अध्याय ११. परमार्थ प्रश्नावली

दैनंदिन जीवनात ऐहिक सुखप्राप्तीसाठी मनुष्य ज्ञान-अज्ञानाने अनेक तऱ्हेची कर्मे करीत असतो. कित्येक वेळी हातून घडलेली पातके व प्रमाद यांची आठवण कोणी करून दिली, तरच ती त्याला होते व ती देऊनसुध्दा ती मान्य करण्यास सहसा कोणी तयार होत नसतो. पण अशाने जीवनाचे खरे सार्थक कशात आहे हे समजणे कठीण होते. रोजच्या व्यावहारिक जीवनात काया-वाचा-मनाने हातून घडणाऱ्या कृत्यांचा जबाब प्रामाणिकपणे झोपण्यापूर्वी प्रत्येकाने आपल्या मनाला विचारण्याची सवय लावून घेतली पाहिजे. नुसती पुस्तकी ज्ञानाची पाखंडी मते बोलण्याने उन्नती होत नसते. जी ‘परमार्थ प्रश्नावली’ या ठिकाणी दिली आहे, त्यातील प्रत्येक प्रश्न सर्वसाधारणपणे प्रत्येक मनुष्याच्या हातून घडलेला किंवा घडणारा असतो. अशा घडणाऱ्या चुकांमुळे कुटुंबाची आचार-विचारांची उन्नती ध्येयवादी होण्यास या ‘परमार्थ प्रश्नावली’ची विचारणा प्रत्येकाने आपल्याशी करून पुनःश्च कोणत्याही परिस्थितीत अशी कर्मे घडणार नाहीत याचा अभ्यास केला पाहिजे व दैनंदिन जीवनात ती सवय जास्तीत जास्तपणे आपल्याला कशी लागेल याचा अनुभव घेतला पाहिजे. अशा नित्य सवयीमुळे परमेश्वरी मार्गाकडे जाण्याची पहिली पायरी तुम्ही निर्माण करू शकाल. नाहीतर देवासमोर बसून तुमच्या आचार-विचारांची स्थिरता होणार नाही. कारण देहाच्या ठिकाणी क्षणाक्षणाला निर्माण होणारे विकार हे त्याला जीवनात स्थिरता, निश्चितता लाभू देत नाहीत. आजकालच्या नवमतवादी सुधारकांची विचारसरणी अशी आहे की, अशा मार्गाचा अवलंब वृध्दापकाळी करावा. परंतु तोपर्यंत जे हातून घडले जाणार आहे, त्यास जबाबदार कोण ? या सवयीने जर मनुष्य आपले आचार-विचार जगाच्या हितसंबंधाशी प्रामाणिकपणे ठेवील, तर आजची समाजातील परिस्थिती, की ज्याच्यात लाचलुचपत, असत्य-अन्याय, कपट-फसवेगिरी इ. मार्गाचा अवलंब करून ऐहिक सुखाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला जात आहे, की ज्यामुळे सामान्य माणसास आपले जीवन नकोसे झाले आहे, ती बदलून एकमेकांबद्दल जिव्हाळा व प्रेम होऊन एकमेकांच्या सहकार्याने अनेक अडचणी दूर होतील.

या कार्यपध्दतीच्या दैनंदिन उपासनेत रोज रात्री आरतीनंतर सामुदायिकपणे या प्रश्नावलीचा आढावा घेण्याची सवय प्रत्येक भक्तभाविकांस लावली जाते. या प्रश्नावलीचा नुसता उच्चार करून उपासना होणार नाही. तर सकाळपासून सायंकाळपर्यंत तसा उच्चार केल्याप्रमाणे ‘एखादे कृत्य हातून घडले आहे काय’ याचे स्मरण व्हावयास पाहिजे. व तसे प्रसंग घडण्यास मी किती कारण झालो, हे अभ्यासिले पाहिजे. तुमच्या ठिकाणी या सवयीमुळे जो सात्विक आनंद निर्माण होईल, त्याच सवयीने कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस याची सवय लागली पाहिजे. दर शनिवारी विद्यार्थी वर्गासाठी ज्या ज्ञानसंवेदना दिल्या जातात, त्या दिवशी विद्यार्थ्यांनाही ही परमार्थ प्रश्नावली शिकविली जाते. आज जरी पूर्णत्वाने या प्रश्नावलीचे मर्म त्यांना आत्मसात झाले नाही, तरी भावी जीवनात त्यांना त्याचा भावार्थ लक्षात येईल. दैनंदिन उपासनेत एकवेळ तुमची पूजा, पाठ राहिला तरी चालेल, परंतु परमार्थ प्रश्नावलीचा आढावा घेतल्याशिवाय कोणीही भक्तभाविकाने झोपू नये. या सवयीने कुटुंबामध्ये जो सलोखा निर्माण होईल, त्यासच ‘आदर्श कुटुंब’ म्हणजे ‘सद्गुरुकृपेचे कुटुंब’ म्हणता येईल.

ही प्रश्नावली, सर्वसाधारणपणे प्रत्येक कुटुंबात ज्ञान-अज्ञानाने घडणाऱ्या ज्या चुका आहेत त्या लक्षात घेऊन कुटुंबाची पारमार्थिक उन्नती होण्यासाठी तयार केली गेली आहे. ही प्रश्नावली मेजर सदुभाऊ गुणे यांनी तयार केली आहे व तिचा फायदा समितीच्या कार्यपध्दतीस अमोल स्वरूपाचा झाला आहे.

परमार्थ प्रश्नावली
१ . मनोनिग्रह करण्याजोगे किती प्रसंग आज उद्भवले व त्यापैकी किती प्रसंगात निग्रहाचा प्रयत्न यशस्वी झाला ?

२. धनार्जनाच्या कामी असत्य, अन्याय, कपट, फसवेगिरी अथवा चोरी याचा अवलंब केला काय ?

३. आपण मिळविलेल्या धनावर आपल्याखेरीज इतरांचा यथायोग्य प्रमाणात हक्क आहे, या जाणिवेचा विसर पडण्याजोगे काही कृत्य आज आपल्या हातून घडले काय ?

४. ऐपतीप्रमाणे दानधर्म अगर परोपकाराचे काही कृत्य आज आपल्या हातून घडले काय ?

५. अन्नदान, वस्त्रदान, अथवा द्रव्यदान या व्यतिरिक्त इतरांना सुख-समाधान देण्यासाठी कायेने, वाचेने अगर मनाने आपण काय काय प्रयत्न केलेत ?

६. अतिथी व अभ्यागत यांचा खऱ्या मनाने परामर्ष घेण्यात आला की जुलुमाने व रंजिसपणाने त्यांची बोळवणूक केली गेली ?

७. कुटुंबातील सर्वांशी – नोकर-चाकरांशीसुध्दा- प्रेमाने व मनमोकळेपणाने बोलणे चालणे शक्य असता आज आपण कोणाशी निष्कारण अबोला घरला काय ?

८. आज आपल्या हातून कोणाचा अपमान, उपमर्द, तिरस्कार अगर कोणाच्या शरीराला किंवा मनाला क्लेश देण्याजोगे काही कृत्य घडले काय ?

९. आपणा स्वतःस करता येण्याजोगी कामे आळसामुळे अगर आपला त्रास वाचविण्याच्या हेतूने दुसऱ्याकडून करून घेतली काय ?

१०. दिवसाकाठी आज आपल्या हातून जे काही कार्यक्रम घडले ते शक्य तितक्या सुंदर, सफाईदार व यथायोग्य रितीने पार पडावेत या हेतूने करण्यात आले की, कसेतरी ओढून काढले ?

११. कार्यक्रमात, सद्विचारात अथवा ईश्वरचिंतनात व्यतीत करता येणे शक्य होता असा किती काळ आपण आज झोपेत, आळसात किंवा रिकामटेकडेपणात घालविला ? कालच्यापेक्षा कमी की अधिक ?

१२. श्रध्देने धर्माचरण व ईश्वरभक्ती करणाऱ्या कुटुंबातील इतर व्यक्तीना बुध्दिभेद होऊन सन्मार्गावरील त्यांची निष्ठा कमी होण्यास कारणीभूत होईल अशा तऱ्हेची एखादी कृती अगर उद्गार आपल्या तोंडून निघाले काय ? याच्या उलट त्यांच्या श्रध्देला उत्तेजन मिळून ती वृध्दिंगत होईल असा काही प्रयत्न आज आपण केला काय ?

१३. असत्य भाषण, चहाडी-चुगली, दुसऱ्याची अपरोक्ष निंदा आज आपल्या हातून घडली काय ?

१४. खाणे-पिणे, कपडालत्ता, ऐषाराम अथवा करमणूक याबाबत केवळ स्वतःप्रीत्यर्थ होणाऱ्या फाजील खर्चातून परोपकारार्थ अथवा केवळ इंद्रियनिग्रह करण्याच्या हेतूने काही बचत केलीत काय ?

१५. काम, क्रोध वगैरे षड्रीपूंच्या तावडीत सापडण्याजोगे किती प्रसंग आज उद्भवले ? व त्यापैकी किती प्रसंगात विवेकाने त्याचा पगडा चालू दिला नाही ?

१६. नामजपाप्रीत्यर्थ किती वेळ खर्च केलात व जपाची संख्या काय झाली ?

१७. सुखात अथवा समाधानात गेला असे ज्यास तुम्ही म्हणू शकाल असा किती काळ आज आपण अनुभवलात ? ते कशामुळे घडून आले ?

१८. त्याचप्रमाणे ‘दु:खात अथवा असमाधानात’ गेला असे ज्यास म्हणून शकाल असा किती काळ आज आपण अनुभवलात ? ते कशामुळे घडून आले ?

१९. प्रापंचिक कर्मे निरासक्त बुध्दिने करण्याकडे मनाची प्रवृत्ती उत्तरोत्तर वाढत आहे ना ? आज सकाम कर्मे कोणती घडली ?

२०. आजचा दिवस यथायोग्य रीतिने पार पाडल्याचे समाधान या क्षणी आपणास लाभत आहे ना ?

<< अध्याय १० कार्यपध्दतीची ओळख

>> अध्याय १२ सेवक व भक्त-भाविक नियमावली