अध्याय ३ – कार्यपध्दती

या समितीच्या कार्यपध्दतीत दु:ख निवारणार्थ जे मार्गदर्शन केले जाते, त्याची प्रथमतः मीमांसा लक्षात घेऊन ते दु:ख निर्माण होण्यास जी कारणे असतील त्यांचे निवारण म्हणजे आलेल्या किंवा येणाऱ्या आपत्ती, दु:ख, शारीरिक पीडा या दैवी कृपेने थोपविल्या जात नाहीत, तर त्या दु:खाचे ऋणानुबंध आजच्या जीवनात दु:ख निर्माण होण्यास कारणीभूत होण्यास काय कारण झाले आहेत, त्याचे निराकरण म्हणजे ती ऋणे, की, जी मनुष्यजन्मात किड्या-कीटकापासून ते देवादिकापर्यंत असू शकतात. ही दु:ख कारणमीमांसा मानवी जीवनात तीन प्रकारच्या ऋणांनी युक्त असते. (देवऋण, पितृऋण, गुरुऋण).

याशिवाय दु:ख-कारणपरंपरेस षोडशादी संस्कार न झाल्याने किंवा यथायोग्य वेळी ते करण्याकडे दुर्लक्ष केल्याने आरंभ होतो. ही दु:ख कारणपरंपरा म्हणजे गर्भदान विधीपासून ते अंत्येष्टीपर्यंत जे जे संस्कार जीवनाच्या हितसंबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहेत ते न करण्याने ज्ञान, शक्ति, ऐश्वर्य, बल, वीर्य, तेज यांचे संवर्धन होऊ शकत नाही. हे संवर्धन न होण्याने वरील ऋणानुबंधनातील दु:ख वाढविण्यास कारण होते. शिवाय या दोन्हीतील ऋणानुबंध दूर करण्यास दैवी मार्गाचा अवलंब करून योग्य प्रकारचे आचार-विचार निर्माण झाले नाहीत तर जीवनाबद्दल अविचार निर्माण होऊन ऐहिक सुख़ाच्या कल्पना या वासनारुप होऊन त्या पुऱ्या करण्याची इर्षा निर्माण होते आणि ही दु:खे केवळ जीवनाचे कारण म्हणजे ऋणानुबंध धर्मकर्मयुक्त संस्कार हे न मानण्याने झालेली असतात. ह्यांचे निराकरण व्हावे म्हणून तेरा सिध्दसिध्दांत पध्दती दु:ख निवारणार्थ आत्मसात केलेल्या आहेत. या शिवाय अन्य वासनांनी ( पिशाच्चबाधा, देवबाधा, करणी, भानामती इ.) झालेली दु:खे यांच्या निवारणार्थ नऊ सिध्दपध्दती आत्मसात केल्या आहेत. आज पर्यंत समितीच्या कार्यपध्दतीत जी हजारो दु:खी माणसे आली, त्यांच्या दु:ख-कारणमीमांसा या बावीस सिद्ध-सिद्धांत पध्दतीमध्ये बसतात आणि या समितीच्या अनुभवाने हेही सिध्द झाले आहे की, यापलिकडे दु:खे असूच शकत नाहीत.

आता प्रथमतः जेव्हा आपण या कार्यपध्दतीचा अवलंब करण्यास येता, तेव्हा आपण आपली बाजू दु:ख म्हणून आमच्यासमोर मांडीत असता व आम्ही ते काहीतरी जन्मजन्मांचे ऋण म्हणून अभ्यासीत असतो. अशा वेळी आपण विचारलेल्या प्रश्नात आमचे निराकरण परस्परविरोधी वाटते. उदा. आपण जेव्हा असा प्रश्न विचारता की, ‘नोकरीत खूप त्रास होत आहे.’ तेंव्हा मार्गदर्शन प्रथम अनुष्ठानाचे झाले, तर त्यात कुलधर्म,कुलाचार यांचा संबंध दाखविला जातो. आपणास शंका अशी येते की, नोकरीचा प्रश्न विचारतो आहे व देवधर्म करण्यास सांगत आहेत. म्हणूनच वर नमूद केले आहे की, आपण दु:ख सांगता व आम्ही ऋणमुक्तता करतो. या प्रश्नासारखे आणखी प्रश्न म्हणजे ‘धंदा चालत नाही, पैसा टिकत नाही, घरातील आजारपण संपत नाही.’  इ. या सर्व प्रश्नांचे निराकरण हे ऋणमुक्ततेसाठी असते. याप्रमाणे तुम्ही ज्या ज्या दु:खाचे निवारण करून घेण्यासाठी येता, तेव्हा आमची भूमिका तुम्हाला ऋणमुक्त करण्याची असते की ज्यामुळे पुनःश्च तुमच्या जीवनात किंवा तुमच्या मुला-बाळांच्या जीवनात तशा प्रकारचे दु:ख निर्माण होत नाही. दैवी मार्ग हा चमत्कार करणारा मार्ग नाही. देवाला आपले अस्तित्व केव्हाही कोणाला चमत्काराने दाखविण्याचे कारण नाही. कारण त्याने निर्माण कलेल्या या निसर्गात पाणीसुध्दा हेच सांगते की, ज्याला तहान लागेल तो मला शोधील. मग देवाला आपले देवत्व, तेही तुम्हाला की जो क्षणिक सुखासाठी देवाला मानणारा आहे, त्याला ‘चमत्काराला मानून मला मान ‘ असे सांगून सिध्द करावयाचे नाही.  म्हणूनच तुम्हाला केलेल्या मार्गदर्शनाचे अवलंबन तुम्ही करता म्हणजे अनुष्ठानपध्दतीचा अवलंब करता व आठव्या दिवशी धंद्यात वाढ झाली नाही, नोकरीत बढती मिळाली नाही, आजारपण संपले नाही, इ. ची प्रचिती आली नाही म्हणून सांगता. परंतु आठव्या दिवशी प्रत्यक्ष प्रचिती येण्याइतकी भावनाच आपण निर्माण केलेली नसते. हे प्रसाद क्षणिक सुखाची पूर्तता करून पुन्हा ज्ञान-अज्ञानाने तशा सुखाच्या मागे पळण्यासाठी दिले जात नाहीत, तर जीवनाची निरंतर सुव्यवस्थितता निर्माण व्हावी, या हेतूने देण्यासाठी समिती मार्गदर्शन करीत असते. परंतु आपण आपल्या जीवनाची भूमिका निश्चित केली नसल्याने ‘एका क्षणिक सुखाचेच दु:ख मला आहे,व ते निवारण होण्यासाठी चार पैसे मिळाले तर बरे’ या भावनेने या प्रसादाकडे पाहता. पुष्कळ भक्तभाविकांची हीच दृष्टी असते की, ईश्वरीकृपेने पैसे मिळाल्यावर सुखाला काय कमी ? परंतु नेमका हाच कयास चुकीचा आहे म्हणून प्रसाद पूजन चालू असता व नंतर ‘सुख निर्माण झाले नाही’ असे व्यक्त करता. कारण जीवनाचे माध्यम आपण पैसा मानता.

ज्याला खरोखरीच जीवन पूर्णत्वाने सुखासमाधानात जावे, कुणाच्या पै-पैशाला कारण होऊ नये असे वाटते त्यांच्यासाठी या सर्व सिध्दसिध्दांत पध्दती आहेत. आपले डोके दुखण्यापासून ते वंश-निर्वंश, निर्धन होण्यापर्यंत जी दु:खे व यातना असतील, त्या निवारणार्थ क्रमशः प्रसाद घेण्याने वरील दु:ख कारण मीमांसेमधून आपण ऋणमुक्त होणार आहात. आज जरी तुमच्या जीवनात अन्य प्रसादांची दःखपरंपरा नसेल तरी भावी जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणाने ती आल्याशिवाय राहणार नाही. कारण हे जन्मऋणानुबंधनाचे संबंध देवादिकांच्या अवताराससुध्दा सुटलेले नाहीत. तेव्हा तुमच्या जीवनातील सुखाच्या दृष्टीने तुम्ही जे प्रश्न विचारता, ते सर्व प्रश्न या प्रसादपूजनामधून सुटणार आहेत. जी प्रसादांची क्रमवारी आहे ती मागे सांगितलेलीच आहे. तरीसुध्दा पुन्हा आपल्या वाचनासाठी लिहिणे योग्य ठरेल. प्रथमतः आपणास देवऋणातून मुक्त केले जाईल, मग पितृऋणातून मुक्त केले जाईल व शेवटी वैयक्तिक कर्मविपाकात तुमच्याच हातून जन्मजन्मात ज्ञान-अज्ञानाने झालेली पापे व आजच्या दैनंदिन जीवनात ज्ञान-अज्ञानाने हातून घडणारे प्रमाद व पातके यांचे प्रायःश्चित्तपूर्वक निराकरण केले जाईल.

आजपर्यंत जगांत बहुतेक शास्त्रांची कारणमीमांसा ही अभ्यासिण्यासाठी पुस्तकरूपाने अस्तित्वामध्ये आहे. उदा. एखादी मोटार नादुरूस्त झाली तर तिचे कारण समजते व ती दुरुस्ती करताच पुनःश्च गाडी पूर्ववत सुरु होते. आता गाडी बिघडली असता नेमके त्याचे संशोधन होणे, हेच शास्त्र आहे. नुसती गाडी बिघडली आहे म्हणून पूर्णपणे खोलून दुरुस्ती करणे याला शास्त्र म्हणता येत नाही. तद्वतच मनुष्याच्या जीवनात ज्या कार्य-कारणाने जी दु:खे झाली आहेत, त्यांचे अचूक कारण समजणे यालाच दैवी शास्त्र असे म्हणतात. या शास्त्राधाराने तुमच्यासमोर दु:ख-कारणमीमांसेला कोण कारण आहे, हे कोणाही सिध्दसाधकाला किंवा समितीला विचारण्याचे कारण नाही. तुमच्या गेल्या सात पिढ्यांपासून ते आज तुम्ही प्रश्न विचारण्यास पुढे बसता तेथपर्यत दु:ख निर्माण होण्यास काय कारणे झाली, हे आमच्यापेक्षा तुम्ही जास्त जाणता. काही भक्त-भाविक या मीमांसा ‘आम्हांला ठाऊक नाहीत’ असे समजाविण्याचा प्रयत्न करतात. तसे करण्याने तुम्ही जी आपल्या घराण्याची परंपरा देवादिकांची, परोप्रकाराची, लोककल्याणाची दर्शविता, तर मग दु:खाला कारण का झालात ? व वडिलोपार्जित जहागिरी, इनामदारी, सावकारी किंवा अन्य धंदा व्यवसाय होता असे म्हणता, तर त्यांनी जे तुमच्यासाठी आज जे स्थावर ठेवले आहे किंवा ते ठेऊनसुद्धा गेले आहेत, जे जाण्यास देव, धर्म, परोपकार किंवा लोककल्याण कारण होईल काय ? कदापिही होणार नाही. तेव्हा वरील निराकारणपध्दती याच हेतूने आपल्यासमोर ठेवल्या गेल्या आहेत की, दु:खाला कोण व काय कारण असू शकते, हे आपणास पुर्ण ज्ञानाने समजावे व भावी जीवनात तुमच्या मुलांबाळांच्या सुखासमाधानासाठी पै-पैशांपासुन ते लंकेचे राज्य जरी देव किंवा अन्य जगत देण्यास आले, तरी जोपर्यंत तुमच्या कष्टाचा वाटा तो नाही, तोपर्यंत त्याची इच्छा, अपेक्षा भावी जीवनाच्या दृष्टीने करु नका, हाच या कार्यपध्दतीतील गुरुप्रसाद आहे. कदाचित् काही भक्त-भाविक अशी शंका निर्माण करतील की, आम्हाला अचानक धनलाभ, गुप्त धन, वारसा हे मिळण्याचे आमच्या नशिबात असते, ‘याला कारण काय? ’ तर त्याला दाखला असा की, अचानक, वेळी-अवेळी जर पीकपाण्यावर पाऊस पडला तर हाती आलेले पीकपाणी नाश होण्यास जसा हा अचानक पाऊस कारण होतो, तद्वतच ही अचानक धनप्राप्ती कुटुंबाच्या सुखासमाधानाला सर्वस्वी नाश करण्यास कारण होते. त्या वेळी तुमच्या संकुचित विचाराने तुमचे जीवन सुखप्राप्तीच्या वासनेने सर्वस्व धनप्राप्तीच असे ठरविते. त्याच क्षणी तुम्ही अज्ञानाने दु:खाला आवाहन केलेले असते. परमेश्वराने मानवी जीवनाचे गणित इतक्या सिध्दसिध्दांत पध्दतीने सोडविले आहे की, ‘ त्याला मला पैसा पुरत नाही’ किंवा ‘माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मला कठीण आहे’ हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे. कारण तुम्ही जन्माला येण्यापुर्वी जीवनाची निश्चितता अशा तऱ्हेने केलेली आहे की, जर एखादा चतुष्पाद प्राणी पाळणार असाल, तर त्याच्या खाण्यापिण्यापासून तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तिच्या अन्नवस्त्राची व कुटुंबाचे हितसंबंध देवादिकांपासून ते आप्तस्वकीयापर्यंत ज्या ज्या कारणाने तुमच्या जीवनाशी संबंधित होणार असतील, त्यांचा वाटा तुमच्या नशिबात लिहून केलेली आहे. याचा विचार कधीही न करता दुसऱ्यांच्या जीवनाची बरोबरी करण्यासाठी आज जगात अनेक कुटुंबे उसनी श्रीमंती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्याक्षणी मनुष्य स्वत:च्या आचार-विचारांनी आपले जीवन आर्दश बनवील, त्याक्षणी त्याला सुखाच्या शोधाप्रित्यर्थ कोणाचेही पाय धरावे लागणार नाहीत. म्हणजे आज आपण दु:ख सांगुन सुख शोधण्यासाठी आला आहात, पुढे आपण दु:ख सांगुन ऋण काय बाकी आहे, हे विचाराल. आणि हे विचारण्यानेच आजच्या परिस्थितीत मानवी जीवनाला जी जी दु:खे म्हणुन वाटत आहेत, ती दूर होण्यासाठी अन्य वेड्यावाकड्या मार्गाचा अवलंब करावा लागणार नाही.

समितीच्या कार्यपध्दतीचे लोककल्याणार्थ जे काही उद्देश आहेत, त्यात ‘अंधश्रध्देने कोणाला नमस्कार सुध्दा करू नये’ असा एक आहे. म्हणून ही कार्यपध्दती तुमच्यासमोर ठेवली आहे. क्षणिक सुखाच्या मार्गदर्शनार्थ आला असाल तर ते केले जाईल व निरंतर सुख प्राप्ती पाहिजे असेल तर त्याबद्दलही सांगितले जाईल. कार्यपध्दतीच्या मार्गदर्शनाचे निराकरण कोणताही आडपडदा न ठेवता आपल्यासमोर ठेवले आहे. हे निराकरण तुम्ही कोणत्याही केंद्रावर गेलात तर प्रमुख कार्यकर्त्यापासून ते नियुक्त सेवकापर्यत याच पध्दतीने होईल. समितीने प्रथमतःच सांगितल्याप्रमाणे समिती तुमच्यापेक्षा तुमच्या सुखाचा विचार अधिक करते, हे स्पष्ट आहे. आज समितीने आपली भूमिका स्पष्टपणे तुमच्या सुखदु:खाप्रीत्यर्थ ठेवली आहे. हे जनहिताच्या दृष्टीने परमेश्वरी आज्ञेचे प्रतिक आहे. आता आपण आपल्या जीवनासंबंधी ज्या सुखदु:खाच्या कल्पना निर्माण केल्या आहेत, त्यांचा कयास लागण्याची वेळ आली आहे. कारण,आजपर्यंत आलेल्या कित्येक भक्तभाविकांनी समितीच्या लोककल्याणाची भूमिका बाजूस ठेवून अन्य प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे. ती भूमिका समितीची होती किंवा नव्हती हे आपण या साधनपत्रिकेवरून ठरवू शकता.

या समितीच्या निराकरणपध्दतीत वैयक्तिक प्रश्न विचारण्यासाठी खाजगीरित्या कोणासही भेटण्याची परवानगी नाही. याबद्दल बऱ्याच भक्तभाविकांची नापसंती आहे. परंतु तसे न भेटून देण्यामागील उद्देश आतापर्यंत कोणालाच समजले नसावेत असे वाटते. मानवी जीवनाच्या दु:ख-कारणमीमांसा अभ्यासण्याचे हे एक उत्तम साधन आहे. कारण बाहेर मनुष्य आपल्या परिस्थितीबद्दल कितीही मोठेपणा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असला, तरी येथे सत्य परिस्थिती कथन करावी लागते, त्यामुळे अभ्यासूस आजचे जग किती प्रकारांनी दु:खी आहे, हे अभ्यासण्यास मिळते. परंतु जेव्हा निराकरण पध्दतीसाठी सामुदायिकरित्या मार्गदर्शन होते, तेव्हा आपल्यालाही जीवनातील काही कारणपरंपरा असल्या किंवा नसल्या, तरी त्या समजू शकतात. परंतु हा अभ्यास आजपर्यंत येथे आलेल्या कोणाही भक्तभाविकाने केलेला नाही, त्याशिवाय दुसरा महत्वाचा भाग असा की, कदाचित एखादेवेळी भक्तमंडळींची सत्प्रवृत्ती बाह्य जगताच्या विचारामुळे बदलण्यास कारण झाली व त्यांनी अमुक एक निराकरण मला सांगितले होते असे खोटे सांगून चालणार नाही. कारण वैयक्तिकरीत्या जर भेटच होत नाही, तर बाह्य जगताला कथन केलेले सांगितले असेल किंवा नसेल ही जबाबदारी समिती राखून ठेवते.

आजपर्यतं या समितीच्या कार्यपद्धतीसाठी कोणीही देणगी दिलेली नाही किंवा मार्गदर्शनाचे मूल्यही ठरलेले नाही व आजपर्यंत तसे कोणासही मागितले नाही, हे अभिमानाने सांगावे लागेल. निराकरण पध्दतीनंतर त्याला सुखसमाधान लाभल्यावर त्याची इच्छा असल्यास त्याने स्वेच्छेने कार्याची भूमिका लक्षात घेऊन पै-पैसा परमपूज्य बाबांच्या चरणी ठेवावा. तोही कोणाच्या विनंतीला मानून किंवा भिडेखातर ठेवू नये. आपल्या सद्सद्विवेक बुध्दिला जर ही समितीच्या लोककल्याणाची भूमिका समजली असेल, तर त्याबद्दल उतराई व्हावे. नाहीतर आपण कोणत्याही आपल्या विचाराने समितीला बाजारी स्वरूपाची देवाण-घेवाण करण्याचे माध्यम बनवू शकत नाही. प्रथमदर्शनी आपण आपले नाव मार्गदर्शनार्थ नोंदविता, तेव्हा कामाच्या दिवशी या सदगुरुपीठाचा मान म्हणून प्रत्येकी पाच रूपये चार आणे दक्षिणा म्हणून घेतले जातात. वास्तविक आपला व समितीचा आर्थिक दृष्ट्या काहीही संबंध येत नाही. हे या कार्यपध्दतीचे वैशिष्ट्य आहे.

<< अध्याय २ कार्यपध्दतीस शास्त्राधार.

>>अध्याय ४ वैयक्तिक व सामुदायिक साधना.