अध्याय ३ – घराण्यातील कुलधर्म
आपण भक्त आपल्या जीवनातील अडीअडचणीनिवारणार्थ ह्या कार्याचा लाभ घेण्यासाठी येता, त्यावेळी प्रथमतः जर कुठला प्रश्न विचारला जात असेल तर तुमच्या घराण्याच्या कुलदेवदेवता व तुम्ही अंगिकारलेले उपास्य दैवत काय किंवा कोणते ? त्या देवतांच्या कृपाशिर्वादार्थ आपण कुलाचार, कुलधर्म, कुलोपासना इत्यादि काय करता ? अशावेळी आपण अज्ञानाने करीत असलेली, या देवदेवतांच्या कृपाशिर्वादाप्रित्यर्थची सेवा ही निवेदन करता. हे ऐकल्यानंतर आपल्या ह्या सांगण्याचे कौतुक वाटते की, ज्या कुलदेवदेवता तुमच्या घराण्याच्या आहेत, त्यांची सेवा म्हणजे कुलधर्म, कुलाचार शास्त्राóय पद्धतीने कसा करावयास हवा हे शास्त्र ऋषीजनांनी जे देवदेवतांच्या युगामध्ये सांगितले, त्या शास्त्रीय पद्धतीनुसार हे होत नसून, केवळ घराण्यात ह्या देवदेवतांचा हितसंबंध कृपाशिर्वाद मिळविण्यासाठी सांगितला आहे, त्यासाठी सेवा म्हणून रुढीपरंपरेप्रमाणे तुम्ही आजपर्यंत करीत आलेले आहात. वास्तविक देवदेवतांच्या युगात, ऋषीजनांनी सांगितलेली पद्धत, म्हणजे कुलधर्म-कुलाचार हे शास्त्रीय पद्धतीने केले तर तुमच्या घराण्यातील भावी पिढ्या अनंतकाळपर्यंत सुखी होतील. आज जगातील प्रत्येक कार्ययंत्रणा ही शास्त्रीय पद्धतीने केल्याशिवाय त्या शास्त्राचे ठिकाणी असणारा मूळ गुणधर्म हा जसा अनुभवास येत नाही, तद्वत् आपल्या इष्ट कुलदेवदेवतां यांचा कुलधर्म, कुलाचार, कुलोपासना आपण शास्त्राय पद्धतीने करीत नाही, त्यामुळे ह्या देवतांचा स्वाभाविक गुण म्हणजे ‘शक्ति’ व तिची सेवा तुम्ही करीत आहात म्हणून तुम्हाला ‘शक्तिमान’ करणे हा जरी आहे, तरी दीर्घकालपर्यंत ह्या कुलदेवदेवता यांची सेवा करुनसुद्धा तुम्हाला ह्या कार्याकडे मार्गदर्शनार्थ यावे लागले.
एका काळात ही सृष्टी रानटी अवस्थेमध्ये जीवन जगत होती. त्यावेळी त्या रानटी अवस्थेमध्ये असलेल्या मानवाला जीवन व्यतीत करण्याचे मूलभूत शास्त्र अवगत झाले नव्हते. किंबहुना त्याचे ज्ञानही नव्हते. त्या काळांत त्यांना धर्म म्हणजे काय ? कर्म म्हणजे काय ? देव म्हणजे काय ? आदींच्या कर्तव्याची ओळखसुद्धा नव्हती. केवळ देहधर्म व त्या देहधर्मपरत्त्वे देहाला जाणविणारी ज्या ज्या प्रकारची भूक किंवा इच्छा-वासना असेल ती पुरी करुन जीवन व्यतीत करणे, इतकाच जीवनाचा अर्थ ते समजत होते. अशामुळे ह्या सृष्टीचे पावित्र्य लयाला जाण्याने, सृष्टीनिर्मितीचा जो परमेश्वराचा सद्हेतू जेव्हा अविकसित असा राहिला, तेव्हा परमेश्वराने स्वर्गलोकातून ऋषीजनांना या भूमीवर पाठवून, वेदवेदांत विद्येप्रमाणे यज्ञ-याग, जप-तप आदि साधनांचा उपयोग करुन, या भूमीला योग्य असे पावित्र्य प्राप्त करुन दिले. ही भूमि योग्यप्रकारे पवित्र झाल्यानंतर, भिन्नाभिन्न ठिकाणी आपली गुरुकुले स्थापन करुन, लोकांना विद्याविद्यार्जन देऊन, त्यांना सज्ञान करण्याचा महान प्रयत्न केला. आज आपणास आपले ‘गोत्र’ काय म्हणून प्रश्न विचारण्यात येतो, पण दुर्दैवाने आज आपल्याला आपले गोत्रही उच्चारता येत नाही. गोत्र उच्चार एवढ्याचसाठी आहे की, ज्या अनादिकाली आपण एका रानटी अवस्थेत होतो, त्या अवस्थेतून सज्ञान अवस्थेत येण्यासाठी ज्या गुरुकुलाचा लाभ घेतलात व आज आपण आधुनिक मानव म्हणून जगत आहोत, पण त्याकाळात ऋषीजनांनी आपल्या देहिक अवस्थेत जी प्रथमतः ‘श्री’ लिहिली त्यामुळे आज आपण चंद्रावर जाण्यापर्यंत शास्त्र उपलब्ध करु शकलो. अशा काळातील हे त्यांचे उपकार आपल्याला जन्मोजन्मी फेडता येणार नाहीत. त्यासाठी, निदान ज्या गुरुकुलातून आपण ज्ञाते झालो, त्याचे स्मरण म्हणून तरी नित्याने गोत्राचा उच्चार करणे आपले कर्तव्य आहे.
या कार्यपद्धतीचा अवलंब होऊन, जेव्हा ह्या रानटी अवस्थेमध्ये असणाऱया आम्हा मानवांना प्राप्त झालेल्या जन्माबद्दल ज्ञान झाले, त्यावेळी जीवन कृतार्थ करण्यासाठी या ऋषीजनांनी ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिगुणात्मक शक्तीला ‘देवदेवता’ व ‘उपास्यदेवता’ म्हणून इहलोकी अवतार घेण्यास प्रार्थना केली. त्या ऋषीजनांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे उत्पत्ति, स्थिती व लय या त्रिगुणात्मक अशा महान शक्तीने भूमीवर येऊन, या विश्वरचनेमध्ये तीन अवस्था धारण करुन, ऋषीजनांचे इष्टफलकार्य अंगिकारले. इहलोकासाठी ‘देवता’ स्थापित झाल्या, परलोकासाठी ‘देव’ अधिष्ठीत झाले व स्वर्गलोकांसाठी ‘उपास्य दैवत’ वास करते झाले.
अशी ही कार्यकारणरचना होऊन ऋषीजनांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देऊन जेव्हा ह्या त्रिगुणात्मक शक्तीने या जगताचे कल्याण करण्याचे कार्य अंगिकारले, तेव्हा इहलोकांत मानवाला विद्या, संपत्ती व संतती यांची अत्यंत गरज आहे म्हणून ती त्रिगुणात्मक शक्ति ‘श्री महाकाली’, ‘श्री महालक्ष्मी’ व ‘श्री महासरस्वति’ या नावरुपे उदयास आली. प्राप्त झालेली विद्या, संपत्ती, संतती यांचे सुख, समाधान, शांति चिरकाल घराण्यात व कुटुंबात वास करीत रहावी म्हणून हे कार्य ‘देवां’च्याकडे दिले. घराण्याची व कुलाची ऐहिक स्थिती सुधारावी व प्रत्येक मनुष्य जो विद्या, संपत्ती व संतती प्राप्त करण्यासाठी अहर्निश प्रयत्न करीत असतो, त्याला योग्य असा कृपाशिर्वाद देऊन, ते प्राप्त करण्याचे सामर्थ्य त्याला प्राप्त व्हावे, म्हणून ह्या देवतांना ‘कुलस्वामिनी’ म्हणण्याचा प्रघात पडला. प्राप्त झालेल्या यशाला निरंतर सुख, शांति, समाधान याचा लाभ करुन देण्यासही यथोचित सहाय्य अत्यावश्यक आहे, म्हणून हे कार्य ‘देव’ यांच्याकडे दिले व या देवांना ‘कुलस्वामी’ असे म्हटले आहे.
जेव्हा आपण अधिव्याधीने व्याकुळ होतो, त्यावेळेला नकळत आपल्या वाणीतून जो ‘आई’ म्हणून उच्चार होतो त्याचा कोणी बोध घेतला आहे काय ? ही हाक, की जी ‘आई’ म्हणून आपण उच्चारतो, ती हाक जन्मदात्या आईशी संबंधित नसून ती आपल्या कुलस्वामिनीशी संबंधित असते. कारण आपण जरी त्या देवतेला भक्तिभावनेने मानीत नसलात, तिची आराधना, सेवा, योग्य प्रकाराने करीत नसलात, तरी ऋषीजनांच्या काळांत ऋषीजनांनी तिला आम्हा मानवांच्या कल्याणार्थ ‘कुलस्वामिनी’ म्हणून संबोधले आहे. त्या ऋषीजनांच्या केल्या गेलेल्या प्रार्थनेचे पालन आज युगापर्यंत ह्या देवदेवता करीत आलेल्या आहेत.आता अशा कुलदेवदेवता की ज्या आम्हा मानवांना अजूनही देवयुगापासून विसलेल्या नाहीत, त्यांना मात्र आपण पाश्चिमात्य संस्कृतीचे; आचार-विचारांचे पांघरुण स्वतःभोवती घेऊन जरी विसरलो आहोत, तरी जगाच्या अंतापर्यंत ह्या देवदेवतांचे कार्य बदलत्या काळाप्रमाणे बदलणारे नाही व कोणात्याहि इच्छेप्रमाणे ते बदलणार नाही, हे सूज्ञ भक्तांनी लक्षांत घ्यावे.
आपल्या जीवनात अद्भूत व अनपेक्षित अशी एखादी गोष्ट घडते तेव्हा नकळत आपण ‘देवा’ म्हणून हाक मारतो. ही वरीलप्रमाणे आपल्या ठिकाणी वास करीत असलेल्या देवाची साक्ष आहे. याचा अर्थ असा की, प्रसंगपरत्त्वे जर देव आणि देवता ह्या तुमच्या ठिकाणी सामावलेल्या आहेत याची साक्ष देतात, तर ‘मी देव मानीत नाही’ असे म्हणणे भूषणावह आहे काय ? जरी तुम्ही अज्ञानाने त्यांचा अव्हेर केला आहे तरी त्या देवदेवतांनी तुमचा अनादर कदापिही व कधीही केलेला नाही. याउलट वेळोवेळी जेव्हा तुम्ही आधिव्याधीत जर्जर झालेले आहात, संकटग्रस्त झालेले आहेत, तेव्हा त्यातून तारुन नेण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे; म्हटल्यानंतर त्यांच्याप्रीत्यर्थ करावी लागणारी सेवा म्हणजे कुलधर्म-कुलाचार-कुलोपासना, किती आस्थेने आपणास करावयास पाहिजे हा प्रश्न आपण भक्तांनी आपणां स्वतःसच विचारावा. आजपर्यंत समाजात अनेक कुटुंबिय व व्यक्ति आपल्या घराण्यातील कुलदैवतांचे कुलधर्म-कुलाचार पिढ्यान्पिढ्या करीत आले असून, अशा व्यक्ति निराकरणार्थ कार्यकेंद्रावर आल्यावर असा प्रश्न विचारत्या होतात की, ज्या आमच्या घराण्याच्या कुलदेवदेवता आहेत त्यांच्याप्रीत्यर्थ आम्ही व आमच्या घराण्यांतील पूर्वापार पिढ्यातील लोकांनी ह्या देवतांची सेवा मनोभावनेने केली असताना आमच्या वाट्याला अडीअडचणी का याव्यात ? पण याचे उत्तर शास्त्रीयपरत्त्वे न समजल्याने व अपेक्षित फलप्राप्ती न होण्याने, ह्या देवदेवता जरी कुटुंबाला पिढ्यान्पिढ्या कुलदेवता आहेत तरी त्यांची आराधना योग्य मार्गाने व योग्यप्रकाराने करण्याकडे बहुजन समाजाचे दुर्लक्ष होत गेले आहे. साधारणपणे ज्या घराण्याच्या कुलदेवता म्हणून आहेत त्यांची आराधना, पूजाअर्चा करण्याचे कर्तव्य कुटुंबातील एक प्रमुख व्यक्ती करीत असते. ह्या ज्या देवदेवता पूजनांत असतात, ही त्या देवतांची प्रतिके जरी आपणास सगुण अवस्थेत दिसत असली तरी, जेव्हा त्यांची कृपा आपल्यावर होते, ती कृपा निराकार अवस्थेत होत असल्याने, आपल्याला त्या प्राप्त झालेल्या कृपाशिर्वादाची जाणीव होत नाही. याला कारण आपल्याकडे ‘लय’ तत्त्व हे कमी असल्याने, जो आशिर्वाद निराकार म्हणून आहे त्याचे अस्तित्त्व समजत नाही. पूजनादि विधी करणाऱया व्यक्तीला आपल्यापाशी जे लय तत्त्व कमी आहे ती उणीव देवदेवतांच्या कृपाशिर्वादाने भरुन काढायची आहे ही जाणीव होत नसल्याने, जरी ह्या देवदेवतांनी कुटुंबकल्याणार्थ कृपाशिर्वाद दिला तरी पूजनादि विधी करणाऱया व्यक्तीचे माध्यम कृपाशिर्वाद धारण करण्यास जोपर्यंत योग्य होत नाही तोपर्यंत प्राप्त झालेला कृपाशिर्वाद कुटुंबकल्याणार्थ व कुटुंबातील व्यक्तींना प्राप्त होण्यास अडथळा निर्माण होत असतो.
अशावेळी आपण भक्तांची विचारणा अशी होण्याची शक्यता आहे की, आमच्यापाशी कुटुंबकल्याणार्थ लय तत्त्व कमी आहे हे आम्ही समजावे कसे ? तर हे अनुमान काढण्याची सोपी पद्धत अशी की,तुमच्या इष्ट कुलदेवता यांच्याप्रीत्यर्थ तुम्ही एखादे स्तोत्र वाचण्यास किंवा जप म्हणण्यास देवासमोर जर बसलात व ते करण्यास जर अर्धा तास लागत असेल, तर अशा ह्या अर्ध्या तासाच्या सेवेत जरी काया व वाचा सामावली असली तरी अशावेळी जर मनाची एकाग्रता तो जप म्हणण्यात किंवा स्तोत्र वाचण्यात होत नसेल तर निश्चित आपल्या देहिक माध्यमात लय तत्त्वाची कमतरता आहे असे समजावे.
अशा व्यक्ती मार्गदर्शनार्थ आल्यावर केंद्रावरील नियुक्त सेवक त्यांना कुलदेवतांप्रीत्यर्थ पूजनार्थ श्रीफल देऊन, पाच किंवा अकरा आठवडे पूजनाचे निराकरण करतात. अशावेळी प्रश्नार्थ आलेल्या व्यक्ती सेवकांना असे सूचित करतात की, आमच्या कुलदेवतांप्रीत्यर्थ आमच्या घराण्यात यथायोग्य तऱहेने कुलधर्म, कुलाचार होत असताना पुनःश्च त्या देवदेवतांचे प्रतिक म्हणून श्रीफलाचे पूजन करण्याचा उद्देश काय ? जर याचा उद्देश असा की, जरी तुम्ही आपल्या इष्टदेवतांप्रीत्यर्थ कुलधर्म, कुलाचार करुन कृपाशिर्वाद प्राप्त करते झालात तरी, इष्टदेवतांनी दिलेला कृपाशिर्वाद ही अवस्था निराकार असल्याने, आपली देहिक माध्यमे तो धारण करण्यास समर्थ नाहीत. आपण भक्तांनी जी कुलदेवतांची आराधना व कुलधर्म, कुलाचार केला आहे, त्या शक्तिवलयाचे अस्तित्त्व आपण रहात असलेल्या वास्तूतच असते. अशावेळी दिलेल्या कृपाशिर्वादाच्या श्रीफलामुळे तुम्ही आजपर्यंत केलेल्या सेवेची फलप्राप्ती होण्यासाठी हे श्रीफल ‘मध्यस्थ’ म्हणून कार्य करते. ही एक महत्त्वाची ओळख आपणास व्हावयास पाहिजे व या दिलेल्या श्रीफलाचे महत्त्व आपल्या इष्टदेवतांइतकेच मानून मार्गदर्शनाप्रमाणे त्याची पूजा-अर्चा करावयास पाहिजे. तरच आपण जी सेवा आपल्या इष्टकुलदेवतांप्रीत्यर्थ केली आहे तिचा अपव्यय झालेला नसून, तो कृपाशिर्वाद साकार करण्याचे महत्कार्य ह्या श्रीफलमाध्यमद्वारा होत असते हे आपल्या अनुभवास येईल.
देवदेवतांनी कृपाशिर्वाद देऊनही जी मंडळी आज दु:खी आहेत याला दुसरे महत्त्वाचे कारण असे की, काही व्यक्तींना कीर्तने, पुराणे किंवा काही धार्मिक ग्रंथांचे वाचन करुन असे वाटू लागते की, देवदेवतांची सेवा, आराधना करुन आपण केलेल्या सेवेतून मोक्ष-मुक्ति प्राप्त व्हावी. हा त्यांचा जो सद्हेतू प्राप्त झालेल्या जन्माबद्दल असतो, हा हेतू इतरांना कळत नसल्याने ही व्यक्ती वर्षानुवर्षे सेवा करीत असूनही या सेवेचे फल कुटुंबात प्राप्त होत नाही. मुक्ति व मोक्षप्राप्तीसाठी जर ह्या व्यक्तीने सेवेचा अंगिकार केला असेल, तर ही सेवा त्या व्यक्तीच्या अज्ञानाने तिने व्यक्तिगत स्वार्थासाठी केली आहे हे सिद्ध होते व वर्षानुवर्षे असा सेवेचा अंगिकार करुनही कुटुंबातील अडीअडचणी निवारण करण्यास ह्या सेवेचा लाभ होत नाही. वास्तविक, शास्त्रशुद्ध पद्धतीप्रमाणे मोक्ष किंवा मुक्ति ही वर्षानुवर्षें देवदेवतांची सेवा, आराधना करण्याने प्राप्त होत नाही. तर अशा व्यक्तींनी आपल्याला प्राप्त झालेल्या जन्मातील इष्टकर्तव्याची पूर्तता केली की प्राप्त झालेला जन्म व पुढे येणारे जन्म हे जे कर्मपरत्त्वे असतात,अशा कर्माचा क्षय कर्तव्यपूर्तता केल्यामुळे जो होतो, त्यामुळे आपोआपच म्हणजे निसर्गतःच मुक्ति किंवा मोक्ष प्राप्त होणे हा सहजधर्म आहे. तेव्हा करीत असलेल्या सेवेबद्दल जर आपण नि:स्वार्थ रहाल, तर ह्या सेवेचा लाभ कुटुंबातील इतर व्यक्तींना होण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
ह्याच विषयाच्या हितसंबंधात तिसरे महत्त्वाचे कारण असे की, ज्या इष्टदेवतांची पूजनार्थ,सगुण साकार अवस्थेत प्राणप्रतिष्ठा केली जाते व जो कृपाशिर्वाद त्या देवदेवता देतात, ती अवस्था निराकार असल्याने, जी व्यक्ति पूजन-अर्चनादि विधी करीत असते, अशा व्यक्तीच्या देहिक माध्यमाच्या परिसरात हे कृपाशिर्वादाचे वलय हितसंबंधित असते. जेव्हा ही व्यक्ति दिवंगत होते तेव्हा हे कृपाशिर्वादाचे वलय जे निराकार अवस्थेत आहे ते निसर्गाधीन होते. त्यामुळे पिढ्यान्पिढ्यांचा हा सेवेचा वारसा जरी आपण निराकरणार्थ आल्यावर सांगत असलात, तरी जी अवस्था निराकार झाली आहे, तिला पुनःश्च कुटुंबकल्याणार्थ साकार करण्याचे कार्य हे गुरुमाध्यमाशिवाय कोणालाही करता येत नाही. देवदेवता ह्या जरी कृपाशिर्वाद देतात, तरी आपण अज्ञानाने किंवा स्वार्थाने जेव्हा तो गमावून बसतो, त्यास पुनःश्च साकार करण्याचे कार्य ह्या देवदेवता करीत नाहीत, तर हे कार्य गुरुसामर्थ्याने होत असते. अशा ह्या शास्त्रीय सिद्धांताप्रमाणे आपण भक्त जेव्हा मार्गदर्शनार्थ आलात त्यावेळी प्रथमतः जी ‘उपासना दीक्षा’ दिली गेली, तिचा उद्देश हाच होता की, आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तींनी आजपर्यंत आपल्या घराण्याच्या इष्टदेवतांची जी मनोभावे आराधना केली व जो कृपाशिर्वाद प्राप्त होऊनही तो साकार करता आला नाही, तो पिढ्यान्पिढ्यांचा ठेवा आपण भक्तांच्या रक्षणार्थ व कल्याणार्थ यावा म्हणून दीक्षापरत्त्वे, श्रीगुरु ही केली गेलेली सेवा आपल्या देहिक माध्यमाशी जोडून देतात. आज समाजात खरे व खोटे असे दोन्ही मार्गांचे गुरु अस्तित्त्वात आहेत. पण वर लिहिल्याप्रमाणे कार्य करणारे गुरुमाध्यम हे आपल्यासारखेच मानवी देहिक माध्यमातून लोककल्याणाचे कार्य करीत असल्याने, त्यांचे कार्य व त्यांचा अधिकार न समजल्याने, ह्या त्यांच्या लोककल्याण कार्यास आपण बुवाबाजी म्हणून समजून, त्यांच्यापासून चार पावले दूर राहण्याचा जो प्रयत्न करतो, हेच अज्ञानाचे विष आपल्याला जन्मोजन्मी भोगावे लागते.
कुटुंबातील इष्ट सुख व शांति व त्या सुखाची प्राप्ती ही घराण्याच्या परंपरेतील कुलदेवदेवता यांचा कुलधर्म-कुलाचार-कुलोपासना यावर अवलंबून आहे म्हटल्यावर साहजिकच आपल्याला तो यथायोग्य तऱ्हेने कृपाशिर्वाद त्या देवदेवता देतात, ती अवस्था निराकार असल्याने, जी व्यक्ती पूजन-अर्चनादि विधी करीत असते, अशा व्यक्तीच्या देहिक माध्यमाच्या परिसरात हे कृपाशिर्वादाचे वलय हितसंबंधित असते. ज्या कुटुंबातील इष्ट सुख व शांती व त्या सुखाची प्राप्ती ही घराण्याच्या परंपरेतील कुलदेवता यांचा कुळधर्म-कुलाचार-कुलोपासना यावर अवलंबून आहे म्हटल्यावर साहजिकच आपल्याला तो यथायोग्य करण्याचा मार्ग शास्त्रीयदृष्ट्या माहीत व्हावा, यासाठी पुढील निवेदन आपल्या मार्गदर्शनार्थ गुरुकृपाशिर्वादाने देत आहे.
प्रथमतः तुमच्या घराण्याच्या कुलदेवदेवता कोण आहेत हे जाणत्या साधकाकरवी माहिती करुन घ्यावयास हवे. कारण वेगवेगळ्या कुटुंबपरंपरेप्रमाणे ऋषीजनांनी वेगवेगळ्या देवदेवता ह्या कुलधर्म, कुलाचार व कुलोपासनेसाठी निश्चित केल्या आहेत. ज्या घराण्याची कुलस्वामिनी श्रीमहालक्ष्मी आहे, त्या घराण्याचा कुलस्वामी श्रीज्योतिबा किंवा केदारनाथ आहे. श्रीमहालक्ष्मीचे पीठ कोल्हापूर येथे असून, श्रीज्योतिबाचे निवासस्थान हेही कोल्हापूरजवळ आहे. त्याचप्रमाणे ज्या घराण्याची कुलदेवता श्रीमहासरस्वती आहे, तिचे पीठ तुळजापूर येथे असून, कुलस्वामी श्रीखंडोबा याचे स्थान जेजुरी येथे आहे. पूर्वीच्या काळी ही स्थाने व पीठे दूरवर असल्याने, भक्तांना वारंवार त्यांच्या दर्शनार्थ जाणे शक्य नव्हते. म्हणून याच देवतांची उपपीठे इतरत्र स्थापन करण्यांत आली. त्या उपपीठांपैकी दक्षिण महाराष्ट्रात औंध येथे श्रीयमाईचे पीठ असून, पालीस श्रीखंडोबाचे पीठ आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी भक्तांच्या सोयी नुसार त्यांना दर्शनाचा लाभ घेता यावा म्हणून ही योजना करण्यात आली. त्याप्रमाणे आपण आपल्या देवदेवतांना भिन्नाभिन्न गावी त्यांची स्थाने आहेत म्हणून मानीत असलात तरी एकदा का होईना,त्या मूळ पीठांचे व स्थानांचे दर्शन घेणे अत्यावश्यक आहे. आता श्रीमहाकाली हीनें कालपरत्त्वे अनेक रुपे धारण केली असल्याने, वेगवेगळ्या घराण्यांत व जातीत ती जरी वेगगळ्या नावाने संबोधली गेली असली तरी मूळपीठ श्रीमहाकाली हे काही बदलले गेले नाही. उदाहरणार्थ लोणावयाजवळ असलेले एकवीरेचे स्थान, गावोगावी असलेली बोलाई, त्याचप्रमाणे सौंदत्ती येथे असलेली यल्लम्मा, (काही ठिकाणी जिला श्रीरेणुका म्हणून संबोधण्यात येते) हेही पीठ कालीस्वरुपच आहे. काही भक्त आपली देवी काळूबाई म्हणून सांगतात, हेही पीठ महाकाली पैकीच आहे. ह्या महाकालीपीठाचा कुलस्वामी श्रीकाळभैरव असून,जरी श्रीखंडोबाची आराधना श्रीकाळभैरवाऐवजी कुलस्वामी म्हणून केली तरी चालते. परंतु ह्या कुलस्वामीचे स्थान मंगसुळी येथे असून ते श्रीखंडोबाचे आद्यपीठ आहे. काही घराण्यातील कुटुंबांची कुलस्वामिनी सप्तश्रृंगी की जीचे पीठ नाशिकजवळ वणी येथे आहे, ती महासरस्वती असून, त्या पीठाचा कुलस्वामी जेजुरीचा श्रीखंडोबा हा आहे. त्याचप्रमाणे माहूरगडला जे देवीचे स्थान आहे ते श्रीमहासरस्वतीचे असून, तिचे मूळ पीठ तुळजापूर आहे. त्या पीठाचा कुलस्वामी हाही जेजुरीचा खंडोबा होय.
समाजात ब्राह्मणवर्गात कऱ्हाडे, कोकणस्थ व देशस्थ असे जे जातीचे पोटविभाग करण्यात आले, त्यानुसार वरील देवदेवता कऱ्हाडे व देशस्थ या घराण्यांच्या झाल्या. कोकणस्थांची कुलस्वामिनी श्रीजोगेश्वरी ही महासरस्वतिस्वरुप आहे. तिचे पीठ अंबेजोगाई असून,त्या कुटुंबियांचा कुलस्वामी श्रीशंकर आहे, ज्याला वाडेश्वर किंवा हरिहरेश्वर या नावांनी संबोधतात. अनेकांच्या सांगण्यात येते की, त्यांची कुलदेवी आर्यादुर्गा किंवा दुर्गादेवी आहे. ही स्वरुपेसुद्धा महासरस्वतीचीच होत.
वर निर्देशन केलेली ही महाराष्ट्रातील देवदेवतांची परंपरा आहे. त्या परंपरेप्रमाणे मध्यभारत, उत्तर भारत या ठिकाणी या देवतांची स्थाने भिन्नाभिन्न नावांनी संबोधण्यात येत असली तरीसुद्धा ही त्या त्रिगुणात्मक शक्तिस्वरुपाचीच प्रतिके आहेत. उदाहरणार्थ गुजरातमध्ये श्रीसंतोषिमाता ही महालक्ष्मी, श्री बहुचराई ही महाकाली व अबु येथे असणारी, माताजी या नावाने संबोधण्यात येणारी कुलस्वामिनी ही महासरस्वती आहे.
आता गोमंतक किंवा गोवा म्हणून ज्याची आपल्याला ओळख आहे, त्याठिकाणी बहुसंख्य सारस्वत घराणी आहेत. त्या घराण्यांच्यासुद्धां देवदेवता याचप्रमाणे आहेत. श्रीशांतादुर्गा ही ज्या घराण्याची कुलस्वामिनी आहे, त्या घराण्याचा कुलस्वामी श्रीमंगेश होय. त्याच घराण्यामध्ये ‘पालवी’ म्हणण्याचा जो प्रघात आहे, त्याचा अर्थ उपास्य दैवत. ज्या घराण्याची कुलस्वामिनी श्रीकामाक्षी आहे, त्यांचा कुलस्वामी श्रीरामनाथ होय.ज्या घराण्याची कुलस्वामिनी श्री म्हाळसा नारायणी आहे, त्यांचा कुलस्वामी श्रीरवळनाथ आहे. काही सारस्वत घराण्यांनी योग्य मार्गदर्शनाच्या अभावी उपास्यदेवता म्हणजे पालवी आहे असे म्हणण्याचा प्रघात सुरु केला. परंतु कुलस्वामिनी किंवा कुलस्वामी हे उपास्य दैवत होऊ शकत नाही हे आजपर्यंत त्या घराण्यातील भक्तभाविकांना न समजल्यामुळे, पालवी म्हणजे एक अधिक कुलस्वामिनीची आराधना त्यांनी आपल्या घराण्यांत रुढीपरंपरेप्रमाणें अज्ञानानें सुरु केली. वास्तविक शास्त्राप्रमाणे प्रत्येक घराण्याला एकच कुलस्वामिनी म्हणून त्या देवतांची आराधना करणे त्या कुटुंबियांच्या हिताचे आहे.
गोमंतकात सारस्वत ब्राह्मणांव्यतिरिक्त अन्य जातीतील कुटुंबिय ज्या देवदेवतांची नावे सांतेरी, महामाया इत्यादि सांगतात, ही सर्व रुपे महालक्ष्मीचीच आहेत. हा सर्व बोध लक्षात घेऊन, आपापल्या घराण्यापरत्त्वे प्रत्येकाने आपापल्या कुलदेवदेवता यांची ओळख झाल्यावर, त्यांचा भक्तिभावनेने कुलधर्म-कुलाचार करण्यासाठीं, त्यांची योग्य प्रतिके म्हणजे टाक किंवा मूर्ति ही त्या स्वरुपाबरोबर आहेत की नाहीत हे पडताळून पाहून, त्यांची स्थापना गुरुजनांकरवी करावी.
गुरुजनांना या देवदेवतांच्या स्थापनाविधीसाठी आमंत्रित केल्यावर,ते शास्त्रशुद्ध स्थापनाविधी करतात किंवा नाहीत हे पण आपल्याला अगत्याने समजले पाहिजे. ज्या प्रतिमा किंवा प्रतिके कुलस्वामिनीची म्हणून आहेत त्यांना पंचामृत अभिषेक करीत असताना, गुरुजनांना ‘श्री सूक्ताचा’ अभिषेक करण्यास सांगावा. अभिषेक होत असताना, त्या सूक्ताचा उच्चार सोळा वेळा होणे आवश्यक आहे. अशी स्थापना झाल्यावर शुद्ध वस्त्र नेसून गोड नैवेद्य करावा. नैवेद्य समर्पणानंतर देवीची मनोभावनेने ओटी भरावी. ही ओटी प्रथमतः एका ताटांत किंवा ताम्हनात एक श्रीफल, एक खण, (की ज्याला दोन्ही बाजूने काठ आहेत) असा घेऊन त्या खणाची घडी करुन, तो खण दुसऱ्या ताटात ठेवून, त्यावर तीन ओंजळी गहू किंवा तांदूळ हे ठेवावेत. ठेवलेल्या खण व गव्हावर हळद, कुंकू व साखर अशा तीन पुड्या ठेवून, उजव्या बाजूस दोन विड्याची देठासकट पाने, सुपारी व रुपया सव्वा ठेवावा. त्यानंतर श्रीफळास हळदकुंकू वाहून ते व एक फळ हातात ओंजळीत धरुन, ती देवदेवतांपुढे धरावी व भक्तिभावनेने असी प्रार्थना करावी की, ‘मी माझ्या यथाशक्ति व यथाज्ञानाने तुझी जी सेवा केलेली आहे ती स्वीकारुन, मला निरंतर असा कृपाशिर्वाद देऊन, मला जन्मोजन्मी तुझी सेवा करण्याचे भाग्य दे’. अशी काढलेली ओटी सायंकाळपूर्वी देवापुढे ठेवावी. त्यानंतर ज्या सुवासिनीने ही ओटी काढली आहे, तिने ही ओटी देवीच्या देवळात पोचवून मगच अन्नग्रहण करावे. ओटी भरत असताना सुवासिनीने शक्यतो काठपदराचे पातळ परिधान करावे. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी ही ओटी आपण रहात असलेल्या गावातील स्थानिक देवतेच्या देवळांत नेऊन द्यावी. अशावेळी ती स्थानिक देवी श्रीमहालक्ष्मी, श्रीमहासरस्वती की श्रीमहाकाली आहे याचा विचार करु नये. कारण आज समाजात कोणीही सुवासिनी दिल्या गेलेल्या खणाची चोळी शिवत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकरवी पुनःश्च त्या खणाची देवाणघेवाण चालू होते.
आता ज्या कुलस्वामीची स्थापना आपल्याला करावयाची आहे, त्याचेही प्रतिक किंवा प्रतिमा त्या देवाप्रमाणे आहे किंवा नाही हे समजून घेऊन, ह्या प्रतिमेची किंवा प्रतिकाची स्थापना गुरुजनांकरवी पंचामृत अभिषेकपूजेने करवून घ्यावी. या कुलस्वामीच्या स्थापनेसाठी पुरुषसूक्त किंवा रुद्र या सूक्तांचा उच्चार करण्यात यावा. ही दोन्ही सूक्ते शक्यतो गुरुजनांकरवी अकरा वेळा म्हणवून घ्यावीत. ते शक्य नसल्यास कुलस्वामिनीचे श्रीसूक्त व कुलस्वामीचे पुरुषसूक्त किंवा रुद्रसूक्त यांचा सकृत पाठ, म्हणजे एक आवर्तन करुन घेतले तरी चालेल. अशी ही स्थापना विधीपूर्वक झाल्यावर, वरीलप्रमाणेच देवाला नैवेद्य समर्पण करुन ब्राह्मण सुवासिनी जेवावयास वाढावी. पण आज इतका शास्त्रशुद्ध विधी जरी आपण केला तरी त्याचे योग्य ते फल मिळण्यास जो अडथळा आहे तो देवांच्याकडे नाही. आपण ज्या सुवासिनीला देवीच्या ठिकाणी मानून, सुवासिनी म्हणून बोलावतो, त्या सुशिक्षित व कुलीन स्त्रिया मासिक पाळीची बंधने पाळीत नसतात. त्याकाळात त्या घरात स्वयंपाक आदि करुन विटाळातील अन्न ग्रहण करीत असतात. हे न पाळणे ही जरी आजच्या समाजाची फॅशन झाली आहे तरी आजच्या बदलत्या आधुनिक काळात फॅशनेबल होऊन ज्या स्त्रिया विटाळातील अन्नग्रहण करतात, त्यांना आपल्या ठिकाणी सुवासिनी म्हणून सामावण्यास देवदेवता अजून तयार नाहीत. त्यामुळे जरी आपण सुवासिनी जेवावयास घातली असे मानतो, तरी ज्या भक्तिभावनेने हा विधी आपण करतो त्याचे फल आपणांस मिळत नाही.
कुलस्वामीची स्थापना झाल्यावर त्याचे स्मरण म्हणून आपण ब्राह्मण जेवावयास बोलावतो. पण ‘ब्राह्मण’ या शब्दाचा अर्थ जातिवाचक नसून, ज्या मनुष्याच्या ठिकाणी ह्या जन्मात तीन देह, म्हणजे स्थुल, सूक्ष्म व कारण हे एकरुप झालेले आहेत व ज्यांचे एकरुपत्त्व उपनयनाचे वेळी गुरुजनांनी गायत्री मंत्राची दीक्षा देऊन, यज्ञोपवीत धारण करावयास लावून केलेले आहे, असा आहे. पण ज्या यज्ञोपवितामुळे हा देह, तिन्ही अवस्थांना एकरुप करुन, पुढे विद्या, संपत्ती, संतती आदि सुखांचा लाभ घेण्यासाठी बलवान करण्याचा हेतू जो वेदशास्त्राचा आहे, तो हेतू यज्ञोपविताबरोबरच आपण अंगाबाहेर टाकलेला असतो. अशा व्यक्तींना विद्या, संपत्ती व संतती ही कष्टाने तर प्राप्त करावी लागतेच, पण विवाहोत्तर जीवनानंतर जेव्हा इच्छित संततीची अपेक्षा या व्यक्तींची असते, ती पूर्णत्त्वास जात नाही.कारण संततीच्या उत्पत्तिकाळापर्यंत उपनयनापासून यज्ञोपवीत धारण करुन, जे वीर्य म्हणजे पुरुषबीज हे शक्तिमान करावयाचे असते, ते न झाल्याने अशक्त व असमर्थ असे बीज प्रजोत्पत्ति म्हणून जन्मास येते. पुढे अशी समस्या उभी राहते की, ‘माझ्या मुलाचे विद्याभ्यासात लक्ष नाही,’ किंवा ‘ त्याची धारणाशक्ति अपेक्षेप्रमाणे नाही.’ जी चूक आपण करुन, आपल्याच अज्ञानाने, आपल्या धर्माने आपल्या हितार्थ केलेली शास्त्रशुद्ध तरतूद आपण निरर्थक आहे असे ठरविले, त्याचे फल पुढे अशा प्रकारे अनुभवास येते. ज्या व्यक्तींना हा उपनयन विधी केल्यानंतर यज्ञोपवित धारण करण्यास कमीपणा वाटतो, त्यांना ब्राह्मण म्हणून जेवावयाचा अधिकार नाही. त्याचप्रमाणें त्यांनी जरी देवदेवतांची भक्ति आपल्या यथाशक्ति व यथाज्ञानाने केली, तरी त्याचे फल पूर्णतः न मिळता ते अंशतःच मिळते. याशिवाय यज्ञोपवित धारण करण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण असे आहे की, जेव्हा आपण विवाहित होता त्यावेळी ज्या वधूचा कन्यादान म्हणून स्वीकार करता, ते दान कन्यादान नसून आपल्यासमोर जी वधू आहे तिचे ‘जन्मकर्म’ आपण स्विकारता असा हा शास्त्रीय सिद्धांत आहे. आपण जन्माला येतेवेळी स्वतःचे जन्मकर्म हे आणलेलेच आहे. त्या जन्मकर्मपरत्त्वे जी इष्टकर्तव्ये आपल्याला आपल्या कुटुंबाप्रीत्यर्थ करावयाची आहेत, त्यामध्ये या कन्यादानाचा स्वीकार होण्याने आपली जबाबदारी दुप्पट होते. ही दुप्पट जबाबदारी पेलण्यासाठी सामर्थ्यही दुप्पट असावयास पाहिजे. यासाठी जीवनारंभाची प्रथम दीक्षा, म्हणजे ‘गायत्री मंत्र,’ हा नित्याने म्हणून देहिक सामर्थ्य चिरकाल टिकविण्यासाठी यज्ञोपवित हे दर पौर्णिमा व अमावस्या या दिवशी बदलावे. याशिवाय जर कुटुंबात सोयरसुतक आले, परान्न घेतले, अगर श्राद्धपक्षादि विधीत अन्नग्रहण केले, तर दुसरे दिवशी स्नानापूर्वी तुळशीपत्र सेवन करुन स्नान करावे. स्नानानंतर यथाशक्ति दान पाण्यात बुडवून देवाजवळ ठेवावे व मग यज्ञोपवित बदलावे. ज्यांना यज्ञोपवित धारण करण्याचा अधिकार आहे, त्यांनी वैवाहिक जीवनापर्यंत तीन, विवाहानंतर पत्नीचे एक अशी चार व गुरुदीक्षा घेतल्यानंतर पाच यज्ञोपविते धारण करावीत. वरील गायत्रीमंत्र व यज्ञोपविताबद्दलची शास्त्रशुद्ध मीमांसा समजल्यावर ज्यांना उपनयन करुन घेण्याचा अधिकार आहे त्या व्यक्तींनी आपल्या मुलांची उपनयने योग्य वेळीच म्हणजे वय वर्षे आठ यावेळी करावीत. कारण या वयापासून मुलांच्या इंद्रिय अवयवांची वाढ होण्यास आरंभ होतो. ती वाढ तीन देहिक अवस्थांना पोषक व्हावयास पाहिजे. पण आपल्या सर्वांची अशी भ्रामक विचारसरणी असते की, मुलांची मुंज ही थाटामाटात झाली पाहिजे, पै-पाहुणे आले पाहिजेत, त्यांना यथोचित आहेर द्यावयास पाहिजे. पण यासाठी लागणारे पैसे यांची शिल्लक दुर्दैवाने जर होऊ शकली नाही तर तो बटू-अवस्थेतील मुलगा प्रौढ अवस्थेपर्यंत, म्हणजे वय वर्षे अठरापर्यंत येऊन पोचतो. ही त्या अपत्याची अठरा वर्षापर्यंतची अविकसित झालेली स्थिती पुढे विद्याविद्यार्जनानंतर जेव्हा हे अपत्य ह्या जगात आपले कर्तव्य म्हणून नोकरी-धंदा-व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करते, एवढेच नव्हे तर अपेक्षेपलिकडे महत्त्वाकांक्षेची भेट व्हावी अशी इच्छा प्रदर्शित करते, त्यावेळी वय अठरा वर्षेपर्यंत जो जन्माचा विकास न होता अविकसित राहिला तेवढे जीवन ह्या प्रयत्नांत कमी पडते.
सूज्ञ भक्तांनो, ह्या कर्तव्याची जबाबदारी परमेश्वराची नसून तुमचीच आहे. तुमच्या जीवनाचा योग्य विकास व्हावा याची परमेश्वराने सर्वतोपरी तरतूद करुनसुध्दा तुम्ही अज्ञानाने जर हे जन्माचे परमपवित्र असे फल अनुभविता तर, ‘मी दु:खी आहे. पण देव अजून माझ्या हाकेला ‘ओ’ देत नाही‘, असे म्हणून चालेल काय ?
समाजात ज्या व्यक्तींना यज्ञोपवित धारण करण्याचा अधिकार नाही, अशांच्या देहिक अवस्थेचा विकास होण्यासाठी शास्त्राने काही तरतूद केली नाही काय ? तर तीसुध्दा तरतूद शास्त्रशुध्द अशीच केलेली आहे. ती अशी की, त्या व्यक्तींनी दर शनिवारी सकाळी स्नानापूर्वी तुळशीपत्र ग्रहण करुन स्नान करावे. स्नानानंतर पंधरा किंवा तीस पैसे पाण्यात बुडवून, देवापुढे ठेवून, दुपारी बारापूर्वी ते पैसे मारुतीचे मंदिरात नेऊन ठेवावेत. ही उपासना वय वर्षे आठपासून अठरापर्यंत करावी, म्हणजे उपनयन व विवाह हे दोन्ही संस्कार त्यामध्ये समावले जाऊन, त्या भक्तांच्या जीवनाचा पूर्णतः विकास होतो. विवाहानंतर त्यांनी दर पौर्णिमेस अशाच प्रकारे सकाळी स्नानापूर्वी तुळशीपत्र ग्रहण करुन, तीस पैसे दान म्हणून स्नानानंतर काढावेत व ते दुपारी बारापूर्वी श्रीमारुतीच्या मंदिरात नेऊन ठेवावेत. याशिवाय अमावास्येस एक बिल्वपत्र देवापुढे ठेऊन, तीस पैसे दान त्या बिल्वपत्रावर ठेवावे व नंतर ते दान व बिल्वपत्र श्रीशंकराचे मंदिरात नेऊन ठेवावे.
आजपर्यंत परमेश्वराने आम्हा मानवांच्या कल्याणार्थ किती सखोल विचार करुन, शास्त्रशुध्द पध्दतीने जीवन साकार करण्याचा महत्कार्यभाग अंगिकारला आहे. तो अनंतरुपी परमेश्वर आपणां सर्वास आपली लेकरे म्हणून वागवीत असून, त्याने कोणाही व्यक्तीचा धर्म म्हणून किंवा जातपात म्हणून अव्हेर केलेला नाही. सर्वांना आपली लेकरे समजून त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची तरतूद तो दयावंत अहर्निश करीत आहे. असे असताना आज आपण वैज्ञानिक युगात सुशिक्षित आहोत, विचारसंपन्न आहोत म्हणून सांगतो; पण जर आपल्या आचारविचारांकडे बारकाईने पाहिले तर असमाधान, जातिपातिपरत्वे मतभेद, निंदा-नालस्ती, एकमेकांनी एकमेकांना कमीपणा देऊन, ‘मी उच्च, तो नीच’ आदीचे प्रखर असे विष निर्माण करुन ठेवलेले आहे. एका रानटी अवस्थेपासून आपण या सुविद्य अवस्थेपर्यंत आलात तरी मूळ अवस्थेतील गुणधर्म आपल्या ठिकाणी जो टिकून आहे, त्यामुळे जगतात शांतता निर्माण व्हावी म्हणून जे जे प्रयत्न राष्ट्रवादी पुरुष करीत आहेत, ती शांतता केवळ बोलण्याने होईल काय ? प्रत्येक व्यक्ती ही प्रत्येक राष्ट्राचा घटक असून, जोपर्यंत हा घटक अविकसित व अज्ञानी अशा अवस्थेत वावरतो आहे तोपर्यंत ह्या अविकसित व अज्ञानी अशा जीवनाचा कार्यकारणभाव हा अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत होणारच. यासाठी प्रत्येकाने आपला धर्म कोणता आहे, आपली जात कोणती आहे, आपली पोटजात कोणती आहे; हे विचार की जे आज समाजाला पोषक नाहीत, ते बाजूला ठेवून सूज्ञपणे एकाच विषयाशी दृढ व्हावे की, ‘आम्हा सर्वांना परमेश्वराने मानव म्हणून जन्माला घातले आहे, तेव्हा आमच्या आचार-विचारांत, बोलण्या-चालण्यात, हे द्वैतभाव न येता आम्ही एक ‘मानवता धर्म’ म्हणून स्वीकारावयास हवा’. ही भूमिका जर कुटुंबापासून राष्ट्रापर्यंत सर्वांच्या ठिकाणी सदैव वास करील तर जागतिक शांततेसाठी कोणत्याही राष्ट्राला शांतता परिषद बोलवावी लागणार नाही. तसेच त्या शांतता परिषदेसाठी होणारा अवाढव्य खर्च हा समाजाच्या व राष्ट्राच्या हितार्थ खर्च होईल.
वाचकहो, वरील निवेदनात मुलांची इष्टविकासाची सांगता शास्त्राने निवेदन केली; पण ज्या कुटुंबात मुली आहेत त्यांचीसुध्दा जीवने आयुष्यभर विकसित रहावीत म्हणून जी तरतूद केली आहे ती अशी की, मुलीचे वय बारा वर्षे झाल्यावर तिला ‘हरितालिका’ हे व्रत तिच्या आईने देऊन, तिला उपवास करावयास सांगावा. जे हरितालिकेचे पूजन म्हणून ह्या कुमारिकेने करावयाचे आहे, त्या पूजनार्थ हरितालिकेचे प्रतिक बाजारात मातीचे मिळते. त्या प्रतिकाची रचना अशी आहे की दोन कुमारिका समोरा समोर बसलेल्या असून श्रीशंकराचे लिंग मध्ये आहे. पण हे प्रतिक व त्याची ओळख आपणांस झाली काय ? आपण हे प्रतिक पूजनार्थ आपल्यासमोंर जेव्हा ठेवतो, तेव्हा आपल्या उजव्या हाताचे जे प्रतिक आहे ते पार्वतीचे बालरुप म्हणजे कुमारिका व डाव्या बाजुची कुमारिका म्हणजे पूजा करणाऱ्या कुमारिकेचे प्रतिक आहे. शास्त्राचा हेतू हा आहे की, कुमारिकेने पार्वतीसमवेत बसून पुढच्या भावी जीवनाचा भविष्यकाळ साकार करावा. ह्या पूजाविधीत कुमारिकेने ही इच्छा करावयाची आहे की, “विवाहजीवनानंतर मला परगृही जावयाचे असून, त्या ठिकाणी माझ्या जाण्याने कशाचीही उणीव भासू नये. मला त्या घरात सुखासमाधानाने ‘अन्नपूर्णा’ म्हणून स्थान दे. माझ्या जाण्याने त्या घरात अन्नवस्त्राला कमतरता न येता, त्या कुटुंबाची भरभराट होऊ दे. त्याचप्रमाणे माझा स्त्रीजन्म हा उत्तम अशी व घराण्यास, कुटुंबास पोषक अशी संतती निर्माण करण्यासाठी कारणीभूत होऊ दे. या जन्मात विवाहबंधनाने माझे नाते ज्या पुरुषाशी पति म्हणून मी स्वीकारणार आहे, त्या पतीच्या सुखदु:खांत सहभागी होण्याचे सामर्थ्य मला दे. एवढेच नाही तर मला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ दे”. हे व्रत कुमारिकेने वय वर्षे बारापासून एकोणीसपर्यंत करावयाचे असून, यानंतरचा त्या कुमारिकेचा काळ हा विवाहोत्तर जीवनाचा असल्याने, पुढें तिनें ‘मंगलागौरीचें’ व्रत विवाहानंतर स्वीकारावयाचें आहे. हे व्रत म्हणजे पार्वतीच्या जीवनातील प्रौढ अवस्था आहे. तेव्हां हे व्रत पाच वर्षे अव्याहत करावे. पाच वर्षानंतर ज्या सुवासिनी या व्रताचे उद्यापन करतात, त्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी अशी की, हे उद्यापन केवळ पाच वर्षे पूजन केलेल्या मंगळागौरीचे नसून, कुमारिका अवस्थेत जे हरितालिका पूजनव्रत स्वीकारले ती सात वर्षे व पुढील पाच वर्षे असे हे बारा वर्षांचे व्रत याचे उद्यापन व्हावयास पाहिजे, तरच त्या सुवासिनींना वर सांगितल्याप्रमाणे हे व्रत यशदायक होईल.
प्रचलित समाजात कुमारिकेने आपल्या भवितव्यासाठी करावयाची ही उपासना ब्राह्मण वर्गातच करण्यात येते. पण ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर ज्ञातीतील ज्या कुमारिका आहेत त्यांनाही या व्रताप्रमाणेच आपले जीवन विकसित करता यावे म्हणून जी सेवा सांगितली आहे तोही कार्यकारणभाव आपल्या शास्त्रांचे उच्च हेतू काय आहेत याचे प्रतिक आहे. अन्य ज्ञातीतील कुमारिकेने वय वर्षे बारापासून एकोणीसपर्यंत दरवर्षीं श्रावण महिन्यांत चार मंगळवारचे उपोषण करावे. अनेक कुटुंबिय उपोषणाचा अर्थ असा लावतात की, सकाळी जेवून रात्री काही खाल्ले नाही की उपवास होतो. पण उपवास याचा अर्थ असा नव्हे. तर तो सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत करावा लागतो. त्यानंतर अन्नग्रहण करावे. विवाहोत्तर जीवनानंतर दरवर्षी अश्विन किंवा पौष महिन्यांतील चार किंवा पाच मंगळवारी सुवासिनीने उपवास करावा. शेवटच्या मंगळवारी डोकीवरुन स्नान करुन देवीची ओटी भरावी. हे श्विन किंवा पौषात करावे. असे व्रत ज्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती आपल्या मुलींना सूचित करतील त्या मुलींच्या विवाहात येणारे अडथळे विचारण्यासाठी ज्योतिष, मंत्र-तंत्र, नवस-सायास इत्यादि काहीही गैरप्रकार न करावे लागता, योग्य अशा वेळीच ह्या मुली विवाहित होऊन त्यांचे वैवाहिक जीवन समृद्ध होईल.
या शास्त्रशुद्ध निराकरण पद्धती वाचनात आल्यावर, शास्त्रशुद्ध कुलाचार-कुलधर्म करणे ही खूपच मोठी समस्या निर्माण झाली असे भक्तभाविकांना वाटणें स्वाभाविक आहे. आजच्या बदलत्या कालानुसार प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना सोय गैरसोय यामध्ये आपले जीवन व्यतीत करावे लागत आहे. अशावेळी जर योग्य ब्राह्मण-सुवासिनी कुलधर्म-कुलाचारासाठी मिळाले नाहीत तर आपल्या सेवेचे फळ नाहीं म्हणून निराश होण्याचे कारण नाही. कारण या कार्यपद्धतीस केवळ नाथपरंपरेचा व दत्तपरंपरेचा कृपाशिर्वाद लाभला आहे असे आपण मानू नये. ज्या आपल्या घराण्यांच्या कुलदेवदेवता आहेत त्याही कृपावंत होऊन या कार्यात सहभागी आहेत. जेव्हा आपल्याला सुलभ असे निराकरण सूचित केले जाते, तेव्हा त्याचा स्वीकार या कुलदेवदेवता आनंदाने करतात. यासाठी कुलधर्म, कुलाचार व कुलोपासना याप्रीत्यर्थ ब्राह्मण-सुवासिनी प्रसाद ग्रहणास बोलावण्यात यावे,असे जे वर सांगितले; त्याऐवजी देवदेवतांना नैवेद्य समर्पण केल्यावर त्याच नैवेद्यापुढे दोन विडे व त्यावर दक्षिणा सव्वापांच रुपये ठेवावी. असा विधी केला असता सहजगत्या तुम्हाला ब्राह्मण व सुवासिनी यांनी प्रसाद ग्रहण केल्याचे पुण्य प्राप्त होईल. त्यांच्या नावे काढलेली दक्षिणा ही कोणत्याहि एखाद्या धार्मिक संस्थेस, वैद्यकीय संस्थेस किंवा शिक्षण संस्थेस नेऊन द्यावी. या संस्थांचे उद्देश जरी समाजकल्याणाचे असले तरी त्यांना आपली कार्ये पैशाअभावी यथायोग्य करता येत नाहीत. अशा संस्था आपल्या गावात आपल्याजवळ कार्य करीत असतात. पण दानधर्म, परोपकाराची कर्तव्ये आपण विसरलो असल्याने, या संस्थांकडे दुर्लक्ष करुन कार्याची अवहेलना करीत असतो. वास्तविक त्या संस्थांकडे इतके आस्थेने पाहिले पाहिजे की, ज्या गोष्टी समाजात परोपकार म्हणून मला करता येत नाहीत, ती जबाबदारी या संस्थांनी स्वीकारली आहे. मी या समाजात एक सामाजिक घटक म्हणून जन्माला आलो आहे. तेव्हा मला वरील रक्कम देण्यास दुख वाटता कामा नये. अशाने दोन्ही हेतू साध्य होऊन, तुम्ही व समाजात कार्य करीत असलेल्या व्यक्ती, ज्या या कार्यार्थ अहर्निश आपले जीवन वेचित आहेत, त्यांना आपले कार्य समाजासाठी यथोचित करण्यास वाव मिळेल.
आपण भक्तभाविक विवाह या मंगलकार्यास अनेक वेळा उपस्थित राहिले असू किंवा आपल्या कुटुंबातील मुलामुलींची लग्ने करते झाले असू. पण ज्या मुलामुलींची लग्ने करण्याचे इष्टकर्तव्य करता, त्यांच्या भावी वैवाहिक जीवनाची पूर्तता करुन देता का ? या प्रश्नास आपणाकडून असे उत्तर मिळेल की, ‘वरपक्षाने मागितलेला हुंडा, दागदागिने, अहेरादि करुन आम्ही मुलीला योग्य अशा सुशिक्षित वराची निवड करुन दिलेली आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे वर हा सुशिक्षित, घरंदाज व मिळवता आहे !’ या सर्व गोष्टी सांगून आपल्या मुलीच्या लग्नाची इतिकर्तव्यता पूर्ण झाली या समाधानात आपले काही दिवस जातात तोच मुलगी की, जिला आपण वरील सर्व व्यावहारिक बाजू पाहून विवाहित केलीत, तिच्या दु:खाला किंवा मानसिक अशांततेला आरंभ लागलीच कसा होतो ? तर आपण ह्या मंगल विधीचे मांगल्य विचारात न घेता, हा विधी कर्तव्य म्हणून करावयाचा आहे, या जाणीवेने तो समारंभ विधीपूर्वक न करता, त्या नवविवाहित वधूवरांच्या वैवाहिक जीवनाला पोषक असे कृपाशिर्वाद आवश्यक असतात त्याकडे दुर्लक्ष करुन, विवाहास आलेले मोठमोठे प्रतिष्ठित यांचा मानसन्मान करण्यात आपण इतके समाधानी असतो की, या मंगल कार्यात जे प्रधान धार्मिक विधी आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करतो.
समजा, तुमच्या मुलीचा विवाह करावयाचा आहे. तिला अनुरुप असा वर व तिच्या वैवाहिक जीवनाला साजेसे समारंभ जरी केले तरी महत्त्वाच्या धार्मिक विधी कडे शास्त्रपरत्त्वे दुर्लक्ष करणे त्यांच्या हिताचे नाही. मुलगी विवाहसमयी जेव्हा गौरीहार पूजनास बसते, त्यावेळी गौरीहारात श्रीअन्नपूर्णेची प्रतिमा व बाळकृष्ण या दोन देवदेवतांचा समावेश असतो. पण अनेकवेळेला एकच देवी किंवा एकच देव गौरीहाराच्या पूजनात मांडण्याचा प्रघात आहे तो चुकीचा आहे. यासाठी गौरीहारपूजानाचे वेळी श्रीअन्नपूर्णा व बाळकृष्ण अशा दोन्ही देवता पूजनात असणे आवश्यक आहे. गौरीहाराचे वेळी नववधू ज्या अन्नपूर्णेचे पूजन करते ती अन्नपूर्णाही पार्वतीचे सौभाग्यवतीस्वरुप आहे. तेव्हा अन्नपूर्णेच्या गळ्यात पाच काळे मणी व मध्ये एक सोन्याचा मणी असणे हे सौभाग्याचे लक्षण असल्याने, ते परिधान केल्याशिवाय अन्नपूर्णा पूजनास ठेवून ‘गौरीहार पूजला’ असे म्हणता येत नाही.
या गौरीहार पूजनाच्या वेळी अन्नपूर्णा व बाळकृष्ण यांचे पूजन या नववधूने भक्तिभावाने एवढ्याचसाठी करावयाचे असते की, कुमारिका अवस्थेमध्ये मातापित्यांच्या घरी केलेले सात वर्षाचे हरितालिकेचे व्रत हे कन्यादानानंतर मातापित्यांच्या घरी राहू नये; तर कन्यादानानंतर हे व्रत तिच्या भावी संसाराची उभारणी करण्यासाठी तिच्या समवेत तिच्या पतिगृही जावे असा या पूजनाचा सद्हेतू आहे. विवाहानंतर पाच वर्षे जे मंगलागौरीचे व्रत करावयाचे आहे, अशी एकूण बारा वर्षाची सेवा कुमारिका या अवस्थेपासून ते सौभाग्यवती या अवस्थेपर्यंत आहे; तिला जोडून देण्याचा जो विधी आहे त्याला ‘गौरीहारपूजन विधी’ असे म्हणतात. गौरीहारपूजनाचे वेळी वधूची मानसिक स्थिती अशी असते की, आईवडिलांच्या प्रेमळ सहवासात व्यतीत केलेले आयुष्य पुढे तिला परगृही व अपरिचित पुरुषास अर्पण करावयाचे असते. अशा वेळी भविष्यकाळात, आपण अनुभविलेले मातापित्यांचे प्रेमळ व लाडके जीवन आपणास मिळेल किंवा नाही या दु:खात ती असताना, आपण या मंगल कार्यास उपस्थित असलेले लोक ह्या मानसिक दुखात असलेल्या वधूच्या आजुबाजूला माकडचेष्टा करीत उभे राहिलेले असतो. तिच्या भवितव्याच्या इच्छा-आकांक्षा डोळ्यासमोर आणून ती अश्रू ढाळीत असते व आपण या दृष्याची निर्भत्सना करुन, तिच्या आजुबाजूला बसून, स्वतःची करमणूक करुन घेतो. अशा वेळी तिची मानसिक अवस्था अशी असते की एका बाजूने सुखाच्या दिशेने जाण्याचा मार्ग तिला दिसत असतो; पण जे सुख जन्मापासून आईवडिलांच्या समवेत जोडलेले असते, तो ऋणानुबंध याचवेळी तिला तोडावयाचा असतो. हा सूज्ञविचार सर्वांनी करुन, ती ज्या गौरीहाराची पूजा मनोभावनेने करावयास बसली आहे ती तिला यथाज्ञानाने व यथाशक्तीने करण्यास योग्य ती संधी देणे उपस्थित आप्त व नातेवाईकांचे कर्तव्य नाही काय ?
अशा गौरीहारपूजनसमयी वधूने आपले मन खंबीर करुन वर निवेदन केलेली प्रार्थना करावी. गौरीहाराच्या वेळी पूजनार्थ बाळकृष्णाची मूर्ति, हिचा उद्देश घराण्यात पुढे होणाऱ्या सत्यनारायणाच्या पूजनासाठी आहे, असा जो समज आपण करतो तो चुकीचा आहे. बाळकृष्णाची प्रतिमा एका पायावर बसलेली अशी असते. याचा अर्थ असा आहे की, जी वधू विवाहित होते, तिच्या पतीने भावी जीवनात अमंगल अशा ठिकाणी आपले पाऊल टाकू नये. या उद्देशाने बाळकृष्णाला दोन्ही पायांवर न बसविता एका पायावर बसविले आहे.