अध्याय १ – कार्य व कार्याची भूमिका
आज जगाच्या उत्पत्तीपासून आम्हां भक्तांच्या सुख-शांती-समाधानासाठी परमेश्वराने प्रत्येक युगात भिन्नाभिन्न पातळीवर अवतार घेऊन आम्हां भक्तांच्या कल्याणाची योजना आखली होती व त्याप्रमाणे प्रत्येक युगात अवतीर्ण झालेल्या अवतारी पुरुषांनी आपले अवतारकार्य नःस्वार्थ, निरपेक्ष बुध्दीने करुन या परमेश्वरकृपेचा बहुमोल असा ठेवा आम्हा मानवांच्या कल्याणार्थ आजपर्यंत अवतारपरंपरेचे व्रत अविरत चालू ठेवून जतन केला आहे. असा हा परंपरेने जतन केलेला परमेश्वराच्या कृपेचा ठेवा गेली ३० वर्षे व अधिक काळ मी तुम्हां भक्तभाविकांच्या सुख-शांती-समाधानासाठी कार्य म्हणून जरी करीत आलो आहे तरी युगयुगांतपरत्वे ही जतन केलेली परमेश्वराची बहुमोल ठेव व तिला प्राप्त होण्यास प्राप्त झालेले तुमच्यासारखे भक्तभाविक यांना परमेश्वराच्या सद्हेतूची विशाल भूमिका आम्हां मानवांच्या कल्याणासाठी काय आहे? याचा बोध झालेला नाही.
आजपर्यंत या कार्याचा लाभ गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ आपण घेत आलात, पण चुकूनही या कार्याची जी मूलभूत योजना मानवी कल्याणार्थ आहे त्या योजनेची भूमिका काय ? व कार्यार्थ आपली भूमिका काय ? याचा सुविचार केला नाहीत. या निवेदनात प्रामुख्याने आज तीन भूमिकेसंबंधी जे स्पष्टीकरण करणार आहे ते भवितव्यात तुमच्या व तुमच्या कुटुंबियांच्या कल्याणार्थच आहे.
पहिल्या भूमिकेचे स्पष्टिकरण म्हणजे या कार्याची स्थापना ही मी काही ऐच्छिक किंवा ऐहिक विषय म्हणून केलेली नसून, ईश्वरी आज्ञेने माझ्या माध्यमातून इतरांच्या कल्याणार्थ प्राप्त झालेल्या जन्माचा सदुपयोग व्हावा, प्राप्त झालेला जन्म केवळ ऐहिक विषयाधीन होऊन खाणेपिणे, कपडालत्ता, ऐषआराम यामध्ये व्यतीत होऊ नये या सद्भावनेने मी या सेवाकार्याशी आज गेली तीसापेक्षा अधिक वर्षे प्रामाणिक राहून हे व्रत अविरत चालू ठेवले आहे. आज तुमच्याच प्रमाणे मी कुटुंबवत्सल मनुष्य असून जीवनासंबंधी तुमच्या ज्या काही अपेक्षा, उणीवा, गरजा असतात तशा स्वाभाविक मलाही असणे हे नित्याचे आहे. तरीसुध्दा आजपर्यंत गेली तीसाहून अधिक वर्षे गुरुकृपेशी एकनिष्ठ राहून आजपर्यंत माझ्या जीवनपरिसरात असणाऱ्या अनेक ऐहिक विषयापासून स्वतःला दूर ठेवून मी हा गुरुकृपेचा ठेवा तुम्हा मानवांच्या कल्याणासाठी जो जतन केला आहे व ज्याचा लाभ आपण घेत आहात, त्यासंबंधीचे आपले काही इष्ट कर्तव्य या जन्मात त्या घेतलेल्या कृपाशिर्वादासंबंधी आहे असा सुविचार क्षणभरही आपण केला नाहीत. तरीसुध्दा हा तुमच्या अज्ञानाने घडलेला प्रमाद मी विचारात न घेता अजूनही तुमच्या कल्याणार्थ कोणकोणत्या अज्ञात अशा भिन्नाभिन्न गुरुकृपाशिर्वादाच्या साधनांची आवश्यकता आहे याचा विचार करुन त्याप्रकारची साधने प्राप्त करण्यासाठी गुरु आज्ञेप्रमाणे गुरुचिंतनात व तीर्थक्षेत्री सेवेत राहून ती मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे. यामागील सद्हेतू म्हणजे केवळ माझ्या कुटुंबाचा योगक्षेम निरंतर स्वरुपामध्ये चालावा व मला प्राप्त झालेल्या जन्मात सद्गुरुचरणी निरंतर अशी मुक्ती मिळावी म्हणून केला नसून, भवितव्यामध्ये तुम्हाला प्राप्त होणारे अनेक जन्म व तुमच्या भावी पिढ्या यांच्या सुख-शांती-संपत्ती, संतती-दीर्घायुष्य आदींची तरतूद करण्यासाठी केला जात आहे.आज मी तुम्हा भक्तभाविकांना वैयक्तिक मार्गदर्शनार्थ माझा लाभ देऊ शकत नाही, याचा अर्थ प्रकृतीस्वास्थ्यासाठी किंवा तुम्हा भक्तांच्या सेवेसाठी मी थकलो आहे असे नसून, गेल्या काही वर्षात तुमच्या प्रापंचिक जीवनातील अडीअडचणी निवारण करुन केवळ ऐहिक विषय हे सुलभपणे तुम्हाला प्राप्त करुन देऊन त्याचा उपभोग घेण्यातच जे तुम्ही आपल्या जीवनाचे सार्थक म्हणून मानीत होतात, अशा ह्या चुकीच्या भूमिकेची दुरुस्ती करण्यासाठी गुरुआज्ञेने मला आज दिवसापर्यंत आपल्या सर्वांच्या प्रेमळ सहवासापासून अलिप्त राहून तुम्हा भक्तांना इहजन्मातच पारलौकिक तत्वाचा लाभ करुन देता येईल, हा साधनेचा साध्य हेतू मिळविण्यासाठी मला आज दूर रहावे लागले. हे जरी खरे असले तरी ज्या कृपाशिर्वादाचा लाभ तुम्ही घेतलात तो कृपाशिर्वाद मी काही तुम्हापासून हिरावून घेतला नाही. तुमच्या असमंजस भूमिकेमुळे तुम्हाला, गेल्या काही दिवसापासून वं. दादांच्या भेटीचा लाभ होत नाही असा खेद होतो. परंतु गुरुमार्गामध्ये ही जी तुमची भूमिका व्यक्तिपूजनाची आहे ती चुकीची आहे. गुरुकृपाशिर्वाद ही एक महान शक्ति या सर्व जगाला व्यापून कार्य करीत असते. पण ती कोणाही गुरुभक्तांच्या माध्यमातून स्वयंस्फूर्त कार्यप्ररणा देत असते. परंतु आपली भूमिका व्यक्तिपूजनाची असल्यामुळे या कार्यात गुरुआज्ञेने नियुक्त केलेले सेवक हे आपली सेवा करण्यास समर्थ आहेत किंवा आपल्या अडी – अडचणी निवारणार्थ मार्गदर्शन करण्यास असमर्थ आहेत अशी भूमिका निर्माण करुन जो अनंत रुपाने सर्वव्यापी नारायण म्हणून चित्स्वरुपामध्ये सद्गुरुच्या ठायी वास करतो आहे व जो मानवी रुपातून प्रकट होतो आहे, अशा गुरुकृपाशिर्वादाला आपण केवळ आपल्या अज्ञानाने मुकत आहात. या पुढील माझ्या जीवनातील काळ हा तुम्हा भक्तांच्या कल्याणार्थ निरंतर अशी सुख-शांती तुम्हा कुटुंबियाना लाभावी व तुमच्या प्राप्त जन्माचे सार्थक कोणत्या साधन-पध्दतीने होईल ती साधने प्राप्त करण्यासाठी खर्च करावयाचा आहे. याचा अर्थ मी तुमच्यापासून दूर आहे असा नसून जो अज्ञानाने तुम्ही हा दुरावा निर्माण करीत आहात त्यापेक्षा मला जे अत्यंत बहुमोल असे गुरुआज्ञेचे इष्ट फल तुमच्या कल्याणार्थ मिळवावयाचे आहे, ते मिळविण्यासाठी तुम्ही माझ्या भूमिकेशी समरस होऊन जे कोणी नियुक्त सेवक प्रत्येक केंद्रावर कार्य करीत आहेत त्यांना सहकार्य देऊन, त्यांना नियुक्त केलेल्या भूमिकेसंबंधीचे कार्य करण्यास जर वाव दिलात तर अनुभवांती तेही माझ्यासारख्या सिध्दाअवस्थेला जाऊन ‘माध्यम’ म्हणून हे कार्य कालकालांतरापर्यंत जगाच्या कल्याणार्थ अविरत करत राहतील.
कार्यार्थ माझी जी वैयक्तिक भूमिका आहे तिचे स्पष्टिकरण माझ्या यथाज्ञानाने वर केले आहे. जे कार्य गुरुआज्ञेने मी अंगिकारलेले आहे, त्या कार्याची भूमिका व तिची योग्य ती ओळख तुम्हाला व्हावी म्हणून गुरुआज्ञेने हे कार्य युगयुगांतरापासून चालू असून त्या कार्यात आजपर्यंत मानवी जीवनाची सार्थकता होण्यासाठी जी मार्गदर्शनपध्दत सूचित करण्यात आली ती यासाठी की, आजच्या युगामध्ये सर्वसामान्य माणसाला आचार-विचाराने ईश्वरी कृपा प्राप्त करण्यास दीर्घ असा जीवनातील काळ व्यतीत करणे शक्य नाही. म्हणून सुलभ अशा निराकरण पध्दतीतून आपल्या प्राप्त जीवनातील इष्ट कर्तव्याची पूर्तता होऊन आपल्या प्राप्त जीवनाचे सार्थक व्हावे असा सद्हेतू या कार्याच्या भूमिकेशी आहे.
पूर्वीच्या कार्यपध्दतीतून आम्हा मानवांच्या कल्याणासाठी जी निराकरणपध्दती सूचित करण्यात आली, त्यात ऋषिजनांच्या युगात जप-तप, यज्ञ-याग,आदि सूचित करण्यात आले. पण ही साधने अधिक प्रखर असल्यामुळे सर्वसामान्य मानवाला त्याचा लाभ करुन घेता आला नाही. त्यानंतरचा काळ म्हणजे देवदेवतांचा.त्या काळात देवदेवता ही उपास्य दैवते म्हणून अस्तित्वात आली व त्यांच्या कृपाप्राप्तीसाठी कुलधर्म-कुलाचार-कुलोपासना, पंचोपचार, षडोपचार, व्रतवैकल्ये, नवस-सायास आदि मार्ग सूचित करण्यात आले. परंतु ह्या निराकरण पध्दती जरी अधिकारी व सूज्ञ अशा साधकांच्या माध्यमातून सूचित झाल्या होत्या तरी कालपरत्वे मनुष्याला तीही निराकरणे सुलभपणे अंगिकारुन आपल्या प्राप्त जीवनातील इष्ट कर्तव्ये साध्य करण्यास अवघड झाली. अशा या अवघड झालेल्या आचार-विचारांच्या जीवनपध्दतीला वेगळ्या स्वरुपाचे वळण लागून नवीनच अशा शाक्तपंथाचा उदय त्या काळात होऊन त्या पंथानेही वेगळी निराकरण पध्दती सूचित करण्याचे कार्य केले. त्यांच्या कार्यपध्दतीत जरी देवदेवतांचा समावेश केला जात होता, तरीसुध्दा शक्तिचे कार्य ज्या प्रधान माध्यमातून केले जात होते ती शक्ति म्हणजे देवदेवतांच्या नांवे बळी दिले गेलेले प्राणीमात्र होत. अशा ह्या प्राणीमात्रांच्या बलिदानापासून निर्माण केलेली शक्ति ही मंत्र-तंत्र-यंत्र पध्दतीने धारण करुन त्याचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी न होता त्या शक्तिचा वापर जारण-मारण, पिशाच्च-वशिकरण अशा कार्यपध्दतीसाठी करण्यात येऊन त्या काळात जे काहीएक सर्वसामान्य मानव सुख-शांती-समाधानाने जगत होते त्यांना ह्या कार्यपध्दतीमुळे अनेक प्रकारच्या अडचणीना तोंड द्यावे लागले. याचे कारण ज्यांना ही मंत्र-तंत्र-यंत्र कार्यपध्दत साधन म्हणून प्राप्त करता आली, त्यांना इतरांना प्राप्त झालेले सुख पाहण्याचे समाधान न होण्याने त्यांनी ह्या साधनांचा वापर समाजात वैरभाव व परस्परांत दु:खे निर्माण करण्यासाठी केला. यामुळे परमेश्वराला पुढे या साधनपध्दतीचा जो दुरुपयोग झाला होता ती साधनपध्दती नष्ट करुन, मानवी जीवनाला योग्य अशा कार्यपध्दतीतून नेऊन, इहलोक व परलोक या दोन्ही अवस्थांचा लाभ सुलभपणे व्हावा म्हणून ’नाथपंथा’ची स्थापना करावी लागली.
असा सर्वाना परिचित असणारा हा नाथसंप्रदाय ! यासाठी नवनारायणांनी या भूमीवर अवतार घेऊन आपल्या अवतार कार्याला आरंभ केला. या कार्यात प्रथमतः त्यांनी देव-युगामध्ये ज्या देवदेवता बलिदान आदि दुष्कृत्यांनीं शाक्तपंथानी दूषित केल्या होत्या, त्यांचे पुनरुज्जीवन करुन शाक्तपंथातील प्रभावी साधने; मंत्र-तंत्र-यंत्र, जारण-मारण आदि जी त्या काळात अस्तित्वात होती त्यांचा वापर पुढील काळात सहजासहजी करता येऊ नये म्हणून ‘शाबरी विद्ये’ची स्थापना करुन शाक्तविद्येचे उच्चाटन केले. अशा या नाथांच्या कार्यपध्दतीचा आविष्कार भारतभूमीवर होऊन सर्वांना समतोल प्रमाणामध्ये सुख-शांती लाभून पारलौकिक तत्वांचा लाभ होण्यासाठी या नाथपंथीयांना श्रीशंकरानी दीक्षा देवून श्री दत्तात्रयानी अनुग्रहित केले. या दोन देवतांच्या दीक्षा व अनुग्रहपध्दतीमुळे पुन्हा इहलोकात व परलोकात एकरुपत्व होऊन मनुष्याला आपल्या प्राप्त झालेल्या जन्माप्रमाणे ‘जन्मजन्मांतर’ व ‘जन्मकर्म’ या दोन्ही ऋणानुबंधांचा लाभ घेण्याचे योग्य ते साधन प्राप्त झाले. प्राप्त जन्म हा केवळ कर्मांग म्हणून आपणास प्राप्त झालेला नसून, त्या प्राप्त जन्मामध्ये ‘मातृपितृ’ हा एक ऋणानुबंध व दुसरा भाग म्हणजे देवादिक, इतरेजन, जन्मजन्मांतर व जन्मकर्म या ऋणानुबंधांचा हितसंबंध असलेला असा जन्म आहे. केवळ पूर्वजन्मीच्या कर्मपरत्वे जन्म घेतला आहे,अशा संकुचित विचाराने जीवनाकडे पाहून आपण कदापिही सुखी होणार नाही. प्राप्त जन्मात सुख-शांती-संपत्ती-संतती आदिंची अपेक्षा आपण भक्तभाविक करीत असता, त्या आपल्या इष्ट अपेक्षा फलद्रुप न होण्यास मातृपितृ घराण्यातील गेल्या सात पिढीत ज्या दिवंगत व्यक्ती परलोकवासी झाल्या आहेत त्यांच्या इहजगतांशी शिल्लक राहिलेल्या ऐहिक वासना प्राप्त जन्मात अडथळा निर्माण करीत असतात. असा हा दोष ‘वंशविमोचन’ म्हणून निवारण करण्यात येतो. ही वंशविमोचन पध्दत आपल्या कार्यपध्दतीमध्ये आपल्याला जी परिचित आहे, त्या कार्यपध्दतीची कार्ययोजना नवनाथांच्या युगापासून झाली असून त्या कार्यपध्दतीचा लाभ गुरुकृपाशिर्वादाने आपल्या कार्यपध्दतीला लाभला आहे. व हा लाभ आपण सर्व कुटुंबियांना काही एक प्रखर साधन न करता जो सुलभपणे मिळतो आहे त्यासारखे सद्भाग्य ह्या जन्मात अन्य कोणतेही नाही !
आता आपण भक्तांच्या सुख-शांतीच्या प्राप्तीसाठी दुसरे प्रखर असे साधन म्हणजे ‘ऋणमोचन’ होय. ह्या साधनाचा उच्चार करण्यास जरी काही वेळ लागत नसला तरी साधक अवस्थेतील माणसाला हे साध्य करण्यास प्राप्त आयुष्यसुध्दा कमी पडेल इतके हे साधन प्रखर आहे. कारण पूर्वीच्या कर्मपरत्वे पुन्हा जेव्हा आपण इहलोकामध्ये जन्म घेतो तेव्हा आत्मा हा देहाधीन होऊन पुन्हा देहाला वर निवेदन केलेले ऋणानुबंध भोगणे भाग पडते अशावेळी वंशदोषातील ऋणानुबंध हे मानवाच्या देहाभोवती वलयरुपाने कार्यकरीत असतात. पण देवादिक, मातृपितृ, इतरेजन, जन्मजन्मांतर, जन्मकर्म हे पाच ऋणानुबंध देहात वास करीत असतात. अशा या पाच ऋणानुबंधांच्या अनुकूल-प्रतिकूलतेमुळे आम्हा मानवांना विद्या, संपत्ती, संतती आदि महत्वाच्या विषयांची कर्तव्यता सहज व सुलभपणे पूर्णावस्थेला नेता येत नाही. जन्मप्राप्तीनंतर देहाशी हे हितसंबंध झालेले दोष एक केवळ गुरुकृपाशिर्वादाने तरी विमोचित करता येतील किंवा या जन्मांत त्या अनुकूल-प्रतिकूलतेमुळे भोगावे लागणारे दु:ख भोगून पुढील जन्मी योग्य अशा अनुकूल ऋणानुबंधांची प्राप्ती करता येईल. अशा ह्या प्रखर दोषामुळे आज जगतात आपल्या सभोवार अनेक कुटुंबीय अज्ञानाने दु:खाच्या दारात उभे आहेत. परंतु आम्हा मानवांच्या कल्याणार्थ वेळोवेळी परमेश्वराने अवतार घेण्यात कमीपणा न मानता अवतार घेतला आहे. हा अवतार घेण्यामागे परमेश्वराला नावारुपाला किंवा नावलौकिकाला पात्र होण्याची इच्छा नसून, तो कमीपणा त्या दयावंत परमेश्वराने आम्हा मानवांच्या कल्याणार्थ व जीवनरक्षणार्थ घेतला आहे. तरीसुद्धा आम्ही मानव आज भौतिक युगाच्या चाकोरीतून स्वतःला नाशाप्रत नेत आहोत. पण प्राप्त झालेल्या बहुमोल जीवनाचा गैरवापर अज्ञानाने होत आहे याची जाणीव चुकुनही एक दिवस आपल्याला होत नाही. आज आपली विचारधारणा भौतिक युगपरत्वे अशी झाली आहे की, गुरुमार्गी होणे किंवा गुरुमाध्यमाला पूज्य मानणे म्हणजे आपण अज्ञानी असून प्राप्त जीवनात अशा या मार्गाची ओळख करुन घेणे म्हणजे सामाजिकदृष्ट्या कमीपणाचे आहे अशा विचाराने जीवनाचा निरर्थक असा दुरुपयोग आपण करीत असतो. प्राप्त जन्मांत कर्तव्य म्हणून आपल्या मुलाबाळांची जबाबदारी आपल्यावर आहे. त्यांची भवितव्ये ही केवळ इच्छेने व अपेक्षेने पूर्णावस्थेला नेण्यास तुमच्या इच्छा-अपेक्षा आज समर्थ नाहीत. कारण इच्छा-अपेक्षा असणे हा जरी स्वाभाविक मानवी धर्म आहे तरी आज तुमच्या इच्छा-अपेक्षांचा पाया हा देवनिष्ठेचा नसून ऐहिक विषयाचा आहे. ऐहिक विषय हा केव्हाही इच्छा-अपेक्षा साकार करण्यास समर्थ असू शकत नाही. कारण या भिन्नाभिन्न विषयांची निर्मिती व त्या विषयांची आसक्ती आम्ही मानवांनी परस्परांत केली आहे. ज्या ठिकाणी इच्छा-अपेक्षा आहेत व त्यांच्या पूर्ततेची तरतूद परमेश्वराच्या अधिष्ठानावर स्थापित आहे अशा इच्छा-अपेक्षा ह्या केवळ या जन्मातच साकार होणार नसून तुमच्या पुढील अनेक जन्मांत व अनेक पिढ्यात साकार होतील. पण आपण आपल्या भवितव्याचा इतका विशाल विचार करुन जीवन व्यतीत करीत नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आज आपल्या वाट्याला आली आहे. जो देव आपल्या इच्छा-अपेक्षा ह्या अनेक जन्मकालपर्यंत पूर्ण करण्या समर्थ आहे, त्या परमेश्वराला प्राप्त करण्यास जितका सहज व सोपा मार्ग या जगतामध्ये आहे यापेक्षासुध्दा अवघड अशा भौतिक मार्गाचा अवलंब करुन आपण ‘देव मानीत नाही’ असे शाब्दिक भूषण जीवनामध्ये भूषविता. हे भूषण समाजात प्रतिष्ठा निर्माण करण्यास जरी कारणीभूत होत असले तरी कर्मपरत्वे प्राप्त झालेला जन्म, ही प्रतिष्ठा वाकविण्यास भाग पाडतो.