अध्याय ५ – कुलाचार, कुलोपासना

अन्नशुध्दी :- कुलधर्म करण्याची विस्तृत भूमिका आपणास निवेदन केलेलीच आहे. आता ‘कुलाचार’ म्हणून ज्या काही गोष्टी आहेत, त्यासाठी जे निवेदन आहे, तेही महत्वाचे आहे. जे अन्न रोज आपण सेवन करता ते अन्न ग्रहण केल्यावर, पचनादि क्रिया झाल्यावर, त्याचे रक्तात रुपांतर होऊन त्याचा पुरवठा शरीराकडे विचार-आचारार्थ केला जातो. यासाठी जे अन्न रोज आपण सेवन करु, ते पवित्र असावयास पाहिजे. घरातील स्त्रिया जो स्वयंपाक करीत असतात, तो कदापिही स्नानापूर्वी करु नये. स्नानानंतर जो स्वयंपाक गॅसच्या चुली, कोळश्याच्या शेगडय़ा आदीवर आपल्याला करावयाचा आहे, त्या नित्याने सकाळी ओल्या फडक्याने पुसून घ्याव्यात व मगच त्यावर स्वयंपाक करावा. आज घरोघरी कुकर लावण्याची पध्दत असल्याने, प्रधान अन्न कोणते शिजवावे हे सूज्ञ गृहिणींना अजून तरी समजले आहे असे वाटत नाही. कारण पाकशास्त्रामध्ये प्रधान अन्नाला प्रथम शिजवावे असा शास्त्राधार आहे. तो म्हणजे प्रथमतः भात शिजवावा, मग डाळ किंवा भाजी शिजवावी व शेवटी चपात्या किंवा पोळ्या अशा क्रमाने स्वयंपाक करावा. आजकाल कुकर वापरण्याची पध्दत असल्याने, कुकरमध्ये डाळी शिजण्यास वेळ लागतो म्हणून कुकरध्ये डाळी खाली ठेवून, त्यावर भात शिजविण्यास तांदूळ ठेवण्यात येतात. हे जरी खरे, तरी अशा शिजविण्याने ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ ही वचनोक्ति सिध्द होत नाही. या साठी शक्यतो भात प्रथम शिजविण्यात यावा. कारण भाताचा हितसंबंध इहलोकापासून परलोकापर्यंत आहे.

स्वयंपाकघरात अन्न शिजविण्यासाठी ज्या माध्यमांचा आपण उपयोग करतो, या व्यतिरिक्त कोळसे वापरण्याची एखादी लहान शेगडी असावी. ती रोजच्यारोज धुवून त्यावर चार कोळसे का होईनात, पेटवावेत. कारण आपण आधुनिक माध्यमे म्हणजे गॅसची शेगडी, इलेक्ट्रिकची शेगडी किंवा स्टोव्ह हे जे वापरतो, त्यांना ‘अग्निदेवता’ असे म्हणत नाहीत. कोळशातून जो अग्नि प्रकट होतो, त्यालाच अग्निदेवता म्हटलेले आहे. याचा हेतू असा आहे की, आपल्या शरीरात अन्नपचनाची क्रिया ज्या जठरमाध्यमातून होते, ते जठरमाध्यम अग्निस्वरुप आहे. म्हणून ज्या ज्या प्रकारचे अन्न आपण सेवन करु, त्या त्या अन्नाचे पचन होत असते. जे अन्न आपण सेवन करणार आहात, ते पवित्र न होऊन आपल्या पोटात जाण्याने, पोटातील वातविकारापासून ते बध्दकोष्ठतेपर्यंतचे रोग होऊन, आपण डॉक्टरकडे जाऊन, औषधासाठी अवाढव्य खर्च करुन, ते निवारण करुन घेतो. त्याऐवजी पवित्र अशा अन्नाच्या सेवनाने या रोगाचे उच्चाटन होते. यासाठी प्रथमतः केलेला जो भात आहे, त्यातील थोडा भात ताटलीत किंवा वाटीत घेऊन त्यावर तूप, दही किंवा दूध घालून जी कोळशाची शेगडी पेटविली आहे, हळदकुंकू वाहून, त्या पेटलेल्या शेगडीत पंचप्राण आहुती, मधली दोन बोटे व अंगठा अशा तीन बोटांनी द्याव्यात. आहुती देताना ‘प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मण्ये स्वाहा’ असे म्हणत ते पंचप्राण म्हणजे आपल्या शरीराचे प्रधान तत्त्व आहे. हे पंचप्राण अन्न व श्वास यांच्या पूरक क्रियेने कर्य करीत असतात. तेव्हा त्यांना पवित्र अशा अन्नाचा लाभ करुन देण्याने, आपण आजार मुक्त होऊन, निरोगी व निरागस असे दीर्घायुष्य प्राप्त करुन घेतो. स्वयंपाक झाल्यावर प्रथमतः देवास नैवेद्य दाखवावा. हा नैवेद्य दाखविणे याचा अर्थ आपण जे अन्न सेवन करणार आहोत ते ताटात वाढून देवापुढे ठेवणे असा होत नाही. तर वाढलेले ताट देवापुढे ठेवण्यापूर्वी, जागेच्या शुद्धतेसाठी देवापुढे चौकोनी मंडल करावे. गोल मंडल चुकूनही करू नये. कारण हे मंडल फक्त श्राद्धपक्षादि विधीच्यावेळी दिवंगत व्यक्तींना जो अन्नाचा नैवेद्य दाखविला जातो त्यासाठी आहे. या चौकोनी मंडलावर वाढलेले ताट आपण जेवावयास बसल्यावर प्रथमतः वरणभात आपल्यासमोर वाढला जातो तशा पध्दतीने ते देवापुढे ठेवावे. पाटावर बसून, दोनदा आचमन करुन, हातात एक पळी पाणी घेऊन, ते पाणी डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे ताटाभोवती दोन वेळा फिरवावे. हे करीत असता तोंडाने वरीलप्रमाणे पंचप्राणांचा उच्चार करावा. तिसऱ्यांदा उजव्या हातावर पाण्याचे उदक सोडावे. त्यानंतर दोन चतकोर भाकरी किंवा पोळी घेऊन, त्यावर प्रत्येकी थोडा भात ठेवून, जे काही तोंडी लावणे केले असेल ते वाढावे. एका चतकोरावर वाढलेल्या अन्नावर मधल्या दोन बोटांनी पाणी घालावे व ते जेवण घरा बाहेर नेऊन ठेवावे. यास जरी ‘वास्तूनैवेद्य’ म्हणून संबोधण्यात येते तरी तो वास्तूनैवेद्य नसून, आपण रहात असलेल्या वास्तूचा समावेश हा आपल्या घरातील देवदेवतांसमवेत असल्याने, देवाला जो नैवेद्य दाखविला, त्यामध्ये वास्तूचा समावेश झालेला असतोच. जो नैवेद्य बाहेर ठेवावयाचा असतो तो एवढ्यासाठीच की, आपल्या घराबाहेरील वातावरणांत असंख्य असे आत्मे अन्नाच्या वासनेने तिष्ठत असतात. त्यांना त्यांच्या वासनेतून मुक्त होण्यासाठी आपल्या या अल्पशा सेवेने जे सहाय्य होते, हा नकळत घडणारा परोपकार असतो. बऱ्यांच कुटुंबात हे अन्न बाहेर नेऊन ठेवण्याचा संकोच त्यांना एवढय़ासाठी वाटतो की, शेजारी काय म्हणतील ? या शेजाऱ्यांच्या शंकाकुशंकांना भिऊन ते अन्न आपण आपल्या खिडकीबाहेर किंवा गॅलरीत ठेवतो. पण आपण जे अन्नदान केले ते वास्तूच्या परिसरात ठेवून होत नाही. ते वास्तूबाहेरच ठेवले गेले पाहिजे.

दुसरा जो अन्नातील वाटा आपण काढला आहे, तो वाटा तसाच ठेवून, जेव्हा एखादा भिकारी भीक मागावयास येतो, त्याला तो द्यावा. पण चुकूनही त्याचा अनादर ‘पुढे चालू लागा’ असे म्हणून करु नये. त्याच्या कर्मपरत्वे आज त्याला ही जी परिस्थिती अन्न मागण्यासाठी दारोदार हिंडण्यास कारणीभूत झाली आहे; ही जरी गोष्ट खरी, तरी आपणही त्याचपैकी एक भिकारी आहोत हे विसरता कामा नये. कारण तो दारोदारी जे कर्मपरत्वे करतो आहे त्याचप्रकरचे कृत्य आपण आपली कर्मे अनुकूल करून घेण्यासाठी देवापुढे बसून भीक मागून करीत असतो. पण इतका तात्त्विक विचार आपल्याला कुणी सूचित केला नसल्याने, आपणास अन्नदानाचा जो परोपकार करावयाचा आहे, त्याचे पुण्य किंवा समाधान जोडावयाच्याऐवजी आपल्याच कष्टार्जित अन्नाचा शाप आपण घेण्यास कारणीभूत होतो. तो कशामुळे ? तर भिकारी हा शब्द उच्चारल्यावर कधीही आपणास या शब्दाबद्दल आदर वाटत नाही. तेव्हा ह्या परिस्थितीने उभा राहीलेला मनुष्य माझ्याचप्रमाणे आहे हे आपण जाणून घेत नसल्याने, त्या भिकाऱ्यास आपण पानात टाकलेले जे अन्न असते ते फेकून देता येत नाही, म्हणून त्यास आपण ते वाढतो. हे अन्न उष्टे आहे हे त्याला समजते. पण दुपारी बारा वाजता ज्या अन्नाची गरज आहे ती भूक अनावर झाल्यानें तो त्या परिस्थितीशी बध्द झालेला आहे. हे अन्न तो बारा वाजताची आपली भूक शमविण्यासाठी खातो. पण आपण जे अन्न वाढलेत ते उष्टे असल्याने, स्वाभाविक आपण दोषस पात्र होतो. दारोदारी येणाऱ्या व्यक्तींना ‘भिकारी’ म्हणण्याचा जो प्रघात आपण पाडला आहे, तत्पूर्वी नोकरी,धंदा, व्यवसायासाठी तुम्हीसुध्दा दारोदारी फिरत असता. येथे जर तुमची संभावना ‘भिकारी’ म्हणून केली तर करीत असलेल्या नोकरीत आपले मन रमेल काय ? यासाठी जे अन्न आपण सेवन करतो त्यात इतरांचा जो वाटा आहे तो त्याला देत असताना, आपणच तो घेत आहोत अशा स्वच्छ विचाराने तो दिलात तर जीवनात अन्न-वस्त्राला कधीही कमतरता पडणार नाही.

वास्तूपूजन :- रोजच्या रोज स्नानादी विधी करून, सुवासिक साबण लावून, आपण आपले शरीर स्वच्छ व शुध्द करतो. त्याच प्रमाणे बुध्दी, मन, चित्त हेहि शुध्द व्हावे म्हणून देवदेवतांची पूजाअर्चा करतो. पण ज्या वास्तूत हे सर्व विधी होऊन, आपणास त्या वास्तूचा कृपाशिर्वाद म्हणजे ‘ll तथास्तु तथास्तु तथास्तु ll’ असा मिळावयास पाहिजे, ती वास्तू आपण स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे याचा कधी विचार केलात काय? रहात असलेल्या जागेत वर्षा दोन वर्षानी रंगरंगोटी करणे म्हणजे वास्तुशुध्दता नव्हे. रहात असलेल्या जागेत जो चार भिंतींचा निवारा असतो, त्या भिंती उन्हाळा पावसाळा व हिवाळा यापासून संरक्षण देण्यासाठी आहेत. पण वास्तूचे वास्तव्य हे आपण ज्या घरात चालतो ती आपल्या पायाखालील जमीन व आपल्या डोक्यावर जे घराचे छत असते, तेथे तो वास्तू कृपाशिर्वादाचे छत्र म्हणून वावरत असतो. या छत्राची निगा कुटुंबात जी व्यक्ति पवित्र हेतूने व पूज्य बुध्दीने सांभाळते, त्या व्यक्तीला तो वास्तू या जगतात ‘छत्रपती’ नावारुपास आणतो. यासाठी वास्तूची शुध्दता अशाप्रकारे ठेवावयास पाहिजे की, सकाळी उठल्यावर प्रथमतः सर्व केर काढावा. पूर्वीच्या काळी हा केर घरातील सुवासिनी काढत असत. पण आजकाल आपण आपली कामे पै-पैसे देऊन, दुसऱ्याकडून त्याच्या कष्टाचा मोबदला देऊन जरी करीत असलो तरी जीवन समृध्द व सुखी करण्याची जी गुरुकिल्ली अनादिकाली सूचित केली, त्याचा लाभ आपण घेऊ शकत नाही. घरातील सुवासिनीने घरातील केर काढावा हे एवढय़ाचसाठी सूचित केले आहे की, आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनातील अनावश्यक असे दोष जेव्हा परमेश्वर कृपाशिर्वादरूपी केरसुणीने काढतो, तो केर काढण्यास त्याला कधीही कमी पणा वाटला नाही किंवा त्याने आपला कोणीही सेवक त्यासाठी नियुक्त केला नाही. मग आपल्या कुटुंबियांच्या हितार्थ जे सोपे मार्ग आसतात, त्यांचा शास्त्रीयदृष्टय़ा विचार करुन, आपण अवघड अशा मार्गाने सुखप्राप्ती करण्याचा मार्ग कां अवलंबिता ?

घरातील केर सुवासिनीने काढण्याचा दुसरा हेतू असा आहे की, त्यांना दिवसभर घरातील कामामुळे शारिरीक संवर्धनार्थ व्यायाम करणे शक्य नसते व नित्य व्यायामाने शरीर निरोगी राहते, म्हणून सकाळी केर काढल्याने स्वाभाविकच स्त्रियांना व्यायाम होत असतो. पण त्याचाही लाभ सोप्या मार्गाने न करुन घेता, शरीरात लठ्ठपणा आल्यावर, पोट मोठे झाल्यावर, वजन कमी करण्यासाठी जे मागाहून ‘औषधोपचार’ करणायाची आधुनिक फॅशन आहे, त्यास हे समर्पक उत्तर आहे. निदान सर्व घरातील केर काढणे जरी सुवासिनीला शक्य झाले नाही तरी निदान देवापुढील व स्वयंपाकघरातील केर सुवासिनीने काढावा.

आजकालच्या आधुनिक पध्दतीमुळे व नव्या वास्तूशास्त्रामुळे आपल्या घरातील दारांना उाबरा म्हणजे दाराची चौकट नसते. उंबरा हा चौकटीला असणे हे प्रतिक असे की, आपल्या घरात अनाहूतपणे प्रवेश करणारी जीवनातील जी दुष्कृत्ये व दुष्कर्मे आहेत, त्यांना घरात प्रवेश न होऊ देण्यासाठी ही लक्ष्मणरेषा आहे. यासाठी प्रत्येक सुवासिनीने स्नानानंतर देवापुढील जागा पुसून, त्यावर हळदकुंकवाचे स्वस्तिके काढावे व त्यानंतर आपल्या घरांत येण्याचे जे प्रवेशद्वार असेल ते ओल्या फडक्याने पुसून, दाराच्या उजव्या डाव्या बाजूस दोन दोन उभ्या रेषा वरुन खाली काढाव्यात. याचा अर्थ ज्या घरात आपण राहतो त्या वास्तूत ऋध्दि-सिध्दी ही सदैव नांदावी, म्हणजे विद्यासंपत्ती यांनी सुखाने आपल्याशी संसार करावा असा आहे.

समाजातील अनेक व्यक्तींचा असा समज आहे की, आपल्या ऐपती प्रमाणे आपल्याला स्थावर म्हणजे राहण्यासाठी घर बांधण्याची ऐपत आल्यावर आपण घर बांधतो. गृह-प्रवेशापूर्वी वास्तू-शांत आदि विधी करुन, आपण त्या वास्तूत रहावयास जातो. पुढे याच वास्तूत दुखः, अशांतता निर्माण झाल्यावर जेव्हा आपण मार्गदर्शनार्थ येतो तेव्हा आपल्या राहत्या जागेची वास्तूशांत झालेली आहे काय ? असा जो प्रश्न विचारले जातो तेव्हा उत्तर असे असते की, ती केल्यावरच आम्ही गृहप्रवेश केला. पण एकदा वास्तूशांत केली म्हणजे त्या वास्तूचे मंगलकार्य हयातीपर्यंत अनुभविण्यास येईल असे नाही. कारण त्याची निगा राखण्यासाठी जे मंगल आचारविचार कुटुंबात असावयास पाहिजेत ते नसतात. ते म्हणजे आजकाल कोणीही स्त्रिया मासिक पाळीची बंधने स्वतःहि पाळीत नाहीत व त्यांच्याकडे येणाऱ्या अन्य स्त्रियाहि पाळीत नाहीत. त्यामुळे साहजिकच वास्तूचे सामर्थ्य हळूहळू कमी होऊन, विद्या-संपत्ती कमी होऊ लागते. आजच्या परिस्थितीत जागेच्या अभावी घराची शुध्दता ठेवण्यास ही जी अडचण आहे, त्यासाठी सोप्यात सोपा मार्ग असा आहे की, घरात सदैव गोमूत्र ठेवावे. ज्या स्त्रियांना मासिक पाळीची बंधने पाळता आली नसतील, त्यांनी चौथ्या दिवशी डोक्यावरुन स्नान झाल्यावर एका भांडय़ात पाणी घालावे व त्यात हळदकुंकू घालून चार गोमुत्राचे थेंब घालावेत. हातात तुळशीपत्र घेऊन ते शुध्दोदक आपल्या राहत्या जागेत उजव्या हाताने सिंचन करुन घ्यावे. ही क्रिया जी स्त्री मासिक पाळीच्या बंधनात होती तिनेच केली पाहिजे. कारण तिने मासिक पाळीची बंधने न पाळल्यामुळे घरात जो विटाळ निर्माण केलेला असतो, तो तिलाच दूर करता येतो. इतरांनी करुन तो दोष दूर होत नाही.

पूर्वीच्या काळी वास्तूशुध्दतेची दुसरी एक बाजू होती. पण ती आजच्या आधुनिक काळात शक्य नसल्याने, त्यासंबंधी काही मार्गदर्शन करावे असे वाटत नाही. त्यांस ‘सडासंमार्जन’ म्हणत.

याशिवाय दर पौर्णिमेस व दर अमावास्येस घरातील कुटुंबप्रमुख व्यक्तींने आपल्या देवदेवतांची पूजा झाल्यावर, ज्या तबकातून देवाला ओवाळलेले असते ते तबक घेऊन, त्या तबकात गंध, फुल, अक्षता, निरंजन आदि साहित्याने राहत्या जागेचे चार कोपरे पूजन करावेत. पूजनाचा विधी असा की, प्रत्येक कोपऱ्यात प्रथमतः तीन पळया पाणी घालावे. त्यावर अक्षता वाहून गंध, फूल वहावे व नंतर तबकातील निरांजनाने ओवाळावे. असे हे चार कोपरे, म्हणजे पूर्व व दक्षिण दिशेमधील जो कोपरा असेल तेथून आरंभ करून, पुन्हा उत्तर व पूर्व या दिशांमधील कोपऱ्यापर्यंत यावे. असे केले असता, या सोप्यात सोप्या निराकरणाने तुमच्या जीवनात रुढीपरत्वे असलेल्या बंधनातुन तर तुमची सुटका श्रीगुरूंनी केलीच आहे, त्याशिवाय तुम्हाला सोप्यात सोप्या अशा मार्गदर्शनपद्धतीने तुमचे जीवन समृद्ध करण्याचा मार्ग सुचविला आहे. याचा लाभ म्हणजे काय हे अनुभवंती अनुभव घेउनच अनुभवास येईल.

आजकाल शहरात गोमूत्र मिळणे कठीण असते. अशावेळी जरी गोमूत्र मिळाले नाही तरी त्याअभावी आपली वास्तू शुद्ध करता येणार नाही असे समजू नये. वर सांगितल्या प्रमाणे शुद्धोदक म्हणजे फक्त पाणी, हळदकुंकू, गंध, फूल घालून ते तुळशीपत्राने जरी घरात सिंचन केले तरी शुद्धता होते.

वर निवेदन केलेली सोप्यात सोपी अशी वास्तूदेवतेच्या शुद्धतेबद्दलची जी निराकरण पद्धत आहे, त्याशिवाय पूर्वीच्या शास्त्राने जी पद्धत सांगितली आहे ती अशी की, आपल्या राहत्या वास्तूची वास्तूशांत दर बारा वर्षानंतर करावी. जेव्हा आपण नव्याने घर बांधतो तेव्हा जो विधी होतो, तो विधी ‘वास्तूप्रतिष्ठा’ म्हणून असतो, ‘वास्तूशांत’ म्हणून नाही. तेव्ह ज्या व्यक्ती गृहप्रवेशारंभी आपल्या इष्टमित्रांना, आप्त नातेवाइकांना ‘ वास्तूशांतीस या’, असे आमंत्रण देतात ते चुकीचे बोलवणे न करता, ‘वास्तूस्थापनेस या’ किंवा ‘वास्तूप्रतिष्ठाविधीस या’, असे आमंत्रण द्यावे. म्हणजे तुमच्या चुकीच्या आमंत्रणामुळे जो वास्तूस्थापनेस कमीपणा येतो, तो न येऊन ‘वास्तूस्थापनेस या’ असे म्हटल्याने, न कळत वास्तूदेवतेलाहि आवाहन केले जाते.

‘वास्तूशांत विधी’ म्हणण्याचा जो प्रघात आहे तो चुकीचा आहे. घरात रहावयास आल्यावर पुढे काही कालाने जेव्हा विद्या, संपत्ती आदि सुखांत कमतरता निर्माण होते, ते वास्तूचे सामर्थ्य आपल्या अशुद्ध आचारविचाराने जे कमी झालेले असते ते पुनःश्च त्याला प्राप्त करून देण्यासाठी ‘वास्तूशांत विधी’ आहे. असा विधी दर बारा वर्षांनी नाहीतर कुटुंबातील तिसरी पिढी सज्ञान होण्यापूर्वी करावयास पाहिजे. याचा अर्थ जर कोणास पहिली मुलगी झाली असेल तर तिचे अपत्य ही तिसरी पिढी धरली जात नाही. मुलाचे अपत्य हे तिसरी पिढी म्हणून धरतात. इतका हा खर्चिक वास्तूशांत विधी प्रत्येकाला करता येणे शक्य नाही व केला तरी व्यतीत झालेल्या बारा वर्षांच्या कालाइतकी अशुद्धता तुम्ही बोलविलेल्या गुरुजनांना घालविण्याचे सामर्थ्य नाही. यासाठी दर पौर्णिमा व अमावस्या या दिवशी सकाळी वर सांगितल्याप्रमाणे घराचे चार कोपरे पूजन करण्याचा विधी करावा; म्हणजे तुमची वास्तू चिरकाल सामर्थ्यवान राहून, ती सदैव तुमच्या कल्याणार्थ “तथास्तु तथास्तु तथास्तु”, “ॐ शांति: शांति: शांति:” असे म्हणत राहील.

लक्ष्मी-सरस्वती पूजन :- कुटुंबात लक्ष्मी व विद्या चिरकाल टिकवी यासाठी दरवर्षी दिवाळीमध्ये येणाऱ्या धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजन करावयास हवे. याचा अर्थ आपण असा घेतो की, आपण व्यवहारात ज्या माध्यमातून पै-पैशातून देवाणघेवाण करतो,ते पैसे म्हणजे लक्ष्मी. पण हे व्यावहारिक द्रव्य आहे. खरे द्रव्य म्हणजे लक्ष्मी हे सोने होय व सरस्वती म्हणजे चांदी होय. आपणास माहित नसल्याने आपला लक्ष्मीपूजनाचा अर्थ व्यवहारातील नाणी व नोटा असा लावतो. यासाठी सवडीत सवड काढून निदान पाच ग्रॅम सोन्याची मुद्रा, ज्यावर एका बाजूस पृथ्वीतत्व व दुसऱ्या बाजूस स्वस्तिक असे सोनाराकडून काढून घ्यावे. दुसरी मुद्रा चांदीची, पाच किंवा दहा ग्रॅम घेऊन, त्यावरही पृथ्वीतत्व व स्वस्तिक काढून घ्यावे. आजपर्यंत तुमच्या अनुभवास असे आले आहे की, ज्या ठिकाणी लक्ष्मी नांदते तेथे सरस्वती म्हणजे विद्या नांदत नाही; व जेथे सरस्वती नांदते तेथे लक्ष्मी नांदत नाही. वास्तविक ह्या दोघी सख्ख्या बहिणी असतांना याच्यात वेगळेपणा का असावा ? तर त्याला आपणच कारण आहोत. म्हणजे जीवनारंभी गुरुजनांनी ‘श्री’ हा शब्द ज्ञान म्हणून आपणास शिकवला. ज्या ‘श्री’ शब्दाने आपण ह्या जगतात ज्ञानी व जाणते झालो, त्या ‘श्री’ म्हणजे ज्ञानमाध्यमामुळेच आपल्याला ‘श्री’ म्हणजे संपत्ती, या अवस्थेची प्राप्ती करण्याचे भाग्य पुढील काळात जे लाभले, त्या जीवनारंभीच्या ‘श्री’ म्हणजे ज्ञान प्राप्त झालेल्या अवस्थेची उतराई आपण आयुष्यात कदापिही करीत नाही. विद्यार्जन हे जरी प्राप्त करण्यसाठी आपण पै-पैशाची देवाणघेवाण करून विश्वविद्यालयातून ते प्राप्त करते झालात, तरी ज्या गुरुजनांनी तुम्हास ज्ञानी केले, त्यांचे स्मरण आपण कधीहि करत नाही. वास्तविक वर्षातील जो गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या ऐकण्यात येतो, तो केवळ आध्यात्मिक मार्गातील गुरुंच्या कृपाशिर्वादाची उतराई आहे, असा जो आपला संकुचित विचार आहे तो चुकीचा आहे. ज्या कोणास जीवनात आध्यात्मिक अथवा पारमार्थिक मार्गाने मार्गदर्शन घेण्याचा लाभ झाला नसेल, किंवा इच्छा झाली नसेल, त्यांनीही प्राप्त झालेल्या, पदवीबद्दल, मानसन्मानाबद्दल उतराई होण्यासाठी निदान गुरुपौर्णिमेच्या दिवशी, ज्या गुरुजनांकडून विद्यासंपन्न होण्याचे भाग्य प्राप्त केले, अशा गुरुजनांचे पूज्य स्मरण करुन, आपल्या इष्टदेवतेसमोर यथाशक्ति काही गुरुदक्षिणा ठेवून, ती ठेवलेली गुरुदक्षिणा एकतर ज्यांनी आपणास विद्याविद्यार्जन दिले त्यांना नेऊन द्यावी अथवा समाजात ज्या काही सामाजिक, धार्मिक, वैद्यकिय संस्था असतील त्यांच्याकडे ही गुरुदक्षिणा जमा करावी. अशाप्रकारे तुम्ही केलेल्या ह्या विधीमुळे, तुम्ही प्राप्त केलेल्या विद्येबद्दल उतराई होण्यचे कर्तव्य तुमच्या जीवनामध्ये सहजासहजी होऊन, प्राप्त झालेल्या जीवनात जी काही ऐहिक समृध्दी आहे, त्यांतील अंशमात्र भाग म्हणून परोपकाराचाही लाभ नकळत तुम्हास प्राप्त होतो. अशा विधीमुळे तुम्ही प्राप्त जीवनात विद्या व संपत्ती म्हणजे ऋध्दि-सिध्दी या दोन्हीचे उपासक झाल्याने, तुमच्या घराण्यात किंवा कुटुंबात, भवितव्यात विद्या व संपत्ती यांचा सुलभपणे यथोचित लाभ होतो.

वर सांगितल्याप्रमाणे सोने व चांदीच्या दोन मुद्रा पूजनार्थ धनत्रयोशीला आपण जर केल्या, तर ही प्रतिके भावी पिढीत तुमच्या मुलाबाळांच्या विद्या, संपत्तीला पूरक होऊन, तुमची भावी पिढी विद्यावान व धनवान होईल.

अशा प्रतिमा कुटुंबात लक्ष्मी – सरस्वती म्हणून पूजनासाठी कशा कराव्यात याबद्दलचे तात्विक मार्गदर्शन केले आहे. लक्ष्मी म्हणून सोन्याची जी प्रतिमा आपण करुन घ्याल, त्या प्रतिमेवरील पृथ्वीतत्त्वात ‘श्री’ असे लिहून घ्यावे व जी चांदीची प्रतिमा आहे ती जिला सरस्वती म्हणून संबोधले जाते, तिच्यावरील पृथ्वीतत्त्वात ‘ॐ’ हे अक्षर लिहून घ्यावे. याचा शास्त्रीय व तात्त्विक उद्देश असा आहे की, लक्ष्मीसमवेत सरस्वती व सरस्वतीसमवेत लक्ष्मी अशी ही दोन वेगवेगतळी तत्त्वे एकमेकांशी एकरुप व्हावीत. अशा प्रतिमा बाजारातून करुन आणल्यावर त्या प्रथमतः शुध्द करुन घ्याव्यात. त्या अशा की, पाण्यात हळदकुंकू, गोमूत्र घालून त्याने त्या धुवून घ्याव्यात. त्या प्रतिमा देवात ठेवण्यापूर्वी त्यावर गुरुजनांकडून श्रीसूक्ताचा अभिषेक करवून घ्यावा. ते शक्य न झाल्यास आपण स्वतः पूजनादि साहित्याने पंचामृताने पूजन करावे. ‘पंचामृत’ म्हणजे एकां वाटीत गरजेपुरते दूध, दही, तूप, शुद्ध मध व साखर घ्यावे. त्यापैकी तूप हे नाममात्र घालावे. कारण पंचामृत पूजन झाल्यानंतर तूपाचा ओशटपणा त्या प्रतिमांवर राहतो. त्यानंतर त्या प्रतिमा पूजनार्थ देवापुढे ठेवून, मागे सांगितल्याने पूजनादि विधी करावा. ह्या प्रतिमा नित्याच्या पूजनामध्ये ठेवल्यानंतर, केवळ रूढीपरंपरेचे अनुकरण म्हणून दिवाळीच्यावेळी धनत्रयोदशीस जी पूजा आपण वर्षातून एकदा करतो व वर्षभर धनप्राप्तीची याचना करतो, यापेक्षा रोजच ह्या देवतांची गरज नित्याची असल्याने, त्यांच्या पूजनाचा सुखसोहळा जो वर्षातून आपण एकदा करतो, तो रोजच्या रोज करण्याने विद्या व संपत्ती संतुष्ट होऊन तुम्हाला कृपाशिर्वाद देत असतात.

आजपर्यंत अनेक वेळेला आपण भक्तांकडून असे विचारण्यात आले की, ‘आम्ही आमच्या देवदेवतांप्रीत्यर्थ आमच्या यथाशक्ती व यथाज्ञानाने जर कुलधर्म करतो, तर केलेल्या कुलधर्माचा कृपाशिर्वाद आम्हाला मिळून आमचे जीवन समृद्ध का होत नाही ?’ तर याचे उत्तर असे की, कुलधर्म हा जीवनात पंचवीस टक्केच मनोभावनेने करावयाचा असून, पंचाहत्तर टक्के कुलाचार म्हणून जो आहे, तो केला पाहिजे. आजपर्यंत आपण भक्तांना एवढेच ज्ञान दिले आहे की, कुलधर्म व कुलाचार म्हणजे एकच विधी आहे. परंतु कुलधर्म हा जो विधी आहे तो घराण्याच्या परंपरेतील देवदेवतांसाठी असून, ह्या देवदेवताच्या कृपाशिर्वादाला कुटुंबातील सर्व व्यक्ति पात्र व्हाव्यात कुलाचार म्हणून सांगितला आहे, तो देवतांसाठी नसून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. हे आपल्या अध्ययनात आजपर्यंत न आल्याने, कुलधर्माचे फल का मिळत नाही? असा प्रश्न आपण गुरुमार्गात विचारणा म्हणून करतो.

आता जीवनात संपत्ती – विद्या – सुख – शांति यांचा अभाव आज आपल्याला सर्वत्र पहावयास मिळतो आहे. याला कारण म्हणजे आपण आज जीवनात अनावश्यक अशा अनेक देवदेवतांचे उपासक झालेले आहोत. हे जीवन सुख, शांति, समाधानात व्यतीत करण्यासाठी इतक्या देवदेवतांची गरज अत्यावश्यक आहे काय ? जर तुम्ही आपल्या सभोवार असणाऱ्या प्रत्येक स्त्री – पुरुषास आई – वडिल म्हणून संबोधू लागलात, तर फक्त जन्मदाते आई व वडील हेच तुमच्या निर्माण झालेल्या दुखात सहभागी होत असतात. ज्या इतरांना तुम्ही आई – वडील म्हणून संबोधता, ते फक्त तुमच्या सुखात सहभागी होतात. यासाठी आपले इष्ट कर्तव्य असे की, आपल्याला जे मागावयाचे आहे, ते निष्ठापूर्वक आपल्या देवदेवतांकडे मागावे.

कुटुंबात विद्या, संपत्ती यांची समृद्धि व्हावी अशी प्रत्येकाची स्वाभाविक इच्छा असते. त्याप्रमाणे आपणास त्याची प्राप्तीसुद्धा होत असते. पण प्राप्त झालेली समृद्धि अधिक समृद्धित करण्याचे कर्तव्य तुमच्या कुलाचारावर अवलंबून आहे. ते असे की, तुमच्या घरात सुवासिनी, कुमारिका असतात त्यांच्या पूर्वपुण्याईने तुमच्या घरात विद्या, संपत्ती नकळत आलेली असते. ही समृद्धि तुमच्या कुटुंबातून घराबाहेर जाता कामा नये, याची काळजी तुम्ही घ्यावयास पाहिजे. घरातील सुवासिनी, काही कारणपरत्वे जेव्हा घराबाहेर जात असतात तेव्हा घराबाहेर पडण्याची जबाबदारी आपल्यावर काय आहे याचा आपण कधीच विचार केला नाही. जी समृद्धि तुमच्या पूर्वपुण्याईने आली आहे ती कुटुंबात सदैव जतन करण्यासाठी या सुवासिनींनी कदापिही दुर्लक्ष करून आपल्या पुण्याईने कुटुंबात प्राप्त झालेली समृद्धि घराबाहेर नेऊ नये. याचे उदाहरण म्हणजे बाहेर जाताना आपण आपल्या गरजेइतकेच पैसै बरोबर नेतो व जे अधिक असतील त्यांना कपाटात कुलुप-किल्ली लावून ठेवून देतो. त्याप्रमाणे तुमच्या पुण्याईने कुटुंबात आलेली समृद्धि घराबाहेर जाऊं नये, हे घरातील प्रत्येक सुवासिनीचे कर्तव्य आहे. ते असे की बाहेर जाण्यापूर्वी आपण सुशोभित वस्त्रे धारण करुन बाहेर पडता त्यावेळी समृद्धि ही घरात जतन होऊन रहावी, यासाठी तुम्हाला कोणत्याहि निमित्ताने घराबाहेर जावयाचे असेल, त्यांवेळी देवास हळदकुंकू वाहून देवास असे सांगा की, “मी बाहेर जाऊन येते.” अशावेळी देव तुमच्याजवळील समृद्धि स्वःजवळ ठेवून तुम्हाला जाण्यास निरोप देईल. बाहेरुन परत आल्यावर तुम्ही हात पाय धुवून देवाला नमस्कार कराल, तेव्हा तुमच्या देहाशी एकरूप करेल. अशा करण्यात काही पै पैसा किंवा अधिक काही वेळ तुम्हाला खर्च करायला लागत नाही. पण अशा करण्याने जीवनातील अमूल्य असा ठेवा, जो वारंवार पूजाअर्चा करुनसुद्धा तुम्हाला प्राप्त होणार नाही, तो निष्ठेने जतन करणे हे तुमचे कर्तव्य आहे.

हा उपाय प्रसंगपरत्वे तुमच्या बाहेर जाण्यायेण्यासाठी शास्त्राने सूचित केला आहे. पण ज्यावेळी तुम्हाला राहत्या वास्तूपासून किंवा राहत असलेल्या गावाच्या सीमेपासून तीन दिवसापेक्षा अधिक काळ रहावयास जायचे आहे, त्यासाठी उपाय असा की, आपण गावाला जाण्यासाठी निघण्यापूर्वी अक्षता एका वाटीत ठेवाव्यात व त्यावर एक सुपारी ठेवून हळदकुंकू वहावे. देवास एवढीच प्रार्थना करावी की, “मी येते” मगच जाण्यास निरोप घ्यावा. असे केल्यानंतर जरी तुम्ही महिना दोन महिने बाहेर राहिलात तरी तुमच्या जन्माला येण्याबरोबर जी समृद्धि तुमच्या कुटुंबात आली आहे, तिचा सांभाळ देवदेवता करुन, पुन्हा तुम्ही घरी आल्यानंतर ही समृद्धि ह्या देवदेवता तुमच्याशी एकरुप करीत असतात. इतका व्यापक व विशाल अर्थ कुलधर्म व कुलाचाराचा आहे. केवळ शाब्दिक उच्चार म्हणजे कुलधर्म कुलाचार नव्हे.

कुलाचार विधीत प्रामुख्याने कर्तव्याचा जो ठेवा आहे, तो घरातील सुवासिनींच्यावर अवलंबून आहे. पुरुषांनी कुटुंबपोषणार्थ कष्टाने धनप्राप्ती करावयाचे कर्तव्य घराबाहेर केल्यानंतर, घरात आणलेली लक्ष्मी हिचे सुख व समृद्धि ही घरातील सुवासिनीच्या आचारविचारांवर अवलंबून आहे. यासंबंधी वर निवेदनात महत्वाच्या आचरणासंबंधी सुवासिनींना यथोचित मार्गदर्शन केलेच आहे. याशिवाय आणखी एक महत्वाची गोष्ट, जिचा खुलासा आपणास करून द्यावा लागत आहे. घरातील सुवासिनीने रात्री जेवण झाल्यानंत झोपावयास जाण्यापूर्वी, हातपाय धुवून चूळ भरून टाकावी व देवास हळदकुंकू वाहून, नमस्कार करून, झोपावयास जावे. याचे कारण स्त्रीला चोवीस तासात जीवनातील दोन इष्टकर्तव्यांची पूर्तता करावयाची असते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत प्रापंचिक कर्तव्यार्थ तिचा वेळ खर्च होत असतो. रात्री तिला वैवाहिक जीवनातील कर्तव्ये अंगीकारायची असतात. अशावेळी पति-पत्नीसमवेत त्या कुटुंबकल्याणार्थ असलेली समृद्धि म्हणजे ऋद्धिसिद्धि, जी ह्या सुवासिनींच्या ठायी वास करीत असते, ती ह्या कात तिच्याजवळ असणे गैर आहे. यासाठी सोप्यात सोपे मार्गदर्शन असे आहे की, रात्री झोपण्यापूर्वी देवाला हळदकुंकू वाहून तिने झोपावयास जावे, म्हणजे त्या ऋद्धिसिद्धि देवाजवळ वास करीत रहातात. सकाळी उठल्यावर प्रातर्विधीनंतर ती जेव्हा देवाला नमस्कार करते, तेव्हा त्या ऋद्धिसिद्धि पुनः त्या सुवासिनीच्या ठायी एकरुप होऊन, सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंतचे जे प्रापंचिक कर्तव्य आहे ते समृद्धपणे करण्यास त्या हितकारक होतात.

आता जी तुमची मुले – मुली सज्ञान होण्याच्या अवस्थेत आहेत, अशांचे शालेय व विश्वविद्यालयीन शिक्षण चालू आहे, त्यांना ह्या शिक्षणाचा लाभ जरी बुद्धि माध्यमातून घ्यावयाचा आहे, तरी ते शालेय व विश्वविद्यालयीन शिक्षण घेण्यास त्यांच्या बुद्धीची धारणा ही क्रियाशील असेलच असे नाही. पण अशा अवस्थेतील मुलामुलींची तरतूद करण्यास, परमेश्वराचा किंवा देवदेवतांचा कदापिही जरी नकार नसतो, तरी आपणच जर देवाचे अस्तित्त्व मानून त्याला शरण जाण्यास कमीपणा मानला आहे, तर मुलांना तरी देवाशिवाय आपले जीवन व्यर्थ आहे हे कसे कळणार ? यासाठीं जी मुलेमुली विद्याविद्यार्जनासाठी घराबाहेर जातात, त्यांनी घरांतून बाहेर पडण्यापूर्वी आपला देवदेवतांना अभिवंदन करून, त्यांचा निरोप घेऊन, शालेय किंवा विश्वविद्यालयीन शिक्षणास जावे. अशाने मुलामुलींना असा लाभ होतो की, त्यांची बुद्धि व धारणाशक्ति ही जरी विद्याविद्यार्जन करण्यास कमी पडत असली, तरी आपल्या इष्ट देवदेवतांच्या घेतलेल्या निरोपामुळे ती शक्ति त्यांच्या विद्याविद्यार्जनाची धारणाक्रिया करण्यास स्वाभाविक मदत करीत असते. इतके साधे व सोपे उपचार जीवन समृद्ध करण्यासाठी, परमेश्वराने जे शास्त्र म्हणून निर्माण केले आहेत, त्यांची अवहेलना करणे यासारखे दुसरे पाप नसून, ह्या जाणूनबुजून केल्या गेलेल्या पापाला धर्मात किंवा शास्त्रात प्रायश्चित्त नाही.

कुटुंबातील ज्या प्रौढ व्यक्ति नोकरीधंदा करून कष्टार्जित धन-प्राप्तीसाठी घराबाहेर जात असतात, ही धनप्राप्ती केवळ कष्ट करीत आहोत म्हणून आपल्याला प्राप्त होत नाही. त्यासाठी पूर्वी आपण जे विद्याविद्यार्जन केलेले असते, ते विद्याविद्यार्जन ह्या कष्टार्जित धनप्राप्तीसाठी खर्ची पडत असते. अशी प्राप्त केलेली विद्या ही धनप्राप्तीसाठी जेव्हा आपण नोकरी, व्यवसाय आदि ठिकाणी घेऊन जाता, त्यातील काही वाटा पुढील भावी पिढ्यांच्या हितार्थ कुटुंबात जतन करणे हे तुमचे कर्तव्य आहे. तुम्ही नोकरी व्यवसाय आदींसाठी बाहेर पडता, तेव्हा वरीलप्रमाणे देवदेवतांना नमस्कार करून घराबाहेर जावे. पण जे महत्प्रयत्नाने विद्यार्जन केले आहे त्यातील जरूरीइतकाच ठेवा जो नोकरी, व्यवसायाला आवश्यक आहे तेवढाच आपल्याबरोबर तेथे घेऊन जा व बाकीचा ठेवा देवापुढे एवढ्यांचसाठी शिल्लक ठेवा, की तुमच्या मुलामुलींनाही तुमच्याप्रमाणें विद्यावान व्हावयाचे आहे. तेव्हा हा बहुमोल वाटा जसा आपल्याला भाग्य म्हणून लाभला आहे तसा आपल्या मुलामुलीनांही त्याचा लाभ व्हावा यासाठी तो देवाजवळ सतत जतन करून ठेवला पाहिजे. तुम्ही प्राप्त केलेली विद्या ही संपत्तीच आहे. चरितार्थासाठी जो पै-पैसा आपणास मिळवावयाचा आहे, त्यासाठी प्राप्त केलेले संपूर्ण विद्याविद्यार्जन एवढ्याची आवश्यकता नाही. पण घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्ही देवाचा निरोप न घेतल्यामुळे, तुमचे पाऊल घराबाहेर पडताच ती विद्यासंपत्ती ही तुमच्याबरोबर येण्याने वातावरणातील दूषित वलये त्या तुमच्या विद्या-संपत्तीला स्वतःच्या ठिकाणी धारण करून, स्वतःचा विकास करण्यासाठी त्यांचा वापर करतात.

स्त्रियांनी परगांवी जाताना देवापुढे वाटीमध्ये अक्षता व सुपारी ठेवण्याची पध्दत सांगितली आहे, त्याचप्रमाणे कुटुंबातील पुरूष व्यक्तींनी परगावी जाताना आपल्या घरातील देवापुढे एक श्रीफल ठेवून, त्यास हळदकुंकू लावून, देवास नमस्कार करावा. अशा विधीस पूर्वी शुभाशुभ दिवसाचा विचार करून ‘प्रस्थान ठेवणे’ असे म्हणण्याचा प्रघात होता.

वर्षाकाठी आपण आपली हौस म्हणून बराचसा पैसा कपडालत्ता खरीदण्यासाठी खर्च करतो. त्यामध्ये आपल्या घरातील देवदेवतांचाही समावेश करणे अगत्याचे आहे, हे निराकरणात सूचित केल्याशिवाय स्वाभाविक तसे करण्याची इच्छा कोणास होत नाही. दरवर्षी घरातील सुवासिनीने आपल्या कुलदेवीच्या निदान पांच ओट्या तरी भरावयास पाहिजेत. त्या ओट्या भरण्याचा क्रम असा की,

पहिली ओटी :- चैत्र प्रतिपदेस.

दुसरी ओटी :- श्रावणात शुध्द पक्षातील मंगळवारी किंवा शुक्रवारी.

तिसरी ओटी :- आश्विनात शुध्द पक्षातील मंगळवारी किंवा शुक्रवारी.

चौथी ओटी :- दिवाळी प्रतिपदेस.

पाचवी ओटी :- पौषात शुध्द पक्षातील मंगळवारी किंवा शुक्रवारी.

वरीलप्रमाणे या सर्व ओट्या भरतांना सुवासिनीने त्या दिवशी डोकीवरून स्नान करून, आपल्या यथाशक्ति गोड नैवेद्य दाखवून, ओटी भरावी व सायंकाळी ती ओटी स्थानिक देवीच्या देवळात नेवून ठेवावी. ओटी भरण्यासंबंधीचे मार्गदर्शन कुलधर्मासंबंधीच्या विवेचनात यापूर्वी केलेलेच आहे.

वर्षातून या पाच ओट्या भराव्यात असे जे सूचित करण्यात आले आहे, त्यामागील महत्त्वाचा हेतू असा की, समाजातील काही रूढीपरंपरेप्रमाणे काही ठिकाणी व काही घरी चैत्रात हळदीकुंकू करण्याचा समारंभ करीत असतात. यामागे हेतू असा होता की, त्यानिमित्ताने आपल्याकडे सुवासिनींचे येणे होऊन, आपल्या गाठीभेटी व्हाव्यात. पण आज या समारंभास कोणीही शुध्द आचारविचाराने उपस्थित रहात नसल्याने, तो आटोपशीर करणे, म्हणजे पाडव्याला आपल्या कुलस्वामीनीची ओटी भरून ती स्थानीक देवीच्या देवळात नेऊन देणे, हेच अधिक महत्त्वाचे आहे.

श्रावणात अधिक व्रते व अधिक देवदर्शनाला जाण्याचा जो प्रघात आहे, तो रुढीपरंपरेप्रमाणे असून, हा महिना चातुर्मासातील एक महिना आहे. त्यावेळी गावातील इष्टदेवतेस जाण्याचा जरी नियम केला व जरी आपण दर्शनास गेलो, तरी त्याठिकाणी दर्शनार्थ पाच मिनीटे उभे राहण्याइतकी शांतता असत नाही. कारण वर्षातून याच महिन्यात अधिक पुण्यसंचय होतो असा काल्पनिक भाव असल्याने, नेहमीपेक्षा दर्शनार्थ येणाऱ्या व्यक्ति अधिक असतात. त्याचप्रमाणे दर्शनार्थ आपण देवापुढे उभे राहिल्यावर, देवाची हाक ऐकू येण्याऐवजी, मागून अन्य भक्तांची हांक अशी ऐकू येते की, “लवकर आवरा हो !” तेव्हा हे देवदर्शन इतक्या झटपट घेऊन, या श्रावण महिन्याचे महात्म्य तुम्ही मिळवूं शकता काय ? यापेक्षा मनोभावे आपल्याच कुलदेवतांची उपासना घरच्या घरी करून, या महिन्याचे महात्म्य आपण घरीच मिळवावे.

आश्विन महिन्यांत दहा दिवस नवरात्र करण्याचा जो प्रघात आहे, तो प्रत्येकजण सोय – गैरसोय ही विचारात घेऊन, त्या देवीच्या नवरात्राचे दहा दिवस कसेतरी आटोपून घेत असतो. ज्या घरांत किंवा कुटुंबात नित्याने कुलदेवदेवतांची आराधना, पूजाअर्चा, विधीने होत असेल, त्यांनी वास्तविक नवरात्राचा उत्सव विशेष महत्त्वाचा म्हणून करण्याचे काहीच कारण नाही. पण ज्यांना वर्षभर आपल्या देवदेवतांच्याप्रीत्यर्थ काहीच सेवा-आराधना करता येत नाही, त्यांच्यासाठी हा नवरात्रविधी सूचित केला आहे.ज्यांना ज्याप्रमाणे शक्य असेल त्याप्रमाणे त्यांनी नवरात्र करावे किंवा आश्विनातील मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या घरी देवीसमोर ओटी काढून ती स्थानिक देवीच्या देवळांत नेऊन पोहोंचवावी.

पौष महिन्यातही चैत्राप्रमाणे हळदीकुंकू समारंभास सुवासिनींना बोलवण्याची प्रथा आहे. या प्रथेप्रमाणे या हळदीकुंकू समारंभास महत्त्व असे आहे की, आलेल्या सुवासिनींना सौभाग्यवाण म्हणजे हळद, कुंकू यांच्या दोन पुड्या व एक साखरेची पुडी भेट द्यावयाची असते. त्याऐवजी अनेक प्लास्टिकच्या वस्तू, की ज्या भेट म्हणून दिल्यावर त्याचा काहीही उपयोग होत नाही, अशी जी देवाणघेवाण होते, त्याला भेट म्हणता येईल काय ? यापेक्षा हा समारंभ न करता,वर सूचित केल्याप्रमाणे कुलदेवीची ओटी भरणे हेच अधिक हिताचे आहे. वास्तविक जीवनाला योग्य वळण व योग्य संस्कार यांची जोड प्राप्त व्हावी, म्हणून पूर्वीच्या काळात सोप्यात सोपे पण हिताचे असे जे विधी सांगितले, त्याकडे अधिकाधिक दुर्लक्ष करून, अवघड अशा मार्गाचा अवलंब करून, अशी रूढी समाजात आपण रूढ केली आहे. त्यामुळे सर्वांना कर्तव्य म्हणून ज्या गोष्टी करावयाच्या असतात त्याला आज सर्वजण पारखे झाले आहेत.

आहारमीमांसा :- यापुढील महत्त्वाचा कुलाचार म्हणजे आपण नित्याने शरीरसंवर्धनार्थ जे अन्न सेवन करतो, की ज्याला आपण आपला ‘आहार’ म्हणतो, त्याबाबतसुद्धां यथायोग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्नाच्या पाकसिद्धिंची पवित्रता कशी ठेवावी हे वर सांगितलेच आहे. त्याचप्रमाणे जे अन्न आपण सेवन करतो, त्या अन्नाने केवळ शरीराचे पोषण करून त्याचे संवर्धन करावयाचे आहे असे नाही. अन्न हे सेवनार्थ आहे हे जरी खरे, तरी शुद्ध अन्नाची गरज प्रत्येक मनुष्याच्या देहिक व आत्मिक विकासाला पोषक असावयास पाहिजे. आहार म्हणजे अन्न हे दोन प्रकाराने सेवनामध्ये येत असते. एक म्हणजे शाकाहारी व दुसरे म्हणजे मांसाहारी. शाकाहारी अन्न हे स्वाभाविकच शुद्ध व पवित्र असे आहे. आपला देह हा पंचभौतिक तत्त्वांनी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश इत्यादि घटकांनी निर्माण झाला आहे. दिवसाकाठी आपण जे काबाडकष्ट करतो, ती शक्ति ह्या पंचतत्त्वांच्या एकरूपत्त्वानें निर्माण झालेली असते. काबाडकष्टामुळें जेव्हा ही शक्ति खर्ची पडते, तेव्हा साहजिकच ह्या पंचतत्त्वांत कमी-अधिकपणा निर्माण होतो. असा निर्माण झालेला कमी-अधिकपणा आपल्याला जरी जाणवत नसला, तरी ती उणीव भरून काढण्याला योग्य असा आहार म्हणजे शाकाहार होय. कारण शाकाहाराची उत्पत्ती नैसर्गिक अवस्थेतून होत असल्याने, त्या शाकाहाराच्या ठिकाणी पूर्णतः पांचही तत्त्वे असतात. असे शाकाहारी अन्न सेवन करण्याने, तुमच्या देहिक पंचतत्त्वांत जो काही कमी-अधिकपणा निर्माण झाला असेल, त्याची भरपाई हे शाकाहारी अन्न यथायोग्यपणे करण्यास कारणीभूत होते. पण मांसाहारी आहारात ज्या प्राण्यांचे मांस आपण सेवन करता, तो प्राणी जरी पंचतत्त्वात्मक असला, तरी त्या प्राण्यांचे मांस आपणांस त्याची हत्या केल्याशिवाय खाता येत नाही. हत्या केल्यानंतर जे मांस अन्न म्हणून तुम्ही सेवनार्थ आणता, त्यामध्ये फक्त पृथ्वी, आप एवढेच तत्त्व शिल्लक राहिलेलें असते. कारण हत्येनंतर तेज म्हणजे त्याचा आत्मा व वायू, आकाश तत्त्व म्हणजे हत्येपूर्वी ह्या प्राण्यास चलनवलन करण्यास लागणारी दोन तत्त्वे, ही वातावरणात विलीन ही वातावरणात विलीन होतात. शेवटी मांसाहारी अन्न म्हणून ज्याला म्हणतात ते अन्न फक्त पृथ्वी व आप अशा दोन तत्त्वांनी युक्त असते.

प्रत्येक मानवाचा जन्म हा पंचतत्त्वात्मक असून, प्राप्त जन्माचा विकास व उद्धार याच जन्मात अतिप्रयत्नाने करावयाचे कर्तव्य असल्याने, ही देहधारणेसाठी जी पंचतत्त्वे आहेत ती परमेश्वराने यथायोग्य प्रमाणात देऊन, सुलभ अशा पद्धतीने आपला जीवन-उद्धार व्हावा, ही योजना केलेली आहे. असे असताना, मांसाहाराने जरी आपण देहाने धष्टपुष्ट म्हणजे अधिक प्रमाणामध्ये आपले पृथ्वी व आप वाढविण्याने देहिक सुदृढता प्राप्त करतो, तितक्यांच प्रमाणांत आपली आत्मिक सुदृढता कमी होत असते, हे कोणाहि सूज्ञाच्या लक्षांत येत नाही. यासाठी मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनी तो सोडून द्यावा असा अर्थ नाही, तर त्याचे सेवन मर्यादित असावे. याचे सहाजिक प्रमाण कसे असावे?  असा जर प्रश्न विचारलात, तर मांसाहार हा आठवड्यातून एकदाच घेणे तुमच्या हिताचे आहे.

अनेकवेळां शाकाहार करणाऱ्या व्यक्ती, ‘मांसाहार करण्यानें काय पाप लागते?’ असे विचारतात. वास्तविक दोन्ही अन्ने सेवन केल्यानंतर त्यांचे पचन करणे हा जरी देहाचा धर्म असला, तरी सेवन केलेल्या अन्नाच्या पचनक्रियेनंतर, जो अन्नरस अन्नपरत्त्वे निर्माण झालेला आहे, असा अन्नरस ज्या ज्या माध्यमांना पोषक असेल, त्याच माध्यमांकडे तो पाठविण्याचे कार्य हा देह करीत असतो. याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे शाकाहार हा पचनानंतर ज्यावेळी अन्नरसात रुपांतर होतो; व त्यांचे रक्तामध्ये रुपांतर होऊन, त्याचे रक्ताभिसरण होते; त्यावेळी शाकाहारी अन्नातून निर्माण झालेला अन्नरस, बुद्धि व मनाला सारख्याच प्रमाणांत पुरवठा करतो. पण मांसाहारी अन्न सेवन केल्यानंतर, पचनक्रियेपरत्त्वे त्याचा अन्नरस निर्माण होत असला, तरी तो रस फक्त बुद्धिमाध्यमाकडे प्रवाहित होतो. अशी स्वाभाविक रचना मनुष्याच्या ठिकाणी निर्माण केली गेलेली आहे. आज शाकाहारी माणसे मांसाहार करतात त्यांच्याबद्दल काही गैर असे लिहावयाचे नसून, त्यांना ह्या मार्गदर्शनपद्धतीत असे सूचित करावयाचे आहे की, या निसर्गात मनुष्य-प्राण्याशिवाय कोणीही आपला आहाराचा धर्म बदललेला नाही. उदाहरणार्थ चतुष्पाद प्राण्यात वाघ हा मांसाहारी आहे. त्याने गाय गवत खाते म्हणून कधी गवत खाल्ले नाही. गाईने वाघ मांसभक्षण करतो म्हणून मांसाहार केला नाही.  एवढेच नव्हे तर पक्षीसुद्धा आपल्या जन्मपरत्त्वे आपला आहार निश्चित ठेवतात; म्हणून उक्रांतवादाप्रमाणे त्यांची उक्रांती स्वाभाविक व नैसर्गिक होत असते. पण मनुष्यजन्म हा ‘नराचा नारायण’ म्हणून होण्यासाठी आपण घेतला आहे, ही जाणीव होऊनसुद्धा, केवळ अन्नसेवनार्थ ज्या आपल्या देहिक वासना आहेत, त्यांच्या आहारी जाऊन आपण नराचे नारायण होण्याऐवजी ‘नरपशू’ म्हणून या जन्माचा उपभोग घेत आहोत. पक्षी म्हणून जी एक योनी चौऱ्याऐंशी लक्ष योनींपैकी आहे, ही सकाळपासून सायंकाळपर्यंत मुक्त स्वातंत्र्याने, स्वच्छंद आनंदाने, आपल्या जीवनाचा कार्यकारणभाव व्यतीत करीत असते. असे पक्षी निसर्गाने नेमून दिलेल्या आहाराव्यतिरिक्त आहार करतात काय ? उदाहरणार्थ पोपट हा पिकलेल्या फळांच्याच शोधात असतो व तीच फळे सेवन करतो. चुकूनही मांसाहार सेवन करीत नाही. पण कावळा हा पक्षी ‘सर्वभक्षंतु’ असल्याने त्याला शाकाहार व मांसाहार याचा विधीनिषेध नाहीं. म्हणूनच मनुष्य दिवंगत झाल्यावर, त्याच्या इच्छावासना शिल्लक राहिल्या आहेत किंवा नाहीत हे त्याच्या आप्तांना कळण्यासाठी, पिंडदान झाल्यावर या कावळ्याची आतुरतेने वाट पाहतात.

वरील आहारासंबंधीची शास्त्रीय मीमांसा वाचनात आल्यावर, शाकाहार श्रेष्ठ की मांसाहार श्रेष्ठ ? हे प्रत्येकाने आपापल्या परीनें ठरवावे. याचा निर्णय हा साधुसंतांकडे वा धर्मनिर्णय मंडळाकडे जाऊन न विचारता, एवढेच लक्षात घ्यावे कीं, आपल्या पोषणार्थ काय योग्य-अयोग्य आहे, की जे अन्न-सेवन केल्यावर आपल्याला प्राप्त होईल.

आहारशास्त्राप्रमाणें शुद्ध आहारासंबंधी वर निवेदन केलेले आहे. पण आपल्या खाण्यापिण्यामध्यें ज्या काही खाद्यपदार्थ सेवनाची कमी अधिक तीव्रता असते याचे कारण तो खाद्यपदार्थ आपल्याला अधिक प्रिय असतो, म्हणून आपण सेवन करतो, एवढाच मर्यादित अर्थ ह्या खाण्यासंबंधी आपण विचारात घेतो.

कुटुंबात जर तीन किंवा पाच माणसे असतील, तर प्रत्येकाच्या आवडी-निवडी ह्या भिन्न असतात. ज्याला जो खाद्यपदार्थ अधिक आवडतो तो दुसऱ्याला बिलकुल आवडत नाही. असे असण्याची जी कारणे आहारमीमांसेमध्ये सांगितली आहे, त्याचा तात्विक विचार केल्यावर, आपल्या पुढील पिढ्यांना सुलभ व सुखकर असे जीवन आपण प्राप्त करून देण्याचे कर्तव्य करणार आहात. त्यासाठी ही जी दुसरी आहारमीमांसा आहे, तिला ‘कुलोपासना’ असे म्हटले आहे. कुलोपासना म्हटल्यावर आपण भक्तांची कल्पना अशी होते की ही उपासना देवाप्रीत्यर्थ आहे. पण तसे नाही. ‘कुलधर्म’ हा देवदेवतांप्रीत्यर्थ आहे. ‘कुलाचार’ हा कुटुंबातील व्यक्तींच्या आचारविचारांची शुद्धता करून, केलेल्या कुलधर्माचा कृपाशिर्वाद प्राप्त करण्याचे माध्यम आहे. पण ‘कुलोपासना’ म्हणजे ज्या ज्या घराण्यांत किंवा कुटुंबात आपण जन्माला येतो, त्या घराण्यात जन्माला येणाऱ्या पुढील भावी पिढ्या, यांच्या जीवनधारणेचा हितसंबंध हा आपल्या रक्ताशी आहे. आज आपल्याला प्राप्त होणारे सुख, शांति, संपत्ती, संतती, दीर्घायुष्य हे भावी पिढ्यातही अशाच प्रकारे सुखासमाधानाने मिळावे यासाठी ही आहारमीमांसा त्याचा मूलभूत पाया आहे. आपण आपले जीवन व्यतीत करीत असतांना जीवनकार्य ज्या देहमाध्यमातून चालू असते, ते कार्य जन्मजन्मांतर व जन्मकर्म ऋणानुबंधपरत्त्वे होत असते. जन्मकर्मपरत्त्वे होणारे कार्य स्थूल देहाकरवी होते व पूर्वीच्या अनेक जन्मातील ज्या इच्छावासना गेलेल्या नाही, त्यांचे पूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी हे जन्मजन्मांतर, म्हणजे सूक्ष्म देह, ह्या स्थूल देहाकरवी त्या इच्छावासना पूर्णत्वाला नेत असतो. अशी ही जीवनाची कार्यकारण रचना आहे.

आज जो देह सकाळी उठल्यापासून रात्री झोपण्यापर्यंत बोलता-चालता, कळत-नकळत ज्या काही क्रिया करीत असतो, त्याला आपण ‘कर्म’ म्हणून संबोधतो. उदाहरणार्थ नकळत आपण एखाद्याला शिवी दिली तर आपण त्याला ‘पाप’ म्हणतो. रस्त्याने जाताना एखादे देऊळ दिसले कीं आदराने आपण त्या देवळापुढे उभे राहून नमस्कार करतो. यास आपण ‘पुण्य’ म्हणतो. दिवसाकाठी अशा ज्या क्रिया आपल्या कळत नकळत हजारो वेळा होतात, त्याला जर आपण कर्म म्हणून संबोधू लागलात तर पुढील जन्मांत जन्मप्राप्तीनंतर आपल्या देहपरिसरात तुम्ही संबोधलेल्या कर्माचे महान पर्वताएवढे प्रचंड वलय निर्माण झालेले दिसेल. तशी कर्मउत्पत्ति होत नसते. पूर्णतः कर्माची उत्पत्ति होण्यास, विषय-क्रिया-कारण-कार्य-कर्म इतक्या अवस्थांतून जावे लागते. अशा या चार अवस्थेतून तुमच्या इच्छावासनेचा विषय क्रिया करता होईल, तेव्हा कार्य म्हणून ही क्रिया जेथे पूर्ण होते, त्या पूर्णावस्थेतील क्रियेला ‘कर्म’ असे म्हणतात. पुनश्च चांगले कर्म करण्याची कर्तव्य म्हणून जी इच्छा आपणाला होते व ती ज्या सद्विचाराने व सुविचाराने आपण करतो, त्याला कारण आपल्या सभोवार असणाऱ्या विषयपरत्त्वे आपण ती करीत नसून, ती प्रेरणा म्हणजे पूर्वजन्मातील इच्छा, कार्यान्वित होत असते. ही इच्छा म्हणजे सूक्ष्म देह अथवा जन्मजन्मांतरात असलेली आपली ठेव आहे. असे असतानासुद्धा आपण अनेक चांगल्या इच्छा स्थूल देहाने विषयपरत्त्वे निर्माण करू इच्छितो. पण त्या सर्वच इच्छा फलदायक न होण्याचे कारण, ह्या जन्मजन्मांतरात पूर्वीच्या जन्मातील अनेक दुष्ट वासना प्रखरतेने इच्छेच्या पुढे वास करीत आहेत. आजच्या पंचभौतिक देहिक माध्यमात इच्छावासना असा विषय काहीही नाही. ते माध्यम कसे आहे ? तर गतजन्मातील इच्छावासना ह्या देहाला प्रेरणा देतात व त्या विषयपरत्त्वे तो देह कार्य करतो. यामुळे जरी सुख-शांति-समाधान प्राप्त व्हावे अशी तुमची प्रामाणिक इच्छा असते व त्याची तरतूदही गतजन्मांत तुम्ही केलेली असते, तरी गतजन्मातील वासनाविकारांची वलये या इच्छेला साकार होण्यास वाव देत नाहीत. स्वाभाविकतः मनुष्याच्या जीवनाकडे पाहिले तर असे दिसेल की, आम्हा मानवांच्या ज्या ऐहिक वासना आहेत, त्याचे अधिक प्रमाण अन्नसेवनाचेच आहे. जो काही ऐहिक उपभोग आपण घेतो, तो उपभोग जरुरीपुरताच असतो. पण खाण्यापिण्यासाठी लागणारे अन्न हे तिन्ही त्रिकाल खाऊनसुद्धा त्या खाद्यपदार्थाबद्दल आपले समाधान कदापिही होत नाही. ज्या वासना म्हणून सांगितल्या आहेत, त्या ह्या जन्मजन्मांतरात प्रखर स्वरूपामध्ये वास करीत आहेत. त्यांच्या सोबत विकार पण आहेत. ते विकार जीवनात कार्यपरत्त्वे उपभोग घेऊन विमोचित होत असतात. पण अन्न व खाद्यपदार्थ हे तिन्ही त्रिकाळ खाऊनसुद्धा ज्यांची तृप्तता झाली नाही, अशा वासना अनेकजणांना पूर्वजन्मी परिस्थितीअभावी पूर्ण न करता आल्याने, त्या इहजन्मात अधिकच तीव्र असे स्वरूप धारण करतात. त्यामुळे तुमच्या जीवनातील इच्छा साकार होण्याची तरतूद जीवनामध्यें असूनसुद्धा त्या इच्छा साकार होत नाहीत. अशा ह्या जन्मजन्मांतरातील वासनाविकारांचे विमोचन स्वतःलाच करावयाचे आहे. यासाठी आपण करीत असलेल्या कुलधर्म-कुलाचाराचा लाभ घेऊन ह्या वासनाविकारांचे विमोचन केले पाहिजे. पण त्यासाठी ज्या देवदेवतांचा कृपाशिर्वाद तुम्ही घेतला आहे, तो ह्या विमोचनार्थ खर्च होणार नाही ही जबाबदारी प्रत्येकाने लक्षात घ्यावयास हवी. यासाठी सुलभ असा मार्ग म्हणजे तुम्हास जे अन्न किंवा खाद्यपदार्थ अतिप्रिय असतात की जे सेवनात आले नाही की तुम्ही बेचैन होता, हे पदार्थ प्रथमतः नित्य सेवनातून वर्ज्य करावयास पाहिजेत. ही सवय एकदम स्वीकारता येणार नाही. यासाठी जेव्हा आपण आपल्या आवडीचे मिष्टान्न किंवा अन्नपदार्थ सेवन करतो, त्यावर यथेच्छ ताव न मारता, देवाला नैवेद्य म्हणून जेवढा पदार्थ आपण देवापुढे ठेवतो, म्हणजे चहाचे तीन चमचे इतकाच आपल्या आवडीचा पदार्थ सेवन करावा. त्याचबरोबर ज्या पदार्थाची आवड स्वाभाविक आपल्याला नाही, तोही पदार्थ हळूहळू त्या प्रमाणामध्ये सेवनार्थ घ्यावा. म्हणजे वासनापरत्त्वे सूक्ष्म देहांत ज्या पूर्वींच्या अनेक जन्मातील अन्नसेवनाच्या वासना आहेत, त्या कमी होत जाऊन, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्यांना पूर्णपणे तुमच्या जीवनात कार्य करण्यास वाव मिळेल.

आज आपल्याला एखादा आजार झाल्यावर जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाता, तेव्हा डॉक्टर काही रोगांच्याबाबतीत असे सांगतात कीं, हा रोग तुमच्या घराण्यांत आनुवंशिक आहे. याचा आपल्याला बोध होत नाही. पण असा आनुवंशिक आजार आपल्याचमुळे येत असतो. याचे उदाहरण असे की, ज्या कोणा व्यक्तीला अधिक गोड खाण्याची तीव्रता असते, ही वासना पूर्वीच्या अनेक जन्मांतील असते. अशा एखाद्या जन्मात त्यास मधुमेह झाल्यानें, गोड खाण्यास वाव मिळाला नाही व खाण्याची वासना तर तीव्र आहे. अशावेळी ही गोड खाण्याची वासना, हिच्या मुळाशीं हा रोग एकरूप होतो व पुन्हा या जन्मात त्याच वासनेपरत्वे जेव्हा गोड खाण्याची अधिक तीव्रता निर्माण होते, तेव्हा ह्या गोड खाण्याच्या वासनेबरोबर हे मधुमेहाचे मूळ तुमच्या अन्नमय कोशात धारण व्हावयास सुरवात करते. वास्तविक आपणास मधुमेह झाला आहे याची जाणीव कधी होऊं लागते ? जेव्हा तुमच्या अन्नमय कोशाचे कार्य वयमानपरत्वे कमी होऊ लागते, तेव्हा अशाप्रकारचा आजार आपणास उद्भवला आहे, ही जाणीव होते. पण हा आजार  त्या व्यक्तीच्या जन्माच्यावेळीच त्याच्या ठिकाणी धारण होतो. अशी जी आनुवंशिक रोगाची कारणे आज डॉक्टरकडे गेल्यावर आपणास सांगण्यात येतात, त्याचे मूळ आपणच आहोत. यासाठी वरील सोप्यात सोपा उपाय म्हणजे जे अतिप्रिय आहे त्याचे प्रमाण सेवनात हळूहळू जर तुम्ही कमी कराल, तर तुमच्या अनेक जन्मातील इच्छा ज्या जन्मजन्मांतरात आहेत, त्या साकार तर होतीलच, पण या सूक्ष्म देहात अंतर्भूत झालेली इच्छा कार्यान्वित झाल्यावर ती जागा कारण देह धारण करील हीच धारणा हळूहळू विकसित झाली की, हा कारण देह स्थुल देहाशी एकरूप होतो. याच जीवनाला ‘पारमार्थिक जीवन’म्हटले आहे. म्हणजे ऐहिक जीवनाचेच रुपांतर शास्त्रशुद्धपद्धतीने व ज्ञानाने करून घेतल्यावर, तुम्हाला देवाच्या कृपाशिर्वादार्थ एकांतात जावयास नको, हिमालय किंवा अन्य पर्वतावर बसून तपश्चर्या करावयास नको, किंवा संन्यास घेतला आहे असा भास निर्माण करावयास नको.

वरील निवेदनाप्रमाणें तिन्ही देहांना कार्यान्वित करून, कारण देहातील जे जन्मकारण ह्या जन्मात सार्थक म्हणून करावयाचे आहे, त्याचे एकरूपत्त्व स्थूल देहात करून घेतले की, त्याच अवस्थेला ‘संन्यास’ असे म्हटले आहे. तो धारण करण्यामागे देहातील या तीनही देहांचे रुपांतर, म्हणजे प्राप्त जन्म ज्या कर्तव्यार्थ आहे हे कर्तव्य, आजच अंगिकारून, त्याप्रमाणे आपले जीवन इहजगतामध्यें व्यतीत केले म्हणजे खऱ्या अर्थाने आपण संन्यास घेतला. केवळ भगवी वस्त्रे धारण करणे, दंडकमंडलू हातात घेऊन गावोगाव भिक्षा मागत हिंडणे, हे या पवित्र शब्दाचे विडंबन आहे.

वरील आहार पध्दतीचाच तात्त्विक विचार करून, दत्तपंथात किंवा नाथसांप्रदायामध्ये जी पाच घरी माधुकरी मागण्याची दिक्षा आहे ती एवढ्याचसाठी की, पाच घरी जी माधुकरी मागितली जाते त्यामध्ये अन्न हा विषय आवड किंवा नावड म्हणून नसतो. पण दत्तउपासकांना ही परंपरा माहित नसल्यानें दत्तभक्ती ही आपल्या इच्छेनुरूप साकार का होत नाही ? असा विचार ते निर्माण करतात. तत्पूर्वी आपल्या आहारात किती शुध्दता आहे व आहाराचा आपण किती अतिरेक करीत आहोत, हा विचार करूनच दत्त किंवा नाथसांप्रदायाची उपासना करण्यास आरंभ करावा.

आज भावी पिढ्यांच्या उध्दारार्थ प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींनी नुसता पै-पैसा ठेवून, मानवी जीवनाची अपक्रांती योग्य संस्काराअभावी आज होत आहे, तो ऱ्हास कधीही कमी न होता, आम्हा मानवांच्या कल्याणार्थ अनादिकालापासून ज्या शास्त्रशुध्दपध्दतीने मनुष्याच्या जीवनाचा हा वंशवृक्ष साकार करण्याच्या शास्त्रोक्त कार्यपध्दती सांगितल्या आहेत, त्याचे महत्त्व लक्षात घेऊन, त्याप्रमाणे वेळीच वर निवेदन केलेली निराकरणे जर आस्थापूर्वक आपल्या आचारविचारात आणलीत, तरच ही मानवी जीवनाची अपक्रांती थांबू शकेल. नाहीतर एक काळ भवितव्यामध्ये असा येणार आहे की, आम्हा मानवांचा जन्म अनादिकाळात जसा रानटी अवस्थेप्रत होता, त्या अवस्थेपर्यंत आपण आपल्या अज्ञानाने जाणार आहोत. त्या प्राप्त होणाऱ्या रानटी अवस्थेचे पुनर्जीवन होण्यासाठीं पुन्हा कोणी ऋषीमुनी, देवदेवता, नाथपंथ उदयास येतील आणि आपल्या रानटी अवस्थेचे रूपांतर पुन्हा मानवी जीवनात करून देतील, हे भविष्य वर्तविणे आजच्या परिस्थितीत तरी कठीण आहे.

मानवी जीवनाच्या उत्पत्तीचे माध्यम हे स्त्री होय. म्हणून स्त्रीला ‘आई’ या शब्दात जी आपण हाक मारतो त्या हाकेतील भाव, भावना, प्रेम, वात्सल्य, आदर, पूज्यता हे इतर कोणत्याही उच्चारल्या जाणाऱ्या शब्दात नाही. असे हे जन्म प्राप्त होण्यासाठी जे स्त्रीचे माध्यम आहे, ते जरी इतके शुभमंगल आहे, तरी जन्म देण्याचा जो धर्म स्त्रियांचा आहे, त्यांनी ह्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करु नये. जेव्हा स्त्रीला गर्भधारणा होते व साधारण नऊ महिन्यानंतर ती अपत्यास जन्म देते, या नऊ महिन्यांच्या काळात जे अपत्य जन्माला येणार आहे, त्याच्या पन्नास ते पंचाहत्तर वर्षाच्या जीवनाला ती साकार करीत असते. असा साकार करण्याचा नैसर्गिक देहधर्म स्त्रीचा आहे. जे अपत्य जन्माला यावयाचे आहे, त्या जन्माला येणाऱ्या जीवाची या जन्मपरत्वे काय भूमिका आहे, हे ज्ञान होणे कदापिही जरी शक्य नाही, तरी त्याची लक्षणे याचे अनुमान निसर्गाने करुन देण्यात चूक केलेली नाही. स्त्रीला गर्भधारणे नंतर डोहाळे लागतात, त्यावेळी अन्नसेवनापासून ते करमणुकीच्या विषयापर्यंत नानाप्रकारचे डोहाळे असतात. त्याचा जर आस्थापूर्वक विचार केला तर जन्माला येणाऱ्या जीवाचे लक्षण कोणते आहे हे अनुभवास येते. याला उदाहरण म्हणून पुराणाकडे बोट दाखविता येईल. सुभद्रेस जेव्हा गर्भधारणा झाली तेव्हा भगवान श्रीकृष्णांना तिने त्या काळातील युध्दातील बिकट रचना चक्रव्यूह कसा असतो याचे ज्ञान सांगावे अशी विनंती केली होती. या लक्षणावरुन हे अनुमान निघाले की जन्माला येणारा हा मुलगा हा योध्दाच होणार. त्याचप्रमाणे श्रीपादश्रीवल्लभ, श्री नृसिंहसरस्वति किंवा आधुनिक काळातील स्वामी विवेकानंद यांच्या मातांना गर्भधारणेनंतर शिवपूजा व शिवव्रते करण्याची इच्छा झाली. या व्रतांची पूर्तता त्यांनी सूज्ञ विचाराने व शुध्द आचरणाने केल्यामुळे. जे जीव जन्माला आले ते आजच्या काळापर्यंत अजरामर झाले आहेत. ही कार्ययोजना निसर्गाने स्वाभाविक करुन दिल्यावर, आपल्याला लागलेले डोहाळे यांची पूर्तता न करता, ते डोहाळे आवरण्या साठी स्त्रिया डॉक्टरांकडे औषधोपचारासाठी जातात. त्यामुळे पुढे जन्माला येणाऱ्या मुलाचे अकल्याण हे आई उदरातच होते.

स्त्रीची दुसरी देहिक अवस्था अशी आहे की, स्त्रीचे विवाहात कन्यादान झाल्यावर, म्हणजे तिच्या पतीनें तिचे जन्मकर्म स्वीकारल्यानंतर ती जन्मकर्माची जागा जन्मजन्मांतर धारण करते. जी जन्मजन्मांतराची जागा रिकामी होते, त्याठिकाणी जन्माला येणाऱ्या भावी अपत्याचा प्रवेश होतो. आता जे स्त्रीचे जन्मजन्मांतर आहे, ते वर सांगितल्याप्रमाणे इच्छावासनेचे स्थान आहे. त्या वासनातील अन्नमय वासना व जन्माला येणाऱ्या अपत्याचे शरीरधारणेचे प्रारंभिक तत्त्व म्हणजे पृथ्वी तत्त्व हे अन्न होय. अशावेळी स्त्रीचे देहिक माध्यम निसर्गतः अचूक कार्य करीत असते की, अन्नाबद्दलच्या वासना व जीव प्रारंभिक अवस्थेमध्ये अन्नमय कोशात देहधारणा करणार आहे त्यातील दोष, असे दोन्ही दोष ती स्त्री डोहाळे या अवस्थेमध्ये ओकारीद्वारा विमोचन करीत असते. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या हितार्थ परमेश्वराने केलेली योजना म्हणजे गर्भधारणा अवस्थेपासूनच त्याच्या विकासासाठी, म्हणजे अयोग्य अशा इच्छा, वासना, विकार हे त्या जीवाच्या पूर्वीच्या जन्मजन्मांतरात शिल्लक असतात, त्याची पुनरावृत्ती जन्मास आल्यावर होऊ नये यासाठी, डोहाळे हे लक्षण जन्माला येणाऱ्या अपत्याच्या व त्या स्त्रीच्या विमोचनार्थ आहे. स्त्रीजन्मात हे विमोचन अगदी स्वाभाविक अवस्थेत होत असते. पण इतके शास्त्रशुध्द ज्ञान स्त्रियांना नसल्याने, डोहाळे लागणे हे लक्षण कमीपणाचे वाटून, नऊ महिन्यात ज्या जीवाची धारणा पुढच्या भावी आयुष्याची म्हणजे पन्नास ते पंचाहत्तर वर्षांची करावयाची असते, त्यातील त्या दोषांचे विमोचन न होण्याने, हे दोष नऊ महिन्यातील काळात धारण झालेल्या पंचतत्त्वांच्या देहाशी पूर्णतः एकरुप होतात.

आता दुसरा गर्भधारणेसंबंधीचा महत्त्वाचा खुलासा असा आहे की, आपल्या कुटुंबातील अनेक मुलामुलींचे लग्नकार्य, नोकरीधंदा, व्यवसाय आदि त्यांच्या जीवनात योग्य वेळी होत नाहीत. त्या मागे काय अज्ञात कारणे आहेत हे न समजल्यामुळे, ग्रहमान अनुकूल नाही किंवा पूर्वजन्मातील काही दोष यांच्या आड येत आहेत, असा विचार करुन त्याचे निरसन करण्यासाठी देवदेवतांपासून नवग्रहशांतीपर्यंत सर्व केले जाते. तरी ज्या कुटुंबातील व्यक्तींना हे अपयश भोगावे लागते, त्याला कारण त्यांच्याच जन्मउत्पत्तीचे होय. या जन्मउत्पत्तीस ‘अनैच्छिक संतती” असे म्हणतात. यास कारण त्या अपत्याचे जन्मदाते मातापिता असून, ज्यावेळी हे विवाहित पतिपत्नी आपला वैवाहिक सुखाचा लाभ घेतात व नकळत जेव्हा गर्भधारणा होते, तेव्हा ते जागे होऊन विचार करते होतात. अशावेळी दोघांची म्हणजे पतीची व पत्नीची वैचारिक अवस्था बिकट असते. अशावेळी दोघांनीही धारण झालेल्या गर्भावस्थेस पूर्णत्वाने जन्म प्राप्त करुन देण्याची संधी द्यावयाची किंवा नाही हे वेळीच ठरवावे. अनेक वेळा असे अनुभवास येते की, झालेली गर्भधारणा पतीस हवी असते व पत्नीस नको असते. कधी पतीस नको असते व पत्नीस हवी असते. अशा ह्या परस्परविरोधी मानसिक स्थितीचा आघात जन्माला येणाऱ्या अपत्यावर होत असतो. म्हणजे जे अपत्य दोघांपैकी एकाला हवे व एकाला नको अशी परिस्थिती असते, अशा वेळी नाईलाजास्तव धारण झालेल्या गर्भावस्थेतील जीवाला आपल्या पूर्वीच्या अनेक जन्मातींल जे ऋणानुबंध जन्मप्राप्तीनंतर या जगात कर्तव्यार्थ व्यतीत करावयाचे असतात, त्या ऋणानुबंधांचे हितसंबंध प्राप्त होणाऱ्या देहाशीं त्याला जोडता येत नसल्याने, ह्या मुलामुलींचे भाग्योदय आईवडिलांच्या पश्चात होत असतात. यासाठी योग्य वेळीच पतीपत्नीने आपली अडचण नीट समजून घेऊन, पुढे जन्माला येणाऱ्या भावी अपत्याचा विचार करून, जर उभयतांची इच्छा या जन्माला येणाऱ्या अपत्याआड येणार असेल, तर नि:संकोचपणे डॉक्टरकडे जाऊन सल्ला घ्यावा. या ऋणानुबंधातील दोषाव्यतिरिक्त जी अपत्ये आज समाजात आपल्याला अपंग स्थितीमध्यें दिसत आहेत, त्यांच्यातही काही प्रमाणामध्ये असेच दोष मातापित्यांकडून उपस्थित झालेले असतात.

आतां ज्या पती-पत्नींना ऐच्छिक अशी संतती झालेली असेल, अशांनी त्या मुलाच्या विकासाठी केवळ दूध व धष्टपुष्ट होण्यासाठी टॉनिक्स देऊन याचा जरी देहिक विकास केला, तरी जन्माला आल्यापासून वय वर्षे तीन पर्यंत त्याचा आत्मिक विकास त्यांनीच करून दिला पाहिजे. हे अपत्य जे जन्म घेते, त्या अपत्याच्या देहाबाहेर एक कवच उभयतांच्या विकार वासनेचे असते. ते जरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नसले, तरी मागाहून त्या अपत्यास येणारी किरकोळ दुखणी यावरून त्याचे अनुमान अनुभविण्यास येते. यासाठी या वासनाविकारांचे वलय बाजूला व्हावे म्हणून कुलोपासनेत स्त्री प्रसूत झाल्यानंतर, पाचव्या व सहाव्या दिवशी पाचवी व सहावीची म्हणजे ‘सटवाईची’ पूजा सांगितली आहे. आजकाल बहुसंख्य स्त्रिया घराबाहेर प्रसूतीसाठी दवाखान्यात जात असल्याने, हा विधी जरी होत नाही, तरी तो घरातील कोणीही सुवासिनीने केला तरी चालतो. हा विधी असा आहे कीं, पाटावर रक्तचंदनाने पृथ्वीतत्त्व (हे ज्यांना माहित नसेल त्यांना स्वस्तिक काढावे) काढून, त्यावर हळदकुंकू वाहून, पाटाभोवती रांगोळी काढावी. त्या चिन्हावर गोड्या तेलाचा दिवा, म्हणजे निरांजनात दोन वाती घालून त्या पेटवाव्यात. पाटावरील चिन्हासमोर दोन विड्याची पाने, सुपारी, सव्वा रुपया ठेवून, उकडलेल्या हरभऱ्याचा नैवेद्य वाटीत दाखवावा. या हरभऱ्यांना मीठ लावू नये.ही पूजा झाल्यावर, दवाखान्यात जी स्त्री प्रसूत झाली असेल तिला हळदकुंकू लावावे व प्रसादाचे चार हरभरे खावयास नेऊन द्यावेत.

त्यानंतर मुलाचे बारसे बाराव्या दिवशी व मुलीचे बारसे तेराव्या दिवशी करावे. यासाठी शुभमुहुर्त पाहण्याची जरुरी नसते. बारशाच्यावेळीं जो नामकरणविधी व्हावयाचा असतो, तत्पूर्वी अकस्मात् अशा काही घटना, म्हणजे त्या कुटुंबात वर्षा-दोनवर्षांपूर्वी कोणी व्यक्तीं दिवंगत झाली असेल, तर तीच व्यक्तीं पुन्हा जन्माला आली आहे असे समजून, अनेक कुटुंबात अशा दिवंगत व्यक्तींची नावे मुलामुलींना ठेवतात. पण जे कोणी कुटुंबात दिवंगत होतात, ते इतक्या अल्पकाळांत जन्माला येऊ शकत नाहींत. हे जरी खरे असले, तरी ज्या मुलांची नावे दिवंगत व्यक्तींची ठेवली जातात, त्या मुलामुलींना दिवंगत झालेल्या व्यक्तीचे इहजगताशी संबंधित असलेले ऐहिक ऋणानुबंध जीवनारंभीच भोगणे भाग पडते. त्यामुळे जीवनारंभीच शरीरसंवर्धन होणे व विद्या प्राप्त करणे, ही जी मुलामुलींची कर्तव्ये असतात, त्याला ही ठेवली गेलेली नावे मारक होतात. तेव्हा चुकूनही अशी नावे न ठेवता, योग्य अशी देवदेवतांची किंवा ज्या नावांचा उच्चार केला असता मंगल उच्चार तोंडातून होईल, अशी नावे ठेवावीत.

नामकरण विधीनंतर बाकीचा समारंभ आपण करताच, पण त्या दिवशी, ज्या आपल्या कुलदेवता आहेत त्यांचे स्मरण करण्यासाठी विसरता. यासाठी नामकरण विधीनंतर प्रथमतः आपल्या देवदेवतांसमोर उदबत्ती, साजूक तुपाचे निरांजन लावून, हिरव्या खणा-नारळाची ओटी काढून ठेवावी. देवापुढे मांडलेल्या पाटावर या बाळ-बाळंतिणीस बसवून, ज्या आप्तांना तिला बाळंतविडा द्यावयाचा आहे, त्यांनी तो तिला द्यावा. तत्पूर्वी ज्या कुटुंबातील ही स्त्री प्रसूत झाली आहे, त्या कुटुंबातील सुवासिनीने पहिला बाळंतविडा तिला हळदकुंकू लावून द्यावा. यावेळी प्रसूत झालेल्या सुवासिनीची ओटी भरत नसतात, तर तो बाळंतविडा तिच्या हातात द्यावयाचा असते. देवापुढे काढलेली ओटी घरातील सुवासिनीने स्थानिक देवतेच्या देवळांत नेऊन द्यावी; बाळ-बाळंतिणीने सव्वा महिन्यानंतर देवदर्शनास जावे.

>>अध्याय ६ उपास्य दैवते व करावयाची उपासना.

अध्याय ४ पूजनादि विधी व तिचे महत्व.<<