अध्याय ४ – पूजनादि विधी व त्यांचे महत्व

आपण भक्तांना आवश्यक असा कुलधर्म व आपल्या इष्ट कुलदेवदेवतेसंबंधी खुलासा आपल्या मार्गदर्शनार्थ यथायोग्य झालाच आहे. आता ह्या देवतांच्या पूजनविधीसंबंधी महत्वाचे मार्गदर्शन पुढे क्रमशः य़ेईल. तत्पूर्वी ह्या देवतांप्रीत्यर्थ उपवास, व्रतवैकल्ये करणे आवश्यक आहे काय ? असा प्रश्न येतो. तर यथायोग्य तऱ्हेने पूजनादी विधी व वार्षिक कुलोपासना योग्यप्रकारे केल्यास, उपवास व व्रतवैकल्ये आदी करण्याची आवश्यकता नाही. जो पूजन विधी आपणांस करावयाचा आहे, त्याचेही यथोचित ज्ञान आपण करुन घेतले पाहिजे. केवळ गंध, फूल, अक्षता व श्रीफल व तेही देवदेवतांना ज्ञानाच्या अभावी समर्पण करणे, म्हणजे ही एक यांत्रिक क्रिया देहाच्या सवयीपरत्वे लागून, पूजाविधी करीत असताना जी मनाची एकाग्रता होणे आवश्यक आहे ती होत नसते. आपण जे पूजा साहित्य देवदेवतांच्या पूजनासाठी घेता ते साहित्यसुध्दा शास्त्राने शास्त्रपूर्वक व अनुभवपूर्वक सूचित केलेले आहे. पूजनारंभ विधीस  बसण्यापूर्वी आपले तोंड कोणत्या दिशेस करुन आपण पूजन करणार आहोत हे प्रथमतः पहावे. पूजाविधी पूर्वाभिमुख किंवा पश्चिमाभिमुख बसल्याने पूजनाचे सद्हेतू अधिक लवकर साध्य होतात. पण अनेकांचे घरी देवदेवतांची स्थापना दक्षिण दिशेस किंवा उत्तर दिशेस जागेच्या अभावी केलेली असते. या दोन दिशाना देवदेवतांचे किंवा आपले तोंड असता कामा नये. पूजन विधी करण्यास जे आसन बसावयास हवे ते दर्भासन असावे किंवा धूतवस्त्राची घडी करुन घ्यावी. चटईवर बसू नये. पूजनादि विधी झाल्यावर हे धूतवस्त्र रोजच्या रोज धुण्यात यावे. कारणा पूजनादि विधीच्या वेळी जो आपण प्रार्थना विधी करतो, त्यावेळी आपल्या पंचभौतिक देहिक माध्यमातील जन्म कर्माचे दोष या आसन  माध्यमात विसर्जीत होत असल्याने, ते आसन रोजच्या रोज धुणे आवश्यक आहे.

पूजनादि विधी आरंभी आसनावर  बसून दोन वेळा आचमन करावे. जो आचमनाचा उच्चार, ‘ॐ केशवाय नमः‘ ,‘ॐ नारायणाय नमः’, ‘ॐ माधवाय नमः’ असा आहे, त्याचा अर्थ तुम्ही पूजनास बसते वेळी तुमच्या देहिक माध्यमातील तीनही देह, स्थूल, सूक्ष्म व कारण हे या विधीस उपस्थित रहावेत असा शास्त्राचा उद्देश आहे. हे आचमन दोन वेळा एवढ्यासाठी करावयाचे आहे की, स्थूल व सूक्ष्म देह म्हणजे जन्मकर्म व जन्मजन्मांतर यांनी या शुभ विधीचे वेळी उपस्थित रहावे. तिसरा देह म्हणजे कारण देह, या ठिकाणी देवादिकांचा ऋणानुबंध वास करीत असल्याने, तो देह पूजनादि विधीच्या वेळी स्वाभाविक उपस्थित असतोच. हे आचमन दोनदा झाल्यावर पाच वेळा पाच स्थांनातून ॐ कार करावा. कारण आपल्या देहिक माध्यमात जे पंचप्राण कोश आहेत म्हणजे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय व आनंदमय यांचाही समावेश या पूजनादि विधीत होण्याने त्यांचा जो विकास अत्यावश्यक आहे तोही या विधीमुळे होतो. हे पंचप्राण कोश देहात अतिसूक्ष्म अवस्थेत वास करीत असून, जोपर्यंत आपण धार्मिक विधी व धार्मिक सत्कृत्ये शास्त्रीयपध्दतीने करीत नाही तोपर्यंत या पांच कोशांपैकी अन्न व प्राण एवढेच कोश कार्य करीत असतात. म्हणजे विकसित असतात. वास्तविक जन्म प्राप्त झाल्यावर देहिक अवस्थेप्रमाणे पुढील तीनही म्हणजे मनोमय, विज्ञानमय व आनंदमय कोशांचाही विकास यथोचित होणे आवश्यक आहे. मनोमय कोश हा विकसित झाल्यामुळे तुम्हाला प्राप्त झालेली ऐहिक सुखे यांचे सुख, समाधान  व शांती तुम्हाला या कोश माध्यमातून मिळते व जी पारमर्थिक सेवा आपण गुरुंच्या मार्गदर्शनाने करता, त्या सेवेचा पारमार्थिक लाभ म्हणजे ‘नित्यानंद’, ‘चिदानंद’ व ‘ब्रह्मानंद’ हे आनंद गुरुज्ञानेने अंगिकारलेली सेवा व तिचे पालन योग्य प्रकारे केले असता, आनंदमय कोश विकसित होऊन, तुम्हां साधकांना क्रमशः प्राप्त होतात. तिसरा आनंद की जो ब्रह्मस्वरुप आहे, हा या ऐहिक जगाच्या  पलीकडे वास करीत असलेल्या परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव असून, तो प्राप्त झाल्यावर योगाधना, कुंडलिनी जागृती, समाधी अवस्था इत्यादि प्राप्त करावयाच्या आहेत, अशा अवघड, बिकट समस्या तुम्ही निर्माण न करता, परमेश्वराच्या सानिध्यातील सुख, म्हणजे आनंदमय कोशापर्यंत आपली झालेली साधना याचे सुख जे, आपणास प्राप्त झाले आहे, त्या सुखापेक्षा अधिक असे सुख योगसाधना, कुंडलिनी जागृती व समाधि या मार्गाने मिळेल असा अविचार करु नये.

ही साधन पध्दत एवढ्यासाठीच सूचित केली की, या जन्मात आपण आपली प्रापंचिक कर्तव्ये पूर्णत्वास नेण्यासाठी जर जन्म घेतला आहे तर त्या कर्तव्याची पूर्तता करण्याची आपली जबाबदारी परमेश्वर कृपेने साकार व्हावयास पाहिजे. वरील शास्त्र म्हणजे योगसाधना, कुंडलिनी जागृती व समाधि ही जरी श्रेष्ठ आहेत तरी प्रापंचिक माणसाला ती प्राप्त करण्यास बराच काळ लागून त्याची प्राप्ती जेवढी व्हावयास पाहिजे तेवढी होत नाही. त्यासाठी सूज्ञ भक्तांनी या मोठ्या नावांनी प्रसिध्द असणारी ही शास्त्रे आपल्यापासून दूर ठेवावीत. जी व्यक्ती गुरुकृपार्शिवादास प्राप्त होते व गुरुमार्गदर्शनाप्रमाणे आपले जीवन व्यतीत करते, त्या व्यक्तीस गुरुआशिर्वादाची प्राप्ती झाल्यावर, ह्या साधनांची जोड प्राप्त जन्म विकसित करण्यासाठी आवश्यक आहे असे मला वाटत नाही.

पूजनादि विधीचे शास्त्रीयदृष्या दोन भाग केलेले आहेत. हे दोन विधी करीत असताना, दोन्ही विधीसाठी भाव भावना ह्या पूजकाच्या माध्यमामध्ये निर्माण व्हावयास पाहिजेत. पहिला पूजनाचा जो विधी आहे, तो देवदेवतांप्रीत्यर्थ असून, त्याला ‘पंचऔपचार विधी’ असे म्हणतात. तर दुसरा विधी आहे त्याला ‘पंचउपचार विधी’ म्हणतात. म्हणजे पहिल्या विधीत इष्ट देवदेवतांबद्दल जो पूज्य भाव तुमच्या ठिकाणी आहे, तो पूजा साहित्यातून व्यक्त करावयाचा आहे. हा केला गेलेला विधी, त्याची जी प्रतिक्रिया, ती आपण काया-वाचा-मनाने धारण करावयाचा आहे. या विधीस पंचउपचार असे असे म्हणतात. हे दोन्ही पूजनाचे विधी करण्याने देवाबद्दलचा पूज्यभाव दिवसानुदिवस विकसित होऊन, केल्या गेलेल्या पूजनादि विधीचा कृपाशिर्वाद म्हणून त्या देवतांबद्दलची आपली आत्मिक भावना कृतार्थ व्हावयास पाहिजे. तरच आपण नित्याने जो पूजन विधी करतो त्याचा लाभ घेऊ शकू.

पंच औपचारिक विधीचे जे पूजनादि साहित्य आहे, त्यामध्ये देवापुढे बसावयाचे आसन, गंध, फूल, अक्षता, अत्तर, हळदकुंकू, साजूक तुपाचे निरांजन, नैवेद्यार्थ आपले एखादे आवडते फळ, हे सर्व पूजन विधीत असणे आवश्यक आहे. या अत्यावश्यक साहित्याचा बोध हा शास्त्राने खालीलप्रमाणे सांगितला आहे.

आसन :- हे सदैव धूत वस्त्र असावे.शक्यतो  ते पांढ-या शुभ्र रंगाचे ध्यावे. आपल्याला ऐपत आहे म्हणून रंगीबेरंगी रंगात सतरंजीवजा किंवा मऊ गालिच्याप्रमाणे असू नये. कारण पूजनादि विधीस देवासमोर बसून जेव्हा आपल्याला देवदेवतांचे चिंतन करावयाचे आहे, तेव्हा आपल्याभोवती असलेल्या वातावरणातील सप्तरंगाची वलये आपल्या देहाशी एकरुप होता कामा नयेत. यासाठी रंगीबेरंगी आसन हे साधकाने घेऊ नये. कारण अशा विविध रंगाच्या वलयाने आपल्या ठिकाणी पूजनादि विधीच्या वेळी बुध्दि व मन स्थिर करावयाचे असते. तो विधी करण्यात या वातावरणातील अनावश्यक रंगानी व्यत्यय येतो. यासाठी पूर्वीच्या काळापासून दर्भासन हे पवित्र मानण्यात आलेले आहे. काही प्रसंगी स्त्रियांनाही कुटुंबातील देवदेवतांची पूजा करणे भाग पडत असते. परंतु दर्भासनावर बसण्याची त्यांना शास्त्राज्ञा नाही. म्हणून धूतवस्त्र हेच योग्य आसन सर्वांच्या सोयीचे आहे. आसनावर बसून पूजनादि विधी झाल्यावर हे आसन लागलीच धुवावे. ते कां धुवावे हे वर नमूद केलेलेच आहे. पूजनारंभी आचमनादि विधी कां करावयाचे हेही निवेदन केलेले आहे.

पूजनादि विधीस आरंभ करण्यापूर्वी दोनदा आचमन करुन, पूजनासाठी घेतलेल्या अक्षता यांस हळदकुंकू म्हणजे ऋध्दिसिध्दी हे वाहून, त्या अक्षता मनोभावे हातात घ्याव्यात, दोन हात जोडून देवाला अशी प्रार्थना करावी की, “मी आपला पूजनविधी माझ्या यथाज्ञानाने व यथाशक्तिने करणार आहे. या विधीचा स्वीकार करण्यासाठी आपण सर्वानी उपस्थित रहावे”. हे वाचनात आल्यावर आपल्याला असे आश्चर्य वाटेल की, असा पूजनादि विधी आम्ही कधीच केला नाही. यांस उत्तर असे की ज्यावेळी आपल्या घरी काही मंगल कार्ये असतात त्यावेळी आपण आपल्या आप्तांना, नातेवाईकांना त्या मंगल कार्यार्थ बोलवावयास जातो. ते बोलावणे प्रसंगपरत्वे असते व जर त्यालासुध्दा अक्षतांची आवश्कता असते. तर जो नित्याने व निरंतर असा पूजाविधी आपणास करावयाचा आहे, त्याचे आमंत्रण देवास भक्तिभावनेने द्यावयास नको काय ?

या प्रार्थनेनंतर त्या अक्षता देवासमोर पाटावर ठेवून मगच देवाला पूजनासाठी ताम्हनात ठेवावे. इष्ट देवदेवतांची प्रतिके ताम्हनात ठेवल्यावर त्यांना शुध्दोदकाने सचैल स्नान घालण्यासाठी तीन पळ्या पाणी घालावे. नंतर या देवतांच्या ठिकाणी जी त्रिगुणात्मक शक्ति वास करीत आहे ती शक्ति आपल्या पूजनाच्या वेळी प्रकट व्हावी यासाठी त्या देवतांच्या प्रीत्यर्थ जी धार्मिक सूक्ते आहेत, म्हणजे गणपती अथर्वशीर्ष, पुरुषसूक्त, श्रीसूक्त, पवमानसूक्त किंवा रुद्र यांचा एक सकृत पाठ म्हणावयास पाहिजे. पण आज आपल्याला ही सूक्ते अवगत नाहीत किंवा गुरुजनांकडून आपण ती  शिकलेलो नाही आणि जरी कोणास ती येत असतील तरीसुध्दा जोपर्यंत ही सूक्ते संथा पध्दतीने म्हणजे उदात्त,अनुदात्त व स्वरित या स्वरांनी म्हणता येत नाहीत, तोपर्यंत आपण ही सूक्ते स्वत:ला पाठ आहेत असे न भासविता, सोप्या अशा पध्दतीने पूजनादि विधी करावा. तो म्हणजे ज्यांना गायत्री मंत्राची दीक्षा उपनयना नंतर दिली आहे, त्यांनी संध्याविधी कर्मात जी देवतांची चोवीस नावे सांगितली आहेत त्यांचा उच्चार करण्यानेही ही कार्यसिध्दी सहज व सुलभ अशा मार्गाने होऊ शकते. त्यापेक्षाही सोप्यात सोपे मार्गदर्शन असे की, ज्यांना ही चोवीस नांवे उच्चारता येत नाहीत, त्यांनी एकवीस वेळा गुरुनामस्मरण म्हणावे. हे म्हटल्यावर पुन्हा एक पळी पाणी घेऊन त्यामध्ये गंध, फूल, अक्षता ही घालून, ते पळीभर पाणी देवावर घालावे. त्यानंतर प्न्हा तीन पळ्या शुध्दोदक देवाला घालून, पहिल्यांदा घातलेले गंध फूल,अक्षता उचलून आपल्या मस्तकास लावावे व ते नंतर आपल्या उत्तर दिशेस ठेवावे. या विधीस ‘उत्तरपूजा’ असे म्हणतात त्यानंतर देवांना धूतवस्त्राने पुसून जाग्यावर ठेवावे.

गंध :- हे चंदनाचे असावे. देवास रक्त चंदन किंवा गोपीचंदन हे चालत नाही.गंध तयार करण्याची कृती शास्त्राप्रमाणे अशी आहे की,जी सहाण म्हणून आपण गंध उगाळण्यास वापरतो ती गोलाकार असते. ते पृथ्वीतत्व आहे. असा उद्देश या सहाणेत अं:तर्भूत केलेला आहे. या सहाणेवर आपण जे चंदनाचे खोड उगाळणार आहोत, ते आपण आहोत ही भावना आहे. चंदनाचा गुण स्वतः झिजत असताना इतरांना सुगंध किंवा आपल्या ठायी असणारा परिमल द्यावा असा परोपकारी भाव आहे. त्याप्रमाणे “माझे जीवन या जगात कृतार्थ व्हावे“, या पूज्य भावनेने गंध उगाळावे. गंध उगाळत असतां ते सहाणेवर कदापिही उभे उगाळू नये कारण पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरते आहे,तसे जन्मकर्म हेही तुमच्या देहाभोवती फिरते आहे. ह्या कर्माच्या जन्ममरण बंधनातून आपण मुक्त व्हावे व ती मुक्तता देह झिजविल्या शिवाय होणार नाही म्हणून, ‘देहाचे हे चंदनरुपी खोड माझे प्रतिक आहे’, तेही चंदनाप्रमाणे झिजून माझ्या गुणाना जगत्कल्याणाच्या कार्यार्थ योग्य तो वाव मिळावा अशी भावना ठेवून सहाणेवर खोड उगाळावे व उगाळीत असताना ते सहाणेवर डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे गोलाकार घासावे. या गंधात, ज्यांना शक्य असेल त्यानी थोडेसे केशर किंवा अष्टगंध अगर हळदीकुंकू घालावे. देवाच्या मस्तकावर आपण जे गंध वाहू ते शुभ्र म्हणजे पांढरे असाता कामा नये, कारण देवाची मस्तक हे सौभाग्याचे स्थान आहे.असे गंध देवदेवतांच्या प्रतिकांना वाहत असताना ते त्यांच्या मस्तकांवर व पायांवर लेपन करावे.जर आपण एखाद्या अवतारी पुरुषाचा फोटो पूजनास ठेवला असेल, किंबहूना तो असतोच अशावेळी ते गंधलेपन त्यांच्या मस्तकावर व पायावर केल्यावर, त्यांच्या छातीच्या मध्यभागी लेपन करावे. कारण ईश्वरी आज्ञेने त्यांनी या जगात जे अवतारकार्य मानवी जन्मासाठी अंगिकारलेले असते, त्या आपल्या स्वरुपाची आम्हां मानवाना ओळख व्हावी म्हणून जे देहस्वरुप धारण केलेले असते, हा त्यांचा परिचय त्यांनी आपल्यासारख्याच देहिक अवस्थेतून केलेला असतो. परंतु त्यांचे ईश्वरी कार्यार्थ घेतलेले अवतारसामर्थ्य हे त्यांच्या अंतर्यामी असते. त्याचा लाभ आपणांस घ्यावयाचा असतो. हे आपणांस अजूनही न समजल्याने आपण आज पर्यंत गंध हे केवळ मस्तकावर लावण्याचा प्रघात पाडला आहे.

फुले :- फुले ही देवाला अर्पण करावयाचा जो विधी आहे, त्याचा हेतू देवाला सुशोभित करण्यासाठी आहे, असा नव्हे तर फूल हे उमलल्यावर कोमल असे हास्य प्रगट करीत असते. त्याच्या जीवनातही काटे असतात. उदाहरणार्थ गुलाबाचे झाड. त्या झाडाचे फूल आपण खुडतो  त्याचे खालीच त्याचे काटे असतात. पण हे फूल फुलल्यानंतर त्याच्या कोमल हास्यात व सुवासात हे काटे अनुभवास येत नाहीत. तद्वत् आपण पूजनादि विधीस बसतो त्यावेळी सुखी असूच असे नाही. तरी सुध्दा ज्याप्रमाणे फुलाने आपले काटे त्यावेळी आपल्या कोमल हास्यात व सुवासात आणले नाहीत तशा प्रकारचे हास्य आपण पूजनादि विधी करीत असताना आपल्या मुखावर आणले पाहिजे. पूजा करण्याचा विधी हा नाईलाजाने करुन ही सेवा फलदायी होत नाही.

या फुलांना देवाला वाहिल्यावर निदान पाच मिनीटे तरी वाहिलेल्या फुलाकडे शुध्द विचाराने पाहून असा बोध घ्यावा की, “ह्या फुलांचे आयुष्य किती अल्पकाळ आहे. तरीसुध्दा त्यांनी आपल्याला देवाला समर्पण करुन आपल्या जीवनाचे सार्थक केले”. दुसऱ्या दिवशी याच फुलांना आपण निर्माल्य म्हणून पूजनातून काढून बाजूला ठेवतो. तेव्हा आपली भावना नकळत अशी जागृत होते की, ह्या फुलांना आपला पाय लागू नये. म्हणजे त्या फुलांना देवाला वाहिल्यावर त्यांच्या जीवनाचे सार्थक तर झालेच, पण जी मलीनता होती ती जाऊन, ती पुढे निर्माल्य झाली. म्हणून “निर्माल्य फेकून द्या”, असे न म्हणता, ”ते विसर्जन करा” असा धार्मिक शब्दाचा उच्चार आपण करतो. मग ती फुले पायदळी पडणार नाहीत याची दक्षता घेऊन नदीत विसर्जन करतो.अशावेळी स्वतःस असा प्रश्न विचारावा की, ”या जगात मला दीर्घकाळ जगण्याचे आयुष्य व त्यापरत्वे अनेक जन्म हे प्राप्त होत आहेत. तरीसुध्दा या फुलाप्रमाणे मला माझ्या एकही जन्माचे सार्थक करुन घेता आले नाही“.अशा भक्तिभावनेने वाहण्यासाठी आणलेल्या सुगंधी फुलांना जरी आपल्या मासिक खर्चातून चार पैसे खर्च करावे लागले, तरी रोजच्या रोज ही फुले आपल्या प्राप्त झालेल्या जीवनातील कर्तव्याची जाणीव नित्याने करुन देत असतात. आपल्या जीवनातील जे आद्य कर्तव्य आहे की, ह्या जीवनाचे सार्थक करावे. त्याचा बोध पुराण,पोथी, प्रवचन, हरिकीर्तन आदिमधून जरी श्रवण भक्तिने आपण ग्रहण करीत असलात तरी ह्या कर्तव्याची जाणीव करुन घेण्यासाठी रोज काही आपणाला पुराणास,कथा कीर्तनास किंवा प्रवचनास जाणे शक्य नसते. पण रोज सकाळी उठल्यावर आपल्या दिवसभराच्या कर्तव्याची जाणीव ही फुले सकाळीच करुन देतात. ही मूकभक्ति केव्हाही श्रवण भक्तिपेक्षा श्रेष्ठ आहे. अशा तऱ्हेने फुलाकडून आपल्या प्राप्त जीवनातील कर्तव्याची जाणीव करुन देण्याच्या स्थितीचा बोध परमेश्वराने कसा सूचित केला आहे हे कळल्यावर तरी आपल्या देवदेवतांना वाहण्यासाठी आवश्यक ती फुले कोणाच्या घरुन मागून न आणता, किंवा शेजारील मनुष्य सकाळी उठण्यापूर्वी त्याच्या बागेतून चोरुन न आणता, ती भक्तिभावनेने  बाजारातून,आपल्या कष्टार्जित पै-पैशातून जर आणली तर देव याची निश्चित परतफेड करील.

फुलामधील हा सात्विक गुण जो देवाला कारणिक होतो, त्याशिवाय फुलाच्या ठिकाणी असणारा तामस गुण हा कधीही कोणाच्या अध्ययनात आलेला नाही. साधारणपणे या वातावरणात असंख्य असे मृतात्मे इतस्ततः वावरत असतात. जेव्हा आपल्या कुटुंबातील स्त्रिया व मुली वेळी अवेळी बाहेर जातात तेव्हा त्यांना या बाधा नकळत होत असतात. या बाधा व त्यापासून होणारा जो त्रास आहे त्यापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येकाला साधक अवस्था प्राप्त करता येईल असे नाही. यासाठी या पिशाच्च योनीपासून तुम्हाला सुलभ व सोप्या अशा मार्गाने संरक्षण मिळावे असे साधन अनादिकालापासून जे सूचित केले आहे त्या साधनास आज आपण पूर्णतः विसरलेलो आहोत. पूर्वीच्या काळी स्त्रिया सुवासिक फुलांच्या वेण्या डोकीत घालीत असत किंवा एखादे सुवासिक फुल तरी डोक्यात असावयाचेच. याचे कारण असे होते की, ही फुले जर बाहेर जाताना  धारण केली तर पिशाच्च बाधा होत नाही. कारण फुलांची निर्मिती व त्यातील सुवासिक गंध हे देवाच्या अस्तित्वाचे प्रतिक असल्याने ज्या स्त्रिया वा मुली ही फुले धारण करतात, त्या फुलांच्या सुगंधामुळे पिशाच्चे त्यांच्याजवळ येत नाहीत. कारण पिशाच्यांचे व सुगंधाचे वाकडे आहे.

पुरुषांनासुध्दा अशाच प्रकारच्या बाधा होत असतात.पण त्या कळत नसल्याने ते अनुभविण्यास येत नाही हे जरी खरे, तरी त्या बाधांचे अस्तित्व नेहमीच्या बोलण्या-चालण्याच्या सवयी व्यतिरीक्त तो मनुष्य बोलू चालू लागला की, या व्यक्तिला  सूक्ष्मात सूक्ष्म अशी बाधा झाली आहे असे समजावे. बाधा अनेक प्रकारच्या असून,बाधेसंबंधी आपले ज्ञान एवढेच आहे की, अंगात ती प्रकट होऊन नाचू लागली म्हणजे ‘बाधा’. परंतु ज्या सूक्ष्मात सूक्ष्म बाधा आहेत त्या बोलण्याचालण्याच्या सवयीपासून ते डॉक्टरना न समजण्यापलिकडील आजार निर्माण करीत असतात. म्हणून पूर्वीच्या काळी एक तर सुवासिक तेल डोक्याच्या टाळूवर घालण्याची पध्दत होती किंवा प्रौढ व्यक्ति उजव्या कानात हीना, चंदन, वाळा, गुलाब किंवा केवडा अशा अत्तराचा फाया, म्हणजे लहान असा कापसाचा बोळा ठेवीत असत. पण समाजातील व्यक्तींना हा अत्तर वापरण्याचा सखोल असा बोध न होण्याने, ज्या व्यक्ती अत्तरे वापरीत असत त्या व्यक्तीला ‘हे ऐषबाज आहेत’ असे ठरवू लागले. त्यामुळे हळूहळू ह्या अत्तरापासून आपण दूर जाऊन, विदेशी अत्तरांच्या म्हणजे सेंट्सचा वापर करु लागलो. या सेंट्समुळे आजुबाजुला जरी सुगंधीतपणा येत असला तरी नैसर्गिक अत्तरामुळे बाधा निवारणार्थ जो सोपा मार्ग सुचविला होता त्याला आपण पारखे झालो आहोत. आज गोमंतकांत जर आपण कोणी गेला असाल,तर आपणास असे दिसेल की, सुशिक्षित व अशिक्षित अशा दोन्ही वर्गातील स्त्रिया सुवासिक फुलांचा वापर नित्याने करीत असतात. त्यामागील सद्हेतू वरीलप्रमाणे आहे.

आता फुलांत जो रजोगुण आहे, तो फुले केव्हा व्यक्त करतात ? जेव्हा एखादी व्यक्ती दिवंगत झाल्यावर तिची प्रेतयात्रा आदराने, सन्मानाने काढण्यात येते. त्यावेळी जी फुले वाहण्यात येतात ती रजोगुण हा भाव व्यक्त करीत असल्याने, त्या फुलांना कोणीही निर्माल्य म्हणत नाहीत.

असा हा फुलांचा ज़न्म विकसित झाल्यावर आपल्याप्रमाणे त्यांच्याजवळ सत्वगुण, तमोगुण व रजोगुण हे जरी असतात तरी वेगवेगळ्या कार्यकारणपरत्वे ती फुले आपले हा गुण कार्यान्वित करतात. पण आपले देहिक माध्यम ह्या गुणांनी अंकित असूनही कार्यकारणपरत्वे त्या त्या गुणांना कार्य करु देण्याची संवय आपण धारण केलेली नाही. उदाहरणार्थ पूजनादि विधीच्या वेळी फुले ही जरी सत्वगुण प्रकट करुन उपस्थित असली तरी पूजक हा रजो, तमो गुणाधीन असतो.

फुलांच्या निसर्गपरत्वे प्राप्त झालेल्या अशा जीवनाकडे पाहिले की, भक्तभाविकांना साहजिकच आपल्या ठिकाणी वास करीत असलेल्या गुणांचे ज्ञान होण्याची स्वाभाविक उत्सुकता निर्माण होईल. आम्हा मानवांच्या ठिकाणी जो ‘सत्वगुण’ आहे, त्याचे प्रधान कार्य म्हणजे सर्वाभूती आत्मा हा एकच असून, सर्वांच्या हितार्थ ह्या जन्मात,या जन्माचे काही कारण आहे, हे जाणून घेणे हे होय. आपल्यापेक्षा जे ज्ञानी आहेत. जे वडील आहेत, त्यांच्याबद्दल पूज्य भाव, जीवनात ज्ञान-अज्ञानाने घडणाऱ्या दुष्कृत्याबद्दल भय व प्राप्त झालेले जीवन स्वतःच्या विचार-अविचाराने, ज्ञान-अज्ञानाने खर्च न करता ते देवाधीन कसे होईल, याची जाणीव ठेवून ते देवाला पूर्णतः अर्पण करणे हे माझे कर्तव्य आहे, अशी जाणीव ज्या व्यक्ती माध्यमाच्या ठिकाणी सदैव वास करते, त्या गुणास ‘सत्वगुण’ असे म्हणतात.

वारंवार आपल्या सर्वांच्या वाचनात असे आलेले आहे की, मनुष्याच्या देहिक प्रकृतीत रज, तम, सत्व हे गुण सामावलेले आहेत. पण या गुणांची शास्रीदृष्ट्या चर्चा झाली असली तरी जीवन-उत्पत्ती-मीमांसेप्रमाणे मनुष्य जेव्हा जन्म घेतो, तेव्हा हा देह पूर्णतः सत्वगुणीच असतो. जन्म प्राप्तीनंतर जीवन विकसित करण्यास अयोग्य असे काहीही परमेश्वर देणार नाही. आपण जन्माला आल्यानंतर वय वर्षे तीन पर्यंत पूर्णतः शंभर टक्के सत्वगुणी असतो, जे गुण रज, तम म्हणून सांगितले आहेत, त्या गुणांची धारणा वय वर्षे आठपासून व्हावयास सुरवात होते. यापैकी जो तामस गुण आहे त्याला आरंभ वय वर्षे पाचपासून व्हावयास सुरवात होते. याला कारण ते बालक नसून त्याचे आईवडील त्याला जबाबदार असतात. कारण आईवडीलांच्या प्रौढ अवस्थेमध्ये हे तीन गुण विषम प्रमाणात त्यांच्या ठिकाणी पूर्णतः धारण झाले असल्याने अनुभवास असे येते की, बाल-संगोपन म्हणजे त्यास अन्न व दूध इत्यादि देणे. त्यामुळे ज्या आपल्या अपत्याने शंभर टक्के सत्वगुण आणला आहे तो अधिकाधिक त्याच्या ठिकाणी कसा राहील याचा सूज्ञ विचार न करता, तो अधिकाधिक कमी करण्याचे कार्य त्या अपत्याचे आईवडील करीत असतात. याचे उदाहरण म्हणजे मुलावर उठता बसता रागावणे, त्याला शिक्षा म्हणून मारणे, इत्यादि काही प्रकार जन्मदाते आईवडील करतात. त्याचा आघात त्या बालमनावर होऊन,आईवडीलांच्या रागावण्याचा जो विषय असतो तो मुलांच्या बालमनाला जाणीव करुन देण्यास कारणीभूत होतो. असा आरंभ बाल्यावस्थेपासून व्हावयास लागला की ह्या रज, तम गुणांची उत्पत्ती स्वाभाविक होण्यास आरंभ होतो. वास्तविक आपण प्रौढ झालो आहोत व त्या मुलाचे जन्मदाते मातापिता आहोत, ही जाणीव ठेवून त्या मुलाला जी शिकवण देणे आपले इष्ट कर्तव्य आहे, ते कर्तव्य आपल्या ठिकाणी    असणा-या सत्वगुणपरत्वे व्हावयास पाहिजे. पण तसे का घडत नाही ? तर जन्माला आल्यावर आपल्या ठिकाणी जो शंभर टक्के सात्विकगुण होता, तो गुण आज आपल्या ठिकाणी केवळ पंचवीस टक्केच उरला आहे. याचे कारण आपल्या वयाच्या अठरा वर्षेपर्यंत तामस गुणाचा विकास आपल्या आईवडीलांचा धाक व कारण नसताना रागावण्याने निर्माण झाला. वय वषे अठरा हे वय इंद्रिय अवयवांची पूर्णतःवाढ झाल्याचे लक्षण असते. अशावेळी वय अठरा या मुलांचा विषय ‘जीवन’ हा नसून ‘जग’ हा असतो. त्या विषयाकडे धाव घेण्याची त्याची मनःस्थिती त्याला अनावर होते व त्या अनावश्यक विषयामुळे त्याला आपले मन ताब्यात ठेवता येत नाही. अशामुळे आपल्या जीवनात तामस हा गुण पंचवीस टक्के व राजस हा गुण पन्नास टक्के इतका निर्माण होतो.

जन्मतःच जो शंभर टक्के गुण मनुष्याला निसर्गतः प्राप्त करुन देण्यात आला आहे, तो आपण न अभ्यासल्यामुळे त्याला अनैसर्गिक अशी अवस्था आपण प्राप्त करुन देतो. त्यामुळे जीवन विकासास योग्य असा वाव या राजस व तामस अशा गुणांमुळे मिळत नाही अनेक वेळा उपासक साधक-माध्यमाकडे जाऊन विचारतात कीं ,”आपण देवाचे चिंतन करण्यास मला सांगता पण मला माझे मन एकाग्र होत नाही”. याला साधक तरी काय मार्गदर्शन करणार ? यासाठी बाल्यावस्थेपासून प्रौढ अवस्थेपर्यंत आपल्या जीवनाचा जो काळ आपण व्यतीत करता, त्या काळात निदान पन्नास टक्के तरी सत्वगुण आपल्या हितार्थ आपल्याला जतन केला पाहिजे, हा विचार करण्यास हवा.

जीवनात राजस व तामस गुण हे असावयास पाहिजेत.पण या दोषांची प्रमाणे पंचवीस–पंचवीस टक्के इतकेच जर असतील तर पन्नास टक्के असणारा सत्वगुण देहिक व पारमार्थिक अशा जीवनाचा लाभ करुन देण्यास किंवा त्यातील सुख-समाधान अनुभविण्यास मदत करील.अशा सत्वगुणाचा पुनःश्च लाभ करुन घेण्याचे साधन जर आपणास अंगिकारावयाचे असेल, तर प्रथमतः आपण जगातील बाह्य विषयाकडे जे मोहित झाला आहात, तो मोह आवरण्यास सुरुवात करा.

तो मोह गरजेपेक्षा अधिक आहे.तो जर कमी केलात तर जो रजोगुण पन्नास टक्के इतका वाढला आहे, तो कमी होऊन सत्वगुण आपोआप वाढू लागेल. त्याचप्रमाणे जो तामस गुण पंचवीस टक्के वाढला आहे त्यासाठी कुटुंबात कारण नसताना रागावणे, मनःस्ताप करुन घेणे इत्यादि ज्या गोष्टी ज्ञान-अज्ञानाने आपण करता, त्या कारणा इतक्याच आचार विचारात जर आणल्यात, तर हा तमोगुण कामी होऊन सत्वगुण वाढू लागेल. हा पारमार्थिक उन्नतीचा पाया देवाने निर्माण करावयाचा नसून, तो आपणच निर्माण केला पाहिजे, प्रौढ अवस्थेत असा पाया निर्माण झाला की, त्या पायावर अधिष्ठित होण्यास देव आतुरतेने वाट  पहात असतो. याचा बोध सूज्ञ भक्तांना होत नसल्याने साधकांना भेटून, देवदर्शनाची, कृपाशिर्वादाची, साक्षात्काराची, आत्मप्रचितीची, आत्मबोधाची  व आत्मज्ञानाची जाणीव केव्हा होईल अशा प्रश्नांची प्रश्नमालिका विचारण्यास सुरुवात होते. अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे गुरुमार्गात आपणास मिळत नाहीत. म्हणून कित्येक सूज्ञ भक्त आपल्या जीवनाची दिशा बदलून गैरदिशेस या जीवनाचा परमपवित्र प्रवाह व्यतीत करतात. हे वाचनात आल्यावर पारमार्थिक जीवनाची प्राप्ती करण्याची जबाबदारी पंचाहत्तर टक्के आपली असून, ती शक्तीमान करण्याची फक्त पंचवीस टक्के जबाबदारी परमेश्वराची आहे. तो ती जबाबदारी आनंदाने स्वीकारतो. ज्यांनी आजपर्यंत अशा कार्य पध्दतीने जीवन व्यतीत केले आहे, त्यांना त्या दयावंत परमेश्वराने कृपावंत केले आहे हे लक्षात येईल.

वरील मार्गदर्शन देहातील प्रधान गुणाबद्दल म्हणजे सत्वगुणाबद्दल, व तो प्राप्त करण्यासाठी काय दक्षता घेणे आवश्यक आहे, हे निवेदन केले आहे. तामस गुणासंबंधी वर जो उल्लेख केला आहे,त्यात त्याचे प्रमाण गरजे इतकेच आवश्यक आहे. म्हणजे साधारण पंधरा टक्के गुणाचा वापर इतकाच आवश्यक आहे की, ज्यावेळी आपल्या जीवनात अडीअडचणी निर्माण होतात किंवा अकस्मात एखादे संकट उभे राहते, तेव्हा ती अडीअडचण किंवा संकट निवारुन नेण्याचे कार्य सत्वगुणाच्या ठिकाणी वास करीत असलेल्या परमेश्वराचा कृपाशिर्वाद करणार आहे. तरीस्ध्दा आपण ह्या अडीअडचणींना किंवा संकटांना तोंड देऊ शकणार नाही. अशी जी कमतरता आपल्याला वाटते, ती वाटू नये व निश्चयाने आपण त्याचा प्रतिकार करावा म्हणून हा तमोगुण आपल्या ठिकाणी कार्य करतो.

या शिवाय कुटुंबात आपण जबाबदार व्यक्ति असल्याने, इतरांना मानवेल इतकाच दरारा आपल्याकडून व्यक्त केला गेला पाहिजे. मार्गदर्शन पध्दतीतील जी निराकरणे पाच ते अकरा आठवडेपर्यंत पूजनार्थ आहेत, त्याचे फल आपल्याला त्या मुदतीत का मिळत नाही, यालाही हे एक कारण अधिक आहे. तुमचे तामस व राजस गुण अधिक वाढीस लागले व सत्वगुण हा प्रसाद कमी पडला, तर दिला गेलेला कृपाप्रसाद, म्हणजे श्रीफल याचे फल पूर्णतः मिळत नाही,

वरील अनेक मार्गदर्शनात ‘जीवन’ हा तुमच्या जीवनातील मुख्य विषय व्हावयास पाहिजे,असे जे अनेक वेळेला म्हटले, याचा अर्थ असा स्पष्ट होतो की,आपला राजस गुण कमी व्हावयास पाहिजे, तो दहा टक्के इतकाच जीवनकार्यार्थ आवश्यक आहे. तुमच्या जीवनात, तुम्हाला अधिक जीवन हे कुटुंबातील इष्ट कर्तव्याची पूर्तता करण्यासाठी खर्च करावयाचे आहे. तेव्हा जगातील अनेक विषय हे तुमचे होता कामा नयेत. या प्रमाणात, म्हणजे पंचाहत्तर टक्के सत्वगुण,पंधरा टक्के तामस गुण व दहा टक्के राजस गुण प्राप्त होण्याने तुमचे जीवन विकसित आहे हे स्पष्ट होते. अशा जीवनाचा जो लाभ आहे, तो म्हणजे तुम्ही जगातील अनेक विषयांचा विषय बनता.

अत्तर :- पूजा साहित्यातील हे सुवासिक तेल देवाला वाहत असताना ते नेहमी अनामिकेने म्हणजे करांगुली जवळील बोटाने देवास लावावयास पाहिजे. हे अत्तरसुध्दा देवाच्या छातीच्याजवळ वहावे. कारण देवाची दैविक शक्ति ही आपल्याप्रमाणेच त्याच्या हृदयात वास करीत असते. हे अत्तर वाहण्याचा जो सद्हेतू आहे, तोही आपणास बोधप्रद असा आहे. आपल्या जीवनात आपण किती गुणी आहोत व जीवनाचे सार्थक करण्यासाठी किती गुणी व्हावयास पाहिजे, याचे सिंहावलोकन कोणीही करीत नाही. प्रत्येकाला आपल्यामध्ये वास करीत असलेल्या कमीअधिक गुणाबद्दल असा अहंभाव असतो की,आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत. पण ही श्रेष्ठता बोलण्या चालण्यात कधीही अनुभवास येत नाही. अशा सद्गुण-दुर्गुण म्हणून वास करीत असलेल्या अवस्था आपल्याजवळ असूनही जेव्हा आपण देवापुढे बसतो, तेव्हा देव आपला अनादर न करता, जरी आपण दुर्गुणी आहोत, इतरांना आपल्यातील वासाने कमीपणा देता आहोत, तरी आपण करीत असलेली पूजा तो परमेश्वर आनंदाने स्वीकरतो. ती याचसाठी की,  ‘माझा भक्त जरी पूर्वजन्मीच्या कृतकर्मानि दुर्गुणी आहे तरी माझ्या कृपाशिर्वादाने आज ना उद्या तो निश्चित गुणी होऊन, त्याचा सुगंध इतरांच्या कल्याणार्थ तो परोपकार म्हणून आचरणात आणील’.

देवाला जे अत्तर वहावयाचे आहे, ते त्याला कोणते प्रिय आहे, याचा आपण कधीही विचार केला नाही. देवाला अत्तर वहावयाचे आहे एवढेच समजून आपण आजच्या काळातील आधुनिक अत्तरे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सेंट्स उपयोगात आणतो. पण यापेक्षाही दुर्दैवाची गोष्ट अशी अनुभवास येते की घरातील ड्रेसिंग टेबलवर रोज वापरण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सेंट्सच्या बाटल्या व त्याही विदेशी, महत्प्रयत्नाने मिळवून ठेवलेल्या असतात. पण देवाजवळ चुकूनही अत्तराची बाटली सापडत नाही. जगासमोर आपणास बाहेर जावयाचे आहे म्हणून परिधान केलेले कपडे सुगंधित करण्याची ही आधुनिक फँशन बाहेरुन जरी आपल्याला सुगंधित करीत असली तरी अंर्तयामी आपण सुगंधित आहोत का ? याचा विचार प्रत्येकाने स्वतःला विचारुन करावा.

देवास प्रिय अशी जी अत्तरे आहेत ती प्रामुख्याने म्हणजे हीना, चंदन, गुलाब, वाळा. याचे कारण ह्या अत्तराची निर्मिती ज्या वनस्पतीपासून केलेली आहे त्या वनस्पतीची उत्पत्ती व त्यातील सुवास हा काही मानवी प्रयोग नसून, हा देवाच्या सामर्थ्याच्या चमत्काराची साक्ष आहे. हे सत्य आपल्यासमोर असताना, साधक अवस्थेतील बाल्य साधक क्षूद्र अष्टसिध्दि सारखे साधन प्राप्त करुन, जे चमत्कार समाजात करीत आहेत व त्यांच्या ठिकाणी ही अद्भूत शक्ति म्हणजे परमेश्वर आहे असे समजून जे लोक अंधश्रध्देने आपल्या देवादिकांकडे पाठ फिरवून त्याच्याकडे धांव घेत आहेत त्यां नी अशा चमत्कार करणा-या व्यक्ती ह्या ‘देव’ आहेत असे समजून तिकडे धाव न घेता,निसर्गात परमेश्वराने अद्भूत असे आपल्या सामर्थ्याचे दिव्य प्रतिक म्हणून तुम्हाला जे अनुभविण्यास दिले आहे, त्या अनुभवाची ओळख करुन अशी श्रध्दा निर्माण करा की, परमेश्वराला आपले अस्तित्व जाणवून देण्यासाठी मनुष्यमात्राची गरज नाही. सृष्टीत मनुष्य हा जसे एक निसर्गाचा घटक आहे, तरी त्याचे जीवन निसर्गपरत्वे व्यतीत होत नसून अनैसर्गिक असेच व्यतीत होत आहे.फक्त निसर्ग ही निर्मिती परमेश्वराची साक्ष असल्याने तो आपल्या दिव्य शक्तिची प्रतिके निसर्गातून व्यक्त करीत असतो. त्याला मानवी माध्यमाची कदापिही गरज नाही.

हळद-कुंकू :- पूजनादी विधीत या दोन द्रव्यांचा जो समावेश शास्त्राप्रमाणे करण्यात आला आहे, त्याचे महत्व असे आहे की, हळद व कुंकू हे देवाला जेंव्हा आपण वहावयाचे असते, त्यावेळी ह्या दोन द्रव्यमाध्यमातून देवाकडे अशी याचना करावयाची असते की, ”देवा  या जगात तू सर्वशक्तिमान असून, तुझी सत्ता जगातील अणुरेणुपासून ब्रम्हांडापर्यंत कार्य करती झाली आहे व अशा कार्यात ज्या ऋध्दिसिध्दीचा समावेश असतो, त्या ऋध्दिसिध्दी तुझ्या दास असून, त्या माझ्या जीवनातील सुख-शांती-समाधानाच्या आधार आहेत. तेव्हा तुझ्या कृपेने हा आधार मला निरंतर स्वरुपात लाभू दे”. अशी प्रार्थना करुन देवाला हळद व कुंकू हे अंगुष्ट व अनामिका अशा चिमटीत धरुन वहावे. हळदकुंकू वाहून झाल्यावर अनामिकेस लावलेले कुंकू आपल्या मस्तकी लावावे. याचा हेतू असा की, ज्या ऋध्दिसिध्दी आपल्या प्रापंचिक जीवनात आपणास कृपाशिर्वादाचा आधार म्हणून लाभाव्यात अशी जी आपली इच्छा असते, ती साकार होण्यासाठी आपण आपले देहिक माध्यमही मंगलमय करावयास हवे. तरच केली गेलेली प्रार्थना पूर्णत्वास जाते.

अलिकडील काळात घरातील सुवासिनी तयार कुंकू, जे बाटल्यात भरलेले बाजारात मिळते, त्याचा सर्रास वापर करतात. त्यामुळे जरी ह्या सुवासिनींची कुंकू लावण्याची सुलभ अशी सोय होत असली तरी घरातील सुवासिनीने देवास हळदीकुंकू वाहून ज्या ऋध्दिसिध्दीच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करावयाची आहे, ती या बाटलीतील कुंकू लावण्याने यशदायक होत नाही. यासाठी निदान घरातील प्रत्येक सुवासिनीने, जरी वेणी-फणी करुन बाटलीतील कुंकू लावले तरी त्यानंतर देवास हळदकुंकू वाहून, पुन्हा आपल्या मस्तकाला प्रथम हळद व नंतर कुंकू लावून घ्यावे. तरच कुटुंबात अंगिकारलेल्या देवदेवतार्जनाचा इष्ट कृपाशिर्वाद कुटुंबियांना प्राप्त होतो.

फलसमर्पण :- हा विधीसुध्दा औपचार व उपचार या विधीने युक्त असा करावयाचा आहे. जे फळ आपण देवाला अर्पण करणार आहोत, ते परिपक्व झाल्यावर म्हणजे पिकल्यावर आपण देवापढे प्रसाद म्हणून ठेवतो. हे पिकलेले फळ म्हणजे त्याच्या तिन्ही अवस्थांचे पूर्णत्व किंवा परिपाक झालेला आहे. त्याचप्रमाणे “मलाही त्या तिन्ही स्थिती असून, माझा काहीच विकास अजून  झाला नाही याबद्दल मला दुख होत आहे” हे देवाला निवेदन करण्याचे माध्यम म्हणजे फळ होय. हे त्याला ज्या प्रार्थनेने किंवा विधीने अर्पण करावयाचे आहे, त्या विधीस ‘नैवेद्य’ असे म्हणतात.

फल अर्पणाचा दुसरा हेतू असा की, ’मी जी तुझी सेवा आतापर्यंत मनोभावे केली आहे, त्याचे फल मी मागणे हिताचे आहे किंवा नाही हे मला समजत नाही. तेव्हा मी केलेली सेवा मनोभावे स्वीकारुन त्याचे योग्य ते फल, तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे दे. कारण जीवनात अज्ञानाने मी जे जे काही मागतो ते माझ्या हिताचेच असेल किंवा नाही याचा बोध मला होत नाही, मी माझ्या इच्छित अपेक्षा फलप्राप्ती म्हणून केल्या व तुला त्यापेक्षा अधिक काही द्यावयाचे असेल तर मी फल प्राप्ती मागण्यात माझ्या अपेक्षेइतकेच प्राप्त होईल’ अशी सद्भावना विचारात घेऊन जे फळ आपण अर्पण कराल त्यासच ‘निरपेक्ष भक्ति’ असे म्हणतात.

हे फल देवाला अर्पण केल्यावर त्या फलाचे रुपांतर आपल्याला जरे दिसत नसले,तरी ते ‘प्रसादात’ होते, असा प्रसाद घरातील सर्वांनी ग्रहण केल्यावर त्याचा प्रतिसाद द्यावयास पाहिजे की, ‘परमेश्वरा, तू दिलेला प्रसाद जो आम्ही् ग्रहण केलेला आहे, त्याच्या सामर्थ्यामुळे मला व माझ्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीला जीवनात आधि-व्याधि, दुख-अशांतता, कर्मपरत्वे अनुकुल-प्रतिकुलता, ऋणानुबंधपरत्वे धननाश, विद्यानाश, संततीनाश आदिच्या दृष्ट भवचक्राचा त्रास सहन करावा लागणार नाही,असा माझा पूर्णतः विश्वास आहे’.

अनेक भक्तभाविक देवाला प्रसाद म्हणून पेढे, बर्फी, लाडू, करंज्या किंवा अन्न मिष्टान्ने यांचा नैवेद्य दाखवितात. वास्तविक ही मिष्टान्ने सेवन करण्यासाठी वासना आपली असते, पण आपण ती देवाच्या निमित्ताने पूर्ण करुन घेत असतो. आपण आपल्या वासनेपरत्वे ही मिष्टान्ने देवापुढे प्रसाद म्हणून ठेवीत असलो तरी देव व देवाचे देवत्व हे इच्छास्वरुपी आहे. हे कदापिही वासनारुपी नाही.त्यामुळे या  प्रसादाचा स्वीकार देवाने केला आहे असे वाटते, ते प्रत्यक्षात घडत नाही. कारण देवाचा धर्म नैसर्गिक असल्याने, जे नैसर्गिक  असेल त्याचेच सेवन करणे व प्रसाद म्हणून तो आपल्याला परत करणे, हा त्याचा धर्म आहे. म्हणून नैवेद्यात श्रेष्ठ म्हणून  जर काही असेल, तर दुधसाखर व इच्छित फळ होय.

आरती ओवाळणे :- पूर्वीच्या अनेक निराकरणात प्रामुख्याने असे सूचित करण्यात आले आहे की, देवापुढे जे निरांजन लावता ते साजूक तुपाचे लावावे. निरांजन भरुन लावण्याइतके तूप नसले तरी पाच मिनिटे ते निरांजन देवापुढे तेवत राहील एवढे तरी तूप घालावे. वास्तविक वात पेटण्यासाठी, कोणताही स्निग्ध पदार्थ म्हणजे मेण व अलिकडील वनस्पती तूप म्हणून ज्याला आपण म्हणता, ते सुध्दा सर्रास वापरण्यात येत आहे व ते निरांजन देवापुढे लावले  याचे समाधानही आपण भक्तभाविकांनां मिळत आहे, असे असता, कार्यपध्दतीत प्रामुख्याने साजुक तूपाचे निरांजन लावावे असे जेव्हा सांगण्यात येते, त्यामागे काहीतरी महत्वाचे कारण असावयास पाहिजे.

जेव्हा आपण भक्तभाविक आपल्या इष्ट देवतांच्या पूजनाचा विधी वरील निवेदना प्रमाणे पूर्ण करता, त्यावेळी आपण देवापुढे स्थूल देह घेऊन बसलेलो असतो, याचीच जाणीव फक्त आपल्याला होत असते. पण ज्या स्थूल देहात दोन अधिक देह आहेत, ते म्हणजे सूक्ष्म व कारण, हे आपणांस दिसत नाहीत किंवा अनुभवास येत नाहीत. पण त्या दोन देहांचा समावेश ह्या पूजनादि विधीत होणे अत्यावश्यक आहे. यासाठी बोध असा सूचित केला आहे की तांब्याचे किंवा पितळेचे निरांजन म्हणजे तुमचा पंचमहाभूत तत्वांनी युक्त असा स्थूल देह याचे प्रतिक, आत जे तूप आहे तो सूक्ष्म देह म्हणजे पंचतन्मात्र व कारण देह म्हणजे निरांजनात ठेवलेली  वात. ही वात आपण पेटविल्यावर जो प्रकाश देव व भक्त यामध्ये पडतो त्याचे प्रतिक असे आहे की, ‘परमेश्वरा, हे मी तुझ्यापुढे जे निरांजन माझे प्रतिक म्हणून पेटवितो आहे व ते मी पेटविल्यावर जसा त्याचा प्रकाश तुझ्या माझ्यात पसरला आहे, तशा माझ्या देहाच्या तिन्ही अवस्था तू तुझ्या कृपाशिर्वादाने एक करुन दे. म्हणजे त्या माझ्या जीवनाचा प्रकाश या जगात सर्वत्र पसरुन मला प्राप्त झालेल्या जन्माचे कारण, इतरांसाठी माझ्या हातून जी सेवा होईल, त्यामुळे मला समजेल’.

या विधीत साजूक तुपाला जे महत्व दिलेले आहे याचे कारण असे, हा देह पंचभौतिक तत्वांची निर्मिती असून,त्याच्या विकासासाठी पंचभौतिक तत्वांचीच आवश्यकता असते. म्हणून अन्न, पाणी, दूध, दही, तूप इत्यादि सेवन करुन या पंचभौतिक शरीराची निगा राखत असतो. त्याच प्रमाणे ह्या जन्माला विकसित करुन त्याची निगा  राखण्याचे साधन हे निरांजनातील तूप होय. तूप हा जो पदार्थ आहे, तो गाय किंवा म्हैस या प्राण्यांच्या दूधापासून निघालेला त्यांच्या पंचभौतिक तत्वांचा सत्वगुण आहे. त्यामुळे या तत्वांत लावलेली ज्योत आपल्यात विलीन होण्यास  अडथळा येत नाही. पण हा गुण आजकालच्या कृत्रिम तुपात नसल्याने, जरी निरांजन लावले आणि नाही लावले तरी त्याचा उपयोग जीवनाला पोषक म्हणून काडीमात्र होत नाही. अशी ही निरांजनातील ज्योत स्वतः जाळून इतरांना प्रकाश देण्याचे महत्कार्य करते, असे आपल्या हातून घडावे, असा बोध सूचित केला आहे. त्या तबकातील निरांजनाने आपल्या पुढील देवास तीन वेळा पायापासून पुन्हा पायापर्यंत गोलाकार अशी ओवाळणी करावयास पाहिजे. ही ओवाळणी करण्याचा हेतूही तिन्ही देहाच्या हितसंबंधाशी आहे. या शिवाय महत्वाचा उद्देश असा आहे की, आपण देवापुढे बसल्यावर देवाची प्रतिके व तसबिरी यामध्ये जे वातावरण आहे, त्या वातावरणात आपल्या जन्मकर्मातील अशुध्द अशी वलये आपल्या पूजनादि विधीत आपल्याला अडथळा निर्माण करण्यासाठी उपस्थित असतात. त्या वलयांचे निरसन होऊन, देवाने वलयरुपाने पाठविलेला कृपाशर्वाद आपणास सहज प्राप्त व्हावा, म्हणून हे निरांजन ओवाळावयाचे आहे.

अक्षता :- पूजनारंभी ज्या अक्षता तुम्ही देवाला वाहित्या, त्या अक्षता देवांना पूजनादि विधी स्वीकारण्यास आवाहन म्हणून वाहिल्या. आता ज्या अक्षता वहावयाच्या आहेत त्या ‘उपचार’ म्हणून, म्हणजे वाहिलेल्या अक्षतांतून स्वतःला जाणीव करुन द्यावयाची आहे कीं, ’देवा हा सर्व विधी जो मी करीत आहे हा काही माझा मोठेपणा नसून, यापेक्षा अधिक कितीतरी गोष्टी तू माझ्या हिताच्या, माझ्या आयुष्यात करीत आला आहेस व पुढेही करीत राहशील. त्याचे मोजमाप परतफेड म्हणून मला कोणत्याही जन्मात करता येणे शक्य नाही. तरी ह्या उपकाराची फेड मी माझ्या यथाशक्ति यथाज्ञानाने वाहिलेल्या अक्षतापेक्षा एका तांदळा एव्हढ्या आकार व वजनाची आहे, त्याचा तू स्वीकार कर’.

देवाची पूजाअर्चा ह्या ज्या ज्या काही साधनांनी करावाची आहे, ते सर्व पूजासाहित्य आपल्याला ऐपतीनुसार आणता येईल असे नाही तरीसुध्दा जशी आपली ऐपत असेल त्याप्रमाणे साहित्य पूजनात असावे. हे जरी खरे, तरी  पूजासाहित्यास आपल्याला ऐपत नाही म्हणून आपण पूजनादि विधीकडे दुर्लक्ष करतो. पण देवादेवतांना पूजासाहित्यापेक्षा भक्तियुक्त भावभावना हीच इतर देखाव्यापेक्षा अधिक प्रिय असतात. तेव्हा देवाबद्दल भक्तियुक्त भावभावना निर्माण करण्यास ऐपत नाही असे म्हणण्याचे कारण नाही, देवाबद्दलची भक्तीभावना व ती भक्तिभावनेने व्यक्त करावयाची भावना, याची नित्याने जर आपण सवय लावून घेतली तर सकाळी पंधरा मिनीटे केलेली पूजा हिचा आनंद रात्री झोपण्यापर्यंत अनुभविण्यास येतो. दिवसातील इष्ट कर्तव्ये करताना चुकूनही तुमच्या तोंडून असा शब्द निघणार नाही कीं, ‘मला आज करमत नाही,’ कारण सकाळी पंधरा मिनीटे पूजनादि विधीत व्यतीत केलेला वेळ हा देहिक आनंदापेक्षा आत्मिक आनंदाचा असल्याने तो द्विगुणीतच होत असतो. असा आनंद प्राप्त करुन घेतल्यानंतर करमणुकीसाठी नाटक, सिनेमा, रेडिओ आदिची जी गरज आपल्याला लागते ती न लागता, या गरजेतून आपण पै-पैशाची खूपच बचत करु शकता. याशिवाय या अक्षता वाहण्याचा दुसरा बोध असा आहे की, ’माझ्या ऐपती प्रमाणे मी तुझी सेवा अक्षतेतील एका तांदळाएवढी केली आहे, त्याचा तू स्वीकार करुन कृपाशिर्वाद दे’.

समाजात प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे भिन्न भिन्न विषयांच्या पातळीपरत्वे व्यतीत होत असते. कोणास अपेक्षेपेक्षा जास्त अशी धनप्राप्ती, विद्याप्राप्ती, नामप्राप्ती किंवा प्रतिष्ठा प्राप्त झालेली  असते. वास्तविक असे विषय प्राप्त झाल्यावर आम्हा मानवांनी संतुष्ट मनाने त्या परमेश्वराचे उपकार मानून, जे इतरांना मिळाले आहे त्यापेक्षा जे आपल्याला अधिक मिळाले आहे,त्यातून जर आपण दानधर्म, देवकर्म व परोपकार आणि तोसुध्दा उपकार म्हणून नव्हे, तर कर्तव्य बुध्दीने अंगिकारलात, तर इतरांच्या ज्या गरजा आहेत त्या आपण सहज पूर्ण करुन नकळत पुण्यसंचय करु. पण याउलट या व्यक्ती समाजात इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी प्रतिष्ठा निर्माण करुन, प्राप्त झालेल्या सुखाबद्दल अहंकार व्यक्त करुन इतरांना तुच्छ व कमीपणाने लेखतात. अशी ही सर्व प्राप्ती करुन देण्याचा जो परोपकार न मागता न कळत ज्याने दिला आहे, असा परमेश्वर आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत व श्रेष्ठ आहे. त्याच्यापुढे भक्तिभावनेने बसून आग्रहाने असा कमीपणा आपण घ्यावयास पाहिजे की, ‘देवा, तू जे सर्व काही मला दिले आहेस, ते तुला वाहिलेल्या अक्षतांपैकी एका तांदळाच्या सहस्त्रपटी इतकेच मला मिळाले आहे. तर हा माझा गर्व तू हरण कर व मला जे प्राप्त झाले ते माझेच असून मलाच त्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे,असा स्वार्थी विचार मला न येऊ देत’.

पूजनादि विधीसाठी महत्वाचे साहित्य यासंबंधीचा आवश्यक तो बोध आपण भक्तभाविकांना यथोचित करुन दिला आहे. यापैकी देवाजवळील नंदादीप हा प्रत्येकाला जागेच्या अभावी लावता येणे शक्यच असते असे नाही, म्हणून त्यासंबंधी विशेष मार्गदर्शन न करता, तो शक्य असेल त्यांनी सकाळी निदान पूजेच्या वेळी व सायंकाळी लावावा. उदबत्ती, धूप हे विधी सकाळ-संध्याकाळ करण्याने घरामध्ये प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. ते आपापल्या परीने करावे.

पंचउपचार विधी :- षोडशोपचारे पूजनादि विधी झाल्यानंतर, करीत असलेल्या पूजन विधीत आपण निरपेक्ष असावयास पाहिजे. पण पूजनादि करणा-या व्यक्तिच्या ठिकाणी सहजासहजी देवाबद्दल किंवा देवाजवळ काही मागण्याबद्दल निरपेक्ष भावभावना असतील असे नाही. यासाठी पूजनादि विधी झाल्यानंतर एक तुळशीपत्र किंवा बिल्वपत्र हातात घेऊन व त्याबरोबर थोड्या अक्षता व हळदकुंकू घेऊन ते देवाला वहावे. अशावेळी, जर मंत्रपुष्पांजली येत असेल तर त्याचा उच्चार करावा, नाही तर  ‘श्रीकृष्णार्पणमस्तु’ म्हणून ती मंत्रपुष्पांजली  म्हणजे तुळस किंवा बिल्वपत्र, अक्षता, हळदकुंकू आदि देवाला समर्पण करावे. अशाने जरी तुम्ही जीवनातील काही अडीअडचणी संबंधी किंवा ऐहिक अपेक्षेने पूजनादि विधीचे वेळी विचार करते झाला असलात, तरी या मंत्रपुष्पांजलीच्या समर्पण विधीने तुम्ही केलेली पूजनादि क्रिया निरपेक्ष झाली, अशी भावना साकार होते.

त्यानंतर देवासमोर आपणास येत असलेले आपल्या इष्टदेवतेबद्दलचे एखादे स्तोत्र, कवच किंवा त्या देवतांच्याबद्दलचे मंत्र यांचा उच्चार करावा. यामध्ये प्रामुख्याने एका गोष्टीची जबाबदारी अशी घ्यावी की, ज्या देवतांचे मंत्र बीजाक्षरी आहेत त्यांचा उच्चार करु नये. कारण हे मंत्र साधक अवस्थेतील सिध्दावस्था प्राप्त केलेल्या व्यक्तीने जर सिध्द केलेले असतील व ते दीक्षा विधी म्हणून आपणांस दिले असतील, तरच या बीजाक्षरी मंत्राचा लाभ आपल्याला होत असतो. यापेक्षा सुलभ, सोप्या मंत्राचा उच्चार हाच हिताचा व लवकर यशप्राप्ती करुन देणारा आहे. म्हणून त्याचाच उच्चार करावा किंवा गुरुनामस्मरण करावे.

अध्याय ५ कुलाचार, कुलोपासना.

अध्याय ३ घराण्यातील कुलधर्म.