी गोष्ट मिळण्यासाठी धडपड करीत असतो. आत्म्याला अनैच्छिकपणे या धडपडीत ओढत असतो.

“असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी” हे खरेच आहे पण तुझा हरी असेल तर?  तुझा हरी कोठे आहे?  तुझा हरी का हरि?  तो नाही घरी मग आम्ही दारोदारी?

एखादी गोष्ट करु,का नको,अशी मनाची विचलीत परिस्थिती होत असते कारण आत्म्याला अनैच्छिकपणे कर्म करावे लागत असते,पण अशावेळी सभावारची परिस्थिती पाहून आपण जोर-जोरात आत्म्याला ओढत असतो व एकदाचे ते कर्म करुन मोकळे होतो. बाहय़ जगाचे ज्ञान व्हावे हे ठीक पण त्याकडे तुम्ही आकर्षिले न जाता देहाने रेडीओ ओढला गेला पाहिजे. समोर बसून प्रश्न विचारता आम्ही सांगतो “हम पर छोडो” कारण आम्हाला माहीत असते की तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ती गोष्ट मिळणार नाही. तुम्ही त्या गोष्टीकडे आकर्षिले गेलात पण त्या गोष्टीला तुमचे आकर्षण वाटायला नको का?  मुक्त होणे हा आत्म्याचा धर्म आहे व स्वतःला मुक्त करुन घेणे हा धर्म देहाचा आहे.  दोन्हीही शास्वत आहेत. फक्त आम्ही काय प्रयत्न करीत आहोत,हा प्रश्न आहे.  चांगले आंबे गोड असतात. त्याचप्रमाणे आत्म्याने हा चांगला देह धारण केला आहे पण आजपर्यंत आंबा खाल्लाच नाही,सालीच खाण्यात जन्म गेला. हापूस असो अगर गावठी असो आंब्याची साल ही तुरटच असणार. आजपर्यंत साल खाण्यातच समाधान मानले.

आत्मा हा स्वय्ं प्रकाशित, स्वय्ंतत्व, स्वय्ंसिध्द व स्वय्ंप्रेरीत आहे. तो म्हणतो आहे की “अहं-ब्रम्हास्मि” निखारा घेतला तर त्याची उष्णता त्याच्या सभोवार जाणवते.  यावर राख साचली म्हणून मूळ-तत्त्व लुप्त झाले नाही. एवढे असूनसुध्दा “मी तो संसार आहे” असा हा देह म्हणत आहे. वास्तविक संसार हा असार आहे. आत्मा हा संरक्षित आहे. त्याचे काळीज किती बंदिस्त ठिकाणीठेवले आहे. बुध्दीसुध्दा अशीच बंदीस्त पेटीत ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीत बुध्दी व मन याना धक्का लागणार नाही याची तो काळजी घेतो. जन्माला आल्याबरोबर त्याने जन्मऋणानुबंधाचे कवच आणले की,जेणे करुन आपण कर्तव्यापासून आपण च्युत होणार नाही. तो ईश्वरवादी आहे. संरक्षित आहे. अविभाज्य आहे.

“नैनं छिदन्ती शस्त्राणि, नैनं दहति पावकः”असे त्याचे वर्णन केलेले आहे.  अशा या संरक्षित पेटीतून आपणाला कोणते गाणे ऐकायला येत आहे पूर्वी गाणे म्हटले गेले असेल तर फोनोच्या प्लेटवरील गाणे ऐकायला येईल.  गतजन्मात याने ‘रहम नजर करो’ अगर ‘शिरडी माझे पंढरपूर’ अशा प्रकारचे गाणे म्हणले असेल तरच प्राप्त जन्मात ते प्लेटवर ऐकता येईल.  पण तुझी आवडणारी एकच ओळ म्हणत राहिलात व म्हणून तुमच्या प्लेटवर एकच चरा उठलेला आहे. जेथे तेथे ही एकच ओळ ऐकायला येते आहे. आत्म्याने आपल्या भोवती तुमचे जीवन उध्दरून जाण्याजोगे चैतन्याचे वलय निर्माण केले आहे. आत्म्याची ओळख फक्त देहालाच झाली. आत्म्याचीच ती उष्णता आहे निखाऱयाच्या बाजूने बोट फिरवीले तर त्याची उष्णता जाणवते. पण जे काम निखाऱयाने होईल ते त्याच्याभोवती असणाऱया उष्णतेने होऊ शकणार नाही.

जन्मऋणानुबंध येत असता तो दुख देऊ नये म्हणून ही वलये असतात. ती वलये चैतन्यापासून निघालेली असतात पण चैतन्यमय नसतात. कारण चैतन्याला देह धारण करावा लागला आहे. उपासना करुन या वलयात जागृती निर्माण करावयाची आहे व ती फक्त सद्गुरुकृपेवर अवलंबून आहे. आपला जसा देह तसाच बाबांचा देह आहे. आपल्या भोवती जन्मऋणानुबंधाचे वलय आहे तर त्यांच्या भोवती आत्मतत्वाचे वलय आहे. आमचा जन्म आमच्याच उध्दाराकरीता आहे तर त्यांचा जन्म इतरांच्या उध्दाराकरीता आहे. त्यांना भेदभाव माहीत नाही.  हिंदु, मुसलमान, पशु, पक्षी सगळे सारखेच दिसतात. आत्मतत्वाचे वलय असल्यामुळे विहिरीत पाणी नसताना “पाणी येऊं द्या”असे त्यांनी म्हणताच निसर्गालासुध्दा त्यांचे म्हणणे ऐकावे लागते. यामुळेच त्यांची सत्ता चराचरावर आहे पण आमची सत्ता आमच्या जन्मऋणानुबंधावरसुध्दा नाही. तू ईश्वरवादी बन,असे देहाला सांगून त्याच्याशी एकरुप व्हावयाचे आहे. असे एकरुप झालात की आत्म्याच्या भोवतालच्या वलयात जागृती होते व जसजशी जागृती होते तसतसा हा आत्मा ढगाला फोडून चैतन्यापर्यंत पोहचल्याशिवाय रहाणार नाही.

आपल्याला रोजच्या वापरासाठी 5 भांडी पुरतात मग घरात आणखीन 10-15 भांडी का ठेवितो? तर वेळ प्रसंगी पाहुणे आले तर ती उरलेली भांडी उपयोगी पडतील. ही वलयेसुध्दा त्या भांडय़ाप्रमाणेच आहेत. वेळप्रसंगी जास्त सुख हवे असल्यास त्यातून मिळेल.  आत्मा त्याच्याभोवती त्याची वलये,त्यानंतर जन्मऋणानुबंधाचे व त्यानंतर सद्गुरुकृपेचे वलय असते.  वास्तविक, सद्गुरुकृपेच्या वलयातून किरण निघून चैतन्यावर प्रकाश पडला पाहिजे. पण तुमची आजची उपासना म्हणजे चैतन्यापासून सद्गुरुवलयाकडे तुम्ही प्रकाश पाठवू मागता आहात. टॉर्चच्या प्रकाशात आकाशातील काहीही दिसणार नाही तर फक्त टॉर्चचा उजेड नजरेस येईल. एकदा सूर्यप्रकाश आला की साऱया चराचरावर उजेड येतो.  खरे म्हणजे तिकडून प्रेरणा आली पाहिजे.

आज ‘मला बाबा बोलावत आहेत’असे कधी वाटले का? तुम्ही खालच्या उपासनेने वरचे सिध्द करायला निघाला आहात पण वरचा अंत लागणार नाही. पण पाऊस मात्र वरुन पडतो. पाऊस पडायला खाली उष्णतामान फार वाढावे लागते. उष्णतेत बाष्पीभवन झाले पण उष्णता निर्माण झाल्याशिवाय पाऊस कोसळणार नाही. वातावरणात उष्णता वाढली पाहिजे. तुमच्या आमच्या अंगात उष्णता वाढून पाऊस पडणार नाही. एवढी हास्पिटले आहेत त्या ठिकाणी असे अनेक रोगी निधतील की ज्यांच्या अगांत102 डिग्रीच्यावर ताप आहे. पण या उष्णतेने पाऊस पडतो का? अंगात उष्णता वाढल्यास बर्फाची घडी ठेवण्यात येते. तुमचे वातावरण म्हणजे उपासना. यात उष्णता वाढली तरच सद्गुरुकृपेचा पाऊस पडेल व जन्मऋणानुबंधाच्या प्रसादाचे फळ मिळेल. आजपर्यंत जन्मऋणानुबंधातील प्रश्न कर्मऋणानुबंधांत विचारलेत. अशिर्वादामुळे ते तेथे परिपक्व झालेले आहेत पण कर्मऋणानुबंध परिपक्व नसल्याम्ळे ते वरचे प्रश्न खाली येत नाहीत. आंबा तयार झालेला पण तो वर झाडावर आहे. तो आपण खाली आणला पाहिजे. यापुढे ज्याचा 11वा प्रसाद घेऊन झाला आहे त्यांनाच गुरुपादुका देणार आहे. ज्या ठिकाणी तुमच्या काया-वाचेचे ऋण देऊ शकणार अशा त्या गुरुपादुका आहेत. हे गुरूप्रसाद आहे. आशिर्वादाची जोड निरंतर घेतली पाहिजे. तरच मुक्त होऊ शकणार. गाडीत पॅसेंजर बसले म्हणून कंडकटर तिकीट देतो व उतारुना कोल्हापूरला जायचे असते म्हणून ते तिकीट घेत असतात. आता हा कंडक्टर आलेला आहे, तिकीट तयार आहे. ज्याला घेण्याची इच्छा आहे त्याने घ्यावे. शिरडीला गेला असला तर यापूर्वीच बाबांच्या पादुका घरी आणल्या असतील. तेथे विकणाऱयाना आपण पादुका का विकतो ते कळले का? असे बाबा घरी येणे फार कठीण! तो एक ऋणानुबंध आहे. या पादुकांची दर गुरुवार,पैर्णिमा, अमावस्या यादिवशी अभिषेक करुन पुजा करावयाची आहे.

संकल्प उच्चार केल्याशिवाय कोणीही काहीही देऊ शकत नाही. संकल्पाशिवाय कोणी देणार असेल तर ते सिध्दसिध्दांत पध्दतीला धरुन असणार नाही. आज बाबांचा पहिला प्रसाद मिळाला आहे. या ठिकाणी देह दादांचा,संचार माझा व नामःस्मरण-दीक्षा बाबांच्या नामस्मरणाची,हे पाहून मनात विचार येत असतील जीवनात तीन तत्वे व तीन अधिष्ठाने नित्य असावयास पाहिजेत. हा प्रसाद आहे मग तो कोणाचा का असेना ही भावना जोपासली गेल्या शिवाय तो कोणाचा आहे हे मी सांगणार नाही. शिरडीला गेलात तर 8दिवसात बाबा स्वप्नात येतात. पण या ठिकाणीयेवून तुम्हाला 5-5 वर्षे झालीत. “लेकीन बाबा गलती से भी धका मारनेके लिये राजी नही” “आशिर्वाद किसी का भी नही” “जया मनी जैसा भाव” “आफू आणा वा साखर आणा” हा प्रश्न तुमचा आहे.

तुम्हाला दोन प्रसाद संभाळणे कठिण वाटते पण तुम्ही एवढे,मला प्रसादच आहात. पण मी सगळय़ांना पुरुन उरलो आहे. “झोली फटी नही है”या प्रसादापासून संकल्पात बदल झालेला आहे. “सद्गुरुकृपाशिर्वादाच्या प्रसादाचा स्वीकार केला आहे”, असे आपण म्हणतो. 1 ते 9 या वैयक्तिककर्मविपाकाच्या प्रसादांचे तुम्ही पूजन केले आहे. या पहिल्या नऊ प्रसादात आत्म्याने सुलभ अशा कर्माचे विमोचन केले आहे. सुलभ कर्मे म्हणजे जी कर्मे क्षणात आली व क्षणात गेली. अशा कर्मांमुळे होणारे दुख अगर अशांतता नाहीशी होण्याकरिता अशा कर्मांचे आत्म्याने प्रथम विमोचन केले. आत्मा हा मूळ-तत्त्वाकडे जात होता,पण हा देह पंचमहाभूतात्मक असल्यामुळे पंचमहाभूतात्मक गोष्टींकडेच आकर्षिला जात असते. ती संवय काढून देहाला नामःस्मरण करावयाची सवय लावली. माजलेला खोंड प्रथम खाबांला बांधतात. तो दोरी तोडण्याचा प्रयत्न करतो,शिंगाने माती उकरतो,नाना तऱहेने सुटण्याचा प्रयत्न करतो. शेवटी थकला व ज्या खांबाला धडका मारीत होता त्याच खांबावर प्रेम करु लागला.  यानंतर त्याला गाडी ओढायला लावतात व तोही व्यवस्थित गाडी ओढतो. तुमचीसुध्दां इंद्रिये प्रथम अशीच इकडे जात असत व विनाकारण शक्तीचा अपव्यय होत असे. हे नाहीसे करुन ती शक्ती गाडीला जोडल्याप्रमाणे एका विशिष्ट कामी लावली व ते काम म्हणजे नामःस्मरण करणे हे होय. आता देहाला नामःस्मरणाची सवय लागली.

पूर्वी प्रेरणा झाल्यानंतर आजची सेवा उद्या करू,असे देह म्हणत असे. पण आता आजची सेवा आजच करण्याची सवय लागली आहे. पूर्वी इतर गोष्टींची आसक्ती होती. आता सद्गुरुची आसक्ती लागली व अशा तऱहेने देह व आत्मा एकरुप होऊन मूलतत्त्वाकडे जायला लागला आहे. आत्मा मूलतत्त्वाकडे जाऊ लागल्या बरोबर त्याला जाणीव झाली की,आपले ओझे कमी करावयाला पाहिजे. त्याने प्रथम सुलभ कर्माचा त्याग करण्यास सुरुवात केली. यानंतर राहिलेल्या म्हणजे तीव्र कर्माचे विमोचन 11व्या प्रसादापासून होते. ही कर्मे इतकी जबरदस्त असतात की आत्मा जर एकटाच त्याचे विमोचन करू लागला तर त्याला ते शक्य होणार नाही. एवढेच नव्हे तर ती कर्मे आत्म्यालाच यापासून परावृत करतील.  त्याला सांगतील की “बाबा तुझे काम करणार नाहीत” व अशा तऱहेने आत्मा आपल्या कार्यापासून बाजूला होतो. यावर उपाय म्हणून बाबांनी आशिर्वाद दिला आहे व त्यांच्या चैतन्यातील काही अंश तुमच्या आत्म्यात घातला आहे कीजेणेकरुन तीव्र कर्मांचे विमोचन व्हावे. यापुढे चैतन्यव्दारा उपासना चालू झाली की सर्व देह परब्रम्ह स्वरुप होऊन जाईल.

बाबा आपल्या अविभाज्य शक्तीतून काही अंश तुम्हाला देतात. एक अंश तुम्हाला दिला की लगेच तेवढा अंश ते तयार करु शकतात. प्रसाद घेतल्यानंतर पहिला व शेवटचा आठवडा यात नामःस्मरण चांगले होते. समाधान होते. याचे कारण पहिल्या आठवडय़ात नामःस्मरण करुन चैतन्याच्या भोवती एक शक्ति निर्माण होते.  त्यानंतर होणारा जप हा आवाहन केलेली कर्मे येऊ लागली की त्यांचे विमोचन करण्यासाठी जातो. पण त्यामुळे चैतन्या च्या भोवती शक्तीचे वलय शिल्लक राहात नाहीत व त्यामुळे जप करुन तितकेसे समाधान मिळू शकत नाही. हे असे शेवटच्या आठवडय़ापर्यंत चाललेले असते. तोपर्यंत आवाहन केलेल्या सर्व कर्मांचे विमोचन झालेले असल्यामुळे पुन्हा शेवटच्या आठवडय़ात केलेला जप कर्मविमोचनार्थ खर्ची न पडल्यामुळे तुम्हाला समाधान लाभते. साधकाने या गोष्टीचा अभ्यास केला पाहीजे.

शेरभर जेंधळे कोठेही पडले तरी उगवल्याशिवाय राहाणार नाहीत. त्याचप्रमाणे तुमच्या कर्माची पुनरावृती झाल्याशिवाय राहत नाही. जेंधळे दळून पीठ करतात तसे सद्गुरुकृपेने कर्माचे अगदी पीठ करुन टाकायचे व त्याची भाकरी करुन खाऊन टाकायची. जीवनाकडे तात्विक दृष्टीकोनातून बघण्यास शिका. कोयनेची वीज येणार व 20 पैसे युनीट असणारी वीज10पैसे युनिट मिळणार,या आनंदात सर्वजण आहात,पण आमच्या दृष्टीकोनाप्रमाणे ती वीज10पैसे युनिट नसून50कोटी रुपये युनिट आहे.  युनिट 10 पैशानी कमी झाला एवढीच गोष्ट तुम्ही लक्षात घेता पण ते करण्यासाठी आधी 50 कोटी रुपये खर्ची पडले आहेत हे विसरुन जाता. प्रत्यक्ष धरणाच्या जागी जाऊन ते अवाढव्य काम बघाल त्यावेळी आश्चर्याने तोंडात बोटे घालाल. तुमच्या दृष्टीने 1 रु 10 आणे देऊन कर्मविपाकाचा प्रसाद घेतला. एवढीच गोष्ट लक्षात घेता. तो प्रसाद देण्यामागे आमची 800वर्षाची तपश्चर्या आहे हे विसरुन जाऊ नका. कोयनेला दोन डोंगरामधे भिंत घालून पाणी अडवले आहे त्याचप्रमाणे जन्म व मरण या दोन टोकामध्ये मी भिंत घालीत आहे. त्या भिंतीची उंची जेथे तुम्ही पातक-प्रमाद केले त्या,या भूतलापासून थेट स्वर्गापर्यंत की,ज्यात इतरेजन व देवादिकाचा ऋणानुबंध जोडला गेला आहे. कोयनेला किती सिमेंट लागले याचा जरा विचार करा. ही जसजशी भिंत पुरी होत जाईल त्यावेळी प्रत्यक्ष परब्रम्ह डोळय़ासमोर नाचू लागेल.  त्या वेळी तुम्ही तोंडात नाहीतर डोळ्यात बोटे घालाल! त्याचवेळी आमच्या प्रसादाचे मर्म कळेल!

तुम्ही’नवनाथ’वाचता पण अजून अर्थ कळत नाही.  स्त्री राज्यात जाऊन किलोचना राणीशी संसार करण्याइतके का नाथ लंपट होत? मच्छिंद्रनाथांनी बघितले की मारुती म्हणजे वायुतत्व. वचनात म्हणजे बंधनात अडकलेला आहे. त्याला सोडविले पाहिजे. त्यांनी प्रथम आपले आत्मतत्व बद्रिनारायणात काढून ठेविले.  त्यानंतर विश्वात उत्पत्तीची जी शक्ती होती ती घेऊन स्त्री राज्यात गेले. पुढे मीननाथाचा जन्म झाला. पुढे गोरखनाथानी त्याचे आत्मतत्त्व बद्रिनारायणाहून आणले व सांगितले “चलो मच्छिंदर गोरख आया” हे ऐकल्याबरोबर ती शक्ती टाकून देऊन पुन्हा आत्मतत्व धारण करुन मोकळे झाले. त्रिविक्रम राजा मरण पावल्यानंतर तो राणीचा व प्रजाजनांचा आक्रोश पाहून मच्छिंद्रनाथांनी आपल्या स्वत. च्या सामर्थ्याने त्रिविक्रम राजाच्या आत्म्याला पकडले व बळजबरीने12 वर्षे त्याच्या आत्म्याला पुन्हा देह धारण करायला लावले.  कारण एकदा देह सोडल्यानंतर पुन्हा त्या देहात आत्मा शिरत नाही म्हणून आपल्या शक्तीचा मच्छिंदरनाथांनी उपयोग केला. धर्मनाथ हा मुलगा मच्छिंद्रनाथांचा नव्हे तर त्रिविक्रम राजाचा. असे हे आत्मे पकडून आम्हालासुध्दा तुमच्यात घालता येतील.

आजपर्यत ज्यांनी काही सेवा करुन मिळवले ते असेच देत गेले. पण आम्ही देणार नाही. अशी दिली गेलेली संतती तुम्हाला तारून नेईल की,तुमची विल्हेवाट लावील हे त्यांनी बघितलेच नाही. किंबहुना हे बघण्याची त्यांना दृष्टीच नव्हती. आम्ही अशी संतती देणार नाही. आम्ही संतती न होण्याचे कारण प्रथम नाहीसे करु व मग तुमच्या झाडाला आलेली फळे बघू. पूर्वी घरात कुलाचार,कुलधर्म पाळला जात असे. त्यामुळे जन्मास येणारी संतती चांगली असे. तुमची कल्पना अशी आहे की स्त्री व पुरुष एकत्र आले की संतती होते. पण ते एकत्र येत असता प्रत्यक्ष आत्मा त्यात प्रवेश करतो व मगच गर्भधारणा होते. तुमच्या घरात येण्यापूर्वी आत्म्याला अनुकूल परिस्थिती या घरात आहे की,नाही हे बधूनच तो स्त्री च्या उदरी प्रवेश करतो. तु

म्ही प्रयोग करुन बघायला हरकत नाही. घरात देवतार्जन चालु असताना दोन मुले होऊ द्यात व मग देवतार्जन सगळे बंद करा व मग दोन मुले होऊ द्यात. पहिली दोन मुले देवाची पूजा करतील तर दुसरी दोन मुले तेच देव गुंडाळून ठेवतील. कारण येणारा आत्मा हा त्याला अनुकूल असे वातावरण बघूनच घरात येत असतो. यानी अनेकाना संतती दिली पण त्याना स्वतःला संतती झाली नाही. कारण त्यांच्यात काही दोष नव्हता तर त्यांच्या इतके कडक धर्माचरण करु शकणारा व त्यांना ‘आपले वडिल’ म्हणू शकण्याइतका आत्मा त्यावेळी वर नव्हता. भलतासलता जीव त्यांच्या घरी येऊच शकत नव्हता व म्हणून त्यांना संतती झाली नाही.

आपल्या गादीवरील सेवकाचे अजून का लग्न होत नाही,असे जर कोणाला वाटत असेल तर त्याला उत्तर असे आहे की,हा पडला बाबांचा भक्त. याला साजेसा म्हणजेच त्याच्या इतके धर्माचरण करणारा जीव अजून वरच्या दुनियेत नाही. या कारणामुळे अजून 5 वर्षेतरी याला संतती होणार नाही. मग आज लग्न करुन काय फायदा? कारण दोन वर्षानी हाच मला प्रश्न विचारणार की बाबा दोन वर्षे झाली माझ्याकडे बघा आता!