अध्याय ६ – उपास्य दैवते व करावयाची उपासना

भक्तभाविक मार्गदर्शनार्थ आल्यावर, त्यांना आपण नित्याची उपासना काय करता ? असा प्रश्न विचारल्यावर, ते अनेक देवदेवतांची नांवे उच्चारून असा भास निर्माण करतात की, आपले नित्य जीवन हे केवळ उपासना मार्गात व्यतीत होत असून, इथे विचारला जाणारा प्रश्न हा गौण आहे. वास्तविक ज्या देवदेवतांची नांवे आपण सांगत असता, त्यापैकी कुलस्वामिनी कोणती ? कुलस्वामी कोणता ? व उपास्य दैवत कोणते ? यातील तत्वतः फरक हा माहित नसल्याने, देवदेवतार्जन करण्यासाठी सगळ्याच देवदेवता आपल्याला अनुकुल आहेत, अशी भावना निर्माण करून, अट्टाहासाने जो उपासनेचा मार्ग व त्याचा अवलंब आपण करता, यामागील शास्त्रीय व तात्विक भूमिका समजल्याशिवाय, जन्मभर जरी तुम्ही देवाप्रीत्यर्थ आपला वेळ खर्च केलात, तरी केल्या गेलेल्या उपासनेचे इष्ट फल तुम्हाला प्राप्त होत नाही. म्हणून तुम्ही देवदेवतांकडे त्याचा दोष सोपविता. देवदेवतार्जन व देवाप्रीत्यर्थ करावी लागणारी उपासना किंवा आराधना ही आपण आपल्या कल्पनेने किंवा इच्छेने अंगिकारुन,किंवा स्वीकारुन त्याची फलप्राप्ती होत नाही. यासाठी योग्य अशा साधकाकडे त्याचा खुलासा करून घेतला पाहिजे .भक्तिमार्गात अनेकांचा विश्वास असा आहे की, कोणत्याही देवाचे भक्तिभावनेने पूजन केले, तर ते भक्तिस्वरुप असते, हे जरी खरे, तरी ज्याप्रमाणे प्रत्येक मानवाचा देहिक धर्म हा आचार विचार पातळीप्रमाणे भिन्न आहे. तद्वत् ह्या सृष्टीला कार्यान्वित करणारी जी महान शक्ति आहे, ती शक्ति त्रिगुणात्मक तत्वात कार्य करीत असते. म्हणजे उत्पत्ति, स्थिती, लय ही निराकार तत्वे साकार स्वरुप होण्यासाठी, या तत्वाने स्वतः साकार होऊन ब्रम्हा, विष्णू, महेश आदि स्वरुपामध्ये या विश्वाचे कार्य अंगिकारले आहे. या तीन शक्ती सर्वसामान्य साधकाला आपल्या उपासनेतून किंवा साधनेतून प्राप्त करणे अत्यंत अवघड आहे. म्हणून देवता युगामध्ये या शक्तींनी आपल्या ठिकाणी तीन अवस्था निर्माण करुन देव, देवता व उपास्य देवता असे वर्गीकरण केले. देव व देवता यांच्यासंबंधीचा खुलासा वर यथायोग्य केलाच आहे. तथापि ज्या उपास्य देवदेवता आहेत, त्या स्वाभाविक कुलस्वामी किंवा कुलस्वामिनी होत नाहीत. पण अनेक जण विठोबा, गणपती, मारुती, शंकर, दत्त, राम, कृष्ण आदि उपास्य देवतांना कुलस्वामी म्ह्णून सांगतात. प्रत्यक्षात हे चुकीचे आहे. ह्या उपास्य देवतांपैकी एखादी देवता पूर्वीच्या घराण्यात कुणा एका व्यक्तीला प्रसन्न होऊन, त्या व्यक्तीला कृपावंत करण्यास कारणीभूत झाली असेल, म्हणून आता त्या देवतेचा पुढील पिढ्यांनी अनादर कसा करावयाचा ? म्हणून या उपास्य देवतांना कुलधर्म-कुलाचारात सामावून घेतले हे स्पष्ट होते. ज्या व्यक्ती ह्या उपास्य दैवतांच्या उपासना करतात, त्यांना ह्या उपास्य दैवतांची अंगिकारलेली उपासना करण्यापूर्वी, मागील निवेदनात जे सत्त्वगुणाबद्दल निवेदन मार्गदर्शन करण्यात आले आहे, तितक्या सत्त्वगुणांची प्राप्ती झाल्याशिवाय उपास्य दैवतांचे फल पूर्णतः कदापिही मिळणे शक्य नाही. याचे कारण, ह्या उपास्य देवतेप्रीत्यर्थ अंगिकारलेली सेवा ही वर्ष दोन वर्षे करून फलप्राप्ती होत नाही. म्हणून ही सेवा मध्येच सोडून देऊन, तुम्ही आपल्या जीवनातील बहुमोल असा वेळ अनाठायी खर्च करण्यास कारणीभूत होता. कारण अंगिकारलेली उपासना पूर्णतः फलप्राप्ती पर्यंत करण्यास, उपासकाला ही उपासना निरंतर स्वरुपामध्ये करावी लागणार आहे, याचा अंदाज सहजासहजी येत नाही. किंवा मार्गदर्शनाच्या अभावी या व्यक्ती आपल्या उपासनेच्या अवाढव्य कल्पनेमध्ये वावरत असतात. सर्वसामान्यापणे वर निवेदन केलेल्या, उपास्य दैवतांच्या पूर्ण कृपाप्राप्तीसाठी जो काळ लागतो, तो येणे प्रमाणे आहे :-

श्री दत्तात्रेयांची उपासना ज्यांना सुलभ व सोपी अशी वाटते, त्यांनी प्रथमतः रज, तम, सत्व या गुणांपैकी पंचाहत्तर टक्के सत्त्वगुण स्वतःच्या ठिकाणी निर्माण करावयास पाहिजे. याशिवाय आहार मीमांसेप्रमाणे खाण्यापिण्यात आवडनिवड न ठेवता मिळेल ते सेवन करून संतुष्ट रहावयास पाहिजे. वेळी-अवेळी निर्माण होणाऱ्या वासना व त्या केवळ खाण्यापिण्यासाठी, अशी जर देहिक स्थिती असेल, तर ती सुधारल्याशिवाय दत्तपंथ अनुकुल होणे हे अत्यंत बिकट आहे; पण याचा सारासार विचार न करता, अविचाराने अनुकरण करणे, ही पध्दत सदैव अनुभवास येते. त्यामुळे जरी एखाद्या श्रेष्ठ देवतेची आराधना तुम्ही केलीत व त्या देवता जरी श्रेष्ठ असल्या,तरी तुम्ही कृपावंत होण्यास बहुतांशी कनिष्ट आहात. दत्त उपासना व तिचा अंगिकार करण्यास ज्या दिवशी तुमची उस्फूर्त भावना कार्यान्वित होते, त्या क्षणाला त्या उपासनेला पोषक असा तुमचा आचार विचार जो अस्तित्वात असतो, तो कृपावंत होण्याच्या दिवसापर्यंत टिकू शकतो काय ? याचे कारण श्रीदतात्रेयांची उपासना फलद्रुप होण्यासाठी छत्तीस वर्षांचा काळ ह्या सेवेत व्यतीत करावा लागतो. ’दत्त’ हे तत्व त्रिगुणात्मक म्हणजे उत्पत्ति, स्थिती, लय म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश आदि तत्त्वांचे महाकारण आहे. म्हणून त्या तीन तत्त्वांचे दत्त स्वरुपात अवतारकार्य सुरू झाले. ते त्रिगुणात्मक तत्त्व साकार स्वरुपात ‘दत्त’ म्हणून जरी प्रकट झाले, तरी त्याची कृपाप्राप्ती होण्याठी, करावी लागणारी दीर्घ तपःश्चर्या ही छत्तीस वर्षांची आहे. पण हे जरी शास्त्रीयदृष्ट्या खरे असले तरी योग्य गुरुंचा व योग्य मार्गाचा आधार तुम्हाला मार्गदर्शन करता झाला, तर ही उपासना तुम्ही बारा वर्षात फलद्रुप करू शकता.

अन्य उपस्य देवता ज्या आहेत, त्यांचा उपासनेचा काल अनुक्रमे दत्तपरंपरे सारखाच आहे.तो येणेप्रमाणे-

श्री गणपती                       २१ वर्षे
श्री शंकर                          ११ वर्षे
श्री मारुती                         १८ वर्षे
श्री राम                             १२ वर्षे
श्री अनंतव्रत                      १४ वर्षे

पार्वती उपासना                 १२ वर्षे (हरितालिका 7 वर्षे,मंगलागौरी 5 वर्षे )

अशी ही उपास्य देवतांची दीर्घकालपर्यंत करावी लागणारी उपासना आपण जर विचारात घेतलीत,तर प्रामाणिकपणे असे ठरवावे लागेल की, एवढा काळ आपली त्या देवतेबद्दलची भक्ती, निष्ठा व त्या देवतेला पोषक असे आचार विचार आपण ह्या काळापर्यंत सांभाळू शकू काय ? यापेक्षा तात्काळ फल देणाऱ्या देवता, म्हणजे आपल्या घराण्याच्या परंपरेतील कुलदेवदेवता, यांची मनोभावनेने उपासना करून श्रध्दा, भक्तीने जर कुलधर्म, कुलाचार व कुलोपासना यांचा आस्थापूर्वक विचार करून, जे जीवन विस्कळीत झाले आहे, ते जर सुसंबध्द केलेत, तर दीर्घकालपर्यंत उपास्य देवतेच्या मार्गाचा अवलंब करून जी फलप्राप्ती तुम्हाला होणार आहे, तीच फलप्राप्ती तुम्हास तुमच्या इष्ट देवता करून देण्यास समर्थ आहेत. मुद्दाम बिकट अशा मार्गाने जाण्यापेक्षा, ज्या समस्या योग्य कारणाने व योग्यवेळी सोडविण्याची परमेश्वराने तरतूद केली आहे, त्याचा लाभ घेणे आपल्या हिताचे आहे.

आज समाजात अनेक कुटुंबात अशा रुढी परंपरेच्या उपासना, व्रतवैकल्ये, भिन्नाभिन्न पूजाअर्चा त्या कुटुंबातील व्यक्ती करीत असताना अनुभवास येतात. वास्तविक घराण्यातील परंपरेत ज्या ज्या वेळी ज्या ज्या काही अडीअडचणी निर्माण होत गेल्या किंवा निर्माण झाल्या असतील, अशा काही कारणप्रसंगी ह्या अडीअडचणी निवारणार्थ कोणी मार्गदर्शन केले असेल, अशांनी त्या घराण्याच्या परंपरेतील पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, उपासतापास, मासिक किंवा वार्षिक देवदेवतार्जन इत्यादि काही करण्याचा प्रघात रूढ केला. त्यामुळे जेव्हा योग्य मार्गदर्शनाची गरज आपल्याला निर्माण होते, तेव्हा ज्या उपासना तुम्हा भक्तांना अनुकुल नसतात व त्या आपण सोडाल काय ? असे विचारण्यात येते, तेव्हा अनेक भक्तमंडळीना त्या संबंधीचा तत्त्वबोध माहित नसल्याने, एक तर मार्गदर्शन न घेता ही मंडळी ह्या कार्यपध्दतीकडे दुर्लक्ष करतात किंवा मार्गदर्शन घेऊनही ज्या काही उपासनांचा अंगिकार केवळ रुढीपरत्वे केला आहे, त्या उपासना चालू ठेवतात.

तुम्ही करीत असलेल्या उपासना जर तुम्हाला अनुकुल असतील, किंवा भवितव्यात त्या अनुकुल होणार असतील, तर चुकूनही निराकरण पध्दतीत असे सूचित करण्यात येणार नाही की, तुम्ही ज्या उपासना काही वर्षापासून करीत आहात त्या सोडाव्यात. पुन्हा या संबंधी आपण भक्तांची विचारणा अशी असते की, हे सोडण्यासाठी कांही उद्यापन आदि करावयास पाहिजे काय ? पण आपल्या वाचनात व ऐकण्यात ‘उद्यापन’ म्हणून जो शब्द आलेला असतो याचा खरा अर्थ काय आहे, हे आपण जाणत नसल्याने, एखादी उपासना सोडा म्हटले की, ‘उद्यापन’ हा शब्द आपण स्वीकारलेली उपासना सोडण्यामध्ये अडथळा निर्माण करतो. जी व्रते व ज्या उपासना तुम्ही शास्त्रशुध्द पध्दतीने अंगिकारलेल्या असतात, त्यांना शास्त्रीयपध्दतीने उद्यापन हा विधी आहे. पण केवळ एकमेकांच्या गाठीभेटीत, ऑफिसच्या कँटिनमध्ये किंवा कोणाच्या घरी पाहुणे म्हणून गेल्यावर, अडीअडचणीच्या विषयापरत्वे व त्याच्या निवारणार्थ आपण एकमेकांत जी उपासनेची देवाणघेवाण करुन, उपासनेचा किंवा व्रतांचा स्वीकार करतो, ही व्रते व उपासना केवळ गाठीभेटी स्वीकारलेली असल्याने, त्यांच्या उद्यापनार्थ शास्त्रीय विधीची आवश्यकता आहे, असे नाही.

शास्त्रीयपध्दतीने उपासना व व्रतांचा स्वीकार अशा तऱ्हेने करावयाचा असतो की, कुटुंबात ज्या वडील व्यक्ती असतात, त्यांनी त्या उपासना काही काळ केल्यावर, पुढे त्या उपासना आपल्या मुलांना, मुलींना, सुनांना किंवा नातवंडाना द्यावयाच्या असतात. ह्या उपासनाव्रतांचे संबंध ज्या देवदेवतांशी आहेत, अशा देवदेवतांचे पूजन-अर्चन, अभिषेक, नैवेद्य, ओटी भरणे आदि सर्व करुन, ज्या व्यक्तीला ते व्रत द्यावयाचे आहे त्या व्यक्तीला देवासमोर बसवून, आपण त्याच्या डाव्या हातास बसावे. पूजनादि विधीतील सर्व औपचार झाल्यावर, मनोभावनेने अशी प्रार्थना करावी की, ‘देवा ,तुझ्या कृपाशिर्वादार्थ मी जी काही सेवा म्हणून उपवास, व्रतवैकल्ये आदि आजपर्यंत करीत आलो / आले, ते माझ्या यथाशक्ती यथाज्ञानाने केले. आता वयपरत्वे किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला ही तुझी सेवा यथाशक्ती करता येणार नाही. ती सेवा मी माझ्या भक्तिभावनेने माझ्या मुलास / मुलीस / सुनेस देत आहे’. एवढी प्रार्थना झाल्यावर, त्या व्रताचा हितसंबंध ज्या देवतेचा आहे, त्या देवतेला वाहिलेल्या फुलातील एक.फूल, जे त्या देवतेच्या मस्तकावर वाहिलेले असेल, ते घेऊन कुटुंबातील ज्या व्यक्तीस ते व्रत द्यावयाचे आहे, तिच्या ओंजळीत ठेवावे. तिने ते फूल मनोभावनेने आपल्या मस्तकास लावून, मग त्या उपास्य देवतेच्या चरणी ठेवावे. अशा सोप्यातसोप्या विधीने हे व्रत परंपरापध्दतीने तुमच्या कुटुंबात वास करीत राहते. अन्यथा तुम्ही ज्या पूजनादि उपासना, व्रतवैकल्ये बोलता-चालता एकमेकांस सांगता याचा लाभ सहजासहजी तुम्हास होत नाही.

ज्या काही वार्षिक उपासना समाजात वर्गणी गोळा करून केल्या जातात त्याचा हेतू जरी सामाजिक हिताच्या व धार्मिक असा आहे, तरी तो समांरंभ ज्या देवतांच्या प्रीत्यर्थ केला जातो, त्या विधीचे व देवतांचे मांगल्य विचारात घेतले जाते काय ? उदाहरणार्थ भाद्रपद महिन्यात गावांतील प्रत्येक ठिकाणी गणपतीची स्थापना दहा दिवस केली जाते. श्रावण महिन्यात अशाच प्रकारे सत्यनारायणाचे पूजनही केले जाते. नवरात्रात श्रीदेवीचे नवरात्रही सार्वजनिक म्हणून केले जाते. पण जे विधी काही शास्त्रपरत्वे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींने करावे असे सांगण्यात आले आहे, त्या विधीची कार्यकारणपध्दत ह्या जगाच्या हितार्थ शास्त्राने काय केली आहे, हे न समजल्याने, आज आपण ह्या विधींना सार्वजनिक समारंभाचे स्वरुप देऊन, त्या विधीतील पूज्यता कमी करण्यास कारणीभूत झालो आहोत.

वरील विधी जेव्हा सार्वजनिक म्हणून करण्यात येतात, तेव्हा ह्या विधीच्या विसर्जनापर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाऊडस्पिकरवरून, करमणुकीसाठी बीभत्स अशी गाणी लावली जातात. याशिवाय या समारंभाची शोभा वाढावी, म्हणून जी प्रासंगिक दृष्ये उभी केलेली असतात, ती सिनेमातील एखाद्या प्रसंगापासून, राजकारणातील प्रसंगापर्यंत असतात. असे हे आपल्या देवाचा व धर्माचे विडंबन चव्हाट्यावर कोणी करीत असेल असे वाटत नाही. प्रत्येकाने आपल्या धर्मपरत्वे देवदेवतांच्या विधीचे ज्ञान बहुजन समाजाला व्हावे,म्हणून ते विधी अवश्य करावेत. पण आज हे समारंभ आपण जेव्हा पाहतो, तेव्हा आपणास असे अनुभवास येते की, गावांत प्रत्येक दहा पावलावर असाच सार्वजनिक समारंभ चालू असून, तो साजरा करण्यासाठी एकमेकांची स्पर्धा चालू असते. भाद्रपद महिन्यात किंवा अश्विनातील नवरात्रात, या देवतांच्या स्थापनेचा जो मूळ शास्त्रीय हेतू आहे, तो न समजल्याने, ह्या समारंभासंबंधीचे पावित्र्य, भक्ति आपल्यात नसते. केवळ वर्गणी जमा करून गणपती किंवा देवीच्या नावाने जो हा सार्वजनिक उत्साह वर्षातून एकदा उफाळून येतो, त्याला आवरण्यास, ज्या देवदेवतांची तुम्ही स्थापना करता, त्यांनाही ते कठीण झालेले आहे.

आता शास्त्रीयदृष्ट्या भाद्रपद महिन्यात शुध्द पक्षातील चतुर्थीला श्री गणपतीला आवाहन करून, दहा दिवस पूजनार्थ जे बोलवावयाचे आहे, इतका काळवेळ, इतकी पूजा,गणपतीची कोणत्याही विधीप्रसंगी नसते. कुटुंबातआपण जेव्हा वेगवेगळे धार्मिक विधी करता, त्यावेळी प्रथमतः श्री गणपतीस आवाहन एवढ्यासाठीच करावयाचे असते की, तो देवांचा अधिपती आहे. आपण जो विधी करणार आहात, तो विधी ज्या देवतांप्रीत्यर्थ असतो त्या विधीस त्या देवतांनी गणपती समवेत उपस्थित राहून, तो विधी अंगिकारावा, असा कार्यकारण भाव असतो. हा विधी पूर्ण होताच, गणपतीवर अक्षता टाकून त्याला असे सांगण्यात येते की, ‘पुनरागमनायच’, म्हणजे ‘पुन्हा मी जेव्हा काही धार्मिक विधी करीन, तेव्हा आपण उपस्थित रहावे’ असे असता, भाद्रपद शुध्द चतुर्थीपासून अनंतचतुर्दशीपर्यंत जो पूजाविधी दहा दिवस करावयाचा आहे, ह्या दहा दिवसांचे माहात्म्य धार्मिक दृष्ट्या फार मोठे आहे. सूज्ञ भक्तांनो, आजपर्यंत ह्या शास्त्रोक्त विधी पध्दतीची माहिती आपण करून घेतली असतीत व त्याप्रमाणे जर हा विधी आचरणात आणला असतात, तर आपल्या जीवनातील अनेक समस्या, जो देवांचा अधिपती गणपती आहे, त्याने सोडविल्या असत्या. पण सूज्ञपणाने तुम्ही ह्या धार्मिक विधीची जाणीव न करून घेण्याने, ह्या देवाला बंधनात घातले आहे.

एकंदर वर्षात बारा महिन्याचा जो काळ आहे, त्याचे दोन भाग ‘उत्तरायण’ व ‘दक्षिणायन’ म्हणून केले आहेत. उत्तरायणाचा आरंभ मकर संक्रातीला सूर्य मकर राशीत गेल्यावर होतो.हा काल सहा महिन्याचा असतो. त्यानंतर सूर्याचे संक्रमण कर्क राशीत होते.हा काल दक्षिणायन असा आहे. या कालातच श्रावण महिन्यात वेगवेगळ्या वारी उपवास आदि व्रते करून, देवदेवतांची दर्शने घेऊन, काया, वाचा व मन शुध्द करावयाचे असते. त्या नंतरचा येणारा महिना म्हणजे भाद्रपद. या महिन्यातील शुध्द पक्षातील चतुर्थीला जे गणपती पूजनाचे माहात्म्य आहे ते दहा दिवसाचे असून, दहाव्या दिवशी ‘अनंताची’ म्हणजे विष्णूची पूजा करून या विधीची समाप्ती होते. या दहा दिवसात गणपतीचे व विष्णूचे पूजन सांगितले आहे, ते एवढ्यासाठी की, संपूर्ण वर्षात नानाविध धार्मिक विधीसाठी जरी तुम्ही विधी आरंभी गणपतीला आवाहन करीत असलात तरी या दहा दिवसातील पूजनाचे माहात्म्य वेगळे आहे.

भाद्रपदातील शुध्द पक्षानंतर ‘पितृपक्ष’ सुरू होतो, हे सर्वाना विदीतच आहे. या वद्यपक्षांत जे श्राध्दपक्ष विधी होतात, त्याचा हेतू घराण्यातील दिवंगत झालेल्या व्यक्तींना त्यांच्या मरणोत्तर जीवनानंतर सद्गती प्राप्त व्हावी हा आहे. असे विधी आजपर्यंत तुम्ही रुढीपरंपरेप्रमाणे करीत आलात, तरी त्यांना सद्गती देण्याचे सामर्थ्य, केवळ घराण्यातील दिवंगत झालेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ श्राध्दविधी करून प्राप्त होत नाही. त्यासाठी देवादिकांचा कृपाशिर्वाद पाठीशी असावयास पाहिजे. म्हणून शास्त्राने अशी शास्त्रशुध्द तरतूद केली आहे की, त्या दिवंगत व्यक्तीला सुलभपणे सद्गती मिळावी, यासाठी त्यांच्या आप्तांनी श्रावण महिन्यात देवादिकांचे उपवास, व्रते करुन, दानधर्म, परोपकार करुन, आपले काया, वाचा, मन शुध्द करावे. शुध्द केल्या गेलेल्या काया, वाचा, मनाने भाद्रपद महिन्यात गणपतीची स्थापना करून, अनंत चतुर्दशीला श्री विष्णूपूजन करुन, गणपती व विष्णूंचा कृपाशिर्वाद भाद्रपद वद्य पक्षांत जे विधी आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तींच्या प्रीत्यर्थ करावयाचे आहेत, त्यांना उत्तम लोकी सद्गती प्राप्त होण्यासाठी प्राप्त व्हावा, अशासाठी हे गणपती स्थापनेचे दहा दिवसांचे माहात्म्य आहे. अशा प्रकारे संपूर्ण श्रावण महिना व भाद्रपद महिन्यातील पंधरा दिवस, असा दीड महिना, ज्यावेळी तुम्ही धार्मिक विधीत आचरणात आणाल, त्यावेळी वद्य पक्षातील श्राध्दपक्षादि विधी सफल होतील.

पूर्वीच्या शास्त्राप्रमाणे ज्यांना प्रयाग, काशी व गया या त्रिस्थळी यात्रा करण शक्य आहे, त्यांनी त्या तिन्ही तीर्थक्षेत्री श्राध्दपक्षादि विधी करून, शेवटचे पिंडदान गयेस विष्णूपदावर करावयाचे असते. हे समर्पण केल्यावर, ह्या दिवंगत व्यक्तींच्या ऋणातून आपण मुक्त होऊन, त्यांनाही उत्तम लोकी मुक्ती प्राप्त करून देतो. पूर्वीच्या काळात ही दूरवर असणारी तीक्षश्रेत्रे व त्या ठिकाणी जाऊन ही धार्मिक कृत्ये करणे अवघड होते. कारण त्या काळात वाहनादि साधनांचा लाभ आज जितका आपण घेऊ शकत आहोत तितका होत नसे. त्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला ही अवघड समस्या सुलभपणे सोडविता यावी व जे पुण्यकर्म या त्रिस्थळीच्या तीर्थयात्रेने व तेथील श्राध्दपक्षादि विधी केल्याने प्राप्त होत असे, तेच पुण्य आपणास सुलभपणे आपण रहात असलेल्या गावी व घरात प्राप्त व्हावे, म्हणून दीड महिना धार्मिक आचरणात व धार्मिक कृत्यात व्यतीत करावा, असे शास्त्राने सांगितले आहे. हे या शास्त्राचे थोर उपकार आपल्या कल्याणार्थ किती बोधप्रद आहेत, याचा विचार करा.

असा हा दीड महिना आस्थापूर्वक विचारात घेऊन, तुम्ही आपल्या घराण्यातील दिवंगत व्यक्तीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी जर श्राध्दपक्ष केलेत, तरच या श्राध्दपक्ष विधीने त्यांची मुक्तता होते, हे जे शास्त्राने सांगितले आहे, त्याचा तुम्हाला अनुभव येईल. आज अनेक लोक असा प्रश्न विचारतात की, घराबाहेर पडल्यावर आमच्या कुटुंबातील बायकामुलांना बाधा म्हणून जो त्रास होतो,असा प्रकार पूर्वी नव्हता काय ? की आजच त्याचे प्रमाण अधिक वाढले आहे ? यास समर्पक उत्तर असे की, संपूर्ण वर्षात जो काळ तुमच्या हितार्थ आहे, तो म्हणजे श्रावण शुध्द प्रतिपदे पासून भाद्रपद शुध्द पौर्णिमेपर्यंत, या कालात तुम्हास धार्मिक कृत्ये, जी करावयास सांगितली आहेत, त्याकडे तर तुम्ही दुर्लक्ष केलेच आहे, पण तुमच्या घराण्यातील दिवंगत व्यक्तींच्या इच्छा वासनेपासून मूक्त करुन, त्यांना उत्तम लोकी जीवन प्राप्त करून देण्यासाठी देवादिकांनी सुध्दा आपले माहात्म्य बाजूला ठेवून, तुम्हाला यथोचित सहाय्य देण्यासाठी आपली कार्ययोजना आपल्याला परिचित करून दिली, त्या श्री गणपतीचे् माहात्म्य आपण न जाणता, त्या थोर दैवताला आज आपण गलिच्छ अशा रस्त्यावरील चौकात नेऊन जर बसविलेत, तर आपल्या घराण्यातील दिवंगत झालेल्या व्यक्तींच्या मुक्तीचा प्रश्न कसा व कोण सोडविणार ? साधारण कुटुंबात जर एखाद्याला बाधा झाली, तर त्यासाठीसुध्दा आपल्याला मंत्र, तंत्र, जादूटोणा करावा लागतो. त्यातून सुटका झाली नाही, तर तीर्थश्रेत्री जावे लागते. व तेथे जाऊनही ही बाधा निवारण होईलच असे नाही. असे जर आहे, तर घराण्यातील त्या व्यक्ती मरणोत्तर जीवनांनंतर सद्गतीला गेल्या नाहीत व जरी तुम्ही त्यांना सद्गती मिळावी म्हणून त्यांच्या प्रीत्यर्थ श्राध्दपक्ष केलेत, तरी जोपर्यंत ह्या दीड महिन्याच्या काळात तुम्ही धार्मिक आचरण, धार्मिक विधी, देवदेवकांच्या इष्ट उपासना अंगिकारल्या नाहीत, तोपर्यंत अनेक काळपर्यंत हे दिवंगत मृतात्म्ये इहजगतांशी हितसंबंध जोडून, आपल्या इष्ट व दुष्ट वासना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या बायका मुलांकडून आपली मुक्तता करून घेण्यासाठी ‘बाधा’ म्हणून वावरणारच.

भारतात ह्या देवतेच्या म्हणजे गणपतीच्या बाबतीत पूजनादि विधीचा जो गैरप्रकार झाला आहे, तो फक्त महाराष्ट्र व गोमंतकात झाला आहे. उत्तर भारतात तर ही देवता नाममात्र परिचित आहे. पण दक्षिण भारतात या देवतेचे अधिष्ठान तिच्या माहात्म्यपरत्वे सांभाळले गेलेले आहे. आज महाराष्ट्रात जो गणपती स्थापनेचा विधी करण्यात येतो, तत्संबंधीचा सार्वजनिक प्रकार याचा उल्लेख वर केलाच आहे. पण घरात जो गणपती बसविण्यात येतो, त्याही गणपतीबद्दलची पूज्यता सार्वजनिक गणपती एवढीच राहिली आहे. जीवनोध्दारार्थ जरी गणपती हे आदितत्व आहे, तरी त्याची स्थापना दीड महिन्याच्या व्रस्तस्थ काळापासून करावयाची आहे. ती आपण आपल्या सोईपरत्वे दीड दिवसावर आणलेली आहे. यापेक्षा गणपतीची स्थापना दीड दिवसासाठी जरी केली नाहीत, तरी त्यामुळे गणपती काही दु:खी होणार नाही.

गणपती पूजनाच्या ह्या दहा दिवसाच्या काळात, तुमच्या ज्या इष्ट कुलदेवदेवता आहेत, यांचाही कृपाशिर्वाद पुढील विधी करण्यास असणे अत्यावश्यक आहे. म्हणून ह्या दहा दिवसात जे ‘गौरीपूजन’ सांगितले आहे, ते ह्या कुलस्वामिनीचे पूजन म्हणून करावयाचे आहे व त्यामुळे घराण्याच्या ज्या कुलदेवता आहेत, त्यांचा कृपाशिर्वाद मिळून, त्याचा लाभ घराण्यातील दिवंगत व्यक्तींना पितृपक्षात होतो. गौरीपूजनाची स्थापना, या संबंधीचे मार्गदर्शन दरवर्षी पंचांगाप्रमाणे विचारात घेऊन गौरीची स्थापना करावी.

सूज्ञ भक्त वरील निवेदन वाचून असा विचार करतील की, दिवंगत व्यक्तींच्या हितार्थ आम्ही धार्मिक आचारविचारांची बंधने पाळून, त्यांना मुक्त करणे म्हणजे हा एक प्रकारे अट्टाहास आहे. पण याला मार्गदर्शनामध्ये असे अचूक उत्तर दिले आहे की, दिवंगत व्यक्ति आपल्या पश्चात् जी स्थावर मिळकत, पै-पैसा, दागदागिने तुमच्या नावे करुन गेले आहेत, त्यांना सद्गती प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जर हा दीड महिना व काळ बिकट वाटत असेल, तर त्यांच्या पश्चात् तुमच्या नावावर आलेली जी स्थावर मिळकत असेल,तर त्यांचा नि:संकोच दानधर्म करावा. यापेक्षा यातील महत्वाची जी तात्विक भूमिका आहे, ती अशी की, स्वतः प्रीत्यर्थ जेव्हा आपणास पुण्यसंचय करावयाचा असतो, तेव्हा हा पुण्यसंचय होण्यास फार विलंब लागतो. पण जेव्हा एखादी सेवा आपण दुसऱ्याच्या कल्याणासाठी म्हणून करतो, की ज्यामध्ये आपला वैयक्तिक स्वार्थ नाही, त्यावेळी पुण्यसंचय हा दुप्पट होतो. यामुळे ह्या दीड महिन्यात तुम्हाला करावी लागणारी धार्मिक कृत्ये, देवदेवतार्जन व परोपकार हा तुमच्या हितासाठीच आहेच, पण मरणोत्तर जीवनानंतर मुक्तावस्थेला जाण्यासाठी ज्या दिवंगत व्यक्तींना देवादिकांचा ऋणानुबंध कमी पडतो, अशांना तुम्ही ही जी दुप्पट पुण्याई प्राप्त केलीत, त्यातील एकपट पुण्याई दिल्यावर, त्यांचा देवादिक ऋणानुबंध कमी असल्यामुळे, जो इहजगताशी संबंध जोडला, त्यातून त्या दिवंगत व्यक्ती देवतांच्या कृपेमुळे तर मुक्त होतातच, पण तुम्हाला ह्या जन्मात जे इति कर्तव्य आहे, की इहलोक व परलोक ह्या दोन्ही अवस्थांची प्राप्ती तुम्हाला ह्या जन्मात अति प्रयत्नाने करावयाची आहे, त्या प्राप्तीचा पाया,या दीड महिन्याच्या काळातील सेवेमुळे प्राप्त होतो. घराण्यातील दिवंगत व्यक्तींच्या ऋणातून, पितृपक्षात तुम्ही आपले कर्तव्य करुन
ऋणमुक्त झालात की, अश्विन महिना येतो. घराण्यातील कुणी दिवंगत झाल्यावर जे दहा दिवस सुतक पाळण्यात येते, हे दिवस अमंगल मानतात. त्याप्रमाणे वर्षातील सर्व महिन्यामध्ये भाद्रपदातील वद्य म्हणजे पितृपक्ष हा काल अमंगल मानलेला आहे. श्रावणापासून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या मंगलकालामध्ये प्राप्त केलेले पुण्यकर्म पितृपक्षात व्यतीत केल्यावर, जो अश्विन महिना येतो, त्यातील दहा दिवसाचे महत्व वेगळे आहे. ज्या देवदेवतांच्या कृपाशिर्वादाने तुम्ही दीड महिन्याची पुण्याई भाद्रपदातील वद्य म्हणजे पितृपक्षात खर्च केली आहे, त्यातील एकपट तुम्ही त्यांना देऊन, एकपट ही तुमच्याकडे शिल्लक राहिली आहे. हा जो परोपकार तुम्ही दिवंगत व्यक्तीच्या प्रीत्यर्थ केलेला आहे, असा हा परोपकाराचा ठेवा, तुम्हाला ‘व्यक्तिगत पुण्याई’ म्हणून मिळावा म्हणून अश्विन शुध्द प्रतिपदे पासून दशमी पर्यंत दहा दिवसांचे ‘नवरात्र’ ‘आहे. या काळात पुन्हा तुम्ही तुमच्या कुलदेवदेवतांचे स्मरण करुन वर्षातील इतर महिन्यापेक्षा त्यांची अधिक प्रमाणात संभावना करुन, जो पूजाअर्चा विधी करता, त्यामुळे परोपकारार्थ केली गेलेली जी सेवा तुमच्याकडे शिल्लक राहिली आहे, तिचे व्यक्तिगत सेवा म्हणून रुपांतर होते. अशा या सेवेचे परोपकाराप्रीत्यर्थ म्हणून केलेले व्रत, व्यक्तिगत जीवनाशी जे एकरुप होते, अशा या विधीला ‘सीमोल्लंधन’ म्हटले आहे.

असे हे सीमोल्लंधन झाल्यावर, प्राप्त झालेली पुण्याई हिचे भोक्ते, त्या क्षणी तुम्ही होऊ नये, म्हणून ती तुम्ही अश्विन महिन्याच्या अखेरीस म्हणजे, धनत्रयोदशीच्या दिवसापर्यंत जतन करावयाची आहे. अशी जतन केलेली परोपकार-पुण्याई, हिचे रुपांतर पुन्हा लक्ष्मी-सरस्वतीमध्ये होऊन भविष्य काळ सुख-शांती-समाधानात जावा, म्हणून धनत्रयोदशीस लक्ष्मी-सरस्वतीचे पूजन आहे. त्यास ‘दीपावली’ म्हटले आहे. म्हणजे आपल्या जीवनात लक्ष्मी व सरस्वती यांचा प्रकाश जीवनोध्दारार्थ कारणीभूत व्हावा, म्हणून ह्या दिवसात दीपोत्सव करावयाचा आहे. इतक्या ह्या शास्त्रशुद्ध भूमिकेतून तुम्ही जेव्हा आपल्या आचार-विचारांशी एकनिष्ठ राहून, दीपावली पर्यंतचा तीन महिन्याचा काळ व्यतीत करता, हे तीन महिने तुमच्या पुढील नऊ महिन्यांची तरतूद सुख, शांती, संपत्ती, म्हणून करीत असतात. ह्यासच दीपावली म्हटले आहे.

आता नवरात्र करण्याचा जो महत्वाचा कार्य-कारण-भाव आहे, हा आपण भक्तांना शास्त्रीय पध्दतीने समजल्यावर, आपणच मला असे विचाराल की, ह्या नवरात्र काळांत ज्या कोणी स्त्रियांचे अंगात देवदेवता येतात असे सांगतात, यात काही सत्यता आहे काय ? कारण अशा देवदैविक शक्ति सर्वसामान्य मानवाच्या माध्यमामध्ये प्रवेश करण्यासाठी, त्या माध्यमांचा देहिक विकास हा पूर्णतः व्हावयास पाहिजे. म्हणजे वर सांगितलेले देहातील रज, तम, सत्व गुण यासंबंधी जो खुलासा केला आहे, त्याप्रमाणे त्या व्यक्तींच्या ठिकाणी पंच्याहत्तर ते शंभर टक्के सत्वगुण विकसित व्हावयास पाहिजे. बाल्यावस्थेमध्ये म्हणजे जन्माला आल्यावर जो सत्व गुण शंभर टक्के असतो, तो आपल्या प्राप्त जीवनातील ठेवा म्हणून असतो. पण पुन्हःश्च जेव्हा देवदैविक उपासना मार्गाने व धर्माचरणाने तुम्ही सत्व गुण प्राप्त करता, हा सत्वगुण तुमच्या ठिकाणी ठेवा म्हणून असत नसून, तो एक नैसर्गिक सामर्थ्य़ म्हणून असतो. असे हे सामर्थ्य जेव्हा आपण पंचाहत्तर ते शंभर टक्के इतके प्राप्त करता, तेव्हाच ह्या देवदेवतांची शक्ति देहात धारण होते. अन्यथा जी तुमच्या ठिकाणी देहिक शक्ति आहे, ती समोरील प्रसंगपरत्वे अधिक प्रकट होऊन असा आविष्कार करते की, तो देवतेचा संचार आहे. जर ह्या नऊ दिवसात स्त्री किंवा पुरूषांच्या अंगात आलेली तत्वे ही देवदेवता आहेत, तर त्यांना विचारलेल्या प्रश्नोत्तराच्या वेळी त्यांच्या ठिकाणच्या परिपूर्ण सत्वगुणांची साक्ष प्रत्ययास का येत नाही ? उलट वारंवार प्रश्न विचारल्यावर जो अपशब्द संचार अवस्थेत असलेल्या व्यक्तींच्या तोंडून निघतो, असा शब्द देव युगापासून आजपर्यंत देवदेवतांनी उच्चारलेला नाही. तेव्हा ज्या ठिकाणी देवाच्या नावांने असा देखावा तुम्हास अनभवास येतो हे खरे किंवा खोटे हे तुमचे तुम्हीच पडताळून पहावे.

कुलधर्म कुलाचार परत्वे नित्याने करावयाची उपासना व महत्वाची वार्षिक उपासना, या पूर्वीच आपणांस निवेदन केलेली आहे. या शिवाय प्रामुख्याने घरोघरी भिन्नाभिन्न देवतांच्या पोथ्या, कवच, स्तोत्रे इत्यादिंचा संग्रह वाचनार्थ भरपूर केलेला आढळतो व नित्याने ती पठणही केली जातात. पण आपण ही स्तोत्रे, कवच किंवा पोथ्या का वाचतो व त्याचा इष्टलाभ काय ? याचा कुणीही कधीही विचार करीत नाही. कुणी म्हणतात जीवनात साडेसाती आली की,नवग्रह स्तोत्र, मारुती स्तोत्र किंवा शनि माहात्म्य वाचावे. पण अशा वाचनात येणाऱ्या स्तोत्रापासून ते कवचापर्यंत ज्यांनी ह्या साडेसातीच्या काळात पाठ केले आहेत, त्यांची साडेसाती जाऊन त्यांना निश्चितपणे सुखाचे क्षण प्राप्त झाले आहेत असा अचूक सिध्दांत आजपर्यंत तरी वाचनार्थ घेतलेल्या स्तोत्र, कवचापासून कुणी आत्मविश्वासाने सांगू शकतो काय ? जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात साडेसाती ही असतेच. पण अशावेळी निश्चितपणे काय केले असता या साडेसातीची पीडा होणार नाही, असे काही अचूक मार्गदर्शन सांगता येण्यासारखे नाही. पण प्रामुख्याने पहिली एक गोष्ट नजरेस येते की, आज आपली जीवनाबद्दलची भावना, श्रध्दा इतकी कमकुवत झालेली आहे की, साडेसातीला सुरुवात होताच जर सर्दी, पडसे झाले, तर साडेसातीला आरंभ झाला म्हणून ह्या माणसाचे हातपाय गळतात. वास्तविक हे रूढीपरत्वे साडेसातीमुळे झाले, वातावरणातील दुषित हवेमुळे झाले वा आपल्या खाण्या-पिण्यातील बदलामुळे झाले, हे लक्षात न घेता, खगोल शास्त्राप्रमाणे आज आपल्याला काही ग्रह प्रतिकूल आहेत असे कळले की, लगेच साडेसातीस व जीवनावर होणाऱ्या वाईट परिणामाकडे लक्ष जाऊन, ह्या साडेसात वर्षाच्या काळात ग्रहांची वेगळी पीडा आहे, यापेक्षा जीवनाबद्दलचे जे अविचार आहेत हेच पीडित आहेत, असा कोणीही कधीही विचार करीत नाही. या उलट ह्या काळात जर आपण असे विचार करते व्हाल की, ‘मी परमेश्वराचा भक्त असून, ज्याची माझ्यावर अखंड कृपा आहे त्या माझ्यासारख्या परमेश्वरभक्ताला ही पीडा हानीकारक न होता, कल्याणकारकच होईल’, असा जर आत्मविश्वास निर्माण केला, तर देहातील आत्मिक शक्तिच्या प्रभावाने, म्हणजे आत्मविश्वासाने, ह्या वातावरणातून होणारे ग्रहांचे परिणाम व तुमच्या स्थुल देहातील माध्यमामध्ये विस्कळीतपणा निर्माण होऊन, तुम्हाला भोगावे लागणारे ग्रहांचे त्रास यातून तुमचा बचाव होईल. अशा अनेक प्रसंगांमुळे,व जे प्रसंग तुमच्या जीवनात कारणपरत्वे अनेक वेळा येणार आहेत, अशा प्रत्येक वेळी तुम्ही जर असा विचार करून, आपल्या जीवनातील काळ दु:खमय होणार आहे, अशी भावना विचारात घेतलीत, तर तुमचे पाऊल कदापिही पुढे पडणार नाही. याला असे म्हणता येईल की ‘वाजे पाऊल आपुले, म्हणे मागे कोण आले ?’ या प्रमाणे जीवनात कोणत्याही कारणपरत्वे, जन्मकर्मपरत्वे किंवा ग्रहपरत्वे येणाऱ्या प्रसंगपरत्वे ज्या ज्या प्रतिकूल गोष्टी आहेत, त्या आपल्यालाच निवारण केल्या पाहिजेत. यासाठी पोथ्यापुराणे, स्तोत्रे, कवचे, भिन्नाभिन्न देवता यांच्या उपासना उपयोगी पडत नाहीत. उदाहणार्थ ज्या मारुतीचे स्मरण आपण आयुष्यात केलेले नसते, तो मारुती आपल्याला साडेसाती आल्यावर आठवू लागतो. लागलीच आपण त्या देवतेच्या पायाशी जाऊन ठेपतो. आपल्यापूर्वी तेथे आपल्यासारखेच अज्ञानी लोक दर्शनार्थ वाट पहात असतात. दर्शनादि विधी झाल्यावर, मारुती प्रसन्न होण्यासाठी, त्यांनी काही अपरिचित असे, म्हणजे मारुतीच्या अंगावर तेल घालणे इत्यादि प्रकार केलेले असतात. हा प्रकार दिसल्यावर आपली अशी भावना होते कीं, इतर भक्तांनाहि साडेसातीने ग्रासले आहे म्हणून आपणही मारुतीच्या अंगावर तेल घालण्यास सुरुवात करतो. वास्तविक आपल्या साडेसातीला भिऊन आपण मारुतीला तेल अर्पण करीत आहोत, याचा काहीतरी संबंध अर्थाअर्थी जीवनात आहे काय ? असा काही विचार न करता, जे वर्षानुवर्षे अनुकरण म्हणून देवतार्जन चालले आहे, ते किती हास्यास्पद आहे हे तुमचे तुम्हीच ठरवा.

अशाच प्रकारचे काही अनुकरणाचे दृष्टोत्पत्तीस येणारे प्रयोग म्हणजे बऱ्याच देवतांच्या देवस्थानांजवळ काही भक्त पशुपक्ष्यांचे बळी देत असतात. वास्तविक बळी देऊन देवदेवतांना संतुष्ट करण्याचा विधी कोणत्याही शास्त्रपुराणात आधार म्हणून सांगितलेला नाही. पण कोणत्या तरी युगात कुणा एका व्यक्तीने जो हा बळी देण्याचा प्रघात सुरु केला, त्यापासून आजच्या सज्ञान युगापर्यंत, मनुष्य जरी सज्ञान झाला आहे असे आपण म्हणतो, तरी त्याच्या वार्षिक कुलोपासनेच्या आचारविचारांकडे पाहिले की असे वाटते की, ह्याचे हे सुशिक्षीत होण्याचे लक्षण, जे समाजाला सामाजिक कार्य म्हणून व्यक्त होत आहे, तोच त्यांचा सुशिक्षीतपणा देवदेवता व धर्म यांच्यापुढे कसा नमता होतो ? हा बळी देण्याचा प्रघात जो अज्ञानीपणाने आपण स्वीकारलात, त्यामुळे आपल्या कुलदेवतांच्या पवित्र स्थानात काय कमीपणा आला, याचा तरी सूज्ञपणाने विचार करते झालात काय ? देवदेवतांच्या युगापासून ऋषीजनांनी स्थापित व अधिष्ठित केलेल्या ह्या देवदेवता, यांच्या ठिकाणी जे अलौकिक सामर्थ्य निर्माण केले होते व ज्या सामर्थ्याचा लाभ तुम्हाला, त्या तुमच्या कुलदेवदेवतां यांचे चिंतन, त्यांच्या स्थानापासून दूर राहून केल्यानेसुध्दा कृपाशिर्वाद म्हणून प्राप्त होत होता, त्या देवदेवतांच्या ह्या परिसरांमध्ये असा बळी देण्याचा हा प्रघात तुम्ही केवळ रुढीपरंपरेमुळे व अज्ञानाने केल्यामुळे, स्वाभाविक या देवदेवतांच्या क्षेत्रात दूषीतपणा आला. अशाप्रकारे तुम्ही विचारात घेतलेल्या प्रश्नांचा कौल म्हणजे ‘प्रसाद’ हा, जर योग्य झाला नाही, तर याला देवदेवता जबाबदार आहेत की तुम्ही जबाबदार आहात, हा ही विचार सूज्ञपणाने करा.

वरील बळी देण्याची प्रथा काही अज्ञानी व्यक्तिद्वारा अनुकरणात आली ही गोष्ट जरी खरी, तरी जे ज्ञाते आहेत व ज्यांना शास्त्राधार व शास्त्र÷ अवगत आहेत, अशांनी तरी ह्या देवदेवतांचा परिसर पवित्र व शुध्द राखला आहे काय ? ज्या कुटुंबियांचे उपाध्येपण गुरुजनांकडे आहे, ते ह्या कुलदेवतांचे सेवेकरी आहेत व ते त्यांची सेवा करीत असतात. ह्या गुरुजनांचे उपाध्येपण ज्या घराण्यापरत्वे आहे, त्या घराण्यातील दोष म्हणजे विद्या, संपत्ती, संतती आदिंचा नाश होतो म्हणून श्राध्दपक्ष, त्रिपींडी, नागबळी, नारायण नागबळी, पुत्रकामेष्टी इत्यादि विधी गुरुजन दोष निवारणार्थ त्या पवित्र अशा कुलस्वमिनीच्याच परिसरामध्ये करीत असतात. एका बाजूला बळी देण्याचा प्रघात व दुसऱ्या बाजूला ज्या तुमच्या घराण्यातील दिवंगत व्यक्ती मरणोत्तर जीवनानंतर मुक्त झालेल्या नाहीत, अशांना दोषमुक्त करून सद्गती देण्याचे विधीही याच ठिकाणी होत असतात. अशामुळे या देवतांचा परिसर हा आपण सूज्ञ लोक किती अपवित्र करीत आहोत, याचा विचार करुन, दोषपरत्वे करावे लागणारे विधी यांचा विधीनिषेध शास्त्रीय व शास्त्रोक्त पध्दतीने जरी सांगितला आहे, तरी त्याचा विचार अज्ञानीही करीत नाहीत व सज्ञानीही करीत नाहीत.

अशाप्रकारे आपल्याला आपल्या देवदेवतांच्या कृपाशिर्वादाची भेट प्राप्त करण्यास जो विलंब लागतो, त्यासाठी घेण्याच्या प्रसादाचे किंवा कौलाचे अनुमान तेथील पुजारी असे सांगतात की, देवीची किंवा देवतांची तुम्हा कुटुंबियावर अवकृपा आहे. वास्तविक जगाच्या उत्पत्तिपासून आज दिवसापर्यंत कुणीही देवदेवता यांनी कुणावरही अवकृपा केलेली नाही. पण ‘अवकृपा’ म्हणून होणारा जो प्रसाद किंवा कौल आहे हा देवतेचा नसून, देवतांच्या परिसरामध्ये जी अपवित्रता किंवा अमंगल अशी कृत्ये झाली आहेत त्याची साक्ष ह्या कुलदेवदेवता देत असतात. पण प्रसादातील ह्या देवदेवतांचा व्यक्त भाव जाणण्याची शक्ति तुमच्याकडे किंवा गुरुजनांकडेही नाही म्हणून ते असे सांगतात की, घरावर किंवा कुटुंबांवर देवदेवतांची अवकृपा आहे. हे ऐकतांच आपण संकटग्रस्त असल्यामुळे, गुरुजी सांगतील तो विधी निमूटपणे करण्यास तयार होतो. यापेक्षा त्या प्रसादावर किंवा कौलावर विसंबून न राहता, आपण त्याची शहनिशा करण्यासाठी आपल्या घरी स्थगित केलेल्या देवदेवतांसमोर आपण बसून, प्रार्थनापूर्वक या प्रश्नांची विचारणा करावी. या प्रार्थनेत आपण काही मुदतीचा काळ मागून घ्यावा. तो असा की, ‘आई,तू माझ्या घराण्याची रक्षणकर्ती असून, माझ्या यथाज्ञानाने व यथाशक्तिने मी तुझी आराधना करीत आहे. प्रसादावर किंवा कौलावर तू जो अवकृपेचा निर्णय दिला आहेस, हे सत्य मला तू तीन / सात दिवसात जर सांगण्याची कृपा केलीस, तर माझ्या अज्ञानाने घडलेल्या प्रमादाबद्दल मी यथाशक्ति व यथाज्ञानाने प्रायःश्चित घेऊन, तुझी कृपा प्राप्त होण्यासाठी, सदैव तुझ्या सेवेत व चिंतनात राहीन’. या प्रार्थनेचा प्रतिसाद निश्चित तुम्हाला तीन / सात दिवसात मिळाला पाहिजे. असे जर असेल, तर तुमची धार्मिक कृत्ये, व्रतवैकल्ये, उपासतापास व देवतांबद्दलचे कुलाचार, हे गुरुजनांवर अवलंबून नसून, ते स्वतःच्या पोषक अशा आचारविचारावर अवलंबून आहेत, याची साक्ष देवदेवतांनी दिल्यावर, निश्चितपणे तुम्हाला तुमच्या हयातीत, संशयाने पछाडलेल्या भूमिकेपरत्वे गुरुजनांनी सांगितलेल्या ह्या देवदेवतांच्या पूजा व उपासना यावर अवलंबून रहावयाला नको.

आपण भक्तांनी नित्याने आवश्यक जी उपासना काय व कोणती करावी, याबद्दल योग्य असे मार्गदर्शन मागे केलेलेच आहे. आता नित्याने काही प्रार्थना म्हणण्याची सवयसुध्दा आपणास व्हावयास पाहिजे. यासाठी सोप्यात सोपे मार्गदर्शन असे की, भक्तांना भक्तिमार्गप्रदीप म्हणून पुस्तक बाजारात मिळते हे माहित असेलच. किंवा काहींच्या संग्रहीसुध्दा ते असेल. ह्या पुस्तकातसुध्दा जरी अनेक स्तोत्रे, आरत्या, भूपाळ्या, अभंग छापलेले आहेत, तरी नित्याने घरातील सर्व व्यक्तीनी या पुस्तकात जे ‘मंगलाचरण’ छापलेले आहे, ते पाठ करून, सकाळी किंवा सायंकाळी, आपल्या घरातील सर्व व्यक्तींना एकत्र बसवून, ते म्हणावयाची शिकवण द्यावी. या मंगलाचरणात सर्व देवदेवतांचा नामनिर्देश झालेला असून,वेगवेगळ्या देवतांप्रीत्यर्थ असणारी स्तोत्रे व पोथ्या यांचा पाठ करण्यापेक्षा, नित्याने हे मंगलाचरण म्हणण्याची सवय सर्वांनी जर लावून घेतली, तर अगदी सोप्यात सोप्या अशा मार्गाने तुमच्या हातून धार्मिक आचरण, दैविक उपासना, ही वेळच्या वेळी प्रतिदिनी होऊन, तुम्हाला तुमच्या काया, वाचा, मनाची शुध्दता सदैव राखता येईल. अशा प्रथमावस्थेतील उपासना साधनेने तुमचा जेव्हा पाया तयार असतो व जेव्हा जीवनात दोषपरत्वे आलेल्या पीडा निवारण करण्यासाठी तुम्ही साधकाकडे आपल्या दु:खनिवारणार्थ जाता, तेव्हा जीवनातील दु:खे निर्माण होण्याची जी कारणे आहेत, त्याला योग्य असे निराकरण केल्यावर, त्या निराकरणपरत्वे तुमच्या जीवनातील किंवा कुटुंबातील दु:ख तथा अशांतता निर्माण करण्यास काही दोष कारणीभूत होतात, त्यांच्या निवारणार्थ साधकाला जी उपाय योजना करावी लागते, त्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी जे भक्तभाविक उपस्थित असतात, त्यांनी कृपाशिर्वादार्थ आपल्या जीवनाचा पाया जर सुलभ अशा उपासनेतून तयार केलेला असेल, तर हे दोष निवारण होण्यास वेळ न लागता, इच्छित असे प्राप्त सुख आपण सहजासहजी मिळवू शकू.

वरील सर्व निवेदन व कार्यपध्दती ह्या तुमच्या वाचनात आल्यावर तुम्हास असे लक्षात येईल की, या कार्यपध्दतीतील निराकरणे व त्यासंबंधीची शास्त्रीय मीमांसा ही कांही तर्कशास्त्रावर आधारलेली नाही किंवा जीवनाबद्दल निराधार अशी भूमिका निर्माण व्हावी ह्या हेतूने वरील कोणताही विषय व निराकरणे सूचित केले गेलेली नाहीत. आज परमेश्वर कृपेने या लोककल्याणाच्या कार्यास आरंभ होऊन बरीच वर्षे झाली. या अनेक वर्षात परमेश्वरकृपेने ज्या व्यक्तींच्या अडीअडचणी निवारण करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले, त्या मार्गदर्शन पध्दतीप्रमाणे, या मानवी जीवनातील सुखदु:खांचा विचार हा जो अवलोकन केला गेला, त्याचा विचार या कार्यपध्दतीत अभ्यास या दृष्टीनेच केला गेलेला असून, ज्या निराकरण पध्दती आज आपणास सूचित करण्यास येत आहेत, त्या सिध्दसिध्दांत पध्दतीने सिध्द असून, कोणतेही निराकरण जे येथे केले जाते, ते नियुक्त सेवकाच्या वैचारिक व इच्छापरत्वे नसते,हे सूज्ञ भक्तांनी लक्षात घेऊन, या कार्याचा लाभ शास्त्रीय पध्दतीने जर घेतलात, तर आपणच आपल्या सुखाचे वाटेकरी व्हाल.

>> अध्याय ७. कार्याची निराकरण पध्दती.

अध्याय ५ कुलाचार, कुलोपासना.<<