आत्मनिवेदन पान 3 — ।। दैनंदिन प्रार्थना ।।
।। ॐ ।।
।। दैनंदिन प्रार्थना ।।
हे भगवंता, नारायणा, आमच्या कुटुंबाच्या उध्दाराकरितां ज्या दिव्य, पुण्य विभूती स्वतःला अनेक तऱहेचा त्रास सोसून देखील अहर्निश झटत आहेत, त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हां सर्वांकडून यथोचित वर्तन घडू दे.आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणांपासून तरी पुनरावृत्ती न होवो.बिकट आर्थिक आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि क्षुद्र मनोविकारांना किंवा कोत्या समजुतींना बळी पडून, आळसामुळे अथवा अज्ञानामुळे, आमच्या मनांत त्यांच्याविषयी जे काही अनुदार विचार आले असतील, अथवा अनुदार उद्गार तोंडावाटे निघाले असतील, किंवा त्यांच्या उपदेशाविरूध्द कृती घडली असेल, त्या सर्वांबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो.आमच्या कुटुंबात सदैव सुख, शांति, समाधान व परस्पराविषयी जिव्हाळय़ाचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नित्य वास करोत.तसेच तुझे विषयीची अचल निष्ठा आमचेपैकी प्रत्येकाचे अंतःकरणात सदैव जागृत राहो.आमच्या राहिलेल्या आयुष्यांत आमच्या हातून त्यांनी योजिलेले महत्कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडो आणि इतरही अनेक सत्कृत्ये प्रत्यही घडत राहोत, तेणे करून त्या दिव्य पुण्य विभूती आम्हावर सदैव संतुष्ट राहोत व तुझीही आमच्या कुटुंबावर अशीच अखंड कृपादृष्टी राहील असे घडून येवो.
हे प्रभो, आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्यकर्म अहोरात्र पाळण्याची सुबुध्दी दे.पूर्वीच्या सत्कर्मानुसार आम्हांपैकी काही व्यक्ती आज जरी सुख भोगीत असूं, तथापी, ‘पुढील जन्मांची तरतूद मनुष्याने ह्याच जन्मी अति प्रयत्नाने करावी’ अशा तऱहेच्या तुझ्या नित्य शुध्द वाचेने तू जगाला जो धडा घालून दिला आह्से त्याला अनुसरून आणि उपकाराची फेड अपकारांने न होईल अशीच बुध्दी, हे दयाघना, कुटुंबातील सर्व व्यक्तींना तू दे, एवढीच मागणी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन मी मागत आहे.