अध्याय ४ वैयक्तिक व सामुदायिक उपासना.

खऱ्याअर्थाने आज मनुष्य सुखी कोणत्या प्रकाराने होईल ते अनुभवण्यासाठी दैवी मार्गाकडे येतो, किंवा पारमार्थिक साधनेच्या वैयक्तिक उपासनेच्या गप्पा सिध्दसाधकापाशी मारतो व सिध्द मार्गातील मनुष्य घरेदारे बांधून कसे रहाता येईल, याचा विचार करतो, कारण दु:खी झालेला सुखासाठी साधकाला भेटतो व साधक घरे दारे करण्यासाठी देवाला मध्ये करून दु:खी माणसाला भेटतो आहे. आता खऱ्या परमार्थाची तळमळ दोघांपैकी कोणाला आहे ? आजच्या जगात तरी दोघांनाही नाही. मग जो मार्ग आज हजारो वर्ष तुमच्या ज्ञानाचा ठेवा म्हणून मानवी जीवनाला सुख, शांती, समाधानासाठी मार्गदर्शनीय ठरला आहे, त्या मार्गाची विटंबना ध्यान, धारणा, समाधी या नावाने किंवा एखादे पुस्तक लिहून करावी का ? आज जर देव प्रसन्न होऊन आपल्या पुढे आले व दोघांनाही वैकुंठाला नेण्यास तयार झाले, तर कोणी जाण्यास तयार होईल का ? कोणीही नाही. कारण सगळा आपल्या इच्छावासनेचा पसारा, सुखाचा खेळ म्हणून मांडला आहे. त्यातून जोपर्यंत कर्तव्याची जबाबदारी पार पाडून तुम्ही निरासक्त होणार नाहीत, तोपर्यंत देव जेथे आहे व वैकुंठ किंवा मोक्ष जेथे आहे, ते तेथेच राहू द्या. तोपर्यंत आपण नित्य अविचाराने घडणाऱ्या प्रत्येक वासनामय सुखाच्या कल्पना म्हणजे जीवनाचे सार्थक नव्हे. याचा नुसता विचार न करता ते प्रत्यक्ष आचरणात आणा. ते आणण्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये निश्चित अशी वैयक्तिक व सामुदायिक उपासना करावयास पाहिजे. आजपर्यंत या उपासनेची कसरत प्रत्येकाने आपल्या जीवनात खूप प्रकारांनी केलेली असेल. परंतु ती भावनाशून्य उपासना ही उपासना नसून देवाची उपासमार होते असे दु:खाने सांगावे लागते. अशी भक्तभाविक मंडळी उपासनेसंबंधी खूप विवेचन करतात.  ते असे की, प्रथमतः सोमवारपासून ते रविवारपर्यंत यांच्या उपासनेचे व उपवासाचे हे वार असतात. सोमवारी शिवलीलामृतापासून उपासनेला सुरुवात होते, त्याची समाप्ती रविवारी सूर्यकवचाने होते. शिवाय स्नानाच्यावेळी गंगास्तोत्र, स्वयंपाकाच्च्या वेळी व्यंकटेशस्तोत्र, त्यात एखादा मुलाबाळांना अपशब्द असे अर्धवट पठण, सायंकाळी मुलाबाळांच्या जेवणखाण्याच्या, झोपी जाण्याच्यावेळी ‘शुभंकरोती कल्याणम्’ हे स्तोत्र असा क्रम बहुतांशी प्रत्येकाच्या जीवनमध्ये आहे. त्याशिवाय दु:ख निवारणार्थ जे कोणी दैवी निराकरण सांगतील व त्यात गुरुचरित्र, सप्तशती, देवीमहात्म्य, नवकथासार यांची पारायणे करण्यास सांगतील तर त्या पोथ्या पूर्वी कोणीतरी वाचलेल्या किंवा जुन्या होऊन फाटलेल्या अशा आणून पारायणास सुरुवात करतात. परंतु ईश्वरी कृपेच्या प्राप्तीचे एकही लक्षण वरील उपासना पध्दतीत असेल असे वाटत नाही. त्याशिवाय सर्वात मोठा जीवनावर बसलेला पगडा हा की, ईश्वरी उपासना दिवसाच व्हावयास पाहिजे. पण आजच्या धामधुमीच्या जगात मनुष्यास सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चरितार्थासाठी घराबाहेर पडावे लागते. मग सूर्यास्तानंतर घरी आल्यावर जरी इच्छा असेल, वेळ असेल तरी वरील पगडा डोक्यावर असल्याने उपासना करण्याची राहून जाते. पण खऱ्या अर्थाने सूर्यास्त होतो का ? तो तुमच्या देवपूजनाच्यावेळी जरी नसला तरी तो या जगापलीकडे गेला आहे, अशातील भाग नाही. देवपूजा ही सूर्य असेपर्यंतच झाली पाहिजे, असे जर असेल तर मनुष्याचा जन्म, मृत्यू रात्री का होतात ? अशा अनेक प्रकारांनी खऱ्या सात्विक प्रकारची उपासना आज कोणीही करू शकत नाही. यासाठी समितीने येथे येणाऱ्या भक्तभाविकांस जी उपासना सांगितली आहे, तिचे थोडे मनन करा.

प्रथमतः उपासकास पोथी, पाठ, पारायणे किंवा जपजाप्य हे करण्यास सूचित केले जात नाही. तर सकाळ-सायंकाळ नित्य-नियमाने होणाऱ्या आरतीस उपस्थित राहून आरतीच्या सुरुवातीपासून ते संपेपर्यंत तुम्ही मनाने जास्तीत जास्त किती वेळ स्वतः आरती म्हणत असता किंवा राहू शकता ? कारण नुसत्या देहाने चोवीस तास जरी देवासमोर बसलात तरी त्याचा काही उपयोग नाही. जशी आपल्याला तहान लागते व ती पाण्याने शमन होते म्हणून पाण्यात बसून ती तहान भागणार नाही, तर तहान लागल्यावर पाणी पिण्यानेच ती तहान भागते याचा अर्थ तहानेला जसा चार घोट पाणी प्यायल्या नंतर त्याला तृप्ती वाटते, तद्वतच दिवसाकाठी पाच मिनिटे जरी तुम्ही उपासना केली, तरी ती करण्याची तहान लागली पाहिजे. नाहीतर नुसते देवासमोर बसण्यात आयुष्यातील वेळ फुकट जावून कोणाच्याही उपयोगी येणार नाही. या नंतरचे दुसरे मार्गदर्शन असे की, रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही आरतीला याल, तेव्हा बाबांसमोर बसून कोणताही विचार मनामध्ये न आणता जास्तीत जास्त किती वेळ बाबांच्याबद्दल पूज्य भावना निर्माण करू शकता ? ही भावना निर्माण करीत असता प्रापंचिक जीवनातील दु:खाबद्दलचा कोणताही विचार पुढे करून ‘बाबा, एवढे काम जरा लवकर होऊ द्दा’ असे जरी मनात आले तरी ती उपासना नसून ती याचना आहे. बहुतांशी दिवसाकाठी अशीच उपासना तुम्ही करण्यासाठी तुमच्या देवासमोर बसतां व निराकरणाच्या वेळी छातीठोकपणे असा विश्वास प्रकट करता की आमच्या कुटुंबात तिन्ही त्रिकाळ उपासना सुरु असते, याचा अर्थ तुम्ही काय सांगावा व आम्ही काय घ्यावा ?

या दोन उपासना पध्दतीनंतर स्तोत्रपठण किंवा पारायण याबद्दल असे मार्गदर्शन केले जाते की, नुसती पोथी हातात, शब्द तोंडात व देह पाटावर, परंतु तुमचे मन व भावना अन्यत्र ! जर अशा पारायणांच्या संख्येने जन्मऋणानुबंधनातील दु:ख निवारण करण्यासाठी तुम्ही कोणाला आवाहन करता ? देह हा प्रारब्धाने निर्बल झालेला आहे, विचार दु:खाने निर्बल झाले आहेत, भावना लवकर काम होत नाही म्हणून निर्बल झाल्या आहेत. आता राहून राहिला देव व त्याचे स्तोत्र ! तर यांची सिध्दता होण्यासाठी या तिन्हींचे म्हणजे विचार, भावना व शरीराचे निश्चित ध्येय परमेश्वर प्राप्तीसाठी व्हावयास पाहिजे. जी स्तोत्रे, पाठ, पोथी आपण वाचतो, त्यामध्ये तुमच्या सारख्याच एखाद्या भक्तावर आलेली आपत्ती परमेश्वराने कशी निवारण केली किंवा परमेश्वराची स्तुती किंवा गुरुचरित्रासारख्या पोथीतून वाचकाला उपदेश केलेला असतो. अशा वाचनाच्या वेळी आपण स्वतः त्या भूमिकेच्या ठिकाणी आहोत, ही भावना निर्माण करून वाचण्यानेच काही समाधान प्राप्त होईल. नाहीतर देवाधर्माच्या नावावर निर्माण झालेला कर्मठपणा, तापटपणा ही लक्षणे ईश्वरी उपासकाची असू शकत नाहीत. शिवाय वर सांगितल्याप्रमाणे स्तोत्र किंवा पोथी वाचीत असता पोथीच्या आरंभापासून समाप्तीपर्यंत तुम्ही किती वेळ पोथी वाचनात व मनाने बाहेर होता हा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. कारण रोजच्या रोज काहीतरी नवीन वाचून की, ज्यामध्ये आपण नसतो याने ईश्वरी उपासनेचे समाधान मिळत नसते. यासाठी .येथील भक्तभाविकास अशी आज्ञा अशी असते की, तुम्ही नित्यनियमाने एक स्तोत्र किंवा एखाद्या पोथीचा एक अध्याय वाचा. व रोज वरीलप्रमाणे आपण आपल्या मनाची व भावनेची ईश्वराच्या ठिकाणी कितीवेळ निश्चिपणे निष्ठा ठेवू शकलो हे अभ्यासा. ईश्वरी उपासना ही नित्याची होणे आवश्यक आहे. मग ती आपण पंधरा मिनिटे ठरवा किंवा काही तास ठरवा. पण तसे होत नाही. बहुतांशी चालढकल करून ‘कालची आज करू या ’ अशी बेरीज वजाबाकी प्रत्येकजण करतो. उपासनेला नित्य धर्म आहे. जसे तुम्हाला झोप आली तर आजची उद्यावर ढकलून चालत नाही, भूक लागली तरी ती पुढे ढकलून चालत नाही, तहान लागली तरी ती पुढे ढकलून चालत नाही. या शरीर धर्माशिवाय नित्य व्यावहारीक जीवनात कर्तव्य म्हणून जी तुम्ही दुसऱ्याची नोकरी करता, धंदा करता, शिकता किंवा अन्य व्यवसाय करता, यात चालढकल केली तर चालते का ? ती तुम्ही करीत नाही, कारण झोपेची चालढकल केली तर शरीरप्रकृती बिघडते. खाण्यपिण्याची चालढकल केली तर शरीर निर्बल बनते. नोकरी-धंद्यात चालढकल केली तर आर्थिक प्राप्ती बुडते. विद्यार्जनात चालढकल केली तर ज्ञानप्राप्ती होत नाही. हे सर्व स्वार्थी विचार समजतात म्हणून ते करण्यासाठी मनुष्य सकाळपासून सायंकाळपर्यंत आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करीत असतो. पण या आवश्यकता जशा जीवनात आहेत असे वाटते, तशी ईश्वरी नित्य उपासना आवश्यक आहे हे का वाटू नये ? वास्तविक, वरील सर्व आवश्यकता आहेत असे तुम्हाला वाटते, तर त्या आवश्यकतांचे समाधान त्या त्या आवश्यकतामधून मिळण्यासारखे नाही. यासाठी या सर्व आवश्यकता व त्यापासून समाधान होण्यासाठी नित्य उपासनेस तितकेच महत्त्व द्यावयास पाहिजे. जर आपण भूक पुढे ढकलली, तहान पुढे ढकलली, झोप पुढे ढकलली व एकदम जेवण्याचा, झोपण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ? तशी स्थिती उपासनेची असते. या करीता नित्य उपासनेची सवय लावून घ्यावयास पाहिजे.

या उपासनापध्दतीने चित्ताची शुद्धता होऊन, परमेश्वराबद्दल पूज्य भावना निर्माण होऊ लागते. यालाच ‘श्रध्दा’ असे म्हणतात. एरवी आपण श्रध्दा हा शब्द क्षणोक्षणी वापरतो. पण खऱ्या अर्थाने ती श्रध्दाच असू शकत नाही. नित्य जीवनात श्रध्देशिवाय कोणतेही कर्म होऊ शकत नाही. मग परमेश्वराबद्दल श्रध्दा हे यात विशेष असे काय अनुभवास येते ? तर परमेश्वरी श्रध्देची पूर्णावस्था ही नित्य जीवनातील निरासक्तता होय. ही ज्या कमीजास्त प्रमाणामध्ये असेल तितका परमेश्वर आपल्यापासून दूर आहे. त्याशिवाय जी परमार्थ प्रश्नावली नित्य जीवनात ज्ञान-अज्ञानाने घडणाऱ्या कर्माचा आढावा झोपण्यापूर्वी प्रामाणिकपणे प्रत्येकाने स्वतःशी घ्यावा म्हणून दिली आहे. तिचा अभ्यास रोज करण्याने आपल्यात काय सुधारणा होऊ शकली हे पहावे. आजपर्यंत देवदैवीक व पारमार्थिक उन्नतीसाठी अनेक तऱ्हेच्या साधना व पर्याय सांगितले आहेत. परंतु आजच्या परिस्थितीत त्यापैकी जास्तीत जास्त लोकांना काय करता येण्यासारखे आहे, हा प्रश्न विचारात घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने वरील उपासना सर्वसामान्यपणे प्रत्येक मनुष्यास आपली नोकरी, धंदा, व्यवसाय सांभाळून करता यावी म्हणून सुचविली आहे. आज तुम्हां कोणास अशी इच्छा होते की, काही असाध्य मार्गाची साधना केली तर परमेश्वर प्राप्ती होईल, तर हे निदान साधना-उपासनेच्या दृष्टीने चुकीचे ठरेल. जसे एकदम जर पदवी परीक्षेला बसलो, तर काय प्रचिती येईल ? तीच प्रचीति अशा असाध्य साधनेत येत असते.

आजच्या परिस्थितीत उपासना ही आपल्या नित्य आचारविचारांस पोषक असणे आवश्यक आहे. आपल्या नित्याचरणाने कुटुंबात किंवा अन्यत्र ती इतराना त्रासदायक होण्याने त्यास उपासना म्हणता येणार नाही. म्हणजे नुसते देवाला घेऊन न बसता घरातील सर्व कुटुंबियांच्या भावनेचा विचार लक्षात घ्यावयास पाहिजे. यासाठी येथील भक्त-भाविकांना नित्य उपासनेसाठी त्यांच्या भक्तिभावनेने प्रमाणे एखादे स्तोत्र व सद्गुरुनामस्मरणाची जपसंख्या अकराशे करण्याची आज्ञा असते. यापेक्षा जास्त अवडंबर कोणी वाढविले व तसे मार्गदर्शन समितीने केले, असे होऊ नये म्हणून स्पष्टपणे उपासनेच्या आज्ञेसंबंधी विचार प्रकट केले आहेत.

याशिवाय आणखी एक महत्वाची सूचना वारंवार येथे आलेल्या भक्तभाविकांना दिली गेली. परंतु पूर्णपणे त्याचा भावार्थ कोणी आत्मसात केला असेल असे दिसत नाही. कारण बऱ्याच भक्तभाविकांची अंधश्रध्दा अशी आहे की, घरात बरेच देव असले म्हणजे दैवी महात्म्य मोठे असते. म्हणून अज्ञानाने बरेच देव जमा करण्याचा प्रयत्न करतात व अशा काही ना काही निमित्ताने देव वाढत गेले की, स्वतःलाही पूजन-अर्चन करणे अशक्य होते व काही कारणाने मुलाबाळांना पूजा करण्याची वेळ आली तर त्यांना त्याबद्दल प्रेम न वाटता, तुमची आज्ञा म्हणून पूजा करावी लागते. यासाठी तुमचे कुलस्वामी व स्वामिनी यांचे टाक किंवा प्रतिमा, तेही मिळणे शक्य नसल्यास पादुका या असाव्यात. हे देव कुलधर्म-कुलाचाराचे असतात व नसले तर ते असणे आवश्यक आहे. याशिवाय एखादी उपास्य देवतेची तसबीर असावी. इतका आटोपशीर देव्हारा हा दैनंदिन उपासनेला केव्हाही कंटाळवाणा होणार नाही. आजपर्यंत भक्त-भाविक मंडळी कुलदेवतासंबंधी असे विधान करतात की, ‘आमचे कुलदैवत दत्त, मारूती, राम, विठोबा, श्रीकृष्ण, गणपती यापैकी आहे’. परंतु ही कुलदैवते नसून उपास्य देव आहेत. तुमच्या वाडवडिलांनी काही कारणासाठी उपासना केली व कालांतराने तुम्ही त्यांनाच कुलदैवते म्हणू लागलात. तरी ही कुलदैवते नाहीत हे लक्षात घ्या.

यानंतरचा पुढील मुद्दा असा की जी मंडळी तीर्थयात्रेसाठी किंवा अन्यत्र देव दर्शनासाठी जातात, तेथे प्रसाद म्हणून त्या देवतांचे फोटो, तसबीरी किंवा प्रतिमा या आणून आपल्या इष्टमंडळीस वाटतात. त्या मागील भावना ही जरी चांगली असली तरी, आजच्या परिस्थितीत एखादा जास्त देव पूजनासाठी वाढल्याने बरीच संकुचित परिस्थिती निर्माण होते. मनुष्य भिडेखातर तुम्ही आणलेल्या देवदेवतांचा स्वीकार करतो. परंतु तुमच्या पश्चात रोज बरेवाईट शब्द त्या तुम्ही दिलेल्या देवाला ऐकावे लागतात. तरी सूज्ञ भक्त मंडळीनी असा देव देण्याचा परोपकार न दाखविता तीर्थयात्रा किंवा देवदेवतांच्या दर्शनाचा प्रसाद म्हणून श्रीफळ, खडीसाखर किंवा अन्य कांहीतरी द्यावे.

आजपर्यंत मार्गदर्शनार्थ येणाऱ्या भक्तभाविक मंडळीच्या अडीअडचणी लक्षात घेऊन समितीने सर्व कार्यकेंद्रावर सामुदायिक उपासनेसाठी दैनदिन क्रम चालू ठेवला आहे. तो या हेतूने की, आजकालच्या परिस्थितीत जागेची टंचाई बऱ्याच प्रमाणात जाणवते. याशिवाय घरात मुलाबाळांची ये-जा अशा परिस्थितीत थोडा वेळ ईश्वर चिंतन करावे तर ते करणास शांतता असावयास पाहिजे, पण ती मिळत नाही म्हणून या केंद्रावर दैनंदिन उपासनेसाठी कोणाही भक्तभाविकास तशी उपासना करण्यास कोणतीही आडकाठी नाही. तरीसुध्दा आडकाठी आहे ती निश्चयाची. प्रत्येकाला आपल्याला दु:ख नसावे असे वाटते. पण तत्प्रीत्यर्थ नित्य उपासना असावी असे कोणालाही वाटत नाही. आज काही निराकरण पध्दतीने जरी आपण सुखी झालात, तरी पुनश्चः आपल्याला दु:खे निर्माण होणार नाहीत असे नाही व प्रत्येक वेळी नुसत्या दु:ख निवारणार्थ तरी प्रश्न किती वेळा विचारणार ? यापेक्षा समितीच्या सामुदायिक उपासनेत भाग घेतलात, तर त्यापेक्षा काही जास्त आजच्या प्राप्त झालेल्या सुखासमाधानासाठी कशाचीही आवश्यकता नाही. परंतु प्रत्येक जण असा विचार प्रकट करतो की, देवाने आम्हाला आधी सुखी करावे, मग आम्ही त्याचे नांव घेऊ. तुम्ही नाव घेण्यासाठी देव आपले कर्तव्य करण्यास थांबत नाही. तो अज्ञानी भक्तांची अडचण लक्षात घेतोच. पण याच व्यावहारीक तत्वाने तुम्ही जर आपले व्यवहार बाहेर करू म्हणालात तर काय प्राप्त होईल ? उदा.तुम्ही नोकरी करता. त्याचे मूल्य महिन्याला मिळते. नोकरी पंचवीस किंवा तीस वर्षे करावी लागणार. या हिशेबाने नोकरी लागल्या दिवशीच जर तुम्ही असे म्हणाल की, ‘मी नोकरी पंचवीस वर्षे करणार आहे. पंचवीस वर्षाचा पगार आधी द्या’ तर असा पगार आजपर्यंत कोणी कोणाला दिला आहे का ? आणि असा मागितला तर उत्तर ‘घरी बसा’ असे मिळेल. इतके व्यावहारीक गणित रोज तुमच्या जीवनात असून परमेश्वरी उपासनेच्या बाबतीत हेवादावा का करता ? आज बहुसंख्य भक्तभाविकांची कल्पना अशी असते की, आपण कोणा सिध्दसाधकाकडे गेलो, तर दु:ख निवारणार्थ आपल्याला कांही दैवी उपासना करण्याची आवश्यकता नाही. अन्यत्र हे विचार जरी प्रकट होत असले, तरी समितीच्या कार्यपध्दतीत या विचारास स्थान नाही. तुमच्या ज्ञान-अज्ञानाने निर्माण झालेली दु:खे यांची कारणमीमांसा सांगणे व त्याबद्दल प्रसाद म्हणून देणे हे समितीचे कर्तव्य आहे. इच्छित सुखाची प्राप्ती होणे हे तुमच्या उपासनेवर अवलंबून आहे. ती न करता ’मला कांही अजून गुण आला नाही’ म्हणजे जे गहू शेतात पेरावयाचे होते, ते मुठीत धरून बसला व पाऊस पाणी पडून शेतात कांही उगवले नाही, म्हणून रडला, तर दोष गव्हात, पाऊस-पाण्यात, का अज्ञानाने मुठीत धरून ठेवण्यात ? याचे उत्तर तुम्हीच देऊ शकाल. तद्वतच तुम्ही येथून घेतलेल्या प्रसादाबाबत करीत असता. तरी सर्व भक्तभाविकांना विनंती अशी आहे की, तुमच्या हिताच्या दृष्टीने निराकरण कोणत्याही अवाढव्य खर्चाची नाहीत. उपासना कोणत्याही आडमार्गाची नाही. नित्य आचार-विचारांवर सक्ती नाही. उपासना करण्यास जागेची अडचण नाही. आलात तरी अडवणूक नाही. असे असता तुम्ही जर आपली नित्य कर्तव्य पार पाडू शकत नसाल, तर समितीच्या निराकरण पध्दतीचा अवलंब करून काहीही प्राप्त होणार नाही.

आजपर्यंत आपण शेकडो ठिकाणी अडीअडचणीच्या निवारणार्थ, ज्योतिष विचारण्याच्या निमित्ताने किंवा अन्य सुखाचा मार्ग शोघण्यासाठी गेला असाल, तर त्या साधकाच्या कार्यपध्दतीची ओळख तो विचारलेल्या प्रश्नांव्यतिरीक्त आपणहून देणार नाही. शिवाय नित्य त्याची उपासना काय आहे हेही तुम्हाला कळून देणार नाही. मग तुमच्या दुःखनिवारणार्थ त्याने कोणत्या दैवी मार्गाचा अवलंब केला हे हि तुम्हाला समजणार नाही. अशा अज्ञानाने तुम्हाला समिती केव्हाही मार्गदर्शन करणार नाही. समितीच्या कार्यपध्दतीत ज्यांचे कृपाशिर्वाद लाभले आहेत, त्यांची अधिष्ठाने तुमच्यासमोर आहेत. त्यांची पूजा-अर्चा येथील सेवंकांसह तुम्ही करता. कार्यपध्दत ही सामुदायिकरित्या तुमच्यासमोरच केली जाते. त्या प्रीत्यर्थ दिला जाणारा प्रसाद हाही तुम्ही आणून दिलेला असतो. इतकी स्पष्ट आणि स्वच्छ, बुध्दिला पटणारी कार्य-पध्दती आपल्यासमोर मांडल्यानंतर जर आपल्या मनात समितीच्या कार्यपध्दतीबद्दल आपलेपणा निर्माण झाला नाही, तर आपण आपले दु:ख खऱ्या मार्गाने दूर करण्यासाठी आला नाही, हे समजणे अशक्य नाही. तर इतरत्र जसे चार दिवस ‘हे कसे काय चालते’ हे पाहण्यासाठी जाता, तसेच येथे येता. हा अनुभव आजपर्यत काही नवा नाही. परंतु आज साधन-पत्रिका लिहीण्याची आज्ञा झाली असल्याने आपल्या बऱ्याचशा शंका आज निरसन होऊ शकतील. पुष्कळशी भक्तभाविक मंडळी आपापल्या आचार-विचारांच्या बऱ्यावाईट अनुभवांनी या कार्याकडे आस्थेने पहात नाहीत. परंतु समितीचे कार्य हे कार्य कोणाही एका व्यक्तीच्या हितसंबंधाचे नाही. तुम्हास जसे कोणाचे आचार-विचार पटले नाहीत तसे तुमचेही कोणाला पटण्यासारखे नसतील, हा सूज्ञ विचार जर भक्तभाविक निर्माण करतील तर नित्य उपासनेत आडकाठी येण्याचे कारण म्हणजे स्वतः आपणच आहोत हे समजेल. असा विचार निश्चयाने दूर करणे, पुनःश्च जीवनात त्याला स्थान न देणे याचा अर्थ वैयक्तिक उपासना !

सामुदायिक उपासना – या उपासनेची पध्दत पूर्ण अभ्यासाने सर्व कार्यकेंद्रांवर भक्त-भाविकांच्या अडचणी लक्षात घेऊन सुरु केलेली आहे. परंतु येणारे भक्तभाविक आपल्या दु:खाचे कथन जितक्या आत्मियतेने करतात, त्याच्या निवारणार्थ जी वैयक्तिक किंवा सामुदायिक उपासना करावयास पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. नित्य उपासनेच्या आवश्यकतेसंबंधी मागे विवेचन केलेलेच आहे. तरीसुध्दा आपण आपली दु:खे जास्तीत जास्त लवकर दूर करून घेण्यास कारण व्हावयास पाहिजे. ही जबाबदारी न ओळखता ‘अजून काही म्हणावे तसे समाधान मिळत नाही ‘असा विचार प्रकट होत असतो. काही भक्त-भाविकांच्या कल्पना अशा आहेत की, फक्त गुरूवारी आरतीला आलो की झाले. बाकीच्या वेळी आलो नाही तरी चालते. हे येणाऱ्या भक्तभाविकांच्या विचारांनी योग्य आहे. परंतु समितीच्या कार्यपध्दतीत जी नित्य उपासनेसंबंधी आवश्यक अशी बाजू मांडली आहे, ती कोणीही विचारात घेत नाही. प्रथमतःच सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या कोणाही भक्तभाविकांस दोन्ही प्रकारच्या उपासनेत भाग घेता येतो. पहिल्या उपासनेत तुम्ही सकाळ-दुपार आपल्या सवडीनी येऊन नामस्मरण, पोथी, पाठ यांचे वाचन करू शकता. दुसऱ्या उपासनेत ज्या काही महत्वाच्या बाजू अभ्यासील्या आहेत त्या अशा की, वैयक्तिक उपासनेत मनाची निश्चितता व्हावी तशी होत नाही. चित्ताची स्थिरता होत नाही. ’त्यामुळे लगेच उपासनेतून उठून जावे’ असे विचार येवू लागतात. याउलट सामुदायिक उपासनेत पारायण, जप यास बसल्यावर ते पूर्ण होई पावेतो बसण्याचा निर्बंध असतो. त्यामुळे मनाची स्थिरता बऱ्याच प्रमाणात होत राहते. सतत या समुदायिक पध्दतीने उपासना केल्यावर वैयक्तिक उपासनेत कोणत्याही प्रकारे व्यत्यय आल्यास मनाची स्थिरता ढळत नाही. काही कारणाने वैयक्तिक उपासनेत मनाची स्थिरता होत नाही असे वाटेल, त्यावेळी सामुदायिक उपासनेत बसणे योग्य आहे. कारण आपल्यासमवेत बसलेल्या गुरुबंधुच्या स्थिरतेमुळे आपल्या मनाची स्थिरता होणे शक्य होते. या शिवाय एकमेकांमध्ये भेदभाव विसरण्यास हे एक उत्तम असे साधन आहे. आज दिवसाकाठी नोकरी, धंदा व प्रपंच सांभाळून काहीतरी सेवा हातून घडावी अशासाठी या सामुदायिक पध्दतीने जी उपासना सर्व कार्यकेंद्रावर सुरु आहे त्यात पुरुषवर्गासाठी श्री नवनाथ पारायणे व स्त्री वर्गासाठी श्री नवनाथ पारायणे व देवी माहात्म्य पाठ व दोघांसाठी सद्गुरू नाम:स्मरणाचा जप यांचा अंतर्भाव होतो. श्री नवनाथ परायणाची पद्धत ही एका वेळी नऊ जणांनी बसून, नऊ नाथांना आवाहन करून पोथी वाचन करावयाचे अशी आहे. एकूण चाळीस अध्याय नऊ जणांमध्ये विभागून घेऊन वाचन केले जाते. त्यास साधारणपणे दोन ते अडीच तास लागतात. रोज सायंकाळी आरती नंतर सामुदायिक उपासना होत असते. त्यात सद्गुरु नामःस्मरणाचा जप हाही सामुदायिकपणे मोठ्याने म्हणून केला जातो. आपण विचारलेल्या प्रश्नात जेव्हा काही निराकरण सांगितले जाते, तेव्हा आपल्याला स्वतःच्या जीवनाबद्दल आत्मविश्वास, देवाबद्दल श्रध्दा व सबूरी निर्माण झाल्याशिवाय प्रत्यक्ष देवाला जरी तुम्ही भेटलात तरी त्या क्षणी तुम्हाला निश्चित काय पाहिजे आहे हे सांगणे कठीण आहे. आपण वारंवार विचारीत असलेले कित्येक किरकोळ प्रश्न हे उपासनेमुळे निर्माण झालेल्या आत्मविश्वासामुळे सहजगत्या सुटू शकतील. आज बरीच कुटुंबे जीवनाची इतकी अनिश्चितता घेऊन प्रश्न विचारण्यास येतात की, त्यासंबंधी मार्गदर्शन करूनसुध्दा ते स्वतः निश्चित नसल्याने सांगितलेल्या निराकरणाबद्दल आत्मविश्वास निर्माण करीत नाहीत. त्यामुळे समितीच्या सिध्दसिध्दांत पध्दती या जरी दु:ख कारणमीमांसेला ऋणमुक्त करण्यासठी सांगितल्या जातात, तरी त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या अनिश्चिततेमुळे मिळू शकत नाही.

आता आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे घराण्यातील काही वडिलोपार्जीत उपासना. कित्येक वेळा घराण्यामध्ये वाडवडिलांच्या हातून दत्त उपासना, शंकर उपासना किंवा अन्य देवतेच्या उपासना या झालेल्या असतात. व पुढील पिढीत जर काही भिन्न देवतांच्या किंवा गुरुपरंपरेच्या उपासना तुम्ही सुरु केल्या, तर त्याचे फल मिळण्यास बराच काळ जावा लागतो. योग्य प्रकारे गुरुपरंपरेतील व्यक्तीकडून मार्गदर्शन झाले तर त्या वडिलोपार्जीत उपासना आजच्या उपासनेला जोडून घ्यावयास लागतात. तरच वडिलोपार्जीत पुण्याईचा भाग हा आपल्याला मिळू शकतो. आज बरीच भक्तभाविक मंडळी आपल्या थोड्याशा उपासनेने अहंकार निर्माण करून असे सांगतात कीं, ‘आमचे सर्वस्व आता बाबा किंवा स्वामी. मी माझ्या कुलदेवदेवतांचा माझ्या घराण्याशी असलेला संबंध जाणत नाही.’ असे विचार प्रकट करण्याने तुम्ही तुमची दैवदैवते नित्य उपासनेतून बाजूला करीत असला तरी तुमच्या मुला-बाळांना त्यांचीच उपासना करणे भाग पडणार आहे. तेव्हा आपण नित्य उपासनेमध्ये वडिलोपार्जीत जे कुलधर्म, कुलाचार आहेत, त्या उपासनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

आता यापुढील महत्वाचा मुद्दा म्हणजे नित्य उपासनेसाठी गुरु-दीक्षा घेणे हा होय. तत्सबंधी आज समाजात बराच कटू अनुभव आलेला आहे. तरीसुध्दा काही भक्त-भाविक मंडळी देवधर्माच्या आहारी जावून अशा गुरुदीक्षेच्या विधीस बळी पडतात. या विधीसंबंधी जगतात आजपर्यंत प्रत्येकजण अनेक तऱ्हेचे शास्त्राधार सांगत आले आहेत व कालांतराने सांगतील. परंतु या दीक्षेसंबंधी समितीची काही स्पष्ट भूमिका आहे ती आपणासमोर मांडणे आपल्या हिताचे होईल. या मार्गात गुरुदीक्षेसंबंधी असे स्पष्ट सांगावयाचे आहे की ज्या कोणा भक्त-भाविकांस जो कोणी सिध्दसाधक अशी गुरुदीक्षा देईल त्याने त्या भक्तास देवऋण, पितृऋण व गुरुऋण यातून स्वतःच्या अधिकाराने मुक्त करावयास पाहिजे. याशिवाय त्या भक्ताच्या जन्मजन्मांत काया, वाचा, मनाने जे काही प्रमाद, पातके घडली असतील त्यासाठी वैयक्तिक कर्मविपाक करावयास पाहिजे. तरच आज घेतलेल्या गुरुदीक्षेचे फल उपासना मार्गाने मिळेल. या गुरुदीक्षा देणाऱ्या सिध्द-साधकांची जबाबदारी आज समाजाच्या परिस्थितीच्या दृष्टीने फार मोठी आहे व होती. या मार्गासाठी मनुष्य आपले सर्वस्व अर्पण करण्यास काही वेळा तयार झालेला असतो. अशा वेळी सिध्द-साधकांनी स्वतःचा स्वार्थ न पाहता देवाच्या शोधार्थ निघालेला, उपासनेने वेडा झालेला, सिध्द-साधक म्हणजे सर्वस्व मानणारा असा,भक्त यास त्याची ही भावना व श्रध्दा लोककल्याणासाठी कारणी लावायला पाहिजे. परंतु ते न होता अशा परिस्थितीत असे विचित्र मार्गदर्शन होते की, ‘तू या क्षणी हिमालयावर जा, बद्रिनारायणास जा किंवा गिरिनारला जा म्हणजे तुला देव भेटेल’. अशा या गुरुपदेशाने आज बऱ्याच घराण्यातील लोकांना दु:ख व यातना सहन कराव्या लागत असून अशा या गुरुमहाराजांना आपण केलेल्या उपदेशाची आठवणसुध्दा नाही. गेल्या पन्नास पाऊणशे वर्षात समाजात ती धार्मिक विचारांची प्रेरणा निर्माण झाली आणि अशा वेळी रुद्राक्षमाळा आणि लंगोटी घातलेले सत्पुरुष म्हणून जे पुढे आले, त्यांच्या पायावर अनेक लोकांनी भावनेच्या आहारी जावून आपले सर्वस्व अर्पण केले. या पैशांचा विनियोग गोरगरीबांच्या कल्याणासाठी झाला असता, तर त्यांचे समाजकार्य आपल्यासमोर आले असते. परंतु ते न होता तो पैसा चुन्यामातीची देवळे व मठ बांधण्यासाठी खर्च केला. अशा वेळी या सिध्द-साधकांचा एक शब्द लाखाचा होता. त्याचा उपयोग समाजकल्याणाच्या विचारांनी न करता स्वतःची महती वाढविण्यासाठी करून देवधर्माचे थोतांड माजविले. यास समाजकल्याण म्हणता येईल का ? आज त्यांच्या पश्चात ज्या ठिकाणी या सिध्द-साधकांनी लाखो रुपयांची समाजाची भावना मातीमोल केली  तेथे आज त्यांचे अस्तित्व विटामातीच्या घराशिवाय काहीही नाही, हा सुध्दा समाजात एक अधर्मच झाला.

या सिध्द-साधकांनी त्याच्या आहारी गेलेल्या प्रत्येक भक्ताच्या मनोमंदिरात माणूस-धर्माची स्थापना करून नि:स्वार्थपणे पैशाचा विनियोग गोरगरीबांच्या शिक्षणार्थ व रोगनिवारणार्थ केला असता तर आज समाजाची शिक्षण व वैद्दकीय सहाय्याच्या अभावी झालेली विकृत अवस्था दिसली नसती. ज्याला सद्गुरुची कृपा पाहिजे, ज्याला वैयक्तिक उन्नती करून घ्यावयाची आहे किंवा गुरुपरंपरा चालवायची आहे त्याला आजच्या परिस्थितीत एखादे नवीन मंदिर किंवा मठ किंवा आश्रम स्थापन करावयाची आवश्यकता वाटते, याचा अर्थ काय ? ज्यांना देवाचे अस्तित्व कळते, ज्यांना देवादिकांच्या आज्ञेने दुसऱ्याचा पै-पैसा घेऊन मठ बांधावा हे कळते, त्यांना समाजात काय दु:खे आहेत, ते कळू नये ? पण ही भावना यावी कशी ?व्यक्तीमहत्वाच्या विषाने धुंद झाल्यावर समाजाची भावना काय व पैसा काय, याचा विचार कोण करणार ? ज्याला खरोखरीच धर्मकर्मपरंपरा, गुरुपरंपरा चालवावयाच्या आहेत, त्यांनी नवीन काही निर्माण न करता आज जी पुरातन देवळे सुंदर व सुसज्ज आहेत त्या ठिकाणी हे सिध्द-साधक जाते तर त्याही देवळांचा जिर्णोध्दार होता ! व नव्याने एखादे देऊळ व मठासाठी समाजाचा वापरलेला पैसा वरील लोककल्याणार्थ किंवा परोपकारार्थ आला असता, तर हे सत्य समितीच्या कार्यपध्दतीपुढे असल्याने आज येणाऱ्या शेकडो भक्तभाविकांच्या भावनेत प्रेमाचे मंदिर, तेही, ‘मानवता’ धर्मासाठी स्थापन करावयाचे आहे व ज्या लोकांच्या प्रेमाने व सहकार्याने कार्य करण्यास वाव मिळेल, तो घेऊन समाजसेवा करावयाची आहे. त्या सेवेत इतरांना सुखसमाधान देण्यासाठी अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान या व्यतिरीक्त काया, वाचा, मनाने जे जे प्रयत्न करावे लागतील, ते करीत असता आपल्या हातून कोणाचा अपमान, उपमर्द, तिरस्कार अगर कोणाच्या शरीराला अथवा मनाला क्लेश देण्याजोगे एकही कृत्य घडता कामा नये. यासच समिती वैयक्तिक उपासना समजते. नित्याचरणात याची सवय लावून धनार्जनाच्या कामी असत्य,अन्याय, कपट, फसवेगिरी किंवा चोरी ही कोणत्याही कारणास्तव ऐहिक वासनेच्या सुखासमाधानासाठी होता कामा नये, याची सदैव आठवण असणे व त्याप्रमाणे जीवनात ज्ञान-अज्ञानाने न घडणे यालाच समिती सामुदायिक उपासना असे समजते. आपणासमोर मांडलेली या कार्याची भूमिका ही वैयक्तिक स्वरुपाची नसून आपण सर्वजण आहात.

वैयक्तिक व सामुदायिक उपासनेला उपासकाशिवाय त्याच्या आप्त, इष्ट, स्वकीय, यांच्या कल्पना किती अज्ञानाच्या असू शकतात हे खूप प्रकाराने पहावयास मिळते. ते म्हणजे दैवी उपासना ही आर्थिक प्राप्तीसाठी असते याचे गणित ते सोडविण्याचा ते प्रयत्न करीत असतात. परंतु दैवी उपासना ही आर्थिक प्राप्तीशिवाय अन्य प्राप्तीचे लक्षण आहे, याचा अनुभव अशांना आलेले नसतो. दैवी उपासना व तिचा मार्ग हा आथिर्क प्राप्तीचा मार्ग नाही तरी झालेली आर्थिक प्राप्ती निरर्थक होऊ नये यासाठी आहे हे येथील सेवेचे उपासक झाल्याशिवाय कोणत्याही बाह्य जगातील अन्य शास्त्राधाराने पटण्यासारखे नाही. उपासनेने मन, विचार, व बुध्दी यांचे संवर्धन होत असते. ते आर्थिक रुपात दाखविणे कदापिही शक्य होणार नाही. जसे शरीर संवर्धनासाठी व्यायाम केला तर तिसरा हात निर्माण होऊ शकत नाही किंवा तिसरा पाय निर्माण होऊ शकत नाही तर त्या शरीरातील ते अवयव व्यायामाने धष्टपुष्ट होऊन रोग प्रतिकार करण्यास सर्मथ होतात. तद्वतच उपासनेने आर्थिक प्राप्ती न होता मन, विचार व बुध्दी यांचे संवर्धन होते. त्यामुळे जीवनात येण्याऱ्या कोणत्याही आपत्तीस तो आपल्या ध्येय् साधनेपासून परावृत्त होऊ शकत नाही. आज अशा निश्चित उपासना पध्दतीमुळे ज्यांना आपल्या जीवनातील लागलेली व्यसने सोडता आली, ती ते उपासनेशिवाय सोडू शकले असते काय ? जीवनात इंद्रियनिग्रह करण्यासाठी उपासना पध्दतीसारखा मार्ग नाही. हे सत्य आपणासमोर नुसते तात्त्विक विवेचन म्हणून मांडले जात नसून पूर्वी जी मंडळी गेल्या चाळीस वर्षापासून व्यसनाधीन झालेली होती अशांची व्यसने कायमची सुटली. एकवेळ मनुष्य शारीरिक यातना सहन करील, परंतु व्यसन सोडू शकणार नाही. पण तेही सुटू शकते व ते इंद्रियनिग्रह झाल्यावर सुटते हा इंद्रियनिग्रह करण्याचा निश्चय म्हणजेच उपासनेचा गुरुप्रसाद ! इंद्रियनिग्रह झाला म्हणजे आर्थिक प्राप्ती झाल्यासारखेच आहे. तर सूज्ञ भक्त भाविकांनी आपल्या दैनंदिन उपासनेतुन आर्थिक प्राप्तीचा लाभ न शोधता निरनिराळ्या वासनांची पूर्तता होऊन किंवा निरनिराळ्या व्यसनांपासून जीवन कसे मुक्त झाले याचा लाभ घ्यावा. आर्थिक प्राप्तीची वाढ हा काही जीवनातील निरंतर स्वरुपाचा ठेवा नाही. कदाचित उपासनेपासून तुम्ही तुमची आर्थिक प्राप्ती वाढवाल पण तीच जाण्यासाठी तुमची व्यसने किंवा वासना जर कारण झाल्या तर त्या आर्थिक प्राप्तीचा फायदा काय ? कदाचित तुमच्या उपासनेमुळे तुमची आर्थिक प्राप्ती वाढली व मुलाबाळांच्या मनावर जर योग्य प्रकारचे संस्कार झाले नाहीत, तर त्या प्राप्तीचा नाश मुले-बाळे करतील, म्हणजे केव्हा न केव्हा उपासनेपोटी निर्माण केलेला हा अर्थ जीवनात अनर्थ निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. तर खऱ्या भक्त भाविकांनी नित्य उपासनेची सवय स्वत:पासून ते मुला-बाळांपर्यंत सर्वांना लावणे याच्या इतका आर्थिक लाभ जगात कोणताही नाही ! ज्याला प्राप्त झालेल्या जन्माचे कर्तव्य आणि कार्य इतरांना सुख समाधान देण्यासाठी आहे हे समजत नाही तोपर्यंत असा स्वार्थी समाज उपासकास उपहासाने आर्थिक प्राप्तीची वाढ विचारीत राहणार !

<<अध्याय ३ कार्यपध्दती.

>>अध्याय ५ स्पर्श संवेदना व ज्ञान संवेदना